॥ श्री एकनाथी भागवत ॥
अध्याय चोविसावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो जी गुणातीता । व्यक्तिरहिता अव्यक्ता ।
तुजमाजीं नाहीं द्वैतकथा । अद्वैततारहिवासी ॥ १ ॥
हे ओंकारस्वरूपा गुणातीता ! तुला नमस्कार असो. हे व्यक्तिरहिता ! हे अव्यक्ता ! तुझ्यामध्ये द्वैताची गोष्टच नाही. तूं अद्वैतामध्येच राहणारा आहेस १.

तुझा अद्वैत निजनिर्वाहो । तेथ नाहीं देवी देवो ।
उदय-अस्तांचा अभावो । रविचंद्रांसी ठावो असेना ॥ २ ॥
अद्वैत हेच तुझें स्वतःचे ठिकाण आहे. तेथे देवी-देव इत्यादि भेद नाहीत. तेथे उदय-अस्त नाहीत, कारण सूर्य आणि चंद्र ह्यांना तेथे जागाच नाही २.

तेथ सशब्द हारपला वेदू । बुद्धीसी मिथ्या बोधू ।
तिळभरी नाहीं भेदू । अद्वयानंदू एकला ॥ ३ ॥
तेथे शब्दासह वेद लीन झाला. बुद्धीला ज्ञान हें मिथ्या वाटू लागले. तेथें तिळभरही भेद नाही. एक अद्वयानंदच भरलेला आहे ३.

ऐसिया अद्वैतपणीं । प्रकृतिपुरुषांची कहाणी ।
सांगिजे केवळ अज्ञानीं । ज्ञातेपणीं चातुर्यें ॥ ४ ॥
अशा अद्वैतपणामध्ये प्रकृतिपुरुषांची कहाणी केवळ अज्ञानी लोकांनीच ज्ञातेपणाचा मोठा आव आणून आणि चातुर्याने सांगावी ४.

जेथ मीतूंपणा नाहीं ठावो । तेथ प्रकृतिपुरुषां केवीं निर्वाहो ।
ज्याचा नाहीं गर्भसंभवो । त्याचें जातक पहा हो वर्तविती ॥ ५ ॥
कारण वास्तविक जेथें मीपणा व तूंपणा यांना स्थान नाही, तेथें प्रकृति आणि पुरुष यांना स्थान कोठून मिळणार? जो कधीं गर्भातसुद्धा असण्याचा संभव नाही,  त्याची जन्मपत्रिका वर्तवितात पाहा ! ५.

जें जन्मलेंचि नाहीं । त्याचें श्राद्ध करावें कायी ।
हें ज्ञात्यासी पुसतां पाहीं । ठेवितां ठायीं ठाके ना ॥ ६ ॥
जो जन्मालाच आला नाही, त्याचे श्राद्ध करावें काय ? हे ज्ञात्यांना विचारले असतां काही ठिकाण लागत नाहीं ६.

वांझेच्या पुत्राचा विवाहो । समारंभ चला पहा हो ।
नेणा साच जाणा वावो । तैसा निर्वाहो प्रकृतिपुरुषां ॥ ७ ॥
अहो ! वांझेच्या मुलाचा विवाह आहे, तो समारंभ पाहावयाला चला ! असे म्हटले तर तो अज्ञान्यास खरा व ज्ञान्यास खोटा असतो, तसाच प्रकार प्रकृति-पुरुषांचा आहे ७.

ऐसें नसतेंचि नाथिलें । साचाचे परी नांदविलें ।
एकीं अनेकत्व दाविलें । एकपण संचलें न मोडतां ॥ ८ ॥
असे केवळ नसलेलेच, मिथ्या, पण ते खऱ्याप्रमाणे वागविलें ; आणि एकांतच अनेकपणा दाखविला, तरीही त्याचे एकपण न मोडता तसेंच राहिले ८.

ऐसा एकपणें एकुलता । तोचि आपण आपली झाला कांता ।
आपुले कांतेचा आपण भर्ता । अतिलाघवता अतर्क्य ॥ ९ ॥
असा एकपणाने एकच असून तोच आपली आपण पत्नी झाला. आणि आपल्या पत्नीचा पतीही आपणच झाला. हे विलक्षण लाघव अतर्क्य आहे ९.

जेवीं अर्धनारिनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।
तेवीं प्रकृति पुरुष संसारीं । एकाकारीं नांदत ॥ १० ॥
ज्याप्रमाणे अर्धनारीनटेश्वराच्या मूर्तीत जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याप्रमाणे संसारांत प्रकृति आणि पुरुष एकरूपानेच नांदत असतात १०.

तो पुरुष ते पतिव्रता । दोघां अनन्य प्रीति एकात्मता ।
येरयेरां वेगळीकता । पाऊल सर्वथा न घालिती ॥ ११ ॥
तो पुरुष आणि ती पतिव्रता ह्या दोघांची एकात्मभावाने अत्यंत प्रीति आहे. ती परस्परांपासून वेगळी होऊन कधी पाऊलसुद्धा टाकीत नाहींत ११.

दोघां एकत्र सदा असणें । दोघासीं एकचि नेसणॆं ।
दोघां एके सत्ता बैसणें । दोघां एकचि प्राणें वर्तती ॥ १२ ॥
दोघांचे सदोदित एकत्रच राहणे असते; दोघांना नेसणे एकच ; दोघांचे बसणे एकाच सत्तेखाली असते ; आणि दोधे एकाच जीवाने राहातात १२.

दोघां एकचि देखणें । दोघां एकचि चाखणें ।
दोघां एकचि बोलणें । दोघां करणें एकचि ॥ १३ ॥
दोघांचे पाहाणे एकच, दोघांचे खाणे एकच ; दोघांचे बोलणे एकच आणि दोघांचे करणेही एकच १३.

कैशी दोघां प्रीति अलोलिक । येरयेरांवीण न घेती विख ।
येरयेरांवीण न चाखिती उदक । येरयेरेंवीण देख आंधळीं ॥ १४ ॥
दोघांचे प्रेम कसें अलौकिक आहे! ती एकमेकांशिवाय विषसुद्धा घ्यावयाची नाहीत. ती एकमेकांशिवाय पाणीही पीत नाहीत. ती एकमेकांशिवाय आंधळींच असतात पाहा १४.

नवल बाइलेचें करणें । नपुंसका पुरुषत्व इणें देणें ।
मग तिचेनि अधीनपणें । पुरुषें नांदणें सर्वदा ॥ १५ ॥
त्यांत बायकोचे कृत्य तर विलक्षणच ! त्या नपुंसकाला हिने पुरुषत्व द्यावयाचे, आणि मग तिच्याच आधीन होऊन पुरुषाने सदोदित राहावयाचे ! असा प्रकार होतो १५.

मग हा तिचेनि डोळां देखे । मग हा तिचेनि बोले मुखें ।
तिचोनि भोगी हा सुखदुःखें । बंधमोक्ष चाखे तिचेनि ॥ १६ ॥
मग हा तिच्याच डोळ्यांनी पाहातो, मग हा तिच्याच तोंडाने बोलतो, तिच्यामुळेच हा सुखदुःखें भोगतो, तिच्यामुळेच बंधमोक्ष भोगतो १६, 

तिचेनि म्हणवी मी ब्रह्म । तिचेनि करी हा कर्माकर्म ।
तिचेनि भोगी हा मरणजन्म । धर्माधर्मविभागें ॥ १७ ॥
तिच्यामुळेच 'मी ब्रह्म' असें म्हणवितो, तिच्यामुळे हा कर्माकर्म करतो, आणि तिच्यामुळेच हा धर्माधर्माच्या परिणामाप्रमाणे मरण आणि जन्म भोगतो १७, 

तिचेनि यासी पाप घडे । तिचेनि यासी पुण्य जोडे ।
तिचेनि हा महत्त्वा चढे । तिचेनि पडे अधःपातीं ॥ १८ ॥
तिच्यामुळेच याला पातक घडते, तिच्यामुळेच याला पुण्य मिळते, तिच्यामुळेच हा महत्त्वाला चढतो, आणि तिच्यामुळेच अधःपाताने पडतो १८.

एथवरी अतिप्रीतीं । वाढविली निजप्रकृती ।
प्रकृति पातिव्रत्यस्थिती । वश्य निजपती तियें केला ॥ १९ ॥
येथपर्यंत अत्यंत प्रीतीने आपली प्रकृति त्या पुरुषाने वाढविली; आणि प्रकृतीही पतिव्रताधर्मानं राहून तिने आपला पति अगदी आपल्याला वश करून ठेविला १९.

नवल दोघांची सोयरिकी । दोघीं भावंडें होती सखीं ।
तो बाप ते त्याची लेंकी । पाहतां विवेकीं तो पुत्र तिचा ॥ २० ॥
त्या दोघांचे नातेही मोठे आश्चर्यकारक आहे. ही दोघेही सख्खी भावंडे होती. किंवा तो बाप आणि ती त्याची कन्या. आणखी विचार केला तर तो तिचा पुत्रही होतो ! २०. 

यापरी अगम्यागमन । तिंहीं दोघीं करूनि जाण ।
वाढविले अनेक जन । तिसरेपण नातळतां ॥ २१ ॥
 ह्याप्रमाणे त्या दोघांनी अगम्यागमन (ज्या स्त्री-पुरुषांशी संभोग करणे निषिद्ध असते, त्याच्याशी संभोग करणे ) करून तिसरेपणाचा संपर्क न होऊ देतां अनेक लोक उत्पन्न केले २१.

ऐसा अव्यभिचारी व्यभिचारू । करूनि वाढविला संसारू ।
तो अतिअतर्क्य अगोचरू । अगम्य दुर्धरू शिवादिकां ॥ २२ ॥
असा अव्यभिचाररूपी व्यभिचार करून हा संसार वाढविला आहे. तो शंकर इत्यादिकांनाही अत्यंत अतर्क्य, अगोचर, अगम्य व दुर्धर असा आहे २२.

हा निजशक्तिप्रकृतिमेळें । भोगी शिवत्वाचे सोहळे ।
प्रिया न देखतां तात्काळें । सांडी सगळें शिवत्व ॥ २३ ॥
हा आपलीच शक्ति जी प्रकृति तिच्या संगतीने शिवपणाचे सारे सोहळे भोगतो, आणि त्याची प्रिया त्याला क्षणभरही दिसली नाही तरी तो आपले सर्व शिवत्व सोडून देतो २३.

ज्यासी गांवठाव ना जीवमेळ । रूपनांव ना काळवेळ ।
ऐसाही प्रकृती केवळ । केला सबळ निजगुणीं ॥ २४ ॥
ज्याला गांव नाही, ठाव नाहीं, जिवाचे ठिकाण नाही, रूप नाही, नांव नाही, काळ नाही, वेळ नाही, असा हा असतांही प्रकृतीने केवळ आपल्या गुणांनीच त्याला प्रबळ केलें आहे २४.

प्रकृती निजगुणास्तव । निजभर्ता केला सावेव ।
वर्ण व्यक्ति रूप नांव । नाना वैभवविलासें ॥ २५ ॥
प्रकृतीने आपल्या गुणांनीच वर्ण, व्यक्ति, रूप, नांव, इत्यादि नानाप्रकारच्या वैभवविलासांनी आपल्या पतीला स्वरूप दिलें २५.

तंव पूर्णत्व लोपोनियां शिवें । अंगावरी वाढविलें शांभवें ।
येरी पतिव्रता आहेवें । रूपें नांवें शिव पूजी ॥ २६ ॥
तेव्हां शिवाने आपला पूर्णपणा सोडून आपल्या अंगावर शिवत्व वाढविले, आणि ती प्रकृति अहेव पतिव्रता राहून रूपाने आणि नांवाने शिवाची पूजा करते २६.

दोघांपासूनि झालें जग । परी न दिसे तिसरा भाग ।
न तुटे अनन्यमिळणीयोग । भिन्न विभाग दाखवितां ॥ २७ ॥
त्या दोघांपासूनच हे जग झाले आहे. पण त्यांत तिसरा कसलाही भाग दिसत नाही, व भिन्न विभाग दाखविण्याचा प्रयत्न केला असता अनन्य भावाने झालेले ऐक्य दुभंग होत नाही २७.

त्रैलोक्य पाहतां साङ्ग । न दिसे तिसरें अंग ।
दोघीं दुमदुमीत जग । भरलें चांग दुबंधीं ॥ २८ ॥
सर्व त्रिभुवन पाहिले असतां तिसरे अंग दृष्टीस पडत नाही. प्रकृति आणि पुरुष या दोघांनींच जग गजबजून गेले आहे. दोघांच्या मिलाफानेंच तें सुंदर रीतीने भरून राहिले आहे २८.

दोघां अतिप्रीति ऐशी । अनन्यमिळणी अनन्यासी ।
दोघें अणूमाजीं सावकाशीं । निजरहिवासी नांदत ॥ २९ ॥
दोघांची अत्यंत प्रीति अशी आहे की, ती अनन्यभावाने एकमेकांशी चिकटूनच असतात. एका अणूएवढ्या जागेत देखील ती दोघे आपल्या वतनदारीच्या जाग्याप्रमाणे नांदत असतात २९.

पतीवीण ते पतिव्रता । सगळीचि विरे सर्वथा ।
प्रियेवीण असतचि नसता । होय कांहीं नव्हतां भर्तारू ॥ ३० ॥
पति नसेल तर ती पतिव्रता निखालस नाहीशीच होऊन जाईल. आणि पति आपल्या स्त्रीशिवाय असून नसल्यासारखाच होईल. तो वास्तविक काही न होतांच पति झाला आहे ३0. 

शिव निःसंग जो पैं सदा । क्रियाकरणेंवीण नुसधा ।
त्यासीही अतिप्रीतीं निजप्रमदा । सुखदुःखबाधा भोगवी ॥ ३१ ॥
खरोखर शिव म्हटला म्हणजे जो सदोदित निःसंग, केवळ कोणतेही कर्म केल्याशिवायच असा असतो. परंतु त्याची श्री आपल्या प्रेमपाशाने त्यालाही वश करून घेऊन अनेक सुखदुःखांचा त्रासही भोगावयास लावते ३१.

यापरी निजनोवरा । प्रकृती गोंविला घरचारा ।
मग घरवातेचा थारा । त्याच्याचि शरीरावरी केला ॥ ३२ ॥
याप्रमाणे प्रकृतीने आपला नवरा गृहाचारांत गुंतविला आणि मग ती त्याच्याचवर प्रपंचाचा अधिकार गाजवू लागली ३२.

प्रकृति पतिव्रता अवंचक । कर्माकर्मीं शिणोनि अनेक ।
सुखदुःखांची परवडी देख । अर्पी आवश्यक निजकांता ॥ ३३ ॥
प्रकृति ही पतिव्रता असून ती नवऱ्याशी अगदी प्रतारणा करीत नाही. ती अनेक कर्माकर्मामध्ये कष्ट सोसून अनेक प्रकारची सुखदुःखें आपल्या पतीला अवश्य देते ३३.

नवल तें मीं सांगावें काये । स्त्री जोडी तें पुरुष खाये ।
तियेवीण तो पाहें । कंहीं न लाहे कवडाही ॥ ३४ ॥
आणखी आश्चर्य तें मी काय सांगू ? बायको जें मिळवील तेच नवरा खातो. कारण असें पाहा की, तिच्याशिवाय त्याला एक कवडीसुद्धा मिळत नाही ३४.

प्रकृति पतिव्रताशिरोमणी । कांत वश्य करोनि निजगुणीं ।
वासना सूक्ष्म सेवया अनुदिनीं । भोगवी सुगरणी भर्ताराकरवीं ॥ ३५ ॥
प्रकृति ही पतिव्रतांमध्ये अगदी श्रेष्ठ आहे. तिने आपल्या गुणांनीच आपल्या पतीला वश केले आहे. आणि रात्रंदिवस ती सुगरण नवऱ्याकडून सूक्ष्म वासनातंतुरूप शेवया सेवन करविते ३५.

तेथ प्रकृतीचेनि गदारोळें । भवाब्धीं जलक्रीडा खेळे ।
प्रकृति पुरुषातें बुडवी बळें । पुरुष एकें काळें प्रकृति बुडवी ॥ ३६ ॥
जेव्हां प्रकृतीच्या धाकाने तोही संसारसमुद्रामध्ये जलक्रीडा करू लागतो, तेव्हां प्रकृति ही बळानेच पुरुषाला त्यांत वुडविते. एकादे वेळी पुरुषही प्रकृतीला बुडवितो ३६.

ऐशा प्रकृतीच्या संगाआंत । पुरुषास लाविलें पंचभूत ।
जन्ममरणांच्या बुड्या देत । अवस्थाभूत होऊनी ॥ 37 ||
अशा प्रकृतीच्या संगतीमध्ये पुरुषाच्या मागें पंचभूर्ते लागतात, तेव्हा तो अवस्थाभूत (साकार) होऊन जन्ममरणांच्या मुख्या देत बसतो ३७.

ऐसा प्रकृतिचिया भिडा । पुरुष केवळ झाला वेडा ।
निजत्व विसरोनि बापुडा । केला गाढा अतिदीन ॥ ३८ ॥
असा प्रकृतीच्या भिटेनें पुरुष हा केवळ वेडा बनला, आणि विचारा आपलें मूलरूप विसरून गेल्यामुळे प्रकृतीने त्याला अत्यंत दीन बनविले ३८.

ऐसा विसरोनि पूर्णत्वासी । जीवशिवद्वंद्वें स्वयें सोशी ।
त्यासी न्यावया निजत्वासी । गुणिया पूर्णांशीं गुरुरावो ॥ ३९ ॥
ह्याप्रमाणे पूर्णपणाला विसरून जाऊन जीव आणि शिव के भेद तो स्वत:च सोशीत बसतो. त्याला पुन्हा आपल्या मूळस्वरूपात न्यावयाला गुरुराज हाच पूर्णपणे कुशल आहे ३९.

ज्याचे वचनमात्रें पहा वो । जीवाचा हारपे जीवभावो ।
शिवा शिवपदीं ठावो । ज्याचा वचनगौरवो नांदवी ॥ ४० ॥
अहो पाहा! ज्याच्या एका शब्दाबरोबरच जीवाचा जीवपणा नाहीसा होतो, आणि शिवाला शिवपदावर जागा मिळते, इतका ज्याच्या वचनाचा प्रभाव असतो ४०.

ज्याची भावार्थें ऐकतां गोठी । अहंकारू निमे उठाउठी ।
जन्ममरणांसी पडे तुटी । न दिसे दृष्टीं भवभय ॥ ४१ ॥
ज्याचा उपदेश भक्तिभावाने ऐकला असता अहंकार त्वरित नाश पावतो, जन्ममरणाचा फेरा चुकतो, आणि संसाराचे भय दृष्टीला दिसतमुखा नाही ४१.

ज्याचिया कृपादृष्टिपुढें । जीवशिवांचें फिटे बिरडें ।
माया मिथ्यात्वें समूळ उडे । पूर्णत्वाचें उघडे भांडार ॥ ४२ ॥
ज्याच्या कृपादृष्टीपुढे जीव आणि शिव यांची गांठ तुटून जाते, माया ही मिथ्या होऊन पूर्णपणे उगन जाते आणि पूर्णत्वाचे भांडार उघडते ४२.

शिवू भुलविला शिवत्वासी । यावया तो निजपदासी ।
आज्ञा जैं पुसे सद्‌गुरूसी । तैंचि शिवासी शिवत्व ॥ ४३ ॥
शिव हा शिवत्वापासून भुलन दूर गेला म्हणजे आपल्या मूळस्वरूपी परत येण्यासाठी जेव्हां गुरूपाशी आज्ञा मागतो, तेव्हाच त्या शिवाला मूळचें शिवस्वरूप प्राप्त होते ४३.

एवढी महिमा सद्‌गुरूसी । वचनें केवीं वानूं त्यासी ।
तंव वानिते वाणीनें वानावयासी । वदवी वाचेसी गुरुरावो ॥ ४४ ॥
एवढा सद्गुरूचा महिमा आहे. त्याचे वर्णन मी शब्दांनी कसे करावें ! पण गौरवाच्या वाणीनें वर्णन करावयाला माझ्या मुखाला गुरुराजच वदवितो ४४.

तेथ एक मी वानिता । हें कोणें घ्यावें आपुले माथां ।
गुरूनें हरितली अहंता । तेथ मी एक कर्ता घडे केवीं ॥ ४५ ॥
त्यांत मी एक वर्णन करणारा, हें श्रेय आपल्या माथीं कोणी घ्यावें ? गुरुनें सर्व अहंताच हिरावून घेतली, तेव्हा मी एक कर्ता असे कसे होणार? ४५.

तेथ मीपणें घ्यावी अहंता । तंव गुरूचि मीपणाआंतौता ।
गुरूवेगळा ठाव नाहीं रिता । मीपणाचे माथां गुरुरावो ॥ ४६ ॥
बरें, अशा प्रसंगी मीपणाने अहंता स्वीकारावी, तर मीपणाच्या आंत गुरूच राहिलेला आहे. गुरूशिवाय रिकामी जागा नाहींच, तेव्हां मीपणाच्या माथ्यावरही गुरुराजच आहे ४६.

माझें जें कां मीपण । तें सद्‌गुरु झाला आपण ।
तेव्हां रूप एक नांवें भिन्न । एका जनार्दन एकत्वें ॥ ४७ ॥
माझे जें मीपण आहे, तें सद्गुरू आपणच झाला आहे. तेव्हां आम्हां दोघांचं रूप एक असून नांवें मात्र भिन्न आहेत. बाकी एका आणि जनार्दन दोघेही ऐक्यरूपाने एकच आहेत ४७.

अवघा जनार्दनचि देखा । तोचि उपनांवें झाला एका ।
तेणें नामें श्री भागवत देखा । देशभाखा अर्थवी ॥ ४८ ॥
अहो, सर्वत्र जनार्दनच आहे, पण तोच उपनावाने एकनाथ झालेला आहे. आणि त्याच्याच नावाने पाहा ! श्रीमद्भागताचा अर्थ देशी भाषेत सांगविला ४८.

तेविसावे अध्यायाचे अंतीं । देवो बोलिला उद्धवाप्रती ।
द्वंद्वभोगांची निजप्राप्ती । साहावी शांती धरोनि ॥ ४९ ॥
आता तेविसाव्या अध्यायाचे शेवटी देव उद्धवाला असें म्हणाला होता की द्वंद्वभोग आपल्याला प्राप्त झाले असता ते शांति धरून सहन करावे ४९.

ज्यांसी बाणली अढळ शांती । ते मज अजितातें जिंकिती ।
तेचि साचार परमार्थी । स्वमुखें श्रीपति बोलिला ॥ ५० ॥
ज्यांच्या ठिकाणी अढळ शांति बाणलेली असते, ते मला अजिंक्यालाही जिंकतात. तेच खरोखर परमार्थसाधक होत असें श्रीकृष्णाने स्वत:च्या. मुखानेच सांगितले ५०.

तें ऐकोन कृष्णवचन । उद्धवाचें दचकलें मन ।
द्वंद्वसहिष्णुता अतिकठिण । कैसोनि आपण साहावी ॥ ५१ ॥
तें कृष्णाचे भाषण ऐकून उद्धवाचे मन दचकलें. त्याला वाटले की, हे भेदाभेद सहन करण्याचे काम मोठे बिकट दिसते. ते आपल्याला कसें साधणार ! ५१.

द्वंद्वसहिष्णुतासाधन । पुसतां उबगेल श्रीकृष्ण ।
ऐशिया भिडा उद्धव पूर्ण । धरोनि मौन राहिला ॥ ५२ ॥
बरें, भेदाभेद सहन करावयाला साधन काय? असे विचारले असतां श्रीकृष्ण रागावेल. अशा संकोचानें उद्धव अगदी मौनच धरून राहिला ५२.

तो उद्धवाचा अभिप्रावो । जाणोनियां देवाधिदेवो ।
द्वंद्वसहिष्णुताउपावो । समूळ पहा वो सांगत ॥ ५३ ॥
उद्धवाचा तो हेतु देवाधिदेव श्रीकृष्णांनी ओळखून द्वंद्वांच्या सहनशीलतेचा उपाय मुळापासून सांगितला ५३.

अद्वयत्वें परिपूर्ण । प्रकृतीहूनि पुरुष भिन्न ।
हें आकळल्या निजज्ञान । द्वंद्वबंधन बाधीना ॥ ५४ ॥
पुरुष हा अद्वयगुणाने परिपूर्ण असून तो प्रकृतीहून भिन्न आहे हे आत्मज्ञान मनात ठसलें असतां द्वंद्वांची बाधा होत नाही ५४.

द्वंद्वें जिणावया पूर्ण । प्रकृतिपुरुषविवंचन ।
उद्धवें न करितां प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ५५ ॥
 ह्याकरितां द्वंद्वे  पूर्णपणे जिंकण्यासाठी प्रकृतिपुरुषांचे विवेचन उद्धवाने विचारले नसतांच श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे ५५.

भक्तअंतरींचे जाणता । यालागीं अंतर्यामी तत्त्वतां ।
तो निजभक्तांचिया स्वार्था । पूर्ण परमार्थ सांगत ॥ ५६ ॥
श्रीकृष्ण हा भक्तांच्या अंत:करणांतले जाणणारा, म्हणूनच तो खरोखर भक्तांचा अंतरात्मा होय. तो आपल्या भक्तांच्या कल्याणाकरितां पूर्ण परमार्थ सांगत आहे ५६.

निजभक्तांचें मनोगत । जाणोनियां श्रीकृष्णनाथ ।
करावया भक्तहित । कृपेनें सांगत कृपाळू ॥ ५७ ॥
आपल्या भक्तांचे मनोगत जाणून कृपाळू श्रीकृष्ण त्या भक्तांचे हित करण्यासाठी कृपा करून सांगत आहे ५७.

जगीं धन्य भाग्य उद्धवाचें । कृष्ण दैवत तिहीं लोकींचें ।
कृपा वोरसोनियां साचें । प्रकृतिपुरुषांचें निज सांगे ॥ ५८ ॥
जगामध्ये उद्धवाचे भाग्य मोठे धन्य होय. कारण, त्रिभुवनाचे दैवत जो श्रीकृष्ण तो खरोखर कृपेचा वर्षाव करून प्रकृतिपुरुषाचे गुह्य त्याला सांगू लागला ५८.

आशंकेचें निरूपण । उद्धवें न सांगतांही जाण ।
तें जाणोनियां श्रीकृष्ण । कृपा निरूपण निरूपी ॥ ५९ ॥
उद्धवाने आपल्या शंकेचे विशेष वर्णन न सांगताही, ती  शंका लक्षात आणून श्रीकृष्ण कृपा करून निरूपण सांगू लागला ५९.

कृष्ण म्हणे ज्यासी तारीन । तो पहिलाचि तरला जाण ।
करावया जगाचें उद्धरण । कृपें श्रीकृष्ण बोलत ॥ ६० ॥
कृष्ण ज्याला तारीन असें म्हणेल तो आधीच तरला म्हणून समजावे. सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्ण कृपा करून बोलू लागला ६०. 

धेनु वत्साचेनि लोभें । जेवीं घरापुरतें दुभे ।
तेवीं उद्धवाचेनि वालभें । जग पद्मनाभें उद्धरिलें ॥ ६१ ॥
गाय वासराच्या लोभाने ज्याप्रमाणे सर्व घराला दूध पुरविते, त्याप्रमाणे पद्मनाभ कृष्णांनी उद्धवाच्या आवडीने सर्व जग उद्धरले ६१.

श्रीभगवानुवाच -
अथ ते संप्रवक्ष्यामि सांख्यं पूर्वैर्विनिश्चितम् ।
यद्विज्ञाय पुमान् सद्यो जह्याद् वैकल्पिकं भ्रमम् ॥ १ ॥
[श्लोक १ ] श्रीभगवान म्हणतात, प्राचीन काळच्या ऋषींनी ज्याचा निश्चय केला आहे, ते सांख्यशास्त्र मी तुला सांगतो हे जाणले असता मनुष्य काल्पनिक भेदरूप भ्रम ताबडतोब सोडून देतो. (१)

जो योगियांचां योगेंद्र । जो ज्ञानियांचा ज्ञानेंद्र ।
जो भक्तचित्तचकोरचंद्र । जो यादवेंद्र यदुवंशीं ॥ ६२ ॥
जो योग्यांचा योगींद्र , जो ज्ञान्यांचा ज्ञानेंद्र, जो भक्तचित्तरूप चकोराचा चंद्र, जो यदुवंशांतला यादवेंद्र ६२, 

जो प्रकृतिपुरुषांहूनि पर । तो स्वयें बोले शार्ङ्गधर ।
उद्धवा द्वंद्वसहनप्रकार । अतिगुह्य विचार अवधारीं ॥ ६३ ॥
जो प्रकृति-पुरुषांहूनही भिन्न, तो श्रीकृष्ण स्वतः म्हणाला की,- उद्धवा ! द्वंद्वे सहन करण्याच्या प्रकाराचा अत्यंत गुह्य विचार तुला आता मी सांगतों, ऐक ६३.

जें ऐकतांचि निरूपण । सुखदुःखातीत आपण ।
हे संपूर्ण पावे खूण । तें गुह्य ज्ञान अवधारीं ॥ ६४ ॥
जें निरूपण ऐकताच आपण सुखदुःखांपासून अगदी निराळे आहों हा विचार पूर्णपणे मनात ठसतो, तें गुह्य ज्ञान ऐक ६४.

मी कपिलरूपें अवतरूनी । प्रकृतिपुरुष विवंचोनी ।
उपदेशिली निजजननी । ते जुनी कहाणी सांगेन ॥ ६५ ॥
मी कपिलऋषीच्या रूपाने अवतार घेऊन आपल्या आईला (देवहूतीला ) प्रकृतिपुरुषाचा सविस्तर विचार सांगून उपदेश केला. तीच पूर्वीची गोष्ट सांगेन ६५.

जे परिसतां सावधान । स्वयें होइजे ज्ञानसंपन्न ।
पुरुषाहूनि प्रकृति भिन्न । सुखदुःख जाण तीपाशीं ॥ ६६ ॥
जी गोष्ट ऐकिली असतां ऐकणारा मनुष्य स्वतःच ज्ञानसंपन्न होतो. पुरुषाहून प्रकृति ही भिन्न आहे, आणि सर्व सुखदुःख तिच्यापाशी आहे हे लक्षात ठेव ६६.

सुखदुःखें मायिक पूर्ण । ऐसें ज्यासी कळलें ज्ञान ।
तेव्हां भवभयभ्रम दारुण । तत्काळ जाण तो सांडी ॥ ६७ ॥
सुखदुःखें जी आहेत. ती पूर्णपणे मायिक आहेत असें ज्ञान ज्याला झालें, तो त्याच वेळी संसाराच्या भयाचा भयंकर भ्रम तत्काळ सोडून देतो ६७.

जेवीं मोतियांची कंठमाळा । भ्रमें सर्प भासली डोळां ।
ते भ्रमांतीं घालिती गळां । न बाधी कंटाळा सर्पभायाचा ॥ ६८ ॥
ज्याप्रमाणे मोत्यांचा हार भ्रमाने डोळ्यांना सापासारखा भासला, तरी तो भ्रम दूर झाल्यानंतर तो हार गळ्यात घालतात व मग कांहीं सर्पाच्या भयाचा त्रास बाधत नाही ६८, 

तेवीं शिवशक्तिविवंचन । तुज मी सांगेन संपूर्ण ।
जें आकर्णितां सावधान । द्वंद्वें सकारण हारपती ॥ ६९ ॥
त्याप्रमाणे शिव आणि शक्ति यांचा विचार मी तुला सर्व सांगतो. जो विचार नीट लक्ष लावून ऐकला असतां द्वंद्वे सर्वस्वी नाहीशी होऊन जातात ६९.

ब्रह्म सुखरूप एकलेपणीं । तेथ प्रकृतिपुरुष कैंचीं दोनी ।
द्वंद्वसुखदुःखें ज्यापासोनी । त्रिभुवनीं न समाती ॥ ७० ॥
ब्रह्म हे आनंदरूप एकटें एक आहे. ज्यांच्यापासून झालेली द्वंद्वांची सुखदुःखें त्रिभुवनांतसुद्धा सामावत नाहीत, अशी प्रकृति आणि पुरुष दोन आली कोठून ? ७०. 

तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ।
प्रकृतिपुरुषांचें जन्म जाण । तें मुख्य कारण सुखदुःखां ॥ ७१ ॥
त्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे. प्रकृतिपुरुषांचा जो जन्म आहे, तेच मुख्यत्वेकरून सुखदुःखांना कारण आहे ७१.

आसीज्ज्ञानमथो ह्यर्थ एकमेवाविकल्पितम् ।
यदा विवेकनिपुणा आदौ कृतयुगेऽयुगे ॥ २ ॥
[श्लोक २] अगदी सुरूवातील जेव्हा प्रलयकाल होता, तेव्हा ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मिळून एकच तत्त्व होते नंतर जेव्हा कृतयुग आले, तेव्हाही विवेकी लोकांच्या दृष्टीने एकच आत्मतत्त्व होते. (२)

जेवीं निजेल्या पुरुषाची छाया । पुरुषातळीं जाय लया ।
तेवीं सविकार गिळोनि माया । ब्रह्म एकल्या एकाकी ॥ ७२ ॥
ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाची छाया त्याच्या आंगाखालीच नाहीशी होऊन जाते, त्याप्रमाणे सविकार माया गिळून टाकून ब्रह्म पुन्हा एकटे एकच शिल्लक राहते ७२.

ब्रह्म एकाकी परिपूर्ण । हेंही म्हणावया म्हणतें कोण ।
नाहीं नाम रूप व्यक्ति पूर्ण । ब्रह्मीं ब्रह्मपण स्फुरेना ॥ ७३ ॥
ब्रह्म एकटे असून ते परिपूर्ण आहे. पण असे म्हणावयाला म्हणणारे तरी कोण? त्याला नाम नाहीं, रूप नाहीं आणि पूर्ण व्यक्तित्वही नाही. पूर्ण ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरणही नाहीं ७३.

तेथ नाहीं युगसंख्या काळ वेळ । नाहीं दिनमान घटिका पळ ।
नाहीं शून्यत्वें शून्य मंडळ । ब्रह्म केवळ परिपूर्णत्वें ॥ ७४ ॥
त्यांत युगांची संख्या नाही, काळ नाही व वेळही नाही. दिनमान नाही, घटका नाहीत, पळे नाहीत. शून्यपणानें शून्याचे मंडळही नाही. असें ब्रह्म केवळ परिपूर्ण स्वरूपाने आहे ७४.  

तेथ मी ब्रह्म हें स्फुरे जें स्फुरण । तेंचि मायेचें मुख्य लक्षण ।
तेंचि प्रकृतिपुरुषांचें जन्मस्थान । जावळीं फळें जाण जन्मलीं ॥ ७५ ॥
त्यांत मी ब्रह्म असें जें स्फुरण होते, तेंच मायेचे मुख्य लक्षण होय. प्रकृति आणि पुरुष यांचे जन्मस्थान तेंच होय. तेथून ती आवळींजावळी फळे जन्माला आलेली असतात ७५.

जेवीं कां कवळूनियां कण । निकण कोंडा वाढे आपण ।
तेंवी पुरुषयोगें पूर्ण । प्रकृति जाण थोरावे ॥ ७६ ॥
ज्याप्रमाणे दाणा पोटांत धरून निःसत्त्व कोंडा  स्वत: वाढतो, त्याप्रमाणेच पुरुषाच्या योगेंकरून ही प्रकृति पूर्णपणे वाढते, हे लक्षात ठेव ७६.

धरूनि गोडपणाचा सांठा । फणसाअंगीं वाढे कांटा ।
तेवीं पुरुषयोगें ताठा । चढला मोठा प्रकृतीसी ॥ ७७ ॥
गोडपणाचा साठा आंतील भागांत ठेवून फणसाच्या अंगावर बाहेरून कांटा वाढत असतो, त्याप्रमाणे पुरुषाच्या योगाने प्रकृतीलाही मोठा ताठा चढतो ७७.

जेवीं कां डोळींचेंचि जळ । गोठोनि डोळां होय पडळ ।
तेवीं ब्रह्मीं मायामळ । करी शबळ शुद्धासी ॥ ७८ ॥
ज्याप्रमाणे डोळ्यांतले पाणी गोठून डोळ्यांतच पडदा येतो, त्याप्रमाणे ब्रह्मामध्येही मायारूपी मळ सांठून तो शुद्ध ब्रह्मालाही मलिन करून सोडतो ७८.

पडळ डोळा मंद करी । माया निजानंद आवरी ।
वाढोनि त्याची त्याचिवरी । वेडा करी पुरुषातें ॥ ७९ ॥
डोळ्यावरील पडदा दृष्टीला मंदपणा आणितो, त्याप्रमाणे माया ही आत्मानंदाला आड येते. त्याचीच माया त्याच्यावरच वाढून पुरुषाला वेडा करून सोडते ७९.

ऐसें कर्तेनवीण आपसया । कार्यकारण जें आलें आया ।
त्यातें कृतयुग म्हणावया । वेदू लवलाह्या उदेला ॥ ८० ॥
असें कर्त्याशिवायच आपोआप जें  कार्यकारण आकाराला आले, त्याला कृतयुग म्हणावयाला वेद तत्काल उद्युक्त झाला ८०.

