|
॥ श्रीवेदेश्वरी ॥
॥ अध्याय आठवा ॥
॥ श्रीशिवराम गुरवे नमः ॥ जय शिव शिव तूं विश्रांति भूमी ॥ राम प्रश्न जीवन मीनतां संगमीं ॥ कल्पवृक्ष गीता उद्भवली अनुक्रमीं ॥ चिद्गगनीं शाखा धांवती ॥ १ ॥ अर्थरूप एकचि खोड ॥ त्यासी षोडश अध्याय शाखा वाड ॥ त्याहून सूक्ष्म शाखांचा पवाड ॥ ते आठशतें श्लोक ॥ २ ॥ पदें हीच देठ जयासी ॥ अक्षरें पानें शोभती त्यासी ॥ प्रत्यगात्मा ब्रह्म अविनाशी ॥ एकरस व्यापला ॥ ३ ॥ मोक्षरूप एकचि फळ ॥ त्वचा आंठोळीवीण घट्ट ना पातळ ॥ लागले असे परम सुढाळ ॥ ते सुकल्पक साधकां प्राप्त ॥ ४ ॥ येर कुकल्पक अनधिकारी ॥ विषयफळे उचिती सारी ॥ कुटंतीक्ष्ण लागतां चुरचुरी ॥ सुखदुःखें कडूनी ॥ ५ ॥ स्त्री पुत्र धनादि नासकी फळें ॥ अनंतावधि असती विपुळे ॥ जी अहंममताविषरूपें भरलीं सकळे ॥ किंचित् मेधु वरी माखे ॥ ६ ॥ तया मधाच्या लालचीनें ॥ सर्वही फळांची करिती अंशनें ॥ रोग लागला तया योगानें ॥ कर्तृत्व भोक्तृत्वाचा ॥ ७ ॥ त्या कर्तृत्व अभिमानाचा ॥ श्वास लागतां उसंत कैंचा ॥ धोका लागला जन्ममरणाचा ॥ तेणें मरमरों मरती ॥ ८ ॥ जो जो जैशी कल्पना करी ॥ फळे पावतसे त्या त्या परी ॥ उगेचि वाहती मृगजळपुरीं ॥ दुःखापासून दुःखें ॥ ९ ॥ परी कोणीच उमजेना ॥ की दुःखासी मूळ असे कल्पना ॥ कल्पनाचि फळ देतसे आपणा ॥ कल्पवृक्षा तळवटीं ॥ १० ॥ यांत एखादा उमजला ॥ जयाच्या भाग्या उदय झाला ॥ तो जेव्हां शोध काढीत चालिला ॥ वृक्षाचे खोडा पावेतों ॥ ११ ॥ तंव येथें राम श्रोता शिव वक्ता ॥ गुरुशिष्य उभयांची भेटी होतां ॥ निरूपण संवाद येतसे हातां ॥ तेव्हां उमजे अधिकारी ॥ १२ ॥ मोक्षफळ तयांसी सांपडे ॥ तें खातांचि मुळाकडे पंवाडे ॥ शिवरूप भूमीत ऐक्यता जोडे ॥ ब्रह्म प्रत्यगात्मा अभिन्नज्ञानें ॥ १३ ॥ परी एखादा उत्तमाधिकारी ॥ निरूपणमात्रे पावे तेथवरी ॥ येर हे बापुडे अनधिकारी ॥ मिथ्या विषयां सोंकले ॥ १४ ॥ साहवा सातवा अध्याय दोन ॥ येथे पूर्ण सिद्धान्त निरूपण ॥ कीं प्रत्यगात्मा ब्रह्म अभिन्न ॥ आणि ब्रह्म सत्य जग मिथ्या ॥ १५ ॥ हे उत्तम अधिकारिया मानलें ॥ कल्पना त्यागून मोकळे झाले ॥ ऐक्यब्रह्मी मिळून गेले ॥ पुनरावृत्ति रहित ॥ १६ ॥ परी हे येर बापुडे जीव ॥ विषयफळींच यांचा गौरवं ॥ अहंममतारूप विषय स्वयमेव ॥ खाऊन मरती ॥ १७ ॥ त्यांची या चिळसी कैशी यावी ॥ विरक्ति दृढ कैशी बाणावी ॥ येथून सुटतील केवीं ॥ आणि मोक्षफळ कधी लाहती ॥ १८ ॥ ऐसा राम मनीं विचारीत ॥ कीं मोक्ष व्हावा समस्तातें ॥ जेणें तो प्रश्न करूं शिवगुरूतें ॥ तेव्हां सांगेल सकरुणें ॥ १९ ॥ जो जो आवडेल तो तो प्रश्न करी ॥ ऐसा प्रसन्नत्वें बोलिला त्रिपुरारि ॥ तरी आतां प्रश्न करूं निर्धारी ॥ देहाचे स्थिति गतीचा ॥ २० ॥ परी जीवासी विषयाचे गोड ॥ त्यागिती ना कळूनि द्वाड ॥ तरी मागुतीं विवेचून दाखवू निवाड ॥ की अरे विष खातां मराल ॥ २२ ॥ यास्तव आपण शिवाकरवीं बोलवावें ॥ की हे विषरूप असे रे अघवें ॥ मग मरती तरी मरोत स्वभावें ॥ नायकूनि गुरुवचन ॥ २३ ॥ परी जे विश्वासी मुमुक्षु असती ॥ ते तरी विषयापासून परतती ॥ ऐसा राम विचार करून चित्तीं ॥ प्रश्न करिता झाला ॥ २४ ॥ श्रीराम उवाच - पांचभौतिकदेहस्य चोत्पत्तिर्विलयः स्थितिः ॥ स्वरूपं च कथं देव भगवन्वक्तुर्महसि ॥ १ ॥ हे भगवन् पांचभोतिक देहासी ॥ उत्पत्ति लय स्थिति असे कैशी ॥ आणि बोलावया तूं योग्य अससी॥ स्वरूप कैसें तें देहीं ॥ २५ ॥ जीवाचें निजरूप कोणतें ॥ कां पावलेती जन्ममरणातें ॥ नाना योनि देहादि समस्ते ॥ हे तरी पांच भौतिक ॥ २६ ॥ आपण तरी स्वतः असंग ॥ देहद्वदयाचे धरिलें सोंग ॥ ते देहचि मी मानूनि मग ॥ विषयां माझे माझे म्हणती ॥ २७ ॥ सुखदुःखें विषय व्याप्त ॥ तेचि सेविती अहोरात ॥ येथे दोषदृष्टि उपजेना किंचित् ॥ की विषप्राय अन्न न खावें ॥ २८ ॥ सदां धन पुत्र आणि दारा ॥ हा इतुकाचि मानूनि थारा ॥ चुकोनि गेलेती तुज ईश्वरा ॥ मा सदगुरु तरी दूर ॥ २९ ॥ हे माझें माझें जयास्तव म्हणती ॥ ते हे देहबुद्धीची अहंकृति ॥ ते देह तरी शुद्ध असे काय पाव रती ॥ जया म्हणती मी मी ऐसें ॥ ३० ॥ गर्भापासून मरणवरी ॥ कोणतें सुख असे देहव्यापारी ॥ देहचि मुळी विष्टेची सामग्री ॥ येथे शुद्धता कैंची ॥ ३१ ॥ ऐसें असून या मी मी म्हणती ॥ त्याचेनि योगें माझें माझें करिती ॥ विष्टारूप विषयभोग सेविती ॥ जेवीं किडे नरकींचें ॥ ३२ ॥ नरकाची यास उपमा द्यावी ॥ ऐसें नव्हे नरकरूपचि अघवी ॥ याची शुद्धि कदां न व्हावी ॥ यासी त्यागिल्याविण ॥ ३३ ॥ तस्मात् जीवें आपुले रूप ओळखावें ॥ दोषदृष्टीने देहादि त्यागावें ॥ यास्तव शंभो यथार्थ बोलावें ॥ या देहाचे रूप ॥ ३४ ॥ याची उत्पत्ति होते कैशी ॥ वर्तताती केवीं दिवा निशीं ॥ लय पावतां दुःख जें जीवासी ॥ होय तें सर्व सांगावें ॥ ३५ ॥ गर्भजन्म जरा मरण ॥ हे दुःखरूप असें संपूर्ण ॥ केवीं याचे करावें निरूपण ॥ जे ऐकतां जीव चिळसती ॥ ३६ ॥ आदि मध्य अवमानीं ॥ अवधी कुंभपाकाची जांचणी ॥ ऐशी चिळसी उपजतां मनीं ॥ त्रासें त्याग करिती ॥ ३७ ॥ जया त्यागें ज्ञान उपजे ॥ ज्ञान होतांचि मोक्ष लाहिजे ॥ तस्मात् भगवन् सांगितली पाहिजे ॥ यातनारूप देहस्थिति ॥ ३८ ॥ ऐशी प्रार्थना रामाची ऐकून ॥ बोलता झाला पंचवदन ॥ ऐक रामा गर्भापासून ॥ अनुक्रमें मरणवरी ॥ ३९ ॥ ब्रह्मादि कीटकांतावरी ॥ देहाची स्थिति समान सारी ॥ कल्पना करूंच नये दुसरी ॥ जरी उत्तमाधम भाव ॥ ४० ॥ श्रीभगवानुवाच - पंचभूतैः समारब्धो देहोऽयं पांचभौतिकः ॥ तत्र प्रधानं पृथिवी शेषाणां सहकारिता ॥ २ ॥ पांचहीं भूते एकत्र मिळूनी ॥ या सर्व देहाची उभवणी ॥ यास्तव शरीरासी बोलिजे वाणी ॥ पांचभौतिक ॥ ४१ ॥ येथे मुख्यत्वें पृथिवी प्रधान ॥ की जडत्व देहासी असे म्हणून ॥ इतरही चारी भूतें संपूर्ण ॥ साह्यकारीभूमीसी ॥ ४२ ॥ करूनियां भूतकर्दमासी ॥ भौतिकता स्पष्ट देहासी कैशी ॥ हे बोलिजेल विस्तारेंशीं ॥ नवमाध्यायीं ॥ ४३ ॥ परी या अध्यायीं गर्भा पासूनी ॥ देहाचे दुःख बोलिजे वाणी ॥ तरी निःसार जाणूनि सर्व जीवांनीं ॥ देहबुद्धि त्यागिजे ॥ ४४ ॥ या पंचभूतात्मक देहाचे ॥ चारी प्रकार असती साचे ॥ पंचम मानसिक साकाराचें ॥ परी तेंही भतकार्य ॥ ४५ ॥ जरायुजोऽण्डजश्चैव स्वेदजश्वोद्भिजस्तस्था ॥ एवं चतुर्विधः प्रोक्तो देहोऽयं पांचभौतिकः ॥ ३ ॥ जरायुज अण्डज आणि ॥ स्वेदज उद्भिज ह्या चारी खाणी ॥ बोलिजेतसे ययालागूनी ॥ पांचभौतिकत्व ॥ ४६ ॥ जरा पासून जे झाले ॥ ते जरायुज असती बोलिले ॥ अण्डापासून उद्भवले ॥ द्विजन्मे ते अण्डज ॥ ४७ ॥ जळ स्वेदापासून जे होती ॥ ते स्वेदज बोलिजेती ॥ उद्भिज पृथिवी भेदून निघती ॥ की वायूपासाव ॥ ४८ ॥ मानमस्तु परः प्रोक्तो देवानामेव संस्मृतः ॥ तत्र वक्ष्ये प्रथमतः प्रधानत्वाज्जरायुजम् ॥ ४ ॥ ब्रह्मादि स्वतः झाले उत्पन्न ॥ तेणें मानससृष्टि केली निर्माण ॥ ऋषि प्रजापति आदिकरून ॥ रजात्मक त्या बोलिजे ॥ ४९ ॥ आणि देव हे ब्रह्मादिक ॥ स्वतः उत्पन्न तेही मानसिक ॥ परी ते जाणिजेति पांचभौतिक ॥ दृश्यत्वामुळे ॥ ५० ॥ ऐसें पांच प्रकार देहाचे ॥ सांगितलें पृथक वाचें ॥ त्या मध्ये प्रथम मुख्यत्व जारजाचें ॥ तस्मात् जरायुज सांगू ॥ ५१ ॥ मुख्यत्वे त्यामाजी मानव ॥ मोक्षप्राप्तीचा हा च ठाव ॥ येर बापुडे गोअश्व ॥ पुरुषाचे भोग्य ॥ ५२ ॥ विवेकें तरी मुक्तीस जावें ॥ अविवेकें बद्धता दुणावे ॥ विवेकियासीच पुरुष म्हणावें ॥ येर द्विपाद पशु ॥ ५३ ॥ असो तया जरायुजासी ॥ उत्पत्ति होतसे कैशी कैशी ॥ तें सर्व सांगू विस्तारेंशी ॥ यातना दुःख ॥ ५४ ॥ शुक्रशोणितसंभूता वृत्तिरेव जरायुजः ॥ स्त्रीणां गर्भाशये शुक्रमृतुकाले विशेद्यदा ॥ ५ ॥ शुक्र शोणितापासून होत ॥ जे जरामध्ये असती वेष्टित ॥ तयासीच जरायुज बोलिजेत ॥ मैथुनसृष्टि ॥ ५५ ॥ स्त्रियांचे कमला अंतरीं ॥ रेते प्रवेशतां माझारी ॥ रक्तरेत मीनतां जठरीं ॥ त्याचा जर होय ॥ ५६ ॥ योषितो रजसा युक्तंतदेव स्याज्जरायुजम् ॥ मैथुनकाळी वीर्य पडत ॥ आणि स्त्रियांचे रजरूपरक्त ॥ तयाचा जर असे होत ॥ खोळीच्या रूपें ॥ ५७ ॥ बाहुल्याद्रजसः स्त्री स्याच्छुकाधिक्ये पुमान्भवेत ॥ ६ ॥ शुक्रशोणितयोः साम्ये जायते च नपुंसकः ॥ रक्त बहुत तरी स्त्री होय ॥ पुरुष संभवे जरी अधिक वीर्य ॥ रक्तरेत जरी समान द्रय ॥ तरी जन्मे नपुंसक ॥ ५८ ॥ ऋतुस्नाता भवेन्नारी चतुर्थे दिवसे ततः ॥ ७ ॥ ऋतुकालस्तु निर्दिष्ट आषोडशदिनावधि ॥ स्त्री होय जेव्हां ऋतुस्नाता ॥ चतुर्थ दिवसापासून तत्त्वतां ॥ सोळा दिवस पर्यंत पाहतां ॥ ऋतुकालचि असे ॥ ५९ ॥ तत्रायुग्मदिने स्त्री स्यात्पुमान्युग्मदिने भवेत् ॥ ८ ॥ चतुर्थापासून दिवस सोळा ॥ विषमदिनीं संभवतां होय बाळा ॥ समान दिनींचा तरी पुतळा ॥ पुरुष होय ॥ ६० ॥ षोडशे दिवसे गर्भो जायते यदि सुभ्रवः ॥ चक्रवर्ती भवेद्राजा जायते नात्र संशयः ॥ ९ ॥ सोळा दिवशीं संभोगे ओजा ॥ जरी गर्भ राहे निश्चयें समजा ॥ तरी तो होईल चक्रवर्ती राजा ॥ येथे संशय नाहीं ॥ ६१ ॥ ऋतुस्नाता यस्य पुंसः साकांक्षं मुखमीक्षते ॥ तदाकृतिर्भवेद्गर्भस्तत्य श्येत्स्वामिनो मुखम् ॥ १० ॥ गर्भ राहतां ऋतुस्नात नारी ॥ जया पुरुषाचे मुख अवलोकन करी ॥ गर्भस्थ जन्मे त्याचे रूपापरी ॥ म्हणून भर्त्याचे मुख पहावें ॥ ६२ ॥ याऽस्ति चर्मावृतिः सूक्ष्मा जरायुः सा निगद्यते ॥ शुक्रशोणितयोर्योगस्तस्मिन्नेव भवेद्यतः ॥ ११ ॥ सूक्ष्मा चर्माची आवृति ॥ जरायु तयासीच बोलती ॥ तयामाजींच रक्तरेत मिळती ॥ तेव्हां जन्मती जारज ॥ ६३ ॥ तत्र गर्भो भवेद्यस्मात्तेन प्रोक्तो जरायुजः ॥ अण्डजाः पक्षिसर्पाद्याः स्वेदजा मशकादयः ॥ १२ ॥ तया जरायूंत जन्मती ॥ म्हणोनि जरायुज बोलिजेती ॥ अण्डज पक्षी सर्पादि म्हणविती ॥ मशकादि स्वेदज ॥ ६४ ॥ श्लोकार्द्ध ॥ उद्भिज्जास्तृणगुल्माद्या मानसाश्च सुरर्षयः ॥ उद्भिज पृथ्वी फोडूनि निघती ॥ मानस ते देव ऋषि बोलिजेति ॥ देवां ऋषींत दोन भेद असती ॥ मानस आणि जारज ॥ ६५ ॥ ब्रह्मादि देव मनसोद्भुत ॥ अन्य देव ते जरायुयुक्त्त ॥ वसिष्ठादि मानस येर ते समस्त ॥ विश्वामित्रादि जारज ॥ ६६ ॥ असो विस्तार हा जारजांचा ॥ बहुधा बोलिजेत आहे वाचा ॥ दुःखात्मक कळतां मानवादिकांचा ॥ तेणेचि रीतीं अन्य ॥ ६७ ॥ जन्मकर्मवशादेव निषिक्तं स्मरमन्दिरे ॥ १३ ॥ शुक्र रजःसमायुक्तं प्रथमे मासि तद्द्रवम् ॥ जन्मकर्माचे योगें कडूनी ॥ वीर्य पडतमें स्त्रियांचे योनीं ॥ तेथें रक्त रेत मिळतां दोनी ॥ एकाचें एक होय ॥ ६८ ॥ ती दोनीही जळेंचि असतां ॥ घट्ट होती एकत्र मिळतां ॥ पहिले मासींच परिणामता ॥ होय चौ प्रकारें ॥ ६९ ॥ कललं बुद्बुदं तस्मात्ततः पेशी भवेदिदम् ॥ १४ ॥ पेशीधनं द्वितीये तु मासि पिण्डः प्रजायते ॥ उभय रेते मिळतां क्षणीं ॥ कलल होतसें प्रथमदिनीं ॥ पुढे बुडबुडा पांचवें दिनीं ॥ मृदु पिशवी होय पक्षा ॥ ७० ॥ संपूर्ण एक मास भरतां ॥ घट्ट पिशवीये भरून अतौता ॥ एवं पहिले मासी चारी अवस्था ॥ दुसरे मासी पिण्ड होय ॥ ७१ ॥ करांघ्रिशर्षिकादीनि तृतीये संभवन्ति हि ॥ १५ ॥ अभिव्यक्तिश्च जीवस्य चतुर्थे मासि जायते ॥ हस्तपाद आणि मस्तक ॥ कटि ग्रीवा स्कंधादिक ॥ हे स्थूल अवयव सकळिक ॥ तृतीय मासी होती ॥ ७२ ॥ चवथे मासी स्पष्ट अभिव्यक्ति ॥ प्राणियाचे अवयव सांग होती ॥ कांहींशी यतते चलनशक्ति ॥ तया गर्भासी ॥ ७३ ॥ ततश्चलति गर्भोऽपि जनन्या जठरे स्वतः ॥ १६ ॥ पुत्रश्चेद्दाक्षिणे पार्श्वे कन्या वामे च तिष्ठति ॥ नपुंसकस्तूदरस्य भागे तिष्ठति मध्यतः ॥ १७ ॥ अतो दक्षिणपार्श्वे तु शेते माता पुमान्यदि ॥ तेव्हां गर्भ चळू लागें॥ स्वतां जननी जठरी वागे ॥ पुत्र तरी राहे दक्षिण भागें ॥ कन्या डावे कुशी ॥ ७४ ॥ उदरा मध्यभागी गर्भ राहतां ॥ नपुंसक जन्मे जाणा चित्तां ॥ तस्मात् पुत्र जरी गर्भी असतां ॥ मातानिजे दक्षिणांगीं ॥ ७५ ॥ अंग प्रत्यंगभागाश्च सूक्ष्माः स्युयुगपत्तदा ॥ १८ ॥ विहाय श्मश्रुदन्तादीजन्मानंतरसंभवान् ॥ श्मश्रु दंत अदिकरून ॥ जन्म झालिया होती ते त्यागून ॥ अंग प्रत्यंग सूक्ष्म संपूर्ण ॥ अंगुली कर्णादि होती ॥ ७६ ॥ एषा प्रकृतिरन्यातु विकृतिःसम्मतासताम् ॥ १९ ॥ चतुर्थे व्यक्तता तेषां भावानामपि जायते ॥ पुंसां स्थैर्यादयो भावा भीरुत्वाद्यास्तु योषिताम् ॥ २० ॥ नपुंसके च ते मिश्रा भवन्ति रघुनंदन ॥ गर्भी उत्पत्ति या नांव प्रकृति ॥ जन्मानंतर होत ते विकृति ॥ ऐसें संत मुनिजन बोलती ॥ रीति द्विधा ॥ ७७ ॥ आणिक नासिकादि सूक्ष्मा समस्ता ॥ अवयवां चौथे मासी व्यक्तता ॥ भावनाही उमटती पाहतां स्थैर्यादिक ॥ ७८ ॥ पुत्र होय गर्भा जरी स्थिरत्व ॥ कन्या होय असतां चंचलत्व ॥ नपुंसक होय जरी उभययुक्तत्व ॥ भावनें शीर रघुनंदना ॥ ७९ ॥ आणिक भाव डोहळियांचे ॥ सूक्ष्मत्वें जैसे जैसे गर्भाचे ॥ तैसे तैसे मानसा मातेचे ॥ होत असती डोहळे ॥ ८० ॥ मातृजं चास्य हृदयं विषयानभिकांक्षति ॥ २१ ॥ ततो मातुर्मनोऽभीष्टं कुर्याद्गर्भभविवृद्धये ॥ मातेचे जैसे जैसे मनोगत ॥ तेची गर्भाची इच्छा जाणावा संकेत ॥ म्हणोन मातेलागीं अभिष्ट जें जें तें ॥ द्यावें गर्भवृद्धीस्तव ॥ ८१ ॥ तां च द्विहृदयां नारीमाहु दौहृदिनी ततः ॥ २२ ॥ अदानादौहृदानां स्युगर्भस्य व्यंगतादयः ॥ दिहृदय नारी तिसी बोलिजे ॥ जरी तिचे मनोगता ऐसें न दीजे ॥ तरी गर्भाचे व्यंग होती सहजें ॥ अवयव कांहीं ॥ ८२ ॥ मातुर्यद्विषये लोभस्तदार्तो जायते सुतः ॥ २३ ॥ प्रबुद्धं पंचमे चित्तं मांसशोणितपुष्टता ॥ ज्या ज्या विषयी मातेचा गौरव ॥ त्या त्या ऐसाचि पुत्राचा उमटे भाव ॥ विषयासक्तता की परमार्थ करील हा जीव ॥ परीक्षा पहावी ॥ ८३ ॥ एवं चारी मासींचे भाव सांगितले ॥ पांचवे मासी गर्भासी प्रबुध्दत्व आलें ॥ म्हणजे कोमलाचें कठिण झालें ॥ पुष्टत्व पावलें रक्तमांसें ॥ ८४ ॥ पष्ठेऽस्थिस्नायुनखरकेशलोमविविक्तता ॥ २४ ॥ बलवरर्णौ चोपचित्तौ सप्तमे त्वंगपूर्णता ॥ सहावे मासी अस्थि होती ॥ शिरा नखें केशही येती ॥ भोंवयादी हे सर्व लोम म्हणविती ॥ तेही पावती व्यक्तता ॥ ८५ ॥ चौथे मासी प्राणाचे चलन ॥ त्यासवें अतिसूक्ष्म मनाचे स्फुरण ॥ होतें तें पांचवे मासीं अधिक त्याहून ॥ काहींसे प्रबुध्द होय ॥ ८६ ॥ तेचि सातवे मासीं मननशक्ति ॥ प्रबल होतसे गर्भाप्रति ॥ तेव्हां गर्भ दुःखाच्या ज्या विपत्ति ॥ येत असती अनुभवा ॥ ८७ ॥ एवं बल वर्ण चित्ताचे स्फुरण ॥ सातवे मासी होत संपूर्ण ॥ किमपिही न राहे न्यून ॥ कदाचित् जन्मताही वांचे ॥ ८८ ॥ परी हा कश्चित पक्ष दिसे ॥ नियमु नवमासाचाचि असे ॥ गर्भदुःखें तळमळी मानसें ॥ तीन मास अत्यंत ॥ ८९ ॥ पादांतरितहस्ताभ्यां श्रोत्ररंध्रे पिधाय सः ॥ २५ ॥ उद्विग्नो गर्भसंवासादस्ति गर्भलयान्वितः ॥ उभय श्रवणी दोन्ही कर ॥ ठेवून आच्छादि कर्णरंध्र ॥ तोचि हस्तासहित जानुमध्ये शिर ॥ घालून बैसे ॥ ९० ॥ सर्व द्वारे असतीं बुजलीं ॥ मस्तक द्वारा श्वासा चाली ॥ ते समयीं दुःखें आठवती झाली ॥ अति खेद पावूनी ॥ ९१ ॥ तया कारागृहाच्या विपत्ती ॥ जठराग्नीने अंगें उकडती ॥ तें दुःख आठवून चित्तीं ॥ अति होय भयभीत ॥ ९२ ॥ ऐसें जन्म आणिक होतां ॥ माझी होईल काय अवस्था ॥ हे माझें दुःख कोण तोडील आतां ॥ कैवारी नसे कोणी ॥ ९३ ॥ येथून कधी होय निर्गमनं ॥ ऐसेंचि इच्छितसें मन ॥ त्या दुःखा बोलिजेल तें ऐकून ॥ मुमुक्षूनें देहबुध्दि त्यागावी ॥ ९४ ॥ आविर्भूत प्रबोधोऽसौ गर्भदुःखादिसंयुतः ॥ २६ ॥ हा कष्टमिती निर्विण्णः स्वात्मानं शोशुचीत्यथ ॥ या गर्भदुःखादिकानें व्याप्त ॥ हा प्रबोध होतसे आविर्भूत ॥ पश्यन्ती की मध्यमेने म्हणत ॥ हा कष्ट कष्ट गर्भीचे ॥ ९५ ॥ अति दुखें पीडित होऊनि ॥ आपणांतें रडवी अनुदिनी ॥ अंतरीच शोक करी तळमळूनी ॥ बाहेर शब्द फुटे कैंचा ॥ ९६ ॥ मागें जितुके गर्भजन्म भोगिले ॥ त्याचे दुःख एकदांचि आठवलें ॥ तेणें तो अंतरीं अतिकष्ट वाटले ॥ हे जाणे ज्याचा तो ॥ ९७|| अनुभता महासह्याः पुरा मर्मच्छिदोऽसकृत् ॥ २७ ॥ करंभवालुका स्तप्ताश्वदह्यन्तासुखाशयाः ॥ महा असह्य नारकी शरीरें ॥ पूर्वी अनुभवली जी वारंवारे ॥ दघिसक्तु होमितां तप्तकण सारे ॥ तेवीं अंग उकडत ॥ ९८ ॥ तया जठराग्नीनें अंगें पोळतीं ॥ जैशी फळे पात्रांत उकडती ॥ कीं नाना धातुभट्टीत आटिती ॥ त्या परी दुखवती मर्मस्थळें ॥ ९९ ॥ हेंचि कुंभिपाकाची जांचणी ॥ दुजा नरक न पहा कोणी ॥ तया दुःखरूपाचे अडचणी ॥ सुखाशय म्हणती ॥ १०० ॥ जेवीं तीक्ष्णासी नाम पंचामृत ॥ तेवीं सुखाशय गर्भासी नाम संकेत ॥ असो ते बाळ गर्भी दुःख जे अनुभवीत ॥ तेंचि बोलत असे ॥ १ ॥ तोचि प्रस्तावा गर्भवासाचा ॥ गर्भ जो आठवितसे साचा ॥ तेंचि बोलिजे काहीसे वाचा ॥ त्या बाळाचें उक्त ॥ २ ॥ जठरानलसंतप्तपित्ताख्यरसविप्लुषः ॥ २८ ॥ गर्भाशये निमग्नं तु दहन्त्यतिभृशं तु माम् ॥ ॥ अहा मी गर्भ सांकडी पडिलों ॥ या जठराग्नीने अति तापलों ॥ पित्तादिक रसें अति कष्टलों ॥ तीक्ष्ण क्षार कडवटें ॥ ३ ॥ तो जठरामि मजला जाळीत ॥ बहुप्रकारे यातना न बोलवत || आणिकही येथींची दुःखें अद्भुत ॥ बोलू काहींशीं ॥ ४ ॥ औदार्यकृमिवक्त्राणि कूटशाल्मलिकंटकैः ॥ २९ ॥ तुल्यानि च तदन्त्यार्तं पार्थास्थिक्रकचार्दितम् ॥ आधीच अग्नीनें मी असे पीडित ॥ त्यावरी उदरांतील जंत तोडित ॥ त्यांची मुखें जेवीं कंटक रुपत ॥ की सुया दाभण ॥ ५ ॥ त्वचा तरी ते कोवळी अति ॥ तयासी मातेची हाडें कठिण मांसें रुतती ॥ तया पीडेसी कांहीं नये दृष्टांतीं ॥ केवळ शस्त्रपंजर ॥ ६ ॥ शस्त्राचा पिंजरा शरीरा रुतत ॥ परी पोळवीना तो कांहीं किंचित् ॥ जरी तापवून पिंजरा केला तप्त ॥ तरी दुगंधि असेना ॥ ७ ॥ येथें तोडणे आणि जाळणें ॥ दुर्गंधि आणि दृढबंधनें ॥ यासी दृष्टान्त कोणता देणें ॥ रडतांही न ये ॥ ८ ॥ अन्य यातनेसी कवणे पाहतां ॥ कवण येऊनि होय सोडविता ॥ येथे अनंतावधि दुःखें सोसितां ॥ कवणाही न कळती ॥ ९ ॥ गर्भे दुर्गंधभूयिष्ठे जठराग्नि प्रदीपिते ॥ ३० ॥ दुःखं मयाप्तं यत्तस्मात्कनीयः कुंभपाकजम् ॥ येथे दुर्गंध सोसवेना ॥ विष्टेत पडिले तें चुकावेना ॥ जठराग्नीनें जळे तें कदां विझेना ॥ तरी कुंभीपाक धाकुटा ॥ ११० ॥ म्यां जें हे दुःख अनुभविलें ॥ यापुढे नरक दुःख तें केतुलें ॥ तस्मात् कुंभपाकही दुःख असे धाकुलें ॥ हे थोरले साहनि ॥ ११ ॥ पूयासृक्श्लेष्मपायित्वं वांताशित्वं च यद्भवेत ॥ ३१ ॥ अशुचौ कृमिभावश्च तत्प्राप्तं गर्भशायिना ॥ पूं रक्त बळस वांताशन ॥ जे नरकी तेच गर्भस्था मज होय पान ॥ अशुद्ध क्रिमीचेही भाव संपूर्ण ॥ एकदांचि होती ॥ १२ ॥ नरककुण्डे तरी वेगळालीं ॥ एकाची दुःखें एकांत नाही झालीं ॥ येथे अवघीं एकदांचि भोगाशि आली ॥ तस्मात् थोरला नरक हा ॥ १३ ॥ तेथें पूं रक्त श्लेष्म वांती ॥ यमदूत बळेंचि पान करविती ॥ येथे आपणचि सर्व द्वारे सेविजेती ॥ दुर्गंधादि मल ॥ १४ ॥ हे दुःख मजला न साहवे ॥ कोठवरी ताप हे सोसावे ॥ कवणेकाळी येथून सुटावें ॥ सोडवावें तरी कवणे ॥ १५ ॥ गर्भशय्यां समारुह्य दुःखं यादृङ् मयापि तत् ॥ ३२ ॥ नातिशेते महादुःखं निःशेषनरकेषु तत् ॥ गर्भशय्येवरी नवमास निजलों ॥ येथे दुःख जितुकें मी असे पावलों ॥ तितुका नरकदुःखा नाहीं भ्यालों ॥ निःशेष या महादुःखापुढें ॥ १६ ॥ एवं स्मरन्पुरा प्राप्ता नानाजातीश्च यातनाः ॥ ३३ ॥ मोक्षोपायमभिध्यायन्वर्ततेऽभ्यासतत्परः ॥ एवं स्मरे पूर्वदुःख प्राप्ति ॥ जें जें भक्षिले आणि नाना योनीच्या विपत्ति ॥ येथून सुटिकेचा उपाय इच्छी चित्तीं ॥ अभ्यासीं तत्पर राहूनी ॥ १७ ॥ अनंत जन्मींचे गर्भवास ॥ या गर्भस्था आठवले चित्तास ॥ आणि म्हणे यापरीस बरा नरकवास ॥ कोटगुणें उणा ॥ १८ ॥ या रीतीं तो गर्भात असूनी ॥ यातना ज्या ज्या भोगिल्या वातादि अशनीं ॥ त्या त्या स्मरतसे अनुदिनीं ॥ किंचितही विराम न होतां ॥ १९ ॥ येथून सुटका होईल केधवां ॥ हेंचि ध्यान लागे गर्भस्थ जीवा ॥ दुसरा विषय कांहीं नाठवावा ॥ सोहं भावें पात्र राहे ॥ १२० ॥ येणें रीतीं अभ्यासी तत्पर ॥ सोहं शब्दें जप अहोरात्र ॥ दुसरा विषयचि नाहीं अणुमात्र ॥ चिंतन घडतां प्रस्तावा ॥ २१ ॥ येथे कोणी अशंका करिती ॥ की जीव गर्भी सोहंभावें राहती ॥ तरी तत्क्षणीच मुक्त कां न होती ॥ याचे उत्तर ऐका ॥ २२ ॥ जैसें सुषुप्तीत मन नसतां ॥ सोहं भावचि उरे तत्त्वतां ॥ तेथील अज्ञानचि न निरसतां ॥ तया ज्ञान कोण म्हणें ॥ २३ ॥ तैसा गर्भी व्यापाररहित ॥ अनेच्छारूप असे एकांत ॥ यास्तव सोहंभाव मात्र स्फुरत ॥ परी ते अज्ञानभ्रांति ॥ २४ ॥ तत्त्वझाडा सर्व होऊन ॥ जरी अपरोक्ष होय ऐक्यज्ञान ॥ तरीच नासे हे अज्ञान ॥ येन्हवीं दृढ कल्पवरी ॥ २५ ॥ गर्भी तो अतिदुःखरूप भ्रांति ॥ तेथे कैंची ज्ञानाची प्राप्ति ॥ सदा तळमळचि सुखाचि जाति ॥ देखिली ना ऐकिली ॥ २६ ॥ मोठ्या जखमा प्राणिया लागती ॥ परी तेही झोपेमाजी विश्रामति ॥ गर्भस्था कदां न ये सुषुप्ति ॥ सप्तमादि नवमांत ॥ २७ ॥ क्षण एक अवसर न होतां ॥ तीन मास एकसहा दुःखरूपता ॥ बोलिल्या रीती जीव हा भोगितां ॥ उसंत नाहीं ॥ २८ ॥ तेथें सुख कैंचें केवीं ज्ञान ॥ कैंची मुक्ति अति दृढ बंधन ॥ म्हणती देवाची करी आठवण ॥ परी देव नेणे कैसा तो ॥ २९ ॥ नवा महिन्यांत पहिले मास तीन ॥ चेतनत्वचि नाहीं गर्भालागून ॥ सहाव्या पावेतों चतुर्थापासून ॥ चेतन असे सूक्ष्मत्वें ॥ १३० ॥ परी ते मूर्छा अवस्थेचे परी ॥ दुःखें नाठवतीं अंतरीं ॥ सप्तमादि नवमांत दुःखें एकसरी ॥ यातना होती तीन मास ॥ ३१ ॥ असो ऐसें गर्भवासीचें दुःख ॥ सर्वत्रांस असे सारिखें ॥ तरी नरदेहा आलिया यथासुखें ॥ ज्ञाने मोक्ष साधावा ॥ ३२ ॥ एकदां नरदेह हातिचा गोलिया॥कोटि जन्माहीहि न पवे तया ॥ तस्मात् विवेके त्यागून विषया ॥ सत्संगें ज्ञान पावावें ॥ ३३ ॥ येथे दुजियाचा नाहीच उपाय ॥ जयाची तेणें पहावी सोय ॥ विवेके आपण आपण आपला बंधु होय ॥ नातरी वैरी ॥ ३४ ॥ असोरामाआपण काय करावें ॥ जैसें केलें तैसें ते पावतील स्वभावें ॥ आतां अष्टभाचें वर्तमान ऐकावें ॥ सप्तमांत झालें ॥ ३५ ॥ अष्टमे त्वकसृती स्यातामोजस्तेजश्च हृद्भवम ॥ ३४ ॥ शुभ्रमापीतरक्तं च निमित्तं जीवितं मतम् ॥ अष्टममासी गर्भाचे जीवन || मातेच्या हृदयरसाचे होतसे पान ॥ वंकनाळे अथवा प्रवेशमान ॥ तचेचिया छिद्रद्वारा ॥ ३६ ॥ श्रोत्रादि गोलकें मांसें भरलीं ॥ तथापि रस झिरपून अंतरीं प्रवेशली ॥ वंकनाळे जें येतसे तेणेंचि झाली ॥ जीवनता गर्भाची ॥ ३७ ॥ मातेचें ओज तेज म्हणजे वीर्य ॥ आदिकरूनि धातुरस होय ॥ आणि अन्नरस गर्भासी जीवन उपाय ॥ मान्य अष्टममासीं ॥ ३८ ॥ येथे कोणी म्हणेल रामा ॥ की सांग गर्भ झाला मासा सप्तमा ॥ जरी अष्टमी पावला जन्मा ॥ तरी यातना उण्या होती ॥ ३९ ॥ याचे ऐकावें उत्तर खरें॥ सप्तमी जन्म पावलें तरी बरें ॥ परंतु अष्टममासी जन्मतां मरे ॥ तोचि कैसें बोलिजे ॥ १४० ॥ मातरं च पुनर्गभं चंचलं तत्प्रधावति ॥ ३५ ॥ ततो जातोऽष्टमे गर्भो न जीवत्योजसोज्झितः ॥ मातेच्या वीर्यप्रवाहें कडून ॥ जरायु अति होतसे कठिण ॥ ते न फुटतां पावे जरी जनन ॥ तरी कोंडून मरे ॥ ४१ ॥ अथवा गर्भासी अतिचंचळपणा ॥ क्षण एक किंचित् स्थिरावेना ॥ तेणें योनिद्वार सांपडेना ॥ आडवें भरें ॥ ४२ ॥ तथापि जरी बाहेर पडलें ॥ तरी अति कष्टून बाळक मेलें ॥ तस्मात् ओजसा त्यागितां न जाय वांचलें ॥ अष्टमासी जन्मतां ॥ ४३ ॥ किंचित्कालमवस्थानं संस्कारात्पीडितांगवत् ॥ ३६ ॥ समयः प्रसवस्य स्यान्मासेषु नवमादिषु ॥ तैशीच सर्व पीडा सोसून ॥ राहे जरी गर्भ स्थिरावून ॥ प्रसवाचा समय नवमास पूर्ण ॥ आदिशब्दें दहावा ॥ ४४ ॥ तस्मात् नवम संपून दहावा लागतां ॥ तोचि जन्माचा समय तत्त्वतां ॥ यावीण अष्टममासी जन्मतां ॥ मृत्यु पावे ॥ ४५ ॥ असो आठवा नववा मास दोन ॥ मातृरसेंचि गर्भाचें जीवन ॥ वंकनाळे होय पिण्ड पोषण ॥ येथे संदेह नाहीं ॥ ४६ ॥ मातुरस्रवहां नाडीमाश्रित्यान्ववतारिता ॥ ३७ ॥ नाभिस्थनाडी गर्भस्य मात्राहाररसावहा ॥ मातेच्या हृदयींच्या नाडी ॥ नाभीपासून विस्तारल्या प्रौढी ॥ त्याची अन्नरसादिकीं व्यापून तांतडी ॥ वाहत असती ॥ ४७ ॥ अन्न जें जें माता खाय ॥ तयाचे होती पाक पर्याय ॥ तो रस नाभीच्या वंकनाळे जाय ॥ गर्भोदरीं ॥ ४८ ॥ तेन जीवति गर्भोऽपि मात्राहारण पोषितः ॥ ३८ ॥ अस्थियंत्रविनिष्पिष्टः पतितः कुक्षिवर्त्मना ॥ तस्मात् स्त्रियांचा जो आहार ॥ तयाचा अन्नरस जो साचार ॥ तेणेंचि गर्भाचे जीवन समग्र ॥ होत असे सत्य ॥ ४९ ॥ असो रामा जीवाशी वैराग्य व्हावें ॥ यास्तव गर्भदुःख निरोपिले बरवें ॥ आतां पुढेही मरणांत दुःख अवधारावें ॥ जन्मापासूनी ॥ १५० ॥ जन्मकाळींचेही दुःख सांगतां ॥ मनासी होय संकोचता ॥ आधीच गर्भामाजी अडकला होता ॥ जेवीं तप्तमुसेंत धातु ॥ ५१ ॥ तेथे नवही दारे असतीं बुजलीं ॥ एक मस्तकद्वारा श्वास घाली ॥ तेंही जन्माची वेळ जेव्हां आली ॥ तेव्हां निःशेष बुजलें ॥ ५२ ॥ मग दम कोंडतां ज्या होती यातना ॥ त्या सहसा मुखीं बोलवतीना ॥ असो कर्मवशें त्वरें पावे जनना ॥ योनिद्वारां ॥ ५३ ॥ तया मातेच्या कुक्षीपासूनी ॥ पडिला एकाएकी मेदिनीं ॥ अवघे शरीर घेतले पिळूनी ॥ तया अस्थियंत्रं ॥ ५४ ॥ मेदोऽसृग्दिग्धसर्वांगो जरायुपुटसंवृतः ॥ ३९ ॥ निष्क्रामन्भृशदुःखार्तों रुदन्नुच्चैरधोमुखः ॥ रक्तमेदें सर्वांग भरलें ॥ त्या जरायूने असे गुंडिलें ॥ कांहीं मोकळे कांहीं आच्छादिलें ॥ जेवीं वस्त्रचि वेष्टनीं ॥ ५५ ॥ बहुत दुःखाची पीडा भोगी ॥ योनिद्वारा निघाला वेगीं॥ रडूं लागला भूमीचिये भागीं ॥ उंच स्वरें अधोमुखें ॥ ५६ ॥ यंत्रादेव विनिर्मुक्तः पतत्युत्तानशाय्युत ॥ ४० ॥ अकिंचित्कस्तथा बालो मांसपेशीसमास्थितः ॥ यंत्रापरी निघे योनीपासून ॥ पडे भूमीत करी उताणे शयन ॥ कांही क्रिया नव्हे इंद्रिये असून ॥ मांसपेशीपरी असे ॥ ५७ ॥ चरकांतून ऊंस निघत ॥ पिळून विशीर्ण होऊन पडत ॥ तैसाचि हा योनियंत्रे उपजत ॥ चूर्ण होऊनी ॥ ५ ८॥ तेव्हां या लोकी जेथे होय जनन ॥ तेचि तयाचे असती स्वजन ॥ तेचि धुवून करविती शयन ॥ टोपलिया माजी ॥ ५९ ॥ परी उताणे जैसे निजविलें ॥ तैसेचि पडे स्वतां न हाले ॥ मांस पिशवीचे परी राहिलें ॥ रुदन मात्र करी ॥ १६० ॥ तेधवां तें अकिंचित्कर ॥ ग्रहणदान नसे असोनि कर ॥ चरण असून न चले अणुमात्र ॥ मलमूत्र मात्र करी ॥ ६१ ॥ परी आपुलें अंग नरके भरलें ॥ ऐसें हैं मनींही नाहीं स्फुरलें ॥ मग कैसें जाईल धुतिलें ॥ स्वकरें कडूनी ॥ ६२ ॥ गर्मी जे मननशक्ति होती ॥ तेही हरली पडली भ्रांति ॥ भूक लागतां खावें हे होय स्फूर्ति ॥ मुखीं घालितां चोखी ॥ ६३ ॥ डोळां देखे परी ओळखीना ॥ श्रवणीं ऐके परी कळेना ॥ त्वचेसी मृदु कठिण लागे परी निवारेना ॥ ऐशी गति ज्ञानेंद्रियां ॥ ६४ ॥ कर्मेंद्रियांची तो अक्रिय गति ॥ कारण की दृढता नसे शरीराप्रति ॥ आणि अभ्यासा नसे पाटवंशक्ति ॥ अंतःकरणही भ्रमरूप ॥ ६५ ॥ बहु कासया बोलणें ॥ मार्जारादिकी भाक्षिलें कोणें ॥ तयासीही नको न म्हणे ॥ अथवा निवारीना ॥ ६६ ॥ श्वमार्जारादिदष्ट्रिभ्यो रक्ष्यते दण्डपाणिभिः ॥ ४१ ॥ पितृवद्राक्षसं वेत्ति मातृड्डाकिनीमपि ॥ श्वान मार्जारादि दष्ट्रिपासन ॥ रक्षीत असती सारे स्वजन ॥ दण्ड घेऊन करिती निवारण ॥ मक्षिकादिही वारिती ॥ ६७ ॥ तयाचेनि कांहीं करवेना ॥ हे भक्षील हेही नेणे आपणा ॥ मातेपरी जाणे डाकिणी असतांना ॥ राक्षसा जाणे पित्यापरी ॥ ६८ ॥ पूयं पयोवदज्ञानादीर्घकष्टं तु शैशवम् ॥ ४२ ॥ पूं रक्त जरी पुढे देखिलें ॥ तयासी दुधाचे परी वाटलें ॥ अहा कष्ट अज्ञानास्तव झाले ॥ तया शिशुप्रति ॥ ६९ ॥ अथवा कांही एका दिवसा ॥ पदार्था जाणूं लागे मानसा ॥ परी बोलतां न ये सहसा ॥ .वर्णोच्चारें ॥ १७० ॥ श्लेष्मणा पिहिता नाडी सुषुम्ना यावदेव हि ॥ ४३ ॥ व्यक्तवर्णं च वचनं तावद्वक्तुं न शक्यते ॥ सुषुम्नानाडी श्लेष्में करून ॥ कोंडली असे जो काळ पूर्ण ॥ तोंकाळ स्वरूप अव्यक्त असती वर्ण ॥ स्पष्ट उच्चारा न येती ॥ ७१ ॥ अथवा कोणता वर्ण निघे कोठून ॥ हा अभ्यास नाहीं वैखरीलागून ॥ यास्तव वर्णोच्चारें न निघे वचन ॥ नाडीही कोंडल्या असती ॥ ७२ ॥ अतएव च गर्भेऽपि रोदितुं नैव शक्यते ॥ श्लेष्में नाडी कोंडल्या असती ॥ गीं तरी रडावया नसे शाक्ति ॥ जन्मतां किंचित् मोकळ्या होती ॥ तेणे रडू लागे ॥ ७३ ॥ हुंकारादि स्वर उमटती ॥ परी वर्णोच्चार किमपि न होती ॥ हे एक वैखरीची सांगितली गति ॥ तैशींच इंद्रिये क्रियाशून्य ॥ ७४ ॥ हळूहळू जेव्हां वाढू लागत ॥ तेव्हां शनैः क्रिया असे होत ॥ चालत बोबडे वर्ण बोलत ॥ आण वृत्तिही वाढे ॥ ७५ ॥ एवं ग्र्भीचे दुःख सांगितलें ॥ त्यावरी थोरा कष्टें जन्मलें ॥ जन्मतांचि षड्विकार पाठी लागले ॥ तेही दुःखरूप ॥ ७६ ॥ जन्म हाचि पहिला विकार ॥ दुसरा आहे मात्र दिसे शरीर ॥ वाढू लागे तदनंतर ॥ हा विकार तिसरा ॥ ७७ ॥ तारुण्य वृधाप्य मरण ॥ हे तिन्ही विकार पुढे असती बोलणें ॥ यांत सुखकारी असे कवण ॥ मुमुक्षु हो विचारा ॥ ७८ ॥ तारुण्यकाळी विषयी लोक ॥ म्हणती सुखभोग घडे अवश्यक ॥ परी विचारून पहा दुःखदायक ॥ किमपि सुख असेना ॥ ७९ ॥ गळ गिळिनां सुख वाटे ॥ परी तत्क्षणी घसा फाटे ॥ तेवीं दर्शनी विषय गोमटे ॥ परी तत्क्षणी दुःख देती ॥ १८० ॥ तस्मात् मुमुक्षुनें दुःखद जाणुन ॥ त्याग करणे हेचि उत्तम लक्षण ॥ असो गर्भ जन्माचे झाले निरूपण ॥ आतां तारुण्य कैसें तें ऐका ॥ ८१ ॥ दृप्तोऽथ यौवनं प्राप्य मन्मथज्वरविव्हलः ॥ ४४ ॥ गायत्यकस्मादुच्चैस्तु तथाकस्माच्च वल्गति ॥ यौवन जेधवां प्राप्त झालें॥ इंद्रिय देहादिकांसी पटुत्व आलें ॥ अंतःकरणांही स्फुरूं लागले ॥ नाना विचार ॥ ८२ ॥ ऐसें इतकेंही प्राप्त होऊन ॥ सुटिकेचा विचार न करी आपण ॥ कामज्वरेंचि गेलासे व्यापून ॥ दुजें न सुचे कांहीं ॥ ८३ ॥ अप्राप्त विषया उद्योगचिंता ॥ केव्हां प्राप्त हे तळमळ अति चित्ता ॥ प्राप्त झालिया तरी अहंममता ॥ दुणावे अंतरीं ॥ ८४ ॥ धन्य म्यांचि हे मेळविलें ॥ हे माझे पदार्थ किती चांगुले ॥ धन्य मज ऐसे प्रयत्न केले ॥ कवणाचेनि जाती ॥ ८५ ॥ ऐसी अहंममता पाठी लागली ॥ परी अंतर्बाह्य भीति उद्भवली ॥ हे माझी वस्तुजात न जावो नासली ॥ दिवसें दिवस वृद्धि घडों ॥ ८६ ॥ कोणी नेईल अथवा नाशिती खाती ॥ ऐसा विश्वास न ये कवणाचा चित्तीं ॥ सुखाची निद्राही न ये पुरती ॥ अमि तस्कर भय वाहे ॥ ८७ ॥ तस्मात् विषय असतां सुख न व्हावें ॥ नासून गेलीया तरी चरफडावें ॥ ऐसा कामें विव्हळ होतसे जीवें ॥ चितेने आंत जळतसे ॥ ८८ ॥ गुरुदेवा स्तुति भाकावया ॥ गर्भी बाळपणी वाणी नव्हती तया ॥ आतां वाणी दृढ झालीया शिणवीं वांया ॥ प्रपंच सुखाकडे ॥ ८९ ॥ गर्भीचे की बाळपणींचें ॥ दुःख किमपि नाठवी साचें ॥ अहंकृती गर्वे उंगाचि नाचे ॥ आवडे तैसा बडबडी ॥ १९० ॥ केव्हां सरागज्ञान उपरागेंशी ॥ गात असे उच्चस्वरेंशी ॥ ओरडतां दुःखचि होय मानसीं ॥ परी तें सुखचि वाटे ॥ ९१ ॥ अथवा मी अमुक माझें करणे चांगलें ॥ ऐसें आव्यपणे कवणाशी बोले ॥ हे म्यां अमुक मेळविलें ॥ वडिलाहनि अधिक ॥ ९२ ॥ सद्गुरु वचन की सच्छास्त्र श्रवण ॥ यास्तव श्रोत्रं झाले निर्माण ॥ परी सदां ऐके विषय निरूपण ॥ नवरसिक शृंगार ॥ ९३ ॥ संतासी भेटतां अंगचोरी ॥ कांतेसी आलिंगी अतिआदरीं ॥ मूर्तिध्यान न पाहे नेत्रीं ॥ न्याहाळी स्त्रियांचे कटाक्ष ॥ ९४ ॥ धनदारेविशीं सदा तत्पर ॥ न करणें तें करी अहोरात्र ॥ संत दर्शनाचा अव्हेर ॥ करी पंगु जैसा ॥ ९५ ॥ आरोहति तरून्वेगाच्छान्तानुद्वेजयत्यपि ॥ ४५ ॥ कामक्रोधमदांधः सन्न कांश्चिदपि वीक्षते ॥ शक्ती पाहतां तरूवरी चढे ॥ सर्व कर्मेंद्रिये असतीं धडे ॥ परी कदां संतांच्या पायां न पडे॥ वरी बोलून उद्विग्न करी ॥ ९६ ॥ कारण की कामक्रोधे अंध झाला ॥ मोह अंधार गडदी पडला ॥ संत असंत न दिसे तयाला ॥ यास्तव न पाहे किंचित् ॥ ९७ ॥ जेवीं मदें मातला उन्मत्त रेडा ॥ आदि अंत न दिसे कांहीं बोकडा ॥ की इंद्रपदही सान सरडा ॥ कुंपणावरीचिया ॥ ९८ ॥ तैसा हा विषय डोंगरी वेंघला ॥ सर्वांहून मीच वाटे थोरला ॥ तो न पाहेचि संत की देवाला ॥ म्हणे हेचि उत्तम कासयाने ॥ ९९ ॥ जे मद्रपी मिळून नेले ॥ अभिन्नत्वे पूर्ण शांत झाले ॥ तयासी निंदा उत्तरी बोले ॥ मन भंगे ऐसें ॥ २०० ॥ जैसा भाला अपार रुतत ॥ तेवीं शब्दशस्त्रे अंतर फाटत ॥ परी ते सहनशील ज्ञाते संत ॥ न मानूनि सोशिती ॥ १ ॥ मांजराची पिली पाहूनी ॥ बोका जैसा मारू इच्छी मनीं ॥ तेवीं देखतां संतां लागूनी ॥ द्वेषी कठिणोत्तरें ॥ २ ॥ बोक्याचा उठतसे माथेशूळ ॥ तेवीं संतां देखतां उठे कपाळ ॥ बोलूनि वर्मचि भेदी बरळ ॥ जेवीं शस्त्रघात ॥ ३ ॥ म्हणे हा पहा झाला संन्यासी ॥ संसार मुळी होइना यासी ॥ यास्तव वेष घेऊन लागला भिकेसी ॥ घरोघरी हिण्डे ॥ ४ ॥ हा दुजा यासीं स्वजनें अव्हेरिलें ॥ तेव्हां कथापुराण आरंभिलें ॥ वडिलाचें नांव सारें बुडविलें ॥ भीक मागून ढोंग मिरवी ॥ ५ ॥ हा पहा नवा साधु झाला ॥ शिष्याचा भार मेळविला ॥ लोक भोंदून द्रव्य संपादि वहिला ॥ तेथें परमार्थ कैंचा ॥ ६ ॥ हा स्त्रियांपाशी निरूपण लावी ॥ द्रव्यवंत शिष्या जवळ ठेवी ॥ भजन करून नाचून प्रेम दावी ॥ परी ते सर्व खोटें ॥ ७ ॥ अहो येणें धश्चोटें काय हो केलें ॥ स्वजन आप्त सर्व त्यागिले ॥ एका जोगड्याचे पाय धरिले ॥ तेणें भुरळ घातले नेणों ॥ ८ ॥ ऐसा गुरूसी अथवा गुरूपुत्रासी ॥ देखूच न शके दिवा की निशीं ॥ वर्म बोलोन दुखवी मानसीं ॥ मद्भक्त सज्जना ॥ ९ ॥ ते साधू जरी उगेंचि सोशिती ॥ परी तें न साहे मज ईश्वराप्रति ॥ बांधनि घालीतमें अंधतमा अति ॥ अक्षोभ्य नरकीं ॥ २१० ॥ मज शिवाप्रति जरी निदिलें ॥ तयाचें दुःख नाही वाटलें ॥ परी माझिया संतांसी जेणें पीडिलें तें मज कदां साहेना ॥ ११ ॥ संताचिया अपराधियाशी ॥ यावच्चंद्रसूर्य मी घाली नरकासी ॥ बहु बोलणे कासयासी ॥ त्यांची सुटिकाचि नव्हे ॥ १२ ॥ हे असोत दुष्ट दोषी जन ॥ परी संतां अव्हेरून करिती माझें अर्चन ॥ त्यांसही मी नव्हेचि प्रसन्न ॥ कल्पांतवरी ॥ १३ ॥ मां दुष्ट जे अधर्मी खळ ॥ संतांचे द्वेषी निंदक चांडाळ ॥ ते अंधतमी जातील सकळ ॥ हे बोलणे नको ॥ १४ ॥ ऐशियासी सोडवू म्हणशी ॥ तरी सांगें रामा कैसा उध्दरिशी ॥ गुरुवचन नायकती कर्णाशीं ॥ जें अविश्वासी ठायींचे ॥ १५ ॥ तेथे गुरूने काय करावें ॥ केवीं साधन पंथा लावावें ॥ म्हणून तया अव्हेरून बैसावें ॥ हेचि बरें ॥ १६ ॥ माता तान्हयासी न जेवी म्हणूनी ॥ दूध पाजी बलात्कार करूनी ॥ तें तो न गिळतां जरी सांडी गुळणी ॥ तरी उपाय काय मातेचा ॥ १७ ॥ तैसें अज्ञाना दुर्लभ ज्ञान ॥ म्हणून करवावें श्रवणादि साधन ॥ परी ते खळ दुरात्मे दुर्जन ॥ निंदेसी प्रवर्तती ॥ १८ ॥ तरी तयाचा त्यागचि उचित ॥ माता जेवीं बाळा त्रासून त्यागीत ॥ तेणें त्याच्या जीवित्वाचा घात ॥ तैसा अधःपात या दुष्टां ॥ १९ ॥ असोत त्या चांडाळांच्या गोष्टी ॥ काज नसे गा मज धूर्जटी ॥ परी भाविक मुमुक्षूच्यासाठीं ॥ बोलावें लागे ॥ २२० ॥ तस्मात् मुमुक्षूनें एक करावें ॥ भाझिया संतांसी शरण जावें ॥ तयांच्या उपदेशे पावन व्हावें ॥ मदेश्य येचि देहीं ॥ २१ ॥ तया भाविका प्रस्तावा धडावा ॥ ऐकून सर्वसंग त्याग व्हावा ॥ यास्तव बोललोंसे अघवा ॥ प्रसंग गर्भादि ॥ २२ ॥ गर्भदुःखाचे असावें स्मरण ॥ विषयादिकां पहावें विवंचून ॥ ज्या मार्गे जाती कामुकजन ॥ तो पंथचि सोडावा ॥ २३ ॥ कामुका स्त्रीसुख बहु वाटे थोर ॥ परी पहा पहा तें कैसे अपवित्र ॥ तेंचि की इच्छिती अहोरात्र ॥ नारकि नरक जेवीं ॥ २४ ॥ अस्थिमांसशिरालाया वामाया मन्मथालये ॥ ४६ ॥ उत्तानपूतिमण्डूकपाटितोदरसन्निभे ॥ आसक्तः स्मरबाणार्त आत्मना दह्यते भृशम् ॥ ४७ ॥ अस्थि मांस शिरांचे वेष्टन ॥ त्यावरी मढिले असे त्वचेनें ॥ तया मांसमयी स्त्री कामसदन ॥ दृष्टान्त देऊन सांगू ॥ २५ ॥ चिरलें मंडुकाचे उदरं ॥ उताणे त्यांतून वाहे रुधिर ॥ उघड दुर्गंधीचे त्यासम कोठार ॥ अथवा तेंचि प्रत्यक्ष ॥ २६ ॥ ऐशियाच्या ठायीं मूर्ख आसक्त ॥ कामबाणे होत्साता पीडित ॥ व्यर्थ आपणांत जाळीत ॥ दिन किंवा निशीं ॥ २७ ॥ वृश्चिकाचे पुच्छा ऐसें वीर्यविष ॥ परी तितुकेने नांगी उंचावे विशेष ॥ तितुकें पडून जातां निःशेष ॥ हिनसुदें पडे ॥ २८ ॥ शरिराचा इतुकाचि संग ॥ परी सर्वदां मन त्यांतचि अभंग ॥ त्या इच्छेचा कदां नव्हे भंग ॥ हाचि अंतरानि ॥ २९ ॥ तेणें धडधडा असे जळत ॥ परी मूर्ख तयाशी सुख म्हणत ॥ सुनबहिरी रोग जयासी होत ॥ तया न कळे त्वचा जळतां ॥ २३० ॥ अस्थिमांसशिरात्वग्भ्यः किमन्यदर्तते वपुः ॥ वामानां मायया मूढो न किंचित् द्वीक्षते जगत् ॥ ४८ ॥ अस्थि मांस शिरा त्वचा ॥ येणेंशी युक्त देह स्त्रीचा ॥ यावीण तेथे सुंदरपणा कैंचा ॥ परी मांसमया नेणें मूढ ॥ ३१ ॥ तया मूढासी काय म्हणावें ॥ त्या दुर्गंधीत मन कैसें गाडावें ॥ मी जळत असें हेही नेणवें ॥ चिळशी न ये मूत्रपात्राची ॥ ३२ ॥ जागृती माजी तेचि ध्यान ॥ तेंचि की झोपेंत पडे स्वप्न ॥ जग की जगकर्ता पाहे कोण ॥ आपआपणा स्मरेना ॥ ३३ ॥ असो ऐशी मूढाची स्थिती ॥ परी मुमुक्षूने जाणून चित्तीं ॥ त्यागचि करूनि कामप्रति ॥ संतांसी शरण जावें ॥ ३४ ॥ प्रजार्थ ऋतुकाळी गमन ॥ हे सत्य नव्हे वेदाचे वचन ॥ जीवें परतावेंचि येथून ॥ हा गूढ अभिप्राय ॥ ३५ ॥ जयाक्षणीं विरक्ति उपजे ॥ त्या क्षणींच निघावें सहजें ॥ प्रजोत्पादन झालिया ओजें ॥ जाईन हे न म्हणावें ॥ ३६ ॥ अथवा स्त्रीची आज्ञा झालियाविण ॥ जाऊं नये हेही व्यर्थ वचन ॥ न पुसतांचि अकिंचित्कर होऊन ॥ विचारावें सुखें ॥ ३७ ॥ अथवा लग्नापूर्वीच निघावें ॥ कर्मत्यागें श्रवणादि करावें ॥ जीवन्मुक्तीचे सुख भोगावें ॥ येणेंचि देहीं ॥ ३८ ॥ कामुकाचें नायकावें बोलणें ॥ वृद्धपणी संन्यास घेणें ॥ धोत्रा खाऊन भुलल्याचे वचन ॥ जेवीं कदां सत्य नव्हे ॥ ३९ ॥ ते मूढ मायेने पावले बंधना ॥ स्त्रियेसी म्हणती चंद्रवदना ॥ हावभाव कटाक्षी मृगनयना ॥ सुनासा सुस्तनीं ॥ २४० ॥ पहा की मुखाची लाळ गळत ॥ तयासी म्हणसी अधरामृत ॥ चंद्राचा दिधला तयासी दृष्टान्त ॥ परी आल्हाद ना प्रकाश ॥ ४१ ॥ घाणेरें रक्तमांसे भरलें ॥ तें काय चंद्राच्या समत्वा आलें ॥ मृगापरी डोळे दिसले ॥ परी प्राण जातां पहावें ॥ ४२ ॥ निर्गते प्राणपवने देहो हंत मृगीदशः ॥ यथाहि जायते नैव वीक्ष्यते पंचषैर्दिनैः ॥ ४९ ॥ त्या मृगनयनेचा प्राण जातां ॥ देहो कैसा दिसेल पाहतां ॥ तें नाहींच पहात केवी हे मूढता ॥ हा खेद वाटे अति ॥ ४३ ॥ पांच सहा दिवसाआंत ॥ की तूर्तचि न कळे मृत्यु पावत ॥ अथवा प्राण गोलिया ज्या ज्या अवस्था प्राप्त ॥ त्या का प्रत्यया न येती ॥ ४४ ॥ मृगसम नेत्राच्या गारी होती ॥ कोणी नसतां उंदीर खाती ॥ मग त्या हावभावाची होय माती ॥ कटाक्षासह ॥ ४५ ॥ जाळिलें तरी राख दिसे ॥ पुरिल्या किडे पडती अपैसे ॥ श्वापदी भक्षितां विष्ठा होतसे ॥ हे परिणाम न कळती मूढा ॥ ४६ ॥ मरणाउपरी अवस्था ऐशी ॥ होणार हे नकळे पापियासी ॥ परी जीव असतां वृद्धत्व ये स्त्रीसी ॥ तेव्हां दशा पाहवी ॥ ४७ ॥ डोळे भळभळां गळती ॥ स्तनाच्या पिशव्या लोंबती ॥ त्वचेवरी सर्व शिरा उमटती ॥ नाका हनुवटी लागे ॥ ४८ ॥ लाळ गळे मुखांतून ॥ अवधी शोभा झाली छिन्नभिन्न ॥ ऐसा परिणाम मुमुक्षूने पाहन ॥ विपापरी विषय त्यागावे ॥ ४९ ॥ अथवा स्त्री राहिली तरुण ॥ पुरुषासी आले वृद्धपण ॥ तरी दुसरे भोगिती स्त्रियेलागून ॥ जे पाहतां अतिदुःख ॥ २५० ॥ असो तारुण्यकाळी म्हणती सुख ॥ ते केवळ अज्ञान मूर्ख ॥ येथून तेथवरी पाहतां दुःख ॥ विचारावें मुमुक्षूनें ॥ ५१ ॥ तरुण काळींच सुख नाहीं ॥ मग वृद्धपणी बोलावें कायी ॥ तेंचि वृद्धत्व बोलिजे लवलाहीं ॥ ऐकून प्रीति त्यागावी ॥ ५२ ॥ महापरिभवस्थानं जरां प्राप्यातिदुःखितः ॥ श्लेष्मणा पिहितोरस्को जग्धमन्नं न जीर्यति ॥ ५० ॥ जरा प्राप्त झालियावरी ॥ ते अवस्था अति दुःखकारी ॥ ते मोठे पराभव स्थान अंतरीं ॥ कळावें मुमुक्षा ॥ ५३ ॥ सर्व देहपाटव होय क्षीण ॥ गलित होताती सर्व करणें ॥ मुख्य सामर्थ्य असावें भक्षितां अन्न ॥ तें तरी खातां जिरेना ॥ ५४ ॥ श्लेष्मेंकडून कोंडल्या नाडी ॥ अन्नरस पावेना हाडोहाडीं ॥ मुख्य उरांतील शिरा दाटल्या प्रौढीं ॥ अन्न खातांचि वमी ॥ ५५ ॥ जरी जिरले अन्न तें पचेना ॥ जठराग्नीच प्रदीप्त असेना ॥ तेणें तगमगी चैन पडेना ॥ सुख निद्राही न ये ॥ ५६ ॥ सन्नदंतो मन्ददृष्टिः कटुतिक्तकषायभुक् ॥ वातभुग्नकटिग्रीवकरोरु चरणोऽबलः ॥ ५१ ॥ वृद्धपण येतां कोणी न पुसे ॥ जुलमें अन्न वाढिती भलतैसें ॥ तें चावेना दंत मुखी नसे ॥ आणि दृष्टीही दिसेना ॥ ५७ ॥ न दिसता भलतेच कालवावें ॥ कडू तीक्ष्ण हिरवें जळके खावें ॥ तेंही न चावे तरी उगेंचि गिळावें ॥ तेणें दुखावें उदर ॥ ५८ ॥ कटि ग्रीवा कर मांड्या चरण ॥ वातें बळही झालेसें भग्नं ॥ थरथरां कांपती गात्रं संपूर्ण ॥ उठवेना बैसवेना ॥ ५९ ॥ गदायुतसमाविष्टः परित्यक्तः स्वबंधुभिः ॥ निःशौचो मलदिग्धाङ्ग आलिंगितवरोपितः ॥ ५२ ॥ सहस्रावधि रोगें कड़न ॥ व्यापलें असे शरीर झालें ग्लान ॥ शब्दशस्त्रे ताडिती स्वजन ॥ तेणेही पराभूत ॥ २६० ॥ सर्वांग विष्ठेने भरलें ॥ कोणी क्षालिना दुगंधि चालें ॥ अत्यंत दाहें शरीर तापलें ॥ अंतर्बाह्य ॥ ६१ ॥ ध्यायन्नतुलभान्भोगान्केवलं वर्तते चलः ॥ सर्वेन्द्रियाक्रियालोपाद्धस्यते बालकैरपि ॥ ५३ ॥ केवळ मरावया टेकला ॥ परी दुर्लभ भोग मिळावे मला ॥ म्हणे परी शक्ति नव्हे विषय ग्रहणाला ॥ परंतु इच्छा उणी नव्हे ॥ ६२ ॥ सर्वेद्रियांच्या क्रिया लोपती ॥ परी अधिकचि लुलू असे चितीं ॥ ते पाहून बाळकें हंसती ॥ म्हणती वृध चळला ॥ ६३ ॥ ऐसें वार्धक्यदुःख हे कठीण ॥ त्याहीहून अति दुःखद मरण ॥ तेंही बोलू अल्पसंकेतेंकडून ॥ कळावया मुमुक्षूसी ॥ ६४ ॥ ततो मृतिजदुःखस्य दृष्टान्तो नोपलभ्यते ॥ यस्माद्विभ्यति भूतानि प्राप्तान्यपि परां रुजम् ॥ ५४ ॥ वार्धक्यदशा झालिया नंतर ॥ मरणोन्मुख होतां नर ॥ त्यापासून दुःख जें होय साचार ॥ तयासी दृष्टान्त असेना ॥ ६५ ॥ जया मरणापासून भाति ॥ सर्व प्राणीमात्र पावती ॥ तया समयाची झाली प्राप्ति ॥ तें उत्कृष्ट दुःख ॥ ६६ ॥ नीयते मृत्यना जन्तुः परिष्वक्तोगपि बन्धुभिः ॥ सागरान्तर्जलगतो गरुडेनेव पन्नगः ॥ ५५ ॥ जरी स्वजनीं वेष्टून घेतला ॥ अथवा सागरामाजीही लपविला ॥ तरी मृत्यु सोडीना तयाला ॥ बळें नेला जीव मात्र ॥ ६७ ॥ जेवीं सागराच्या जलाआंत ॥ सर्प जरी लपून बसत ॥ परी गरुड उडी घालून नेत ॥ तेवीं मृत्यु जीवासी ॥ ६८ ॥ हा कान्ते हा धनं पुत्राः कन्दमानः सुदारुणम् ॥ मण्डूक इव सर्पेण मृत्युना नीयते नरः ॥ ५६ ॥ हा इति खेदें म्हणे माझी कांता ॥ अहो हे धनपुत्र हो सुता ॥ ऐसा आक्रंदून रडत असतां ॥ दारुण दुःखें ॥ ६९ ॥ परी काळ सोडीना तयासी ॥ सर्प जसा धरी मंडुकासी ॥ तेवीं नर बांधून काळपाशी ॥ मृत्यूनें नेला ॥ २७० ॥ मर्मसून्मथ्यमानेषु मुच्यमानेषु संधिषु ॥ यदुःखं म्रियमाणस्य स्मर्यतां तन्मुमक्षुभिः ॥ ५७ ॥ प्राणत्यागाचे संधी आतौता ॥ वर्मस्थळी ओढिले असतां ॥ जें जें दुःख होतसें समस्तां ॥ तें स्मरावें मुमुक्षूनें ॥ ७१ ॥ हे दुःख सर्वांसी समान ॥ परी न स्मरती कदां मूढजन ॥ आपणांतें चिरंजीवचि मानून ॥ आमरण लोभ धरिती ॥ ७२ ॥ असो तया मूढमतीशीं ॥ आम्हां का नसे उपदेशीं ॥ परी निरवणे असे मुमुक्षूसी ॥ की स्मरण असों द्या मरणाचें ॥ ७३ ॥ जयासी मोक्षाची असे चाड ॥ तेणें अहं ममतेची न धरावी भीड ॥ गर्भापासून मरणांत द्वाड ॥ अतिदुःख हैं स्मरावें ॥ ७४ ॥ आदि मध्य आणि अवसानी ॥ शरीर हे दुःखाची खाणी ॥ ऐशी दोषदृष्टि असतां त्या लागूनी ॥ अहं ममता उपजेना ॥ ७५ ॥ एक देहाचा लोभ सोडितां ॥ नुदभवे कदां विषय ममता ॥ ऐसा हा निःशेष त्याग घडता ॥ ज्ञान द्वारा मोक्ष ॥ ७६ ॥ ज्ञान हे जरी स्वतंत्र असे ॥ तरी त्यागाची तया अपेक्षा वसे ॥ मग येर साधने असतीं फोंसें ॥ कर्मादि त्यागापुढें ॥ ७७ ॥ कर्में प्रजेने की धनानें ॥ मोक्ष न पाविजे जीवानें ॥ एका त्यागेंचि श्रुति म्हणे ॥ जीवन्मुक्ति पावे ॥ ७८ ॥ तो त्याग दोषदृष्टीवीण ॥ कदां न घडे जीवालागून ॥ तस्मात् मरण दुःखाचें स्मरण ॥ अनुतापयुक्त असावें ॥ ७९ ॥ जो विविधता चित्तीं पोळला ॥ अनुतापें अवघाचि त्याग केला ॥ तोचि मुमुक्षु अधिकारी झाला ॥ मोक्षाश्रयेचा ॥ २८० ॥ येर बापुडे जे अज्ञान ॥ भोगिलेच भोगिती जन्मभरण ॥ त्यासी त्राताचि नसे कवण ॥ की दुःखातून सोडवी ॥ ८१ ॥ दृष्टावाक्षिप्यमाणायां संज्ञया ह्रियमाणया ॥ मृत्यपाशेन बद्धस्य त्राता नवापलभ्यते ॥ ५८ ॥ हा पडिला असे निसंज्ञ ॥ निसंशय पावतो मरण ॥ ऐसें पाहूनही कवणाचेनें ॥ न जाय सोडविला ॥ ८२ ॥ ब्रह्मादि देवजरी आले ॥ त्यांचे कृपेनें मानस द्रवलें ॥ परी काळपाशे पुरुषातें बांधिलें ॥ तेथे ते अशक्य रक्षावया ॥ ८३ ॥ तस्मात् येथून सोडविता त्राता ॥ नाहींच तिहीं लोका आतौता ॥ अथवा अज्ञानें जो पावला बद्धता ॥ तोही ज्ञानेंवीण न सुटे ॥ ८४ ॥ जीवंत असतां संज्ञा हरली ॥ परमार्थ नेणे पडली भुली ॥ मी माझें हें करितांच मेलीं ॥ त्यांशी सोडता नसे ॥ ८५ ॥ तस्मात मुमुक्षुहो अहं ममता ॥ संतसेवेनें सांडूनि परता ॥ हा देह जीवंतचि असतां ॥ जीवनमुक्ति वरावी ॥ ८६ ॥ ऐसें न होतां मरूनि मरावें ॥ पुनः पुनः तेंचि सोसावें ॥ अंधतमा माजी जेणें पडावें ॥ तया सोडवावें कवणें ॥ ८७ ॥ संरुध्यमानस्तमसा महच्चित्तमिवाविशन् ॥ उपाहूतस्तदा ज्ञातीनीक्षते दीनचक्षुषा ॥ ५९ ॥ महातमेशी रोधले चित्त ॥ तेणें अंधतमी निःसंज्ञ होत ॥ तों पाशें ओढिला हे ज्ञाति पाहत ॥ दीनदृष्टी करूनि ॥ ८८ ॥ तेथें कवणाचे सामर्थ्य चाले ॥ कीं तयासी जाय सोडविलें ॥ उगेचि दीनापरी पाई लागलें ॥ ॥ निरुपाय म्हणूनी ॥ ८९ ॥ अथवा जीवंत असतां अज्ञानें ॥ चित्तप्रपंचीं निमग्न होणें ॥ तेथे काय करावें ज्ञात्याने ॥ हा सुटाचि न इच्छीं ॥ २९० ॥ ज्ञाता म्हणे हा भव नसतां ॥ अज्ञानें व्यर्थ पावला बद्धता ॥ बळेंचि म्हणोन मी पापपुण्य कर्ता ॥ अधःपाता चालिला ॥ ९१ ॥ ऐशी खंति मात्र ज्ञानिया लागे ॥ कांहींच उपाय न चले वेगें ॥ अंधतमी वृक्षादि होतां अगें ॥ मग तो सुतरां न सुटे ॥ ९२ ॥ असा जो का पाशी पडिला ॥ तो कवणेही न जाय सोडविला ॥ सर्वही दीनदृष्टी पाहती त्याला ॥ जरी देवादिक ॥ ९३ ॥ अयःपाशेन कालेन स्नेहपाशेन बंधुभिः ॥ आत्मानं कृष्यमाणं तं वीक्षते परितस्थता ॥ ६० ॥ काळें लोहाचे पाशें ओढिलें ॥ स्वजनें स्नेहापाशें बांधिलें ॥ या रीती आपणांतें ओढिती वेगळाले ॥ तेव्हां पाहे भोंवता ॥ ९४ ॥ अंतरीं अयंःपाश तो घालून ॥ ओढून काढिती पंचप्राण ॥ येथें कवणाचे आशंकील मन ॥ की नाडी आंत पाश कैंचा ॥ ९५ ॥ तरी याचे उत्तर ऐसें ॥ अयः पाश तो खरा नसे ॥ परी पहिलाचि ध्यास जो अंतरीं असें ॥ तोचि स्वप्नापरी कल्पित ॥ ९६ ॥ सर्व नाडींचा प्राण गोळा होतां ॥ कासाविशी होय ओढ लागतां ॥ तयासी कल्पून मानिली पाशता ॥ अज्ञानास्तव ॥ ९७ ॥ कैंचा यम कैंचा पाश ॥ उगेची कल्पूनि पावे नाश ॥ स्वप्नीं जेवीं नसतां कर्कश ॥ व्याघ्रे फाडिलें देखे ॥ ९८ ॥ असो काळपाश ओढी एकीकडे ॥ स्वजनी स्नेहें बांधिलें इकडे ॥ ऐसें सांकडे पडे दोहींकडे ॥ उगा इतस्ततः पाहे ॥ ९९ ॥ हिकय्या बाध्यमानस्य श्वासेन परिशुष्यतः ॥ मृत्युनाकृष्यमाणस्य न खल्वस्ति परायणम् ॥ ६१ ॥ निश्चयशी म्हणे कवणें ॥ बांधिले असे सत्राणें ॥ एक श्वास जरी मज घडे वाचणें ॥ तरी फार उत्तम होतें ॥ ३०० ॥ परी मृत्यूनें आकर्षिलें असतां ॥ एक श्वास रक्षीना कोणी त्राता ॥ हा नेमुचि असे सर्व श्वास सरतां ॥ मरावें अचूक ॥ १ ॥ जे वेळ गर्भाच्या संभवे ॥ अथवा प्रवेशतां लिंगासह जीवें ॥ ते समयीं अमृक श्वास रहावें ॥ हा नेमुचि असे ॥ २ ॥ त्यांतून एक श्वास उणा न होय ॥ अथवा एक आधिक होऊं नये ॥ येथे किमपि न धरावा संशय ॥ होणार तें आधीच झालें ॥ ३ ॥ जैसे दण्डं चक्र कुलाल फिरवी ॥ त्या झटक्याऐशी फेर्याची नेमणूक व्हावी ॥ त्यांत उणे अधिक वेढे न होती स्वभावीं ॥ हा नेमचि जैसा ॥ ४ ॥ ते वेढे जैसे न मोजी कुलाल ॥ परी नेम झाला तो अन्यथा नव्हेल ॥ तैसाचि हाही नेमु जाणिजेल ॥ कर्ताही नेणे परी केला ॥ ५ ॥ तस्मात् नेम होतां ते श्वास सरले ॥ आतां अधिक उणे न जाती केले ॥ जरी येणे एका श्वासा मागितलें ॥ तरी देतो कोण ॥ ६ ॥ श्वास सरणे हे मृत्यूनें ओढिलें ॥ येथून एक श्वास न जाय रक्षिलें ॥ ब्रह्मादि देव जरी आले ॥ तरी एक श्वास न देववे ॥ ७ ॥ संसारयंत्रमारूढो यमदूतैराधिष्ठितः ॥ क्व यास्यामीति दुःखार्तः कालपाशेन योजितः ॥ ६२ ॥ या संसृति यंत्री आरोहून ॥ जीव पावला असे जन्ममरण ॥ शेवटी पावन व्हावे म्हणून ॥ नरदेहासी आला ॥ ८ ॥ येथेही सार्थक न झालें ॥ जन्म मृत्यू नाहीं चुकविलें ॥ तैसेचि अज्ञाने जाऊनि पडिले ॥ काळाचिये मुखीं ॥ ९ ॥ जेव्हां काळपाश अंतरीं ओढिती ॥ यमदूती काढिले हे वाटे चित्तीं ॥ तेव्हां पडिला दुःखाचे आवर्ती ॥ म्हणे मी जाईन कोठे ॥ ३१० ॥ अहा जन्म गेला सार्थकावीण ॥ कांहीही नाही केले साधन ॥ आतां वाचतों जरी एक क्षण ॥ तरी सार्थक करितों ॥ ११ ॥ किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् ॥ इतिकर्तव्यतामूढः कृच्छादेहात्त्यजत्यसून् ॥ ६३ ॥ आतां साधन मी काय करूं ॥ अंतःकरणी काय धरूं ॥ आणि कोणते गोष्टीचा करूं अव्हेरू ॥ जाऊं तरी कोठें ॥ १२ ॥ या रीती कर्तव्यता इच्छी मनीं ॥ तो मूढ कष्ट कष्टेंचि करूनी ॥ सोडीतसे प्राणा लागूनी ॥ अत्यंत विस्मृतिरूप ॥ १३ ॥ आजवरी सार्थक नाहीं केलें ॥ आतां साधन करीन भावन प्राण गेले ॥ तरी हे बहुत की बरे झालें ॥ पुढें जन्मतां लागे मार्गी ॥ १४ ॥ परी हेही नेणून मूढमति ॥ देह रक्षणाची धरून प्रीति ॥ म्हणे काय करूं निश्वितीं ॥ मी वांचेन कैसा ॥ १५ ॥ काय त्यागून काय घेऊं ॥ अथवा कवणापाशी जाऊं ॥ ऐसेंचि कल्पून सोडीत जीवु ॥ तेव्हां सद्गति कैंची ॥ १६ ॥ यातनादेहसंबद्धो यमदूतैरधिष्ठितः ॥ इतो गत्वानुभवति या यास्ता यमयातनाः ॥ ६४ ॥ पहिल्या देह संबंधाच्या यातना ॥ वरी मृत्युकाळी यमदूतांच्या ताडणी ॥ कष्टेंचि सोडीतसे प्राणा ॥ संसारांतूनी ॥ १७ ॥ लोक म्हणती दुःखातूनि सुटला ॥ परी तो दुःखाहूनि दुःखावर पडता झाला ॥ मरणानंतरें यमलोकी गेला ॥ यम यातना भोगावया ॥ १८ ॥ तेथें ज्या ज्या यातना अनुभवीत ॥ त्या बोलतां मन होय शंकित ॥ अनंत दुःख नरका नव्हे अंत ॥ अमुक काळ हा नेमु कैंचा ॥ १९ ॥ तासु यल्लभते दुःखं तद्वक्तुं क्षमते कुतः ॥ ऐशियाअनंत दुःखामधून ॥ एका नरकाचे दुःख होय जीवालागून ॥ तें बोलावया शक्य नव्हे वचन ॥ मग अशेष दुःख कैसे बोलावें ॥ ३२० ॥ असो यमयातनेचे दुःख ॥ परी इहलोकीं तरी कैंचें सुख ॥ मानिले मात्र अमृतवत् विखं ॥ त्या देहाचा परिणाम पहा ॥ २१ ॥ कर्पर चंदनाद्यैस्तु लिप्यते सततं हि यत् ॥ ६५ ॥ भूषणैर्भूष्यते चित्रैः सुवस्त्रैः परिवार्यते ॥ जया देहासी कर्परयुक्त चंदनाची उटी शोभत ॥ माळा सुगंधी स्त्रिया अर्पित ॥ आणि मृदु आस्तरणें ॥ २२ ॥ वस्त्रे भूषणें अलंकार ॥ उंच उंच आणि अमुल्य सुंदर ॥ सदां सन्निधचि परिवार ॥ तोचि देह अंती पहा ॥ २३ ॥ अस्पृश्यं जायतेऽप्रेक्ष्य जीवत्यक्तं सदा वपुः ॥ ६६ ॥ निष्कासयन्ति निलयात्क्षणं न स्थापयन्त्यपि ॥ तेचि वैपु जीवाने त्यागितां ॥ अस्पर्श न पहावया योग्य होतां ॥ क्षण एक न ठेविती संदना अतौता ॥ काढिती ग्रामा बाहेरी ॥ २४ ॥ जेणें माझें होतें म्हणितलें ॥ जयासंगी सवीं सुख भोगिलें ॥ तेंचि स्वजन म्हणती काढा पहिले ॥ क्षण लोटतां जड होय ॥ २५ ॥ दह्यते च ततः काष्ठैस्तद्भस्म क्रियते क्षणात ॥ ६७ ॥ भक्ष्यते वा मृगालैश्च गृध्रकुक्करवायसैः ॥ परिवार सन्निध असतां जाळिती ॥ एक ते चंदनाची काष्ठं घालिती ॥ परी जळालिया भस्माची रीती ॥ समान असे ॥ २६ ॥ परिवार नसतां सन्निधान ॥ गृध्र कुक्कट वायस श्वान ॥ भक्षिती अवघे विदारून ॥ अति दुर्गधि सुटे ॥ २७ ॥ कित्येकांस समयो पडे ऐसा ॥ स्वजन असतां तया सहवासा ॥ ओढून टाकून जाती सहसा ॥ तेव्हां श्वान सूकरें खाती ॥ २८ ॥ पुनर्न दृश्यते सोऽथ जन्मकोटिशतैरपि ॥ ६८ ॥ देह जळाले की भाक्षिलें ॥ पुढे स्वजन जरी पाहूं गेलें ॥ तरी कोटिशत जन्में देखिले ॥ नाहींच कोणी ॥ २९ ॥ माता पिता गुरुजनः स्वजनो ममति मायोपमे जगतिकस्य भवेत्प्रतिज्ञा ॥ एको यतो व्रजति कर्मपुरःसरोऽयं विश्रामवृक्षसदृशः खलु जीवलोकः ॥ ६९ ॥ या इंद्रजालापरी सृष्टी आंत ॥ मृत्यु मय जेधवा होय प्राप्त ॥ त्याचे माता पिता कुलगुरु सर्व गोत ॥ कोण न शकत माझे म्हणों ॥ ३३० ॥ माझे म्हणोनि न सोडविती ॥ अथवा त्या समागमें न जाती ॥ उगचि माझा गेला म्हणनि रडती ॥ परी आधीं जेविती फिरून येतां ॥ ३१ ॥ हा तुमचा तरी या सवें तुम्हासी ॥ जाळू म्हणे जरी कोणी निश्चयेंशीं ॥ तरी सर्वही म्हणती हा परदेशी ॥ आमुचा नव्हे सत्य सत्य ॥ ३२ ॥ तस्मात् कोणासही आमुचा म्हणावया ॥ शक्ति न होय काळी कवाणिया ॥ जाणे लागेल एकटिया ॥ कर्म मात्र संमागमें ॥ ३३ ॥ पाप अथवा पुण्य में केलें ॥ तया पुरःसर एकलें मेलें ॥ या विरहित स्वजन नाहीं गेलें ॥ स्वर्गी की नरकीं ॥ ३४ ॥ जैसे वृक्षावरी पक्षी मीनती ॥ तैसेचि या लोकीं एकत्र जन्मती ॥ एक जाती एक राहती ॥ अथवा दाही दिशां दहा ॥ ३५ ॥ ऐसा निश्चयाच असे वास्तविक ॥ मिळाले एके स्थळी अनेक ॥ एकदां विघडून गेल्या सकळिक ॥ कोटि जन्में भेटती ना ॥ ३६ ॥ तेथे माझें ऐसें कोण म्हणे ॥ तस्मात् मुमुक्षूनें एक करणें ॥ माझें माझें हे निःशेष त्यागणें ॥ आपुलिया हितास्तव ॥ ३७ ॥ अथवा सर्वही माझेंच म्हणावें ॥ कारण की अनंत जन्मींचे सांगाती सर्वे ॥ येणेही सुखदुःख नुरावें ॥ एकदेशिया परी ॥ ३८ ॥ हा साडेतीन हात मी एकला ॥ हे स्वजन साह्य असती मजला ॥ ऐसा जो एकदेशी मानून राहिला ॥ तो बांधला संसारीं ॥ ३९ ॥ अनंत ब्रह्माण्डात्मक मी एकला ॥ माझेंच म्हणे सर्व नामरूपाला ॥ ऐसें तादात्म्य असे जयाला ॥ तो निश्चयेंशी मुक्त ॥ ३४० ॥ ऐशिया मतीचा जो पुरुष ॥ तया मस्तकी बैसवी मी परशु ॥ तस्मात् राघवा अहंकार हा विशेषु ॥ समाष्टमय घ्यावा ॥ ४१ ॥ जया मी माझेपणे बुडिजे ॥ तया मी माझेपणेचि सुटिजे ॥ हे हातवटी ज्ञानिया लाहिजे ॥ येरा अप्राप्त ॥ ४२ ॥ हा अर्थ ध्वनितार्थे काढिला ॥ मी माझेंच परी शोभे तयाला ॥ एकदेशी भावितां येराला ॥ अचुक जन्ममृत्यू ॥ ४३ ॥ वृक्षावरील पक्षियाचा ॥ दृष्टान्त दिधला तो असे साचा ॥ येथें नाहींच कोणी कोणाचा ॥ एकटा आपला आपण ॥ ४४ ॥ सायं सायं वासवृक्षं समेताः प्रातः प्रातस्तेन तेन प्रयान्ति ॥ त्यक्त्वान्योन्यं तं च वृक्षं विहंगा यदत्तद्वज्ज्ञात योऽज्ञातयश्च ॥ ७० ॥ वृक्षावरी जैसी पक्षी मंडळी ॥ मिळत असे सायंकाळी ॥ परी एकदांचि न येईजे सकळीं ॥ एकेक मागे पुढे मिळती ॥ ४५ ॥ तैसेचि एका मागे एक जन्मती ॥ काही काळ एकत्र राहती ॥ तयाशी माझे माझे म्हणती ॥ विवेकशून्य सारे ॥ ४६ ॥ मागुतां प्रातःकाळ होतां ॥ वृक्षाहून पक्षी उडून जातां ॥ टाकून जाती एकमेकां समस्तां ॥ मागे पुढे दशदिशा ॥ ४७ ॥ तैसीच ज्ञातीसी जे जे ज्ञाती ॥ जे का एकत्र जन्मली होती ॥ ते एकमेकां सोडून जाय निश्चितीं ॥ मागे पुढे आयुष्य सरतां ॥ ४८ ॥ तस्मात् कोण असे येथे कोणाचे ॥ अवघे सांगाती क्षण सुखाचे ॥ अज्ञान मानिती त्या विवेकशून्याचें ॥ मुमुझे मुख नावलोकावें ॥ ४९ ॥ मूर्ख अज्ञानें सुख-दुख भोगितो ॥ जन्मतो मरतो मरतो जन्मतो ॥ ऐशा प्रत्यावृत्ति करतो ॥ उंच नीच योनी ॥ ३५० ॥ मृतिबीजं भवेज्जन्म जन्मबीजं भवेन्मृतिः ॥ घटयंत्रवदश्रान्तो बम्भ्रमीत्यनिशं नरः ॥ ७१ ॥ मरणासी बीज जनन ॥ जन्मासी बीज मरण ॥ घटियंत्रापरी विश्राम न पावून ॥ दिवानिशीं भ्रमत ॥ ५१ ॥ मुख्य अज्ञान जेघवां झालें ॥ तेव्हांचि जीव जन्माती आले ॥ ते जन्मणोंचे मरणा कारण झालें ॥ होईल तें जाईल ॥ ५२ ॥ जन्मतांचि गाडगियांत घालून ॥ नराचें ठेविती मरणासी प्रस्थान ॥ आज की शतवर्षा अचुक मरण ॥ जन्मापाठी असे ॥ ५३ ॥ तैसेंच मरणाच्याही पूर्वी ॥ जे जे मनें जीव आठवी ॥ ते तेचि योनि अवलंबावी ॥ तेणें अचुक जन्म ॥ ५४ ॥ अळिकेने पुढील पाय धरावे ॥ तेव्हां मागील सोडावे ॥ तैसे देह धरावे अन्य जीवें ॥ तेव्हां विसर्जी हा देह ॥ ५५ ॥ एवं मेला तरी जन्म व्हावया ॥ की जन्मला असे मरावया ॥ हे भ्रमण न चुके कांहीं केलिया ॥ कल्पांतवरी ॥ ५६ ॥ घटियंत्र म्हणजे कुलालचक्र ॥ भ्रमत असे दियारात्र ॥ तें रंगविलें श्वेत काळे विचित्र ॥ अर्घ अर्ध भागें ॥ ५७ ॥ काळियामागे पांढरे लागलें ॥ की पांढरिया मागे काळे चालिलें ॥ एकरूपचि दृष्टीस भासले ॥ पहाणाराच्या ॥ ५८ ॥ तैसेंचि जन्मापाठी लागले मरण ॥ की मरणापाठी लागलें जनन ॥ किंवा उभयतां चालिलें सहतंत्रपणे ॥ न कळे पुढे की मागें ॥ ५९ ॥ एवं मृत्यु पावे जन्मला म्हणून ॥ जन्मला असे होतां मरण ॥ नर शद्बे पुरुष अभिधान ॥ जीवासी असे ॥ ३६० ॥ तो जीव अज्ञान वासना वशे ॥ उंच नीच योनि फिरत असे ॥ जन्मणे मरणें चक्रापरी होतसे ॥ कारण होऊन एकमेकां ॥ ६१ ॥ गर्भे पुंसः शुक्रपाताद्यदुक्तं मरणावधि ॥ तदेतस्य महाव्याधर्मत्तो नान्योऽस्ति भेषजम् ॥ ७२ ॥ गर्भाच्याठायीं वीर्यसंभवा पासून ॥ पुरुषासी मरणावधि पूर्ण ॥ दुःख होतसे दारुण ॥ सांगितल्या न्यायें ॥ ६२ ॥ ऐशया अज्ञान महाव्याधी ॥ औषध एकच मी अविनाशी ॥ मज सद्गुरूवीण सोडवील जीवासी ॥ ऐसा दुजा उपाय नाहीं ॥ ६३ ॥ आधीं स्त्री पुरुषाचे संयोगी ॥ रक्तरेत मिळतां कमलभागीं ॥ त्या दिवसापासून लागवेगीं ॥ दुःखावरी दुःखें ॥ ६४ ॥ गर्भीचे दुःख जो सरलें ॥ तों जन्मदुःखें घाबरलें ॥ जन्मतां बाळपणी कष्टी केलें ॥ तेंही दुःख परतंत्रत्वें ॥ ६५ ॥ स्वतंत्र वाटे तरुणपण ॥ तेंही केलेसे पराधीन ॥ सदा जाळीतसे चिंताग्न ॥ तेथेही सुख कैचें ॥ ६६ ॥ पुढे वृद्धत्वाच्या आपदा ॥ दिवसे दिवस क्षीण सदा ॥ त्यावरी मरणदुःख तें कदा ॥ बोलिलें नव जाय ॥ ६७ ॥ तथापि कळावया मुमुक्षुसी ॥ गर्भादि मरणान्त दुःखराशी ॥ बोलिल्या असती संकेतेशीं ॥ अध्याय संपेतों ॥ ६८ ॥ ऐशया अनंता व्याधीशी कारण ॥ एक जीवासी पडिलें अज्ञान ॥ त्या अज्ञानाचे व्हावया निरसन ॥ एक ज्ञानचि पाहिजे ॥ ६९ ॥ रात्रीसी पाहिजे दीनोदय ॥ अंधारा पाहिजे दीपं निश्चय ॥ तेवींच अज्ञानाचा व्हाया क्षय ॥ ज्ञानचि पाहिजे ॥ ३७० ॥ दोरीच्या न कळण्याने सर्प झाला ॥ तो दीपें ओळखितांचि मेला ॥ तेवीं ब्रह्माज्ञानें भवे भासला ॥ तो नासे ब्रह्मज्ञानें ॥ ७१ ॥ तस्मात् अज्ञान रोगासी ज्ञान मात्रा ॥ मिळे जरी परम पवित्रा ॥ तरीच भव नाशूनि स्वतंत्रा ॥ जीवन्मुक्ति साधका ॥ ७२ ॥ अज्ञान न जाय ज्ञानावांचून ॥ तें ज्ञान नव्हे सद्गुरूवीण ॥ तो सद्गुरु मीच शिव सनातन ॥ तारक सच्छिष्या ॥ ७३ ॥ तयासी मज सद्गुरु परता ॥ दुजा कोण असे त्राता ॥ भवरोगासी औषध तत्त्वतां ॥ मीच एकु ॥ ७४ ॥ दुजें नाहीं गा नाहीं ॥ हे सत्य सत्य अन्यथा नाहीं ॥ मीच औषध सर्व जीवा पाहीं ॥ अज्ञान निरसना ॥ ७५ ॥ परी पथ्य झाले पाहिजे जीवा ॥ तरीच ज्ञानमात्रेचा चाले यांवा ॥ पथ्य म्हणजे वैराग्य सदैवा ॥ प्राप्त व्हावें ॥ ७६ ॥ मुख्य वैराग्याचे लक्षण ॥ द्वैत त्यागावें जें भेदभान ॥ नामरूप त्यागितां संपूर्ण ॥ मदैक्यज्ञान होय ॥ ७७ ॥ मायेपासून तृणावरी ॥ जे विषयजात नानापरी ॥ त्याचा त्याग जो केलाचि करी ॥ तोचि मुमुक्षु खरा ॥ ७८ ॥ ऐसें वैराग्य व्हावया व्याजें ॥ पदार्थी दोषदृष्टि पाहिजे ॥ आणि ते विषय कवणा लाहिजे ॥ भोक्ता असे कवण ॥ ७९ ॥ देहास्तव भोग इच्छावे ॥ तरी देहासी आदि अंत जाणावे ॥ गर्भादि मरणांत विचारावें ॥ दुःखरूप शरीर ॥ ३८० ॥ जयासी इच्छा मोक्षाची असे ॥ तेणें देहादि प्रपंच त्यागावा मानसें ॥ देहबुद्धि जावी गुरूपदेशे ॥ सच्छास्त्र श्रवणें ॥ ८१ ॥ आठवे अध्यायीं हेंचि बोलिलें ॥ देहदुःख अवघे विस्तारिलें ॥ हे शरीर कासयाचें असें रचिलें ॥ हें निरूपिजे नवमीं ॥ ८२ ॥ जेणें देहबुद्धि तत्क्षणी झडे ॥ अभिन्न ब्रह्मीं जीव हा पवाडे ॥ संशय अवघाचि विघडे ॥ अज्ञानासहित ॥ ३८३ ॥ इति श्रीपद्मपुराणे शिवगीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे पिण्डोत्पत्तिकथनंनाम अष्टमोध्यायः ॥ ८ ॥ इति श्रीमद्धेदेश्वरी ॥ शिवगीता पद्म पुरणांतरीं ॥ वैराग्ययोगाचेनि अनुकारी ॥ अष्टमोध्यायः ॥ ८ ॥ श्रीसद्गुरुचरणारविंदार्पणमस्तु ॥ श्रीशिवभवतु ॥ ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥ |