श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय दुसरा
गरुडाची कथा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
संपले अगाध सिंधुमथन । ऐका सिंहावलोकनेंकरुन ।
कद्रू विनता येऊन । वारु विलोकिती रवीचा ॥ १ ॥
पाहोनि आल्या निजसदनीं । कद्रू म्हणे विनते साजणी ।
उच्चैःश्रवा कोणे वर्णी । येरी म्हणे शुद्ध धवल ॥ २ ॥
चंद्रकिरणांचा ओतिला । कीं शुद्धरजताचा घडिला ।
कीं जान्हवीनीरें धुतला । दुग्धवर्ण तेजस्वी ॥ ३ ॥
कद्रू म्हणे सत्य जाण । परी पुच्छ आहे कृष्णवर्ण ।
अरुणजननी बोले वचन । तुझे नयन तरळले ॥ ४ ॥
कद्रू म्हणे पुच्छ श्वेत । जरी मज दाखविसी यथार्थ ।
तरी सहस्त्र अयनेंपर्यंत । दासी तुझी होईन मी ॥ ५ ॥
जरी श्यामवर्ण पुच्छ पाहीं । तरी तूं दासी माझी होईं ।
उदयीक जाऊं लवलाहीं । पुच्छ पहावया वारुचें ॥ ६ ॥
रात्रीं पुत्र पाचारुनी । रुदन करी कद्रू ते क्षणी ।
म्हणे असत्य पातकें करुनी । विनतेने मज मारविले ॥ ७ ॥
तरी तुम्ही सर्वही जाऊन । वारुच्या पुच्छास दंश करुन ।
करुन दाखवा श्यामवर्ण । दासी आमुची विनता मग ॥ ८ ॥
व्याल म्हणती तत्क्षणीं । आम्हांस भस्म करील तरणी ।
समर्थासीं द्वंद्व बांधूनी । मग आम्हीं कोठें राहावें ॥ ९ ॥
कद्रू कोपली अनिवार । शापशस्त्रें ताडिले विखार ।
म्हणे तुम्हांतें सापत्न आणि वैश्वानर । करितील संहार चुकेना ॥ १० ॥
जनमेजयाचा याग परम । तेथें तुम्ही व्हाल भस्म ।
ऐसा शाप ऐकतां उत्तम । मानिता जाहला परमेष्ठी ॥ ११ ॥
सर्प हिंसक चांडाळ । महादुर्मती विखार खळ ।
वाढेल बहु त्यांचे कुळ । बरें शापिलें कद्रूनें ॥ १२ ॥
ऐकोनि मातेचा शाप देख । भयभीत धांवती दंदशूक ।
कृष्णकेश होऊनि सकळिक । पुच्छीं जडले वारुच्या ॥ १३ ॥
कद्रूनें तें जाणून । विनतेस पदरी धरुन ।
ओढिली म्हणे श्वेतवर्ण । पुच्छ कोठें दाखवीं ॥ १४ ॥
उदया येतां वासरमणी । विनतेस नेलें ओढूनी ।
पुच्छ श्यामवर्ण पाहुनी । विनता वचन न बोले ॥ १५ ॥
मग कद्रूनें ओढोनी । दासी करुन ठेविली सदनीं ।
जैशी धेनु कर्दमीं जाउनी । अकस्मात गुंतली ॥ १६ ॥
सहस्त्र वर्षें भरतां पूर्ण । आपेंआप अंड उलोन ।
प्रगटे महाराज सुपर्ण । जैसा सूर्य कल्पांतींचा ॥ १७ ॥
किंवा प्रगटला प्रळयाग्न । ब्रह्मांड उजळलें तेजेंकरुन ।
लोक भाविती प्रळय पूर्ण । करिती स्तवन अपार ॥ १८ ॥
तुझें स्मरण करितां निःशेष । उतरे संसारविखारविष ।
तुझे जे कां अनन्य दास । त्यांच्या स्मरणें सर्प पळती ॥ १९ ॥
पक्ष स्पर्शतां जगती । गरुडपाचूच्या खाणी उमटती ।
चोवीस सहस्त्र योजनें गणती । दोन पक्ष दोहींकडे ॥ २० ॥
बिंबप्रवाळरंगाहून । आरक्त चंचु चरण लोचन ।
किरीटकुंडलें मंडित ध्यान । चतुर्भुज रुप तुझें ॥ २१ ॥
तुज भजती जे आवडीं । तेचि गरुडोपासक गारोडी ।
तुझ्या स्मरणें सर्पकोडी । पळतील उठोनियां ॥ २२ ॥
पंचाहत्तर सहस्त्र योजनें थोर । एवढें तुझें दीर्घ शरीर ।
दोनी पक्ष चोवीस सहस्त्र । वेदध्वनी उमटती ॥ २३ ॥
पूर्व उत्तर मीमांसा दोन्हीं । पक्षांमधून उमटती ध्वनी ।
पक्षतेज झळकतां मेदिनी । पाषाण होती दिव्य पाचू ॥ २४ ॥
तुझें तेज अंबरी प्रचंड । करपोन जाईल ब्रह्मांड ।
नाभी नाभी म्हणे गरुड । चिंता कांहीं करुं नका ॥ २५ ॥
जे विष्णुभक्तिविहीन । ज्यास नावडे स्मरण किर्तन ।
निंदक दुष्ट दुर्जन । त्यांस विदारीन क्षणार्धे ॥ २६ ॥
माता पिता गुरु ब्राह्मण । साधु संत हरिभक्त जाण ।
यांस द्वेषी जो दुर्जन । त्यास विदारीन क्षणार्धे ॥ २७ ॥
वेद शास्त्र पुराण । करिती जे कां अप्रमाण ।
विष्णु शिव जे निंदिती दुर्जन । त्यांसी विदारीन क्षणार्धे ॥ २८ ॥
हरिशिवप्रतिमा म्हणे पाषाण । तीर्थमहिमा सांडी खंडून ।
निंदी हरिस्वरुपें सगुण । त्यास विदारीन क्षणार्धे ॥ २९ ॥
म्हणोनि प्रजा हो निश्चिती । सद्भावें करा भगवद्भक्ती ।
तरी तुम्हां अहोरातीं । घरटी घालून रक्षीन ॥ ३० ॥
प्रजेचें करुन समाधान । अद्भुत तेज अच्छादून ।
मातेचें घ्यावया दर्शन । सर्प सदना पातला ॥ ३१ ॥
देखोनि मातेचे क्लेश । परम संतापला खगेश ।
दासीपुत्र सुपर्णास । सर्प म्हणती मागें पुढें ॥ ३२ ॥
कद्रू म्हणे गरुडा पाहीं । रमणकद्वीपाप्रति सर्प नेईं ।
सुपर्णे पृष्ठीं वाहोनी लवलाहीं । सर्प नेले तया स्थाना ॥ ३३ ॥
सर्पांची सत्ता देखोन । म्हणे मातेस सुपर्ण ।
तुझ्या पालटास जाण । मागेल तें देईन मी ॥ ३४ ॥
विनता म्हणे कद्रूतें । माझ्या पालटा माग दिव्य वस्तूतें ।
कद्रू म्हणे मजसहित पुत्रांतें । अमृतपान करवीं कां ॥ ३५ ॥
तुवां दिधलिया अमृत । तत्काळचि तुज करीन मुक्त ।
विनता गरुडासी सांगत । अपेक्षित सर्पांचें ॥ ३६ ॥
