|
॥ श्रीवेदेश्वरी ॥
॥ अध्याय सातवा ॥
श्रीशिवराम गुरवे नमः ॥ सूत म्हणे शौनकहो पवित्र । शिवगीतारूपें हा महामंत्र । वेदान्त रहस्यचि स्वतंत्र । समुद्र अर्थाचा ॥ १ ॥ ॐकारबीज ज्ञप्तिशक्ति । अनुसंधान कीलक या प्रति । आराध्य दैवत तो मुख्य चिन्मूर्ति । श्रीशिव सद्गुरु येथें ॥ २ ॥ रामचंद्र ऋषि या मंत्राचा । सर्वछंद असती यासी साचा । स्वात्मप्रीत्यर्थ अर्थ येथींचा । अर्थवाद असे ॥ ३ ॥ मोक्षकाम जया मुमुक्षूसी । तेणें सोडून सर्व व्यापारासी । जपा प्रवर्तावें अहर्निशी । एकाप्रभावें ॥ ४ ॥ अस्ति भाति प्रियावरी । बुद्धीची स्थापना दृढ करी । हाचि आसनविधि निर्धारी । समानत्व सर्वांभूतीं ॥ ५ ॥ प्राणांत जरी ओढवला । तरी श्रवण मनन जप न जाय सोडिला । ऐसा दृढसंकल्प पाहिजे केला । आरंभी जपाच्या ॥ ६ ॥ नामरूपें सांडिजे फोस । हेचि या जपारंभीं न्यास । ध्यान तेंचि सदां निदिध्यास । ब्रह्माकार वृत्ति ॥ ७ ॥ शमदमादि हेचि नियम । अनिर्वचनीयता मौन परम । तीर्थवास हा सत्यसमागम । तरी मोक्षकाम पुरे त्वरा ॥ ८ ॥ ऐसा जप हा कोणी अधिकारी । निश्चयात्मक जो अनुदिनीं करी । तो अल्पचि काळें जीवन्मुक्ति वरी । येथें संशय नाहीं ॥ ९ ॥ असो सहावा अध्याय शिव सांगतां । तो ऐकून राम झाला सुखावता । याचि श्रवण मननें मुक्ति सायुज्यता । उत्तराधिकारिया होय ॥ १० ॥ जयासि एकदां उपदेश होय । तो ऐकून पावे स्वरूप अद्वय । भिन्नत्वाचा नुरेचि ज्या संशय । तो उत्तम अधिकारी ॥ ११ ॥ तयाची कार्यसिद्धी झाली । परी मंदप्रज्ञ भावार्थीं मानवें आथिलीं । तयाशीं निरूपणाची झोड लागली । पाहिजे अत्यंत ॥ १२ ॥ वारंवार श्रवण मनन । निरूपिलेंचि पाहिजे निरूपण । तेव्हां बाणत बाणत अपरोक्ष ज्ञान बाणेल दृढ ॥ १३ ॥ शिवें सांगितलें यथार्थ ज्ञान । आतांचि पावती अंतर्धान । तरी मग वाढेल कैसें निरूपण । विस्तारेशीं ॥ १४ ॥ तरी अतित्वरा प्रश्न करावा । जेणें संतोष वाटे सदाशिवा । अनन्य भावार्थिया ज्ञानदिवा । गुरुमुखें लागे ॥ १५ ॥ कल्पतरूची प्राप्ति बरवी । होतां इच्छेची वाण कां करावीं । तेवीं शिवसद्गुरु मीं नसतां गोसावी । वाण कासया प्रश्नांची ॥ १६ ॥ उत्पत्ति स्थिति लय जगाचा । आणि निश्चय कैसा कर्तृत्वाचा । सहावे अध्यायीं हा जाहला साचा । परी मागुती तेंचि पुसों ॥ १७ ॥ हें वास्तविक असे इंद्रजाळ । कीं गंधर्व नगरची सकळ । परी मुमुक्षूसी कळावें केवळ । कांहीं संशय नुरतां ॥ १८ ॥ ऐसा रामाचे अंतरी हेतु । तो गुप्तचि ठेवूनि समस्तु । मज कळलें नाहीं ऐसें पुसतु । अंतरीं सर्वज्ञ असोनि ॥ १९ ॥ वांकुडें बोट केलियावीण । तूप न निघे सान मुखांतून । तैसे अज्ञान घेतल्यावांचून । निरूपण प्रकटेना ॥ २० ॥ आता ऐका राम तो काय । शिवगुरूसी प्रश्न करिता होय । हा समजावा जीवाचा भाग्योदय । तेथें रामाचे काज नाहीं ॥ २१ ॥ श्रीराम उवाच - भगवन्यन्मया पृष्टं तत्तथैव स्थितं विभो । अत्रोत्तरं मया लब्धं त्वत्तो नैव महेश्वर ॥ १ ॥ हे भगवन् मी जें पुसिले । तें प्रभो त्वां सांगितले । त्यारीती सर्व मज बाणलें । परी उरला गूढाभिसंधि ॥ २२ ॥ तया अंतर्हेतूचा निर्द्धार । तुजपासून हे महेश्वर । लाधलों नाहीं तरे तें उत्तर । सविस्तर द्यावें ॥ २३ ॥ म्यां पुसिलें कीं तुजपासून । भूतभौतिक जग संपूर्ण । देवादि स्थावर जंगम मिळून । कोणें परी झालें ॥ २४ ॥ आणि स्थिति लय जगाचा सहसा । कारण असशी त्या तूंच कैसा । याचा विचार जैसा असे तैसा । यथार्थ तुवां सांगितला ॥ २५ ॥ यथार्थ तुझें रूप कैसें । ते तें माया न होऊन झाली असे । तया मायेचिये सरिसें । जग सर्व होतें झालें ॥ २६ ॥ आणि मायेंत जें प्रतिबिंबलें । तो ईश्वर तया कर्तृत्व आलें । आणि मीच असें जें जें नामरूप उद्भवलें । तेंही सांगितलें कृपाळुवें ॥ २७ ॥ तें वास्तविक जैसा बोलशी । तैसेंचि असे निश्चयेंशीं । हें दृढ प्रत्यया आलें चित्तासी । माझिया सत्य ॥ २८ ॥ परी गूढ हेतू माझे अंतरींचा । त्याचा संशय फिटला नाहीं साचा । तो हेतूचि प्रगट करूं वाचा । बोलूं नये परी ॥ २९ ॥ म्यां या जीवाच्या तरणोपाया । प्रश्न केलासे श्रीगुरुराया । त्वां यथार्थज्ञान बोलिलें जें तया । मर्कटा नारळ होय काय ॥ ३० ॥ तयाशी स्पष्ट मिथ्यत्वें कळावें । परी ते मंदप्रज्ञ असती आघवे । एका उपदेशे समाधान पावावें । ऐसे अधिकारी थोडे ॥ ३१ ॥ तस्मात् त्यासी स्पष्टत्वें कळावें । तरी बोलिलेंचि मागुतें बोलावें । तुजपासूनि जें झालें आघवें । तो तूं कवण सांगें ॥ ३२ ॥ तूं निर्विशेष कीं सविशेष । किं हा परिणामयुक्त देह विशेष । या तिहींतून सांगें विशेष । मी एक म्हणोनि ॥ ३३ ॥ म्यां जीवाची वकिली स्वीकारिली । तेव्हां म्यांचि जीवदशा असे धरिली । त्या मज आशंका जे वाटली । तें बोलतों निर्भीड ॥ ३४ ॥ तिहीं प्रकारें त्वां रूप आपुलें । पूर्वाध्यायीं स्पष्ट सांगितलें । एक निर्विशेष दुजें सविशेष बोलिलें । तिसतें लीलाविग्रह ॥ ३५ ॥ त्यांत सत्यत्वें मी निर्विशेष असें । येर उभयही मिथ्यात्वें दिसे । असो रूपत्रयही तुझें ऐसें । आलें प्रतीती ॥ ३६ ॥ परी या तिहीं देहांपासून । जग नव्हेल ऐसा असंभव पूर्ण । मज झाला तयाचें निरसन । नाहीं केलें तुवां ॥ ३७ ॥ तो अवधारी असंभव कैसा । बोलोन दाखवितों कांहींसा । तिहीं रूपापासून सहसा । जगौत्पत्ति होय कैशी ॥ ३८ ॥ निर्विशेष तरी निर्विकार । तेथें उत्पत्तिचा कैंचा विकार । विकार म्हणतां निर्विकार उत्तर । उरलें कैसें ॥ ३९ ॥ सच्चिदानंद ब्रह्मींचें । असज्जड दुःखरूप जगाचें । एक लक्षण असतां कारणाचें ।कार्याचें भिन्न कैसें ॥ ४० ॥ तथापि भिन्न जरी झालें म्हणावें । तरी गव्हांपासून उडीद कैसा संभवे । विपरीतत्व मायेनें केलें म्हणतां व्हावें । विरोधरूप उत्तर ॥ ४१ ॥ अग्नीशी ओडंबा लागला । कीं कीड लागली मणिस्थंभाला । तेवीं निर्विशेषीं या जगाला । उत्पत्ति होय ॥ ४२ ॥ जरी अग्नीपासून कीटक होती । तया अग्नीमाजी आजन्म राहती । तरी स्वरूपीं या जगाची उत्पत्ति । आणि स्थितीही तैशी ॥ ४३ ॥ सूर्यकिरणावी मुंगिया चालती । कीं अग्निपाठारीं बीजें वाफती । जरी तरी जगाची स्थिति उत्पत्ति । परब्रह्मीं होय ॥ ४४ ॥ एवं निर्विशेषीं ऐसा असंभव । जग नव्हेचि हा जिवाचा भाव । आतां सविशेष व्यापक जें स्वयमेव । तेथेंही नव्हेसें वाटे ॥ ४५ ॥ स्फुरण चंचळ जाणता पुरुष । तया ईश्वराशी नाम सविशेष । तेथें जडत्वें हे जग अशेष । होय कैसेनि ॥ ४६ ॥ अव्यक्तीं व्यक्ति हे प्रगटेना । जेवीं मृगजळें धान्यादि पिकेना । तथापि होय हे करावी कल्पना । तरी द्रव्य कोठूनि आलें ॥ ४७ ॥ स्फुरणीं कोणती सामग्री असें । कीं अल्पचि विस्तीर्ण होय अपैसे । तस्मात् सविशेषा पासूनही असंभव दिसे । या संपूर्ण जगाचा ॥ ४८ ॥ आतां तिसरा तूं देहधारी । वससी कैलास कोणा माझारीं । यापासून तों उत्पत्ति जगाची सारी सुतराम नव्हेचि ॥ ४९ ॥ परिछिन्न परीमाणे देहे भगवतस्तव । उत्पत्तिः पंचभूतानां स्थितिर्वा विलयः कथम् ॥ २ ॥ परिछिन्न साडेतीन हात प्रमाण । हे भगवन् देह तुझा सान । येथें एवढालीं भूतादि उत्पन्न होऊन । स्थिति लयही होय कैसा ॥ ५० ॥ अणुपासून पर्वत निपजे । कीं मुंगीपासून प्रगटिजे गजें । तेवीं परिछिन्न प्रमाण देह तुझे । तेथें ब्रह्माण्ड कैसें होय ॥ ५१ ॥ तथापि तुझ्या देहापासून जरी झालें । तरी ब्रह्मा विष्णु कां न करिती वहिले । आणि इंद्रादि देवीं कां नाहीं केलें । सामर्थ्य ऐसें जग ॥ ५२ ॥ तूं देव मोठा तुवां मोठें केलें । हे जीव मानवादि असती धाकुले । तरी याज पासूनहही पाहिजे झालें । लहान लहान ब्रह्माण्ड ॥ ५३ ॥ दैत्यही थोर पराक्रमी असती । तेही कां एकेक ब्रह्माण्ड न करिती । तस्मात् ऐशी होतसे अतिव्याप्ति । तरी देहापासून असंभव ॥ ५४ ॥ आणि हे संपूर्ण देवादिक । आपुलाले सामर्थ्यें राहिले पृथक । ते तूंच कैसा म्हणसि सकळिक । हेंही अघटित वाटे ॥ ५५ ॥ स्वस्वाधिकारसंबद्धा कथं नाम स्थिताः सुराः । ते सर्वे त्वं कथं देव भुवनानि चतुर्दश ॥ ३ ॥ हे सर्व देव वेगळाले । स्वस्व अधिकारसंबंधें रहिले । ते सुर तूंच कैसा कळलें । पाहिजे मज ॥ ५६ ॥ स्वतंत्र सर्व देव भिन्न भिन्न । व्यापारही सर्वांचे अनान । एक विशेष एक असती सान । तरी ते तूंच कैसा ॥ ५७ ॥ आणि हें ब्रह्माण्ड चतुर्दश भुवन । देव दैत्यादिकांचें स्थान । हेंही तूं कैसा असशी आपण । जगरूपत्वें ॥ ५८ ॥ तूं म्हणशी स्थावर जंगमाची । उत्पत्ति होणें गति लयाची । सांगितली स्थिति ही देवांची । आतां कां पुसशी तरी ऐकें ॥ ५९ ॥ तत्तः श्रुत्वापि देवात्र संशयो मे महानभूत् । अप्रत्यायितचित्तस्य संशयं छेत्तुर्महसि ॥ ४ ॥ तुजपासून ऐकिलें जरी । देवा संदेह वाढला मज अंतरीं । हा संशय छेदावया तूं पुरारि । योग्य असशी ॥ ६० ॥ संशयात्मक जे जीव । याचा गुरु तूं सदाशिव । तुजविण संशयाचा अभाव । कवण परी ॥ ६१ ॥ एका पासुनचि सर्व झालें । ऐसें अनेकधा महत्त्व वेद बोले । आणि तूं स्वमुखें आपुलें । सांगत अससी ॥ ६२ ॥ परी अज्ञान जीव मूढमति । एकाचे एकचि भाविती । नानाप्रकारींचे कुतर्क करिती । आणि पडती संशयीं ॥ ६३ ॥ जीवाचा आशय कीं दृष्टीं पहावें । तेंचि एक साच मानावें । शास्त्ररीतीं जें ऐकावें । तें खरें कैसें अनुमानें ॥ ६४ ॥ तूं जें स्वमुखें बोलशी । उगीच थोरी वदविसी । ऐसा स्वभावचि असे सर्वांसी । कीं उगेंचि बोलावें ॥ ६५ ॥ परी ऐकणारें तेंचि ऐकावें । संभवेल किंवा हे न संभवे । उगेंचि मुंगी म्हणतां गजातें प्रसवें । सत्य मानावें हें कैसें ॥ ६६ ॥ जेते आपणासी थोर म्हणती । आपुलाचि पराक्रम श्रेष्ठत्वें दाविती । ऐशीच असे सर्वत्रांची गति । तरी तूंही प्रौढी सांगशी ॥ ६७ ॥ कैचें असे निर्विशेष रूपक । आणि कैचा असशी तूं व्यापक । हा तूं देहधारी अससी देख । तरी हें होय कैसें तुझेनि ॥ ६८ ॥ हे देव सारे वेगळाले । अधिकार रक्षिती आपुलाले । हे इतकेही मीच म्हणशी उगलें । कासया वरूनी ॥ ६९ ॥ बरें आतां त्वां जरी सृष्टि केली । तरी आम्हा करून दावीं वहिली । दाविल्याविण न जाय निवाली । आमुची चित्तवृत्ति ॥ ७० ॥ ऐसे हे प्रवृत्तीचे लोक । आणि शास्त्रज्ञ पण्डित सकळिक । देखिल्यावीण निश्चयात्मक । सत्य कदां न मानिती ॥ ७१ ॥ तस्मात् तुझिया देहापासूनी । दाखवावी कैशी स्थिती उभवणी । हा गूढाभिसंधि होतां अंतःकरणीं । नो बोलोनि दाविला ॥ ७२ ॥ पहा लोकांची काय रीती । सद्गुरूचेंही सामर्थ्य पाहती । सामर्थ्यचि नसे जयाप्रति । तो जीवा ब्रह्म करी कैसा ॥ ७३ ॥ ऐसा लोकांचा असे आशय । तो कदांही न फिटे संशय । तयाचा संदेह निवारण होय । ऐसें करी तूं जगद्गुरु ॥ ७४ ॥ तुजवीण कोण असे दुसता । कीं हा संशय निरसील सारा । तरी तूंचि निवारावया कर्पूरगौरा । अति योग्य होशी ॥ ७५ ॥ माझा विश्वास तुझिये चरणीं । तरी सांगावें कृपा करूनी । मजवरी कृपा करितां येक्षणी । जीवही विश्वसतील ॥ ७६ ॥ जीव जरी ऐसें विपरीत भाविती । परी उपेक्षूं नको तूं कृपामूर्ति । हे माझी विनवणी पदाप्रति । तरी जीवाशी उद्धरीं ॥ ७७ ॥ सहस्र अन्यायी परी तुझे अंश । तरी तोडीं तोडीं यांचा भवपाश । ऐसें बोलोनियां सावकाश । स्दृढ चरण धरिले ॥ ७८ ॥ ऐशी रामाची ऐकतां प्रार्थना । हंसून बोले कैलासराणा । उठीं उठीं गा तुझिया मना । आवडे तेंचि करूं ॥ ७९ ॥ यथार्थ सर्व असतां सांगितलें । तुजलागीं असंभूत वाटलें । तरी मागुतीं पाहिजे ऐकिलें । हा असंभाव नव्हे ॥ ८० ॥ सविशेष निर्विशेष रूपें दोन । तिसरें हें असें व्यक्ति धरून । तुज वाटे जग नव्हे तिहींपासून । तरी पुसेन ते सांगें ॥ ८१ ॥ श्रीभगवान् उवाच - वटबीजेऽतिसूक्ष्मेऽपि महावटतरुर्यथा । सर्वदास्तेऽन्यथा वृक्षः कुत आयाति तद्वद ॥ ५ ॥ वटबीज तें अल्पप्राय । आणि महावृक्ष शाखा विटपमय । नसतां येतसे अभिप्राय । कोठोनियां सांगें ॥ ८२ ॥ रामा तूं म्हणशी संशय जीवासी । बळेंचि कल्पिती असंभवासी । तरी पुसावें कीं तयासी । प्रतिबंदी उत्तरें ॥ ८३ ॥ बीजामाजी कांहीं नसतां । वृक्ष निघतसे समान पर्वता । हा कोठोनि सांगावा तत्त्वतां । प्रत्यक्ष आला ॥ ८४ ॥ कांहींच नसतां पाणियांत । गारा मीठ केंवी उत्पन्न होत । आणि आकाशीं नसतां अभ्र येत । कवणेपरी सांगा ॥ ८५ ॥ सूर्यकिरणीं नसतां जळ । उठती मृगतृष्णेचे कल्होळ । हे कोठून निघती सकळ । हें पुसें जीवासी ॥ ८६ ॥ हे असो जीवांची कथा । रामा तूंच सांगें सर्वथा । हें जग नव्हेल मज समर्था । पासून केंवीं ॥ ८७ ॥ मी निर्विशेष परिपूर्ण । सच्चिदानंद अनंतघन । त्या मज सहस्रकिरणा पासून । मृगजळ जग कां नव्हे ॥ ८८ ॥ तोचि मी मायावशें सविशेष । संपूर्ण या जगाचा ईश । अव्यक्त मेघजळापासून विशेष । व्यक्त जग गारा कां न होती ॥ ८९ ॥ तिसरें हें माझें शरीर । वटबीजापरी अल्पमात्र । तेथून वृक्षरूप हें जग समग्र । गरुडापरि कां नव्हे ॥ ९० ॥ एवं तिहीं रूपीं नाहीं असंभव । संभव तेचि असे सदैव । तरी आग्रहें कां करिशी अभाव । आणि अविश्वास वचनीं ॥ ९१ ॥ तद्वन्मम तनौ राम भूतनामागतिर्लयः । वटबीजादिकांचे परी । माझे तनुपासून निर्धारी । भूतांचा लय उत्पत्ति सारी । होत असे पाहें ॥ ९३ ॥ येथे न मानी अविश्वास । श्रुति आणि माझें वचनास । या तिहीं रूपेंहीं मी सर्वांस । असे कारण ॥ ९४ ॥ आतां एकेका रूपीं कैसें झालें । तें तुज सांगिजेल वेगळाले । प्रथम निर्विशेषरूपीं असंभविलें । त्वां जग नव्हे म्हणोनि ॥ ९५ ॥ कारण कीं सच्चिदानंद निर्विशेष । तेथें असज्जडात्मक कैसें सविशेष । संभवेल हा तुझा हेतु अशेष । तरी अवधारीं सांगूं ॥ ९६ ॥ रज्जूवरी सर्प भासला । कीं शुक्तिवरी ठाव रजताला । किंवा स्थाणूचा पुरुष भासला । तरी येथें असंभव कोण ॥ ९७ ॥ ऐसें असतां तूं अन्य कल्पूनीं । असंभवचि मानिसी मनीं । तरी सांग मी पुसेन तुजलागुनी । करून विकल्प ॥ ९८ ॥ कारणापासून जीं कार्यें होतीं । तयांचीं त्रिविधा प्रकारें असे रीति । घटकार्यासी आरंभ म्हणती । बहुकारणें म्हणोनि ॥ ९९ ॥ दुधाचें दहीं जेवीं होतां । तया परिणाम म्हणती तत्वतां । रज्जु सर्पादि कार्य तें विवर्तात्मकता । ओळखिजे तिन्ही ऐशीं ॥ १०० ॥ तस्मात् जगकार्य जें स्वरूपीं झालें । हें तुवां कैसें असे भाविलें । आरंभात्मक कीं परिणामात्मक बोलें । किंवा विवर्तात्मक ॥ १ ॥ आरंभात्मक ब्रह्मींचें कार्य जग । जरी म्हणशी तूं हें अंग । तरी बहुत कारणें कोठें सांग । असती निमित्तादि ॥ २ ॥ घटकार्य मातीचें खरें । त्यासी बहुकारणें असतीं साचारें । मृद्गोल चक्र दण्ड कुलाल तिसरें । निमित्त असे ॥ ३ ॥ ऐसी आणिक बहु कारणें नसतां जगासी । कल्पिशी तूं न्यायादिका ऐशीं । कीं माया उपादान ईश्वर निमित्ताशी । असे कारण ॥ ४ ॥ काल कर्म आणि स्वभाव । हींही कारणें समवायी भाव । तरी या तिहींशीं झाला ठाव । जगदंतःपाति ॥ ५ ॥ माया कारण उपादान । जगाचा लय मायेंत म्हणून । परी मायेशीही उत्पत्ति अधिष्ठान । ब्रह्मचिं कीं असे ॥ ६ ॥ उत्पत्ति मायेस जेव्हां झाली । तेव्हां माया जगांत आली । मायाच कार्य तेव्हां भाविली । कारण कैशी ॥ ७ ॥ तैसाचि ईश्वर माया प्रतिबिंबित । आला असे जग कार्यांत । तरी जगाशी असतां ही निमित्त । मुख्यत्वें कारण नव्हे ॥ ८ ॥ मायेपासूनि ऐलिकडे । पदार्थ तितुका काळांत सांपडे । तरी काळासी कारणत्व जोडे । मायेवीण ब्रह्मीं केवीं ॥ ९ ॥ कर्में जगाशी उत्पत्ति । तरी मायेअभावी कर्मा कोठें वस्ती । मायेपासून कर्माची गति । तरी कर्मही कारण नव्हे ॥ ११० ॥ **** जेधवां उत्पत्ति मायेची । तेधवांचि उभवणी या सर्वांची । हेंचि कार्यरूप तरी कारणाची । आरोपणा या व्यर्थ ॥ ११ ॥ तथापि म्हणावें यासी कारण । तरी मायेपासून पर्यंत तृण । कारणत्व ये सर्वांलागून मग कार्य तें कोणतें ॥ १२ ॥ गुणभूतें ही कारणें भौतिका । आईबाप कारणें लेंकी लेंकां । तृणादि वृक्ष पाषाण लतिका । फलपुष्पादिकां कारण ॥ १३ ॥ बीज कारण फळासी । आणि फळ कारण बीजासी । एवं कारणत्व जरी उभयांशी । तरी कार्यचि नव्हे ॥ १४ ॥ क्लार्यचि नसतां कोण कारण । ऐसी अनवस्था होय संपूर्ण । तस्मात् मायादिक हें जगकारण । ईश्वरासहित म्हणूं नये ॥ १५ ॥ स्वभाव एक मणती ब्रह्मींचा । कीं स्वरूपीं उद्भव व्हावाचि जगाचा । हा स्वभाव अनादि असे साचा । तरी खरें कारणत्व स्वभावा ॥ १६ ॥ तरी ऐकावें स्वस्थचित्ता । स्वरूपीं स्वभावचि जरी असता । तरी कासयासी अपेक्षिता । काल कर्म मायेसी ॥ १७ ॥ सर्वदां उत्पत्ति स्थितीच असावी । मग लयाची गोष्टीही न बोलावी । लय होतां स्वभावा उरावी । कारणता कशी ॥ १८ ॥ तथापि मानिला रूपीं स्वभाव । तरी सुवर्णा उगवावें नगाचे अवयव । मग सुवर्णाकाराचें गौरव । कासया पाहिजे ॥ १९ ॥ काय मृत्तिकेपासून स्वयंभ । घट गाडग्याचे निघती कोंभ । परे ते कुलाल मतीचे गर्भ । उमटले कीं ॥ १२० ॥ तस्मात् मायेचा हा स्वभाव । तेव्हां मुख्यत्वें कारणाचा अभाव । एकदेशी मायेचा उद्भव । ब्रह्मीं सर्वत्र तरी कोठें ॥ २१ ॥ स्निग्ध भूमीचेचि घट होती । तेवीं एकदेशी मायेची अभिव्यक्ति । काल कर्म स्वभावादि उमटती । तिजपासूनि ॥ २२ ॥ एकदेशीं आणि सर्वदां नाहीं । तस्मात् आरंभात्मक जगकार्य नव्हे कहीं । मायादि तृणांत हें सर्वही । स्वरूपीं विवर्त ॥ २३ ॥ आतां रामा तूं असिएं म्हणशी । कीं परिणामात्मकता असेल जगासी । तरी अवधारावी लक्षणें कैशीं । परिणामाचीं ॥ २४ ॥ कार्य सत्यत्वें असावें । तयाशी परीणाम म्हणावें । अथवा कारण ऐसें कार्य व्हावें । तरी म्हणावा परिणाम ॥ २५ ॥ नासून जावें सर्व कारण । कार्य व्हावें पूर्वरूप पालटून । दुधाचें दहीं जैसें होणें । परिणाम या नांव ॥ २६ ॥ दुधासम दहीं पांढरें असे । सत्यत्वेंही विकार झाला असे । आणि दहीं होतां दूधपण नासें । तरी तो परिणाम खरा ॥ ३७ ॥ हें जें जगकार्य जाहलें । तेंसत्यत्वें नवचे भाविलें । सत्य भावितां वेदशास्त्र बोलिलें । कीं हें मिथ्या ऐसें ॥ २८ ॥ आणि गुरुमुखें स्वानुभवी यासी । मिथ्यत्व आलें जें अनुभवासी । तया बाध आला कीं सर्वांशी सत्यत्वें भावितां ॥ २९ ॥ गुरु शास्त्र आणि श्रवण मनन । सर्व मिथ्या झाले साधन । आणि जीवासी नव्हेचि अभेद ज्ञान । येणें वेदान्त हानी ॥ १३० ॥ सत्य भावितां इतुकीं दूषणें । तरी तें सत्यत्व न भाविजे कवणें । सत्यत्वचि नसतां परिणामरूप होणें । जग कार्य हें कैसें ॥ ३१ ॥ अस्ति भाति प्रियात्मक ब्रह्म । असज्जड दुःखात्मक जगरूप नाम । तरी कारण कार्य केवीं होय सम । तस्मात् परिणाम नव्हे ॥ ३२ ॥ स्वरूप परिपूर्ण अनंत । जगचि मध्यें होऊन नासत । अनंतत्व नासून जग जरी उत्पन्न होत । तरी बोलूं येता परिणाम ॥ ३३ ॥ दह्याचें मागुतें नव्हे दुग्ध । जग जाऊन उरे ब्रह्म शुद्ध । तरी मग परिणामात्मक होईल सिद्ध । कैसें तें सांगें रामा ॥ ३४ ॥ अपरोक्षज्ञान झालियावरी । निजांगें ब्रह्म होतसे अधिकारी । तस्मात् हे कल्पनाच कधीं न करीं । परिणामात्मकाची ॥ ३५ ॥ आतां उरला पक्ष तिसरा । ब्रह्मीं विवर्तात्मक जगाचा उभारा । तरी दोष नसे करितां अंगिकारा । विवर्तात्मकाचा ॥ ३६ ॥ शुक्तीवरी दिसे रजत । की रज्जूवरी सर्प उमटत । अथवा स्थाणूचा पुरुष भासत । यां नांवे विवर्त ॥ ३७ ॥ हें जैसें न होऊन झालें । अज्ञानीं उगेंचि कल्पून केलें । त्याच रीती जग हें कल्पिलें अज्ञानें ब्रह्मीं ॥ ३८ ॥ ऐसें विवर्तात्मक जग सर्व । स्वीकारितां कैंचा असंभव । मागुती ऐकें विवर्ताचा स्वभाव । खालून सांगिजे ॥ ३९ ॥ ब्रह्म एक निर्विकार । जेथें मायादिकांचा नसे विकार । तेथें आरोपिलें जगदाकार । रज्जू सर्पापरी ॥ १४० ॥ तेवीं जगही झालें नसतां । अज्ञानें जीव झाला कल्पिआ । तेणें बंधन पावला अवचिता । जन्ममृत्युरूपें ॥ ४२ ॥ दोरीचें दिसणें वांकुडें । तेवीं जगाचें अस्ति भाति प्रिय रूपडें । तेथें स्र्पनाम ठेविलें त्या भ्याडें । तेवीं जगनाम ठेवी जीव ॥ ४३ ॥ सर्पभाव झालियावरी । तया कल्पावी कीं भ्रांति पडली खरी । तेवीं जग कल्पना होतां नानापरी । यासी अज्ञान कारण कल्पावें ॥ ४४ ॥ अगा अज्ञान तेंचि स्वरूपीं माया । माया म्हणजे शब्दचि वांया । अहं ब्रह्म प्रतीति असतां तया । अज्ञानाइसें कल्पिलें ॥ ४५ ॥ मी ब्रह्म स्फुरण जेव्हां झालें । तेव्हां तितुक्या स्फुरणा जाणूं लागलें । तें जाणणेंचि परी अज्ञानत्व पावलें । न कळे की केवढें ब्रह्म ॥ ४३ ॥ जेवीं दोरीचें न कळणें । सर्पाकारत्व आलें तेणें । तेवीं स्फुरणा विरहित स्वरूप तें नेणें । तेव्हां द्वैत कल्पना करी ॥ ४७ ॥ दोरीच्या दिसण्या म्हणावें अज्ञान । तेवीं स्वरूपाच्या आठवा माया अभिधान । दिसणेंचि जैसें न दिसणें । ज्ञानचि अज्ञान तेवीं ॥ ४८ ॥ सर्प जेधवां भासला । तेथें कोण म्हणावा आधीं झाला । अज्ञान कीं भ्याड कीं सर्प पाहिला । निवडितां नये ॥ ४९ ॥ तेवीं जग जेधवां झालें । यांत कोण म्हणावें आधीं जन्मलें । माया कीं कल्पिता जीव कीं जग पाहिलें । नेमितांच न ये ॥ १५० ॥ भ्याड नव्हे अज्ञान सर्पावीण । आणि जीव न प्रगटे माया जगावंचून । सर्प नव्हे नसतां भ्याड अज्ञान । मायाजीवाभावी जग नव्हे ॥ ५१ ॥ सर्प भ्याड नसतां दोनी । अज्ञान कल्पना करील कोणी । तेवी जीव जगाची नसतां उभवणी । माया कोणें कल्पावी ॥ ५२ ॥ येथें कोणी होईल कल्पिता । कीं भ्याडपणा जरी उत्पन्न नसता । परी पुरुषाच्या ठायीं पूर्वाध्यास होता । तो कल्पितां भीति होय ॥ ५३ ॥ ऐसा पूर्वाध्यास येथें कोठें । तरी ये विषयीं बोलिजेल गोमटें । अहं ब्रह्म स्फूर्ति जे उठे । तो अहंपणा पूर्वाध्यासा ॥ ५४ ॥ पुरुष जैसा पूर्वींच असे । स्फुरण अनादि कोठें तैसें । ऐसें बोलती तरी साधलासे । पक्ष आमुचाची ॥ ५५ ॥ जैसा पुरुष पहिलाचि आहे । तैसा संकल्पकर्ता झालाचि नव्हे । जितका रज्जुसर्पाचा खरेपणा लाहे । तितुकांही नाहीं जगद्भ्रमा ॥ ५६ ॥ ऐसें विवर्तात्मक न होऊन । म्हणतां असंभव कोण । वेदान्तपक्षीं अज्ञानेंकडून । झालें ऐसें स्वीकारिती ॥ ५७ ॥ सत्यत्वें जरी झालें असते । तरी मात्र असंभूत म्हणावें लागतें । तैसें तो परिणामात्मक जग जें तें । झालेंचि नाहीं ॥ ५८ ॥ रज्जूवरी जैसा भुजंग । कीं आकाशीं उमटले मेघ । नातरी पाणियावरी तरंग । होतां असंभव नाहीं ॥ ५९ ॥ शुक्तीवरी जैसें रजत । कीं स्थाणूचा पुरुष भासत । कीं सूर्यकिरणीं मृगजळ दिसत । तरी असंभाव कोणता ॥ १६० ॥ तेवींच रामा अज्ञानास्तव । जग हें झालें विवर्तात्मक सर्व । त्री येथें न कल्पावा असंभव । निर्विशेष ब्रह्मीं ॥ ६१ ॥ आतां सविशेष शबलब्रह्म । तयासीच ईश्वर हें नाम । तेथूनही जगाचा होता उद्गम । विरोध नाहीं ॥ ६२ ॥ येथें तरी चंचळ जाणिवात्मक । इच्छा असें कीं व्हावें अनेक । तेचि इच्छा देवी सामग्री सकळिक । व्हावया असे ॥ ६३ ॥ इच्छेसरिशा शक्ती तीन । होत्या झाल्या आधीं निर्माण । त्याचि त्रिपुटींरूप विभागून । जगकार्य चाले ॥ ६४ ॥ भोग्य भोक्ता भोगण । कर्ता कार्य कारण । हेचि त्रिगुणात्मक होऊन । शक्तियोगें कार्य चाले ॥ ६५ ॥ कर्ता भोक्ता हे ज्ञानशक्ति । कार्यभोग दे द्रव्यशक्ति । भोगण करण हे क्रियाशक्ति । साधनविषय ग्रहणा ॥ ६६ ॥ ज्ञानशक्ति तेंच अंतःकरण । क्रियाशक्ति ते इंद्रियप्राण । द्रव्यशक्ति विषय संपूर्ण । हें त्रिविधापरी जग ॥ ६७ ॥ एवं त्रिविधरूप जग ईश्वरें । इच्छून निर्मिलें असें सारें । जेवी जीवें स्वप्नीं उभविली आकारें । स्वप्न सृष्टि ॥ ६८ ॥ द्रव्य नसतां कोठून आले । म्हणशी तरी कल्पून निर्लिलें । जैसें स्वप्नीं कांहीं नसतां दिसलें । तैसें दृश्य कल्पिलें ईश्वरें ॥ ६९ ॥ अव्यक्तापासून कैसे व्यक्त । जाहलें ऐसे जरी मनोगअ । जैसें मेघजळापासूनि गारा मीठ होतअ । तैसेंचि जग झालें ॥ १७० ॥ मागुती लय झालिया होय अव्यक्त । पुन्हां उत्पत्तिकाळीं दिसे व्यक्त । तेंचि केवीं ऐकें बोलिजेत । एकाग्रभावे ॥ ७१ ॥ महा संधवपिण्डोऽपि जले क्षिप्तो विलीयते ॥ ६ ॥ न दृश्यते पुनः पाकात्कुत आयाति पूर्ववत् । मिठाचा भेला महाथोर । जळीं टाकितां जीवन उरे क्षार । तेथें कांहीं न दिसतां पुन्हा आकार । आळतां पूर्ववत होय ॥ ७२ ॥ ताइसें व्यक्तरूप सारें हें जग । लयकाळीं अव्यक्त होय मग । उत्पन्न होतां लागवेग । पुन्हा व्यक्त ॥ ७३ ॥ आणिक तुझा भव ऐसा । कीं देवभूतादि तूंच कैसा । तयाचें उत्तर ऐकें मानसा । स्वस्थ करूनी ॥ ७४ ॥ मी ईश्वर जाणतां अनुक्रमीं । सर्वांत प्रवेशलों अंतर्यामीं । मिठाची गोडी मिठीं तेवीं मी । सर्वीं व्यापून असें ॥ ७५ ॥ मीठ ही बांधा पाणियाचा । तेवीं आकार मी या जगाचा । आणि रसरूपें प्रवेश आपाचा । तेवीं जाणता मी प्रवेशें ॥ ७५ ॥ मीठ हा बांधा पाणियाचा । तेवीं आकार मी या जगाचा । आणि रसरूपें प्रवेश आपाचा । तेवीं जाणता मी प्रवेशें ॥ ७६ ॥ देव दैत्य मानवादि । मीच असें ईश्वरु अनादि । भिन्न व्यापार भिन्न उपाधि । परी मी एकलाचि ॥ ७७ ॥ मींच हीं पंचभूतें अंगें । जरी असती भिन्नभिन्न विभागें । जेवीं मीठ गोडी भिन्न केवीं सांगें । तेवीं जग आणि ईश्वर ॥ ७८ ॥ तस्मात् ब्रह्मादि तिन्ही देव । आंओ अष्टदोल्पाल भूत भौतिक मानव । अंतर्बाह्य मीच असें सर्व । येथें असंभव मानूं नको ॥ ७९ ॥ तुज हें सर्व असे ठाउकें । परी दाटून नेणीव घेशी कौतुकें । की अज्ञान जीवांसी कळावें निकें । मीच सारा म्हणूनी ॥ १८० ॥ याचि हेतु तूं पुसशी । ऐसें पूर्ण ठाउकें मजशीं । उगाचि असंभव जो बोलशी । तो अर्थ संभवावया ॥ ८१ ॥ तरी अवधारीं क्रिया जगाची । प्रतिदिनीं होत जागृतीची । ते सूर्यापरी मजस्तवचि । होत असे ॥ ८२ ॥ प्रातः प्रातर्यथाऽलोको जायते सूर्यमण्डलात् ॥ ७ ॥ सूर्य प्रभा ते प्रगटतां । जगकर्में चालती तत्त्वतां । अथवा प्रातःकालादि उद्भवती अवस्था । सूर्यापासूनि ॥ ८३ ॥ तेवीं माझिया इच्छावशें । जग होऊन स्थिती होतसे । तरी सांगें गा असंभव कैसे । तस्मात् बोलिलें तें सत्य ॥ ८४ ॥ एवं सविशेष निर्विशेष । या उभयरूपीं हें जग विशेष । होत असे बापा अशेष । असंभवावीण ॥ ८५ ॥ हाचि अर्थ कैमुतिक न्यायें । संभवूं बहु बोलून काय । जेणें असंभव हा सर्व जाय । तरी अवधान असावें ॥ ८६ ॥ हा जो मी देहधारी । पंचवदन त्रिपुरारि । तो मी कल्पून उभवीं सारीं । आणि ग्रासीं शेवटीं ॥ ८७ ॥ ऐसा देह एकदेशी सान । जग होतसे तयापासून । तरी मग कां न होईल जग निर्माण । सविशेष निर्विशेषरूपीं ॥ ८८ ॥ त्वां मागां होतें कल्पिलें । तुझ्या देहापासून जग झालें । तरी सर्वत्र व्हावें वेगळालें । अन्य देहापासूनी ॥ ८९ ॥ तस्मात् अवधारीं निश्चयेशीं । सर्वही निर्मिती शक्ति जैशी । ब्रह्मदेवें कल्पितां मानसीं । ब्रह्मसृष्टि झाली ॥ १९० ॥ विष्णु मनाऐसें अवतार घेत । दुष्ट निर्दळून सज्जन रक्षित । कोरडे काष्टीं पहा कैसा प्रगटत । आणि सुनंदादि उद्भवती ॥ ९१ ॥ मीच पहा कैलासवासी । उत्पन्न करीं भूतगणासी । नानारूपें धरून सर्व सुरांसी । मोहित असें मायेनें ॥ ९२ ॥ आणि अष्टदिक्पालादि सकळ । करिती दाविती सामर्थ्यबळ । आणि सर्वही ऋषिमंडळ । शापानुग्रह समर्थ ॥ ९३ ॥ दैत्यही एकाचे बहुत होती । नानाप्रकारें माया दाविती । पाहे म्यांच कार्कंडेयाप्रती । चौदा कल्प दाविले ॥ ९४ ॥ आणिक कश्यप दक्षादि प्रजापति । ना प्रकारें प्रजा निर्मिती । पाहे तुझिया बाणापासून निघती । अग्न्यादि कैसे ॥ ९५ ॥ मंत्रविद्येचें सामर्थ्य म्हणशी । तैसेंचि मायिक सामर्थ्य मजपाशी । अरे हें गारुड दाविती एकमेकांसी । मानवीही जन ॥ ९६ ॥ एक योगसामर्थ्य दावित । एक उपासनाबळें सामर्थ्यवंत । एक उगेंचि कवटाल करीत । मंत्र मणि औषधीनें ॥ ९७ ॥ ऐसें सर्वांपाशीं सामर्थ्य असे । तरी मज ईश्वरापाशीं कां नसे । पाहें विश्वामित्र उद्भवीतसे । दुसरी सृष्टि ॥ ९८ ॥ मनुष्याची बाजेगिरी । राक्षसांची ओडंबरी । भगवम्ताची नानापरी । सृष्टिवविद्या तैशी ॥ ९९ ॥ येथेंही भावितील कोणी । कीं सामर्थ्य असे सर्वांलागूनी । तरी तूच एक काय म्हणोनी । असशी थोर ॥ २०० ॥ तरी रामा असें सावधान । अल्पसें करूं निरूपण । मज निर्विशेषाचें अभिन्नज्ञान । अकृत्रिम असे ॥ १ ॥ कवणेही अवस्थेआंत । मज देहबुद्धि नाळत । पद्मपत्र जेवीं जळा आंत । तेवीं वर्तणूक माझी ॥ २ ॥ सविशेषामाजी पाहतां । मायादि तृणांत मीच तत्त्वतां । माझिये वृत्तिसी असे दृढता । कीं जग सर्व माझें अंग ॥ ३ ॥ मज द्वैतचि नाही स्पर्शलें । हा मी तो तूं नाहीं उद्भवलें । ऐसें समष्टितादात्म्य अनादि पहिलें । अकृत्रिम असे ॥ ४ ॥ मी दशभुज पंचवदन । हा इतुकाच मी येर रर्व हें आन । ऐशी प्रतीती होती जरी मजलागून । तरी जीवत्व काय मी न पावतों ॥ ५ ॥ म्हणूनियां ज्ञान अकुंठित । मजपाशी असें सदोदित । यास्तव मी थोर देव विख्यात । आणि नियंता ईश्वर ॥ ६ ॥ ऐसें ज्ञान असे जयापाशीं । देव दानव कीं मानव ऋषि । तो मीच कोण म्हणे तयासी । जीव ऐसें या लोकीं ॥ ७ ॥ अरे जो ब्रह्म अंगें झाला । तेथें थोरसानपणा कोठें उरला । नातळे जीवा कीं शिवाला । तो वंद्य ब्रह्मादिकांसी ॥ ८ ॥ ऐसेंच ज्ञान व्हावया जीवांसी । तूं पडिलासि कीं अति सायाशीं । मीही प्रगटलों याचि कार्यासी । हें काय न ठावें तुज ॥ ९ ॥ परी जीवाची फिटावी कल्पना । यास्तव घेशी कुतर्क नाना । वाउगी कल्पून असंभावना । कळून अर्थ संभविशी ॥ २१० ॥ असो रामा तुवां बळेंचि पुशिलें । जाणत असतां नेणिवेशीं घेतलें । तें म्यांही जाणून उत्तर दिधलें । गूढार्थ प्रगट केला ॥ ११ ॥ तरी मी सांगितल्याप्रमाणें । जीवें निःसंदेह निश्चय करणें । मजमाजी हें जग पाहणें आणि जगीं मी एकला ॥ १२ ॥ एवं मत्तो जगत्सर्वं जायतेऽस्ति विलीयते । मय्येव सकलं राम तद्वज्जानीहि सुव्रत ॥ ८ ॥ या रीती मजपासून । सर्व हें झालें राहे लयही होणें । त्याच रीती जीवेंशी तूं जाणें । हे सुमत रामा ॥ १३ ॥ निर्विशेषीं विवर्तवत । सविशेषीं सर्व कल्पित । गरुडापरी झाले समस्त । देहापासून ॥ १४ ॥ ऐशिया रीती माझिया ठायीं जग । झालें राहे लय पावे मी अभंग । जैसा तैसा असें हें जाणें सुभग । असंभव सांडोनि ॥ १५ ॥ जीवाचिये जगदोद्धारा । प्रश्न केला आपुलिये गिरा । तरी तूं सुव्रत खरा । परोपकारी ॥ १६ ॥ तरी म्यां जें तुज सांगितलें । तें जीवें निश्चयेशीं पाहिजे धरिलें । कीं जगीं मीच मजमाजी मग वर्तलें । ऐसें जाणती तयां मोक्ष ॥ १७ ॥ एतद्विषयीं संशय । कालत्रयीं धरूं नये । हें तूं जाणें रामा निश्चयें । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १८ ॥ ऐसें शंकराचे ऐकतां बोल । श्रीरामा येती सुखाचे डोल । येणें निःसंशय होईल । जगदोद्धार ॥ १९ ॥ म्यां जे मनीं घरून सायास केले । तें माझे गुरुमायेनें कोडें पुरविलें । परी हेंचि मागुतीं पाहिजे खलिलें दृढतर व्हावया ॥ २२० ॥ कितेक अधिकारी ऐकतां । श्रवणमात्रें होती संशयापरता । कितेक मंदप्रज्ञ न मानिती सार्थकता । दृष्टि देखिलियावीण ॥ २१ ॥ तरी यासी कैसें करावें । म्यां जरी आतां कांहीं न पुसावें । तरी हे जीवकेंवी सुटती अघवे । जरी अश्लाघ्य तरी पुसोः ॥ २२ ॥ ज्ञाता असून रामें काय पुसिलें । ऐसें ज्ञाते हंसोत जरी हांसिले । अथवा शिवें कोपून परतें जरी केलें । तरी पुसिल्याविण न राहूं ॥ २३ ॥ ऐसा निग्रह मनीं धरून । श्रीराम करिता झाला प्रश्न । मागील झालें जें निरूपण । तें नेणिल्यापरी दावी ॥ २४ ॥ श्रीराम उवाच - कथिरेऽपि महाभाग दिग्जडस्य यथा दिशे । निवर्तते भ्रमो नैव तद्वन्मम करोमि किम् ॥ ९ ॥ तुम्हीं कथिले जरी हे महाभग । परी विवरीचें तम नवजे दिग्जडभाग । त्यापरी भ्रम न निवर्ते तरी मग । काय मी करूं ॥ २५ ॥ म्यां जें जें होतें असंभविलें । तें तें संभवून निश्चित सांगितलें । विवर्त परिणामाचेंही रूप केलें । प्रतिष्ठिलें वेदान्त संमत ॥ २६ ॥ जग मिथ्या सत्य ब्रह्म । हाही दाविला अनुक्रम । न जोतंचि निर्गुणीं । विवर्तापरी झालें असे ॥ २७ ॥ सगुणींही कल्पित केलें तैसें । परी देखती जेव्हं गारूड तुझें कैसें । या प्रत्यक्ष देहाचें झालें । रूपनाम विवर्तापरी ॥ २८ ॥ सविशेष कर्ताही सांगितला । त्याचाही सत्यमिथ्या निवाडा केला । आणि गारुडापरी जगडंबर उभविला । देहही धरूनि ॥ २९ ॥ हें इतुकें पृथक् पृथक् । तुवां सांगितलें निश्चयात्मक । परी भ्रम नव्हेचि निवृत्त देख । तरी मी काय करूं ॥ २३० ॥ विवरांतील निःशेष अंधार । न फिटेचि जेवीं प्रगटतां दिनकर । तेवीं सांगतां यथार्थ ज्ञानविचार । भ्रम न जाय जीवाचा ॥ ३१ ॥ तयासी दृष्टी देखिलीयावीण । यथार्थ कदा न वाते ऐकून । नानाप्रकारें तर्क करून । असंभव करिती ॥ ३२ ॥ गारोडियाचा खेळ होतां । तेणें दोरीचा सर्प प्रत्यक्ष दावितां । तेथेंही कल्पिती कुतर्कता । मिथ्या न भाविती ॥ ३३ ॥ म्हणती दोरी लपून ठेविली । येणें सत्य दुजी नागीण काढिली । आमुची दृष्टी असे चुकविली । दोरीचा सर्प केवीं होय ॥ ३४ ॥ तैसें निर्विशेष नाहीं देखिलें । कोण जाणें तेथून कसिएं झालें । सविशेषें कल्पून केलें । हेंही अघटित ॥ ३५ ॥ गारुडापरी सामर्थ्यें केलें । साकारें तेंही कवणें पाहिलें । तस्मात् हें सत्यत्वेंचि असेल झालें । वाउगें मिथ्या म्हणती ॥ ३६ ॥ आत्मप्रतीती वांचून । कोण जाणें शास्त्राचा अनुमान । ऐसें जीव घेती आडरान । याशि कैसें करावें ॥ ३७ ॥ ही दोरी हा सर्प केला । या मातीचा हा हिरा करून दाविला । सत्य मानिती ऐशा गारुडियाला । म्हणती हा खरा मांत्रिक ॥ ३८ ॥ तेवीं तूं आपुले देहापासून । जग करून दाविशी जरी निर्माण । तरीच हें मिथ्या मानितील जन । कीं गारुडापरी झालें ॥ ३९ ॥ या जगाची लय स्थिति उत्पत्ति । तुझिया देहामाजी दृष्टिनें पाहती । तरी मग ऐकिलें तेंही सत्य मानिती । कीं भ्रमें झालें असेल ॥ २४० ॥ तस्मात् दाखवीं हे तुझी माया । कपटें केवीं होत देहापासूनियां । वारंवार लागतसें पायां । कीं फेडीं हा संशय ॥ ४१ ॥ मुखें निश्चयेंसी सांगशी । परी हे मानेना जीवासी । यास्तव दाखवीं करणी कैशी । अंगें करूनी ॥ ४२ ॥ कोपोनि परी मज दाखवीं । माझी आळ समर्थें पुरवावी । ऐशी रामाची विनवणी ऐकतां करावी । खंतीं अंतरीं शिवें ॥ ४३ ॥ म्हणे हा काय रामाचा छंद । ज्ञानियामाजी केवळ निंद्य । परी पुरवणें लागे लळा विशद । बाळाचा मज जननीशी ॥ ४४ ॥ श्रीभगवान् उवाच - मयि सर्वं यथा राम जगदेतच्चरा चरम् । वर्तते तदृर्शयामि न द्रष्टुं क्षमते भवान् ॥ १० ॥ हे रामा माझिये ठायीं जैसें । चराचर जग वर्तत असे । तें दाखवीन तुजला तैसें । परी पाहूं न शकसी ॥ ११ ॥ माझें यथार्थरूप न्रिर्विशेष । तेथें जग झालें हें अशेष । विवर्तावरी यांत अवश्य । सत्यत्व नाहीं ॥ ४६ ॥ दुसरें सविशेष तें मायिक । तेथून उद्भवलें हें काल्पनिक । हीं दोन्ही सत्य व्हावया निश्चयात्मक । देह सामर्थ्य दाखवूं ॥ ४७ ॥ देहसामर्थ्य गारुड पहावें । तेव्हांचि बोलिलें तें सत्य मानावें । ऐसें घेतलें तुवां जीवें । तरी पाहें दाखवूं ॥ ४८ ॥ परी हा देहभाव जो मनीं धरिला । हा त्वां जगोदोद्धार नाहीं केला । जग बुडवावया धोंडा बांधिला । कैसा तो समजशी पुढें ॥ ४९ ॥ परी तुवां जो छंद घेतला । मज पाहिजे पुरविला । परीहा भूगोल माझ्या ठायीं वर्तला । जैशियापरी ॥ २५० ॥ याचा लयही कैसा मजमाजी । तो दाखवीन तुजशीं आजी । परी पाहूं न शकशी तूं सहजीं । गारुड माझें ॥ ५१ ॥ अनंत दशदिशा व्यापून । एकदाचि उद्भवतील नाना चिन्हें । तीं केवीं पाहशी अल्प चर्मचक्षूकडून । जेवीं लहरी समुद्राच्या ॥ ५२ ॥ अथवा ज्ञानचक्षूनें पाहूं जाशी । तरी त्या त्या ज्ञानापुढें न उरे दशी । सूर्य जेवीं अंधारासी । देखेना कदां ॥ ५३ ॥ तस्मात् देहींहून तिसरी । दृष्टि असे मायिकानुकारी । तेचि देऊं जेणें गारुडाची परी । साग्र देखशी तूं ॥ ५४ ॥ दिव्यं चक्षुः प्रदास्यामि तुभ्यं दशरथात्मज । तेन पश्य भयं त्यक्त्वा मत्तेजो मण्डलं ध्रुवम् ॥ ११ ॥ हे दशरथात्मजा तुजकारणें । मध्यम दिव्यचक्षु मी देईन । तरी सर्व भीति त्यागून पाहणें तेणें । माझें तेजोमंडल ध्रुव ॥ ५५ ॥ जितुकें हें माझें मायेचें गारूड । तितुकेंही एकदांच देखें भारुड । तोचि दिव्यदृष्टी देईन जाड । त्रिकाल ज्ञानरूप ॥ ५६ ॥ द्वैतीं अत्यंत असे भीति । ते सांडून बोलिली जे श्रुति । अथवा जीव हे कैसे तरती । तेही भय सांडी ॥ ५७ ॥ माझें तेज म्हणजे सामर्थ्य शक्ति । कैशी असे पाहें पुरती । ध्रुव म्हणजे जीवा असज्य निरुती । कल्पांत ईश्वरनिष्ठ ॥ ५८ ॥ अथवा मायिक पाहिनो निश्चय करी । कीं हे मिथ्याचि गारुडापरी । याची भीति त्यागूनियां सारी । माझ्या सत्यस्वरूपीं समरसें ॥ ५९ ॥ तूं तरी मदभिन्न पाहिलाचि अससी । परी भिन्नत्व आलेंसे जीवासी । तरी त्या जीवें त्यागून गारुडासी । माझें ध्रुवरूपीं मिळावें ॥ २६० ॥ न चर्मचक्षुषा द्रष्टुं शक्यते मामकं महः । नरेण वा सुरेणापि तन्ममानुग्रहं विना ॥ १२ ॥ या चर्मचक्षूकडून जीवा । पाडूं न शकवे दैत्य कीं मानवा । अथवा पहावेना स्वर्गस्थ देवां । माझिया अनुग्रहवीण ॥ ६१ ॥ ऐसें हें गारुड मायिक । माझें असे मृगजलात्मक । माझी कृपा जयावरी अवश्यक । तोंचि देखूं शकेल ॥ ६२ ॥ इत्युक्त्वा प्रददौ तस्मै दिव्यं चक्षुर्महेश्वरः । अथादर्शयदेतस्मै वक्त्रं पातालसंनिभम् ॥ १३ ॥ सूत म्हणे शौनकादिकांप्रति । या रीतीं बोलोन उमापति । देता झाला रघुनाथा प्रीति । गारुड पाहेशी दृष्टि ॥ ६३ ॥ पहाशील ऐसें आशिर्वचन । हेंचि गुरुकृपेचें देणें । मग दाखविता झाला दृष्टि देऊन । गारुड कैसें तें सदाशिव ॥ ६४ ॥ उभयतां रथीं बैसले होते । मावळून गेलें पूर्ववत जें तें । रामभूमीवरी राहे त्या समयातें । आणि काय देखता झाला ॥ ६५ ॥ सारें शरीर केवढें कैसें । नाहीं देखिलें अवयव असती जैसे । एक मुखमात्र पाताळा ऐसें । पाहता झाला ॥ ६६ ॥ पाताळ म्हणजे भूमीचें चढळ । त्या तळीं अवकाश पोकळ । तया पोकळींत हें ब्रह्माण्ड सकळ । समुद्रीं जेवीं राई ॥ ६७ ॥ विद्युत्कोटिप्रभं दीप्तं अतिभीमं भयावहम् । तद्दृष्टैव भयाद् रामो जानुभ्यां अवनिंगतः ॥ १४ ॥ कोटि विद्युल्लतेचे मिळाले भार । ऐशी दीप्ति पडली भयंकर । तया भयेंकडूनि श्रीरघुवीर । जानू टेकी भूमीवरी ॥ ६८ ॥ एकाएकी भयंकर पाहतां । चमक बैसतसे सर्वांच्या चित्ता । हा स्वभावचि दृष्टि मनाचा असतां । तेवीं किंचित् दचकला ॥ ६९ ॥ मागुती म्हणे हा शिवगुरु । दावीतसे गारुडाचा प्रकारु । म्हणून घालूं पाहे नमस्कारु । यास्तव गुडघे टेंकिले ॥ २७० ॥ प्रणम्य दण्डवत् भूमौ तुष्टाव च पुनः पुनः । अथोत्थाय महावीरो यावदेव प्रपश्यति ॥ १५ ॥ तओसाचो नमस्कार भूमीवरी । करून वारंवार स्तवन करी । मग संतोषूनि अंतरीं महावीर उठता झाला ॥ ७१ ॥ सन्मुख विन्मुख चहूंकडे । दशदिशा जेथवरी पाहे कोडें । तेथवरी मुख त्याचियाही पुढें देखतुची असे ॥ ७२ ॥ वक्त्रं पुरंभिदस्तत्र अन्तर्ब्रह्माण्ड कोटयः । चटका इव लक्ष्यन्ते ज्वालामाला समाकुलाः ॥ १६ ॥ पुढें पुढेंही पाहतां साचा । अंतचि न लगे त्या मुखाचा । त्यामाजीं कोट्यावधी ब्रह्मांडांचा । समुदाय दिसतसे ॥ ७३ ॥ जैशा आकाशीं चिमण्या उडती । तळींहून दावाग्निज्वाळें आहाळती । तेवीं अनंत ब्रह्माण्डें दिसतीं । तया महातेजीं ॥ ७४ ॥ कवठा ऐशीं कोटिशः ब्रह्माण्डें । तयामाजी रामाची दृष्टि पवांडे । तयाप्रति ब्रह्माण्डीं भिन्नभिन्न निवाडें । स्थावर जंगमा दिसताती ॥ ७५ ॥ मेरुमंदरविंध्याद्या गिरयः सप्त सागराः । दृष्यन्ते चन्द्रसूर्याद्याः पंच भूतानि ते सुराः ॥ १७ ॥ मेरुमंदर विंध्याद्रि पर्वत । सप्तसागर आवरणोदकासहित । चंद्रसूर्य तारांगनें अद्भुत । पंचभूतेंही दिसती ॥ ७६ ॥ एका ब्रह्माण्डातील सर्व सांगनें । त्या रीतीं इतर ब्रह्माण्डीं ओळखणें । असो राम पाहतसे निजनयनें । देवही सारे ॥ ७७ ॥ अरण्यानि महानागा भुवनानि चतुर्दश । प्रतिब्रह्माण्डमेवं तु दृष्ट्वा दशरथात्मजः ॥ १८ ॥ अहो शौनक महाभाग । तुम्ही ही ऐकूनि पहा सांग । अरण्यें चौदा भुवनें महानाग । रामपाहता झाला ॥ ७८ ॥ याच रीतीं प्रति ब्रह्माण्डीं । सर्वही देखतसे प्रौढी । आणिक काय होतें तें परंवडी । अल्प संकेतें बोलूं ॥ ७९ ॥ सुरासुराणां संग्रामाः तत्र पूर्वापरानपि । विष्णोर्दशावतारांश्च तत्तत्कर्माण्यपि द्विजाः ॥ १९ ॥ पहिले झाले पुढें जे होती । तितुके सुरासुरांचे संग्राम दिसती । विष्णूचे दशावतार आणि त्यांची कृती । देखता झाला द्विजहो ॥ २८० ॥ शंखासुर मारिला मत्स्य होऊनि । कल्पान्त दाविला श्राद्धदेवालागूनि । आणि बोधिले नौकेंत बैसवुनि । नौका बांधूनि निजश्रृंगा ॥ ८१ ॥ कूर्में मंदपृष्टीवरी धरिला । तेव्हां देवदैत्यीं सागर मथिला । तेथें मोहिनी धन्वंतरीही देखिला । आणि संग्रांअ झाला तोही ॥ ८२ ॥ हिरण्याक्ष वाराहें निवटिला । स्तंभीं नृसिंह प्रगटला । तेणें हिरण्यकशिपु वधिला । प्रल्हाद भक्ता रक्षिले ॥ ८३ ॥ वामनें पाताळीं घातला बळीं । इंद्रादि देव सुखीं केले सकळीं । पुढें माजतां क्षत्रिय मंडळीं । मारिली परशुरामें ॥ ८४ ॥ श्रीरामें देखिलें आपणासी । सर्व रामायणरूप क्रियेशीं । सहपरिवारें मारिलें रावनासी । राज्यारूढही राम झाला ॥ ८५ ॥ द्वापारीं होणार कृष्णावतार । तोही देखिला सहपरिवार । कंसवधादि क्रिया समग्र । त्यापुढें बौद्ध कल्की देखिले ॥ ८६ ॥ पराभवांश्च देवानां पुरदाहं महेशितुः । उत्पद्यमानानुत्पन्नान् सर्वांनापि विनश्यतः ॥ २० ॥ त्रिपुरभयें देव पळाले । तें शंकरें त्रिपुर जाळिले । असो ऐसें झालें तें व होणारही देखिलें । आणि सर्व लयोन्मुख ॥ ८७ ॥ त्रिपुरें मायिक दावितां शक्ति । विष्णवादि देव सर्वही पळती । कैलासवासिया स्तवितां उपापति । प्रसन्नत्वें त्रिपुर जाळी ॥ ८८ ॥ ऐसें जितुकें मातें झालें । ऋषी आदिकरून सर्व देखिलें । पुढें कल्पान्तवरी जें जें होणार वहिलें । तेंही पाहिलें श्रीरामें ॥ ८९ ॥ इतुकेही प्रतिब्रह्मांडीं दिसती । परी सर्वही विनाशमुख असती । देवदानव अवतारपंक्ति । रगडीत चालिला असे ॥ २९० ॥ कांहीं ब्रह्माण्डें असतीं गिळिलीं । कांही जिव्हेनें वेटाळिलीं । कांही दाढेनें रगडिलीं । कांही ओढिलीं श्वासें ॥ ९१ ॥ ऐसें सर्व मरणोन्मुख पाहूनि । श्रीरामा अति कळवळा आला मनीं । प्रळय ओढवला आजिचे दिनीं । हाचि काळाचा महाकाळ ॥ ९२ ॥ दृष्ट्वा रामो भयाविष्टः प्रणनाम पुनः पुनः । उत्पन्नतत्त्वज्ञानोऽपि बभूव रघुनन्दनः ॥ २१ ॥ हाचि सर्वांशी ग्रासील आतां कांहीं उरो नेदी ब्रह्मादि तृणांता । यास्तव भयभीत जालला होता । जीवन्मुक्त असोनि ॥ ९३ ॥ वसिष्ठमुखें तत्त्वज्ञान झालें उत्पन्न । यास्तव जीवमुक्त म्हणावा रघुनंदन । त्याहीवरी शिवाचें निर्वाणवचन । तेणें तें अतिदृढ झालें ॥ ९४ ॥ ऐसा तत्त्वज्ञानीही असतां । अत्यंत जाहला भीति घेता । येथें कोणी होईल शंका करितां । कीं ऐसें कैसें ॥ ९५ ॥ अभिन्न ज्ञान ज्याक्षणीं झाले । तया ज्ञात्याशी भय नाहीं उरलें । ऐसा राम निर्भय असतां वाटलें । भय तया कैसें ॥ ९६ ॥ ये विषयीं ऐकावें उत्तर । निर्भयचि असे रघुवीर । परी भयाविष्ट झालें जें अंतर । याशी हेतू अन्य असे ॥ ९७ ॥ हा सिवज्ञानी अज्ञानी न पाहे । सगटचि खात चालिला आहे । आपण यत्न केला तो व्यर्थ होऊं पाहे । जगदोद्धाराचा ॥ ९८ ॥ ज्ञाना पावून जे लया गेले । ते पूर्वींच मुक्तीस पावले । मग ते नासले कीं उरले । सारिखेचि दोन्ही ॥ ९९ ॥ परी अज्ञानीं आतां मरतां । हे सुटती कैसे तत्त्वतां । तस्मात् म्यां जगदोद्धार कल्पिला होता । तो निर्फळ झाला ॥ ३०० ॥ हे जीव ज्ञानें नाहीं कीं सुटले । तैसेचि काळामुखीं असती पडिले । या हेतुस्तव रामें भय घेतलें । कळवळूनि कणवें ॥ १ ॥ आणि क उत्पत्ति लय स्वरूपापासूनी । हें ठाउकें असतां मजलागूनी । सोडवावया जीवाच्या श्रीणी । बळें असंभव केला ॥ २ ॥ तुझें सामर्थ्यचि दाखवीं मजला । ऐसाही म्यां वाउगा छंद घेतला । गुरुअवज्ञा घडली मजला । अविश्वास मानितां ॥ ३ ॥ आणि अमर्यादाही घडली । हें आठवून अति भीति वाटली । गुरुमाउली असेल कीं कोपलीं । आतां तुष्टेल कैशी ॥ ४ ॥ ऐशिया हेतू राम भयभीत । होऊन साष्टांग असे घालीत । आणि अपराध असे क्षमापवीत । नाना स्तुतिस्तवनें ॥ ५ ॥ अथोपनिषदां सौरः अर्थैः तुष्टाव शंकरम् । उपनिषदाच्या सार अर्थें । तुष्टविता झाला स्तव स्वार्थें । शंकराप्रति म्हणे अपराधी अनाथें । रक्षीं रक्षीं निजभक्ता ॥ ६ ॥ श्रीराम उवाच - देवप्रपन्नार्तिहर प्रसीद प्रसीद विश्वेश्वर विश्ववंद्य । प्रसीद गंगाध्र चन्द्रमौले मां त्राहि संसारभयादनाथम् ॥ २२ ॥ हे देवप्रपन्नार्तिहर । प्रसन्न होई हे विश्वेश्वर । प्रसीद विश्ववंद्य गंगाधर । हे चंद्रमौले ॥ ७ ॥ जीव हे अज्ञानें अति पीडिले । कवणेंही न जाती सोडविले । यास्तव म्यां तुजशी प्रार्थिलें । अगस्तीनें प्रेरितां ॥ ८ ॥ तुवांही देवा प्रसन्न होऊनी । अभिन्नज्ञानास्त्रा मजला देउनी । कथिलेंस कीं जीव सुटतील येणेंकडूनी । गुरुमुखें ज्ञान होतां ॥ ९ ॥ परी तूं आजचि खात उठिलासी । ज्ञान नसतां उत्पन्नयांशी । तस्मात् सोडवीं तूं तरी म्हणविशी । प्रपन्नार्थिहर ॥ ३१० ॥ शरणागताची पीडा वारिशी । आजि निष्करुण कैसा झालासी । कीं मजवरी देवा कोपलासी । अपराध पाहून माझा ॥ ११ ॥ म्यां यथार्थ संवादा । असंभविलें करूनि प्रतिवादा । तेक्षमा करीं तूं सच्चित्कंदा । विश्ववंद्या ईश्वरा ॥ १२ ॥ बाळक कांहींही छंद घेतां । तयावरी कोप न करी माता । तेवीं म्यां आळ घेतली परीं तूं जगत्राता । प्रसन्न होईं मजवरी ॥ १३ ॥ म्यां जरी आळ घेतली नसती । तरी तूं कासया भक्षितासी जीवाप्रति । तस्मात् म्याचि या जगताची मृति । कल्पून आणिली ॥ १४ ॥ जीव तों नाहीं सोडविले । परी काळामुखीं अवदाना घातलें । ऐसें हें दूषण मजवरी आलें । तरी त्राही मज अनाथा ॥ १५ ॥ शीतळ गंगा मस्तकीं धरिली । त्या गंगाधरा उग्रता कैशी आली । तापहारक तूं चंद्रमौली । तरी जाळिशी कैसा जीवां ॥ १६ ॥ अज्ञानरूप हा भवसागर । यांत हे अज्ञाननर । यांच्या सुटिकेचा करीं विचार । तूं अनाथबंधु म्हणविशी ॥ १८ ॥ माझे सर्व अपराध क्षमूनी । त्राही त्राही या सर्व अनाथा लागुनी । सत्य सत्य अधिष्ठान पूर्णपणीं । जगदुत्पत्ति स्थिति लया ॥ १९ ॥ ऐसे असतां म्यां दाटून असंभव । कल्पिला तो क्षमा करी तूं गुरुदेव । तोचि मी बोलेन सर्व अभिप्राव । तूंचि या आधार कैसा ॥ ३२० ॥ त्वत्तो हि जातं जगदेतदीश त्वय्येव भूतानि वसन्ति नित्यम् । त्वय्येव शंभो विलयं प्रयान्ति भूमौ यथा वृक्षलता दयोऽपि ॥ २३ ॥ हे चराचर जग तुजपासून झालें । आणि भूतादि तुझ्याचि ठायीं राहिलें । हे शंभो अंती तुझें ठायीं लय पावले । जेवीं भुवीं वृक्षलतादि ॥ २१ ॥ भूमीवरी जितुकें निर्माण । वृक्षलतादि अंती तृण । ते पृथ्वीवरी उत्पन्न होऊन । पृथ्वीवरीच राहती ॥ २२ ॥ पृथ्वीचा दृष्टांत दिधला । परी साकार न पाहिजे स्वीकारिला । वृक्षादिकांचे उत्पत्ति स्थिति लयाला । भूमीहून दुजा थोर नाहीं ॥ २३ ॥ इतुकेंचि घेणें आधार सर्वांसी । कारण उत्पत्ति स्थिति लयासी । परी साकार असे भूमी जैशी । तैसा नव्हेसी तूं साकार ॥ २४ ॥ कांहींही सत्यत्वा वांचून । असत्य भ्रम हा नव्हे उत्पन्न । यास्तव तूं परमात्मा अधिष्ठान । किंवा कारण या सर्वां ॥ २५ ॥ रज्जूचा सर्प कवणाशी भासला । तेव्हां दोरी कल्पावी अधिष्ठान त्याला । तेवीं जगद्भ्रम जीवास वाटे झाला । म्हणूनि तूंचि अधिष्ठान श्रुती बोले ॥ २६ ॥ अज्ञानेंचि नामरूप ठेविलें । तेव्हांचि म्हणावें उत्पन्न झालें । तें अज्ञान आहे तोंवरीच राहिलें । लयही अज्ञान निरसतां ॥ २७ ॥ अज्ञानें सुखदुःखात्मक हें जग । उमटले यापूर्वींच तूं अभंग । तैसाचि स्थिति काळींही असंग । सर्पां जेंवी दोरी ॥ २८ ॥ लय जग होतांही पूरीलपरी । असंग उरशी तूं निर्विकारी । याचि हेंतू तुझें नाम शंभु निर्धारी । शं सुख भू अस्तित्व ॥ २९ ॥ हे शंभो शुखैकघना । तूंचि आदि अंती परिपूर्णा । नामरूप हें जगकल्पना । तुजवरी वाउगी ॥ ३३० ॥ हेंचि मागुतीं कैमुतीक न्यायें । विवर्तापरी हा सत्यनिश्चय । बोलेन तेचि ऐकावी सोय । श्रोतेजनीं ॥ ३१ ॥ ब्रह्मेंद्ररुद्रश्च मरुद्गणाश्च गन्धर्वयक्षाऽसुरसिद्धसंघाः । गंगादिनद्यो वरुणालयाश्च वसन्ति शूलिंस्तव वक्त्रयंत्रे ॥ २४ ॥ ब्रह्मा इंद्र रुद्र मरुद्गण । गंधर्व यक्ष सुरसिद्ध संपूर्ण । गंगादि नद्या समुद्र वरुणाचें स्थान । हे शूलीन तुम्हा मुखाआंत ॥ ३२ ॥ नामरूपाचा करावा क्षय । हा शूल तुझे हातीं अद्वय । ऐसा तूं शूली अप्रमेय । तुझिया मुखीं हे सारे ॥ ३३ ॥ ब्रह्मादि देव गण गंधर्व । सिद्ध मरुद्गण दैत्य मानव । नद्या पर्वत भूतादि स्वयमेव । मशकप्राय मुखीं दिसती ॥ ३४ ॥ त्वां लीलेनें हा साकार धरिला । तो लीलाविग्रही देह बोलिला । ऐशिया मायिक स्वरूपीं उद्भव दाविला । तरी निर्विशेषरूपीं कां नव्हे ॥ ३५ ॥ या देहापासून गारुड दाविले । तरी ईश्वरें कां नसे केलें । ऐसें कैमुतीकन्यायें प्रत्यया आलें । विवर्तरूपत्व मानसीं ॥ ३६ ॥ आणि सर्वही तूंच कैसा । अनुमान होता जो मानसा । तोही फिटला अपैसा । सर्वात्मका तुज पाहतां ॥ ३७ ॥ घटामाजीं जेवीं माती । तेवीं तूं अस्ति ग्भाति । सर्व तें व्यर्थ येतसें प्रतीति । गारुड तुझें ॥ ३८ ॥ ही माती हा रुपया केला । दावीं आळ म्यां होता घेतला । तो छंद दयाळुत्वें फेडिला । प्रत्यक्ष सर्प केला वादीचा ॥ ३९ ॥ खरा सर्प अरी झालाचि नाहीं । हें प्रत्यक्ष विचारें कळलें पाहीं । हे जीव कैसे भ्रांत असती कहीं । ऐकूनि सत्य मानिती ॥ ३४० ॥ प्रत्यक्ष दृष्टीशीं पहावें । तेव्हांचि यथार्थ मानावें । ऐशिया जीवाचें अज्ञान जावें । यास्तव म्यां प्रार्तिलें होतें ॥ ४१ ॥ ते तुवां कृपा करूनी । दाविली गरुडाची करणी । आतांही जीव सत्य न मानिती अझूनी । ते आपुली करणी पावती ॥ ४२ ॥ तुम्हीही बोलिलां होतां मजलागीं । कीं अविश्वासी अनधिकारी त्यागीं । तें सत्य आतां मजला कळलें प्रसंगीं । कीं बळें संदेही पडती ॥ ४३ ॥ असो आतां अविश्वासियाचें । कारणचि येथें नसे साचें । जे विश्वासी निघतांचि वचन गुरूचें । प्रत्यया आणून मुक्त होती ॥ ४४ ॥ म्यां आळ घेऊनि जें पुशिलें । हें मजपासून फार चुकलें । परी चुकलें तें होऊन गेलें । आतां क्षमा करीं ॥ ४५ ॥ तुवां जगदोद्धार नाहीं केला । जग बुडवावया धोंडा बांधिला । ऐसें आपण जें होतां बोलिला । तोही आला प्रतीती ॥ ४६ ॥ तेंचि कैसें निश्चयात्मक । बोलेन गुरुपुढें कांही एक । येथें सावध मुमुक्षु साधक । राहती तेचि तरती ॥ ४७ ॥ गारुड दावीं म्यां पुसिलें । तें शिवगुरुनें मज दाविलें । ये मंदमति भावितील वहिलें । कीं सामर्थ्य असावें गुरूसी ॥ ४८ ॥ सामर्थ्य पाहून उपदेश घेती । तेथें कैंची ज्ञानाची प्राप्ति । उगीच देहबुद्धीनें ठकविती । गुरुरूपें द्रव्य भोंदू ॥ ४९ ॥ हेही शिष्य अनधिकारी । निश्चय करिती सामर्थ्यावरी । ते वास्तवीक बुडती मृगजळपुरीं । तया काढिता कवणु ॥ ३५० ॥ वास्तवीक जयाशी ज्ञान झालें । सर्व मिथ्या तें मिथ्यत्वें त्यागिलें । त्यांतील देहबुद्धीचें सामर्थ्य मानिलें । वमनापरी तिहीं ॥ ५१ ॥ सामर्थ्य तपोबळाचें । यथार्थ नव्हे कीं ज्ञानाचें । सर्वचि मिथ्या तरी सामर्थ्य साचें । ज्ञाते कसिए मानिती ॥ ५२ ॥ पहिली असतां जरी सामर्थ्यशक्ति । ज्ञान झालिया वमनप्राय त्यागिती । मा साधनक्रियेनें केवीं साधू जाती । यथार्थ ज्ञान जया असे ॥ ५३ ॥ व्यासादिक सृष्टीचे सांगाती । सामर्थ्य तप पाहिजे तपांप्रती । परंतु न लगे जीवन्मुक्ता अति । खटाटोप मायिकाचा ॥ ५४ ॥ शंकरादि देव हे थोरले । तिहीं सृष्ति कर्तृत्वादि सामर्थ्य स्वीकारिलें । परी ज्ञाते नातळती जनक जरी प्राप्तअ झालें । वमनप्राय त्यागिती ॥ ५५ ॥ जेथें योगादि सामर्थ्य असे । तेथें यथार्थज्ञान कांहीं नसे । ज्ञान तेथें सामर्थ्य पिसें । कासयासी ॥ ५६ ॥ खरें जयाशी सुटावें वाटे । तेणें सामर्थ्य न पहावें गोमटें । हे दोन मात्र पाहावे घड्घडाटे । प्रबोधशक्ति स्वानुभव ॥ ५७ ॥ सामर्थ्य पाहून उपदेश घेती । ते अनधिकारी मंदमति । ज्ञान व्हावें ही इच्छाही असतां चित्तीं प्राप्त होय कोठूनी ॥ ५८ ॥ आपण उगेंचि गुरूत्व करावें । यास्तव योगसामर्थ्यें लोक भोंदावें । अथवा तपोबळें सामर्थ्य दावावें तेथें ज्ञान कैचें ॥ ५९ ॥ कली जातीं तों पुढे पुढें । योग ना तपोबळ आतुडे । उगे भोंदावया लोक वेडे । नाना कंवटालें करतील ॥३६० ॥ मंत्र औषधी आणि मणी । तोडगे कंवटाले करिती करणी । तेथे भोंदा योग ना तपोबळ नसती दोन्ही । तेव्हां ज्ञान तरी कैचें ॥ ६१ ॥ ऐशीं कंवटाले माजतील । लोकही तेथें झटून पडतील । एवं गुरुशिष्य उभयआं बुडतील । येथें संदेह नाहीं ॥ ६२ ॥ एकादा खरा अधिकारी निवडूनि । शरण जाईल गुरु ज्ञानिय लागूनि । वमनापरी सामर्थ्य त्यागूनि । ज्ञानें मुक्त होय ॥ ६३ ॥ असो अनधिकारिया काय बोलावें । परी मुमुक्षु साधक जे असती बरवे । तिहीं ज्ञानियां गुरूचे पाद सेवावे । सामर्थ्य न पाहतां ॥ ६४ ॥ ज्ञानें अज्ञान मावळूनी । संशयाची व्हावी धूळधाणी । जीव ब्रह्म एकखंडपणीं । हेंचि सामर्थ्य गुरूचें ॥ ६५ ॥ असो भाग्य जयासी जैसें । त्एचि विचारून शरण जाती तैसे । हे शिवसद्गुरु जग हे मिथ्या कैसें । बोलेन स्वामुभवें ॥ ६६ ॥ त्वन्मायया कल्पितं इन्दुमौले त्वय्येव दृश्यत्वमुपैति विश्वम् । भ्रान्त्या जनः पश्यति सर्वमेतत्शुक्तौ यथा रौप्यमहिं च रज्जौ ॥ २५ ॥ निखळ तुझिया स्वरूपाचुआ ठायां । वरी दृश्यत्व पाववी कल्पून तुझी माया । तेही भ्रांतजन पाहती सत्यत्वें नसूनिया । शुक्ति रजत रज्जूसर्पापरी ॥ ६७ ॥ तुझें रूप सविशेष आणि साकार । या या सहित सर्व जगदाकार । हा इतुकाही मायेचा कल्पित प्रकार । नसूनि भासे ॥ ६८ ॥ अस्ति भाति प्रियरूप तुझें । तेथें नामरूप पुत्र झाले वांझे । सुवर्णनाम अलंकार ओझें । तेवीं जगदाकार तूं ॥६९ ॥ अस्ति भाति रूप जया न कळे । तेचि भ्रांत सर्वजन आंधळे । नामरूपें कल्पिते झाले बळे । अस्तित्वरूपीं ॥ ३७० ॥ रज्जूच्या ठायीं भाविती सर्प । कीं रजत भाविती असूनि शिंप । तेवीं जग हें कल्पिती नामरूप । अज्ञानजन ॥ ७१ ॥ वास्तवीक तुझिये ठायीं पाहतां । ईश्वरादि तृणांत या जगता । ठावचि नाहीं नामरूपा समस्ता । आहे तें अस्ति भाति ब्रह्म ॥ ७२ ॥ तेजोभिरापूर्य जगत्समस्तं प्रकाशमानः कुरुषेप्रकाशनम् । विना प्रकाशं तव देवदेव न दृश्यते विश्वमिदं क्षणेन ॥ २६ ॥ तुझिये तेजेंकरून असून जग भरलें । तूम् प्रकाशमान वरी तूंच प्रकाशिले । तुझिया प्रमाशांवाचून न जाय दिसलें । हें क्षणभरी विश्व ॥ ७३ ॥ तू अस्ति भाति प्रियात्मक । अद्वयपूर्ण जेवीं दोरी एक । त्यावरी कल्पिलें अज्ञानें नामरूपक । सर्प जेवीं अआंधारीं ॥ ७४ ॥ आहेपणा तो दोरीचा । सर्पाकार झालासें साचा । तेवींच या आकार जगाचा । सत्यत्वावरी ॥ ७५ ॥ दोरीच्या दिसण्या सर्प भाविला । तेवीं तुझिया प्रकाशें रूप जगाला । त्यावीवरी पाहणार जो उमटला । तोही तूं चिद्रूप आत्मा ॥ ७६ ॥ सर्प भावितां दुःखें उमटती । मगकल्पितां सुखदुःखें दिसतीं । दोरी असे जेवीं दुःखापरती । तेंवीं तूं आनंदघन ॥ ७७ ॥ असो मुख्य तुझा चिद्रूप प्रकाश । पहिलाचि असे निर्विशेष । त्यावरी उद्भवलें सविशेष । त्याशीही प्रकाशर्ता तूं ॥ ७८ ॥ रज्जूचें दिसणें जरी नाहीं । तरी कोठें दिसेल अंधारी अहि । तैसें तुझिया चिद्रूपावीण कांहीं । जग क्षणभरी दिसेना ॥ ७९ ॥ हें असो निर्विशेषरूप । परी तुझें जें साकार असद्रूप । तेंही न म्हणावें कदां अल्प । सर्व जगा आधार ॥ ३८० ॥ अल्पाश्रयो नैव बृहन्मर्थं धत्तेऽणुरेको न हि विंध्य शैलम् । त्वद्वक्त्रमात्रे जगदेतदस्ति त्वन्माययैवेति विनिशिनोमि ॥ २७ ॥ रेणू विंध्यशैल उचलीना । तेवीं मोठा अर्थ अल्पाश्रय धरीना । तुझिया मुखींच दिसतीं ब्रह्माण्डें नाना । परी तीं मायिक म्यां निश्चय केला ॥ ८१ ॥ तुझिया देहाचा थोरपणा किती । कीं अमण्त ब्रह्माण्डें मुखींच फिरतीं । मग सर्व देहाकृतीची संपत्ती । केवढी म्हणोन वर्णावी ॥ ८२ ॥ परी एवढाही तुझा थोरपणा । मज तुझिया कृपें सत्य वाटेना । जेवीं गारोडी एकाचें एक दाविती नाना । परी मंत्रज्ञा सत्य नसे ॥ ८३ ॥ तेंचि मिथ्यात्व मागुतीं । बोलिजेल स्वानुभवें आणि युक्ती । गारुडाची अज्ञाना असे भीती । सज्ञाना नाहीं ॥ ८४ ॥ रज्जौ भुजंगो भयदो यथैव न जायते नास्ति न चैति नाशम् । त्वन्मायया केवलमात्तरूपं तथैव विश्वं त्वयि नीलकंठ ॥ २८ ॥ रज्जूचा भुजंग भयंकर । जन्मला नाहीं नसेना नासे दुर्धर । तेवींच हे नीलकंठ मायिक भ्रम मात्र । जग झालें राहे ना मरे ॥ ८५ ॥ गारुडीये वादीचा सर्प केला । तो पाहून अज्ञाना झेण्डू फुटला । परी मंत्रज्ञासी सर्प नाहींच जन्मला । तया भीति कैंची ॥ ८६ ॥ तेवीं तुवाम् गारुड जें दाविलें । हें पाहून अज्ञानी भीति वहिले । मज तुझिये कृपें सत्यचि नाहीं वाटले । तरी भय तें कैंचे ॥ ८७ ॥ हें जें दाविले इतुकेंचि गारुड । असें हें नव्हे मजशी भीड । तुझें सविशेष ईश्वरत्व जें वाड । तेंही रज्जूसर्पवत् मिथ्या ॥ ८८ ॥ ईश्वरापासून तृणापर्यंत । नामरूपें दिसती मात्र कल्पित । परी हीं झालीं ना राहतीं ना मरत । तया भुजंगापरी ॥ ८९ ॥ भ्रमें जेणें सत्यत्व भाविलें । तेचि थोर सान कल्प कल्पूं मेले । जया यथार्थ कळलें कीं नाहींच झालें । तेचि पावले परमसुख ॥ ३९० ॥ अज्ञाना आश्रय ऊं एकट । यास्तवचि नामें नीलकंठ । तें अज्ञान खांदून केलें सपाट । तुझिया ज्ञानें जिंहीं ॥ ९१ ॥ ते अंगें ब्रह्म झाले तूचि । तयासी भीति तरी उरेल कैंची । आधीं झालेंच नाहीं तया भ्रमकार्याची । मुळी खांदिली ॥ ९२ ॥ ऐसें विचार न करितां । जे का साकाराशी मानिती सत्यता । ते बुडालेचि बुडती मृगजळा अतौतां । तया काढिता कवणु ॥ ९३ ॥ विचारमाणे तव यत् शरीरं आधारभावं जगतामुपैति । तदप्यवश्यं मदविद्ययैव पूर्णाश्चिदानंदमयो यतस्त्वम् ॥ २९ ॥ जीं पावलें जगदाशी आधार । ऐसें हें तुझें साकार शरीर । तयाचा यथार्थ करितां विचार । सत्य नव्हे ॥ ९४ ॥ जरी हें सत्यचि म्हणावें । तरी तुझें पूर्ण चिदानंदरूप नव्हे । तस्मात् जे मानिती ते स्वभावें । स्वकीय अविद्येनें ॥ ९५ ॥ जें जें दिसतें तें नासे । श्रुतीचेंही वचन ऐसें । नटें सोंग आणितां सत्य नसे । युक्तीही ऐशी ॥ ९६ ॥ क्षणां दिसे एकाचे एक । हेंचि गारुडाचें रूपक । ऐसा अनुभव निश्चयात्मक । असे मानसीं ॥ ९७ ॥ एवं श्रुतियुक्ति अनुभवें । साकाराशी सत्यत्व नव्हे । विचार जाणावा याचि नांवें । सत्य मिथ्यात्व निवडणें ॥ ९८ ॥ सुवर्ण जैसें ओळखितां । अलंकाराची मिथ्या वार्ता । तैसें तुझें रूप सच्चिदानंद कळतां । साकार मिथ्या होय ॥ ९९ ॥ ऐसें असून उगेच मंदमति । साकाराशी सत्यत्व कल्पिती । श्रुति अनुभवही त्यागिती । आपुल्या दुराग्रहें ॥ ४०० ॥ ते भुलले अविद्येनें । ऐसें न म्हणावें काय ज्ञानियानें । अलंकार जरी सत्यत्वें घेणें । तें नेणणें कीं सुवर्णाचे ॥ १ ॥ सच्चिदानंद ब्रह्म परिपूर्ण । ऐसें तुझें असतां लक्षण । साकारचि करीतां ग्रहण । सत् चित् घन न लोपलें कीं ॥ २ ॥ हें न कळणेंचि दृढ व्हावया । प्रयोजन असे जी गुरुराया । तें ईं बोलेन सन्निध पायां । मुमुक्षुच्या हितास्तव ॥ ३ ॥ तेंचि ब्रह्म कीं आपण अंगें । असतां अंध झाले अविद्येचे संगें । देहबुद्धिच घेतली सवेगें । मी देह म्हणोनि ॥ ४ ॥ देहाशी जन्ममृत्यू लागले । तेचि धर्म आपुले माथां घेतले । जन्मती मरती नेणून उगले । आपुलीया रूपा ॥ ५ ॥ आपणे जेवीं एकदेशी साकार । हा सत्यचि बाणला निर्धार । तैसाचि कोण एक अए ईश्वर । अवयवात्मक ॥ ६ ॥ तुज सविशेष अव्यक्तातें नेणती । मा कैसेनि कळशी तूं निर्विशेष अमूर्ति । आपणा ऐसेंचि अवलोकिती । परी सत्य भाविती देह तुझा ॥ ७ ॥ देहधारीच असे ईश्वर । परी जीवा ऐसा नव्हे निर्धार । जीव मरती ईश्वर अमर । यास्तव तो साकार अविनाश ॥ ८ ॥ जीव किंचिज्ञ ऒश सर्वज्ञ । ईश्वर अक्षयीं जीवा जन्ममरण । इतुकें कर्म मानिती भिन्नभिन्न । परी साकारत्वें सारिखे ॥ ९ ॥ देव करितां काय एक नव्हे । ऐसें बोलती उगेंचि आघवे । परी हें तुझें गारुड नेणवे । अथवा मिथ्या तूं साकारें ॥ ४१० ॥ एवं साकारा तुज सत्यत्व भावितां । हे निश्चयेंशी अविद्यात्मकता । असो विचारवम्तें विचार घेतां । साकारता मिथ्या तुझी ॥ ११ ॥ तूं यथार्थ कळतां सच्चिदानंद । तत्क्षणींच साकारा उपमर्द । साकार मिथ्या होतां स्वतःसिद्ध । सत् चित् घन कळे तत्क्षणीं ॥ १२ ॥ निश्चयेंशी कळतां अंतरीं । संशय जाय ब्रह्माण्डा बाहेरीं । जग सारें गारूडापरी । तूं कर्ता निर्धारी खपुष्प ॥ १३ ॥ ऐसें ज्ञान प्रमाणसिद्ध । जें सहजत्वें जीवां मोक्षप्रद । हें नेणूनि बळें पावती बंध । अव्हेरूप गुरूशास्त्रा ॥ १४ ॥ अनंत श्रुति मिथ्या म्हणती । मिथ्या म्हणून सहस्रधा तुम्ह्या उक्ति । साधुसंतही निश्चयेंशीं बोलती । परी जीवा सत्य न वाते ॥ १५ ॥ न होऊन रज्जू सर्प दिसे । तेवींच विवर्तात्मक जग हें भासे । परी तें कल्पना करून बळाविती कैसे । तेंचि अल्पसें बोलूं ॥ १६ ॥ पहा पहा रज्जू सर्प भ्रमापरी । उद्भवलीं नामरूपें सारीं । त्या भ्रमामाजीं कल्पना केली दुसरी । हें थोर हें सान ॥ १७ ॥ हा नाग मोठा हें किरडूं सान । तेवीं हा सत्वगुन हा तमोगुण । किरडूं झालें नागापासून । तेवीं गुणापासून भूतें ॥ १८ ॥ गव्हाळा तांबडा डोंब्या पीतवर्ण । जेवीं नामें कल्पिलीं अनान । तेवीं पृथ्वी आप तेज वायु गगन । नामें ठेविलीं अस्तित्वा ॥ १९ ॥ सर्व एकदाचि भ्रमें झालें । त्यासही कल्प कल्पूं बोलिलें । हें कारण हें कार्य त्यापासून कल्पिलें । कार्य धाकुलें कारण मोठें ॥ ४२० ॥ आकाश मोठें आणि एकगुण । वायु सान परी असे द्विगुण । तरी वायु कार्य आकाश कारण । कल्पिलें असे ॥ २१ ॥ तेंवीच वायु कारण तेजाचें । तेज कार्य असे वायूचें । तेजीं तीन गुन असती साचे । उणें असे म्हणूनी ॥ २२ ॥ आपल्याहून सान चतुर्गुण । यास्तव आप कार्य तेज कारण । पृथ्वी पंचगुनी परी उणी दशंगुण । तेव्हां आप कारण कार्य भूमि ॥ २३ ॥ ऐसे न्यादिक शास्त्रकारक । अनेक प्रकारें करून तर्क । बळाविलें मिथ्या हें अनेक । भ्रम परी सत्यत्वें ॥ २४ ॥ देहादि जडत्वें देखिलें । तेव्हां हें भूताचें कार्य झालें । अमुकाचे अमुक अंश कल्पिले । तेव्हां म्हणती पंचीकृत ॥ २५ ॥ सूक्ष्म तत्त्वें पाहतां सकळ । म्हणती भूतगुणांचे हे खेळ । आणि अपंचीकृत उद्भवलें केवळ । मग प्रवेशलें पिंडी ॥ २६ ॥ मुळीं जाणतेपणा जो होता । तोचि सर्वज्ञ ईश्वर याचा कर्ता । पिंडी प्रवेशतां किंचिज्ञता । आणि जीवत्व तयासी ॥ २७ ॥ उगेचि म्हणती असे पूर्वकर्म । यास्तव पावले योनि उत्तमधाम । पुढेंही करी पापसंभ्रम । तेव्हां उंच नीच योनि ॥ २८ ॥ ऐसें जीवत्वही खरेंचि आलें । बंधनही खरेंचि सत्यत्वें पडिले । हे कैसे जातील सुटले । कल्पकोटि ॥ २९ ॥ तरी या जीवासी अती सुख व्हावें । ऐसें पुण्यकर्म कांहीं करावें । अथवा स्वर्गादिकीं जाऊन रहावें । हेचि मुक्ति जीवां ॥ ४३० ॥ ऐसें मिथ्या परीच दृढ केलें । पुनरावृत्ति भोगिती उगले । सर्प भयें कांपूं लागले । झेंडू फुटले कित्येका ॥ ३१ ॥ मी जीव ऐसेंही भिन्नत्वें न भावी । मी देह म्हणून बुद्धि घ्यावी । हीं हीं माझी बळकट धरावीं । हेंचि बंधाचें स्वरूप ॥ ३२ ॥ आपुलें निजरूप विसरले । बळेंचि पापपुण्य माथां घेतले । तरी याचें सुखदुःख पाहिजे भोगिले । तेवीं रज्जू नेणतां कंपादि ॥ ३३ ॥ तो भ्याड गूळ खाता म्हणे कडू । मीठ मिरची खातां मणे गोडु । तेवीं या जीवांविषयांचा पवाडू । अति गोड लागे ॥ ३४ ॥ परमार्थ कडू म्हणोन त्यागिला । तैसाचि देह मृत्यूतें पावला । जैसा सर्पा भिऊन भ्याड निजेला । परी धोका चित्तीं उरे ॥ ३५ ॥ पुन्हां तो जन्माशी जरी आला । तरी भवबंध सत्य म्हणून बैसला । जैसा भ्याड निजून उठला । तो सर्पभयें कांपें ॥ ३६ ॥ असो ऐसा महाप्रलय । झाला तरी सुटका न होय । अज्ञान नव्हेचि क्षय । म्हणूनिया ॥ ३९ ॥ जरी होय अभिन्नज्ञान । गुरुशास्त्र आत्मप्रतीती कडून । तेव्हांचि नासून जाय अज्ञान । जीवन्मुक्ति सुख होय ॥ ४४० ॥ जेवीं भ्याडें दिवा लाविला । दोरी ओळखून निवांत बैसला । तेणें लहरीसहित सर्प मेला । निर्भय ठेला तत्क्षणी ॥ ४१ ॥ ज्ञानेंवीण कर्में करी । तेणें भवभय नासेना निर्धारी । दीपेंवीण आणिले उतारी । तरी लहरी न जाती ॥ ४२ ॥ अथवा याग करितां आटाआटें । तरीई अज्ञानबंध न तुटे । जेवीं सर्पावीण घालितां सोटे । भांति न फिटे कदां ॥ ४३ ॥ अथवा उपासना साह्य केली । तरी अज्ञानभ्रांति न जाय फिटली । जेवीं गारुडी साह्य करितां न जाय भुली । सर्प भ्रमाची ॥ ४४ ॥ ऐसे असून ज्ञानउपाय । न करितीच कोणी निश्चय । थरथरां कांपती सर्पभयें परी दीप न लाविती ॥ ४५ ॥ नाना प्रकारें कर्में करिती । योग कीं उपासना आरंभिती । परी त्या द्वैताची न जाय भिईति । दीपेंवीण अन्य साधनें ॥ ४६ ॥ येथें शंकील कोणी शंकाकार । कीं अप्रमाण काय कर्मशास्त्र । अथवा उपासना काण्ड प्रकार । तोही व्यर्थची ॥ ४७ ॥ तरी राम म्हणे स्वानुभवज्ञान । जोंवरी यथार्थ नाहीं ब्रह्मात्मभान । तोंवरी सत्यची अक्र्म उपासना कांड दोन । अधिकार भेदें ॥ ४८ ॥ अभिन्नज्ञान झालियावरी । तो नव्हे कर्म उपासनेसी अधिकारी । तया मिथ्याचि हीं शास्त्रें सारी । द्वैतरूप जीं ॥ ४९ ॥ पूजेष्टपूर्तादिवरक्रियाणां भोक्तुः फलं यच्छसि विश्वमेव । मृषैतदेवं वचनं पुरारे त्त्वत्तोस्ति भिन्न न च किंचिदेव ॥ ३० ॥ पूजा होम वापी कूपादि क्रिया । तूं ईश फल देशी कामुककर्तिया । हे पुरारे तीं वचनेंचि वातती वाया । तुजहून भिन्न किमपि नसतां ॥ ४५० ॥ तुज देवातें भक्त जीव पूजिती । पूजा साहित्य अत्रगंध कल्पिती । अथवा तूं यज्ञभोक्ता याज्ञिक कर्म करिती । आणि वापी तडागादि पुण्यकर्म ॥ ५१ ॥ जरी हें फलासहित वेद बोलिला । परी सत्य न वाते मजला । खडे मांडून ॐनामा शिकविला । तेवीं पूर्वपक्ष ॥ ५२ ॥ ज्ञानकांडी सर्वही ब्रह्म । येथें कदाचित् नाहीं रूपनाम । तरी ईश जीव क्रिया अनुक्रम । त्रिपुटी भिन्न उरे केवीं ॥ ५३ ॥ भोक्ता एक सत्य असावा । तरी तेणें फलेच्छा भोग अपेक्षावा । ईश जरी भिन्नत्वें फलद व्हावा । तरीच कर्में निपजती ॥ ५४ ॥ आधीं शोध घ्यावा भोक्त्याचा । मग अपैसा भेद कळे त्रिपुटीचा । भोक्ता आत्मा कीं जीव असे साचा । कीं उभयात्मक ॥ ५५ ॥ आत्मा परी असंग परिपूर्ण । जेथें त्रिपुटीचें नव्हे भेदभान । तेथें काय इच्छी कोण हें श्रुतीचें वचन । तस्मात् भोक्तृत्व न ये आत्मया ॥ ५६ ॥ जीव जरी मिथ्या आभास । उगाचि धीवृत्तीचा प्रतिभास । भोक्तृत्व न ये वंध्यापुत्रास । तरी भोक्ता उभयात्मक ॥ ५७ ॥ आत्मा इंद्रिय मनयुक्त । भोक्ता ऐसें मनीषी बोलत । हें उभयतादात्म्य अविद्याजनित । मी भोक्ता अभिमानें ॥ ५८ ॥ ज्ञानें अविद्या नष्ट झाली । तरी मग तदात्मता कोठें उरली । देहबुद्धीची मुळीं खांदिली । आतां भोक्ता तरी कोण ॥ ५९ ॥ विषयभोग म्हणजे ज्ञेय । याशीही वेगळें रूप काय । नेहनाना श्रुति बोले निश्चय । तेव्हां इच्छा कासयाची ॥ ४६० ॥ एवं शून्य पडिलें पदार्थाला । अज्ञान न जातां भोक्ता मेला । तरी इच्छा संभवेल कवणाला । कासयाची ॥ ६१ ॥ तूं एक फळदाता भक्तांसी । तरी भक्तचि कोठें भिन्नत्वेंशी । जीव ब्रह्मैक्य महावाक्यें ऐशी । तरी फल देशी कवणा ॥ ६२ ॥ त्वां जीवाप्रीत्यर्थ ईशत्व धरिलें । तें जीवाभावीं नाव सांडिलें । तस्मात् जीव ईश्वरत्व न उरलें । तरी दाता ना घेता ॥ ६३ ॥ आतां पूज्य ना पूजक । याज्य ना नसे याजक । तरी पूजा आणि यज्ञादिक । क्रियाचि नुद्भवे ॥ ६४ ॥ वापी तडागादि कवनें करावी । कासयाचीं कवणें फळें घ्यावी । एक परिपूर्ण ब्रह्मताचि आघवी । नामरूप बाधें ॥ ६५ ॥ पूजासाहित्य सामग्री यज्ञाची । आहे तें परिपूर्ण ब्रह्म एकचि । तस्मात् ज्ञानिया मृगजळवत् साची । तरी मृषाचि कर्मकाण्ड ॥ ६६ ॥ जयाची अंतःकरण शुद्धी व्हावी । तेणें निष्कर्म कर्में आचरावीं । यास्तव कर्माची उठाठेवी । बोलिला वेद ॥ ६८ ॥ तस्मात् अधिकार परत्वें वेद बोलिला । हा यथार्थ विधि नव्हे ज्ञात याला । एतदर्थ सत्ववचनें न वाटती मजला । देहत्रयदहना त्रिपुरारे ॥ ६९ ॥ तूं एकलाचे अससी परिपूर्ण । सर्व हें नाहींच झालें उत्पन्न । ज्ञाताही निरे तुजवीण भिन्न । यास्तव सर्वही मिथ्या ॥ ७० ॥ जयासी अभिन्नज्ञान नाहीं । जे पडिले प्रवृत्ति प्रवाहीं । तयाचें बोलणें करणें सहसाही । सत्य नसे ज्ञानिया ॥ ७१ ॥ अज्ञानमूढा मुनयो वदन्ति पूजोपचारादि बहिःक्रियाभिः । तोषं गिरीशो भजतीति मिथ्या कुवस्त्वमूर्तस्य तु भोगलिप्सा ॥ ३१ ॥ अज्ञान मूढ मुनि बोलती । कीं बलि उपचारें पूजादिकीं समस्तीं । तोषवावें गिरिशा तुजप्रति । परी तें मज वाते खोटें ॥ ७२ ॥ कारण कीं तूं निरवयव अमूर्ति । भोगलिप्सा कायशी तुजप्रति । अथापि तुज साकार भावून कल्पिती । एंतें मिथ्याचि ज्ञानिया ॥ ७३ ॥ अत्र गंध पुष्प धूप दीप । यांत तुजवीण भिना काय असे अल्प । सुवर्णवीण अलंकारारूप । तेवीं काय असे जगा ॥ ७४ ॥ ऐसें अज्ञ ना हें नेणती । वाउगे मृन्मय देव स्थापिती । पूजासाहित्य मेळवून आणिती । पूजिती ते सर्व मूढ ॥ ७५ ॥ शास्त्रसंपन्न जरी झाले । परी अभिन्नज्ञाना जे आंचवले । तया अज्ञान मुनींनी जें कवित्व केलें । तें सर्व मिथ्या ॥ ७६ ॥ चतुर्विध वाणीचा तूं ईश । यास्तव तुज नाम गिरीश । हे मूढ तुझा करूं पाहती संतोष । बाह्योपचारें ॥ ७७ ॥ परी तुझे हस्त पाद तोडिले । आणि ते तुझ्या मस्तकीं वाहिलें । तेथें तुझें मन तुष्टलें कीं क्षोभलें । सत्य सांगें गुरुराया ॥ ७८ ॥ तूं एकलाचि परिपूर्ण असतां । तुजसी भिन्न कल्पिती नेणतां । हेंचि तोडून तुझी पूजा करितां । संतोष नव्हे तुझा ॥ ७९ ॥ हें वर्म कांहींच नेणती । बळेंचि भावार्थें पूजा करिती । समुद्रींचे पाणी वाहूं समुद्राप्रति । ऐसेंही बोलती सदां ॥ ४८० ॥ येणें ऐक्यत्व बोलती मुखीं । परी भावना कोठें तयासारिखी । मी सान तऊं थोर हें कल्पिती शेखीं । इच्छिती सुखदुःख फळें ॥ ८१ ॥ म्हणती शिव हा मोठा दयाळु । भावार्थें अर्पितां पूगीफळु । त्रैलोक्यराज्य देतसे केवळु । ऐसा भोळा शंकर ॥ ८२ ॥ किंचिद् दलं वा चुलकोदकं वा यस्त्वं महेश प्रतिगृह्ण दत्से । त्रैलोक्यलक्ष्मीमपि यज्जनेभ्यः सर्वं त्वविद्या कृतमेव मन्ये ॥ ३२ ॥ किंचित् बिल्वदळ शिळें कीं साजूक । अथवा अल्पसें चुलुकोदक । महेशा तुज भावार्थें अर्पितां एक । ग्रहण करिशी आवडी ॥ ८३ ॥ आणि तया भावार्थियासी । त्रैलोक्यराज्य लक्ष्मी देशी । शास्त्रांची वचनें जीं जीं ऐशीं । ती सर्व अविद्याकृत मीं मानीं ॥ ८४ ॥ उगाचि म्हणती पाषाण देव । येथें दृढ ठेवितां भाव । हाचि मनोरथ पुरवील सर्वं । पूजितां प्रेमें ॥ ८५ ॥ जीवाची कामबुद्धि पाहिली । तया अज्ञानास्तव श्रुतिमाउली । उगीच रोचनपर वचनें बोलिलीं । बाळका समजावी जेवीं माता ॥ ८६ ॥ बाळाचे हातावरी बोटें ठेवून आई । कावकाव येई चीवचीव येई । आणि म्हणे तूं दाणाखाई पाणी पीई । डोईवरी बैसे उडोनी ॥ ८७ ॥ तेथें काउळा ना चिमणी । दाणा किंवा असेना पाणी । तैसें देवत्व नसतां पाषाणीं । प्रतिष्ठितां येतसे म्हणे ॥ ८८ ॥ शिवाची बिल्वदळावरी अतिप्रीति । भावार्थी कोणी वाहतां मती । राज्यलक्ष्मी देईल ये विषयीं सांगती । इतिहास योजूनी ॥ ८९ ॥ एखादा राजा झाला पाहुनी । म्हणती हा पूर्वीं अतिदरिद्री असूनी । येणें बिल्वदळ वाहिलें होतें लिंगालगूनी । त्या पुण्यें राजा झाला ॥ ४९० ॥ हा संपत्तीवान् आतां पाहे । पूर्वजन्मीं होता शबर देहे । मुखीं पाणी घेऊन लिंगा वाहे । तेणें पावे लक्ष्मी ॥ ९१ ॥ ऐशीं ऐशीं शास्त्राची वचनें । सत्य मानिजेति अज्ञानें । काव काव चीव चीव म्हणतां जेवीं बाळानें । ऐकतां राहणें रडतां ॥ ९२ ॥ तैसें हे श्रुति जरी बोलिली । ज्ञाता सत्य मानी वहिली । प्रौढ झालिया मातेची बोली । तुच्छ वाटे होपळ ॥ ९३ ॥ येथें कोणी म्हणती साहासें । कीं कर्मकाण्ड साक्षात् मोक्षकर नसे । परी योग आणि उपासना असे । मोक्षकर साधका ॥ ९४ ॥ तरी ऐकावें सावधान । योगही क्रियात्मक संपूर्ण । पूजा अर्चन हेंही करणें । कर्मचि असे ॥ ९५ ॥ उपासना प्रकार जो असे । तो ऐसा क्रियारूप नसे । त्याचें रूप पुढें बोलिजेल अपैसें । प्रसंगानुसार ॥ ९६ ॥ यज्ञ अर्चनादि प्राणायाम । हें अवघेचि क्रियारूप कर्म । आचरेल जो कोणी निष्काम । तुआची अंतःकरणशुद्धी ॥ ९७ ॥ तया अंतःकरणशुद्धिद्वारें । ज्ञान पावून मोक्ष साचोकारें । हें परंपरा साधन मोक्षकर खरें । परी प्रत्यक्ष मोक्षद न होती ॥ ९८ ॥ तेंचि कर्म सकामामुळें । आचरतां ही होय निर्फळें । जेवीं लेंकुरांसी कांही न मिळे । कावकाव चीवचीव करितां ॥ ९९ ॥ आणिक येथें शंकील कोणी । कीं देवधर्म नाहीं जयालागुनी । हें नास्तिकमत अंगें राम कां वाखाणी । तरी ऐका तैसें नव्हें ॥ ५०० ॥ नास्तिक तयासीच म्हणावे । जें निस्तत्वासी सत्य मानावें । तेणें सत्यत्वासी शून्यत्व संभवे । कीं ब्रह्म नाहीं दिसेना ॥ १ ॥ सर्प नसतां दोरी हरपे । तेवीं जगसत्यत्वें ब्रह्म लोपें । मग जें जें करणें तें तें साक्षेपें । नास्तिक मत ॥ २ ॥ ते स्वतांचि नास्तिक असून । नास्तिक म्हणती ज्ञात्यालागून । असो त्या मूर्खांशी काय कारण । परी सांगणें मुमुक्षासी ॥ ३ ॥ अस्तित्व कैसें ज्ञान झालिया । कीं अणूही नाहीं वांचून देवराया । हे शिवगुरो तुझें तूं जाणशी उपाया । येरा कळेना ॥ ४ ॥ व्याप्नोषि सर्वा विदिशो दिशश्च त्वं विश्वमेकः पुरुषः पुराणः । नष्टेऽपि तस्मिन् तव नास्ति हानिः घटे विनष्टे नभसो यथैव ॥ ३३ ॥ दिशा विदिशा व्यापिल्या तुवां । तूं एकचि पुराणपुरुष शिव शिवा । यानामरूपा लय झाला जरी सर्वां । तरी तुझी हानि नव्हे ॥ ५ ॥ घट फुटतां आकाश न फुटे । कीं तरंग नासतां पाणी न आटे । तेवीं तुझें अस्तित्वरूप गोमटें । नामरूपासवें न नासे ॥ ६ ॥ साधक हो ऐका सावधान । ज्ञान म्हणजे अंगें ब्रह्म होणें । अंगें म्हणजे देहाएवढेंपन । उरलें नाहीं ॥ ७ ॥ आकाशाशी घालून पोटीं । अस्तित्व असे तें केवीं बोलूं गोष्टी । अणुप्राय ब्रह्मांडाच्या कोटी । जया स्वरूपीं वर्तती ॥ ८ ॥ ते ब्रह्म वाणी मनावांचून । अंगें झाला सत्चित्घन । शून्य सांडून पूर्ण समाधान । पावला या नांव ज्ञाता ॥ ९ ॥ तयाचें नास्तिकमत कैसें होय । दशदिशा व्यापला देवराय । मीपण नुरेचि अवघें शिवमय । जग हें उद्भवलें नाहीं ॥ १० ॥ हे शिव मी तूंपणें वीण । एकलाचि ब्रह्म तूं पुरातन । दिशा म्हणजे सर्व हें गगन । व्यापून तूं अससी ॥ ११ ॥ विदिशा म्हणजे मायेविरहित । जें का पूर्णब्रह्म तूं अनंत । तेथें व्याप्य व्यापकाचा संकेत । नसे किमपि ॥ १२ ॥ तेंचि स्वरूप ज्ञानियाचें । नामरूप व्यापलें साचें । पाणीच जेवीं अंग तरंगाचें । तेवीं विश्वरूपी ज्ञाता तूं ॥ १३ ॥ ब्रह्मया पासून तृणावरी । एकचि ब्रह्म निर्विकारी । मागें पुढें तळीं उपरीं । सव्य अपसव्य देव ॥ १४ ॥ देवामाजीं देह वावरे । देहामाजींही तेंचि सारे । जेवीं घट आकाशीं फिरे । कीं घटीं आकाश ॥ १५ ॥ ऐसें बुद्धीनें दृढ केलें । बुद्धि नासतां तें न जाय नासलें । जेवीं फुटतां आकाश भंगलें । न जाय कदां ॥ १६ ॥ ज्ञात्याचा देह जरी निमाला । तरी देवरूपचि ज्ञाता उरला । अथवा महाप्रळय जगासी झाला । तरी हानी नव्हे ज्ञात्याची ॥ १७ ॥ देह असतां देवचि झाला । तो देव न नासे जरी देह मेला । ऐशिया अस्तित्वा नास्तिकवाद कल्पिला । विमूढजनीं कीं ॥ १८ ॥ तेणें कोणतें जरी त्यागिलें । कर्म उपासना योग सांग त्या घडले । येर बापुडें कर करूं मेलें । परी व्यर्थ गेलें शेवटीं ॥ १९ ॥ इतरांचें करणें तें न करणें । ज्ञातयाचें न करणें तें करणें । हें जयाचें वर्म तोचि जाणें । येरां तुच्छ वाटे ॥ ५२० ॥ येर आकाराशी देव मानिती । मृन्मयादि पूज्य मूर्ति । अन्य स्थळें ओस दिसती । तेथें देव नाहीं तयां ॥ २१ ॥ मूर्ति भंगतां देव मेला । न विकारतां मानिती जन्मला । हा काय शून्यवाद न वाते तयाला । पापपुण्य भीति असतां ॥ २२ ॥ हे शिव तूं मूर्तिमान् सद्गुरु । त्या तुज न करिती कदां नमस्कारु । शिलामय मूर्ति भाऊन थोरु । पूजिती नमस्कारिती ॥ २३ ॥ हे अविश्वासी सर्व मिळाले । नायकती जरी सत्य सांगितलें । रुचिकर फळाशेसी गुंतले । कामनागुणें ॥ २४ ॥ ऐसें असून जे जे करिती । ते ते व्यर्थ जाय त्यांची कृति । तस्मात् ज्ञानियाची जे सहजस्थिति । तेंचि कर्म तयाचें ॥ २५ ॥ सहज अस्तिभातिप्रिय पाहे । तेचि अखण्ड पूजा होता हे । आत्मा आत्मपणीं संयोग राहे । हाचि योग त्याचा ॥ २६ ॥ नेत्रीं शिवचि पहावा । श्रोत्रीं शिवचि ऐकावा । त्वचें शिवचि आलिंगावा । रसहि घ्यावा शिवाचा ॥ २७ ॥ घ्राणें गंध घ्यावा शिवाचा । क्रियाही शिवरूप आदिवाचा । डोळे उघडतां शिव दिसे साचा । लावितां परिपूर्ण शिव ॥ २८ ॥ स्फूर्ति उठतां शिवरूपें उठे । स्फूर्ति निमतां परिपूर्ण दाटे । भेटूं जातां शिवचि भेटे । नातरी अंगेचि शिव ॥ २९ ॥ जागृतीमाजीं शिवचि भरला । स्वप्नामाजीं शिव उमटला । सुषुप्तीमाजीं तो पूर्ण संचला । विकाराभावीं शिव ॥ ५३० ॥ त्याचा जितुका होय व्यापार । तो तो शिवची सच्चिन्मात्र । ऐसें करणें त्याचें स्वतंत्र । इंद्रिय मनावीण ॥ ३१ ॥ आतां देह जावो कीं राहो । शिवरूप झाला निःसंदेहो । एक शिवचि शिवरूपीं आहों । दुजा भाव नाहीं ॥ ३२ ॥ भज्य भजकत्व गेलें । पूज्य पूजकत्व हरलें । जीवशिव जाऊन उरलें । शिवरूप शिवपणीं ॥ ३३ ॥ देव भक्त गेले दोन्ही । एकला एक पूर्णपणीं । गुरु शिष्य नाढळई परी मिळणी । गुरुशिष्या जेह्तें ॥ ३४ ॥ ऐसा अस्तित्वें उरला ज्ञाता । जेणें होण्याजाण्याची नुरे वार्ता । तयासी नास्तिकवाद म्हणतां । जीभ काय न झडे ॥ ३५ ॥ ऐशा श्रीरामाच्य वृत्ती धाल्या । वचनोक्तीनें निघत्या झाल्या । ऐकतां शिवगुरूसी होती गुदगुल्या । म्हणती धन्य हा ज्ञाता ॥ ३६ ॥ येणें सत्य परोपकारास्तव । प्रयत्नाचा केला गौरव । आत्मार्थ नव्हे हें मीच जाणें शिव । मीच हा म्हणूनि ॥ ३७ ॥ असो आणिक काय राम बोलें । तें निवांत ऐकावें उगले । यास्तव कांहीं न बोलतां मौनें ठें । तेव्हां राम बोलता झाला ॥ ३८ ॥ हे शिवा तूं ज्ञान याच्या ठायीं । बोलिल्या रीतीं अससी निःसंशयीं । आतां सर्व जन समुदायी । बोलूं कैसा राहासी ॥ ३९ ॥ अस्तित्वें असतां आंत बाहेरीं । आकाश जेवीं घटांतरीं । त्यांतही उदक प्रतिबिंबापरी । अंतःकरणीं बिंबशी ॥ ५४० ॥ यथैकमाकाशगमर्कबिंबं क्षुद्रेषु पात्रेषु जलान्वितेषु । भजत्यनेकप्रति बिंबभावं तथा त्वमन्तःकरणेषु देव ॥ ३४ ॥ एकचि आकाशस्य सूर्य जैसा । सान थोर घटजळीं पावे प्रथिभासा । सर्व पिंडीं अंतःकरणीं तूं तैसा । असशी देवा ॥ ४१ ॥ ब्रह्मादि तृणांत देहधारी । हे घट उद्भवले निर्धारी । त्यां माजीं चंचल्वृत्ति सविकारी । हेंचि जीवन घटीं ॥ ४२ ॥ तूं जो सविशेष ईश्वर ।चिद्गगनीं उदेलाशी दिनकर । तोचि तूं अंतःकरणीं भासमात्र । प्रतिबिंबत्वें ॥ ४३ ॥ परी तयासी नाश असे । जळ आटतां प्रतिबिंब नासे । अथवा घट फुटतां जला सरिसें । हरपोनि जाय ॥ ४४ ॥ तेवीं वृत्ति नसतां जीवत्व सरे । पिण्ड मरतां दोन्ही ओसरे । हें असो मुख्य बिंब साचोकारें । खरें कोठें असे ॥ ४५ ॥ सूर्यासी जैसा अस्त होय । तेवीं तुज ईश्वरा मायेसहित लय । आकाश जेवीं नव्हे अस्तोदय । तेवीं चिद्गगन रूप तुझें ॥ ४६ ॥ तें गगन घटींही व्यापलें । पाणी नसतां जैसें संचले । तैसें तुझें रूप अस्तित्वें दाटलें । अंतःकरणाचे अभावीं ॥ ४७ ॥ घट जरी फुटोन जातां । आकाश आकाशीं उरे तत्वतां । तेवीं या सर्वांचा लय होतां । तूं अनंत परिपूर्ण ॥ ४८ ॥ एवं घटीं जेवीं सूर्य आकाश । तेवीं तूं पिंडीं सविशेष निर्विशेष । सविशेष सूर्यासी असे नाश । अविनाश तूं चिद्गगन ॥ ४९ ॥ तूं सविशेषचि या जगाचा कर्ता । केवळ तुझे ठायीं नसे हे वार्ता । हें बोलेन मी निज स्वानुभवता । सद्गुरू पुढें ॥ ५५० ॥ संसर्जने व्याऽप्यवने विनाशे विश्वस्य किंचित्तव नास्ति कार्यम् । अनादिभिः प्राणभृतामदृष्टैस्तथापि तत्स्वप्नवदातनोषि ॥ ३५ ॥ जग हें उत्पन्न करावें कीं पाळावें । कीं अवघें एकदांचि संहारावें । यांत तुझें किमपि कार्य नव्हे । मृगजलवत् आकाशीं ॥ ५१ ॥ अनादि देहभृताचें कर्म । उद्भवूनि पावतसे उपरम । तथापि आरोपिती तूं पुरुषोत्तम । स्वप्नवत् सर्वकर्ता ॥ ५२ ॥ जैसा माळी फळाचे लालुची । उठाठेवी करी बागांची । तैशी तुज आशा कोणती साची । जगाच्या कर्तेपणें ॥ ५३ ॥ तथापि सूर्यावीण मृगजळ नव्हे । तेवीं सविशेषावीण जग हें नुद्भवें । यास्तव तुजवरी कर्तृत्व आरोपावें । परी तेंही सत्य नाहीं ॥ ५४ ॥ जेवीं स्वप्नामाजीं हा जीव । उभवी पाळी हरी स्वप्नभाव । तेवींच जगकर्ता तूं ईश स्वयमेव । परंतु निष्काम ॥ ५५ ॥ सूर्याचें काय मृगजळावांचून । तेवीं तुज काज नसे जगावीण । ईश्वरचि अलिप्त मा तूं निर्गुण । अलेप बोलणें नको ॥ ५६ ॥ असो मायेरहित तूं निर्विकार । तोचि ऊं मायावी जगकर्तार । हा कर्तेपणा घालिती तुजवर । जीव भोक्ता तयापरी ॥ ५७ ॥ निर्विकारत्वें ब्रह्म देहीं । असेचि असे सर्वदांहीं । तया वृत्तियोगें जीवत्व पाहीं । आलें असें भ्रमें ॥ ५८ ॥ तो जीव पिंडीं सुखदुःख भोक्ता । तूं ईश ब्रह्माण्डीं सर्व जगकर्ता । या उभयांवरी आरोपाची वार्ता । घालिती यासी हेतु असे ॥ ५९ ॥ स्थूलस्य सूक्ष्मस्य जडाजडस्य देहस्य शंभो न विदं विनास्ति । अतस्त्वदारोपणमातनोति श्रुतिः पुरारे सुखदुःखयो सदा ॥ ३६ ॥ स्थूलसूक्ष्म जडचंचळ दोनी । देह परप्रकाशें वर्तती जनीं । यांची उत्पत्ति किंवा होतां हानी । न जाणती जडत्वें ॥ ५६० ॥ यास्तव तूं चैतन्य जीवरूप । त्या तुजवरी श्रुति करी आरोप । कीं सुखदुःख भोगाचें माप । अंतरात्म्यासी ॥ ६१ ॥ हे शंभो तूं त्रिपुरांचें करिशी दहन । हें साक्षीरूप नेणती तुझें ज्ञान । अणि देहद्वय जड म्हणून । श्रुति म्हणे तुज कर्ता भोक्ता ॥ ६२ ॥ स्थूलदेह जैसा जड । तेवींच पंचभूतात्मक ब्रह्माण्ड । उत्पत्ति स्थिति कीं लयाचा निवाड । न होय जयाचा तया ॥ ६३ ॥ मनादिक तत्त्वें चंचळ । मायादि गुणांत भासकत्वें सकळ । परी हे परप्रकाशें वर्तती केवळ । हेही उत्पत्ति लय नेणती ॥ ६४ ॥ उत्पत्ती झालिया विषया ओळखिती । परी आपुली केवीं झाली नेणती उत्पत्ति । लय तो सुतरां न जाणती । यास्तव हे परप्रकाश ॥ ६५ ॥ मनीं प्रतिबिंबला तो जीव । मायेंत प्रतिबिंबला तो शिव । या उभयतांचा चेतन स्वभाव । प्रकाश जडांसी ॥ ६६ ॥ म्हणून जीव पिंडीं सुखदुःख भोक्ता । ब्रह्मांडीं ईश्वर सर्वांचा कर्ता । श्रुतिमाउली सांगे जीवाचिये होता । कीं जडचेतन निवडावें ॥ ६७ ॥ अरे जडें हीं काय सुखदुःख जाणती । तरी जीव भोक्ता तो जाणाया प्रति । तेवींच ईश्वरही स्वयंज्योति । उत्पत्ति करी सर्वां ॥ ६८ ॥ असो हे शंभो तुजवरी आरोप । जीवेश भोक्ता कर्ता संकल्प । परी याचा विचार घेतां अल्प । तुज संबंध असेना ॥ ६९ ॥ पाणी हालतां प्रतिबिंब चळे । परी विचारें पाहतां प्रतिबिंब निराळें । तेवीं जीव भोक्ता देहद्वयामुलें । परी जीवास भोग नाहीं ॥ ५७० ॥ पाणियासी काष्टें ताडितां । प्रतिबिंबा न लगे अणुमात्रता । तेवीं चेतनयोगें देहद्वया भोग घडतां । जीवा नाहीं सुखदुःख ॥ ७१ ॥ तैसाचि कर्ता ईश्वर म्हणणें । तरी जाणता काय चळूं जाणे । चंचळ प्रकाशें कांहीं नेणें । यास्तव आरोपणें तें वृथा ॥ ७२ ॥ तस्मात् प्रतिबिंबरूप जीवेश्वरासी । कर्तृत्व भोक्तृत्वें न स्पर्शती अपैशीं । मग सत्चित्घन ब्रह्म आत्मयासी । कर्तृत्व भोक्तृत्व नाहींच ॥ ७३ ॥ सर्वांमाजी ब्रह्म परिपूर्ण । पिंडामाजीं आत्मा सघन । घटींमठीं जेवीं गगन । अलिप्तत्वें अभेद ॥ ७४ ॥ आपण आत्मा ब्रह्म नेणती । सुखदुःख भोग आत्मया म्हणती । आणि ईश्वरही सर्व कर्ता भाविती । परी ते भांति निश्चयें ॥ ७५ ॥ देहद्वयातीत आत्मा ओळखिला । मायाविरहित परमात्मा कळला । तोचि ब्रह्मात्मा आपणचि निश्चया आला । तेव्हां भ्रांति कैंचि ॥ ७६ ॥ तरी कर्तृत्व भोक्तृत्व आटलें । अन्योन्य तादात्म्य निरसलें । मिथ्या तें मिथ्यापणें गेलें । सत्य तें उरलें सत्यत्वें ॥ ७७ ॥ ब्रह्म आत्म एकचि सत्य । येर मायादितृणांत हें असत्य । हे त्रिधा प्रतीति येतां कृतकृत्य । होऊन प्राप्त तें पावले ॥ ७८ ॥ ऐसी निःसंशयता या नांव ज्ञान । मागुतीं सत्यासी मिथ्यत्व न येणें । मिथ्यासी सत्यत्व किमपि न होणें । हेंचि विज्ञान चरमदशा ॥ ७९ ॥ रज्जु जाणतां सकार्य सर्प मेला । ब्रह्म जाणतां प्रपंच निरसला । बंध मोक्षातीत निर्भयत्व पावला । शिवसद्गुरु प्रसादें ॥ ५८० ॥ या अध्यायाचें हेंचि निरूपण । कीं ब्रह्म आत्मा अभेद पूर्ण । यथार्थ कळे गारुड हें संपूर्ण । रज्जुसर्प विवर्तावरी ॥ ८१ ॥ ऐसें जें हें यथार्थ निवडूनी । सांगितलें तैसेंचि माधुन अनुदिनीं । दृढ धरील जो अंतःकरणीं । तो येचि देहीं मुक्त ॥ ८२ ॥ राम म्हणे येथेंही कोणी । शंका करील कीं रज्जु ओळ्खितां नयनीं । सर्प न दिसेचि भ्याडालागुनी । तेव्हां निर्भय खरा झाला ॥ ८३ ॥ ब्रह्म आत्मा अभेदें जाणतां । सर्व मिथ्या कळलें चित्ता । परी न राहेचि हें दिसतां । तेव्हां निर्भय कैसा ॥ ८४ ॥ तरी जपाकुसुमीं स्फटिक ठेविला । तेणें श्वेत असतां तांबडा दिसूं लागला । मणी श्वेत ऐसा जरी कळला । तरी तांबडेपणा दिसे ॥ ८५ ॥ कारण कीं पुष्पाचे सन्निधान ।जोंकाल तोवरी दिसे रक्तवर्ण । कळलें परी न जाय दिसणेंपण । सोपादिक भ्रम ऐसा ॥ ८६ ॥ तेवींच देहद्वय उपाधि जोंवरी । सर्व मिथ्या परी दिसेल तोंवरी । सोपाधिक भ्रमाचिये परी । दिसतां अज्ञान नव्हे ॥ ८७ ॥ मृगजळ मिथ्या यथार्थ कळलें । तरी सत्य न वाटे जरी दिसलें । तैसें मिथ्या कळून जरी भासलें । तरी तो निर्भय अंतरीं ॥ ८८ ॥ मागुतीं शंकाकार म्हणतसे । कीं रज्जुसर्प दृष्टान्त दिधलासे । निरुपाधिक भ्रम हा विवर्तरूप असे । आतां म्हणतां सोपाधिक ॥ ८९ ॥ जोंवरी असे मध्यान्ह काळ । तोंवरी दिसेलचि मृगजळ । हाही दृष्टान्त असे केवळ । सोपाधिकत्वें विवर्त ॥ ५९० ॥ रज्जुसर्प कीं रजतशुक्तीचें । किंवा दिसणें स्थाणुपुरुषाचें । ज्ञान न होतांचि स्थाणु शुक्ति रज्जूचें । सर्प पुरुष रजत न दिसती ॥ ९१ ॥ ऐसे हे विवर्ताचे दृष्टान्त । यांत तुमचा ऐसा संकेत । कीं सर्पादि जितुकें सत्यत्वें भासत । तितुकेंही जगा रूप नाहीं ॥ ९२ ॥ तरी का ब्रह्मज्ञान झालियावरी । जग नच दिसावें सहपरिवारीं । दिसेल म्हणतां उपाधि तोंवरी । आम्हां विरोध वाटे ॥ ९३ ॥ तरी याचें कैसें समाधान । श्रोते हो ऐका सावधान । सर्पांचें जें होतें दिसणें । तें दोरीचें दिसें ॥ ९४ ॥ तेवीं जगाचें दिसणें होतें । तें ब्रह्मरूप झालें समस्तें । कदाही नुपजती नामसंकेतें । अस्ति भातित्वें ब्रह्म ॥ ९५ ॥ दोरीचें दिसणें राहे । तेवीं अस्तित्वें ब्रह्मचि दिसताहे । कळतां सर्पभय कवण लाहे । तेवीं निर्भय द्वैताभावीं ॥ ९६ ॥ दोरीसीच सर्प भाविला । तेवीं अस्तित्वा जगभाव कल्पिला । दोरी कळतां सर्प मेला । ब्रह्म कळतां जग गेलें ॥ ९७ ॥ आतां दिसे ते रज्जु असे । तैसें जग नाहीं ब्रह्म विलसे । तरी विरोध कोणता पहाना कैसें । विचारून अंतरीं ॥ ९८ ॥ मागुतीं एक समाधान । बोलूं तें ऐका सावधपणें । हें दिसतसेच या लागून । तें काय सत्य कीं मिथ्या ॥ ९९ ॥ कर्णें शब्द ऐकावा । त्वचेनें स्पर्श अवलंबावा । डोळियानें जगभाग पहावा । रस घ्यावा जिव्हेनें ॥ ६०० ॥ घ्राण गंधासी घेतसें । कर्मेंद्रिय क्रिया करित अपैसें । संकल्प करिजे तो मानसें । निश्चय करी बुद्धि ॥ १ ॥ एवं हें इतुकें अविद्याकार्य । अविद्याकार्य पंचविषय । तस्मात् अविद्येचा अविद्येसी प्रत्यय । यांत काय आत्मयाचें ॥ २ ॥ आत्मा सर्वत्रीं तरी व्यापक । परी स्पर्शला नाहीं पदार्थ एक । आत्मा न देखे अविद्यात्मक । अविद्यात्मका आत्मा न कळे ॥ ३ ॥ आत्मा ऐके ना चाखे । आत्मा स्पर्शें ना देखे । आत्मा यास नेघे ना ओळखे । अथवा क्रियाही न करी ॥ ४ ॥ आत्मा शब्द अरूप । आत्मा अस्पर्श निर्विकल्प । आत्मा अगंध अल्प । भोग्य ज्~येय नव्हे ॥ ५ ॥ तो निजांगे आत्मा आपण । हें अविद्यात्मक आपणाहून अभिन्न । तरी अविद्येसी अविद्या भासमान । होईन सुखे ॥ ६ ॥ आपण अविद्यात्मक जरी असावें । तरीच मानावें कीं न दिसावें । आपण आत्मा तरी तेणें न पहावें । कालत्रयींही ॥ ७ ॥ तस्मात् निःसंशय जो आत्मा आपण । तयासी नाढळेचि द्वैतभाव । हें हें नामरूपाचें नव्हे दर्शन । आहे तें अस्ति भाति ॥ ८ ॥ एवं रज्जू कळतां जेवीं सर्प मेला । तेवीं ब्रह्मज्ञान होतां अभाव जगाला । या गोष्टीसी ज्ञाताचि मानवला । अज्ञान वेडावे ॥ ९ ॥ परी साधकें पर्थार्थ मानावे । सत्य तें सत्य अंगें व्हावें । मिथ्या तें मिथ्यात्वें त्यागावे । नाहींच म्हणोनि ॥ ६१० ॥ अद्वैतीं द्वैतचि नाहीं । विचारूनि होइजे निःसंदेही । ज्ञान द्वैत म्हणतां सत्य नव्हे कहीं । लय उद्भव असे ज्ञानासी ॥ ११ ॥ ज्या वृत्तीसी अज्ञान होतें आलें । तया वृत्तीसी ज्ञान असे झाले । दोनीही मावळून आत्मत्व उरले । दृढ अपरोक्ष तेंचि ॥ १२ ॥ जेवीं निवळीचें बीज जाण । पाणियाचा सर्व गाळ नासून । आपणही नुरे एक जीवन । उरे जैसें ॥ १३ ॥ तैसें अज्ञान नासून ज्ञान मावळे । मग आपुला आपणचि केवळें । येथेंही ज्ञान मिथ्या तरी अज्ञान जळे । कैसे नि कोणी मानील ॥ १४ ॥ तरी याचें उत्तर ऐका चित्तें । अज्ञान जरी सत्यत्वें असतें । तरी ज्ञानें कदां न निरसतें । परी ऐसें नाहीं ॥ १५ ॥ मिथ्या भूताशि मिथ्या मंत्र । तेवीं मिथ्या अज्ञाना मिथ्या ज्ञान स्वतंत्र । निश्चयेंशी नाशी अणुमात्र । द्वैत उरों ॥ १६ ॥ सूत म्हणे शौनकादिकां । सावध असा कीं श्रवणीं अवांका । गारूड दाविलें तैसा निका । निश्चय करा अंतरें ॥ १७ ॥ ऐसा राम सदाशिवापुढें । स्वानुभवज्ञान बोलिला कोडें । येणें श्रवणें साधक पवाडे । अभिन्नपदीं ॥ १८ ॥ असो रामें केला होता प्रश्न । कीं गारूड दावीच दुराग्रह धरून । तयाचें करवीतसे क्षमापान । नमन स्तवन करूनी ॥ १९ ॥ नमः सच्चिदंभोधिहंसाय तुभ्यं नमः कालकालाय कालात्मकाय । नमस्ते समस्ताघसंहारकर्त्रे नमस्ते मृषाचित्तवृत्त्यैकभोक्त्रे ॥ ३७ ॥ हे सच्चिदानंद सागरा तुज । नमन कालात्मका हंसासहज । नमो कालकाला सद्गुरुराज । अनन्यभावें ॥ ६२० ॥ उत्पत्ति स्थिति जगाचा लयकर्ता । मिथ्या चित्तवृत्तीचा तूं भोक्ता । ऐसा तूं सविशेष मिथ्यात्वें असतां । नमन तुज तदंशें ॥ २१ ॥ सच्चित्सागर तूं निर्विशेष । हंसशब्दें ईश सविशेष । काल काला साकार निर्दोष । तूं जगद्गुरु जगाचा ॥ २२ ॥ एवं ऐशीं तुझीं तिन्हीं रूपें । त्या तुज नमस्कार माझा साक्षेपं । आणि कर्ता भोक्ता हीं जीं दोन्हीं रूपें । तीं तुज सविशेषाचीं ॥ २३ ॥ मिथ्यात्वें तूं जगाचा कर्ता संहर्ता । तेवींच चित्तवृत्तीचाही एक भोक्ता । ऐसा तूं सविशेष ईश तत्वतां । नमन तया मिथ्यासी मिथ्यात्वें ॥ २४ ॥ आतां कालकालात्मक साकारु । अज्ञान भवच्छेदक जगद्गुरु । त्या तुज साष्टांग नमस्कारु । सच्छिष्य भावें ॥ २५ ॥ सच्चिदानंद ब्रह्म परिपूर्ण । तें निर्विशेष सत्य तूं आपण । तेथें मी अन्यय मनावांचून । एकरूपचि सदां ॥ २६ ॥ म्हणजे देहबुद्धिनें तुझा दास । जीवबुद्धीनें तुझा अंश । आत्मबुद्धीनें तरी तूं मी अविनाश । अभेद एकरूप ॥ २७ ॥ श्रीरामें पूर्वीं होतें आक्षेपिलें । यास्तव येणें रीतीं क्षमापविलें । आणिकही हेतूं असती ते ऐकिले । पाहिजेत श्रोत्रीं ॥ २८ ॥ सर्वांध्यायाचें जें निरूपण । एक सत्य ब्रह्म गारुड तयावीण । ऐशिया रीतीं जीवासी व्हावें ज्ञान । यास्तव नमन तुज असो ॥ २९ ॥ सत्य तें सत्यत्वें अंगें व्हावें । मिथ्यात्वें जीवें त्यागावें । या हेतूस्तव तुजसी साष्टांग भावें । नमन माझें ॥ ६३० ॥ अधिकारी ते सहज सुटती । अनधिकारी वचन अव्हेरिती । हें नेणून म्यां केली विनंति । ते क्षमा क्षमा ॥ ३१ ॥ हे शंभो श्रीसद्गुरुनाथा । तुजसी प्रार्थना इतुकीच समर्था । उपेक्षूं नये कवण्याही अनाथा । शरणागतासी ॥ ३३ ॥ सूत म्हणे शौनका लागून । रामें शिवासी ऐसें क्षमापवून । साष्टांग दण्डप्राय घाली नमन । तया विश्वरूपापुढें ॥ ३४ ॥ सूत उवाच - एवं प्रणम्य विश्वेशं पुरतः प्रांजलिः स्थितः । विस्मितः परमेशानं जगाद रघुनंदनः ॥ ३८ ॥ या रीतीं नमस्कार करून । पुढें राहिला अंजलीपुट जोडून । परम विस्मित अंतरीं रघुनन्दन । बोलता झाला ईशाप्रति ॥ ३५ ॥ श्रीराम उवाच - उपसंहर विश्वात्मन् विश्वरूपमिदं तव । प्रतीतं जगदैकात्म्यं शंभो भवदनुग्रहाद् ॥ ३९ ॥ हे विश्वात्मया त्रिपुरारि । हें ताफ़ुड आपुलें उपसंहारीं । तूं एकचि विश्वरूप हे प्रतीति खरी । आलीसे जीवा ॥ ३६ ॥ या जगामाजीं मीच एकला । कीं मजमाजीं ब्रह्मगोळ उभवला । जगत्भाव न होऊन दिसला । गारुडापरी मद्रूपीं ॥ ३७ ॥ हे शंभो ऐशी तुझिया अनुग्रहें । जो कोणी स्थिति स्वात्मत्वें लाहे । तो तूंच निर्विशेषत्वें आहे । येथें संदेह नाहीं ॥ ३८ ॥ तरी आतां हे विश्वरूप लोपवीं । पूर्वरूपें मजला व्यक्ति दावीं । कारण तुझी वचनोक्ति आणिक ऐकावी । हे इच्छा पुरवी माझी ॥ ३९ ॥ श्रीभगवान् उवाच - पश्य राम महाबाहो मत्तो नान्योऽस्तिकश्चन । सूत उवाच - इत्युक्त्वैवोपसंजर्हे स्वदेहे देवताधिकान् ॥ ४० ॥ पाहें रामा मजवीण कांहीं । सर्वथा अन्य दुसरें नाहीं । ऐसें बोलून स्वकीय देहीं । देवादि जग आटोपिलें ॥ ६४० ॥ अस्ति भाति माझें प्रियरूप । त्यावरी जगादि हें नामरूप । ईश्वरासहित तृणांत आरोप । रज्जुसर्पापरी ॥ ४१ ॥ हें पुरतें पाहे निश्चयात्मक । गारुड असे नव्हे वास्तविक । आत्मा ब्रह्म तरी एकरूपक । मुळींच आहे ॥ ४२ ॥ संशय होता तुझिये चित्तीं । हें सत्य परी जीव न मानिती । यास्तव दाविली गारुड संपत्ति । मायिक ईश्वराची ॥ ४३ ॥ तरी आतां जीवें भावें । ईशासह जग सत्य न मानावें । आत्मा ब्रह्म भिन्न कदां न व्हावें । हेंचि मुख्य ज्ञान ॥ ४४ ॥ ऐसें ज्ञान हें निःसंशय । गुरुमुखें पावावें अद्वय । तो येचि देहीं मुक्त होय । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ४५ ॥ शौनकांदिकांसी म्हणे सूत । इतुकें बोलून देवतांसहित । जगरूप गारुड सर्व आटोपित । जैसा गारोडी खेळ पोतडीत ॥ ४६ ॥ तेवीं अनंत ब्रह्मांडांचा खेळ । पूर्वदेहीं सांठवून सकळ । पूर्ववत् कंठनीळ । ध्येयमूर्ति साजिरी ॥ ४७ ॥ मीलिताक्षः पुनर्हर्षाद्यावद् राम प्रपश्यति । तावदेव गिरेः श्रृंगे व्याघ्रचर्मोपरि स्थितम् ॥ ४१ ॥ ददर्श पंचवदनं नीलकंठं त्रिलोचनम् । व्याघ्रचर्माम्ब्रधरं भूतिभूषितविग्रहम् ॥ ४२ ॥ विश्वरूपाचें तेजेंकडून । मीलिताक्ष होता रघुनंदन । मग जों जों पाहे नेत्र उघडून । तों तों ध्येमूर्ति दिसे ॥ ४८ ॥ गिरिश्रृंगापरी रथीं बैसला । वरी व्याघ्रचर्म पांघुरला । ऐसा पंचवदन देखिला । नीकलंठ त्रिनयन ॥ ४९ ॥ दुसरें व्याघ्रचर्म असे नेसत । देह अवघा विभूति भूषित । घवघवीत कर्पूर पर्वत । राम पाहता झाला ॥ ६५० ॥ फणिकंकण भूषाढ्यं नागयज्ञोपवीतिनम् । व्याघ्रचर्मोत्तरीयं च विद्युत्पिंगजटाधरम् ॥ ४३ ॥ एकाकिनं चंद्रमौलिं वरेण्यमभयप्रदम् । चतुर्भुजं खड्ण्डपरशुं मृगहस्तं जगत्पतिम् ॥ ४४ ॥ सर्पांची वेटाळीं सलक्षण । तेवीं शोभतीं करीं कंकणें । यज्ञोपवीतही लंबायमान । रुळे गळां नागाचें ॥ ५१ ॥ व्याघ्रचर्म नेसे पांघुरे । तींचि भूषणें होतीं भयंकरें । विजे ऐशा पिंग जटाधारे । जटा असती बांधिल्या ॥ ५२ ॥ त्यामाजी चंद्र भाळीं धरिला । ऐसा एकला सर्वश्रेष्ठ देखिला । अभयप्रद वरुता हस्त केला । ना भि म्हणून भक्तां ॥ ५३ ॥ चतुर्भुज परशु हातीं । मृग श्रृंगादि आयुधें शोभती । ऐसा रमें देखिला जगत्पति । जग खेळ जयाचा ॥ ५४ ॥ राम देखून संतोषला । साष्टांग दंडवत घातिला । शिवही कृपेनें बोलाविता झाला । रथावरी रामासी ॥ ५५ ॥ अथाज्ञया पुरस्तस्य प्रणम्योपविवेश सः । अथाग रामं देवेशो यद् यद् प्रष्टुमभीच्छसि । तत्सर्वं पृच्छ राम त्वं मत्तो नान्योऽस्ति ते गुरुः ॥ ४५ ॥ इति श्रीपद्मपुराणे शिवगीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघव संवादे विश्वरूपदर्शनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥ मग शिवाचे आज्ञेकडून साष्टांग नमस्कार घालून । शिवापुढें बैसला जाऊन । कर जोडोनि राम ॥ ५६ ॥ नंतर सर्वात्मा श्रेशंकरू । सर्व देव देव जगद्गुरु । रामाप्रति वरदोत्तरू । बोलता झाला ॥ ५७ ॥ अगा रामा हें अवधारी । जगदोद्धार करावा तुझें अंतरीं । तरी जें ईप्सित असे झडकरी । तें तें पुसें मज ॥ ५८ ॥ तूं सर्व जीवांचा जीव । अधिकारी होशी मदैक्य भाव । तरी तुजला मजवीण गुरुदेव । कोण असे दुसरा ॥ ५९ ॥ सर्व जीवांस बोध करावया । मीच जगद्गुरू गा रामराया । तरी जें जें आवडतें तें पुसावया । अनुमान न करी ॥ ६६० ॥ शिष्याचें द्रव्य हरून घ्यावें । नाना कौंटाळें सामर्थ्य दावावें । शेवटीं जन्ममरणा हातीं द्यावें । ते ते अन्य असद्गुरू ॥ ६१ ॥ सेवा चुकतां शाप देती । न चुकतां तरी उगें बोलती । कीं मोक्ष होईल तुजला अंतीं । ते ते अन्य असद्गुरू ॥ ६२ ॥ तया असद्गुरूचें लक्षण । बहुप्रकारें अत्यंत हीन । सांगतां वाणीसी असे शीण । परी अल्परीतीं समजावें ॥ ६३ ॥ ऐसे जे जगांत असद्गुरू । द्रवभोंदु विषयी पामरु । ते ते मी नव्हें निर्विकारू । उपदेशकर्ता जीवां ॥ ६४ ॥ जो शिष्याचा अधिकार पाहुन । अन्य सर्व मतांसी सांडून । उपदेशी ब्रह्माभिन्नज्ञान । तो मीच सद्गुरू ॥ ६५ ॥ तयासी मनुष्य म्हणूं नये । तो साकारेंशी ब्रह्ममय । तेथें साधकें ज्ञान साधन उपाय । पुसावें अपेक्षित ॥ ६६ ॥ मीच तो भाव नसे दुजा । तो मीच सर्व जीवां । एक गुरूराजा ऐसें हें समजून राजाधिराजा । प्रश्न करी ईप्सित ॥ ६७ ॥ तुज बोलावयाचें तें बोलिलें । सुद्ध ब्रह्मज्ञान निरूपिलें । परी आणिकही हेतु असती जेतुले । तेतुले पुसें मी सांगेन ॥ ६८ ॥ सूत म्हणे शौनकादिकांसी । शिवाचीं वचनें ऐकून ऐशीं । तथास्तु म्हणून लागे चरणांसी । अत्यादरें राम ॥ ६६९ ॥ ॥ इति श्रीमद्वेदेश्वरी - शिवगीता पद्म पुराणांतरी - जगगारूड स्वानुभवानुकारी - सप्तमोध्याऽयः ॥ ७ ॥ श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु ॥ श्रीशिवंभवतु ॥ ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥ |