॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ चतुर्थोऽध्यायः - अध्याय चवथा ॥

सूत उवाच -
एवमुक्त्वा मुनिश्रेष्ठ गते तस्मिन्निजाश्रमम् ।
अथ रामगिरौ रामस्तस्मिन्गोदावरीतटे ॥ १ ॥
शिवलिङ्गं प्रतिष्ठाप्य कृत्वा दीक्षां यथाविधि ।
भूतिभूषितसर्वाङ्गो रुद्राक्षाभरणैर्युतः ॥ २ ॥
अभिषिच्य जलैः पुण्यैर्गौतमीसिन्धुसंभवैः ।
अर्चयित्वा वन्यपुष्पैस्तद्वद्वन्यफलैरपि ॥ ३ ॥
भस्मच्छन्नो भस्मशायी व्याघ्रचर्मासने स्थितः ।
नाम्नां सहस्रं प्रजपन्नक्तंदिवमनन्यधीः ॥ ४ ॥
सूत म्हणाला, असे सांगून अगस्त्य ऋषि आपल्या आश्रमीं गेल्यानंतर राम त्या रामगिरीवर पुण्यवती गोदावरीच्या तीरीं शिवलिंगाची स्थापना करून, विधीप्रमाणे, विरजादीक्षा करून, सर्वांगाला भस्म लावून, रुद्राक्षमाला धारण करून, लिंगाला गोदानदीच्या पवित्रोदकानें अभिषेक करीत, वन्य पुष्पांनी व फलांनी पूजा करीत भस्म धारण करून भस्मावर शयन करीत, व्याघ्रचर्मासनावर बसून, एकाग्रचित्ताने अहोरात्र सहस्रनामाचा जप करू लागला. १-४.

मासमेकं फलाहारो मासं पर्णाशनः स्थितः ।
मासमेकं जलाहारो मासं च पवनाशनः ॥ ५ ॥
शान्तो दान्तः प्रसन्नात्मा ध्यायन्नेवं महेश्वरम् ।
हृत्पङ्कजे समासीनमुमादेहार्धधारिणम् ॥ ६ ॥
एकमासे फलाहार, दुसर्‍या मासांत पर्णाहार, तिसर्‍या मासांत जलाचाच आहार आणि चवथ्या मासांत वायूचाच आहार करणारा तो राम शम व दम यांनी युक्त व प्रसन्नचित्त होत्साता हृदयकमलांत वास करणार्‍या महेश्वराचें ध्यान करीत असे. ५-६.

चतुर्भुजं त्रिनयनं विद्युत्पिङ्गजटाधरम् ।
कोटिसूर्यप्रतीकाशं चन्द्रकोटिसुशीतलम् ॥ ७ ॥
सर्वाभरणसंयुक्तं नागयज्ञोपवीतिनम् ।
व्याघ्रचर्माम्बरधरं वरदाभयधारिणम् ॥ ८ ॥
व्याघ्रचर्मोत्तरीयं च सुरासुरनमस्कृतम् ।
पञ्चवक्त्रं चन्द्रमौलिं त्रिशूलडमरूधरम् ॥ ९ ॥
नित्यं च शाश्वतं शुद्धं ध्रुवमक्षरमव्ययम् ।
एवं नित्यं प्रजपतो गतं मासचतुष्टयम् ॥ १० ॥
चतुर्भुज, त्रिनेत्र, विद्युल्लतेसारख्या पिंगटवर्णाच्या जटा धारण करणारा, कोट्यवधि सूर्यांसारखा तेजस्वी, कोटिचंद्रांप्रमाणे शीतल, सर्व भूषणांनीं भूषित, नागरूपी यज्ञोपवीतधारी, व्याघ्रचर्म परिधान करणारा, वरद आणि अभय स्वरूप धारण करणारा, व्याघ्रचर्म हेच उत्तरीय धारण करणारा, ज्याला सर्व सुरासुर वंदन करतात, पंचवक्त्र, चंद्रमौलि, त्रिशूळ आणि डमरु धारण करणारा, नित्य, शाश्वत, शुद्ध, निर्विकार व अक्षय अशा शिवाचें ध्यान करीत असतां चार मास गेले. ७-१०.

अथ जातो महानादः प्रलयाम्बुदभीषणः ।
समुद्रमथनोद्भूतमन्दरावनिभृद्ध्वनिः ॥ ११ ॥
रुद्रबाणाग्निसंदीप्तभ्रश्यत्त्रिपुरविभ्रमः ।
तमाकर्ण्याथ संभ्रान्तो यावत्पश्यति पुष्करम् ॥ १२ ॥
तावदेवो महातेजो समस्यासीत्पुरो द्विजाः ।
तेजसा तेन संभ्रान्तो नापश्यत्स दिशो दश ॥ १३ ॥
नंतर एके समयीं प्रलयकालाच्या समुद्राच्या शब्दासारखा भयंकर अथवा समुद्रमंथनसमयीं मंदरपर्वताच्या घर्षणानें जो शब्द होत असे त्यासारखा, अथवा शंकराच्या बाणाग्नीनें जेव्हां त्रिपुरासुराचे विमान जळून खाली पडूं लागले त्या वेळीं जो कडकडाट झाला त्यासारखा महानाद झाला. तो नाद ऐकून राम भयचकित होऊन आकाशाकडे पाहू लागला. इतक्यांत, हे द्विजहो, त्याला समोर मोठे तेज दिसू लागले. त्या तेजानें भ्रांत झालेल्या त्याला दश दिशांस कांहीं दिसेनासे झाले. ११-१३.

अन्धीकृतेक्षणस्तूर्णं मोहं यातो नृपात्मजः ।
विचिन्त्य तर्कयामास दैत्यमायां द्विजेश्वराः ॥ १४ ॥
तत्काल नेत्र दिपून गेलेला तो राजपुत्र मूढ झाला. हे ब्राह्मणहो, ही रावणाची माया असावी असा त्याने विचार करून तर्क केला. १४.

अथोत्थाय महावीरः सज्जं कृत्वा स्वकं धनुः ।
अविध्यन्निशितैर्बाणैर्दिव्यास्त्रैरभिमन्त्रितैः ॥ १५ ॥
नंतर तो महावीर राघव, स्वतःचे धनुष्य सज्ज करून उठला व दिव्य अस्त्रांनी अभिमंत्रण केलेल्या तीक्ष्ण बाणांची वृष्टि करू लागला. १५.

आग्नेयं वारुणं सौम्यं मोहनं सौरपार्वतम् ।
विष्णुचक्रं महाचक्रं कालचक्रं च वैष्णवम् ॥ १६ ॥
रौद्रं पाशुपतं ब्राह्मं कौबेरं कुलिशानिलम् ।
भार्गवादिबहून्यस्त्राण्ययं प्रायुङ्क्त राघवः ॥ १७ ॥
अग्न्यस्त्र, वरुणास्त्र, सोमास्त्र, मोहनास्त्र, सूर्यास्त्र, पर्वतास्त्र, सुदर्शनास्त्र, महाचक्र, कालचक्र, वैष्णवास्त्र, रुद्रास्त्र, पाशुपतास्त्र, ब्रह्मास्त्र, कुबेरास्त्र, वज्रास्त्र, वाय्वस्त्र आणि परशुरामास्त्र इत्यादि अनेक अस्त्र त्याने सोडलीं. १६-१७.

तस्मिंस्तेजसि शस्त्राणि चास्त्रान्यस्य महीपतेः ।
विलीनानि महाभ्रस्य करका इव नीरधौ ॥ १८ ॥
परंतु त्याची ती सर्व शस्त्रास्त्रें त्या भयंकर तेजांत मेघांतून समुद्रांत पडलेल्या गारा जशी विरून जातात तशी विरून गेली. १८.

ततः क्षणेन जज्वाल धनुस्तस्य करच्च्युतम् ।
तूणीरं चाङ्गुलित्राणं गोधिकापि महीपते ॥ १९ ॥
नंतर लगेच त्याच्या हातांतील धनुष्य खाली पडून जळाले. तशींच बाणांचे भाते, अंगुलीत्राण, गोधिका [ धनुष्याच्या दोरीचा आघात होऊं नये म्हणून मनगटावर बांधलेलें चर्म ] हींही खाली पडून जळाली. १९.

तद्दृष्ट्वा लक्ष्मणो भीतः पपात भुवि मूर्च्छितः ।
अथाकिञ्चित्करो रामो जानुभ्यामवनिं गतः ॥ २० ॥
मीलिताक्षो भयाविष्टः शंकरं शरणं गतः ।
स्वरेणाप्युच्चरन्नुच्चैः शंभोर्नामसहस्रकम् ॥ २१ ॥
ते पाहून लक्ष्मण भ्याला आणि मूर्च्छित होऊन भूमीवर पडला आणि रामचंद्र स्तब्ध होऊन जमिनीवर गुडघे टेंकून डोळे मिटून भयचकित होत्साता शंकराला शरण गेला आणि उच्च स्वराने शिवसहस्रनामाचा जप करू लागला. २०-२१.

