श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय पाचवा
कच आणि देवयानी यांची कथा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
वैशंपायन म्हणे जनमेजया । श्रवण करीं पवित्र राया ।
चतुराननापासूनियां । दहावा ययाति जाणिजे ॥ १ ॥
जनमेजय म्हणे कथा समस्त । ऐकावया मी आर्तभूत ।
कर्ण जहाले अति क्षुधित । श्रवणभोजन देइजे ॥ २ ॥
वैशंपायन म्हणे सावधान । देवदैत्यांसीं वैर मुळींहून ।
इंद्रपद घ्यावया हिरोन । दैत्यीं उपाय निर्मिले ॥ ३ ॥
युद्ध करितां अद्भुत । निर्जर जर्जर जाहले समस्त ।
अपार मृत्यु पावती दैत्य । नाहीं गणित सर्वथा ॥ ४ ॥
परी जपून मंत्र संजीवनी । शुक्र उठवी दैत्यां तेच क्षणीं ।
विबुध पडती समरांगणीं । त्यांसी उपाय चालेना ॥ ५ ॥
अमृतसंजीवनी पाहीं । बृहस्पतिपाशीं मंत्र नाहीं ।
पाकशासनाचे हृदयीं । चिंतारोग पर्वतला ॥ ६ ॥
मग बृहस्पतीचा पुत्र । कचनामा अति पवित्र ।
गुणनिधि परम चतुर । कार्यसाधनीं नेटका ॥ ७ ॥
तयांते एकांतीं नेऊनी । सांगता जाहला कुलिशपाणी ।
म्हणे तूं शुक्रापाशीं जाउनी । संजीवनी साधीं कां ॥ ८ ॥
थोरपण अभिमान । मी एक जाणता सर्वज्ञ ।
मी असें देवगुरुनंदन । हें सर्वही सांडिजे ॥ ९ ॥
परम प्रीति धरुनि जीवीं । शत्रूशीं मैत्री करावी ।
शुक्रास प्रार्थून विद्या घ्यावी । अनालस्येंकरुनि ॥ १० ॥
गुरुशुश्रूषा करुन अपार । विद्या साधिती परम चतुर ।
कीं पुष्कळ धन देऊनि साचार । विद्यासमुद्र शिष्य होती ॥ ११ ॥
अथवा आपुली विद्या गुरुस देती । दुसरी त्यापासून साधिती ।
चौथा उपाय निश्चितीं । विद्यासाधनी असेना ॥ १२ ॥
तरी प्रेमभावेंकरुन । कवीस निघावें तुवां शरण ।
नाना कष्ट पीडा सोसून । आपुलें कारण साधावें ॥ १३ ॥
तूम चातुर्यसिंधु यथार्थ । तुज काय शिकवावें बहुत ।
आदित्यास प्रभा अत्यंत । पाडीं म्हणावें न लगे हें ॥ १४ ॥
मृगमद आणि रंभासुत । हे पहिलेच सुवासिक अत्यंत ।
चंदन स्वांगें सुगंध बहुत । साह्य न लगे दुसरे पैं ॥ १५ ॥
तैसा तूं चातुर्यभांडार । तुज सांगणें न लगे वारंवार ।
मग वाचस्पतीस करुन नमस्कार । आज्ञा घेतली शक्राची ॥ १६ ॥
कच जात त्वरेंकरुन । मार्गीं जाहले दिव्य शकुन ।
दैत्यपुरींत येऊन । निःशंक मनें चालिला ॥ १७ ॥
सभा घनवटली अपार । मुख्य वृषपर्वा दैत्येंद्र ।
पूज्य त्याचा गुरु शुक्र । उच्चस्थलीं बैसला ॥ १८ ॥
त्या सभेस कच येऊन । मुखें जयजयकार करुन ।
घालिता जाहला लोटांगण । आदरें कवीस तेधवां ॥ १९ ॥
उभा ठाकला कर जोडून । म्हणे मी आहें देवगुरुनंदन ।
आलों निष्कपट तुज शरण । तनुमनधनेंकरुनियां ॥ २० ॥
मी विद्यार्थी तुझा दीन । नीच सेवा जे असेल पूर्ण ।
तीच सांगावी मजलागून । आलो शरण यालागी ॥ २१ ॥
ब्रह्मचर्यव्रतस्थ । सहस्त्र वर्षेपर्यंत ।
सेवा करीन निश्चित । अनालस्येंकरुनियां ॥ २२ ॥
विरोध असेल वडिलांशीं । तो संबंध नाहीं मजशीं ।
मी निष्कपट मानसीं । शरण तुजसी पातलों ॥ २३ ॥
शरण आलों असें तुज । उपेक्षितां जाईल लाज ।
मज देवांशीं नाहीं काज । पुत्र तुझा मी आहें ॥ २४ ॥
कवि विचारी मनांत । हा मनाचा निर्मल दिसत ।
येणें सेवा करितां अद्भुत । बृहस्पति शिष्य आमुचा ॥ २५ ॥
पिता तोचि बोलती पुत्र । येथें नाहीं अन्य विचार ।
ही श्लाघ्यता आम्हांस थोर । शिष्य गुरुसुत आमुचा ॥ २६ ॥
मग म्हणे वत्सा पाही । मम गृहीं तूं अवश्य राहीं ।
विद्या अभ्यासीं सर्वही । दुर्लभ ज्या कां त्रिभुवनीं ॥ २७ ॥
मग दुर्वा सुमनें अर्घोदक । जल काष्ठें समिधा देख ।
फल मूल पर्णादिक । आणून नित्य देतसे ॥ २८ ॥
सडासंमार्जन पादक्षालन । वस्त्रक्षालन अंगमर्दन ।
व्यजन पिकपात्र धरुन । उभा जवळी सर्वदा ॥ २९ ॥
वेदशास्त्रचर्या गायन । स्तुतिवादें तोषवी मन ।
देवयानी तें देखोन । मित्रत्व वाढवी कचाशीं ॥ ३० ॥
भोजन तांबूल फलाहार । कचावेगळी न करी साचार ।
स्नेह वाढवी अपार । कोठें दूर जाऊं नेदी ॥ ३१ ॥
पंचशत संवत्सर । चढती सेवा करी गुरुपुत्र ।
देवयानीची प्रीती अपार । कचावरी बैसली ॥ ३२ ॥
धेनु घेऊनि वना पाहीं । आचार्याज्ञें नित्य जाई ।
तों दुष्ट दैत्यांनीं लवलाहीं । एकला वनीं लक्षिला ॥ ३३ ॥
म्हणती हा देवगुरुचा सुत । महाकपटी असे धूर्त ।
संजीवनी साधूं आला येथ । लटिकेंचि साधुत्व दावितसे ॥ ३४ ॥
मग तीक्ष्ण्खड्गधारीं । मारुन टाकिला तो वनांतरीं ।
मांस भक्षिलें वनचरीं । वृकव्याघ्रजंबुकीं ॥ ३५ ॥
अस्ता जातां गभस्ती । धेनु पातल्या गृहाप्रती ।
कच न देखोनि चित्तीं । देवयानी खेद करी ॥ ३६ ॥
पितयासी म्हणे देवयानी । वनीं कच मारिला दैत्यांनीं ।
मी प्राण देईन ये क्षणीं । कच माझा न भेटतां ॥ ३७ ॥
भृगुतनय विचारी मनीं । तों कच मारिला दैत्यांनीं ।
मांस भक्षिलें श्वापदांनी । हें सर्व ज्ञानें समजलें ॥ ३८ ॥
मग संजीवनी स्मरोनी । म्हणे वत्सा ये धांवोनी ।
तों अकस्मात कच येऊनी । धरी चरण भार्गवाचे ॥ ३९ ॥
मंत्राचें तेज अद्भुत । श्वापदोदरींचीं खंडें समस्त ।
जडोन देह झाला पूर्ववत । धन्य सामर्थ्य शुक्राचें ॥ ४० ॥
कच सांगे कविलागूनी । दैत्यीं मज वधिलें वनीं ।
दैत्यगुरु म्हणे ते क्षणीं । श्रमलासि बहु वत्सा तूं ॥ ४१ ॥
मग सुमनें आणावया गुरुसुत । एकदा गेला असतां वनांत ।
दैत्य देखोनियां म्हणत । उठविला कीं कवीने ॥ ४२ ॥
म्हणती मग ते न उठे पुढती । ऐशी करावी आतां युक्ती ।
दैत्य मारुनि मागुती । शरीर केलें दग्ध त्याचें ॥ ४३ ॥
मग भस्म अस्थि करुनि चूर्ण । मद्यामाजी मेळवून ।
शुक्रास करविती प्राशन । अत्यादरें करुनियां ॥ ४४ ॥
दैत्य आनंदलें संपूर्ण । कच उठावयाचा खुंटला यत्न ।
देवांचें बळ जाहलें क्षीण । म्हणती हिरोनि घेऊं इंद्रपद ॥ ४५ ॥
तों मावळला वासरमणी । कच न देखे देवयानी ।
पितयापाशीं येऊनी । शोक करी बहुसाल ॥ ४६ ॥
शुक्र म्हणे मारिला दैत्यांनी । मद्यांत घातला घोंटूनी ।
पुढती न उठे मागुतेनी । देवयानी रडे तेव्हां ॥ ४७ ॥
शुक्र बाहे म्हणे रे वत्सा । कोठें आहेस बाळा कचा ।
येरु म्हणे मी पुत्र साचा । त्वदुदरींच वसतसें ॥ ४८ ॥
मी भाग्याचा बहुवस । तुझे उदरीं जाहला वास ।
ठाव नाहीं बाहेर यावयास । केला विपर्यास दैत्यांनीं ॥ ४९ ॥
कवि म्हणे कन्येलागून । कच उठवितां मजला मरण ।
मी वांचलिया कचदर्शन । नव्हे कदा तुजलागीं ॥ ५० ॥
तुज्ला आवडे कोण । मज सत्वर सांग वचन ।
देवयानी म्हणे हें कठिण । न व्हावें मरण दोघांसीं ॥ ५१ ॥
आतां एक करीं ताता । संजीवनीं देईं गुरुसुता ।
तो बाहेर येऊनि तत्त्वतां । पुनः तुजला उठवील ॥ ५२ ॥
शुक्र विचारी मनांत । कच जाहला माझा सुत ।
संजीवनीं विद्या हे अद्भुत । करावे प्राप्त तयातें ॥ ५३ ॥
कच न उठतां जाण । देवयानी देईल प्राण ।
तरी संजीवनी मंत्र संपूर्ण । शिकवावा कचातें ॥ ५४ ॥
म्हणे जीवतनुजा मम सुता । न्यासबीजासहित आतां ।
संजीवनी मंत्र घे तत्त्वतां । अवश्य ताता कच म्हणे ॥ ५५ ॥
आतां ब्रह्महत्यारे चाडांळ । क्षय पावती दैत्य सकळ ।
मग कवींद्र होऊनि दयाळ । एकांतीं सांगे संजीवनी ॥ ५६ ॥
तुवां केली सेवा बहुत । त्याचें फळ हें तुज प्राप्त ।
माझी विद्या सुफळ हो समस्त । प्रेतें उठवीं देवांचीं ॥ ५७ ॥
भगवंतें उदरींच देख । उपदेशिला जैसा शुक्र ।
कीं गर्भी असतां दैत्यबाळक । नारदें त्यास उपदेशिलें ॥ ५८ ॥
तैसी संजीवनी ते समयीं । प्रतिष्ठिली कचाचे हृदयीं ।
जैसें प्राणसखयास पिता सर्वही । ठेवणें आपुलें दावीतसे ॥ ५९ ॥
विद्या दिधलीया समस्त । म्हणे कचा बाहेर ये त्वरित ।
उठवीं तूं माझें प्रेत । संजीवनी जपोनियां ॥ ६० ॥
मग तो बाहेर येत हृदय भेदून । कीं उदय पावे रोहिणीरमण ।
तैसा प्रकटला गुरुनंदन । तों कवि अचेतन पडियेला ॥ ६१ ॥
कच सदगदित ते वेळीं । म्हणे धन्य तूं गुरुमाउली ।
मग मत्रं जपोनि तेच वेळीं । कविराव उठविला ॥ ६२ ॥
निद्रित उठे अकस्मात । तैसा उठला शुक्र त्वरित ।
कच धांवोनि चरण धरित । प्रेमें क्षालित नयनोदकें ॥ ६३ ॥
उभा ठाकला कर जोडून । आरंभिलें गुरुस्तवन ।
म्हणे त्रिभुवनींचें गुरुत्व संपूर्ण । एकवटलें तुझे ठायीं ॥ ६४ ॥
सकळ गुरुरत्नैकपदक । त्यांत वरिष्ठ तूं मध्यनायक ।
द्वादश गुरुत्वें असती देख । स्वामी ऐका अनुक्रमें ॥ ६५ ॥
धातिर्वादी गुरु प्रथम जाण । दुसरा गुरु जाणिजे चंदन ।
तिजा विचार गुरु पूर्ण । अनुग्रह गुरु चौथा पैं ॥ ६६ ॥
परीस गुरु पांचवा । कच्छ्प जाणिजे सहावा ।
सातवा चंद्र गुरु ओळखावा । दर्पण आठवा जाणिजे ॥ ६७ ॥
नववा जाणिजे छायानिधि । दहावा नाद निधि त्रिशुद्धि ।
क्रौंचपक्षिणी कृपानिधि । अकरावा तो ओळखे ॥ ६८ ॥
सूर्यकांतकार्पासप्रकार । हा बारावा शेवटीं निर्धार ।
यांचा अर्थ साचार । अनुक्रमें ऐकिजे ॥ ६९ ॥
धातुर्वादी गुरु तो कोण । शिष्याहातीं करवी तीर्थाटन ।
नाना साधने साधून । शेवटीं ज्ञान प्राप्त होय ॥ ७० ॥
एक अभक्तांस दूर करुन । भक्तासी तारी समागमें पूर्ण ।
जैसा मलयगिरिचंदन । सुवासिक करी वृक्ष सर्व ॥ ७१ ॥
परि हिंगण आणि वंश । यांस न करी ससुवास ।
तैसा अभक्त त्यागी भक्तांस । तारी पुरुष साच तो ॥ ७२ ॥
विचार गुरु सारासारपद्धती । श्रवण करवी शिष्यां हातीं ।
शेवटी साक्षात्कार पावती । पिपीलिकामार्गे ॥ ७३ ॥
एका अनुग्रह गुरु देत । त्याचे प्रतापें ज्ञान वाढत ।
सायास न लागती तेथ । ऐसें सामर्थ्य एकांचे ॥ ७४ ॥
पांचवा गुरु परीस जाण । स्पर्शें लोहाचें करी सुवर्ण ।
तैसें जयाच्या स्पर्शेंकरुन । दिव्य ज्ञान साधका ॥ ७५ ॥
कच्छ्पगुरु तोचि पाहें । कृपावलोकनें लवलाहें ।
विलोकितांच ज्ञान होये । कूर्मिणी पाहे पिलीं जैसी ॥ ७६ ॥
उदय पावतां चंद्र । चंद्रकांतास फुटे पाझर ।
दयावंत होतां अंतर । दूरचे साचार शिष्य तरती ॥ ७७ ॥
आठवा गुरु दर्पण । दर्शनें होय स्वरुपज्ञान ।
ऐसें तयाचें सामर्थ्य पूर्ण । सायास कांहीं न लागती ॥ ७८ ॥
छायानिधि पक्षी अवधारीं । जो गगनीं वास्तव्य करी ।
त्याची छाया पडे ज्याचे शिरीं । मग पृथ्वीपति तो होय ॥ ७९ ॥
तैसें ज्या पुरुषाचें दुर्लभ दर्शन । अवचट कृपाकर लागतां पूर्ण ।
कैवल्यप्राप्ति दिव्य ज्ञान । स्पर्शमात्रें होय पै ॥ ८० ॥
आतां नादनिधी महामणी । जे धातूची ध्वनि पडे कानीं ।
दृष्टि न देता स्वस्थानीं । सुवर्ण होती सर्व धातु ॥ ८१ ॥
तैसी ज्या पुरुषाची करणी । ऐकतां मुमुक्षु कारुण्यवाणी ।
दर्शन न होतां तेच स्थानीं । दिव्य ज्ञान प्रकटत ॥ ८२ ॥
आतां जैसी क्रौचपक्षिणी । समुद्रतीरीं पिलें ठेवूनी ।
चारा घ्यावयालागूनी । दूर देशाप्रति जाय ॥ ८३ ॥
षण्मासपर्यंत काल क्रमित । पिलीं इकडे तैसींच जीत ।
क्षणाक्षणां तें आठवूनि मनांत । बाहे ऊर्ध्वमुख करुनी ॥ ८४ ॥
त्याच स्नेहें निश्चितीं । पिलीं येथें पुष्ट होती ।
तेवीं तो आठवी ज्यांसी चित्तीं । ते तरती स्वस्थानीं ॥ ८५ ॥
सूर्यदर्शनें सूर्यकांतांत । अग्नि पडे अकस्मात ।
कार्पास तत्काल दग्ध होत । इच्छा नसतां सूर्याची ॥ ८६ ॥
तैसी इच्छा न धरितां अकस्मात । त्याची दृष्टि जिकडे झळकत ।
तो पुरुष विदेहत्व । पावे तत्काल तेथेंचि ॥ ८७ ॥
ऐसीं द्वादशगुरुत्वें पूर्ण । ओंवाळावीं तुजवरुन ।
ऐकतां कचाचें स्तवन । कविश्रेष्ठ संतोषला ॥ ८८ ॥
कचासी दिधले अलिंगन । करें कुरवाळिलें वदन ।
म्हणे चांडाळ दैत्य दुर्जन । तुज मारुन टाकिलें ॥ ८९ ॥
मद्यात घालूनि तुज । दुर्जनीं पाजियेलें मज ।
तरी विष्णुहस्तें निर्लज्ज । संहारती सर्वहि ॥ ९० ॥
आजपासून मद्यपान । जो कोणी करील ब्राह्मण ।
तो नीच अनामिकाहून । नरक दारुण भोगील ॥ ९१ ॥
ती शुक्राज्ञा अवधारा । न मोडावे हरिहरां ।
मद्यपान करितां विप्रा । प्रायश्चित्तचि तात्काळ ॥ ९२ ॥
असो सहस्त्र वर्षें जाहलीं पूर्ण । कचास म्हणे भृगुनंदन ।
आतां स्व -स्थला जाऊन । आपुला श्रम करीं दूर ॥ ९३ ॥
नमस्कारुनि गुरुचरण । निघता जाहला गुरुनंदन ।
तों देवयानीनें येऊन । पदरीं स्नेहें धरियेला ॥ ९४ ॥
म्हणे म्यां तुझी धरिली आस । तूं सुंदर निर्दोष पुरुष ।
असुरीं मारुनि निःशेष । दोन वेळा टाकिलें ॥ ९५ ॥
म्यां शुक्राचार्यासी बोधिलें । दोन वेळां तुज जन्मविलें ।
मानस तव पदीं गुंतलें । वरीन वेगें तुजलागीं ॥ ९६ ॥
विद्याविनयसंपन्न । तुजसारिखा नाहीं आन ।
मजसारिखी दुसरी कामीन । त्रिभुवनांत असेना ॥ ९७ ॥
अमृतसंजीवनी विद्या पूर्ण । तुज प्राप्त जाहली माझेन ।
मज वरितां भृगुनंदन । स्नेह वाढवील विशेष ॥ ९८ ॥
कच बोले आदरें । तुम्ही आम्ही एकोदरें ।
बंधु भगिनी निर्धारें । नाहीं दुसरें सापत्न ॥ ९९ ॥
तुज मज जननस्थान । कवींद्राचें उदर पूर्ण ।
जेष्ठभगिनी मातेसमान । झणीं वचन बोलसी ॥ १०० ॥
यावरी देवयानी बोलत । कचा तूं नष्ट परम धुर्त ।
माझे न पुरविसी मनोरथ । कपट साधुत्व तुझें हें ॥ १०१ ॥
संजीवनीमंत्र निर्मळ । होईल तुझा निष्फळ ।
बीजें व्यर्थ गेलीं सकळ । समयीं फळ न देती ॥ १०२ ॥
कच म्हणे देवयानीसी । विचार न करतां मज शापिसी ।
तूं ब्रह्मकन्या निश्चयेंशीं । क्षत्रियासी वरसील पैं ॥ १०३ ॥
कदा न वरीच ब्राह्मण । तुज शाप नेदीं मी कठिण ।
तूं स्नेह केला असाधारण । गुरुनंदिनी विशेष ॥ १०४ ॥
मज मंत्र न फळे निःशेष । तरी उपदेशीन दुजयास ।
कार्य चालेल विशेष । गुरुप्रसादेंकरुनी ॥ १०५ ॥
ऐसें बोलूनि तारासुत । शक्रपदास पावला त्वरित ।
सामोरा येऊनि शचीनाथ । सन्मानित गुरुसुता ॥ १०६ ॥
देऊनियां क्षेमालिंगन । दिव्य यानीं बैसवून ।
वाद्यगजरेंकरुन । मिरवीत नेला स्वस्थाना ॥ १०७ ॥
वंदूनिया गुरुचरण । समीप बैसे सफस्त्रनयन ।
कचें सांगिताले वर्तमान । शक्र ऐकोनि तोषला ॥ १०८ ॥
सबीजमंत्र ते वेळां । कचें गुरुस सांगितला ।
पतीतिसमवेत फळला । आनंदला देवराव ॥ १०९ ॥
दिव्याभरणीं दिव्यवसनीं । गुरु कच पूजिले दोन्ही ।
देव समस्त लागती चरणीं । धन्यकरणी कचाची ॥ ११० ॥
इकडे शुक्रशिष्य वृषपर्वा । जो दैत्यांमाजी म्हणती मघवा ।
दैत्यसमुदाय आघवा । आज्ञा शिरीं वंदीतसे ॥ १११ ॥
तों शर्मिष्ठा जे दैत्यकुमारी । लावण्यसमुद्रींची लहरी ।
देवांगना न पावती सरी । आवडे सुंदरी पितयातें ॥ ११२ ॥
शुक्रकन्या देवयानी । सौंदर्यरत्नांची दिव्य खाणी ।
वनक्रीडेस दोघीजणी । निघत्या जाहल्या एकदा ॥ ११३ ॥
परिचारिका दहा सहस्त्र । स्त्रियांचाच सर्व दळभार ।
शर्मिष्ठा देवयानी सुंदर । प्राणसख्या परस्परें ॥ ११४ ॥
देखती रमणीक उद्यान । नंदनवनाहून सुंदर गहन ।
त्यांत सरोवर निर्मळजीवन । मराळ तीरीं क्रीडती ॥ ११५ ॥
शर्मिष्ठा आणि देवयानी । तेरीं वसने भूषणें ठेवूनी ।
सखियासमवेत नग्न होउनी । सरोवरजीवनीं क्रीडती ॥ ११६ ॥
कमळें तोडोनि करीं घेती । परस्पर जळ शिंपिती ।
नाना कुसरी गायन करिती । अप्सरा जैशा दिव्य पैं ॥ ११७ ॥
सेनेसहित पुरंदर । मार्गीं चालतां दळभार ।
स्त्रिया क्रीडतां सत्वर । वायु वेगें सुटला ॥ ११८ ॥
अनिलवेगेंकरुनी । वस्त्रे जाती गुंडाळूनी ।
दूरी ऐकतां पुरुषवाणी । घाबर्या कामिनी धांविन्नल्या ॥ ११९ ॥
शर्मिष्ठेचें दिव्य वस्त्र । भार्गवी नेसली सत्वर ।
तिचे क्षीरोदक पवित्र । राजकन्या ओढीतसे ॥ १२० ॥
दूर गेले निर्जरभार । मग सावध होऊनि समग्र ।
अंबरें आपुलीं सत्वर । परस्पर लक्षिती ॥ १२१ ॥
क्रोधायमान देवयानी । शर्मिष्ठेस बोले कठोरवाणी ।
तूं परम नष्ट राजनंदिनी । वसन माझे नेसलीस ॥ १२२ ॥
तूं अपवित्र परम निषिद्ध । पितृभाग्याचा चढला मद ।
माझा पिता शुक्र प्रसिद्ध । त्याच्या वरदें राज्य तुम्हां ॥ १२३ ॥
माझे पितयाचें पादोदक । शिरीं वंदी तुझा जनक ।
राज्य भोगितां सम्यक । शुक्रप्रसाडेंकरुनि ॥ १२४ ॥
ऐकतां कोपली राजकुमारी । तू अश्रिताची कन्या दरिद्री ।
तुझा ताठा न मावे अंबरी । तोंड आवरी शतमूर्खे ॥ १२५ ॥
तुझा बाप भिक्षुक । ठाऊक आहे परान्नभक्षक ।
माझा जनक देतो भीक । मातलीस ते भक्षूनियां ॥ १२६ ॥
आपण आयोग्य बुद्धिमंद । पंडितांशीं करी वाद ।
आपण निःशस्त्री धरुनि मद । धांवतसे रणशूरावरी ॥ १२७ ॥
आपण मागणार भिकारी । दातया सांगे आपुली थोरी ।
तूं तैशीच मूढ निर्घारीं । विप्र भिकारे पिता तुझा ॥ १२८ ॥
शर्मिष्ठेनें दासी लावून । मुष्टिघातें पृष्ठीं मर्दून ।
वनीं कुपामाजी टाकून । आपण गेला स्वस्थाना ॥ १२९ ॥
निःशेष निमाली देवयानी । शर्मिष्ठा गेली संतोष मानूनी ।
तो ययातिराव तये वनीं । मृगयामिषें पातला ॥ १३० ॥
अश्वारुढ एकला । दळभार दूरी राहिला ।
तृषेनें प्रम श्रांत झाला । शोधीत आला कूपापाशीं ॥ १३१ ॥
तों त्यांत स्वल्पोदक । आंत इंदिरेसमान सुरेख ।
ललना करी परम शोक । दीर्घ स्वरें रडतसे ॥ १३२ ॥
ययाति बोले वरुनी । कोणाची तूं सुंदर नितंबिनी ।
कुमारी कीं सुवासिनी । या स्थळीं पडलीस कां ॥ १३३ ॥
म्हणे दैत्यांचा प्राणदाता । उशनाकवि माझा पिता ।
शर्मिष्ठा जी राजदुहिता । तिणें येथें टाकिलें ॥ १३४ ॥
तूं कोण सांग मजप्रती । येरु म्हणे मी राव ययाती ।
देवयानी म्हणे धरीं हातीं । बाहेर काढ राजेंद्रा ॥ १३५ ॥
तूं पवित्र नृपति कुलवंत । मी ब्रह्मकन्या वंद्य अत्यंत ।
माझा धरावया हात । योग्य होसी राजेंद्रा ॥ १३६ ॥
ययाती म्हणे हें थोर यथार्थ । देऊनियां सव्यहस्त ।
बाहेर काढिली त्वरित । स्वरुप अद्बुत न वर्णवे ॥ ॥ १३७ ।
रातोत्पाल सुकुमार । तैसे करतल परम सुंदर ।
परम आरक्त तेजगार ॥ नक्षत्रांऐसे झळकती ॥ १३८ ।
आकर्णनेत्री लावण्यखाणी । उपमेस रंभा मेनका उणी ।
अंगीचा सुवास वनीं ॥ बहकतसे चहूंकडे ॥ १३९ ।
साधकां साधे निधान । कीं रंका सांपडे धन ।
कीं जन्मांधासी आले नयन ॥ तैसा राव संतोषला ॥ १४० ।
म्हणे सुकुमारे गृहास जाईं । स्नेह असों दे निजहृदयी ।
शुक्लपक्षीं लवलाहीं ॥ जैशी वाढे शशिकला ॥ १४१ ।
येरी म्हणे मनींचे आर्त । पुरविणार रमाकांत ।
पुसोन गेला नृपनाथ ॥ भार्गवी जात स्वग्रामा ॥ १४२ ।
नगरासमीप जाऊनि त्वरित । वृक्षाखालीं बैसली रडत ।
घूर्णिकेस देखोन सांगत ॥ वर्तमान सर्वही ॥ १४३ ।
पितयास जाऊनि त्वरें सांग । निर्दय दैत्यांचा सांडीं संग ।
नाहीं तरी करीन देहत्याग ॥ जिव्हा आसडून आपुली ॥ १४४ ।
सांडून दुष्ट हे सकल । शिष्य करावा देवपाल ।
परम सत्वमूर्ति सुशील ॥ वधील सकल दैत्यांसी ॥ १४५ ।
घूर्णिका धांवली त्वरित । शुक्रास जाणवी सर्व मात ।
शर्मिष्ठेनें केला घात ॥ मरुन वाचली देवयानी ॥ १४६ ।
वर्तमान ऐकून साद्यंत । शुक्रवेगें आला धांवत ।
कंठीं धावोनि मिठी घालित ॥ देवयानी पितयाच्या ॥ १४७ ।
भिजली कंचुकी आणि चीर । तुटून गेले मुक्ताहार ।
रडे आक्रोशें सुकुमार ॥ शुक्र शांतवी तियेतें ॥ १४८ ।
काय जाहलें सांग वहिलें । मजला शर्मिष्ठेनें मारिलें ।
वनीं घोर कूपीं ढकलिलें ॥ प्राण जावा म्हणोनियां ॥ १४९ ।
नहुषपुत्र ययाती । तो पातला मृगयेप्रती ।
तेणें मज धरुन हातीं ॥ कूपाबाहेर काढिलें ॥ १५० ।
मारुन लोटिलें कूपांत । याचा खेद न मनीं किंचित ।
परी दुष्टोत्तरें छळिले बहुत ॥ तें न वदवे माझेनी ॥ १५१ ।
ओखटें बोलतां उत्तर । तुटे बहुकालींचा मित्र ।
दुग्धीं कांजी पडतां बिंदुमात्र ॥ घट नाशी दुग्धाचा ॥ १५२ ।
तप्त शस्त्राचे घाय तीक्ष्ण । त्याहून शब्दशस्त्र दारुण ।
त्रिभुवनी वंद्य तुझे चरण ॥ तुज दूषण लाविलें ॥ १५३ ।
मग शांतवून देवयानी । शुक्र पावला दैत्यस्थानीं ।
समस्त उभे ठाकले ते क्षणीं ॥ आचार्यचरण वंदावया ॥ १५४ ।
पूज्यासनीं न बैसे कवी । म्हणे मज आज्ञा द्यावी ।
मजविणें सुखें भोगावी ॥ आचार्यपदवी बुडाली ॥ १५५ ।
ऐसें बोलतां भृगु निश्चित । दैत्यांस वाटला कल्पांत ।
वृषपर्वा धांवोनि पाय धरित ॥ एक घाली पोटांत डोई ॥ १५६ ।
ऋणानुबंध तुटला संपूर्ण । प्राक्तनाचें विचित्र विंदान ।
नेईल तिकडे जावें एथून ॥ ईश्वरी संकल्प अगाध ॥ १५७ ।
म्हणे अपराध जाहला काई । तो सांगावा लवलाहीं ।
आम्हांस मारुनियां जाईं ॥ सर्वांसही ये काळीं ॥ १५८ ।
तुझेनि बळें निर्धारीं । शक्रप्रतिमा घातली तोडरीं ।
विष्णुमहिमा वाणिजे सर्वोपरी ॥ परि आम्ही मानूं तृणप्राय ॥ १५९ ।
प्राणसखयानें विष घातलें । मातेनें बालक आपटिलें ।
तारकें पूरीं ओसंडिलें ॥ तेथें यत्न न चले कीं ॥ १६० ।
रक्षक करुं इच्छित घात । दाता भणंगास दवडीत ।
गुरु कुमार्गेंच लावीत ॥ तेथें यत्न न चले कीं ॥ १६१ ।
आम्हां अंतरतां तुझे चरण । तत्कालचि सर्वांसी मरण ।
अपराध तरी कवण ॥ करीं विदित स्वामिया ॥ १६२ ।
शुक्र बोले तये क्षणीं । तुझे शर्मिष्ठेनें देवयानी ।
ताडन करुन काननीं ॥ कूपामाजी लोटिली ॥ १६३ ।
नहुष पुत्रें काढिली बाहेरी । नये कदा नगराभीतरीं ।
देहत्याग करील निर्धारीं ॥ तुमचे संगें राहतां ॥ १६४ ।
दैत्येंद्र म्हणे आचार्य श्रेष्ठा । तुझिया पादुकांवरुन वरिष्ठा ।
ओंवाळून टाकीन शर्मिष्ठा ॥ आणि देवयानिवरुनि ॥ १६५ ।
आज्ञा देइजे निश्चित । घेईन देहांत प्रायश्चित्त ।
राज्य ओंवाळीन समस्त ॥ तुझिया पादुकांवरुनि ॥ १६६ ।
देवयानी तुझें बालक । आम्ही कोणाचे सकळिक ।
पितयाहून गुरु अधिक ॥ श्रुतिशास्त्रें बोलती ॥ १६७ ।
देवयानीचा अपमान । तेणें शिणलें तुझें मन ।
देव आम्हांसी करिती दीन ॥ तोही अपमान तुझा कीं ॥ १६८ ।
आतां अन्याय घालीं पोटांत । चरण धरिती दैत्य समस्त ।
क्षमा म्हणसी तरी उठों सत्य ॥ नातरी पडूं ऐसेचि ॥ १६९ ।
शुक्र म्हणे जाऊनि वना । देवयानीची करा प्रार्थना ।
ते समजल्यास माझे मना ॥ समाधान सहजची ॥ १७० ।
शुक्र आणि वृषपर्वा दैत्यनाथ । आले देवयानी असे तेथ ।
चरण वंदिती समस्त ॥ अपराध क्षमा करीं माते ॥ १७१ ।
इच्छिसी तें देऊं समस्त । सुरां दुर्लभ ते पुरवूं पदार्थ ।
देवयानी म्हणे त्वरित ॥ देऊं इच्छितां मज जरी ॥ १७२ ।
तरी दहा सहस्त्र दासींसहित । शर्मिष्ठा दासी माझी निश्चित ।
जेथें मज देईल तात ॥ तेथें यावें तियेनें ॥ १७३ ।
ऐसें ऐकतां वृषपर्वा । सेवक पाठवूनियां तेव्हां ।
दासीसमवेत सुदैवा ॥ शर्मिष्ठा त्वरें आणविली ॥ १७४ ।
पिता म्हणे शर्मिष्ठेसी । आमुचें कुल जरी वाढविसी ।
तरि तूं होईं देवयानीची दासी ॥ न करीं मानसीं खेद कांहीं ॥ १७५ ।
येरी म्हणे तूं नांदें अक्षयी । यापरता मज लाभ नाहीं ।
रायें कर धरुनि ते समयीं ॥ देवयानीस दीधली ॥ १७६ ।
असो देवयानी शर्मिष्ठेसहित । तातसदनी प्रवेशत ।
दैत्य स्वगृहीं समस्त ॥ नांदूं लागले तेधवां ॥ १७७ ।
सवें घेऊनि शर्मिष्ठेसी । देवयानी गेली वनक्रीडेसी ।
पावली पूर्वस्थलासी ॥ खेळे मानसीं आनंदें ॥ १७८ ।
तों मृगयाव्यसनें ययाती । पावला त्याच स्थलाप्रती ।
तों देखिल्या बहुत युवती ॥ दोघी जणी श्रेष्ठ त्यांत ॥ १७९ ।
