श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय तिसरा


जनमेजयाचे सर्पसत्र


श्रीगणेशायनमः ॥
आस्तिकाचें जन्मकथन । द्वितीयाध्यायीं कथियेलें पूर्ण ।
जनमेजयें ऋषि मेळवून । सर्पसत्र आरंभिले ॥ १ ॥
सुवर्णवर्ण नृपति नामा । त्याची कन्या वपुष्टमा ।
ते जनमेजयाची रामा । पतिव्रता परम ती ॥ २ ॥
भार्येसहित दीक्षाग्रहण । जनमेजय व्रतस्थ पूर्ण ।
कुंडीं प्रतिष्ठिला कृशान । मूर्तिमंत प्रकाशला ॥ ३ ॥
चत्वारिश्रृगं त्रिचरण । सप्तहस्त द्विमूर्धान ।
हस्तिशुंडेसमान । वसुधारा प्राशित ॥ ४ ॥
विशाल कुंड भयंकर गहन । जैंसे काळें पसरिलें वदन ।
ऋषि समिधा मंत्रून । कुंडामाजी ओपिती ॥ ५ ॥
नागलोकीं हलकल्लोळ । दंदशूक कांपती सकळ ।
भ्रमित होऊन तत्काळ । आकाशमार्गें उसळती ॥ ६ ॥
सर्पाचीं जुंबाडें असंख्यात । कुंडीं येऊनि रिचवत ।
एक वृक्षासी वेढे घालित । तरु उसळती आकाशीं ॥ ७ ॥
फणी एकमेका बाहती । एकाच्या गळा एक पडती ।
शतांचीं शतें वेंटाळती । मग पडती कुंडांत ॥ ८ ॥
नाना सर्पांच्या मुखध्वनीं । नाद उमटती गगनीं ।
एक मुखें पसरुनी । भयभीत पडताती ॥ ९ ॥
एकें शिळेस घातले वेढे । ती शिळा येऊन कुंडीं पडें ।
असंख्य पडती जुंबाडें । लेखा न करवे कोणासी ॥ १० ॥
एक काळे काजळवर्ण । खदिरांगार तैसे नयन ।
एक पीत एक नीलवर्ण । दूर्वारंग एक पैं ॥ ११ ॥
तप्त लोहार्गळेऐसे सबळ । लंबायमान स्थूल विशाळ ।
मुखी निघती महाज्वाळ । कंकणाकार एक पडती ॥ १२ ॥
श्रृंखलाकार शंखवर्ण । चित्रविचित्र विक्राळवदन ।
आरक्तमाणिकासारखे पूर्ण । केशाळ अस्वलासारिखे ॥ १३ ॥
अत्यंत जुनाट सुवासी । मणि झळकती एकाचे शीर्षीं ।
ब्राह्मण आपले मंत्रपाशीं । बांधोनि आणिती बळेंचि ॥ १४ ॥
आर दुतोंडे अजगर । महाडूंळ फोडसे कवडे थोर ।
डोंब धामिणी एरंडाकार । शंखपाळ किरडूं पैं ॥ १५ ॥
पंचमुखी दशमुखी । शतमुखी सहस्त्रमुखी ।
एकेकाचे मुकुट मस्तकीं । पडती जळती तडतडां ॥ १६ ॥
पर्वताकार विशाल । लांब जैसे मंदराचल ।
ज्यांच्या दर्शनें तत्काल । मृत्यु होय प्राणियां ॥ १७ ॥
व्याघ्रवदन जंबुकानन । वृखमुख गजवदन ।
मातृशापेंकरुन । कुंडाग्नींत रिचवती ॥ १८ ॥
धडधडा जळती विखार । दुर्गंधीनें भरलें अंबर ।
धन्य धन्य जनमेजय राजेंद्र । प्रताप न मावे त्रिभुवनीं ॥ १९ ॥
सहस्त्रवदना नव्हे लेखा । ऐसे सर्प जाळिले देखा ।
राजा म्हणे आणा तक्षका । जेणें माझ्या जनका ग्रासिले ॥ २० ॥
ऐसे ऐकतां द्विजगण । तक्षकनामरुप स्मरुन ।
आकर्षिला मंत्रेकरुन । घेत अवदान टाकावया ॥ २१ ॥
तों मरणकालींचें अवचिन्ह । तक्षकें तें जाणून ।
धनुष्यापासून सुटें बाण । तैसा गेला शक्रपदा ॥ २२ ॥
तक्षक रडें ते कालीं । म्हणे देवेंद्रा पाठिसीं घालीं ।
शरणागता रक्षीं ये वेळीं । बद्धांजली विनवीतसे ॥ २३ ॥
ऋषि अवदानें टाकिती । त्यासरिसे सर्प पडती ।
निर्वंश केले निश्चिती । उरले क्षितीं किंचित ॥ २४ ॥
इंद्र म्हणे रे दुर्जना । परम चांडाला खला मलिना ।
अन्याय करितां करुणा । किमपि नाहीं कां आली ॥ २५ ॥
तक्षक म्हणे देवपाळा । मी उत्तरीय होईन तुझ्या गळा ।
शक्रें तेव्हां पाठीं घातला । कश्यपसुत म्हणोनि ॥ २६ ॥
पातालीं वासुकिशेषभुवनीं । आकांत होत सर्पांलागूनी ।
एका दुष्टानें केली करणी । निर्वंश जाहला सर्पांचा ॥ २७ ॥
कद्रूमातेचा महाशाप । उत्तंक ऋषीचा विशेष कोप ।
रुरुची भार्या सुस्वरुप । डंखूनि पूर्वीं मारिली ॥ २८ ॥
देवदूतीं बळेंकरुनी । उठविली मागुती त्यांनीं ।
