श्रीमद् भगवद्‌गीता
द्वादशोऽध्यायः

भक्तियोगः


अक्षरोपासक व विश्वरूपोपासक यांतील युक्ततम कोण ? असा अर्जुनाचा प्रश्न.

द्वितीयाध्यायांतील 'अशोच्यानन्यशोचस्त्वं०' या श्लोकापासून विभूति-योगाख्य दहाव्या अध्यायाच्या अंतापर्यंत सर्व अध्यायांत परमात्म्याचें-अक्षराचें म्ह० सर्व विशेषशून्य अशा ब्रह्माचें उपासन सांगितलें. म्ह० निरुपाधिक ब्रह्म ज्ञेय-जाणण्यास योग्य आहे असें अनुसंधान करावयास सांगितलें व त्याच अध्यायामध्ये ठिकठिकाणीं सर्व योगैश्वर्य, सवर्ज्ञानशक्ति यांनी युक्त असें सत्त्व हीच ज्याची उपाधि आहे, अशा सोपाधिक ईश्वराचे-तुझेच ध्येयत्वानें उपासन सांगितले. पण विश्वरूपाध्यायांत ऐश्वर्य, आद्य, समस्त जगदारमरूप असें तुझें विश्वरूप उपासनेसाठींच तूं दाखविलेंस आणि शेवटीं 'मत्कर्मकृत्०' इत्यादि सांगितले आहेस. यास्तव या दोन पक्षांतील अधिक विशिष्ट-अधिक चांगलें उपासन कोणतें ! ते जाणण्याच्या इच्छेने अर्जुन पुढील प्रश्न करीत आहे-

अर्जुन उवाच -
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चापि अक्षरं अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १२-१ ॥

अन्वय : एवं - अकराव्या अध्यायाच्या शेवटीं सागितल्याप्रमाणे - सततयुक्तः - अहोरात्र भगवत्कर्मादिकांत युक्त होऊन - ये भक्ताः त्वां पर्युपासते - जे भक्त तुला भजतात, तुझे ध्यान करतात - अपि च ये - आणि जे भक्त - अव्यक्तं अक्षरं पर्युपासते - अव्यक्त ब्रह्माची उपासना, भक्ति, ध्यान करतात - तेषां योगवित्तमा के - त्या दोन प्रकारच्या भक्तांतील आधिक योगवेत्ते कोण ? त्यांतील श्रेष्ठ भक्त कोण ? १.

व्याख्या : एवम् इति अतीतानन्तरश्लोकेन उक्तम् अर्थं परामृशति ‘मत्कर्मकृत्’ (भ. गी. ११ । ५५) इत्यादिना । एवं सततयुक्ताः, नैरन्तर्येण भगवत्कर्मादौ यथोक्ते अर्थे समाहिताः सन्तः प्रवृत्ता इत्यर्थः । ये भक्ताः अनन्यशरणाः सन्तः त्वां यथादर्शितं विश्वरूपं पर्युपासते ध्यायन्ति ; ये चान्येऽपि त्यक्तसर्वैषणाः संन्यस्तसर्वकर्माणः यथाविशेषितं ब्रह्म अक्षरं निरस्तसर्वोपाधित्वात् अव्यक्तम् अकरणगोचरम् । यत् हि करणगोचरं तत् व्यक्तम् उच्यते, अञ्जेः धातोः तत्कर्मकत्वात् ; इदं तु अक्षरं तद्विपरीतम् , शिष्टैश्च उच्यमानैः विशेषणैः विशिष्टम् , तत् ये चापि पर्युपासते, तेषाम् उभयेषां मध्ये के योगवित्तमाः ? के अतिशयेन योगविदः इत्यर्थः ॥ १ ॥

अर्थ : अर्जुन म्हणाला - अकराव्या अध्यायाच्या शेवटीं सांगितल्याप्रमाणें अहोरात्र भगवत्कर्मादिकांत युक्त होऊन जे मंद व मध्यम अधिकारी भक्त तुला भजतात - तुझें ध्यान करतात आणि जे गिर्गुण ब्रह्मनिष्ठ उत्तम अधिकारी भक्त अव्यक्त ब्रह्माची उपासना-भक्ति-ध्यान करतात त्या दोन प्रकारच्या भक्तांतील अधिक योगवेत्ते कोण ? त्यांतील श्रेष्ठ भक्त कोणते [ सगुणोपासक चांगले कीं निर्गुणोपासक ? त्यांतील अधिक श्रेष्ठ कोण ? ]

विवरण :


श्रीभगवानुवाच -
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः ॥ १२-२ ॥

अन्वय : ये मयि मनः आवेश्य - जे माझ्या ठिकाणीं, माझ्या सगुण स्वरूपांत मन स्थिर करून, माझ्या सगुण विश्वस्वरूपांत मन लावून - नित्ययुक्ताः - सतत, अहोरात्र युक्तचित्त होऊन व - परया श्रद्धा उपेताः - अत्यंत श्रद्धेने युक्त होऊन - मां उपासते - माझी उपासना करतात, मला भजतात - ते मे युक्ततमाः मताः - ते सगुणभक्त मला अतिशय उत्तम भक्त, श्रेष्ठ उपासक, असे संमत आहेत. सगुण ईश्वराची उपासना करणारे श्रेष्ठ असें मी समजतो. २

व्याख्या : मयि विश्वरूपे परमेश्वरे आवेश्य समाधाय मनः, ये भक्ताः सन्तः, मां सर्वयोगेश्वराणाम् अधीश्वरं सर्वज्ञं विमुक्तरागादिक्लेशतिमिरदृष्टिम् , नित्ययुक्ताः अतीतानन्तराध्यायान्तोक्तश्लोकार्थन्यायेन सततयुक्ताः सन्तः उपासते श्रद्धया परया प्रकृष्टया उपेताः, ते मे मम मताः अभिप्रेताः युक्ततमाः इति । नैरन्तर्येण हि ते मच्चित्ततया अहोरात्रम् अतिवाहयन्ति । अतः युक्तं तान् प्रति युक्ततमाः इति वक्तुम् ॥ २ ॥

अर्थ : श्रीकृष्ण म्हणाले - जे माझ्या ठिकाणी - माझ्या सगुण वि श्वरूप स्वरूपांत मन स्थिर करून सतत - अहो रात्र युक्तचित्त होऊन व अत्यंत श्रद्धेनेने युक्त होऊन माझी उपासना करतात, ते सगुण भक्त मला अतिशय उत्तम भक्त - श्रेष्ठ उपासक म्हणून संमत आहेत. सगुण ईश्वराची उपासना करणारे श्रेष्ठ असे मी समजतो. [ जे सम्यग्ज्ञानी एषणाशून्य अक्षरोपासक ते अगोदर राहू देत. त्यांच्या विषयी मला जे सांगावयाचे आहे ते मी पुढें सांगेन. पण त्याहून जे अन्य भक्त मज विश्वरूप परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करून श्रद्धेने युक्त होत्साते माझें सतत चिंतन करतात, ते मला युक्ततम म्हणून मान्य आहेत. कारण ते एक क्षणही फुकट न घालविता अहोरात्र माझ्या ठि काणी आपले चित्त लावून दुसऱ्या कशाचेही चिंतन न करतां केवळ माझेंच चिंतन करतात. म्हणून त्यांना युक्ततम म्हणणें योग्यच आहे. ]

विवरण :


त्यांतील विश्वरूपाचे चिंतन करणारे युक्ततम व निर्गुण ब्रह्मोपासकांविषयीं कांहींच सांगतां येत नाहीं, असें भगवानांचें उत्तर.

तर मग निर्गुणोपासक अक्षर ब्रह्मोपासक युक्ततम नव्हेत कीं काय ! नाहीं. तसें नाहीं, तर त्यांच्याविषयी जें कांहीं सांगावयाचे आहे तेंच आतां सांगतात -

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥ १२-३ ॥
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ १२-४ ॥

अन्वय : तु - पण - ये सर्वत्र समबुद्धयः सर्वभूतहिते रताः - जे सर्व ठिकाणी समबुद्धि, प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्मबुद्धि ठेवणारे व सर्व प्राण्यांच्या हितामध्ये निमग्न असलेले निर्गुणोपासक, निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे भक्त - इन्द्रियग्रामं संनियम्य - इंद्रियसमूहाचे म्ह० सर्व इंद्रियाचे संयमन करून, सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यांत ठेवून - अनिर्देश्यं - ज्याचा नांवानें निर्देश करतां येत नाहीं, - अव्यक्तं - जें व्यक्त नाही - सर्वत्रगं - सर्व सृष्टीत व्यापून राहणारे, - अचिंत्यं - ज्याचे चिंतनही करतां येत नाही - कूटस्थं - ज्याच्यामध्ये कोणताही विकार होत नाही, - अचलं - जे आपल्या अवस्थेपासून ढळत नाही - ध्रुवं - म्हणूनच जे नित्य आहे अशा - अक्षरं - अक्षराची - पर्युपासते - उपासना करतात, त्याचें अहोरात्र ध्यान करतात - ते मां एव प्राप्नुवन्ति - ते निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे मलाच प्राप्त होतात. ते मला म्ह० निर्गुण ब्रह्माला प्राप्त होतात. ३-४.

