॥ श्री एकनाथी भागवत ॥
अध्याय तेविसावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो सद्‌गुरु विश्वरूप । विश्वा साबाह्य तूं चित्स्वरूप ।
तुझें निर्धारितां रूप । तूं अरूप‌अव्यय ॥ १ ॥
हे ओंकाररूप विश्वरूपा सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तूं ज्ञानस्वरूप असून विश्वाच्या आतबाहेर तूंच भरलेला आहेस. तुझ्या स्वरूपाचा विचार केला तर, तूं निर्गुण असून अव्ययच आहेस १.

चराचर जें सावेव । तें तुज अरूपाचे अवेव ।
जीवशिव हे तुझी माव । अद्वयवैभव पै तुझें ॥ २ ॥
हें  जें मूर्तिमंत चराचर आहे; ते तुझ्या निर्गुणस्वरूपाचे अवयव आहेत. जीव आणि शिव ही तुझी माया आहे. अद्वैत हेच तुझे खरे वैभव होय २.

घृतपुतळी दिसे साकार । घृतपणें ते निराकार ।
तैसा तूं अव्यय अक्षर । जगदाकार भाससी ॥ ३ ॥
तुपाची बाहुली साकार दिसते, पण केवळ तूप म्हणूनच तिच्याकडे पाहिले तर ती निराकारच आहे. त्याप्रमाणे तूं अविनाशी व अविकारी असूनही जगाच्या आकाराने भासमान होतोस ३.

ठसावलें जें दिसे जग । निर्धारितां तुझें अंग ।
अंग पाहतां तूं अनंग । अनंगाचा माग तुजमाजीं नाहीं ॥ ४ ॥
हा जो जगाचा ठसा उमटलेला दिसतो, त्याचा विचार केला तर ते तुझेच स्वरूप आहे, आणि तुझे अंग पहावे तर तूं अनंगच आहेस. पण त्या अनंगाचा (म्हणजे कामाचा) तुझ्यामध्ये स्पर्शही नाहीं ४. 

देखिजे तें तूं नव्हसी । नव्हे तें तूंचि होसी ।
होणें न होणें नाहीं तुजपाशीं । ऐसा तूं जगासी जगद्‌गुरु ॥ ५ ॥
जे काही दृष्टीला दिसते, तें तूं नव्हेस. जे दिसत नाही, तें तूं आहेस. होणें न होणे तुझ्यापाशी नाही. असा तूं जगाचा जगद्गुरु आहेस ५.

शब्द तुजहोनियां दूरी । तूं शब्द सबाह्य अंतरीं ।
बोलका तूं चराचरीं । वेदशास्त्रीं तूं वक्ता ॥ ६ ॥
शब्द हा तुझ्याहून दूर आहे. पण शब्दाच्या अंतर्बाह्य  तूंच आहेस. चराचरांमध्ये बोलणारा तूंच, आणि वेदशास्त्रांचा वक्ताही तूंच ६.

उंसापासून गोडी दिसे । उंसा सबाह्य गोडीचि असे ।
गोडियेमाजीं ऊंस नसे । वेदांसी तुज तैसें सौजन्य ॥ ७ ॥
उसापासून गोडी निघालेली दिसते. उसाच्या आंतबाहेर गोडीच असते, पण गोडीमध्ये काही ऊस असत नाही. तुझें आणि वेदांचे नाते तसेंच आहे ७. 

वेदांचा वक्ता तूंचि होसी । वेदीं प्रतिपादिजे तुम्हांसी ।
शेखीं वेदांसी नाकळसी । निःशब्दवासी गुरुराया ॥ ८ ॥
वेदांचा वक्ता तूंच आहेस, आणि वेदांमध्ये तुझेंच प्रतिपादन केलेले आहे. हे गुरुराया ! तूं निःशब्दांतच राहणारा असल्यामुळे शेवटी वेदांनाही तूं आकलन होत नाहींस ८.

जेवीं कां निःशब्द अनाहतध्वनी । असे ध्वनिमात्रीं मिळूनी ।
तो अनाहत वाजविजे जनीं । ऐसें नाहीं कोणी वाजंत्र ॥ ९ ॥
ज्याप्रमाणे अनाहतध्वनि हा निःशब्द असून प्रत्येक ध्वनीशी मिळूनच असतो, पण तोच अनाहत ( वाद्यावर आघात केल्यावांचून उमटणारा ध्वनि) वाजवील असे कोणतेच वाजंत्र जगामध्ये नाही ९.

तेवीं तूं वेदाचा वक्ता । सकळ शास्त्रां युक्तिदाता ।
परी वेदशास्त्रार्थसंमता । तुज तत्त्वतां न बोलवे ॥ १० ॥
त्याप्रमाणे तू  सर्व वेदांचा वक्ता आहेस, सर्व शास्त्रांना युक्ति शिकविणारा आहेस, पण वेदशास्त्रार्थाला संमत अशा तुझें वर्णन खरोखर करवत नाही १०. 

म्हणों तूं केवळ निःशब्द । तंव निःशब्द आणि सशब्द ।
हाही मायिक अनुवाद । तूं एवंविध न कळसी ॥ ११ ॥
म्हणून तूं  निखालस निःशब्द आहेस असें म्हणावें, तर निःशब्द आणि सशब्द असे म्हणणे ही मायीकच आहे. तात्पर्य, तुझे स्वरूप कळतच नाहीं.तुझें स्वरूप खरोखर कळतच नाही ११. 

तूं न कळसीचि तत्त्वतां । ऐशीया युक्तींचा तूंचि विज्ञाता ।
ज्ञाताचि हें जंव स्थापूं जातां । तंव अज्ञानता असेना ॥ १२ ॥
पण या विचारांचाही ज्ञाता तूंच आहेस. पण असा तूं ज्ञाताच आहेस असे सिद्ध करावयास जावें, तर मग अज्ञानपणा उरत  नाही १२.

जेथ अज्ञानता नाहीं । तेथ ज्ञातेपण कैंचे कायी ।
हो कां मुख्यत्वें नोवरी नाहीं । तैं नोवरी पाहीं म्हणे कोण ॥ १३ ॥
मग अज्ञानपणाच जेथे नाही, तेथे ज्ञातेपण कोठे आणि कशाचें ? अहो ! आधी नवरीच नसली, तर नवरा पहा असें तरी म्हणणार कोण ? १३.

ज्ञाता ना अज्ञाता । तूं बोलता ना नबोलता ।
तूं बहु ना एकुलता । तुझी अलक्ष्यता लक्षेना ॥ १४ ॥
तूं ज्ञानी नव्हेस. आणि अज्ञानीही नव्हेस. तूं बोलणाराही नव्हेस आणि न बोलणाराही नव्हेस. तूं अनेकही नव्हेस आणि एकही नव्हेस. तुझ्या अतर्क्य स्वरूपाविषयीं तर्कच चालत नाही १४.

तूं निःशब्द निर्विकार । तू निर्गुण निरहंकार ।
हेंही म्हणतां पडे विचार । तूं जगदाकार जगदात्मा ॥ १५ ॥
तूं शब्दातीत आहेस, विकारातीत आहेस, तूं निर्गुण आहेस, तू  निरहंकार आहेस, असे म्हटले तरीसुद्धा विचारच पडतो. कारण, जगदाकार व जगदात्मा तो तूंच १५.

जगदाकारें तूं प्रसिद्ध । तेथ कोणाचें कोणा बाधे द्वंद्व ।
पर नाहीं मा परापराध । अतिविरुद्ध कोणासी ॥ १६ ॥
साऱ्या जगताच्या आकाराने प्रसिद्ध असणारा तूंच, तेव्हां कोणाचें द्वंद्व कोणाला बाधणार? दुसराच नाहीं असें झालें, मग दुसऱ्याचे अपराध अतिशय विरुद्ध असे वाटणार कोणाला १६? 

यापरी सद्‌गुरुनाथा । तुझे चरणीं द्वंद्वसमता ।
तेणें समसाम्यें निजकथा । श्रीभगवता चालविसी ॥ १७ ॥
हे सद्गुरुनाथा! अशा प्रकारे तुझ्या चरणाच्या ठिकाणी द्वंद्वांची एकवाक्यता झाल्यामुळेच त्या ऐक्यभावनेनें, आपलीच कथा जी श्रीभागवत, ती चालवितोस १७.

तेंचि श्रीभागवतीं । बाविसावे अध्यायाअंतीं ।
उद्धवें पुशिलें निजशांती । द्वंद्वसमाप्तिउपावो ॥ १८ ॥
त्याच श्रीभागवतांतील बाविसाव्या अध्यायाच्या शेवटी, उद्धवाने आपल्याला शांति कशी प्राप्त होईल व ही द्वंद्वे कशी मोडतील ह्याचा उपाय विचारला १८.

उद्धवें प्रश्न केला वाड । जेणें ब्रह्मज्ञानाची पुरे चाड ।
तो श्रीशुकासी लागला गोड । तेणें पुरे कोड परीक्षितीचें ॥ १९ ॥
ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञानाची इच्छा पूर्ण होईल असा उद्धवाने हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. श्रीशुकाचार्यांना तर तो प्रश्न फारच आवडला ! आणि तेणेकरून परीक्षिति राजाची इच्छाही पूर्ण झाली १९.

ऐकोनि उद्धवाची प्रश्नोक्ती । शुक सुखावला आनंदस्फूर्ती ।
तो म्हणे सावध परीक्षिती । तुष्टला श्रीपती उद्धवासी ॥ २० ॥
उद्ध्वाचा हा प्रश्न ऐकून शुकाचार्य आनंदाने डुलू लागले, आणि परीक्षितीला म्हणाले, राजा ! सावध हो. उद्धवावर श्रीभगवान् प्रसन्न झाले २०.

ब्रह्मज्ञानाची निर्वाणस्थिती । ते जाण पां मुख्यत्वें शांती ।
ते उद्धवें पुशिली अतिप्रीतीं । तेणें श्रीपती संतोषला ॥ २१ ॥
ब्रह्मज्ञानाची अखेरची स्थिति म्हणजेच मुख्यत्वेकरून शांति होय. तीच अत्यंत प्रेमाने उद्धवाने विचारली, त्यामुळे श्रीकृष्णालाही संतोष झाला २१.

तो शांति आणि निवृत्ती । सांगेल चौं अध्यायोक्ती ।
ऐक राया परिक्षीती । ते मी तुजप्रती सांगेन ॥ २२ ॥
ह्याकरितां शांति आणि निवृत्ति ह्यांचेच निरूपण तो आतां चार अध्यायांत करील. हे राजा परिक्षिति ! तेच तुला मी सांगतों २२.

ऐकें पांडवकुलदीपका । कौरवकुळीं कुलतिलका ।
तूं शांतीसी अधिकारी निका । निजात्मसुखा साधकू ॥ २३ ॥
हे पांडवकुलदीपका! हे कौरवकुलांतील कुलतिलका ! ऐक. तूं आत्मसुखाचा साधक आहेस म्हणून खरोखर शांतीचा अधिकारी तूंच आहेस २३.

साधावया ब्रह्मप्राप्ती । तूं त्यक्तोदक श्रवणार्थीं ।
यालागीं शांती आणि निवृत्ती । ऐक नृपती हरि सांगे ॥ २४ ॥
ब्रह्मप्राप्ति  साध्य करण्याकरितां तूं जलपानही सोडून भगवत्कथाश्रवणाला बसला आहेस. याकरितां हे सज्जना ! श्रीकृष्णांनी सांगितलेली शांति आणि निवृत्ति ऐक २४.

तेविसावे अध्यायीं निरूपण । दुर्जनीं क्षोभविलें मन ।
त्या मनासी ये क्षमा पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण सांगेल ॥ २५ ॥
तेविसाव्या अध्यायांतील विषय असा आहे की, दुर्जनांनी जर मन क्षुब्ध केले, तर त्या मनाला पूर्णपणे क्षमा प्राप्त होईल असा मार्ग श्रीकृष्ण सांगतील २५.

भिक्षुगीतसंरक्षण । तें मनोजयाचें लक्षण ।
प्रकृतिजयाचें निरूपण । सांगेल संपूर्ण चोविसावा ॥ २६ ॥
भिक्षुमीताचे संरक्षण म्हणजेच मनोजयाचे लक्षण होय. आणि प्रकृतिजय कसा करावा हे सारें निरूपण चोविसाव्या अध्यायांत सांगितले आहे २६.

सांगोनि त्रिविध त्रिगुण । परी लक्षविलें निजनिर्गुण ।
हें गुण्जयाचें निरूपण सुलक्षण पंचविसावा ॥ २७ ॥
तीन प्रकारचे तीन गुण सांगून त्यांत आपण निर्गुण असल्याचे दाखविले आहे, हेच गुणजयाचें उत्तम निरूपण, तोच पंचविसावा अध्याय होय २७.

सव्विसावा अध्यावो येथ । तो धडधडीत विरक्त ।
सांगोनियां ऐलगीत । स्त्रियादि सम्स्त विषयत्यागु ॥ २८ ॥
आता यांत सव्वीसावा अध्याय 'जो आहे, तो धडधडीत विरक्तीचा आहे. त्यांत बुधापासून इलेच्या ठिकाणी झालेला जो ऐल-पुरुरवा, त्यांचे गीत सांगून स्त्रियादिक सर्व विषयांचा त्याग सांगितला आहे २८.

गुण विषय प्रकृति मन । या चहूंचें समाधान ।
चहूं अध्यायीं विशद जाण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥ २९ ॥
गुण, विषय, प्रकृति आणि मन या चारांचे समाधान श्रीकृष्ण आपल्या मुखाने चार अध्यायांत सांगतील २९.

यापरी परीक्षितीस जाण । करोनियां सावधान ।
श्रीशुकयोगींद्र आपण । कथालक्षण निरूपी ॥ ३० ॥
याप्रमाणे परीक्षिति राजाला सावध करून श्रीशुकयोगींद्र कथेचे निरूपण करूं लागला ३०.

बादरायणीरुवाच-
स एवमाशंसित उद्धवेन भागवतमुख्येन दशार्हमुख्य ।
सभाजयन् भृत्यवचो मुकुन्दस्तमाबभाषे श्रवणीयवीर्यः ॥ १ ॥
[श्लोक १] श्रीशुक म्हणतात ज्यांचे पराक्रम श्रवण करण्यायोग्य आहेत, अशा यदुश्रेष्ठ मुकुंदांना परम भगवद्‌भक्त उद्धवाने जेव्हा अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी आपल्या सेवकाच्या प्रश्नाची प्रशंसा करून त्याला म्हटले. (१)

शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि उद्धवाची विनंती ।
वचनें संतोषला श्रीपती । तो उद्धवाप्रती संबोधी ॥ ३१ ॥
शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षिति! ही उद्धवाची विनंती ऐकून त्याच्या भाषणाने श्रीकृष्णाला संतोष झाला आणि तो उद्ध्वाला पुढे उपदेश करूं लागला ३१.

कोटी जन्मांतीं केवळ । द्विजत्वें पाविजे सत्कुळ ।
हें माहापुण्याचें निजफळ । तेंचि निष्फळ हरिभक्तीविणें ॥ ३२ ॥
कोट्यावधि जन्म जावेत, तेव्हांच शेवटी ब्राह्मणांच्या उत्तम कुलांत जन्म होतो. तें महापुण्याचे फळ आहे. परंतु हरिभक्ति नसेल तर तेही निष्फळच होय ३२.

सदा सफळ आंब्याचा रुख । त्यावरी उपजे कांवरुख ।
तो सफळींही निष्फळ देख । तैसे उत्तम लोक भजनेंवीण ॥ ३३ ॥
आंब्याचा एकादा वृक्ष सदासर्वदा फलद्रूप होणाराच असतो, पण त्यावरच जर बांडगूळ उगवले, तर तो फलद्रूप असलेला वृक्षही निष्फळं  होतो. त्याप्रमाणे उत्तम लोकही भजनाशिवाय व्यर्थ होतात ३३.

ते स्थिति नाहीं उद्धवापासीं । उत्तम जन्म यादववंशीं ।
सभासदता आल्याही हातासी । श्रीमदासी भुलेचिना ॥ ३४ ॥
पण उद्धवाची मात्र तशी गोष्ट नव्हती. तो यादवांच्या उत्तम वंशांत जन्मास येऊन श्रेष्ठता हाती येऊनही संपत्तीच्या मदाने भुललाच नाही ३४.

झालियाही राज्यसंपत्ती । जो विसंबेना भगवद्भक्ती ।
भागवतमुख्यत्वाची प्राप्ती । त्यासीच निश्चितीं महाराजा ॥ ३५ ॥
हे महाराजा ! राज्यवैभव प्राप्त झाले असतांही जो भगवद्भक्तीला विसंबत नाही, त्यालाच भगवद्भक्तांमध्ये श्रेष्ठपणाचा लाभ खरोखर होतो ३५.

सगुण सुंदर पतिव्रता । अनुकूळ मिळालिया कांता ।
जो विसंबेना भगवत्पथा । भागवतमुख्यता त्या नांव ॥ ३६ ॥
सद्गुणी, सुंदर व पतिव्रता स्त्री अनुकूल अशी मिळाली असतांही जो भक्तिमार्ग सोडीत नाही, त्याचंच नांव श्रेष्ठभगवत्भक्त  ३६.

इंहीं गुणीं अतियुक्त । विवेकेंसी अतिविरक्त ।
श्रीकृष्णचरणीं अनुरक्त । मुख्य भागवत उद्धवू ॥ ३७ ॥
उद्धव तर हा गुणांनी परिपूर्ण भरलेला होता. विचाराने तर तो अत्यंत विरक्त होता. आणि श्रीकृष्णाच्या चरणी तर तो अत्यंत अनुरत होता. म्हणून उद्धव हाच श्रेष्ठ भगवद्भक्त होय ३७.

वयें धनें जें श्रेष्ठपण । तें श्रेष्ठत्व अतिगौण ।
भगवत्प्राप्ती ते श्रेष्ठ जाण । तेणें भाग्यें परिपूर्ण उद्धवू ॥ ३८ ॥
वयाने व संपत्तीनें जो थोरपणा येतो, तो थोरपणा अत्यंत गौण समजला पाहिजे. कारण भगवत्प्राप्ति हीच सर्वात श्रेष्ठ होय असे समज. त्याच वैभवानें उद्धव हा परिपूर्ण होता ३८.

जो श्रीकृष्णाचा विश्वासी । श्रीकृष्ण एकांत करी ज्यासी ।
गुण ज्ञान सांगे ज्यापाशीं । त्याच्या भाग्यासी केवीं वानूं ॥ ३९ ॥
तो श्रीकृष्णाचा अत्यंत विश्वासू होता. श्रीकृष्ण ज्याच्याशी एकांत करीत असे, ज्याच्याजवळ गुह्मज्ञान सांगत असे, त्याच्या भाग्याचे वर्णन काय करावें ? ३९, 

परब्रह्म जें कां साक्षात । जें उद्धवासी झालें हस्तगत ।
त्याच्या बोलामाजीं वर्तत । भाग्यें भाग्यवंत तो एक ॥ ४० ॥
साक्षात जें परब्रह्म, तेंच मुळी उद्धवाला हस्तगत झाले होते. इतकेच नव्हे, तो परब्रह्मरूपी श्रीकृष्ण त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असे. म्हणून भाग्यशालीपणाने खरा भाग्यवंत असा एक तोच होय ४०.

उद्धवभाग्य वानित वानित । शुक झाला सद्गदित ।
स्वानंदें वोसंडला तेथ । ठेला तटस्थ महासुखें ॥ ४१ ॥
अशा प्रकारे उद्धवाच्या भाग्याचे वर्णन करीत करीत शुक्राचार्य सद्गदित झाला. त्याच्या अंत:करणाला आनंदाने इतकें भरते आले की, तो त्या भरांत तटस्थ बसून राहिला ४१.

उद्धवभाग्याचा उद्रेक । सांगतां वोसंडला श्रीशुक ।
तें देखोनि कुरुनायक । जाहला आत्यंतिक विस्मित ॥ ४२ ॥
अशा प्रकारे उद्धवाच्या भाग्याचा उत्कर्ष वर्णन करतांना श्रीशुक गहिवरला हे पाहून परीक्षिति राजालाही फार आश्चर्य वाटले ४२.

ज्याचें निजभाग्य सांगतां । श्रीशुकासी होतसे अवस्था ।
उद्धव भाग्याचा तत्त्वतां । मजही सर्वथा मानला ॥ ४३ ॥
तो मनात म्हणाला, ज्याचे भाग्य सांगतां सांगतां शुकाचार्यांनासुद्धा गहिवर आला, तो उद्धव खरोखरीच भाग्यवान  होय. मलाही तो सर्वतोपरी पूज्यच आहे ४३.

तंव शुक म्हणे रायासी । परम भाग्य तें उद्धवासीं ।
तेणें विनवितां हृषीकेशी । वचनमात्रेंसीं तुष्टला ॥ ४४ ॥
इतक्यांत शुकाचार्य राजास म्हणाले, राजा त्या उद्धवाचे भाग्य अत्यंत अलौकिक खरें. त्याने विनंती करतांच त्या भाषणाने श्रीकृष्ण संतुष्ट झाला ४४.

उद्धवासी शांतीची चाड । तो प्रश्न श्रीकृष्णांसी झाला गोड ।
त्यांचे पुरवावया कोड । निरूपण वाड सांगेल ॥ ४५ ॥
उद्धवाला शांतीचीच इच्छा होती व तोच प्रश्न श्रीकृष्णालाही फार आवडला; म्हणून त्याचा हेतु पूर्ण करण्यासाठीच आतां तो त्याचे विस्तृत निरूपण करील ४५.

परम शांतीचा अधिकारी । तूंचि एक निजनिर्धारीं ।
ऐसें उद्धवप्रेमपुरस्करीं । शांति श्रीहरि सांगत ॥ ४६ ॥
खरोखर विचार केला तर त्या श्रेष्ठ शांतीचा अधिकारी एक तूंच आहेस, असें उद्धवाला प्रेमपुरस्सर म्हणून श्रीकृष्ण सांगू लागले ४६.

श्रीभगवानुवाच-
बार्हस्पत्य स वै नात्र साधुर्वै दुर्जनेरितैः ।
दुरुक्तैर्भिन्नमात्मानं यः समाधातुमीश्वरः ॥ २ ॥
[श्लोक २] भगवान श्रीकृष्ण म्हणाले - हे बृहस्पतिशिष्या ! दुर्जनांच्या कटुवाणीच्या आघाताने घरे पडलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरूष या जगात सहसा सापडत नाही. (२)

उद्धवा तू जें बोलिलासी । मीही सत्य मानीं त्यासी ।
दुर्जनीं केल्या अपमानासी । सहावया कोणासी शांति नाहीं ॥ ४७ ॥
उद्धवा! तूं जे बोललास तें मीही खरेंच समजतो. दुर्जनांनी अपमान केला असतां तो सहन करण्याइतकी शांति कोणालाच नसते ४७.

देव पादुका वाहती शिरसीं । मुख्य इंद्र लागे ज्याच्या पायांसीं ।
अष्ट महासिद्धि ज्याच्या दासी । ब्रह्मज्ञान ज्यपाशीं वचनांकित ॥ ४८ ॥
देवही ज्याच्या पादुका मस्तकावर वाहातात, मुख्य इंद्रही ज्याच्या पायीं लागतो, अष्ट महासिद्धि ज्याच्या दासी होऊन राहिल्या आहेत, आणि ब्रह्मज्ञान ज्याच्या अंकित होऊन राहिले आहे ४८, 

ऐसा देवगुरु बृहस्पती । त्याचा शिष्य तूं विवेकमूर्ती ।
यालागीं शांतीच्या साधक युक्तीं । तूंचि निश्चितीं जाणसी ॥ ४९ ॥
असा जो देवांचा गुरु बृहस्पति, त्याचा तूं शिष्य साक्षात विवेकाची मूर्तीच आहेस. म्हणून शांति साध्य होण्याचे जे उपाय आहेत ते खरोखर तुलाच समजतील ४९.

शांति आकळावया उद्धवासी । आदरें सत्कारी हृषीकेशी ।
अनुमोदूनि त्याचे बोलासी । शुद्ध शांतीसी हरि सांगे ॥ ५० ॥
उद्धवाला शांतीचे रहस्य कळावे म्हणून श्रीकृष्णांनी आदराने त्याचा मोठा गौरव केला, आणि त्याच्याच भाषणाला अनुमोदन देऊन श्रीकृष्ण शुद्ध शांतीचे स्वरूप सांगू लागले ५०.

निंदा अवज्ञा हेळण । दुर्जनीं केलिया अपमान ।
हें साहे तो ईश्वर जाण । निजबोधें पूर्ण तो मद्रूप ॥ ५१ ॥
निंदा, अवज्ञा, उपहास इत्यादि मार्गानी दुर्जनांनी केलेला अपमान जो सहन करील, तो साक्षात् ईश्वरच होय, हे लक्षात ठेव. तो आत्मज्ञानाने पूर्ण मद्रूपच  झालेला असतो ५१.

ज्यासी सर्वभूतीं निजात्मता । दृढ बाणलीसे तत्त्वतां ।
तो दुर्जनाचिया आघाता । साहे सर्वथा यथासुखें ॥ ५२ ॥
प्राणिमात्राच्या ठिकाणी आत्मस्वरूपच पाहणें हें  ज्याला खरोखर पूर्णपणे पटले आहे, तो दुर्जनाच्या आघातालाही मोठ्या आनंदाने सहन करतो ५२.

जो स्वयें होय अवघें जग । त्यासी लागतां उपद्रव अनेग ।
उठेना क्रोधाची लगबग । साहे अनुद्वेग यथासुखें ॥ ५३ ॥
जो स्वत:च सारे जग बनून राहतो, त्याला कितीही उपद्रव लागले तरी क्रोधाची उसळी येतच नाही. तो मुळीच उद्विग्न न होता ते उपद्रव आनंदाने सहन करितो ५३.

निजांगीं लागतां निजकर । नुठी क्रोधद्वेषांचा उद्गार ।
निजात्मता जो देखे चराचर । शांति त्याचें घर स्वयें रिघे ॥ ५४ ॥
आपलाच हात आपल्या अंगाला लागला तर रागाचा किंवा द्वेषाचा शब्द आपल्या तोंडांतून निघत नाही, त्याप्रमाणेच चराचराला जो आत्मस्वरूपानेच पहातो, त्याच्या घरांत शांति ही आपण होऊनच शिरते ५४.

उद्धवा ऐसा ज्यासी निजबोधू । त्यासी म्हणिजे सत्य साधू ।
तोचि साहे पराचा अपराधू । शांतिशुद्ध तो एक ॥ ५५ ॥
उद्धवा ! असे ज्याला आत्मज्ञान झाले असेल, त्यालाच खराखरा साधु म्हणावा. तोच दुसऱ्याचा अपराध सहन करतो. तोच एक शांतीच्या योगाने पवित्र झालेला असतो ५५.

नेणोनियां निजबोधातें । इतर जे सज्ञान ज्ञाते ।
ते न साहती द्वंद्वातें । एक तूतें सांगेन ॥ ५६ ॥
हे आत्मज्ञान ज्यांना समजत नाही, असे जे दुसरे ज्ञानसंपन्न  विद्वान् असतात, ते ही द्वंद्वे सहन करू शकत नाहीत तेही तुला सांगतों ऐक ५६.

न तथा तप्यते विद्ध पुमान्बाणैः सुमर्मगैः ।
यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः ॥ ३ ॥
[श्लोक  ३] माणसाच्या हृदयाला जेवढी पीडा दुष्टांच्या मर्मभेदी कठोर वाग्बाणांनी होते, तेवढी मर्मभेदी बाणांनीही होत नाही. (३)

तिख्याचे अतितिख बाण । जेणें घायें होती विकळ प्राण ।
त्याहूनि दुर्जनाचे वाग्बाण । अधिक जाण रुपती ॥ ५७ ॥
पोलादाचे अत्यंत तीक्ष्ण बाण असतात, त्यांच्या ज्या घायाने प्राण अगदी विव्हळ होतात त्यांहून दुर्जनांचे वाग्बाण शरीरांत खोल जाऊन रुतून बसतात ५७.

लोहाचे बाण जेथ लागती । तेचि अंगें व्यथित होती ।
परी वाग्बाणांची अधिक शक्ती । घायें भेदिती पूर्वज ॥ ५८ ॥
लोखंडाचे बाण शरीरावर जेथे लागतात तेवढ्याच अवयवाने जखमी मनुष्य विव्हळ होतो. पण वाग्बाणांचें सामर्थ्य त्याहून अधिक आहे. त्यांच्या प्रहाराने पूर्वजही जखमी होतात ५८.

लोहबाणाचे लागलिया घाये । ते पानपाल्या व्यथा जाये ।
परी वाग्बाण रुपल्या पाहें । तें शल्य राहे जन्मांत ॥ ५९ ॥
लोखंडाच्या बाणाची जखम झाली तर ती जखम झाडपाला लावल्याने बरी होते, पण वाग्बाण एकदा रुतून बसले की त्यांचे शल्य जन्मभर टोचत राहते ५९.

वर्मस्पर्शाचें बासटें जाण । विंधितां निंदेचे वाग्बाण ।
तेणें भेदितांचि अंतःकरण । सर्वांगीं पूर्ण भडका उठी ॥ ६० ॥
वर्में बाहेर काढण्याच्या विषारी भावनेने माखलेले निंदेचे वाग्बाण शरीरांत घुसले व त्यांनी अंत:करणाचा भेद केला, की सर्व आंगभर आगीचा भडका उठतो ६०.

दुर्जनाचिया दुरुक्ती । अपमानाची उद्धती ।
साहावयालागीं शांती । नव्हे निश्चितीं प्राकृतां ॥ ६१ ॥
अशी दुर्जनाची दुरुक्ति व अपमानाचा उद्धटपणा सोसण्याला लागणारी शांति सामान्य जनांच्या ठिकाणी मुळीच असत नाहीं ६१.

ऐशिया रीतीं यथोचित । उद्धवाचें मनोगत ।
संलक्षूनि श्रीकृष्णनाथ । शांतीचा निश्चितार्थ सांगों पाहे ॥ ६२ ॥
अशा रीतीने उद्धवाचे मनोगत यथायोग्य ध्यानात घेऊन श्रीकृष्णनाथ शांतीचा निर्णय सांगत आहेत ६२.

पूर्वीं सांगीतलें निजशांतीसी । वेगीं साधीं म्हणे उद्धवासी ।
ते अटक वाटेल तयासी । अतिसंकोचासी पावेल ॥ ६३ ॥
पूर्वी ज्या शांतीचे वर्णन केले होते, तीच लौकर साध्य कर असें श्रीकृष्ण उद्धवास म्हणाला. पण त्याला तो अडथळा वाटेल आणि त्याच्या मनाला अत्यंत संकोच होईल ६३, 

होतें उद्धवाचे मानासीं । हे शांति असाध्य सर्वांसी ।
जाणोनियां हृषीकेशी । सांगे इतिहासेंसीं भिक्षुगीत ॥ ६४ ॥
कारण ही शांति सर्वांना असाध्य आहे असे उद्धवाच्या मनांत होते; हे लक्षात घेऊन श्रीकृष्ण भिक्षुगीत (एका संन्याशाने गाइलेले विचार) संपूर्ण इतिहासासह सांगत आहेत ६४.

कथयन्ति महत्पुण्यमितिहासमिहोद्धव ।
तमहं वर्णयिष्याचि निबोध सुसमाहितः ॥ ४ ॥
[श्लोक ४] उद्धवा ! यासंबंधी एक मोठा पुण्यकारक इतिहास सांगतात, तो मी तुला सविस्तर सांगतो लक्षपूर्वक ऐक. (४)

अशांतिक्षोभाचे चित्तमळ । क्षाळावया जी तत्काळ ।
इतिहासगंगा केवळ । अतिनिर्मळ कृष्णोक्ति ॥ ६५ ॥
शांततेचा भंग होऊन क्षोभाने उत्पन्न होणारे जे चित्तांतील मळ, ते तत्काळ नाहीसे करण्याला योग्य अशी जी इतिहासगंगा, तीच अत्यंत निर्मळ अशी कृष्णोक्ति होय ६५.

श्रीकृष्णवदनब्रह्माद्रीं । श्रीभागवतऔदुंबरीं ।
जन्मली शांतिगोदावरी । निजमूळाकारीं निर्मळ ॥ ६६ ॥
श्रीकृष्णमुखरूपी ब्रह्मगिरि पर्वतावर श्रीभागवतरूप औदुंबराखाली शांतगोदावरी उगम पावली, त्यामुळे ती मुळापासूनच अत्यंत निर्मळ आहे ६६.

ते गुप्त ओघें नारदगती । उद्धवगंगाद्वारीं व्यासोक्ती ।
तेचि शुकमुखकुशावर्तीं । प्रकटे अवचितीं पवित्रपणें ॥ ६७ ॥
तीच गुप्त ओघाने नारदगतीने  उच्चगंगाद्वारी व्यासमुखाने प्रगट झाली; व तीच शुकाचार्याच्या मुखरूपी कुशावर्तात पवित्रपणाने अकस्मात् प्रगटली ६७.

तया पवित्र ओघाचिये गती । श्रद्धाधृती समरसे भक्ती ।
त्याचि अरुणा वरुणा सरस्वती । हे संगमप्राप्ती जेथ होय ॥ ६८ ॥
त्या पवित्र ओघाबरोबर श्रद्धा, शांति  आणि भक्ति ह्याच अनुक्रमें अरुणा, वरुणा आणि सरस्वती या नद्या येऊन त्यांचा येथे जो संगम झाला आहे ६८, 

तेणें सांतिगंगेची स्थिती । भरूनि उथळे अतिउन्नती ।
तेथ श्रवणार्थी बुडी देती । ते पवित्र होती निजक्षमा ॥ ६९ ॥
त्यामुळे शांतिरूप गंगेला पूर येऊन ती दुथडीने वहात चालली आहे. त्यांत जे श्रवणार्थी बुड्या देतात, ते आपल्या आंगच्या क्षमेनेच पवित्र होतात ६९.

ते शांतिगंगा अतिविख्यात । उद्धव करावया पुनीत ।
प्रकट करी श्रीकृष्णनाथ । भिक्षुगीतविन्यासें ॥ ७० ॥
ती शांतिरूप अत्यंत प्रसिद्ध गंगा उद्धवाला  पुनीत करण्यासाठी भिक्षुगीतवर्णनाने श्रीकृष्णांनी प्रकट केली आहे ७०.

केनचिद्भिक्षुणा गीतं परिभूतेन दुर्जनैः ।
स्मरता धृतियुक्तेन विपाकं निजकर्मणाम् ॥ ५ ॥
[श्लोक ५] एका भिक्षूला दुष्टांनी अतिशय त्रास दिला त्यावेळी त्याने आपले धैर्य सोडले नाही आणि हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ आहे, असे समजून आपल्या मनातील भाव प्रगट केला होता. (५)

उद्धवा कोणी एक संन्यासी । दुर्जनीं उपद्रवितां त्यासी ।
म्हणे क्षयो होय दुष्टकर्मासी । येणें संतोषें मानसीं क्षमावंत ॥ ७१ ॥
उद्धवा ! कोणी एक संन्यासी होता. त्याला दुर्जनांनी अतिशय उपद्रव दिला असता तो म्हणत असे की, त्यांच्या उपद्रवांनी माझ्या दुष्कर्माचा क्षय होईल. याच आनंदानें तो आपल्या मनात दुर्जनांविषयी क्षमाशील झाला ७१.

आपुलें अंगींचे मळ । पुढिलीं क्षाळितां सकळ ।
जो क्रोधेंसीं करी तळमळ । तो मूर्ख केवळ आत्मघाती ॥ ७२ ॥
आपल्या अंगी असलेला मळ दुसऱ्यांनी पूर्णपणे धुवून काढला असतां जो क्रोधाने तळमळ करीत असतो, तो मूर्ख व केवळ आत्मघातकी होय ७२.

लोक म्हणती ज्यासी दुर्जन । संन्यासी म्हणे ते माझे स्वजन ।
माझे दोषांचें निर्दळण । यांचोनि धर्में जाण होतसे ॥ ७३ ॥
लोक ज्यांना दुर्जन असे म्हणतात, त्यांना संन्यासी म्हणतो की, “हे माझे स्वजन आहेत. कारण माझ्या दोषांचा नाश ह्यांच्याच धर्मामुळे होत असतो" ७३.

संमुख कोणी निंदा करिती । तेणें अत्यंत सुखावे चित्तीं ।
म्हणे मज तुष्टला श्रीपती । पापाची निष्कृती सहजें होय ॥ ७४ ॥
कोणी समोर निंदा करूं लागले असता त्यामुळे तर तो मनामध्ये अतिशय आनंदित होतो. तो म्हणतो की, हा श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्नच झाला. कारण माझ्या पातकांचा नाश आपोआपच होत आहे ७४.

ऐसेनि विवेकें तत्त्वतां । शांतीसी ढळो नेदी सर्वथा ।
चढोनि निजधैर्याचे माथां । गातिली गाथा ते ऐक ॥ ७५ ॥
खरोखर अशा विचाराने तो शांतीला कधीही मुळीच ढळू देत नाही. आपल्या धैर्याच्या शिखरावर चढून त्याने जी गाथा गाईली  ती ऐक ७५.

उद्धवासी म्हणे श्रीकृष्णनाथ । ये अर्थीं होईं सावचित्त ।
अतिलोभी तो अतिविरक्त । झाला तो वृत्तांत सांगेन ॥ ७६ ॥
श्रीकृष्णनाथ उद्धवाला म्हणाला, उद्धवा ! ह्याकरितां आतां नीट लक्ष दे. अत्यंत लोभी होता तोच अत्यंत विरक्त कसा झाला तो वृत्तांत सांगतों ७६.

अवन्तिषु द्विजः कश्चिदासीदाढ्यतमः श्रिया ।
वार्तावृत्तिः कदर्यस्तु कामी लुब्धोऽतिकोपनः ॥ ६ ॥
[श्लोक ६] अवन्तिनगरात एक ब्राह्मण राहात होता शेती, व्यापार करून त्याने पुष्कळ संपत्ती मिळवली होती तो अतिशय कंजूष, कामी, लोभी आणि रागीट होता. (६)

मालवदेशीं अवंतिनगरीं । तेथ ब्राह्मण वसे गृहद्वारीं ।
कृषिवाणिज्यवृत्तिवरी । जीविका करी निरंतर ॥ ७७ ॥
मालव देशांतील अवंती नगरीमध्ये एक ब्राह्मण होता. तो आपल्या घराच्या ओसरीवर बसत असे. तो शेतकी व व्यापार ह्या उद्योगांवर आपला निर्वाह नेहमी करी ७७.

गांठीं धनधान्यसमृद्धी । अमर्याद द्रव्यसिद्धी ।
परी अतिशयें कृपणबुद्धी । पोटाही त्रिशुद्धी न खाय ॥ ७८ ॥
त्याच्या घरी धनधान्याची समृद्धि असून द्रव्यही  विपुल होते. पण त्याची बुद्धि अतिशय कृपण असल्यामुळे तो पोटालासुद्धा खरोखर पुरतें खात नसे ७८.

पोटा सदा खाय कदन्न । तेहीं नाहीं उदरपूर्ण ।
तेथ स्त्रीपुत्रादि दासीजन । जठरतर्पण न पावती ॥ ७९ ॥
स्वत:च्या पोटाला खावयाचे म्हणजे नेहमी जाडेभरडे अन्न, आणि तेसुद्धा पोटभर खावयाचे नाही. अर्थात् तेथे त्याची बायकामुलें, नोकरचाकर देखील  पोटभर जेवीत नसत ७९.

न करी नित्यनैमित्य । स्वप्नीं नेणे धर्मकृत्य ।
देव ब्राह्मण अतिथी तेथ । सदा जात पराङ्मुख ॥ ८० ॥
तो कधीही नित्य-नैमित्तिक कर्म करीत नसे. धर्मकृत्य करावयाचे तर त्याला स्वप्नांतसुद्धा ठाऊक नव्हते. देव, ब्राह्मण, अतिथि तेथून नेहमी विमुखच परत जावयाचे ८०. 

कवडी एक लाभू पाहे । तैं मातापित्यांचें श्राद्ध आहे ।
तें सांडूनि अंत्यजगृहा जाये । न मनी भये स्पर्शाचें ॥ ८१ ॥
एकादे दिवशी एखाद्या काडीचा लाभ होणार असला, आणि त्याच दिवशी आईबापांचे श्राद्ध असले, तरी ते श्राद्ध सोडून देऊन तो लाभासाठी महाराच्या घरीसुद्धा जाई. शिवाशिवीवें भय मनांतसुद्धा यावयाचे नाही ८१.

मी उत्तम हा हीनवर्ण । हे धनलोभें गिळी आठवण ।
हाता येतां देखोनि धन । स्वीकारी अन्न पतिताचें ॥ ८२ ॥
मी उच्च  जातीचा आहे व हा नीच  जातीचा आहे, ह्याची आठवण तो धनलोभामुळे विसरून जाई. हातांत पैसा पडतो असे पाहिले की, हीन जातीवें अन्नसुद्धा ग्रहण करी ८२.

धनकामासाठीं देख । न मनी पाप महादोख ।
कवडीच्या लोभें केला मूर्ख । नाठवे नरकमहापातू ॥ ८३ ॥
द्रव्यलोभापुढे पातक किंवा महादोष हें  मनांतसुद्धा आणीत नसे. कवडीच्या लोभानेही त्याला इतके मूर्ख बनविले होते की, त्यामुळे त्याला नरक किंवा महापतन यांची आठवणच होत नसे ८३.

यापरी तो कर्मभ्रष्ट । अकर्म करी क्रियानष्ट ।
अतिवंचक महाशठ । केवळ नष्ट धनलोभी ॥ ८४ ॥
अशा प्रकारे तो कर्मभ्रष्ट व क्रियानष्ट ब्राह्मण दुष्कर्मे करीत असे. तो महाठक, मोठा कपटी, मोठा नष्ट व धनलोभी होता ८४.

त्या धनलाभाचा अवरोधू । होतां देखोनि खवळे क्रोधू ।
गोहत्यादि ब्रह्मवधू । करावया सिद्धू स्वयें होय ॥ ८५ ॥
त्याच्या धनलोभांत काही अडथळा आलेला दिसला की तो क्रोधाने खवळे, आणि गोहत्या, ब्रह्महत्या वगैरे करावयालासुद्धा स्वतः तयार होई ८५.

धनकामीं क्रोधाची वस्ती । धनापाशीं पापें असती ।
धनलोभीं ज्याची स्थिती । कदर्युवृत्ती त्या नांव ॥ ८६ ॥
धनलोभाच्या ठिकाणी क्रोधाची वस्ती असते, व द्रव्यापाशीं पातकेंही असतातच. द्रव्यलोभावरच ज्याचें मन नेहमी असते, त्याच्या त्या वृत्तीचें नांव कृपणपणा ८६.

ऐसें धन सांचिलें फाडोवाडें । त्याचाही व्यय जैं करणें पडे ।
तैं प्राणांतचि येऊनि घडे । विचार पुढें असेना ॥ ८७ ॥
अशा द्रव्याचे मोठमोठे ढीग त्याने साठवून  ठेविले होते, आणि त्यांचा जर त्याला खर्च करणे भाग पडले, तर त्याला आता आपला जीवच जातो असें वाटे. दुसरा विचारच राहात नसे ८७.

वानराचे गालींचे चणे । हाता न येती जितां प्राणें ।
तैसा द्रव्याचा व्ययो करणें । तेंचि मरणें कदर्या ॥ ८८ ॥
वानराच्या गालांत असलेले हरभरे त्याच्या जिवांत जीव आहे तोपर्यंत काही हाती लागत नाहीत, त्याप्रमाणेच द्रव्य खर्च करणे तेच कृपणाचे मरण होय ८८.