मग लोहार्गला हातीं घेउनी । सर्प मारीत वनीं हिंडे ॥ २९ ॥
कोटींच्या कोटि मारी विखार । तरी न सरती दुराचार ।
मग जनमेजयाचें सर्पसत्र । तेथें तो साह्य जाहला ॥ ३० ॥
असो वासुकी म्हणे जरत्कारी । कंप सुटला आमुच्या शरीरीं ।
कलेवर जाय चांचरी । ज्वाला दृष्टीं दिसताती ॥ ३१ ॥
अनुष्ठानीं बैसला आस्तिक मुनी । माता बोले सद्‌गद होउनी ।
म्हणे बंधू वांचवीं ये क्षणी । मातुल तुझे सुपुत्रा ॥ ३२ ॥
तों सर्प अवघे मिळोन । आस्तिकासी आले शरण ।
भक्तांसी धांवे रमारमण । तैसा धांवे ये काळीं ॥ ३३ ॥
मग तो आस्तिक ऋषिराणा । धांवत वेगें सर्परक्षणा ।
मनोवेगें सत्वर जाणा । सर्पसत्रीं पावला ॥ ३४ ॥
तपस्तेज अंगी प्रचंड । जैसा उदेला प्रलयमार्तंड ।
द्वारपाल आडदंड । घालूं न शकती महाभयें ॥ ३५ ॥
आंत आला आस्तिक मुनी । तों देखिली ऋषींची आस्थानी ।
जैसे उगवले वासरमणी । तपोधन तेजस्वी ॥ ३६ ॥
बलीचिये द्वारीं येऊन । उभा ठाकला जैसा वामन ।
तैसा आस्तिक देदीप्यमान । तेज न माय मंडपीं ॥ ३७ ॥
बोलका जैसा अंगिरासुत । उचलोनियां पद्महस्त ।
स्तुति आशीर्वाद वदत । ऋषि तटस्थ पाहती ॥ ३८ ॥
यज्ञनारायण तुज नमन । सकलब्रह्मवृंदा माझें अर्चन ।
तुमचें मंत्रसामर्थ दारुण । ब्रह्माडं नूतन कराल ॥ ३९ ॥
कुरुपांडवकुलवर्या । आशीर्वाद तुज जनमेजया ।
धन्य सामर्थ्य प्रतापसूर्या । शत्रुनक्षत्रें विध्वंसिलीं ॥ ४० ॥
तुष्टि पुष्टि ऐश्वर्य पूर्ण । आयुष्यवृद्धि धर्माचरण ।
शांति क्षमा श्रीविष्णुपूजन । वएधमान हो कां सदा ॥ ४१ ॥
यश कीर्ति औदार्य भजन । आनंद सद्विवेक समाधान ।
क्षेत्र दया उपरतिस्थान । वर्धमान हो कां सदा ॥ ४२ ॥
निर्दोष यशाचे कोश । भ्रोत अक्षयीं कीर्तिविशेष ।
माझें वांच्छित निःशेष । होय संपूर्ण तुझियेनी ॥ ४३ ॥
तथास्तु ऐसें त्रिवार । बोलती समस्त ऋषीश्वर ।
आस्तिक म्हणे धन्य राजेंद्र । सार्थक केलें जन्माचें ॥ ४४ ॥
पूर्वीं झाले बहुत याग । परी तृप्त येथें चत्वारिश्रृंग ।
पडिलें नाहीं कांही व्यगं । आश्चर्य मोठें जाहलें ॥ ४५ ॥
बुध्दीस उपमिजे बृहस्पति । वैखरीं वसे सरस्वती ।
तेजस्वीपणें गभस्ती । पवित्रपणें वैश्वानर ॥ ४६ ॥
दंडाविषयीं तमारिसुत । लोकरक्षणीं इंदिराकांत ।
राज्यरचना धन बहुत । यक्षपति दुसरा पैं ॥ ४७ ॥
तपियांत जैसा व्योमकेश । लोकरचनेंत सत्यलोकेश ।
सभे बैसतां अमरेश । जनमेजया दिससी तूं ॥ ४८ ॥
भार्गव दाशरथी भीष्म द्रोण । धनुर्धर किरीटी अभिमन्य ।
तैसा धनुर्वेदप्रवीण । जनमेजया तूं एक ॥ ४९ ॥
वाल्मीकि विश्वामित्र वसिष्ठ । दधीची अगस्ति अत्रि वरिष्ठ ।
त्यांतुल्य यथेष्ठ । धैर्य तप तुझें असे ॥ ५० ॥
उपमन्यु भगीरथ भरत । प्रयत्‍नाविषयीं तैसा तूं सत्य ।
देवकीनंदन भीम हनुमंत । तूं एक बलें तैसा पैं ॥ ५१ ॥
वयें दिससी बालक । परि प्रतापें भरला सर्व लोक ।
धाकटे दिसती चंद्रार्क । परि प्रताप अद्‍भुत पैं ॥ ५२ ॥
जनमेजय म्हणे भाग्य अद्‍भुत । ऐसा महाराज आला मंडपांत ।
परि तक्षक जाळूनि याचें वांछित । पूर्ण करीन शेवटीं ॥ ५३ ॥
म्हणोनि घातलें कनकासन । मणें बैसें एक क्षण ।
आस्तिक म्हणे मनीं कारण । धरुनि एक आलों आहें ॥ ५४ ॥
तें पूर्ण करीन ऐसें वचन । बोल मग मी बैसेन ।
तों बोलती सदय ब्राह्मण । राया बैसवीं ऋषीतें ॥ ५५ ॥
रावम्हणे मज्जनकभक्षक । आधीं भस्म करीन तक्षक ।
कीं कोणी जाहला त्यासी रक्षक । तयासहित रक्षा करीन मी ॥ ५६ ॥
मग मी रत्‍नराशी आणून । आस्तिकासी अभिषेक करीन ।
जें मागेल तें देईन । तनु मन धन राज्यही ॥ ५७ ॥
विप्र म्हणती पळाला तक्षक । त्यास सहस्त्राक्ष जाहला रक्षक ।
ऐकतां कोपला नरनायक । काय बोले तेधवां ॥ ५८ ॥
इंद्रासहित तक्षकासी । भस्म करा दोघां दुष्टांसी ।
जो परीक्षितिनृपासी भक्षी । त्यासी कां रक्षी शचीचर ॥ ५९ ॥
इंद्रासहिततक्षकाय । स्वाहाम्हणतीऋषिवर्य ।
सिंहासनासहित अमरराय । ब्राह्मणीं खालीं आणिला ॥ ६० ॥
तपः सामर्थ्य अद्‍भुत । आस्तिक दिनेश मूर्तिमंत ।
वरीच रक्षी निर्जरनाथ । महिमा अद्‍भुत ऋषीचा ॥ ६१ ॥
ऋषि म्हणती जनमेजयास । तरीच हें कर्म पावेल सिद्धीस ।
समाधान करुन अस्तिकास । कनकासनीं पूजिले ॥ ६२ ॥
मग भूभुज बोलत । ब्राम्हणा मागें अपेक्षित ।
तवं ऋत्विग्जन नवल सांगत । इंद्रें तक्षक दवडिला ॥ ६३ ॥
तुझा याग लक्षून । भयभीत दशशतनयन ।
तक्षक उत्तरीयवस्त्रें गुंडाळून । भिरकाविला अंतरिक्षीं ॥ ६४ ॥
अलातचक्रवत विखार । गगनीं फिरे तो दुराचार ।
दक्षिणेपासून उत्तर । इतका थोर पसरला ॥ ६५ ॥
सुसाटें गर्जें गगनी । जाहला ऊर्ध्वपुच्छ अधोवदनी ।
तों अस्तिके उचलोनि पाणी । तिष्ठतिष्ठ वचन बोले ॥ ६६ ॥
ब्राम्हण म्हणती जनमेजयासी । आम्ही भस्म करुं तक्षकासी ।
तूं सन्मानूनि आस्तिकासी । अपेक्षित देई कां ॥ ६७ ॥
आस्तिकास राव म्हणत । प्रसन्न जाहलो माग इच्छित ।
येरु म्हणे याग समाप्त । करावा आतां एथूनी ॥ ६८ ॥
जाहली एथूनी आतां सीमा । उरग न जाळीं राजोत्तमा ।
जाहला पुरुषार्थ करीं क्षमा । इतुकें आम्हां देईजे ॥ ६९ ॥
जनमेजय खेंचला अंतरीं । म्हणे माझा तक्षक मुख्य वैरी ।
तो वेगळा करुन समस्त धरित्री । राज्य तुज समर्पीन ॥ ७० ॥
न करी माझ्या यागाचे खंडन । घालितों सहस्त्र लोटांगण ।
आस्तिक म्हणे तूं पुण्यपरायण । दुसरें वचन न बोले ॥ ७१ ॥
सर्पास जिव्हा दोनी । एक जिव्हा तुझे वदनीं ।
सत्त्वशीला पुण्यखाणी । विटाळवाणी होईल तुझी ॥ ७२ ॥
असे मागणें एवढें एक । आणीक मागेन तरी तो नरक ।
जैसे कुंजरद्विज देख । माघारे आंत न जाती ॥ ७३ ॥
डोंबा घरीं आपणास विकिलें । हरिश्चंद्रें सत्व रक्षिलें ।
सत्वरक्षणा वना गेले । पांडव आणि रघुनाथ ॥ ७४ ॥
कांतिनगरींचा श्रियाळ । भोजनास दिधलें पोटींचें बाळ ।
शिबिराजें मांस सकळ । कपोताशीं तुकियेलें ॥ ७५ ॥
इतुकें बोलिला जरात्कारीनंदन । परिरायाचें असंतुष्ट मन ।
मग भ्रूसंकेतेंकरुन । संकेत दावी मांत्रिकां ॥ ७६ ॥
मंत्रबळें ओढिती तक्षक । आस्तिकें रोंविला लोहकंटक ।
ऋषीचें सामर्थ्य अधिक । कोणातेंही उपडेना ॥ ७७ ॥
विप्र म्हणती राजनंदना । मान देईं आस्तिकवचना ।
आमुचिं पाळीं हेचि आज्ञा । आग्रह सोडीं तत्त्वतां ॥ ७८ ॥
असंख्यात जाळिले सर्प । लोकीं वाढविला प्रताप ।
यशाच्या मोटा अमूप । किती बांधिसी राजेंद्रा ॥ ७९ ॥
अपूर्ण होमाचा विषाद । मनांत न धरीं कांहीं खेद ।
ब्राह्मणांस जेणें आनंद । यज्ञ संपूर्ण तोचि पैं ॥ ८० ॥
ऐसें बोलतां ऋत्विज । अवश्य म्हणे भूभुज ।
आस्तिकासी वदे महाराज । यज्ञ संपविला तव आज्ञें ॥ ८१ ॥
जयजयकार करी आस्तिक । आनंदले जन सकळिक ।
धन मान देऊनि देख । विप्र तोषवी राजेंद्र ॥ ८२ ॥
वस्त्रें अलंकार अपार धन । देऊनि पूजिला जरत्कारीनंदन ।
आस्तिक आणि सकल ब्राम्हण । देऊनि मान बोळविले ॥ ८३ ॥
तक्षक मुक्त जाहला । तोही स्वस्थळासी पावला ।
आनंदसमुद्र उचंबळला । नागलोकीं तेधवां ॥ ८४ ॥
आस्तिक आला सर्पभुवनीं । विखार येती लोटांगणीं ।
म्हणती तूं धन्य या त्रिभुवनीं । तुझे स्मरणें दोष नुरे ॥ ८५ ॥
जे करिती आस्तिक स्मरण । त्यांतें न बाधी सर्प पूर्ण ।
जो सर्प स्मरणासी नेदी मान । मस्तक शतचूर्ण होय त्यांचे ॥ ८६ ॥
हें आस्तिकाख्यान संपूर्ण । जे करिती श्रवण पठन ।
त्यांलागीं सर्प देखून । पळती जाण भयभीत ॥ ८७ ॥
तुझ्या चरित्रकथा कीर्तिती । जे गृहीं संग्रहिती वाचिती ।
सर्प तात्काळ उठोनि पळती । पुन्हा न येती त्या ठायां ॥ ८८ ॥
तुझे नाममंत्रेंकरुन । उतरे सर्प विष दारुण ।
तुझे करितीं जेथे स्मरण । त्या स्थला त्यागून जाऊं आम्ही ॥ ८९ ॥
वाटेनें जातां वनांतरीं । जो तुझे क्षणाक्षणां स्मरण करी ।
तो मार्ग सोडूनियां दूरी । जाऊं आम्ही तत्काळ ॥ ९० ॥
आमुचें मैथुन देखती । तुझें स्मरण जरी करिती ।
त्यांस आम्ही रक्षूं निश्चितीं । पाठी न लागूं सर्वथा ॥ ९१ ॥
सकलसर्पमुख्य वासुकी । भाष देती आस्तिकालागीं ।
तुझे स्मरण करिती जे प्रसंगीं । त्यांसी आम्ही नाताळूं ॥ ९२ ॥
ते मर्यादा अद्यापि जाण । सर्प चालविती संपूर्ण ।
व्यासें लिहिलें हें प्रमाण । असत्य कोण म्हणेल ॥ ९३ ॥
सर्पसत्र संपलें तत्त्वतां । पुढें वर्तलीती कथा ।
शौनकादि ऋषी समस्तां । सूत सांगे आल्हादें ॥ ९४ ॥
जनमेजय राव मनांत । ऐकूं इच्छी पूर्वजांचे चरित ।
तों व्यास देव अकस्मात । येता जाहला पूर्वभाग्यें ॥ ९५ ॥
देखतां साष्टांग नमन । करिता जाहला परीक्षितिनंदन ।
कनकासनीं बैसवून । षोडशोपचारें पूजिला ॥ ९६ ॥
चरणीं पुढती ठेवून शिर । म्हणे ऐकेन पूर्वजांचे चरित्र ।
साठ लक्ष पवित्र । तुवां प्रबंध रचियेला ॥ ९७ ॥
त्यांत सवालक्ष दिधलें मानवां । तें मज जगद्‌गुरो श्रवण करवा ।
मग वैशंपायनास तेधवा । आज्ञा करी वेदव्यास ॥ ९८ ॥
रायासे श्रवण करवीं भारत । ऐसें बोलोन सत्यवतीसुत ।
अंतर्धान पावला त्वरित । सूर्य अस्त पावे जैसा ॥ ९९ ॥
यावरी जनमेजय श्रोता निपुण । वक्ता व्यासशिष्य वैशंपायन ।
सभा घनवटली संपूर्ण । ऋषि राजर्षि बैसला ॥ १०० ॥
गृहस्थ ब्रह्मचारी वानप्रस्थ । सभेसीं बैसले आवडीं समस्त ।
चारी वर्ण आर्तभूत । श्रवणपंक्तीं बैसले ॥ १०१ ॥
नावडे भारतश्रवण । तो मनुष्य पशुसमान ।
असो यावरी वैशंपायन । काय बोलता जाहला ॥ १०२ ॥
चेदिदेशीं वसुनृपनाथ । इंद्राचा मित्र अत्यंत ।
तेणें येऊन तपोवनांत । आराधन केले इंद्राचे ॥ १०३ ॥
त्यागून राज्य धनुष्यबाण । वेष्टूनियां वल्कलवसन ।
अन्न फल तोय वर्जून । नियमन केलें मनेंद्रियां ॥ १०४ ॥
खडतर तप देखोन । प्रसन्न जाहला शचीरमण ।
म्हणे सखया शरीर दंडून । तपकष्ट करुं नको ॥ १०५ ॥
पृथ्वीवरी तूंचि इंद्र । मजसमान राजेंद्र ।
समुद्रवलयांकित पृथ्वी समग्र । राज्य करी तूंचि पैं ॥ १०६ ॥
वेणुदंड उंच प्रचंड । इंद्रध्वज उभवीं अखंड ।
संवत्सरप्रतिपदेस सुघड । अत्यादरें पूजीं कां ॥ १०७ ॥
संवत्सराचे आदि । इंद्रध्वज पूजितां यथाविधी ।
तेणें शत्रुनाश त्रिशुद्धि । ऐश्वर्यसिद्धि विशेष ॥ १०८ ॥
तेच दिवसापासून । संवत्सरप्रतिपदेस जन ।
करिती इंद्रध्वजपूजन । कीर्ति कल्याण तेणें सदा ॥ १०९ ॥
जो इंद्रध्वजपूजा अव्हेरी । तो दरिद्री दुःखी जन्मवरी ।
पूजिती भावें त्यांचे मंदिरीं । पुरवी वृत्रारि संपदा ॥ ११० ॥
पृथ्वीचें राज्य संपूर्ण । चैद्यवसूस समर्पून ।
स्वपदा गेला पाकशासन । मित्रमन तोषवूनी ॥ १११ ॥
प्रजापालनीं परम चतुर । त्याकरितां नाम उपरिचर ।
त्यास जाहले पांच पुत्र । नामें पवित्र ऐका पां ॥ ११२ ॥
बृहद्रथ प्रत्युग्रह कुशांब सगुण । महाव्रत चौथा पांचवा मणिवाहन ।
पांचही पुत्र इंद्रासमान । प्रताप गहन न वर्णवे ॥ ११३ ॥
वसुमती नगरापुढून । शक्तिमती नदी वाहे पूर्ण ।
तीस कामाचारें पर्वतें कोंडून । दुराग्रहें तो भोगीत ॥ ११४ ॥
कालाहनामा पर्वत । शक्तिमती नदीस भोगीत ।
प्रवाह खुटंला समस्त । उदक किंचित मिळेना ॥ ११५ ॥
मृगयेमिषें शोध करीत । तेथें पावला नृपनाथ ।
हाणूनियां सबळ लाथ । कालाह पर्वत फोडिला ॥ ११६ ॥
जलप्रवाह जाहला मुक्त । तंव ते सरिता होऊनि मूर्तिमंत ।
उपरिचर रायास स्तवीत । म्हणे पुरुषार्थ केला त्वां ॥ ११७ ॥
पर्वतवीर्यें कुमार कुमारीं । जन्मलीं हीं माझे उदरीं ।
हीं तूं राया अंगिकारीं । परम सुंदर दोघेहीं ॥ ११८ ॥
शक्तिमाती अप्त्यें देऊनि दोघें । प्रवाहरुपें चालली वेगें ।
कन्येचें स्वरुप देखूनि अनंगें । मोहिला तो नृपवर ॥ ११९ ॥
गिरिका नामे तीं वेल्हाळ । रायें पत्‍नी केली तत्काळ ।
बंधु तिचा सबळ । सेनापति केला तो ॥ १२० ॥
सुरतानंदें नृपानाथ । तिसीं बहुकाल रमत ।
एकदां ती असतां ऋतुस्नात । रावगेला मृगयेसी ॥ १२१ ॥
परम सुंदर उद्यान । छाये बैसला राव सुखघन ।
तों गिरिका आठवतां मन । मनसिजें पूर्ण व्यापिलें ॥ १२२ ॥
आठवी सुरतानंदसुख । वीर्य उसळलें अधोमुख ।
क्षितीं न पडतां तात्काळिक । पर्णद्रोणीं धरियेलें ॥ १२३ ॥
म्हणे स्त्री घरीं ऋतुस्नात । तीस हें पाठवावें त्वरित ।
शेनपक्षिया जवळीं देत । आज्ञा करी राव त्यातें ॥ १२४ ॥
गिरिकेसी देईं हें रेत । मग चंचूस धरुन पक्षी जात ।
तो अनेक विहंगम उन्मत्त । पाठीं धांवती तयाचे ॥ १२५ ॥
हा एकला पक्षी बहुत । युद्ध करितां सांडलें रेत ।
यमुनाजळीं तें पडत । मग भक्षिती मत्स्यिणी ॥ १२६ ॥
मत्स्यिण्युदरी गर्भ वाढत । तों मत्स्यघ्ने धरिली अकस्मात ।
मांसाळ देखोनि बहुत । विदारीत तियेतें ॥ १२७ ॥
तों कुमार कुमारी दोघें जण । जावळीं निघालीं सुगुण ।
उपरिचर राजास नेऊन । भेटविलीं किराते ॥ १२८ ॥
संतोषला नृपनाथ । बाललेणीं लेववीत ।
मत्स्यनामा पुत्र आपण घेत । कन्या देत कैवर्तका ॥ १२९ ॥
जिचे पोटीं दोघें जन्मलीं । ती अद्रिकानामें देवांगना वहिली ।
ब्रह्मशापें मत्स्यी जाहली । यमुनाजळीं बहुकाळ ॥ १३० ॥
कुमार कुमारी उपजतां जाण । ते स्वर्गा गेली उद्धरोन ।
असो रायें मत्स्यपुत्र नेऊन । मत्स्यदेशी राव केला ॥ १३१ ॥
कन्या दिधली जे कैवर्तकाप्रती । तिचें नांव ठेविलें सत्यवती ।
सौंदर्यास उणा रोहिणीपती । रति दमयंती दासी तिच्या ॥ १३२ ॥
पितृआज्ञेने सुंदरी । नौका रक्षी यमुनातीरीं ।
परि जन्मली ते मत्स्योदरीं । दुर्गंधि आंगीं बहुतचि ॥ १३३ ॥
तों तीर्थयात्रा करीत । पराशर ऋषि पातला तेथ ।
सत्यवती बैसोन नौकेंत । नेती जाहली पैलपार ॥ १३४ ॥
मध्यभागीं नौका जात । देखून परम एकांत ।
मन्मथें व्यापिला शक्तिसुत । विलोकित तियेतें ॥ १३५ ॥
म्हणे पद्मनेत्रे सुंदरि । मजशीं सुरतानदें क्रीडा करीं ।
मग बोले दाशकुमारी । विपरीत कर्म केवीं करुं ॥ १३६ ॥
अंगनादेह विक्रीत यथार्थ । पुढें वरग्राहक न ये कीं सत्य ।
भंगितां माझे कुमारित्व । पुढें अनर्थ जन्मवरी ॥ १३७ ॥
दिवसप्रथमप्रहर देख । उभयतटीं पाहती लोक ।
रहस्य प्र्कटेल तात्कालिक । उपहास जन्मवरी ॥ १३८ ॥
माझा पिता कैवर्तक पाहीं । त्यासी प्रार्थून तूं मज घेईं ।
ऋषि म्हणे इयुक्याचें कार्य नाहीं । भोग देईं आतांचि ॥ १३९ ॥
पाहती जरी नारी नर । पाहें माझा चमत्कार ।
अभ्रें आच्छादूनि दिनकर । धूम्राकार नभझालें ॥ १४० ॥