अकार-उकार-मकारेंसीं । वेदू उपजे प्रकृतिपुरुषीं ।
जेवीं उकलल्या बीजासी । प्रथम ये त्यासी तिवणा डिरू ॥ ८१ ॥
'अ'कार, 'उ'कार व 'म'कार ह्यांसह प्रकृतिपुरुषांमध्ये वेद उत्पन्न झाला. ज्याप्रमाणे मोड फुटलेल्या बीजाला प्रथम तीन पानांचा कोंभ फुटतो, त्याप्रमाणे ८१.

ते वेदींचा अभिप्रावो । ब्रह्म सत्य माया वावो ।
आपुलेनि अभेदें ब्रह्मभावो । विवेकनिपुण पहा वो जाणती ॥ ८२ ॥
त्या वेदांतील मथितार्थ हा की, ब्रह्म हे सत्य आणि माया ही मिथ्या; आणि आपण भेदाभेद सोडला की ब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होते. अहो ! विचारी व तज्ज्ञ लोक हे जाणतात ८२.

ऐसे वेदविवेकें अभेदयोगी । ते कृतादि होत कां कलियुगीं ।
वर्तता ते सदा अयुगीं । युग त्यालागीं असेना ॥ ८३ ॥
अशा प्रकारे वेदाच्या विचाराने जे अभेदभावनेचे योगी होतात, ते कृतयुगापासून कलियुगापर्यंत केव्हाही होवोत, ते वागत असतां नेहमी युगरहितच असतात. त्यांना युग असत नाही ८३.

कृतयुगादि युगपंक्ती । चराचर नाना व्यक्ती ।
यांसी उपजवी प्रकृती । तिची उत्पत्ती हरि सांगे ॥ ८४ ॥
कृतयुगादि ज्या युगांच्या मालिका आहेत व चराचरादि ज्या नाना प्रकारच्या व्यक्ति आहेत, त्या प्रकृतीच उत्पन्न करते. त्या प्रकृतीची उत्पत्ति श्रीकृष्ण सांगतात ८४.

तन्मायाफलरूपेण केवलं निर्विकल्पितम् ।
वाङ्मनोऽगोचरं सत्यं द्विधा समभवद्‌बृहत् ॥ ३ ॥
[श्लोक ३] कोणत्याही प्रकारचा भेद नसलेले ते सत्य ब्रह्म होते, मन किंवा वाणी यांना ते कळत नव्हते माया आणि तीत प्रतिबिंबित झालेल्या जीवाच्या रूपाने दृश्य आणि द्रष्टा या दोन भागात ते विभागले गेले. (३)

तें बृहत् जें परब्रह्म । जेथ न रिगे रूपनाम ।
जें मनबुद्धीसी अगम्य । जें दुर्गम इंद्रियां ॥ ८५ ॥
जें परब्रह्म, तें सर्वव्यापक आहे. ज्यांत रूपाचा व नामाचा रिघावच नाही, जे मनाला व बुद्धीलाही अगम्य, आणि इंद्रियांना जे दुर्गम ८५; 

जें निर्गुण निराकार । जें सत्यस्वरूप साचार ।
जें परेहूनि परात्पर । निर्विकार निजवस्तु ॥ ८६ ॥
जें निर्गुण व निराकार, जें खरे खरे सत्यस्वरूप, जे परेच्या पलीकडचे, आणि जें निर्विकार असें तत्त्व आहे ८६, 

तेथ अतर्क्य मायाचमत्कार । करी दृश्यद्रष्टृत्वें सविकार ।
तेचि प्रकृति पुरुष साचार । तेणें चराचर वाढवी ॥ ८७ ॥
त्या परब्रह्मांत मायेचे चमत्कार अतर्क्य आहेत. ती परब्रह्मालाच दृश्य आणि द्रष्टा अशा प्रकारचा विकार उत्पन्न करिते, तीच खरोखर प्रकृति आणि पुरुष होते, आणि त्या योगाने चराचरांची वृद्धि करते ८७.

जेवीं रूपासवें छायेची व्यक्ती । तेवीं ब्रह्मीं मायेची निजस्थिती ।
तिणें उपजविली शिवशक्ती । पुरुष प्रकृति द्विधा भेदें ॥ ८८ ॥
ज्याप्रमाणे स्वरूपाबरोबरच छायेची मूर्ति उत्पन्न होते, त्याप्रमाणेच ब्रह्मामध्ये मायेची स्थिति आहे. तिनंच शिव-शक्तीला पुरुष आणि प्रकृति ह्या दोन भेदांनी उत्पन्न केले आहे ८८.

ब्रह्मांडीं ईश्वरस्वभावो । पिंडीं त्यासीच जीवभावो ।
ऐसा प्रकृतिपुरुषनिर्वाहो । मायेनें पहा हो द्विधा केला ॥ ८९ ॥
ब्रह्मांडांत जे ईश्वरी स्वरूप असते, त्यालाच पिंडामध्ये (देहामध्ये) जीवाचे रूप येते. अहो पहा ! असा हा प्रकृतिपुरुषांचा जोडा मायेनेच दोन प्रकारचा केला आहे ८९.

ब्रह्म अच्छेद्य वेदू बोले । तें फाडूनि द्विधा कैसें केलें ।
जेवीं आरिसां आपणा आपुलें । मुख देखिलें संमुख ॥ ९० ॥
ब्रह्म अच्छेद्य आहे असे वेद म्हणतो. ते फाडून त्याचे दोन भाग कसे केले? तर ज्याप्रमाणे आरशामध्ये आपलेच तोंड समोर निराळे दिसते, त्याप्रमाणे ९०.

आपण पुर्वामुख आहे । प्रतिबिंब पूर्वेकडे न होये ।
आपलें आपणा संमुख होये । हें लाघव पाहें मायेचें ॥ ९१ ॥
आपण पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलों, तर आपले प्रतिबिंब काही पूर्वेकडे तोंड केलेले असत नाही. ते आपल्यासमोरच (पश्चिमाभिमुख) असते. हेच मायेचे कौतुक होय ९१.

प्रतिबिंब दिसतां संमुख । संमुख म्हणतां अतिविमुख ।
पुरुष पूर्वेकडे देख । प्रतिबिंबाचें मुख पश्चिमेकडे ॥ ९२ ॥
प्रतिबिंब समोर दिसले असता ते समोर आहे म्हणावें, तर अगदी उलट दिशेला त्याचे तोंड असते. म्हणजे पुरुष पूर्वेकडे पाहात असला, तर प्रतिबिंबाचे तोंड पश्चिमेकडे असते ९२.

तेवीं आत्मदृष्टि स्वरूपीं पडें । जीवदृष्टि प्रपंचाकडे ।
येणें संमुखत्व न घडे । विमुखत्व गाढें जीवासी ॥ ९३ ॥
त्याप्रमाणे आत्मदृष्टि असते ती स्वरूपाकडे असते, आणि जीवदृष्टि असते ती प्रपंचाकडे असते. त्यामुळे जीवाला स्वरूपाकडे सन्मुख होता येत नाही. तो जीव अगदी उलट बाजूलाच पाहात असतो ९३.

तेवीं ब्रह्मीं जें ब्रह्मस्फुरण । तेंचि मूळमायेचें लक्षण ।
तेथ ईश्वरत्वें जाण । होय आपण्या आपण संमुख ॥ ९४ ॥
त्याप्रमाणेच ब्रह्मामध्ये जे ब्रह्माचे स्फुरण होते, तेच मूळ मायेचे स्वरूप होय. तेथे ईश्वराच्या स्वस्वरूपानंच आपण आपल्या सन्मुख होतो ९४.

जे अद्वितीय वस्तु शुद्ध । तेथ मिथ्या मायासंबंध ।
अभेदीं उपजवूनि भेद । केलीं द्विविध शिवशक्ती ॥ ९५ ॥
खरोखर जें शुद्ध व अद्वितीय ब्रह्म, त्यांत मायेचा संबंध मिथ्या होय. परंतु त्या मायेनं अभेदामध्येही भेद उत्पन्न करून शिव आणि शक्ति (पुरुष आणि प्रकृति) अशी निरनिराळी केली ९५.

तयोरेकतरो ह्यर्थः प्रकृतिः सोभयात्मिका ।
ज्ञानं त्वन्यतमो भावः पुरुषः सोऽभिधीयते ॥ ४ ॥
[श्लोक ४] त्यांपैकी एका वस्तूला प्रकृती म्हणतात तिनेच जगामध्ये कार्य आणि कारण अशी दोन रूपे धारण केली दुसरी वस्तू म्हणजे ज्ञानस्वरूप जीवात्मा त्याला पुरूष म्हणतात. (४)

त्या दोहीं भागांमाझारीं । प्रकृतिभाग तो विकारी ।
पुरुषभाग तो अविकारी । स्वयें श्रीहरी सांगत ॥ ९६ ॥
त्या दोन भागांमध्ये प्रकृतीचा भाग तो विकारी आहे, आणि पुरुषाचा भाग तो अविकारी आहे असें श्रीकृष्ण स्वतः सांगतात ९६.

तेथ आपण आपुली कांता । आपुले कांतेचा आपण भर्ता ।
एकपणीं दावूनि द्वैता । भिन्नविभागता शिवशक्ती ॥ ९७ ॥
तेथें पुरुष स्वत:च आपली स्त्री  होतो, आणि स्वत:च त्या आपल्या स्त्रीचा पति होतो. अशा प्रकारे एकपणांतच द्विधाभाव दाखवून शिव आणि शक्ति असे भिन्न विभाग केले आहेत ९७.

जेवीं आपुलें एक अंग । तेथ बोलती वाम सव्य भाग ।
तेवीं प्रकृतिपुरुषविभाग । जाणावे साङ्ग मायिक ॥ ९८ ॥
ज्याप्रमाणे आपले एकच अंग असते तरी त्यांत डावें अंग व उजवें अंग असे दोन विभाग मानतातच, त्याप्रमाणे प्रकृति व पुरुष हेही भाग पूर्णपणे मायिकच आहेत असे समजावें ९८.

अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।
प्रकृतिपुरुषीं तैशी परी । एक शरीरीं एकात्मता ॥ ९९ ॥
अर्धनारीनटेश्वरामध्ये जो पुरुष असतो, तोच स्त्री असतो. प्रकृतिपुरुषांतही तसाच प्रकार आहे. म्हणजे ती दोन्ही एकशरीरी असून त्यांचा आत्माही एकच आहे ९९.

जैं पुरुषविभाग लपवीं । तैं स्वेच्छा प्रकृति नाचवी ।
प्रकृतिभाग जैं लपवी । तैं पुरुषाची पदवी प्रकट दिसे ॥ १०० ॥
पुरुषाचा भाग जेव्हां लपविते, तेव्हां प्रकृतीला स्वेच्छेने नाचूं देते. आणि प्रकृतिविभाग जेव्हां लपविते, तेव्हां पुरुषाचे स्वरूप स्पष्ट दिसून येते १००.

मधील पडदा जैं तोडिती । तैं पुरुष ना प्रकृती ।
तेव्हां प्रकटे निजात्मस्थिती । स्त्रीपुरुषव्यक्ती समूळ मिथ्या ॥ १ ॥
प्रकृति व पुरुष यांच्या मधला भेदभावं जेव्हां तोडते, तेव्हां पुरुषही नाही आणि प्रकृतीही नाही. त्या वेळी आपलें स्वस्वरूपचं प्रगट होतें. तात्पर्य, स्त्रीपुरुषव्यक्ति या समूळ मिथ्याच आहेत १. 

ऐशी मिथ्या मायिक प्रकृती । तीपासाव गुणोत्पत्ती ।
गुणास्तव संसारस्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥ २ ॥
अशा प्रकारें प्रकृति ही मायिक असल्यामुळे मिथ्या आहे. तिच्यापासून गुण उत्पन्न होतात, आणि त्या गुणांपासून संसार उत्पन्न होतो असें श्रीकृष्ण स्वतः सांगतात २.

तमो रजः सत्त्वमिति प्रकृतेरभवन्गुणाः ।
मया प्रक्षोभ्यमाणायाः पुरुषानुमतेन च ॥ ५ ॥
[श्लोक  ५] जीवांच्या शुभअशुभ कर्मांनुसार मीच प्रकृतीला प्रक्षुब्ध केले तेव्हा तिच्यापासून सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण प्रगट झाले. (५)

प्रकृति गुणमयी पूर्ण । ते लाहोनि पुरुषईक्षण ।
प्रकट करी तिन्ही गुण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३ ॥
प्रकृति ही पूर्णपणे गुणमयी आहे. तिला पुरुषदृष्टि प्राप्त झाली म्हणजे ती तिन्ही गुण प्रगट करते. तेच निरूपण श्रीकृष्ण सांगतात ३.

जेवीं सूर्यावलोकनमेळीं । कळीं विकासे कमळदळीं ।
ते वेगळवेगळी पांकोळी । होती मूळीं कळिकेमाजीं ॥ ४ ॥
ज्याप्रमाणे सूर्याची दृष्टि पोचल्याबरोबर कमळाची कळी निरनिराळ्या पाकळ्यांनी विकसित होते; पण त्या विकासलेल्या निरनिराळ्या पाकळ्या त्या कळीमध्येच असतात ४.

तेवीं पुरुषाच्या ईक्षणीं । गुणमयी झाली गुर्विणी ।
ते तम-रज-सत्त्वगुणी । प्रसवली तिनी गुणांतें ॥ ५ ॥
त्याप्रमाणे प्रकृति असते ती ईश्वराच्या दृष्टीनेच आपल्या गर्भामध्ये गुणांचें धारण करून गर्भिणी होते; आणि सत्त्व, रज व तम या तिन्ही गुणांना प्रसवते ५.

जेवीं जळे बीज क्षोभूनी । दोनी दळें उलवूनी ।
डिरू निघाला त्यांतूनी । तरतरूनी तिवणा पैं ॥ ६ ॥
ज्याप्रमाणे पाण्याने बीज फुगून त्याच्या दोन्ही डाळिंब्या उकलून त्यातून तीन पानांचा अंकुर तरतरून बाहेर निघतो ६; 

तेवीं परमात्मा मी आपण । पुरुषत्वातें पावोनि जाण ।
प्रकृति क्षोभवूनी पूर्ण । तिनी गुण प्रकटविले ॥ ७ ॥
त्याप्रमाणे मी परमात्मा स्वतः पुरुषत्व पावून आणि प्रकृतीला पूर्णपणे क्षुब्ध करून तिन्ही गुण प्रगट केले आहेत ७.

जेवीं कां सूर्याचे किरणीं । सूर्यकांतीं पडे अग्नी ।
तेवीं पुरुषें प्रकृती भोगुनी । गुण तिनी ते प्रसवे ॥ ८ ॥
सूर्याच्या किरणाने सूर्यकांतांतून ज्याप्रमाणे अग्नि पडतो, त्याप्रमाणे पुरुषाने प्रकृतीचा उपभोग घेतला, म्हणजे ती तिन्ही गुण प्रसवते ८.

तेभ्यः समभवत्सूत्रं महान्सूत्रेण संयुतः ।
ततो विकुर्वतो जातो अहङ्कारो यो विमोहनः ॥ ६ ॥
[श्लोक ६ ] त्यांच्यापासून क्रियाशक्तिप्रधान सूत्र आणि ज्ञानशक्तिप्रधान महतत्त्व हे प्रगट झाले हे दोघे एकमेकांत मिसळलेलेच आहेत महत्तत्त्वापासून अहंकार उत्पन्न झाला हा अहंकारच जीवांना मोह उत्पन्न करतो. (६)

ते तिनी गुण भिन्न भिन्न । भिन्नपणें वाढी समान ।
त्या नांव सूत्र प्रधान । क्रियाशक्ति जाण या नांव ॥ ९ ॥
ते तीन गुण भिन्न भिन्न आहेत, पण ते भिन्नपणांतही सारखेच वाढत असतात. त्यालाच सूत्र, प्रधान आणि क्रियाशक्ति अशी नावे आहेत ९.

क्रियाशक्तीस जडपण । तेथ चेतनात्मक उपजे ज्ञान ।
तेंचि महत्तत्त्व नांव जाण । भिन्नाभिधान या हेतू ॥ ११० ॥
क्रियाशक्तींत जडपणा असतो. तेथें जें चेतनात्मक ज्ञान उत्पन्न होते, त्याचेंच नांव महत्तत्त्व होय. हे निराळे नांव ह्यामुळेच त्याला प्राप्त झाले आहे ११०.

महत्तत्त्व आणि प्रधान । दोहिंचें रूप एकचि जाण ।
तेथ क्रिया आणि स्फुरे ज्ञान । यालागीं नांवें भिन्न दोहींचीं ॥ ११ ॥
महत्तत्त्व आणि प्रधान या दोहोंचें स्वरूप एकच आहे. तेथें क्रिया आणि ज्ञान स्फुरण पावते, म्हणून दोहोंची नांव मात्र भिन्न आहेत ११.

क्रियायुक्त जें स्फुरे ज्ञान । तेथ चेतवे अभिमान ।
त्रिगुणीं अहंकार पूर्ण । ते ठायीं जाण उठावे ॥ १२ ॥
क्रियायुक्त जें ज्ञान स्फुरण पावते, तेथेच अभिमान जागृत होतो. आणि तीन गुणांनी पूर्ण अहंकार त्या ठिकाणी उत्पन्न होतो १२.

अहं खवळल्या दारुण । शिवासी विसरवी शिवपण ।
देहत्मवादें भुलवी पूर्ण । जन्ममरण भोगवी ॥ १३ ॥
अहंभाव भयंकर रीतीने खवळला, की तो शिवाला शिवपणाचा विसर पाडतो, आणि देहात्मवादाने पूर्णपणे भुरळ घालून जन्ममरण भोगावयास लावतो १३.

त्या अहंकाराची मोहक शक्ती । भवभ्रमें पाडी भ्रांती ।
अहंकाराची विकारउत्पत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ १४ ॥
त्या अहंकाराची मोहक शक्ति संसाराच्या भ्रमाने भ्रांतीत पाडते. अहंकारापासून विकार कसे उत्पन्न होतात. तें श्रीकृष्ण स्वतः सांगतो १४.

वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेत्यहं त्रिवृत् ।
तन्मात्रेन्द्रियमनसां कारणं चिदचिन्मयः ॥ ७ ॥
[श्लोक ७ ] तो अहंकार सात्त्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा आहे पंचतन्मात्रा, इंद्रिये आणि मन ही अहंकाराची कार्ये आहेत म्हणून तो जडचेतन असा उभयात्मक आहे. (७)

अहंकार अतिदुर्धर । गुणानुसारें त्रिप्रकार ।
गुण अहंता दृढ संसार । गुणविकार तो ऐसा ॥ १५ ॥
अहंकार हा अत्यंत दुर्धर आहे. त्याचे सत्त्वादि गुणानुसार तीन प्रकार होतात. गुण व अहंता हाच मोठा संसार होय. गुणांचा विकार असा आहे की १५, 

प्रथम अहंभावो सात्त्विक । झाला अंतःकरणद्योतक ।
तोचि देवताविकारजनक । यालागीं वैकारिक बोलिजे त्यासी ॥ १६ ॥
प्रथमतः सात्विक अहंकार उत्पन्न होत असून तो अंत:करणाला प्रकाशित करतो. तोच अनेक देवतांचे विकार उत्पन्न करणारा आहे, म्हणून त्याला 'वैकारिक' म्हणतात १६. 

अहंकार जो राजसू । तो ज्ञानकर्मेंद्रियप्रकाशू ।
वांछी रजतेजविलासू । यालागीं तैजसू बोलिजे ॥ १७ ॥
जो राजस अहंकार असतो, तो ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा प्रकाशक असतो. राजस तेजाचे विलास त्याला आवडतात, म्हणून त्याला तैजस असे म्हणतात १७.

तामसाहंकाराची सिद्धि । सूक्ष्म भूतांतें उत्पादी ।
यालागीं म्हणिजे तो भूतादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ १८ ॥
तामस अहंकाराचा परिणाम असा होतो की, तो सूक्ष्म परमाणुरूप भूतांना उत्पन्न करतो. म्हणून उद्धवा ! खरोखर त्याला 'भूतादि' असे म्हणतात १८.

नवल अहंकाराची थोरी । सचेतना अचेतन नोवरी ।
स्वयें लग्न लावी प्रीतीवरी । चिदचिद्ग्रंथी पुरी पाडूनी ॥ १९ ॥
अहंकाराचे बंड मोठे विलक्षण आहे. सचेतनाला अचेतन नवरी बनवितो, आणि ज्ञान-अज्ञानांची पक्की गांठ मारून मोठ्या प्रेमाने स्वतःचे लग्न तिच्याशी लावतो १९.

चिन्मात्रस्वरूपता जीवासी । लग्न लावी जड देहेंसीं ।
‘ओं पुण्या’ एकात्मतेसी । कर्ता ज्योतिषी अभिमान ॥ १२० ॥
जीव हा ज्ञानस्वरूप आहे, त्याचे जड देहाशी लग्न लावून देतो. अभिमान हाच 'ॐ पुण्याहं मंत्र म्हणून त्याचा एकजीव करणारा ज्योतिषी होय १२०.

जीव ज्ञानस्वरूप चोखडा । तो करोनि जड मूढ वेडा ।
दृढ घाली हाडांचे खोडां । तो हा धडफुडा अहंकारू ॥ २१ ॥
जीव हा शुद्ध ज्ञानस्वरूप असून त्याला जड, मूढ व वेडा करून सोडतो, आणि त्याला हाडांच्या खोड्यांत जखडून टाकतो. असा हा अहंकार उपद्व्यापी आहे २१.

तोचि सात्त्विक आणि राजस । होऊनि तिसरा तामस ।
त्रिविध विकारीं बहुवस । वाढवी असोस संसारू ॥ २२ ॥
तोच सात्विक, राजस आणि तिसरा तामस असा तीन प्रकारांनी जिकडे तिकडे फैलावून अफाट संसार वाढवितो २२.

अर्थस्तन्मात्रिकाज्जज्ञे तामसादिन्द्रियाणि च ।
तैजसाद् देवता आसन् एकादश च वैकृतात् ॥ ८ ॥
[श्लोक ८] तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि त्यांपासून पंच महाभूते उत्पन्न झाली राजस अहंकारापासून इंद्रिये आणि सात्त्विक अहंकारापासून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अकरा देवता प्रगट झाल्या. (८)

विषय तेचि महाभूतें । तामस प्रसवला अपंचीकृतें ।
विषयास्तव प्रकटती भूतें । ऐक तूतें सांगेन ॥ २३ ॥
विषय तीच महाभूतें होत. तामसगुणाने ती पांच महाभूतें परस्परांशी मिश्रण न करिता वेगवेगळी निर्माण केली आहेत. ती पंचमहाभूतें विषयापासून उत्पन्न होतात. तेच तुला आता सांगतों, ऐक २३. 

शब्दापासाव नभ उद्‌भवत । स्पर्शापासाव मारुत ।
रूपापासाव तेज होत । रसास्तव येथ आप उपजे ॥ २४ ॥
शब्दापासून आकाश उत्पन्न होते, स्पर्शापासून वायु उत्पन्न होतो, रूपापासून तेज उत्पन्न होते, आणि रसापासून पाणी उत्पन्न होते २४.

गंधापासोनि पृथ्वी कठिण । उपजली आपीं आपण ।
येरयेरांचें अनुस्यूतपण । सर्वथा जाण मोडेना ॥ २५ ॥
गंधापासून कठीण पृथ्वी पाण्यामध्ये स्वतः उत्पन्न झाली आहे. अशा रीतीने जरी ही निरनिराळी उत्पन्न होत असलेली दिसली, तरी परस्परांचा ऐक्यसंबंध सर्वथा मोडत नाही २५.

शब्द निःशब्दीं जन्मला । तो आकाशातें प्रसवला ।
आकाशीं सूक्ष्म स्पर्श झाला । तो स्पर्श व्याला मारुत ॥ २६ ॥
तो प्रकार असा निःशब्दा ( परब्रह्मा) पासून शब्द निर्माण झाला, आणि त्याने आकाश उत्पन्न केले. आकाशामध्ये सूक्ष्म स्पर्श उत्पन्न झाला, आणि त्या स्पर्शानंच वायु निर्माण केला २६.

जन्मल्या मारुताआंत । शब्द स्पर्श दोनी नांदत ।
मारुत रूपातें प्रसवत । त्या रूपांत तेज जन्मलें ॥ २७ ॥
अशा रीतीने जन्मलेल्या वायूमध्ये शब्द आणि स्पर्श दोन्ही नांदतात. त्या वायूनें रूप उत्पन्न केले व त्या रूपांत तेज जन्मास आले २७.

त्या जन्मल्या तेजाआंत । शब्द स्पर्श रूप नांदत ।
रूप रसातें प्रसवत । आप रसांत जन्मलें ॥ २८ ॥
त्या उत्पन्न झालेल्या तेजांत शब्द, स्पर्श वरूप ही तिन्ही नांदतात. रूपापासून रस उत्पन्न झाला, आणि त्या रसापासुन पाणी उत्पन्न झाले २८.

जन्मले आपीं समरस । शब्द स्पर्श रूप रस ।
नांदताती सावकाश । विषयीं विषयांस प्रवेशू ॥ २९ ॥
अशा रीतीनें जन्मलेल्या पाण्यांत शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे खुशाल नांदत असतात. याप्रमाणे विषयांत विषय मिश्र होऊन राहातात २९.

आपामाजीं जन्मे गंध । गंधापासाव पृथ्वी शुद्ध ।
शब्द स्पर्श रूप रस गंध । पृथ्वी पंचविध विषययुक्त ॥ १३० ॥
पाण्यामध्ये गंध उत्पन्न होतो व त्या गंधापासून ही शुद्ध पृथ्वी निर्माण होते. अशी ही पृथ्वी शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध अशा पांच विषयांनी युक्त आहे १३०.

विषययुक्त अपंचीकृतें । पूर्वीं लीन होतीं समस्तें ।
तींचि स्थूळावलीं येथें । महाभूतें प्रसिद्ध ॥ ३१ ॥
अशी ही विषययुक्त निरनिराळी पंचमहाभूतें पूर्वी अत्यंत सूक्ष्म रूपानें लीन झालेली असतात, तींच येथे स्थूल रूपाला येऊन पंचमहाभूते या नावाने प्रसिद्ध होतात ३१.

ज्ञान कर्म उभयपंचक । श्रोत्रादि इंद्रियदशक ।
राजसापासोनि देख । स्वाभाविक जन्मलीं ॥ ३२ ॥
पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेदिये, आणि कान इत्यादि दहा इंद्रिये ही राजस अहंकारापासून आपोआपच उत्पन्न होतात ३२.

सत्त्व‌अहंतेचा विकार । चित्तचतुष्टय चमत्कार ।
मन बुद्धि चित्त अहंकार । अकराही सुर इंद्रियाधिप ॥ ३३ ॥
सत्त्वाहंकाराच्या विकारांपासून मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार असा चित्तचतुष्टयाचा चमत्कार उत्पन्न होतो. आणि प्रजापति-इंद्रादि अकरा देव इंद्रियांचे अधिष्ठाते होतात ३३.

महाभूतें अतिजडें देख । इंद्रियें तेथें प्रवर्तक ।
अंतःकरणचाळक । देव प्रकाशक कर्माचे ॥ ३४ ॥
वास्तविक महाभूतें अत्यंत जड आहेत. इंद्रियें ही त्यांची प्रवर्तक होत. अंतःकरण हें चालक असून देव हे कर्माचे प्रकाशक होत ३४.

त्रिविध अहंकारवृत्ती । गुणक्षोभें क्षोभक शक्ती ।
यापरी झाली उत्पत्ती । ब्रह्मांडस्थितीलागूनी ॥ ३५ ॥
तीन प्रकारच्या अहंकारवृत्ति गुणक्षोभानें क्षोभक शक्ति होतात. याप्रमाणे ब्रह्मांडाची सर्व रचना झाली आहे ३५.

मया सञ्चोदिता भावाः सर्वे संहत्यकारिणः ।
अण्डमुत्पादयामासुः ममायतनमुत्तमम् ॥ ९ ॥
[श्लोक ९] माझ्या प्रेरणेने हे सर्व पदार्थ एकत्र होऊन एकमेकात मिसळले गेले आणि त्यांनी ब्रह्मांडरूप अंडे उत्पन्न केले हे ब्रह्मांड माझे उत्तम निवासस्थान आहे. (९)

भूतां परस्परें वैर देख । पृथ्वीतें गिळूं धांवे उदक ।
उदकातें आवश्यक । तेज देख निर्दळी ॥ ३६ ॥
भूतांमध्ये एकमेकांत वैरच असते. पाणी पृथ्वीला गिळून टाकावयाला धावत असते; तेज (अग्नि) त्या पाण्याचा खात्रीने नाश करिते ३६.

तेजातें प्राशी पवन । पवनातें ग्रासी गगन ।
एवं भूतांसी सौजन्य । सर्वथा जाण असेना ॥ ३७ ॥
तेजाला वायु गिळून टाकतो. वायूला आकाश गिळून टाकतें.  ह्याप्रमाणे भूतांभूतातही एकमेकांशी मुळींच सख्य असत नाही ३७.

तेथ अंतर्यामिरूपें मी जाण । स्वयें प्रवेशोनि आपण ।
भूतें मेळवूनि पूर्ण । करीं संरक्षण मर्यादा ॥ ३८ ॥
त्यांत मी अंत:करणरूपाने आपण स्वतः प्रवेश करून सर्व भूतें एकत्र करून त्यांची मर्यादा संरक्षण करतों ३८.

माझे मर्यादेची रेखा । प्रथ्वी न विरवी उदका ।
उदकातें तेज देखा । न लववी नखा शोषाचे ॥ ३९ ॥
मी मर्यादेची रेषा घालून दिल्यामुळे पाणी पृथ्वीला विरवून टाकू शकत नाही. आणि पहा ! तेजही आपले शोषणक्रियेचे नख उदकाला लावण्याकरिता पुढे करीत नाही (तेज उदकाला शोधूं शकत नाही) ३९.

तेजातें न प्राशी पवन । वायु स्वेच्छा विचरतां जाण ।
सर्वथा ग्रासीना गगन । गतिबंधन करीना ॥ १४० ॥
तसेंच वायु तेजाला गिळून टाकीत नाही, आणि वायु कितीही स्वेच्छाचाराने वागत असला तरी आकाश त्याला कधीच गिळीत नाही, किंवा त्याच्या गतीला प्रतिबंध करीत नाही १४०.

यापरी हीं महाभूतें । एकवटूनि समस्तें ।
स्रजिलें ब्रह्मांडातें । मज महापुरुषातें वस्तीशीं ॥ ४१ ॥
याप्रमाणे ही सर्व महाभूते एकत्र होऊन मला महापुरुषाला राहण्यासाठी त्यांनी ब्रह्मांड तयार केले आहे ४१.

सप्तावरणेंसीं प्रचंड । आवो साधूनि उदंड ।
निर्माण केलें ब्रह्मांड । मयूरांड आकारें ॥ ४२ ॥
मोठमोठाल्या सप्त  आवरणांसह प्रशस्त जागा व्यापून मयूराच्या अंड्याच्या आकाराचें ब्रह्मांड निर्माण केले आहे ४२.

तस्मिन्नहं समभवं अण्डे सलिलसंस्थितौ ।
मम नाभ्यामभूत्पद्मं विश्वाख्यं तत्र चात्मभूः ॥ १० ॥
[श्लोक १०] जेव्हा ते अंडे पाण्यामध्ये स्थिर झाले, तेव्हा मीच नारायणरूपाने त्यात विराजमान झालो माझ्या नाभीपासून विश्वकमळाची उत्पत्ती झाली त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाला. (१०)

ऐसें ब्रह्मांड जें विद्यमान । त्यामाजीं मी नारायण ।
लीलाविग्रही झालों जाण । आपण्या आपण विश्वात्मा ॥४३ ॥
असें जें हें आज अस्तित्वात असलेलें ब्रह्मांड, त्यामध्ये मूळचाच आपला आपण विश्वात्मा असणारा मी नारायण लीलेने देह धारण करणारा झालों ४३.

त्या माझे नाभीसी नाभिपद्म । विकासलें विश्वधाम ।
त्याहीमाजीं उत्तमोत्तम । आत्मभू नाम जन्मला ब्रह्मा ॥ ४४ ॥
त्या माझ्या नाभीमध्ये विश्वाला आधारभूत असें नाभिकमल उत्पन्न झाले, आणि त्यांत उत्तमोत्तम असा 'आत्मभू' नामक ब्रह्मदेव जन्मास आला ४४.

नाहीं योनिद्वारा उदरगर्भू । मज आत्म्यापासूनि स्वयंभू ।
उपजला यालागीं आत्मभू । नामाचा शोभू ब्रह्मयासी ॥ ४५ ॥
तो उदरांत गर्भरूपाने राहून योनिद्वारा जन्मलेला नव्हता, तर तो माझ्या आत्म्यापासून स्वयंभूच निर्माण झाला. म्हणूनच ब्रह्मदेवाला 'आत्मभू'  अशा नांवाचे भूषण प्राप्त झाले आहे ४५.

ब्रह्मांड तो विराटदेहो । त्याचा मुख्य भाग विग्रहो ।
माझे नाभिकमळीं पहा हो । ब्रह्मदेवो जन्मला ॥ ४६ ॥
ब्रह्मांड हाच विराट देह होय. आणि विग्रह हाच त्याचा मुख्य भाग. अहो  ! पहा. अशा रीतीने ब्रह्मदेव माझ्या नाभिकमलापासून जन्मास आला ४६.

करावया लोकसर्जन । पद्मनाभाचे नाभीसी जाण ।
स्वयें जन्मला चतुरानन । रजोगुणप्राधान्यें ॥ ४७ ॥
सृष्टि निर्माण करण्याकरिता पद्मनाभाच्या नाभिकमलामध्ये रजोगुणाच्या प्राधान्येकरून ब्रह्मदेव स्वतःच जन्मास आला ४७.

सोऽसृजत्तपसा युक्तो रजसा मदनुग्रहात् ।
लोकान् सपालान् विश्वत्मा भूर्भुवःस्वरिति त्रिधा ॥ ११ ॥
[श्लोक ११] विश्वरूप ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि माझ्या कृपेने रजोगुणाच्या द्वारे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीन लोकांची व त्यांच्या लोकपालांची निर्मिती केली. (११)

ब्रह्म रजोगुणप्रधान । नाभिकमळीं बैसोनि जाण ।
मी जन्ममूळ जो नारायण । त्यासी तो आपण देखेना ॥ ४८ ॥
अशा प्रकारचा रजोगुणप्रधान जो ब्रह्मदेव, तो जन्मास येऊन नाभिकमळांत बसला, परंतु त्याच्या जन्माचे मूळ जो मी नारायण, त्या मला काही तो पाहू शकला नाही ४८.

स्वयें बैसल्या कमळासी । कमळमूळ न कळे त्यासी ।
देखे एकार्णव जळासी । रजोगुणेंसीं मोहित ॥ ४९ ॥
कारण तो स्वतःच कमळांत बसल्यामुळे त्या  कमळाचे मूळ काही त्याला दिसेना. तो रजोगुणाला भुलल्यामुळे त्याला सर्व एकरूप समुद्रासारखे पाणीच पाणी दिसू लागले ४९.

तें कमळमूळ पहावया बुडीं । एकार्णवीं घालोनि उडी ।
बुडतां दिवसांच्या कोडी । त्या मूळाची जोडी न लभेचि ब्रह्मा ॥ १५० ॥
तें कमळाचे मूळ पहाण्याकरिता त्याने त्या समुद्रात बुडी मारली, आणि किती तरी दिवस पाण्यातच बुडून होता, तरी देखील त्या ब्रह्मदेवाला त्या कमळाच्या मूळाचा शोध लागला नाहींच १५०.

तेथ निर्बुजला जळभयें । बाहेरि उसासे लवलाहें ।
कमळावरी बैसोनि पाहें । करावें काये स्मरेना ॥ ५१ ॥
अखेरीस तेथे तो पाण्याच्या भीतीने घाबरून गेला, आणि झटकन पाण्याच्या बाहेर येऊन उसासे टाकू लागला. मग तो त्या कमळावर पुन्हा बसला, पण पुढे काय करावे हे त्याला सुचेना ५१.

धांव पाव गा अच्युता । निवारीं माझी जगदंधता ।
तुजवांचूनि सर्वथा । संरक्षिता मज नाहीं ॥ ५२ ॥
तो म्हणाला, “हे अच्युता ! धावत ये आणि मला प्रसन्न हो. मला जगाविषयी आलेले अंधत्व नाहीसे कर. तुझ्याशिवाय माझे सर्वस्वीं रक्षण करणारा दुसरा कोणी नाही" ५२.

ब्रह्मा माझे पोटींचें बाळ । रजें रजांध झालें केवळ ।
धरोनि ठेला नाभिकमळ । कृपा तत्काळ मज आली ॥ ५३ ॥
ब्रह्मदेव माझ्याच पोटचे लेंकरूं. रजाने बिचारे केवळ आंधळे झाले. असा तो नाभिकमळालाच धरून बसला, तेव्हा मला तत्काळ त्याची दया आली ५३.

मज विश्वात्म्याचें अपत्य । जडत्वें राहिला तटस्थ ।
म्यां उपदेशिला तेथ । सृष्टिसर्जनार्थ तपोनिष्ठा ॥ ५४ ॥
मज विश्वात्म्याचाच तो पुत्र, पण केवळ जडत्वाने स्तब्ध होऊन राहिला. तेव्हा त्या तपोनिष्ठाला सृष्टि निर्माण करण्याकरितां मी उपदेश केला ५४.