शर्मिष्ठा आणि देवयानी । देखोनि राव निवाला मनीं ।
म्हणे सकल तरुणींच्या स्वामिणी ॥ दोघी जणी सत्य पैं ॥ १८० ।
राव बोले मधुर वचन । मी नहुषपुत्र ययाति जाण ।
सोमवंशध्वज पूर्ण ॥ संतति अत्रि ऋषीची ॥ १८१ ।
देवयानी म्हणे तयासी । शर्मिष्ठा हे माझी दासी ।
मी शुक्रात्मजा जाण निश्चयेंसीं ॥ ओळख मानसीं असेल ॥ १८२ ।
तुवां मज कूपांतूनी । काढिलें कृपाहस्त देऊनी ।
मी होइन तुझी पट्टराणी ॥ पाणिग्रहिणी यथोक्त ॥ १८३ ।
राजा म्हणे तूं ब्रह्मकुमारी । परम कोपिष्ठ त्याहीवरी ।
समर्थ तव पिता निर्धारीं ॥ शुक्राचार्य असुरगुरु ॥ १८४ ।
त्यास न कळतां लग्न । कैसें करावे अप्रमाण ।
येरी म्हणे माझें वचन ॥ परम मान्य पितयासी ॥ १८५ ।
मग दासी पाठविली सत्वर । कवीस सांगितला समाचार ।
परम आनंदला भृगुवर ॥ आला सत्वर ते ठाया ॥ १८६ ।
पातला देखोन कवींद्र । नमस्कारे ययाती राजेंद्र ।
मनोरथ परिपूर्ण ऐसें साचार ॥ बोले गुरुवर दैत्यांचा ॥ १८७ ।
देवयानी बोले वचन । पितया तव उदरींचें हें रत्न ।
त्यास ग्राहक नहुषनंदन ॥ घ्यावयालागीं पातला ॥ १८८ ।
कचें दिधलें शापवचन । दुसरें ब्रह्मसूत्र प्रमाण ।
तरी न करितां अनमान ॥ करीं दान माझें आतां ॥ १८९ ।
आनंदले भृगु आपण । सकल संपत्ति तेथें आणोन ।
यथासांग केलें लग्न ॥ देत आंदण बहुसाल ॥ १९० ।
शुक्र म्हणे ययातीस । तुज सांगणें एक रहस्य ।
तुवां रेतदान शर्मिष्ठेस ॥ सहसाही न करावें ॥ १९१ ।
ही राजतनया निश्चयेंसीं । परी मम कन्येची होय दासी ।
ईस भोगितां निश्चयेंसीं ॥ शापशास्त्रे ताडीन ॥ १९२ ।
कदा न घडे म्हणे ययाती । द्विज म्हणे माझे पाय शिवें हातीं ।
मग प्रमाण करी नृपती ॥ शुक्र चित्तीं आनंदला ॥ १९३ ।
मग शर्मिष्ठेसहित देवयानी । ययाती निघाला घेऊनी ।
जामातासी बोळवूनी ॥ शुक्र गेला स्वस्थाना ॥ १९४ ।
आपुल्या नगरालागून । मिरवत आला नहुषनंदन ।
भार्गवीचे वचन प्रमाण ॥ ययातिराव मानित ॥ १९५ ।
श्रृंगारवनीं नेऊनी । ठेविली ते क्षणी ।
विश्रामसदन बांधोनी ॥ दासी दिधल्या सेवेसी ॥ १९६ ।
पतिसंग वेगळा करुनी । सकळ भोग पुरवी देवयानी ।
शय्याश्रृंगारभोजनीं ॥ आपणास मान देत ॥ १९७ ।
देवयानीचे संगतीं । परम सुखावे ययाती ।
तुच्छ मानी अमरावती ॥ नाहीं गणती आनंदा ॥ १९८ ।
यदु आणि तुर्वस । पुत्र जाहले कवींद्रकन्येस ।
बत्तीस लक्षणी डोळस ॥ रुपें विशेष न वर्णवे ॥ १९९ ।
श्रृंगारवनीं राजसुता । सकळहि भोग भोगितां ।
परी पतिविणें तत्त्वतां ॥ खदिरांगारासमान ॥ २०० ।
म्हणे कर्माची गति गहन । न सुटे कदा भोगिल्याविण ।
मी दास्य पावल्यें पूर्ण ॥ पतिसंग नेणेंचि ॥ २०१ ।
पतिवीण भोग श्रृंगार । वाटती जैसे विखार ।
निद्रा न लागे अणुमात्र ॥ विकल शरीर पडतसे ॥ २०२ ।
जीवनावीण कासार । दीपावीण व्यर्थ मंदिर ।
फलावीण तरुवर ॥ तेविं शरीर व्यर्थ माझें ॥ २०३ ।
तों मृगयामिषें ययाती । पातला त्या वनाप्रती ।
बहुत श्रमला विश्रांती ॥ पावावया तेथें आला ॥ २०४ ।
प्रधानास म्हणे नृपवर । आजी येथें रहावें साचार ।
अवश्य म्हणोन दळभार ॥ केला स्थिर त्या स्थानीं ॥ २०५ ।
शर्मिष्ठेस आनंद बहुत । बाहेर आली अंचल रुळत ।
तिचें सौंदर्य पाहतां रतिकांत ॥ भुलोन वेडा होय पैं ॥ २०६ ।
भोंवत्या तिच्या सहस्त्र दासी । सदा तिष्ठती सेवेसी ।
उदक ठेवूनि रायासी ॥ अभ्यंग करवी शर्मिष्ठा ॥ २०७ ।
आपण स्वहस्तेंकरुन । करी रायास तैलमर्दन ।
मार्जन जाहल्या भोजन ॥ देत आपण शर्मिष्ठा ॥ २०८ ।
राजेंद्राचे भाळीं मृगमदतिलक रेखी वेल्हाळी ।
दिव्यचंदनउटी दिधली । हार घाली स्वहस्तें ॥ २०९ ॥
ऐसा स्वगुणेंकरुन । मोहिला नहुषनंदन ।
राजा म्हणे माझें मन । तुझा संग इच्छीतसे ॥ २१० ॥
परी कोपेल देवयानी । मी काय करुं सांग ये क्षणीं ।
येरी म्हणे मी राजनंदिनी । वरिलें मनीं पूर्वीच म्यां ॥ २११ ॥
मनःसुमनांची माला । तुझे कंठीं घातली नृपाळा ।
तिचें मन राखिसी सुशीला । माझी उपेक्षा करुनियां ॥ २१२ ॥
एकचि सुधारस पूर्ण । प्राशन करिती दोघे जण ।
एकांचे चुकलें मरण । एका मृत्यु न सोडी ॥ २१३ ॥
भागीरथीत स्नान । सप्रेम करिती दोघे जण ।
एकांचे पाप गेलें जळोन । एक तैसाची राहिला ॥ २१४ ॥
परिसाच्या देवास निश्चिती । लोहभक्त दृढ भेटती ।
एकाची जाहली सुवर्णकांती । एक तैसाची राहिला ॥ २१५ ॥
सुवर्णलतिका गुणें समान । कवळिती सुरद्रुमालागून ।
एक सफल जाहली पूर्ण । दुजी निष्फल जाहली कां ॥ २१६ ॥
एका हातें झांकूनि नयन । एका चक्षूनें कीजे अवलोकन ।
