॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ द्वितीयोऽध्यायः - अध्याय दुसरा ॥

ऋषय ऊचुः -
किमर्थमागतोऽगस्त्यो रामचन्द्रस्य सन्निधिम् ।
कथं वा विरजां दीक्षां कारयामास राघवम् ।
ततः किमाप्तवान् रामः फलं तद्वक्तुमर्हसि ॥ १ ॥
ऋषि म्हणाले-अगस्त्य ऋषि रामचंद्राच्या समीप कां आले, त्यांनी रामाकडून विरजा नामक दीक्षा कशी करविली व त्यापासून रामाला काय फल प्राप्त झाले हे सांगण्यास तू योग्य आहेस. १.

सूत उवाच -
रावणेन यदा सीताऽपहृता जनकात्मजा ।
तदा वियोगदुःखेन विलपन्नास राघवः ॥ २ ॥
सूत म्हणाला, जेव्हां जनककन्या सीता रावणाने चोरून नेली तेव्हां तिच्या विरहदुःखाने रामचंद्र विलाप करू लागला. २.

निर्निद्रो निरहंकारो निराहारो दिवानिशम् ।
मोक्तुमैच्छत्ततः प्राणान्सानुजो रघुनन्दनः ॥ ३ ॥
लक्ष्मणासहवर्तमान ज्याला अहोरात्र निद्रा नाहीं, देहभान नाहीं, आहार नाही असा राम नंतर प्राण सोडण्याची इच्छा करू लागला. ३.

लोपामुद्रापतिर्ज्ञात्वा तस्य सन्निधिमागमत् ।
अथ तं बोधयामास संसारासारतां मुनिः ॥ ४ ॥
हे जाणून अगस्त्य मुनि त्याच्या समीप आला, आणि संसाराच्या असारतेविषयी त्यास बोध करू लागला. ४.

अगस्त्य उवाच -
किं विषीदसि राजेन्द्र कान्ता कस्य विचार्यताम् ।
जडः किं नु विजानाति देहोऽयं पाञ्चभौतिकः ॥ ५ ॥
अगस्त्य म्हणाला, हे राजेंद्रा, विषाद काय करतोस ! कांता कोणाची याचा विचार कर. पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेल्या या जड देहाला ज्ञान कसे असेल ? ५.

निर्लेपः परिपूर्णश्च सच्चिदानन्दविग्रहः ।
आत्मा न जायते नैव म्रियते न च दुःखभाक् ॥ ६ ॥
आत्मा हा निर्लेप, सर्वत्र भरलेला आणि सच्चिदानंदस्वरूप आहे. तो कधी जन्माला येत नाहीं, कधीं मरत नाही व त्याला कधीं दुःख होत नाहीं. ६.

सूर्योऽसौ सर्वलोकस्य चक्षुष्ट्वेन व्यवस्थितः ।
तथापि चाक्षुषैर्दोषैर्न कदाचिद्विलिप्यते ॥ ७ ॥
हा सूर्य सर्व लोकांच्या नेत्रांत नेत्रेन्द्रिय स्वरूपाने राहिलेला आहे, तथापि नेत्रदोषांनी हा कधीं लिप्त होत नाहीं. ७.

सर्वभूतान्तरात्मापि तद्वद्दृश्यैर्न लिप्यते ।
देहोऽपि मलपिण्डोऽयं मुक्तजीवो जडात्मकः ॥ ८ ॥
तसाच सर्व प्राणिमात्रांच्या अंतरीं असणारा आत्मा त्यांच्याप्रमाणे दृश्य वस्तूंनीं लिप्त होत नाहीं. देह म्हणजे केवल मलाचा पिंड, जीवहीन व जडरूप आहे. ८.

दह्यते वह्निना काष्ठैः शिवाद्यैर्भक्ष्यतेऽपि वा ।
तथापि नैव जानाति विरहे तस्य का व्यथा ॥ ९ ॥
हा काष्ठे व अग्नि ह्यांच्या संयोगाने जळतो किंवा कोल्हे कुत्रे ह्यांनीं भक्षिला जातो. तथापि ह्या देहाला ते कांहींच कळत नाही. अशा देहाचा वियोग झाला असतां दुःख कां मानावें ? ९.

सुवर्णगौरी दूर्वाया दलवच्छ्यामलापि वा ।
पीनोत्तुङ्गस्तनाभोगभुग्नसूक्ष्मवलग्निका ॥ १० ॥
बृहन्नितम्बजघना रक्तपादसरोरुहा ।
राकाचन्द्रमुखी बिम्बप्रतिबिम्बरदच्छदा ॥ ११ ॥
नीलेन्दीवरनीकाशनयनद्वयशोभिता ।
मत्तकोकिलसँल्लापा मत्तद्विरदगामिनी ॥ १२ ॥
कटाक्षैरनुगृह्णाति मां पञ्चेषुशरोत्तमैः ।
इति यां मन्यते मूढ स तु पञ्चेषुशासितः ॥ १३ ॥
माझी कांता सुवर्णासारखी गौरवर्ण अथवा दूर्वेच्या अंकुराप्रमाणे श्यामवर्ण आहे, पुष्ट व उच्च अशा स्तनांच्या विस्ताराने जिचा काटिप्रदेश वांकलेला आहे, नितंब आणि जघनभाग हे किती विस्तीर्ण आहेत, हिचे चरणकमल किती लाल आहेत, पौर्णिमेच्या चंद्रासारखें जिचे मुख आहे, पिकलेल्या तोंडल्यासारखा जिचा अधरोष्ठ आहे, निळ्या कमळाप्रमाणे असलेल्या नेत्रांनी जी शोभत आहे, मत्त झालेल्या कोकिलेसारखा जिचा शब्द मधुर आहे, मदोन्मत्त झालेल्या हत्तीसारखी मंदगामिनी, अशी ही कामिनी साक्षात् मदनाचे बाण असे जे आपले नेत्रकटाक्ष त्यांनी माझ्यावर प्रसादच करीत आहे, असे जो मूर्ख मानतो त्याच्यावर मदनाचा पूर्ण अंमल बसला. १०-१३.

तस्याविवेकं वक्ष्यामि शृणुष्वावहितो नृप ।
न च स्त्री न पुमानेष नैव चायं नपुंसकः ॥ १४ ॥
आतां यांतला अविचार तुला सांगतों, स्वस्थचित्ताने ऐक. हा जीव स्त्री नव्हे, पुरुष नव्हे आणि नपुंसकही नव्हे. १४.

अमूर्तः पुरुषः पूर्णो द्रष्टा देही स जीविनः ।
या तन्वङ्गी मृदुर्बाला मलपिण्डात्मिका जडा ॥ १५ ॥
हा जीवात्मा अमूर्त, परमपुरुष, सर्वत्र भरलेला, जीवसमुदायाचा द्रष्टा आहे. जिला कोमलांगी नाजुक कांता म्हणतोस ती मलपिंडरूपी व जड आहे. १५.

सा न पश्यति यत्किंचिन्न शृणोति न जिघ्रति ।
चर्ममात्रा तनुस्तस्या बुद्ध्वा त्यक्षस्व राघव ॥ १६ ॥
तिला दिसत नाहीं, ऐकू येत नाहीं व वासही येत नाहीं. तिचा देह केवळ चर्माचा आहे असे जाणून, हे राघवा, त्याचा तू त्याग कर. १६.

या प्राणादधिका सैव हंत ते स्याद्घृणास्पदम् ।
जायन्ते यदि भूतेभ्यो देहिनः पाञ्चभौतिकाः ॥ १७ ॥
जी प्राणाहून अधिक प्रिय तीच सीता तुला दुःखाला कारण व्हावी ना ! जीवात्मे जर भूतांपासून उत्पन्न झालेले असतील तर त्यांना पांचभौतिक म्हणावे लागेल. १७.

आत्मा यदेकलस्तेषु परिपूर्णः सनातनः ।
का कान्ता तत्र कः कान्तः सर्व एव सहोदराः ॥ १८ ॥
परंतु त्यांत जो जीवात्मा आहे तो एक असून सर्वव्यापी व सनातन आहे. मग त्यांत कांता कोण व कांत कोण ? सर्व सहोदर आहेत. १८.

निर्मितायां गृहावल्यां तदवच्छिन्नतां गतम् ।
नभस्तस्यां तु दग्धायां न कांचित्क्षतिमृच्छति ॥ १९ ॥
अनेक घरे बांधली तर त्या गृहांच्या आकाराप्रमाणे त्या घरांत असणार्‍या आकाशालाही तसतसे अनेक आकार प्राप्त होतात. परंतु तींच घरे जाळून टाकली तर आकाशाचा कांहीं नाश होत नाहीं. १९.

तद्वदात्मापि देहेषु परिपूर्णः सनातनः ।
हन्यमानेषु तेष्वेव स स्वयं नैव हन्यते ॥ २० ॥
तसाच सनातन आत्मा देहामध्ये भरलेला आहे. म्हणून देह मरण पावला असतां आत्मा मरत नाहीं. २०.

हन्ता चेन्मन्यते हन्तुं हतश्चेन्मन्यते हतम् ।
तावुभौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ २१ ॥
मारणारा जर मी मारतों असें मानील, तसाच मरणारा जर मी मेलों असे मानील, तर ते दोघे अगदीं मूर्ख होत. कारण, हा मारीत नाहीं व मरतही नाहीं. २१.

अस्मान्नृपातिदुःखेन किं खेदस्यास्ति कारणम् ।
स्वस्वरूपं विदित्वेदं दुःखं त्यक्त्वा सुखी भव ॥ २२ ॥
म्हणून हे राजा रामचंद्रा, ह्यांत अतिशय दुःखाला व खेदाला काय कारण आहे ? आत्मस्वरूप जाण, हे दुःख सोड आणि सुखी हो. २२.

राम उवाच -
मुने देहस्य नो दुःखं नैव चेत्परमात्मनः ।
सीतावियोगदुःखाग्निर्मां भस्मीकुरुते कथम् ॥ २३ ॥
राम म्हणाला, हे मुने ! देहाला जर दुःख नाहीं व आत्म्याला जर दुःख नाहीं तर सीतावियोगदुःखरूपी अग्नि मला जाळतो हा कसा ? २३.

सदाऽनुभूयते योऽर्थः स नास्तीति त्वयेरितः ।
जायातां तत्र विश्वासः कथं मे मुनिपुङ्गव ॥ २४ ॥
हे मुनिश्रेष्ठा, जिचा निरंतर अनुभव येतो ती गोष्ट खोटी आहे असे तूं सांगतोस तर त्यावर माझा विश्वास कसा बसावा ? २४.

अन्योऽत्र नास्ति को भोक्ता येन जन्तुः प्रतप्यते ।
सुखस्य वापि दुःखस्य तद्ब्रूहि मुनिसत्तम ॥ २५ ॥
सुखाचा अथवा दुःखाचा भोक्ता जीवाहून भिन्न तर कोणी नाहीं ना, की ज्यामुळे जीवाला दुःख-होते ? मुनिश्रेष्ठा, हे मला सांग. २५.

अगस्त्य उवाच -
दुर्ज्ञेया शांभवी माया तया संमोह्यते जगत् ।
माया तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम् ।२६ ॥
अगस्त्य म्हणाला, शंकराची माया समजण्यास कठिण आहे, तिनें हें सर्व जग मोडून टाकलें आहे. मायेलाच प्रकृति असें जाणतात, आणि मायेचा जो ईश्वर त्याला महेश्वर असें म्हणतात. २६.

तस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत्।
सत्यज्ञानात्मकोऽनन्तो विभुरात्मा महेश्वरः ॥ २७ ॥
त्याच्याच अवयवरूप जीवांनी हें सर्व जग व्यापलें आहे. महेश्वर हा सत्यरूप, ज्ञानस्वरूप, अंतरहित, सर्वव्यापी, सर्वांचा आत्मा असा आहे. २७.

तस्यैवांशो जीवलोके हृदये प्राणिनां स्थितः ।
विस्फुलिङ्गा यथा वह्नेर्जायन्ते काष्ठयोगतः ॥ २८ ॥
त्याचाच अंश ह्या शिवलोकी प्राण्यांच्या हृदयांत वास करतो. काष्ठाच्या संसर्गानें अग्नीपासून जशा ठिणग्या उत्पन्न होतात, तद्वत्. २८.

अनादिकर्मसंबद्धास्तद्वदंशा महेशितुः ।
अनादिवासनायुक्ताः क्षेत्रज्ञा इति ते स्मृताः ॥ २९ ॥
तसेच अनादि कालापासून चालत आलेल्या कर्माशी संबद्ध असलेले हे ईश्वराचे अंश जीव अनादि वासनांनी युक्त आहेत म्हणून त्यांना क्षेत्रज्ञ [देहावर अभिमान करणारे ] असें म्हणतात. २९.

मनो बुद्धिरहंकारश्चित्तं चेति चतुष्टयम् ।
अन्तःकरणमित्याहुस्तत्र ते प्रतिबिम्बिताः ॥ ३० ॥
जीवत्वं प्राप्नुयुः कर्मफलभोक्तार एव ते ।
ततो वैषयिकं तेषां सुखं वा दुःखमेव वा ॥ ३१ ॥
मन, बुद्धि, अहंकार आणि चित्त या चतुष्टयाला मिळून अंतःकरण म्हणतात. यांत त्यांचे [ क्षेत्रज्ञांचे ] प्रतिबिंब पडलेले असल्यामुळे त्यांना जीवत्व प्राप्त होते आणि ते कर्मफल भोगतात. त्यापासून वैषयिक सुख अथवा दुःख पावतात. ३०-३१.

त एव भुञ्जते भोगायतनेऽस्मिन् शरीरके ।
स्थावरं जङ्गमं चेति द्विविधं वपुरुच्यते ॥ ३२ ॥
कर्मफल भोगण्याचे स्थान जें हें शरीर त्यामध्ये ते भोग भोगतात. स्थावर आणि जंगम असे दोन प्रकारचे शरीर आहे. ३२.

स्थावरास्तत्र देहाः स्युः सूक्ष्मा गुल्मलतादयः ।
अण्डजाः स्वेदजास्तद्वदुद्भिज्जा इति जङ्गमाः ॥ ३३ ॥
वृक्ष, लता, गुल्म, इत्यादि स्थावर देह. अंडज [ पक्षि, सर्प इत्यादि ],स्वेदज [कृमि, मशक इत्यादि], आणि उद्भिज्ज [=जरायुज=मनुष्य, गाई इत्यादि] हे जंगम देह होत. ३३.

योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः ।
स्थाणुमन्येऽनुसंयन्ति यथाकर्म यथाश्रुतम् ॥ ३४ ॥
आत्म्याला देहप्राप्ति व्हावी म्हणून कर्मानुरूप व ज्ञानानुरूप कोणी योनींचा आश्रय करतात, कोणी वृक्षादिकांचा आश्रय करतात. ३४.

सुख्यहं दुःख्यहं चेति जीव एवाभिमन्यते ।
निर्लेपोऽपि परं ज्योतिर्मोहितः शंभुमायया ॥ ३५ ॥
अलिप्त व अत्यंत प्रकाशमय असलेला जीवच शिवाच्या मायेमुळे मी सुखी, मी दुःखी असा अभिमान धारण करतो. ३५.

कामः क्रोधस्तथा लोभो मदो मात्सर्यमेव च ।
मोहश्चेत्यरिषड्वर्गमहंकारगतं विदुः ॥ ३६ ॥
काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य आणि मोह हे सहा शत्रु अहंकारापासून उत्पन्न होतात. ३६.

स एव बध्यते जीवः स्वप्नजाग्रदवस्थयोः ।
सुषुप्तौ तदभावाच्च जीवः शंकरतां गतः ॥ ३७ ॥
तो जीव स्वप्न आणि जागृति या अवस्थांमध्ये (अहंकारामुळे ) बंध पावतो. सुषुप्तीमध्ये अहंकाराचा अभाव असतो म्हणून जीव हा शंकररूप [आनंदरूप] झालेला असतो. ३७.

स एव मायासंस्पृष्टः कारणं सुखदुःखयोः ।
शुक्तो रजतवद्विश्वं मायया दृश्यते शिवे ॥ ३८ ॥
मायेचा संसर्ग झालेला तोच (जीव) सुखदुःखाला कारण होतो. शुक्तीवर जसे रुपें त्याप्रमाणे शिवाचे ठिकाणीं विश्व मायेच्या योगाने दिसते. ३८.

ततो विवेकज्ञानेन न कोऽप्यत्रास्ति दुःखभाक् ।
ततो विरम दुःखात्त्वं किं मुधा परितप्यसे ॥ ३९ ॥
म्हणून विवेक केला तर दुःखभागी कोणीच नाहीं. म्हणून तू हे वियोगदुःख सोड. व्यर्थ कां ताप पावतोस ? ३९.

श्रीराम उवाच -
मुने सर्वमिदं तथ्यं यन्मदग्रे त्वयेरितम् ।
तथापि न जहात्येतत्प्रारब्धादृष्टमुल्बणम् ॥ ४० ॥
राम म्हणाला, मुने, जे तू माझ्यापुढे बोललास हे सर्व खरे आहे, तथापि विरहदुःखदायक असे हे सामर्थ्यवान् प्रारब्धकर्म मला सोडीत माहीं. ४०.

मत्तं कुर्याद्यथा मद्यं नष्टाविद्यमपि द्विजम् ।
तद्वत्प्रारब्धभोगोऽपि न जहाति विवेकिनम् ॥ ४१ ॥
ज्याचे अज्ञान नष्ट झाले आहे अशा ब्राह्मणाला देखील मद्य जसे उन्मत्त करते, तसेच कितीही विवेक केला तरी प्रारब्धकर्म मला सोडीत नाहीं. ४१.

ततः किं बहुनोक्तेन प्रारब्धसचिवः स्मरः ।
बाधते मां दिवारात्रमहंकारोऽपि तादृशः ॥ ४२ ॥
तेव्हां फार बोलून काय उपयोग ! मदन, प्रारब्धाचा सचिव होऊन अहोरात्र मला पीडा देत आहे, तसाच अहंकारही पीडा देत आहे. ४२.

अत्यन्तपीडितो जीवः स्थूलदेहं विमुञ्चति ।
तस्माज्जीवाप्तये मह्यमुपायः क्रियतां द्विज ॥ ४३ ॥
जीव अत्यंत पीडित झाला म्हणजे स्थूल देहाचा त्याग करतो. तेव्हा हे ब्राह्मणा, माझे प्राण वांचतील अशाविषयीं कांहीं उपाय कर. ४३.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
वैराग्योपदेहो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
इति द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥





GO TOP