बाहू पिटूनि बोले पुरुषार्थ । देवांसी जिंकोनि आणितों अमृत ।
गरुड चालिला त्वरित । निषाद भक्षित समुद्रींचे ॥ ३७ ॥
भक्षिले बहुत निषादगण । त्यांत सांपडला एक ब्राह्मण ।
तो तत्काळ टाकिला उगळून । श्रेष्ठवर्ण म्हणोनियां ॥ ३८ ॥
क्षुधानल नव्हे शांत । कश्यप म्हणे पुत्रा ऐक त्वरित ।
देवलोकीं सरोवर अद्भुत । कूर्मकुंजर त्यांत भांडिती ॥ ३९ ॥
विभावसु सुप्रतीक । पूर्वीं हे बंधू दोघे देख ।
द्रव्यसंबंधें एकास एक । शापून ऐसे जाहले ॥ ४० ॥
तीन योजनें जाण । दोघांचे शरीर विस्तीर्ण ।
गरुडें तत्काळ मारुन । अतंरिक्षें घेऊन जातसे ॥ ४१ ॥
जंबुवृक्षाची विशाळ । श्तयोजनें शाखा निर्मळ ।
वरी बैसतां खगपाळ । तंव ती शाखा मोडली ॥ ४२ ॥
विजेऐसी कडकडत । गरुड विलोकून पाहत ।
तों पनोपानीं समस्त । जडले वालखिल्य येऊनी ॥ ४३ ॥
साठीसहस्त्र त्यांचा मेळा । सर्व पर्णीं जडोन ठेला ।
अंगुष्ठप्रमाण परि आगळा । प्रताप त्यांचा न वर्णवे ॥ ४४ ॥
मरतील आतां ब्राह्मण । गरुड उडाला शाखा घेऊन ।
मुखीं कूर्म इभ धरोन । अतंरिक्ष हिंडतसे ॥ ४५ ॥
संकटी पडला सुत । देखोन कश्यप प्रार्थित ।
म्हणे स्वामी भग्नशाखा त्वरित । सांडून जा पूर्वस्थळा ॥ ४६ ॥
ऐकोन कश्यपाचें वचन । मानसगती अवघे जण ।
हिमाचलाप्रती जाऊन । तपध्यान आरंभिती ॥ ४७ ॥
विहंगोत्तमें क्षुधाहरण । केलें इभ कूर्म भक्षून ।
कनकशाखा नेऊन । हिमाद्रिशिरीं ठेविली ॥ ४८ ॥
वैनतेयबळ अगाध । देखोनि इंद्राचा अपराध ।
हा दुसरा शक्र प्रसिद्ध । वालखिल्य करीत होते ॥ ४९ ॥
शौनक म्हणे सूता । शक्रें काय अन्याय केला होता ।
सूत म्हणे कश्यपें याग करितां । पुत्रोत्पत्तीकारणें ॥ ५० ॥
साठीसहस्त्र वालखिल्य जाणा । समिधा आणूं चालिले वना ।
मूर्ती अंगुष्ठप्रमाणा । परम वेगें चालती ॥ ५१ ॥
शिखा यज्ञोपवीत धोत्रें । चिमणींच झळकती पवित्रें ।
परी सामर्थ्यें जयांचीं विचित्रें । न गणती शक्रसूर्यांतें ॥ ५२ ॥
वेदशास्त्रचर्चा करित । एक एक दर्भकाडीसी धरित ।
शनैःशनैः जाती कष्टत । तों गोष्पदीं उदक देखिलें ॥ ५३ ॥
पाय निसरोन अकस्मात । आंत पडले विप्र समस्त ।
बुचकळ्या देतां तेथ । कासावीस जाहले ॥ ५४ ॥
जीवाचिये काकुळती । एकास एक झोंबती ।
टाळी वाजवून अमरपती । हांसे विमानीं गदगदां ॥ ५५ ॥
पहा हो गोष्पदजळीं । विप्र हे बुडती सकळी ।
परी धावोन नये जवळी । कौतुक मात्र विलोकित ॥ ५६ ॥
मग वालखिल्य जोडिल्या हस्तीं । स्तविते जाहले रमापती ।
विश्वव्यापक सगुणमूर्ती । काढीं आम्हां येथोनियां ॥ ५७ ॥
मग धांवूनि श्रीकरधर । कडेसीं काढिले ब्रह्मपुत्र ।
परी इंद्र हांसला तेणें विप्र । परम संताप पावले ॥ ५८ ॥
तेथेंचि आरंभिलें तप तीव्र । दुसरा करुं इच्छिला प्रतिशक्र ।
कंपायमान शचीवर । शरण गेला कश्यपा ॥ ५९ ॥
मग कश्यपें येऊन । स्तविले सर्व ते ब्राह्मण ।
म्हणे मजवरी दृष्टी देऊन । कोप सोडा आतां हा ॥ ६० ॥
तुम्हीं निर्मिला दुसरा इंद्र । तरी तो आतां करा खगेद्रं ।
वीर्यें शौर्यें बलसागर । शक्राहून विषेश ॥ ६१ ॥
शक्रसामर्थ्य करुन क्षीण । त्याचा प्रताप वाढेल गहन ।
मग विनतागर्भीं दिव्यरत्न । पक्षीश्वर जन्मला ॥ ६२ ॥
द्वादश मित्र करुन एकत्र । घडीला तो सर्पामित्र ।
जो विष्णुभक्तांचा परम मित्र । ऐका चरित्र तयाचें ॥ ६३ ॥
असो पक्षवातेंकरुन । हडबडिलें स्वर्गभुवन ।
शक्रास म्हणे अंगिरानंदन । सावधान अमृत रक्षा ॥ ६४ ॥
गरुड देखोनियां दृष्टीं । धांवती सुरवरांच्या थाटी ।
करिते जाहले शस्त्रवृष्टी । परी न गणी सुपर्ण तो ॥ ६५ ॥
आकांत भावे निर्जरदळीं । शस्त्रें सकळांचीं गिळियेलीं ।
देवसेना विदारिली । दिक्पाळ सकळ पळविले ॥ ६६ ॥
लागतां नखांचा मार । शस्त्रें चूर्ण जाहलीं समग्र ।
पाठी देऊन सत्वर । पळती निर्जर त्वरेनें ॥ ६७ ॥
वीज झळके अंतराळीं । तेवीं विहंगमराज तळपे दळीं ।
अमृतकुंडाजवळी । लक्षित आला निजबळें ॥ ६८ ॥
तों तेथें ज्वाळावर्ण । विझविली चंचू उदकेंकरुन ।
वायूचें करणार खंडण । कर्तरीयंत्र उपडिलें ॥ ६९ ॥
रजतकलशीं सुधारस । भरोनि चालिला खगेश ।
अद्भुत देखोनि श्रीनिवास । धांवोनि चक्र मोकलिलें ॥ ७० ॥
येतां देखोनि सुदर्शन । गरुडें गिळिलें न लगतां क्षण ।
हृदयस्थ जो कां भगवान । त्याचे हातीं दीधलें ॥ ७१ ॥
सुपर्णास म्हणे नारायण । माग तुज मी जाहलों प्रसन्न ।
मग बोले विनतानंदन । तूंचि मागें मज कांही ॥ ७२ ॥
हरि बोले सुहास्यवदन । सुपर्णा तू होईं माझें वहन ।
गरुडें धांवोनि चरण । श्रीरंगाचे वंदिले ॥ ७३ ॥
असो तो सर्पारि जाण । तेथून जाहला विष्णुवाहन ।
इंद्रहि स्नेहें येऊन । सुपर्णास भेटला ॥ ७४ ॥
इंद्र म्हणे तूं कश्यपकुमर । होसी माझा तूं सहोदर ।
अमृत पाजून विखार । अमर सहसा करुं नको ॥ ७५ ॥
वैनतेय म्हणे कौतुक पाहीं । सुधाघट नेतों लवलाहीं ।
अतंरे ठेवितांच ते समयीं । घेऊन येईं तुझा तूं ॥ ७६ ॥
ऐसा संकेत सांगून । सर्पसदना आला सुपर्ण ।
अमृतकुंभ दावून । म्हणे स्नानें करा आतां ॥ ७७ ॥
गंगा जळ पुण्यरुप । तेथें स्नान करिती सर्प ।
सुधारसघट खगाधिप । कुशमंडळीं ठेवी तेव्हां ॥ ७८ ॥
म्हणे माझी माता येथून । मुक्त जाहली दासीपणापासून ।
साक्षी धरणी सूर्यनारायण । बोले गर्जोनि अंडजप्रभू ॥ ७९ ॥
तों इंद्र अदृश्यरुपें येऊन । सुधारसघट नेला उचलोन ।
कृतांत नेतो जैसा प्राण । कोणासही न कळतां ॥ ८० ॥
स्नानसंध्या करुन व्याळ । धांवोनि आले तेथें सकळ ।
शोधिती सकळ कुशमंडळ । न दिसें सुधारसघट कोठेंही ॥ ८१ ॥
हाहाकार करिती फणी । घेती वक्षःस्थळ कपाळें बडवोनी ।
म्हणती ठकविलें आम्हांलागुनी । कपट केलें सुपर्णे ॥ ८२ ॥
अमृतघट ठेविला जेथें । चाटिती सर्प दर्भांतें ।
तों जिव्हा चिरल्या समस्तांतें । दुःख जाहले अपार ॥ ८३ ॥
हातींचा गेला सुधारस । वरी जिव्हा चिरल्या विषेश ।
सर्प द्विजिव्ह निःशेष । अद्याप जन पाहती ॥ ८४ ॥
मग सत्तावीस व्याळकुळें । समूळ ग्रासिलीं खगपाळें ।
उरले ते पळाले । विवरद्वारें पातळीं ॥ ८५ ॥
स्कंधीं घेऊन विनतेसी । सर्पारि गेला निजाश्रमासी ।
विनता आणिली कश्यपापासीं । ऐक्यता केली सुपुत्रें ॥ ८६ ॥
हें सुपर्णाख्यान जे पढती । बहुत श्रोतयां ऐकविती ।
त्यांस पृष्ठीं वाहोनी अंतीं । गरुड नेईल वैकुंठा ॥ ८७ ॥
आणि संसारीं असतां सदा । कदा न होय सर्पबाधा ।
ऐसी व्यासवचनमर्यादा । असत्य नव्हे काळत्रयीं ॥ ८८ ॥
असो शेष वासुकी सर्प सकळी । तप करिती हिमाचळीं ।
विष्णुनाभ येऊन ते काळीं । पुसता जाहला तयांते ॥ ८९ ॥
कां आरंभिले तप घोर । शेष वासुकी बोलती उत्तर ।
चांडाळ हे परम विखार । यांच्या संगें बुडालों आम्ही ॥ ९० ॥
सुपर्णासीं सदा वैर । चालविती हे विखार ।
आणि मातृशाप अनिवार । सर्पसत्रीं भस्म व्हावें ॥ ९१ ॥
म्हणोन तीव्र तपवैश्वानर । त्यांतचि जाळूं आपलें शरीर ।
मग बोले चतुर्वक्त्र । भय मानसीं धरुं नका ॥ ९२ ॥
माथां घेऊनि कुंभिनी । अक्षयीं राहा पातालभुवनीं ।
हरिस्मरण करा अनुदिनीं । शाप तुम्हांसी बाधेना ॥ ९३ ॥
मग सर्षपप्राय धरणी । शेष घे माथां उचलुनी ।
खल कुटिलभाव टाकुनी । भगवद्भजनीं राहिला ॥ ९४ ॥
सहस्त्रफणींचा मध्यमणी । त्यावरी पुष्पवत धरिली धरणी ।
परम भक्त म्हणवूनी । त्यावरी पहुडे नारायण ॥ ९५ ॥
मिळोन दुर्जन विखार । एकांतीं करिती विचार ।
म्हणती जनमेजयाचें सत्र । न चले ऐसे करावें ॥ ९६ ॥
एक म्हणती प्रधान मोहून । विवेक सांगून मोडावा यज्ञ ।
एक म्हणती रात्रीं जाऊन । ऋत्विजगण डंखावे ॥ ९७ ॥
होमद्रव्य समूळींहून । नासावें गरळ घालून ।
किंवा जनमेजयासी मारुन । टाकावें परीक्षितीसारिखें ॥ ९८ ॥
एक म्हणती विषधारा अमोघ । पाडावा यज्ञावरी मेघ ।
एक म्हणती सवेग । गजपूरचि बुडवावें ॥ ९९ ॥
वासुकी म्हणे ते क्षणीं । दुष्ट पडतील हुताशनी ।
सुष्ठु रक्षील आस्तिक मुनी । भविष्य असे पूर्वींचें ॥ १०० ॥
परम सुरस भारतकथा । पावन होय श्रोता वक्ता ।
शौनकादिऋषी समस्तां । सूत सांगे आदरें ॥ १०१ ॥
जो पांडवकुलीं कुलभूषण । सर्व लक्षणीं विराजित पूर्ण ।
जो परीक्षितीचा नंदन । जनमेजय राजेंद्र ॥ १०२ ॥
विद्याप्रवीण गुणसमुद्र । भारतसागरौल्हासचंद्र ।
सुर भूसुर सप्तकर । तृप्त ज्याचे निजगृहीं ॥ १०३ ॥
कलीमाजी राज्य करुन । केलें कलीसी निग्रहण ।
करी गोविप्रप्रतिपालन । प्रजाजन सुखरुप ॥ १०४ ॥
षोडशवर्षें विराजित । सभेस बैसला नृपनाथ ।
अमात्य हस्त जोडून समस्त । उभे तिष्ठत निजस्थानीं ॥ १०५ ॥
सभा घनवटली पूर्ण । पुढें गर्जती बंदिजन ।
तों सर्वांकडे पाहून । जनमेजय बोलत ॥ १०६ ॥
माझा पिता अभिमन्युनंदन । अल्प्वयीचं कां त्यास मरण ।
वर्तलें तें सर्व कारण । श्रुत पूर्ण मज करावें ॥ १०७ ॥
अमात्य जाहले सदगदित । नृपास आले अश्रुपात ।
सभा राहिली निवांत । प्रधान सांगे वर्तलें तें ॥ १०८ ॥
पांडव निजधामा गेलियावरी । कली सुटला उर्वीवरी ।
परीक्षिती नृप राज्य करी । कुंजरपुरीं तेधवां ॥ १०९ ॥
तो कुरुकुलावतंस नृपती । पवित्र राजा परीक्षिती ।
राज्यामाजी बहुत नीती । धर्माऐसी चालवीत ॥ ११० ॥
मृगयाव्याजेंकरुनी । चातुरंगसेनादळ घेऊनी ।
हिंडतां घोर काननीं । सायक लावूनी शरासना ॥ १११ ॥
तों दूर देखिला कुरंग । सायकें विंधिला सवेग ।
घायाळ पळत तो वेगें मृग । पाठी धांवे नृपती तो ॥ ११२ ॥
आंगीं भेदला असतां मार्गण । घोर कांतार लंघी हरिण ।
राजा पाठीसीं धांवतां शीण । बहुसाल पावला ॥ ११३ ॥
