॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ प्रथमोऽध्यायः - अध्याय पहिला ॥

सूत उवाच -
अथातः सम्प्रवक्ष्यामि शुद्धं कैवल्यमुक्तिदम् ।
अनुग्रहान्महेशस्य भवदुःखस्य भेषजम् ॥ १ ॥
सूत म्हणाले, शौनकादिक हो आतां मी तुम्हाला कैवल्यमुक्ति देणारे, परम पवित्र असे संसारदुःखाचे औषध, शिवाच्या प्रसादाने सांगतों. १.

न कर्मणामनुष्ठानैर्न दानैस्तपसापि वा ।
कैवल्यं लभते मर्त्यः किंतु ज्ञानेन केवलम् ॥ २ ॥
ही कैवल्यमुक्ति, कर्माच्या अनुष्ठानांनी, दानांनीं अथवा तपाने मनुष्याला प्राप्त होत नाहीं; तर केवळ ज्ञानानेंच प्राप्त होते. २.

रामाय दण्डकारण्ये पार्वतीपतिना पुरा ।
या प्रोक्ता शिवगीताख्या गुह्याद्गुह्यतमा हि सा ॥ ३ ॥
पूर्वी दंडकारण्यामध्ये रामचंद्राला शंकरांनी जी शिवगीता सांगितली ती अत्यंत गुह्य आहे. ३.

यस्याः श्रवणमात्रेण नृणां मुक्तिर्ध्रुवं भवेत् ।
पुरा सनत्कुमाराय स्कन्देनाभिहिता हि सा ॥ ४ ॥
जिच्या श्रवणमात्रानेच मनुष्याला निश्चयाने मुक्ति प्राप्त होते अशी ही गीता स्कंदाने सनत्कुमाराला सांगितली. ४.

सनत्कुमारः प्रोवाच व्यासाय मुनिसत्तमाः ।
मह्यं कृपातिरेकेण प्रददौ बादरायणः ॥ ५ ॥
हे मुनिश्रेष्ठहो, सनत्कुमाराने ती व्यासाला सांगितली आणि व्यासानें परमदयालुत्वाने ती मला दिली. ५.

उक्तं च तेन कस्मैचिन्न दातव्यमिदं त्वया ।
सूतपुत्रान्यथा देवाः क्षुभ्यन्ति च शपन्ति च ॥ ६ ॥
आणि असे सांगितले की, ही गीता तू कोणालाच देऊ नको, देशील तर सर्व देव क्रुद्ध होऊन शाप देतील. ६.

अथ पृष्टो मया विप्रा भगवान्बादरायणः ।
भगवन्देवताः सर्वाः किं क्षुभ्यन्ति शपन्ति च ॥ ७ ॥
ब्राह्मणहो ! असे ऐकतांच मी व्यासाला प्रश्न केला–महाराज गीतेचा उपदेश केल्याने सर्व देव क्रुद्ध होऊन शाप कां देतील ? ७.

तासामत्रास्ति का हानिर्यया कुप्यन्ति देवताः ।
पाराशर्योऽथ मामाह यत्पृष्टं शृणु वत्स तत् ॥ ८ ॥
अशी देवांची ह्यांत काय हानि आहे की, ज्यामुळे ते क्रुद्ध होतील ? तेव्हां व्यास मला म्हणाले, वत्सा, तू जो प्रश्न केलास त्याचे उत्तर ऐक. ८.

नित्याग्निहोत्रिणो विप्राः संति ये गृहमेधिनः ।
त एव सर्वफलदाः सुराणां कामधेनवः ॥ ९ ॥
जे ब्राह्मण निरंतर अग्निहोत्र चालविणारे आणि निरंतर गृहस्थाश्रमीच असतात तेच देवांना सर्व अभीष्ट फलें देणारे केवल कामधेनुसारखे होत. ९.

भक्ष्यं भोज्यं च पेयं च यद्यदिष्टं सुपर्वणाम् ।
अग्नौ हुतेन हविषा सत्सर्वं लभ्यते दिवि ॥ १० ॥
भक्ष्य, भोज्य, पेय इत्यादि जें जें देवांना पाहिजे असते ते सर्व (गृहस्थाश्रम्याने) अग्नींत हवन केलेल्या हवीनें स्वर्गामध्ये देवांना मिळते. १०.

नान्यदस्ति सुरेशानामिष्टसिद्धिप्रदं दिवि ।
दोग्ध्री धेनुर्यथा नीता दुःखदा गृहमेधिनाम् ॥ ११ ॥
तथैव ज्ञानवान्विप्रो देवानां दुःखदो भवेत् ।
त्रिदशास्तेन विघ्नन्ति प्रविष्टा विषयं नृणाम् ॥ १२ ॥
देवांना स्वर्गावर इष्टसिद्धि करून देणारें गृहस्थासारखे दुसरें साधन नाहीं. (म्हणूनच ) जसे कुटुंबवत्सलाची दुभती गाय कोणी चोरून नेली असतां त्याला दुःख होते, तसेच ब्राह्मण कर्ममार्ग सोडून ज्ञानी झाला म्हणजे देवांना दुःख होते. म्हणून देव, मनुष्यांच्या भोग्य विषयांमध्ये सूक्ष्म रूपाने प्रवेश करून मनुष्याला विघ्न करतात. ११-१२.

ततो न जायते भक्तिः शिवे कस्यापि देहिनः ।
तस्मादविदुषां नैव जायते शूलपाणिनः ॥ १३ ॥
म्हणून कोणालाच शिवाविषयी भक्ति उत्पन्न होत नाही. त्यांत अज्ञान्यांना तर मुळीच होत नाहीं. १३.

यथाकथंचिज्जातापि मध्ये विच्छिद्यते नृणाम् ।
जातं वापि शिवज्ञानं न विश्वासं भजत्यलम् ॥ १४ ॥
कदाचित् झालीच तर कांहीं तरी कारणाने मध्ये खंडित होते. तसेंच शिवस्वरूपाचे ज्ञान कदाचित् कोणाला झालेच तर त्यावर पूर्ण विश्वास बसत नाहीं. १४.

ऋषय ऊचुः -
यद्येवं देवता विघ्नमाचरन्ति तनूभृताम् ।
पौरुषं तत्र कस्यास्ति येन मुक्तिर्भविष्यति ॥ १५ ॥
शौनकादि ऋषि म्हणाले–जर देव ह्याप्रमाणे मनुष्यांना विध्ने करतात तर त्या ठिकाणी कोणाचा पराक्रम चालणार आहे ? की, ज्या पराक्रमानें मुक्ति प्राप्त होईल. १५.

सत्यं सूतात्मज ब्रूहि तत्रोपायोऽस्ति वा न वा ॥
सूत उवाच -
कोटिजन्मार्जितैः पुण्यैः शिवे भक्तिः प्रजायते ॥ १६ ॥
सूता ! खरेच सांग ह्याविषयी कांहीं उपाय आहे किंवा नाहीं ? सूत म्हणाले, कोट्यवधि जन्म केलेल्या पुण्यकर्मानें शिवाचे ठायीं भक्ति उत्पन्न होते. १६.

इष्टापूर्तादिकर्माणि तेनाचरति मानवः ।
शिवार्पणधिया कामान्परित्यज्य यथाविधि ॥ १७ ॥
त्या भक्तीच्या योगाने सर्व मनोरथांचा त्याग करून केवल शिवार्पणबुद्धीनें मनुष्य विधिपूर्वक इष्टापूर्त कर्में करू लागतो, १७.

अनुग्रहात्तेन शंभोर्जायते सुदृढो नरः ।
ततो भीताः पलायन्ते विघ्नं हित्वा सुरेश्वराः ॥ १८ ॥
त्यापासून शिवाचा त्याच्यावर अनुग्रह होतो आणि त्यानें मनुष्य पराक्रमी होतो. नंतर देव भितात आणि विघ्ने करावयाची सोडून पळून जातात. १८.

जायते तेन शुश्रूषा चरिते चन्द्रमौलिनः ।
शृण्वतो जायते ज्ञानं ज्ञानादेव विमुच्यते ॥ १९ ॥
असे झाले झणजे मनुष्याला शिवाचें चरित्र श्रवण करावे अशी इच्छा उत्पन्न होते. तें ऐकू लागला म्हणजे ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञान झाले म्हणजे मुक्त होतो. १९.

बहुनात्र विमुक्तेन यस्य भक्तिः शिवे दृढा ।
महापापोपपापौघकोटिग्रस्तोऽपि मुच्यते ॥ २० ॥
फार काय सांगावे ? ज्याची शिवावर दृढ भक्ति आहे तो कोट्यवधि महापातके व पातके यांच्या प्रवाहांत बुडाला असला तरी मुक्त होतो. २०.

अनादरेण शाठ्येन परिहासेन मायया ।
शिवभक्तिरतश्चेत्स्यादन्त्यजोऽपि विमुच्यते ॥ २१ ॥
अनादराने, वक्रत्वाने, थट्टेने किंवा कपटाने जरी शिवभक्तीविषयी मनुष्य तत्पर होईल आणि तो अंत्यज जरी असेल तथापि मुक्त होतो. २१.

एवं भक्तिश्च सर्वेषां सर्वदा सर्वतोमुखी ।
तस्यां तु विद्यमानायां यस्तु मर्त्यो न मुच्यते ॥ २२ ॥
संसारबन्धनात्तस्मादन्यः को वास्ति मूढधीः ।
नियमाद्यस्तु कुर्वीत भक्तिं वा द्रोहमेव वा ॥ २३ ॥
तस्यापि चेत्प्रसन्नोऽसौ फलं यच्छति वाञ्छितम् ।
ऋद्धं किंचित्समादाय क्षुल्लकं जलमेव वा ॥ २४ ॥
यो दत्ते नियमेनासौ तस्मै दत्ते जगत्त्रयम् ।
तत्राप्यशक्तो नियमान्नमस्कारं प्रदक्षिणाम् ॥ २५ ॥
यः करोति महेशस्य तस्मै तुष्टो भवेच्छिवः ।
प्रदक्षिणास्वशक्तोऽपि यः स्वान्ते चिन्तयेच्छिवम् ॥ २६ ॥
गच्छन्समुपविष्टो वा तस्याभीष्टं प्रयच्छति ।
चन्दनं बिल्वकाष्ठस्य पुष्पाणि वनजान्यपि ॥ २७ ॥
फलानि तादृशान्येव यस्य प्रीतिकराणि वै ।
दुष्करं तस्य सेवायां किमस्ति भुवनत्रये ॥ २८ ॥
ह्याप्रमाणे सर्व प्रकारांनी सर्व प्राण्यांची शिवाविषयींची भक्ति अखंड प्रवाहरूप चाललेली असून जो मनुष्य संसारबंधापासून मुक्त होणार नाही त्यासारखा दुसरा कोण मूर्ख आहे ? जो नियमाने शिवाची भक्ति अथवा द्वेष करतो त्यालाहि प्रसन्न होऊन शिव वांछितफल देतो. कांहीं मोठ्या किंमतीची वस्तु किंवा अगदीं क्षुल्लक-अल्पमोलाची, वस्तु अथवा केवळ उदक घेऊन जो नियमानें अर्पण करतो त्याला शिव प्रसन्न होऊन त्रैलोक्य देतो. तेहि करावयास अशक्त असेल तर नियमानें नमस्कार किंवा प्रदक्षिणा जो करितो त्यालाहि शिव प्रसन्न होतो. प्रदक्षिणा करावयासहि जो समर्थ नाहीं तो देखील बसतां, उठतां, चालतां, सर्वकालीं अंतःकरणांत शिवाचें ध्यान करील तर त्यालाहि शंकर प्रसन्न होऊन अभीष्ट वर देतो. बेलाच्या काष्ठाचें चंदन, अरण्यांत उत्पन्न झालेली पुष्पें, तशीच अरण्यांतील फलें हीच ज्याला फार प्रीतीनें आवडतात अशा शिवाची भक्ति करण्यांत कठिण ते काय आहे ? २२-२८.

वन्येषु यादृशी प्रीतिर्वर्तते परमेशितुः ।
उत्तमेष्वपि नास्त्येव तादृशी ग्रामजेष्वपि ॥ २९ ॥
अरण्यांत उत्पन्न झालेल्या पदार्थांवर जशी शंकराची प्रीति आहे तशी ग्रामांत उत्पन्न झालेल्या पदार्थांवर - मग ते कितीहि उत्तम असोत तथापि त्यांवर नाहीं. २९.

तं त्यक्त्वा तादृशं देवं यः सेवेतान्यदेवताम् ।
स हि भागीरथीं त्यक्त्वा काङ्क्षते मृगतृष्णिकाम् ॥ ३० ॥
अशा या देवाला सोडून जो इतर देवतेस भजतो तो भागीरथी सोडून मृगजलाची इच्छा करतो असे होते. ३०.