हें चतुरांस नव्हे भूषण । लागे दूषण तत्त्वतां ॥ २१७ ॥
असो चातुर्यसुमनेंकरुन । तिणें पूजिला नहुषनंदन ।
पंचबाणे रायाचें मन । भेदिलें पूर्ण नाटोपे ॥ २१८ ॥
क्षेमालिंगन चुंबन । परस्परें देतां पूर्ण ।
सुरतानंदी सदा निमग्न । दोघें जाहलीं तेधवां ॥ २१९ ॥
भोग देऊन ते क्षणीं । राव निघे वेगेंकरुनी ।
हें जरी कळेल देवयानी । तरी अनर्थ करील ॥ २२० ॥
परी शर्मिष्ठा जाहली गरोदर । नवमास भरले सत्वर ।
आवळेजावळे दोघे पुत्र । द्रुह्युअनुनामे जाहले ॥ २२१ ॥
देवयानी चिंतातुर । म्हणे कैसी प्रसवली दोघे पुत्र ।
लोटल्या एक संवत्सर । तया वना पातली ॥ २२२ ॥
म्हणे कैसे जाहले गे पुत्र । शर्मिष्ठा बोले तेव्हां चतुर ।
एक अकस्मात आला ऋषीश्वर । तेणें भोग दिधला ॥ २२३ ॥
त्याचे प्रसादेंकरुन । जाहले दोघे नंदन ।
देवयानी बोले वचन । नामगोत्र काय त्याचें ॥ २२४ ॥
येरी म्हणे मी भुलल्यें । त्यासी पुसावया विसरल्यें ।
येरी म्हणे ऐसें जरी जाहलें । तरी मी संतुष्ट सदा तुजवरी ॥ २२५ ॥
घरा गेली देवयानी । परी सचिंत सर्वदा मनीं ।
तों आणिक नृपसंगेंकरुनी । पुत्र कन्या जाहलीं ॥ २२६ ॥
पुरु माधवी निर्दोष । पुत्रकन्यानामें विशेष ।
तों देवयानी आली वनास । शर्मिष्ठेस पुसतसे ॥ २२७ ॥
बत्तीसलक्षणीं संयुक्त । राजबीज तेज अद्भुत ।
तुज कैसे होतात सुत । ऋषीपासून नेणें मी ॥ २२८ ॥
तों देवयानीचे सांगातें । ययाती आला होता तेथें ।
देवयानी बोलवी बालकांतें । पुढें तिघांतें घेऊनी ॥ २२९ ॥
पुसे बालकांलागून । तुमचा पिता दाखवा कोण ।
तंव तिघेही तर्जनी उचलोन । रायाकडे दाविती ॥ २३० ॥
सवेंच उठलीं तिघें जण । बैसती राजअंकीं जाऊन ।
गळां मिठी घालून । फळें मागती भक्षावया ॥ २३१ ॥
तें देखोनि देवयानी । क्रोधें संतप्त तये क्षणीं ।
म्हणे राजयालागूनी । पुत्रत्रय तुज जाहलें ॥ २३२ ॥
राजा नेदी प्रतिवचन । पाहे खालीं अधोवदन ।
जैसा तस्कर आणिला धरुन । बोलवितां न बोले ॥ २३३ ॥
म्हणे शर्मिष्ठेस तूं दासी । चोरुन भोगिलें रायासी ।
संपादणी करित्येसी । कीं मज ऋषि भेटला ॥ २३४ ॥
असत्य बोलसी वचन । जिव्हेचे करीन खंडन ।
तूं असुरी कपटीण । वशीकरण जाणसी ॥ २३५ ॥
शर्मिष्ठा म्हणे मी तुझी भगिनी । म्यांहि राव वरिला मनीं ।
पितृवचनेंकरुनी । दासी तुझी म्हणवित्यें ॥ २३६ ॥
देवयानी म्हणे रायासी । मी जात्यें कवींद्रापाशीं ।
तूं भोगीं शर्मिष्ठेसी । करीं सुखें राज्य आतां ॥ २३७ ॥
वेगें निघतां ती गोरटी । राजा धांवोनि घाली मिठी ।
म्हणे एवढा अन्याय पोटीं । घालीं माझा एधवां ॥ २३८ ॥
राजा भाल ठेवी चरणीं । पायें लोटी देवयानी ।
लत्ताप्रहार करुनी । म्हणे सरें माघारा ॥ २३९ ॥
राजा धांवतसे चरणीं । परी नाटोपे देवयानी ।
मनोवेगेंकरुनी । शुक्राजवळी पातली ॥ २४० ॥
धरुनि पितयाचे चरण । दीर्घस्वरें करी रोदन ।
तों राजाहि कर जोडून । उभा ठाकला तिजमागें ॥ २४१ ॥
देवयानी म्हणे पितयासी । दैत्यकन्या माझी दासी ।
येणे भोगून तियेसी । पुत्रत्रय निर्मिलें ॥ २४२ ॥
मज जाहले दोघे सुत । तिजकडे याचें सदा चित्त ।
शापशस्त्रें भृगुसुत । ताडिता जाहला रायातें ॥ २४३ ॥
महावार्धक्यें निश्चित । शरीर होवो तुझें गलित ।
राजा लोटांगणें घालित । विनवीत श्वशुरातें ॥ २४४ ॥
म्हणे शर्मिष्ठा दग्धली कामेंकरुन । प्रार्थून मागे भोग पूर्ण ।
जरी नेदीं वीर्यज्ञान । तरी पुत्रह्त्या घडेल ॥ २४५ ॥
या शास्त्रनिर्बंधें निश्चित । तेथें जाहला वीर्यपात ।
शुक्र म्हणे अविधि यथार्थ । करुन शास्त्र सांगसी ॥ २४६ ॥
माझें वचन नव्हे व्यर्थ । तंव राव जाहला जराभूत ।
दशन पडले समस्त । नयन अंधत्व पावले ॥ २४७ ॥
श्रवण जाहले बधिर । कांपूं लागले शरीर ।
मर्कटाऐसें कलेवर । दिसों लागलें तयाचें ॥ २४८ ॥
नयनीं घ्राणीं वदनीं । एकवटली जलें तीन्हीं ।
शब्द अडखळे आननीं । कोणातेंही समजेना ॥ २४९ ॥
यावरी घालूनि लोटांगण । ययातिराव बोले वचन ।
तृप्त नाहीं माझें मन । देवयानीस भोगितां ॥ २५० ॥
कृपा करुन ये समयीं । माझें तारुण्य मज देईं ।
कवि कळवळला हृदयीं । वचन काय बोलत ॥ २५१ ॥
पांच पुत्र तुझे जाण । एकाशीं मागें तारुण्य ।
त्यास देऊन वृद्धपण । होईं तरुण पुढती तूं ॥ २५२ ॥
राजा म्हणे शुक्रातें । जो तारुण्य ओपील मातें ।
राज्यपद देईन त्यातें । नाहीं इतरातें संबंध ॥ २५३ ॥
अवश्य म्हणे कविराज । जो तारुण्य देईल सतेज ।
तोच वंशीं विजयध्वज । वंशधर पद तयातें ॥ २५४ ॥