ज्ञातयोऽतिथयस्तस्य वाङ्मात्रेणापि नार्चिताः ।
शून्यावसथ आत्मापि काले कामैरनर्चितः ॥ ७ ॥
[श्लोक ७] त्याने आपले जातीबांधव किंवा अतिथी यांना कधी गोड शब्दांनीही सुखविले नाही तर मग खाऊपिऊ घालण्याची गोष्ट तर दूरच राहो ! कधीही धर्मेकर्मे न होणार्‍या घरात तो राहात असे आणि योग्यवेळी सुद्धा सुखोपभोगांनी आपल्या शरीराला सुखी करीत नसे. (७)

घरींचा भात वेंचेल कांहीं । यालागीं वैश्वदेव करणें नाहीं ।
तेथ अतिथि आलिया पाहीं । कोणे समयीं कोण पूजी ॥ ८९ ॥
घरांतला थोडा तरी भात खर्च होईल म्हणून वैश्वदेवसुद्धा करावयाचा नाही, मग अतिथि आला तर त्याला केव्हा आणि कोण पूजणार ! ८९.

अतिथि आलिया जाण । ऐसे बोल बोले आपण ।
जे वचनमात्रें जाती प्राण । त्यासी मागे कोण अन्नोदक ॥ ९० ॥
इतकेंही करून अतिथि आलाच तर, त्याच्याशी तो असें भाषण करी की, त्या भाषणाने त्याचा प्राणच जावयाच्या बेतात यावा. मग त्याजकडे अन्नपाणी मागणार कोण? ९०.

देखोनि त्याचिया घरासी । ब्रह्मचारी नित्य उदासी ।
आशा त्यजिली संन्यासीं । जेवीं राजहंसीं गोमय ॥ ९१ ॥
त्याच्या घराकडे पाहिले की ब्रह्मचारी उदास होत. संन्याशांनी तर, राजहंस जशी शेणाची आशा सोडतात, त्याप्रमाणे याच्या घराची आशा सोडली होती ९१.

भिकारीं सांडिलें त्याचें द्वार । अतिथीं डावलिलें निरंतर ।
पाहुणा दूरी पाहे बिढार । निराशी पितर सर्वदा ॥ ९२ ॥
भिकाऱ्यांनी त्याचे दार वर्ज्यच केलेले होते. अतिथि तर त्याच्या घराला नेहमी वगळून जात. पाहुणा आला तर तो आपलें बिऱ्हाड  लांबच ठेवी. आणि पितर तर सदा सर्वदा निराशच झालेले होते. ९२ 

दारा न ये कोरान्नकर । घर सांडूनि गेले उंदिर ।
काउळीं वोसंडिलें तें घर । चिडियां साचार न मिळे दाणा ॥ ९३ ॥
कोरान्न मागणारा कोणी दारांत उभा राहावयाचा नाही. उंदीरसुद्धा घर सोडून चालते झाले. कावळ्यांनी ते घर वर्ज्य  केलेले होते. आणि चिमण्यांनासुद्धा खरोखर तेथें दाणा मिळत नव्हता ९३.

मुंग्यांसी पडे नित्य लंघन । तिंही धरिलें बिढार आन ।
पोटा ना खाय जो आपण । तेथ कथा कोण इतरांची ॥ ९४ ॥
मुंग्यांना रोज लंघनाची पाळी येत असे, म्हणून त्यांनी आपल्याला दुसरें बिऱ्हाड  पाहिलें. जो स्वतःसुद्धा धड पोटाला खात नाही, त्याच्यापुढे इतरांची कथा काय ? ९४.

अत्यंत भूक लगल्या पोटीं । चणेही न खाय जगजेठी ।
तेथ कायसी सेवकांची गोठी । कावलीं पोटीं स्त्रीपुत्रें ॥ ९५ ॥
पोटांत अतिशय भूक लागली तरीसुद्धा स्वतः घरचा मालक असून मूठभर चणेसुद्धा खात नव्हता. मग त्याच्या नोकरांची गोष्ट काय सांगावी ? बायकामुलेसुद्धा पोटाकरितां संतापून जात ९५.

जैं वमन घडे त्यासी । तैं न करी फळाहारासी ।
अधिक वेंचू कोण सोशी । यालागीं उपवासी स्वयें पडे ॥ ९६ ॥
जरी ओकून पडले, तरीसुद्धा फराळ म्हणून करावयाचा नाही. कारण, अधिक खर्च  झाला तर कोण सोशील? म्हणून स्वत:च उपाशी राही ९६.

तेथ कुळगुरूचा सन्मान । कुळधर्म गोत्रभोजन ।
व्याही जांवई यांचा मान । धनलोभी जाण कदा न करी ॥ ९७ ॥
कुलगुरूचा सन्मान करावयाचा, किंवा कुळधर्माला भाऊबंद जेवावयाला सांगावयाचे, किंवा व्याही जावयांचा मान करावयाचा, यांपैकी धनलोभी असतो तो एकही कधीं करीत नाही ९७.

ऋतुकाळें फळें येती पूर्ण । त्यांसी दृष्टिभेटी हाटीं जाण ।
परी जिव्हेसी आलिंगन । प्राणांतीं आपण हों नेदी ॥ ९८ ॥
ऋतुबळांत भरपूर फळफळावळ मळ्यांत पिकली, तर ती त्याला बाजारांत दृष्टीस पडावयाची. पण प्राण गेला तरी त्यांतील  एक फळ जिभेला आपण होऊन काही लावावयाचें नाहीं ९८.

मातेचें स्तनपान सेविलें । तेंचि क्षीर रसना चाखिलें ।
पुढें दूधचि वर्जिलें । व्रत धरिलें धनलोभें ॥ ९९ ॥
आईचे स्तनपान केले तेव्हा जे काय दूध चाखले  असेल तेवढेच, पुढे दूध वर्ज्यच  केलेले. असे द्रव्यलोभाचे जणू काय त्याने व्रतच घेतलेले होते ९९.

रस रसनेचें माहेर । तेणेंवीण ते गादली थोर ।
धनलोभ अतिनिष्ठुर । करितां करकर भेटों नेदी ॥ १०० ॥
खरोखर रस हे रसनेचें माहेर आहे. असे असता त्या रसावांचूनच तिची तो गांजणूक करीत असे. कारण त्याचा द्रव्यलोम अत्यंत निष्ठुर होता. त्यामुळे त्याच्या जिभेने कितीही किरकिर केली तरी तो तिची रसाशी भेट म्हणून होऊ देत नसे १००. 

वस्त्रें मळकीं अतिजीर्ण । मस्तक सदा मलिन ।
मुखीं वास निघती जाण । स्वप्नींही पान न खाय ॥ १ ॥
आंगावर वस्त्रें  घ्यावयाची ती अतिशय मळकी, जुनाट आणि फाटकींतुटकी घ्यावयाची, आणि मस्तक तर सदासर्वदा मळकेंच असावयाचे. तोंडाला घाण येत असावयाची, तरी स्वप्नांतसुद्धा विडा खावयाचा नाही १. 

सण वार दिवाळी दसरा । तैं जुने जोंधळे धाडी घरा ।
अन्नेंविण पीडी लेंकुरां । कदर्यु खरा या नांव ॥ २ ॥
दिवाळी, दसरा असा काही सणवार आला तर घराकडे  जुने जोंधळे  पाठवून  द्यावयाचे. अन्नाशिवाय पोराबाळांनासुद्धा चरफडत ठेवी.  ह्याचेंच नांव खरा कृपण २. 

धनलोभी धर्महीन । देखोनि कदर्युवर्तन ।
विमुख झाले स्वजन । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३ ॥
अशा प्रकारें तो द्रव्यलोभी धर्महीन झालेला पाहुन व त्याचे ते कृपणपणाचे वर्तन पाहून त्याचे आप्तजनही त्याला सोडून गेले. तेच वर्णन श्रीकृष्ण सांगतो ३.

दुःशीलस्य कदर्यस्य द्रुह्यन्ते पुत्रबान्धवाः ।
दारा दुहितरो भृत्या विषण्णा नाचरन् प्रियम् ॥ ८ ॥
[श्लोक  ८] त्याचा कंजूषपणा आणि वाईट स्वभाव यांमुळे त्याचे पुत्रकन्या, बंधूबांधव, नोकरचाकर, पत्‍नी इत्यादी सर्वजण दुःखी असत त्यामुळे ते त्याच्या मनाला बरे वाटेल असे काहीही करीत नसत. (८)

नाहीं स्वधर्मीं निजशीळ । दानधर्म खुडी सकळ ।
अत्यंत धनलोभी केवळ । त्यासी दुःशीळ बोलिजे ॥ ४ ॥
स्वधर्माचरणांत ज्याचें मन मुळीच नाही, सर्व दानधर्म जो बंद करून थकतो, ज्याला केवळ अतोनात द्रव्यलोभ असतो, त्याला 'दुःशील' असें म्हणतात ४.

अन्नआच्छादनेंवीण । कुटुंबेंसहित आपण ।
जो कदर्थवी निजप्राण । कदर्यु पूर्ण त्या नांव ॥ ५ ॥
अन्नवस्त्रावांचून साऱ्या कुटुंबासह आपला जीवसुद्धा त्रासवितो, त्यालाच खरोखर कृपण असें नांव आहे ५.

कदर्यु नरासी तंव देख । मुख्य स्त्री होय विमुख ।
स्वजन आणि सेवक ।पुत्रही पराङ्मुख होती त्यासी ॥ ६ ॥
अशा कृपण मनुष्याला आधी त्याची स्त्रीच  अंतरते, आणि मग आप्त, इष्ट, चाकरनोकर व पुत्रसुद्धा त्याच्या विरुद्ध होतात ६.

आपले जे कां सखे बंधू । तेही करूं लागती विरोधू ।
द्रव्यविभागाचा संबंधू । कलह सुबद्धू आरंभे ॥ ७ ॥
आपले जे आप्त इष्ट असतात तेसुद्धा विरोध करु  लागतात, आणि द्रव्याच्या वाटणीचा संबंध येऊन गृहकलहाला आरंभ होतो ७.

गांठीं असोनि अमित धन । न करी माहेरसणबोळवण ।
कन्या क्षोभोनियां जाण । शाप दारुण त्या देती ॥ ८ ॥
पदरी अतोनात द्रव्य  असूनही माहेरपण, सणवार किंवा बोळवण करीत नाही, म्हणून मुली रागावून त्याला भयंकर शाप देतात ८. 

गोत्रज सदा चिंतित । हा मरे तैं जेवूं दूधभात ।
आप्त ते झाले अनाप्त । अवघे अनहित वांछिती ॥ ९ ॥
भाऊबंद  तर नेहमी असेंच चिंतन करीत असतात की, हा एकदां मेला म्हणजे आम्ही यथेच्छ दूधभात खाऊं. मित्र असतात तेच शत्रु होऊन राहतात. सर्वजण त्याच्या वाइटाचीच इच्छा करतात ९.

जयाचिया द्रव्यासी जाण । नाहीं धर्माचें संरक्षण ।
तें काळेंचि होय क्षीण । तेंचि लक्षण हरि सांगे ॥ ११० ॥
ज्याच्या द्रव्याला धर्माचे संरक्षण नसते, त्याचे द्रव्य थोड्याच  काळानें क्षयाला जाते. तोच प्रकार श्रीकृष्ण सांगतो ११०. 

तस्यैव यक्षवित्तस्य च्युतस्योभयलोकतः ।
धर्मकामविहीनस्य चुक्रुधुः पञ्चभागिनः ॥ ९ ॥
[ श्लोक ९] इहलोक आणि परलोक अशा दोहोंनाही मुकलेल्या व यक्षासारखी धनाची केवळ राखण करणार्‍या त्याच्यावर धर्मकर्मांच्या अभावी पंचमहायज्ञांच्या देवता रागावल्या. (९)

खाय ना जेवी ना लावी हात । ठेव्यापाशीं जैसें भूत ।
तैंसे याचें यक्षवित्त । असे राखत ग्रहो जैसा ॥ ११ ॥
खात नाही, जेवीत नाही, आणि द्रव्याला हातही पण लावीत नाही, अशा रीतीने ठेव्याजवळ जसा समंध बसतो, त्याप्रमाणे हाही आपलें यक्षवित्त एकाद्या ग्रहासारखे राखीत बसे ११.  

केवळ धर्मकामरहित । धनलोभी जैसें भूत ।
त्या नांव बोलिजे यक्षवित्त । जीवाहून आप्त अर्थ मानी ॥ १२ ॥
असा धर्मेच्छाविरहित केवळ समंधाप्रमाणे असणारा जो द्रव्यलोभी, त्यालाच ' यक्षवित्त' असे म्हणतात. त्याला द्रव्य म्हणजे प्राणाहुनही प्रिय वाटत असते १२.

स्वशरीरीं भोग नाहीं जाण । तेणें इहलोक झाला शून्य ।
नाहीं स्वधर्मकर्म पंचयज्ञ । परलोक शून्य तेणें झाला ॥ १३ ॥
आपल्या शरीराला सुखोपभोग घेत नाही त्यामुळे इहलोक शून्य होतो, आणि स्वधर्मकर्म, पंचमहायज्ञ करीत नाही त्यामुळे परलोकही शून्य होतो १३.

यज्ञाचे पंच विभागी । यज्ञभाग न पवे त्यांलागीं ।
ते कोपोनियां पंचविभागीं । वित्तनाशालागीं उद्यत ॥ १४ ॥
यज्ञाचे हविर्भाग घेणारे पांचजण असतात, त्यांना त्यांचे भाग पोचत नाहीत, त्यामुळे ते पांचहीजण क्षुब्ध होउन त्याच्या द्रव्यनाशाला उद्यक्त होतात १४.

पावोनि ब्राह्मणजन्म वरिष्ठ । धनलोभें स्वधर्मनष्ट ।
तो होय उभय लोकीं भ्रष्ट । पावे कष्ट कृपणत्वें ॥ १५ ॥
श्रेष्ठ अशा ब्राह्मणजन्माला येउन जो द्रव्यलोभाने स्वधर्मापासून भ्रष्ट होतो, तो दोन्ही लोकांपासून च्युत होतो व कृपणपणाने कष्ट मात्र भोगतो १५.

करितां अतिआयास । जोडला अर्थ बहुवस ।
त्यासी अधर्में आला नाश । तोही विलास हरि सांगे ॥ १६ ॥
अत्यंत कष्ट करून पुष्कळ पैसा मिळविला तरी त्याचा अधर्मानं नाश होतो. त्याचाही प्रकार श्रीकृष्ण सांगतो १६.

तदवध्यानविस्त्रस्तपुण्यस्कन्धस्य भूरिद ।
अर्थोऽप्यगच्छन्निधनं बह्वायासपरिश्रमः ॥ १० ॥
[श्लोक १०] हे उदार उद्धवा ! पंचमहायज्ञाच्या देवतांच्या कोपामुळे त्याचा पूर्वपुण्याचा आधार नाहीसा झाला आणि अतिशय उद्योग व परिश्रम करून मिळवलेले धनही नष्ट झाले. (१०)

पंचयज्ञदेवता सकळ । येणें उपेक्षिल्या केवळ ।
तिंहीं द्रव्यलाभाचें मूळ । पुण्यक्षयें तत्त्काळ छेदिलें ॥ १७ ॥
पंचमहायज्ञाच्या ज्या सर्व देवता असतात, त्यांची तो पूर्ण उपेक्षा करतो. त्यामुळे द्रव्यलाभाचे मूळ जे पुण्य, त्या पुण्याचाच देवतांनी क्षय करून टाकिला असे समजावें १७.

द्रव्यप्राप्तिपुण्यदिवाकर । अस्तमाना गेला तो भास्कर ।
मग द्रव्यलाभाचा अंधकार । अधर्में थोर दाटला ॥ १८ ॥
द्रव्यप्राप्तीचा जो पुण्यरूप सूर्य, तो सूर्यच अस्तमानाला गेला, म्हणजे मग अधर्मानें द्रव्यलाभाच्या ऐवजी द्रव्यक्षयाचाच अंधार दाटून राहतो १८.

प्रयासें संचिली संपत्ती । तिसी अधर्म‌अंधाराची ये राती ।
क्षोभल्या पंचधा यज्ञमूर्ती । पंचधा पावती महानाश ॥ १९ ॥
प्रयासाने संपत्ति सांठविलेली असते, तेथें अधर्मरूप अंधाराची रात्र येते, आणि त्या पांचही यज्ञमूर्ति क्षुब्ध झाल्या म्हणजे पांच प्रकारचे महानाश होतात १९.

जो सुखी न करी कुटुंबालागीं । जो निजात्मा निववीना नाना भोगीं ।
जो द्रव्य न वेंची धर्मालागीं । त्यसी पंचविभागी ऊठती ॥ १२० ॥
जो कुटुंबालाही सुख देत नाही, किंवा आपल्या जीवालाही अनेक प्रकारचे सुखोपभोग भोगीत नाहीं, जो धर्माप्रीत्यर्थ द्रव्य खर्चीत नाही, त्याच्यावर हे यज्ञाचे पांच भागीदार रागावून उठतात १२०.

दायाद चोर राजा आगी । अधर्में रोग संचरे अंगीं ।
हे पांचजण विभागी । द्रव्यनाशालागीं पावती ॥ २१ ॥
भाऊबंद, चोर, राजा, आग आणि अधर्माने आंगांत रोग होणे या पांच रूपांनी ते पांच भागीदार द्रव्याचा नाश करण्याला तयार होतात २१.

नाहीं द्विजपूजा श्रद्धायुक्त । नाहीं लौकिकक्रिया उचित ।
नाहीं दानादि धर्म वेदोक्त । द्रव्यक्षयो तेथ आवश्यक ॥ २२ ॥
जेथे श्रद्धेने ब्राह्मणाची पूजा नाही, जेथें उचित असें लौकिक कर्म होत नाही, जेथे वेदांत सांगितल्याप्रमाणे दानादि धर्म होत नाही, त्या ठिकाणी हटकून द्रव्याचा  नाश होतो २२.

जेथ नाहीं वडिलांसी सन्मान । जेथ नाहीं पंचमहायज्ञ ।
जेथ गुरूसीं करी अभिमान । तेथ क्षयो जाण उद्धवा ॥ २३ ॥
जेथे वडिलांचा मान रहात नाही, जेथे पंचमहायज्ञ होत नाहीत, जेथे गुरूजवळच अभिमान धरला जातो, उद्धवा ! तेथे द्रव्याचा  नाश हा व्हावयाचाच, हे लक्षात ठेव २३.

ज्यांसी परांचा द्वेष सदा । जे बोलती परापवादा ।
जे चढती धनगर्वमदा । तेथ क्षयो सदा उद्धवा ॥ २४ ॥
ज्यांना निरंतर दुसऱ्याचा द्वेष वाटतो, जे दुसऱ्याची निंदा करतात, संपत्तीच्या गर्वाने मदोन्मत्त होतात, तेथें उद्धवा ! नेहमी द्रव्याचा क्षय हा ठेवलेलाच २४.

त्याच द्रव्यक्षयाचें लक्षण । ग्रंथाधारीं निरूपण ।
स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । दयाळू पूर्ण निजभक्तां ॥ २५ ॥
श्रीकृष्ण हे भक्तांविषयी पूर्ण दयाळू असल्यामुळे त्याच द्रव्यक्षयाचे लक्षण ते ग्रंथाधाराने स्वतः सांगत आहेत २५.

ज्ञातयो जगृहुः किञ्चित् किञ्चिद्दस्यव उद्धव ।
दैवतः कालतः किञ्चिद्‌ब्रह्मबन्धोर्नृपार्थिवात् ॥ ११ ॥
[श्लोक ११ ] उद्धवा ! त्या अधम ब्राह्मणाचे काही धन त्याच्या कुटुंबियांनी घेतले, काही चोरांनी चोरून नेले काही दैवी कोपाने नष्ट झाले, काही काळाच्या प्रभावाने नाहीसे झाले, काही इतर माणसांनी घेतले आणि उरलेसुरलेले धन राजाने काढून घेतले. (११)

स्त्री पुत्र होऊनि एक । तिंही ठेवा नेला कित्येक ।
गोत्रज मिळोनि सकळिक । बलात्कारें देख वांटा नेला ॥ २६ ॥
बायको आणि मुले एक होऊन त्यांनी बराच ठेवा लांबविला. भाऊबंद होते ते सारे एक होऊन त्यांनी बळजबरीने आपला वाटा नेला २६.

चोरीं फोडोनियां घर । काढूनि नेलें भांडार ।
आगी लागोनियां घर । वस्तु अपार जळाल्या ॥ २७ ॥
चोरांनी घर फोडून भांडार काढून नेले. घराला आग लागून असंख्य वस्तु जळून गेल्या २७.

हिंसाळ्यानें गेलें शेत । प्रवर्त बुडाला जेथींचा तेथ ।
विश्वासू ठेवा घेऊनि जात । खतखूत हारपलें ॥ २८ ॥
शेतावर रोग पडून त्याचा सत्यानाश झाला. व्यापार जेथल्यातेथें बुडाला. विश्वासू होते त्यांनीच सर्व ठेवा दडपून टाकला, आणि खतापत्रांचे पुडकें हरवले २८.

भांडीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे ।
पातिकरावरी घाला पडे । चहूंकडे अपावो ॥ २९ ॥
भांड्यात ठेवलेला कापूर उडून जातो; समुद्रात गेलेलें गलबत फुटते; त्याप्रमाणे भागीदारावर काही तरी घाला पडून चहूंकडून नाश झाला २९.

ठक येऊनि एकांतीं । मुलाम्याचीं नाणीं देती ।
धनलोभाचे काकुळती । हातींची संपत्ती त्यांसी दे ॥ १३० ॥
फसवे लोक येऊन त्यांनी एकांतामध्ये खोटे मुलामा दिलेले रुपये पदरांत घातले, आणि नफ्याच्या किंवा व्याजाच्या आशेने त्याने आपली हातात असलेली संपत्ति त्यांना देऊन टाकली १३०.

स्वचक्रपरचक्रविरोधधाडी । खणती लावूनि घर फोडी ।
तळघरींचे ठेवे काढी । भरोनि कावडी धन नेती ॥ ३१ ॥
लढाईची धामधूम उडून कुदळीने सारें घर खणून काढण्यात आले; आणि तळघरांत ठेवलेले ठेवेसुद्धा उपसून काढून कावडी भरून घेऊन गेले ३१.

पाणी रिघे पेंवाआंत । तेणें धान्य नासे समस्त ।
धटू झोंबोनि हरी शेत । दैवहत तो झाला ॥ ३२ ॥
 पेंवांत पाणी शिरून त्यामुळे सारा दाणागोटा कुजून गेला, आणि कोणीतरी धटिंगण उठून त्याने शेतही हिसकावून घेतले. अशा प्रकारे हा कफल्लक होउन बसला ३२.

गोठणीं सेणयां रोगू पडे । निमाले गायीम्हशींचे वाडे ।
उधारें नेले ठाणबंदी घोडे । तो रणीं महायुद्धीं ॥ ३३ ॥
गायवाड्यांत रोगाची साथ येऊन गाईम्हशींची खिल्लारें पार नाहीशी झाली ठाणबंदांत असलेले घोडे ज्याने नेले होते ; तो तिकडेच युद्धामध्ये ठार झाला ३३.

भूमिनिक्षेप जे करूं जाती । ते आपणियाकडे धूळी ओढिती ।
तेथ घालूनि निजसंपत्ती । तोंडीं माती स्वयें घाली ॥ ३४ ॥
जे कोणी आपले द्रव्य जमिनीत पुरून ठेवतात ते आपल्याकडे धूळच खरोखरी ओढवून घेतात. कारण आपली संपत्ति मातीत घातली म्हणजे अखेर त्यांच्या तोंडांतही मातीच पडते ३४.

बुद्धि सांगती वाड वाड । येथूनि तोंडीं घाला दगड ।
ऐसे ठेवे बुजिले दृढ । त्याची चाड धरूं गेला ॥ ३५ ॥
त्या वेळी मोठमोठ्या गोष्टी सांगत असतात. अमुक ठिकाणी खड्याच्या तोंडावर दगड ठेवा म्हणतात. अशा रीतीने बंदोबस्ताने बुजवून ठेवलेले ठेवे आपले म्हणून इच्छा धरतो ३५.

ठेवे ठेविले जे अनेक । ते पृथ्वीनें गिळिले निःशेख ।
भाग्य झालें जैं विमुख । झाले अनोळख ते ठाय ॥ ३६ ॥
पण अशा ज्या अनेक ठेवी ठेवलेल्या असतात; त्या साऱ्या पृथ्वी जेथल्या तेथेंच गिळून टाकते. कारण दैव फिरलें म्हणजे त्या ठेवलेल्या ठिकाणाचीच ओळख रहात नाही आणि जागाच चुकते ३६.

अधर्में अदृष्ट झालें क्षीण । विपरीत भासे देहींचें चिन्ह ।
पालटला निजवर्ण । ब्राह्मणपण लक्षेना ॥ ३७ ॥
अधर्मानें  प्रारब्धाचा क्षय झाला आणि देहावरही अवकळा आली. तो निस्तेज होऊन ब्राह्मण आहे असेंसुद्धा वाटेना ३७.

देखे तो पुसे ज्ञाति कोण । तो सांगे जरी मी ब्राह्मण ।
ऐक त्याचें न मनी मन । वर्णाग्रपण मावळलें ॥ ३८ ॥
जो कोणी भेटे, तो तुमची जात कोणती म्हणून विचारू लागे भाणि मी ब्राह्मण आहे असे जरी त्याने सांगितले, तरी ते ऐकणाऱ्याच्या मनाला खरे वाटत नसे. कारण त्याचे ब्रह्मतेजच अस्ताला गेलेलें होतें ३८.

एवं निःशेष नासलें धन । ब्रह्मवर्चस्व गेलें जाण ।
म्लानवदन हीनदीन । खेदखिन्न अतिदुःखी ॥ ३९ ॥
अशा प्रकारे द्रव्यही पूर्णपणे नष्ट झाले, आणि ब्राह्मणपणाची कळाही नाहीशी झाली. तेव्हां तो निस्तेज चेहऱ्याचा व दीन दुबळा होऊन दुःखानें खिन्न  होऊन हाय हाय करीत बसला ३९.

स एवं द्रविणे नष्टे धर्मकामविवर्जित ।
उपेक्षितश्च स्वजनैश्चिन्तामाप दुरत्ययाम् ॥ १२ ॥
[श्लोक १२] अशा प्रकारे त्याची सर्व संपत्ती निघून गेली त्याने धर्म जोडला नाही की सुखोपभोग घेतले नाहीत इकडे त्याच्या सोयर्‍याधायर्‍यांनी सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवली, आता त्याला भयानक चिंतेने घेरले. (१२)

गेलें शेत निमाली कुळवाडी । घर पाडिलें परचक्रधाडीं ।
धन नासलें नाहीं कवडी । अधर्माचें जोडी हे दशा ॥ १४० ॥
शेत गेल्यामुळे शेतकी बुडाली, परचक्राचा घाला येऊन घर पडलें, सारे द्रव्य जाऊन कवडीसुद्धा जवळ राहिली नाही, इतकी दशा एक अधर्म केल्याने पदरीं आली १४०.

नाहीं स्वधर्मकर्म ना दान । विहित भोग न करी आपण ।
त्या धनलोभ्याचें नासलें धन । जेवीं कां स्वप्न रंकाचें ॥ ४१ ॥
स्वधर्मकर्म केले नाही, दान केले नाही, योग्य तेवढे सुखही आपण घेतले नाही, म्हणून त्या द्रव्यलोभ्याचे द्रव्य स्वप्नांमध्यें भिकारी व्हावें त्याप्रमाणे धुळीस मिळालें ४१.

दैव झालें पराङ्मुख । त्या हतभाग्याची दशा देख ।
स्त्रीपुत्रें झालीं विमुख । तिंहीं निःशेख दवडिला ॥ ४२ ॥
दैव फिरल्यामुळे त्या दुर्दैवी पुरुषाची काय दशा झाली पहा. बायकामुलें अंतरली आणि त्यांनी त्याला मुळीच बाहेर घालवून दिले ४२.

ऐक धनलोभाच्या ठायीं । इष्ट मित्र पूर्वींचि नाहीं ।
गोत्रजांसी त्याचें सुख कायी । दवडिला पाहीं उपेक्षितू ॥ ४३ ॥
आणखी ऐक. द्रव्यलोभाच्या ठिकाणी इष्टमित्र हे पहिल्यापासून कधीच नसतात. आणखी भाऊबंदांना तरी त्याच्यापासून सुख तें काय? म्हणून त्यांनीही त्याला उपेक्षा करून सोडून दिले ४३.

निंदा प्रत्यक्ष करिती लोक । रांडा पोरें थुंकती देख ।
खावया नाहीं निःशेख । मागतां भीक मिळेना ॥ ४४ ॥
लोक धडधडीत त्याच्या तोंडावरच त्याची निंदा करूं लागले. रांडापोरें तोंडावर थुंकू  लागली आणि खावयाला तर जवळ काही नाही. भीक मागावयाला गेले तर भीकसुद्धा कोणी घालीना ४४.

भिकेलागीं जेथ जेथ गेला । म्हणती काळमुखा येथें कां आला ।
होता धनलोभें भुलला । भला नागविला ईश्वरें ॥ ४५ ॥
तो जेथे जेथें भिक्षा मागायला जाई, तेथे तेथे हा काळतोंडा इकडे कशाला आला ? असें म्हणत. द्रव्यलोभासाठी काय पण तो भुलला होता ! ईश्वरानें खासा कफल्लक  बनविला' ४५, 

यापरी धिक्कारिती लोक । धन जाऊनि झाला रंक ।
चिंतावर्तीं पडला देख । दुःखें महादुःख पावला ॥ ४६ ॥
अशा रीतीने लोक त्याची निर्भर्त्सना करूं लागले, आणि तो तर द्रव्य जाऊन शुद्ध भिकारी  बनला व चिंतासमुद्रात पडून मोठ्या दुःखानें विलाप करू लागला ४६. 

तस्यैवं ध्यायतो दीर्घं नष्टरायस्तपस्विनः ।
खिद्यतो बाष्पकण्ठस्य निर्वेदः सुमहानभूत् ॥ १३ ॥
[श्लोक १३ ] धन नाहीसे झाल्यामुळे सतत त्याच काळजीने त्या बिचार्‍याला मनात खेद उत्पन्न झाला अश्रूमुळे त्याचा गळा दाटून येऊ लागला परंतु यामुळेच त्याच्या मनात संसाराबद्दल उत्कट वैराग्य उत्पन्न झाले. (१३)

धनलोभ्याचें गेलें धन । धनासवें न वचेचि आठवण ।
तें आठवतां फुटताहे मन । तळमळी जाण अतिदुःखें ॥ ४७ ॥
 द्रव्यलोभी मनुष्याचे द्रव्य गेले तरी  त्या द्रव्याबरोबर त्याची आठवण काही जात नाही. ती आठवण झाली की मन अगदी द्विधा  होते आणि त्या असह्य  दुःखाने तो अगदी तळमळत असतो ४७.

कांटा रुतल्या भुजंगकपाळीं । पुच्छ तुटल्या सापसुरळी ।
हो कां जळावेगळी मासोळी । तैसा तळमळी अतिदुःखें ॥ ४८ ॥
सर्पाच्या  मस्तकांत काटा  रुतला , किंवा सापसुरळीचे शेपूट तुटलें, किंवा मासा पाण्यातून बाहेर काढला, तर ती जशी असह्य  दुःखाने चरफडतात ४८, 

मनें आठवितांचि धन । हृदयीं चालिलें स्फुंदन ।
अश्रुधारा स्रवती नयन । मूर्च्छापन्न क्षणक्षणां ॥ ४९ ॥
त्याप्रमाणेच पूर्वीच्या धनाची मनांत आठवण झाली की तोही मनामध्ये हुंदके देऊ लागतो. डोळ्यांतून घळघळ अश्रूधारा वाहतात आणि घटकेघटकेला मुर्छा येऊन पडतो ४९.

पोटीं दुःखें अति चरफडे । धाय मोकलूनियां रडे ।
उठे बैसे पाहे पडे । लोळे गडबडे आरडत ॥ १५० ॥
मनांतील दुःखाने तो अतिशय तळमळतो, धाय मोकलून रडू  लागतो, उठतो, बसतो, पाहतो आणि पुन्हा वेड्याप्रमाणे पडतो. जमिनीवर गडबडा लोळून ओरडत  बसतो १५०, 

मग म्हणे रे कटकटा । झालों एक वेळ करंटा ।
अहा विधातया दुष्टा । काय अदृष्टा लिहिलेंसी ॥ ५१ ॥
आणि म्हणतो , 'हाय रे देवा ! शेवटी मी भिकारी झालों ! हाय हाय! ! “हाय रे दैवा ! शेवटी मी भिकारी झालों अं! हाय हाय ! हे दुष्टा ब्रह्मदेवा ! काय रे हे माझ्या कपाळी लिहून ठेवलेस? ५१.

मज ठावो नाही कोणीकडे । विचार संभवेना पुढें ।
अतिदुःख आलें जी रोकडें । तेणें विचारें रडे महादुःखी ॥ ५२ ॥
मला कोठेच ठाव नाही, व पुढे काही योग्य विचारही सुचत नाही." असें जें अत्यंत मोठे दुःख त्याच्यापुढे येऊन उभे राहिले, त्याच्या विचाराने तो महादुःखी होऊन रडत बसतो ५२.

हें अल्पदुःख पावलों येथें । पुढें थोर दुःख आहे मातें ।
यम दंडील निष्ठुर घातें । कोण तेथें सोडवी ॥ ५३ ॥
" येथे हे थोडेसेंच दुःख झाले आहे, पण मला पुढे मोठे दुःख भोगावयाचे आहे ! यम जेव्हां निर्दयपणाने घावांनी ताडण करील, त्या वेळी मला तेथे कोण सोडविणार ? ५३.

म्यां नाहीं दीधलें दान । मी नाहीं स्मरलों नारायण ।
मज येती नरक दारुण । तेथ कोण सोडवी ॥ ५४ ॥
मी दानधर्म केला नाही, किंवा मी नारायणाचे स्मरणही केले नाही, तेव्हां भयंकर नरकच माझ्या कपाळी येणार. तेथे मला कोण सोडवील? ५४.

म्यां नाहीं केले पंचमहायज्ञ । नाहीं दीधलें अतिथींसी अन्न ।
नाहीं केलें पितृतर्पण । माझे दुःख कोण निवारी ॥ ५५ ॥
मी पंचमहायज्ञ केले नाहीत, मी अतिथींना अन्न दिलें नाहीं; मी पितृतर्पण केलें नाही, तेव्हा माझे दुःख कोण निवारण करणार ? ५५.

म्यां नाहीं केली द्विजपूजा । नाहीं भजलों अधोक्षजा ।
नाहीं वंदिले वैष्णवरजा । माझे दुःखसमाजा कोण नाशी ॥ ५६ ॥
मी ब्राह्मणाची पूजा केली नाही, मी परमेश्वराचे भजन केलें नाही, भगवद्भक्तांच्या पायधुळीला वंदन केलें नाहीं; तेव्हा माझ्या दुःखसमुदायाचा नाश कोण करणार ? ५६.

मी सर्वथा अकर्मकाती । बुडालों बुडालों अघोरीं ।
धांव पाव गा श्रीहरी । मज उद्धरीं दीनातें ॥ ५७ ॥
मी सर्वस्वी अकर्मच करणारा असल्यामुळे अघोर नरकामध्ये बुडालों हो बुडालों! हे श्रीहरे ! धावत येऊन मला पाव आणि माझा गरिबाचा उद्धार कर ५७.

कृष्णा माधवा मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी ।
गरुडध्वजा गोवर्धनधारी । मज उद्धरीं दीनातें ॥ ५८ ॥
हे कृष्णा ! हे माधवा ! हे मुरारे ! हे अच्युता ! हे अनंता ! हे श्रीहरे ! हे गरुडध्वजा ! हे गोवर्धनधारी! माझा गरिबाचा उद्धार कर ५८.

तुवां रक्षिलें प्रल्हादासी । अंबरीषासी गर्भवासीं ।
उदरीं राखिलें परीक्षितीसी । तैसें मज दीनासी उद्धरीं ॥ ५९ ॥
तूं प्रल्हादाचे रक्षण केलेंस, गर्भवासापासून अंबरीषाला मुक्त केलेंस, उदरामध्ये परीक्षितीचे संरक्षण केलेंस, त्याप्रमाणेच माझा गरिबाचा उद्धार कर ५९.

तुवां तारिलें अहल्येसी । उद्धरिलें नष्टा अजामिळासी ।
उडी घातली गजेंद्रासी । तेणें वेगेंसी मज तारीं ॥ १६० ॥
तू  अहल्येला तारलेंस, पातकी अजामिळाला उद्धरलेंस, आणि गजेंद्राच्या संकटांत उडी घातलीस, तितक्याच त्वरेने माझेही तारण कर १६०

महादोषांची श्रेणी । नामें तारिली कुंटिणी ।
तेणें लाघवें चक्रपाणी । मज दुष्टालागोनी उद्धरीं ॥ ६१ ॥
सर्व पातकांची केवळ खाणच अशी कुंटीणही नामस्मरणाने मुक्त केलीस. हे चक्रपाणी ! तितक्याच चातुर्याने माझा दुष्टाचाही उद्धार कर ६१.

जळो जळो हा धनकाम । गेलें वृथा माझें जन्म ।
फुकाचें जें रामनाम । तें मी अधम न म्हणेंचि ॥ ६२ ॥
आग लागो ह्या धनेच्छेला, तिच्यामुळे माझा जन्म फुकट गेला. फुकटचे जे रामाचे नाव ते सुद्धा मी अधमानें उच्चारलें नाहीं ! ६२.

रामनामाच्या प्रतापासाठीं । जळती म्हापापांच्या कोटी ।
थोर अधम मी एक सृष्टीं । नाम वाक्पुटीं न म्हणेंचि ॥ ६३ ॥
रामनामाच्या प्रभावाने महान् पातकांच्या राशीच्या राशी जळून जातात. असे असतां मुखाने मी रामनाम उच्चारीत नाही, त्याअर्थी जगामध्ये अत्यंत अधम असा एक मीच होय" ६३.

ऐसा मानोनि अपराध । अनुतापें करितां खेद ।
उपजला अतिनिर्वेद । तेंचि गोविंद स्वयें सांगे ॥ ६४ ॥
अशा रीतीनें तो आपले अपराध मनांत आणून पश्चात्तापाने दुःख करूं लागला असता त्याला तीव्र  वैराग्य उत्पन्न झाले. तेंच श्रीकृष्ण स्वतः सांगतों ६४.

स चाहेदमहो कष्टं वृथाऽऽत्मा मेऽनुतापितः ।
न धर्माय न कामाय यस्यार्थायास ईदृशः ॥ १४ ॥
[श्लोक १४] आता तो ब्राह्मण मनात म्हणू लागला की, "अरेरे ! मी आजपर्यंत स्वतःला व्यर्थच कष्ट दिले ! जे धन मिळविण्यासाठी मी कठीण परिश्रम केले, त्याने ना धर्म साधला, ना सुखोपभोग ! (१४)

हात चुरूनि म्हणे कटकटा । ब्राह्मणदेहो मोक्षाचा वांटा ।
तो लाहोनि मी अतिकरंटा । धनलोभचेष्टा नाडलों ॥ ६५ ॥
तो ब्राह्मण हात चोळून म्हणतो, "अरेरे ! ब्राह्मणदेह हा मोक्षप्राप्तीचाच एक विभाग होय. तो प्राप्त होऊनही मी कसा अत्यंत करंटा राहिलो आणि द्रव्यलोभाच्या उलाढालीने व्यर्थ गेलों! ६५. 

जेणें देहें लाभे मोक्षसुख । त्या देहासी म्यां दीधलें दुःख ।
धनलोभी मी परम मूर्ख । मजऐसा आणिक असेना ॥ ६६ ॥
ज्या देहाच्या योगाने मोक्षाचे सुख मिळते, त्याच देहाला मी दुःख  दिलें. मी द्रव्याचा लोभ करणारा असा अत्यंत मूर्खच. माझ्यासारखा मूर्ख दुसरा कोणीच असणार नाही ६६.

न वेंचितां धर्मकामासी । अर्थ जोडिला सायासीं ।
त्या अर्थाची दशा ऐसी । अतिदुःखेंसीं मज फळला ॥ ६७ ॥
धर्माच्या कामी द्रव्याचा व्यय न करता मी मोठ्या प्रयासाने पैसा जमवून ठेवला, आणि त्या पैशाची तर अशी दशा झाली की, त्याने मला अत्यंत दुःखाची फळे दिली ६७.

बाप धनलोभाचें कवतिक । नाही इहलोक ना परलोक ।
थितें अंतरले मोक्षसुख । भोगवी नरक अनिवार ॥ ६८ ॥
द्रव्यलोभाचे आश्चर्य फार मोठे आहे. त्याच्यामुळे इहलोक नाही आणि परलोक नाही. सुलभ असलेले मोक्षसुख त्याच्यामुळे अंतरले. तो लोभ अनिवार नरक भोगावयास लावतो ६८.

देखें ज्या नरकाचे ठायीं । आकल्प बुडतां ठावो नाहीं ।
धनलोभ घाली तैसें ठायीं । तें म्यां नरदेहीं जोडिलें ॥ ६९ ॥
अहो पहा ! ज्या नरकामध्ये कल्पपर्यंत बुडून राहिले असतांही ठाव म्हणून लागत नाही, तशा ठिकाणी हा धनलोभ जीवाला नेऊन घालतो. तेच मी नरदेहांत मिळविले ६९.

जो जन्मला ब्राह्मणदेहीं । तो पूज्य होय लोकीं तिहीं ।
मोक्ष लागे त्याच्या पायीं । म्यां अभाग्यें तोही नाशिला ॥ १७० ॥
जो ब्राह्मणदेहांत जन्माला आला, तो तिन्ही लोकांत पूज्य होतो. मोक्ष त्याच्या पायांजवळ असतो. अशा ब्राह्मणदेहाचा मी दुर्दैवाने नाश करून टाकला १७०.

लोभें जें धन संचिलें । तें निःशेष नासोनि गेलें ।
परी मजलागीं अतिदुःखी केलें । बांधोनि दीधलें महानरका ॥ ७१ ॥
लोभाने ज्या द्रव्याचा संग्रह केला, ते तर सर्वच नाश पावलें, पण मला मात्र त्याने अत्यंत दुःखी केले व मला बांधून घोर नरकाच्या स्वाधीन केले ७१.

उत्तम देहो झाला प्राप्त । तो धनलोभें केला व्यर्थ ।
आयुष्य गेलें हातोहात । अतिसंतप्त अनुतापें ॥ ७२ ॥
मला उत्तम देह प्राप्त झालेला असता मी तो द्रव्याच्या लोभाने फुकट घालविला. हां हां म्हणतां आयुष्य निघून गेले आणि पश्चात्तापाने मात्र अतिशय संतप्त झालों ७२.

धनलोभींचे अचाट । वृथा गेले माझे कष्ट ।
वैराग्य उपजलें उद्भट । अतिचोखट सविवेक ॥ ७३ ॥
धनलोभामध्ये माझे फार मोठमोठे कष्ट व्यर्थ गेले, पण विवेकासहवर्तमान पवित्र असें अत्यंत वैराग्य मात्र सुदैवाने उत्पन्न झाले ७३.

धनलोभी जो कां नर । तो सकल दुःखांचें भांडार ।
धनबद्धक तो पामर । स्वमुखें साचार निंदीत ॥ ७४ ॥
जो द्रव्यलोभी मनुष्य असतो तो सर्व दुःखांचे भांडारच होय. जो धनाने बद्ध झालेला असतो तो पामर होय." अशा प्रकारें तो आपल्या तोंडानेच आपली निंदा करूं लागला ७४.

प्रायेणार्थाः कदर्याणां न सुखाय कदाचन ।
इह चात्मोपतापाय मृतस्य नरकाय च ॥ १५ ॥
[श्लोक  १५] कंजूष माणसाला धनापासून बहुधा कधीच सुख मिळत नाही या लोकी तो धन मिळविणे आणि त्याच्या रक्षणाच्या चिंतेने कष्टी होतो आणि मेल्यानंतर धर्म न केल्याकारणाने नरकात जातो. (१५)

प्रायशा जे धनबद्धक । त्यांसी इहलोकीं नाहीं सुख ।
धनरक्षणीं अतिदुःख । तें जातां देख प्राणान्त ॥ ७५ ॥
बहुधा जे द्रव्यलोभी असतात, त्यांना इहलोकीं सुख नसतेच. कारण, त्या द्रव्याचे रक्षण करण्यामध्येच त्यांना अतिशय दुःख होते, आणि तें धन गेलें असतां प्राणांतसमयच ओढवल्यासारखे होते ७५.

धनागमनीं अतिकष्ट । धनरक्षणीं कलह श्रेष्ठ ।
धननाशें होय हृदयस्फोट । इहलोकीं कष्ट धनलोभ्या ॥ ७६ ॥
द्रव्य मिळवितांना अतिशय कष्ट सोसावे लागतात, ते द्रव्य सांभाळतांना अतिशय कलह माजतात, आणि त्याच द्रव्याचा नाश झाला असतां छाती फुटून जाते. अशा प्रकारे द्रव्यलोभ्याला या जगांत कष्ट होतात ७६.

यापरीं इहलोकीं दुःख । अधर्में खुंटला परलोक ।
मरतां उरी आदळे नरक । आवश्यक धनलोभ्या ॥ ७७ ॥
इहलोकांत अशा प्रकारचे दुःख असते. आणि त्यात अधर्म होत असल्याने परलोकही अंतरतो. म्हणून द्रव्यलोभी मरतांना त्याच्या उरावर नरक हटकून येऊन आदळतो ७७.

जो धर्म करीना स्वयें न खाये । जो मजसारिखा कदर्यु होये ।
त्यासी चढतें वाढतें दुःख पाहें । नाहीं सुखसोये कदर्या ॥ ७८ ॥
जो धर्म करीत नाही व स्वतःही खात नाहीं, जो माझ्यासारखा कृपण होऊन राहतो, त्याला अधिकाधिक दुःखच होते पहा. कृपणाला सुखाची सोय मिळतच नाही ७८.

लोभाची वस्ती जिये ठायीं । तेथ स्वप्नींही सुख नाहीं ।
लोभ अतिशयें निंद्य पाहीं । तें आपण स्वमुखेंही सांगत ॥ ७९ ॥
ज्या ठिकाणीं लोभाची वस्ती असते, तेथे स्वप्नांत  सुद्धा सुख राहात नाही. हें  पहा! लोभ हा अतिशय निंद्य आहे. ते तो ब्राह्मण  स्वत: आपल्याच मुखाने सांगत आहे ७९.

यशो यशस्विनां शुद्धं श्लाघ्या ये गुणिनां गुणाः ।
लोभः स्वल्पोऽपि तान् हन्ति श्वित्रो रूपमिवेप्सितम् ॥ १६ ॥
[श्लोक  १६] जसे अंगावरील थोडेसेही कोड सुंदर स्वरूप बिघडवून टाकते, त्याचप्रमाणे थोडासासुद्धा लोभ यशस्वी लोकांचे शुद्ध यश आणि गुणी लोकांचे प्रशंसनीय गुण नष्ट करतो. (१६)

रणीं पडतां मुख्य धुरेसी । जो अंगें विभांडी त्या रणासी ।
खांदीं वाऊनि आणी रायासी । येवढी कीर्ति ज्यासी जोडली ॥ १८० ॥
समरांगणामध्ये पुढे असलेला मुख्य योद्धा पडला असतां जो स्वतः पुढे घुसून शत्रूसैन्याचा पराभव करितो व शत्रूच्या तडाक्यांत सांपडलेल्या राजाला खांद्यावर बसवून आणतो, इतकी कीर्ति ज्याला मिळाली १८०, 

लोभ संचरोनि त्यापाशीं । एक शेत मागवी रायासी ।
तेचि अपकीर्ति होय त्यासी । जग उपहासी मूर्खत्वा ॥ ८१ ॥
त्याच्या अंत:करणांत त्या शौर्याच्या मोबदल्याचा लोभ शिरून जर तो राजापाशी एक शेत मागू लागला, तर तीच त्याची अपकीर्ति होते, आणि सर्व जग त्याच्या मूर्खपणाचा उपहास करिते ८१.

त्यासी न मागतां राजा जाण । करूं पाहे आपणासमान ।
त्यासी लोभें आणोनि नागवण । मूर्खपण स्थापिलें ॥ ८२ ॥
कारण, त्याने काही न मागतांच राजा त्याला आपल्या बरोबरीचा करण्याच्या विचारांत असतो. त्या राजाच्या विचाराला या लोभाने अडथळा आणला. आणि त्या लोभामुळे मूर्खपणा मात्र प्रस्थापित झाला ८२.

स्वयें करितां कन्यादान । सकळ कुळ होय पावन ।
तेथेंही लोभें घेतां धन । अधःपतन धनलोभिया ॥ ८३ ॥
स्वतः कन्यादान केले तर सारे कुळ पावन होते, पण त्यातही जर लोभाने कन्येबद्दल द्रव्य घेतले, तर त्या द्रव्यलोभ्याला अधःपतन घडते ८३.

दाता देऊनियां दान । दानप्रसंगें उपार्जी धन ।
तेंचि दात्यासी दूषण । लोभ लांछन दानासी ॥ ८४ ॥
दाता दान देउनही त्या दानाच्या प्रसंगाने काही मोबदला मिळवील, तर तेंच दात्याला दूषणास्पद होते. अशा प्रकारें लोभ हा दानालाही लांच्छनास्पद होतो ८४.

वेदशास्त्रें करूनि पठण । पंडित झाले अतिसज्ञान ।
तेही धनलोभें छळिले जाण । ज्ञानाभिमान प्रतिष्ठे ॥ ८५ ॥
वेदशास्त्रांचे  पठण करून मोठे ज्ञानसंपन्न पंडित झाले, तरी त्यांचीसुद्धा द्रव्याच्या लोभाने छळणूक होते असे समज. कारण त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा अभिमान दृढपणे रहातो ८५.

देहप्रतिष्ठेचिये सिद्धी । पंडित-पंडितां वादविधी ।
नाना छळणोक्ती विरोधीं । ठकिले त्रिशुद्धी ज्ञातें लोभें ॥ ८६ ॥
देहाचे सत्यस्व सिद्ध करण्यासाठी पंडितपिडितांमध्ये वादविवाद सुरू होतात, आणि त्यांत विरोध आला असता ते अनेक प्रकारची छळाची भाषणे करतात. अशा प्रकारे ज्ञातेही खरोखर लोभाने फशीं पडतात ८६.

सविवेक सज्ञान ज्ञात्यासी । लोभ आणी निंदास्पदासी ।
इतरांची गति काइसी । ते लोभाची दासी होऊनि ठाती ॥ ८७ ॥
विचारसंपन्न व ज्ञानसंपन्न अशा पंडितालाही  लोभ  हा निंदेला  पात्र करतो, मग इतरांची कथा काय ? ते तर लोभाची बटिकच होऊन बसतात ८७.

लोभ शुद्धीसी करी अशुद्ध । लोभ तेथ निंदास्पद ।
तोचि दृष्टांत विशद । ऐक प्रसिद्ध सांगत ॥ ८८ ॥
लोभ हा पवित्र मनुष्यालाही अपवित्र करून सोडतो. लोभ असतो तेथें निंदेला स्थळ असते. तोच प्रसिद्ध दृष्टांत त्या ब्राह्मणाने स्पष्ट करून सांगितला, तो  ऐक ८८.

कुलशील अतिसुकुमार । रूपें सर्वांगमनोहर ।
नाकीं श्वेतता अणुमात्र । निंद्य सुंदर तेणें होय ॥ ८९ ॥
कन्या कुलवान् असली, सुशील असली, अत्यंत सुकुमार असली, ती स्वरूपाने सर्वांगमनोहर असली, आणि इतके असूनही जर तिच्या नाकावर लहानसाच पांढच्या कोडाचा ठिपका असला, तर त्यामुळे, ती सुंदर असूनही निंद्यच  होते ८९.

तेवीं अल्पही लोभाची जे वस्ती । नाशी गुणौदार्ययशः कीर्ती ।
लोभाऐसा त्रिजगतीं । कर्ता अपकीर्ती आन नाहीं ॥ १९० ॥
त्याप्रमाणे थोड्याही  लोभाची वस्ती मनामध्ये असली, तरी तो लोभ सर्व गुण, औदार्य, यश, कीर्ति या सर्वांचा नाश करतो. म्हणून लोभासारखा अपकीर्ति करणारा त्रिभुवनांत दुसरा कोणी नाही १९०.

धनलोभीं सदा विरोधू । धनलोभ तोडी सखे बंधू ।
धनलोभाऐसा नाहीं बाधू । अतिअशुद्धू आणिक असेना ॥ ९१ ॥
द्रव्यलोभामुळे सर्वांशी  सदासर्वदा विरोध राहतो. द्रव्यलोभ हा इष्टमित्रांची ताटातूट कस्तो. द्रव्यलोभासारखा बाधक व अत्यंत अमंगळ असा दुसरा आणखी कोणीच नाही ९१.

अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये ।
नाशोपभोग आयासस्त्रासश्चिन्ता भ्रमो नृणाम् ॥ १७ ॥
[श्लोक  १७] माणसांना धन मिळविणे, त्यात वाढ करणे, ते जपून ठेवणे, ते खर्च होणे, त्याचा नाश होणे किंवा उपभोग घेणे, अशा सर्वच बाबतीत परिश्रम, भय, चिंता आणि भ्रम यांच्याशीच सामना करावा लागतो. (१७)

प्रथम शिणावें द्रव्य जोडितां । दुसरें शिणावें तें वाढवितां ।
द्रव्य जरी झालें उत्कर्षतां । तरी लोभ सर्वथा पुरे न म्हणे ॥ ९२ ॥
पहिल्याप्रथम द्रव्य संपादन करण्याकरितां खपावे , नंतर ते वाढविण्याकरितां श्रम करावे. आणि इतकेंही करून ते द्रव्य कितीही उत्कर्षाला चढले, तरी लोभ कधीही 'आतां पुरे ' असे मुळींच म्हणत नाही. ९२.

द्रव्यालागीं भावार्थतां । जैसे कष्टती सर्वथा ।
तैसा जरी कष्टे परमार्था । तैं ब्रह्म तत्त्वतां खेळणें होय ॥ ९३ ॥
द्रव्यासाठी लोक जसे मनोभावाने सर्व प्रकारे कष्ट करितात, तसाच जर कोणी परमार्थासाठी झटेल , तर खरोखर ब्रह्म हे त्याचे खेळणे होऊन राहील ९३.

एवं कष्टीं जोडल्या द्रव्यासी । रक्षणीं अतिचिंता मानसीं ।
अतिशय लागली जीवासी । अहर्निशीं धुकधुकी ॥ ९४ ॥
इतक्या कष्टाने द्रव्य संपादिले, तरी ते सांभाळतांना मनात अत्यंत चिंता लागते, आणि यामुळे जिवाला रात्रंदिवस धुकधुक लागलेली असते ९४.

स्त्री पुत्र हो माता पिता । त्यांसी पातिजेना सर्वथा ।
आपणाहूनि परता । विश्वासू अर्था मानेना ॥ ९५ ॥
स्त्री असो, पुत्र असो, की आईबाप असोत, त्यांच्यावर विश्वार म्हणून कधीच ठेवीत नाही. द्रव्याच्या संबंधांत आपल्याहून दुसरा कोणी विश्वासू आहे असें त्याला वाटत नाहीं ९५.

विसरोनियां निजघाता । चोरापासोनि राखे वित्ता ।
वित्तरक्षणीं निजचिंता । तिन्ही अवस्था एकाग्र ॥ ९६ ॥
आपल्या जिवाचा घात होईल हें  विसरून चोरापासून द्रव्याचे रक्षण करतो. द्रव्यरक्षणामध्ये एकदा त्याला चिंता वाटू लागली, म्हणजे जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तिन्ही अवस्थामध्ये त्या चिंतेच्या ठिकाणींच तो एकाग्र  ध्यान धरून बसतो ९६.

ऐसी एकाग्रता करूनी । जरी लागता भगवद्भजनीं ।
तरी वश्य होता चक्रपाणी । अर्धक्षणीं साधका ॥ ९७ ॥
अशी एकाग्रता करून जर तो भगवद्भजनीं लागला असता, तर अशा त्या साधकाला एका निमिषमात्रांतही देव वश झाला असता ९७.

उचिचानुचित विवाहासी । द्रव्य वेंचितां उदरासी ।
अतिशय होय कासाविसी । धनव्ययो त्रासासी उपजवी ॥ ९८ ॥
धर्माला  योग्य किंवा अयोग्य असा काही खर्च झाला, किंवा पोटाला खाण्याकरितां द्रव्य खर्च झाला , तर तो अत्यंत घाबराघुबरा होऊन जातो. अशा रीतीने द्रव्याचा खर्च त्याला त्रास उत्पन्न करितो ९८.

एवं जोडूनि रक्षितां द्रव्यासी । अवचटें नाश होय जैं त्यासी ।
तै अतिभ्रम चढे मानसीं । होती धनपिशीं बद्धक ॥ ९९ ॥
अशा प्रकारे द्रव्य मिळवून त्या द्रव्याचे रक्षण केले असता अकस्मात् जर त्याचा नाश झाला, तर मनाला अधिकच भ्रम उत्पन होतो. द्रव्यलोभी लोक द्रव्यासाठी वेडेपणांत असे बद्ध होतात ९९.

द्रव्यार्जनीं वसे प्रयास । द्रव्यरक्षणीं चिंतेचा वास ।
द्रव्यव्ययीं वळसा त्रास । भ्रमाचा रहिवास धननाशीं ॥ २०० ॥
द्रव्य  मिळवावयाला प्रयास पडतात.तें द्रव्य रक्षण करण्यामध्ये चिंता असते, आणि त्या द्रव्याचा  खर्च झाला म्हणजे त्रास उत्पन्न होतोच. अशा प्रकारे द्रव्यनाशामध्येही भ्रमच असतो २००. 

आदिमध्यावसानीं पाहीं । द्रव्य तें समूळ अपायी ।
तेथ सुखाचा लेश नाहीं । हें ऐसें पाहीं मज जाहलें ॥ १ ॥
पहा! आधी, मध्य आणि शेवटींही द्रव्य हे  निखालस अपायकारकच आहे. त्यांत सुखाचा एक लेशही नाही. असें अखेर माझ्या अनुभवाला आलें १.

आयास-त्रास-चिंतेसहित । धनापाशीं भ्रम नांदत ।
अर्थ तितुका अनर्थयुक्त । तोचि अर्थ स्वयें सांगे ॥ २ ॥
आयास, त्रास आणि चिंता यासह भ्रम हा द्रव्यापाशी नांदत असतो. म्हणून अर्थ जितका आहे, तितका अनर्थकारकच आहे. त्याच अर्थाचे वर्णन तो ब्राह्मण स्वतः करूं लागला २.

स्तेयं हिंसानृतं दम्भः कामः क्रोधः स्मयो मदः ।
भेदो वैरमविश्वासः संस्पर्धा व्यसनानि च ॥ १८ ॥
एते पञ्चदशानर्था ह्यर्थमूलामता नृणाम् ।
तस्मादनर्थमर्थाख्यं श्रेयोऽर्थीं दूरतस्त्यजेत् ॥ १९ ॥
[श्लोक १८-१९] चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य हे पंधरा अनर्थ मुनष्यांच्या ठिकाणी धनामुळेच होतात, असे मानले गेले आहे म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे, त्याने अर्थ नावाच्या अनर्थाला लांबच ठेवावे. (१८-१९)

अर्थ सर्वांगे अनर्थभूत । हें माझें वचन त्रिसत्य ।
पृथ्वीमाजीं जे जे अनर्थ । ते ते अर्थांत उपजती ॥ ३ ॥
अर्थ हा सर्वांगाने अनर्थकारकच आहे, हे माझे भाषण त्रिवार सत्य आहे. पृथ्वीमध्ये जेजे काही अनर्थ आहेत, ते ते अर्थापासूनच उत्पन्न होतात ३.

पुसाल अर्थींचे अनर्थ । ते सांगता असंख्य अनंत ।
संक्षेपें सांगेन येथ । पंधरा अनर्थ अर्थासी ॥ ४ ॥
अर्थापासून अनर्थ तरी कोणते होतात असे विचाराल, तर ते सांगावयाला लागले असता असंख्य व अनंत आहेत. तरी अर्थापासून उत्पन्न  होणारे पंधरा अनर्थ येथे संक्षेपाने सांगेल ४.

प्रथम अनर्थ अर्थासी । चोरी वसे अर्थापाशीं ।
अर्थु नाहीं गा जयापाशीं । चोरापासून त्यासी भय नाहीं ॥ ५ ॥
अर्थापासून पहिला अनर्थ म्हटला म्हणजे अर्थापाशी चोरी रहात असते. ज्याच्यापाशी पैसा नाही, त्याला चोरापासून भय नाही ५.

द्रव्य नाहीं ज्याच्या हातीं । त्यातें देखोनि चोर भिती ।
कांहीं मागेल आम्हांप्रती । म्हणोनि लपती त्या भेणें ॥ ६ ॥
ज्याच्या हातात पैसाच नसतो, त्याला पाहून चोरच भितात, आणि हा काही तरी आपल्याचपाशी मागत बसेल म्हणून  त्याच्या भयाने ते लपून बसतात ६. 

अतर्क्य नेत्रांतरें नेणें । कां धातुवादें सर्वस्व घेणें ।
परस्व भोळ्यांनीं बुडवणें । कां विजनीं हरणें सर्वस्व ॥ ७ ॥
एकाचे  द्रव्य  किंवा वस्तु त्याचा डोळा चुकवून अचानक घेऊन जाणे, किंवा किमया करतों अशा नादास लावून सर्वस्व हरण करणे, किंवा भोळेपणाचा फायदा घेऊन सर्वतोपरी बुडविणे  किंवा रानांत गांठून सर्वस्व लुटून घेणे ७, 

मार्गीं पडलें धन पराचे । स्वयें जाणोनि अमकियाचें ।
नाही देणें त्यासी साचें । हेंही चोरीचें लक्षण ॥ ८ ॥
तसेच दुसऱ्याचे धन वाटेंत पडलें असतां व तें अमक्याचे आहे असे माहीत असताही त्याला खरोखर न देणे, हे देखील चोरीचंच लक्षण होय ८.

स्वर्णस्तेयें नरकप्राप्ती । ऐसे विवेकीही चोरी करिती ।
मा इतरांची कायशी गती । चोरीची वस्ती धनापाशीं ॥ ९ ॥
सोने चोरणाराला नरकप्राप्ति होते असा विचार माहीत असणारेही सोन्याची चोरी करतात. मग इतरांची कथा काय ? तात्पर्य, द्रव्य म्हटले की तेथे चोरी ही असावयाचीच ९.

जगीं महापापिणी चोरी । तीस कोणी बैसों नेदी द्वारीं ।
ते राहिली सुवर्णामाझारीं । धन तेथ चोरी निश्चित ॥ २१० ॥
जगामध्ये चोरी ही मोठी पापीण आहे. तिला कोणीही दारापाशी बसू देत नाही, म्हणून ती सोन्याजवळ राहते. यावरून जेथे द्रव्य असते तेथें चोरी असते, हे खचित आहे २१०.

देखतांचि त्या धनासी । विकल्पी होती संन्यासी ।
इतरांची कथा काइसी । चोरी धनापाशीं स्वयें नांदे ॥ ११ ॥
त्या द्रव्याला पाहिले की संन्याशाच्या मनांतसुद्धा लोभाने विकल्प उत्पन्न होतो; मग इतरांची कथा काय ? चोरी ही स्वतः द्रव्यापाशी राहात असते ११.

प्रथम अनर्थलक्षण । धनापाशीं चोरी जाण ।
धन हिंसेचे आयतन । तेंही निरूपण अवधारीं ॥ १२ ॥
तात्पर्य, धनापासून होणाऱ्या पहिल्या अनर्थाचे लक्षण असे समज की, ' द्रव्याच्यापाशी चोरी असते.' आतां द्रव्य हें हिंसेचे स्थान कसे आहे तेही वर्णन ऐक १२.

धनालागीं द्वंद्व दारुण । पुत्रपौत्र मारिती जाण ।
धनालागीं घेती प्राण । सुहृदपण सांडोनी ॥ १३ ॥
द्रव्यासाठी भयंकर मारामाऱ्या होतात. पुत्रपौत्रसुद्धा आपल्या वाडवडिलांना मारतात. आप्तपणा सोडून देऊन लोक द्रव्यासाठी एकमेकांचा प्राणसुद्धा घेतात १३.

धनलोभाचें कवतिक । कन्या बापासी देतसे विख ।
पितृघाताचें न मानी दुःख । निष्ठुर देख धनलोभ ॥ १४ ॥
द्रव्यलोभाचा चमत्कार असा आहे की, त्या लोभाने कन्यासुद्धा बापाला विष घालते. पितृघाताचे दुःख ती मानीत नाही, इतका धनलोभ निष्ठुर आहे १४.

धनलोभी सांडी बापमाये । स्त्री घेऊनि वेगळा राहे ।
तेथही धनलोभ पाहें । वैर होये स्त्रीपुरुषां ॥ १५ ॥
द्रव्यलोभी मनुष्य आपल्या आईबापांना सोडून देतो. आपल्या स्त्रीला घेऊन बापापासून निराळा राहातो. पण तेथेही धनलोभ असतोच. त्या लोभाने त्या स्त्रीपुरुषांतच वैर माजतें पहा! १५.

धनलोभाची नवलपरी । पुत्र पित्यातें जीवें मारी ।
पिता पुत्रातें संहारी । कठिण भारी धनलोभ ॥ १६ ॥
धनलोभाचा प्रभाव इतका विचित्र आहे की, पुत्रही बापाला जिवानिशीं मारतो. बाप पुत्राला मारतो. इतका द्रव्यलोभ महाकठिण आहे १६.

जे नवमास वाहे उदरांत । जे सदा सोशी नरकमूत ।
ते मातेचा करी घात । द्रव्यानिमित्त निजपुत्र ॥ १७ ॥
जी नऊ महिने उदरांत वागविते, जी सदासर्वदा नरकमूत्राचा त्रास सोसते, त्या आईचासुद्धा द्रव्यानिमित्त तिचेच पुत्र घात करतात १७.

अभिनव धनलोभाची त्राय । नवल तें मी सांगों काय ।
पोटींचा पुत्र मारी माय । ऐसा अनर्थ होय धनासाठीं ॥ १८ ॥
या द्रव्यलोभाचा तडाखा मोठा विलक्षण आहे. त्याचे आश्चर्यकारक वर्णन मी कोठपर्यंत सांगावें ! आईसुद्धा पोटचा पुत्र मारून टाकते, इतका अनर्थ एका द्रव्यासाठी होतो १८.

एवं हिंसा ते हे संपूर्ण । दुसरें अनर्थलक्षण ।
आतां असत्याचें विंदान । तेंही निरूपण स्वयें सांगे ॥ १९ ॥
तात्पर्य, ही जी सर्व हिंसा, तेंच धनापासून होणाऱ्या दुसऱ्या अनर्थाचे लक्षण होय. आतां द्रव्य हे असत्याला कसे कारण होतें तेंही निरूपण स्वतःच करीत आहे १९.

असत्य जन्मलें अर्थाच्या पोटीं । अर्थबळें तें दाटुगें सृष्टी ।
अर्थासवें असत्य उठी । असत्याची गांठी अर्थेंसीं ॥ २२० ॥
असत्य हें  द्रव्याच्याच पोटी जन्माला आलेले आहे, आणि ते द्रव्याच्याच बळावर जगामध्ये प्रबळ होऊन बसले आहे. द्रव्याच्याबरोबरच असत्य उत्पन्न होतें. असत्याची गांठ त्याबरोबर कायमची पडलेली आहे २२०.

तो अर्थ असे जयापाशीं । कां अर्थअपेक्षा जयासी ।
तेथ असत्य वसे कुटुंबेंसीं । धन तें मिरासी मिथ्यात्वीं ॥ २१ ॥
ते द्रव्य ज्याच्यापाशी असते. किंवा ज्याला द्रव्याची अपेक्षा असते, त्याच्यापाशी असत्य हें  सहकुटुंब राहिलेले असते. द्रव्य हे खोटेपणाची मिरास आहे २१.

अर्थबळ थोर असत्यासी । मिथ्या बोलवी बापासी ।
धनलोभें झकवी मातेसी । सत्यत्व धनापाशीं असेना ॥ २२ ॥
असत्याला द्रव्याचे मोठे बळ असते. ते बापालासुद्धा खोटे बोलावयास लावते . द्रव्याच्या लोभाने आईलासुद्धा फशी पाडावयास लावते. कारण, सत्यत्व हे द्रव्यापाशी असतच नाही २२.

क्रयविक्रयीं धनलोभें जाण । मिथ्या बोलती साधारण ।
परी वेदशास्त्रसंपन्न । धनार्थ सज्ञान बोलती मिथ्या ॥ २३ ॥
द्रव्याच्या लोभाने क्रयविक्रय करतांना साधारण लोक खोटे बोलतातच, पण वेदशास्त्रसंपन्न व विद्वान् सुद्धा द्रव्यासाठी खोटे बोलतात २३.

वेदींचा आठव न ये पूर्ण । तो संभावनेलागीं जाण ।
म्हणवी मी वेदसंपन्न । करावया यजन नीचाचें ॥ २४ ॥
ज्याने वेद पुरता म्हटलेलाही नसतो, तो मनुष्य संभावनेसाठी (द्रव्यप्राप्तीस्तव) नीच माणसाच्या घरी यज्ञ करण्याकरिता मी वेदसंपन्न आहे असे स्वतःला म्हणवून घेतो २४.

भाग देऊनि मध्यस्था । मी चतुःशास्त्रीं । विख्याता ।
ऐसें मिथ्यात्वें छळी पंडिता । राजद्रव्यार्थालागुनी ॥ २५ ॥
मध्यस्थ माणसाला लांच देऊन मी चारही शास्त्रांमध्ये सुप्रसिद्ध पंडित आहे असा खोटाच समज पसरवून राजद्रव्य मिळावे म्हणून खऱ्या पंडितांना छळीत असतो २५.

विरक्त म्हणविती परमार्थी । तेथही असत्यें घातली वस्ती ।
नाथिल्या सिद्धि दाविती । अर्थप्राप्तीलागोनी ॥ २६ ॥
परमार्थी असतात ते आपल्याला विरक्त म्हणवितात, पण तेथेही असत्याने आपला मुक्काम केलेला असतोच. तेही द्रव्य मिळविण्याकरिता खोट्याच सिद्धीचे ढोंग दाखवितात २६.

अर्थीं असत्याचा बडिवारू । सद्भावें केला जो सदद्‌गुरू ।
त्यासी मिथ्या नास्तिक विचारू । एकान्तीं नरू प्रतिपादी ॥ २७ ॥
 द्रव्यापाशी असत्याचा मोठा बडेजाव असतो. भक्तिभावानें जो सद्गुरु केला असेल, त्यालाच तो मनुष्य एकांतामध्ये खोटे नास्तिकपणाचेच विचार प्रतिपादन करून सांगतो २७.

अर्थ नाहीं जयापाशीं । ना अर्थकल्पना जयासी ।
असत्य स्पर्शेना तयासी । कदाकाळेंसीं कल्पांतीं ॥ २८ ॥
परंतु ज्याच्यापाशी द्रव्यच नाही, किंवा ज्याला द्रव्याची कल्पनाही नाही, त्याला कधीं कल्पांतीही असत्य शिवावयाचे नाही २८.

अर्थापाशीं असत्य जाण । त्याचें सांगीतलें लक्षण ।
आतां अर्थापाशीं दंभ संपूर्ण । तेही वोळखण अवधारीं ॥ २९ ।
अशा रीतीने द्रव्यापाशी असत्य असते त्याचे लक्षण सांगितले. आतां द्रव्यापाशी सर्व दंभ (ढोंगीपणा) असतो, त्याचेही वर्णन ऐक २९.

पोटीं नाहीं परमार्थ । धरोनियां अर्थस्वार्थ ।
स्वयें म्हणविती हरिभक्त । या नांव निश्चित भजनदंभू ॥ २३० ॥
अंत:करणांत परमार्थ नसतां, केवळ द्रव्यलोभ धरून स्वतःला हरिभक्त म्हणवितात. याचंच नाव खरोखर भजनाचे ढोंग २३०.

धन जोडावयाकारणें । टिळे माळा मुद्रा धारणें ।
धनेच्छा उपदेश देणें । या नांव जाणणें दीक्षादंभू ॥ ३१ ॥
द्रव्य मिळविण्यासाठी टिळे, माळा, मुद्रा धारण करून द्रव्यलोभाने उपदेश देणे याचेच नांव दीक्षेचे ढोंग, हे लक्षात ठेवावें ३१.

देखोनि धनवंत थोरू । त्यासी उपदेशीं अत्यादरू ।
नेमूनि गुरुपुजाकरभारू । सांगे मंत्रू तो दांभिक ॥ ३२ ॥
एकादा गुरु मोठा श्रीमान् गृहस्थ पाहून त्याला उपदेश करण्यामध्ये मोठा आदर बाळगतो आणि गुरुपूजेचे अमुक द्रव्य द्यावे लागेल असा करार ठरवून त्याला मंत्र सांगतो, तो ढोंगी होय ३२.

जयांपासोनि होय अर्थप्राप्ती । ते समर्थ शिष्य आवडती ।
दीन शिष्यातें उपेक्षिती । हे दांभिकस्थिती गुरुत्वा ॥ ३३ ॥
ज्यांच्यापासून द्रव्यप्राप्ति होते, ते श्रीमंत शिष्य आवडतात, आणि गरीब शिष्य असतील त्यांचा विकार करतो, हेही गुरुपणाला ढोंगाचेंच स्वरूप देणे होय ३३.

गुरूसी द्यावें तनु मन धन । ऐसें उपदेशूनि जाण ।
जो द्रव्य संग्रही आपण । तें दांभिकपण गुरुत्वा ॥ ३४ ॥
तन, मन, धन गुरूलाच अर्पण करावे, असा शिष्याला उपदेश करून जो गुरु आपण मात्र द्रव्याचा संग्रह करतो, ते त्याचे वर्तन गुरुपणाला ढोंगाचेंच स्वरूप आणिते ३४.

जेथ धनलोभ गुरूपाशीं । तो काय तारील शिष्यासी ।
धनलोभाची जाती ऐसी । करी गुरुत्वासी दांभिक ॥ ३५ ॥
ज्या गुरूपाशी द्रव्यलोभ असतो, तो शिष्याला काय तारणार ? द्रव्यलोभाची जातच अशी की, तो गुरूला ढोंगी करितो ३५.

आखाडभूतीऐसा जाण । गुरुपाशील न्यावया धन ।
उपदेश घे होऊनि दीन । तो दांभिक जाण शठ शिष्य ॥ ३६ ॥
जो एकादा लुच्चा मनुष्य गुरूजवळ असलेले द्रव्य उपटण्याकरितां गरिबी दाखवून उपदेश घेतो, तो शिष्यही दांभिक व शठ होय ३६.

गुरूपदेशें शिकोनि युक्ती । स्वयें ज्ञानाभिमाना येती ।
गुरूतें मानी प्राकृतस्थिती । तोही निश्चितीं दांभिक ॥ ३७ ॥
गुरुच्या उपदेशाने युक्ति शिकून स्वतः ज्याला ज्ञानाची घमेंड येते, आणि त्या गुरूलाच  जो यःकश्चित् मानू लागतो, तोही खरोखर ढोंगी होय ३७.

मी एक सधन सज्ञान । ऐसा सूक्ष्मरूप ज्ञानभिमान ।
करी गुरुआज्ञेचें हेळण । हेंही लक्षण दंभाचें ॥ ३८ ॥
श्रीमान् काय तो मी, ज्ञाता काय तो मी, असा गुप्तरूपाने अभिमान बाळगतो, आणि गुरूच्या आज्ञेची हेळसांड करितो, हेही ढोंगाचेंच लक्षण होय ३८.

अहं ब्रह्म हेही स्फूर्ती । न साहे जेथ स्वरूपस्थिती ।
तेथ मी ज्ञाता हे घोंगडी युक्ती । स्फुरे निश्चितीं सूक्ष्मदंभें ॥ ३९ ॥
खरी ब्रह्मरुपाची स्थिति प्राप्त झाली, म्हणजे त्या ठिकाणी 'अहं ब्रह्म' -मीच ब्रह्मस्वरूप आहे-ही स्फूर्तीसुद्धा सहन होत नाही, मग त्या ठिकाणी 'मी ज्ञाता' असे म्हणणे ही केवळ कपटाची कल्पना होय. ती अंत:करणांतील गुप्त दंभानेच उत्पन्न होते ३९.

जीवासी देहाचें मध्यस्थान । तेथ दंभाचें अधिष्ठान ।
त्यासी मिळोनियां मन । ज्ञानाभिमान उपजवी ॥ २४० ॥
जीवाला देहाच्या मध्यभागी स्थान आहे, आणि त्यांत दंभाचे अधिष्ठान असते. त्याला मन साहाय्यकारी होऊन ज्ञानाचा अभिमान उत्पन्न करते ४०.

नवल दंभाचें कवतिक । आम्ही अग्निहोत्री याज्ञिक ।
तेचि जीविका करूनि देख । नाडले वेदपाठक धनलोभें ॥ ४१ ॥
या दंभाचें जें जें कौतुक ऐकावें  तें आचर्यकारकच आहे. जे आपण अग्निहोत्री व याज्ञीक म्हणून मिरवितात, तेच भिक्षा मागून निर्वाह करतात. अशा प्रकारे द्रव्यलोभाने वेदपाठकही फसले आहेत ४१.

सोडोनि परमार्थाची पोथी । ब्रह्मज्ञान सांगे नाना युक्तीं ।
तेही ज्ञाते दंभे नाडिजेती । द्रव्यासक्ती धनलोभें ॥ ४२ ॥
परमार्थाची पोथी सोडून नानाप्रकारांनी ब्रह्मज्ञान सांगतात, ते ज्ञातेसुद्धा दंभामुळे द्रव्याच्या आसक्तीने आणि धनलोभाने फसले जातात ४२.

मंत्रतंत्रांची कथा कोण । मुख्य गायत्री वेंचिती ब्राह्मण ।
आम्ही स्वधर्मनिष्ठापावन । म्हणती जाण दांभिक ॥ ४३ ॥
मंत्रतंत्रांची कथा काय ! मुख्य जो गायत्रीमंत्र, त्याचाही विक्रय  ब्राह्मण करितात आणि आम्ही स्वधर्मनिष्ठेनेच पावन आहोत असे म्हणतात. ते ढोंगी आहेत असे समज ४३.

दंभें नाडिले संन्यासी । लौकिक राखणें पडे त्यांसी ।
ज्यालागीं मुंडिले शिसीं । त्या अर्थासी विसरले ॥ ४४ ॥
दंभाने संन्याशीसुद्धा पेंचांत सापडतात. कारण त्यांनासुद्धा लौकिक व्यवहार राखणे भाग पडते. ज्याकरिता त्यांनी मस्तकाचे मुंडण केलेले असतें, तो हेतु (ब्रह्मचिंतन) ते अजिबात विसरून जातात ४४.

दृष्टि सूनि अन्नसन्मान । संन्यासी करिती शौच स्न्नान ।
शुद्ध न करवेचि निजमन । वादव्याख्यान अतिदंभें ॥ ४५ ॥
गोड गोड अन्ने  आणि मानसन्मान यांच्या प्राप्तीवर लक्ष ठेवून संन्याशी स्नान वगैरे पवित्रता करीत असतात, परंतु स्वत:चे मन त्यांना शुद्ध करताच येत नाही. ढोंगीपणाने वादविवादाची व्याख्याने देत राहातात ४५ 

घ्यावया परद्रव्य परान्न । कां देहप्रतिष्ठेलागीं जाण ।
मिथ्या दाखवी सात्त्विकपण । हें दंभलक्षण पैं चौथें ॥ ४६ ॥
दुसऱ्याचे द्रव्य व दुसऱ्याचे अन्न घेण्यासाठी, किंवा आपल्या देहाची प्रतिष्ठा वाढण्यासाठी खोटाच सात्त्विकपणा दाखवितात. अर्थापासून होणारा चवथा अनर्थ जो दंभ, त्याचे हे लक्षण होय ४६.

द्रव्यापाशीं वसे काम । अतिशयें अतिदुर्गम ।
द्रव्य तेथ कामसंभ्रम । अतिविषम सांगात ॥ ४७ ॥
 द्रव्यापाशी कामही वस्ती करून राहतो. तो फार प्रबळ असल्यामुळे त्याला जिंकणे फार कठीण आहे. जेथे द्रव्य असते तेथे त्याच्याबरोबर अत्यंत त्रासदायक अशी कामासक्ति असते ४७.

द्रव्य नसतां अपेक्षाकाम । तो सबाह्य करवी अतिश्रम ।
अनेक कष्टांचें विषम । अतिदुर्गम भोगावी ॥ ४८ ॥
जवळ द्रव्य नसतां अपेक्षाकाम (द्रव्य मिळविण्याची इच्छा) असतो. तो अंतर्बाह्य अतिशय कष्टी करतो, आणि त्या अनेक कष्टांपासून येणारें दुःसह दुःख भोगवितो ४८.

धन झालिया उन्मादकाम । करूं लागे अगम्यागम ।
उपजवी नाना अधर्म । निंद्य कर्म धनवंता ॥ ४९ ॥
द्रव्य  मिळाल्यावर उन्मादकाम (मदोन्मत्तपणा) येतो, आणि तो हव्या त्या स्त्रीशी समागम करावयास लावून नानाप्रकारचे अधर्म उत्पन्न करितो. श्रीमंतांकडून अशा प्रकारें निंद्य कर्में  घडतात ४९.

कामु जडलासे धनेंसीं । तो सदा छळी धनवंतासी ।
काम खवळे धनापाशीं । अहर्निशीं मुसमुशित ॥ २५० ॥
काम हा द्रव्यापाशी नेहमी खिळलेलाच असतो, म्हणून तो सदासर्वदा धनवंताचा छळ करतो. द्रव्य असेल तेथें काम खवळतो, आणि रात्रंदिवस विषयाची इच्छा मुसमुसलेली असते २५०.

धनापाशीं अति उद्धतू । काम पांचवा अनर्थू ।
काम तेथ निश्चितू । क्रोध नांदतू सैन्येंसीं ॥ ५१ ॥
अशा प्रकारे द्रव्यापासून होणारा पांचवा अनर्थ जो अत्यंत उद्दाम असा काम, तो द्रव्यापाशी असतो. जेथे काम असतो तेथे क्रोध हा आपल्या फौजफाट्यांसह निश्चयेंकरून असावयाचाच ५१.

कामप्राप्तीसी आडवी काडी । होतां क्रोधाची पडे उडी ।
खवळला अति कडाडी । तपाच्या कोडी निर्दाळित ॥ ५२ ॥
इच्छित वस्तु प्राप्त होण्याच्या मार्गात एकादी काडी आडवी आली असतांही तेथे क्रोधाची उडी पडते. मग तो पिसाळून असा काही अकांडतांडव करतो की, तपाच्या कोटीच्या कोटी असल्या तरी त्यांचा फडशा पाडतो ५२.

जप तप निष्ठा नेम । शिणोनि साधलें दुर्गम ।
क्रोध अति खवळल्या परम । ते करी भस्म क्षणार्धें ॥ ५३ ॥
जप, तप, नेम, धर्म, यांचे कष्ट करून जितकें म्हणून काही अलभ्य साध्य केलेले असते, तितकें सर्व क्रोध अत्यंत भयंकर खवळला की एका निमिषार्धात भस्म करून टाकतो ५३.

धनाकडे कोणी दावी बोट । तेथ क्रोध उठी अचाट ।
वाढवी प्राणान्त कचाट । क्रोध अतिदुष्ट धनेंसीं ॥ ५४ ॥
द्रव्याकडे कोणी बोट दाखविलें पुरे, की लागलाच अचाट क्रोध उत्पन्न होतो व प्राणाशीं गांठ येईपर्यंत प्रसंग आणतो. असा हा द्रव्याबरोबर अतिदुष्ट क्रोध रहातो ५४.

धनागमनीं अवरोधू कां धनव्ययाचा संबंधू ।
ते संधीं खवळे क्रोधू । अतिविरोधू उन्मत्त ॥ ५५ ॥
द्रव्यप्राप्तीला काही प्रतिबंध झाला, किंवा द्रव्य खर्च होण्याचा प्रसंग आला, तर त्या वेळी क्रोधाने संतप्त होतो आणि उन्मत्तपणाने अत्यंत वैर धरतो ५५.

धनापाशीं क्रोध समर्थू । हा सहावा अतिअनर्थू ।
धनापाशीं गर्व अद्भुतू । तेंचि निश्चितू सांगत ॥ ५६ ॥
द्रव्यापाशी दांडगा क्रोध असतो, हाच सहावा अनर्थ होय. आतां द्रव्यापाशीं गर्व तर अतिशय विलक्षणच राहतो. तोही निश्चितपणे सांगतो ५६.

धनगर्वाचिये पुष्टी । सखा बाप नाणी दृष्टी ।
मातेतें म्हणे करंटी । इतरांच्या गोष्टी त्या काय ॥ ५७ ॥
द्रव्याच्या गर्वाने मनुष्य फुगला म्हणजे त्याला आपला बापही डोळ्यांनी दिसेनासा होतो. आईलासुद्धा करंटी म्हणतो, मग इतरांची कथा काय? ५७.

सिद्ध साधक तापसी । त्यांतें देखोनि उपहासी ।
म्हणे करंटे ते होती संन्यासी । हरिदासासी विटावी ॥ ५८ ॥
सिद्ध, साधक, किंवा तापसी यांना पाहून त्यांचा उपहास करितो, दरिद्री असतात तेच संन्याशी होतात असे म्हणतो, आणि हरिदासांची टवाळी करितो ५८.

अंगीं धनाचें समर्थपण । त्याहीवरी जैं झालें ज्ञान ।
तैं गर्वाचा ताठा चढे पूर्ण । जेवीं आरें धारणू गिळिला ॥ ५९ ॥
 आधीच आंगामध्ये श्रीमंतीचे बल, आणि त्यांत जर का ज्ञान प्राप्त झाले, तर त्याला गर्वाचा असा काही पूर्ण ताठा चढतो की, जणूं काय अजगराने धारणच गिळलेला आहे ! ५९.

धनज्ञानगर्वाची जाती कैसी । गर्व करी सद्गुरूसी ।
त्याच्या वचनातें हेळसी । शेखीं धिक्कारेंसी निर्भर्त्सी ॥ २६० ॥
द्रव्याच्या आणि ज्ञानाच्या गर्वाचे लक्षणच असे आहे की, तो सद्गुरुंशीच गर्व करूं लागतो, त्याच्या भाषणाची हेलना करतो व शेवटी त्याचा धिक्कार करून त्याची निर्भत्सना करतो २६०.

धनज्ञानगर्वाचें लक्षण । देखे सद्गुरूचे अवगुण ।
गुरूसी ठेवी मूर्खपण । मी एक सज्ञान हें मानी ॥ ६१ ॥
द्रव्याच्या आणि ज्ञानाच्या गर्वाचे लक्षण हेच की, तो सद्गुरूचे दोष पहात बसतो, गुरूला मूर्ख ठरवितो आणि मीच काय तो ज्ञानी असें मानितो ६१.

जो भ्रांत म्हणे सद्गुरूसी । गुरु मानी त्यांते द्वेषी ।
बाप गर्वाची जाती कैशी । देखे गुणदोषांसी सर्वांच्या ॥ ६२ ॥
जो सद्गुरुला  भ्रांतिष्ट असें म्हणतो आणि जो गुरूला मान देईल त्याचा द्वेष करतो, त्या गर्वाची जातच किती विलक्षण पहा ! तो सर्वांचे गुणदोषच पहात असतो ६२.