राव परम तृषाक्रांत । तों गोपाळ देखिले बहुत ।
नाना विनोद करित । जाहले उन्मत्त दुग्धपानें ॥ ११४ ॥
त्यांसी नृप पुसे जीवन । भरोनी आणिती दुग्धद्रोण ।
गोप म्हणती करी पयःपान । परी तें नेघे सर्वथा ॥ ११५ ॥
महापर्वताचे दरीमधून । मृग गेला चुकावून ।
भोंवता पाहे अभिमन्युनंदन । तों ऋषिआश्रम देखिला ॥ ११६ ॥
तंव तया आश्रमांत । शमीक ऋषि बैसला ध्यानस्थ ।
तयास परीक्षिती पुसत । कुरंग गेला या वाटे ॥ ११७ ॥
तंव तो समाधिसुखें तल्लीन । दारुप्रतिमा जे विरहितप्राण ।
राव विषाद पावोन । म्हणे गर्वे न बोले ॥ ११८ ॥
विनाशकाळीं बुद्धि विपरीत । अविद्या आठवली मनांत ।
ईश्वरी माया अद्भुत । पूर्वकर्म सुटेना ॥ ११९ ॥
मृत उरग होता पडला । धनुष्यकोटीनें उचलिला ।
कंठीं ऋषीच्या घातला । नेणवे त्याला कांहीं तें ॥ १२० ॥
परम सज्ञान चतुर । विवेकसमुद्रींचा पोहणार ।
बहुतांस सांगे नीतिशास्त्र । तो कुबुद्धिकूपीं पडियेला ॥ १२१ ॥
परम पुण्यवंत परीक्षिती । परी कर्माची गहन गती ।
घोर अनर्थ करुन नृपती । कुंजरपुराप्रति गेला ॥ १२२ ॥
तंव तें सर्पशरीर घाणत । दुर्गंधी सुटली अरण्यांत ।
पिपीलिका आंगास झोंबत । सावचित्त शमीक नोहे ॥ १२३ ॥
ऋषि जाती आश्रमावरुन । कंटाळती उरग देखोन ।
त्याचा पुत्र श्रृंगी तपोधन । ब्रह्मदर्शना गेला होता ॥ १२४ ॥
मागें रायें येऊन वनीं । करुन गेला दुष्ट करणी ।
तें नेणून सर्व ब्राह्मणीं । कंटाळती आश्रमातें ॥ १२५ ॥
नित्य नेम सारोन आश्रमा येत । तों स्वाध्यायी भेटले बहुत ।
म्हणती पिता तुझा ध्यानस्थ । मृतसर्प गळां त्याचे ॥ १२६ ॥
तो वेगें आश्रमासी आला । मृतसर्प गळां देखिला ।
परम क्षोभ पावला । जेवीं कल्पांती व्योमकेश ॥ १२७ ॥
अनुचित कर्म करुन निश्चिती । गेला नागपुरा परीक्षिती ।
सर्व कळलें तयाप्रती । क्रोध चित्तीं न समाये ॥ १२८ ॥
हातीं घेऊनि सलिल । शापशस्त्र सोडिलें सबळ ।
जें हरि हर देवपाळ । असत्य करुं न शकती ॥ १२९ ॥
आजपासून सातवे दिनीं पूर्ण । तक्षकदंशें पावले मरण ।
मग मृतसर्प काढून । अंग क्षालन उदकें ॥ १३० ॥
बाप रे नकळे होणार । क्रोधें शापिला नृपवर ।
सावध जाहला शमीक ऋषीश्वर । पुढें पुत्र देखिला ॥ १३१ ॥
न सांगता कळला समाचार । शापिला कुरुकुलदिवाकर ।
क्षमाशील तो योगीश्वर । श्रृंगीप्रति बोलतसे ॥ १३२ ॥
म्हणे अहा कर्म निंद्य केलें । राजहिंसा जोडिली बळें ।
त्या रायाचेनि स्नेहमेळें । या वनी सुखीं राहतों ॥ १३३ ॥
प्रजापाळक पवित्र भला । पांडवकुळीं तेवढाच उरला ।
आहा अविवेकें अनर्थ केला । राजा शापिला परीक्षिती ॥ १३४ ॥
भूसुरां पाळी भूपती । तेणें यज्ञयागादि कर्में चालती ।
मग संतोषोनि सुरपती । पर्जन्य पाडी समयोचित ॥ १३५ ॥
तेणें सर्वौषधी पिकून । सुख पावती सकळ जन ।
गाईंस होय तृण जीवन । हा धर्म राजयाचा ॥ १३६ ॥
शमीक विचारी चित्तीं । शाप न टळे कल्पांतीं ।
श्रृंगी म्हणे कर्मगती । न टळे निश्चिती तत्वतां ॥ १३७ ॥
मग गौरमुखनाम शिष्य ते वेळे । शमिके त्यास आज्ञापिले ।
रायासी सावध करीं वहिलें । शाप न टळे कल्पांतीं ॥ १३८ ॥
मग गौरमुख ब्राह्मण । परीक्षितीपाशीं येऊन ।
कांहीं न देतां आशीर्वचन । मौनेंकरुन उगीची ॥ १३९ ॥
मग नरेश्वरें नमून । केलें गौरमुखाचें पूजन ।
तो म्हणे राया कर्म गहन । वनीं करुन आलासी ॥ १४० ॥
शमीक ऋषि पुण्यात्मा । जो कमलोद्भवाची प्रतिमा ।
तो बोलिला वचनें नृपसत्तमा । तींच तुजला समर्पितों ॥ १४१ ॥
मृगयानंदे येऊनि वनीं । गेलास कंठी मृतसर्प घालूनी ।
तें मम पुत्रें देखोनि । परम क्षोभ पावला ॥ १४२ ॥
शापकुठारें परम तीक्ष्ण । आयुष्यतरु छेदिला मूळींहून ।
जीं ऐकतां वचनें अवर्षण । होय सर्व सुखाचें ॥ १४३ ॥
सप्त दिवस होतां पूर्ण । तक्षक दंश करील येऊन ।
तात्काळ जाशी भस्म होऊन । मरीचिनंदनसदनाप्रती ॥ १४४ ॥
शक्र शिव कमलासन । अन्यथा न करी त्याचें वचन ।
सावध होईं येथून । करीं यत्न बहुसाल ॥ १४५ ॥
तक्षकविषहरणार्थ । उपाय करीं अत्यद्भुत ।
ऊठ पळें पळें मृत्यु सत्य । जवळ आला येथूनी ॥ १४६ ॥
गौरमुख हें सांगोन । निघतां नृपें धरिले चरण ।
म्हणे सांग शमीका जाऊन । मी अन्यायी सर्वस्वें ॥ १४७ ॥
माझा अपराध प्रचंड । त्याहून करा विशेष दंड ।
दुष्कृतकर्म गहन प्रचंड । न सुटे भोगिल्यावीण पैं ॥ १४८ ॥
शमीकचरणीं माझें भाळ । सांग ठेविलें मीं सहस्त्र वेळ ।
परत्रीं तरी दोषमूळ । मज झगटूं नेदीं तूं ॥ १४९ ॥
असो बोळावून गौरमुखा । पाचारी अमात्य प्रजा सकळिका ।
जाहलें कर्म तें सर्व देखा । श्रुत केलें समस्तां ॥ १५० ॥
टाकावया श्वासिच्छ्वास । यावरी नाहीं अवकाश ।
कोणे तीर्थीं करुं वास । कोण सत्पुरुष भेटेल ॥ १५१ ॥
कोठें देव होईल प्रकट । नाशील हें एवढें अरिष्ट ।
करील स्वरुपसाक्षात्कार स्पष्ट । ऐसा श्रेष्ठ गुरु कोठें ॥ १५२ ॥
तक्षकविष उतरी । ऐसा कोठें धन्वंतरी ।
स्नानें अज्ञान जाय दूरी । ऐसें तीर्थ कोठें असे ॥ १५३ ॥
वारी मृत्युभय नेटें । ऐसा सोयरा आहे कोठे ।
हे राज्यविलास मोठे । मज कासया सांग पां ॥ १५४ ॥
हडबडून राव उठिला । म्हणे तक्षक आला रे आला ।
मज संतचरणीं घाला । तों तेथें प्रकटला नारद ॥ १५५ ॥
नृपें नारदाचे चरण धरिले । म्हणे गुरुवर्या आयुष्य सरलें ।
सांता दिवसां मरण आलें । सार्थक केलेंजाय कैसें ॥ १५६ ॥
व्यास वाल्मीकि महापुरुष । ध्रुव प्रल्हाद ज्याचे शिष्य ।
तो नारद बोलिला सारांश । गोष्टी ऐक नृपश्रेष्ठा ॥ १५७ ॥
व्यासपुत्र शुक जाण । जो योगियामाजी चूडारत्न ।
त्याच्या मुखेंकरुन । श्रीभागवत श्रवण करीं ॥ १५८ ॥
ऐके नृपते सावधान । पूर्वीं राजा खट्वांग जाण ।
तेणें तीन मुहूर्तीं सार्थक करुन । हरिपद पूर्णपावला ॥ १५९ ॥
सात दिवसपर्यंत । तुज अवकाश आहे निश्चित ।
उपाय हाचि यथार्थ । भागवत परिसें कां ॥ १६० ॥
नारद गेला सांगोन । रायें केले शुकाचें स्मरण ।
तत्काळ उभा ठाकला येऊन । देदीप्यमान दयाळू ॥ १६१ ॥
षोडश वर्षीं विराजित । ज्याच्या तेजाशीं उणा आदित्य ।
ज्याचे स्वरुपावरुन मन्मथ । ओंवाळून टाका ॥ १६२ ॥
सुधापान करिती निर्जर । त्याहून शुकाचें शरीर सुंदर ।
सुहास्यवदन आकर्ण नेत्र । जटाभार मस्तकीं ॥ १६३ ॥
विभूति चर्चूनि सुंदर । विराजे गौरवर्ण कलेवर ।
द्रुढ कौपीन पंचशर । जेणें तोडरीं घातला ॥ १६४ ॥
मोह भ्रम क्रोध काम । जेणें जाळोनि केले भस्म ।
रंभेनें छळिलें होऊन सकाम । न चळे मन तत्वतां ॥ १६५ ॥
तो प्रकटला महाराज शुक । कक्षेस भागवतपुस्तक ।
देखोनि परीक्षिती नृपनायक । भाल ठेवी शुकचरणीं ॥ १६६ ॥
स्वामी शुका व्यासनंदना । तोडीं वेगें संसारबंधना ।
पुढती मिठी घालोनी चरणा । प्रेमभरें स्फुंदत ॥ १६७ ॥
मग बोले व्याससुत । सर्पभयें तूं अतिव्याप्त ।
क्षणाक्षणां दचकसी यथार्थ । सर्प सर्प म्हणवूनी ॥ १६८ ॥
तुझें मन नाहीं स्थिर । कैसा होशी श्रवणीं सादर ।
मग परीक्षिति राजेंद्र । स्थल पाहे श्रवणातें ॥ १६९ ॥
गगनचुंबित लोहस्तंभ । त्यावरी दृढ गृह निर्मिलें स्वयंभ ।
त्यांत बैसविला राव सुप्रभ । जेवीं मित्र उदयाचलीं ॥ १७० ॥
हृदयीं रक्षिजे जैसे प्राण । कृपण जतन करी जैसें धन ।
तैसें रक्षिले मन । हरिचरणीं आवडीं ॥ १७१ ॥
स्तंभाभोंवत्या निर्धारीं । बैसल्या ऋषीश्वरांच्या हारी ।
जैसे मानससरोवरीं । राजहंस विराजती ॥ १७२ ॥
नाना यंत्र मंत्र मनी । स्तंभीं बांधिती आणूनी ।
सुपर्णसुक्तें करुनी । द्विज जप करिताती ॥ १७३ ॥
नाना अनुष्ठानें पुरश्चरण । महामंत्र जपती ब्राह्मण ।
सेना सन्निध करुन । प्रधान रक्षिती भोंवतीं ॥ १७४ ॥
त्या गृहामाजी शुक परीक्षिती । बैसले जैसे शक्र वाचस्पती ।
शुक म्हणे धरणीपति । न करीं खंती भवभयाची ॥ १७५ ॥
अठरा सहस्त्र दिव्यग्रंथ । विष्णुलीला श्रीभागवत ।
शुखमुखें श्रवण करित । नृपनाथ परीक्षिति ॥ १७६ ॥
राजेंद्र बैसतां श्रवणीं । प्रधानासी बोलावूनी ।
म्हणे धन्वंतरी शोधूनी । अवनीवरी काढावा ॥ १७७ ॥
वाराणसी विश्वनाथनगरी । तेथें असे महाधन्वंतरी ।
द्रव्य मागेल तें त्याचे घरीं । देऊनी येथें आणावा ॥ १७८ ॥
यावरी द्वादशस्कंध भागवत । सत्यवतीसुत सांगत ।
सप्रेम राजा ऐकत । भवभय समस्त विसरला ॥ १७९ ॥
तक्षकभयें अत्यंत । गोष्ट प्रकटली देशांत ।
सकल राजे सुहृद आप्त । येते जाहले पहावया ॥ १८० ॥
परस्परें ऐकतां समाचार । धन्वंतरी कश्यपनामा विप्र ।
तो गजपुरास येतां सत्वर । तक्षक मार्गी भेटला ॥ १८१ ॥
विप्ररुप धरुनी । तक्षक पुसे त्यालागूनी ।
बहुत त्वरें धांवसी वनीं । कोठें जातोस सांग पा ॥ १८२ ॥
तो म्हणे परीक्षिती महाराज । पांडवकुलीं विजयध्वज ।
त्यास तक्षक दंश करितां सहज । मी उतरीन क्षणार्धें ॥ १८३ ॥
तक्षक म्हणे कश्यपासी । मीच ग्रासूं जातों नृपासी ।
तुझी मंत्रविद्या कैसी । दाखवीं आतां तत्त्वतां ॥ १८४ ॥
तेथें एक सरोवर भरला । तीरीं न्यग्रोधवृक्ष वाढला ।
वरी एक द्विज चढला । पत्रें तोडी वृक्षाचीं ॥ १८५ ॥
तक्षक धावें क्रोधेंकरुनी । वृक्ष दंशिला निजदशनीं ।
तत्काळ कोळसे होऊनी । विप्रासहित दग्ध जाहला ॥ १८६ ॥
कश्यपें तैसेंच ते क्षणीं । सरोवरींचे उदक मंत्रूनी ।
शिंपितांचि टवटवोनी । वट मागुती विस्तारला ॥ १८७ ॥
विप्र तैसाच पत्रें तोडित । मग त्यास तक्षक म्हणत ।
धन्य तुझा सदगुरु समर्थ । ऐसा मंत्र दिधला ॥ १८८ ॥
तूं जातोस उतरावयासी । श्रृंगीचें वचन असत्य करिसी ।
माझ्या प्रतापा उणें आणिसी । जाय वेगेंसी माघारा ॥ १८९ ॥
तो म्हणे नृप देईल धन । मी पीडिलों दारिद्रयेंकरुन ।
तक्षक म्हणे त्याचे शतगुण । द्रव्य देईन तुजलागीं ॥ १९० ॥
भुमींतील विवर उघडिलें । तक्षकें अपारद्रव्य काढिलें ।
सेवकाचे मस्तकीं दिधले । पाठविलें गृहा त्याच्या ॥ १९१ ॥
असो कश्यप मागें परतविला । लांच देऊन न येसा केला ।
तक्षक तेथून निघाला । गुप्त आला गजपुरासी ॥ १९२ ॥
तों सप्तम दिवसाचे आंत । संपत आलें श्रीभागवत ।
सप्रेम परीक्षिति ऐकत । क्षालन होत महत्पापा ॥ १९३ ॥
जप तप विप्र करित । देखोनियां तक्षक हांसत ।
ऋषिवचन असत्य । याचेनि केवीं होय पां ॥ १९४ ॥
तक्षकें पाठविले ब्राह्मण । कापट्यवेषी विखार पूर्ण ।
अस्ता जातां सूर्यनारायण । वेळ साधून चालिले ॥ १९५ ॥
पुष्पें फळे घेऊन । चालिले राजदर्शना ब्राह्मण ।
विशालरुप अच्छादून । तक्षक सूक्ष्म जाहला ॥ १९६ ॥
सान कीटक होऊन । फलगर्भी रिघाला दुर्जन ।
घ्यावया नृपाचा प्राण । जात लपोन दुरात्मा ॥ १९७ ॥
कक्षेस घेऊन पाश । मैंद जैसे आले यात्रेस ।
तैसे विप्रवेषें वेदघोष । करीत सर्प चालिले ॥ १९८ ॥
नृपास जाणविती प्रधान । तपोवनाहूनि आले ब्राह्मण ।
येऊ द्या म्हणे उत्तरानंदन । द्विज जीवन आमुचें ॥ १९९ ॥
रायें ब्राह्मण नमस्कारिले । इतुक्यांत श्रीभागवत संपलें ।
नृपें शुकास पूजिलें । अंतर्धान पावला तो ॥ २०० ॥
सुवासिक पक्व फलें विविध । विप्र रायास देती प्रसाद ।
नृपें सकलांस देऊन शुद्ध । आपुला भाग घेतला ॥ २०१ ॥
पूर्वकर्माचें गहन बल । ज्यामाजी होता तक्षक खल ।
तें राजविभागा आलें फल । अंतकालसमयासी ॥ २०२ ॥
सकल विप्र पूजिले तये क्षणीं । द्विज प्रार्थिती प्रीतीकरुनी ।
राया हें फल घेऊनी । मुखामाजी घालीं कां ॥ २०३ ॥
रायें फल उकलिलें ते वेळीं । तों आंतून निघाली आरक्त अळी ।
परीक्षितीनें सकळांस दविली । म्हणे वेळ टळली मरणाची ॥ २०४ ॥
अली निघाली ये वेळे । इतुकेन आमुचें मरण टळलें ।
अळीस सहज ग्रीवेवरी ठेविलें । तों तक्षकें धरिलें विशाल रुप ॥ २०५ ॥
आरक्तवर्ण फणिमंडळ । धुधुःकारासरिसे भडकले ज्वाळ ।
भयानक रसना विशाळ । कडकडून दंश केला ॥ २०६ ॥
मुखींच्या ज्वाला गगनीं जाती । ग्रीवास्थलीं वेष्टिला नृपती ।
सेवक आणि द्विज पळती । उड्या टाकूनि चहूंकडे ॥ २०७ ॥
त्यालोहगृहासमवेत । राजा भस्म जाहला तेथ ।
गजपुरीं एकचि आकांत । नोळखती कोणा कोणी ॥ २०८ ॥
लोक पळती ग्राम सोडून । प्रळय वर्तला दारुण ।
गुणिया लांच देऊन । परतविला चांडाळें ॥ २०९ ॥
वटवृक्षीं होता जो ब्राह्मण । तेणें हे सांगितलें वर्तमान ।
ब्रह्मशाप परम दारुण । घेतला प्राण परीक्षितीचा ॥ २१० ॥
योग्यायोग्य असो ब्राह्मण । परि सहसा नकरावे छळण ।
घडे तरी पूजावा प्रीतींकरुन । न घडे तरी ननिंदिजे ॥ २११ ॥
ब्रह्मशाप दुर्धर देख । परीक्षिती पावला विष्णुलोक ।
मग ऋषि अमात्य सकळिक । जनमेजया स्थापिती तूतें ॥ २१२ ॥
ऐसें हें पूर्वकथन । प्रधानीं सांगितलें संपूर्ण ।
राजा नेत्रांसी वस्त्र लावून । करी रोदन पितयालागीं ॥ २१३ ॥
सभा जाहली सद्गदित । प्रजेस गहिंवर न धरवत ।
नेत्री अश्रुधारा स्फुंदत । काय बोलत ते वेळां ॥ २१४ ॥
व्यर्थ गेला पुत्रधर्म माझा । अहा परीक्षिती कुरुकुलध्वजा ।
चांडाळें तक्षकें प्राण तुझा । एकाएकीं घेतला ॥ २१५ ॥
सात दिवस उपोषण । करुं दिल्हें नाहीं उदकपान ।
अवचितां घेतला प्राण । महादुर्जनें तक्षकें ॥ २१६ ॥
मध्येंच लांच देऊनि प्रबळ । गुणिया परतविला तत्काळ ।
परम पापी दुष्ट खळ । करीन निर्मूल कुल याचें ॥ २१७ ॥
हृदय हस्ते पिटून । म्हणे देहत्याग करीन ।
किंवा तक्षकाचा प्राण । घेईन आतां निर्धारे ॥ २१८ ॥
सूड घेईन पितयाचा । निर्वंश करीन तक्षकाचा ।
समुदाय मेळविला ऋषींचा । सर्पसत्र आरंभिलें ॥ २१९ ॥
सर्प संहरावे समस्त । उत्तंक ऋषीचें मनोगत ।
ते गोष्टीस साह्य त्वरित । रुरु जाहला तेधवां ॥ २२० ॥
राव श्वासोच्छ्वास टाकित । दशन बिंबाधरीं रोंवीत ।
क्रोध नाटोपे हस्त चुरीत । नयन आरक्त जाहले ॥ २२१ ॥
कुशल जाणते मंत्र तीक्ष्ण । तें अविलंबें आणविले ब्राह्मण ।
जे मंत्रोच्चार करितां पूर्ण । सर्पांच्या थाटी भस्म होती ॥ २२२ ॥
गरुडास्त्रमंत्रोपासक । तीच गारुडी विद्या सम्यक ।
कोटींच्या कोटी अही सकळिक । भस्मकर्ते क्षणार्धे ॥ २२३ ॥
विप्र म्हणती भूभुजनायका । पितृभक्त होसी निका ।
सर्प भस्म करितां देखा । त्रिभुवनीं कीर्ति गाजेल ॥ २२४ ॥
राव लागे विप्रचरणीं । आतां करुन दाखवा करणी ।
तक्षक आठवतां माझे मनीं । प्राण व्याकुल होताती ॥ २२५ ॥
अवश्य म्हणूनियां भूसुर । सामग्री सिद्ध केली समग्र ।
गौड मल्याळ देश आंध्र । तेथींचे विप्र पातले ॥ २२६ ॥
ज्यांचिया विद्या सामर्थ्ये । आवाहन करितां मंत्रदैवतें ।
उभीं ठाकती येऊनि तेथें । यज्ञकुंडाजवळीं पैं ॥ २२७ ॥
सकल तीर्थीं राहणार द्विज । सप्तपुर्यांमाजील सतेज ।
सर्पसत्रीं महाराज । नृपें आदरें आणिले ॥ २२८ ॥
अथर्वणवेदींचे ब्राम्हण । कृष्णवस्त्रें परिधान ।
कृष्णांबरेंच प्रावरण । आरक्त नयन होमधूम्रें ॥ २२९ ॥
ज्यांचा पेटला क्रोधाग्न । ब्रह्माडं जाळितील न लगतां क्षण ।
क्षणें इंद्रपद हिरोन । रंकासही देतील ॥ २३० ॥
कुंड वेदिका मंडप सत्वर । करिती चतुर सूत्राधार ।
हवनसामग्री समग्र । सिद्ध करुन ठेविली ॥ २३१ ॥
अतींद्रियद्रष्टे ब्राह्मण । ज्यांस भूतभविष्यज्ञान ।
म्हणती सिद्धी न पावे यज्ञ । होईल खंडन शेवटीं ॥ २३२ ॥
आग्रह करील एक ब्राह्माण । पूर्णाहुति होऊं नेदी पूर्ण ।
जनमेजय क्रोधायमान । भरीं भरला नाटोपे ॥ २३३ ॥
शौनकादिक श्रोतेजन । सूताप्रति करिती प्रश्न ।
मख खंडील जो ब्राह्मण । त्याचें कथन सांगें पां ॥ २३४ ॥
सूत म्हणे तो अस्तिक । परम तपस्वी दुसरा अर्क ।
सर्पकुलांचा रक्षक । कथानक ऐका त्याचें ॥ २३५ ॥
परम तपस्वी जरत्कार । हिंडत असतां वनांतर ।
कूपगर्तेंत आपुले पितर । अधोवदन देखत ॥ २३६ ॥
त्यांसी पुसे तुम्ही कोण । तंव ते करिते जाहले रोदन ।
आम्ही तुझे पितृगण । वंशखंडण केलें तुवां ॥ २३७ ॥
तूं स्त्री करुन आधीं । करीं वंशवल्लीची वृद्धी ।
तेणें आम्हां ब्रह्मपदीं । ठाव देईल अब्जज ॥ २३८ ॥
जरत्कारु म्हणे ते क्षणीं । माझिया नामाची मिळेल तरुणी ।
तरीच गृहस्थाश्रमीं वर्तूनी । वंशवृद्धि करीन ॥ २३९ ॥
करीत पृथ्वीपर्यटन । ठायीं ठायीं बोले गर्जून ।
माझ्या नामाची स्त्री आणून । भिक्षेलागीं द्या कोणी ॥ २४० ॥
मी वृद्ध शक्तिक्षीण । माझ्यानें न देववे अशन वसन ।
आज्ञा भंगिता टाकून । जाईन तिला क्षणार्धे ॥ २४१ ॥
ऐसें ऐकता वचन । हांसती देशोदेशींचे जन ।
कोणी न देत प्रतिवचन । तामसी ब्राह्मण देखोनियां ॥ २४२ ॥
स्वर्ग मृत्यु अष्टलोकपाल । जरत्कारें शोधिलें सकल ।
मग गर्तेपाशीं येऊन तत्काल । गर्जोन सांगे पितरातें ॥ २४३ ॥
तुमचे गांठी पुण्य असेल । तरी संकल्प हा होईल सफल ।
कन्यादान कोणी करील । मन्नामक वधूचें ॥ २४४ ॥
पातलास गेला ब्राह्मण । हांक फोडी आक्रोशेंकरुन ।
ते नयनद्वारें करिती श्रवण । चक्शुःश्रवे सर्वही ॥ २४५ ॥
ब्राह्मणाचें वृत्त सकलिक । वासुकीस सांगती दंदशूक ।
भविष्य जाणोनि अहिनायक । अनुजा आपुली जरत्कारी ॥ २४६ ॥
तेथें आणिली श्रृंगारुनी । म्हणे हे माझी कनिष्ठ भगिनी ।
दुसरी इंदिरा लावण्यखाणी । धर्मपत्नी करा हो ॥ २४७ ॥
जरत्कारु म्हणे तत्त्वतां । तुम्हां समर्थांची हे दुहिता ।
स्वरुप श्रृंगार पाहतां । उर्वशी रंभा दासी पैं ॥ २४८ ॥
नम्र असावे मृदु वचन । बोलोन हरावें माझें मन ।
आज्ञा भंगितां जाईन टाकून । अनुमान कांहीं न करितां ॥ २४९ ॥
हे जातीची पद्मीण शुद्ध । सुवासें वेधिले मिलिदं ।
इचें पाहता वदनारविंद । मीनकेतन भुले पैं ॥ २५० ॥
माहेरींचें बल दावून । भ्रतारास मानिती जैसें तृण ।
कीं वनींचें मर्कट जाण । धरुनी आणूनि नाचविती ॥ २५१ ॥
वासुकी म्हणे ऋषीलागूनी । तैसे नव्हे माझी भगिनी ।
रुपवती चातुर्यखाणी । पतिभजनीं सादर ॥ २५२ ॥
चीरभूषणें सर्व संपदा । तीस मी पुरवीन सर्वदा ।
होऊं नेदीं कांहीं आपदा । अंगिकारा स्वामी ही ॥ २५३ ॥
मग यथासांग लाविलें लग्न । चार दिवस संपादून ।
जरत्कारीस संगें घेऊन । आश्रमा आला आपुलिया ॥ २५४ ॥
सर्प सेवा करिती अनुदिन । बांधोन दिधलें सुवर्णसदन ।
सकल संपत्ति आणून । राजभोग समर्पिती ॥ २५५ ॥
नित्यनैमित्तिक कर्मे समस्त । अन्नसत्र नित्य चालवित ।
अतिथिपूजनें दानें देत । पतीचें अनुमत जाणूनी ॥ २५६ ॥
ऐसा काल क्रमित बहुत । जरत्कारीस गर्भ राहत ।
जैसा सूर्य दीप्तिमंत । तैसा उदरांत पुत्र वसे ॥ २५७ ॥
गर्भ राहिला उदरीं । हें नेणेचि जरत्कारी ।
तों कोणे एके अवसरीं । नित्यकर्म सारुनियां ॥ २५८ ॥
निद्रेनें व्यापिला जरत्कार । तिचे मांडीवर ठेवी शिर ।
निद्रिस्थ जाहला ऋषीश्वर । तों दिनकर मावळला ॥ २५९ ॥
मनीं विचारी ऋषिललना । आदित्य जातो अस्तमाना ।
संध्याहोमकाल जाणा । टळतां ऋषि कोपेल ॥ २६० ॥
जागें करितां कोपेल तत्क्षणीं । न करितां सत्कर्मा होईल हानी ।
मनीं विचारी नागभगिनी । दोष सामान्य थोर कोण ॥ २६१ ॥
निद्रा घेइजेल रजनींत । परी सत्कर्मभंगें प्रायश्चित्त ।
मग चरण चुरीत बोलत । गेला आदित्य आस्तमाना ॥ २६२ ॥
म्हणे होम देऊन ये क्षणीं । मग पहुडावें सुखशयनीं ।
ऐसें ऐकतां क्रोधेंकरुनी । जरत्कारु उठिला ॥ २६३ ॥
तुझे अंकी पडतां भार । कष्टी जाहलीस तूं सुकुमार ।