आज्ञा घेऊन ययाती । पातला स्वनगराप्रती ।
पंच पुत्रांस परम प्रीतीं । पाचारुन पुसतसे ॥ २५५ ॥
सहस्त्र वर्षेंपर्यंत । तारुण्य द्यावें मज यथार्थ ।
तृप्त जाहलिया मनोरथ । जरा पुढती घेईन मी ॥ २५६ ॥
यदु तुर्वसु देवयानीचे पुत्र । द्रुह्यु अनु पुरु निर्धार ।
हे शर्मिष्ठेचे सुंदर । पंच कुमार दोघींचे ॥ २५७ ॥
त्यांत चौघे बोलती नंदन । नेदूं आपुलें तारुण्य ।
केवळ नरकवास वृद्धपण । पाप कोण घेईल हें ॥ २५८ ॥
आमुचें तारुण्य घेउन । भोगिसी आमुचे माते लागून ।
मातृगमनाचें दारुण । पाप घडेल आम्हांतें ॥ २५९ ॥
ऐसी ऐकतां वचनोक्ती । शाप देत ययाती ।
यदूची यादवकुलसंतती । आश्रयें राहील दुजियांच्या ॥ २६० ॥
नाहीं छत्र सिंहासन । अरे तुर्वासो तुझें संतान ।
गोहत्यारी मद्यपी जाण । महाचांडाल अपवित्र ॥ २६१ ॥
आरक्तश्यामवर्णनयन । सांगरबेटीं राहील पूर्ण ।
द्रुह्युपुत्राप्रति शापवचन । काय बोले ययाती ॥ २६२ ॥
तुझा वंश हो कैवर्तक सत्य । मत्स्यघ्न अनाचारी बहुत ।
नौका तारुनि जीवित । रक्षूनियां वर्तेल ॥ २६३ ॥
अनु तुझे संतान । यंत्रकार लोहकार जाण ।
राज्यविरहित यातिहीन । जन्मतील दुरात्मे ॥ २६४ ॥
चौघे घातले बाहेरी । पुरु पाचारिला ते अवसरीं ।
तेणें मस्तक ठेवूनि चरणावरी । तरुणत्व दिधलें ॥ २६५ ॥
पुरु पुत्र बोले वचन । शरीर जाहलें तुजपासून ।
तुझें तुज नेदीं पूर्ण । तरी जाईं नरकालया ॥ २६६ ॥
ऐसें बोलतां वचन । ययाति जाहला तरुण ।
पुरुनें घेतलें वृद्धपण । सहस्त्र वर्षें मर्यादा ॥ २६७ ॥
शर्मिष्ठा आणि देवयानी । स्त्रिया भोगी सुखशयनीं ।
राज्य चालवे अनुदिनीं । धर्मन्यायें ययाती ॥ २६८ ॥
दुष्टास दंड करुन । केलें बहु प्रजापालन ।
सुखी केले पृथ्वीचे ब्राह्मण । भोजनधनालंकारें ॥ २६९ ॥
केले बहुतचि यज्ञ । गो भू गज नवरत्न ।
उरलें नाहीं कांहीं दान । व्रताचरण नेम कांहीं ॥ २७० ॥
मग उबगून विषयांसी । तारुण्य दिधलें पुरुसी ।
छत्रसिंहासन देऊन त्यासी । वंशधर तो केला ॥ २७१ ॥
अंगीकारुन वृद्धपण । दोघी स्त्रिया संगें घेऊन ।
प्रवेशला तापसारण्य । तप दारुण आचरला ॥ २७२ ॥
तीस वर्षेंपर्यंत । जलाहार ययाति करित ।
वायुभक्षण निश्चित । एक वर्षे केलें हो ॥ २७३ ॥
पंचाग्निसाधन वर्ष एक । एका चरणावरी उभा देख ।
मग दिव्यदेह पावोनि सुरेख । स्वर्गाप्रति पावला ॥ २७४ ॥
उबयदारांसहित । दिव्य विमानीं बैसत ।
इंद्रादि देव सामोरे येत । वंदिती समस्त रायातें ॥ २७५ ॥
पुण्य देखोन समर्थ । इंद्रास विषाद उपजत ।
कपटें रायासी विचारित । बोले सुकृत आपुलें ॥ २७६ ॥
भोळेपणे सांगे ययाती । तों सुकृतहानि जाहली निश्चितीं ।
खालीं पडला धरणीपती । तंव नवल वर्तलें ॥ २७७ ॥
माधवीकन्येचे पुत्र देख । प्रतर्दन वसुमान शिबि अष्टक ।
चौघे पुत्र पुण्यश्लोक । स्वर्धुनीतीरीं वसती सुखें ॥ २७८ ॥
महापुरुष ते महंत । गंगातीरीं याग करित ।
त्याचा होमधूम्र गगनीं जात । पुण्यरुप तेजस्वी ॥ २७९ ॥
ययाति पडावा धरित्रीं । तों धूम्रें धरिला वरचेवरी ।
ययाति ते अवसरीं । नमस्कारी तैं अष्टका ॥ २८० ॥
सांगितलें वर्तमान । इंद्रें दिधलें लोटून ।
मग तो ययाती पूर्ण । महंतींही बोधिला ॥ २८१ ॥
त्यांचे संगें केलें तप । श्रवण केले अमूप ।
मग स्वर्गास सुखरुप । ययाति राव पातला ॥ २८२ ॥
व्यास सूत वैशंपायन । तिघे बोलिले कथा पूर्ण ।
त्यांतील सारांश काढून । केलें कथन तुम्हांप्रति ॥ २८३ ॥
संपले ययातिआख्यान । पुढें कथा गोड गहन ।
श्रवण करोत विचक्षण । ब्रह्मानंदेंकरोनियां ॥ २८४ ॥
भारतग्रंथ समुद्र । साहित्यरत्नें आंत अपार ।
त्यांचे ग्राहक पंडित नर । परम चतुर भावार्थी ॥ २८५ ॥
पांडवप्रतापग्रंथीं । जे बैसती श्रवणपंक्तीं ।
तिहीं कृपा करुन पंडितीं । अवधान पुढें देइजे ॥ २८६ ॥
ब्रह्मानंदा पंढरीनाथा । पुढें बोलवीं भारतकथा ।
आदिमध्यांत तत्त्वतां । तूंचि कर्ता अससी पैं ॥ २८७ ॥
वाजविणार नाहीं बरवा । तरी कैसा वाजेल पांवा ।
रुक्मिणीजीवना करुणार्णवा । श्रीधरवरदा सुखाब्धे ॥ २८८ ॥
पुढें पांडवोत्पत्ति सुंदर । माजेल जो रस अपार ।
श्रीधरमुखें परिकर । ब्रह्मानंद वदेल पैं ॥ २८९ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्वव्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । पंचमाध्यायीं कथियेला ॥ २९० ॥
इति श्रीधरकृत पांडवप्रतापादिपर्वणि पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥
अध्याय पाचवा समाप्त
GO TOP
|