महाकल्पादींचे मांडणी । माझिया अशरीरी वाणी ।
तप तप या दों वचनीं । उपदेशिला अग्रगणी चतुरानन ॥ ५५ ॥
महाकल्पादिकाच्या आरंभी मी आपल्या आकाशवाणीने 'तप तप' या दोन शब्दांनी श्रेष्ठ ब्रह्मदेवाला उपदेश केला ५५.

यथोक्त तप करितां जाण । वृद्धि पावला सत्त्वगुण ।
त्याचिया सात्त्विकता पूर्ण । प्रत्यक्ष नारायण मी झालों ॥ ५६ ॥
मी सांगितल्याप्रमाणे त्याने तप करितांच त्याचा सत्त्वगुण वाढला आणि त्याच्या त्या पूर्ण सत्त्वगुणानेच मी प्रत्यक्ष नारायण झालों ५६.

काळत्रयीं अबाधिक । तूंचि विश्वात्मा निश्चित ।
हें चतुःश्लोकी भागवत । म्यां त्यासी तेथ उपदेशिलें ॥ ५७ ॥
“त्रिकालाबाधित विश्वात्मा खरोखर तूंच आहेस" अशा अर्थाच्या चतुःश्लोकी भागवताचा मी त्याला उपदेश केला ५७.

माझिया उपदेशविधीं । होऊनियां समबुद्धी ।
कल्पकल्पांचिये अवधी । मोह त्रिशुद्धी बाधीना ॥ ५८ ॥
त्या माझ्या उपदेशाने तो समबुद्धि होऊन राहिला आणि कल्पाचे कल्प गेले तरी खरोखर त्याला मोह  स्पर्शही करीत नाही ५८.

यापरी ब्रह्मा कल्पादी । पावला परम समाधी ।
प्रकटोनि निजात्मबुद्धी । सर्जनसिद्धी तेणें केली ॥५९ ॥
याप्रमाणे कल्पाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने समाधि धारण केली, तेव्हा त्याला आत्मबुद्धि प्राप्त होऊन त्याने ही सर्व उत्पत्ति करण्याचे कार्य सिद्धीस नेले ५९.

सुरासुर मानव पन्नगादिक । यांचे वसते तिन्ही लोक ।
सप्तपाताळ घरें देख । गोपुरें अलोलिक सप्तसंख्या ॥ १६० ॥
देव, राक्षस, मनुष्य, सर्प यांची वस्ती असलेले तिन्ही लोक, सात पाताळें  व तशीच विलक्षण सात गोपुरेही त्याने निर्माण केली  ६०

भूशब्दें पाताळलोक । भुवःशब्दें मृत्युलोक ।
स्वःशब्दें स्वर्गलोक । त्रिलोक देख यां नांव ॥ ६१ ॥
 'भूः' म्हणजे पाताळलोक, ' भुवः ' म्हणजे मृत्युलोक, आणि 'स्व:' म्हणजे स्वर्गलोक, यांनाच त्रिभुवन असें नाव आहे ६१

चतुर्दश भुवनें सकळ । तेथ वसते लोक लोकपाळ ।
तेंचि करोनियां विवळ । सांगे प्रांजळ श्रीकृष्ण ॥ ६२ ॥
 सर्व मिळून चौदा लोक, व तेथे राहणारे लोकपाळ, हे स्पष्ट करून श्रीकृष्ण नीट रीतीने सांगत आहे ६२.

देवानामोक आसीत् स्वर्भूतानां च भुवः पदम् ।
मर्त्यादीनां च भूर्लोकः सिद्धानां त्रितयात्परम् ॥ १२ ॥
अधोऽसुराणां नागानां भूमेरोकोऽसृजत्प्रभुः ।
त्रिलोक्यां गतयः सर्वाः कर्मणां त्रिगुणात्मनाम् ॥ १३ ॥
[श्लोक १२-१३]  देवतांचे निवासस्थान स्वर्ग, भूतप्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान ठरविले या तीन लोकांच्या वरच्या बाजूला महर्लोक इत्यादी सिद्धींची निवासस्थाने ठरविली. (१२)
ब्रह्मदेवाने असुर आणि नागांच्यासाठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले या तिन्ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळ्या गती प्राप्त होतात. (१३)

मागील श्लोकाचे अंतीं । भूर्भुवःस्वर इति ।
यापरी त्रिलोकी श्रीपती । जाण निश्चितीं बोलिला ॥ ६३ ॥
मागच्या श्लोकाच्या शेवटी भूः, भुवः, स्वः असे तीन लोक श्रीकृष्णाने स्पष्टपणे सांगितले ६३.

तेंचि पुढील श्लोकार्था । पाताळलोक होय चौथा ।
तो मृत्युलोक एकात्मता । जाण तत्त्वतां व्याख्यान ॥ ६४ ॥
त्याप्रमाणेच पुढच्या श्लोकाच्या अर्थामध्ये पाताळ लोक हा चौथा सांगितलेला आहे, व त्याचे मृत्युलोकाशी ऐक्य आहे. याचेही यथातथ्य निरूपण आतां समजून घे ६४.

इंद्रादि सकळ देवांसी । स्वर्ग निजमंदिर त्यांसी ।
यक्षरक्षभूतगंधर्वांसी । निवासासी अंतरिक्ष ॥ ६५ ॥
इंद्रादि सर्व देवांना स्वर्ग हेंच त्यांचे रहाण्याचे स्थान आहे. यक्ष, राक्षस, भूते आणि गंधर्व ह्यांना रहावयाला आकाश आहे ६५.

जेणें पाविजे निजमोक्षासी । जेथूनि गमन लोकांतरासी ।
ते कर्मभूमी मनुष्यासी । निजभाग्येंसी भूर्लोक ॥ ६६ ॥
आणि ज्याने मोक्षास जाता येते, जेथून परलोकास जाता येते, ती कर्मभुमि म्हणजे अतळादि सप्त पाताळांसह पृथ्वी थोर भाग्याने मनुष्यास रहावयास मिळाली आहे ६६.

त्रिलोकीवरतें जाण । सिद्ध वोळंगती आपण ।
तें सिद्धांचें सिद्धिस्थान । वसतें जाण निरंतर ॥ ६७ ॥
सिद्ध असतात ते स्वत: त्रैलोक्याच्या वर रहातात. ते सिद्धांचे नेहमी राहाण्याचे सिद्धिस्थान होय ६७.

अतळ वितळ सुतळ । रसातळ महातळ ।
तळातळ आणि पाताळ । अधःसंख्या सकळ पाताळा ॥ ६८ ॥
अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, महातळ, तळातळ आणि पाताळ ही पृथ्वीच्या खाली असणाऱ्या सर्व पाताळांची संख्या आहे ६८.

सप्तपाताळीं अधिकारमेळू । अतळीं वसे मयपुत्र बळू ।
प्रतापें अतिप्रबळू । दैत्यमेळू समुदाय ॥ ६९ ॥
आतां सप्तपाताळांत अधिकारी कोण आहेत ते ऐक. तर अतळामध्ये मयासुराचा पुत्र बळ राहातो. तो पराक्रमाने अत्यंत प्रबळ आहे. त्याच्याजवळ राक्षसांचा मोठा समुदाय आहे ६९.

वितळीं वसे हाटकेश्वरू । जो उमाकांत कर्पूरगौरू ।
जेथिले हाटकनदीचा पूरू । सुवर्णसंभारूप्रवाही ॥ १७० ॥
वितळामध्ये हाटकेश्वर आहे. जो उमाकांत व कापुरासारखा गौरवर्ण, तोच हा हाटकेश्वर होय. तेथे सुवर्णाच्या राशि जिच्या प्रवाहांतून वाहातात अशा हाटकनदीचा प्रवाह वहात आहे १७०.

सुतळीं महावैष्णव बळी । ज्याचा द्वारपाल वनमाळी ।
प्रल्हादही त्याचिजवळी । वैष्णवकुळीं नांदत ॥ ७१ ॥
सुतळामध्ये ज्याचा द्वारपाल विष्णु आहे असा महान् भगवद्भक्त बळीराजा आहे. प्रल्हादही त्याच्याजवळ विष्णुभक्तांसह रहात असतो ७१.

त्रिपुर भेदूनि शंकरू । रसातळीं स्थापिला मयासुरू ।
तो मायालाघवी महावीरू । सपरिवारू वसताहे ॥ ७२ ॥
शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर रसातळामध्ये मयासुराची स्थापना केली. तो मायालाघवी व महान् पराक्रमी वीर सहपरिवार तेथेंच रहात असतो ७२.

माहातळीं कद्रूसुत । जे विषधर क्रोधयुक्त ।
ते सर्प जाण समस्त । तेथ नांदत निजवासें ॥ ७३ ॥
जे विष धारण करणारे व कोपिष्ट असे कद्रुचे  मुलगे  सर्प, ते सर्व महातळामध्ये वस्ती करून असतात ७३.

तळातळीं नांदती दानव । निवातकवची वीर सर्व ।
फणिमुख्य राजगौरव । रचना अपूर्व ते ठायीं ॥ ७४ ॥
तळातळामध्ये दानव राहतात, त्यांना 'निवातकवची वीर' असे म्हणतात. [ते  प्रऱ्हादाचा भाऊ जो सऱ्हाद त्याचे पुत्र होत.]  तेथील राजा नाग असून तो त्यांस पूज्य आहे, त्या ठिकाणची रचना मोठी अपूर्व आहे ७४.

सातवे पाताळीं वसती नाग । शतसहस्त्र फणिगणभोग ।
वासुकिप्रमुख अनेग । पद्मिनीभोग भोगिती ॥ ७५ ॥
सातव्या पाताळांत नाग राहतात. तेथे एक लाख नागांचा समुदाय ज्याच्या सेवेला तत्पर आहे, असे वासुकि वगैरे अनेक थोर थोर नाग पद्मिनींबरोबर विलास करीत असतात ७५,

स्वर्गीं रंभा उर्वशी सुंदरी । कां पाताळीं पद्मिणी नारी ।
त्यांच्या सौंदर्याची थोरी । लोकांतरीं वाखाणे ॥ ७६ ॥
 स्वर्गामध्ये रंभा, उर्वशी, या जशा सुंदर स्त्रिया आहेत, त्याप्रमाणेच पाताळांत पद्मिनी नामक स्त्रिया आहेत. त्यांच्या सौंदर्याची थोरवी परलोकांमध्येही वर्णन होत असते ७६.

त्या तळीं तीं शतयोजनांवरी । शेष वसे सहस्रशिरी ।
ज्याच्या निजांगावरी । निद्रा करीं मी भगवंत ॥ ७७ ॥
त्याच्या खाली तीनशे योजनांवर सहस्रमुखांचा शेष राहतो. त्याच्याच आंगावर मी भगवान् निद्रा करतों ७७.

त्याहूनि तळीं आत्यंतिक । अंधतामिस्रादि महानरक ।
त्याहीतळीं कूर्म देख । आवरणोदक तयातळीं ॥ ७८ ॥
त्याच्याही पुष्कळ खाली अंधतामिस्रादि मोठमोठाले नरक आहेत. त्याच्याही खाली कर्म असून त्याच्या खाली आवरणोदक आहे ७८.

ज्यांचा स्वर्गभोग होय क्षीण । अधोभोगाचें उरे पुण्य ।
तेणें पुण्यानुक्रमें जाण । सप्तपाताळीं जन जन्मती ॥ ७९ ॥
ज्यांचा स्वर्गातील भोग क्षयास जातो, आणि अधोभागांतील भोग भोगण्याइतकेंच पुण्य शिल्लक राहते, त्या पुण्याच्या अनुक्रमाप्रमाणेच ते लोक सप्तपाताळांत जन्मास येतात ७९.

ज्याचे गांठीं पाप चोख । तो भोगी नाना नरक ।
ऐशी त्रिलोकी देख । चतुर्मुख स्वयें रची ॥ १८० ॥
ज्याच्या गाठीला फक्त पातकच असते, तो नाना प्रकारच्या नरकांचा उपभोग घेतो. अशी ही त्रिलोकी ब्रह्मदेवानेच स्वतः रचिली आहे १८०.

ज्यांसीं निष्कामता नाहीं चित्तीं । जे स्वप्नीं न देखती विरक्ती ।
त्यांसी त्रिलोकीवरती गती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ ८१ ॥
उद्धवा ! ज्यांच्या मनामध्ये निरिच्छता नाही, ज्यांनी स्वप्नांतही विरक्ति पाहिलेली नाही, त्यांना खात्रीने त्रैलोक्याच्यावर गति नाहीं ८१.

जे न करितीचि माझी भक्ती । जे नायकतीचि माझी कीर्ती ।
जे माझें रामनाम नुच्चरिती । भवबंधपंक्तिच्छेदक ॥ ८२ ॥
जे माझी भक्ति करीत नाहीत, जे माझी कीर्ति श्रवण करीत नाहीत, जे संसारबंधनांच्या फेऱ्यांना तोडणारे माझें रामनाम उच्चारीत नाहीत ८२, 

त्यांसी पुनः पुनः स्वर्गलोक । पुनः पुनः भोगिती नरक ।
पुनः पाताळ मृत्युलोक । नानायोनीं दुःख भोगिती ॥ ८३ ॥
त्यांना पुनः पुन्हा स्वर्गलोक आणि पुनः पुन्हा नरक भोगावा लागतो, व ते पुनः पुन्हा पाताळलोक व मृत्युलोक ह्यांत अनेक प्रकारच्या योनीमध्ये जन्म घेऊन दुःख भोगितात ८३.

जे त्रिगुणगुणी सदा सकाम । जे सर्वदा करिती सकाम कर्म ।
त्यांसी त्रैलोक्यबाहेरी निर्गम । त्रिगुणधर्म निघों नेदी ॥ ८४ ॥
जे या तीन गुणांत गुंतलेले असून सदासर्वदा लोभिष्ट असतात, जे निरंतर सकाम कर्मच करतात, त्यांना त्यांचा तो त्रिगुणात्मक धर्म त्रैलोक्याच्या बाहेर जाऊ देत नाही ८४.

सांगीतली पाताळविवंचना । आतां ऐक स्वर्गरचना ।
लोकीं लोकांतरगणना । समूळ जाणा सांगेन ॥ ८५ ॥
हा पाताळाचा विचार झाला. आता स्वर्गाची रचना ऐक. असेंच इतर लोकांचेही सविस्तर वर्णन सांगेन. ऐक ८५.

रविचंद्रप्रभा जेथवरी । तेथवरी पृथ्वीची थोरी ।
तळीं पाताळ स्वर्ग वरी । लोकलोकांतरीं निवास ॥ ८६ ॥
जेथपर्यंत सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाश पोचतो, तेथपर्यंत पृथ्वीचे काय ते महत्त्व आहे. परंतु लोकांची वस्ती खालच्या पाताळापासून तों अगदी वरच्या स्वर्गलोकापर्यंत अनेक निरनिराळ्या लोकांमध्ये आहेच ८६.

पायीं चालिजे तो भूलोक जोडे । येथूनि सूर्याऐलीकडे ।
भुवर्लोकींची थोरी वाढे । तेथ वस्ती घडे यक्षरक्षगंधर्वां ॥ ८७ ॥
पायांनी चालतात तो भूलोक होय. तेथपासून तो सूर्याच्या अलीकडेपर्यंत भुवलोंकाचा विस्तार आहे. त्या भुवलोकांत यक्ष, रक्ष व गंधर्व ह्यांची वस्ती आहे ८७.

भुवर्लोकाहीवरी । सूर्यलोकाची वाढे थोरी ।
पृथ्वीपासूनि लक्षावरी । जाण निर्धारीं रविलोक ॥ ८८ ॥
भुवलोंकाच्याही वर सूर्यलोकाचा विस्तार सुरू होतो. पृथ्वीपासून लक्षावधि योजनांवर सूर्यलोक आहे हे नीट लक्षांत ठेव . ८८.

वायूपासूनि चक्राकारीं । रविचंद्रतारालोक कुसरी ।
खेवणोनियां तयावरी । काळ सूत्रधारी भवंडीत ॥ ८९ ॥
काळरूपी सूत्रधार हा वायूपासून बनलेल्या चक्रावर सूर्य, चंद्र व तारालोक मोठ्या कौशल्याने कोंदणांत बसविल्याप्रमाणे बसवून त्यांना गरगर फिरवीत असतो ८९.

त्या काळाहीवरी माझी सत्ता । माझेनि भेणें काळू तत्त्वतां ।
क्षणलवनिमिषावस्था । अधिकन्यूनता होऊं नेदी ॥ १९० ॥
पण त्या काळावरही माझी सत्ता आहे. खरोखर माझ्या धाकानेंच क्षण, लव, निमिष इत्यादि विभागांत तो अधिक-उणेपणा होऊ देत नाही १९०.

नवल काळचक्रगती । मासां रवि चंद्र समान होती ।
सूर्याआड चंद्रासी गती । जाण निश्चितीं दिनद्वयें ॥ ९१ ॥
या कालचक्राची गति मोठी आचर्यकारक आहे. एक महिन्याने सूर्य व चंद हे एकत्र येत असतात. नक्षत्रचक्रांत चंद्राचे एक परिभ्रमण पूर्ण झाल्यावर आणखी दोन दिवसांनी (एकंदर सुमारे २९॥ दिवसांनी) चंद्र सूर्याच्या आड येतो ९१.

ते अमावास्याप्रतिपदेसी । चंद्र चंद्रमंडळीं सावकाशीं ।
सूर्यसमभागें गमन त्यासी । तें या लोकांसी दिसेना ॥ ९२ ॥
अमावास्या व प्रतिपदा यांच्या संधिकाळी चंद्र आपल्या भ्रमणमार्गात यथावकाश चालत असतां त्याचे राशिअंशादि स्थान सूर्याइतकेच होते. ते सूर्याच्या तेजामुळे या लोकांना दिसत नाही ९२.

इतुक्यासाठीं ते दिवशीं । जीवें जित्या चंद्राशीं ।
नष्टत्व स्थापिती ज्योतिषी । तें लोकांसी सत्य मानें ॥ ९३ ॥
इतक्यावरूनच त्या दिवशी सजीवपणाने जिवंत असणाऱ्या (आकाशांत प्रत्यक्ष असणाऱ्या) चंद्राला ज्योतिषी तो नष्ट झाला असे म्हणतात, आणि ते या लोकांना खरे वाटते ९३.

रवि चंद्र एकासनीं । सर्वथा नव्हती गमनीं ।
लक्षांतरें वसती दोन्ही । मंडळसमानीं मासांतीं गती ॥ ९४ ॥
सूर्य आणि चंद्र आपापल्या मार्गानी चालत असतांना एका ठिकाणी कधींच यावयाचे नाहीत. कारण ते एकमेकांपासून लक्षावधि योजनें दूर अंतरावर राहातात. परंतु महिन्याच्या शेवटी (अमावास्येच्या वेळी ) त्यांच्या गतींनी त्यांची बिबें क्रांतिवृत्तांत आरंभस्थानापासून समान अंतरावर येतात ९४.

रविआड गती ज्या ग्रहासी । त्याचा अस्त सांगे ज्योतिषी ।
सत्य माने या लोकांसी । तो ग्रहो दृष्टीसी दिसेना ॥ ९५ ॥
जो ग्रह आपल्या गतीने सूर्याच्या आड येतो (सूर्याच्या जवळ असल्यामुळे दिसेनासा होतो), त्याचा अस्त झाला असें ज्योतिषी सांगतो, आणि ह्या लोकांना ते खरे वाटते. कारण त्या वेळी तो ग्रह दृष्टीसही पडत नाहीं ९५.

दृष्टिसृष्टीचा जो न्यावो । तो ज्योतिषशास्त्रीं सत्य पहा हो ।
न दिसे त्याचा अस्तभावो । दिसे तो पहा हो पूजिती ॥ ९६ ॥
वेदांतांत जो दृष्टिसृष्टीचा न्याय आहे, तो ज्योतिषशास्त्रामध्येच खरा आहे, हे लक्षात ठेवा. कारण जो दिसत नाही त्याचा अस्त झाला असें ज्योतिषी लोक समजतात, आणि जो दिसतो त्याची पूजा करितात ९६.

अभ्राआड ग्रहण झालें । देखीलें तेथें पर्व फावलें ।
न दिसे ते देशीं नाहींच झालें । येणेहीं बोलें वर्तती ॥ ९७ ॥
ग्रहण लागून ते काही वेळ अभ्राआड झाले, तरी ज्यांना ते अभ्र नसते तर ग्रहण दिसूं शकले असते, ते लोक त्या वेळी पर्वकाळ मानितात, पण तेच ग्रहण ज्या देशांत दृश्य आकाशांत नसते (चंद्रग्रहण दिवसा झाले तर त्या वेळी चंद्र दृश्य आकाशांत नसतो, तसेंच रात्रीचें सूर्यग्रहणही दृश्य आकाशांत नसते) त्या देशांतील लोक ग्रहण झाले नाही असे म्हणूनच वागतात ९७. 

रविचंद्रांहूनि आरती । राहुकेतूंची असे वस्ती ।
ते जैं मंडळाआड येती । तैं ग्रासिलें म्हणती रविचंद्रां ॥ ९८ ॥
सूर्यचंद्रांच्या अलीकडे राहुकेतूंची वस्ती आहे. ते राहु-केतु जेव्हां सूर्यचंद्रांच्या बिंबांआड येतात, तेव्हां त्यांनी रवि-चंद्रांचा  ग्रास केला असे म्हणतात ९८.

राहू सूर्या गिळिता साचें । तैं तोंड जळतें राहूचें ।
मंडळीं मंडळ आड ये त्यांचे । हें सर्वग्रासांचें संमत ॥ ९९ ॥
खरोखरच राहु जर सूर्याला गिळीत असता, तर राहूचे तोंडच जळून गेले असते. एका बिंबाआड दुसरें बिंब येते, हेच त्या ग्रहणांतील सर्व ग्रासांचे सर्वमान्य तत्त्व आहे ९९.

सूर्य सूर्यमंडळीं राज्य करी । त्याच्या सर्वग्रासाची थोरी ।
ज्योतिषी सांगे घरोघरीं । तें देखोनि नरीं महाशब्द कीजे ॥ २०० ॥
वस्तुतः सूर्य हा सूर्यमंडळांत आपले राज्य करीत असतो, परंतु सूर्यग्रहणाच्या वेळी त्याच्या सर्वग्रासाचें माहात्म्य ज्योतिषी घरोघर सांगतो आणि तें ग्रहण पाहून सामान्य जनही कोलाहल करितात २००.

सूर्यसर्वग्रासाचिया गोठी । जगीं एक बोंब उठी ।
शेखीं रवि-राहूंसी नाहीं भेटी । स्पर्शही शेवटीं असेना ॥ १ ॥
 सूर्याचे खग्रास ग्रहण म्हटले की, जगांत एकच हाहाकार उठतो. परंतु वास्तविक सूर्य व राहु यांची भेटही होत नाही, आणि अखेरपर्यंत त्यांचा  एकमेकांना स्पर्शही होत नाही १. 

ग्रहचक्र वेगें चळतां पाहीं । रविचंद्रादिकां चालणें नाहीं ।
ते निश्चळ निजराज्याच्या ठायीं । न चालतां पाहीं चालती ॥ २ ॥
ग्रहमंडळ वेगानें पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना दिसले, तरी सूर्यचंद्रादिकांना कांहीं वास्तविक तशी गति नसते. ते आपापल्या अधिकारांच्या मर्यादेतच निश्चितपणे असतात (नक्षत्रमंडळांतील अनुक्रमाप्रमाणेच पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतात.) ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वास्तविक चालत नसताही ते तसेच चालतात असें केवळ भासते २.

रविलोकाहूनि वरी । चंद्रलोक लक्षांतरीं ।
चंद्रलोकाहूनि दूरी । लक्षांतरीं तारालोक ॥ ३ ॥
सूर्यलोकापासून लक्षावधि योजनें वर चंद्रलोक आहे (तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण आणि श्रीमद्भागवत ह्यांत अशी कल्पना आहे ). चंद्रलोकापासून वर लक्षावधि योजने अंतरावर तारालोक आहे ३.

तारालोकाहूनि वरी । बुधलोक दों लक्षांतरीं ।
बुधलोकाहूनि वरी । दों लक्षांतरीं शुक्रलोक ॥ ४ ॥
तारालोकाहून वर दोन लक्ष योजने अंतरावर बुधलोक आहे. बुधलोकापासून वर दोन लक्ष योजने अंतरावर शुक्रलोक आहे ४.

मिळोनियां दैत्यगण । ज्याच्या चरणां येती शरण ।
नित्य घालिती लोटांगण । तो शुक्राचार्य जाण दैत्यगुरु ॥ ५ ॥
सर्व दैत्य एकत्र जमून ज्याच्या चरणीं शरण येतात आणि नित्य लोटांगणे घालतात, तोच दैत्यांचा गुरु हा शुक्राचार्य होय ५.

शुक्रलोकाहूनि दों लक्षांतरीं । भौमलोक वसे अंबरीं ।
भौमलोकाहूनि दों लक्षांतरीं । देवगुरु करी निजवासू ॥ ६ ॥
शुक्र लोकांपासून वर दोन लक्ष योजने अंतरावर मंगळलोक आकाशांत आहे. मंगळलोकापासून वर दोन लक्ष योजने अंतरावर देवगुरु वसति  करितो ६.

ज्याचे चरण वंदिती देख । इंद्रचंद्रवरुणादि अर्क ।
नित्य येती आवश्यक । तो बृहस्पतिलोक गुरूचा ॥ ७ ॥
इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य, इत्यादि देव आदरपूर्वक नित्य येऊन ज्याचे चरण वंदन करितात, त्याच गुरुचा तो बृहस्पतिलोक होय ७.

त्याहिवरी लक्ष दोनी । सूर्यसुत वसे शनी ।
लक्षांतरें तेथूनी । सप्तऋषिजनीं निवासू ॥ ८ ॥
त्याच्याही वर दोन लक्ष योजने अंतरावर सूर्यपुत्र शनि वसति करितो. त्याच्यापासून वर एक लक्ष योजने अंतरावर सप्तऋषींचे निवासस्थान आहे ८.

सप्तऋषींची ऋषिपंक्ती । तेथेंचि वसे अरुंधती ।
यावरी वसे अमरावती । इंद्रसंपत्तीसमवेत ॥ ९ ॥
ससऋषींचा समुदाय जेथे राहातो, तेथेच अरुंधती राहाते. आणि त्याच्याही वर इंद्राच्या वैभवाने सुशोभित अशी अमरावती वसलेली आहे ९.

जेथ अंगें वसे इंद्र जाण । ऐरावती आरोहण ।
पार्षदगण मरुद्‌गण । सुरसेना जाण जयाची ॥ २१० ॥
जेथें इंद्र स्वतः राहातो, ऐरावतावर आरोहण करितो, मरुद्रण हे ज्याचे सभासद आहेत, देवसमुदाय हेच ज्याचे सैन्य आहे २१०, 

उच्चैःश्रवा वारू जाण । कल्पतरूंचें उद्यान ।
कामधेनूंचें गोधन । नंदनवन क्रीडेसी ॥ ११ ॥
जेथें उच्चैःश्रवा हा घोडा आहे, कल्पतरूंचीच मनोहर बाग आहे, कामधेनूंचे खिल्लार आहे, आणि क्रीडेसाठी नंदनवन आहे ११, 

जेथींच्या पायर्‍या चिंतामणी । रंभा उर्वशी विलासिनी ।
अष्टनायिका नाचणी । ज्याच्या रंगणीं नांदती ॥ १२ ॥
जेथील पायऱ्या चिंतामणीच्या आहेत, जेथें रंभा-उर्वशीसारख्या विलासिनी स्त्रिया आहेत, अष्टनायिका नृत्यांगना होऊन ज्याच्या रंगसमेंत नृत्य करीत असतात १२, 

येणें वैभवें अमरावती । इंद्र तेथील अधिपती ।
येथूनि स्वर्गाचि समाप्ती । त्रैलोक्य निश्चितीं या नांव ॥ १३ ॥
अशा त्या इंद्राच्या वैभवाने अमरावती सजलेली असून इंद्र हा तेथील अधिपति आहे. येथे स्वर्गाची सीमा संपली. ह्याचंच नांव खरोखर त्रैलोक्य १३.

आतां त्रैलोक्यबाहेरी । एक लक्ष योजनांवरीं ।
भक्तकृपाळू श्रीहरी । ध्रुवमंडळ करी कृपेने ॥ १४ ॥
आता ह्या त्रैलोक्याच्या बाहेर एक लक्ष योजने अंतरावर भक्तवत्सल श्रीहरीने आपल्या कृपेनें ध्रुवमंडळ निर्माण केले आहे १४.

त्रिलोकीं होतां प्रलयकाळ । ध्रुवासी कदा नव्हे चळ ।
तो सर्वदा अचळ । यालागीं अढळ ध्रुवपद ॥ १५ ॥
त्रैलोक्यांत प्रळयकाळ झाला असतांही ध्रुवाला कधीही आपल्या स्थानापासून ढळावे लागत नाही. तो सदोदित अचलच असतो. म्हणून ध्रुवपद अढळ आहे असे म्हणतात १५, 

पृथ्वीपासोनि कोटि योजन । महर्लोक वसे जाण ।
तेथ वसती कल्पायु जन । तें वसतिस्थान तयांचें ॥ १६ ॥
पृथ्वीपासून एक कोटि योजने अंतरावर महर्लोक आहे हे लक्षात ठेव, तेथें कल्पापर्यंत आयुष्य असणारे लोक राहातात. तेच त्यांचे वसतिस्थान होय १६.

तेथूनि कोटि योजनें देख । वरुता असे जनोलोक ।
तेथ वसती सनकादिक । ऊर्ध्वरेते देख महायोगी ॥ १७ ॥
आणखी पहा ! तेथून वर एक कोटि योजने अंतरावर जनोलोक आहे. तेथें जितेंद्रिय व महायोगी असे सनकादिक राहातात १७.

तेथूनि दोन कोटि अधिक । वसताहे तपोलोक ।
तेथील निवासी आवश्यक । वैराजदेव देख तपस्वी ॥ १८ ॥
तेथून पुढे दोन कोटि योजने अंतरावर तपोलोक तपस्वी वैराजदेव हेच तेथील खरोखर रहिवासी होत १८.

तपोलोकाहूनि देख । चौकोटी उंच अधिक ।
तेथ वसताहे सत्यलोक । तेथील नायक चतुरानन ॥ १९ ॥
तपोलोकाहुन वर चार कोटि योजनें प्रदेश आहे, तेथे सत्यलोक आहे. तेथील अधिपति ब्रह्मदेव आहे १९.

तेथ मूर्तिमंत चारी वेद । मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध ।
मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध । तपही विशद मूर्तिमंत ॥ २२० ॥
तेथे चारही वेद आणि  सर्व धर्म मूर्तिमंत आहेत, शुद्ध ब्रह्मचर्य मूर्तिमंत आहे, आणि प्रत्यक्ष तपही मूर्तिमंत असते, २२०

गायत्री मूर्तिमंत तेथ । वाचा मूर्तिमंत वर्तत ।
दया मूर्तिमंत नांदत । योग मूर्तिमंत ब्रह्मसदनीं ॥ २१ ॥
त्या ब्रह्मसदनी प्रत्यक्ष गायत्री मूर्तिमंत असते, वाणी मूर्तिमंत असते, दया मूर्तिमंत नांदते, आणि योगही मूर्तिमंत असतो. २१.

तेथ अग्नि तिनी मूर्तिंमंत । ते एकरूपें त्रिधा भासत ।
सत्य सत्यलोकीं मूर्तिंमंत । असत्य तेथ असेना ॥ २२ ॥
दक्षिणाग्नि, गार्हपत्य व आहवनीय असे जे तीन अग्नि, वस्तुतः मूर्तिमंत असतात. सत्यलोकामध्ये सत्य मूर्तिमंत असते. तेथे असत्य असतच नाही २२.

ते लोकीं वसते कोण लोक । जे गायत्रीमंत्रजापक ।
जे ब्रह्मणतीर्थप्राशक । जे यागउपासक निष्काम ॥ २३ ॥
तेथे राहाणारे लोक कोण ते सांगतो. जे गायत्रीमंत्राचा जप करणारे, जे ब्राह्मणांचे चरणतीर्थ प्राशन करणारे, आणि जे यज्ञयागांचे निष्काम उपासक असतात, ते तेथे राहातात २३.

जे ब्राह्मणकार्यीं निमाले । जे गोसंरक्षणीं जीवें गेले ।
जे परोपकारार्थ वेंचले । ते पावले सत्यलोक ॥ २४ ॥
जे ब्राह्मणांच्या कार्याकरिता मृत्यु पावले. ज्यांनी गोरक्षणाकरिता आपले प्राण दिले, जे परोपकार करितां करितां दरिद्री बनले. ते लोकच सत्यलोकाला गेले आहेत २४.

जे निष्काम द्विजां भजले । जिंहीं निष्काम द्विज पूजिले ।
जिंहीं निष्काम द्विज भोजिले । ते पावले सत्यलोक ॥ २५ ॥
ज्यांनी निष्काम बुद्धीने ब्राह्मणांची सेवा केली, ज्यांनी निष्काम बुद्धीने ब्राह्मणांची पूजा केली, ज्यांनी निष्कामबुद्धीने ब्राह्मणांना भोजन घातले. ते सत्यलोकाला गेले २५, 

जे कृपाळू दीनार्थ देख । कृपाळू बंधमोचक ।
जे सत्यवादी सात्त्विक । ते सत्यलोकनिवासी ॥ २६ ॥
जे दीनजनांवर उपकार करण्यासाठींच कृपाळू बनले, संसारबंधनांनी त्रास पावत असलेल्या लोकांची ती बंधनें तोडण्याकरितांच जे कृपाळू बनले, जे सत्य बोलणारे व सात्त्विक वृत्तीचे असतात, तेच सत्यलोकांतील रहिवासी होत २६.

जे परापवादीं मूक । परदारानपुंसक ।
जे परद्रव्या पराङ्‌मुख । ते सत्यलोकनिवासी ॥ २७ ॥
जे परनिंदेविषयी मुके, परस्त्रीविषयीं नपुंसक, जे परद्रव्यापासून पराङ्मुख, ते सत्यलोकांतील रहाणारे होत २७.

ऐसी सत्यलोकींची स्थिती । तेथींचा ब्रह्मा अधिपती ।
ब्रह्मसृष्टि याहीवरती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ २८ ॥
अशी सत्यलोकांतील स्थिति आहे. तेथला अधिपति ब्रह्मदेव होय. उद्धवा ! ह्याच्याहूनही वर ब्रह्मदेवाची सृष्टि मुळीच नाही हे लक्षात ठेव २८.

ब्रह्मांडाहूनि वेगळा । कैलास निर्माण करी भोळा ।
वैकुंठ रची घनसांवळा । हे लोक स्वलीळा निर्मित ॥ २९ ॥
भोळ्या शंकराने ब्रह्मांडाहून वेगळा असा कैलास निर्माण केला आहे, आणि मेघश्याम विष्णूने वैकुंठ निर्माण केले आहे. हे लोक त्यांनी आपापल्याच लीलांनी तयार केले आहेत २९.

होतां ब्रह्मांडा घडामोडी । वैकुंठ कैलास न लगे वोढी ।
तेथील वस्तीची अभिनव गोडी । हरिहरभक्त फुडी जाणती ॥ २३० ॥
ब्रह्मांडाची घडामोड झाली असतांही वैकुंठ आणि कैलास ह्यांना धक्का लागत नाही. तेथील राहण्याची विलक्षण गोडी विष्णुभक्त आणि शंकरभक्त खरोखर जाणतात २३०.

तेथ नाहीं काळाचें गमन । नाहीं कर्माचें कर्मबंधन ।
तेथ नाहीं जन्ममरण । हें भक्त अनन्य पावती ॥ ३१ ॥
तेथें काळाचा प्रवेशही होत नाही, कर्माचे कर्मबंधन नाही, तेथे जन्ममरण नाही. अनन्यभक्त असतील त्यांनाच हे स्थळ प्राप्त होते ३१.

वैकुंठकैलासरचना । सांगतां मन मुके मनपणा ।
ते लोकींची लोकलक्षणा । ऐक विचक्षणा सांगेन ॥ ३२ ॥
वैकुंठ आणि कैलास यांची रचना सांगावयास लागले म्हणजे मनाचा मनपणा नाहीसा होतो. हे बुद्धिमान् उद्धवा ! आतां तेथील लोकांची लक्षणे सांगतो ऐक ३२.

सकळ ब्रह्मांडाबाहेरी । मायाआवरणाभीतरीं ।
वैकुंठ कैलास हरहरीं । स्वलीलेकरीं निर्मिजे ॥ ३३ ॥
सर्व ब्रह्मांडाच्या बाहेर आणि माया-आवरणाच्या आंत शिवांनी कैलास आणि विष्णूंनी वैकुंठ ही आपापल्या लीलेनेच निर्माण केली ३३.

सकळ जीवां सुखकरू । कैलासीं वसे शंकरू ।
जो कां पार्वतीपरमेश्वरू । जो योगेश्वरू योगियां ॥ ३४ ॥
सर्व जीवांना सुखदायक, जो पार्वतीचा परमेश्वर, जो योग्यांचा योगेश्वर, असा तो शंकर कैलासांत राहतो ३४.