दुर्गंधि दवडूनि समग्र । सुवासिक केलें तिचें शरीर ।
भोंवता एक योजनमात्र । सुगंध सुंदर धांवतसे ॥ १४१ ॥
मजशीं करितां सुरत । तुझें न मोडे कुमारित्व ।
पुढें राव वरील यथार्थ । वचन सत्य जाण पां ॥ १४२ ॥
मनांत म्हणे सुंदरी । हा केवल ईश्वर निर्धारीं ।
सुरतयुद्धा ते अवसरीं । प्रवर्तलीं दोघें जणें ॥ १४३ ॥
क्रीडाकौतुकेंकरुन । इच्छा जाहली परिपूर्ण ।
पराशर म्हणे तुज निधान । पुत्ररत्‍न होईल ॥ १४४ ॥
मनोरथ करुन पूर्ण । निघाला शक्तिनंदन ।
तपा आंचवला पूर्ण । पुन्हा साधूं चालिला ॥ १४५ ॥
तो नवमास भरतां पूर्ण । पळोपळीं प्रकाशे जैसा अरुण ।
कीं उदयाचलीं उगवे सहस्त्रकिरण । तैसा पुत्र जन्मला ॥ १४६ ॥
षड्गुणैश्वर्ययुक्त । जन्मला व्यास प्रतापवंत ।
त्याचे ज्ञानास नाहीं अंत । जो विख्यात त्रिभुवनीं ॥ १४७ ॥
एकमुखाच ब्रह्मदेव । कीं केवल द्विबाहु रमाधव ।
कें भाललोचन शिव । स्वयमेव अवतरला ॥ १४८ ॥
जो वसिष्ठाचा पणतू होय । शक्तीचा पौत्र निश्चय ।
त्या पराशरसुताचें महत्त्व । पाहें कोणा न वर्णवे ॥ १४९ ॥
ऐसा तो शुकतात पूर्ण । सत्यवतीउदररत्‍न ।
जगदगुरु कृष्ण्द्वैपायन । यमुनाद्वीपीं जन्मला ॥ १५० ॥
वेद शास्त्रें पुराणें बहुत । चतुर्दश विद्या कला समस्त ।
सर्वविद्यापारंगत । उपजतांच महाज्ञानी ॥ १५१ ॥
जननीस नमस्कारुन पाहीं । म्हणे तपा जावया आज्ञा देईं ।
सत्यवती म्हणे ते समयीं । तृप्ती नाहीं तुज पाहतां ॥ १५२ ॥
तुझा पाहतां वदनचंद्र । नृत्य करी मम मानसचकोर ।
व्यास म्हणे स्मरतांच सत्वर । येईन मी तुजपाशीं ॥ १५३ ॥
ऐसा दावूनि संकेत । योगमार्गें गेला गुप्त ।
नाहीं मोडलें कुमारित्व । सुखी जाहली सत्यवती ॥ १५४ ॥
ज्याचे मुखकमलापासून । चिद्रस द्रवला परिपूर्ण ।
वाङमयामृतें करुन । त्रिजगत पूर्ण धालें हो ॥ १५५ ॥
वेदार्थ केला सुगम । म्हणोन वेदव्यास नाम ।
कीं वेदाब्जविकाशक परम । व्यासभास्कर जन्मला ॥ १५६ ॥
पंचम वेद भारत । शिष्य पुत्रांलागी देत ।
पुलस्ति जैमिनि सुमंत । गालव आणि संजय ॥ १५७ ॥
साहवा शुक निजसुत । ज्ञानी केला अत्यद्‍भुत ।
जेणें श्रवण करुन भागवत । परीक्षिति उद्धरिला ॥ १५८ ॥
इतुका जाहलिया गतकथार्थ । जनमेजय राव पुसत ।
आमच्या पूर्वजांसी भारत । किमर्थ म्हणती सांग पां ॥ १५९ ॥
यावरी बोले वैशंपायन । कुरुवंशी विख्यात पूर्ण ।
दुष्यंत राजा गुणनिधान । चक्रवर्ती जन्मला ॥ १६० ॥
प्राची प्रतीची उत्तर दक्षिण । चार्‍ही दिशा आक्रमून ।
पृथ्वीचें राज्य संपूर्ण । आज्ञेंत चालवी राव तो ॥ १६१ ॥
नऊ खंडें छप्पन्न देश । सप्तद्वीपींचे लोक निःशेष ।
दुष्यंत राजा निर्दोष । धनें वसनें तोषवी ॥ १६२ ॥
ज्याचे भाग्याची गणना । नव्हेची कदा सहस्त्रवदना ।
सौंदर्यासी मदन उणा । देवराणा दुसरा तो ॥ १६३ ॥
अधर्माची कांहीं वार्ता । राज्यांत नाही तत्त्वतां ।
दुःख दरिद्र रोग पाहतां । कोणालागीं नसेचि ॥ १६४ ॥
यथाकालीं वर्षे घन । सुखरुप नांदती चार्‍ही वर्ण ।
वेदघोषें गर्जती ब्राह्मण । चर्चा करिती शास्त्रांची ॥ १६५ ॥
वर्णूं आता काय बहुत । विष्णुसमान तो राव दुष्यंत ।
षडगुणैश्वर्यमंडित । प्रतापसूर्य तेजस्वी ॥ १६६ ॥
बळें परम तो सबल । उपडूं शके मंदराचल ।
दुष्टदंडनीं प्रत्यक्ष काल । उदार मेघासारिखा ॥ १६७ ॥
वेदशास्त्रीं निपुण बहुत । धनुर्वेदपारंगत ।
नाना वहनीं बैसोन फिरत । नसे अंत विद्येसी ॥ १६८ ॥
दुष्यतंराव मृगयेसी । निघाला एकदा दलभारेंशीं ।
कीं समुद्र फुटे तैसा । सेना चाले सांगातें ॥ १६९ ॥
चतुरंगदल अद्‍भुत । मिरवित जातसे दुष्यंत ।
नारी नर गोपुरींहूनि पाहत । म्हणती मन्मथ दुसरा हा ॥ १७० ॥
तंतवितंतघनसुस्वर । वाद्यें वाजती अपार ।
चंड पर्वत नद्या थोर । उल्लंघून जातसे ॥ १७१ ॥
नानावृक्षमंडित । वनें उपवनें देख अद्‍भुत ।
ऋष्याश्रम विलोकित । दर्शनें घेत जातसे ॥ १७२ ॥
दुष्ट श्वापदें अपार वधित । येता जाहला कश्यपारण्यांत ।
कण्वऋषीचे आश्रमांत । प्रवेशला राजेंद्र तो ॥ १७३ ॥
तों कोणी न दिसे समोर । मग गंभी गर्जे नृपवर ।
म्हणे आश्रमीं आहे काय ऋषीश्वर । प्रत्युत्तर कोणी नेदी ॥ १७४ ॥
तों लावण्यामृतसरिता । बाहेर आली ऋषिदुहिता ।
कीं शातकुंभदिव्यलता । सुगधंखाणी पद्माक्षी ॥ १७५ ॥
वैकुठंवनिता रमा । तिची दुसरी हे अपर प्रतिमा ।
कीं सरस्वती आणि उमा । द्यावी उपमा तयांची ॥ १७६ ॥
रुपयौवनचातुर्यखाणी । मंडित दिव्यकनकाभरणीं ।
राजेंद्रासी सन्मानूनि । आसन देत बैसावया ॥ १७७ ॥
स्वागत पुसोन समस्त । अर्घ्यपाद्यविधीं पूजित ।
राव तोषला मनांत । म्हणे मंडित सर्वगुणीं ॥ १७८ ॥
मग बोले ते कामिनी । राजचक्रचूडामणी ।
तुमचें नाम ऐकावें श्रवणीं । ऐसें मनी वाटतें ॥ १७९ ॥
स्नेह दिसतो बहुत । अंतर शब्दें जाणावा समस्त ।
मग बोले दुष्यतं । वचने तृप्त जाहलों ॥ १८० ॥
सुलक्षण चातुर्यखाणी । मैथिलनरेंद्र विख्यात त्रिभुवनीं ।
त्याचा पुत्र मी सुलक्षणी । दुष्यतंराव नाम माझें ॥ १८१ ॥
कण्वऋषीचें दर्शन घ्यावें । म्हणून आलों सद्‍भावें ।
केव्हां येतील बोलावें । सुवदने पिकस्वरे ॥ १८२ ॥
शकुंतला म्हणे नृपनाथा । फळें आणावया गेला पिता ।
तो येईल त्वरित आतां । विलंब कांही न लागेचि ॥ १८३ ॥
यालागीं नृपचक्रमुकुटावतंसा । क्षणभरीं तुम्ही स्वस्थ बैसा ।
इच्छा असेल जे मानसा । ते परिपूर्ण होईल ॥ १८४ ॥
देखोनि परम एकांत । राजास जाची मन्मथ ।
पुन्हां तीस बोलावित । राव दुष्यतं चतुर तो ॥ १८५ ॥
राव म्हणे सद्‌गुणखाणी । ऊर्ध्वरेता कण्वुमनी ।
त्यासी तूं जाहलीस नंदिनी । प्रगट वचन करी तें ॥ १८६ ॥
मग चातुर्यसरोवरमराळी । बोलत सुरस ते वेळीं ।
म्हणे एका तपस्वियाजळी । कण्वें कथा सांगितली ॥ १८७ ॥
ते म्यां मनीं धरली पूर्ण । तेच तुजपाशीं सांगेन ।
पूर्वी विश्वामित्र गाधिनंदन । तप दारुण तेणें केलें ॥ १८८ ॥
तपःपुण्याचल वाढे अद्‍भुत । त्यापुढें मेरु ढेंकुळ दिसत ।
पुरंदर चित्तीं चिंताक्रांत । मग प्रेरित मेनिकेतें ॥ १८९ ॥
म्हणे जाऊन तूं सुंदरि । कौशिकतपासी क्षय करीं ।
मी पुरवीन सामग्री । जें जें इच्छिसी मानसी ॥ १९० ॥
येरी म्हणे विश्वामित्र । तपस्वियांमाजी अति पवित्र ।
भूमडंळीं अपरिमित । उदयास्तरहित तो ॥ १९१ ॥
हा प्रतिसृष्टीचा धाता पूर्ण । शापें भस्मे करील त्रिभुवन ।
मग बोले सहस्त्रनयन । साधीं कारण एवढें ॥ १९२ ॥
वस्त्रें अलंकारमंडित । मेनिका आली कौशिकारण्यांत ।
ऋषीस नमूनि त्वरित । नृत्यकौतुककला दावी ॥ १९३ ॥
मग वस्त्रें ठेवूनि तीरीं । स्नान करी कासारीं ।
सवेंचि आली बाहेरी । वस्त्रें घ्यावयाकारणं ॥ १९४ ॥
तो मलयाचलींचा सुगंध वात । वस्त्र तिचें उडवून नेत ।
येरी नग्नचि चमकत । धांवे वस्त्र धरावया ॥ १९५ ॥
वामहस्त कामसदनीं । झांकून धांवे लावण्यखाणी ।
मृगेंद्रकटी कुरंगनयनी । विलोकिली कौशिकें ॥ १९६ ॥
विसरला वैराग्यज्ञान । धांवोन देत अलिंगन ।
सुरतानंदें दोघें पूर्ण । क्रीडत एकांती यथेच्छ ॥ १९७ ॥
बहुकाल तीस भोगित । तेव्हां जाहला वीर्यपात ।