व्याख्या : 'ते मे युक्ततमा मता' इत्यनेन उपास्योपासकभेदेन इतरेभ्यः सगुणोपासकानां श्रेष्ठतमत्वं उक्तम् । निर्गुणोपासकानां तु स्वरूपत्वात् सफलं निर्गुणभजनप्रकारमाह द्वाभ्याम् । तुशब्देन पूर्वेभ्यः वैलक्षण्यं द्योतितम् । ये तु साधनचतुष्टयसंपन्नाः गुरुमुखात् अवगतवाक्यार्थाः परमहंसपरिव्राजकाः अव्यक्तं निर्गणं व्रह्म पर्यपासते परि आसमताद्‌भागे उपतादात्म्यलक्षणेन आसते आसनमवस्थानं कुर्वंति ब्रह्मणः ऐक्यं अनुभवन्ति । ते भक्ताः मामेव प्राप्नुवन्ति हति द्वितीयेनान्वयः । कथंभूतं अव्यक्तम् । अक्षरं न क्षरति तत् अक्षरं अविनाशि । पुनः कथंभूतम् । अनिर्देश्यं निर्देष्टुं निर्वक्तुं योग्यं न भवति तत् अनिर्देश्यम् । पुनः कथंभूतम् । सर्वत्रगं सर्वत्र गच्छति व्याप्नोति तत् सर्वत्रगम् । पुनः कथंभूतम् । अचित्यं चिन्तितुं अयोग्यं अचिंत्यम् । पुनः कथंभूतम् । कूटस्थं कूटे मायाप्रपंचे अधिष्ठानत्वेन तिष्ठति तत् कूटस्थं निर्विकारम् निर्विकल्पं 'निरंजनमिति श्रुतेः' । पुनः कथंभूतम् । अचलं चलनरहितम् । पुनः कथंभूतम् । ध्रुवं शाश्वतम् ॥ ३ ॥
यच्छब्दानिर्दिष्टान् साधनपूर्वकं तत्फलं आह । संनियम्येति । कथंभूताः ये । सर्वत्र सर्वेष्विति सर्वत्र स्थावरजंगमादिषु समबुद्धयः समा ब्रह्मरूपा बुद्धिर्येषां ते समबुद्धयः । पुनः कथंभूताः । सर्वभूतहितेरताः सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि सर्वभूतानां हितं सर्वभूतहितं तस्मिन् जीवनेब्रह्मणि रताः यद्वा सर्वभूतानां हिते कल्याणे रताः । किं कृत्वा । इंद्रियग्रामं इंद्रियाणां कर्मज्ञानेद्रियाणां ग्रामः समुदायः तं इद्रियग्रामं संनियम्य सम्यक् नियम्य ये पर्युपासते ते मामेव प्राप्नुवन्तीति भावः ॥ ४ ॥

अर्थ : जे सर्व ठिकाणी समबुद्धि - प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्मबुद्धि ठेवणारे व सर्व प्राण्यांच्या हितामध्ये निमग्न असणारे - निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे भक्त सर्व इंद्रियांचे संयमन करून - त्यांना स्वाधीन ठेवून अनिर्देष्य, अव्यक्त, सर्वत्रग, अचिंत्य, कूटस्थ, अचल, ध्रुव, अक्षर ब्रह्माची उपासना करतात, त्याचे अहोरात्र चिंतन करतात, ते निर्गुण ब्रह्मोपासक मलाच प्राप्त होतात. [ अनिर्देश्य म्ह० ज्याचा नांवानें निर्देश करतां येत नाही; अव्यक्त म्ह० जे व्यक्त नाहीं तें; सर्वत्रग म्ह० सर्वसृष्टींत व्यापून राहणारे; अचिंत्य म्ह० ज्याचें चिंतनही करतां येत नाही; कूटस्थ म्ह० ज्याच्यामध्ये कोणताही विकार होत नाहीं तें; अचल म्ह० आपल्या अवस्थेपासून न ढळणारे; ध्रुव म्ह० नित्य; अशा अक्षर ब्रह्माची उपासना जे करतात, से मलाच प्राप्त होतात. ज्ञानी पुरुषांना त्यांच्या ज्ञानाप्रमाणे भगवत्प्राप्ति होणे ही गोष्ट सिद्धच आहे. त्यामुळे ते मला प्राप्त होतात, हे सांगावयासच नको. तसेंच भगवत्स्वरूप झालेल्या ज्ञानी पुरुषांना युक्ततम किंवा अयुक्ततम यांतील कांहींच म्हणतां येत नाहीं.)

विवरण :


क्लेशोऽधिकतरस्तेषां अमव्यक्तासक्तचेतसाम् ॥
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्‌भिः अवाप्यते ॥ १२-५ ॥

अन्वय : अव्यक्तासक्तचेतसां तेषां - अव्यक्त ब्रह्मामध्ये ज्यांचें मन आसक्त झालें आहे अशा त्यांना - क्लेशः अधिकतरः - क्लेश व दुःख सगुणोपासकांपेक्षां पुष्कळच अधिक होते - हि - कारण - देहवद्‌भिः - व्यक्त देहावर अभिमान ठेवणाऱ्या, 'हा देहच मी' असें समजणाऱ्या लोकांना - अव्यक्ताः गतिः - अव्यक्त ब्रह्माची गति - दुःखं अवाप्यते - मोठ्या कष्टाने प्राप्त होते. ( म्हणून निर्गुणोपासकांपेक्षां सगुणोपासक चांगले.) ५.

व्याख्या : ननु-निर्गुणोपासकाः जीवंत एव त्वद्‌रूपाः भवन्ति चेत् पूर्वोक्ता अपि निर्गुणमेव किमिति नोपासते तत्राह । क्लेश इति । तेषां सगुणोपास्यत्वाभिमानेन पराग्दृष्टीनां अधिकतरः अतिशयेन अधिकः इति अधिकतरः क्लेशः बहुतरं दुःखं भवति । कथंभूतानां तेषाम् । अव्यक्तासक्तचेतसां अव्यक्ते प्रत्यक्‌ब्रह्मणि आसक्तं अभिनिविष्टं चेतोऽन्तःकरणं येषां ते अव्यक्तासक्तचेतसः तेषाम् । सगुणनिर्गुणयोः दोलायितचेतस्त्वात् उभयप्राप्तिप्रतिबंधेन अतीव दुःखे निमज्जन्तीत्यर्थः । उक्तमेव हेतुत्वेन विशदयति । हि यस्मात् कारणात् देहाभिमानं विना सगुणोपासनं न संभवति तस्माद्धेतोः देहवद्भिः देहाः विद्यन्ते येषां ते देहवन्तः तैः देहवद्भिः देहाभिमानवद्भिः अव्यक्ता अव्यक्तविषया गतिः प्राप्तिः दुःखं यथा यस्यां क्रियायां स्यात्तथा अवाप्यते किम् ? । न प्राप्यते इत्यर्थः ॥ ५ ॥

अर्थ : पण असें जरी आहे, तरी अव्यक्त ब्रह्मामध्ये ज्यांचे मन आसक्त झालें आहे, अशा त्यांना सगुणोपासकांपेक्षां अधिक क्लेश होतात. कारण व्यक्त देहावर अभिमान ठेवणार्‍या "हा देहच मी" असे समजणाऱ्या लोकांना अव्यक्त ब्रह्माची गति मोठ्या कष्टाने प्राप्त होते. म्हणून निर्गुणोपासकांपेक्षां सगुणोपासक श्रेष्ठ. [ अव्यक्त म्ह० अत्यंत सूक्ष्म, निर्विशेष अक्षर, त्यांत ज्यांचे चित्त आसक्त - 'मीच तें' असे अभिनिविष्ट असतें, त्यांना सगुणोपासकांपेक्षां क्लेश अधिक होतात. कारण ज्यांचा देहाभिमान सुटलेला नसतो, त्यांना अव्यक्त अक्षरात्मिका गति मोठ्या कष्टानें प्राप्त होते. ]

विवरण :


'अक्षरोपासक मलाच प्राप्त होतात' असें तूं सांगितलेस, पण त्यावरून सगुणोपासक तुला प्राप्त होत नाहींत, असे समजावयाचे कीं काय ? असे अर्जुन विचारील म्हणून भगवान् 'ते मला क्रमाने प्राप्त होतात' असें सांगतात-

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ १२-६ ॥
तेषां अहं समुद्धर्ता मृत्युसंसार सागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मयि आवेशितचेतसाम् ॥ १२-७ ॥

अन्वय : तु पार्थ - पण हे अर्जुना - ये मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य - जे सगुणभक्त माझे ठिकाणीं सर्व कर्मांचा संन्यास करून, सर्व कर्मे मला अर्पण करून - मत्पराः - मत्परायण होऊन, मीच ज्यांना श्रेष्ठ आहे, मजवांचून दुसरा कोणी श्रेष्ठ नाही, असे होऊन - अनन्येन एव योगेन - विश्वरूप परमेश्वर जो मी, त्या मला सोडून दुसऱ्या कोणाच्याही ठिकाणी ज्यांचें चित्त जात नाहीं, अशा अनन्य योगानेच, केवल माझ्याच ठिकाणीं चित्ताला स्थिर करून - मां ध्यायन्तः उपासते - माझें ध्यान करणारे (असे जे भक्त) माझी भक्ति करतात - मयि आवेशितचेतसां तेषां - माझ्या ठिकाणी ज्यांनी आपले चित्त स्थिर ठेवले आहे, अशा त्यांचा - अहं न चिरात् - मी अगदी लवकर - मृत्युसंसारसागरात् समुद्धर्ता भवामि - मृत्यूनें युक्त अशा या संसारसागरापासून उत्तमप्रकारे उद्धार करणारा होतों. ६-७.

व्याख्या : संप्रति सगुणोपासकानां वृत्तं फलं च शृणु इति अभिप्रायेणाह द्वाभ्याम् । मद्भक्तानां तु मत्प्रसादात् अनया श्रद्धया स्वत एव सिद्धिर्भवतीत्याह । येत्विति । ये सगुणोपासकाः मत्पराः संतः अहं सगुणत्वेन वर्त्तमानो विश्वरूपः परः पुरुषार्थो येषां ते मत्पराः सर्वाणि लौकिकवैदिकानि कर्माणि मयि सर्वात्मनि संन्यस्य समर्प्य न विद्यते अन्यः मद्व्यतिरेकेण देवतांतरभजनगंधः यस्मिन् सः अनन्यः तेन योगेन भक्तिलक्षणयोगेन मां सर्वांतरात्मानं ध्यायन्तः सन्तः ध्यायन्ति ते ध्यायन्तः ध्यायन्ति सर्वत्र मद्दृष्टिं भावयन्ति उपासते सेवन्ते ॥ ६ ॥
तेषाम् हति । हे पार्थ ! अहं तेषां उपासकानां मृत्युसंसारसागरात् यथा सागरे पतितस्य ध्रुवः मृत्युः तथा संसारसागरे पतितस्य व स्वरूपच्युतिलक्षणस्य मृत्योः अवश्यंभावित्वात् संसार एव सागरः समुद्रः संसारसागरः मृत्युयुक्तश्चासौ संसारसागरश्च मृत्युसंसारसागरः तस्मात् समुद्धर्त्ता सम्यक् उत्तमपकारेण उत् ऊर्ध्वं धर्त्ता पृथक् कर्त्ता समुद्धर्त्ता भवामि । ननु-मृत्युसंसारसागरे पतितस्य त्रिविधतापवडवानलदग्धस्य नानासंकल्पमीनत्रोटितमानस्य जायासुताप्तमकरगृहीतगात्रस्य अहंकारमहाव्यालविषदूषितस्य वासनावरुणपाशपाशितस्य नानावेदनामनुभवतः कदा समुद्धार्ता भवसि इत्यपेक्षायामाह । हे पार्थ ! मृत्युसंसारसागरनिमग्नाः ये पुरुषाः दैवात् मदभिमुखाः जाताः तदैव तेषां समुद्धर्त्ता भवामि । चिरात् विलंबेन न भवामि । अतित्वरया । हेतुत्वेन तान् विशिनष्टि । कथंभूतानां तेषाम् । मयि सर्वात्मनि आवेशितचेतसां आवेशितं निक्षिप्तं चेतोऽन्तःकरणं यैस्ते आवेशितचेतसः तेषाम् । हे पार्थ ! पतितानामपि अहं सांकेत्येन पुत्रमिषेण नामग्रहणवतां तत्काल एव समुद्धर्त्ता भवामि । तत्र मय्यावेशितचेतसां उद्धरणे सर्वगतोहं कथं विलंबं सहामि ? इति भावः ॥ ७ ॥

अर्थ : पण, हे अर्जुना, जे सगुण भक्त माझ्या ठिकाणी सर्व कर्मांच्या संन्यास करून - सर्व कर्मे मला अर्पण करून मत्परायण - मीच ज्यांना श्रेष्ठ आहे, मजवांचून दुसरा कोणी श्रेष्ठ नाहीं, असे होऊन, विश्वरूप परमेश्वर जो मी, त्या मला सोडून दुसऱ्या कोणाच्याही ठिकाणी ज्यांचे चित्त जात नाही, अशा अनन्य योगानेंच - केवल माझ्याच ठिकाणी चित्ताला स्थिर करून, माझी उपासना करतात, त्या मजमध्यें चित्त स्थिर केलेल्या मज भक्तांचा मी मृत्युयुक्त संसारसागरातून सत्वर उद्धार करतो. [ ज्यांनीं आपलें चित मज विश्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केले आहे, त्यांचा मी उद्धार करतो. ]

विवरण :


मयि एव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मयि एव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ १२-८ ॥

अन्वय : मयि एव मन आधत्स्व - माझ्यामध्येंच आपले मन स्थिर कर; तूं आपल्या मनाला माझ्या सगुण विश्वरूपांत स्थाप - मयि बुद्धिं निवेशय - माझ्यामध्यें निश्चय करणाऱ्या बुद्धीला प्रविष्ट कर. तिलाहि माझ्या स्वरूपांतच राहू दे. तूं आपलें मन व बुद्धि या दोन्ही चित्तवृत्तींना माझ्याच ठिकाणी स्थिर केलेस म्हणजे - अतः ऊर्ध्व मयि एव निवशिष्यसि - मेल्यावर माझ्या ठिकाणींच तूं राहशील - न संशयः - यात कांही शंका नाही. ८.

व्याख्या : तस्मात् त्वमपि एवं भव हत्याह । मय्येवेति । हे पार्थ ! त्वं मय्येव सर्वात्मके एव मनः कामादिवृत्तिं संकल्पविकल्पात्मकं मनः आधत्स्व स्थिरीकुरु न तु अन्यत्र । सर्वैः उपायैः मामेव स्मरेत्यर्थः । चेत्यपरं बुद्धिं वासुदेवः सर्वमिति अध्यवसायात्मिकां बुद्धिं मयि सर्वात्मके निवेशय प्रवेशय । एवं सति किं स्यात्तत्राह । त्वं एवं कुर्वन् सन् मत्प्रसादेन लब्धज्ञानः सन् अत ऊर्ध्वं देहांते मयि सर्वकारणे निवसिष्यसि वासं करिष्यसि । जन्ममरणविनिर्मुक्तः सन् मां प्राप्स्यसि । मयि व्यावहारिकं सुखं त्यक्त्वा भगवति मनोबुद्धिसमर्पणेन भगवत्प्राप्तिः भविष्यति न वेति संशयो न कार्यः ॥ ८ ॥

अर्थ : ज्याअर्थी भगवदुपासना असे विशिष्ट फल देणारी आहे, त्याअर्थी तूं माझ्या ठिकाणींच आपलें मन स्थिर कर. तूं आपल्या मनाला माझ्या सगुण स्वरूपांत स्थापन कर. माझ्यामध्येंच निश्चय करणार्‍या बुद्धीला प्रविष्ट कर. तिलाही माझ्या स्वरूपांत राहू दे. याप्रमाणे तूं आपलें मन व बुद्धि या दोन्ही चित्तवृत्तींना माझ्याच स्वरूपांत स्थिर केलेंस, म्हणजे मेल्यावर माझ्या ठिकाणींच रहाशील, यांत संशय नाहीं. [ भगवन्निष्ठाला भगवत्प्राप्ति होते, या विषयीं केव्हांही संशय ठेवू नये. ]

विवरण :


भगवानांमध्यें चित्तादि स्थापणे या उत्तम साधनापासून कर्मफलत्यागापर्यंत अधिकारीपरत्वें उत्तरोत्तर सुलभ साधनांचा उपदेश.

स्वमतप्रदर्शनपूर्वक भगवत्‌प्राप्तीचे दुसरे उपायही सांगतात-

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥ १२-९ ॥

अन्वय : अथ मयि चित्तं स्थिरं न शक्नोषि - आतां जर ( मी वर सांगितल्याप्रमाणें ) माझ्या ठिकाणी आपल्या मनाला स्थिर, अचल स्थापावयास तूं समर्थ नसशील - ततः हे धनंजय - तर मग हे अर्जुना ! - मां अभ्यासयोगेन - मला अभ्यासयोगाने, मनाला वारंवार आवरून धरून माझ्याच ठिकाणी तें स्थिर करण्याचा प्रयत्न करणे, या अभ्यासपूर्वक योगाने - आप्तुं इच्छ - प्राप्त होण्याची तू इच्छा कर. ९

व्याख्या : मनोबुद्धिनिवेशने असमर्थश्चेत्तथाकरणे सुगमोपायं शृणु इति अभिप्रायेणाह । अथेति । हे धनंजय ! अथ यदि त्वं मयि सर्वात्मके स्थिरं निश्चलं चित्तं संकल्पाध्यवसायात्मकं अंतःकरणं समाधातुं सम्यक् आधातुं अवस्थापयितुं न शक्रोषि चेत् न समर्थो भवसि चेत् ततः तर्हि अभ्यासयोगेन अभ्यासस्य पुनः पुनः ममानुस्मरणलक्षणस्य योगः प्रत्ययावृत्तिः अभ्यासयोगः तेन मां सर्वात्मानं आप्तुं प्राप्तुं इच्छां कुरु । प्रयत्‍नं कुर्वित्यर्थः ॥ ९ ॥

अर्थ : आतां मीं वर सांगितल्याप्रमाणे तूं माझ्या ठिकाणींच आपल्या मनाला अचल स्थापावयास जर समर्थ नसशील, तर हे अर्जुना, अभ्यासयोगानें - मनाला वारंवार आवरून धरून माझ्या ठिकाणी ते स्थिर करण्याचा प्रयत्न करणें, या अभ्यासपूर्वक योगानें मला प्राप्त होण्याची इच्छा कर. [ चित्ताला स्थूल प्रतिमादि एकाच आलंबनामध्यें सर्व बाजूंनी आकर्षण करून पुनः पुनः स्थापणे हाच अभ्यास होय. असे अभ्यासपूर्वक समाधान म्ह० चित्ताची एकाग्रता, हाच योग, त्याच्या योगाने मला जाणण्याची आकांक्षा धर.]

विवरण :


पण हा अभ्यास करण्याचीही योग्यता नसल्यास त्याहून सुलभ उपाय सांगतात-

अभ्यासेऽपि असमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं अवाप्स्यसि ॥ १२-१० ॥

अन्वय : अभ्यासे अपि (चेत्) असमर्थ असि - वर जसा सांगितला तसा अभ्यास करण्यासही जर तूं असमर्थ असशील तर मग - मत्कर्मपरमः भव - माझायासाठी कर्म करणे, हेंच एक काम कर. ईश्वरासाठी कर्मकरणे हेच आपलें मुख्य कर्तव्य समज. कारण - मदर्थं अपि कर्माणि कुर्वन् - केवळ माझ्यासाठी कर्मे करणारा असा तूं - सिद्धिं अवाप्स्यसि - सिद्धीला, चित्तशुद्धि, योग, ज्ञानप्राप्ति या क्रमाने मोक्ष या सिद्धीस प्राप्त होशील. १०

व्याख्या : अभ्यासेपीति किं च त्वं अभ्यासेपि पुनः पुनः विषयेभ्यः मनोनिग्रहेण ममानुस्मरणलक्षणाभ्यासेपि असमर्थः अशक्तः असि चेत् तर्हि मत्कर्मपरमः मदर्थमेव मत्प्रीत्यर्थमेव कर्म वैदिकं लौकिकं कर्म मत्कर्म मत्कर्म एव परमं पुरुषार्थसाधनं यस्य सः मत्कर्मपरमः भव स्याः । ततः किमित्यत आह । त्वं मदर्थं मत्प्रीत्यर्थं कर्माणि एकादश्युपवासव्रतचर्या नामसंकीर्त्तनं इत्यादीनि कुर्वन् सन् करोतीति कुर्वन् सिद्धिं मत्प्राप्तिलक्षणाख्यं मोक्षं अवाप्स्यसि प्राप्स्यसि ॥ १० ॥

अर्थ : वर जसा सांगितला, तसा अभ्यास करण्यासही जर तूं असमर्थ असशील, तर माझ्यासाठी कर्म करणें हेंच एक कार्य कर. ईश्वरासाठी कर्म करणें, हेंच आपले मुख्य कर्तव्य समज. कारण माझ्यासाठींही कर्मे करणारा तूं सिद्धीला - चित्तशुद्धि, योग, ज्ञानप्राप्ति या क्रमाने मोक्ष या सिद्धीला प्राप्त होशील. [ माझ्यासाठी जें कर्म ते मत्कर्म. तत्परम म्ह. मत्कर्मप्रधान. मुख्यत्वेंकरून माझ्यासाठी कर्मे कर. अभ्यासावांचून केवल माझ्यासाठी कर्म करणाराही तूं चित्तशुद्ध्यादि क्रमाने या जन्मीं किंवा उत्तरजन्मी ब्रह्मभावाला प्राप्त होशील. येथील 'अपि०' हा शब्द, ईश्वरार्थ केलेल्या कर्माचे ब्रह्मभाव हें साक्षात् फल नसून चित्तशुद्ध्यादि क्रमाने मिळणानें फल आहे, हे सुचविण्यासाठी आहे. ]

विवरण :


अथ एतद् अपि अशक्तोऽसि कर्तुं मद्योगं आश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ १२-११ ॥

अन्वय : अथ (चेत्) एतत् अपि कर्तुं अशक्तः असि - आतां जर हेही करण्यास तूं असमर्थ असशील - ततः मद्‍योगं आश्रितः - तर मग सर्व कर्मे मला अर्पण करून त्यांचें अनुष्ठान करणे,या योगाचा आश्रय करून व - यतात्मवान् सर्वकर्मफलत्यागं कुरु - आपल्या चित्ताचे संयमन करून सर्व कर्माच्या फलांचा त्याग कर. ११

व्याख्या : अत्राप्यशक्तौ अतिसुगमोपायमाह । अथैतदपीति । अथ पक्षांतरे त्वं एतदपि अभ्यासमपि कर्तुं निर्वर्तयितुं अशक्तः असमर्थः असि चेत् ततः तर्हि मद्योगं मम योगः मद्योगः तं मदेकशरणं आश्रितः सन् अधिष्ठितः सन् सर्वकर्मफलत्यागं सर्वाणि समस्तानि च तानि कर्माणि च सर्वकर्माणि सर्वकर्मणां आवश्यकाग्निहोत्रादिकर्मणां फलानि सर्वकर्मफलानि सर्वकर्मफलानां त्यागः मयि समर्पणं सर्वकर्मफलत्यागः तं कुरु । कथंभूतः त्वम् । यतात्मवान् यतः स्वार्थं फलाभिलाषं विहाय नियमितः आत्मा मनो यस्य सः यतात्मवान् । तथा भवेत्यर्थः । ननुपूर्वस्मिन् लोके मदर्थमपि कर्माणि कुरु इति उक्ते सति अर्थात् फलत्यागः उक्तः । पुनरपि अस्मिन् श्लोके सर्वकर्मफलत्यागं कुरु इति पुनरुक्तौ किमभिप्रायेण पूर्वस्मात् सुगमोपायाभिधानं इति चेत् उच्यते । पूर्वस्मिन् श्लोके सर्वकर्मसु आदौ च मध्ये च अवसाने च मदर्थत्वेन अनुसंधानं उक्तम् । हह तु सर्वकर्मावसाने कृष्णार्पणबुद्ध्या फलत्यागः इति विवेकः ॥ ११ ॥

अर्थ : आतां हें अभ्यासाहून सुलभ असलेले कार्य म्ह० सर्व कर्मे मला अर्पण करून त्यांचे अनुष्ठान करणें या योगाचा आश्रय करून करण्यासही जर तूं असमर्थ असशील, तर चित्ताचे संयमन केलेला असा होऊन सावधान मनानें सर्व कर्मांच्या फळाचा त्याग कर. [ बाह्य विषयांनी चित्ताचे आकर्षण केल्यामुळें मत्कर्मपरत्वही अशक्य झाल्यास तूं नियतचित्त होऊन सर्व कर्मांच्या फलांचा संन्यास कर.]

विवरण :


कर्मफलत्यागाची स्तुति.

भगवान् कर्मफलत्यागाची स्तुति करतात-

श्रेयो हि ज्ञानं अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिः अनन्तरम् ॥ १२-१२ ॥

अन्वय : अम्यासात् ज्ञानं श्रेयः हि - वर सांगितलेल्या अभ्यासाहून ज्ञान श्रेयः, अधिक प्रशंसनीय आहे, हे तर प्रसिद्धच आहे. पण - ज्ञानात् ध्यानं विशिष्यते - त्या ज्ञानाहूनही ज्ञानासह केलेले ध्यान अधिक चांगले, ध्यानात् कर्मफलत्यागः - आणि त्या तसल्या ध्यानाहूनही ज्ञान ध्यानयुक्त कर्माच्या फलाचा त्याग अधिक चांगला आहे. कारण - त्यागात् अनन्तरं शान्तिः - कर्मफलाचा त्याग केल्यानंतर लागलीच संसाराची शांति होते. १२

व्याख्या : तमेव सर्वकर्मफलत्यागं केनचित् साम्येन मोक्षोपयोगितया स्तौति । श्रेयोहीति । केवलं पांडित्याभिनिवेशेन अभ्यासात् शास्त्राध्ययनाभ्यासात् ज्ञानं आत्मनिष्ठं ज्ञानं श्रेयः प्रशस्यतरम् । अस्ति इति शेषः । पराकाष्ठा उक्ता । ज्ञानाधिकाराभावे ज्ञानात् युक्तिसहितोपदेशपूर्वकज्ञानात् ध्यानं दृश्यत्यागपूर्वकं अहं ब्रह्मास्मीति प्रवाहीकरणं विशिष्यते । वर्णाश्रमविहितानुष्ठानादेः श्रेष्ठं तदशक्तावपि ध्यानात् उक्तलक्षणात् कर्मफलत्यागः कर्मणां नित्यनैमित्तिकानां फलानि फलाभिलाषाः कर्मफलानां त्यागः मदर्पणफलत्यागः श्रेयान् श्रेष्ठः । त्यागात् ईश्वरकर्मफलसमर्पणात् अनंतरं ईश्वरप्रसादेन ज्ञानलाभानंतरं शीघ्रमेव शांतिः सर्वानर्थनिवृत्तिलक्षणा स्वरूपास्थितिः भवति ॥ १२ ॥

अर्थ : वर सांगितलेल्या अभ्यासाहून ज्ञान अधिक प्रशंसनीय आहे, हें प्रसिद्धच आहे. पण ज्ञानाहूनही ज्ञानासह केलेले ध्यान अधिक चांगले आणि त्या तसल्या ध्यानाहूनही ज्ञान-ध्यानयुक्त कर्मांच्या फलाचा त्याग अधिक चांगला आहे. कारण कर्मफलाचा त्याग केल्यानंतर लागलीच संसाराची शांति होते. [ अविवेकपूर्वक अभ्यासाहून म्ह० ज्ञानासाठी केलेल्या श्रवणाभ्यासाहून किंवा ध्यानाभ्यासाहून ज्ञान-शब्द व उपपत्ति, किंवा श्रवण व मनन यांनीं केलेला आत्मनिश्चय अधिक प्रशंसनीय आहे. कारण सो साक्षात्काराला निमित्त होतो. अशा ज्ञानाहूनही ज्ञानपूर्वक ध्यान श्रेष्ठ आहे. ज्ञानवानाच्या ध्यानाहूनही कर्मफलत्याग विशिष्ट-श्रेष्ठ आहे. नियतचित्त, या विशेषणाने विशिष्ट असलेल्या पुरुषाच्या कर्मफलत्यागाने कारणांसह संसाराचा उपशम लागलाच होतो. ध्यान हे साक्षात्काराचे अंतरंग साधन आहे. दीर्घकाल, निरंतर सत्कार्राने केलेल्या ध्यानाने तत्त्वसाक्षात्कार होऊन संसारदुःखाची शांति होते. पण तसल्या चध्यानाहूनही कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे, असे शेवटीं सांगितले आहे. त्यामुळे ही कर्मफलत्यागाची स्तुतीच आहे. परम सिद्धान्त नव्हे. कारण अक्षरोपासमादि प्राप्त साधनांतील पूर्व पूर्व साधनाचे अनुष्ठा करण्याचे सामर्थ्य नसल्यास उत्तरोत्तर सुलभ साधनांचा उपदेश करून सर्वांच्या शेवटीं कर्मफलत्याग सांगितला आहे.)

विवरण :


भगवद्‌भक्ताच्या अद्वेष्ट्टत्वादि साधनांचा व लक्षणांचा उपदेश.

आत्मा व ईश्वर यांच्या भेदाचा आश्रय करून ईश्वराच्या ठिकाणी चित्तसमाधानरूप योग सांगितला. त्यावरून ज्याला अभेदज्ञान झाले आहे त्याच्यासाठीच कर्मयोगादिक आहे, असे सिद्ध होत नाहीं. कारण 'अथैतदप्यशक्तोसि०' असें म्हणून 'असमर्थ असणें,' हें अज्ञानाचे कार्य सुचविले आहे. अर्थाद अक्षरोपासकाचा कर्मयोग उपपन्न होत नाहीं, असेंच भगवान् प्रदर्शित करीत आहेत. अक्षरोपासकांच्या कर्मयोगाप्रमाणेच कर्मयोग्याच्या अक्षरोपासनेची अनुपपत्तीही भगवान दाखवीत आहेत. तत्त्वज्ञाननिष्ठ अक्षरोपासक आपल्या ज्ञानाप्रमाणें ईश्वरालाच प्राप्त होतात, पण कर्मी साक्षात् त्याला प्राप्त होण्यास योग्य नसतात. 'ते मलाच प्राप्त होतात' या वचनाने अक्षरोपासकांचे कैवल्यप्राप्तीविषयी स्वातंत्र्य सांगून 'त्यांचा मी उद्दार करणारा आहे' या वचनाने इतरांचे पारतंत्र्य - ईश्वराधीनता भगवानांनीं दाखविली आहे -त्यामुळें अक्षरोपासना व कर्मयोग ही एकत्र संभवत नाहींत. ज्या अर्थी असें आहे, त्या अर्थी तत्त्वज्ञाननिष्ठ अक्षरोपासक संन्याशांना ' अद्वेष्टा सर्व भूतानां' येथून साक्षात् अमृतत्त्वाचे स धिन होणारा धर्मसमूह भगवान् सांगत आहेत. अज्ञ कर्मीं पुरुषांच्या ठिकाणीं पुढील सर्व धर्म पूर्णपणे संभवत नाहींत. यास्तव अक्षरब्रह्मनिष्ठासाठीच मुख्यत्वेंकरून हे धर्म आहेत. तथापि त्यांतील जे सामान्य धर्म ज्या इतरांनाही जितक्या प्रमाणाने आचरतां येतील, तितके त्यांनीं ते अवश्य आचरावे हे इष्टच आहे. कारण कर्मयोग्यांनीही शक्य तितका द्वेष टाकणें, सर्वांशी मित्रत्वाने वागणे, इत्यादि केव्हांही चांगलेच; पण ते सर्व धर्म पूर्णपणे निष्काम ज्ञाननिष्ठ संन्याश्यांच्या हातूनच घडणे शक्य आहे. म्हणून भगवान् म्हणतात-

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १२-१३ ॥

अन्वय : सर्वभूतानां अद्वेष्टा - कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा (स्वतःला दुःख देणाऱ्या प्राण्याचाही द्वेष न करणें हें भगवद्‌भक्ताचे लक्षण आहे. - मैत्रः करुणः एव च - सर्वांशी मित्रत्वाने राहणारा, दुःखी जीवांवर दया करणारा असाच तो असतो. - निर्ममः - हा अमुक पदार्थ माझा आहे, असें त्याला कधी वाटत नाही - निरहंकारः - 'हा मी' हा अभिमान त्याच्या ठिकाणी नसतो - समदुःखसुखः - दुःख व सुख ही दोन्ही त्याला एकसारखीच वाटतात. ( दुःख द्वेषाची प्रवृत्ति करते व सुख आसक्तीला वाढविते. सामान्य मनुष्य ज्याच्यापासून दुःख होते, त्याचा द्वेष करतो व ज्याच्यापासून सुख होतें त्यावर प्रेम करतो. पण भगवद्‌भक्त त्या दोघांनाही समान मानतो. ) - क्षमी - क्षमावान्, कोणी शिव्या दिल्या किंवा मारले तरी हा मनांत क्षुब्ध होत नाही तर अगदी शांत असतो. १३.

व्याख्या : एवंभूतस्य भक्तस्य क्षिप्रमेव परमेश्वरमसादहेतून् धर्मान् आह । अद्वेष्टा इति अष्टभिः । यः एतादृशः मद्भक्तः मम भक्तः मद्भक्तः सर्वभावेन भजन् सन् भजतीति भजन् वर्त्तते सः भक्तः मे मम परमात्मनः प्रियः प्रियत्वेन प्रसिद्धः । अस्ति इति शेषः । सः ममात्मा एवेत्यर्थः । इति द्वितीयेनान्वयः । कथंभूतः यः । सर्वभूतानां सर्वाणि च तानि भूतानि च सर्वभूतानि तेषां अद्वेष्टा द्वेष्टीति द्वेष्टा न द्वेष्टा अद्वेष्टा । पुनः कथंभूतः । सर्वभूतानां मैत्रः उत्तमेषु द्वेषशून्यः समेषु मित्रतया वर्तत इति मैत्रः । पुनः कथंभूतः । करुणः कृपायुक्तः । परदुःखासहिष्णुरित्यर्थः । पुनः कथंभूतः । निर्ममः ममताशून्यः । निर्ममत्वे हेतुः । निरहंकारः निर्गतः अहंकारो यस्य सः निरहंकारः अहंकारशून्यः । पुनः कथंभूतः । समदुःखसुखः दुःखं च सुखं च दुःखसुखे समे ब्रह्मरूपे दुःखसुखे यस्य सः समदुःखसुखः । पुनः कथंभूतः । क्षमी क्षमा विद्यते यस्य सः क्षमी क्षमावान् ॥ १३ ॥

अर्थ : कोणत्याहि प्राण्याचा द्वेष न करणारा, सर्वांशी मित्रत्वाने रहाणारा, दुःखी जीवावर दया करणारा, असाच तो असतो. सर्व भूतांना अभय देणारा संन्यासी निर्मम असतो - हा अमुक पदार्थ माझा आहे, असे त्याला कधीं वाटत नाहीं. त्याच्या ठिकाणी "हा मी" असा अभिमान नसतो. सुख व दुःख ही दोन्ही त्याला एकसारसींच वाटतात व तो क्षमावान् असतो. [ दुःख द्वेषाची प्रवृत्ति करते आणि सुख आसक्ति वाढविते. सामान्य मनुष्य ज्याच्यापासून दुःख होते, त्याचा व स्वतः दुःखाचाही द्वेष करतो आणि ज्यांच्यापासून सुख होते त्यांवर व सुखावर प्रेम करतो; पण भगवद्‌भक्त त्या दोहोंनाही समान मानतो; म्हणून स्वतःला दुःख देणाऱ्या प्राण्यांचाहि द्वेष न करणे, हें भगवद्‌भक्ताचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे कोणी शिव्या दिल्या किंवा मारले तरी मनांत क्षुब्ध न होतां शांत रहाणे, हेंच क्षमिस्व आहे. इतर शब्दांचा अर्थ स्पष्ट आहे.]

विवरण :


सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिः यो मद्‌भक्तः स मे प्रियः ॥ १२-१४ ॥

अन्वय : सततं संतुष्टः - सदा संतुष्ट, जिवंत राहण्यास अवश्य असलेल्या वस्तु मिळाल्या तरी ठीक, न मिळाल्या तरी ठीक, दोन्हीमध्ये सदा आनंदी - (सततं) योगी - सदोदित शांतचित्त असणारा, मनाला केव्हांहि विक्षिप्त होऊं न देणारा, - यतात्मा - स्वभावाचें नियमन करणारा, मनाच्या प्रत्येक स्वाभाविक वृत्तीचा निरोध करणारा, किंवा शरीरेंद्रिय संघाताचे नियमन करणारा, - दृढनिश्चयः - आत्मतत्त्वाविषयी ज्याचा निश्चय अतिशय दृढ झाला आहे, - मयि अर्पितमनोबुद्धिः - जो माझ्या ठिकाणी आपलें मन व बुद्धि यांना स्थिर करून राहिला आहे. - यः मद्‌भक्तः - असा जो माझा भक्त आहे, ज्या माझ्या भक्तामध्यें हे सर्व गुण आहेत - सः मे प्रियः - तो मला प्रिय आहे. १४.

व्याख्या : संतुष्ट इति । किंच पुनः कथभूतः । सततं लाभे च अलाभे संतुष्टः प्रसन्नचित्तः न तु जायापत्रादिभिः । अत एव योगी योगो तत्त्वंपदलक्ष्यैक्यलक्षणो योगः यस्यास्तीति योगी । तत्र हेतुः । यतात्मा यतः आत्मनिष्ठितः आत्मा अहंभावो येन सः यतात्मा । ननु तमःस्वभावादेव पराङ्‌मुखत्वात् केनचिन्निमित्तेन पुनः आत्मनिष्ठान्तः सन् प्रच्युतिः स्यादेव तत्राह । दृढव्रतः दृढं बद्धमूलनिश्चयं व्रतं यस्य सः मद्विषयनिश्चयः अत एव मयि परमानंदे अर्पितमनोबुद्धिः मनश्च बुद्धिश्च मनोबुद्धी अर्पिते समर्पिते मनोबुद्धी येन सः परमानंदलाभेन निवृत्ते मनोबुद्धी यस्य सः एतादृशः मद्भक्तः मे प्रियः अस्ति ॥ १४ ॥

अर्थ : सदा संतुष्ट-जिवंत रहाण्यास अवश्य असलेल्या वस्तु मिळाल्या तरी आनंद, न मिळाल्या तरी आनंद; तसेंच सदोदित शांतचित्त असणारा, मनाला केव्हांही विक्षिप्त अस होऊं न देणारा, स्वभावाचे नियमन करणारा, म्हणजे मनाच्या प्रत्येक स्वाभाविक वृत्तीचा निरोध करणारा; किंवा शरीर. इंद्रियसंघाताचे नियमन करणारा, आत्मतत्वाविषयीं ज्याचा निश्चय अतिशय दृढ आहे व जो माझ्या ठिकाणीं आपले मन व बुद्धि स्थिर करून राहिला आहे, असा माझा भक्त, मला प्रिय आहे. [ जो अशा प्रकारचा मद्‌भजनपरायण ज्ञानी, तो मला प्रिय आहे. 'ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे व तो मला अत्यंत व प्रिय आहे,' असें जें सातव्या अध्यायांत ( श्लोक १३) सुचविले आहे, त्याचाच हा विस्तार केला आहे. ]

विवरण :


यस्मात् न उद्विजते लोको लोकात् न उद्विजते च यः ।
हर्षामर्षभय उद्वेगैः मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १२-१५ ॥

अन्वय : यस्मात् लोकः न उद्विजते - ज्या माझ्या भक्तापासून कोणताही प्राणी उद्विग्न होत नाहीं, ज्या भगवद्‌भक्तापासून कोणालाहि संताप, क्षोभ होत नाही, - च यः लोकात् न उद्विजते - त्याचप्रमाणे जो कोणत्याही प्राण्यापासून उद्वेग पावत नाहीं - च यः हर्ष-अमर्ष भय-उद्वेगैः मुक्तः - हर्ष, क्रोध, भय व खेद यांनी मुक्त असतो - सः मे प्रियः - तो मला प्रिय आहे. १५.

व्याख्या : यस्मादिति । किंच यथा जनः सर्वभावेन भजनीयात् नृपदेवात् रुद्धस्वभावतया उद्विजते भयं प्राप्नोति तथा यस्मात् यतेः लोकः प्राकृतोऽयं जनसमूहः नोद्विजते उद्वेगं न प्राप्नोति भयशंकया संक्षोभं न याति । तथा यः यतिलोकात् प्राकृतजनात् नोद्विजते भयशंकया संक्षोभं न प्राप्नोति । मायाकल्पितात् लोकात् नोद्वेगं प्राप्नोतीत्यर्थः । किंच यः भिक्षुः हर्षामर्षभयोद्वेगैः हर्षः स्वाभीष्टप्राप्तिजन्यः च संतोषः अमर्षः स्वाभीष्टप्राप्तिनाशे क्रोधावेशः च भयं अविद्याकल्पिते स्वोत्कृष्टमर्यादाभंगात् त्रासः च उद्वेगः भयादिनिमित्तचित्तक्षोभः हर्षामर्षभयोद्वेगाः तैः मुक्तः अस्ति सः भक्तः मे मम प्रियः अस्ति ॥ १५ ॥

अर्थ : ज्या माझ्या भक्तांपासून कोणताही प्राणी उद्विग्न होत नाहीं, कोणालाही संताप - क्षोभ होत नाहीं, त्याच प्रमाणें जो कोणत्याहि प्राण्यांपासून उद्वेग पावत नाहीं आणि जो हर्ष, क्रोध, भय व खेद यांनीं मुक्त-रहित असतो, तो मला प्रिय आहे.

विवरण :


अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारंभपरित्यागी यो मद्‌भक्तः स मे प्रियः ॥ १२-१६ ॥

अन्वय : अनपेक्षः - देहादिकांसाठी ज्यांची अत्यंत अपेक्षा, गरज असते अशा अन्नवस्त्रादिकांविषयीही अनपेक्ष, निःस्पृह, निरिच्छ - शुचिः - बाह्य शरीरशुद्धि व आतील मनाची शुद्धि यांनी युक्त म्हणजे दोन्ही प्रकारे शुद्ध पवित्र, - दक्षः - कर्तव्ये प्राप्त झाली असतां त्यांना बरोबर जाणण्यास समर्थ, यावेळीं मला अमुक करणेच योग्य आहे, असे समजून ते करणारा, - उदासीनः - मित्रादिकांचा पक्ष न घेणारा, निःपक्षपात - गतव्यथ - निर्भय - सर्वारम्भपरित्यागी - काम हेच ज्याचे कारण आहे अशा या लोकच्या व परलोकच्या फलासाठी केल्या जाणाऱ्या सर्व कर्मांचा त्याग करणारा, सर्व सकाम कर्मे सोडणारा - यः मद्‌भक्तः - असा जो माझा भक्त - सः मे प्रियः - तो मला प्रिय आहे. १६.

व्याख्या : अनपेक्ष इति । किं च । कथंभूतः यः । अनपेक्षः न विद्यते कल्पितस्य अपेक्षा यस्य सः अनपेक्षः यदृच्छोपस्थिते अर्थेपि निस्पृहः । पुनः कथंभूतः । शुचिः बाह्याभ्यन्तरशौचसंपन्नः । पुनः कथंभूतः । दक्षः स्वात्मानुसंधाननिपुणः । अनलस इत्यर्थः । पुनः कथंभूतः । उदासिनः देहद्वयोपेक्षकः । पक्षपातरहित इत्यर्थः । पुनः कथंभूतः । गतव्यथः गता व्यथा दुःख यस्य सः गतव्यथः त्रिविधतापशून्यः यः प्रसिद्धः मद्भक्तः मां अतर्यामिणं भजतीति मद्भक्तः सर्वारंभपरि-त्यागी सन् सर्वे च ते आरंभाश्च सर्वारंभाः सर्वारंभान् लौकिकवैदिकारंभोपक्रमान् परित्यक्तुं शीलं स्वभावः यस्य सः सर्वारंभपरित्यागी मां भजते सः भक्तः मे मम प्रियः अस्ति ॥ १६ ॥

अर्थ : देहादिकांसाठी ज्यांची अत्यंत अपेक्षा असते, अशा वस्त्रादिकाविषयीही अनपेक्ष, बाह्य शरीरशुद्धि व आंतील मनाची शुद्धि यांनीं युक्त, म्ह० दोन्ही प्रकारें शुद्ध-पवित्र; अनेक कर्तव्ये प्राप्त झाली असतां त्यांना बरोबर जाणण्यास समर्थ; यावेळी मला अमुक करणेंच योग्य आहे, असें समजून तें करणारा; मित्राविकांचा पक्ष न घेणारा-निःपक्षपात, निर्भय व सर्व सकाम कर्में सोडणारा; असा जो माझा भक्त तो मला प्रिय आहे.

विवरण :


यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १२-१७ ॥

अन्वय : यः न हृष्यति - जो इष्ट वस्तूची प्राप्ति झाली असतां हृष्ट होत नाही, हर्ष मानीत नाहीं, - न द्वेष्टि - जो अनिष्ट वस्तूची प्राप्ति झाली असतां द्वेष करीत नाही, - न शोचति - जो प्रिय वस्तूचा वियोग झाला असतां शोक करीत नाही व - न कांक्षति - न मिळालेल्या वस्तूची इच्छा करीत नाही, - शुभाशुभ परित्यागी - शुभ व अशुभ कर्मांचा परित्याग करणारा - भक्तिमान् यः - असा जो भक्तिमान् असतो, - स मे प्रियः - तो मला प्रिय आहे. १७.

व्याख्या : यो न हृष्यतीति । किं च यः प्रसिद्धः यतिः प्रियं अनुकूलविषयं प्राप्य न हृष्यति ममेदं प्राप्तं इति संतोषं न प्राप्नोति । किं च यः अप्रतिकूलं प्राप्य न द्वेष्टि अनिष्टबुद्ध्या द्वेषं न करोति । किं च यः मद्भक्तः इष्टार्थे नष्टे सति न शोचति शोकं न कुरुते । किं च यः भक्तः अप्राप्तं वस्त न कांक्षति न इच्छति । आत्मातिरेकेण सर्वस्याभावात् तत्प्राप्त्यादिना हर्षादेरभाव इत्यर्थः । किं च यः भक्तः शुभाशुभपरित्यागो सन् शुभं च अशुभं च शुभाशुभे पुण्यपापे ते परित्यक्तुं शीलं यस्य सः शुभाशुभपरित्यागी अस्ति । कल्पितत्वात् । शुभाशुभसंधानशून्य इत्यर्थः । सः भक्तः मे मम प्रियः भवति । कथंभूतः सः । भक्तिमान् भक्तिर्विद्यते यस्य सः भक्तिमान् मद्भक्तियुक्तः ॥ १७ ॥

अर्थ : जो इष्ट वस्तूंची प्राप्ति झाली असतां हृष्ट होत नाहीं व अनिष्ट वस्तूंची प्राप्ति झाली असतां तिचा द्वेष करीत नाहीं, जो प्रिय वस्तूचा वियोग झाला असतां शोक करीत नाहीं व न मिळालेल्या वस्तूंची इच्छा करीत नाहीं आणि जो शुभ व अशुभ वस्तूंचा परित्याग करतो, तो भक्तिमान् मनुष्य मला प्रिय आहे.

विवरण :


समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १२-१८ ॥
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः ॥ १२-१९ ॥

अन्वय : शत्रौ च मित्रे च समः - शत्रु व मित्र या दोघांच्याहि ठिकाणी एकसारखा व्यवहार करणारा - तथा मानापमानयोः - त्याचप्रमाणे मान व अपमान यामध्ये सम, त्या दोहोंनाही एकसारखाच मानणारा - शीतोष्णसुखदुःखेषु समः - शीत, उष्ण, सुख, दुःख यांमध्यें एकसारखीच भावना ठेवणारा, - संगवर्जितः - कोठेंही आसक्ति न ठेवणारा, - तुल्यनिंदास्तुति - निंदा व स्तुति यांना समान मानणारा, - मौनी - वाणीचे नियमन करणारा - येन केनचित् संतुष्टः - शरीर जीवंत राहण्यापुरतें जें कांही मिळेल त्यानें संतुष्ट होणारा, - अनिकेतः - ज्याचें एक नियत, नेमलेलें राहण्याचे स्थान नाहीं, जेथे राहील तेंच त्याचें घर असा जो - स्थिरमतिः - स्थिरबुद्धि, ज्याची परमार्थाविषयींची बुद्धि स्थिर असते, डळमळीत नसते - भक्तिमान् नरः - असा जो भक्तिमान् पुरुष - सः मे प्रियः - तो मला प्रिय आहे. १८-१९

व्याख्या : सम हति । किं च यथा सुवर्णानुसंधाता सुवर्णगोव्याघ्रोपाधौ समदृष्टिः तथा 'सर्वं खल्विदं ब्रह्म' इति श्रुतेः । सर्वात्मदर्शी यतिः शत्रौ प्रतिकूले चेत्यपरं मित्रे अनुकूले समः समं ब्रह्मदर्शनं यस्य सः समः एकरूपः अस्ति । तथा मानापमानयोः मानः पजा च अपमानः तिरस्कारः मानापमानौ तयोः मानापमानयोः समः हर्षविषादशून्यः अस्ति । शीतोष्णसुखदःखषु शीतं च उष्णं च सुखं च दुःखं च शीतोष्णसुखदुःखानि तेषु शीतोष्णसुखदुःखेषु समः काल्पतत्वेन आगमापायदर्शनात् सर्वेष्वपि हर्षविषादरहितः । अत एव द्वितीयाभावात् संगवर्जितः अस्ति ॥ १८ ॥ तुल्यनिंदेति । किं च एतादृशः यः नरः अद्वेष्टादिलक्षणैः मयि सर्वात्मनि भक्तिमान् भक्तिर्विद्यते यस्य सः भक्तिमान् अस्ति सः नरः मे मम प्रियः आत्मवित्प्रियः भवति । कथंभूतः नरः । तुल्यनिदास्तुतिः निंदा दूषणोक्तिः च स्तुतिः स्तवनोक्तिः निंदास्तुती तुल्ये समे निंदास्तुती यस्य सः तुल्यनिंदास्तुतिः स्तुतिनिंदावचनं स्वध्येयप्रणवात्मकं मत्वा निंदास्तुतिभ्यां न विक्रियते । पुनः कथंभूतः नरः । मौनी मननशीलः मुनिः मनेर्भावः मौनं मौनं विद्यते यस्य सः मौनी अथवा आत्मव्यतिरेकेण किमपि वाक् न वदतीति मौनं तत् विद्यते यस्य सः मौनी अनात्मवचनशून्यः । पुनः कथंभूतः नरः । येन केनचित् दैवलधेन संतुष्टः अलंप्रत्ययः। यथा नानादिगंतसरित्प्रवाहोदकानां गमनागमनैः समुद्रः सदा संतुष्ट एव तथा अयमपीत्यर्थः । पुनः कथंभतः । अनिकेतः न विद्यते निकेतः आधारः यस्य सः अनिकेतः नियतवासशून्यः नरः । स्वयमेव सर्वाधारो भूत्वा आधेयो न भवतीति तात्पर्यार्थः । पुनः कथंभतः नरः । स्थिरमतिः स्थिरा ब्रह्मनिष्ठा मतिः बुद्धिर्यस्य सः स्थिरमतिः शरीरस्य अस्थिरतायां मतेः अंतःकरणस्य एकरूपत्वात् स्थिरबुद्धिः ॥ १९ ॥

अर्थ : शत्रू व मित्र या दोघांशींही तुल्य व्यवहार करणारा; मान व अपमान या दोहोंनाही समान मानणारा; शीतोष्ण, सुख-दुःख यांमध्ये एकसारखीच भावना ठेवणारा; कोठेंही आसक्ति न ठेवणारा, निंदा व स्तुति यांना तुल्य मानणारा, वाणीचे नियमन करणारा, शरीर जीवंत रहाण्यापुरते जें कांहीं मिळेल, त्यानें संतुष्ट होणारा, ज्याचे निवासस्थान एक नियत नाहीं, जेथे राहील तेंच त्याचें घर असा व ज्याची परमार्थविषयक बुद्धि स्थिर असते, डळमळीत नसते, असा जो भक्तिमान् पुरुष तो मला प्रिय आहे.

विवरण :


'अद्वेष्टा०' या १३ व्या लोकापासून सांगावयास आरंभिलेल्या संन्याश्यांच्या धर्माचा उपसंहार करतात-

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥ १२-२० ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥

अन्वय : तु ये श्रद्दधाना मत्परमाः भक्ताः - पण जे श्रद्धावान मत्परम झालेले भक्त, माझे एकनिष्ठ भक्त - इदं यथोक्त धर्म्यामृतं - हे वर सांगितलेले धर्माला सोडून नसलेले, धर्मरूप अमृत, मोक्षाचे साधन - पर्युपासते - करतात, वरील मोक्षसाधनाचें अनुष्ठान करतात, तसे आचरण करतात - ते मे अतीव प्रियाः - ते श्रेष्ठ भक्त मला, परमेश्वराला अतिशयच प्रिय आहेत. २०

व्याख्या : प्रियत्वेन उक्तान् भक्तान् अध्यायावसानसमये अतिप्रियत्वेन विशिनष्टि । ये त्विति । ये भक्ताः तुः अवधारणे । यथोक्तं मयोक्तप्रकारं इदं अव्यवधानेन अद्वेष्टेत्यादिनोक्तं धर्म्यामृतं धर्मादनपेतं धर्म्यं धर्म्यमेव अमृतं धर्म्यामृतं मोक्षसाधनं पर्युपासते । केचित् पठन्ति केचित अनतिष्ठन्ति सर्वत्र भजन्ति ते भक्ताः मे मम अतीव अत्यंतमेव प्रियाः । आत्मसाक्षात्कारवत् प्रियतराः भवन्तीत्यर्थः । कथंभूताः भक्ताः । श्रद्दधानाः श्रद्धां भक्तिं धारयन्ति ते श्रद्दधानाः मदुक्तौ प्रेम्णा विश्वासवन्तः । पुनः कथंभूताः भक्ताः । मत्परमाः अहमेव परमः परुषार्थो येषां ते मत्परमाः मत्परमत्वादेव मद्वाक्ये श्रद्दधाना इत्यर्थः ॥ २० ॥
सख्युः प्रश्नानुसारेण तत्प्रत्युक्तिविभागशः ।
निर्णीतां सफलां भक्तिं व्यक्तं व्यक्तात्मवेदिनाम् ॥ १ ॥
दुःखमव्यक्तवर्त्मैतत् बहुविघ्नमतो बुधः ।
सुखं कृष्णपदांभोजभक्तिसत्पथमाभजेत् ॥ २ ॥
इति श्रीबालबोधिन्यां भीमद्भगवद्गीताटीकायां द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥

अर्थ : पण जे श्रद्धावान् व माझे एकनिष्ठ भक्त, हें वर सांगितलेले, धर्माला सोडून नसलेले मोक्षाचे साधन करतात, ते श्रेष्ठ भक्त मज परमेश्वराला अतिशयच प्रिय होतात. [ ज्याअर्थी वर सांगितलेल्या या धर्मामृताचे अनुष्ठान करणारा भक्त, मज व्यापक परमेश्वराला अतिशय प्रिय होतो, त्याअर्थी विष्णूच्या प्रिय परम धामास-परम पदास प्राप्त होण्याची इच्छा करणार्‍या मुमुक्षूनें या धर्मामृताचे मोठ्या प्रयत्नानें अनुष्ठान करावे, असा 'अद्वेष्टा' इत्यादि या सर्व वाक्यांचा अर्थ आहे. याप्रमाणे या अध्यायांत सोपाधिक ईशस्वरूपाच्या ध्यानाचा परिपाक झाला असतां निरुपाधिक स्वस्थपाचे अनुसंधान करणाऱ्या व 'अद्वेष्टा सर्भूतानां०' इत्यादि ग्रंथाने सांगितलेल्या धर्मांनी युक्त होऊन श्रवणादिकांची आवृत्ति करीत असलेल्या मुख्य अधिकाऱ्यालाच तत्त्वसाक्षास्कार होतो व त्यामुळेंच ज्याअर्थी मुक्ति मिळते, त्याअर्थी साक्षात्काराला कारण होणाऱ्या वाक्यार्थ ज्ञानाचा विषय, असा जो तत्पदार्थ त्याचें अनुसंधान करावे, असें सिद्ध झाले. ]

येथें भगवद्गीतेचा 'भक्तियोग' नावाचा बारावा अध्याय समाप्त झाला.

विवरण :


॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP