॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ षष्ठोऽध्यायः - अध्याय सहावा ॥

श्रीराम उवाच -
भगवन्नत्र मे चित्रं महदेतत्प्रजायते ।
शुद्धस्फटिकसंकाशस्त्रिनेत्रश्चन्द्रशेखरः ॥ १ ॥
मूर्तस्त्वं तु परिच्छिन्नाकृतिः पुरुषरूपधृक् ।
अम्बया सहितोऽत्रैव रमसे प्रमथैः सह ॥ २ ॥
राम म्हणाला, हे भगवन् , ह्याविषयीं मला मोठे आश्चर्य वाटते की, स्फटिकमण्यासारखी शरीरकांति असलेला, त्रिनेत्र, चंद्रशेखर, असा परिच्छिन्नाकृति, मूर्त, पुरुषरूप धारण करणारा तूं येथें पार्वतीसह व प्रमथ गणांसह रममाण होत आहेस. १-२.

त्वं कथं पञ्चभूतादि जगदेतच्चराचरम् ।
तद्ब्रूहि गिरिजाकान्त मयि तेऽनुग्रहो यदि ॥ ३ ॥
श्रीभगवानुवाच -
साधु पृष्टं महाभाग दुर्ज्ञेयममरैरपि।
तत्प्रवक्ष्यामि ते भक्त्या ब्रह्मचर्येण सुव्रत ॥ ४ ॥
तो तूं पंचमहाभूतें ज्याच्या उत्पत्तीला आदिकारण आहेत असे हे चराचर जगत् कसा आहेस हें तुझा माझ्यावर अनुग्रह आहे तर सांग. शंकर म्हणाले, हे महाभागा, बरा प्रश्न केलास. जें देवांस समजावयास कठिण, ते हे सुव्रता, भक्तीनें व ब्रह्मचर्यानें ( प्रसन्न झालेला मी ) तुला सांगतो. ३-४.

पारं यास्यस्यनायासाद्येन संसारनीरधेः ।
दृश्यन्ते पञ्चभूतानि ये च लोकाश्चतुर्दश ॥ ५ ॥
समुद्राः सरितो देवा राक्षसा ऋषयस्तथा ।
दृश्यन्ते यानि चान्यानि स्थावराणि चराणि च ॥ ६ ॥
गन्धर्वाः प्रमथा नागाः सर्वे ते मद्विभूतयः ।
पुरा ब्रह्मादयो देवा द्रष्टुकामा ममाकृतिम् ॥ ७ ॥
मंदरं प्रययुः सर्वे मम प्रियतरं गिरिम् ।
स्तुत्वा प्राञ्जलयो देवा मां तदा पुरतः स्थिताः ॥ ८ ॥
याचे योगानें अनायासाने संसारसागराच्या पलीकडे जाशील. जीं पंचमहाभूतें दिसतात, तसेच चतुर्दश लोक, समुद्र, नद्या, देव, राक्षस, ऋषि,तसेच इतर स्थावरजंगम प्राणी, गंधर्व, प्रमथगण, नाग हे सर्व माझ्याच विभूति आहेत. पूर्वीं ब्रह्मदेवादि देव, माझे स्वरूप पहाण्याच्या इच्छेने मला अत्यंत प्रिय अशा मंदरपर्वतावर गेले आणि माझी स्तुति करून अंजलि जोडून माझ्यापुढे उभे राहिले. ५-८.

तान्दृष्ट्वाथ मया देवान् लीलाकुलितचेतसः ।
तेषामपहृतं ज्ञानं ब्रह्मादीनां दिवौकसाम् ॥ ९ ॥
त्यांना पाहून त्या ब्रह्मादि देवांचे ज्ञान लीलेनें युक्त झालेल्या मी हरण केलें. ९.

अथ तेऽपहृतज्ञाना मामाहुः को भवानिति ।
अथाब्रुवमहं देवानहमेव पुरातनः ॥ १० ॥
ज्ञानहीन होत्साते ते "तूं कोण ?" असे मला म्हणाले. तेव्हां मीं उत्तर दिले की मी पुरातन आहे. १०.

आसं प्रथममेवाहं वर्तामि च सुरेश्वराः ।
भविष्यामि च लोकेऽस्मिन्मत्तो नान्यस्ति कश्चन ॥ ११ ॥
हे देवहो, सृष्टीच्या पूर्वीं मीच होतो, वर्तमानकालीं मीच आहे व पुढेही मीच असेन. माझ्याशिवाय या लोकीं दुसरा कोणी नाहीं. ११.

व्यतिरिक्तं च मत्तोऽस्ति नान्यत्किञ्चित्सुरेश्वराः ।
नित्योऽनित्योऽहमनघो ब्रह्मणां ब्रह्मणस्पतिः ॥ १२ ॥
देवहो, मी ज्यांत नाही अशी कांहींच वस्तु नाहीं. नित्य, अनित्य, पापरहित, वेदांचा व ब्रह्मदेवाचाही मी स्वामी आहे. १२.

दक्षिणाञ्च उदञ्चोऽहं प्राञ्चः प्रत्यञ्च एव च ।
अधश्चोर्ध्वं च विदिशो दिशश्चाहं सुरेश्वराः ॥ १३ ॥
दक्षिणेकडे, उत्तरेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे, खालीं, वर, पूर्वादि दिशा व आग्नेय्यादि विदिशा मीच. १३.

सावित्री चापि गायत्री स्त्री पुमानपुमानपि ।
त्रिष्टुब्जगत्यनुष्टुप् च पंक्तिश्छन्दस्त्रयीमयः ॥ १४ ॥
गायत्री, स्त्री, पुरुष, नपुंसक, त्रिष्टुप् , जगती, अनुष्टुप् , पंक्ति, छंद,मीच आहे. मी वेदमय आहे. १४.

सत्योऽहं सर्वगः शान्तस्त्रेताग्निर्गौर्यहं गुरुः ।
गौर्यहं गह्वरं चाहं द्यौरहं जगतां विभुः ॥ १५ ॥
सर्वत्र सत्य, शांत, त्रेताग्नि, गुरुपणा, गुरु, वाणी, वाणीचे रहस्य, स्वर्ग, सर्व जग व्यापणारा मीच आहे. १५.

ज्येष्ठः सर्वसुरश्रेष्ठो वरिष्ठोऽहमपांपतिः ।
आर्योऽहं भगवानीशस्तेजोऽहं चादिरप्यहम् ॥ १६ ॥
सर्वांहून ज्येष्ठ, सर्व देवांत श्रेष्ठ, ज्ञानानें वर्षिष्ठ, सर्व उदकांचा पति, सर्वांहून पूज्य, षड्गुणैश्वर्यसंपन्न, ईश्वर, तेज आणि तेजाचा आदि [वायु ] मीच आहे. १६.

ऋग्वेदोऽहं यजुर्वेदः सामवेदोऽहमात्मभूः ।
अथर्वणश्च मन्त्रोऽहं तथा चाङ्गिरसो वरः ॥ १७ ॥
स्वयंभु ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, मंत्र आणि अंगिरसांमध्ये श्रेष्ठ मी आहे. १७.

इतिहासपुराणानि कल्पोऽहं कल्पवानहम् ।
नाराशंसी च गाथाहं विद्योपनिषदोऽस्म्यहम् ॥ १८ ॥
इतिहास, पुराणे, कल्पसूत्रे, त्यांचे प्रवर्तक (बौधायनादि) ऋषि, नाराशंसीनामक गाथा, उपासनाकांड, उपनिषदें मी आहे. १८.

श्लोकाः सूत्राणि चैवाहमनुव्याख्यानमेव च ।
व्याख्यानानि परा विद्या इष्टं हुतमथाहुतिः ॥ १९ ॥
दत्तादत्तमयं लोकः परलोकऽहमक्षरः ।
क्षरः सर्वाणि भूतानि दान्तिः शान्तिरहं खगः ॥ २० ॥
श्लोक, सूत्रें, व्याख्यानें, अनुव्याख्यानें, अध्यात्मविद्या, यज्ञ, होम, आहुति, दिलेलें अथवा द्यावयाचें दान, इहलोक, परलोक, मी आहे. मी शाश्वत आहे. सर्व प्राणी नश्वर आहेत. इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह, जीव मीच आहे. १९-२०.

गुह्योऽहं सर्ववेदेषु आरण्योहमजोऽप्यहम् ।
पुष्करं च पवित्रं च मध्यं चाहमतः परम् ॥ २१ ॥
बहिश्चाहं तथा चान्तः पुरस्तादहमव्ययः ।
ज्योतिश्चाहं तमश्चाहं तन्मात्राणीन्द्रियाण्यहम् ॥ २२ ॥
बुद्धिश्चाहमहंकारो विषयाण्यहमेव हि ।
ब्रह्मा विष्णुर्महेशोहमुमा स्कन्दो विनायकः ॥ २३ ॥
इन्द्रोऽग्निश्च यमश्चाहं निरृतिर्वरुणोऽनिलः ।
कुबेरोऽहं तथेशानो भूर्भुवः स्वर्महर्जनः ॥ २४ ॥
तपः सत्यं च पृथिवी चापस्तेजोऽनिलोऽप्यहम् ।
आकाशोऽहं रविः सोमो नक्षत्राणि ग्रहास्तथा ॥ २५ ॥
प्राणः कालस्तथा मृत्युरमृतं भूतमप्यहम् ।
भव्यं भविष्यत्कृत्स्नं च विश्वं सर्वात्मकोऽप्यहम् ॥ २६ ॥
सर्व वेदांचे गुह्य जे आरण्यक तें मी आहे. जन्मरहित, पवित्र, सर्वांचा मध्य, बाहेर, आंत, पुढे सर्वत्र नाशरहित मी आहे. तेज, अंधकार, इंद्रियांचे विषय व इंद्रियें, बुद्धि, अहंकार, विषय, ब्रह्मदेव, विष्णु, महेश्वर, उमा, स्कंद, गणपति, इंद्र, अग्नि, यम, निर्ऋति, वरुण, वायु, कुबेर, ईशान, भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यम्, पृथिवी, उदक, तेज, वायु, आकाश, सूर्य, चंद्र, नक्षत्रे, ग्रह, प्राण, काल, मृत्यु, अमृत, भूत, वर्तमान, भविष्य, संपूर्ण विश्व, असा सर्वरूप मीच आहे. २१-२६.

ओमादौ च तथा मध्ये भूर्भुवः स्वस्तथैव च ।
ततोऽहं विश्वरूपोऽस्मि शीर्षं च जपतां सदा ॥ २७ ॥
आरंभीं ॐकार, मध्यें व्याहृती, नंतर गायत्री आणि शेवटीं गायत्रीशीर्ष हा जपप्रकार माझेंच स्वरूप. मी विराट्‌रूप आहे. २७.

अशितं पायितं चाहं कृतं चाकृतमप्यहम् ।
परं चैवापरं चाहमहं सर्वपरायणः ॥ २८ ॥
भक्षण केलेलें, प्राशन केलेलें, कृत, अकृत, पर, अपर आणि सर्वांचा आश्रय मीच आहे. २८.

अहं जगद्धितं दिव्यमक्षरं सूक्ष्ममव्ययम् ।
प्राजापत्यं पवित्रं च सौम्यमग्राह्यमग्रियम् ॥ २९ ॥
अहमेवोपसंहर्ता महाग्रासौजसां निधिः ।
हृदि यो देवतात्वेन प्राणत्वेन प्रतिष्ठितः ॥ ३० ॥
दिव्य असें जगताचे हित, अक्षर, सूक्ष्म मीच. प्रजापति व सोम देवता ज्याची असें पवित्र मीच. अग्राह्य, सर्वांचा आदि, सर्वांचा संहारकर्ता, गुरुत्वानें मोठे व तेजाने मोठे अशा सर्व पदार्थांचे अधिष्ठान, प्राणिमात्रांच्या हृदयांत प्राणरूपानें व देवतारूपाने रहाणारा मीच, २९-३०.

शिरश्चोत्तरतो यस्य पादौ दक्षिणतस्तथा ।
यश्च सर्वोत्तरः साक्षादोङ्कारोऽहं त्रिमात्रकः ॥ ३१ ॥
ज्याचे शिर उत्तरेकडे, ज्याचे पाद दक्षिणेकडे, ज्याचे अंतर मध्यभागीं, असा त्रिमात्रात्मक ओंकार मीच. ३१.

ऊर्ध्वं चोन्नामहे यस्मादधश्चापनयाम्यहम् ।
तस्मादोङ्कार एवाहमेको नित्यः सनातनः ॥ ३२ ॥
म्हणूनच त्याचा जप करणार्‍याला मी ऊर्ध्व [ स्वर्गादि ] लोकीं नेतों व ते पुण्य क्षीण झाले म्हणजे खाली आणतों. तस्मात् निरंतर एकरूप व सनातन असा ओंकार मीच. ३२.

ऋचो यजूंषि सामानि यो ब्रह्मा यज्ञकर्मणि ।
प्रणामहे ब्राह्मणेभ्यस्तेनाहं प्रणवो मतः ॥ ३३ ॥
यज्ञकर्मांत ब्रह्मा ह्या नांवाचा ऋत्विक् होऊन ऋक्, यजु, साम ह्या वेदांचे मंत्र ऋत्विजांस उपस्थित करतों म्हणून मी प्रणवरूप आहे. ३३,

स्नेहो यथा मांसपिण्डं व्याप्नोति व्याप्ययत्यपि ।
सर्वान् लोकानहं तद्वत्सर्वव्यापी ततोऽस्म्यहम् ॥ ३४ ॥
जसें स्नेहद्रव्य मांसपिंडाला व्यापतें व तो भक्षण करणार्‍याच्या सर्व देहालाही तें व्यापतें, तद्वत् सर्व लोकांना मी व्यापतों म्हणून मी सर्वव्यापी आहे. ३४.

ब्रह्मा हरिश्च भगवानाद्यन्तं नोपलब्धवान् ।
ततोऽन्ये च सुरा यस्मादनन्तोऽहमितीरितः ॥ ३५ ॥
ब्रह्मदेव, भगवान् विष्णु व इतर देव ह्यांसही माझा आदि आणि अंत समजत नाहीं म्हणून मला अनंत म्हणतात. ३५.

गर्भजन्मजरामृत्युसंसारभवसागरात् ।
तारयामि यतो भक्तं तस्मात्तारोऽहमीरितः ॥ ३६ ॥
गर्भवास, जन्म, जरा, मृत्यु इत्यादि संसारसागरापासून भक्ताला तारतों म्हणून मला तार म्हणतात. ३६.

चतुर्विधेषु देहेषु जीवत्वेन वसाम्यहम् ।
सूक्ष्मो भूत्वा च हृद्देशे यत्तत्सूक्ष्मं प्रकीर्तितः ॥ ३७ ॥
चतुर्विध जीवांचे ठायीं जीवरूपाने व त्यांच्या हृदयाकोशांत सूक्ष्मरूपानें वास करतों म्हणून मला सूक्ष्म म्हणतात. ३७.

महातमसि मग्नेभ्यो भक्तेभ्यो यत्प्रकाशये ।
विद्युद्वदतुलं रूपं तस्माद्विद्युतमस्म्यहम् ॥ ३८ ॥
मोठ्या अज्ञानरूप अंधकारांत बुडालेल्या भक्तजनांकरितां मी विद्युल्लतेसारखें निरुपम तेजोरूप प्रकट करतों म्हणून मी वैद्युत् आहे. ३८.

एक एव यतो लोकान् विसृजामि सृजामि च ।
विवासयामि गृह्णामि तस्मादेकोऽहमीश्वरः ॥ ३९ ॥
मी एकटाच सर्व लोकांस मारतों, उत्पन्न करतों, राहवितों म्हणून मी एकटा ईश्वर आहे. ३९.

न द्वितीयो यतस्तस्थे तुरीयं ब्रह्म यत्स्वयम् ।
भूतान्यात्मनि संहृत्य चैको रुद्रो वसाम्यहम् ॥ ४० ॥
प्रलयकालीं दुसरा कोणीच शेष राहिलेला नाहीं. केवळ तुरीय गुणत्रयातीत जें ब्रह्म तो मी सर्वभूतांचा आपल्या स्वरूप उपसंहार करून, एकच रुद्र रहातों. ४०.

सर्वांल्लोकान्यदीशेहमीशिनीभिश्च शक्तिभिः ।
ईशानमस्य जगतः स्वर्दृशं चक्षुरीश्वरम् ॥ ४१ ॥
मी सर्व लोकांवर ईशिनी शक्तीनीं सत्ता चालवितों म्हणून दिव्य द्रष्टा सर्वांचा चक्षु असा या जगाचा मी ईशान आहे. ४१.

ईशानश्चास्मि जगतां सर्वेषामपि सर्वदा ।
ईशानः सर्वविद्यानां यदीशानस्ततोऽस्म्यहम् ॥ ४२ ॥
सर्व जगाचा मी सर्वदा ईश आहे. सर्व विद्यांचा अधिपति आहे, म्हणून ईशान हे मला नाम आहे. ४२.

सर्वभावान्निरीक्षेऽहमात्मज्ञानं निरीक्षये ।
योगं च गमये तस्माद्भगवान्महतो मतः ॥ ४३ ॥
मी सर्व पदार्थ जाणतों, भक्तांना आत्मज्ञानाचा उपदेश करतों, योगाप्रत नेतों, म्हणून श्रेष्ठ पुरुष मला भगवान् म्हणतात. ४३.

अजस्रं यच्च गृह्णामि विसृजामि सृजामि च ।
सर्वांल्लोकान्वासयामि तेनाहं वै महेश्वरः ॥ ४४ ॥
सर्वदा मी सर्व लोकांचे ग्रहण नाश, उत्पत्ति आणि स्थिति करतों. त्यामुळे मला महेश्वर म्हणतात. ४४.

महत्यात्मज्ञानयोगैश्वर्ये यस्तु महीयते ।
सर्वान् भावान् परित्यज्य महादेवश्च सोऽस्म्यहम् ॥ ४५ ॥
आत्मज्ञान, योग, ऐश्वर्य इत्यादि गुणांनी आपल्या महत्त्वाने जो सर्वांमध्ये अधिक महत्त्व पावतो असा महादेव मी आहे. ४५.

एषोऽस्मि देवः प्रदिशो नु सर्वाः
    पूर्वो हि जातोस्म्यहमेव गर्भे ।
अहं हि जातश्च जनिष्यमाणः
    प्रत्यग्जनस्तिष्ठति सर्वतोमुखः ॥ ४६ ॥
तो हा मी श्रुतिप्रतिपादित देव सर्व प्रदिशा आहे, सर्व दिशांचे ठायीं आहे. सर्वांच्या पूर्वी जन्म पावलेला, गर्भांत वास करणारा, गर्भापासून निर्गत, पुढे उत्पन्न होणारा मीच आणि सर्व लोक मीच. म्हणूनच मला सर्वदिशांस मुखें आहेत. ४६.

विश्वतश्चक्षुरुत विश्वतोमुखो
    विश्वतोबाहुरुत विश्वतस्पात् ।
संवाहुभ्यां धमति सम्पतत्रै-
    र्द्यावाभूमी जनयन्देव एकः ॥ ४७ ॥
सर्व जगताशीं तादात्म्य असल्यामुळे मला सर्वत्र नेत्र आहेत. सर्वत्र मुखें आहेत, सर्वत्र बाहु आहेत व सर्वत्र पाद आहेत. तो मी बाहूंनीं व पादांनीं स्वर्ग आणि पृथिवी ह्यांना उत्पन्न करून प्रेरणा करतों. तथापि मी देव एकच आहे. ४७.

वालाग्रमात्रं हृदयस्य मध्ये
    विश्वं देवं जातवेदं वरेण्यम् ।
मामात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरा-
    स्तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम् ॥ ४८ ॥
हृदयांत केशाच्या अग्राइतक्या सूक्ष्म रूपानें राहणारा विश्वव्यापक, स्वप्रकाश, श्रेष्ठ, अशा मला जे कुशल पुरुष 'आत्मस्थ' असे एकरूपाने जाणतात, त्यांस शाश्वत मोक्षसुख प्राप्त होते, इतरांना नाहीं. ४८.

अहं योनिमधितिष्ठामि चैको
    मयेदं पूर्णं पञ्चविधं च सर्वम् ।
मामीशानं पुरुषं देवमीड्यं विदित्वा
    निचाय्येमां शान्तिमत्यन्तमेति ॥ ४९ ॥
जगाचा आधार मी सत्य व एकरूप आहे. मींच हे पंचभूतात्मक जगत् धारण केले आहे. असा ईश्वर जो मी त्या माझ्या स्वरूपाविषयीं जो विवेक करील त्याला आत्यंतिक शांति-मोक्ष-प्राप्त होईल, ४९.

प्राणेष्वन्तर्मनसो लिङ्गमाहु-
    रस्मिन्क्रोधोउआ च तृष्णा क्षमा च ।
तृष्णां हित्वा हेतुजालस्य मूलं
    बुद्ध्या चित्तं स्थापयित्वा मयीह ।
एवं ये मां ध्यायमाना भजंते
    तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम् ॥ ५० ॥
प्राणांच्याही आंत मन आहे. त्या ठिकाणीं क्रोध, तृष्णा, व क्षमा राहतात. म्हणून, शुभाशुभफलप्राप्तीला कारण जी विषयतृष्णा तिला जिंकून, निश्चयात्मक बुद्धीनें माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून, जे माझें ध्यान करतात, त्यांस शाश्वत शांति [ मोक्षसुख ] प्राप्त होते; इतरांना नाहीं. ५०.

यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ।
आनन्दं ब्रह्म मां ज्ञात्वा न बिभेति कुतश्चन ॥ ५१ ॥
ज्या ठिकाणी वाणीची गति नाहीं, जे मनालाही प्राप्त होत नाही, असे जे आनंदरूप परब्रह्म तो मी आहे; असें जो जाणील त्याला कोणापासून भय प्राप्त होत नाहीं. ५१.

श्रुत्वेति देवा मद्वाक्यं कैवल्यज्ञानमुत्तमम् ।
जपन्तो मम नामानि मम ध्यानपरायणाः ॥ ५२ ॥
सर्वे ते स्वस्वदेहान्ते मत्सायुज्यं गताः पुरा ।
ततोऽग्रे परिदृश्यन्ते पदार्था मद्विभूतयः ॥ ५३ ॥
मोक्षाचे ज्ञान करून देणारें हें माझें भाषण, श्रवण करून देव माझ्या नामाचा जप करीत, ध्यानपरायण होऊन, देहांती सर्व माझ्या स्वरूपीं सायुज्य पावले; आता जे हे पदार्थ दिसतात हे सर्व माझ्या विभूति आहेत. ५२-५३.

मय्येव सकलं जातं मयि सर्वं प्रतिष्ठितम् ।
मयि सर्वं लयं याति तद्ब्रह्माद्वयमस्म्यहम् ॥ ५४ ॥
माझ्या ठिकाणी सर्व उत्पन्न झालें, माझ्यावरच राहिलें आहे व माझ्याच ठायीं लय पावेल असा अद्वय ब्रह्मरूपच मी आहे. ५४.

अणोरणीयानहमेव तद्व-
    न्महानहं विश्वमहं विशुद्धः ।
पुरातनोऽहं पुरुषोऽहमीशो
    हिरण्मयोऽहं शिवरूपमस्मि ॥ ५५ ॥
मी सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, मोठ्याहून मोठा, विश्वरूप, लेपरहित, पुरातन पुरुष, सर्वेश्वर, तेजोमय, आणि शिवरूप असा आहे. ५५.

अपाणिपादोऽहमचिन्त्यशक्तिः
    पश्याम्यचक्षुः स शृणोम्यकर्णः ।
अहं विजानामि विविक्तरूपो
    न चास्ति वेत्ता मम चित्सदाहम् ॥ ५६ ॥
मला हात नाहीत, पाय नाहींत, माझ्या शक्ति अचिंत्य आहेत, नेत्र नसून मी पहातों; कर्ण नसून ऐकतो; मी सर्व जाणतों, मला मात्र जाणणारा कोणी दिसत नाहीं. सर्वदा मी चैतन्यरूप आहे. ५६.

वेदैरशेषैरहमेव वेद्यो
    वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ।
न पुण्यपापे मम नास्ति नाशो
    न जन्म देहेन्द्रियबुद्धिरस्ति ॥ ५७ ॥
सर्व वेदांनी जाणावयाचें तो मीच, वेदांताचा कर्ता व वेदवेत्ता मीच; मला पुण्य नाहीं, पाप नाहीं, नाश नाहीं, जन्म नाहीं; तसेंच देह व इंद्रिये यांचे ज्ञानही नाहीं. ५७.

न भूमिरापो न च वह्निरस्ति
    न चानिलो मेऽस्ति न मे नभश्च ।
एवं विदित्वा परमात्मरूपं
    गुहाशयं निष्कलमद्वितीयम् ॥ ५८ ॥
समस्तसाक्षिं सदसद्विहीनः
    प्रयाति शुद्धं पर्मात्मरूपम् ॥ ५९ ॥
भूमि, उदक, तेज, वायु आणि आकाश ह्यांचा मला लेप नाहीं. असा, पंचकोशात्मक गुहेंत वास करणारा, निर्विकार, संगातीत, सर्वसाक्षी, कार्यकारणभेदानें रहित परमात्मा जो मी त्या माझ्या ज्ञानानें मनुष्य शुद्ध परमात्मस्वरूप पावतो. ५८-५९.

एवं मां तत्त्वतो वेत्ति यस्तु राम महामते ।
स एव नान्य लोकेषु कैवल्यफलमश्नुते ॥ ६० ॥
हे रामचंद्रा, जो ह्याप्रमाणे खरोखर मला जाणतो तोच मोक्षफल भोगतो. इतरांना मोक्ष प्राप्त होत नाहीं. ६०.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
विभूतियोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
॥ इति षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥





GO TOP