वृद्ध देखोन भ्रतार । हेलना गर्वें करिसी तूं ॥ २६४ ॥
माझी आज्ञा न होतां पूर्ण । सूर्य केवीं पावेल अस्तमान ।
मी न देतां अर्घ्यदान । अग्निसेवन यथाविधि ॥ २६५ ॥
क्षण एक धरुन धीर । पहाव होता चमत्कार ।
कैसा मावळता दिनकर । जरत्कारु न ऊठतां ॥ २६६ ॥
मी वृद्ध देखतां नयनीं । हेलना करिसी तूं सर्पिणी ।
आतां नांदे बंधुसदनीं । नष्टकर्मे यथार्थ ॥ २६७ ॥
जरत्कारु चालिला उठोनी । पाठीं धांवे नागभगिनी ।
दृढ धरिले पाय दोन्ही । अश्रु नयनीं वाहती ॥ २६८ ॥
म्हणे आग्रह करिसी पापिणी । तरी भस्म करीन शापूनी ।
थरथरां कांपे कामिनी । भयेंकरुनि न बोले ॥ २६९ ॥
सर्प ठायीं ठायीं दडती । भयें समोर कोणी न येती ।
भगिनीचे चरण धरिती । शांतवीं पति आपुला ॥ २७० ॥
त्वरें जात जरत्कार । पाठीं धावें सुकुमार ।
म्हणे महाराज तुम्ही सत्त्वसमुद्र । माझा त्याग न करावा ॥ २७१ ॥
सुकुमार ते कामिनी । अडखळोन पडे धरणीं ।
पद्मीण ते पद्मलोचनी । बाहू उभारुन हांक देत ॥ २७२ ॥
सांडूनियां ललना । न जावें हो तपोधना ।
मज वधून याच क्षणा । ऋषिवर्या जाइजे ॥ २७३ ॥
तुमचे सुकुमार चरण । मी आपुले केशीं झाडीन ।
एवढा अन्याय क्षमा करुन । पोटीं घाली ऋषिवर्या ॥ २७४ ॥
कांहीं मी कापट्य नेणें । बोलिल्यें आज भोळेपणें ।
सर्वज्ञें विचारुन पाहणें । क्षमा करणें अन्याय हा ॥ २७५ ॥
मांगे पाहे जरत्कार । तों पाठीसीं धांवें सुकुमार ।
हृदयीं दाटला गहिंवर । सजल नेत्र जाहले ॥ २७६ ॥
जवळ येतां जरत्कारी । म्हणे तूं जाईं माघारीं ।
येरी म्हणे ते अवसरीं । वचन ऐका महाराज ॥ २७७ ॥
पुत्रफल नाहीं पूर्ण । कैसे उद्धरतील पितृगण ।
माझे बंधु सर्प जाण । निराशा त्यांची जाहली ॥ २७८ ॥
आज्ञा भंगली म्हणून । कद्रूनें शापिले संपूर्ण ।
म्हणे सकुल भस्म होऊन । जा रे तुम्ही दुर्जन हो ॥ २७९ ॥
जनमेजयाचे सत्रीं परम । अवघे उरग होतील भस्म ।
त्यांत किंचित्स्वस्तिक्षेम । राहवे नेम एक असे ॥ २८० ॥
माझे जठरसत्पात्रीं जाण । स्वामी तूं करशील वीर्यदान ।
तो पुत्र होतां निर्माण । सर्पकुलें रक्षील ॥ २८१ ॥
ऐसें बोलतां जरत्कारी । ऋषि म्हणे तूं अवधारीं ।
तुझे गर्भशुक्तिकेमाझारी । मुक्ताफल पुत्र आहे ॥ २८२ ॥
नास्तिक नाहीं आस्तिक । पुत्र होईल जैसा अर्क ।
जेवीं वसिष्ठ वामदेव शुक । चौथा देख तैसा हा ॥ २८३ ॥
ऐसें जरत्कारु बोलिला । तत्काल तेथें गुप्त जाहला ।
विकल पडली नागबाला । पतिवियोगेंकरुनियां ॥ २८४ ॥
सावध करुन विखारी । घरा नेली जरत्कारी ।
वासुकी म्हणे सुंदरी । आम्हांस अभय देई कां ॥ २८५ ॥
येरी म्हणे तुमचा रक्षक । गर्भांत आहे सत्य आस्तिक ।
आनंदले सर्प सकळिक । गुढिया तोरणें उभविती ॥ २८६ ॥
अभ्रें आच्छादिलें अर्कस्वरुप । कीं काश्मीरसदनींचा जैसा दीप ।
नवमास भरतां पुण्यरुप । आस्तिक जन्म पावला ॥ २८७ ॥
जैसा विधूम पावक । तैसा जन्मला मुनि आस्तिक ।
आनंदले सर्प सकळिक । गगनीं हर्ष न मावे ॥ २८८ ॥
नागिणी नाग सकळिक । प्राण ऐसें रक्षिती बालक ।
कृत्तिकाप्रथमचरणीं देख । मुनि आस्तिक जन्मला ॥ २८९ ॥
जातकर्मादि उपनयन । वासुकी करी स्वयं आपण ।
च्यवनभार्गवापासून । विद्या प्राप्त तयासी ॥ २९० ॥
संहिता ब्राह्मण अरण । छंद निघंट शिक्षा जाण ।
ज्योतिष सूत्र व्याकरण । निरुक्त दशग्रंथ पढियेला ॥ २९१ ॥
बोलका जैसा अंगिरासुत । तेजस्वी जैसा आदित्य ।
तपस्वी जैसा भासत । व्योमकेश दुसरा जो ॥ २९२ ॥
शीतल जैसा शीतकर । मेघाहून अति उदार ।
ब्रह्मांड मोडून रचणार । दुसरें पुढती सामर्थ्यें ॥ २९३ ॥
पुढें अनुसंधान पाहीं । हस्तिनापुरीं ऋषि सर्वही ।
मिळाले जनमेजयाचे गृहीं । सर्पसत्र आरंभिलें ॥ २९४ ॥
सिंहावलोकनेंकरुन । पहा मागील अनुसंधान ।
जे पंडित भक्त विचक्षण । निर्मत्सर मन ज्यांचें ॥ २९५ ॥
आदिपर्व सुधारस । सज्जन श्रोते हे त्रिशद ।
पान करोत अति सुरस । ब्रह्मानंदेंकरोनियां ॥ २९६ ॥
ब्रह्मानंद महाराज पिता । सावित्री नामें माझी माता ।
वंदूनि ते उभयतां । परम आल्हाद पावलों ॥ २९७ ॥
या उभयतांचे नाम सार । श्रीधर जपे हा मंत्र ।
श्रीपांडुरंग रुक्मिणीवर । तेणेंकरुन तोषला ॥ २९८ ॥
श्रीधर नाम आपुलें । अभंगीं तेणें घातलें ।
त्याचें चरित्र वहिलें । तेणेंचि कथिलें ऐका तें ॥ २९९ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । द्वितीयाध्यायीं कथियेला ॥ ३०० ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्वटीका श्रीधरकृत ।
परीक्षितिनिधन सत्रारंभाद्भुत । आस्तिकजन्मकथन केलें ॥ ३०१ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि द्वितीयो ध्यायः ॥ २ ॥
॥ अध्याय दुसरा समाप्त ॥
GO TOP
|