मग ऋषि सावध होत । म्हणे तपासी आंचवलों ॥ १९८ ॥
कौशिक तपासी चालिला पुढती । मेनिका जाय स्वर्गाप्रती ।
वाटेस हिमालय पर्वतीं । गर्भ टाकला तत्काल ॥ १९९ ॥
कन्यारुप बाळ सत्वर । टाकूनि गेली ते निष्ठुर ।
पक्षी मिळोनि समग्र । पक्षच्छाया वरी करिती ॥ २०० ॥
मधुरस आणुनि स्नेहमेळीं । मुखी घालिती क्षुधाकाळीं ।
कोणी दुष्ट येतां जवळी । झडपूनि दवडिती आवेशें ॥ २०१ ॥
तो क्ण्व ऋषि आला तेथ । देखे बाळ रक्षिती शकुंत ।
उचलोनि ओसंगाघेत । गृहा आणूनि प्रतिपाळी ॥ २०२ ॥
शकुंती रक्षिली यथार्थ । शकुंतला नामें पिता बाहत ।
पालन केलें आजपर्यंत । इतुका वृत्तांत असे हा ॥ २०३ ॥
मनीं म्हणे दुष्यंत । हे स्वर्गींची अप्राप्त वस्त ।
मज होईल तरी प्राप्त । नाही अंत भाग्यासी ॥ २०४ ॥
दुष्यंत म्हणे नितंबिनी । तूं लावण्यरत्‍नखाणी ।
तुज वास या काननीं । योग्य नव्हें तत्त्वतां ॥ २०५ ॥
तरी लाज सांडून सकळी । जरी मज वरिसी ये काळीं ।
कीर्ति वाढे या भूमंडळीं । पट्टराणी तूं साच ॥ २०६ ॥
देवां दुर्लभ पदार्थ । ते ते मत्सदनीं आहेत यथार्थ ।
पृथ्वीची स्वामिणी सत्य । होशील आजपासूनी ॥ २०७ ॥
अष्टविवाहांमाजी जाण । उत्तम असे गांधर्वलग्न ।
जरी घेईल तुझें मन । तरी माळ घालीं कां ॥ २०८ ॥
मग म्हणे शकुंतला । यथार्थ बोलसी चतुर भूपाला ।
परि पितयास न सांगतां ये वेळा । व्यभिचारकर्म दिसे हें ॥ २०९ ॥
तरी क्षणभरी राहें तत्वतां । आतां आश्रमा येइल माझा पिता ।
त्यापाशीं मागोन करीं कांता । नृपनाथा गुणालया ॥ २१० ॥
येरु म्हणे आपुलें मन । आपणा वडील आहे पूर्ण ।
आदि मध्ये अंतीं जाण । आपुले आपण सांगाती ॥ २११ ॥
शकुंतला विचारी मनीं । हा गेलीयावरी एथुनी ।
दृष्टी न पडे पुन्हां नयनीं । बहुत तपें साधितां ॥ २१२ ॥
मग हास्यवदनें बोलत । मज भाष द्यावी यथार्थ ।
माझे पोटीं होईल जो सुत । राज्यछत्र द्यावें तया ॥ २१३ ॥
दुष्यंत उचलोनि हस्त । त्रिवार तियेसी भाष देत ।
तूं पट्टराणी यथार्थ । तुझा पुत्र छत्रपति ॥ २१४ ॥
हें माझें सत्यवचन । उल्लंघूं न शके विधि ईशान ।
मग शकुंतला माळ घालून । अनुसरली तयासी ॥ २१५ ॥
संपूर्ण जाहलें सुरत । गर्भ राहिला उदरांत ।
ऋषिभयें राव निघत । मग बोले तियेसी ॥ २१६ ॥
देऊन अलिगंन चुबंन । म्हणे तुज न्यावया पाठवीन ।
छत्रें चामरें शिबिका यान । तुज धाडीन आणावया ॥ २१७ ॥
राव निघे वेगेंकरुन । तिजविषयी गुंडाळत मन ।
परी कण्वभय वाटे दारुण । शापील येऊनि महाऋषि ॥ २१८ ॥
मार्गस्थ पाहून नृपाला । सद्‌गद होय शकुंतला ।
तोम कण्व ऋषि आश्रमा आला । घरांत अबला लपतसे ॥ २१९ ॥
ऋषीनें जाणिलें ज्ञानदृष्टीं । दुष्यंताशीं पडली गांठी ।
संतोषोनि परम पोटीं । आश्वासीत कन्येतें ॥ २२० ॥
मनीं न धरावें आन । उत्तम जाहले गांधर्व लग्न ।
येरीनें धांवोनी धरिलें चरण । वर्तमान सकल सांगत ॥ २२१ ॥
कण्व परम आनंदत । म्हणे पुरले माझे मनोरथ ।
तुझा भ्रतार आयुष्मंत । तुजसहित सुखी असो ॥ २२२ ॥
ब्रह्मानंदें म्हणे श्रीधर । पुढें कथा रसाळ फार ।
श्रवण करोत पंडित चतुर । शकुंतलाख्यान हें ॥ २२३ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । तृतीयाध्यायीं कथियेला ॥ २२४ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्वटीका श्रीधरकृत ।
व्यासजन्म शकुंतलादुष्यंत । यांचे चरित्र कथियेलें ॥ २२५ ॥
॥ इति श्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि तृतीयोऽध्यायः ॥
अध्याय तिसरा समाप्त



GO TOP