जटाजूटी गंगाधर । पिनाकपाणी पंचवक्त्र ।
कर्पूरगौर गोक्षीर । अभयवरदकर निजभक्तां ॥ ३५ ॥
तो जटा धारण करणारा, मस्तकावर गंगा वहाणारा, पिनाक नांवाचे धनुष्य हातांत असणारा, पंचमुखी, कापूर किंवा गाईचे दूध ह्यांच्यासारख्या पांढऱ्या शुभ्र वर्णाचा, आपल्या भक्तांना सदोदित अभय देणारा व वरदायक ३५, 

त्रिमात्रातीत त्र्यंबक । त्रिपुटीत्रिपुर त्रिपुरांतक ।
त्रिविधताप उच्छेदक । तिनी लोक सुखकारी ॥ ३६ ॥
अकार, उकार व मकार या तीन मात्रांच्या पलीकडचा, त्रैलोक्याचा नेत्र, त्रिपुटी हेच त्रिपुर त्यांचा नाश करणारा, त्रिविध तापांचा उच्छेद करणारा, आणि तिन्ही लोकांना सुखी करणारा असा आहे ३६.

नागभूषणीं शोभे लीला । रुद्राक्षयुक्त रुंडमाळा ।
नीळकंठ जाश्वनीळा । भस्मोद्धूलिधूसर ॥ ३७ ॥
नागभूषणें धारण केल्यामुळे ज्याची शोभा विशेष खुलते, ज्याने रुद्राक्ष व रुंडमाळा धारण केल्या आहेत, ज्याचा कंठ नीलरत्नासारखा आहे, भस्मलेपनाने ज्याचे अंग धुरासारखे दिसते ३७; 

त्रिशूळडमरांकित कर । त्रिनेत्र व्याघ्राजिन अंबर ।
रामनामीं अतितत्पर । करी निरंतर जपमाळा ॥ ३८ ॥
त्रिशूळ आणि डमरू ज्याने हातात घेतले आहेत, ज्याला तीन नेत्र आहेत, व्याघ्रांबर हेंच वस्त्र अंगावर घेतले आहे, रामनामजपामध्येच जो आपल्या हातांतील जपमाळा नेहमी तत्पर ठेवितो ३८, 

सहस्रबाहु बळिपुत्र बाण । शृंगी भृंगी चंडी पार्षद पूर्ण ।
साठी सहस्र रुद्रगण । कात्या त्रिशूळ जाण झेलती ॥ ३९ ॥
बळीचा पुत्र सहस्रबाहु बाणासुर, शृंगी , भृंगी , चंडी हे ज्याचे सेवक आहेत, यांशिवाय साठ हजार रुद्रगण लखलखीत कोयते व त्रिशूळ नेहमी हातात घेऊन असतात ३९; 

गणेश स्वामिकार्तिक । नंदी पंचमुख षण्मुख ।
वीरभद्रसेनानायक । जेणें लाविली सीक दक्षासी ॥ २४० ॥
गणपति, कार्तिकस्वामी, नंदी, पंचमुख, षण्मुख, आणि ज्याने दक्षाला शिक्षा केली होती असा सेनापति वीरभद्र २४०, 

भूत प्रेत पिशाचक । महाप्रमत ज्याचें सैन्यक ।
अवघे शिवांकित देख । शिवनामघोष गर्जती ॥ ४१ ॥
भूत, प्रेत, पिशाच्च आणि मोठमोठे देव हेच ज्याचे सैन्य, असा तो शंकर असून हे सर्वजण शंकराचे आज्ञाधारक आहेत. ते नेहमी शिवनामाची गर्जना करीत असतात ४१.

शंभु शिव शूली शंकर । उमाकांत कर्पूरगौर ।
भव भर्ग भवानीवर । कपर्दी ईश्वर महादेव ॥ ४२ ॥
शंभु, शिव, शूली, शंकर, उमाकांत, कर्पूरगौर, भव, भर्ग, भवानीपति, कपर्दी, ईश्वर, महादेव ४२; 

हरहरशंकरनामोच्चारीं । धाकें कळिकाळ पळे दूरी ।
शिवनामें गर्जे सदा गिरी । गिरीश राज्य करी ते ठायीं ॥ ४३ ॥
किंवा 'हर हर शंकर' ह्या नामोच्चाराच्या धाकानेच कळिकाळ दूर पळून जातो. कैलास पर्वत नेहमी शिवनामाचीच गर्जना करीत असतो, आणि त्या ठिकाणी शंकर राज्य करतो ४३.

जेथ शिवनामाचा उच्चार । तेथ सुखेंसीं तिष्ठे शंकर ।
भक्तकृपाळू ईश्वर । भोळा निरंतर भावार्थ्यां ॥ ४४ ॥
जेथे शिवनामाचा उच्चार होतो, तेथे शंकर आनंदाने राहतो. तो ईश्वर भक्तांचा मोठा कृपाळू असून भाविकांना नेहमी अगदी भोळेपणाने वश होणारा आहे ४४.

निजदासांचे त्रिगुण वैरी । छेदावया सदा त्रिशूळ करीं ।
निजडमरूच्या गजरीं । पापाची उरी उरों नेदी ॥ ४५ ॥
तीन गुण हेच आपल्या भक्तांचे शत्रु आहेत, म्हणून त्या त्रिगुणांचा संहार करण्याकरितांच त्याने हातात नेहमी त्रिशूळ धारण केलेला आहे. तो आपल्या डमरूच्या गजराने पातकाला पूर्णपणे नष्ट करितो ४५.

कैलासीं तृण तरु समस्त । पशु पक्षी जे जे तेथ ।
ते अवघेचि शिवांकित । सर्वरूपें समस्त शिवू नांदे ॥ ४६ ॥
कैलास पर्वतावरील सर्व गवत, झाडे, पशु, पक्षी, किंवा जे जे कोणी तेथे आहेत, ते ते सर्वजण शंकराचे आज्ञाधारक आहेत. किंबहुना त्या सर्वांच्या रूपाने शंकरच तेथे नांदतात! ४६.

यापरी ब्रह्मांडाबाहेरी । शिवू स्वलीला निर्माण करी ।
नेमूनियां कैलासगिरि । भरू राज्य करी भवानीशीं ॥ ४७ ॥
याप्रमाणे ब्रह्मांडाच्या बाहेर शंकरांनी आपल्याच लीलेने कैलास पर्वत निर्माण करून त्याची स्थापना केली, आणि तेथेच भवानीसह शंकर राज्य करतो ४७.

आतां वैकुंठींची स्थिती । ऐक सांगेन तुजप्रती ।
जे ऐकतां चित्तवृत्ती । स्वानंदस्फूर्ती वोसंडे ॥ ४८ ॥
आतां वैकुंठांतली स्थितीही तुला सांगतो, ऐक. जी ऐकतांना चित्तवृत्ति स्वानंदस्फूर्तीने तुडुंब भरून वाहू लागते, अशी ती वैकुंठलोकांतील स्थिति आहे ४८.

उंस गाळूनि काढिजे सार । त्याची आळूनि कीजे साकर ।
तिचेही नाना प्रकार । करिती नानाकर अतिकुशळ ॥ ४९ ॥
ऊस पिळून त्याचा रस काढतात, तो आटवून त्याची साखर करतात, आणि अत्यंत कुशल लोक तिचेही अनेक आकारांचे पदार्थ करतात ४९, 

तेवीं चैतन्यचि निश्चितें । मुसावूनि श्रीभगवंतें ।
वैकुंठ रचिलें तेथें । निजसामर्थ्यें नांदावया ॥ २५० ॥
त्याप्रमाणेच श्रीभगवंताने स्वत:च्या सामर्थ्याने राहाण्याकरिता खरोखर चैतन्यच मुशीत घालून आटवून त्याचेच तेथें वैकुंठ रचिलें २५०.

स्वलीला सगुण साकार । सुकुमार अतिसुंदर ।
घनश्याम मनोहर । मूर्ति चिन्मात्र चोखडी ॥ ५१ ॥
आपल्याच लीलेने सगुण, साकार, सुकुमार, अत्यंत सुंदर, घनश्याम, मनोहर, अशी ज्ञानमय बनलेली सुंदर मूर्ति ५१; 

शंख चक्र पद्म गदा । चारी भुजा सायुधा ।
डोळे लांचावले आनंदा । सगुण गोविंदा देखोनी ॥ ५२ ॥
शंख, चक्र, पद्म, गदा अशा चार आयुधांनी युक्त असलेल्या चार भुजा, अशा त्या सगुणस्वरूपी गोविंदाला पाहून होणाऱ्या आनंदाला डोळे लुब्धच होऊन जातात ५२.

मुकुट कुंडले मेखळा । कांसे पिंवळा सोनसळा ।
कौस्तुभ झळके गळां । आपाद वनमाळा शोभत ॥ ५३ ॥
मुकुट, कुंडले, मेखळा, आणि पिवळा सोनसळा पीतांबर नेसलेला आहे; गळ्यांत कौस्तुभ मणि झळकत आहे; पायापर्यंत लोंबणारी वनमाळा गळ्यांत शोमत आहे ५३; 

चरणींची गंगा अतिपुनीत । जे जगातें पवित्र करित ।
ते माथां वाहे उमाकांत । निजस्वार्थ देखोनी ॥ ५४ ॥
चरणांपासून निघालेली गंगा तर अत्यंत पवित्र, ती जगालाच पुनीत करून सोडते. अशी ती गंगा आपला स्वार्थ आहे असे पाहून शंकरांनी आपल्या मस्तकावरच धारण केली ५४.

त्या श्रीहरीचें पदद्वंद्व । वानितां मुका झाला वेद ।
अगम्य हरीचें निजपद । महिमा अगाध श्रीहरिचरणीं ॥ ५५ ॥
त्या श्रीहरीच्या दोन्ही पायांचे वर्णन करतांना वेदही मुका होऊन बसला. कारण, तें श्रीहरीचे पद केवळ अगम्य आहे. श्रीहरीच्या चरणांचा महिमा फार मोठा आहे ५५.

पाहतां मुकुंदाचें श्रीमुख । फिकें झालें जी पीयूख ।
डोळ्यां झालें परम सुख । धन्य श्रीमुख हरीचें ॥ ५६ ॥
त्या श्रीहरीचे अतिसुंदर मुख पाहिले म्हणजे अमृतही फिकें  होऊन जाते, आणि डोळ्यांना अप्रतिम सुख वाटते. श्रीहरीचे तें आल्हादकारक मुख धन्य होय ५६.

ज्याचें निमेषार्ध देखिल्या मुख । हारपे कोटि जन्मांचें दुःख ।
त्रिलोकीं न माय हरिख । धन्य श्रीमुख हरीचें ॥ ५७ ॥
ज्याचे मुख निमिषार्ध अवलोकन केले तरी कोटिजन्मांचे दुःख नाहीसे होते, आणि होणारा आनंद त्रिभुवनांतही मावत नाही, अशा त्या श्रीहरीचे ते आल्हादकारक मुख धन्य होय ५७.

ज्याचा देखिलिया वदनेंदू । बांधू न शके द्वंद्वबाधू ।
चढता वाढता परमानंदू । स्वानंदकंदू जगाचा ॥ ५८ ॥
ज्याचा मुखचंद्र पाहिला असतां सुखदुःखादि द्वंद्वांची बाधा मुळीच पीडा देऊ शकत नाहीं, अधिकाधिक परमानंदच प्राप्त होतो; असा तो सर्व जगाचा आत्मा आनंदाचे मूळ आहे ५८.

जयाची विक्षेपभ्रुकुटी । रची ब्रह्मांडें उठाउठी ।
ज्याचे रोमकूपीं ब्रह्मांडे कोटी । तो हरि वैकुंठीं नांदत ॥ ५९ ॥
ज्याची कमानदार भुंवई दृष्टिक्षेप करतांना किंचित् वांकडी होताक्षणीच तत्काळ कित्येक ब्रह्मांड उत्पन्न होतात; ज्याच्या प्रत्येक रोमरंध्रांत कोट्यवधि ब्रह्मांडे राहतात; असा तो श्रीहरि वैकुंठामध्ये निवास करतो ५९.

ज्याची झालिया कृपादृष्टी । अहंकाराची विरे गांठी ।
दुसरें दिसों नेदी सृष्टीं । तो हरि वैकुंठीं नांदत ॥ २६० ॥
ज्याची कृपादृष्टि झाली असतां अहंकाराची गांठच तुटून पडते, आणि सृष्टीमध्ये दुसरे म्हणून काही दिसूंच देत नाही, तो श्रीहरि वैकुंठामध्ये नांदत आहे २६०.

जया दादुल्याचें नाम । निर्दाळी गा मरणजन्म ।
समूळ उपडी कर्माकर्म । तो पुरुषोत्तम नांदत ॥ ६१ ॥
अहो ! ज्या प्रभूचे नामस्मरण जन्ममरणालाच नाहींसें करून टाकते, कर्माकर्म मुळासकट उपटून टाकतें, तो पुरुषोत्तम वैकुंठात नांदत आहे ६१.

ते वैकुंठीं पाहतां साचार । अवघे चतुर्भुज नर ।
घनश्याम पीतांबरधर । शंख चक्र अवघ्यांसी ॥ ६२ ॥
त्या वैकुंठांत खरोखर पाहिलें तर सर्व लोक चतुर्भुज असतात. सर्वच लोक मेघासारख्या श्यामरंगाचे, पीतांबर धारण करणारे, व सर्वांच्याच हातांत शंख-चक्र इत्यादि आयुधे असतात ६२.

अवघ्यांचें एक स्वरूप । अवघे दिसती एकरूप ।
जेथ हरि नांदे स्वयें सद्‌रूप । तेथ कोणी कुरूप दिसेना ॥ ६३ ॥
सर्वाचे स्वरूप सारखें. सर्वजण एकसारखेच दिसतात. जेथे सौंदर्यशाली श्रीहरि स्वत:च राहतो, तेथे कोणीच विद्रूप दिसत नाही ६३.

तेथ नाहीं आधी व्याधी । नाहीं विषयवार्ता उपाधी ।
स्त्रीपुरुषां समान बुद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ६४ ॥
तेथे आधिदैविक किंवा आधिभौतिक पीडा नाहीत, विषयवार्तेची उपाधि नाही, आणखी उद्धवा ! तेथें खरोखर स्त्रीपुरुषांची बुद्धि सारखीच असते ६४.

तेथ नाहीं तहानभूक । नाहीं कामक्रोध द्वंद्वदुःख ।
नाहीं जन्ममरण निःशेख । ऐसा वैकुंठलोक नांदत ॥ ६५ ॥
तेथें तहानभूक नाही, काम-क्रोध नाहीत, सुखदुःखांच्या द्वंद्वांचे दुःख नाहीं, जन्ममरण तर मुळीच नाही, असा वैकुंठलोक आहे ६५.

लक्ष्मीनें करावें अवलोकन । यालागीं कष्टती सुरगण ।
ते लक्ष्मी अंगें आपण । करी संमार्जन वैकुंठी ॥ ६६ ॥
लक्ष्मीने एकदा आपल्याकडे अवलोकन करावे ह्यासाठी सर्व देवांचे समुदाय धडपड करीत असतात, पण अशी ती लक्ष्मी आपण स्वतः वैकुंठांत सडापोतेरें घालीत असते ६६.

ते वैकुंठीं जगन्नाथ । उद्धरावया निजभक्त ।
स्वलीला असे नांदत । दीनकृपायुक्त दयाळू ॥ ६७ ॥
त्या वैकुंठात दीनदयाळ व उदार जगन्नाथ आपल्या भक्तांचा उद्धार करण्याकरिता आपल्याच लीलेने नांदत असतो ६७.

अंतीं नाममात्र घेतल्यासाठीं । उद्धरल्या जीवकोटी ।
तो स्वामी श्रीविष्णु वैकुंठी । दीनकृपादृष्टी नांदत ॥ ६८ ॥
मृत्युसमयीं त्याचे नामस्मरण केल्यामुळेच कोट्यवधि जीव त्याने उद्धरले आहेत. तो प्रभु श्रीविष्णु दीनजनांवर कृपादृष्टि ठेवून वैकुंठामध्ये नांदत असतो ६८.

जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ ।
पढिये पंचम पुरुषार्थ । तो हरी नांदत वैकुंठीं ॥ ६९ ॥
ज्याचा जसा भाव असतो, तसा त्याचा मनोरथ तो पूर्ण करितो. आणि पांचव्या पुरुषार्थावर प्रीति करितो. असा तो श्रीहरि वैकुंठामध्ये नांदत असतो ६९.

लोकलोकांतरगणना । ब्रह्मांडसंख्या अवघी जाणा ।
वैकुंठकैलासरचना । समूळ विवंचना सांगितली ॥ २७० ॥
निरनिराळ्या लोकांची गणना, ब्रह्मांडांची सर्व संख्या, वैकुंठ व कैलास यांची रचना हे सविस्तर विवेचन सांगितले २७०.

लोक सांगीतले भिन्न भिन्न । तेथील प्राप्तीचे कोण जन ।
ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थीं निरूपण अवधारीं ॥ ७१ ॥
भिन्नभिन्न लोक सांगितले, पण ते लोक प्राप्त करून घेणारे लोक कोणते अशी तुझ्या मनात कल्पना येईल, म्हणून त्या अर्थाचें निरूपण ऐक ७१.

महर्जनतपःसत्यलोक । वैकुंठरचना अलोलिक ।
तेथील प्राप्तीचे कोण लोक । ते यदुनायक सांगत ॥ ७२ ॥
महर्लोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक आणि ज्यांची रचना आश्चर्यकारक आहे असें वैकुंठ त्यांची प्राप्ति करून घेणारे लोक कोणते ते यदुनायक श्रीकृष्ण सांगत आहे ७२.

योगस्य तपसश्चैव न्यासस्य गतयोऽमलाः ।
महर्जनस्तपः सत्यं भक्तियोगस्य मद्‌गतिः ॥ १४ ॥
[श्लोक १४] योग, तपश्चर्या आणि संन्यास यांचेद्वारा महर्लोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोकरूप उत्तम गती प्राप्त होते आणि भक्तियोगाने माझे परम धाम प्राप्त होते. (१४)

निश्चळ करावया निजचित्ता । साधिली प्राणापानसमता ।
षट्चक्रें भेदूनि तत्त्वतां । पुढें निजात्मता पावावी ॥ ७३ ॥
आपल्या चित्ताला स्थिर करण्याकरितां प्राणापान समान करण्याचे कौशल्य साध्य केले आणि खरोखर षट्चक्रांचा भेद करून पुढे आत्मस्वरूपाला पोचावें ७३, 

तंव आयुष्या झालें अस्तमान । निजांगीं आदळे मरण ।
ऐसे निमाले जे योगीजन । त्यांसी ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥ ७४ ॥
इतक्यांत आयुष्य संपून मृत्यु आला, तर अशा रीतीने मृत्यु पावलेले जे योगी लोक, त्यांना महलोंक, जनोलोक, इत्यादि वर वर असणाऱ्या लोकांमध्ये जाता येतें ७४.

जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी । ब्रह्मचर्यनेमें व्रतधारी ।
जो स्वप्नींहीं नातळे नारी । जो भिक्षाहारी सर्वदा ॥ ७५ ॥
जो गृहस्थाश्रमी असून ब्रह्मचारी असतो, नियमाने ब्रह्मचर्यव्रत पाळतो, जो स्वप्नातही स्त्रीला स्पर्श करीत नाही, जो सदोदित भिक्षा मागून खातो ७५; 

जो सदा धडधडीत विरक्ती । एक भिक्षा न धरी हातीं ।
सद्‌गुरूचिया सेवा करिती । आत्मज्ञानप्राप्ती पावावया ॥ ७६ ॥
जो निरंतर कडकडीत वैराग्य धारण करतो, किंवा जो भिक्षेला शिवतही नाही, आणि आत्मज्ञानाची प्राप्ति होण्याकरितां सद्गुरूची सेवा करतो ७६; 

जे संधीं व्हावें आत्मज्ञान । ते संधीसी आलें मरण ।
ऐशा ब्रह्मचारियासी जाण । ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥ ७७ ॥
त्याला तशा प्रसंगी जो आत्मज्ञान व्हावयाचे, त्याच वेळेला जर मृत्यु आला, तर असा ब्रह्मचारी वर महर्जनादि लोकांतच जातो ७७.

जे गृहस्थाश्रमीं नेटक । जे अग्निसेवे साग्निक ।
जे स्वधर्में चित्तशोधक । जे सेवक द्विजदेवां ॥ ७८ ॥
जे गृहस्थाश्रमात तत्पर, जे अग्निसेवेसाठी अग्निहोत्र घेणारे, जे स्वधर्मानेच चित्त शुद्ध करणारे, आणि जे ब्राह्मणांची व देवाची सेवा करणारे ७८; 

जे भूतदयाळू भाविक । जे सत्यवादी सात्त्विक ।
जे निजात्मज्ञानसाधक । जे अवंचक गुरुभजनीं ॥ ७९ ॥
जे भाविक असून प्राणिमात्रावर  दया करणारे, जे सत्यभाषणी असून सात्त्विक वृत्तीचे, जे आत्मज्ञान साध्य करणारे, जे गुरुभजनाच्या ठायीं प्रतारणा न करणारे ७९, 

गुरुकृपा साधूनि ज्ञान । पावावें ब्रह्म सनातन ।
तंव वेंचलें आयुष्यधन । अंगीं निधन आदळलें ॥ २८० ॥
अशा लोकांनी गुरुकृपेने आत्मज्ञान साध्य केल्यावर त्यांना सनातन ब्रह्माची प्राप्ति होऊ लागावी आणि इतक्यांत त्यांचं आयुष्यरूपी धन संपून त्यांना मरण यावें २८०, 

तेणें खोळंबली ब्रह्मप्राप्ती । परी ऊर्ध्वलोकीं होय गती ।
जैसी उपासना विरक्ती । तेणें तारतम्यें जाती महर्जनादि लोकीं ॥ ८१ ॥
की त्यामुळे ब्रह्मप्राप्ति होण्याला जरी आडकाठी येते, तरी ते वर जातातच व जशी ज्यांची उपासना व विरक्ति असते, त्या मानाने ते महर्जनादि लोकांमध्ये पोंचतात ८१.

जे वनवासी वानप्रस्थ । जे वैराग्यें अतिविरक्त ।
जे कंदमूळफळीं तृप्त । जे सदा नेमस्त आश्रमधर्मीं ॥ ८२ ॥
जे वनामध्ये राहून वानप्रस्थाश्रम आचरतात, जे वैराग्याने अत्यंत विरक्त असतात, जे कंदमूलफलांवरच तृप्त असतात, आणि जे सदासर्वदा आश्रमधर्माच्या नियमाने वागतात ८२, 

वर्षाकाळीं आसारीं राहे । हेमंतीं जळाशयें ।
उष्णकाळीं पंचाग्नी साहे । तपश्चर्या वाहे अतिनिष्ठा ॥ ८३ ॥
असा साधक पर्जन्यकाळांत पर्जन्यवृष्टीमध्ये बसतो, हिवाळ्यात पाण्यात बसतो, उन्हाळ्यात पंचाग्निसाधन करतो, अशी जो अत्यंत निष्ठेने तपश्चर्या करतो ८३, 

शरीरशोषणाचें पाहे । सर्वथा न धरी भये ।
स्वार्थाचेनि लवलाहें । तपोनिष्ठा साहे दारुण ॥ ८४ ॥
शरीर क्षीण होईल याचे भय मुळीच बाळगीत नाही, आत्महितसाधनाच्या उत्कंठेने दारुण तपश्चर्या सहन करतो ८४, 

वैराग्य साधूनि पूर्ण । करावें संन्यासग्रहण ।
साधावया ब्रह्मज्ञान । तेचि काळीं मरण वोढवलें ॥ ८५ ॥
किंवा पूर्ण वैराग्य साधून ब्रह्मज्ञानप्राप्तीकरितां संन्यास घेऊ लागतो, आणि त्याला इतक्यांतच जर मरण येऊन ठेपलें ८५, 

ऐसेनि देहान्तस्थिती । त्यासी ऊर्ध्वलोकीं होय गती ।
महर्जनतपोलोकप्राप्ती । तारतम्यस्थिती उपासना ॥ ८६ ॥
तर त्याला अंतकाळानंतर ऊर्ध्वलोकी गमन होते, आणि त्याच्या उपासनेच्या मानाने महर्जनतपोलोकाची प्राप्ति होते ८६.

जो समूळसंकल्पसंन्यासी । लोकलोकांतर न घडे त्यासी ।
हें न टकेचि गा जयासी । आणि झाले संन्यासी विधियुक्त ॥ ८७ ॥
जो मुळासह सर्व संकल्पांचाच संन्यास करतो, त्याला लोकांतराला जाणे घडत नाही. तो मुक्तच होतो. हे ज्याला घडत नाही, आणि जे विधियुक्त संन्यासी होतात ८७, 

जे कां पोटींहून अतिविरक्त । स्वप्नीं धातूंसी न लाविती हात ।
जे यतिधर्मीं सदा निरत । जे सदा जपत प्रणवातें ॥ ८८ ॥
जे अंत:करणापासून अत्यंत विरक्त असतात, स्वप्नांतसुद्धा सोन्यारुप्याला हात लावीत नाहीत, जे सदासर्वकाळ संन्यासधर्मात निमग्न असतात, आणि जे निरंतर ओंकाराचा जप करतात ८८, 

अंगीकारिले आश्रमविधी । उबगू न मानी जो त्रिशुद्धी ।
मरणीं डंडळीना बुद्धी । त्या गमनसिद्धी सत्यलोकीं ॥ ८९ ॥
आश्रमविधि पतकरल्यानंतर जो खरोखर त्याचा कंटाळा मानीत नाहीं, मरणसमयीं ज्याची बुद्धि चंचल होत नाही, त्याला सत्यलोकांत जाणे घडतें ८९.

ऐसे सत्यलोकातें पावती । तेथील्या भोगांची ज्यां विरक्ती ।
ते ब्रह्म्यासवें मुक्त होती । येर ते येती माघारे ॥ २९० ॥
असले लोक सत्यलोकाला जातात, पण तेथल्या सुखविलासादि भोगांचीही ज्यांना विरक्ति असते, ते ब्रह्मदेवाबरोबरच मुक्त होतात, आणि बाकीचे परत येतात २९०.

ज्यांसी सत्यलोकीं भोगासक्ती । तेही खचोनि माघारे येती ।
इतर लोकांची कोण गती । पुनरावृत्ती सोडीना ॥ ९१ ॥
ज्यांना सत्यलोकांतील भोगविलास भोगण्याचीच आवड असते, तेही तेथून ख खेचून माघारे येतात, मग इतर लोकांची गति काय सांगावी ? त्यांना जन्म आणि मरण सोडीतच नाहीं ९१.

जेथवरी भोगासक्ती । तेथवरी पुनरावृत्ती ।
जेथ भोगाची निवृत्ती । तेथ चारी मुक्ती आंदण्या ॥ ९२ ॥
भोगासक्ति म्हणून जेथपर्यत आहे, तेथपर्यंत हा पुनरावृत्तीचा फेरा आहेच. पण जेथें भोगाची इच्छा नाहीशी होते, तेथें चारही मुक्ति दासी होऊन राहतात ९२.

ज्यां लोकीं ज्या भोगविरक्ती । तेथून ते पुढारे जाती ।
जे लोकीं ज्या भोगासक्ती । ते खचोनि पडती भूलोकीं ॥ ९३ ॥
ज्या लोकांत ज्यांना भोगविरक्ति होते, तेथून ते पुढे जातात. आणि ज्या लोकांत ज्यांना भोगासक्ति उत्पन्न होते, तेथून ते खचून भूलोकावर पडतात ९३.

तैसी नव्हे माझी भक्ती । भक्तां नाहीं इतर प्राप्ती ।
मद्‌भक्तां माझी गती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९४ ॥
परंतु माझी भक्ति कांही तशी नव्हे. भक्तांना दुसऱ्या कशाचीच प्राप्ति होत नाही. उद्धवा ! माझ्या भक्तांना निश्चयेंकरून माझीच गति प्राप्त होते ९४.

जे सकाम माझी सेवा करिती । त्यांसी कामनाफळीं पडे वस्ती ।
ज्यांसी निष्काम माझी भक्ती । त्यांसी माझी प्राप्ती अनन्य ॥ ९५ ॥
जे इच्छा धरून माझी सेवा करतात, त्यांना वासनेच्या फळांतच रहावे लागते. परंतु ज्यांना माझी निष्काम भक्ति असते, त्यांना माझी अनन्य प्राप्ति होते ९५.

सकाम भक्तांचे पुरवूनि काम । त्यांसी मी करीं नित्य निष्काम ।
निजभक्तांसी निजधाम । मी पुरुषोत्तम पाववीं ॥ ९६ ॥
सकाम भक्तांच्या वासना पूर्ण करून, त्यांना मी नेहमी निष्काम करीत असतो. मी पुरुषोत्तम माझ्या भक्तांना निजधामाला घेऊन जातों ९६.

यालागीं गोपींची कामासक्ती । म्यांचि आणूनि निष्कामस्थिती ।
त्यांसी दिधली सायुज्यमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९७ ॥
उद्धवा ! म्हणूनच गोपींची कामासक्ति होती, ती मीच निष्काम स्थितीला आणून त्यांना खरोखर सायुज्यमुक्ति दिली हे लक्षात ठेव ९७.

म्यां गोपिकांसी कामू केला । कीं निःशेष कामू त्यांचा हरिला ।
न विचारितां या बोला । कृष्ण व्यभिचारला मूर्ख म्हणती ॥ ९८ ॥
मी गोपिकांशी कामविलास केले की त्यांचा काम पूर्णपणे नष्ट केला, या म्हणण्याचा विचार न करतांच मूर्ख लोक कृष्णाने व्यभिचार केला असे म्हणतात ९८.

सलोकता आवडे भक्तांसी । तैं मी करीं वैकुंठवासी ।
भक्त मागे समीपतेसी । करीं मी तयासी जिवलग ॥ ९९ ॥
भक्तांना सलोकता आवडत असेल तर मी त्यांना वैकुंठांत राहावयास घेऊन जातो. भक्का भक्तांनें समीपता मागितली, तर मी त्याला आपला जिवलग मित्र करितों ९९.

हितगुज अळोंच्यासी । हृदयींचें गोड सांगावयासी ।
उद्धवा तूं जैसा आवडसी । ऐशीच त्यांसीं करीं प्रीति ॥ ३०० ॥
हितगुज सांगावयाला, मनांतील गोडगोड गोष्टी बोलावयाला, उद्धवा ! तू  मला जसा आवडतोस, त्याचप्रमाणे मी त्याच्यावर प्रीति करतों ३००. 

भक्त मागे सरूपता । त्यासी मी दें चतुर्भुजता ।
शंखचक्रादि सायुधता । घनश्यामता सुरेख ॥ १ ॥
भक्ताने सरूपता मागितली तर त्याला मी चतुर्भुज करतों, आणि शंख-चक्रादिक आयुधे त्याला देऊन मेघाप्रमाणे सुंदर सांवळा वर्ण देतों १.

मुकुट कुंडलें मेखळा । कांसे मिरवे सोनसळा ।
वांकी तोडरू चरणकमळा । कौस्तुभ गळां मत्सम ॥ २ ॥
मुकुट, कुंडलें, मेखळा, नेसावयाला पिवळा सोनसळा पीतांबर, वांकी, पायांत तोडर, आणि गळ्यामध्ये माझ्यासारखाच कौस्तुभमणि २.

ठाणमाण गुणलक्षण । वीर्य शौर्य गांभीर्य पूर्ण ।
रूप रेखा समसमान । दोघेही अनन्य सरूपता ॥ ३ ॥
आकारस्वरूप, गुणलक्षण, वीर्य, शौर्य, पूर्ण गांभीर्य, रूपलक्षणे ही अगदी सारखी. दोघेही स्वरूपाने अगदी एकसारखेच ३.

रमा दोघांसी एकत्र देखे । देवो कोण हें ते नोळखे ।
पार्षदक्रिया ठकलीं ठाके । कोणासी सेवकें सेवावें ॥ ४ ॥
लक्ष्मीनें जर दोघांना एकत्र पाहिले, तर देव कोणता हेसुद्धा तिला ओळखत नाही. सेवकांचे सेवाकर्म थांबतें; कारण त्यांनी कोणाची सेवा करावी ? ४.

छत्रधरू चवके चित्तीं । कोणावरी धरूं छत्री ।
चवरधरें चवरें हातीं । कोणाप्रती विंजावें ॥ ५ ॥
छत्र धरणारा मनांत दचकून म्हणतो की, मी आतां छत्र तरी कोणावर धरूं? चवरी वारणाराने हातांत चवरी धरून कोणावर वारावी ? ५.

नमना येती ब्रह्मादि देव । तेही मानिती अतिअपूर्व ।
दोंमाजीं कोण आदिदेव । त्यांसीही स्वयमेव कळेना ॥ ६ ॥
ब्रह्मादि देव नमन करावयाला येतात, तेही मोठे आश्चर्य  मानितात. दोघांमध्ये आदिदेव कोणता हे त्यांना स्वतःलाही कळत नाहीं ६.

जेवीं दीपें दीपू लाविला । न कळे वडील कोण धाकुला ।
तेवीं माझी सरूपता पावला । न वचे ओळखिला आनासी ॥ ७ ॥
ज्याप्रमाणे दिव्याने दिवा लावला म्हणजे पहिला कोणता व दुसरा कोणता हे समजत नाही, त्याप्रमाणेच माझी सरूपता प्राप्त झाली म्हणजे इतराला तोही ओळखतां येत नाही ७. 

जेवीं आरिशाचें प्रतिबिंब । दिसे समरूपें स्वयंभ ।
तैशी सरूपतेची शोभ । सम विडंब दोहींचा ॥ ८ ॥
ज्याप्रमाणे आरशांतलं प्रतिबिंब हुबेहूब सारख्याच स्वरूपाचे दिसत असल्यामुळे तेच स्वयमेव बिंब आहे असे वाटते, त्याप्रमाणेच सरूपतेची शोभा असते. दोहोंचाही थाट सारखाच ८.

देवो होऊनियां प्रसन्न । आपली सरूपता दे संपूर्ण ।
नेदी हृदयींचा द्विजचरण । श्रीवत्सलांछन अविनाशी ॥ ९ ॥
देव प्रसन्न होऊन जरी आपली पूर्ण सरूपता देतो, तरी हृदयावर उमटलेलें ब्राह्मणाचे पाऊल-जें  अविनाशी श्रीवत्सलांछन-तें मात्र देत नाही ९.

श्रीवत्स चिन्ह द्यावयासी पाहीं । विष्णु म्हणे मज सामर्थ्य नाहीं ।
तें असे ब्राह्मणाच्या पायीं । त्याचा चरण हृदयीं धरिल्या लाभे ॥ ३१० ॥
विष्णु स्वत:च म्हणतो, श्रीवत्सचिन्ह देण्याला मला सामर्थ्य नाही. ते सामर्थ्य ब्राह्मणांच्या पायांत आहे, त्या ब्राह्मणांचे चरण हृदयांत धरले तरच ते मिळेल ३१०.

सरूपतेमाजीं जाण । देवा-भक्तांची हे खूण ।
ज्याचे हृदयीं श्रीवत्सलांछन । तो स्वामी श्रीविष्णु जाण सर्वांचा ॥ ११ ॥
सरूपतेमध्ये देवाची आणि भक्ताची निराळेपणा ओळखण्याची खूण हीच की, ज्याच्या हृदयावर श्रीवत्सलांछन असते, तोच सर्वांचा स्वामी श्रीविष्णु होय ११.

ऐशी सरूपता जरी झाली प्राप्त । तरी हा देवो मी एक भक्त ।
हा भिन्नत्वाचा भेद किंत । त्याआंत उरला असे ॥ १२ ॥
अशा प्रकारची सरूपता जरी प्राप्त झाली, तरी हा एक देव, व हा एक भक्त, असा भिन्नत्वाचा भेदभावाचा किंतु त्यांच्यामध्ये शिल्लक राहातोंच १२.

देवभक्तांमाजीं भेदू । भिन्न सरूपतासंवादू ।
जंव नाहीं अद्वयबोधू । तंव परमानंदू प्रकटेना ॥ १३ ॥
देव आणि भक्त ह्यांच्यामध्ये जोपर्यंत भेद आहे, तोपर्यंत सरूपता म्हणणे हेही अयुक्तच होय. कारण, जोपर्यंत अद्वयज्ञान झाले नाही, तोपर्यंत परमानंद उत्पन्न होत नाही १३.

सांडूनि भिन भेदवार्ता । भक्त मागे सायुज्यता ।
ते गोड निरूपणकथा । तेथील स्वादता मी जाणें ॥ १४ ॥
म्हणून भिन्नत्वाची भेदवार्ता सोडून भक्त सायुज्यताच मागतो. त्या निरूपणाची कथा फार गोड आहे. त्यांतील गोष्टी फक्त मीच जाणतों १४.

सायुज्याचें गोडपण । माझें मी जाणें आपण ।
उद्धवा तुज तेंही जाण । साङ्ग संपूर्ण सांगेन ॥ १५ ॥
सायुज्याची जी गोडी आहे, ती माझी मीच स्वतः जाणतो. उद्धवा ! तीही मी तुला सर्व सविस्तर सांगेन १५.

देह सरूपता सारिखेपण । हृदयीं भिन्न मीतूंपण ।
ऐशियेही मुक्तीसी जाण । भक्त सज्ञान नातळती ॥ १६ ॥
सरूपतेनें देहाचा सारखेपणा प्रास झाला तरी हृदयामध्ये मीपण असा भिन्नभाव असतो. म्हणून अशा सरूपतामुक्तीलाही ज्ञाते भक्त लुब्ध होत नाहीत १६.