शिवं च दण्डवद्भूमौ प्रणनाम पुनः पुनः ।
पुनश्च पूर्ववच्चासीच्छब्दो दिङ्मण्डलं ग्रसन् ॥ २२ ॥
वारंवार शिवाला साष्टांग नमस्कार घालीत होता. इतक्यांत पुनः पूर्वीसारखा दशदिशा दणाणून टाकणारा शब्द झाला. २२.

चचाल वसुधा घोरं पर्वताश्च चकम्पिरे ।
ततः क्षणेन शीतांशुशीतलं तेज आपतत् ॥ २३ ॥
भूमि भयंकर रीतीने हालली, पर्वतही हालले. नंतर क्षणांत चंद्रासारखें शीतल असे तेज प्रगट झाले. २३.

उन्मीलिताक्षो रामस्तु यावदेतत्प्रपश्यति ।
तावद्ददर्श वृषभं सर्वालंकारसंयुतम् ॥ २४ ॥
राम नेत्र उघडून पाहूं लागला तो सर्वालंकारांनी भूषित असा शुभ्र वृषभ पुढे दिसला. २४.

पीयूषमथनोद्भूतनवनीतस्य पिण्डवत् ।
प्रोतस्वर्णं मरकतच्छायशृङ्गद्वयान्वितम् ॥ २५ ॥
नीलरत्नेक्षणं ह्रस्वकण्ठकम्बलभूषितम् ।
रत्नपल्याणसंयुक्तं निबद्धं श्वेतचामरैः ॥ २६ ॥
घण्टिकाघर्घरीशब्दैः पूरयन्तं दिशो दश ।
तत्रासीनं महादेवं शुद्धस्फटिकविग्रहम् ॥ २७ ॥
जो अमृतमंथनसमयीं वर आलेल्या नवनीतपिंडासारखा अतिस्वच्छ, सोन्यामध्यें ओवलेल्या मरकत मण्यांच्या कांतीसारखी ज्याची शिंगे आहेत, ज्याचे नेत्र नीलमण्यासारखे आहेत, जो लहान सास्त्नेनें भूषित आहे, ज्याला रत्नजडित पृष्ठास्तरण आहे, ज्यावर श्वेत चामरें शोभत आहेत, गळ्यांतील घंटा व घुंगुर ह्यांच्या घणधणाटानें जो दशदिशा दणाणून टाकत आहे अशा त्यावर स्वच्छ स्फटिकमण्याप्रमाणें कांति असलेला महादेव बसला होता. २५-२७.

कोटिसूर्यप्रतीकाशं कोटिशीतांशुशीतलम्।
व्याघ्रचर्माम्बरधरं नागयज्ञोपवीतिनम् ॥ २८ ॥
सर्वालंकारसंयुक्तं विद्युत्पिङ्गजटाधरम् ।
नीलकण्ठं व्याघ्रचर्मोत्तरीयं चन्द्रशेखरम् ॥ २९ ॥
नानाविधायुधोद्भासिदशबाहुं त्रिलोचनम् ।
युवानं पुरुषश्रेष्ठं सच्चिदानन्दविग्रहम् ॥ ३० ॥
तत्रैव च सुखासीनां पूर्णचन्द्रनिभाननाम् ।
नीलेन्दीवरदामाभामुद्यन्मरकतप्रभाम् ॥ ३१ ॥
मुक्ताभरणसंयुक्तां रात्रिं ताराञ्चितामिव ।
विन्ध्यक्षितिधरोत्तुङ्गकुचभारभरालसाम् ॥ ३२ ॥
सदसत्संशयाविष्टमध्यदेशान्तराम्बराम् ।
दिव्याभरणसंयुक्तां दिव्यगन्धानुलेपनाम् ॥ ३३ ॥
दिव्यमाल्याम्बरधरां नीलेन्दीवरलोचनाम् ।
अलकोद्भासिवदनां ताम्बूलग्रासशोभिताम् ॥ ३४ ॥
शिवालिङ्गनसंजातपुलकोद्भासिविग्रहाम् ।
सच्चिदानन्दरूपाढ्यां जगन्मातरमम्बिकाम् ॥ ३५ ॥
सौन्दर्यसारसंदोहां ददर्श रघुनन्दनः ।
स्वस्ववाहनसंयुक्तान्नानायुधलसत्करान् ॥ ३६ ॥
बृहद्रथन्तरादीनि सामानि परिगायतः ।
स्वस्वकान्तासमायुक्तान्दिक्पालान्परितः स्थितान् ॥ ३७ ॥
अग्रगं गरुडारूढं शंखचक्रगदाधरम् ।
कालाम्बुदप्रतीकाशं विद्युत्कान्त्या श्रिया युतम् ॥ ३८ ॥
जपन्तमेकमनसा रुद्राध्यायं जनार्दनम् ।
पश्चाच्चतुर्मुखं देवं ब्रह्माणं हंसवाहनम् ॥ ३९ ॥
चतुर्वक्त्रैश्चतुर्वेदरुद्रसूक्तैर्महेश्वरम् ।
स्तुवन्तं भारतीयुक्तं दीर्घकूर्चं जटाधरम् ॥ ४० ॥
अथर्वशिरसा देवं स्तुवन्तं मुनिमण्डलम् ।
गङ्गादितटिनीयुक्तमम्बुधिं नीलविग्रहम् ॥ ४१ ॥
श्वेताश्वतरमन्त्रेण स्तुवन्तं गिरिजापतिम् ।
अनन्तादिमहानागान्कैलासगिरिसन्निभान् ॥ ४२ ॥
कैवल्योपनिषत्पाठान्मणिरत्नविभूषितान् ।
सुवर्णवेत्रहस्ताढ्यं नन्दिनं पुरतः स्थितम् ॥ ४३ ॥
दक्षिणे मूषकारूढं गणेशं पर्वतोपमम् ।
मयूरवाहनारूढमुत्तरे षण्मुखं तथा ॥ ४४ ॥
महाकालं च चण्डेशं पार्श्वयोर्भीषणाकृतिम् ।
कालाग्निरुद्रं दूरस्थं ज्वलद्दावाग्निसन्निभम् ॥ ४५ ॥
त्रिपादं कुटिलाकारं नटद्भृङ्गिरिटिं पुरः ।
नानाविकारवदनान्कोटिशः प्रमथाधिपान् ॥ ४६ ॥
नानावाहनसंयुक्तं परितो मातृमण्डलम् ।
पञ्चाक्षरीजपासक्तान्सिद्धविद्याधरादिकान् ॥ ४७ ॥
दिव्यरुद्रकगीतानि गायत्किन्नरवृन्दकम् ।
तत्र त्रैयम्बकं मन्त्रं जपद्द्विजकदम्बकम् ॥ ४८ ॥
गायन्तं वीणया गीतं नृत्यन्तं नारदं दिवि ।
नृत्यतो नाट्यनृत्येन रम्भादीनप्सरोगणान् ॥ ४९ ॥
गायच्चित्ररथादीनां गन्धर्वाणां कदम्बकम् ।
कम्बलाश्वतरौ शंभुकर्णभूषणतां गतौ ॥ ५० ॥
गायन्तौ पन्नगौ गीतं कपालं कम्बलं तथा ।
एवं देवसभां दृष्ट्वा कृतार्थो रघुनन्दनः ॥ ५१ ॥
कोटिसूर्यांसारखा तेजस्वी, कोटिचंद्रांसारखा शीतल, व्याघ्रांबर परिधान केलेला, नागयज्ञोपवीत धारण करणारा, सर्वालंकारांनीं युक्त, विद्युल्लतेसारख्या पिंगट जटा धारण करणारा, ज्याचा कंठ नील, व्याघ्रचर्म प्रावरण केलेला, मस्तकी चंद्र धारण केलेला, ज्याचे दहा भुज अनेक आयुधांनीं शोभत आहेत, त्रिनेत्र, तरुण, सर्व पुरुषांत श्रेष्ठ, सच्चिदानंदरूप, तसेच त्या वृषभावर आनंदाने बसलेली, पूर्णचंद्राप्रमाणे जिचें मुख, नीलकमलासारखी अथवा मरकतरत्नासारखी जिची कांति, जी मौक्तिकाभरणांनी युक्त असल्यामुळें नक्षत्रांनीं युक्त व विंध्यपर्वतासारख्या अत्युच्च स्तनांच्या भारानें नम्र झालेली रात्रच की काय, जिचा मध्यभाग आहे किंवा नाही याचीच शंका उत्पन्न व्हावयाची, सर्व स्त्रीजातींत श्रेष्ठ, दिव्य अलंकारांनी युक्त, दिव्य सुगंधाची उटी लावलेली, कंठीं दिव्य पुष्पांच्या माला आहेत, नीलकमलाप्रमाणें जिचे नेत्र, कुरलकेशांनी जिचें मुख शोभत आहे, तांबूलचर्वणाने अधरोष्ठ शोभायमान, शंकराला आलिंगन दिल्यामुळे जिच्या शरीरावर रोमांच उभारले आहेत, जी सच्चिदानंदरूप आहे, ती त्रैलोक्याची माता, सर्व सुंदर पदार्थांचें सार काढून जिचे स्वरूप बनविले आहे, अशा पार्वतीलाही रामचंद्र पाहता झाला. तसेच आपापल्या वाहनावर बसलेले, आपापली आयुधें धारण केलेले, "बृहद्रथंतरादि" सामें गाणारे, आपापल्या स्त्रियांनी युक्त असे आसमंताद्‌भागी असलेले इंद्रादि लोकपाल, अग्रभागी गरुडारूढ, शंख, चक्र, गदा धारण करणारा, नीलमेघाप्रमाणे ज्याची शरीरकांति, विद्युत्कांति लक्ष्मीनें युक्त व एकाग्र अंतःकरणाने रुद्राध्यायाचा जप करीत असलेला विष्णु व पृष्ठभागी हंसावर बसलेला चतुर्मुख, चार मुखांनी चार वेद आणि रुद्रसूक्तें यांनी महेश्वराची स्तुति करणारा, मोठ्या मिशा असलेला, मस्तकी जटा धारण करणारा सावित्रीसहित ब्रह्मदेव, अथर्वोपनिषदानें स्तुति करणारे मुनिमंडल, श्वेताश्वतर शाखेच्या मंत्रांनी गिरिजापतीची स्तुति करणारा व गंगादि नद्यांनी युक्त असा नीलवर्ण सागर, रत्नभूषित होऊन कैवल्योपनिषदाचा पाठ करणारे कैलासपर्वतासारखे अनंतादि महानाग, सुवर्णाची वेत्रलता हस्तांत घेऊन अग्रभागीं उभा राहिलेला नंदिकेश्वर, दक्षिणभागीं मूषकावर आरूढ झालेला पर्वतप्राय गजानन, उत्तरभागीं मयूरावर आरूढ झालेला षण्मुख कार्तिकस्वामी, भीषणदेही महाकाल आणि चंडेश्वर उभयपार्श्वभागीं उभे राहिलेले, प्रदीप्त झालेल्या दावाग्नीसारखा भयंकर असा लांब अंतरावर उभा राहिलेला कालाग्निरुद्र, वक्रदेहाचा त्रिपाद, अग्रभागीं नृत्य करणारा भृंगिरिटि आणि अनेक प्रकारच्या आकृतींचे कोट्यवधि प्रमथगण, सभोंवतीं आपापल्या वाहनारूढ झालेलें ब्राह्मी, माहेश्वरी इत्यादि मातृकांचें मंडल, पंचाक्षरमंत्राचा जप करणारे सिद्ध विद्याधर इत्यादि, दिव्य रुद्रगीतांचे गायन करणारे किन्नरवृंद, "त्र्यंबकं यजामहे" या मंत्राचा जप करणारा ब्राह्मणसमूह, आकाशांत आपली महती वीणा वादन करून नृत्यगीत करणारा नारद, हावभावयुक्त नृत्य करणार्‍या रंभादि अप्सरा, गात असलेल्या चित्ररथादि गंधर्वांचा समुदाय, शंकराच्या कर्णांतील कुंडलेंच झालेले कंबल आणि अश्वतर हे नाग, तसेच मधुर गान करीत असलेले कपाल आणि कंबल हे नाग, अशा प्रकारची ती सर्व देवसभा पाहून रामचंद्र आपणाला कृतार्थ मानिता झाला. २८-५१.

हर्षगद्गदया वाचा स्तुवन्देवं महेश्वरम् ।
दिव्यनामसहस्रेण प्रणनाम पुनः पुनः ॥ ५२ ॥
अतिशय हर्ष झाल्यामुळे सद्‌गदित झालेल्या वाणीने सहस्रनामजपानें महेश्वराची स्तुति करून तो वारंवार प्रमाण करता झाला. ५२.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
शिवप्रादुर्भावाख्यश्चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
इति चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥





GO TOP