किंतु यस्यास्ति दुरितं कोटिजन्मसु संचितम् ।
तस्य प्रकाशते नायमर्थो मोहान्धचेतसः ॥ ३१ ॥
परंतु ज्याने कोट्यवध जन्मांमध्ये पातकाचाच संचय केला आहे व ज्याचे अंतःकरण मोहाने अंध झाले आहे अशाला हा शिवभक्तिरूप अर्थ दिसत नाहीं. ३१.

न कालनियमो यत्र न देशस्य स्थलस्य च ।
यत्रास्य चित्रं रमते तस्य ध्यानेन केवलम् ॥ ३२ ॥
ज्याला कालनियम नाहीं, देशाचा व स्थलाचाहि नियम नाहीं, तर ज्या ठिकाणी ह्याचे चित्त रममाण होईल त्या ठिकाणी व त्याकाली ३२.

आत्मत्वेन शिवस्यासौ शिवसायुज्यमाप्नुयात् ।
अतिस्वल्पतरायुः श्रीर्भूतेशांशाधिपोऽपि यः ॥ ३३ ॥
स तु राजाहमस्मीति वादिनं हन्ति सान्वयम् ।
कर्तापि सर्वलोकानामक्षयैश्वर्यवानपि ॥ ३४ ॥
शिवः शिवोऽहमस्मीति वादिनं यं च कञ्चन ।
आत्मना सह तादात्म्यभागिनं कुरुते भृशम् ॥ ३५ ॥
'मी शिवरूप आहे' असे आत्मरूपाने शिवाचे ध्यान केल्याने शिवसायुज्य पावतो. ज्याचे आयुष्य व वैभव अतिस्वल्प पण तो जर शंकराच्या अंशाच्या अंशाने युक्त असेल तर 'मी राजा आहे' असा अभिमान धरणाराचा परिवारासहित नाश करण्यास समर्थ होतो. शिव सर्व लोकांचा कर्ता व अक्षय ऐश्वर्याने युक्त आहे तरी 'मी शिवस्वरूपी आहे' असें म्हणणार्‍या कोणाहि माणसाला [अल्पज्ञान्याला ] तत्काल आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावणारा, असा करतो. ३३-३५.

धर्मार्थकाममोक्षाणां पारं यस्याथ येन वै ।
मुनयस्तत्प्रवक्ष्यामि व्रतं पाशुपताभिधम् ॥ ३६ ॥
हे ऋषिहो ! आतां धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चार पुरुषार्थांप्रत ज्या साधनांनी जातात ते पाशुपत नांवाचे व्रत मी तुम्हांला सांगतों. ३६.

कृत्वा तु विरजां दीक्षां भूतिरुद्राक्षधारिणः ।
जपन्तो वेदसाराख्यं शिवनामसहस्रकम् ॥ ३७ ॥
संत्यज्य तेन मर्त्यत्वं शैवीं तनुमवाप्स्यथ ।
ततः प्रसन्नो भगवाञ्छंकरो लोकशंकरः ॥ ३८ ॥
भवतां दृश्यतामेत्य कैवल्यं वः प्रदास्यति ।
रामाय दण्डकारण्ये यत्प्रादात्कुम्भसंभवः ॥ ३९ ॥
तत्सर्वं वः प्रवक्ष्यामि शृणुध्वं भक्तियोगिनः ॥ ४० ॥
इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
शिवभक्त्युत्कर्षनिरूपणं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
विरजा नामक दीक्षा स्वीकारून विभूति आणि रुद्राक्ष धारण करून सर्व वेदांचें केवल सार असे जे शिवसहस्रनाम त्याचा जप केला म्हणजे तुम्हांला मर्त्यत्व जाऊन शिवत्व प्राप्त होईल आणि तसे झाले म्हणजे भगवान् लोककल्याणकर्ता शंकर प्रसन्न होऊन तुम्हांला दर्शन देऊन, कैवल्य मुक्ति देईल. अगस्त्य ऋषीनें दंडकारण्यामध्ये रामचंद्राला जे सांगितले ते सर्व मी तुम्हांला सांगतों. भक्तियुक्त होऊन श्रवण करा. ३७-४०. इति प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥

GO TOP