मी होऊनियां मातें । भजन स्वतःसिद्ध आइतें ।
तें सांडूनियां भेदातें । निजभक्त चित्तें नातळती ॥ १७ ॥
माझ्या स्वरूपाला प्राप्त होऊन माझे स्वतःसिद्ध भजन करावयाचे, ते सोडून माझे भक्त मनानेसुद्धा भेदाला शिवत नाहीत १७.

देवेंसी भक्त अनादिसिद्ध । ठायीं मूळींहून अभेद ।
तेथ दाटूनि जो धरी भेद । तो भक्तिमंद मायिक ॥ १८ ॥
देवासह भक्त हे अनादिसिद्ध आहेत. ते मूळचेच अभेदरूप आहेत. असे असता त्यांत जो मुद्दाम भेद बाळगतो, तो  भक्तिहीन व मायिक असे समजावें १८.

आर्त जिज्ञासु आणि अर्थार्थी । हे भेद केले मायिका भक्ति ।
जे अभेदभावें मज भजती । सायुज्यमुक्ती तयांसी ॥ १९ ॥
आर्त, जिज्ञासु आणि अर्थार्थी हे सर्व भेद मायिक भक्तीने केलेले आहेत, परंतु अभेदभावाने जे माझे भजन करतात, त्यांना सायुज्यता मुक्ति प्राप्त होते १९.

ज्यांसी रावो रंक समान । वंद्य निंद्य न मनी मन ।
जे न धरिती देहाभिमान । सायुज्य जाण तयांसी ॥ ३२० ॥
राजा आणि रंक हें  ज्यांना सारखे, ज्यांचे मन अमुक वंद्य  आणि अमुक निंद्य असा भेद मानीत नाही, जे देहाभिमान धरीत नाहीत, त्यांना सायुज्यता प्राप्त होते ३२०.

जैशी आपुली साउली । मिथ्या आपणासवें लागली ।
तैशी देहबुद्धि ज्यांसी झाली । त्यांसी फावली सायुज्यता ॥ २१ ॥
ज्याप्रमाणे आपली सांवली मिथ्याच आपल्याला चिकटलेली असते,  त्याप्रमाणेच जो ही देहबुद्धि मिथ्या समजतो, त्यालाच सायुज्यता प्राप्त होते २१.

जन्मूनि छाया सरिसी वाढे । माझी हे ममता नुठी पुढें ।
ऐसे देहाचें न बाधी सांकडें । सायुज्य रोकडें तयासी ॥ २२ ॥
छाया ही आपल्याचपासून जन्मास येऊन आपल्याबरोबरच वाढते, तरी ती माझी अशी ममता तिच्याबद्दल काही कोणाच्याही मनात उत्पन्न होत नाही. अशाच प्रकारे देहाचे दुःख ज्याला बाधत नाही, त्याला निश्चितपणे सायुज्यता प्राप्त होते २२.

सांडूनि देहाची विषयासक्ती । जो करी भावें अभेदभक्ती ।
त्यासीचि सायुज्यमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २३ ॥
देहाची विषयासक्ति सोडून जो मनोभावाने अभेदभक्ति करतो, त्यालाच उद्धवा ! सायुज्य मुक्ति प्राप्त होते असें निश्चित समज २३.

ज्यासी देहीं नुठी मीपण । भूतमात्रीं न देखे तूंपण ।
त्यासी सायुज्यमुक्ति जाण । साङ्ग संपूर्ण सांपडे ॥ २४ ॥
स्वतःच्या देहामध्ये ज्याला मीपणा उत्पन्न होत नाही, कोणत्याही प्राणिमात्रामध्ये जो तूपणा पाहात नाही. त्याला सर्वस्वी पूर्ण सायुज्यमुक्ति प्राप्त होते २४.

जेवढी मज आत्म्याची व्यक्ती । तेवढीच त्याची प्रतीती ।
त्यासीच सायुज्यता मुक्ती । सहज आपैती उद्धवा ॥ २५ ॥
उद्धवा! माझ्या आत्म्याचा जेवढा विस्तार आहे, तेवढीच त्याला आत्मप्रतीति असते. यामुळे त्यालाच सहज सायुज्य मुक्ति लाभते २५.

त्यासी विष्णुस्वरूप व्हावा देहो । हा सर्वथा नुपजे अहंभावो ।
त्यासी विष्णुसगट स्वदेह वावो । यालागीं सारूप्य पहा हो वांछीना ॥ २६ ॥
 त्याला आपला देह विष्णुस्वरूप व्हावा असा देहाभिमान मुळीच उत्पन्न होत नाही. त्याला विष्णूचा देह आणि आपला देह हे दोन्ही मिथ्या  असेंच वाटत असते. म्हणून तो सरूपतेची इच्छा करीत नाही २६.

निजविवेकें पाहतां ठायीं । देहो तितुका मिथ्या पाहीं ।
तेथ सारूप्यता कोणें ठायीं । सज्ञानीं कायी मागावी ॥ २७ ॥
आपल्याच ठिकाणी आपण विचार करून पाहिला असता देह म्हणून जितका आहे, तितका मिथ्या आहे असे वाटते. तेव्हा तेथे सारूप्यता राहिली कोठे ? अर्थात् ज्ञात्यांनी ती कशी मागावी? २७.

सायुज्यता आलिया हाता । वस्तूवीण ठावो नाहीं रिता ।
सकळ भूतीं एकात्मता । सायुज्य तत्त्वतां या नांव ॥ २८ ॥
सायुज्यता प्राप्त झाली असता ब्रह्मांशिवाय रिकामी जागाच शिल्लक राहिलेली दिसत नाही. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी एकात्मता होणे, याचंच नांव खरोखर सायुज्यता होय २८.

सकळ रूपें नांदतें जग । तें जो जाणे आपुलें अंग ।
आपण सर्वात्मा अभंग । त्यासीच साङ्ग सायुज्य ॥ २९ ॥
अनेक प्रकारच्या स्वरूपांनी जग भरून राहिले आहे, ते सारें आपलेच अंग  आहे असें जो समजतो, आपणच अभंग असा सर्वात्मा आहे असा ज्याचा भाव असतो, त्यालाच पूर्ण सायुज्यता प्राप्त होते २९.

मी एक सबाह्याभ्यंतरीं । मी एक जंगमीं स्थावरीं ।
मीचि आत्मा चराचरीं । जाण त्याचे घरीं सायुज्य नांदे ॥ ३३० ॥
अंतर्बाह्य व्यापलेला एक मीच; सर्व स्थावर-जंगांमध्ये व्यापलेला एक मीच, चराचरांतील आत्मा तो मीच, असें जो मानतो, त्याच्या घरी सायुज्यता राबत असते असे समज ३३०.

मीचि एक एकला । एकपणेंचि संचला ।
ज्यासी द्वैताचा दुष्काळ पडिला । सत्य पावला सायुज्य ॥ ३१ ॥
सर्वत्र एकटा  एक मीच एकपणाने भरून राहिलों आहे अशी ज्याची समजूत असते, ज्याला द्वैताचा दुष्काळ पडलेला असतो (द्वैतभाव नष्ट झालेला असतो), तोच खरोखर सायुज्यता पावतो ३१.

एवं भावार्थाच्या अतिप्रीतीं । जें जें निजभक्त वांछिती ।
तें तें मे पुरवीं श्रीपती । चारी मुक्ती भक्तांसी ॥ ३२ ॥
तात्पर्य, भावार्थाच्या अत्यंत प्रेमाने माझे भक्त ज्याची ज्याची इच्छा करतात, तें तें मी श्रीपति त्यांना पुरवितों. याप्रमाणे भक्तांना चारही मुक्ति प्राप्त होतात ३२.

यावेगळे माझे प्रिय भक्त । भक्तिप्रतापें प्रतापवंत ।
भजनशौर्य अतिअद्‌भुत । निष्काम निरत मद्‌भजनीं ॥ ३३ ॥
याशिवायही माझे दुसरे आवडते भक्त आहेत. ते भक्तीच्या प्रतापाने मोठे प्रतापशाली असतात. त्यांच्या भजनाचे शौर्य फार विलक्षण असते.  ते निरंतर निरिच्छपणाने माझ्या भजनांतच मग्न असतात ३३.

आर्त जिज्ञासु अर्थार्थी । या कल्पना न धरोनि हातीं ।
नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ॥ ३४ ॥
आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी या कल्पना लक्षात न घेता ते थोर भक्त निरंतर निरिच्छपणाने व अत्यंत प्रेमाने माझे भजन करतात ३४.

नेघती सालोक्य सामीप्य सरूपता । शेखीं न मागती सायुज्यता ।
निष्काम भजतीं भगवंता । भक्ती तत्त्वतां या नांव ॥ ३५ ॥
ते सलोकता, समीपता व सरूपता मुळीच घेत नाहीत, व शेवटी सायुज्यताही मागत नाहीत. ते निरिच्छपणाने भगवंताला भजत असतात. ह्याचंच नांव खरी भक्ति ३५.

नवल भजनाची परवडी । आवडीतें प्रसवे आवडी ।
क्षणोक्षण चढोवढी । नित्य नूतन गोडी प्रेमाची ॥ ३६ ॥
भजनाच्या सामर्थ्याचा एक मोठा चमत्कार आहे. तो असा की, आवडीनेच अधिकाधिक आवड उत्पन्न होते, आणि अधिकाधिक उत्कर्षाने क्षणोक्षणी प्रेमाची नित्य नवी गोडी उत्पन्न होते ३६.

माझिया आवडीं तत्त्वतां । सर्वस्वें वेंचित जीविता ।
कदा पालट नव्हे चित्ता । भावार्थतां विश्वासी ॥ ३७ ॥
खरोखर माझ्या आवडीने तो आपलें जीवित सर्वस्वी खर्च करितो, तरी त्याच्या चित्तांत कधीं बदल होतच नाही. भावबळानें तो भजनाच्या ठिकाणी इतका विश्वासू बनलेला असतो ३७.

मीच एक देवाधिदेवो । सर्वभूतीं माझाचि भावो ।
विकल्प विकृति संदेहो । घालितां पहा हो उपजेना ॥ ३८ ॥
देवाधिदेव काय तो एक मीच, सर्व प्राणिमात्रांमध्ये माझाच आत्मा आहे, अशी जी त्याची समजूत झालेली असते, त्या समजुतींत कितीही विकल्प, विकृति, संशय उत्पन्न करण्याचा कोणी प्रयत्न केला, तरी सुद्धा ते उत्पन्न होत नाहींत ३८.

नवल भावार्थाची थोरी । मद्‌भावें देखे नरनारी ।
श्वानसूकरादि आकारीं । नमस्कारी मद्‌भावें ॥ ३९ ॥
भक्तीची थोरवी मोठी आश्चर्यकारक आहे. तो भक्त सर्व पुरुष-स्त्रिया माझ्याच भावनेने पाहतो. कुत्री, डुकरें, इत्यादिकांच्या ठिकाणीही माझेच स्वरूप समजून त्यांना वंदन करतो ३९.

नवल त्याची भजनख्याती । सायुज्यादि चारी मुक्ती ।
माझ्या नांवावरूनि ओंवाळिती । भक्ती पढियंती येणें पाडें ॥ ३४० ॥
त्याच्या भजनाची थोरवी मोठी चमत्कारिक आहे. सायुज्यादि चारही मुक्ति असे भक्त माझ्या नावावरून ओवाळून टाकतात. इतक्या निस्सीमपणाने त्यांना भक्ति प्रिय असते ३४०.

मांडल्या अतिविघ्न सांकडें । ग्लानी न करिती आणिकांकडे ।
जाणती रामनामापुढें । विघ्न बापुडें ते कायी ॥ ४१ ॥
अत्यंत मोठे विघ्न आले, किंवा एकादे  संकट आले, तरी ते दुसऱ्याकडे गयावयां करावयाला जात नाहीत. कारण ते असे समजतात की, रामनामापुढे तें विघ्न बिचारे काय करणार? ४१.  

गगन पडों पाहे कडाडें । पृथ्वी उलथावया गडबडे ।
ऐसें मांडलिया सांकडे । नाम पढे श्रीहरीचें ॥ ४२ ॥
आकाशांत प्रचंड कडकडाट होऊन आकाश खाली पडते असे वाटलें, किंवा पृथ्वी डळमळून उलथण्याच्या बेतांत आली, एवढे संकट पुढे उभे राहिले असताही तो श्रीहरीचे नामस्मरण करीत असतो ४२.

ऐशी देखोनि अनन्य प्रीती। मी सर्वस्वें भुललों श्रीपती ।
मग न पाहतां कुळ जाती । त्याच्या घराप्रती मी धांवें ॥ ४३ ॥
अशी एकनिष्ठ प्रीति पाहिली म्हणजे मी लक्ष्मीपति त्याला सर्वस्वी भुलून जातों, आणि मग कुळ किंवा जाति ह्याच्याकडे लक्ष न देता मी त्याच्या घराकडे धाव घेतों ४३.

ते न घेती वैकुंठींची वाट । त्यांचें घरचि मी करीं वैकुंठ ।
तेथें चिन्मात्रें फुटे पाहांट । पिके पेंठ संतांची ॥ ४४ ॥
असे भक्त कांहीं वैकुंठाच्या वाटेला जात नाहीत. त्यांचे घरच मी वैकुंठ करून सोडतो. तेव्हा तेथे ज्ञानाची पहाट फुटते, आणि संतांचे समुदाय जमू लागतात ४४.

उपनिषदें येती तयांपाशीं । स्वधर्म ये सुखवस्तीसी ।
नारदादि सनकादिकांसी । तया घरासी अतिप्रीती ॥ ४५ ॥
उपनिषदें त्यांच्या जवळ येतात; स्वधर्म हा आनंदाने वस्ती करावयास त्यांच्याजवळ येतो; आणि नारद, सनकादिक, इत्यादिकांना त्या घराविषयी फार प्रीति वाटते ४५.

गर्जती नामाचे पवाडे । माझी कीर्ति गाती वाडेंकोडें ।
माझ्या रामनामापुढें । द्वंद्वाचें उडे बाधकत्व ॥ ४६ ॥
ते नामाच्या महात्म्याची गर्जना करतात. मोठ्या आवडीने माझी कीर्ति गातात. माझ्या रामनामापुढे सुखदुःखांच्या द्वंद्वांचा त्रासदायकपणा शिल्लकच राहात नाही ४६.

ऐशी देखोनि माझी भक्ती । वोरसोनियां निजशांती ।
धांवोनि ये तयांप्रती । वोळली मागुती जावों विसरे ॥ ४७ ॥
अशी माझी भक्ति पाहिली, की आत्मशांति अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे धावत येते, आणि तेथे येऊन ती प्रसन्न झाली की तिला परत जावयाची आठवणसुद्धा होत नाही ४७.

त्यांसी छळों ये जें जें दूषण । तें तें त्यांसी होय भूषण ।
माझे भक्तीचें प्रसन्नपण । जाण संपूर्ण या नांव ॥ ४८ ॥
जें जें दूषण त्यांचा छळ करावयाला येते, ते ते त्यांना भूषणच होते. याचेंच नांव माझ्या भक्तीची पूर्ण प्रसन्नता ४८.

तेथ सायुज्यादि चारी मुक्ती । त्यांचे सेवेसी स्वयें येती ।
ते जेथ विषय सेवूं जाती । तेथ सायुज्यमुक्ती सेवा करी ॥ ४९ ॥
सायुज्यादि ज्या चार मुक्ति आहेत, त्या स्वतः तेथे त्यांच्या सेवेला येतात, ते जेथे विषयसेवन करूं लागतात, तेथे सायुज्यमुक्तीच त्यांची सेवा करीत असते ४९.

ऋद्धिसिद्धि त्याच्या घरीं । होऊनि राहती कामारी ।
तरी तो सिद्धींची चाड न धरी । माझे भक्तीवरी निश्चयो ॥ ३५० ॥
ऋद्धिसिद्धि त्याच्या घरच्या दासी होऊन राहातात, तरी तो त्या सिद्धींची इच्छा धरीत नाही. त्याचा सर्व भरंवसा माझ्या भक्तीवरच असतो ३५०.

ऐशी देखोनि निश्चयें भक्ती । मीही करीं अनन्य प्रीती ।
भक्त जेउती वास पाहती । तेउता मी श्रीपती स्वयें प्रकटें ॥ ५१ ॥
अशी निश्चयाने केलेली भक्ति पाहिली म्हणजे मीही त्याच्यावर अनन्य प्रीति करतो. भक्त जिकडे वाट पहातात, तिकडे मी लक्ष्मीकांत स्वतः प्रकट होतो ५१.

भक्त स्वभावें बोलों जाये । त्याचें बोलणें मीचि होयें ।
त्याचे बोलण्या सबाह्यें । मीचि राहें शब्दार्थें ॥ ५२ ॥
भक्त सहज जें बोलू लागतो, ते त्याचे बोलणें मीच स्वतः होतो. त्याच्या बोलण्यामध्ये अंतर्बाध मीच शब्दार्थरूपाने राहातों ५२.

तो कौतुकें खेळे खडे । ते खडेचि मज होणें घडे ।
तो कृपाळु पाहे जयाकडे । त्याचे छेदीं मी गाढे भवबंध ॥ ५३ ॥
तो मौजेने खडे खेळू लागला, तर ते खडेसुद्धा मलाच व्हावे लागते. तो कृपाळूपणाने ज्याच्याकडे पाहील, त्याचे बळकट संसारबंध मी तोडून टाकतों ५३.

तो वास पाहे जेणें मोहरी । तेउती मी सुखाची सृष्टी करीं ।
तो म्हणे जयातें उद्धरीं । तो मी स्वपदावरी बैसवीं ॥ ५४ ॥
तो जिकडे दृष्टीचा रोख फिरवील, तिकडे मी सुखाचीच सृष्टि करून सोडतो. तो ज्याचा उद्धार करावा असे म्हणेल, त्याला मी आपल्या पदावर नेऊन बसवितों ५४.

त्यासी अल्पही विचंबू पावे । तो सर्वांगें मी करूं धांवें ।
त्याचें नाम जिंहीं स्मरावें । त्यांसी म्यां तारावें सर्वथा ॥ ५५ ॥
त्याला अल्पसे जरी संकट प्राप्त झाले, तरी ते नाहींसें करावयास मी स्वतः धावत सुटतो. त्याचे नाम जे कोणी घेतात, त्यांना मी पूर्णपणे उद्धरतों ५५.

जेवीं तान्हयालागीं माता । तेवीं भक्तांची मज चिंता ।
त्यांची सेवाही करितां । मी सवर्था लाजेंना ॥ ५६ ॥
तान्ह्या  मुलाची चिंता जशी आईला असते, त्याप्रमाणेच भक्तांची चिंता मला असते. त्यांची सेवाचाकरीही करतांना मी मुळीच लाजत नाही ५६.

माता बाळकाचें पुरवी कोड । तैसे ते माझे लळेवाड ।
त्यांचें प्रेमचि मज गोड । उपचारचाड मज नाहीं ॥ ५७ ॥
आई जसे बालकाचे लाड पुरविते, त्याप्रमाणेच ते माझे लडिवाळ आहेत (मी त्यांचे लळे पुरवितों). त्यांचे प्रेमच मला गोड वाटते. इतर उपचारांची इच्छाच मला नाही ५७.

मी शरीर तो माझा आत्मा । प्रेमळ असे पढिया आम्हां ।
प्रेमळावरती सीमा । भक्तीचा महिमा चढेना ॥५८ ॥
मी शरीर आणि तो माझा आत्मा होय. प्रेमळ भक्तच आम्हांला आवडत असतो. भक्तीचा महिमा कितीही थोर असला तरी प्रेमळावर त्याची मात्रा चालत नाही. (प्रेमळाच्या ठिकाणींच भत्तीची मर्यादा संपते. त्याहून भक्तीचा महिमा आणखी वाढत नाही) ५८.

त्यासी झणें काळ संहारी । यालागीं त्या आंतबाहेरी ।
मी निजांगाचें दुर्ग करीं । ऐशी प्रीति पुरी प्रेमळाची ॥ ५९ ॥
त्याचा कदाचित काळ संहार करील, म्हणून त्याच्या आंत आणि बाहेर मी आपल्या अंगाचा किल्लाच तयार करतो. इतकें प्रेमळाचे मला पूर्ण प्रेम आहे ५९.

तेथ काळाचेनि हटतटें । लावूनि ब्रह्मस्थितीचे वाटे ।
माझे भक्त नेटेंपाटें । आपणिया आंतवटें स्वसुखें वसवीं ॥ ३६० ॥
अशा स्थितीत काळाच्या भीतीमुळेच मी आपल्या भक्तांना ब्रह्मस्वरूपाच्या मार्गाला लावितों, आणि असे ते माझे भक्त अत्यंत काळजीपूर्वक मी आपल्या स्वरूपांत पूर्ण आत्मसुखी करून ठेवतों ३६०.

त्याचें स्वाभाविक कर्म जाण । तें माझे प्रीतींचे पूजन ।
तो देखे तें माझें दर्शन । त्याची चावटी तें स्तवन खुणेचें माझें ॥ ६१ ॥
अशा भक्तांचे जें स्वाभाविक कृत्य असते, तेच माझे प्रीतीचे पूजन होय. तो जें पाहतो तेंच माझे दर्शन होय. आणि तो जें काय बोलतो तेच माझे खरे स्तोत्र होय ६१, 

तो स्वयें करी आरोगण । तेंचि मज नैवेद्यअर्पण ।
त्याची निद्रा ते जाण । समाधि संपूर्ण पैं माझी ॥ ६२ ॥
तो स्वतः भोजन करितो तेच मला नैवेद्य समर्पण केल्याप्रमाणे होते. त्याची निद्रा तीच माझी पूर्ण समाधि होय ६२.

त्याचा निमेषोन्मेषांचा व्यापार । तो मज अत्यंत प्रियकर ।
त्याचे श्वासाचे परिवार । मज अपार सुखविती ॥ ६३ ॥
त्याच्या डोळ्यांची जी उघडझाप चालते, तीही मला फार प्रिय वाटते. त्याच्या श्वासोच्छ्वासाची आंदोलने मला फार सुख देतात ६३.

भक्तांची शरीरस्वभावस्थिती । तेणें मी सुखावें श्रीपती ।
ऐसे सप्रेम भक्त आवडती । माझी अनन्यप्रीती मद्‌भक्तां ॥ ६४ ॥
भक्तांच्या शरीराची जी स्वाभाविक स्थिति असते, तेणेकरून तर मी लक्ष्मीपति फारच आनंदित होतो. असे प्रेमळ भक्त मला आवडतात. माझ्या भक्तांवर माझी एकनिष्ठ प्रीति असते ६४.

चारी पुरुषार्थां नातळती । उपेक्षूनि चारी मुक्ती ।
सप्रेम करिती माझी भक्ती । मजचि पावती मद्‌भक्त ॥ ६५ ॥
जे भक्त चारही पुरुषार्थाना शिवत नाहीत, आणि चारही मुक्तींना दूर लोटून प्रेमळपणाने माझीच भक्ति करतात, ते माझे भक्त मलाच पावतात ६५, 

गंगा सागरीं मीनली मिळे । मीनली त्याचीच त्यावरी लोळे ।
तैसा भक्त मिळोनि भावबळें । माझे भक्तीचे सोहळे मजमाजीं भोगी ॥ ६६ ॥
गंगा समुद्रात जाऊन एकरूपाने त्यांत मिसळली, की अशा रीतीने मिसळलेली ती गंगा ऐक्यरूपाने त्याचीच होऊन त्याच्यावर लोळू लागते. त्याप्रमाणे भक्त हा भक्तीच्या सामर्थ्यांने मला मिळून माझ्या भक्तीचे सोहळे माझ्यामध्येच भोगतो ६६.

जेवीं कां भरें तरुणांगी । तरुणपण भोगी सर्वांगीं ।
तेवीं भक्त मिळोनि मजलागीं । माझे भक्तीचें भोगी वैभव ॥ ६७ ॥
तरुण स्त्री तारुण्याच्या मदाने सर्वांगांनी त्या तारुण्याचा उपभोग घेत असते, त्याप्रमाणे भक्त मला मिळून माझ्या भक्तीचे वैभव भोगीत असतो ६७.

कां सतरावीचें गोडपण । चंद्र जाणे आपुलें आपण ।
तेवीं मी होऊनि माझें भजन । भक्त सज्ञान जाणती ॥ ६८ ॥
किंवा सतराव्या कलेची गोडी चंद्र आपली आपणच जाणतो, त्याप्रमाणे मी होऊन माझे भजन कसे करावयाचें तें सज्ञानी भक्त जाणतात ६८.

जातिस्वभावें उदक एक । तेंचि गंगा यमुना नांवीं देख ।
प्रयागसंगमीं उद्धरी लोक । तेवीं भक्त भाविक मद्योगें ॥ ६९ ॥
जातिस्वभावाप्रमाणे पाहिले तर सर्व ठिकाणचे उदक एकच असते. तरी तेच गंगा, यमुना, अशी निरनिराळी नांवें  स्वीकारून प्रयागाच्या ठिकाणी एकत्र होते व त्या संगमावर लोकांचा उद्धार करिते. त्याप्रमाणेच माझ्याशी ऐक्य झाल्याने भाविक भक्तही मोठ्या योग्यतेस चढतो ६९.

तेवीं माझे भक्त मज मिळून । अनन्य करिती माझे भजन ।
येथ भाविक सात्त्विक अतिदीन । उद्धरती जाण मद्योगें ॥ ३७० ॥
त्याप्रमाणे माझे भक्त माझ्याशी मिळून एकनिष्ठतेने माझे भजन करतात. अशा भजनाने माझ्याशी ऐक्य झाल्यामुळे भाविक, सात्त्विक व अत्यंत दीन लोक उद्धरतात ३७०.

पृथ्वी निधानें भरली आहे । परी पायाळेंवीण प्राप्ती नोहे ।
तेवीं आत्मा स्वतः सिद्ध आहे । गुरुकृपा लाहे तैं प्राप्ती ॥ ७१ ॥
पृथ्वी ही द्रव्याने भरलेलीच आहे; पण पायाळूशिवाय मात्र त्या द्रव्याची प्राप्ति होत नाही. त्याप्रमाणे आत्मा हा मूळचा स्वत:सिद्ध आहे, पण गुरुकृपा होते तेव्हांच त्याची प्राप्ति होते ७१.

चहूं पुरुषार्थातें त्यागिती । चारी मुक्ति उपेक्षिती ।
पंचम पुरुषार्थाची भक्ती । मज पढियंती उद्धवा ॥ ७२ ॥
चारही पुरुषार्थाना सोडून चारही मुक्तींची उपेक्षा करितात व पांचच्या पुरुषार्थाची जी भक्ति करतात, तीच उद्धवा ! मला प्रिय आहे ७२.

येचि भक्तीचें मज कोड । हेचि भक्त माझे लळेवाड ।
मज अवाप्तकामा त्यांची चाड । ऐसें प्रेम गोड तयांचें ॥ ७३ ॥
अशाच भक्तीची मला आवड असते. असेच भक्त माझे लाडके असतात. निरिच्छ असणाऱ्या मला त्यांचे कौतुक वाटते. असे त्यांचे प्रेम गोड असते ७३.

आम्ही प्रेमाचे पाहुणे । भावार्थाचे आंदणे ।
म्यां अनन्याची सेवा करणें । जीवेंप्राणें सर्वस्वे ॥ ७४ ॥
आम्ही प्रेमाचे पाहुणे व भावार्थांचे सेवक आहोत. मी एकनिष्ठाची जीवाभावाने सर्वस्वी सेवा करावी ७४..

माझें नाम आत्माराम । मी अवाप्तसकळकाम ।
परी प्रेमळांलागीं सकाम । ऐसें गोड प्रेम तयांचें ॥ ७५ ॥
माझे नांव आत्माराम आहे. मी सर्व इच्छा नष्ट झालेला असा आहे. तरी पण मी प्रेमळ भक्तांची इच्छा बाळगितों, इतकें त्यांचे प्रेम गोड असते ७५.

मग आपुलिये संवसाटीं । प्रेमळू घें मी उठाउठी ।
वरीव सुखही दें शेवटीं । मज प्रीति मोटी प्रेमाची ॥ ७६ ॥
मग मी प्रेमळ भक्ताला तत्काळ आपल्या बरोबरीला घेतों, आणि शेवटी माझेच सुख मी त्याला देतो. कारण मला प्रेमाची फार आवड आहे ७६.

प्रेम मजसीं मोलें अधिक । संवसाटी करितां नव्हे देख ।
यालागीं वरीव देतां सुख । न ये तैं सेवक सेलेचा होय ॥ ७७ ॥
प्रेम माझ्याहूनही अधिक मोलाचे आहे. मला त्याची बरोबरी करता येत नाही. म्हणून माझे सुख भक्ताला देतां न येईल, तर त्याचा मी इमानी सेवक होऊन राहतों ७७.

प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण । भावार्थाची उणखूण ।
जाणता मी एक श्रीकृष्ण । इतरांसी जाण कळेना ॥ ७८ ॥
प्रेमाचा खरा जिव्हाळा, आणि भावार्थाचे रक्षण, हे मी एक श्रीकृष्णच जाणणारा आहे. इतरांना ते कळत नाही ७८.

मज गोपिकांची कोण गोडी । त्यांच्या प्रेमाची जाति चोखडी ।
यालागीं मज त्यांची आवडी । अतिगाढी उद्धवा ॥ ७९ ॥
मला गोपींच्या सहवासांत गोडी मानण्याचे काय कारण होते. पण त्यांचे प्रेम अत्यंत निर्मळ होते, म्हणूनच उद्धवा ! मला त्यांची अत्यंत आवड उत्पन्न झाली ७९.

कुब्जा काय सुंदर होती । तिच्या प्रेमाची मज प्रीती ।
राधा प्रार्थीं मी वनाप्रती । काय विषयासक्तीलागूनी ॥ ३८० ॥
कुब्जा सुंदर होती काय? पण तिच्या प्रेमाची मला आवड होती. मी वनांत जाऊन राधेची प्रार्थना करीत असे, ती काय विषयासक्तीसाठी ? ३८०.

कोण भक्ती केली गोपाळीं । काय तीं सोंवळीं कीं ओंवळीं ।
त्यांचे उच्छिष्ट कवळ मी गिळीं । प्रेमसंमेळीं डुल्लत ॥ ८१ ॥
गोपाळांनी तरी अशी किती भक्ति केली ? ते सोंवळे होते की ओंवळे होते ? पण त्यांचे उष्टे घास मी खाल्ले, आणि त्यांच्या प्रेमामुळे प्रेमभरांत डुलत राहिलों ८१.

पांडवांच्या बाचें मी काय लागें । त्यांचीं वेवटें सोशीं अनेगें ।
मी सुदाम्याच्या पायां लागें । काय त्याचेनि पांगें पांगलों ॥ ८२ ॥
पांडवांच्या बापाचा मी काय ऋणी होतो? पण त्यांच्यासाठी अनेक अडचणी सोसल्या. मी सुदाम्याच्या पायां पडलों, तो काय मी त्या सुदाम्याच्या उपकारांनी ऋणी झालो होतो म्हणून? ८२.

मी काय अन्नासी दुकाळलों । तो यज्ञपत्न्यां सीं मागों गेलों ।
मी भावार्थाचा भुकेलों । प्रेमाच्या पावलों पाहुणेरा ॥ ८३ ॥
मला काय अन्नाचा दुष्काळ पडला होता, म्हणून यज्ञपत्न्यांजवळ अन्न मागावयाला गेलों? मी भावार्थासाठी भुकेलेलों आहे, म्हणून मी प्रेमाचा पाहुणचार घ्यावयास गेलों ८३.

माझी काय क्षीण झाली शक्ती । मज गोपिका दावीं बांधिती ।
त्यांच्या निजप्रेमाची जाती । मी स्वयें श्रीपती पोखितू ॥ ८४ ॥
मला गोपिकांनी दाव्यांनी बांधिले होते, त्या वेळी माझी शक्ति त्या बंधनांत राहण्याइतकी क्षीण झाली होती काय ? पण त्यांच्या प्रेमाच्या प्रकारानेच मी श्रीपति पोसला जात होतो ८४.

मी न लागतां कोणाची कवडी । अर्जुनाचीं धूतसे घोडीं ।
धर्माघरीं उच्छिष्टें काढीं । मज अतिआवडी प्रेमाची ॥ ८५ ॥
मी कोणाची एक कवडीसुद्धा देणे लागत नसता अर्जुनाची घोडी धूत होतो. धर्माच्या घरी उष्टीही काढलीं ! अशी मला प्रेमाची अतिशयच आवड आहे ८५.

मज प्रेमळांची अतिआवडी । ते लोकेषणालाज दवडी ।
महत्त्वाच्या विसरवी कोडी । त्यांचा सेवेची जोडी मजलागीं ॥ ८६ ॥
मला प्रेमळ भक्तांची अत्यंत आवड आहे. ती आवड माझी लौकिकलाज सुद्धा नष्ट करिते. व माझी मोठमोठी कामेंसुद्धा विसरविते. इतकी त्यांच्या सेवेची मला आवड आहे ८६.

सकळ अळंकार लेऊनि माता । निजपुत्र मस्तकीं लाडवितां ।
त्याच्या कंटाळेना थुंकमुता । तेवीं प्रेमळें सर्वथा मजलागीं ॥ ८७ ॥
सर्व अलंकार घालून आई आपला मुलगा मस्तकावर घेऊन लाडवितांना तो तेथे थुंकला किंवा मुतला, तरी त्याला ती कंटाळत नाही. तसेच माझे प्रेमळ भक्त मला सर्वस्वी प्रिय आहेत ८७.

ऐसा प्रेमाचेनि अतिपांगें । म्यां पंगिस्त होइजे श्रीरंगें ।
यालागीं तया पुढेंमागें । सदा सर्वांगें तिष्ठत ॥ ८८ ॥
अशा प्रकारे प्रेमाच्या अत्यंत आवडीने मी श्रीकृष्ण भक्तांचा अंकित होऊन राहतों, आणि प्रेमामुळे त्यांच्या पुढे मागें सदासर्वदा स्वतः उभा असतों ८८.

उद्धवा यादवा समस्त । असतां माझें बहुत गोत ।
तूंचि प्रियकर मज जो येथ । माझें प्रेम अद्‌भुत तुजलागीं ॥ ८९ ॥
उद्धवा ! सर्व यादव हा माझा फार मोठा गोतावळा असतां तूंच मला जो एवढा प्रिय वाटतोस, याचे कारण, तुला माझे काही विलक्षण प्रेम आहे ८९.

हे ऐकोनि देवाची गोठी । उद्धवें पायीं घातली मिठी ।
देवो सुखावोनि पोटीं । उठाउठी आलिंगी ॥ ३९० ॥
हें देवाचे भाषण ऐकून उद्धवाने देवाच्या पायांना मिठी घातली. तेव्हां देवही अंत:करणांत अत्यंत आनंद पावला आणि त्याने उद्ध्वाला तत्काळ आलिंगन दिले ३९०.

हृदयीं हृदय जाले संलग्न । देहीं देहा पडिलें आलिंगन ।
मनेंसीं एक झालें मन । स्वानंद पूर्ण वोसंडे ॥ ९१ ॥
हृदयांत हृदय एकरूप झालें, देहांत देहाला आलिंगन पडले, मनाशी मन एक झाले, तेव्हां आत्मानंद अगदी पूर्ण भरून वाहू लागला ९१.

देवो विसरला देवपण । भक्ता नाठवे भक्तपण ।
दोघांचें उडालें दोनीपण । स्वानंदीं पूर्ण बुडाले ॥ ९२ ॥
देव देवपणा विसरला, आणि भक्ताला भक्तपणा आठवेनासा झाला. दोघांचे दोन्हीपण (द्वैतपणा) नष्ट होऊन ते आत्मानंदांत पूर्णपणे मग्न झाले ९२.

सेव्यसेवकता ठेली गोठी । द्वैतभावाची खुंटली दृष्टी ।
भक्तिसाम्राज्याच्या पाटीं । दोघां झाली भेटी निजात्मता ॥ ९३ ॥
सेव्य आणि सेवक ही गोष्टच नाहीशी झाली. द्वैतभावाची दृष्टीच बंद पडली. आत्म्याच्या ऐक्याने भक्तिसाम्राज्याच्या सिंहासनावर दोघांची भेट झाली ९३.

स्थूळ लिंग आणि कारण । इंहीं उपलक्षिजे माहाकारण ।
ते देहचतुष्टयाची आठवण । आठवितें कोण ते ठायीं ॥ ९४ ॥
स्थूळदेह, लिंगदेह आणि कारणदेह यांनी महाकारणदेह पहावयाचा, पण त्या देहचतुष्टयाची आठवण त्या वेळी कोणाला होते ! ९४.

तेथ निबिड आणि निघोट । सुखस्वरूप घनदाट ।
नाहीं आदि मध्य शेवट । तें झालें प्रकट स्वयंभ ॥ ९५ ॥
तेव्हां घनदाट आणि परिपूर्ण असें आनंदमय स्वरूप, ज्याला आदि, मध्य व अंतही नाही, ते मूर्तिमंतच प्रगट झाले ९५.

नवल देवाचें पूर्णपण । तेथही लाघव केलें जाण ।
मोडों नेदीचि उद्धवपण । ऐसा भक्त आन मज मिळेना ॥ ९६ ॥
परंतु देवाच्या परिपूर्णतेचे मोठे आश्चर्य आहे. त्याने तेथेही एक मोठा चमत्कार केला. तो असा की, उद्धवाचे उद्धवपणाचे भान त्याने जाऊ दिले नाही. कारण तो मनांत म्हणाला की, मला असा दुसरा भक्त मिळणार नाहीं ९६.

उद्धवाऐसा मजपाशीं । कोण मिळेल अळोंचासी ।
माझे निजगोड कोणापाशीं । म्यां सावकाशीं सांगावें ॥ ९७ ॥
माझे हितगुज सांगावयाला मला उद्भवासारखा दुसरा कोण मिळणार ? माझ्या मनांतील ज्या गोड गोड गोष्टी आहेत त्या सावकाशपणाने मी कोणापाशी सांगाव्या ? ९७.

मज निजधामा गेलिया जाण । माझें जें निःसीम निजज्ञान ।
त्यासी उद्धव शुद्ध सांठवण । यालागीं उद्धवपण राखिलें ॥ ९८ ॥
मी निजधामाला गेल्यानंतर माझें जें अपार आत्मज्ञान आहे, त्याला उद्धव हा एक योग्य साठा आहे. म्हणून उद्धवाचे भान त्याने कायम ठेवले ९८.

उद्धव स्वानंदी निमग्न । त्यासी थापटूनि आपण ।
सावध करी श्रीकृष्ण । येरा भक्तपण आठवलें ॥ ९९ ॥
उद्धव आत्मानंदांत निमग्न झाला होता, त्याला आपल्या हातांनी थोपटून श्रीकृष्णांनी सावध केलें, तेव्हां त्याला आपण भक्त आहोत ही आठवण झाली ९९.

म्हणे जय जय श्रीकृष्णनाथा । जें मज सुख दाविलें आतां ।
तें नित्य निर्वाहे सर्वथा । ऐशी कृपा तत्त्वतां करावी ॥ ४०० ॥
आणि तो म्हणाला, “ श्रीकृष्णनाथा ! तुझा जयजयकार असो. आता मला जे आत्मसुख दाखविलेंस, ते सदोदित सर्वस्वी कायम राहील अशीच कृपा खरोखर तूं करावीस" ४००. 

तंव श्रीकृष्ण म्हणे उद्धवा । हा माझा निजगुह्य गोप्य ठेवा ।
तुज म्यां सांगीतला कणवा । पुरुषार्थ पांचवा या नांव ॥ १ ॥
तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले, “ उद्धवा ! हा माझा गुह्य ज्ञानाचा गुप्त ठेवा आहे. तो मी तुला प्रेमानें सांगितला. ह्यालाच 'पांचवा पुरुषार्थ' असें नांव आहे १.

हें वेदशास्त्रां अगम्य । सकळ देवांसी अतिदुर्गम ।
जेणें लुब्धें मी पुरुषोत्तम । तें हें भक्त प्रेमरहस्य ॥ २ ॥
हे वेदशास्त्रांना अगम्य व सर्व देवांना अत्यंत दुर्गम आहे. ज्याच्या योगाने मी पुरुषोत्तम लुब्ध होऊन जातो, तें हें  भक्तप्रेमाचे रहस्य आहे २.

मज वश्य करावयाचें वर्म । पोटीं धरावें भक्तिप्रेम ।
चहूं मुक्तींचा पडे भ्रम । पुरुषार्थकाम वोसरे ॥ ३ ॥
मला वश करून घेण्याचे वर्म हेच की, अंत:करणांत भक्तिप्रेम धरावें ; म्हणजे चारही मुक्तींचा भ्रम नष्ट होतो व पुरुषार्थकामही कमी होतो ३.

ज्यासी माझी सप्रेम भक्ती । त्याचेनि नांवें विघ्नें पळती ।
मजवेगळी अन्यथा गती । करावया प्राप्ती कोणाची ॥ ४ ॥
ज्याला माझी सप्रेम भक्ति आहे, त्याचे नांव ऐकतांच सर्व विघ्ने पळून जातात. त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी गति प्राप्त करून देण्यास कोण समर्थ आहे?" ४. 

जयासी माझी अनन्य भक्ती । तेथ माझी पूर्ण कृपास्थिती ।
मद्‌भक्तां मजवेगळी गती । कदा कल्पांतीं असेना ॥ ५ ॥
 ज्याला माझी अनन्यभक्ति असते, त्याच्यावर माझी पूर्ण कृपा असते. माझ्या भक्तांना माझ्याशिवाय दुसरी गति कधीच कल्पांतीही प्राप्त व्हावयाची नाही ५.

वेदविधीं करावा बाधू । तो निःश्वसित माझा वेदू ।
जेथ माझा पूर्ण कृपाबोधू । तेथ विधिवादू बाधीना ॥ ६ ॥
भक्तांना वेदविधींनी अडचण उत्पन करावी, तर तो वेद माझ्याच उच्छ्वासापासून उत्पन्न झालेला आहे. तेव्हां जेथें माझ्या कृपेचाच पूर्ण प्रसाद झाला, तेथें वेदविधि बाधक होत नाही ६.

जे कां माझे भक्त सकाम । ते फळभोगांतीं होऊनि निष्काम ।
तेही ठाकिती माझें निजधाम । भक्तां अन्यगमन असेना ॥ ७ ॥
जे माझे सकाम भक्त असतात, तेही फळे भोगल्यानंतर निष्कामच होतात, आणि तेही माझ्याच निजधामाला येतात. कारण भक्तांना दुसरी जागाच नाही ७.

ज्यासी माझें अनन्य भजन । स्वकर्म त्याचे सेवी चरण ।
विधिवेदू वोळंगे अंगण । त्यासी अन्यथागमन असेना ॥ ८ ॥
ज्याच्याजवळ माझें एकनिष्ठ भजन आहे, त्याच्या चरणाची सेवा स्वकर्म करते. विधिनिदर्शक वेद त्याच्या आंगणांत उभे असतात. माझ्या भक्ताला माझ्यावांचून दुसरी जागा असत नाही ८.

जेथ सप्रेम नाहीं माझी भक्ती । तेथ कर्में अवश्य बाधती ।
कर्मास्तव अन्यथागती । अभक्त पावती उद्धवा ॥ ९ ॥
ज्याच्या ठिकाणी माझी सप्रेम भक्ति नाही, त्याला कर्में हटकून बाधक होतात. उद्धवा ! अभक्त असतात ते कर्मामुळेच दुसरी गति पावतात ९.

जेथ माझी साचार भक्ती । तेथ कर्माची न चले गती ।
मद्‌भक्तां माझी प्राप्ती । सत्य निश्चितीं या हेतू ॥ ४१० ॥
जेथे माझी खरी भक्ति असते, तेथें कर्माची गति चालत नाही. माझ्या मक्तांना जी माझी  प्राप्ति होते, ती खरोखर ह्याच कारणाने होय ४१०.

भक्तांसी सर्वांभूतीं मद्‌भावो । तेथ कर्मबंधा कैंचा ठावो ।
कर्मानुगती खुंटली पहा हो । मत्प्राप्ति स्वयमेवो मद्‌भक्तां ॥ ११ ॥
भक्तांना सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझाच भाव असतो, तेव्हा त्यांच्या ठिकाणी कर्मबंधनाला जागा कोठली मिळणार ? अहो पहा ! कर्माची गतीच त्यांच्यापाशी खुंटून जाते. माझ्या भक्तांना आपोआप माझी प्राप्ति होते ११.

भक्त पाऊल ठेवी अवनीं । परी म्यां ठेविलें न धरी मनीं ।
कर्ता भगवंत सत्य मानी । यालागीं कर्मबंधनीं बांधवेना ॥ १२ ॥
भक्त जमिनीवर पाऊल ठेवतो, परंतु तें मी ठेवलें असें मनांत धरीत नाही. सर्वकर्ता भगवंत आहे हेच सत्य मानतो, म्हणून तो कर्माच्या बंधनाकडूनही बांधला जात नाही १२.

भक्तांस नाहीं अन्यथा गती । मद्‌भक्तां माझी अनन्य प्रीती ।
त्या भक्तभावार्थाच्या युक्ती । विशद श्रीपती स्वयें केल्या ॥ १३ ॥
भक्तांना माझ्यावांचून दुसरी गति नाही, कारण माझ्या भक्तांना माझीच एकनिष्ठ प्रीति असते. त्या भक्तांच्या भावार्थाच्या गोष्टी श्रीकृष्णांनी स्वतःच स्पष्ट करून सांगितल्या १३.

‘न मे भक्तः प्रणश्यति’ । हें बोलिला अर्जुनाप्रती ।
तें साचार बिरुद श्रीपती । तो भक्तां अन्यगती घडोंचि नेदी ॥ १४ ॥
'न मे भक्तः प्रणश्यति' (गीता ९.३१) असें कृष्णाने अर्जुनाला सांगितले, तेंच श्रीकृष्णाचे खरें ब्रीद होय. तो भक्तांना दुसरी गति धडूंच देत नाही १४.

भक्तशापाची ऐकतां गोठी । देवो कैवारें सवेग उठी ।
सुदर्शन लावूनि पाठी । केला हिंपुटी दुर्वासा ॥ १५ ॥
 भक्तांला शाप दिल्याची गोष्ट ऐकतांच देव त्या भक्ताचा कैवार घेऊन लागलाच उठला, आणि सुदर्शन पाठीमागे लावून दुर्वासाला ग्रस्त करून सोडले १५.

एका अंबरीषाकारणें । दहा गर्भवास सोशिले जेणें ।
तो अनन्य भक्तांसी उणें । कोण्याही गुणें येवों नेदी ॥ १६ ॥
एका अंबरीषाकरितां ज्याने दहा गर्भवास सोसले, तो एकनिष्ठ  भक्तांना कोणत्याही प्रकारे कमी पडू  देत नाही १६.

भक्तकैवारी श्रीकृष्ण । हे भावार्थाची निजखूण ।
एका जनार्दना शरण । भावो प्रमाण भक्तीसी ॥ १७ ॥
भक्ताचा कैवारी श्रीकृष्ण आहे, हीच भक्तिरहस्यांतील मुख्य गोष्ट आहे. एकनाथ जनार्दनाला शरण आहे. कारण, भक्तीला भाव हेच साधन आहे १७.

शुद्धभावेंवीण जे भक्ती । तेचि दांभिक जाण निश्चितीं ।
ते अपक्वचि राहे प्राप्ती । जेवीं कांकड जाती मुगांची ॥ १८ ॥
शुद्ध भावाशिवाय जी भक्ति, तीच खरोखर दांभिक भक्ति होय असे समज. ज्याप्रमाणे मुगांतले कुचर दाणे अपक्व राहातात, तशी ती दांभिक भक्ति अ पक्वच रहावयाची १८.

‘भक्तियोगस्य मद्‌गतिः’ । हे मूळपदींची पदस्थिती ।
तेंचि वाढविलें किती । ऐसें श्रोतीं न म्हणावें ॥ १९ ॥
'भक्तियोगस्य मद्गति: ' असें मूळ श्लोकांतील पद आहे. तेंच किती वाढविले ? असे श्रोत्यांनी म्हणूं नये १९.

‘मद्‌गती’ या पदाची व्युत्पत्ती । कोण आहे जाणे किती ।
हें रहस्य जाणे विरळा क्षितीं । यालागीं क्षमा श्रोतीं करावी ॥ ४२० ॥
'मद्गति ' या पदाचा अर्थ किती आहे कोण जाणे ! त्यांतील रहस्य जाणणारा मनुष्य पृथ्वीवर विरळा. याकरिता श्रोत्यांनी क्षमा करावी ४२०, 

हो कां भक्ती माझी निजजननी । ज्यां प्रेमपान्हां ये वाढवूनी ।
सरता केलों भगवद्‌भजनीं । ते म्यां गौण महिमेनीं वानिली ॥ २१ ॥
 अहो ! भक्ति ही माझी माता आहे. जिनें प्रेमपान्हा पाजून मला वाढविले, आणि भगवद्भजनांत थोरपणा मिळवून दिला, ती भक्ति वास्तविक येथे फारच कमी महत्त्व देऊन वर्णिली २१.

भगवद्‌भक्तीचें महिमान । मी केवीं जाणें अज्ञान ।
जें बोलिलों तें सर्वथा गौण । क्षमा पूर्ण करावी ॥ २२ ॥
कारण भगवद्भक्तीचा थोर महिमा मी अज्ञानी कसा जाणणार? मी येथें जें वर्णन केलें, तें खरोखर फारच कमी आहे. म्हणून श्रोत्यांनी क्षमा करावी २२.

भक्ति माझी निजमाउली । ते मी आपुल्या बोबडे बोलीं ।
ग्रंथाधारें गौरविली । सप्रेम भुली भुलोनी ॥ २३ ॥
भक्ति ही माझी सख्खी आई आहे, ती मी आपल्या बोबड्या बोलांनी प्रेमाच्या योगाने भुरळ पडून केवळ ग्रंथाधाराने गौरविली आहे २३.

प्रेमाची निजजाति कैशी । आठवों नेदी आठवणेसी ।
एवं विसरवूनि हेतूसी । भक्तिरहस्यासी बोलविलें ॥ २४ ॥
प्रेमाची जात कशी आहे ? तर ती आठवणीची आठवण होऊ देत नाही. ह्यामुळे त्या प्रेमाने मूळ हेतूचा विसर पडून भक्तिरहस्य बोलविले  २४.

जेवीं कां निजबाळकातें । माउली बोल बोलवी त्यातें ।
तेवीं भक्तीनें मज केलें येथें । म्यां चुकी कोणातें ठेवावी ॥ २५ ॥
ज्याप्रमाणे आपल्या मुलाला आई बोलविते, त्याप्रमाणे येथे भक्तीने मला बोलके केले आहे. तेव्हा मी ह्यांत दोष कोणावर ठेवावा ? २५.

माउलीचें लोभाळूपण । प्रकट करी तो मूर्ख जाण ।
याहीपरी मी अज्ञान । चुकलेपण दिसताहे ॥ २६ ॥
आईचा वात्सल्यलोभ प्रगट करील तो मूर्ख होय. यापेक्षा मी अज्ञानपणाने चुकलों हेच खरें वाटतें २६.

उडिदीं काळें जेथींच्या तेथें । तेवीं चुकलेपण माझें येथें ।
चुकीचि मानावी निश्चितें । हेंही गुरुनाथें वारिलें ॥ २७ ॥
उडदाचा काळेपणा जसा जेथल्या तेथेच असतो, त्याप्रमाणे माझी येथे जी चुकी झाली असेल, ती खरोखर चुकीच मानावी, पण हेही गुरुनाथांनी ठेवलेले नाही २७.

चुकलेपणचि मानितां । मी हों पाहें कवि कर्ता ।
मीपण नावडे गुरुनाथा । तेणें तें तत्त्वतां सांडविलें ॥ २८ ॥
कारण चुकी झालेली मानली असतां मी कवि किंवा कर्ता होऊ पहातों असें झाले. परंतु गुरुनाथांना मीपणा मुळीच आवडत नाही. त्यांनी तो खरोखरच सोडावयास लावला आहे २८.

साङ्ग झालिया कथाकथन । तेणें श्लाघें न घ्यावें मीपण ।
तंव गुरूंनीं दावूनि निजखूण । मीतूंपण उडविलें ॥ २९ ॥
कथेचे वर्णन परिपूर्ण झाले असताही त्या अभिमानाने आत्मस्तुति करून मीपणा घेऊ नये. गुरूंनी हीच आत्मखूण दाखवून देऊन मीतूंपणा नष्ट केला २९.

हेही बोल बोलता । मी नव्हें नव्हें गा सर्वथा ।
मी नव्हें कवि कर्ता । हें गुरूंचे तत्त्वतां गुरु जाणे ॥ ४३० ॥
पण हे भाषण बोलणारासुद्धा मी मुळीच नव्हें हो नव्हें. मी कवीही नव्हें, आणि ग्रंथकर्ताही नव्हे. हे खरोखर गुरुचे गुरुच जाणतो ४३०.

तंव श्रोते म्हणती चमत्कार । भक्तिसुखाचें सुखसार ।
भक्तिपरमामृतसागर । उघड साचार तुवां केला ॥ ३१ ॥
तेव्हां श्रोते म्हणाले, काय चमत्कार आहे ! भक्तिसुखाचे सुखदायक रहस्य-भक्तिपरमामृतसमुद्र-तूं खरोखर अगदी उघडा केलास ३१.

भागवत मुख्य भक्तिप्रधान । जें भक्तीचें सुख सनातन ।
तें करतळामळ करूनि जाण । तुवां परिपूर्ण दाविलें ॥ ३२ ॥
भागवत हे मुख्यतः भक्तिप्रधान आहे. भक्तीचे जें सनातन सुख, तें पूर्ण रीतीने करतलामलकवत् उघडे करून दाखविलेंस ३२.

तुवां हा थोर केला उपकार । तरावया स्त्रियादि शूद्र ।
जग व्हावया भजनतत्पर । भागवत निजसार काढिलें ॥ ३३ ॥
तूं हा फार मोठा उपकार केलास. स्त्रियादिक व शूद्र  वगैरे उद्धरण्याकरिता, आणि जग भजनतत्पर होण्याकरितां तूं भागवताचे  सार काढलेस ३३.

भागवतींचें गुप्त पीयूख । तें त्वां प्रकटिलें भक्तिसुख ।
तेणें संत सुखावले देख । श्रोते सकळिक निवाले ॥ ३४ ॥
भागवतांतील जें  गुप्त अमृत तेच भक्तिसुख तूं स्पष्ट करून दाखविलेंस, त्यामुळे सर्व संत आनंदित झाले आणि सर्व श्रोते तृप्त  झाले ३४.

तुज संतोषोनि श्रीपती । दीधली आपली निजभक्ती ।
यालागीं तुवां भक्तीची कीर्ती । यथार्थस्थितीं वर्णिली ॥ ३५ ॥
तुला  श्रीकृष्णांनीच प्रसन्न होऊन आपली भक्ति दिली. म्हणूनच तूं भक्तीची कीर्ति यथार्थ रीतीने वर्णन केलीस ३५.

तुझे भक्त्तीचा एकेक बोल । ब्रह्मसुखेंसीं सखोल ।
त्याहीमाजीं प्रेमाची वोल । येताति डोल चित्सुखें ॥ ३६ ॥
तुझा भक्तीचा एकेक शब्द ब्रह्मानंदाहूनही अत्यंत गंभीर असा आहे. आणि त्यांतही प्रेमाचा ओलावा असल्यामुळे ज्ञानानंदाला अगदी भरतें येते ३६.

तुज वाखाणितां निजभक्ती । प्रेमें वोसंडे चित्तवृत्ती ।
विसरोनियां ग्रंथस्फूर्ती । भक्तीची कीर्ती वानिशी ॥ ३७ ॥
तूं ही आत्मभक्ति वर्णन करतांना तुझी चित्तवृत्ति प्रेमाने परिपूर्ण भरून वाहू लागते. ग्रंथाचे भान विसरून तूं भक्तीचे माहात्म्यच वर्णन करीत आहेस ३७.

निजाआवडी वाडेंकोडें । वानितां भक्तीचे पवाडे ।
तुज नाठवे मागेंपुढें । प्रेम गाढें जाणवलें ॥ ३८ ॥
आपल्याच आवडीने व उत्कंठेने भक्तीचे माहात्म्य वर्णन करतांना तुला मागची पुढची काही आठवण राहत नाही, इतकें तुझे अवर्णनीय प्रेम आम्हांला कळून चुकले ३८.

जंव जंव भक्तीचें निरूपण । अधिकाधिक वाढतां जाण ।
तंव तंव येतसे स्फुरण । तेथ कोण पुरे म्हणेल ॥ ३९ ॥
जो जो भक्तीचे निरूपण अधिक अधिक वाढू लागते, तो तों तुला स्फुरणच चढते. तेथे पुरे म्हणणार कोण? ३९.

जंव जंव निरूपणा वाढी । तंव तंव भक्तीची अधिक गोडी ।
तेणें श्रोत्यांचीही आवडी । चढोवढी वाढली ॥ ४४० ॥
जो जो निरूपण वाढते, तों तो भक्तीला अधिकच गोडी चढते. त्यामुळे श्रोत्यांचीही आवड पुढेपुढे वाढतच जाते ४४०.

करितां भक्तिसुखनिरूपण । श्रोते वक्ते लांचावले जाण ।
होतां अमृतांचे आरोगण । पुरे कोण म्हणों शके ॥ ४१ ॥
भक्तिसुखाचे निरूपण करतांना श्रोते आणि वक्ते दोघेही त्यांत लोलुप झाले आहेत. अमृताचें भोजन करतांना पुरे असें कोण म्हणू शकेल ? ४१.

यापरी गा अतिप्रीतीं । वाढली निरूपणीं भक्ती ।
ते आवरूनियां स्फूर्ती । पुढील ग्रंथार्थीं प्रवर्तें ॥ ४२ ॥
अशा प्रकारे अत्यंत प्रेमाने निरूपणामध्ये भक्ति वाढली. पण ती स्फूर्ति आतां आवरून धरून पुढील ग्रंथार्थ सुरू करावा" ४२.

हें ऐकोनि संतवचन । केलें साष्टांग नमन ।
भली दीधली आठवण । येरवीं निरूपण नावरतें ॥ ४३ ॥
हे संतांचे वचन ऐकून एकनाथांनी त्यांना साष्टांग नमन केले आणि म्हटले, “बरी आठवण केलीत, नाही तर हे निरूपण आवरले नसतें ४३.

‘भक्तियोगस्य मद्‌गतिः’ । ये पदाची पदव्युत्पत्ती ।
निरूपिली भगद्‌भक्ती । जेणें भगवत्प्राप्ती अतिसुलभ ॥ ४४ ॥
'भक्तियोगस्य मद्गति: ' ह्या पदाचा अर्थ सांगतांना, ज्या भक्तीने भगवत्प्राप्ति अत्यंत सुलभ होते, त्या भगवद्भक्तीचें निरूपण केले ४४.

हे न करितां भगवद्‌भक्ती । त्रिगुणगुणीं जीवपंक्ती ।
बांधिल्या संसारीं उन्मज्जती । तेही स्थिती हरि सांगे ॥ ४५ ॥
ही भगवद्भक्ति केली नाही तर त्रिगुणरूपी दोरांनी जीवांच्या पंक्तीच्या पंक्ति बांधल्या जाऊन त्या संसारांत जन्मास येतात. तीही स्थिति श्रीकृष्ण सांगतो ४५.

मया कालात्मना धात्रा कर्मयुक्तं इदं जगत् ।
गुणप्रवाह एतस्मिन् उन्मज्जति निमज्जति ॥ १५ ॥
[श्लोक १५] हे कर्मयुक्त जग कर्मफल देणार्‍या कालरूप माझ्यामुळे या गुणप्रवाहात कधी वर तर कधी अधोगतीला जाते. (१५)

मुख्य मूळीं मी जगाचा धरिता । स्त्रष्टृरूपें मीचि स्त्रजिता ।
विष्णुरूपें मी प्रतिपाळिता । मीचि संहर्ता रुद्ररूपें ॥ ४६ ॥
जगाला मुख्यतः मूळ धारण करणारा मी आहे; ब्रह्मादेवाच्या रूपाने उत्पत्ति करणारा मीच आहे; विष्णूच्या रूपाने प्रतिपाळ करणारा मीच आहे आणि रुद्ररूपाने संहार करणाराही मीच आहे ४६.

हे त्रिगुण काळाची काळसत्ता । तो मी निजकाळ तत्त्वतां ।
स्रजिता पाळिता संहर्ता । गुणावस्थाविभागें ॥ ४७ ॥
हे तीन गुण हीच काळाची सत्ता आहे, तोच मी खरोखर निजकाळ असून गुणावस्थेच्या स्वरूपाप्रमाणे उत्पन्न करणारा, पालन करणारा व संहार करणारा आहे ४७.

जनांचें वासनाकर्म विचित्र । तेचि काळसत्ता निजसूत्र ।
तेणें रचिला संसार । चराचर गुणबद्ध ॥ ४८ ॥
लोकांचे वासनाकर्म विचित्र आहे. तेच काळसत्तेचे आत्मसूत्र होय. त्यानेच हा गुणांनी बद्ध असलेला चराचर संसार उभारला आहे ४८.

गुणकर्में स्वर्गा चढे । गुणकर्में नरकीं पडे ।
नाना योनींचें सांकडें । भोगणें घडे गुणकर्में ॥ ४९ ॥
जीव गुणकर्माच्या योगानें स्वर्गास चढतो, आणि गुणकर्मामुळेच नरकांत पडतो. अनेक प्रकारच्या योनींची संकटे गुणकर्मामुळेच त्याला भोगावी लागतात ४९.

स्वर्ग भोगूनि वाडेंकोडें । महर्जनतपोलोकांपुढें ।
सत्यलोकवरी वरता चढे । उन्मज्जन घडे या नांव ॥ ४५० ॥
तो मोठ्या आनंदाने स्वर्गातील सुखोपभोग भोगून व महर्जनतपोलोक भोगून पुढे सत्यलोकापर्यंत वर चढतो. ह्यालाच 'उन्मजन' असें म्हणतात ४५०.

पशुपक्षिस्थावरांत । वृक्षपाषाणकृमित्व प्राप्त ।
महानरकीं अधःपात । निमज्जन एथ त्या नांव ॥ ५१ ॥
पशु, पक्षी, स्थावर, वृक्ष, पाषाण, किडे वगैरेमध्ये जन्म येत येत अखेरीस महानरकामध्ये अधःपतन होणे यालाच ' निमज्जन  ' असे नाव आहे ५१.

उंचीं चढोनि नीचीं पडणे । भोगवी नाना जन्ममरणें ।
तें प्रकृतिपुरुषांचें साजणें । जीवबंधनें भोगवी ॥ ५२ ॥
उंचावर चढून खाली पडणे, या उलाढालीत जें नानाप्रकारची जन्ममरणे भोगविते, तें प्रकृतिपुरुषांचे कार्य आहे. तेच जीवबंधने भोगावयास लावतें ५२.

अणुर्बृहत् कृशः स्थूलो यो यो भावः प्रसिध्यति ।
सर्वोऽपि उभयसंयुक्तः प्रकृत्या पुरुषेण च ॥ १६ ॥
[श्लोक १६] लहानमोठे, कृशस्थूल असे जे जे पदार्थ उत्पन्न होतात, ते सर्व प्रकृती आणि पुरूष या दोघांच्या संयोगानेच. (१६)

अणु म्हणिजे अतिसूक्ष्म सान । बृहत् म्हणिजे विशाळ जाण ।
कृश म्हणिजे किरकोळपण । स्थूळ तें पूर्ण जडावयवीं ॥ ५३ ॥
अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म लहान; बृहत् म्हणजे अत्यंत मोठे; कृश म्हणजे किरकोळपणा असलेले; आणि स्थूल म्हणजे पूर्णपणे जड अवयवांनी युक्त ५३, 

जें जें दृष्टिगोचर झालें । जें जें नांवरूपा आलें ।
तें तें उभययोगें केलें । जाण घडलें प्रकृतिपुरुषीं ॥ ५४ ॥
असें जे जे दृष्टीला दिसू लागते, जें जें नावारूपाला येते, तें तें प्रकृति आणि पुरुष ह्या उभयतांच्या संयोगानेच झालेले आहे ५४.

जें उभययोगसंभव । जग ऐसें ज्याचें नांव ।
तें प्रकृतिपुरुष सावेव । तिसरा भाव असेना ॥ ५५ ॥
जें दोन पदार्थाच्या संयोगापासून होते, जग असें नांव ज्याला आहे, ते मूर्तिमंत प्रकृतिपुरुषमयच होय. तिसरें स्वरूपच असत नाही ५५.

या दोहींवेगळें निरवयव । जेथूनि या दोहींचा उद्‌भव ।
तेचि सद्वस्तु सर्वीं सर्व । देवाधिदेव सांगत ॥ ५६ ॥
आता ह्या दोहीवेगळे जें निरवयव आहे, जेथून या दोघांचाही उद्भव होतो, तेच सर्वत्र सर्वस्वी व्यापून असलेलें परब्रह्म देवाधिदेव आतां सांगत आहे ५६.

यस्तु यस्यादिरन्तश्च स वै मध्यं च तस्य सन् ।
विकारो व्यवहारार्थो यथा तैजसपार्थिवाः ॥ १७ ॥
यदुपादाय पूर्वस्तु भावो विकुरुतेऽपरम् ।
आदिरन्तो यदा यस्य तत्सत्यमभिधीयते ॥ १८ ॥
[श्लोक १७-१८] ज्याच्या सुरूवातीला आणि शेवटी जे असते, तेच मध्ये असते आणि तेच सत्य आहे कार्य ही फक्त व्यवहारासाठी केलेली कल्पना आहे जशी बांगड्याकुंडले इत्यादी सोन्याची कार्ये किंवा घडागाडगे इत्यादी; मातीची कार्ये पहिला कारण पदार्थ ज्या परम कारणाच्या आधाराने पुढील कार्यपदार्थाला उत्पन्न करतो, तेच परमकारण केवळ सत्य असते कारण तेच कार्याच्या आधी आणि शेवटीही असते. (जसा भिजलेला मातीचा गोळा घड्याचे कारण असतो पण तो मूळ माती या परमकारणाच्या आधाराने घडारूप कार्याचे कारण बनतो भिजलेल्या गोळ्याच्या आधी माती, गोळ्यात माती, घड्यात माती आणि घडा फुटल्यावरही मातीच असते म्हणून मातीच सत्य होय). (१७-१८)

प्रकृतिपुरुषेंसीं साकार । जें दिसताहे चराचर ।
त्यासी आद्यंतें जें अनश्वर । तेंचि साचार मध्येंही ॥ ५७ ॥
प्रकृतिपुरुषासह हे जे साकार चराचर दिसते, ते आदी व अंती जसें नश्वर आहे, तसेच तें खरोखर मध्येही नश्वर आहे ५७.

लेण्याआधीं कनक एक । लेण्याअंतीं तेंचि आवश्यक ।
मध्येंही लेणेंरूपें देख । भासे कनक अद्वितीय ॥ ५८ ॥
दागिना करावयाच्या आधी जे सोने असते तेच दागिना मोडला तरीही कायम राहातें, आणि मध्यंतरीही तेंच शुद्ध सोनें दागिन्याच्या रूपाने भासत असते ५८.

न करितां मातीचें गोकुळ । पूर्वी मृत्तिकाचि केवळ ।
गोकुळ मोडल्या सकळ । उरे अविकळ मृत्तिका ॥ ५९ ॥
मातीचे गोकुळ करावयाच्या आधी केवळ मातीच असते, आणि गोकुळ पूर्णपणे मोडले म्हणजेही निखालस मातीच शिल्लक राहते ५९.

तेचि गोकुळरूपें असतां । भासे मृत्तिकाचि तत्त्वतां ।
तेंवी आदिमध्यअवसानतां । भासे चित्सत्ता अनश्वर ॥ ४६० ॥
तीच माती, गोकुळाच्या रूपाने असली, तरी ती खरोखर मातीच भासते. त्याप्रमाणे आदीं, मध्ये व अंतीही अविनाशी ब्रह्मतत्वच भासत असते ४६०.

त्रिगुणगुणें सविकार । जें जग दिसताहे साकार ।
तें मायिक गा चराचर । जेवीं व्यवहार स्वप्नींचा ॥ ६१ ॥
तीन गुणांच्या प्रभावाने विकृत झालेलें जें हें जग साकार दिसते, ते सर्व चराचर, ज्याप्रमाणे स्वप्नांतील व्यवहार केवळ मायिक असतो त्याप्रमाणे मायिक होय ६१.

सकळ विकारांचें कारण । अंगें अविद्या आपण ।
ते विकारीं सत्यता स्थापितां जाण । आलें सत्यपण अविद्येसी ॥ ६२ ॥
सर्व विकारांचे कारण स्वतः अविद्या हीच आहे. त्या विकारांत सत्यता स्थापित करूं लागले असतां अविद्येलाच खरेपणा येऊ लागेल ६२.

अविद्या आपुलेनि नांवें जाण । आपुलें नास्तिक्य सांगे आपण ।
हें वर्म जाणती सज्ञान । नेणोनि अज्ञान मानिती सत्य ॥ ६३ ॥
अविद्या ही आपल्याच नावाने आपला अस्तित्वरहितपणा आपणच सांगते. हे वर्म, ज्ञाते लोक जाणतात, परंतु अज्ञानी लोक तें समजून न घेऊन अविद्येलाच सत्य मानतात ६३.

अविद्या अविद्यकत्वें मिथ्या जाण । वस्तु वस्तुत्वें सदा संपन्न ।
येचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६४ ॥
अविद्या ही अविद्यकत्वामुळे मिथ्या आहे, आणि ब्रह्म हे ब्रह्मत्वामुळेच सर्वदा संपन्न आहे. याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगतो ६४.

प्रकृतिअंगीकारें देख । वस्तूपासाव होती लोक ।
जेवीं निद्रायोगें एक । होय अनेक निजस्वप्नीं ॥ ६५ ॥
ज्याप्रमाणे निद्रेच्या योगाने आपण स्वप्नांमध्ये वस्तुत: एकच असतां अनेक होतो, त्याप्रमाणे प्रकृतीचा अंगीकार केल्यामुळेच ब्रह्मापासून अनेक लोक होतात ६५.

जेवीं तंतूपासाव कोटि पट । कोटि पटीं तंतु एकवट ।
पाहतां आदि मध्य शेवट । द्वैताचें बोट रिघेना ॥ ६६ ॥
ज्याप्रमाणे तंतूपासून कोट्यवधि वस्त्रें होतात, तरी त्या कोट्यवधि वस्त्रांमध्ये तंतु एकसारखा एकच एक असतो; वस्त्राचा आदि, मध्य किंवा शेवट पाहिला तरी तंतूखेरीज दुसऱ्या पदार्थाचें दुजेपणाचे बोटही शिरकलेले दिसत नाही ६६; 

तेवीं वस्तूपासोनियां लोक । प्रकृतिपुरुषादि सकळिक ।
आदि-मध्य-अवसानीं एक । द्वैतवार्ता देख असेना ॥ ६७ ॥
त्याप्रमाणे प्रकृतिपुरुषादि सर्व लोक परमात्म्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. त्यामुळे ते आदीं, मध्ये व अंती एका परब्रह्म स्वरूपाचेच आहेत. त्यांत द्वैताची गोष्टसुद्धा असत नाही ६७.

तंतु सत्य पट मायिक । वस्तु सत्य अविद्या लटिक ।
जें आदि-मध्य-अवसानीं एक । तें सत्य निष्टंक उद्धवा ॥ ६८ ॥
तंतु खरा असून वस्त्र हे मायिक असते, त्याप्रमाणे परब्रह्म खरे असून माया ही लटकी आहे. उद्धवा ! जें आदीं, मध्य व अंती एकच असते तेंच शुद्ध सत्य होय ६८.

जेवीं कां काष्ठाची बाहुली । काष्ठावयवें शोभे आली ।
तेवीं वस्तु वस्तुत्वें एकली । शोभा पावली जगत्वें ॥ ६९ ॥
ज्याप्रमाणे लाकडाची बाहुली लाकडाच्याच अवयवांनी शोभते, त्याप्रमाणे ब्रह्म हें ब्रह्मस्वरूपाने एकच असून जगाच्या रूपाने शोभा पावलें आहे ६९.

जेवीं कां एकलें देह देख । दिसे अवयवरूपीं अनेक ।
तेवीं वस्तु एकली एक । आभासे अनेकस्वरूपीं ॥ ४७० ॥
ज्याप्रमाणे देह हा एकटा एक असून तो निरनिराळ्या अवयवरूपांनी अनेक प्रकारचा दिसतो, त्याप्रमाणे ब्रह्मही एकटें एकच असून तें अनेक स्वरूपांनी भासते ४७०.

जेवीं कां जळीं क्रीडतां जळा । उपजवी तरंगांच्या माळा ।
तेवीं वस्तूचिया स्वलीळा । जगदादि मेळा प्रकाशे ॥ ७१ ॥
ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाणीच खेळत असतां तें तरंगांच्या अनेक मालिका उत्पन्न करिते, त्याप्रमाणे परब्रह्माच्या लीलेनेच जगत् इत्यादि सर्व वस्तुसमुदाय प्रगट होतो ७१.

तरंगा आदि-मध्य-अवसानीं । जेवीं पाणीपणें असे पाणी ।
तेवीं उत्पत्ति स्थिति-निदानीं । वस्तु वस्तूपणीं अनश्वर ॥ ७२ ॥
तरंगांच्या आदी, मध्ये व अंती जसे पाण्याच्या रूपाने पाणीच असते, त्याप्रमाणे उत्पत्ति, स्थिति व लय ह्यांमध्ये ब्रह्म हें ब्रह्मरूपानेच अविनाशी असते ७२.

ब्रह्म सत्य प्रपंच वावो । हा साधकां साधावया निर्वाहो ।
कार्यकारणअभिन्नभावो । देवाधिदेवो बोलिला ॥ ७३ ॥
म्हणून ब्रह्म हे सत्य आहे आणि प्रपंच हा मिथ्या आहे, हा विचार साधकांना समजण्यासाठी कार्यकारणामध्ये अभिन्नभावच आहे, असे  देवाधिदेव बोलला ७३.

कार्य कारणीं अभिन्न । तैं ब्रह्मीं माया कैंची भिन्न ।
जगद्‌रूपें ब्रह्म परिपूर्ण अन्योपदेशें जाण दाविलें ॥ ७४ ॥
कार्य जर कारणाशी अभिन्न ( एकरूप) आहे, तर ब्रह्मामध्ये माया ही भिन्न कशी ? अशी शंका येईल, यासाठीच ब्रह्म हेंच जगदूरूपाने परिपूर्ण नटलेलें आहे, असे पर्यायाने दाखवून दिले ७४. 

ब्रह्म माया काळगती । यें तिन्हीं अनादि म्हणती ।
तेही न घडे उपपत्ती । येचि अर्थीं हरि बोले ॥ ७५ ॥
ब्रह्म, माया आणि काळाची गति ही तिन्ही अनादि आहेत असे म्हणतात, परंतु तेही म्हणणे युक्तीला धरून नाही. याच हेतूनें श्रीकृष्ण सांगतो ७५.

प्रकृतिर्ह्यस्य उपादानं आधारः पुरुषः परः ।
सतोऽभिव्यञ्जकः कालो ब्रह्म तत् त्रितयं त्वहम् ॥ १९ ॥
[श्लोक १९] या प्रपंचाचे उपादनकारण प्रकृती आहे, आधार परमात्मा आहे आणि यांना प्रगट करणारा काल आहे प्रकृती, परमपुरूष आणि काल ही तिन्ही रूपे खरे पाहता ब्रह्मस्वरूपच आहेत आणि तेच शुद्ध ब्रह्म मी आहे. (१९)

ब्रह्मावेगळी माया । सर्वथा न ये आया ।
ते ब्रह्माधारें वाढोनियां । गुणकार्या वाढवी ॥ ७६ ॥
ब्रह्माशिवाय वेगळी अशी माया कधीच दृष्टोत्पत्तीस येत नाही. ती ब्रह्माच्याच आश्रयाने वाढून गुणांचे कार्य वाढविते ७६.

मायानियंतें ब्रह्म आपण । यालागीं यासी पुरुषपण ।
पुरुषाची प्रिया माया पूर्ण । प्रकृति अभिधान या हेतू ॥ ७७ ॥
मायेचे नियंते स्वतः परब्रह्मच असते, म्हणूनच त्याच्याकडे पुरुषस्व आहे. माया ही त्या पुरुषाची अत्यंत प्रिय आहे, ह्यामुळेच  तिला प्रकृति असें नांव आहे ७७. 

ब्रह्माहून पुरुष भिन्न । हें सर्वथा मिथ्या वचन ।
ब्रह्म पुरुष नामाभिधान । एकासीचि जाण आलें असे ॥ ७८ ॥
ब्रह्माहून पुरुष भिन्न आहे असे म्हणणे सर्वस्वी खोटे आहे. ब्रह्म  आणि पुरुष ही नावे एकालाच आलेली आहेत असे समज ७८.

माया प्रकृति अभिधान । दोहीं नांवीं मायाचि पूर्ण ।
आविद्यक दावी कार्य भिन्न । अविद्या जाण या हेतू ॥ ७९ ॥
माया आणि प्रकृति ही जी दोन नावे आहेत. त्या दोन्ही नावांनी 'माया' असाच अर्थ पूर्णपणे समजावयाचा. ती माया निराळेच अविद्यात्मक कार्य दाखविते, यामुळे तिला ' अविद्या' असे म्हणतात ७९.

माया ब्रह्मींची शक्ति जाण । तेही ब्रह्मेंसीं असे अभिन्न ।
वेगळी नव्हे अर्धक्षण । सदा सुलीन ब्रह्मेंसीं ॥ ४८० ॥
माया ही ब्रह्मांतली शक्ति आहे हे लक्षात ठेव. पण तीसुद्धा ब्रह्माशी एकरूप झालेली आहे. ती त्याच्यापासून अर्धंक्षणही वेगळी होत नाही. ती सदोदित ब्रह्मामध्येच लीन झालेली असते ४८०.

जेवीं शूरांची शौर्यशक्ति पूर्ण । शूरांहोनि नव्हे भिन्न ।
तेवीं ब्रह्मीं मायाशक्ति जाण । असे सुलीन सर्वदा ॥ ८१ ॥
शूरांची शौर्य ही शक्ति ज्याप्रमाणे शूरांहून काही निराळी नव्हे, त्याप्रमाणेच ब्रह्मामध्ये ही मायाशक्ति सदासर्वदा एकरूपच असते ८१.

माया ब्रह्मीं असतां जाण । क्षोभेंवीण नव्हे सर्जन ।
मायाक्षोभकू काळ पूर्ण । काळास्तव जन जन्मती ॥ ८२ ॥
माया ही  ब्राह्ममध्येच असते तरीही ती क्षोभल्याशिवाय दृष्टीची उत्पत्ति होत नाही. मायेला क्षोभविणारा काळ होय. ह्या काळापासूनच लोक जन्मास येतात ८२.

ब्रह्मींची सत्ता तो काळ जाण । प्रकृति क्षोभवूनि आपण ।
दावी उत्पत्ति स्थिति निदान । तो काळही अभिन्न ब्रह्मेंसीं ॥ ८३ ॥
ब्रह्मांतील जी सत्ता, तो काळ होय. तो काळच आपण होऊन प्रकृतीला क्षुब्ध करतो, आणि उत्पत्ति, स्थिति व  लय ही दाखवितो. तो काळसुद्धां ब्रह्माशी एकरूपच आहे ८३.

जेवीं रायाच्या राजपुत्रासी । राजाचि दमूं शके त्यासी ।
तेवीं झालें जें प्रकृतीचे कुशीं । तें निजसत्तेसी निर्दळी ॥ ८४ ॥
ज्याप्रमाणे राजाच्या मुलाला राजाच आळा घालू शकतो , त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटी जो काळ जन्मास येतो, त्याला ती आपल्या सत्तेने नष्ट करते ८४.

विवेकदृष्टीं पाहतां जाण । काळ परमात्मा दोन्ही अभिन्न ।
प्रकृति पुरुष काळ जाण । तिहींसी एकपण या हेतू ॥ ८५ ॥
विचारदृष्टीने पाहिले असतां काळ आणि परमात्मा ही दोन्ही एकरूपच आहेत. तात्पर्य प्रकृति, पुरुष आणि काळ या तिघांमध्ये यामुळेच एकरूपता असते ८५.

ब्रह्ममाया-काळसंबंध । हे तिनी मूळींचि अभेद ।
दिसे जो व्यावहारिक भेद । तोही अबद्ध मिथ्यात्वें ॥ ८६ ॥
ब्रह्म, माया आणि काळ यांचा संबंध असा आहे की, ही तिन्ही मूळचींच एकरूप आहेत. त्यांत जो व्यावहारिक भेद दिसतो, तोही मिथ्यात्वाच्या योगाने असंबद्धच आहे ८६.

वस्तु एकलीचि आपण । प्रकृति-पुरुष काळरूपें जाण ।
अखंडत्वें दावितां पूर्ण । तो मी श्रीकृष्ण परमात्मा ॥ ८७ ॥
ब्रह्म आहे ते एकटें एकच आहे. प्रकृति व पुरुष यांची स्वरूप काळरूपाने वेगळी भासतात. ती अखंडत्वाने पाहिली असता तोच मी श्रीकृष्ण परमात्मा होय ८७.

उत्पत्तीपूर्वी मी ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीचें मी ब्रह्म आदिकारण ।
स्थितिकाळीं मी ब्रह्मरूपें जाण । एकीं अनेकपण स्वयें दावीं ॥ ८८ ॥
उत्पत्तीच्या पूर्वी पूर्ण ब्रह्म तो मी; उत्पत्तीचें आदिकारण जें ब्रह्म तें मी; आणि स्थितिकाळी ब्रह्मरूपाने अरुणारा मीच, अशी मी स्वतः एकांतच अनंत रूपं दाखवितों ८८.

स्वलीला सृष्टीचे प्रांतीं जाण । प्रळयीं उरें मी ब्रह्म परिपूर्ण ।
तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८९ ॥
आपल्याच लीलेने सृष्टीच्या अखेरीस प्रळय झाल्यानंतर मी परिपूर्ण ब्रह्मस्वरूपच शिल्लक उरतों. या अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगतो ८९.

स्वर्गः प्रवर्तते तावत् पौर्वापर्येण नित्यशः ।
महान् गुणविसर्गार्थः स्थित्यन्तो यावदीक्षणम् ॥ २० ॥
[श्लोक २०] जोपर्यंत परमात्म्याची ईक्षणशक्ती आपले काम करीत राहाते, तोपर्यंत जीवांच्या कर्मभोगासाठी कारणकार्यरूपाने हे विविध सृष्टिचक्र अखंड चालू राहाते. (२०)

महान् म्हणिजे अतिथोरू । पितृपुत्रप्रवाहें संसारू ।
अनवच्छिन्न निरंतरू । अतिदुर्धरू वाढला ॥ ४९० ॥
पिता, पुत्र, अशा परंपरेनें संसार हा महान् म्हणजे अत्यंत मोठा झालेला आहे. हा अगदी अखंड, निरंतर असणारा आणि अत्यंत दुर्धर असा वाढलेला आहे ४९०.

अतिशयेंसीं दुर्धरू । कैसेनि वाढला संसारू ।
तेही अर्थींचा विचारू । शार्ङ्गधरू सांगत ॥ ९१ ॥
हा संसार अतिशय दुर्धर असा कशाने वाढला ? त्याबद्दलचाही विचार श्रीकृष्ण सांगतो ९१.

विषयांचिये आसक्ती । वासनानिष्ठ झाली वृत्ती ।
ते देहात्मता अतिप्रीतीं । संसारस्थिती वाढवी ॥ ९२ ॥
विषयांच्या आसक्तीने वृत्ति ही वासनानिष्ठ होते, आणि ती देहभावनेने अत्यंत प्रेमाने संसाराचे स्वरूप वाढविते ९२.

खवळला जो देहाभिमान । तो शुद्धासी लावी जीवपण ।
नाना योनीं जन्ममरण । विशेषें जाण वाढवी ॥ ९३ ॥
जो देहाभिमान खवळलेला असतो, तो त्या शुद्ध परब्रह्माला जीवपणा लावतो, आणि नाना प्रकारच्या योनीत जन्ममरण हे मुख्यत्वेकरून वाढवीत असतो ९३.

ऐसेन अतिदुर्धरू । स्रष्टेन सृजिला संसारू ।
तो ब्रह्मायूपर्यंत स्थिरू । ब्रह्मप्रळयीं संहारू सृष्टीचा ॥ ९४ ॥
अशा रीतीनें ब्रह्मदेवाने अत्यंत दुर्धर असा संसार उत्पन्न केला आहे. तो ब्रह्मदेवाचे आयुष्य असेपर्यंत असाच कायम राहावयाचा, आणि ब्रह्मप्रळय होईल तेव्हां सृष्टीचा संहार व्हावयाचा ९४.

एक नित्यप्रळयो लागला आहे । एक दैनंदिन प्रळयो पाहें ।
कर्मजन्य प्रळयो लाहे । एक तो होये अवांतर प्रळयो ॥ ९५ ॥
एक नित्यप्रळय लागलेला आहे, आणि एक दैनंदिन प्रळय  आहे. तसाच एक कर्मजन्य प्रळय होत असतो आणि एक अवांतर प्रळय होतो ९५.

सकळ प्रळयांच्या शिरीं । ब्रह्मप्रळयाची थोरी ।
तो सकळ सृष्टीतें संहारी । कांहीं संसारीं उरों नेदी ॥ ९६ ॥
पण या सर्व प्रळयांहून श्रेष्ठ  अशी ब्रह्मप्रळयाची थोरवी आहे. कारण तो सर्व सृष्टीचा संहार करितो व संसारांत कांहींच शिल्लक उरू देत नाहीं ९६.

ब्रह्मप्रळयीं नाश सृष्टीसी । पुढती रचावया कल्पादीसी ।
उंच नीच नाना योनींसी । नव्या करावयासी कारण काय ॥ ९७ ॥
ब्रह्मप्रळयांत सृष्टीचा नाश करावयाचा आणि नंतर नव्या कल्पाच्या आरंभी सृष्टि रचण्याकरिता उंच-नीच अशा नानाप्रकारच्या योनींना नवीन तयार करावयाचे, ह्याला कारण काय ? ९७.

ब्रह्मप्रळयीं सृष्टीचा र्‍हासू । परी निःशेष नव्हेचि नाशू ।
उरे वासनाबीजविलासू । सुलीन रहिवासू अविद्येअंगीं ॥ ९८ ॥
ब्रह्मप्रळयांतही सृष्टीचा लय होतो खरा, पण निखालस नाश होत नाही. तर वासनारूप बीजविभाग शिल्लक उरतो, आणि तो अविद्येच्या अंगामध्ये पूर्णपणें लीन होऊन राहिलेला असतो ९८. 

तेचि बीजें कल्पादि जाण । मीचि स्त्रष्टृरूपें आपण ।
मज म्यां अनुग्रहूनि पूर्ण । सूक्ष्म कारण लक्षविलें ॥ ९९ ॥
 त्याच वासनारूप बीजाने कल्पाचा आरंभ होतो. ब्रह्मदेवाच्या रूपाने मीच स्वतः मलाच पूर्णपणे अनुग्रह करून ते सूक्ष्म कारण पहावयास लाविले ९९.

जेवीं वर्षाकाळीं नाना तृणें । वाढूनि शरत्काळीं होती पूर्णें ।
तींच उष्ण काळीं बीजकणें । होती सुलीनें पृथ्वीसी ॥ ५०० ॥
ज्याप्रमाणे पावसाळ्यांत नानाप्रकारची गवते वाढून ती शरदृतूंत पूर्ण दशेला येतात, आणि त्याचीच बीजकणे उन्हाळ्यांत पृथ्वीशी मिळून जातात ५००, 

सुलीन बीजें पूर्ण क्षितीं । परी तीं कोणा व्यक्ती न येती ।
तेवीं वासनाबीजें प्रळयांतीं । उरे अव्यक्तीं संसारू ॥ १ ॥
तीं बीजे पृथ्वीवर सर्वत्र पसरलेली असतात पण ती कोणाला उघड दिसत नाहीत, त्याप्रमाणे प्रळयाच्या शेवटीं वासनाबीजरूपाने संसार अव्यक्तामध्ये शिल्लक राहतो १.

जेवीं काळीं वरुषलेनि घनें । बीजें विरुढती सत्राणें ।
वाढती नाना जातींचीं तृणें । पूर्वलक्षणें यथास्थित ॥ २ ॥
ज्याप्रमाणे ती उन्हाळ्यात जमिनीवर पडलेली बीजें वर्षाकाळांत पाऊस पडला म्हणजे जोराने उगवतात आणि नाना प्रकारची गवते पूर्वीप्रमाणे अगदी हुबेहूब वाढत असतात २, 

तेवीं उत्पत्तिकाळावरी । सूक्ष्मवासना बीजांकुरीं ।
नाना योनी चराचरीं । जंगमस्थावरीं जग वाढे ॥ ३ ॥
त्याप्रमाणे उत्पत्तिकाळाच्या वेळी सूक्ष्म वासनारूप बीजांकुरांनी अनेक योनीमध्यें चराचर आणि स्थावर-जंगमात्मक जग वाढते ३.

व्रह्मयाचे प्रळयाआंतू । निःशेष सृष्टीचा नव्हे अंतू ।
यालागीं संसारीं अनंतू । वेदशास्त्रार्थू प्रतिपादी ॥ ४ ॥
ब्रह्मदेवाच्या प्रळयांतसुद्धा सृष्टीचा पूर्णपणे नाश होत नाही. म्हणूनच संसार अनंत आहे असें वेद शास्त्रांत  प्रतिपादन केले आहे ४, 

ऐसा संसार अनंतू । याचा निःशेष होय अंतू ।
तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथू । श्लोकींचा पदार्थू बोलिला ॥ ५ ॥
पण अशा प्रकारे संसार अनंत असूनही ह्याचा निःशेष नाश होउं शकतो, याच अर्थान श्रीकृष्णनाथाने लोकांतील शब्दार्थ सांगितला  ५.

‘स्थित्यन्तो यावदीक्षणम्’ । येणें पदें श्रीकृष्ण ।
अत्यंत प्रळयींचें लक्षण । सूत्रप्राय जाण बोलिला ॥ ६ ॥
'स्थित्यन्तो यावदीक्षणम्' या शब्दांनी श्रीकृष्णाने अत्यंत प्रळयाचे लक्षण थोडक्यांत सांगितले ६.

‘ईक्ष्ण’ या पदाचा अर्थ जाण । सद्‌गुरुकृपादृष्टि पूर्ण ।
तेंचि माझें कृपावलोकन । जेणें ब्रह्मज्ञान प्रकाशे ॥ ७ ॥
'ईक्षण' ह्या पदाचा अर्थ 'सद्गुरूची पूर्ण कृपादृष्टि' असा आहे. ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञान प्रगट होते तेच माझें कृपावलोकन होय ७. 

पूर्ण प्रकाशल्या ब्रह्मज्ञान । संसार झाला नाहींच जाण ।
वस्तु वस्तुत्वें परिपूर्ण । मीतूंपण असेना ॥ ८ ॥
ब्रह्मज्ञान पूर्णपणे प्रगट झाले असतां संसार झालाच नाही असे होते. मग ब्रह्म हेंच ब्रह्मरूपाने पूर्ण स्वरूपाने राहते, आणि मीतूंपणा उरत नाही ८.

तेथ ध्रुवमंडळाची ठेली मात । वैकुंठकैलासा झाला प्रांत ।
शेषशायीचाही अंत । ब्रह्मज्ञानांत होऊं सरला ॥ ९ ॥
तेव्हां ध्रुवमंडळाची गोष्टच नाहीशी होते. वैकुंठ आणि कैलास यांचाही अंत होतो. फार काय सांगावें ? पण त्या ब्रह्मज्ञानामध्ये शेषशायीचाही अंत होऊन जातो ९.

हारपलें मीतूंपण । उडालें देव-भक्त भजन ।
बुडालें साकारतेचें भान । ब्रह्म सनातन सदोदित ॥ ५१० ॥
मीतूंपण हरपून जाते; देव, भक्त आणि भजन हा भेद नाहीसा होतो; सगुण मूर्तीचे भान उडून जाते; आणि सदासर्वदा सनातन ब्रह्मच काय तें उरते  १०;

प्रपंच एक झाला होता । हे समूळ मिथ्या वार्ता ।
पुढें होईल मागुता । कदा कल्पांता घडेना ॥ ११ ॥
 प्रपंच म्हणून कोणी एक झाला होता, ही गोष्टच मुळी सर्वस्वी खोटी. किंवा तो पुन्हा पुढे होईल असेंही कल्पांती देखील घडावयाचे नाही ११; 

हें अत्यंत प्रळयाचें लक्षण । भाग्येंवीण न पाविजे जाण ।
ज्यासी साचार सद्‌गुरुचरण । ते सभाग्य जन पावती ॥ १२ ॥
हे अत्यंत प्रळयाचे लक्षण होय, ते भाम्या भाग्याशिवाय कधीही कळावयाचे नाही. ज्यांना खरोखर सद्गुरुचरणाचा लाभ घडला, ते भाग्यवान् लोकच ते जाणू शकतात १२.

अत्यंत प्रळयींची गती । न घडे गा समस्तांप्रती ।
हे परम निर्वाणगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १३ ॥
अत्यंत प्रळयाची गति कांही सर्वांनाच कळत नाही. कारण की, उद्धवा ! ही खरोखर परमनिर्वाणाचीच गति आहे असे खात्रीने समज १३.

ज्याची अहंममता खुंटे । त्याची निःशेष कल्पना तुटे ।
अत्यंत प्रळयो त्यासीच भेटे । नेटेंपाटें निजात्मता ॥ १४ ॥
ज्याची अहंममता खुंटते, त्याची कल्पनाही निःशेष नष्ट होते, आणि त्यालाच आत्मस्वरूपाचा बोध झाल्यामुळे अत्यंत प्रळयाचा लाभ घडतो १४.

देह पडलिया प्रळयो घडे । हें बोलणे सर्वथा कुडें ।
जितांचि हा प्रळयो जोडे । वाडेंकोडें निजनिष्ठा ॥ १५ ॥
देह पडला की प्रळय झाला हे बोलणे सर्वस्वी खोटें आहे. आत्मनिष्ठा असली तर जिवंतपणीच हा प्रळय अवश्य प्राप्त होईल १५.

जितांचि हा प्रळयो जाण । येणें संसारबीजदहन ।
आतां ब्रह्मप्रळयलक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ १६ ॥
जिवंतपणींच हा प्रळय झाला तर याच्या योगाने संसाराचें बीजच दग्ध होऊन जाते. आता ब्रह्मप्रळयाचेही संपूर्ण लक्षण सांगतों ऐक १६.

ब्रह्मांडप्रळयाचा अनुक्रम । तेथ अंतीं उरे पूर्ण ब्रह्म ।
हें उद्धवें जाणावया वर्म । पुरुषोत्तम बोलत ॥ १७ ॥
ब्रह्मांडप्रळयाचा जो अनुक्रम आहे, त्यात शेवटीं पूर्ण ब्रह्म शिल्लक राहतेच. हे वर्म उद्धवाने जाणून घ्यावे यासाठी पुरुषोत्तम सांगतो १७.

विराण्मयाऽऽसाद्यमानो लोककल्पविकल्पकः ।
पञ्चत्वाय विशेषाय कल्पते भुवनैः सह ॥ २१ ॥
[श्लोक २१] मी कालरूपाने हे ब्रह्मांड व्यापलेले असते, तोपर्यंत विविध लोकांची उत्पत्ती व संहार होत असतात जेव्हा मी प्रलय करण्याचा संकल्प करतो, तेव्हा ब्रह्मांड भुवनांसह विनाशाला योग्य होते. (२१)

चतुर्दशभुवनेंसीं ब्रह्मांड । काळें कल्पिलें प्रचंड ।
तें स्थितिकाळीं पाळूनि अंड । अंतीं नाशाचें बंड आदरी काळू ॥ १८ ॥
चौदा लोकांसह हे प्रचंड ब्रह्मांड काळाने कल्पनेने रचलेले आहे. ते अस्तित्वात असतांना त्याचे पालनपोषण करून शेवटी त्याच्या नाशाचा उपद्व्यापही काळच करतो १८.

तो तूं काळ म्हणशी कोण । तरी काळात्मा मीचि जाण ।
तेणें काळें म्यां प्रळयईक्षण । केलें जाण सृष्टीसी ॥ १९ ॥
असा तो काळ तरी कोण? असें तूं म्हणशील, तर त्या काळाचा आत्मा तो मीच होय असे समज. त्याच काळस्वरूपाने मी सृष्टीकडे संहाराच्या दृष्टीने पाहतो १९.

पंचभूतांचे भिन्न भाग । काळसत्ता राखिले विभाग ।
ते सत्ता म्यां आवरितां सांग । खवळे लगबग पंचत्वासी ॥ ५२० ॥
पंचमहाभूतांचं जे भिन्न भिन्न भाग आहेत, ते विभाग काळाच्या सत्तेनेंच रक्षण केले आहेत. ती सर्व सत्ता मी आवरून घेतली असता पंचमहाभूतांचीही गडबड उडून जाते ५२०.

जैसा उत्पत्तीचा उपक्रमू । तैसाचि प्रळयाचा अनुक्रमू ।
भूतीं भूतलयो सुगमू । पुरुषोत्तमू सांगत ॥ २१ ॥
उत्पत्तीचा जसा उपक्रम आहे, तसाच प्रळयाचाही अनुक्रम आहे. भूतांमध्येच भूतांचा सहज लय होऊन जातो, हेंच श्रीकृष्ण सांगतो २१.

अन्ने प्रलीयते मर्त्यं अन्नं धानासु लीयते ।
धाना भूमौ प्रलीयन्ते भूमिर्गन्धे प्रलीयते ॥ २२ ॥
[श्लोक २२] विनाशाच्या वेळी प्राण्यांचे शरीर अन्नामध्ये, अन्न बीजामध्ये, बीज भूमीमध्ये आणि भूमी गंधतन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते. (२२)

म्यां पाहिल्या प्रळयदृष्टीं । पडोनि ठाके अनावृष्टी ।
तेणें अन्न क्षीण होय सृष्टीं । अन्नापाठीं शरीर ॥ २२ ॥
मी प्रळयाच्या दृष्टीने पाहिले असता अवर्षण पडून राहाते, आणि त्यामुळे सृष्टीत अन्न अत्यंत कमी होते. अन्न क्षीण झाले की मागोमाग शरीरही क्षीण होतें २२.

येथ असे ‘अन्नमय प्राण’ । हें वचन प्रत्यक्ष प्रमाण ।
ते अन्न होतांचि क्षीण । अन्नासवें प्राण प्राण्यांचे जाती ॥ २३ ॥
येथे ' अन्नमय प्राण असतो ' हे वचन प्रत्यक्ष प्रमाण आहेच. तें अन्न कमी होतांच त्या अन्नाबरोबर प्राण्यांचे प्राणही निघून जातात २३.

अन्नवृद्धि खुंटल्या धान्य । बीजमात्र राहे आपण ।
तेंही पृथ्वीसी होय लीन । तत्काळ जाण उद्धवा ॥ २४ ॥
अन्नाची वाढ खुंटली असतां धान्य हें स्वतः बीजरूपाने मात्र राहते. परंतु उद्धवा ! तेंही तत्काल पृथ्वीतच एकरूप होऊन जाते, हे लक्षात ठेव २४.

तंव द्वादशादित्यमेळा । एकत्र होय रविमंडळा ।
तो पीठ करी पर्वतशिळा । तेही तृणसाळा उरों नेदी ॥ २५ ॥
तो इतक्यांत बारा सूर्याचा समुदाय सूर्यमंडळामध्ये एकत्र जमतो. तो पर्वत व दगडधोंडे यांचेही भस्म करून टाकतो आणि गवतकाडीही शिल्लक राहू देत नाही २५.

तेणें तापलें सप्तपाताळ । पोळलें शेषाचें कपाळ ।
तो वमी विषाग्निकल्लोळ । महाज्वाळ धडधडीत ॥ २६ ॥
त्या योगाने सप्त पाताळें तापून जातात, आणि शेषाचे मस्तक होरपळतें. तो विषाग्निच्या ज्वाळा भडाभड ओकू लागतो, आणि त्यांचा मोठा जाळ धडाडू लागतो २६.

तो संकर्षणमुखानळ । पार्थिव जाळी सकळ ।
ब्रह्मांड जाळोनि तत्काळ । पृथ्वी केवळ भस्म करी ॥ २७ ॥
तो शेषाच्या मुखांतून निघालेला अग्नि पृथ्वीवरील सर्व वस्तू जाळून टाकतो, आणि तत्काळ सर्व ब्रह्मांड जाळून पृथ्वी निखालस भस्म करून सोडतो २७.

तेव्हां पृथ्वीचें पृथ्वीपण सरें । तें गंधमात्रस्वरूपें उरे ।
तोही गंधू जळीं विरे । तेंचि शार्ङ्गधरें सांगिजे ॥ २८ ॥
त्या वेळी पृथ्वीचे पृथ्वीपण संपते आणि ती गंधस्वरूपाने मात्र उरते. मग तो गंधही पाण्यामध्ये विरून जातो, तेच श्रीकृष्ण सांगतो २८.

अप्सु प्रलीयते गन्ध आपश्च स्वगुणे रसे ।
लीयते ज्तोतिषि रसो ज्योती रूपे प्रलीयते ॥ २३ ॥
[श्लोक २३] गंध पाण्यामध्ये, पाणी आपला गुण जो रस त्यामध्ये, रस तेजामध्ये आणि तेज रूपामध्ये लीन होऊन जाते. (२३)

तेव्हां प्रळयमेघांचा मेळा । शुंडादंडधारा प्रबळा ।
शत वरुषें वर्षतां जळा । सप्तसमुद्रमेळा एकत्र जाहला ॥ २९ ॥
त्या वेळी प्रळयमेघांचे मोठमोठे समुदाय शुंडादंडाप्रमाणे मोठमोठ्या धारांनी भयंकर वृष्टि करितात. अशा रीतीने शंभर वर्षांपर्यंत पाण्याचा वर्षाव होत असल्यामुळे सात समुद्रांचा समुदाय एकत्र होतो २९.

तेणें जळ कोंडलें सुबद्ध । ते जळीं पृथ्वीचा विरे गंध ।
तेव्हां जळचि एकवद । प्रळयीं प्रसिद्ध उधवलें पैं ॥ ५३० ॥
त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी तुंबून राहते, आणि त्या पाण्यांत पृथ्वीचा उरलेला गंधही विरून जातो, तेव्हां जिकडे तिकडे सारे एकत्र जमलेले पाणी प्रळयाला पूर्णपणे सिद्ध होते ५३०.

सांवर्तक मेघांचें लक्षण । सिंधु एकत्र करिती पूर्ण ।
पृथ्वी विरवूनियां जाण । ते जळीं आपण विरोनि जाती ॥ ३१ ॥
 सांवर्तक मेघांचे लक्षण असे आहे की, प्रळयकाळी ते सर्व समुद्र पूर्णपणे एकत्र करितात आणि पृथ्वीला विरवून त्याच पाण्यामध्ये आपण विरून जातात ३१.

ते काळीं अतिदुर्धर । सांवर्ताग्नि खवळे थोर ।
तो जळ शोषी सर्वत्र । उरे रसमात्र अवशेष ॥ ३२ ॥
त्या वेळी अत्यंत भयंकर सांवर्त अग्नि क्षुब्ध होतो, आणि तो सर्व ठिकाणचे पाणी आटवून टाकून रस मात्र शिल्लक ठेवतो ३२.

रसमात्र जळ उरे तेंही । लीन होय तेजाचे ठायीं ।
तेव्हां तेजचि दिशा दाही । कोंदोनि पाहीं वोसंडे ॥ ३३ ॥
मग रसरूपाने जे पाणी शिल्लक राहिलेले असते; तेंही तेजामध्ये लीन होऊन जातें, व त्या वेळी तें तेजच दाही दिशा भरून सांडूं लागते ३३.

सांवर्ताग्नीची मातू । जळ शोषूनि राहे निवांतू ।
जाळिती शक्ति स्वयें जाळितू । या नांव निश्चितू सांवर्तकाग्नी ॥ ३४ ॥
त्य सांवर्ताग्नीची गोष्ट काय सांगावी ? तो ते जळ शोषण करून स्वस्थ रहातो असें नाही, तर आपली स्वतःची जी दाहकशक्ति ती स्वतः जाळतो, त्यामुळे त्याला खरोखर सांवग्नि असें नांव मिळाले आहे ३४.

तेणेंचि काळें झंझामारुत । उठी तेजातें शोषित ।
तें तेज शोषितां समस्त । उरे तेथ रूप मात्र ॥ ३५ ॥
इतके झाल्यावर त्याच काळाच्या योगाने सोसाट्याचा वारा उत्पन्न होतो आणि तो त्या सर्व तेजाला शोषून टाकतो. ते सर्व तेज शोषले गेले असता तेथें रूप मात्र बाकी राहते ३५.

रूपं वायौ स च स्पर्शे लीयते सोऽपि चाम्बरे ।
अम्बरं शब्दतन्मात्र इन्द्रियाणिं स्वयोनिषु ॥ २४ ॥
[श्लोक २४] इंद्रिये आपापल्या अधिष्ठात्या देवतांमध्ये आणि शेवटी राजस अहंकारामध्ये समाविष्ट होऊन जातात. (२४)

तेजाचें जें उरे रूप । तें वायु शोषूनि करी अरूप ।
तेव्हां वायूचि एकरूप । अतिअमूप कोंदाटे ॥ ३६ ॥
तेजाचें जें रूप शिल्लक राहते, त्याला वायु शोषण करून निराकार करितो, तेव्हां जिकडे तिकडे एक वायूच वायु भरपूर भरून राहतो ३६.

कोंदाटल्या वायुसी । गगन जेथींचें तेथें ग्रासी ।
तेव्हा वायु प्रवेशे स्पर्शी । तो उरे अवशेषीं स्पर्शमात्र ॥ ३७ ॥
मग त्या भरून राहिलेल्या वायूला आकाश जेथल्या तेथेच गिळून टाकतें, तेव्हां वायु स्पर्शाच्या रूपांत शिरून तो स्पर्शाच्या रूपानेच शिल्लक राहतो ३७.

उरल्या वायूच्या स्पर्शासी । लयो तत्काळ होय आकाशीं ।
आकाश प्रवेशे शब्दासी । उरे अवशेषीं शब्दतन्मात्र ॥ ३८ ॥
त्या वायूच्या उरलेल्या स्पर्शस्वरूपाचा लय आकाशांत तत्काळ होऊन जातो. नंतर आकाश शब्दामध्ये प्रवेश करते, आणि तें शब्दतन्मात्र बाकी राहते ३८.

दशेंद्रियांची मंडळी । राजसापासोनि जन्मली ।
ते निजगुणीं सामावली । जेवीं पंचांगुळी मुष्टीमाजीं ॥ ३९ ॥
मूठ वळली म्हणजे पांच बोटें जशी तिच्यांत लीन होतात, त्याप्रमाणे दहा इंद्रियांचा हा समुदाय राजसगुणापासून जन्मलेला असतो, तो त्या आपल्या गुणामध्ये जाऊन लुप्त होतो ३९.

योनिर्वैकारिके सौम्य लीयते मनसीश्वरे ।
शब्दो भूतादिमप्येति भूतादिर्महति प्रभुः ॥ २५ ॥
[श्लोक २५] हे सौम्य ! राजस अहंकार आपला नियंता असलेल्या सात्विक अहंकाररूप मनामध्ये, शब्दतन्मात्रा महाभूतांचे कारण असलेल्या तामस अहंकारामध्ये आणि सर्व जगाला मोहित करण्यास समर्थ असलेला त्रिविध अहंकार, महतत्त्वामध्ये लीन होऊन जातो. (२५)

वैकारिक जो सत्त्वगुण । व्याला देवता अंतःकरण ।
प्रळयस्वभावें आपण । मनामाजीं जाण प्रवेशे ॥ ५४० ॥
विकार पावलेला जो सत्त्वगुण असतो, तो देवता व अंतःकरण ही उत्पन्न करितो. तोही प्रळयाच्या स्वभावधर्माप्रमाणे स्वतः मनामध्ये प्रवेश करतो ५४०.

सकळ इंद्रियांचा राजा मन । मनःकल्पना जीवशिवपण ।
श्लोकपदें ‘मनसीश्वर’ पूर्ण । मनाशींच जाण हरि बोले ॥ ४१ ॥
मन हा सर्व इंद्रियांचा राजा आहे. जीवपण आणि शिवपण ह्याही मनाच्याच कल्पना होत. श्लोकांतील 'मनसीश्वर' ह्या शब्दाने श्रीकृष्ण पूर्णपणे मनाविषयींच बोलत आहेत ४१.

मनोदेवता अंतःकरण । घेऊनि प्रवेशे सत्त्वगुण ।
ज्या कार्याचें जें कारण । तेथ तीं जाण प्रवेशती ॥ ४२ ॥
मनोदेवता ही अंत:करणाला घेऊन सत्वगुणामध्ये प्रविष्ट होते. ज्या कार्याचे जे कारण असते तेथेंच ती जात असतात ४२.

शब्दतन्मात्र उरलें आधीं । ते मीनलें तामसामधीं ।
कारणीं कार्यासी अवधी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ४३ ॥
मग आधी उरलेले शब्दतन्मात्र असते, ते तामसामध्ये जाऊन एकरूप होतें. उद्धवा! कारणामध्येच कार्याचा खरोखर लय होतो, ही गोष्ट लक्षात ठेव ४३.

त्रिविधगुणी अहंकारू । एकवटला महाथोरू ।
ऐक त्याचा बडिवारू । तोचि दुर्धरू संसारीं ॥ ४४ ॥
तीन गुणांनी युक्त असा अहंकार एकवटून मोठा बलाढ्य झालेला असतो. त्याचीही थोरवी ऐक. तोच संसारामध्ये महाकठिण आहे ४४.

जो शिवातें महत्त्वा चढवी । जीवातें देहात्मता गोंवी ।
अहंममता जग भुलवी । प्रभुत्वपदवी महत्त्वें येणें ॥ ४५ ।
जो शिवाला महत्त्वाला चढवितो. जीवाला देहात्मतेमध्ये गुंतवून ठेवतो आणि अहंममतेने सर्व जगाला भुरळ घालितो, ह्या त्याच्या थोर सामर्थ्यामुळेच त्याची प्रतिष्ठा आहे ४५.

अहंकारू ऐसा आहे । तो जैं परमार्थी साह्य होये ।
तैं सोहंभावाचेनि लवलाहें । विभांडी पाहें संसारू ॥ ४६ ॥
अहंकार हा असा आहे. तो जर परमार्थात साह्यकारी होईल, तर सोहंभावाच्या (ब्रह्म तेच मी ह्या भावनेच्या) योगाने तत्काळ संसाराचा फडशा करील पहा ! ४६.

चोर जैं विश्वासू मित्र होये । तैं चोर चोरा निवारी पाहें ।
तेवीं अभिमानू जैं साह्य होये । तैं भवभय बाधीना ॥ ४७ ॥
चोरच जेव्हां विश्वासू मित्र होतो, तेव्हा तो चोरच इतर चोरांचे निवारण करतो. त्याप्रमाणे अभिमानच जेव्हा सहाय होतो, तेव्हां संसाराचे भयही बाधत नाही ४७.

याहीपरी अभिमान । सामर्थ्यें अतिगहन ।
यालागीं प्रभुत्वें जाण । केलें व्याख्यान उद्धवा ॥ ४८ ॥
उद्धवा ! याप्रमाणे अभिमान हा सामर्थ्याने संपन्न झालेला असल्यामुळेच मी त्याचे वर्णन थोरपणाने सांगितले ४८.

त्रिगुणगुणीं गुणाभिमान । एकत्र होऊनियां पूर्ण ।
महत्तत्त्वीं होय लीन । अतिसुलीन तद्‌रूपें ॥ ४९ ॥
तीन गुणांपासून झालेला जो हा गुणाभिमान, तो पूर्णपणे एकत्र होऊन महत्तत्वामध्ये लीन होतो व त्याच्याशी अगदी एकात्मता पावतो ४९.

स लीयते महान्स्वेषु गुणेषु गुणवत्तमः ।
तेऽव्यक्ते संप्रलीयन्ते तत्काले लीयतेऽव्यये ॥ २६ ॥
[ श्लोक  २६] हे सौम्य ! राजस अहंकार आपला नियंता असलेल्या सात्विक अहंकाररूप मनामध्ये, शब्दतन्मात्रा महाभूतांचे कारण असलेल्या तामस अहंकारामध्ये आणि सर्व जगाला मोहित करण्यास समर्थ असलेला त्रिविध अहंकार, महतत्त्वामध्ये लीन होऊन जातो. (२५)

तेंही महत्तत्त्व येथें । कारणगुणीं लीन होतें ।
तेंही गुणसाम्यें निश्चितें । पावे लयाते अव्यक्तीं ॥ ५५० ॥
 ह्या वेळी ते महत्तत्वही कारणगुणांमध्ये लीन होते, आणि गुणसाम्याने खरोखर अव्यक्तामध्ये (मूळ मायेमध्ये ) लीन होतें ५५०.

आकारविकार समस्त । हारपोनि जाती जेथ ।
उरे बीजमात्र अवशेषित । त्या नांव अव्यक्त बोलिजे ॥ ५१ ॥
त्या वेळी सर्व आकार-विकार जेथें नाहीसे होऊन जातात, तेथे बीज मात्र अवशेष बाकी राहते, त्यालाच 'अव्यक्त' असे म्हणतात ५१.

वटाचा आकारविकार । ना शेंडा मूळ पुष्प पत्र ।
उरे अवशेष बीजमात्र । तेवीं संसार अव्यक्तीं ॥ ५२ ॥
वडाचा आकार नाहीं, विकार नाही, शेंडा नाहीं, मूळ नाही, पान नाही, फूल नाहीं, अवशेष बी मात्र शिल्लक रहावें, त्याप्रमाणेच संसार हा अव्यक्तांत राहतो ५२.

वटबीज उरलें येथ । तें दृष्टीसी तर्केना निश्चित ।
तेवीं भवबीज जें अव्यक्त । तें नव्हे व्यक्त जीवासी ॥ ५३ ॥
जे वडाचें बी राहिलेले असते, ते खरोखर डोळ्यांना दिसतसुद्धा नाही. तसेंच जें संसाराचे बीज अव्यक्तच असते, ते जीवाला उघड दिसत नाही ५३.

नाना तृणजातिबीज गहन । उष्णकाळीं काळ करी लीन ।
तेवीं भवबीज अव्यक्त जाण । होय सुलीन काळेंसीं ॥ ५४ ॥
अनेक प्रकारच्या गवतांच्या जातींचे बीज उन्हाळ्यामध्ये काळ अगदीं जमीनदोस्त करून टाकतो त्याप्रमाणे अव्यक्त असणारे संसारबीजही काळाशी एकरूप होऊन जातें ५४.

पूर्वीं काळें क्षोभोनि अव्यक्त । जगदाकारें केलें व्यक्त ।
तेचि काळयोगें अव्यक्त । सुलीन होत काळेंसीं ॥ ५५ ॥
पूर्वी काळानें क्षुब्ध होऊन जें अव्यक्त होते तेच जगाच्या आकाराने व्यक्त केले होते, तेच अव्यक्त काळाच्या योगाने काळाशींच एकरूप होऊन जाते ५५.

या नांव अव्यक्ताचा पहा हो । काळामाजीं बोलती लयो ।
काळ बोलिजे महाबाहो । त्याचा होय व्ययो पुरुषेंसीं ॥ ५६ ॥
अहो पहा ! ह्यालाच अव्यक्ताचा काळामध्ये लय असें म्हणतात. काळालाच महाबाहु असें म्हणतात. त्याचा लय पुरुषामध्ये होतो ५६.

कालो मायामये जीवे जीव आत्मनि मय्यजे ।
आत्मा केवल आत्मस्थो विकल्पापायलक्षणः ॥ २७ ॥
[श्लोक २७] काल मायामय जीवामध्ये आणि जीव माझ्यामध्येअजन्मा परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो. आत्मा मात्र आपल्या स्वरूपातच स्थित राहातो तो विश्वाची उत्पत्ती आणि लय यांच्या अधिष्ठानामुळे जाणला जातो. (२७)

पुरुषाची पूर्ण क्षोभकता । तोचि काळ बोलिजे तत्त्वतां ।
उत्पत्ति-स्थिति-प्रलयांता । तिनी अवस्था काळाच्या ॥ ५७ ॥
पुरुषाची जी पूर्ण क्षुब्धावस्था तिलाच खरोखर काळ म्हणतात. उत्पत्ति, स्थिति आणि प्रळय या तिन्ही अवस्था काळाच्याच आहेत ५७.

तिनी अवस्था लोटल्या ठायीं । काळासी कर्तव्यता नाहीं ।
तो उपजत व्यापारें पाहीं । जीवाचे ठायीं सामावे ॥ ५८ ॥
या तिन्ही अवस्था संपल्या, म्हणजे त्या ठिकाणी काळाचे काहीच काम नसते. म्हणून तो स्वाभाविक व्यापारानेच जीवामध्ये एकरूप होतो ५८.

अचेतनीं चेतविता । जडातें जो जीवविता ।
यालागीं जीवू ऐशी वार्ता । जाण तत्त्वतां पुरुषासी ॥ ५९ ॥
जो अचेतनाला चेतना देणारा व जडाला सजीव करणारा आहे, त्या पुरुषाला ह्याच गुणांमुळे जीव अशी संज्ञा आहे ५९: 

प्रकृतीचेनि योगें जाण । शुद्धासी बोलिजे जीवपण ।
पुरुषू हेंही अभिधान । त्यासीच जाण बोलिजे ॥ ५६० ॥
प्रकृतीच्या योगाने शुद्धालाच जीव असें म्हणतात, त्यालाच पुरुष हें नांव देतात, हे लक्षात ठेव ५६०.

करितां प्रकृतिविवंचन । केवळ मृगजळासमान ।
दिसे परी साचपण । सर्वथा जाण असेना ॥ ६१ ॥
प्रकृतीचा विचार केला, तर ती केवळ मृगजळासारखी आहे. ती प्रत्यक्ष दिसते, पण तिला खरेपणा मुळीच नाही ६१.

मृगजळामाजीं जो पडे । तेथ जळ नाहीं मा तो कोठें बुडे ।
तेवीं प्रकृति नसतां जोडे । वाडेंकोडें जीवत्व कोणा ॥ ६२ ॥
मृगजळामध्ये जो पडेल, तो तेथे पाणीच नाही, मग बुडणार कोठे ? त्याप्रमाणे प्रकृति नसतांनाच आवडीने जीवपणा कोणाला जोडणार ? ६२.

जळीं बुडालें दिसे व्योम । सत्य मानणें तो मूर्खधर्म ।
तैसें रूप नाम गुण कर्म । हा मिथ्या भ्रम मायिक ॥ ६३ ॥
समुद्राकडे पाहूं लागले असतां पाण्यामध्ये आकाश बुडालेले दिसते, पण तें खरें मानणे हा मूर्खपणा आहे. त्यांप्रमाणे रूप, नाम, गुण, कर्म हा सर्व मायेचा भ्रम आहे ६३.

प्रकृतिकाळींही जाण । सत्य नाहीं जीवपण ।
तेही अर्थींची निजखूण । उद्धवा संपूर्ण अवधारीं ॥ ६४ ॥
उद्धवा ! प्रकृतीच्या अस्तित्वकाळामध्येसुद्धा जीवपणा खरा नाही. त्यासंबंधींचाही खरा प्रकार पूर्णपणे सांगतों, ऐक ६४.

स्वयें अवलोकितां दर्पण । दर्पणामाजीं दिसे आपण ।
तरी आपुलें वेगळेपण । स्वयें आपण जाणीजे ॥ ६५ ॥
आपण आरशांत पाहू लागलों असतां आरशांत आपण स्वतःच दिसतो. तरी आपण ते वेगळे आहोच असे आपण समजतोंच ६५, 

तेवीं प्रकृतिकर्म करितां । जरी दिसे प्रकृतिआंतौता ।
तरी मी प्रकृतीपरता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ६६ ॥
त्याप्रमाणेच उद्धवा ! प्रकृतीच्या अनुरोधाने कर्म करीत असतां मी जरी तिच्या आंत आहे असा दिसतो, तरी मी खरोखर प्रकृतीहून भिन्नच आहे, हे तू लक्षात ठेव ६६.

दिसे व्योम जळीं बुडालें । परी तें नाहीं वोलें झालें ।
तेवीं प्रकृतिकर्म म्यां केलें । नाही माखलें ममांग ॥ ६७ ॥
आकाश पाण्यामध्ये बुडालेले दिसते, परंतु तें कांहीं ओलें होत नाही. त्याप्रमाणे प्रकृतीचे कर्म जरी मी केले, तरी माझे अंग कांही त्या योगाने माखत नाहीं ६७.

यापरी करितां निर्वाहो । प्रकृतीचा झाला अभावो ।
तेव्हा जीवशिवनांवें वावो । जीव तोचि पहा हो परमात्मा ॥ ६८ ॥
याप्रमाणे विचार केला असता प्रकृतीचाच अभाव होऊन जातो व त्यामुळे जीव आणि शिव ही नावेही व्यर्थ होऊन जातात. कारण, अहो ! जो जीव तोच परमात्मा आहे हे लक्षात ठेवा ६८.

जीवाचें गेलिया जीवपण । सहजेंचि उडे शिवपण ।
दोघेही आत्मत्वें जाण । होती परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ६९ ॥
जीवाचे जीवपण गेले असतां सहजच शिवपणही नाहीसे होते. आणि दोघेही पूर्णपणे आत्मस्वरूपाने परिपूर्ण होतात ६९.

जीवासी निजस्वरूप आठवो । या नांव जीवाचा परब्रह्मीं लयो ।
परमात्मा अज अव्ययो । अविनाश अद्वयो अनंत ॥ ५७० ॥
जीवाला आत्मस्वरूपाची आठवण होणे, ह्याचंच नाव जीवाचा परब्रह्मांत लय होणे होय. तो परमात्मा अजन्मा, अव्यय, अविनाशी, अद्वय आणि अनंत असा आहे ५७०.

ब्रह्मीं स्फुरेना ब्रह्मपण । तेथ ‘मी तूं’ म्हणे कोण ।
परमानंद परिपूर्ण । उरे जाण उद्धवा ॥ ७१ ॥
ब्रह्मामध्ये ब्रह्मस्वरूपाचेच जर मुळी स्फुरण होत नाही, तर तेथे 'मी' आणि ' तूं  ' म्हणणार तरी कोण ! उद्धवा ! त्या वेळी परिपूर्ण परमानंदच शिल्लक उरतो ७१. 

ऐसा परमानंद म्हणसी कोण । तो मी अज अव्यय श्रीकृष्ण ।
आनंदस्वरूप तो मी जाण । मजवेगळें स्थान असेना ॥ ७२ ॥
असा परमानंद कोणता? असें म्हणशील, तर अज, अव्यय, आनंदस्वरूप असा जो मी श्रीकृष्ण, तोच मी परमानंदस्वरूप आहे असे समज. त्या परमानंदाला माझ्याशिवाय दुसरी जागाच नाहीं ७२.

ज्या स्वानंदा नांव श्रीकृष्ण । तें तुझें स्वरूप उद्धवा जाण ।
तेथ नाहीं गा मीतूंपण । परम कारण उर्वरित ॥ ७३ ॥
उद्धवा ! आणखी ज्या स्वानंदाला श्रीकृष्ण असें नाव आहे, तेंच तुझेही स्वरूप आहे. त्यामध्ये मीतूंपणा नाही. केवळ परमकारण मात्र उरलेले असते ७३.

उद्धवा जीवाचा जीव मी श्रीकृष्ण । मज तुज नाहीं वेगळेपण ।
यालागीं जीवाची हे निजखूण । परम कारण सांगीतले ॥ ७४ ॥
उद्धवा ! तुझ्या जीवाचा जीव तोच मी श्रीकृष्ण आहे. माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काही वेगळेपणा नाही. म्हणूनच जीवाचें परम कारण अशी ही माझी खूण तुला सांगितली ७४.

जगाचा आत्मा श्रीकृष्ण । त्या माझा आत्मा तूं उद्धव पूर्ण ।
हें ऐकोनि श्रीकृष्णवचन । उद्धव जाण गजबजिला ॥ ७५ ॥
मी श्रीकृष्ण सर्व जगाचा आत्मा आहे; त्या माझा पूर्ण आत्मा तूं उद्धव आहेस. हें कृष्णाचे भाषण ऐकून उद्धव गोंधळांत पडला ७५.

कृष्ण मज म्हणे आपुला आत्मा । परी मी नेणें कृष्णमहिमा ।
अगाध लीला पुरुषोत्तमा । ते केवीं आम्हां आकळे ॥ ७६ ॥
कृष्ण मला आपला आत्मा असें म्हणतो खरा, परंतु कृष्णाचा महिमासुद्धा मी जाणत नाही. पुरुषोत्तमाची लीला अगाध आहे. ती आम्हांला कळणार कशी ? ७६.

नाथिलेंचि उद्धवपण । माझ्या अंगीं जडलें जाण ।
कृष्णविवेकें पाहतां पूर्ण । माझें मीपण दिसेना ॥ ७७ ॥
नसतेच उद्धवपण माझ्या अंगी जडलेले आहे, पण कृष्णाच्या विचाराने नीट पाहिले असता माझा मीपणा दिसत नाही ७७. 

मज उद्धवपण सांडितां । कृष्ण निजधामा जाईल तत्त्वतां ।
ते न साहवे अवस्था । सखेदता सप्रेम ॥ ७८ ॥
मी आपला उद्धवपणा सोडून दिला. तर कृष्ण खरोखर निजधामाला जाईल. ती खेदयुक्त प्रेमावस्था कांही मला सहन करवणार नाहीं ७८.

हे उद्धवाची अवस्था । कळों सरली श्रीकृष्णनाथा ।
तेचि अर्थीची हे कथा । शब्दार्थता निरूपी ॥ ७९ ॥
ही उद्धवाची अवस्था श्रीकृष्णाला कळून आली म्हणून त्यासंबंधीचीच ही कथा तो शब्दार्थरूपाने सांगू लागला ७९.

एवं अन्वीक्षमाणस्य कथं वैकल्पिको भ्रमः ।
मनसो हृदि तिष्ठेत व्योम्नीवार्कोदये तमः ॥ २८ ॥
[श्लोक २८]

प्रकृति-पुरुषविवंचन । आदि मध्य अवसान ।
तुज म्यां दाविलें एकपण । तेथ कां भिन्नपण कल्पिसी वायां ॥ ५८० ॥
प्रकृतिपुरुषांचे विवेचन करून मी तुला आदि, मध्य आणि अंत या तिन्ही अवस्थांत ऐक्य असल्याचे दाखवून दिले. मग त्यांत व्यर्थ भिन्नपणा कां मानतोस ? ५८०.

उत्पत्तिआदि ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीसी तेंचि कारण ।
जग जन्मलें जे सगुण । तेहीं ब्रह्मरूपें जाण दाविलें तुज ॥ ८१ ॥
उत्पत्तीच्या आधीही पूर्ण ब्रह्मच असते. उत्पत्तीला तेच कारण होते आणि जें  जग दृश्य आकारानें जन्मास आले आहे. तेही ब्रह्मस्वरूपच होय, हेही मी तुला दाखवून दिले ८१.

आणी प्रळयाच्या अंतीं । ब्रह्मचि उरे निजस्थिती ।
तेही विखींची प्रतीती । तुज म्यां निश्चितीं दाविली ॥ ८२ ॥
आणखी प्रळयाच्या शेवटीं ब्रह्मच जशाचे तसे शिल्लक राहते, त्याविषयींचाही अनुभव तुला निश्चितपणे दाखवून दिला ८२.

प्रकृतिहूनि पुरुष भिन्न । प्रकृति स्वातंत्र्यें मिथ्या जाण ।
ऐसें प्रकृतिपुरुष ज्यासी ज्ञान । त्यासी मीतूंपण भासेना ॥ ८३ ॥
प्रकृतीहून पुरुष हा भिन्न आहे. प्रकृति ही स्वतंत्र रीतीने पाहू लागले तर मिथ्या होय. असें  प्रकृतिपुरुषांचे ज्ञान ज्याला होते, त्याला मीतूंपणा भासतच नाही ८३.

जेथ नाहीं मीतूंपण । तेथ विकल्प कल्पी कोण ।
आद्यंती वस्तु पूर्ण । हें विवेकज्ञान जयासी ॥ ८४ ॥
तेथें मीतूंपणच नाही, तेथें विकल्पाची कल्पना कोण करणार ? सृष्टीच्या आदिअंती परब्रह्मच परिपूर्ण आहे असें ज्ञान ज्याला विचाराने प्राप्त होते ८४,

जो विवेक पुरुषप्रकृती । सांख्य जागे ज्याचे चित्तीं ।
त्यासी विकल्पाची प्राप्ती । नव्हे कल्पांतीं उद्धवा ॥ ८५ ॥
पुरुषप्रकृतीचा जो विचार आणि त्यांचे जे सांख्यतत्त्वज्ञान, ते ज्याच्या मनांत जागृत असते, त्याच्या मनात हे उद्धवा ! कल्पांतीसुद्धा विकल्पाची उत्पत्ति होत नाही ८५.

सांख्यविवेकगभस्ती । पूर्ण उगवला ज्याचे चित्तीं ।
तेथ विकल्पाची अंधारीं राती । कैशा रीतीं उरेल ॥ ८६ ॥
ज्याच्या मनांत हा प्रकृतिपुरुषांचा विचाररुपी सूर्य पूर्णपणे उदय पावला, त्या ठिकाणी विकल्परूप अंधाराची रात्र कोणत्या रीतीने राहील? ८६.

ज्यासी पटुतर सांख्यज्ञान । विकल्प विसरे त्याचें मन ।
हृदयीं उगवे चिद्‌भान । अज्ञाननिशा पूर्ण निरसूनी ॥ ८७ ॥
ज्याला प्रकृतिपुरुषाचे अत्युत्तम ज्ञान आहे, त्याचे मन विकल्पाला विसरूनच जाते. त्याच्या अंत:करणांत ज्ञानरूपी सूर्य अज्ञानरात्र पूर्णपणे नष्ट करून उदय पावतो ८७.

जेथ निरसलें अज्ञान । तेथ विकल्पाचें कैंचें स्थान ।
यापरी सांख्यज्ञान । साधकां पूर्ण उपकारी ॥ ८८ ॥
ज्या ठिकाणचे अज्ञानच नाहीसे होते, तेथें विकल्पाचा ठाव कोठचा? अशा प्रकारे हा सांख्यतत्त्वविचार साधकांवर फार उपकार करणारा आहे ८८.

जें साराचें निजसार । जें गुह्यज्ञानभांडार ।
जें कां विवेकरत्ना कर । तें सांख्या साचार उद्धवा ॥ ८९ ॥
उद्धवा ! जें साराचेही सार, जे गुणज्ञानाचे भांडार, जे विचाररत्नांचा समुद्र, तेच खरोखर सांख्यशास्त्र होय ८९.

एष सांख्यविधिः प्रोक्तः संशयग्रन्थिभेदनः ।
प्रतिलोमानुलोमाभ्यां परावरदृशा मया ॥ २९ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
एकादशस्कन्धे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
[श्लोक २९]

मी विवेकाचा विवेकू । मी अर्काचा आदिअर्कू ।
मी ज्ञानियांचा ज्ञानतिलकू । त्या माझा परिपाकू तें हें सांख्य ॥ ५९० ॥
मी विचाराचा विचार आहे, मी सूर्याचा आदिसूर्य आहे. मी ज्ञान्यांचा ज्ञानरूपी मुगुटमणि आहे त्या माझी जी पूर्णावस्था, ते हे सांख्य मत होय ५९०. 

मी वेदांचा आदिवेदू । मी बोधाचा आदिबोधू ।
मी आनंदाचा निजानंदू । त्या माझा प्रबोधू तें हें सांख्य ॥ ९१ ॥
मी वेदांचा आदिवेद, मी उपदेशाचा आद्य उपदेश माणि मी आनंदाचा आत्मानंद आहे. त्या माझा ज्ञानोपदेश तेच हे सांख्यतत्त्वज्ञान होय ९१.

तेणें म्यां सर्वज्ञें श्रीकृष्णें । निर्धारोनि निजज्ञानें ।
सांख्ययोगौपलक्षणें । ब्रह्म अव्ययपणें दाविलें ॥ ९२ ॥
त्या मी सर्वज्ञ श्रीकृष्णाने आत्मज्ञान स्पष्ट करून सांख्ययोगाच्या साधनाने अव्ययपणाने ब्रह्मही दाखवून दिले ९२.

जेवीं गरगरीत वाटोळा । करतळीं दिसे आंवळा ।
तेवीं सांख्ययोगलीळा । ब्रह्म तुज डोळां दाविलें ॥ ९३ ॥
ज्याप्रमाणे तळहातावर गरगरीत वाटोळा आंवळा दिसतो, त्याप्रमाणेच सांख्ययोगाच्या साधनाने प्रत्यक्ष परब्रह्म तुला तुझ्या डोळ्यांनी दाखवून दिले ९३.

जो ब्रह्म डोळां देखों जाये । तो सर्वांगें देखणा होये ।
ऐशी सांख्यज्ञान निजसोये । तुज म्यां पाहें दाविली ॥ ९४ ॥
जो डोळ्यांनी ब्रह्म पहावयाला जातो, तो सर्वागांनींच पाहणारा (तन्मयच) होतो, अशी सांख्यज्ञानाची गुरुकिल्ली मी तुला दाखवून दिली ९४.

हा सांख्ययोग अनुक्रम । अन्वयव्यतिरेकें उपक्रम ।
आलोडितां आकळे वर्म । अखंड ब्रह्म अद्वय ॥ ९५ ॥
हा सांख्ययोगाचा अनुक्रम अन्वय-व्यतिरेकाने नीट विचार करून पाहिला असतां ब्रह्म हें  अखंड असून अद्वयच आहे, हे रहस्य कळून  येते ९५.

उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । ब्रह्म अखंड निज नित्य ।
हेंचि सांख्ययोगें प्राप्त । जाण निश्चित साधकां ॥ ९६ ॥
उत्पत्तींत, स्थितीत किंवा प्रळयांत ब्रह्म हे अखंड आणि स्वतः नित्य आहे, हेंच ज्ञान साधकांना खरोखर सांख्ययोगानें प्राप्त होते ९६.

ज्यांसी ब्रह्मज्ञानाचें कोड । ते सांख्ययोग पुरवी चाड ।
लिंगदेहाचें सुदृढ झाड । त्याचें समूळ बूड उन्मळी ॥ ९७ ॥
ज्यांना ब्रह्मज्ञानाची हौस असते, ती त्यांची हौस सांख्ययोग पुरी करतो. आणि लिंगदेहाचे जे बळकट झाड फोफावलेले असते, त्याचे बूड तो समूळ उन्मळून पाडतो ९७.

लिंगदेह अत्यंत कठिण । तें सांख्ययोगापुढें जाण ।
जेवीं अग्नीमाजीं तृण । तेवीं होय संपूर्ण भस्मांत ॥ ९८ ॥
लिंगदेह अत्यंत कठीण आहे खरा पण ज्याप्रमाणे अग्नीत गवत पडावे , त्याप्रमाणे सांख्ययोगापुढे त्याची पूर्णपणे राखरांगोळी उडून जाते ९८.

लिंगदेह सैंधवगिरिवर । सांख्या अत्यंत प्रळयसागर ।
खवळला विरवूनि करी नीर । एकाकार निजात्मता ॥ ९९ ॥
लिंगदेह हा मिठाचा एक प्रचंड पर्वत आणि सांख्य हा प्रळयकाळाचा तुफान समुद्र आहे. तो समुद्र एकदा खवळला की आपल्या पाण्यांत त्या पर्वताला विरवून आपल्याप्रमाणेच सर्व एकाकार पाणीच पाणी करून सोडतो ९९.

खवळल्या अत्यंत चित्सागरा । नाना संशयजळगारा ।
उरावया नाहीं थारा । निजनिर्धारा उद्धवा ॥ ६०० ॥
उद्धवा ! हा ज्ञानसमुद्र एकदा खवळला, की मग अनेक प्रकारच्या संशयरूप गारा शिल्लक उरावयाला खरोखर जागाच राहात नाही ६००. 

सकळ संशयांचें छेदन । लिंगदेहाचें भेदन ।
करी तें सांख्ययोगज्ञान । उद्धवा जाण निश्चित ॥ १ ॥
हे उद्धवा ! जे ज्ञान सर्व संशयांचे छेदन करतें, लिंगदेहाचा भेद करिते, ते सांख्ययोगज्ञान होय असें अगदी निश्चित समज १.

अनुलोम प्रतिलोम । विवंचना वाटेल दुर्गम ।
हें न करितां सांख्य सुगम । आकळे तें वर्म सांगेन ऐक ॥ २ ॥
आता अनुलोम आणि प्रतिलोम यांचे विवेचन फार कठीण वाटेल, पण हे विवेचन न करतांच सांख्य सुलभ रीतीने समजेल अशी युक्ति सांगतों ऐक २.

सांडूनि आकारविषमता । सर्व भूतीं भगवंतता ।
जो पाहे सद्‌भावता । सांख्य त्याचे हात समूळ आलें ॥ ३ ॥
निरनिराळ्या आकारांत दिसणारे भेद सोडून देऊन सर्व प्राणिमात्रांत भगवंतस्वरूपच भरलेले आहे असें जो भावनापूर्वक पाहील, त्याच्या हाती समूळ सांख्य येईल ३.

कां जैसें होईल कर्माचरण । तैसें सुखेंचि हो आपण ।
मी कर्ता हें तूं न म्हण । इतुकेन ब्रह्म पूर्ण तूं होसी ॥ ४ ॥
किंवा कर्माचरण जसें होईल तसे आपोआप खुशाल होऊ या. मी कर्ता असें मात्र तूं  म्हणू नकोस. इतके केलेस म्हणजे तू पूर्णब्रह्म होशील ४.

याहीवरती सुगमता । मज दिसेना सर्वथा ।
उद्धवा तुझे निजहितार्थ । जाण तत्त्वतां सांगीतलें ॥ ५ ॥
याहून अधिक सुलभ मार्ग मला मुळीच दिसत नाही. उद्धवा ! तुझ्या आत्मकल्याणासाठी मी तुला हें  सांगितले ५.

हेंचि एक माझें वचन । विचारूनियां संपूर्ण ।
निजहितार्था आपण । अवश्य जाण करावें ॥ ६ ॥
हेच एक माझें भाषण पूर्णपणे मनन करून आपल्या कल्याणाकरिता आपण त्याचे आचरण अवश्य करावें ६.

ऐसें बोलिला देवाधिदेवो । तेथ जडला उद्धवाचा भावो ।
निःशेष ‘अहं’ सांडितां पहा हो । ब्रह्म स्वयमेवो सहजचि ॥ ७ ॥
असें देवाधिदेवांनी सांगितले तेव्हा त्याच्यावर उद्ध्वाची भक्ति जडली. अहो पहा ! नि:शेष अहंता सोडून दिली असता आपण आपोआप ब्रह्म होतों ७. 

विचारितां सांख्यज्ञान । जगातें गोंवी अहंपण ।
अहंपाशीं जन्ममरण । दुःख दारुण अहंभावीं ॥ ८ ॥
सांख्यज्ञानाचा विचार केला असता असे दिसून येते की, सर्व जगाला अहंपणाच गोत्यात आणतो. 'अहं 'भावाजवळ जन्ममरण असते, आणि अहंभावाजवळ भयंकर दु:खही असते ८.

ऐसा अहंभावो कठिण । सांडितां न सांडे आपण ।
येचि गुंतीचें कारण । सर्वथा जाण कळेना ॥ ९ ॥
असा अहंभाव हा कठीण आहे. तो सोडावयाचा प्रयत्न केला तरी आपण होऊन सुटत नाही. पण त्याच्या अशा या गुंतागुंतीचे कारण काय, तें मात्र मुळीच कळत नाही ९.

हें पुसों जावें देवापाशीं । तेणें विशद सांगीतलें सांख्यासी ।
आतां आपुली गुंती आपल्यापाशीं । तेंचि आम्हासी कळेना ॥ ६१० ॥
हे देवाला विचारावयास जावें, तर त्याने सांख्यशास्त्र स्पष्ट  करून सांगितले आहे. तेव्हा आपली ही गुंतागुंत आपल्यापाशीच कशी राहिली तेच आम्हांला कळत नाही ६१०.. 

येचि अर्थीं श्रीकृष्ण । पंचविसावे अध्यायीं जाण ।
सगुण निर्गुणविभागें पूर्ण । गोड निरूपण सांगेल ॥ ११ ॥
ह्याचकरितां श्रीकृष्ण पंचविसाव्या अध्यायामध्ये सगुण आणि निर्गुण ह्या दोन प्रकारांनी भेदाचें गोड निरूपण पूर्णपणे सांगेल ११.

ते सुरम रसाळ मधुर कथा । जेथ श्रीकृष्णाऐसा वक्ता ।
उद्धव शिरोमणि श्रोता । अनुपम स्वादुता ते ठायीं ॥ १२ ॥
ती कथा सुरस, रसाळ आणि मधुर आहे. जेथे श्रीकृष्णासारखा सांगणारा आणि उद्धवासारखा श्रेष्ठ श्रोता, त्या ठिकाणी निरुपमच स्वाद चढलेला असणार १२.

त्या स्वादाचें गोडपण । सांगावया समर्थ श्रीकृष्ण ।
सेवावया श्रोता अतिसज्ञान । निजभक्त जाण उद्धव ॥ १३ ॥
त्या स्वादाचे गोडपण सांगावयाला श्रीकृष्णच समर्थ आहे, आणि ती गोडी सेवन करण्याला अत्यंत ज्ञानसंपन्न असा त्याचा भक्त उद्धव श्रोता आहे १३.

ते देवभक्तसंवाद गोडी । वेदशास्त्रें न जोडे जोडी ।
आलोडितां ग्रंथकोडी । ते निजगोडी नातुडे ॥ १४ ॥
देव आणि भक्त  यांच्या त्या संवादांतील ती गोडी वेदशास्त्रांनी सुद्धा प्राप्त होणार नाही. कोट्यवधि ग्रंथांचे अवलोकन केले, तरी ती गोडी मिळावयाची नाही १४.

आतुडावया ते निजगोडी । जैं भाग्यें भावार्थें जोडे जोडी ।
भावार्थाचे निजआवडीं । जिव्हारींची गोडी देवो दे भक्तां ॥ १५ ॥
ती खरी गोडी प्राप्त करून घ्यावयाची असेल, तर जेव्हा भाग्याने भावार्थानंच प्राप्त होईल तेव्हा होते. कारण भावार्थांच्या आवडीने देव आपल्या अंत:करणांतील गोडी आपल्या भक्तांना देतो १५.

एवं भावार्थापरतें कांहीं । देवासी आवडतें नाहीं ।
तो भावो नाहीं ज्यांचे ठायीं । ते मूर्ख पाहीं बालिश ॥ १६ ॥
तात्पर्य, देवाला भावार्थाहून दुसरें कांहींच प्रिय नाही. तो भावच ज्यांच्या ठिकाणी नाही, ते मूर्ख केवळ अज्ञानी होत १६.

त्या बाळकांचा धन्य भावो । खापरें मांडूनि म्हणती देवो ।
तेथही प्रकटे देवाधिदेवो । धरिल्या निःसंदेहो विश्वास ॥ १७ ॥
जी मुले खापरें मांडून त्यालाच देव म्हणतात, त्या मुलांची भक्तीसुद्धा मोठी धन्य होय. आणि तेथेही निःसंशय विश्वास धरला असतां देवाधिदेव प्रगट होतो १७.

बाळकें दूध मागावयासाठीं । भावार्थें लागला देवापाठीं ।
कां क्षीराब्धि करूनि वाटी । उपमन्यावोठीं लाविली ॥ १८ ॥
उपमन्यु बालक दूध मागण्यासाठी भावार्थाने देवाच्या पाठीस लागला, तेव्हां क्षीरसागराचीच वाटी करून उपमन्यूच्या तोंडाला लावली १८.

एवं भाविकू देवाचा लाहणा । देवो भाविकांचा आंदणा ।
भावेंवीण देवो जाणा । कधीं कोणा न भेटे ॥ १९ ॥
तात्पर्य, भाविक असतो तोच देवाचा आवडता असतो, आणि देवही भाविकांचा सेवक असतो. भावाशिवाय देव कधीच कोणाला भेटत नाही १९.

यालागीं जेथ भावार्थ । तेथचि जोडे सुखस्वार्थ ।
भावार्थ तेथ परमार्थ । साङ्ग साद्यंत सांपडे ॥ ६२० ॥
म्हणून जेथे भावार्थ असतो, तेथेच सुखाचा लाभ होतो. जेथे भावार्थ असतो, तेथेंच परमार्थही पूर्णपणे सांपडतो ६२०.

ऐसा वाढिविल्या भावार्थ । तेणें जोडे निर्गुणनिजस्वार्थ ।
तेचि अर्थींचा वृत्तांत । पुढिल्या अध्यायांत हरि सांगे ॥ २१ ॥
अशा प्रकारे भावार्थ वाढविला तर त्या योगाने निर्गुणप्राप्तीचीही आपली इच्छा तृप्त होते. त्याच अर्थाचा वृत्तांत पुढच्या अध्यायांत श्रीकृष्ण सांगेल २१.

ते कथेचें गोडपण । अमृतास विसरवी जाण ।
ऐसें रसाळ निरूपण । सादरें श्रीकृष्ण सांगेल ॥ २२ ॥
ज्या कथेचे गोडपण अमृताचाही विसर पाडील, असें रसभरित निरूपण श्रीकृष्ण अगत्यपूर्वक सांगेल २२.

तें श्रीकृष्णकथापीयूख । श्रोत्याचें पावे श्रवणमुख ।
एका जनार्दनीं अतिसुख । सकौतुक व्याख्यान ॥ २३ ॥
ते श्रीकृष्णाचे कथामृत श्रोत्यांच्या श्रवणरूपी मुखांत पडेल. एकनाथस्वरूपी जनार्दनालाही अत्यंत आनंद होऊन तो मोठ्या कौतुकाने त्याचे व्याख्यान करील २३.

श्रीभागवत अत्यादरें । श्रीकृष्णकथा सविस्तरें ।
अहेर विस्तारिले साजिरे । परमार्थाळंकारें साळंकृत ॥ २४ ॥
श्रीभागवताने मोठ्या सन्मानाने श्रीकृष्णकथेच्या विस्ताराचा उत्तम अहेर पसरलेला आहे, आणि परमार्थरूप अलंकारानें तो शोभिवंत केलेला आहे २४.

तेणें संत सज्जन सोयरे । गौरवीन श्रवणादरें ।
एका जनार्दनकृपाकरें । आविष्करे सामर्थ्य ॥ २५ ॥
त्या अहेराच्या श्रवणाविषयी आदर उत्पन्न करून मी आमचे आप्त जे संतसज्जन, त्यांचा गौरव करीन, एकनाथावर जनार्दनांनी कृपा केल्यामुळे तो एवढे सामर्थ्य प्रगट करीत आहे २५.

गौरविले सोयरे सज्जन । म्हणाल उपेक्षिले इतर जन ।
जो श्रीभागवतीं सावधान । तो परमार्थें जाण गौरवे ॥ २६ ॥
सोयरे जे सज्जन त्यांचाच मात्र आदरसत्कार केला, आणि इतरांची उपेक्षा केली असें म्हणाल, तर तसे नव्हे. जो श्रीभागवत लक्ष देऊन श्रवण करील, त्याचा परमार्थानेच गौरव होईल २६.

भावार्थासारिखें गौरवण । एका जनार्दन जाण ।
एका जनार्दना शरण । आपण्या आपण गौरवी ॥ ६२७ ॥
खरोखर भावार्थ हाच मुख्य गौरव आहे. तोच एकनाथस्वरूपी जनार्दन जाणतो, म्हणून एकनाथही जनार्दनाला शरण जाऊन आपला आपणच गौरव करून घेत आहे ६२७.

इति श्रीभागवते महापुरणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
एकाकारटीकायां प्रकृतिपुरुषसांख्ययोगो नाम चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ २९ ॥ ओव्या ॥ ६२७ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कन्धे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥ चोविसावा अध्याय समाप्त.



GO TOP