नवल गर्वाची पैं काहणी । गुणू सर्वथा सत्य न मानी ।
दोष पडतांचि कानीं । सत्य मानी निश्चित ॥ ६३ ॥
गर्वाची गोष्टच मोठी अजब आहे. तो कोणत्याही गुणाला कधीं खरे म्हणतच नाही. दोष कानांवर पडले पुरे, की तेच खरे मानावयाचे ६३.

सात्त्विक ये गर्वितापुढें । त्यासी सर्वथा मानी कुडें ।
अतिसात्त्विकता दृष्टी पडे । तरी मानी वेडें अर्बुज ॥ ६४ ॥
गर्विष्ठापुढे कोणी सात्त्विक मनुष्य आला, तर त्याला तो निखालस वाईट असें समजतो, आणि अतिशय सात्विक वृत्ति दृष्टीस पडली तर त्या वृत्तीच्या माणसाला एक वेडे, आर्ष असे मानतो ६४. 

अंगीं भवंडी भरे लाठी । तैं भूमी लागे ललाटीं ।
साष्टांग नमावया सृष्टीं । पात्र गर्वदृष्टीं दिसेना ॥ ६५ ॥
अंगात  सडकून भोवंड येईल तरच जमिनीवर पडून जमिनीला डोके लावावयाचे. त्यावांचून गर्विष्ठ दृष्टीला साष्टांग नमस्कार घालावयाला योग्य असे जगांत कोणी दिसतच नाहीं ६५.

तेथें कोण दे सन्मान श्रेष्ठा । कायसी वृद्धाची प्रतिष्ठा ।
धनगर्वे चढला ताठा । मी एक मोठा ब्रह्मांडीं ॥ ६६ ॥
तेथे लोकांना सन्मान देणार कोण? आणि वडिलांची प्रतिष्ठा ती काय? त्याला द्रव्याच्या गर्वाने इतका ताठा चढलेला असतो की, साऱ्या ब्रह्मांडांत मीच काय तो एक मोठा असेंच त्याला वाटत असते ६६.

एक गुरुसेवाविश्वासकू । निजसेवा झाला वश्यकू ।
त्यासी गर्व चढे मी सेवकू । तो अतिबाधकू सेवका ॥ ६७ ॥
एकादा कोणी गुरूच्या सेवेवरच निष्ठा ठेवून  बसलेला असतो, व तो गुरूच्या सेवेतच तत्पर झालेला असतो. पण त्यालाही सेवक असा काय तो एक मीच असा मोठा गर्व चढतो, आणि तोच त्या सेवकाला अत्यंत बाधक होतो ६७.

ऐसा अतिगर्वें उन्नद्ध । हा सातवा गर्वबाध ।
आतां धनापाशीं महामद । तोही संबंध द्विज सांगे ॥ ६८ ॥
अशा प्रकारें मनुष्य अतिगर्वाने उन्मत्त होणे हा ; द्रव्यापासून ऊत्पन होणारा गर्वपीडा नांवाचा सातवा अनर्थ होय. आतां द्रव्यापाशी मोठा मदही असतो, त्याचाही संबंध ब्राह्मण सांगत आहे ६८.

ज्यासी चढे धनमदू । तो उघडे डोळां होय अंधू ।
कानीं नायके शब्दबोधू । धनमदें स्तब्धू सर्वदा ॥ ६९ ॥
ज्याला द्रव्याचा धूर चढतो, तो उघड्या डोळ्यांनीच आंधळा होत असतो. तो शब्दांचा उपदेश कानांनी ऐकत नाही. द्रव्याच्या धुंदीनेच सर्वदा फुगलेला असतो ६९.

धनमदें अतिअंहता । धनमदें उद्धतता ।
धनमदें अद्वातद्वता । करी सर्वथा अधर्म ॥ २७० ॥
द्रव्याच्या मदाने अतिशय अहंता वाढते, द्रव्याच्या मदाने उद्धटपणा अंगी येतो, आणि द्रव्याच्या मदानें मनुष्य सर्वप्रकारे हवे तसे अधर्मच करीत सुटतो २७०.

धनमद अति अपवित्र । तो चढल्या होय अतिदुस्तर ।
न म्हणे पात्र अपात्र । विचरे विचित्र योनीसी ॥ ७१ ॥
धनाचा मद अत्यंत अमंगल आहे. तो चढला असतां उतरावयाला जड जातो. असा मनुष्य योग्यायोग्य विचार न करितां विचित्र योनीत विहार करीत असतो ७१.

जो धनमदा वश होय । तो न मानी कोणाचेंही भय ।
न जावें तेथ स्वयें जाय । न खावें तें खाय यथेष्ट ॥ ७२ ॥
जो द्रव्याच्या मदाला वश होतो, तो कोणाचेही भय मानीत नाही. जेथे जाऊं नये तेथे स्वतः जातो, जें खाऊं नये ते यथेच्छ खातो ७२.

न धरावा तो संग धरी । न करावें तें कर्म करी ।
न बोलावें तें उच्चारी । जनाभीतरीं उद्धतू ॥ ७३ ॥
ज्याची संगति धरूं नये त्याची संगति धरतो, जें करूं नये तें कर्म करतो, जे बोलू नये ते बोलतो आणि लोकांमध्ये उद्दामपणाने वागतो ७३.

न देखे आपुलें केलें । परापवाद स्वयें बोले ।
नायके बापाचें शिकविलें । वेडें केलें धनमदें ॥ ७४ ॥
आपण काय केलें आहे ते पहात नाही, आणि दुसऱ्याचे दोष मात्र स्वतः बोलतो. बापाने शिकविलेलेंसुद्धा ऐकत नाही. इतकें द्रव्याच्या मदाने त्यास वेडे करून सोडलेले असते ७४.

शिकविलें तें नायके । वारिलें तें करी आवश्यकें ।
साधुनिंदा निजमुखें । यथासुखें जल्पत ॥ ७५ ॥
जे शिकवावें ते ऐकत नाही, आणि जें करु नको म्हणावें तें अवश्य करतो. तसेच साधूची निंदा स्वत:च्या तोंडाने वाटेल तशी बडबडत असतो ७५.

न मानी स्वयाती स्वाचारू । न मानी दोष अनाचारू ।
न मानी वडीलांचा विचारू । धनमदें थोरू मातला ॥ ७६ ॥
आपली जात व आपला आचार ही मानीत नाही, दोषास्पद वर्तन व अनाचार ह्यांना मानीत नाही, आणि वडिलांचा विचारही मानीत नाही, इतका द्रव्याच्या मदाने अतिशय माजलेला असतो ७६.

आधींच तारुण्यें अतिलाठा । वरी धनमदें चढला ताठा ।
यापरी मातला मोठा । न चाले वाटा सुपंथीं ॥ ७७ ॥
आधीच तारुण्याच्या भराने दांडगट बनलेला, आणि त्यांत द्रव्याच्या मदाचा ताठा चढला, म्हणजे तो फार उन्मत्त होतो आणि सरळ मार्गाने मुळी चालतच नाहीं ७७.

स्त्रीकामें अतिविव्हळ । न विचारी कुळशीळ ।
न म्हणे सकाळ सांज वेळ । विचरे केवळ खरू जैसा ॥ ७८ ॥
तो स्त्रीच्या इच्छेने अत्यंत विव्हळ होतो, कुलाचा किंवा शीलाचा विचारच करीत नाही, सकाळ आहे की संध्याकाळ आहे हाही विचार करीत नाही, व गाढव जसा वागतो त्याप्रमाणे तो आपले वर्तन ठेवतो ७८.

अभिलाषूनि परनारी । दिवसा विचरे दुपारीं ।
गतालकाही अंगीकारी । भय न धरी पापाचें ॥ ७९ ॥
परस्त्रीचा अभिलाष धरून दिवसा दुपारींच तिच्याशी रममाण होतो. विकेशा स्त्रीचासुद्धा अंगीकार करतो. पापाचे भय मुळीच धरीत नाहीं ७९.

जो मातला करूनि मद्यपान । तो मद तत्काळ उतरे जाण ।
त्याहूनि धनमद दारुण । आल्याही मरण उतरेना ॥ २८० ॥
दारू पिऊन जो धुंद झालेला असतो, त्याची ती धुंदी लागलीच उतरते; पण त्याचा अंमल त्याहूनही भयंकर आहे. मृत्यु आला तरीसुद्धा तो उतरत नाही २८०.

अकर्म करितां आपण । तेंचि निजघातें घेईल प्राण ।
हेही नाठवे आठवण । धनमदें जाण भुलला ॥ ८१ ॥
आपण दुष्कर्म केले असता तें आपलाच घात करून प्राण घेईल ही देखील आठवण त्याला राहात नाही. इतका द्रव्याच्या मदानें तो भुललेला असतो असे समज ८१.

महाअनर्थी धनमद जाण । हें आठव्या अनर्थाचें लक्षण ।
आतां धनापाशीं भेद पूर्ण । तेंचि निरूपण द्विज सांगे ॥ ८२ ॥
द्रव्याचा अंमल अत्यंत अनर्थकारक आहे, हेच आठव्या अनर्थाचे लक्षण होय. आतां द्रव्यापाशी भेदही परिपूर्ण कसा असतो, तेच वर्णन ब्राह्मण सांगतो ८२.

भेद जन्मला धनाचे कुशीं । धन तेथ भेदाची मिराशी ।
भेद सपरिवार धनापाशीं । अहर्निशीं जागत ॥ ८३ ॥
भेद हा द्रव्याच्याच पोटी जन्मलेला आहे. जेथें द्रव्य असेल तेथे भेदाची जणू काय मिरासच असते. भेद हा सहपरिवार द्रव्यापाशी अहोरात्र जागत असतो ८३.

हाता आलिया बहु धन । मातेहूनि राखे भिन्न ।
पित्यासी करी वंचन स्त्रियेसीही जाण कळों नेदी ॥ ८४ ॥
हातांत पुष्कळसें द्रव्य आले असता ते आईपासून निराळे ठेवतो, बापाची फसवणूक करितो, व ते बायकोलासुद्धा कळू देत नाही ८४.

अर्थ पुत्रासी अतर्क्यता । तेथ इतरांची कोण कथा ।
भेदू तो अर्थापरता । जगीं सर्वथा असेना ॥ ८५ ॥
बापापाशी द्रव्य किती आहे याविषयीं मुलालासुद्धा काही तर्क करितां येत नाही, तेथे इतरांची कथा काय ? द्रव्याजवळ जो भेद असतो, त्यापेक्षा अधिक भेद जगामध्ये मुळीच असत नाही ८५.

माथां साहोनि शस्त्रघात । बंधु बंधूसी रणीं साह्य होत ।
तेचि बंधू अनाप्त होत । वांटितां अर्थविभाग ॥ ८६ ॥
शस्त्राचे वार मस्तकावर सहन करून बंधु रणामध्ये बंधूला साहाय्य करतात. पण तेच भाऊ भाऊ द्रव्याची वाटणी करूं लागले असतां, जणूं काय बंधुत्वाचे नातेच नाही अशा रीतीने वागतात ८६.

मित्र मित्रांसी वेंचिती प्राण । तेथें प्रवेशोनियां धन ।
विकल्पा आणी मित्रपण । भेद दारुण धनापाशीं ॥ ८७ ॥
मित्र मित्रांकरितां प्राणही देतात, पण त्यांच्यांत द्रव्य प्रवेश करून त्यांचा मित्रपणा संशयांत आणिते. असा द्रव्यापाशी भयंकर भेद आहे ८७.

आपणचि गांठीं बांधिलें धन । तें क्षणक्षणां पाहे आपण ।
येथवरी धनापाशीं जाण । विकल्प पूर्ण नांदत ॥ ८८ ॥
आपणच जे द्रव्य गांठीला बांधलेले असते, तें घटकेघटकेला स्वतःच पहात असतो. अशाप्रकारे देखील द्रव्यापाशी परिपूर्ण भेद वागत असतो ८८.

ऐसा धनापाशीं भेदू जाण । हें नववें अनर्थलक्षण ।
अतिशयें अतिनिर्वाण । वैर दारुण धनेंसीं ॥ ८९ ॥
असा द्रव्यापाशी भेद असतो, तेंच नवव्या अनर्थांचे लक्षण होय. द्रव्याबरोबर अत्यंत कमालीचे असें भयंकर वैरही असते ८९.

धनापाशीं वैर पूर्ण जाण । हें अंगें भोगूनि आपण ।
सांगे कदर्यु ब्राह्मण । वैरलक्षण धनाचें ॥ २९० ॥
द्रव्याजवळ वैरही परिपूर्ण आहे, हे आपण स्वतः अनुभवून तो कदर्यु ब्राह्मण वैराचे लक्षण सांगत आहे २९०.

पित्यापुत्रांमाजीं विरोधू । पाडितो हा द्रव्यसंबंधू ।
वैरी करी सखे बंधू । तो हा प्रसिद्धू धनलोभ ॥ ९१ ॥
हा द्रव्याचा संबंध पितापुत्रांमध्ये विरोध आणितो. सख्खे भाऊही वैरी करून सोडतो. असा तो धनलोभ आहे ९१.

आपुल्या कळवळ्याचे सुहृद । त्यांसी धनलोभ पाडी द्वंद्व ।
धनास्तव अतिसुबुद्ध । वैर विरुद्ध सर्वांसी ॥ ९२ ॥
आपल्या अगदी जिव्हाळ्याचे आप्त असतात, त्यामध्ये सुद्धा द्रव्यलोभ कलह उत्पन्न करतो. द्रव्याकरितांच सर्वांच्या विरुद्ध निकराचें वैर वाढते ९२.

प्राणाहूनि पढिये मित्रू । त्यांसी धनलोभ करी शत्रू ।
धनलोभ अतिअपवित्रू । वैरी दुस्तरू जगीं हा ॥ ९३ ॥
प्राणापेक्षाही प्रिय मित्र असतात, त्यांनाही द्रव्यलोभ शत्रु करून सोडतो. द्रव्यलोभ हा अत्यंत अमंगळ व दुस्तर शत्रु आहे ९३.

बंधुकलहें धन वांटितां । अधिक न ये आपुल्या हाता ।
तैं वांटा करिती जे धर्मतां । त्या साधूंसी तत्त्वतां वैर चाळी ॥ ९४ ॥
भावाभावांत कलह उत्पन्न झाल्यामुळे द्रव्याची वाटणी करतांना आपल्या हाती कांहीं अधिक येत नाही म्हणून, त्या वेळी जे वास्तविक न्यायाने वाटणी करतात, त्या सात्त्विक वृत्तीच्या पुरुषांविषयींच खरोखर वैर करितो ९४.

जिचे उदरीं जन्मला आपण । जिचें सदा केलें स्तनपान ।
ते मातेसी धनलोभें जाण । वैर संपूर्ण चालवी ॥ ९५ ॥
जिच्या पोटी आपण जन्म घेतला, जिचे सदासर्वदा स्तनपान केलें, त्या आईशींच धनलोभाने पूर्णपणे वैर चालवितो ९५.

आपली जे कां निजजननी । अर्थ तीतें करी वैरिणी ।
बाहेर घाली घरांतूनी । मुख परतोनी पाहेना ॥ ९६ ॥
आपली जी प्रत्यक्ष आई असते, तिलाच द्रव्य हे वैरीण करून सोडते. तिला घरातून बाहेर घालवितो व फिरून तोंड देखील पहात नाहीं ९६.

ज्याचेनि तुटे भवबंधन । ज्याचेनि बोलें होइजे पावन ।
त्या सद्गुरूसी अबोला जाण । धनाभिमान धरवित ॥ ९७ ॥
ज्याच्या योगाने संसाराचे बंधन तुटते व ज्याच्या शब्दाच्या योगाने पावन होतो, त्या सद्रूबरोबरच हा द्रव्यलोभ अबोला धरवितो ९७.

धनाभिमानाचा बडिवार । सद्गुरूमाजीं पाडी वैर ।
धनाभिमानी अणुमात्र । नव्हे निर्वैर कोणासी ॥ ९८ ॥
या द्रव्याच्या अभिमानाचा काय बडेजाव आहे पहा! तो सद्गुरूपाशीही वैर पाडतो. द्रव्याचा अभिमानी असतो तो अणुमात्रही कोणाशी निर्वैर असत नाहीं ९८.

जें हें सांगितलें निरूपण । त्या नांव वैर संपूर्ण ।
हें दहावें अनर्थलक्षण । अविश्वासी धन तें ऐक ॥ ९९ ॥
हे जें मी निरूपण सांगितले, त्याचेच नाव संपूर्ण वैर होय. दहाव्या अनर्थांचे लक्षण होय. आतां द्रव्य अविश्वासी कसे असते तें  ऐक ९९.

धनाभिमानाचा विलास । न मानी पित्याचा विश्वास ।
पूर्ण बंधूचा अविश्वास । केवीं सुहृदांस पातेजे ॥ ३०० ॥
द्रव्याच्या अभिमानाचा प्रताप असा आहे की, त्यामुळे पुत्र आपल्या बापाचासुद्धा विश्वास धरीत नाही. भावाचासुद्धा पूर्णपणे अविश्वास असतो, मग इतर आप्तेष्टांवर भरंवसा कसा ठेवणार? ३००. 

'आत्मा वै पुत्रनामासी' । जो साचार धणी सर्वस्वासी ।
त्या पातेजेना निजपुत्रासी । अतिअविश्वासी धनलोभ ॥ १ ॥
'आत्मा वै पुत्रनामासि' पुत्र हा प्रत्यक्ष आपला आत्माच होय अशी श्रुति आहे. असा जो पुत्र खरोखर आपल्या सर्वस्वाचा धनी, त्या आपल्या मुलावरसुद्धा विश्वास ठेवीत नाही, असा द्रव्यलोभ अत्यंत अविश्वासी आहे १.

धर्म अर्थ काम संपूर्ण । त्रिसत्य सत्य हें वचन ।
पूर्वजांची भाक निर्वाण । देऊनि आपण जे परणी ॥ २ ॥
धर्म, अर्थ व काम पूर्णपणे साधीन अशी विवाहसमयीं त्रिवार सत्य म्हणून शपथ घेतली आणि त्याचा विश्वास पटविण्यासाठी पूर्वजांच्या थोर लौकिकाची खात्री देऊन आपण जिच्याशी लग्न केलें २, 

जिणें जीवू प्राण सर्वस्वेंसीं । साचार अर्पिला भ्रतारासी ।
ऐशियेही धर्मपत्नीसी । अविश्वासी धनलोभ ॥ ३ ॥
जिने सर्वस्वी आपला जीवप्राण खरोखर भ्रतारालाच अर्पण केलेला असतो, अशा धर्मपत्नीशीही हा द्रव्यलोभ अविश्वासीपणा करतो ३.

जे उदरीं वाहे नवमासीं । जे सर्वदा विष्ठामूत्र सोशी ।
धनलोभाची जाती कैशी । तेही मातेसी न विश्वासे ॥ ४ ॥
या द्रव्यलोभाची जात कशी आहे पहा! जी नऊ महिने उदरांत बाळगते, सदासर्वदा विष्ठामूत्र काढण्याचे कष्ट सोसते, त्या आईवरही तो विश्वासत नाही ४. 

धनाभिमान ये जयापाशीं । तो विश्वासेना सद्गुरूसी ।
इतरांची कथा कायसी । पूर्ण अविश्वासी धनमानी ॥ ५ ॥
ज्याला द्रव्याचा अभिमान चढतो, तो सद्गुरूवरसुद्धा विश्वास ठेवीत नाही. मग इतरांची कथा काय ? द्रव्याला मान देणारा मनुष्य पूर्ण अविश्वासी असतो ५.

अविश्वासाचें मुख्य कारण । धन आणि दुसरी स्त्री जाण ।
तेथ मोहावलें ज्याचें मन । तो अतिसंपन्न अविश्वासें ॥ ६ ॥
अविश्वासाचे मुख्य कारण म्हटले म्हणजे एक द्रव्य आणि दुसरी स्त्री हे लक्षात ठेव. त्यांत ज्याचें मन मोहून पडलें तो अविश्वासाने पूर्णपणे भरलेला असतो ६.

जो धनमानी आणि स्त्रीजित । त्यासी विमुख होय हृदयस्थ ।
त्यातें सद्गुरूही उपेक्षित । परम अनर्थ अविश्वासें ॥ ७ ॥
जो द्रव्यालाच मान देणारा आणि बाइलवेडा असतो, त्याला हृदयस्थ आत्माराम विन्मुख होतो. सद्गुरुही  त्याची उपेक्षा करतात अविश्वासाने असा अत्यंत अनर्थ होतो ७.

सकळ दोषां मुकुटमणी । अविश्वास बोलिला पुराणीं ।
जो प्रकटतां अर्धक्षणीं । करी धुळदाणी वृत्तीची ॥ ८ ॥
पुराणांतरीसुद्धा अविश्वास हा सर्व  दोषांचा मुकुटमणि होय असेंच म्हटले आहे. तो अविश्वास प्रगट झाला की, क्षणार्धामध्ये वृत्तीची धूळधाण करितो ८.

अविश्वासा अभिमान भेटे । तैं मुक्ताची मुक्तता तुटे ।
मग विकल्पाचेनि नेटें । घाली उफराटें देहबंदीं ॥ ९ ॥
अविश्वासाला अभिमान भेटतो तेव्हां मुक्ताची मुक्तता संपते. मग तो अविश्वास विकल्पाच्या प्रेरणेने त्याला उलट देहाच्या बंधनांत घालितो ९.

अविश्वासें कवळिल्या चित्ता । अभिमानें म्हणे मी ज्ञाता ।
तेव्हां उभउभ्यां पळे आस्तिकता । देखे नास्तिकता सर्वत्र ॥ ३१० ॥
अविश्वासाने चित्त व्यापून टाकले असता 'मी ज्ञाता' असें तो मोठ्या अभिमानाने म्हणतो, तेव्हा आस्तिक वृत्ति उभ्याउभ्याच पळून जाते, आणि सर्वत्र नास्तिकताच दिसू लागते ३१०.

अविश्वास येतां पहा हो । सकुटुंब पळे सद्भावो ।
मग लोकत्रयीं अभावो । नांदवी निर्वाहो विकल्पेंकरूनी ॥ ११ ॥
अहो! असे पहा की, अविश्वास आला की सद्भाव सहकुटुंब पळून जातो आणि सान्या त्रिभुवनांत त्या सद्भावाचा अभाव होतो. मग अविश्वास हा विकल्पाच्या योगानेच सर्व व्यवहार चालवितो ११. 

वाडेंकोडें अविश्वासी । विकल्पू नांदे अहर्निशी ।
जेथ रिगाव अविश्वासासी । विकल्प त्यासी नागवी ॥ १२ ॥
अविश्वासाच्या ठिकाणी विकल्प हा  मोठ्या आनंदानं रात्रंदिवस राहात असतो, आणि जेथे अविश्वासाला शिरकाव मिळतो तेथें विकल्पच त्याला लुटून फस्त करतो १२.

अंगोवांगीं अविश्वास । परमार्थराष्ट्र पाडी वोस ।
सद्‌गुरूचेही दावी दोष । न मनी विश्वास ब्रह्मयाचा ॥ १३ ॥
हा अविश्वास एकदा आंगी खिळला तर परमार्थाचे राज्यच ओसाड करून टाकतो, आणि सद्गुरूचेही दोष दाखवितो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचासुद्धा विश्वास धरीत नाही १३.

यालागीं सकळ दोषांचा राजा । अविश्वासाहूनि नाहीं दुजा ।
तो रिगोनियां निजपैजा । विभांडी वोजा महासिद्धि ॥ १४ ॥
म्हणून सर्व दोषांचा राजा अविश्वासाहून दुसरा कोणी नाही. तो स्वतः पैजेपुढे होऊन महासिद्धींची पूर्णपणे वाताहत करून टाकतो १४.

जिकडे अविश्वासें चाली केली । तिकडे परमार्था पळणी झाली ।
विकल्पाची धाडी आली । ते संधी नागवली बहुतेकें ॥ १५ ॥
आणखी अविश्वासाने जिकडे हल्ला केला, तिकडून परमार्थ पळून गेला असे समजावे. विकल्पाची धाड पडली, की बहुधा ती वेळ व्यर्थच गेली असें होते १५.

सिद्धाचें गेलें सिद्धिभूषण । साधकें सपाई नागवलीं जाण ।
रानभरी झाले साधारण । श्रद्धेचें उद्यान छेदिलें ॥ १६ ॥
सिद्धाच्या सिद्धीचे भूषण  नाहीसे झालें, साधक लोक तर बिचारे सफाई ठार झाले, व साधारण सावध होते ते तर रानोमाळ पळत सुटले. कारण अविश्वासाने श्रद्धेची बाग सर्व तोडून टाकली १६.

यमनियमांचीं नगरें जाळी । क्रोधू तापसा करी होळी ।
मोक्षफळें सफळिता केळी । समूळ उन्मळी मोहगजू ॥ १७ ॥
क्रोध हा यमनियमांची शहरें जाळून फस्त करतो आणि तपस्वी लोकांची होळी करून टाकतो. मोहरूपी हत्ती असतो तो मोक्षरूपी फळांनी सुफळ झालेल्या वेळी समूळ उपटून टाकतो १७, 

शमदमाचें घरटें । खाणोनि सांडिलें आव्हाटे ।
वोस विवेकाचे चोहटे । कोणी ते वाटे वागेना ॥ १८ ॥
व शम-दमांचे झोपडे अस्ते खणून काढून चवाठ्यावर फेकून देतो, विचाराचे चवाठे ओस पडून त्या मार्गानें कोणी पाऊलही टाकीत नाहीं १८.

व्रतोपवास यांचीं साजिरीं । निष्काम उपवनें चौफेरीं ।
तीं जाळिलीं उपराउपरी । नानापरी विकल्पें ॥ १९ ॥
व्रत, उपवास, ह्यांची चौफेर जी गोजिरवाणी निष्काम उपवनें होती, ती विकल्पाने हां हां म्हणतां नाना प्रकारांनी जाळून फस्त केली १९.

ऐशिया अविश्वासासी । ज्ञानाभिमानी आले भेटीसी ।
विकल्पें अभय देऊनि त्यांसी । आपणियापाशीं राहविलें ॥ ३२० ॥
ज्ञानाचे अभिमानी लोक अशा अविश्वासाला भेटायला आले असतां विकल्पाने त्यांना अभय देऊन आपल्यापाशी ठेवून घेतले ३२०.

ऐशिया अविश्वासापुढें । परमार्थ काइसें बापुडें ।
विकल्पाचें बळ गाढें । तो करी कुडें तत्काळ ॥ २१ ॥
अशा अविश्वासापुढे परमार्थ तो बिचारा काय? विकल्पाचे बळ मोठे असते. तो तत्काळ अनर्थ करून सोडतो २१.

पोटांतून जो अविश्वासी । तो सदा देखे गुणदोषांसी ।
अखंड द्वेषी परमार्थासी । हा त्यापाशीं स्वभावो ॥ २२ ॥
पोटांतूनच जो अविश्वासी असतो, तो नेहमी गुणदोषांचाच विचार करीत असतो, आणि परमार्थाचा सतत द्वेषच करितो. त्याचा हा स्वभावच आहे २२.

यापरी अविश्वासी । बद्धवैर पडे परमार्थासी ।
यालागीं जो पोटींचा अविश्वासी । हांसल्याही त्यापाशीं न वचावें दीनीं ॥ २३ ॥
अशा प्रकारे अविश्वासी मनुष्य परमार्थाशी दृढ वैर धरून राहातो. म्हणून जो अंत:करणापासून अविश्वासीच आहे, तो हासत आला तरी त्याच्यापाशी गरिबाने जाऊं नये २३.

सकळ दोषांमाजीं समर्थ । सकळ दोषंचें राजत्व प्राप्त ।
तो हा अकरावा अनर्थ । असे नांदत धनामाजीं ॥ २४ ॥
सर्व दोषांत प्रबळ, सर्व दोषांचे राज्य ज्याला प्राप्त झाले आहे, तो हा 'अविश्वास' नावाचा अकरावा अनर्थ द्रव्यांत राहिलेला असतो २४.

अकराहीं इंद्रियांसी । पूर्ण करी अविश्वासेंसी ।
यालागीं अकरावें स्थान यासी । वस्ति अविश्वासासी मनामाजीं ॥ २५ ॥
हा अविश्वास अकराही इंद्रियांना पूर्णपणे अविश्वासी करितो, म्हणून ह्याला अकरावें स्थान दिले आहे. ह्या अविश्वासाला मनामध्ये स्थान असतें २५.

मुख्यत्वें स्पर्धेचें आयतन । बहुविद्या का बहुधन ।
हेंचि स्पर्धेचें जन्मस्थान । येथूनि जाण तें वाढे ॥ २६ ॥
मुख्यत्वेकरून स्पर्धेचे स्थान म्हणजे पुष्कळ विद्या किंवा पुष्कळ धन हेंच होय. स्पर्धेचे जन्मस्थान हेंच आहे. येथूनच ती पुढे वाढते २६.

विद्या झालिया संपन्न । पंडित पंडितां हेळण ।
मुख्य गुरूशीं स्पर्धा करी जाण । हें स्पर्धालक्षण विद्येचें ॥ २७ ॥
विद्या प्राप्त झाली असतां पंडितांपंडितांमध्ये एकमेकांची हेळणा सुरू होते. तो मुख्य गुरुशीच स्पर्धा करतो, हेच विद्येचें स्पर्धालक्षण होय २७.

गांठीं झालिया धन । स्पर्धा खवळे दारुण ।
कुबेर परधनें संपन्न । मी स्वसत्ता जाण धनाढ्य ॥ २८ ॥
द्रव्य संग्रही असले म्हणजे स्पर्धा भयंकर खवळते. तो म्हणतो की, “ कुबेर दुसऱ्याच्या द्रव्यावर श्रीमंत झाला आहे, परंतु मी आपल्या सत्तेच्याच बळावर धनाढ्य झालों आहे २८.

माझिया निजधनापुढें । गणितां अल्प गंगेचे खडे ।
माझिये धनाचेनि पडिपाडें । कोण बापुडें उभे राहे ॥ २९ ॥
माझ्या स्वतांच्या द्रव्यापुढे गंगा नदीतील खडे मोजले असताही ते थोडेच होतील. माझ्या संपत्तीच्या बरोबरीला दुसरे कोण बरे उभे राहणार?" २९.

मग जे जे देखे धनवंत । ते ते हेळूनि सांडी तेथ ।
यापरी स्पर्धा अद्भुत । धरूनि अर्थ उल्हासे ॥ ३३० ॥
मग जे जे श्रीमंत पहातो, त्या त्या सर्वांची तेथल्यातेथेच विटंबना करून टाकतो. ह्याप्रमाणे द्रव्याचा आश्रय धरून स्पर्धा ही विलक्षण उसळत असते ३३०.

एवं धरूनियां अर्थ । स्पर्धा बारावा अनर्थ ।
सदा नांदे धनाआंत । तो हा वृत्तांत सांगीतला ॥ ३१ ॥
अशा रीतीने द्रव्य धरून राहिले असतां स्पर्धा हा बारावा अनर्थ त्या द्रव्यामध्ये नेहमी राहतो. त्याचा हा वृत्तांत सांगितला ३१.

आतां तीन अर्थांचा मेळा । एके पदीं झाला गोळा ।
तोही नांदे धनाजवळा । ऐक वेगळा विभाग ॥ ३२ ॥
आता एका शब्दांत ('व्यसनानि' या पदांत) तीन अर्थाचा मेळा एकत्र झालेला आहे, तोही द्रव्यापाशींच रहात असतो. त्याचेही निरनिराळे विभाग आता ऐक ३२.

स्त्री द्यूत आणि मद्यपान । या तिहींतें वाढवी धन ।
हे तीन अनर्थ दारुण । धनवंता पूर्ण आदळती ॥ ३३ ॥
स्त्री, द्यूत आणि मद्यपान त्या तिहींना द्रव्य वाढविते. हे तीन भयंकर अनर्थ श्रीमंतावर पूर्णपणे कोसळतात ३३.

जो कां पुरुष निर्धन । तो स्त्रियेस जडिसासमान ।
देखोनि निर्धनाचें वदन । प्रत्यक्ष जाण स्त्री थुंकी ॥ ३४ ॥
निर्धन पुरुष असतो तो बायकोलाही दगडासारखा वाटतो. निर्धन पुरुषाचे तोंड पाहून प्रत्यक्ष त्याची स्त्रीही त्याच्यावर थुंकते  ३४.

धनहीन पुरुषाचे घरीं । कलहो स्त्री-पुरुषांमाझारीं ।
निर्भर्त्सूनि नानापरी । दवडी घराबाहेरी पुरुषातें ॥ ३५ ॥
निर्धन पुरुषाच्या घरांत स्त्रीपुरुषांमध्ये नेहमी कलह असतो. त्याची स्त्री नानाप्रकारें निर्भर्त्सना करून त्या पुरुषाला घराबाहेर घालवून देते ३५.

धनवंता पुरुषासी स्त्री लवोटवो करी कैसी ।
कुटका देखोनि शुनी जैसी । हालवी पुच्छासी कुंकात ॥ ३६ ॥
धनवान् पुरुषापाशी त्याची स्त्री कशी लुडबुड करते ? तर ज्याप्रमाणे कुत्री भाकरीचा तुकडा पाहून 'कुंकू' करीत शेपूट हालविते ३६.

त्या धनाची झालिया तुटी । स्त्री वसवसोनि लागे पाठी ।
आतां नावडती तुमच्या गोठी । रागें उठी फडफडोनी ॥ ३७ ॥
पण त्या द्रव्याचा नाश झाला असता तीच स्त्री वसवसून नवऱ्याच्या पाठीला लागते. " मला नाहीं आता हे  तुमचे बोलणे आवडत " असे म्हणून रागाने फणकारून उठते ३७.

दिवसा पोरांची तडातोडी । रात्रीं न सोसे तुमची वोढी ।
हातीं नाहीं फुटकी कवडी । जळो गोडी जिण्याची ॥ ३८ ॥
ती म्हणते-"दिवसा पोरांची तडातोडी चालू असते, आणि रात्री तुम्ही ओढता. ते सहन होत नाही. हातात फुटकी कवडीसुद्धा नाही. जळो ते जगण्यांतलें सुख !" ३८.

ऐशापरी कडोविकडी । निर्भर्त्सूनि दूरी दवडी ।
निर्धन पुरुषाची आवडी । न धरी गोडी स्वदारा ॥ ३९ ॥
अशा प्रकारे मोठमोठ्याने निर्भर्त्सना करून नवऱ्याला दूर लोटून देते. निर्धन  पुरुषाची आवड व गोडी त्याची स्त्रीसुद्धा धरीत नाही ३९.

यापरी निर्धन पुरुषासीं । स्वस्त्री वश्य नव्हे त्यासी ।
स्त्रीबाधा धनवंतासी । अहर्निशीं अनिवार ॥ ३४० ॥
अशा रीतीनें निर्धन पुरुषाला त्याची स्वत:ची स्त्रीसुद्धा अनुकूल होत नाही, परंतु श्रीमंताला मात्र स्त्रीची पीडा रात्रंदिवस मनस्वी होत असते ३४०.

लक्षूनि धनवंत नर । वेश्या मिरवी श्रृंगार ।
हावभाव चमत्कार । त्यासी धनाढ्य थोर भाळले ॥ ४१ ॥
श्रीमान् गृहस्थ पाहून वेश्या त्याच्यापुढे थाटमाट मिरविते. तिचे ते हावभाव व मोहक वर्तन यांना थोर धनाढ्य लोक भाळलेले असतात ४१.

वेश्याकामसंगें जाण । अखंड लांचावलें मन ।
तद्योगें मद्यपान । करिती सधन धनमदें ॥ ४२ ॥
एकदा वेश्येचा कामसंग घडला की, त्याचे मन त्यालाच निरंतर उंचावते, आणि त्याच्या योगाने द्रव्याच्या धुंदीत शेटसावकार मद्यपान करूं लागतात ४२.

मद्यापानें जो उन्मत्त । तो स्वेच्छा खेळे द्यूत ।
एवं हेही तिन्ही अनर्थ । जाण निश्चित अर्थासी ॥ ४३ ॥
मद्यपानानें जो उन्मत्त झाला, तो स्वेच्छेनेच जुगार खेळू लागतो. असे हे तिन्ही अनर्थ द्रव्यापाशीच खात्रीने असतात असे समज ४३.

अर्थापाशीं पंधरा अनर्थ । ते सांगीतले इत्थंभूत ।
सुखाचा लेशु येथ । नाहीं निश्चित धनवंता ॥ ४४ ॥
याप्रमाणे द्रव्यापाशी पंधरा अनर्थ असतात ते इत्थंभूत सांगितले. यावरून श्रीमंताला धनाजवळ सुखाचा एक लेशही मिळत नाही ४४.

एवं हे पंधराही अनर्थ । मूर्ख अथवा पंडित ।
जे अर्थसंग्रह करित । अवश्य हे तेथ उठती ॥ ४५ ॥
तात्पर्य, मूर्ख असो की पंडित असो, जे कोणी द्रव्यसंचय करतात त्यांच्याठिकाणी हे पंधराही अनर्थ अवश्य उत्पन्न होतात ४५.

त्यासी नाम मात्र हा अर्थ । येर्‍हवीं मूर्तिमंत अनर्थ ।
यालागीं श्रेयार्थी जे हरिभक्त । तिंही निश्चित त्यागावा ॥ ४६ ॥
पैसा किंवा द्रव्य यांचे केवळ नांव मात्र 'अर्थ' आहे, परंतु एरवी पाहिले तर तो मूर्तिमंत 'अनर्थ'  आहे. याकरितां जे स्वहितेच्छु हरिभक्त असतील, त्यांनी निश्चयेंकरून अर्थाचा त्याग करावा ४६.

जेवीं कां बोळ हुंगेना माशी । ढेंकुण न ये तेलापाशीं ।
वोळंबा न लगे अग्नीसी । तेवीं जो अर्थासी नातळे ॥ ४७ ॥
ज्याप्रमाणे माशी कधी बोळ हुंगीत नाही, किंवा ढेकूण जसा तेलापाशी येत नाही, किंवा वाळवी जशी अग्निला  लागत नाही, त्याप्रमाणे जो द्रव्याला शिवत नाही ४७; 

जेवीं कां अग्नीमाजीं लवण पडे । तें तडफडोनि बाहेर उडे ।
तेवीं मोक्षाचिये चाडे । जो त्यागी रोकडें निजधन ॥ ४८ ॥
किंवा ज्याप्रमाणे अग्नीमध्ये मीठ पडलें असतां तें फडफडून बाहेर पडते, त्याप्रमाणे मोक्षाच्या इच्छेनें जो आपले द्रव्य तत्काल टाकून देतो, तोच स्वहितेच्छु हरिभक्त होय ४८.

बचनाग मुखीं घालितां आपण । क्षणार्ध दावी गोडपण ।
तोचि परिपाकीं आणी मरण । तैसा अर्थ जाण अनर्थीं ॥ ४९ ॥
आपण बचनाग तोंडात घातला असता तो क्षणभर गोडपणा दाखवितो, पण परिणामी मृत्यु आणतो. त्याप्रमाणे अर्थ हा अनर्थास कारण होतो ४९.

यालागीं जो मोक्षार्थी । तेणें अर्थ न धरावा हातीं ।
काया वाचा चित्तवृत्ती । अर्थ निश्चितीं त्यागावा ॥ ३५० ॥
ह्याकरिता ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्याने हातामध्ये द्रव्य घेऊ नये. कायावाचामनेंकरून खरोखरच द्रव्याचा त्याग करावा ३५०.

अर्थमूळ सकळ भेद । पूर्वीं बोलिला एवंविध ।
तोचि पुनःपुनः गोविंद । करूनि विशद सांगत ॥ ५१ ॥
सर्व प्रकारचे भेद अर्थापासून उत्पन्न होत असतात असें पूर्वी सांगितलेलेंच आहे. परंतु श्रीकृष्ण तेच पुनः पुन्हाः स्पष्ट करून सांगतात ५१.

भिद्यन्ते भ्रातरो दाराः पितरः सुहृदस्तथा ।
एकास्निग्धाः काकिणिना सद्यः सर्वेऽरयः कृताः ॥ २० ॥
[श्लोक २०] बांधव, स्त्रिया, वडील, मित्र असे जे जे स्नेहबंधनाने एकरूप होऊन राहातात, ते सर्वजण धनामुळे इतके दुरावले जातात की, ताबडतोप ते एकमेकांचे शत्रू होतात. (२०)

इष्टमित्रांचें मित्रत्व मोडी । बंधुबंधूंचा स्न्नेह बिघडी ।
सुहृदांचें सौजन्य तोडी । फुटकी कवडी अर्थाची ॥ ५२ ॥
द्रव्याची एक फुटकी कवडी असली तरी ती इष्टमित्रांचे मित्रत्व मोडून टाकते, बंधूबंधूंचा  स्नेह बिघडविते, आणि सुहृदांचे सौजन्य नष्ट करिते ५२.

पित्यापुत्रांमाजीं विरोध । स्त्रीपुत्रांमाजीं द्वंद्व ।
तो हा जाण अर्थसंबंध । विभांडी हार्द सुहृदांचें ॥ ५३ ॥
पितापुत्रांमध्ये जो विरोध, स्त्रीपुत्रांमध्ये जो कलह, तोच हा अर्थाचा संबंध आहे असे समज. तो आप्तइष्टांचे प्रेमच नष्ट करितो ५३.

काकिणी म्हणजे वीसकवडी । ते आप्तांचा स्न्नेह तोडी ।
त्यांतील एक फुटकी कवडी । भेदू पाडी सुहृदांसी ॥ ५४ ॥
'काकिणी' म्हणजे वीस कवड्या ; पण तेवढ्यासुद्धा आप्तांचा संबंध तोडून टाकतात. हे तर काय, पण त्यातील एक फुटकी कवडीसुद्धा इष्टमित्रांत भेद पाडिते ५४.

अर्थेनाल्पीयसा ह्येते संरब्धा दीप्तमन्यवः ।
त्यजन्त्याशु स्पृधो घ्रन्ति सहसोत्सृज्य सौहृदम् ॥ २१ ॥
[श्लोक २१] हे लोक थोडयाशा धनासाठी सुद्धा प्रक्षुब्ध आणि क्रुद्ध होतात एकमेकांशी स्पर्धा करू लागतात आणि एकदम मैत्री तोडून एकमेकांच्या जिवावर उठतात. (२१)

अतिअल्प अर्थासाठीं । सुहृदता सांडोनि पोटीं ।
कोपें खवळला उठी । शस्त्रमुठी उद्यत ॥ ५५ ॥
द्रव्यार्थी मनुष्य अत्यंत अल्प द्रव्याकरितां अंत:करणांतील मित्रत्व सोडून रागाने संतप्त होऊन उठतो, आणि मुठीत शस्त्र धरून घाव घालावयालाही तयार होतो ५५.

तेथें आप्त होऊनि अनाप्त । परस्परें करिती घात ।
अर्थ अनर्थी प्राणांत । निजस्वार्थघातकू ॥ ५६ ॥
अशा वेळी आप्त  असतात तेच शत्रु होऊन एकमेकांचा घात करतात. अर्थ हा माणसाला अनर्थामध्ये पाडून त्याचा प्राणान्तही घडवितो. अशा प्रकारें अर्थ हा आपल्या स्वार्थाचाही घात करणारा आहे ५६.

जितां अर्थ अनर्थ करी । मेल्या ने नरकद्वारीं ।
उत्तम देहाची बोहरी । अर्थ करी ते ऐक ॥ ५७ ॥
जिवंत असेपर्यंत हे द्रव्य अनर्थ करते, आणि मेल्यावर नरकाच्या द्वारी नेते. आता हेच द्रव्य उत्तम देहाची कशी राखरांगोळी करून टाकतें तेंही ऐक ५७.

लब्ध्वा जन्मामरप्रार्थ्यं मानुष्यं तद्‌द्विजाग्र्यताम् ।
तदानादृत्य ये स्वार्थं घ्रन्ति यान्त्यशुभां गतिम् ॥ २२ ॥
[श्लोक २२] देवतांनीही इच्छा करावी, असा मनुष्यजन्म आणि त्यातही श्रेष्ठ असे ब्राह्मणत्व होऊनही जे त्याचा अनादर करून आपल्या खर्‍या स्वार्थाला तिलांजली देतात, ते अशुभ गतीला जातात. (२२)

कोटि जन्माचें शुद्ध सुकृत । तेणें कर्मभूमीं नरदेह प्राप्त ।
तेथेंही वर्णाग्र्य समर्थ । सत्कुळप्रसूत ब्राह्मणत्वें ॥ ५८ ॥
कोट्यवधि जन्मांचे निर्मळ पुण्य असावे, तेव्हांच या कर्मभूमीत (भरतखंडात) मनुष्यदेह प्राप्त होतो. त्यांतही सर्व वर्णात अग्रगण्य अशा सामर्थ्यवान् ब्राह्मणवांमध्ये जन्म, आणि त्या ब्राह्मणवर्णात  उत्तम कुळामध्ये जन्म ५८. 

ऐसे जन्म पावावया येथ । अमरही मरण मागत ।
इंद्रादि देव जे स्वर्गस्थ । तेही वांछित हें जन्म ॥ ५९ ॥
असा जन्म या मृत्युलोकी प्राप्त होण्यासाठी देवही मरणाची इच्छा करतात. स्वर्गातील इंद्रादिक जे देव आहेत तेही असल्या जन्माची इच्छा करतात ५९.

जे सत्यलोकपर्यंत । ऐश्वर्य पावले अद्भुत ।
तेही हें जन्म वांछित । उत्कंठित अहर्निशीं ॥ ३६० ॥
सत्यलोकापर्यंत अद्भुत ऐश्वर्य ज्यांना प्राप्त झालें आहे, तेसुद्धा या जन्माची इच्छा करतात. इतकेच नव्हे तर रात्रंदिवस त्यासाठी उत्कंठित असतात ३६०.

येथ करितां भगवद्भक्ती । पायां लागती चारी मुक्ती ।
यालागीं हे जन्मप्राप्ती । अमर मागती अहर्निशीं ॥ ६१ ॥
अशा ह्या जन्मांत भगवद्भक्ति केली, तर चारही मुक्ति पायीं लागतात, म्हणून या जन्माची प्राप्ति व्हावी असे देव रात्रंदिवस मागत असतात ६१.

ऐसें उत्तम जन्म पावोनी । अतिअभाग्य मी त्रिभुवनीं ।
निजस्वार्थातें उपेक्षूनी । भुललों धनीं धनलोभें ॥ ६२ ॥
असा उत्तम जन्म प्राप्त झाला असूनही त्रिभुवनांत मी अत्यंत अभागी झालों आणि आपल्या स्वार्थाची उपेक्षा करून द्रव्यलोभाने द्रव्याच्याच ठिकाणी भुलून पडलों ६२.

धनलोभाचिया भ्रांती । कां लोकेषणा लौकिकस्थिती ।
जो उपेक्षी भगवद्भक्ती । अशुभ गती तयासी ॥ ६३ ॥
द्रव्यलोभाच्या भ्रांतीने किंवा लोकांत प्रतिष्ठा व्हावी अशा लौकिकाच्या बुद्धीनें जो भगवद्भक्तीची उपेक्षा करतो, त्याला दुर्गति प्राप्त होते ६३.

तेचि कैशी अशुभ गती । धनलोभ्यां नरकप्राप्ती ।
चौर्‍यांशीं लक्ष योनींप्रती । गर्भ भोगिती अतिदुःखें ॥ ६४ ॥
ती दुर्गति कसली? तर द्रव्यलोभ्यांना नरकवास प्राप्त होतो आणि ते चौऱ्यायशी लक्ष योनीमध्ये अत्यंत दुःखाने गर्भवास भोगीत राहातात ६४.

जया ब्राह्मणजन्माआंत । स्वर्गमोक्ष सहजें प्राप्त ।
तेचि अर्थींचा इत्यर्थ । स्वयें सांगत धनलोभी ॥ ६५ ॥
ज्या ब्राह्मणजन्मामध्ये स्वर्ग आणि मोक्ष सहजी प्राप्त होतात, त्याच अर्थाचे रहस्य तो द्रव्यलोभी स्वतः सांगत आहे ६५.

स्वर्गापवर्गयोर्द्वारं प्राप्य लोकमिमं पुमान् ।
द्रविणे कोऽनुषज्जेत मर्त्योऽनर्थस्य धामनि ॥ २३ ॥
[श्लोक २३] मोक्ष आणि स्वर्गाचे द्वारे असे मनुष्यशरीर मिळूनही अनर्थाचे घर असलेल्या धनाच्या कचाट्यात कोणता शहाणा मनुष्य सापडेल ? (२३)

ब्राह्मणें करितां स्वधर्म । वासना झळंबे स्वर्गकाम ।
तैं इंद्रचंद्रादिकांचें धाम । पावे द्विजोत्तम सहजचि ॥ ६६ ॥
ब्राह्मणाने आपल्या धर्माप्रमाणे वर्तन केले असता त्याला स्वर्गप्राप्तीची इच्छा उत्पन्न होते. त्या वेळी तो ब्राह्मणश्रेष्ठ इंदचंद्रादिकांचे स्थानही सहज मिळवू शकतो ६६.

ज्याचिया याजनस्थिती । इतरांसी होय स्वर्गप्राप्ती ।
एवं स्वर्ग तो ब्राह्मणांच्या हातीं । त्यांसी ते गती सहजचि ॥ ६७ ॥
ज्याच्या यज्ञकर्मामुळे इतरांनासुद्धा स्वर्गप्राप्ति होते. अशा रीतीनें स्वर्ग हा ब्राह्मणांच्या हातांतीलच असल्यामुळे त्यांना ही स्वर्गगति साहजिकच प्राप्त होते ६७.

सांडूनि ईषणात्रयासी । निष्काम स्वधर्म ज्या द्विजासी ।
मोक्ष लागे त्याच्या पायांसी । तिष्ठे अहर्निशीं आज्ञाधारी ॥ ६८ ॥
लोकेषणा, पुत्रेषणा व दारेषणा ह्या तीन ईषणांना सोडून ज्या ब्राह्मणाला निष्काम स्वधर्माचरण घडते, त्याच्या चरणाला मोक्षही लागतो, आणि रात्रंदिवस त्याचा आज्ञाधारक होऊन राहातो ६८.

तो अनुग्रही जयांसी । ते पावती निजमोक्षासी ।
एवढें सामर्थ्य ब्राह्मणापाशीं । अनायासीं सहजचि ॥ ६९ ॥
तो ज्यांच्यावर कृपा करील, तेही मोक्षपदाला पावतील, एवढे सामर्थ्य ब्राह्मणापाशी अगदी अनायासें सहज असते ६९.

स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्याचा आज्ञधारी ।
एवढी ब्राह्मणत्वाची थोरी । धनलोभावारी नाशिती ॥ ३७० ॥
स्वर्ग हा ज्याच्या पायाखालची पायरी आहे, मोक्ष ज्याचा आज्ञाधारक आहे, एवढी ब्राह्मणपणाची थोरवी असून अशा ब्राह्मणजन्माचा द्रव्यलोभावारी नाश करून टाकतात ३७०.

ब्राह्मणजन्म पावल्या जाण । निःशेष खुंटे जन्ममरण ।
तेथ मी नाडलों जाण । जोडूनि धन धनलोभें ॥ ७१ ॥
ब्राह्मणजन्म प्राप्त झाला असतां जन्ममरण पूर्णपणे नाहीसे होते असे असतां मी मात्र द्रव्यलोभाने द्रव्य मिळवून फशी पडलों ७१.

दुर्लभ येथें माणुसपण । त्यामाजीं अतिदुर्लभ ब्राह्मण्य ।
तेंही पावोनि मे आपण । धनलोभें पूर्ण नागवलों ॥ ७२ ॥
या जगामध्ये आधीं मनुष्यपणा दुर्मिळ आहे. त्यांत ब्राह्मणपणा तर फारच दुर्लभ. पण ते ब्राह्मणपण प्राप्त होऊनही मी स्वतः द्रव्यलोभाने पूर्णपणे फसलों ७२.

पावोनि ब्राह्मणशरीर । धनें नाडले थोरथोर ।
अर्थ अनर्थाचें मुख्य घर । दुःख दुर्धर वाढवी ॥ ७३ ॥
ब्राह्मणाचा देह प्राप्त होऊन द्रव्यामुळे मोठमोठे लोकही नागवले आहेत. अर्थ हा खरोखर अनर्थाचेंच मुख्य घर असून तो दुर्धर दुःख मात्र वाढवितो ७३.

अर्थ अनर्थाचें भाजन । तें निःशेष त्यागावें धन ।
वैराग्यें तापला पूर्ण । स्वयें ब्राह्मण बोलत ॥ ७४ ॥
द्रव्य  हें अनर्थाचेंच स्थान आहे, म्हणून ते द्रव्य पूर्णपणे टाकून द्यावे. याप्रमाणे वैराग्याने पूर्णपणे संतप्त झालेला तो ब्राह्मण स्वत: बोलू लागला ७४.

आशंका ॥ दैवें जोडिलें संपत्तीसी । नेऊनि सांडावे बिदीसी ।
कां घालावें जळप्रवाहेंसीं । त्याग अर्थासी तो कैसा ॥ ७५ ॥
[आशंका] दैवयोगाने संपत्ति प्राप्त करून दिली, तर ती काय उकिरड्यावर टाकून द्यावी ? किंवा पाण्यात नेऊन टाकावी? द्रव्याचा त्याग तो कसा करावयाचा ? ७५.

तें अर्थत्यागनिरूपण । स्वयें सांगताहे ब्राह्मण ।
जे असतील सधन । तिंहीं सावधान परिसावें ॥ ७६ ॥
तें द्रव्यत्यागाचे वर्णन तो कदर्यु ब्राह्मण स्वतः सांगत आहे. जे धनसंपन्न असतील त्यांनी नीट लक्ष देऊन ऐकावे ७६.

देवर्षिपितृभूतानि ज्ञातीन्बन्धूंश्च भागिनः ।
असंविभज्य चात्मानं यक्षवित्तः पतत्यधः ॥ २४ ॥
[श्लोक २४] जो मनुष्य देव, ऋषी, पितर, प्राणी, बांधव, कुटुंबीय आणि धनाचे दुसरे भागीदार यांना त्यांचा हिस्सा देत नाही किंवा स्वतःही त्याचा उपभोग घेत नाही, धनाचे रक्षण करणार्‍या यक्षाप्रमाणे असणारा तो कंजूष अधोगतीला जातो. (२४)

दैवें जोडिलिया धन । आचरावे पंचमहायज्ञ ।
करावें भगवत्पूजन । उल्हासें जाण महोत्साहें ॥ ७७ ॥
दैवयोगाने द्रव्य मिळाले असतां पंचमहायज्ञ (भूतयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ व मनुष्ययज्ञ) करावे. उत्साहाने मोठा उत्सव करून भगवंताचे पूजन करावें ७७.

स्वयें करावें पितृतर्पण । षण्णवति श्राद्धें जाण ।
पितर उद्धरावे आपण । गयावर्जन करोनियां ॥ ७८ ॥
स्वतः पितृतर्पण करावें. दरवर्षी शाण्णव श्राद्धे  (१२ अमावास्या, ४ युगादितिथि, १४ मन्वादितिथि, १२ सूर्यसंक्रांति, १२ वैधति, १२ व्यतिपात, १५ महालय, ५ अष्टका, ५ अन्वष्टका, व ५ पुर्वेयुः मिळून एकंदर ९६) करावी. स्वतः गयावर्जन करून पितरांचा उद्धार करावा ७८.

जित्यां पितरां त्रिकाळीं नमन । कदा न करावें हेळण ।
त्यांची अवज्ञा आपण । प्राणांतीं जाण न करावी ॥ ७९ ॥
जिवंत असलेल्या वडील माणसांना त्रिकाळ नमस्कार करीत जावें. त्यांचा कधीही अवमान करूं नये. आपण प्राणांतीसुद्धा त्यांची अवज्ञा करूं नये ७९.

त्यांसी गौरवूनि आपण । यथारुचि द्यावें अन्न ।
यथाशक्ति द्यावें धन । सेवेनें संपूर्ण सुखी करावीं ॥ ३८० ॥
आपण त्यांचा गौरव करून त्यांना पाहिजे तसे अन्न द्यावें, यथाशक्ति द्रव्य द्यावे, आणि त्यांची सेवा करून वडील माणसें सुखी करावी ३८०.

पिता स्वयमेव नारायण । माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ।
ऐसें भावें ज्याचें भजन । सुपुत्र जाण तो एक ॥ ८१ ॥
पिता हा प्रत्यक्ष नारायणस्वरूप आहे, व आई ही प्रत्यक्ष लक्ष्मीस्वरूप आहे, अशा भावनेने ज्याच्याकडून पितृ-मातृसेवा घडते, तोच एक सत्पुत्र होय ८१. 

ज्याचे सेवेनें सुखी पितर । तेंचि पितृतर्पण साचार ।
जितां अवज्ञा तो अनाचार । मेल्या श्राद्धविचार तो लौकिक ॥ ८२ ॥
ज्याच्या सेवेनें पितर संतोषित होतात, तेंच खरोखर पितृतर्पण होय. आणि जिवंतपणी त्यांची अवज्ञा करणे तोच अनाचार होय. मेल्यावर श्राद्ध करणे तो केवळ लोकाचार आहे ८२.

जो पितृवचन अविश्वासी । तेणें केल्या पापराशी ।
जो पितृवचन विश्वासी । मोक्ष त्यापाशीं वोळंगणा ॥ ८३ ॥
वडिलांच्या वचनावर जो विश्वास ठेवीत नाही, त्याने पापाच्या राशींच्या राशी जोडल्या म्हणून समजावें, आणि जो वडिलांच्या वचनावर विश्वास ठेवतो, त्याच्याजवळ मोक्षही सेवक होऊन राहातो ८३.

जितमृतपितृतर्पण । ते सांगीतली उणखूण ।
या नांव गा पितृभजन । ऋषिपूजन तें ऐक ॥ ८४ ॥
जिवंत पितरांना आणि मृत पितरांना कसे तृप्त करावे, याचे रहस्य सांगितले. ह्याचंच नांव पितृभजन. आता ऋषिपूजन कसे करावें तें ऐक ८४.

सन्मानें आणूनि ब्राह्मण । श्रद्धा कीजे चरणक्षाळण ।
चरणतीर्था अभिवंदन । सबाह्य जाण स्वयें कीजे ॥ ८५ ॥
सन्मानपूर्वक ब्राह्मणाला आणून श्रद्धेनें त्याचे पाय धुवावे. त्याच्या चरणांच्या तीर्थाला स्वतः अभिवादन करून त्यांतील काही प्राशन करावे व काही शरीरावर सिंचन करावें ८५.

धूपें दीपें यथोक्त पूजन । यथारुचि तृप्ति सदन्न ।
यथाशक्ति द्यावें धन । ऋषिपूजन या नांव ॥ ८६ ॥
धूप, दीप इत्यादिकांनी यथासांग पूजा करावी व त्यास आवडेल तसेंच उत्तम अस तृप्ति होईपर्यंत करावे. तसेच यथाशक्ति द्रव्य द्यावे. ह्याचे नांव ऋषिपूजन ८६.

ब्राह्मण तेचि ऋषीश्वर । ब्राह्मणें तृप्त सनत्कुमार ।
ब्राह्मणमुखें शार्ङ्गधर । धाला ढेंकर देतसे ॥ ८७ ॥
ब्राह्मण हाच महर्षि होय. ब्राह्मणाच्या योगाने सनत्कुमार तृप्त होतात. ब्राह्मणाच्या मुखानेंच श्रीकृष्ण तृप्त होऊन ढेकर देतो ८७.

बंधु स्वगोत्र स्वजन । त्यांची दरिद्रपीडा दारुण ।
निरसावी देऊनि धन । हा मुख्य धर्म जाण श्रेष्ठत्वें ॥ ८८ ॥
भाऊ, सोयरेधायरे, इष्टमित्र, यांची अत्यंत भयंकर दरिद्रपीडा त्यांना द्रव्य देऊन नाहींशी करावी, हाच मुख्यतः श्रेष्ठ धर्म होय ८८.

कुटुंब पीडूनि आपण । अन्यत्रां द्यावें अन्नधन ।
तोचि अधर्म परिपूर्ण । शुद्ध पुण्य तें नव्हे ॥ ८९ ॥
आपण आपल्या कुटुंबाला पीडा देऊन दुसऱ्याला अन्नधन द्यावयाचे तोच पूर्णपणे अधर्म होय. ते पुण्य शुद्ध नव्हे ८९.

कुटुंबासी यथोचित । सुखी करूनि समस्त ।
याहूनि उरला जो अर्थ । तो श्रेयार्थ वेंचावा ॥ ३९० ॥
आपल्या कुटुंबांतील सर्व मनुष्यांना पूर्णपणे सुखी करून त्यानंतर जे द्रव्य उरेल तेंच परोपकारार्थ खर्च करावें ३९०. 

अतिथि आलिया देख । अन्न द्यावें आवश्यक ।
तो झालिया पराङ्मुख । पुण्य निःशेष हरासे ॥ ९१ ॥
कोणी अतिथि आला असता त्याला अवश्य अन्न द्यावें. तो जर विन्मुख जाईल तर आपले सर्व पुण्य लयास जातें ९१.

सकळ दानांमाजीं जाण । अतिश्रेष्ठ अन्नदान ।
दीनास देऊनि सन्मान । द्यावें सदन्न अतिश्रद्धा ॥ ९२ ॥
सर्व दानांमध्ये अन्नदान हे अत्यंत श्रेष्ठ आहे. गोरगरिबाचा सन्मान करून त्याला अत्यंत भक्तिभावानें सुग्रास अन्न द्यावें ९२.

कुटुंब सुखी करी आपण । स्वेच्छा दे दीनभोजन ।
परी कदर्थवी जो निजप्राण । तोही दारुण अधर्म ॥ ९३ ॥
जो स्वतः कुटुंबाला सुखी करितो, गोरगरिबाला यथेच्छ जेवावयाला घालतो, पण स्वतःचे प्राण मात्र उपाशी मारतो, त्याचें तें वर्तनही मोठा अधर्मच होय ९३.

जैसें कीजे दीनतर्पण । त्यांत आपणही एक दीन ।
तेथ न करूनि अधिकन्यून । करावें भोजन समभागें ॥ ९४ ॥
जसें गोरगरिबाला आपण देतो, त्यांत आपणही एक गरीबच आहो असे समजून, त्यामध्ये काहीएक कमीजास्त न करता सर्वांच्या बरोबरीने भोजन करावें ९४.

पंक्तीमाजीं प्रपंचपण । तें अन्नदानीं अतिविघ्न ।
यालागीं करावें भोजन । समभागीं आपण सकळांसीं ॥ ९५ ॥
पंक्तिप्रपंच करणे (पंक्तीमध्ये एकाला चांगला पदार्थ तर दुसऱ्याला वाईट पदार्थ वाढणे, किंवा एकाला पोटभर तर दुसऱ्याला अर्धपोटी वाढणे ) हेही अन्नदानांतील एक मोठे विघ्न आहे. ह्याकरितां सर्वांशी बरोबरीने आपण स्वतः भोजन करावें ९५.

धनाचा सद्व्ययो खरा । द्यावें अनाथप्रेतसंस्कारा ।
अर्पावें दीनांच्या उद्धारा । धाडावें घरा अयाचितांच्या ॥ ९६ ॥
द्रव्याचा खरा सद्वय  म्हणजे ते अनाथांच्या प्रेतसंस्काराला द्यावें, गोरगरिबांचा उद्धार करण्यासाठी द्यावे, किंवा अयाचिताच्या घरी पाठवून द्यावे ९६.

अंध पंगु मुके दीन । यांसी संरक्षी जो आपण ।
त्याचेंचि सार्थक धन । शुद्ध पुण्य तयाचें ॥ ९७ ॥
आंधळे, पांगळे, मुके, दीनदुबळे, यांचे जो आपण होऊन संरक्षण करतो. त्याचेच  धन सार्थकी लागले व त्याचेच पुण्य शुद्ध होय असे समजावें ९७.

साधुसज्जनां विचंबू अडी । तो विचंबू जो सधन तोडी ।
त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥ ९८ ॥
साधु व सज्जन  यांना जें संकट अडचणीत आणते, तें संकट जो धनवान् मनुष्य नाहींसें करितो, त्याच्या धर्मशीलतेची गुढी साक्षात् वैकुंठांत उभी राहाते ९८.

दुर्बळ जो कां भगवद्भक्त । त्यासी संरक्षी जो धनवंत ।
तेणें तुष्टला भगवंत । त्यातें उद्धरीत भक्ताआधीं ॥ ९९ ॥
जो भगद्भक्त दुर्बळ असेल, त्याचें जो श्रीमंत संरक्षण करतो, त्याच्यावर भगवान् संतुष्ट होतो, आणि त्या भक्ताच्या आधीच त्याला उद्धरतो ९९.

सकळमंगळां मंगळ पूर्ण । सकळ कल्याणाचें कल्याण ।
ते हे सद्‌गुरुश्रीचरण । तेथ निजधन जयांचें अर्पे ॥ ४०० ॥
सर्व मंगलांनी परिपूर्ण, सर्व कल्याणांचे कल्याण, ते हे सद्गुरूचे पवित्र चरण होत. तेथे ज्याचे स्वतःचे द्रव्य अर्पण होईल ४००, 

तयांच्या निजधर्माचें निशाण । सत्यलोकीं लागलें जाण ।
वैकुंठी कैलासी संपूर्ण । भेरीनिशाण त्राहाटिलें ॥ १ ॥
त्याच्या औदार्यधर्माचा ' ध्वज  सत्यलोकी फडकत राहातो, आणि वैकुंठात व कैलासांत सर्वत्र त्याचा यशोदुंदुभि दुमदुमत राहतो १.

स्वधर्में जोडलें निजधन । जो करी सद्गुरूसी अर्पण ।
तोचि कर्मीं निष्कर्म जाण । परम पावन तो एक ॥ २ ॥
स्वधर्माने  मिळविलेले द्रव्य जो सदुरूला अर्पण करतो, तोच कर्म करूनही निष्कर्मी होय असे समज. परमपवित्र असा एक तोच २.

जो चढत्यावाढत्या भगवद्भक्ती । गुरूसी अर्पी निजसंपत्ती ।
त्यातें अंगीकारूनि लक्ष्मीपती । आपुली निजभक्ती त्यासी दे ॥ ३ ॥
जो अधिकाधिक भगवद्भक्तीने गुरुला आपली संपत्ति अर्पण करतो, त्याचा अंगीकार करून लक्ष्मीपति तर आपली भक्ति त्याला देतो ३.

ज्यासी अनन्य गुरुभक्ती । त्याच्या द्वारीं चारी मुक्ती ।
दासीत्वें उभ्या असती । त्यापासोनि श्रीपती परता नव्हे ॥ ४ ॥
ज्याला एकनिष्ठ गुरुभक्ति असते, त्याच्या दारांत चारीही मुक्ति बटकीसारख्या उभ्या असतात. लक्ष्मीपति तर त्याच्यापासून दूर होतच नाहीं ४.

ज्याचें तनु मन धन । गुरुचरणीं अर्पे पूर्ण ।
त्यासी भवभयाचें भान । कल्पांतीं जाण दिसेना ॥ ५ ॥
ज्याचे शरीर, मन व धन ही पूर्णपणे गुरुचरणींच अर्पण होतात, त्याला संसारभयाचे स्मरण कल्पांतीसुद्धा होणार नाही ५.

दैवें जोडली जे संपत्ती । ते वेंचोनि ऐशा निगुतीं । अर्थें
परमार्थप्राप्ती । सभाग्य लाहती निजनिष्ठा ॥ ६ ॥
दैवाने जी संपत्ति मिळाली असेल, ती अशा रीतीनें खर्च करून भाग्यवान् मनुष्य त्या द्रव्याने निष्ठापूर्वक परमार्थाची प्राप्ति करून घेतात ६.

ऐसें न वेंचोनि धन । स्वयाति कुटुंब पीडी पूर्ण ।
जो पोटा न खाय आपण । तें यक्षधन संचित ॥ ७ ॥
अशा रीतीने द्रव्य खर्च न करतां स्वजाति व कुटुंब यांना पूर्णपणे पीडा देतो व तो आपण स्वतः पोटाला खात नाही, त्याचें तें संग्रहित केलेलें धन हेंच ‘यक्षधन' होय ७. 

एवं कदर्थूनि निजप्राण । जें संचिलें यक्षधन ।
तें अधःपातासी कारण । दुःख दारुण धनलोभ्या ॥ ८ ॥
अशा रीतीने आपल्या जीवाला क्लेश देऊन जें यक्षधन सांठविलेले असते, तें अधःपाताला कारण होते, आणि त्या द्रव्यलोभ्याला भयंकर दुःख प्राप्त होते ८.

म्हणे मीही याच निष्ठा । यक्षवित्तें झालों करंटा ।
हातींचा स्वार्थ गेला मोटा । वंचलों कटकटा निजमोक्षा ॥ ९ ॥
तो ब्राह्मण म्हणाला, मीही त्याच रीतीनें यक्षवित्तानें करंटा झालो. हाती असलेला स्वत:चा मोठा लाभ व्यर्थ गेला, आणि हाय हाय! मी मोक्षाला अंतरलों! ९.

सांचोनियां यक्षवित्त । म्यां माझें केलें अनहित ।
ऐसा तो खेदयुक्त । कष्टें बोलत निजदुःख ॥ ४१० ॥
यक्षवित्त सांठवून मी माझे अकल्याण केलें. असा तो खेदयुक्त होऊन मोठ्या कष्टाने आपले दुःख सांगतो ४१०.

व्यर्थयार्थेहया वित्तं प्रमत्तस्य वयो बलम् ।
कुशला येन सिध्यन्ति जरठः किं नु साधये ॥ २५ ॥
[श्लोक २५] ज्यांनी विवेकी लोक मोक्षसुद्धा प्राप्त करून घेतात, तीच आयुष्य, धन आणि बळ ही साधने मी मूर्खाने धन मिळविण्याच्या प्रयत्‍नात व्यर्थ खर्च केली आता वृद्धापकाळी मी काय करणार ? (२५)

निजभोगविवर्जित । शिणोनि काया वाचा चित्त ।
कष्टें मिळवावया वित्त । झालों उन्मत्त अविवेकी ॥ ११ ॥
स्वतः विलास न भोगतां शरीर, वाणी व मन यांना त्रास देऊन कष्टाने द्रव्य मिळविण्याकरिता मी उन्मत्त व अविचारी बनलों " ११.  

करितां वित्ताचे आयास । गेलें तारुण्य बळ आयुष्य ।
शरीर क्षीण झालें निःशेष । तरी वित्ताचा शोष शमेना ॥ १२ ॥
द्वन्यप्राप्तीची खटपट करता करता तारुण्य, बळ व आयुष्य ही निघून गेली. शरीर पूर्णपणे क्षीण झाले. तरी द्रव्याचा हव्यास कमी होत नाही १२.

अर्थें अर्थ वाढवितां । अनिवार वाढली चिंता ।
तेथें विसरलों निजस्वार्था । अर्थलोभता कदर्यू ॥ १३ ॥
पैशाने पैसा वाढवितांना चिंता अनिवार वाढली. त्यामुळे मी आपला स्वार्थ विसरलों, आणि द्रव्यलोभाने कृपण बनलों १३.

जेणें वित्तें जीवितें साचार । भूतदया परोपकार ।
करूनियां विवेकी नर । भवाब्धिपरपार पावले ॥ १४ ॥
ज्या द्रव्याने आणि ज्या जन्माने खरोखर विचारी लोक भूतदया व परोपकार करून संसारसमुद्राच्या परतीराला पोंचले १४, 

मज निर्दैवाचें येथ । वृथा वित्त वृथा जीवित ।
आयुष्यही गेलें व्यर्थ । निजस्वार्थ बुडाला ॥ १५ ॥
आणि अशा स्थितीत माझे कपाळकरंट्याचे द्रव्य व्यर्थ गेले, जीवित व्यर्थ गेलें, आयुष्यही फुकट गेले, आणि माझा स्वार्थ बुडाला १५.

म्हणाल असतां जीवें जीत । साधूनि घेऊं निजस्वार्थ ।
तें आतां न चले येथ । अर्थ सामर्थ्य दोनी गेलीं ॥ १६ ॥
आता कदाचित् असें म्हणाल की, जिवांत जीव असतां यापुढे तरी आपला स्वार्थ साधून घेऊ! पण तेही आता अशा स्थितींत चालावयाचे नाही. कारण आतां द्रव्य आणि सामर्थ्य ही दोन्ही नाहीशी झाली १६.

अधर्मास्तव गेलें वित्त । जरेनें गिळिलें सामर्थ्य ।
केवळ मी जरठ येथ । दैवहत उरलों असें ॥ १७ ॥
अधर्मामुळे सर्व पैसा संपला, आणि वृद्धावस्थेने सर्व सामर्थ्य गिळून टाकले. आता मी केवळ जीर्ण म्हातारा व कपाळकरंटा मात्र उरलों आहे १७.

कटकटा जोडितां अर्थ । लोक नाडले समस्त ।
ऐसें जाणोनि प्रस्तुत । स्वयें सांगत कदर्यु ॥ १८ ॥
हाय हाय ! पैसा मिळवितांना सर्व लोक नागविले, हे लक्षात आणून आतां कदयु स्वतः सांगत आहे १८.

कस्मात्संक्लिश्यते विद्वान् व्यर्थयार्थेहयासकृत् ।
कस्यचिन्मायया नूनं लोकोऽयं सुविमोहितः ॥ २६ ॥
[श्लोक २६] विद्वानसुद्धा धनाच्या व्यर्थ हव्यासाने नेहमी दुःखी का होतात बरे ! हा संसार निश्चितच कोणाच्या तरी मायेने अतिशय मोहित होत आहे. (२६)

येथ अज्ञानाची कोण गती । जे अर्थ अनर्थी म्हणती ।
तेही अर्थार्थी होती । ज्ञाते भ्रमती अर्थासी ॥ १९ ॥
अशा द्रव्यलोभाच्या बाबतीत अज्ञानी लोकांची दशा काय वर्णन करावी! जे अर्थ हा अनर्थकारक आहे असे म्हणतात, तेही द्रव्यलोभी होतात. ज्ञाते लोकसुद्धा द्रव्याला भुलतात १९.

ऐसे भ्रमले से सज्ञान । तेही अर्जावया धन ।
युक्तायुक्त प्रयत्न । अनुदिनीं जाण स्वयें करिती ॥ ४२० ॥
असे जे ज्ञाते भ्रमात पडले, तेही द्रव्य संपादन करण्याकरितां बरे-वाईट प्रयत्न  दररोज स्वत: करतात हे लक्षात ठेव ४२०.

सज्ञान भ्रमावया कारण । ईश्वराची माया पूर्ण ।
अघटघटी जीचें लक्षण । त्या धनी सज्ञान मोहिले ॥ २१ ॥
ज्ञाते लोकांना भ्रम व्हावयाला कारण सर्वस्वी ईश्वराची माया होय. अघटित घटना करणारी असें जिचे लक्षण आहे. त्या मायेला सज्ञान धनिक मोहित झाले २१.

कृष्णमाया मोहिले पंडित । नव्हे म्हणाल हा इत्यर्थ ।
जे जोडिताति अर्थ । निजसुखार्थ भोगेच्छा ॥ २२ ॥
विद्वान लोक हे कृष्णाच्या मायेने भुलले असें म्हणाल, पण हा काही या वर्णनांतला हेतु नव्हे, तर ते आपल्या सुखाकरितां व विलासाकरिता पैसा मिळवीत असतात २२.

भोगांमाजीं जे म्हणती सुख । ते जाणावे केवळ मूर्ख ।
येथ अर्थींचा विवेक । कदर्यु देख बोलत ॥ २३ ॥
परंतु विषयोपभोगामध्ये सुख आहे असे जे म्हणतात, ते निखालस मूर्ख होत असे समजावे.  ह्याविषयींचाच विचार आतां कदर्यु  सांगत आहे पहा २३.

किं धनैर्धनदैर्वा किं कामैर्वा कामदैरूत ।
मृत्युना ग्रस्यमानस्य कर्मभिर्वोत जन्मदैः ॥ २७ ॥
[श्लोक २७] काळाच्या विक्राळ दाढेत सापडलेल्या माणसाला धन किंवा धन देणारे, सुखभोग किंवा ते पूर्ण करणारे, तसेच पुन्हा पुन्हा जन्म देणारी कर्मे यांपासून काय लाभ आहे ? (२७)

कटकटा वर्णाग्र्यें पूज्य पहा हो । त्या द्विजासी भुलवी मायामोहो ।
भोगीं वाढवीजे जो देहो । तोचि पहा हो नश्वर ॥ २४ ॥
हाय हाय ! अहो पहा ! सर्व वर्णामध्ये अग्रगण्यत्वानें पूज्य अशा त्या ब्राह्मणालासुद्धा मायेचा मोह भुलवितो! पण जो देह नानाप्रकारच्या उपभोगांनी वाढवावयाचा, तोच आधी नश्वर आहे! २४.

त्या देहासी जे नाना भोग । तोच त्यासी क्षयरोग ।
धन जोडणें अनेग । तोचि मार्ग निर्धनत्वा ॥ २५ ॥
त्या देहाला जे नानाप्रकारचे भोग द्यावयाचे, तोच त्याला क्षयरोग होतो. आणि पुष्कळ द्रव्य संपादन करणे हाच दारिद्र्याचा मार्ग होय २५.

तें धन मिळे अनायासीं । यालागीं धनवंत उपासी ।
अर्थ जोडोनियां प्रयासीं । भोगितां कामासी सुख काय ॥ २६ ॥
ते द्रव्य अनायासे मिळते; म्हणून श्रीमान् गृहस्थ त्याची उपासना करितो. पण अत्यंत कष्टाने द्रव्य मिळवून कामवासनेचा उपभोग घेत असता त्यांत सुख आहे काय? २६.

कामसुख कामिनीमेळीं । सुखार्थ स्त्रियेतें प्रतिपाळी ।
तेचि नानापरी सळी । देतां किंकळी सुटेना ॥ २७ ॥
कामसुख स्त्रीच्या संगतीमध्ये घेता येते, म्हणून त्या सुखाकरितांच तो स्त्रीचा  प्रतिपाळ करतो. पण तीच नानाप्रकारांनी त्याला छळू लागते, आणि मग मोठ्याने रडत बसलें तरी ती सुटत नाही २७.

स्त्रीपुत्रकामभोगादिक । तेणें देहासी द्यावें सुख ।
तो देहोचि मरणोन्मुख । नित्य अंतक लागला ॥ २८ ॥
स्त्री, पुत्र, कामभोग इत्यादिकांनी देहाला सुख द्यावें, तर तो देहच मुळी मृत्यूकडे चाललेला ! त्याच्या पाठीमागे काळ नेहमी लागलेलाच आहे २८.

जे जे अतिक्रमे घडी । ते ते काळ वयसा तोडी ।
येथ कोण भोगाची गोडी । धनकामें वेडीं सज्ञानें केलीं ॥ २९ ॥
जी जी घटिका जाते, त्या त्या घटिकेनें काळ आयुष्य कमी करीत असतो. अशा स्थितींत सुखाची गोडी ती काय? परंतु द्रव्येच्छेनें ज्ञाते लोकही वेडे बनविले २९.

सर्पमुखीं दर्दुर जातां । तो दर्दुर होय माशा खाता ।
तेणें न सुटे सर्पग्रासता । जाण तत्त्वतां जयापरी ॥ ४३० ॥
सर्पाच्या  तोडांत बेडूक जात असतांना तो बेडूक माशा खातच असतो, पण त्यामुळे त्याचे सर्पाच्या  तोंडांत जाणे खरोखर ज्याप्रमाणे नाहीसे होत नाही ४३०, 

तेवीं नानाभोगमेळें । देहींचा मृत्यु मागें न टळे ।
हें जाणॊनि आंधळे । धनकामें झाले सज्ञान ॥ ३१ ॥
त्याप्रमाणे नानाप्रकारचे भोग भोगण्याने देहाचा मृत्यु काही मागे हटत नाही. सर्व जाणूनही ज्ञाते लोक द्रव्येच्छेने आंधळे होतात ३१.

स्वयें कर्ता तोचि मरणधर्म । त्यासी कोण निववी भोगकाम ।
हा केवळ मायेचा भ्रम । भ्रमले परम महासिद्ध ॥ ३२ ॥
स्वतः जो कर्ता, त्याच्याच मागें मरणधर्म लागलेला. त्याला कोणत्या भोगाने समाधान होणार? हा केवळ मायेचा भ्रम होय. त्या भ्रमाने मोठमोठे सिद्धही भ्रमात पडले आहेत ३२.

धनें होईल परलोक । तोही भोगू दुःखदायक ।
भोगक्षयें कर्ममूर्ख । येती देख अधःपाता ॥ ३३ ॥
द्रव्याच्या योगाने यज्ञयाग करून स्वर्गलोक प्राप्त होईल, पण तो स्वर्गभोगही दुःखदायकच होय. कर्मानें अज्ञानी बनलेले लोक त्या भोगाचा क्षय झाला म्हणजे अधोगतीला येतात पहा! ३३.

करितां भोग्य काम्य कर्म । पुढती मरण पुढती जन्म ।
भोगणें पडे अविश्रम । हें दुःख परम धनकामा ॥ ३४ ॥
किंवा भोग भोगण्यासाठी सकाम कर्म केले. तर पुन्हा मरण व पुन्हा जन्म हेंच  अखंड भोगावे लागते. द्रव्यलोभ्याला हे फार मोठे दुःख आहे ३४.

धनकामासी निजसुख । सर्वात्मना नाहीं देख ।
मीही ऐसाचि होतों मूर्ख । निजभाग्यें देख धन गेलें ॥ ३५ ॥
द्रव्यलोभ्याला खरें सुख सर्वस्वी नाहींच पहा. मीसुद्धा असाच मूर्ख होतो. परंतु सुदैवाने माझे सारे द्रव्य गेले पहा! ३५.

नूनं में भगवांस्तुष्टः सर्वदेवमयो हरिः ।
येन नीतो दशामेतां निर्वेदश्चात्मनः प्लवः ॥ २८ ॥
[श्लोक  २८] सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले, यात काहीच शंका नाही म्हणून तर त्यांनी मला या दशेला आणून वैराग्य दिले वैराग्यच आत्म्याला संसारसागरातून पार करणारी नाव आहे. (२८)

मी पूर्वी होतों अतिअभाग्य । आतां झालों अतिसभाग्य ।
मज तुष्टला श्रीरंग । विवेकवैराग्य पावलों ॥ ३६ ॥
मी पूर्वी अत्यंत अभागी होतों, पण आता मोठा भाग्यवान् झालों. मला श्रीकृष्णच प्रसन्न झाला, मला विवेक आणि वैराग्य प्राप्त झाले ३६.

माझें संचित जें कां धन । तेंचि माझें मुख्य अज्ञान ।
तें हरीने आपण । कृपा पूर्ण मज केली ॥ ३७ ॥
माझे सांठविलेले जे द्रव्य तेच माझे मुख्य अज्ञान होते. ते श्रीहरीने स्वतः नष्ट करून माझ्यावर पूर्ण कृपा केली आहे ३७.

भक्तांचें अज्ञान हरी । याचिलागीं नांवें तो 'हरी' ।
तेणें कृपा करून पुरी । विवेक अंतरीं उपजविला ॥ ३८ ॥
भक्तांचे अज्ञान हरण करतो, म्हणूनच नांवानें तो 'हरि' आहे. त्यानेच पूर्ण कृपा करून माझ्या अंत:करणामध्ये विवेक उत्पन्न केला ३८.

वैराग्य विवेकविण आंधळे । विवेक वैराग्यवीण पांगळें ।
ते माझे हृदयीं जावळीं फळें । एक वेळे उपजविलीं ॥ ३९ ॥
वैराग्य है विवेकाशिवाय आंधळे असते; आणि विवेक वैराग्यावांचून पांगळा असतो. माझ्या हृदयांत ती दोन्ही एकाच वेळी उत्पन्न  केली ३९.

ऐशी हरीनें कृपा करूनी । माझें धनेंसीं अज्ञान हरूनी ।
विवेक वैराग्य यें दोनी । माझे हृदयभुवनीं प्रकाशिलीं ॥ ४४० ॥
श्रीहरीने अशी कृपा करून  द्रव्यासहवर्तमान माझे अज्ञान हरण केलें व विवेक आणि वैराग्य ही दोन्ही माझ्या हृदयमंदिरात प्रकाशित केली ४०.

परी कोणे काळें कोणे देशीं । कोण समयविशेषीं ।
हरी कृपा करितो कैशी । हें कोणासी कळेना ॥ ४१ ॥
 पण कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी, आणि कोणत्या प्रसंगी श्रीहरि कशी कृपा करतो हे कोणाला कळत नाही ४१

भक्तांचें हरावया चित्त । हरि हरितो त्यांचें वित्त ।
वित्तत्यागें करूनि सुचित्त । दे विवेकयुक्त वैराग्य ॥ ४२ ॥
 भक्तांचे चित्त हरण करण्याकरितां श्रीहरि आधी त्यांचे द्रव्य हरण करतो, आणि  द्रव्यनाशाने त्यांचे चित्त शुद्ध करून त्यांना विवेकयुक्त वैराग्य देतो ४२.

ऐसें घेतेंदेतें विंदान । ब्रह्मादिकां अतर्क्य जाण ।
यालागीं तो भगवंत पूर्ण । त्यासी साही गुण वशवर्ती ॥ ४३ ॥
अशा प्रकारचे घेण्यादेण्याचे लाघव ब्रह्मादिकांनाही अतर्क्य  होय  असे समज. म्हणून तो भगवंत-पूर्ण  भाग्यवान्-होय. त्याला सहा गुण वश झालेले असतात ४३.

त्याचें अचिंत्यानंतरूप । परी मजलागीं झाला सकृप ।
माझें धनेंसी निरसूनि पाप । ज्ञानदीप उजळला ॥ ४४ ॥
त्याचे अचिंत्य  आणि  अनंत असे स्वरूप आहे. परंतु माझ्यासाठी तो कृपाळु झाला व माझें पातक  द्रव्यासह नाहींसें करून ज्ञानदीप लावला ४४.

हो कां कृपा उपजली भगवंता । परी म्यां वंचिल्या यज्ञदेवता ।
त्या क्षोभल्या करिती घाता । हेंही सर्वथा घडेना ॥ ४५ ॥
भगवंताला कृपा उत्पन्न झाली हे खरे; पण मी यशदेवतांना फसविले आहे, त्या रागावल्या तर माझा घात करतील, असे म्हणावें, तर तसे कधी घडावयाचें नाहीं ४५.

करीं चक्र धगधगित । ज्याचा पाठिराखा हरि समर्थ ।
विघ्नाचा वारा न रिघे तेथ । देव वंदीत तयासी ॥ ४६ ॥
हातांत देदीप्यमान चक्र असलेला समर्थ श्रीहरि ज्याचा पाठिराखा होईल, त्याच्याजवळ विघ्नांचा  वारासुद्धा यावयाचा नाही. देव त्याला वंदन करतील ४६.

देवीं वंदूनि प्रल्हादासी । शांत करविलें नृसिंहासी ।
तो पाठिराखा नरहरी ज्यासी । विघ्न त्यापाशीं रिघे केवीं ॥ ४७ ॥
देवांनीच प्रल्हादाला वंदन करून नृसिंहाला शांत करविलें. तो नरहरीच ज्याला पाठिराखा झाला, त्याच्यापाशीं विघ्न कसें येईल? ४७.

जेणें देवांचिया कोडी । क्षणें सोडविल्या बांदवडी ।
त्याचे भक्तांची लोंव वांकडी । देवें बापुडीं केवीं करिती ॥ ४८ ॥
ज्याने कोटींच्या कोटि देवांचे समुदाय एका क्षणांत बंदिवासातून सोडविले, त्याच्या भक्ताचा केस तरी बिचाऱ्या त्या यज्ञादि देवता कसा वांकडा करणार? ४८.

जो सकळ देवांचा नियंता । ज्याचे चरण देव वंदिती माथां ।
तो भगवंत साह्य असतां । विघ्न सर्वथा बाधीना ॥ ४९ ॥
जो सर्व देवांचे नियम करणारा, ज्याचे पाय देवही शिरसा वंद्य करतात, तो भगवंतच साहाय्यक असल्यावर विघ्नं मुळींच  पीडा करणार नाही ४९.

ज्याचेनि बळें वाढले देव । देव जयाचे अवयव ।
तो हरि तुष्टला स्वयमेव । तेथ विघ्नसंभव कोणाचा ॥ ४५० ॥
ज्याच्या बळाने देव एवढे थोर झाले आहेत, देव हेच ज्याचे अवयव आहेत, तो श्रीहरि स्वत:च प्रसन्न झाला असता तेथे कोणत्या विघ्नांचा  संभव आहे ? ४५०.

सर्वदेवमय श्रीहरी । इंद्रचंद्ररूपें माझा हरी ।
ऐशिया मज दीनावरी । विघ्न संसारीं असेना ॥ ५१ ॥
श्रीहरि हा सर्वदेवस्वरूपच आहे. इंद्र व चंद्र यांची स्वरूपें म्हणजे माझा श्रीहरीच होय. अशा मज दीनावर संसारामध्ये विघ्न येणार नाही ५१.

ऐशिये कृपेचे कारण । ये जन्मीं नाहीं साधन ।
हें माझें पूर्वील जुनें ऋण । देवापाशीं जाण ठेविलें होतें ॥ ५२ ॥
भगवंताची अशी कृपा होण्याचे कारण पाहूं लागले तर ह्या जन्मांत माझ्याकडून कांहींच साधन घडलेले दिसत नाही. हे माझे पूर्वजन्मार्जित ऋण देवापाशी ठेवलेले होते असे समज ५२.

पूर्वीं कोण जन्मीं कोण देशीं । तीर्थक्षेत्रीं कोण वंशी ।
कोण आचरलों सत्कर्मासी । तेणें हृषीकेशी तुष्टला ॥ ५३ ॥
पूर्वी कोणत्या जन्मी, कोणत्या देशांत, कोणत्या तीर्थक्षेत्रांत, कोणत्या वंशामध्ये, कोणते सत्कर्म आचरण केले होते की, त्याच्या योगाने परमेश्वर मला प्रसन्न झाला! ५३.

मातें अतिदुःखी देखोन । हरि तुष्टला कृपापूर्ण ।
त्याचे कृपेस्तव जाण । विवेकसंपन्न मी झालों ॥ ५४ ॥
की मला अत्यंत दुःखी झालेला पाहून कृपासागर श्रीहरि संतुष्ट झाला आणि त्याने कृपा केली म्हणून मी विवेकसंपन्न  झालों! ५४.

हो कां धनक्षयें झालें दुःख । तेणें दुःखें पावलों निजसुख ।
भवाब्धि तरावया देख । वैराग्यविवेक दृढ तारूं ॥ ५५ ॥
अहो ! द्रव्य गेल्यामुळे मला दुःख झाले, आणि त्या दुःखाने मी  आत्मसुखाचा लाभ पावलों. हा संसारसमुद्र तरावयाला वैराग्ययुक्त विवेक हेंच बळकट तारूं आहे पहा ५५.

हरिखें वोसंडूनि ब्राह्मण । म्हणे उरले आयुष्येनि जाण ।
वृथा जावों नेदीं अर्ध क्षण । करीन निर्दळण सुखदुःखां ॥ ५६ ॥
याप्रमाणे तो ब्राह्मण हर्षभरित होऊन म्हणाला-आतां उरलेल्या आयुष्यात मात्र अर्धक्षणसुद्धा फुकट जाऊ देणार नाही. सुखदुःखांचे निर्दाळण करून टाकीन ५६.

सोऽहं कालावशेषेण शोषयिष्येऽङ्गमात्मनः ।
अप्रमत्तोऽखिलस्वार्थे यदि स्यात्सिद्ध आत्मनि ॥ २९ ॥
[श्लोक २९] जर माझे आयुष्य शिल्लक असेल, तर मी आत्मलाभातच संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावध होईन आणि उरलेल्या कालावधीत माझे शरीर तपश्चर्येने सुकवून टाकवीन किंवा ज्ञानाने लयाला नेईन. (२९)

काइसा भवभयाचा पाड । घेईन कोटि जन्मंचा सूड ।
नासल्या आयुष्याचा कैवाड । करीन निवाड येणें देहें ॥ ५७ ॥
संसाराच्या भयाची पर्वा कसली ? कोट्यवधि जन्मांचा सूड घेईन. जे आयुष्य फुकट गेलें त्याचा याच देहानें  वचपा काढीन ५७.

देहासी आली वार्धक्यता । परी वृद्धत्व नव्हे माझिया चित्ता ।
तेणें चित्तें चिंतूनि भगवंता । भवबंध आतां छेदीन ॥ ५८ ॥
देहाला म्हातारपण आले आहे, परंतु माझ्या चित्ताला काही म्हातारपण आलेलें नाही. याकरिता त्याच चित्ताने भगवंताचे चिंतन करून आता संसारबंध तोडून टाकीन ५८.

उरले आयुष्यें येथ । कळिकाळाचे पाडीन दांत ।
गर्भदुःखाचें खणोनि खत । मरणाचा घात मी करीन ॥ ५९ ॥
आतां उरलेल्या आयुष्यात कळिकाळाचे दांत पाडून टाकीन. गर्भवासदुःखाचे खत फाडून मी मरणाला ठार करीन ५९.

जेणें देहें सत्यानृत । कर्में आचरलों समस्त ।
तें देह मी शोषीन येथ । विदेहस्थ निजभावें ॥ ४६० ॥
ज्या देहाने खरी खोटी सर्व कर्मे आचरण केली, तो देहच मी आता येथे विदेहस्थितीतील आत्मभावनेने सुकवून टाकीन ४६०.

घालूनि निजबोधाची धाडी । फोडीन देहाची बांदवडी ।
तोडूनि सुखदुःखांची बेडी । उभवीन गुढी सायुज्याची ॥ ६१ ॥
 आत्मज्ञानाची धाड घालून देहाचे कुंपणच तोडून टाकीन, आणि सुखदुःखाची बेडी तोडून सायुज्याची गुढी उभारीन ६१.

आजी वैराग्यविवेकयुक्त । मी निजस्वार्थीं सावचित्त ।
जो जो साधीन परमार्थ । तो तो हस्तगत मज होय ॥ ६२ ॥
आज वैराग्य आणि विवेक यांनी युक्त असा मी आपल्या स्वार्थामध्ये सावधचित्त झालो आहे. मी आता जो जो परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीन, तो तो मला हस्तगत होईल ६२.

मजचि साधे निजस्वार्थ । हाचि नेम नाहीं येथ ।
जो जो वैराग्यविवेकयुक्त । त्यासी परमार्थ आंदणा ॥ ६३ ॥
मलाच माझा स्वार्थ साधेल हाच येथे काहीं विशेष नियम नाही. तर जो जो कोणी वैराग्यविवेकयुक्त होईल, त्याला परमार्थ आपोआप मिळणारा आहे ६३.

वैराग्यविवेकाचें लक्षण देहगेहस्त्रियदि धन ।
असतां आसक्त नव्हे मन । वैराग्य पूर्ण या नांव ॥ ६४ ॥
वैराग्यविवेकाचे लक्षण हें की, देह, घर, स्त्रिया इत्यादि वैभव असतांना त्यांत मन आसक्त होत नाही. त्याचेच नाव पूर्ण वैराग्य होय ६४.

म्यां जो आरंभ केला पहा हो । यासी देवोदेवीसमुदावो ।
येणेंसहित देवाधिदेवो । मज साह्य होवो हें प्रार्थित ॥ ६५ ॥
अहो! पहा. मी जो आरंभ केला आहे त्याला देव आणि देवी यांच्या सर्व समुदायासह देवाधिदेव मला सहाय होवो असें मो प्रार्थितों ६५.

तत्र मामनुमोदेरन् देवास्त्रिभुवनेश्वराः ।
मुहूर्तेन ब्रह्मलोकं खट्वाङ्गः समसाधयत् ॥ ३० ॥
[श्लोक  ३०] तिन्ही लोकांचे स्वामी देवगण माझ्या या संकल्पाला संमती देवोत राजा खट्‌वांगाने नाही का दोन घटकांमध्येच भगवद्धामाची प्राप्ती करून घेतली !". (३०)

इंद्रियाधिष्ठात्री देवता । मज साह्य होतू समस्ता ।
सिद्दि पावावया परमार्था । इंद्रियजयता मज द्यावी ॥ ६६ ॥
इंद्रियांच्या ठिकाणी अधिष्ठित असणाऱ्या सर्व देवता मला सहाय होवोत. त्यांनी परमार्थ सिद्धीला पोचण्याकरिता मला इंद्रियजय द्यावा  ६६.

जो त्रिभुवनेश्वर विख्यात । तो साह्य झालिया भगवंत ।
देवता साह्य होती समस्त । त्या अंतर्भूत हरिरूपीं ॥ ६७ ॥
जो त्रिभुवनेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे, तो भगवंत सहाय झाल्यावर सर्व देवता मला साध्य होतील, कारण त्या श्रीहरीच्याच स्वरूपात अंतर्भूत आहेत ६७.

देवतारूपें भावूनि हरी । सकळ देवांची सेवा करीं ।
साह्य होऊनि दीनोद्धारीं । मज भवसागरीं तारावें ॥ ६८ ॥
सर्व देवतांची स्वरूप ही श्रीहरीच होत अशी भावना करून मी सर्व देवांची सेवा करितो. त्यांनी मज दीनाचा उद्धार करण्यांत सहाय होऊन मला भवसागरांतून तारावें ६८.

म्हणाल वयसेचा शेवट । केवळ झालासी तूं जरठ ।
वार्धकीं हे खटपट । वृथा कष्ट कां करिशी ॥ ६९ ॥
यावर आपण कदाचित म्हणाल की, " तुझ्या वयाचा आतां शेवटचा काळ आला. तूं  केवळ जरठ झालास. आता म्हातारपणांत ही खटपट करून फुकटची दगदग कां करितोस?" ६९.

ऐसा न मानावा अर्थ । खट्वांगराजा विख्यात ।
मुहूर्तें साधिला परमार्थ । निजस्वार्थ फावला ॥ ४७० ॥
पण असा अर्थ मनांत आणूं नये.  खट्वाग  राजा प्रसिद्धच आहे. त्याने एका मुहूर्तमात्रांत परमार्थ साधिला अणि त्याला त्याचा स्वार्थ मिळाला ४७० . 

त्याहूनि माझें तंव येथ । आयुष्य असेल बहुत ।
देव साह्य होत समस्त । निमेषें परमार्थ साधीन ॥ ७१ ॥
त्याच्यापेक्षा येथे माझं आयुष्य तर अधिकच असेल. सर्व देव मला सहाय होवोत, म्हणजे मी एका निमिषांत परमार्थ साधीन ७१. 

आजी विवेकवैराग्य जैसें आहे । हें जैं निर्वाहलें राहे ।
तैं कळिकाळ बापुडें काये । म्यां जितिला होये संसार ॥ ७२ ॥
आज जसें विवेकवैराग्य प्राप्त झाले आहे, तसेंच हे जोपर्यंत टिकून राहील, तोपर्यंत बिचारा कळिकाळ काय करणार? मी संसार जिंकला असे होईल ७२.

हा पूर्वी कैसा होता येथ । आतां पालटलें याचें वृत्त ।
झाला विवेकवैराग्ययुक्त । आश्चर्यें सांगत श्रीकृष्ण ॥ ७३ ॥
हा पूर्वी कसा होता ? आतां ह्याची वृत्ति पालटली. तो विवेकवैराग्ययुक्त झाला. श्रीकृष्ण हें आश्चर्याने सांगतो ७३.

श्रीभगवानुवाच-
इत्यभिप्रेत्य मनसा ह्यावन्त्यो द्विजसत्तमः ।
उन्मुच्य हृदयग्रन्थीन् शान्तो भिक्षुरभून्मुनिः ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] भगवान श्रीकृष्ण म्हणतात - त्या अवंतिनिवासी श्रेष्ठ ब्राह्मणाने अशाप्रकारे मनोमन निश्चय करून मीमाझेपणाची गाठ तोडून टाकली यानंतर तो शांत होऊन, मौन धारण करून संन्यासी झाला. (३१)

ऐसा तो अवंतीचा ब्राह्मण । अतिकदर्यु होता जाण ।
त्याच्या हातींचें गेलिया धन । वैराग्यचिन्ह पालटले ॥ ७४ ॥
असा तो अवंतीचा ब्राह्मण अत्यंत कृपण होता. पण त्याच्या हातांतील द्रव्य जाताच त्याचा स्वभाव पालटला आणि त्याला वैराग्यलक्षण प्राप्त झाले ७४.

यालागीं वैराग्यविविवेक चित्तीं । झाल्या आंदणी ब्रह्मप्राप्ती ।
कृष्ण सांगे उद्धवाप्रती । निजात्मस्थिती साधावया ॥ ७५ ॥
म्हणून मनामध्ये वैराग्यविवेक उत्पन्न झाला असता ब्रह्मप्राप्ति आपोआप होते. आत्मस्वरूपाची स्थिति साध्य करण्याकरितां श्रीकृष्ण उद्धवाला सांगतो ७५.

पूर्वीं होता ब्राह्मणाधम । धनलोभी निंद्यकर्म ।
तोचि झाला द्विजोत्तम । विवेकें परम वैरागी ॥ ७६ ॥
तो पूर्वी अधम ब्राह्मण होता. तो द्रव्यलोभी असून निंद्यकम करणारा होता. पण तोच विवेकानें परमवैराग्यशाली असा उत्तम बाह्मण बनला ७६, 

पूर्वीं केलिया निश्चितार्था । मी साधीन सर्वथा ।
ऐशिया अतिउल्हासता । निजपरमार्था साधक ॥ ७७ ॥
मी पूर्वी केलेला निश्चय पूर्णपणे साधीन अशा अत्यंत उल्हासाने तो आपल्या परमार्थाचा साधक झाला ७७.

माझिया दुःखाचें कारण । माझा मीचि झालों जाण ।
धरितां काम लोभ धनाभिमान । दुःख दारुण मज माझें ॥ ७८ ॥
माझ्या दुःखाला माझा मीच कारण झालो. काम, लोभ आणि द्रव्याचा अभिमान धरल्यामुळे माझे मलाच अतिशय दुःख भोगावे लागले ७८.

मज दुःख देऊनि गेलें धन । धन तें दुःखाचें भाजन ।
स्त्रीपुत्रार्थ सलोभी आपण । तिंहीच जाण मज दवडिलें ॥ ७९ ॥
द्रव्य हेच मला दुःख देऊन गेलें,  ह्यावरून द्रव्य  हे च दुःखाचे घर आहे. बायकामुलांचा लोभ मी स्वतः धरिला होता, पण त्यांनीच मला घराबाहेर घातले पहा ! ७९.

धरावा ज्ञातीचा अभिमान । तंव स्वयातीं सांडिलों जाण ।
मजसी विमुख झाले स्वजन । त्यांचा लोभ कोण मज आतां ॥ ४८० ॥
जातीचा अभिमान धरावा, तर मी माझ्या जातभाईपासूनही दूर झालो. माझे भाऊबंदही मला विमुख झाले, तेव्हा त्यांचा तरी आता मला लोभ कसला? ४८०.

स्त्री पुत्र स्वजन धन । यांच्या लोभांचें मुख्य कारण ।
माझा मज देहाभिमान । त्यासी माझें नमन साष्टांग ॥ ८१ ॥
बायको, मुलें, आप्तेष्ट , द्रव्य, या सर्वांच्या लोभाचे मुख्य कारण माझा मलाच झालेला देहाभिमान होय. ह्या देहाभिमानालाच आतां साष्टांग नमस्कार असो ८१.

नमन स्त्रीपुत्रादि धनांसी । नमन स्वयातिस्वजनांसी ।
नमन देहाभिमानासी । संबंध तुम्हांआम्हांसी असेना ॥ ८२ ॥
बायको, मुलें आणि द्रव्य यांना.नमस्कार असो. जातीयबांधवांना व आप्तेष्टांना नमस्कार असो. देहाभिमानाला नमस्कार असो. आता तुम्हां आम्हांला काही संबंध उरला नाही ८२.

जेवीं कां जळा आणि चंद्रबिंबासी । एकत्र वास दिसे दोहींसी ।
परी चंद्र अलिप्त जळेंसीं । तेवीं संबंध तुम्हांसीं मज नाहीं ॥ ८३ ॥
पाणी आणि त्यांत पडलेले चंदाचे प्रतिबिंब या दोघांचे राहणे एकत्र असते असे दिसून येते, पण चंद्र पाण्यापासून अगदी निराळा असतो. त्याप्रमाणेच तुमच्याशी माझा आतां संबंध नाही ८३.

जेवीं कां अखंड अहर्निशीं । छाया जडलीसे रूपासी ।
तैं रूप न बैसे निजच्छायेसी । तेवीं संबंधू तुम्हांसीं मज नाहीं ॥ ८४ ॥
ज्याप्रमाणे नेहमी रात्रंदिवस छाया ही पदार्थाबरोबर खिळलेली असते, तरी तो पदार्थ काही आपल्या छायेपाशी बसून राहात नाही, त्याप्रमाणे तुमचा मला संबंध नाही ८४.

जेवीं तारुण्य ये देहापाशीं । तेणें तारुण्यें देहो मुसमुशी । शेखीं
तारुण्य सांडी देहासी । तेंवी म्यां तुम्हांसी सांडिलें ॥ ८५ ॥
किंवा ज्याप्रमाणे देहाजवळ तारुण्य येते, आणि त्या तारुण्याने देह मुसमुसू लागतो, पण शेवटीं तारुण्यदेहाला सोडून जाते. त्याप्रमागेच मी तुम्हांला सोडलें आहे ८५.

वनीं वसंताचें रिगवणें । वनश्री शोभा मिरवी तेणें ।
तो वस्तूं जेवीं सांडी वनें । तेवीं म्यां सांडणें अहंममता ॥ ८६ ॥
वनामध्ये वसंतऋतूचा प्रवेश झाला म्हणजे त्याच्या योगाने वनश्री शोभेचा दिमाख दाखवू लागते. पण तो वसंत आपला काल संपताच ज्याप्रमाणे वनाला सोडून जातो, त्याप्रमाणेच मी अहंममता सोडीत आहे ८६.

बाप सवैराग्य विवेक । त्याग करविला अलोलिक ।
देहाभिमाना तिळोदक । दीधलें देख ममतेसी ॥ ८७ ॥
वैराग्यासह विवेकाचे सामर्थ्य मोठे आश्चर्यकारक आहे. त्याने मजकडून केवढा अलौकिक त्याग करविला ! त्यामुळे देहाभिमानाला व ममतेला मी तिळोदकंच दिले ८७.

जेवीं भ्रष्टलिया पुत्रासी । पिता घडस्फोटें त्यागी त्यासी ।
तेंवी त्यागूनि देहाभिमानासी । स्वयें संन्यासी तो झाला ॥ ८८ ॥
ज्याप्रमाणे पिता भ्रष्ट झालेल्या पुत्राचा घटस्फोट करून त्याचा संबंध तोडून टाकतो, त्याप्रमाणेच देहाभिमानला सोडून तो स्वतः संन्यासी झाला ८८.

जेवीं कां ये फळ परिपाकातें । सांडी जन्मल्या निजदेहातें ।
देंठ न धरी त्या फळातें । फळ देंठातें धरीना ॥ ८९ ॥
ज्याप्रमाणे फळ पिकलें म्हणजे आपल्या जन्मकाळच्या देहाचा त्याग करते , देठही त्या फळाला धरीत नाही, व फळ देंठाला धरीत नाहीं ८९, 

तेवीं हा न धरी अहंतेसी । अहंता लाजिली न ये यापाशीं ।
हाही देहाभिमानासी । सद्भावेंसीं नातळे ॥ ४९० ॥
त्याप्रमाणे हा अहंतेला धरीत नाही व अहंता लाजून ह्याच्यापाशी येत नाही. हाही सद्भावनेनें देहाभिमानाला शिवत नाही ४९०.

जळीं जेवीं पद्मिनीपान । असोनि जळेंसी अलिप्त जाण ।
तेवीं नातळोनि देहाभिमान । संन्यासग्रहण विध्युक्त ॥ ९१ ॥
ज्याप्रमाणे पाण्यामध्ये कमलाचे पान असून ते त्या पाण्यापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे देहाभिमानाला स्पर्श न करिता त्याने विधियुक्त संन्यास घेतला ९१.

अन्य संन्यासी करोनि होम । जाळिला म्हणती क्रोधकाम ।
शेखीं तिळतूप होय भस्म । क्रोधकाम संचले ॥ ९२ ॥
इतर संन्यासी होम करून आम्ही क्रोध व काम जाळला असे म्हणतात, पण अखेरीस तीळ व तूप यांचे मात्र भस्म होते, आणि कामक्रोध जसेच्या तसेच राहातात ९२.

तैशी नव्हेच याची होमस्थिती । जाळिल्या विकल्पाच्या वृत्ती ।
कामक्रोधांची पूर्णाहुती । केली अहंकृतीसमवेत ॥ ९३ ॥
तसा काही याच्या होमाचा प्रकार नव्हता. त्याने विकल्पाच्या वृत्ति जाळून टाकल्या होत्या, आणि अहंकारासह कामक्रोधांची पूर्णाहुति केली होती ९३.

होमूनि निजस्वभावासी । झाला त्रिदंडी संन्यासी ।
आज्ञा घेऊनि गुरूपाशीं । सुखें सुखवासी विचरत ॥ ९४ ॥
आपल्या मूळ स्वभावाचा होम करून तो त्रिदंडी संन्यासी झाला आणि गुरूपाशी आज्ञा मागून सुखाने आनंदात फिरूं लागला ९४.

स चचार महीमेतां संयतात्मेन्द्रियानिलः ।
भिक्षार्थं नगर ग्रामनसङ्गोऽलक्षितोऽविशत् ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] आपले मन, इंद्रिये आणि प्राण वश करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वागू लागला भिक्षेसाठी तो शहरांत किंवा खेड्यांत कोणालाही कळणार नाही अशा रीतीने जात असे. (३२)

जिणॊनियां मनपवन । सांडोनिया मानाभिमान ।
परमानंदें परिपूर्ण । पृथ्वीमाजीं जाण विचरत ॥ ९५ ॥
मन व प्राण यांना जिंकून मानाभिमान सोडून परमानंदाने परिपूर्ण होऊन तो पृथ्वीवर संचार करूं लागला ९५.

ज्यासी नावडे देहसंगती । त्यासी कैंचा संगू सांगती ।
एकला विचरे क्षिती । आत्मस्थिती निजबोधें ॥ ९६ ॥
देहाची संगति ज्याला आवडत नाही, त्याला बरोबर दुसरा सोबतीला घेणे कसे रुचणार ? तो आत्मज्ञानाने आत्मस्वरूपामध्ये निमग्न होऊन पृथ्वीवर एकटाच फिरत होता ९६.

अखंड वसे वनांतरीं । भिक्षेलागीं निघे नगरीं ।
खेट खर्वट ग्रामीं पुरीं । भिक्षा करी यथाप्राप्त ॥ ९७ ॥
निरंतर अरण्यामध्येच रहात असे. भिक्षेसाठी मात्र गांवांत येई आणि जेथे बाजार भरत असेल अशा शहरांत किंवा गांवांत मिळेल ती भिक्षा आणीत असे ९७.

मी एक भिक्षेसी येता । हा नेम न करी सर्वथा ।
अलक्ष्य येवोनि अवचितां जें आलें हाता तेणें सुखी ॥ ९८ ॥
मी एक भिक्षेला येणारा आहे असा नेम तो मुळीच करीत नसे. कोणाच्या दृष्टीस न पडतां अकस्मात यावयाचे आणि जें हातावर पडेल  तेवढ्यात संतोष मानावयाचा ९८.

पंचागार सप्तागार । हाही नेम नाहीं निर्धार ।
कोणोविखींचा अहंकार । अणुमात्र धरीना ॥ ९९ ॥
पांचच घरें भिक्षा मागावयाची, किंवा सातच घरें भिक्षा मागावयाची, असाही कधी निश्चित नेम त्याने धरिलेला नाही. कोणत्याही गोष्टीविषयींचा अहंकार त्याला लेशमात्रही नव्हता ९९.

तं वै प्रवयसं भिक्षुमवधूतमसज्जनाः ।
दृष्ट्वा पर्यभवन् भद्र बह्वीभिः परिभूतिभिः ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] उद्धवा ! तो अवधूत भिक्षू आता अतिशय म्हातारा झाला होता त्याला पाहाताच दुष्ट लोक निरनिराळ्या प्रकारे त्याला पीडा देत. (३३)

न करी देहमळक्षाळण । मुसलवत् करी स्न्नान ।
यालागीं तो धूसरवर्ण । अवधूतपण या हेतू ॥ ५०० ॥
अंगावरचा मळही कधीं धुवीत नसे. मुसळासारखें स्नान करीत असे. म्हणून त्याच्या अंगाचा वर्णही राखेसारखा झाला होता, त्यामुळे त्याला 'अवधूत' असे म्हणत असत ५००.

ऐसा विचरतां पृथ्वीसी अवचटें आला अवंतीसी ।
अतिवृद्ध आणि संन्यासी । अवधूतवेषी देखिला ॥ १ ॥
 याप्रमाणे पृथ्वीवर संचार करता करता अकस्मात तो अवंती नगरांत आला. तेव्हां अत्यंत वृद्ध असून संन्यासी झालेला असा अवधूतवेषाने त्याला येतांना लोकांनी पाहिला १.

संन्यास घेतलिया जाण । पूर्वभूमिका अवलोकन ।
एक वेळां करावी आपण । पद्धतिलेखन आचार्याचें ॥ २ ॥
संन्यास घेतल्यावर एकवार जन्मभूमीचं दर्शन घ्यावे अशी पद्धति मोठमोठ्या आचार्यांनी लिहून ठेवली आहे २.

ते नगरींचे म्हणती जन । अरे हा कदर्यु ब्राह्मण ।
याचें हारपल्या धन । संन्यासी जाण हा झाला ॥ ३ ॥
तो दृष्टीस  पडतांच त्या गांवांतील लोक म्हणू लागले की, " अरे ! हा तर कदर्यु  ब्राह्मण ! त्याच्याजवळचे धन गेलें म्हणून हा संन्यासी झाला आहे " ३.

हें ऐकोनियां अतिदुर्जन । त्यासभोंवते मीनले जाण ।
परस्परें दावूनि खूण । विरुद्ध छळण मांडिलें ॥ ४ ॥
हे ऐकून अत्यंत दुष्ट  मनुष्य त्याच्याभोंवतीं गोळा झाले, आणि त्यांनी एकमेकांना खुणा करून त्याच्या छळाला प्रारंभ केला ४.

त्यासी बहुसाल उपद्रवितां । क्षणार्ध पालट नव्हे चित्ता ।
क्रोध न येचि सर्वथा । अतिविवेकता महाधीरू ॥ ५ ॥
पण त्यांनी त्याला हवा तितका त्रास दिला असताही अर्धा क्षणभर देखील त्याच्या चित्ताला पालट म्हणून झाला नाही. तो मुळींच रागावला नाही. असा तो अत्यंत विवेकी व मोठा धैर्यवान् झाला होता ५.

त्याच्या उपद्रवाची कथा । आणि त्याचि सहनशीलता ।
तुज मी सांगेन तत्त्वतां । सावधानता अवधारीं ॥ ६ ॥
त्याला लोकांनी दिलेल्या त्रासाचे वर्णन व त्याची सहनशीलता ही सर्व तुला मी आता  सांगेन. लक्ष देऊन ऐक ६.

दृष्टि ठेवूनि येथींच्या अर्था । विवेकें कुशळ होय श्रोता ।
अर्थ धरी भावार्थता । शांति तत्त्वतां तो लाभे ॥ ७ ॥
ह्यांतील तात्पर्यावर लक्ष दिलं असता श्रोता विवेकानें  चतुर होईल; आणि अर्थावर जो भक्ति ठेवील, त्याला खरी खरी शांति प्राप्त होईल ७.

विवेकचित्तचकोरचंद्रा । भागवतभाग्यें शुद्धमुद्रा ।
शांतिसौभाग्यनरेंद्रा । ऐक सुभद्रा उद्धवा ॥ ८ ॥
हे विवेकयुक्त चित्तचकोराच्या चंद्रा ! भगवद्भक्ताच्या भाग्याने शुद्धस्वरूपा ! हे शांतिसौभाग्याच्या राजा ! हे भाग्यवंता उद्ध्वा ! ऐक ८.

आकळावया निजशांतीसी । कृष्ण संबोधी उद्धवासी ।
ऐसें सावध करोनि त्यासी । म्हणे दशा ते ऐसी शांतीची ॥ ९ ॥
आत्मशांति प्राप्त करून घेण्यासाठी कृष्ण उद्धवाला हाका मारू लागला, आणि त्याला असें सावध करून म्हणाला, शांतीचे स्वरूप तें असें आहे ९.

अवरोधितां जीविकेसी । सन्मान देतां अपमानेंसीं ।
जो सर्वथा न ये क्षोभासी । शांति त्यापाशीं तें ऐक ॥ ५१० ॥
जीवनक्रमांत व्यत्यय आणला, सन्मानाच्या निमित्ताने अपमान केला, तरी जो मुळीच रागावत नाही, त्याच्याचपाशी शांति असते. ते आतां ऐक ५१०.

केचित्त्रिवेणुं जगृहुरेके पात्रं कमण्डलुम् ।
पीठं चैकेऽक्षसूत्रं च कन्थां चीरणि केचन ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] कोणी त्याचा त्रिदंड हिसकावून घेई, कोणी भिक्षापात्र, कोणी कमंडलू, कोणी आसन, कोणी रूद्राक्षमाळ, कोणी झोळी कोणी लंगोटी तर कोणी छाटी काढून घेत. (३४)

दुर्जनीं वेढूनि संन्यासी । छळणार्थ लागती पायांसी ।
तेणें नमनप्रसंगेंसीं । करिती स्पर्शासी अवघेही ॥ ११ ॥
त्या दुष्टांनी त्या संन्याशाभोवती गराडा घातला आणि छळण्याकरितां त्याच्या पायांवर मस्तक ठेवू लागले. यांतील हेतु एवढाच की, पायांवर मस्तक ठेवून  नमस्कार करावयाच्या निमित्ताने सर्वहीजण त्याला शिवाशिव करतील " ११. 

एक म्हणती वृद्ध संन्यासी । एक म्हणती किती चातुर्मासी ।
एक पुसती संप्रदायासी । कोणे गुरूनें तुम्हांसी मुंडिलें ॥ १२ ॥
कोणी म्हणाले, “हा म्हातारा संन्यासी आहे." कोणी म्हणाले, " किती पावसाळे लोटले ?" कोणी म्हणाले, "अहो ! तुमचा सांप्रदाय कोणता? कोणत्या गुरूने तुमचे मुंडण केले?" १२.

एक खुणाविती एकांसी । पूर्वभूमी पुसा यासी ।
एक म्हणती यापाशीं । धनसंग्रहासी पुसा रे ॥ १३ ॥
कोणी कोणाला खुणावू लागले की, "त्याचे मूळ गांव कोणतें तें विचारा." कोणी म्हणाले, "अरे ! याच्यापाशी धनसंग्रह किती आहे तें विचारा" १३.

एक म्हणती अहो स्वामी । तुमची कवण पूर्वभूमी ।
तुम्ही व्यापारी कीं उदिमी । कोणे ग्रामीं निवासू ॥ १४ ॥
कोणी म्हणाले, "अहो स्वामी! तुमचे मूळ गांव कोणते ? तुम्ही व्यापारी की उदमी? कोणत्या गांवीं तुम्ही राहतां ?" १४.

एक म्हणती कांहीं आहे धन । एक म्हणती आतां निर्धन ।
एक म्हणती न करा छळण । विरक्त पूर्ण संन्यासी ॥ १५ ॥
कोणी म्हणाले, “ह्याच्याजवळ थोडासा पैसा आहे." कोणी म्हणाले, "छे ! आता हा द्रव्यहीन झाला आहे." कोणी म्हणाले, अरे, “ त्यांना त्रास देऊ नका. तो पूर्ण विरक्त संन्यासी आहे” १५.

ऐसें करितां छळण । संन्यासी अनुद्वेग जाण ।
निःशब्दवादें धरिलें मौन । कांहीं वचन न बोले ॥ १६ ॥
असे नानाप्रकारांनी कुचेष्टेने छळीत असताही त्या संन्याशाला मुळीच त्रास वाटला नाही. तोंडावाटे एक शब्दही न काढतां त्याने मौन धरिलें. काहीं भाषण बोलेचना १६.

एक म्हणती त्रिदंडा कारण । हा पूर्वीं होता अतिसधन ।
कोरूनि भरिलें असेल धन । हेंचि लक्षण त्रिदंडा ॥ १७ ॥
कोणी म्हणाले, " हा त्रिदंडी संन्यासी दिसतो. त्या त्रिदंडाचे कारण असे की, हा पूर्वी मोठा धनसंपन्न होता, त्याने ते सारें द्रव्य हे दंड पोखरून त्यांत भरले असेल. हेच त्रिदंडाचे कारण" १७.

एक म्हणती सहस्रदोरीं । कंथा केली असे अतिथोरी ।
एक म्हणती त्यामाझारीं । धन शिरोवेरीं खिळिलेंसे ॥ १८ ॥
कोणी म्हणाले, " हजारों दोरे घालून ह्याने ही पहा केवढी मोठी गोधडी केली आहे !" कोणी म्हणाले, "अहो ! त्यांत तोंडोतोंड धन भरून ठेविलें आहे" १८.

एक म्हणती काय पाहतां तोंड । येणें मांडिलेंसे पाखंड ।
ऐसा निर्भर्त्सिता वितंड । एकें त्रिदंड हरितला ॥ १९ ॥
कोणी म्हणाले, "अहो ! ह्याचे तोंड काय पाहतां ? ह्याने सारे पाखंड मांडलेले आहे." अशा रीतीने त्याची अद्वातद्वा निंदा चालली असतांना एकाने त्याचा त्रिदंडच हिसकावून घेतला १९.

एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र ।
एकें नेलें अक्षसूत्र । काषायवस्त्र तें एकें ॥ ५२० ॥
एकानें कमंडलू पळविला, एकानें पवित्र आसन पळविलें, एकानें द्राक्षांची माळ पळविली, आणि एकाने काषायवस्त्रच पळविले ५२०.

एक म्हणे हा माझा ऋणायित । भला सांपडला येथ ।
म्हणोनि कंथेसी घाली हात । कौपीनयुक्त तेणें नेली ॥ २१ ॥
एकजण म्हणाला, " हा माझा ऋणको आहे. येथे मला सांपडला " असे म्हणून त्याने गोधडीला हात घातला. आणि त्याने लंगोटीसह ती गोधडी नेली २१.

ऐसें करितांही दुर्जन । त्याचें गजबजीना मन ।
कांहीं न बोले वचन । क्षमेनें पूर्ण निजधैर्य ॥ २२ ॥
ते दुर्जन अशा रीतीने छळ करीत असतांही त्याचे मन डळमळले नाही. तो एकही शब्द बोलला नाही. त्याचे धैर्य क्षमेनें परिपूर्ण भरलेलें होते २२.

तो म्हणे जाणेंयेणें हीं दोनी । केवळ अदृष्टाअधीनी ।
यालागीं मागण्याची ग्लानी । न करूनि मुनी निघाला ॥ २३ ॥
तो मनांत म्हणाला, " जाणे आणि येणे ही दोन्ही केवळ प्रारब्धाधीन आहेत." यास्तव मागण्यासाठी गयावयां न करता तो संन्यासी तेथून पुढे निघाला २३.

संन्यासी जातां देखोनी । सभ्य सभ्य शठ येऊनी ।
साष्टांग नमस्कार करूनी । अतिविनीतपणीं विनवित ॥ २४ ॥
संन्यासी निघून जातांना पाहून लबाडांमधले जे मुख्य मुख्य पुढारी होते, ते त्याला साष्टांग नमस्कार घालून अत्यंत नम्रपणाने विनंती करूं लागले २४.

मग म्हणती हरहर । अपराध घडला थोर ।
मातले हे रांडपोर । पात्रापात्र न म्हणती ॥ २५ ॥
ते म्हणाले, "हर हर! आमच्या हातून मोठा अपराध घडला. हे रांडलेक माजले आहेत. योग्य कोण आणि अयोग्य कोण ह्याचा विचारच करीत नाहीत २५.

स्वामी कोप न धरावा मनीं । वस्त्रें घ्यावीं कृपा करूनी ।
परतविला पायां लागूनी । पूर्ण छळणीं छळावया ॥ २६ ॥
स्वामीमहाराज ! आपण मनामध्ये राग येऊ देऊ नये. कृपा करून आपली वस्त्रें  घ्यावी." ह्याप्रमाणे पायां पडून त्याला कुचेष्टांनी पुरता छळण्याकरितां पुन्हा परत आणिलें २६.

प्रदाय च पुनस्तानि दर्शितान्याददुर्मुनेः ।
अन्नं च भैक्ष्यसंपन्नं भुञ्जानस्य सरित्तटे ॥ ३५ ॥
मूत्रयन्ति च पापिष्ठाः ष्ठीवन्त्यस्य च मूर्धनि ।
यतवाचं वाचयन्ति ताडयन्ति न वक्ति चेत् ॥ ३६ ॥
[श्लोक ३५-३६] काहीजण त्याला वस्तू देऊन तर काहीजण फक्त दाखवून पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेत तो जेव्हा मधुकरी मागून आणून गावाबाहेर नदीकिनारी जेवावयास बसत असे, तेव्हा काही नीच लोक कधी त्याच्या डोक्यावर मूत्रविसर्जन करीत तर कधी थुंकत ते लोक अशा तर्‍हेने त्या मौनी अवधूताला बोलण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे भाग पाडीत आणि एवढे करूनही जेव्हा तो काहीच बोलत नसे, तेव्हा त्याला मारहाणही करीत. (३५-३६)

संन्यासी आणूनि साधुवृत्ती । दंडकमंडलू पुढें ठेविती ।
एक वस्त्रें आणोनि देती । एक ते नेती हिरोनी ॥ २७ ॥
 ह्याप्रमाणे तो संन्यासी परत आणून सभ्यपणाने त्याच्यापुढे दंडकमंडलु आणून ठेवला. कोणी वने आणून देऊ लागले, आणि लगेच काहीजण ती हिसकावून परत नेऊं लागले २७.

एक ते म्हणती वृद्ध संन्यासी । याचीं वस्त्रें द्यावी यासी ।
एक म्हणती या शठासी । दंडितां आम्हांसी अतिपुण्य ॥ २८ ॥
कोणी म्हणाले, “हा संन्यासी म्हातारा आहे. त्याची वस्त्रे त्याला द्या." कोणी म्हणाले, "ह्या लबाडाला मार दिला असतांच आम्हांला मोठे पुण्य लागणार आहे " २८.

वस्त्रें न देती उपहासीं । संन्यासी निघे सावकाशीं ।
एक परतवूनि त्यासी । देऊनी वस्त्रांसी जा म्हणती ॥ २९ ॥
अखेर त्याचा तिरस्कार करून कोणीही वस्त्रे दिली नाहीत. तेव्हां तो संन्यासी स्वस्थ अंत:करणाने तेथून निघाला. तोंच कोणी त्याला पुन्हा परत आणून वस्त्रे दिली व जा म्हणाले २९.

एक धांवूनि हाणे माथां । वस्त्रें हिरोनि जाय परता ।
एक म्हणती द्या रे आतां । वृद्ध कां वृथा शिणवाल ॥ ५३० ॥
इतक्यात एकाने धावत येऊन त्या संन्याशाच्या डोक्यावर एक तडाखा मारला आणि त्याची वस्त्रे हिसकावून घेऊन परत गेला. कोणी म्हणाले, " द्या रे आता. म्हाताऱ्याला उगीच कशाला दमवितां ?" ५३०.

यावरी संन्यासी आपण । गेला वस्त्रें वोसंडून ।
करोनिया संध्यास्न्नान । भिक्षार्थ जाण निघाला ॥ ३१ ॥
नंतर तो संन्यासी आपण स्वत:च ती वस्त्रे टाकून गेला, आणि स्नानसंध्या करून भिक्षेकरितां निघाला ३१.

भिक्षा मागोनि संपूर्ण । शास्त्रविभागें विभागून ।
सरितातटीं करितां भोजन । तें देखोनि दुर्जन तेचि आले ॥ ३२ ॥
संपूर्ण भिक्षा मागून झाल्यानंतर शास्त्रोक्त विभागविधीप्रमाणे त्याचे विभाग करून नदीच्या काठावर तो भोजन करीत असता ते पाहून तेच टवाळ लोक तेथे जमले ३२, 

अरे हा संन्यासी नव्हे साचा । कदर्यु आमुचे गांवींचा ।
होय नव्हे न बोले वाचा । हा ठकपणाचा उपावो ॥ ३३ ॥
आणि म्हणाले, " अरे ! हा खरा संन्यासी नव्हे. आमच्या गावांतील जो कदर्यु  ब्राह्मण तो हा. 'होय' 'नव्हे' असें तोंडाने बोलत नाही," हा फसवेगिरीचा मार्ग आहे" ३३.

यासी बोलविल्यविण राहे । तो याचाचि दासीपुत्र होये ।
ऐशी शपथ करूनि पाहें । आले समुदायें तयापाशीं ॥ ३४ ॥
तेव्हां " ह्याला बोलाविल्यावांचून जो राहील तो ह्याच्याच बटकीचा पुत्र होईल," अशी शपथ घेऊन सर्वजण एकत्र जमून त्याच्यापाशी आले ३४.

एक म्हणे याचें मौन । उडवीन मी न लागतां क्षण ।
हा जेणें करी शंखस्फुरण । तो उपावो जाण मी जाणें ॥ ३५ ॥
एक म्हणाला, “ह्याचे मौन मी एक क्षणभर सुद्धा वेळ न लागतां उडवून टाकीन. ज्या उपायाने हा शंख करूं लागेल तो उपाय मी जाणतों" ३५.

तो महापापी अतिदुर्मती । जेवितां त्याचे मस्तकीं मुती ।
तरी क्रोध न ये त्याचे चित्तीं । निजात्मस्थितीं निवाला ॥ ३६ ॥
असें म्हणून तो महापातकी व अत्यंत दुष्ट बुद्धीचा मनुष्य तो संन्यासी जेवीत असतां त्याच्या मस्तकावर मुतला. तरी त्या संन्याशाच्या मनात राग आला नाही. तो आत्मज्ञानाने शांत राहिला ३६.

जरी अंतरीं क्रोध आला । तरी तो अशांतचि झाला ।
बाहेरी न बोलेचि बोला । लोकलाजे भ्याला पोटास्थे ॥ ३७ ॥
क्रोध जरी मनामध्ये आला, तरी तो मनुष्य शांतिरहित झालाच. तो बाहेर क्रोधाचे शब्द बोलत नाही याचे कारण तो लोकलज्जेकरिता किंवा पोटाकरितां भ्याला इतकंच ३७.

तैसा नव्हे हा संन्यासी । धूओनि सांडिलें निजलाजेसी ।
निजशांतीची दशा कैशी । क्रोध मानसीं वोळेना ॥ ३८ ॥
पण हा संन्यासी तसा नव्हता. आपली लज्जा त्याने धुवून नाहींशी केली होती. आत्मशांतीचे स्वरूप कसें असतें ? क्रोध मनांतसुद्धा येत नाही ३८.

आंत एक बाह्य एक । या नांव मुख्य दांभिक ।
तैसा संन्यासी नव्हे देख । सबाह्य चोख निजशांति ॥ ३९ ॥
आत एक आणि बाहेर एक, याचंच नांव खरोखर दांभिक. पण तसा काही हा संन्यासी नव्हे. हा आत्मशांतीनं अंतर्वास अगदी निर्मळ होता ३९.

तंव ते दुर्जन म्हणती । अरे हा न बोले निश्चितीं ।
संमुख मुखावरी थुंकिती । अतिनिंदिती नोकूनी ॥ ५४० ॥
तेव्हा ते टवाळ लोक म्हणू लागले की, "अरे ! हा खरोखरच बोलत नाही." असे म्हणून ते त्याच्यासमोर उभे राहून त्याच्या तोंडावर थुकले आणि अत्यंत दुःख देऊन खूप निंदा करूं लागले ५४०.

एक हाणीती लाता । एक टोले देती माथां ।
एक म्हणती न बोलतां । यासी सर्वथा न सोडा ॥ ४१ ॥
कोणी लाथा मारू लागले, कोणी मस्तकावर टोले हाणूं लागले, आणि कोणी असें म्हणू लागले की, "हा बोलला नाही तर याला मुळीच सोडूं नका!" ४१.

तर्जयन्त्यपरे वाग्भिः स्तेनोऽयमिति वादिनः ।
बध्नन्ति रज्ज्वा तं केचिद्‌बध्यतां बध्यतामिति ॥ ३७ ॥
[श्लोक ३७] काहीजण त्याला 'चोर' म्हणून धाकदपटशा दाखवीत काही जण त्याला 'बांधा, बांधून टाका,' म्हणत दोरीने बांधीत. (३७)

आणिक एक दुरूनि जाण । वर्मीं विंधिती वाग्बाण ।
याच्या वेषाचें लक्षण । आम्हीं संपूर्ण जाणीतलें ॥ ४२ ॥
आणखी कोणी लांबून आपले वाग्बाण त्याच्या वर्मावरच टोचतील असे मारू लागले. ते म्हणाले, "याच्या या वेषाचे कारण आम्ही पूर्णपणे ओळखलें आहे ४२.

याचे वेषाचा विचारू । शठ नष्ट दांभिक थोरू ।
भिक्षामिसें हिंडे हेरू । धरा चोरू निश्चितीं ॥ ४३ ॥
याच्या सोंगांतलें वर्म हेच की, हा मोठा ठक, नष्ट, आणि मोठा ढोंगी आहे, भिक्षेच्या निमित्ताने हा हेर हिंडत आहे. खरोखर हा चोर पकडा" ४३.

ऐसे विकल्पवाक्यें गर्जती । एक बांधा बांधा म्हणती ।
एक दृढदोरीं बांधिती । दोहीं हातीं अधोमुख ॥ ४४ ॥
अशा निंदास्पद भाषणाने ते सर्वजण मोठमोठ्यांनी ओरडू लागले. कोणी 'बांधा बांधा' म्हणाले. तोच कित्येकजण त्याचे तोंड खाली करून त्याचे दोन्ही हात जाड दोरांनी बांधू लागले ४४.

क्षिपन्त्येकेऽवजानन्त एष धर्मध्वजः शठः ।
क्षीणवित्त इमां वृत्तिमग्रहीत्स्वजनोज्झितः ॥ ३८ ॥
[श्लोक ३८] काहीजण त्याची निर्भर्त्सना करीत म्हणत, "याची संपत्ती निघून गेली म्हणून नातलगांनी याला घराबाहेर काढले तेव्हा या लबाडाने धर्माचे सोंग घेऊन हा धंदा सुरू केला; (३८)

त्याचें पूर्ववृत्त जे जाणती । ते अपमानूनि निंदिती ।
पूर्वीं कदर्यू याची ख्याती । हा आम्हांप्रती संन्यास मिरवी ॥ ४५ ॥
 -त्याची पूर्वीची हकीकत जे जाणत होते, ते त्याचा अपमान करून त्याची निंदा करूं लागले. ते मणाले, " पूर्वी कदर्यु या नांवाने हा प्रसिद्ध होता. आणि आता हा आमच्यापुढे आपला संन्यास मिरवीत आहे ४५.

येणें सूक्तासूक्तीं संचिलें धन । अधर्में वित्त झालें क्षीण ।
स्वजनीं सांडिला दवडून । पोटासी अन्न मिळेना ॥ ४६ ॥
 ह्यानें शुभाशुभ कर्मानी द्रव्य सांठविले, आणि अधर्मानं तें द्रव्य नाहींसें झालें. म्हणून आप्त माणसांनी ह्याला  घरांतून बाहेर हाकून लावले, तेव्हां ह्याच्या पोटाला अन्नसुद्धा मिळेनासे झाले ४६.

अन्न मिळावया पोटासी । झाला कपटवेष संन्यासी ।
लाज नाहीं या निर्लज्जासी । योग्यता आम्हांसी दावितां ॥ ४७ ॥
पोटाला अन्न मिळविण्यासाठी हा कपटी सोंग घेऊन संन्यासी झाला आहे. आमच्यापुढे असली प्रतिष्ठा मिरवितांना या निर्लज्जाला लाजही वाटत नाही ४७.

पूर्वींलागूनि हा वंचकू । आतां झाला संन्यासी दांभिकू ।
याचें मत नेणे हा भोळा लोकू । महाठकू दृढमौनी ॥ ४८ ॥
पूर्वीपासून हा फसव्या, आणि आतां ढोंगी संन्यासी झाला आहे. त्याचे असें मत झालेले दिसते की, भोळे लोक, यांना काही माहीत नाही, असा हा महाठक पूर्ण मौन धारण केलेला आहे ४८.

हो कां बहुरुप्याचीं सोंगें जैसीं । तेवीं हा उत्तमवेषें संन्यासी ।
होऊनि ठकूं आला आम्हांसी । मारितां यासी दोष नाहीं ॥ ४९ ॥
अहो ! बहुरूप्याची जशी सोंगें असतात, त्याप्रमाणेच हा उत्तम वेषाने संन्यासी होउन आम्हाला फसवावयास आला आहे. ह्याला मारले असतां दोष लागावयाचा नाही ४९.

अहो एष महासारो धृतिमान् गिरिराडिव ।
मौनेन साधयत्यर्थं बकवद्दृढनिश्चयः ॥ ३९ ॥
[श्लोक  ३९] हा मोठा तगडा असून धैर्याच्या बाबतीत एखाद्या पर्वतासारखा आहे असे असून मौन धारण करून हा बकसंन्यासी आपले काम साधून घेत आहे. (३९)

हा दांभिकांमाजीं महाबळी । धरिल्या वेषातें प्रतिपाळी ।
आम्हीं पीडितां न डंडळी । जेवीं कां वाहटोळीं महामेरू ॥ ५५० ॥
हा ढोंग्यांमध्ये मोठा प्रबळ आहे. घेतलेल्या सोंगाला छान सांभाळतो. आम्ही त्रास दिला असता जसा वावटळीने महामेरु हादरत नाही, त्याप्रमाणे तो डगमगत नाही ५५०.

याच्या धैर्याचें शहाणपण । साधवया अन्नआच्छादन ।
बकाच्या ऐसें धरिलें मौन । स्वार्थ पूर्ण लक्षूनी ॥ ५१ ॥
अन्न व वस्त्र मिळविण्याकरितांच ह्याच्या धैर्याचे हे शहाणपण आहे. स्वार्थावर पूर्ण लक्ष ठेवून ह्याने बकाप्रमाणे मौन धरले आहे ५१.

बक गिळावया मासा । मौन धरोनि राहे जैसा ।
हाही जाणावा तैसा । भोळ्या माणसां नाडील ॥ ५२ ॥
बगळा मासा गिळण्यासाठी जसा मौन धरून राहातो, त्याप्रमाणे हाही समजावा. हा भोळ्या माणसांना लुटील ५२.

आतां हा धनलोभार्थ जाणा पूर्वील उपद्रव नाणी मना ।
तेचि झालीसे दृढ धारणा । उपद्रवगणना या नाहीं ॥ ५३ ॥
आता हा द्रव्यलोभाकरिता पूर्वीचा त्रास मनाला आणीत नाही. तीच ह्याला दृढ संवय झाली आहे, म्हणून याला उपद्रवाची खिसगणती नाही" ५३.

एक म्हणती धैर्यमूर्ती । म्हणोनियां लाता हाणिती ।
एक ते नाकीं काड्या खुपसिती । याची निजशांती पाहों पां ॥ ५४ ॥
कोणी म्हणाले, “ केवढी धैर्याची मूर्ति !” असें म्हणून त्याला लाथा मारू लागले. कोणी त्याच्या कानांत काट्याच खुपसू लागले, आणि आता “ ह्याची शांति पाहूं या" असे म्हणाले ५४.

ऐसऐसे उपद्रवती । नानापरी उपहासिती ।
तरी द्वेष नुपजे चित्तीं । निजशांती निश्चळू ॥ ५५ ॥
असा अनेक प्रकारे त्याला ते त्रास देऊ लागले. नानाप्रकारची कुचेष्टा करूं लागले. तरी त्याच्या मनांत द्वेष उत्पन्न झाला नाही. त्याची शांति अढळ होती ५५.

जंव जंव देखती त्याची शांती । तंव तंव दुर्जन क्षोभा येती ।
नाना उपद्रव त्यासी देती । तेंचि श्रीपती सांगत ॥ ५६ ॥
जो जो त्याची शांति ते पाहू लागले, तों तों ते दुष्ट लोक अधिकच संतापले आणि त्याला नानाप्रकारचे त्रास देऊ लागले. तेंच श्रीकृष्ण सांगतो ५६.

इत्येके विहसन्त्येनमेके दुर्वातयन्ति च ।
तं बबन्धुर्निरुरुधुर्यथा क्रीडनकं द्विजम् ॥ ४० ॥
[श्लोक ४०] कोणी त्याचा उपहास करीत, तर कोणी त्याच्यावर अपानवायू सोडीत ज्याप्रमाणे लोक पाळीव पक्ष्यांना बांधतात किंवा पिंजर्‍यामध्ये बंद करतात, त्याचप्रमाणे ते लोक त्याला बांधीत किंवा कोंडून ठेवीत. (४०)

कदर्या बाणली पूर्ण शांती । ऐसे एक उपहासिती ।
एक नाकीं चुना लाविती । एक मुख माखिती काजळें ॥ ५७ ॥
"कदर्यूला पूर्ण शांति प्राप्त झाली बुवा !" अशी कोणी त्याची थट्टा करूं लागले. कोणी त्याच्या नाकाला चुना लावला, कोणी त्याच्या तोंडाला काजळच फांसले ५७.

एक अतिशठ साचोकारे । पुढं ठाकोनि पाठिमोरे ।
शर्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ॥ ५८ ॥
कित्येक अगदी खरोखर पक्के वात्रट होते. त्यांनी त्याच्यापुढे पाठमोरे उभे राहून अपानवायु सोडला. तेव्हां तो दुर्गध त्याच्या नाकातोंडांत भरला ५८.

तरी त्याचिया निजस्थिती । अणुमात्र क्षोभ न ये चित्तीं ।
तोचि संन्यासी त्रिजगतीं । ज्याची ढळॆना शांती क्षोभविल्याही ॥ ५९ ॥
तरी त्याच्या आत्मरूप स्थितीमुळे त्याच्या चित्ताला लेशभरही क्षोभ आला नाही. राग आणण्याचा प्रयत्न केला तरीही ज्याची शांति ढळत नाही. तोच त्रिभुवनांत संन्यासी होय ५९.

एवं क्षोभेना त्याचें मन । देखोन खवळले दुर्जन ।
त्यासी गळां श्रृंखला निरोधून । आणिला बांधून चौबारा ॥ ५६० ॥
तात्पर्य, त्याचे मन क्षुब्ध होईना. असे पाहून ते दुष्ट लोक अधिकच खवळलें . त्यांनी त्या संन्याशाच्या गळ्यांत साखळदंड अडकवून त्याला बांधून चवाठ्यावर आणले ५६०.

यासी वोळखा रे कोणी तुम्ही । हा धनलोभी जो अकर्मी ।
तो आजी सांपडविला आम्हीं । अतिअधर्मी दांभिक ॥ ६१ ॥
"अरे ! तुम्ही कोणी तरी ह्याला ओळखा. जो निंद्य कर्म करणारा होता तोच हा द्रव्यलोभी. तो आज आम्हीं धरला. हा अत्यंत अधर्मी व दांभिक आहे" ६१.

जेवीं गारुडी बांधी माकडा । तेवीं संन्यासी बांधिला गाढा ।
मिळोनियां चहूंकडा । मागांपुढां वोढिती ॥ ६२ ॥
ज्याप्रमाणे गारुडी माकडाला बांधून ठेवतो त्याप्रमाणे त्यांनी तो संन्यासी घट्ट बांधून ठेवला, आणि मग सर्व मिळून चहूकडून मागे पुढे त्याला ओढू लागले ६२.

एक ओढिती पूर्वेशी । एक ओढिती पश्चिमेसी ।
संन्यासी हांसे निजमानसीं । सुख सर्वांसी होये येणें ॥ ६३ ॥
कोणी पूर्वेला ओढीत होते, कोणी पश्चिमेला ओढीत होते, ह्यामुळेच सर्वांना संतोष होत आहे हे पाहून संन्यासीही आपल्या मनामध्ये हसू लागला ६३.

देह प्रारब्ध भोगी जाण । याचा मजसी संबंध कोण ।
येणें विवेकें क्षमापूर्ण । कोणाचें मन् दुखवीना ॥ ६४ ॥
देह प्रारब्ध भोगीत आहे. ह्याचा माझ्याशी संबंध काय? अशा विवेकानें तो क्षमेनें परिपूर्ण झाला होता. तो कोणाचें मन दुखवीत नव्हता ६४.

जेथ स्वगोत्र सोइरे स्वजन । जिंहीं दीधला अतिसन्मान ।
त्यांदेखतां अपमान । अनुद्विग्न जो साहे ॥ ६५ ॥
ज्या ठिकाणी आपले भाऊबंद, सोयरेधायरे व इष्टमित्र आहेत, ज्यांनी पूर्वी आपला अतिशय सन्मान केलेला होता, त्यांच्यादेखत जो मुळीच त्रास न मानतां अपमान सहन करतो ६५.

त्यापाशीं शांति संपूर्ण । उद्धवा निश्चयेंसीं जाण ।
ज्याचें लोकेषणे लाजे मन । अशांति जाण ते ठायीं ॥ ६६ ॥
उद्धवा ! त्याच्यापाशीच खरोखर परिपूर्ण शांति असते असे समज. आणि लौकिक प्रतिष्ठेमुळे ज्याचे मन लाजतें; त्याच्या ठिकाणी शांति रहात नाही ६६.

ऐसा क्षोभवितां पहा हो । क्षोभा न चढे त्याचा भावो ।
त्या सन्याशाचा अभिप्रावो । स्वयें देवादिदेवो सांगत ॥ ६७ ॥
अहो पहा! त्याला इतका त्रास दिला असता त्याच्या मनाला क्रोध येईना. त्या संन्याशाचे हृदगत देवाधिदेव स्वतः सांगत आहे ६७.

एवं स भौतिकं दुःखं दैविकं दैहिकं च यत् ।
भोक्तव्यमात्मनो दिष्टं प्राप्तं प्राप्तमबुध्यत ॥ ४१ ॥
[श्लोक ४१ ] कधी त्याला ताप इत्यादीमुळे देहाचे दुःख, कधी थंडीऊन इत्यादी दैवी कष्ट, तर कधी दुर्जन लोकांनी केलेल्या अपमान इत्यादीद्वारे भौतिक पीडा सहन कराव्या लागत परंतु तो, "हे सर्व आपल्या पूर्वकर्मांचे फळ असल्याने आपल्याला हे अवश्य भोगले पाहिजे," असे मानत असे. (४१)

भिक्षु बोले निजविवेक । त्रिविध प्रारब्धें बांधले लोक ।
तेणें भोगणें पडे आवश्यक । रावो रंक सुटेना ॥ ६८ ॥
भिक्षूने आपला विचार सांगितला. तो म्हणाला, तीन प्रकारच्या (संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध) प्रारब्धाने सर्व लोक बद्ध झाले आहेत, त्यामुळे ते अवश्य भोगावे लागते. राजा व रंक ह्यांतून सुटत नाही ६८.

भूतांची पीडा ते भौतिक । देवांची पीडा ते दैविक ।
देहीं उपजती ज्वरादिक । हे पीडा देख दैहिक ॥ ६९ ॥
पंचमहाभूतांपासून होणारी पीडा ती 'भौतिक' होय. देवांपासून होणारी पीडा 'दैविक' होय आणि देहामध्येच ज्वरादिक उत्पन्न होतात ती पीडा 'दैहिक' होय ६९.

यापरी त्रिविध दुःख । प्रारब्ध झालें जनक ।
तें भोगितां मानी असुख । तो केवळ मूर्ख अतिमंद ॥ ५७० ॥
याप्रमाणे तीन प्रकारचे दुःख जे आहे, ते प्रारब्धापासून उत्पन्न होते. ते भोगीत असतां जो त्रास मानितो तो केवळ मूर्ख व मंदबुद्धि होय ५७०.

जे भोग आले प्रारब्धेंसीं । तेथे साह्य केल्या हरिहरांसी ।
भोग न चुकती प्राण्यासी । हें जाणोनि संन्यासी क्षमावंत ॥ ७१ ॥
प्रारब्धाने जे भोग आपल्या वाट्याला येतील, त्यांत हरिहराला वश करून घेतले असतांनाही ते भोग प्राण्याला चुकत नाहीत, हे जाणूनच तो संन्यासी क्षमाशील झाला होता ७१.

कृष्ण साह्य पांडवांसी । ते भोगिती नष्टचर्यासी ।
तेथें साह्य केल्या हरिहरांसी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥ ७२ ॥
श्रीकृष्ण पांडवांना साहय्य करीत होता तरी त्यांनी नष्टचर्य भोगिलेच. त्या वेळी विष्णु व शंकर ह्यांना जरी सहाय करून घेतलें, तरी प्रारब्ध कोणालाच टळत नाहीं ७२.

परिभूत इमां गाथां अगायत नराधमैः ।
पात्यद्भिः स्वधर्मस्थो धृतिमास्थाय सात्त्विकीम् ॥ ४२ ॥
[श्लोक ४२] अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्‍न करीत, तरीसुद्धा तो सात्त्विक धैयाने आपल्या धर्माशी एकनिष्ठ राही तो म्हणू लागला. (४२)

दुर्जनांच्या उपद्रवाहातीं । निजशांति न सांडीच यती ।
धरोनियां सात्त्विकी धृती । स्वधर्मस्थिती न ढळेचि ॥ ७३ ॥
दुष्ट लोकांच्या उपद्रवानेही  तो संन्यासी आपली शांति सोडीना. सात्त्विक धैर्य धरल्यामुळे त्याची धर्मस्थिति ढळलीच नाहीं ७३.

तेणें भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज मी सांगेन आतां ।
उद्धवा अतिसावधानता । तो बोध तत्त्वतां अवधारीं ॥ ७४ ॥
त्या भिक्षून जी गाथा गायिली, ती मी तुला आतां सांगेन. उद्धवा ! चित्त अत्यंत स्वस्थ करून खरोखर तो बोध श्रवण कर ७४.

तो बोधू धरितां चित्तीं । द्वंद्वसाम्या पावे स्थिती ।
सहजें उल्हासे निजशांती । सायुज्यमुक्ती घर रिघे ॥ ७५ ॥
तो उपदेश मनांत धरिला असतां मनाला द्वंद्वांतील समता दिसूं  लागते, आत्मशांति सहज प्रगट होते, आणि सायुज्यमुक्ति घरांत येते ७५.

जगीं उद्धवाचें भाग्य पूर्ण । ज्यासी श्रीकृष्ण करी सावधान ।
काय बोलिला भिक्षु आपण । तें निरूपण अवधारीं ॥ ७६ ॥
ज्याला श्रीकृष्णाने स्वस्थचित्त केले, त्या उद्धवाचे भाग्य जगामध्ये फार मोठे होते. श्रीकृष्ण म्हणाला-भिक्षु स्वत: काय म्हणाला तें वर्णन ऐक ७६.

द्विज उवाच-
नायं जनो मे सुखदुःखहेतुः न देवताऽऽत्माग्रहकर्मकालाः ।
मनः परं कारणमामनन्ति संसारचक्रं परिवर्तयेद्यत् ॥ ४३ ॥
[श्लोक ४३] ब्राह्मण म्हणाला - माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसे नाहीत, देवता नाहीत, शरीर नाही, ग्रह नाहीत, कर्म नाही की काल नाही मनच त्याला खरे कारणीभूत आहे, असे श्रुती सांगतात तेच जीवाला या संसारचक्रात फिरवीत असते. (४३)

सुजन दुर्जन साधारण । ऐसे जे त्रिविध जन ।
माझ्या सुखदुःखांसी कारण । सर्वथा जाण ते नव्हती ॥ ७७ ॥
तो भिक्षु म्हणाला-सज्जन, दुर्जन, आणि साधारण असे जे तीन प्रकारचे लोक असतात, ते माझ्या सुखाला किंवा दुःखाला मुळीच कारण होत नाहींत. ७७.

जन तितुके पांचभौतिक । माझाही देहो तोचि देख ।
जनांसी मज सहजें ऐक्य । उपजे सुखदुःख मनापाशीं ॥ ७८ ॥
लोक म्हणून जितके आहेत, तितके सर्व पंचमहाभूतांपासून झालेले आहेत. माझाही देह तसाच आहे. तेव्हा लोक आणि मी अशा दोहोंचे ऐक्य आहे. सुखदुःख केवळ मनापाशी उत्पन्न होते ७८.

देवता सुखदुःखदायक । ऐसें म्हणावें आवश्यक ।
तीं दैवतें मनःकाल्पनिक । त्याचें सुखदुःख मजसी न लगे ॥ ७९ ॥
देवता ह्याच अवश्य सुखदुःख देणाऱ्या आहेत असे म्हणावें, तर देवतांचे समुदाय हे मनाने कल्पिलेले आहेत. तेव्हा त्यांचे सुखदुःखही मला लागावयाचें नाहीं ७९.

देवतारूपें मन आपण । मनें कल्पिले देवतागण ।
ते जैं सुखदुःखें देती जाण । तैं मुख्य कारण मन झालें ॥ ५८० ॥
देवतारूपाने आपले मन आहे, आणि त्या मनानेच सर्व देवता कल्पिलेल्या आहेत. अर्थात् देवता जेव्हां सुखदुःख देतात, तेव्हां त्याला मुख्य कारण मनच झाले ५८०.

जेथ जैसा मनाचा सद्भावो । तेथ तद्रूपें भासे देवी देवो ।
जेथ मनाचा विकल्प पहा हो । तेथ थिता देवो दिसेना ॥ ८१ ॥
जेथे जसा मनाचा सद्भाव असेल, तेथे त्याप्रमाणेच त्या स्वरूपाने देवी किंवा देव भासमान होतो. अहो ! असे पहा की, जेथे मनाची अश्रद्धा असते, तेथे असलेला देवही दिसत नाही ८१.

यालागीं सकळ देवता । त्या जाण मनःकल्पिता ।
त्यांपासाव सुखदुःखव्यथा । ते मनाचे माथां निश्चित ॥ ८२ ॥
म्हणून ज्या सर्व देवता आहेत, त्या मनःकल्पितच होत असे समज. तेव्हां त्यांच्यापासून सुखदुःखाची व्यथा झाल्यास ती मनामुळेच आहे हे निश्चित ८२.

आत्मा सुखदुःखांसी कारण । हें समूळ मिथ्यावचन ।
आत्म्याचे ठायीं द्वैतभान । त्रिशुद्धी जाण असेना ॥ ८३ ॥
बरें, आत्मा हाच सुखदुःखांचे कारण आहे असे म्हणावें, तर हे बोलणे मुळी खोटें आहे. आत्म्याच्या ठिकाणी द्वैतभावना मुळींच असत नाही ८३.

मी एक सुखदुःखांचा दाता । हा एक सुखदुःखांचा भोक्ता ।
हें आत्म्याचे ठायीं तत्त्वतां । जाण सर्वथा असेना ॥ ८४ ॥
मी एक सुखदुःख देणारा आहे, आणि हा एक सुखदुःखांचा भोक्ता आहे, ही गोष्ट वास्तविक आत्म्याच्या ठायीं खरोखर मुळीच असत नाही ८४.

जन्मकाळींचे ग्रह दारुण । म्हणों सुखदुःखांसी कारण ।
ग्रहांचा ग्रहो मन आपण । जन्ममरण भोगवी ॥ ८५ ॥
जन्मकाळचे क्रूर ग्रह सुखदुःखांस कारण असतात असे म्हणावें, तर आपले मन हेच स्वतः ग्रहांचाही ग्रह आहे. ते जन्ममरण भोगायला लावतें ८५.

ग्रहांची ग्रहगती देहान्तवरी । मनाची ग्रहगती त्याहूनि थोरी ।
दुःख भोगवी नाना प्रकारीं । जन्मजन्मांतरीं सोडीना ॥ ८६ ॥
ग्रहांची ग्रहदशा देह पडेपर्यंत असते, पण मनाची ग्रहदशा त्याहून अधिक आहे. ते नानातव्हेंने दुःख भोगविते आणि जन्मजन्मांतरीही सोडीत नाही ८६.

दुष्ट ग्रह चारी दिवस पीडी । मनाची पीडा जन्मकोडी ।
दुष्ट ग्रहो भोगूनि सोडी । मन न सोडी कल्पांतीं ॥ ८७ ॥
दुष्ट ग्रह थोडाच काळ पीडा देतो, पण मनाची पीडा कोट्यवधि जन्म असते. दुष्टग्रह असतो तो आपली भोगदशा भोगली की सोडून देतो, परंतु मन कल्पांतीही सोडीत नाहीं ८७.

जैं मन न धरी देहाभिमान । तैं ग्रहांची पीडा मानी कोण ।
यालागीं सुखदुःखां कारण मनचि जाण महाग्रहो ॥ ८८ ॥
मन जर देहाभिमान धरणार नाही, तर ग्रहांची पीडा कोण मानतो म्हणून सुखदुःखाला कारण होणारा मन हाच एक महाग्रह आहे ८८.

येथ निजकर्म दुःखदायक । हेंही म्हणतां न ये देख ।
कर्म कर्मबंधमोचक । तें दुःखादायक घडे केवीं ॥ ८९ ॥
आता येथे आपले कर्मच दुःखदायक आहे असेही म्हणता येत नाही. कारण, कर्म हे कर्मबंधांतून सोडविणारे आहे. तेव्हां तेच दुःखदायक कसे होईल ? ८९.

स्वकर्म शुद्ध स्वाभाविक । त्यासी मनें करूनि स्कामिक ।
नानापरी अतिदुःख । योनि अनेक भोगवी ॥ ५९० ॥
आपले  कर्म स्वाभाविक व अत्यंत पवित्र असतां मनच त्याला सकाम बनविते आणि त्यामुळे अनेक प्रकारचे अत्यंत दुःख देउन अनेक योनि भोगावयाला लावतें ५९०.

हो कां कर्माचेनि क्रियायोगें ।जैं मनःसंकल्प कर्मी न लगे ।
तैं सुखदुःखांचीं अनेगें । विभांडी वेगें निजकर्म ॥ ९१ ॥
अहो ! कर्माच्या क्रियांसंबंधाने जेव्हां मनाचा संकल्प कर्माकडे लागत नाही, तेव्हां कितीही सुखदुःखें असली तरी आपले कर्मच त्यांचा नाश करते ९१.

देह सुखदुःखांसी काय जाणे । आत्मा सुखदुःख सर्वथा नेणे ।
येथ सुखदुःखांचे गाडे भरणें । मनें भोगवणें निजसत्ता ॥ ९२ ॥
देह हा सुखदुःख काय जाणणार ? आत्मा तर सुखदुःख मुळीच जाणत नाही. ह्यावरून सुखदुःखांचे गाडे भरावयाचे आणि ते सुखदुःख भोगावयाला लावावयाचे, हें सर्व मनाच्या सत्तेनेच होतें ९२.

येथ सुखदुःखदायक । मनचि झालें असे एक ।
मनाअधीन होऊनि लोक । मिथ्या सुखदुःख भोगिती ॥ ९३ ॥
येथे सुखदुःख देणारे काय तें एक मनच झालेले आहे, आणि लोक त्या मनाच्या आधीन होऊन व्यर्थ सुखदुःख भोगतात ९३.

काळ सुखदुःखांचा दाता । हेंही न घडे गा सर्वथा ।
मनःसंकल्पसंकेता । काळाची सत्ता लागली ॥ ९४ ॥
सुखदुःख देणारा काळ आहे, असे म्हणणेही सर्वस्वी बरोबर नाही. मनःसंकल्पाचा जसा संकेत होईल तशीच काळाची सत्ता चालते ९४.

अजरामर असतां आपण । मनें घेतलें मज आहे मरण ।
तेथचि काळ लागला जाण । क्षणें क्षण निर्दाळित ॥ ९५ ॥
आपण अजरामर असतां मला मरण आहे अशी मनानेच आपली कल्पना करून घेतली, की त्यामुळेच काळ पाठीमागे लागतो आणि क्षणानें क्षण नाहीसा करतो असे समज ९५.

आपुलेनि हातें आपण । पठाडे खोंविलें दाभण ।
रात्रीं रुततांचि तें जाण । सर्पभयें प्राण सांडिला ॥ ९६ ॥
आपणच आपल्या हातानें अंथरुणांत दाभण खोंचून ठेवले व ते रात्री झोपतांना अंगाला टोचतांच साप चावला या भयाने बिचारा मरून गेला ९६.

त्यासी सर्प नाहीं लागला । मा विखें केवीं तो घारला ।
परी निजशंके स्वयें निमाला । तैसा काळ लागला जनासी ॥ ९७ ॥
वस्तुतः त्याला काही सर्प चावला नव्हता. मग विषाने त्याला कसे घेरलें ? तर तो आपल्या शंकेनेंच स्वतः मरण पावला. त्याप्रमाणेच लोकांना हा काळ लागलेला आहे ९७.

एकासी सर्प झोंबला पाठीसी । काय रुतलें म्हणे सांगातियासी ।
तो म्हणे कांटी लागली होती कैसी । ते म्यां अनायासीं उपडिली ॥ ९८ ॥
एकाच्या पाठीला साप चावला, तेव्हां तो आपल्या सोबत्यास विचारूं लागला की, “माझ्या पाठींत काय रुतलें ?" दुसरा म्हणाला, " एक कशी कांटी लागली होती कोण जाणे ! ती मी उपटून टाकली " ९८.

तो नव्हे सर्पा साशंक । यालागीं त्यासी न चढेचि विख ।
निजव्यापारीं देख । यथासुख वर्तत् ॥ ९९ ॥
त्यामुळे त्याला सापाची शंकासुद्धा आली नाही, म्हणून त्याला विष चढलेच नाही. तो आपल्या उद्योगामध्ये खुशाल गुंतून राहिला ९९.

त्यासी सांगोनि बहुकाळें खूण । देतां सर्पाची आठवण ।
तत्काळ विषें आरंबळोन । आशंका प्राण सांडिला ॥ ६०० ॥
पुष्कळ दिवस गेल्यावर त्याला तो सर्पच चावला होता असे सांगून त्याची पाठीवरील खूणही दाखविली असतां सर्पाची आठवण होतांच तत्काळ विषाने घेरले अशा शंकेनेंच त्याने प्राण सोडला ६००. 

तेवीं निर्विकल्पपुरुखा । उठी संकल्पाची आशंका ।
ते काळीं काळू देखा । बांधे आवांका निर्दळणीं ॥ १ ॥
त्याप्रमाणे निर्विकल्प पुरुषाला संकल्पाची शंका येते, त्याच वेळी त्याच्या नाशाविषयी काळ तयार होतो पहा!  १.

निःशंकपणे साचार । ज्याचें मन म्हणे मी अमर ।
त्यांचे काळ वर्जी घर । काळ दुर्धर मनःशंका ॥ २ ॥
पण खरोखर निःशंकपणाने ज्याचे मन “ मी अमर आहे" असें म्हणते, त्याचे घर काळ वर्ज्य करितो. मनःशंकेनेच काळ असह्य होतो २.

जो निर्विकल्प निजनिवाडें । काळ सर्वथा न ये त्याकडे ।
नश्वर नाहीं मा तयापुढें । काळ कोणीकडे रिघेल ॥ ३ ॥
जो स्वत:च निर्विकल्प आहे, त्याच्याकडे काळ कधीच येत नाही, कारण त्याच्याजवळ कांहींच नश्वर नसते, तेव्हां काळ कोठे शिरणार? ३.

यापरी गा काळ देख । नव्हे सुखदुःखदायक ।
सुखदुःखांचें जनक । मनचि एक निश्चित ॥ ४ ॥
पहा ! याप्रमाणे काळ हा काही सुखदुःख देणारा नव्हे हे लक्षात आण. सुखदुःख उत्पन्न करणारे काय तें एक मनच हे निश्चित ४.

मनःकल्पित संसार जाण । मनें कल्पिलें जन्ममरण ।
संसारचक्रीं आवर्तन । मनास्तव जाण पुनः पुनः ॥ ५ ॥
संसार हाही मनःकल्पित होय असे समज. मनानेच जन्ममरणांची कल्पना केली आहे. संसारचक्रांत पुनः पुन्हा गिरक्या खात रहावयाचें तेंही मनामुळेच ५.

हे साही प्रकार जाण । म्हणती सुखदुःखांसी कारण ।
विचारितां हे अप्रमाण । मनोजन्य सुखदुःखें ॥ ६ ॥
हे सहा प्रकार हेच सुखदुःखांना कारण आहेत असे कोणी म्हणतात. विचार केला तर हेही म्हणणे खोटेंच. कारण, सुखदुःखें ही मनापासूनच उत्पन्न होत असतात ६.

नवल लाघवी कैसें मन । शुद्धि उपजवी मीपण ।
चिद्रूपा लावूनि जीवपण । सुखदुःखें जाण भोगवी ॥ ७ ॥
हें  मन किती आश्चर्यकारक लाघवी आहे पहा की, ते मीपणाचे भान उत्पन्न करून व शुद्ध ब्रह्मस्वरूप अशा आत्म्याकडे जीवपणा लावून त्याला सुखदुःख भोगावयास लावतें ७. 

डोळींचा कणू अल्प एक । तो शरीरासी दे अतिदुःख ।
तेवीं वासनामात्रें मन देख । दारुण सुखदुःख भोगवी ॥ ८ ॥
डोळ्यांत गेलेला अत्यंत लहान कण असला, तरी तो अतिशय दुःख देतो. त्याप्रमाणेच पहा ! मन हेही वासनेच्या निमित्ताने भयंकर सुखदुःख भोगावयाला लावते ८.

म्हणाल येथ अविद्या एक । ते होय सुखदुःखदायक ।
अविद्या ब्रह्म असतां देख । मनेंवीण सुखदुःख कदा नुपजे ॥ ९ ॥
आता कदाचित तुम्ही म्हणाल की, अविद्या आहे तीच सुखदुःख देणारी आहे. पण अविद्या ही ब्रह्मस्वरूप असल्याने मनाशिवाय सुखदुःख कधीही होणार नाही ९.

अविद्या ब्रह्म असतां पाहीं । मन लीन सुषुप्तीच्या ठायीं ।
तेव्हां सुखदुःखचि नाहीं । भोग कोणेंही कंहीं देखिजेना ॥ ६१० ॥
अविद्या ब्रह्मस्वरूप असतांना मन हे सुषुप्तीमध्ये लीन होते. तेव्हां मुळी सुखदुःखच नसते. म्हणून भोग कोणी कधी तेथे पहातच नाहीत ६१०.

मन दुश्चित जेव्हां पाहीं । तेव्हां जो भोग भोगिजे देहीं ।
तें सुखदुःख न पडे ठायीं । स्वयें स्वदेहीं देखिजे ॥ ११ ॥
मन जेव्हां दुश्चित असते तेव्हां जो भोग देहाने भोगावा, त्याचे सुखदुःखच आपल्याला कळत नाही. हा अनुभव आपल्या देहांतच आपण पाहून घ्यावा ११.

यालागीं सुखदुःखांचें कारण । मनचि आपण्या आपण ।
तेणें लावूनि जन्ममरण । भोवंडी दारुण भवचक्रीं ॥ १२ ॥
म्हणून आपल्या सुखदुःखाचे कारण आपलें मनच स्वतः आहे. त्यानेच जन्ममरण पाठीमागे लावून ते भयंकर संसारचक्रांत भोंवंडीत राहातें १२.

भवचक्रीं प्रत्यावर्तन । कोणे रीती करवी मन ।
तेचि अर्थींचें निरूपण । भिक्षु आपण्या आपण निरूपी ॥ १३ ॥
मन हे संसारचक्रामध्ये कसें फिरविते ? त्याच अर्थाचे निरूपण भिक्षु आपण स्वतःच सांगत आहे १३.

मनो गुणान्वै सृजते बलीयः ततश्च कर्माणि विलक्षणानि ।
शुक्लानि कृष्णान्यथ लोहितानि तेभ्यः सवर्णाः सृतयो भवन्ति ॥ ४४ ॥
[श्लोक ४४ ] हे अतिशय बलवान मनच कामक्रोधादी विकार निर्माण करते त्यामुळे सात्त्विक, राजस आणि तामस अशी अनेक प्रकारची कर्मे होतात आणि त्या कर्मानुसारच जीवाला विविध गती प्राप्त होतात. (४४)

मनो कल्पोनि निजसत्तें । उपजवी नाना वृत्तींतें ।
त्याचि त्रिगुणा होती येथें । गुणविभागातें गुणावृत्ती ॥ १४ ॥
मन हेच आपल्या सत्तेने कल्पना करून अनेक प्रकारच्या वृत्ति उत्पन्न करते. त्याच वृत्ति पुढे त्रिगुणात्मक होतात व गुणांच्या विभागाप्रमाणे गुणांच्या वृत्ति बनतात १४.

सत्त्वरजतमादि गुणीं । सुरनरतिर्यगादि योनी ।
मनें त्रिभुवन उभवूनी । संसारभुवनीं स्वयें नांदे ॥ १५ ॥
त्याच सत्त्वरजतमादि गुणांनी देव, मनुष्य व पशुपक्षी इत्यादि योनि मनानेच त्रिभुवन उत्पन्न करून संसारसदनामध्ये खुशाल नांदत असतात १५.

त्या मनाची प्रौढी गाढी । क्षणें रची क्षणें मोडी ।
मन ब्रह्मादिकां भुली पाडी । इतर बापुडीं तीं कायी ॥ १६ ॥
त्या मनाचे सामर्थ्य काही विलक्षण आहे. ते क्षणांत पाहिजे तो व्यूह उभा करतें व ढासळून टाकते. मन हे ब्रह्मादिकांनासुद्धा भुरळ पाडते, मग इतर बिचाऱ्यांची कथा काय ? १६.

मनाचा बलात्कार कैसा । निर्गुणीं पाडी गुणाच्या फांसा ।
लावूनि जीवपणाचा झांसा । संसारवळसा आवर्तीं ॥ १७ ॥
मनाचा प्रभाव किती विचित्र आहे पहा, की ते निर्गुणाला गुणांच्या फांसांत अडकवितें. त्याला जीवंतपणाची तंद्री लावून संसाराच्या भोवऱ्यांत गिरक्या खावयास लाविते १७.

केवळ विचारितां मन । तें जड मूढ अचेतन ।
त्याचें केवीं घडे स्रजन । तेंचि निरूपण सांगत ॥ १८ ॥
केवळ विचार केला असतां मन हे जड, मूढ व अचेतन आहे. त्याची उत्पत्ति तरी कशी होणार ? तेंच वर्णन श्रीकृष्ण सांगतो १८.

अनीह आत्मा मनसा समीहता हिरण्यमयो मत्सख उद्विचष्टे ।
मनः स्वलिङ्गं परिगृह्य कामान् जुषन्निबद्धो गुणसङ्गतोऽसौ ॥ ४५ ॥
[श्लोक ४५] क्रियाशील मनाबरोबर राहूनही ज्ञानशक्तिप्रधान जीवाचा सखा आत्मा निष्क्रिय असून जीवाला साक्षीरूपाने पाहातो परंतु जीवा आत्म्याच्या ठिकाणी संसार भासविणार्‍या मनाला बरोबर घेऊन कर्मात आसक्त होऊन सुखांचा उपभोग घेत संसारात बांधला जातो. (४५)

आत्मा चित्स्वरूप परिपूर्ण । निःसंग निर्विकार निर्गुण ।
त्यासी संसारबंधन । सर्वथा जाण घडेना ॥ १९ ॥
आत्मा हा ज्ञानस्वरूप असल्याने परिपूर्ण आहे. तो नि:संग, निर्विकार व निर्गुण आहे. त्याला संसारबंधन मुळीच घडत नाही १९.

जो स्वप्रकाशें प्रकाशघन निजतेजें विराजमान ।
जो परमात्मा परिपूर्ण । त्यासी क्रियाचरण कदा न घडे ॥ ६२० ॥
जो आत्मा स्वयंप्रकाशा प्रकाशमय आहे, स्वतेजानेंच शोभत आहे, आणि जो परमात्मा परिपूर्ण आहे, त्याला क्रियाचरण कधीही घडत नाहीं ६२०.

विचारितां निजनिवाडें । मनाचे जडत्वचि जोडे ।
त्यासीही संसार न घडे । भवबंध घडे तो ऐका ॥ २१ ॥
आपल्याच कल्पनेने विचार केला असतां मन जड असल्याचे दिसून येते, तेव्हा त्यालाही संसार घडणे शक्य नाही. आतां हें संसाराचे बंधन कोणाला असतें तें ऐका २१.

नवल मनाचें विंदान । शुद्धीं उपजवी मीपण ।
तेचि वस्तूसी जीवपण । सगुणत्वा जाण स्वयें आणी ॥ २२ ॥
मनाचे कौशल्य आश्चर्यकारक आहे. तें शुद्ध अशा आत्म्याच्या ठिकाणी मीपणा उत्पन्न करते, आणि त्याच ब्रह्माला जीवभाव लावून स्वतःच त्याला सगुणस्वरूपाला आणते २२.

मनःसंकल्पाचें बळ । शुद्धासी करी शबळ ।
लावूनि त्रिगुणांची माळ । भवबंधजाळ स्वयें बांधे ॥ २३ ॥
मनाच्या संकल्पाचें सामर्थ्य इतके आहे की, तें शुद्ध ब्रह्माला अविद्यात्मक करून सोडते, आणि त्रिगुणांची माळ लावून संसाररूप जाळें स्वत:च तयार करते २३.

जेवीं घटामाजील घटजळ । आकळी अलिप्त चंद्रमंडळ ।
तेवीं मनःसंकल्पें केवळ । कीजे शबळ चिदात्मा ॥ २४ ॥
ज्याप्रमाणे घटांतील पाणी अलिप्त असलेल्या चंद्रबिंबाला आपल्यामध्ये आकलन करते, . त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पाने ज्ञानस्वरूप आत्मा अविद्यात्मक केला आहे २४.

घटींचें हालतां जीवन । चंद्रमा करी कंपायमान ।
तेवीं शुद्धासी जन्ममरण । मनोजन्य सुखदुःखें ॥ २५ ॥
घटांतील पाणी हालले असता ते चंद्रबिंबालाही कंपित करते, त्याप्रमाणे मनामुळे शुद्ध ब्रह्माला जन्ममरण व सुखदुःखें उत्पन्न झालेली आहेत २५.

आत्मा स्वप्रकाश चित्स्वरूप । मन जड कल्पनारूप ।
तें मानूनि आपुलें स्वरूप । त्याचें पुण्यपाप स्वयें भोगी ॥ २६ ॥
आत्मा हा स्वयंप्रकाश आणि ज्ञानस्वरूप आहे. मन हे जड असून कल्पनारूप आहे. तरी तेच आपलें स्वरूप असे मानून त्याचे पुण्य-पाप असतें तें हा जीवात्माच स्वतः भोगतो २६.

जीवाचा आप्त आवश्यक । सुहृद सखा परमात्मा एक ।
तो मनाजीवाचा नियामक । द्रष्टा देख साक्षित्वें ॥ २७ ॥
जीवाचा खराखरा आत, सुहृद व मित्र म्हटला म्हणजे एक परमात्मा होय. तोच मनाचा आणि जीवाचाही नियामक असून साक्षीदाराप्रमाणे एक प्रेक्षक होय २७.

अविद्या प्रतिबिंबे नेटका । जीव जो कां माझा सखा ।
तो मनोभ्रमें भ्रमोनि देखा । भोगी सुखदुःखां मनोजन्य ॥ २८ ॥
जो जीव अविद्येच्या योगानें स्पष्टपणाने प्रतिबिंबित होतो, तोच माझा मित्र होय. तोच मनाच्या भ्रमानें भ्रमण - पावून मनापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखांना भोगीत आहे २८.

मनाची एकात्मता परम । जीवासी पडला थोर भ्रम ।
आपण असतांही निष्कर्म । कर्माकर्म स्वयें भोगी ॥ २९ ॥
मनाची एकात्मता मोठी विलक्षण आहे. त्यामुळे जीवाला अत्यंत भ्रम पडतो, आणि तो जीव आपण स्वतः निष्कर्म असतांही स्वत:च कर्माकर्म भोगतो २९.

सूळीं जीव मनाचा नियंता । तोचि मनाच्या एकात्मता ।
मनाचिया सुखदुःखव्यथा । आपुले माथां नाथिल्या सोशी ॥ ६३० ॥
वस्तुतः पाहिले तर जीव हा मनाचा नियंता आहे, पण तोच मनाशी एकरूप होऊन मनाच्या नसत्याच  सुखदुःखांच्या व्याधि आपल्या माथीं घेऊन सहन करितो ६३०.

जेवीं अतिआप्तता प्रधान । रायासी लावी दृढबंधन ।
मग राजा तो होय दीन । तो भोगवी तें आपण सुखदुःख भोगी ॥ ३१ ॥
ज्याप्रमाणे अत्यंत जवळचा नातेवाईक प्रधान असला, म्हणजे तो राजालाच आपल्या कैचीत ठेवतो; आणि मग तो राजा अगदी गरीब होऊन जातो, व प्रधान जें जें काय सुख-दुःख भोगावयास लावील तें तें आपण भोगीत असतो ३१, 

ते दशा झाली जीवासी । मनें संसारी केलें तयासी ।
मग नाना जन्ममरणें सोशी । अहर्निशीं सुखदुःखें ॥ ३२ ॥
तीच दशा जीवाला प्राप्त झालेली आहे. मनाने त्याला संसारी करून ठेविले आहे, त्यामुळे तो अनेक जन्ममरणे व रात्रंदिवस अनेक सुखदुःखें सोशीत असतो ३२.

त्या मनासी निग्रहो न करितां । जीवाची न चुके व्यथा ।
मनाचेनि छंदें नाचतां । साधनें सर्वथा व्यर्थ होती ॥ ३३ ॥
त्या मनाचा निग्रह केला नाही, तर जीवाचें दुःखही टळावयाचे नाही. मनाच्याच नादाने नाचत राहिले तर सर्व साधनें फुकट जातात ३३.

दानं स्वधर्मो नियमो यमश्च श्रुतं च कर्माणि च सद्व्रतानि ।
सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ताः परो हि योगो मनसः समाधिः ॥ ४६ ॥
[ श्लोक ४६] दान, स्वधर्माचे पालन, यमनियम,वेदाध्ययन, सत्कर्मे आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे मनाचा निग्रह करण्यासाठी असतात कारण मनाची एकाग्रता हाच परम योग आहे. (४६)

न लक्षितां मनोनियमन । सर्वस्वही दिधल्या दान ।
एक मी दाता होय अभिमान । तेणें दानें मन दाटुगें होय ॥ ३४ ॥
मनोनिग्रहाकडे लक्ष न देतां सर्वस्वही दान दिले, तर दाता काय तो एक मीच असा अभिमान होतो व त्या दानाच्या योगाने मन गर्वाने उन्मत्त  होतें ३४.

चुकोनि मनोनिग्रहाचें वर्म । आचरतां वर्णाश्रमधर्म ।
तेणें उल्हासे मनोधर्म । माझें स्वकर्म अतिश्रेष्ठ ॥ ३५ ॥
किंवा मनोनिग्रहाचे वर्म चुकून वर्णाश्रमधर्म आचरण केला असतां त्याच्या योगाने मनोधर्म आनंदभराने बळावतो, आणि ' माझे स्वकर्म हेच अत्यंत श्रेष्ठ' असें वाटू लागते ३५.

मीचि एक तिहीं लोकीं । स्वचार निष्ठ स्वंयपाकी ।
यापरी स्वधर्मादिकीं । मन होय अधिकीं चाविरें ॥ ३६ ॥
त्रिभुवनांत मीच काय तो एक आचारसंपन्न, मीच काय तो एक स्वतः स्वयंपाक करणारा, ह्याप्रमाणे स्वधर्मादि आचरणाने मन अधिकच चवताळून जाते ३६.

मनोनियमनीं नाहीं बुद्धी । तैं यमनियम ते उपाधी ।
मी एक साधक त्रिशुद्धी । हेंचि प्रतिपादी मनोधर्म ॥ ३७ ॥
मनाचे नियमन करण्याची बुद्धि नसेल तर यम-नियम हीसुद्धा एक उपाधीच आहे. कारण त्यामुळे, 'खरोखर साधक काय तो मीच' हेच मनोधर्म नेहमी सांगत असतो ३७.

करितां वेदशास्त्रश्रवण । गर्वाचें भरतें गहन ।
पांडित्यीं अतिअभिमान । मनोनियमन तेथें कैंचें ॥ ३८ ॥
वेदशास्त्र श्रवण केले असतां गर्वाची भयंकरच भरती येते. पांडित्यामध्ये अतिशय अभिमान उत्पन्न होतो. तेथे मनाचे नियमन कसे होणार ? ३८.

करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अतिदुर्गम ।
कर्मठतेचा चढे भ्रम । मनोनियमन घडे केवीं ॥ ३९ ॥
आपलेंच कर्म करावयास जावें, तर कर्मक्रिया अत्यंत कठीण आहे. त्या कर्मठपणाचाच मोठा भ्रम वाढतो, तेथे मनाचे नियमन कसे घडणार ? ३९.

कर्म केवळ देहाचे माथां । आत्मा देहीं असोनि विदेहता ।
त्यासी कर्मीं कर्मबद्धता । कर्मठ मूर्खतां मानिती ॥ ६४० ॥
कर्म हे केवळ देहाच्या ठिकाणी आहे. आत्मा देहांत असूनही तो विदेहस्थितीत आहे. त्याला कर्माने कर्मबद्धता प्राप्त होते, असें कर्मठ लोक मूर्खपणाने मानितात ६४०.

अनंतव्रतें झाले व्रती । तेणें धनधान्य वांछिती ।
मनोनिग्रहो नाहीं चित्तीं । सद्व्रते जाती सुनाट ॥ ४१ ॥
असंख्य व्रतें करून व्रतस्थ झाले असताही ते त्याबद्दल धनधान्य मिळावे अशी इच्छा करतात. कारण त्यांच्या मनांत मनोनिग्रह नसतो.' चांगली चांगली केलेली व्रतेंही अशा रीतीने व्यर्थ जातात ४१.

व्रत दान स्वधर्म सकळ । यांसी मनोनिग्रहो मुख्य फळ ।
तेणेंवीण अवघीं विकळ । साधनें निष्फळ साधकां ॥ ४२ ॥
व्रत, दान, स्वधर्म, इत्यादि जी सर्व आहेत, त्यांना मनोनिग्रह हेच मुख्य फळ आहे. त्याच्याशिवाय सर्व साधनें दुर्बल व साधकांना निष्फळ होत ४२.

दानादिक सप्त पदार्थ । हे ज्ञानाचे अंगभूत ।
तीं साधनें समस्त । निष्फळ येथ केवीं म्हणा ॥ ४३ ॥
दानादिक सात साधनें ही ज्ञानाचींच अंगभूत आहेत, ती सर्वच साधनें निष्फळ आहेत असे येथे कसे म्हणावें ? ४३.

दानादिकें जीं जीं येथें । इहामुत्र फळ ये त्यांतें ।
तें फळचि निष्फळ येथें । जन्ममरणांतें वाढवी ॥ ४४ ॥
(ह्याचे उत्तर असें की,) येथे दानादिक जी जी साधने आहेत, त्यांना इहपरलोकीं फळ येते, पण ते फळच येथे निष्फळ होते आणि जन्ममरणांना वाढविते ४४.

येथ साधक होय सज्ञान । फळाशा निःशेष त्यागून ।
दानादि स्वधर्माचरण । चित्तशुद्धीसी जाण उपयोगी ॥ ४५ ॥
ह्यांत साधक ज्ञानसंपन्न असला, तर तो फळाची आशा निखालस सोडून देऊन दानादिक स्वधर्माचरण करील, आणि ते मात्र त्याच्या चित्तशुद्धीला उपयोगी होईल ४५.

माझी व्हावी चित्तशुद्धी । ऐशी उपजावया बुद्धी ।
भगवत्कृपा पाहिजे आधीं । तैं साधनें सिद्धी पावती ॥ ४६ ॥
परंतु 'माझी चित्तशुद्धि व्हावी' अशी बुद्धि उत्पन्न होण्याला आधी भगवंताची कृपा पाहिजे. तरच साधनें सिद्धीला जातात ४६.

साधनीं माझी मुख्य भक्ती । त्यांत विशेषें नामकीर्ती ।
नामें चित्तशुद्धि चित्तीं । स्वरूपस्थिती साधकां ॥ ४७ ॥
सर्व साधनांत माझी भक्ति हीच मुख्य होय. त्यांतही नामाची कीर्ती विशेष आहे. नामाने चित्ताची शुद्धि होते आणि साधकांना स्वस्वरूपस्थिति प्राप्त होते ४७.

नामापरतें साधन । सर्वथा नाहीं आन ।
नामें भवबंधच्छेदन । सत्य जाण उद्धवा ॥ ४८ ॥
नामाहून श्रेष्ठ असे साधन दुसरें मुळीच नाही. उद्धवा ! नामाने खरोखरच संसारबंधाचे छेदन होते हें लक्षात ठेव ४८.

स्वरूपस्थित निश्चळ मन । जेथ लाजोनि जाय साधन ।
तेथ दानादिकांचें प्रयोजन । सहजचि जाण खुंटले ॥ ४९ ॥
स्वस्वरूपाच्या ठिकाणी राहून मन निश्चळ झाले, की अशा वेळी जेथे साधन निघून जाते; तेथे दानादिकांचे कारण आपोआपच खुंटले असे समज ४९.

समाहितं यस्य मनः प्रशान्तं दानादिभिः किं वद तस्य कृत्यम् ।
असंयतं यस्य मनो विनश्यद् दानादिभिश्चेदपरं किमेभिः ॥ ४७ ॥
[श्लोक ४७] ज्याचे मन एकाग्र होऊन एकदम शांत झाले, त्याला दान इत्यादींची काय आवश्यकता आहे, सांग ना ! परंतु ज्याचे मन चंचल असून आळस इत्यादी दोषांनी भरलेले आहे, त्याने दानादी कर्मे केली, तरी त्यांचा काय उपयोग ? (४७)

येथ ज्या पुरुषाचें मन । ठाकी आपुलें जन्मस्थान ।
त्यासी दानादिकांचें कोण । प्रयोजन साधनीं ॥ ६५० ॥
येथे ज्या पुरुषाचे मन आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रविष्ट होते, त्याला दानादि साधनांचे कारण काय ? ६५०.

पूर्णतृप्तापाशीं जाण । ओगरलिया सदन्न ।
तो जेवीं न पाहे हुंगोन । तेवीं साधन अमनस्का ॥ ५१ ॥
पूर्णपणे तृप्त झालेल्या माणसापुढे पक्वान्न  वाढले असतां तो जसा त्याचा वासही घेऊन पहात नाही, त्याप्रमाणेच मनोविकार नष्ट झालेल्याच्यापुढे साधन व्यर्थ होय ५१.

गंगा उतरावया महापूरीं । अतिप्रयासीं ताफा करी ।
तोचि पूर वोहटल्यावरी । ताफा अव्हेरी निःशेष ॥ ५२ ॥
महापुरांतून गंगा नदीच्या पलीकडे जाण्यासाठी एकादा मनुष्य मोठ्या कष्टानें तराफा तयार करितो; पण तोच पूर उतरल्यावर तो तराफा पूर्णपणे दूर झुगारून देतो ५२.

तेवीं कामक्रोधादिवेगशून्य । ज्याचें निर्विकल्पीं निश्चळ मन ।
त्यासी दानादिकीं प्रयोजन । नाहीं जाण निश्चित ॥ ५३ ॥
त्याप्रमाणे कामक्रोधादि ऊर्मींनी रहित असें ज्याचे मन निर्विकल्पामध्ये स्थिर झाले, त्याला खरोखर दानादिकांचे काही कारणच नाही ५३.

जेवीं सूर्योदय झाल्यापाठीं । उपेगा न ये लक्ष दिवटी ।
तेवीं निर्विकल्पता मनीं उठी । तैं साधनें कोटी सुनाट ॥ ५४ ॥
ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर लक्षावधि दिवट्याही उपयोगी पडत नाहीत, त्याप्रमाणे निर्विकल्पता मनामध्ये उत्पन्न झाली की, कोट्यवधि साधने निष्फळ होत ५४.

एवं समाहित ज्याचें मन । त्यासी दानादि नाना साधन ।
करावया नाहीं प्रयोजन । कल्पनां पूर्ण निमाल्या ॥ ५५ ॥
अशा प्रकारे ज्याचे मन शांत झाले, त्याला दानादि नाना प्रकारची साधनें करण्याचे कारणच नाही. त्याच्या कल्पनाच पूर्णपणे लयास गेलेल्या असतात ५५.

ज्याचें नेम न मनी चित्त । जें सदा विवेकरहित ।
जें अनिवार विषयासक्त । त्यासीही अनुपयुक्त साधनें ॥ ५६ ॥
ज्याचे मन कोणतेच नियमन पाळीत नाही, जे मन सदोदित विचारशून्य असते, जे विषयांच्या ठिकाणी अनिवार आसक्त असते, त्यालाही साधनें निरुपयोगी होत ५६.

जेवीं मदगजांच्या लोटीं । सैन्य पळे बारा वाटीं ।
तेवीं विषयासक्तापाठीं । साधनें हिंपुटी होऊनि ठाती ॥ ५७ ॥
ज्याप्रमाणे मदोन्मत्त हत्तींच्या झुंडींमुळे सैन्य अनेक वाटांनी पळत सुटते, त्याप्रमाणे विषयासक्ताजवळ साधने हिरमुसली होऊन जातात ५७.

जो विषयासक्तमना । तो सर्वथा नातळे साधना ।
करी तैं तेथेंही जाणा । विषयकल्पना संकल्पीं ॥ ५८ ॥
जो मनाने विषयासक्त आहे, तो साधनाचे आचरण मुळीच करीत नाही. कारण, त्याने साधनें  केलीच तर तेथेही त्याच्या मनःसंकल्पांत विषयांच्याच कल्पना असतात ५८.

स्वयें करितां पै साधना । जें जें फळ वांछी वासना ।
तें तेंचि फळे जाणा । करी उगाणा दानादिकांचा ॥ ५९ ।
स्वतः साधन करीत असतांना वासना ज्या ज्या फळाची इच्छा करिते, ते तेंच फळ प्राप्त होते, आणि दानादिकांचा नाश करिते ५९.

जेवीं कां पूर्णबळाचा वारू । त्यावरी बैसला निर्बळ नरू ।
तो त्यासी सर्वथा अनावरू । नव्हे स्थिरू अणुमात्र ॥ ६६० ॥
ज्याप्रमाणे एकादा पूर्णपणे बलवान् असा घोडा असला आणि त्यावर दुबळा पुरुष बसला, तर तो घोडा त्याला सर्वस्वी अनावर होतो, एक क्षणभरही स्थिर रहात नाही ६६०.

तैसें ज्याचें अतिदुर्मन । सदा कामक्रोधीं परिपूर्ण ।
जो स्वयें झाला मनाचे आधीन । ज्याचा विवेक निमग्न महामोहीं ॥ ६१ ॥
त्याप्रमाणेच ज्याचे मन अतिशय दुर्बळ असते, सदोदित कामक्रोधांनीच पूर्ण भरलेले असतें, जो स्वत:च मनाचा गुलाम झालेला असतो, ज्याचा विचार महामोहांतच नेहमी गटंगळ्या खात असतो ६१,

तेथ साधनचि करी कोण । करी तें मोहास्तव जाण ।
तेणें वाढे तमोगुण । मनोनियमन घडेना ॥ ६२ ॥
 तशा स्थितीत साधन कोण करणार? त्याने एकादेवेळी साधने केली तर ती मोहामुळेच करितो. त्यामुळे तमोगुण वाढतो, पण मनाचे नियमन होत नाहीं ६२.

श्रवणादि इंद्रियबंधन । करूनि करितां साधन ।
तेणें वश्य नव्हे मन । मनाअधीन इंद्रियें ॥ ६३ ॥
 बरें, श्रवणादि इंद्रियांचे नियमन करून साधन केले असता त्याने मन आकलन होत नाही. कारण इंद्रिये ही मनाच्या आधीन असतात ६३.

मनोवशेऽन्ये ह्यभवंस्म देवा मनश्च नान्यस्य वशं समेति ।
भीष्मो हि देवः सहसः सहीयान् युञ्ज्याद्वशे तं स हि देवदेवः ॥ ४८ ॥
[श्लोक ४८] मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिये वश होतात इंद्रिये मनाला वश करू शकत नाहीत कारण मन हा बलवानांपेक्षाही बलवान भयंकर आहे जो या मनावर नियंत्रण मिळवतो, तो देवांचाही देव होतो. (४८)

मनें आकळिलें सर्वांसी । परी मन नाकळे कोणासी ।
मनें छळिलें देवांसी । तें केवीं इंद्रियांसी आटोपे ॥ ६४ ॥
मनाने सर्वांना आपल्या आधीन केलेले आहे; परंतु मन मात्र कोणालाच आवरत नाही. मनाने देवांनाही छळिलें, तें इंद्रियांना कसें आवरणार ? ६४.

चंद्र अधिष्ठाता मनासी । मनें छळिलें चंद्रम्यासी ।
व्यभिचारोनि गुरुपत्नीसी । क्षयरोगी त्यासी मनें केलें ॥ ६५ ॥
मनाचे नियमन करणारा चंद्र आहे. पण मनाने त्या चंद्राला छळिले. त्या चंद्राला मनानेच गुरुपत्नीशी व्यभिचार करावयास लावून त्याला क्षयरोगी बनविले ६५.

ब्रह्मा अधिष्ठाता बुद्धीसी । मन ब्रह्मयाची बुद्धि भ्रंशी ।
निजपुत्री वारितां त्यासी । स्वकन्येसी अभिलाषी ॥ ६६ ॥
ब्रह्मदेव हा बुद्धीचा नियामक आहे. पण त्या ब्रह्मदेवाची बुद्धीही मनानेच भ्रष्ट केली, म्हणून त्याची कन्या त्याचे निवारण करीत असतांही ब्रह्मदेवाने त्या आपल्या कन्येचा अभिलाष केलाच ६६.

चित्तीं वासुदेवाचें अधिष्ठान । त्यातेंही हळूच ठकी मन ।
लावूनि वृंदेचें ध्यान । श्मशानीं जाण पाडिला ॥ ६७ ॥
 चित्तामध्ये वासुदेवाचे अधिष्ठान आहे. पण त्या वासुदेवालाही मनाने हळूच फसविले. त्याला वृंदेचें ध्यान लावून स्मशानांत पाडले ६७.

रुद्र अधिष्ठाता अहंकारीं । त्यातेंही मन सिंतरी ।
अभिलाषितां ऋषिनारी । शापिला ऋषीश्वरीं लिंगपातें ॥ ६८ ॥
रुद्र (महादेव ) हा अहंकाराचा नियामक आहे. पण त्यालासुद्धा मनाने फसविले. त्याने ऋषिपत्नीचा अभिलाष केला असता त्या महर्षीने शाप देऊन त्याचा लिंगपात केला! ६८.

ऐसें देवां दुर्जय जें मन । त्यासी आवरी इतर कोण ।
म्हणाल इंद्रियें नियमितील मन । तरी मनाधीन इंद्रियें ॥ ६९ ॥
असें देवांनासुद्धा जिंकण्याला कठीण जें मन, त्याला इतर कोण आवरणार ? आता तुम्ही म्हणाल की, इंद्रिये मनाचे नियमन करतील. पण ती इंद्रियेच मुळी मनाच्या आधीन असतात ६९.

जैं इंद्रियें धरोनि हातीं । मन एकाग्र होइजे अर्थीं ।
तेव्हा इतर इंद्रियाची स्थिती । राहे निश्चितीं सुनाट ॥ ६७० ॥
जेव्हां इंद्रियें स्वाधीन ठेवून मनच एकाद्या विषयांत एकाग्र होते, तेव्हा त्या ठिकाणी इतर इंद्रियांचे सामर्थ्य खरोखर निष्फळ होऊन राहाते ६७०.

इंद्रियविषयां होय संगती । ते काळीं जैं दुश्चिती मनोवृत्ती ।
तेव्हां न घडे विषयप्राप्ती । इंद्रियां स्फूर्ति स्फुरेना ॥ ७१ ॥
इंद्रिये आणि विषय ह्यांचे ऐक्य झाले, आणि त्या वेळी जर मनाची वृत्ति बदलली, तर ते विषय भोगावयास मिळत नाहीत. कारण इंद्रियांना उपभोगाची स्फूर्तीच स्फुरत नाही ७१.

जेव्हा अनासक्त मनोधर्म । तेव्हां इंद्रियांचें न चले काम ।
मनाअधीन । इंद्रियग्राम । इंद्रियां मनोनेम कदा न घडे ॥ ७२ ॥
मनाचे धर्मच जेव्हां आसक्तिरहित होऊन जातात, तेव्हां इंद्रियांची इच्छा कांहींच चालत नाही. कारण इंद्रियांचा सर्व समुदाय मनाच्या स्वाधीन असतो. म्हणून इंद्रियांकडून मनाचे नियमन कधीही घडत नाहीं ७२.

इंद्रियांचा राजा मन । इंद्रियें न चालती मनेंवीण ।
पुरुषातेंही मन आपण । वश्य जाण स्वयें करी ॥ ७३ ॥
मन हे इंद्रियांचा राजा आहे. इंद्रियें मनाशिवाय चालत नाहीत. पुरुषालासुद्धा मन हे आपण स्वतः वश करिते ७३.

अतिबळियां बळी मन । तेथ इंद्रियें बापुडिं कोण ।
मनाचें करावया दमन । नव्हे आंगवण वरिष्ठां ॥ ७४ ॥
मन हें  महान् बलाढ्यांतील बलाढ्य आहे. त्याच्यापुढे विचारी इंद्रिये ती काय ? मनाचे दमन करावयाला मोठमोठ्यांना सुद्धा धैर्य होत नाहीं ७४.

काळ निजसत्ता सर्व ग्रासी । परी मनाची लोंव नुपडे त्यासी ।
करितां उत्पत्तिस्थितिप्रळयांसी । मन काळासी नाटोपे ॥ ७५ ॥
काळ हा आपल्या सामर्थ्याने सर्व भक्षण करितो, परंतु मनाचे एक रोमसुद्धा त्याच्यानें उपटवत नाही. उत्पत्ति, स्थिति व प्रळय करण्यांतही मन काळाला देखील आटपत नाहीं ७५.

शस्त्रें न तुटे सर्वथा मन । त्यासी विरवूं न शकेचि जीवन ।
मन जाळूं न शके दहन । मनातें गगन शून्य करूं न शके ॥ ७६ ॥
मन हे शस्त्राने मुळीच तुटावयाचे नाही; पाणी देखील मनाला विरघळवू शकत नाहीं; अग्नीही मनाला जाळू शकत नाही; किंवा आकाश मनाला शून्यरूप करू शकत नाहीं ७६.

मनासी लागों न शके व्याधी । मन रोडेजे ऐशी नाहीं आधी ।
मन आकळावया सिद्धी । पाहतां त्रिशुद्धी दिसेना ॥ ७७ ॥
मनाला दुखणे लागू शकत नाहीं; मन रोडावेल असा कोणताही रोग नाही; मन ताब्यात ठेवता येण्यासारखी एकादी सिद्धि पाहूं गेलें असताही खरोखर कोठे दिसत नाहीं ७७.

मन ब्रह्मादिकांच्या रची कोडी । मन ब्रह्मांडें घडी मोडी ।
मन निजकल्पनाकडाडीं । नाचवी धांदडी त्रैलोक्या ॥ ७८ ॥
मन कोट्यवधि ब्रह्मदेव उत्पन्न करतें, मन ब्रह्मांडें उत्पन्न करते व ती नाहीशी करते; आणि मन आपल्या कल्पनेच्या कडकडाटाने सर्व त्रैलोक्याला जबरदस्तीने नाचविते ७८.

मन कळिकाळातें छळी । मन प्रळयानळातें गिळी ।
मन बळियांमाजीं अतिबळी । मनातें आकळी ऐसा नाहीं ॥ ७९ ॥
मन हें कळिकाळालासुद्धा छळते. मन हे प्रळयानळालाही गिळून टाकते. मन हे बलाढ्यांतील महाबलाढ्य आहे. मनाला ताब्यात ठेवील असा कोणी नाहीं ७९.

मन देवांसी दुर्धर । मन भयंकरां भयंकर ।
मनें आकळिले हरिहर । मनासमोर कोण राहे ॥ ६८० ॥
मन हे देवांनाही असह्य आहे. मन हे भयंकरांनाही भयंकर आहे. मनानें हरिहरांनासुद्धा ताब्यात ठेविले आहे. असल्या ह्या मनासमोर कोण टिकून राहील? ६८०.

मनाचा अनिवार मार । कोण राहे मनासमोर ।
मनास पर्जी ऐसा थोर । सुर नर असुर दिसेना ॥ ८१ ॥
मनाचा तडाखा निवारण करणे कठीण आहे. मनाच्या समोर 'कोण उभे राहणार ? मनाला जिंकील असा पराक्रमी देव, मानव, राक्षस, कोणी दिसत नाही ८१.

मनासी मेळवी हातोफळी । ऐसा त्रिलोकीं नाहीं बळी ।
मन कळिकाळातें आकळी । प्रळयरुद्रातें गिळी न माखतां दाढ ॥ ८२ ॥
मनाबरोबर दोन हात करील असा बलवान् त्रिभुवनांत नाही. मन हें  कळिकाळालासुद्धा ताब्यात ठेवितें. प्रळयरुद्राला दाढेला न लावतांच गिळून टाकतें ८२.

ऐसा मनाचा अगाध भावो । यालागीं यातें म्हणिजे देवो ।
मनाचा भयानकां भेवो । यालागीं भीष्मदेवो मनातें म्हणती ॥ ८३ ॥
मनाचा महिमा असा अगाध आहे, म्हणूनच ह्याला 'देव' असे म्हणतात. भयंकरांनाही मनाचे भय वाटने, म्हणूनच मनाला 'भीष्मदेव' असें म्हणतात ८३.

ऐशी मनाची अनावर स्थिती । यासी आकळावयाची सवर्म युक्ती ।
साचार सांगेन तुम्हांप्रती । सावधानस्थिती अवधारा ॥ ८४ ॥
अशी मनाची स्थिति मोठी अनावर आहे. ह्याला आटोक्यात आणण्याची युक्ति व तिचे धर्म तुम्हांला खरोखर सांगेन, सावधपणाने लक्ष देऊन श्रवण करा ८४.

जेवीं हिरेनि हिरा चिरिजे । तेंवी मनेंचि मन धरिजे ।
हेंही तैंचि गा लाहिजे । जैं गुरुकृपा पाविजे संपूर्ण स्वयें ॥ ८५ ॥
ज्याप्रमाणे हिऱ्यानेच हिरा कापतात, त्याप्रमाणे मनानेच मन आवरून धरावें. परंतु जेव्हां स्वतः पूर्णपणे गुरूची कृपा प्राप्त होते, तेव्हांच हेही प्राप्त होते ८५.

मन गुरुकृपेची आंदणी दासी । मन सदा भीतसे सद्गुरूसी ।
तें ठेवितां गुरुचरणापाशीं । दे साधकांसी संतोष ॥ ८६ ॥
मन हे गुरुकृपेपाशी आंदण दिलेली दासी आहे. मन हे सद्गुरूला नेहमी भीत असते. ते गुरूच्या पायांपाशीच ठेवले असता साधकांना संतोष देतें ८६.

या मनाची एक उत्तम गती । जरी स्वयें लागलें परमार्थीं ।
तरी दासी करी चारी मुक्ती । दे बांधोनि हातीं परब्रह्म ॥ ८७ ॥
ह्या मनाचा एक उत्तम गुण आहे. तो हा की, जर ते स्वतः परमार्थाकडे लागले, तर चारही मुक्तींना आपल्या दासी करून ठेविते, आणि परब्रह्मच बांधून हातांत देते ८७.

मनचि मनाचें द्योतक । मनचि मनाचें साधक ।
मनचि मनाचें बाधक । मनचि घातक मनासी ॥ ८८ ॥
मन हेच मनाचे प्रकाशक आहे, मन हेच मनाचे साधक आहे, मन हेच मनाला बाधक आहे, आणि मन हेच मनाला घातक आहे ८८.

जेवीं वेळु वाढवी वेळुजाळी । वेळुवेळुवां कांचणीमेळीं ।
स्वयें पाडूनि इंगळी । समूळ जाळी आपण्यातें ॥ ८९ ॥
ज्याप्रमाणे वेळू आपले वेळवांचे बेट वाढवितो, आणि एक वेळू  दुसऱ्या वेळूवर घांसला जात असतां आपणच विस्तवाची ठिणगी  पाडून आपल्यालाच समूळ जाळून टाकतो ८९, 

तेवीं मन मनासी चिंती मरण । तैं सद्गुरूसी रिघवी शरण ।
त्याचे वचनीं विश्वासोन । करवी गुरुभजन निरभिमानें ॥ ६९० ॥
त्याप्रमाणेच मन हेंच  मनाला मरण यावें असें चिंतील तेव्हांच ते सद्गुरूला शरण जावयास लाविते. आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवून निरभिमानपणाने गुरुभजन करविते ६९०.

सद्‌गुरुकृपा झालियां संपूर्ण । हें मनचि मनासी दावी खूण ।
तेणें निजसुखें सुखावोन । मनचि प्रसन्न मनासी होय ॥ ९१ ॥
पूर्ण सदुरुकृपा झाल्यावर हे मनच मनाला खूण दाखवून देते, आणि आपल्या सुखाने सुखी होऊन मनच मनावर प्रसन्न होते ९१.

मन मनासी झालिया प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभिमान ।
ऐसें साधकां निजसमाधान । मनें आपण साधिजे ॥ ९२ ॥
मनच मनावर प्रसन्न झाले असतां वृत्ति निरभिमान होते. याप्रमाणे मनाने आपणच साधकांना निजसमाधान साधून दिलें असें होतें ९२.

पावोनि गुरुकृपेची गोडी । मनोविजयाची निजगुढी ।
मनें उभवूनि लवडसवडी । दीजे रोकडी साधकांहातीं ॥ ९३ ॥
गुरुकृपेची गोडी लागल्यावर आपल्या मनोजयाची गुढी त्वरित उभी करून मनच ती प्रत्यक्ष साधकाच्या हातात देते ९३.

यापरी साधकांसी संपूर्ण । मन आपला विजयो दे आपण ।
शेखीं सद्‌गुरुनिजबोधीं पूर्ण । मन होय लीन निजात्मता ॥ ९४ ॥
याप्रमाणे साधकाला मन हेच आपला आपण पूर्णपणे जय करून देते, आणि शेवटी सद्गुरूच्या आत्मज्ञानांत मन हेच आत्मस्वरूपाने पूर्णपणे लीन होते ९४.

जेवीं कां सैंधवाचा खडा । रिघोनि सिंधूमाजिवडा ।
स्वयें विरोनियां रोकडा । सिंधूएवढा तो होय ॥ ९५ ॥
ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्राच्या पाण्यात शिरून स्वतः प्रत्यक्ष विरून जाऊन समुद्राएवढाच होतो ९५, 

यापरी साधक जाण । होतांच निरभिमान ।
स्वयें होती ब्रह्म पूर्ण । मीतूंपण गिळोनी ॥ ९६ ॥
त्याप्रमाणे साधकही निरभिमानी होतांच मीतूंपण नष्ट करून स्वतः पूर्णब्रह्म होतात हे लक्षात ठेव ९६.

मग त्याचिया निजदृष्टी । मीचि एक अवघे सृष्टीं ।
मावळली द्वंद्वत्रिपुटी । सुखदुःख पाठीं लागेना ॥ ९७ ॥
मग त्याच्या आत्मदृष्टीला सर्व सृष्टीत मीच काय तो एक भरलेला आहे असे दिसू लागते, द्वंद्वाची त्रिपुटी नाहीशी होते, आणि सुखदुःख पाठीला लागत नाहीं ९७.

तेथे कैंचें सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ।
कोण पंडित कोण मूर्ख । ब्रह्म एक एकलें ॥ ९८ ॥
तेथे कसले सुख आणि कसले दुःख ? कसला बंध आणि कसला मोक्ष ? पंडित कोण आणि मूर्ख कोण ? सर्वत्र एकटें एक ब्रह्मच ९८.

तेथ कोण देव कोण भक्त । कोण शांत कोण अशांत ।
मावळलें द्वैताद्वैत । वस्तु सदोदित स्वानंदें ॥ ९९ ॥
तेथें देव कोण आणि भक्त कोण? शांत कोण आणि अशांत कोण ? द्वैत-अद्वैत लयास जाते, आणि एक परब्रह्मच सदोदित स्वानंदरूपाने राहते ९९.

तेथ उगाणलें क्रियाकर्म । लाजा विराले धर्माधर्म ।
कैंचें अधम उत्तम मध्यम । परिपूर्ण ब्रह्म कोंदलें ॥ ७०० ॥
तेथें क्रिया आणि कर्म नाहीशी होतान ; धर्म आणि अधर्म लज्जेनेच नष्ट होतात ; तेथे कनिष्ठ, उत्तम, मध्यम तरी कसले ? परिपूर्ण ब्रह्मच सर्वत्र भरून राहाते ७००.

तेथ कैंचा शास्त्र कैंचा वेद । कैंची बुद्धी कैंचा बोध ।
निःशेष निमाला भेद । परमानंद कोंदला ॥ १ ॥
तेथे कसले शास्त्र आणि कसला वेद ? कसली बुद्धि आणि कसला बोध ? भेदच निखालस नाहीसा होतो, आणि आनंदस्वरूप परब्रह्मच भरून राहाते १.

यापरी मनोविजयें पहा हो । ऐशिया स्थिती पावला भावो ।
तेंचि स्वयें वदे देवो । ये अर्थीं संदेहो असेना ॥ २ ॥
अहो ! पहा. याप्रमाणे मनोविजयाने इतक्या स्थितीला भाव पोचतो. तेच स्वतः देवांनी सांगितले म्हणून ह्याविषयी संशय नाही २.

मनोजयाचा सद्भावो । ब्रह्मादिकां अगम्य पहा हो ।
जो स्वांगें करी स्वयमेवो । तो देवाधिदेवो निजबोधें ॥ ३ ॥
अहो ! पहा. मनोजयाची स्थिति ब्रह्मदेवादिकांनाही अगम्य आहे. असे असतां ती स्वत:च जो आपोआप प्राप्त करून घेतो, तो आत्मज्ञानाने देवाधिदेवच झाला असें समजावें ३.

जो निजमनातें जिंकोनी । जनीं पावला जनार्दनीं ।
तो धन्य धन्य त्रिभुवनीं । त्याचोनि अवनी पवित्र ॥ ४ ॥
ह्याप्रमाणे जो आपल्या मनाला जिंकून इहलोकांतच जनार्दनाशी ऐक्यरूप झाला, तो त्रिभुवनांत अत्यंत धन्य होय. त्याच्या योगाने पृथ्वी पावन होते ४.

तेणेंचि पूर्वज तारिले । तेणें सकळ कुळ उद्धरिलें ।
तेणेंचि परब्रह्म आंगविलें । जेणें जिंकिलें मनातें ॥ ५ ॥
त्यानेच पूर्वजांना तारले, त्यानेच सर्व कुळाचा उद्धार केला. ज्याने मनाला जिंकलें, त्यानेच परब्रह्माला आपलेसे करून घेतले ५.

मनोजयें जे अतिसमर्थ । शांति सर्वस्वें विकिली तेथ ।
त्यांसी सुखदुःखांचे आवर्त । गेले न लगत निजात्मता ॥ ६ ॥
मनोजयाने जे अत्यंत समर्थ झालेले असतात, तेथेच सर्वस्वी शांति ही विकलेली असते. त्यांना आत्मबोधाच्या योगाने सुखदुःखांचे भोंवरे न लागतांच निघून जातात ६.

ऐशी भिक्षूची निजवाणी । उल्हासें सांगे शार्ङ्गपाणी ।
उद्धवास म्हणे संतोषोनी । धन्य त्रिभुवनीं मनोजय ॥ ७ ॥
असें त्या भिक्षूने स्वतः केलेले भाषण मोठ्या उल्हासाने श्रीकृष्णाने सांगितले, आणि आनंदाने उद्धवास म्हणाला, मनोजय हा त्रिभुवनांत धन्य होय ७.

जेणें निजमनातें जिंकिलें । त्यासी मी किती वानूं बोलें ।
तेणें मज आपुलें पोसणें केलें । कीं विकत घेतलें उखितेंचि ॥ ८ ॥
ज्याने आपल्या मनाला जिंकलें, त्याचे शब्दांनी मी किती वर्णन करूं? त्याने मला आपला दास बनविलें, किंवा मला एकाएकी विकतच घेतले ८.

मज सुखरूपा त्याचेनि सुखप्राप्ती । मज नित्यतृप्ता त्याचेनि तृप्ती ।
मज अनंता त्यामाजीं वस्ती । मी दाटुगा त्रिजगतीं त्याचेनि ॥ ९ ॥
मला आनंदस्वरूपाला आनंद होतो. मला नित्यतृप्ताला त्याच्यामुळेच तृप्ति होते. मला अनंताला त्याच्या ठिकाणींच वस्ती असते. त्याच्यामुळेच मी त्रिभुवनांत बलवान् झालों ९.

'मी तो' या शब्दकुसरी । त्याही जाण आम्हांबाहेरी ।
आंतुवटे निजविचारीं । तोचि मी निर्धारीं निजऐक्यता ॥ ७१० ॥
'मी' आणि 'तो' हे बोलण्याचे जे कौशल्य आहे, ते सुद्धा आमच्या पलीकडे आहे. आपल्या अंत:करणांत आपण विचार केला तर आत्मैक्याने खरोखर तोच मी आहे ७१०.

मनोजयें हे पदवी प्राप्त । तो मनोजय न करूनि तेथ ।
प्राकृत रिपुजयें जे गर्वित । त्यातें निर्भर्त्सित स्वयें भिक्षुं ॥ ११ ॥
मनोजयाने एवढा अधिकार प्राप्त होतो. तो मनोजय न करितां इहलोकींच्या सामान्य शत्रूवर जय मिळविल्यामुळे जे गर्वाने फुगतात, त्यांची भिक्षु स्वतःच निर्भर्त्सना करीत आहे ११.

तं दुर्जयं शत्रुमसह्यवेगं अरुन्तुदं तं न विजित्य केचित् ।
कुर्वन्त्यसद्विग्रहमत्र मर्त्यैः मित्रण्युदासीनरिपून्विमूढाः ॥ ४९ ॥
[श्लोक ४९] मन जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे त्याचे रागादिक वेग असह्य आहेत ते मर्मस्थानेच घायाळ करते त्याला जिंकल्याशिवायच मूर्ख लोक दुसर्‍यांशी व्यर्थ भांडणे करून त्यांना शत्रू, मित्र किंवा उदासीन ठरवितात. (४९)

पार्थिव शत्रु सबळ येती । तेथ सामदानादिकां स्थिती ।
कारणीं लावोनियां ख्याती । जिंकिले जाती निजांगें ॥ १२ ॥
मोठमोठे बलाढ्य राजे शत्रु होऊन येतात, तेव्हां सामदामादिक उपाय योजण्यास वाव असतो, किंवा अखेर त्यांना पराक्रमाने स्वतः जिंकितां येते १२.

हे प्रकार मनाच्या ठायीं । करितां न चलती पाहीं ।
मनासी करावी शिष्टाई । तें कोणाचें कांहीं ऐकेना ॥ १३ ॥
पण हे प्रकार मनाच्या ठिकाणी योजिले असतां चालत नाहीत. मनापाशी मध्यस्थी करावी, तर ते कोणाचे काही ऐकतच नाही १३.

मनासी द्यावें विषयदान । परी विषयीं तृप्त नव्हे मन ।
तेणें अधिकचि होय दारुण । आवरी कोण तयासी ॥ १४ ॥
मनाला विषयांचे दान द्यावे, तर विषयांतही मन तृप्त होत नाही. उलट त्यामुळे ते अधिकच भयप्रद होते. त्याला आवरणार कोण? १४.

न चले शमदमादि प्रकारू । तरी मनासी करावा मारू ।
तेथ न चले हातियेरू । मारणीं विचारू स्फुरेना ॥ १५ ॥
शमदमादिक प्रकार त्याच्याजवळ चालत नाहीत, तेव्हां अशा त्या मनाला मारूनच टाकावें, तर त्याच्यावर हत्यार चालत नाही, आणि मारावयाचा विचार मनात येत नाही १५.

यापरी हा मनोवैरी । दुर्जयत्वें कठिण भारी ।
तो सुखदुःखांच्या भरोवरी । सर्वदा मारी जन्ममरणें ॥ १६ ॥
याप्रमाणे हा मनोरूप शत्रु अजिंक्यपणाने फार कठीण झाला आहे. तोच सुखदुःखाच्या सामग्रीने सदोदित जन्ममरणानेच मारतो १६.

इतर शत्रु नावरती । तरी पळों ये हातोहातीं ।
रिघोनियां गडदुर्गाप्रती । वांचती गती देखिजे ॥ १७ ॥
इतर शत्रु आवरतनासे झाले तर तत्काळ पळून जाता येते. डोंगरांतील किल्ल्यावर जाऊन आपला बचाव करण्याचा प्रयत्न करून पाहातां येतो १७.

परी पळावया मनापुढें । पळतां त्रैलोक्य होय थोडें ।
जेथ लपावें अवघडें । तेथही रोकडें मन पावे ॥ १८ ॥
पण मनाच्या पुढे पळावयास लागले तर पळता पळतां त्रिभुवनही पुरत नाही. ज्या अवघड ठिकाणी लपून बसावें, तेथेही मन साक्षात उभे राहतें १८.

मनाचे सेनापति शूर । कामक्रोधादि महावीर ।
त्यांचा मार अतिदुर्धर । घायीं थोरथोर लोळविती ॥ १९ ॥
कामक्रोधादि महान् महान् वीर मनाचे शूर सेनापति असून त्यांचा मारा फार असह्य आहे. ते तडाक्यासरसे मोठमोठ्यांना लोळवून सोडतात १९.

बाह्य शत्रु ते दूरदेशीं । येतां बहु दिन लागती त्यांसी ।
मनःशत्रु तो अंगेंसीं । अहर्निशीं जडलासे ॥ ७२० ॥
बाहेरचे शत्रू असतात ते दूर देशावर असतात. त्यांना आपल्याजवळ यावयाला बरेच दिवस लागतात. परंतु मनोरूप शत्रु अगदी आंगाशींच रात्रंदिवस भिडलेला असतो ७२०.

आसनीं भोजनीं एकांतीं । जपीं अथवा ध्यानस्थितीं ।
मनाची उडी पडे अवचितीं । विभांडी सर्वार्थीं वैराकरें ॥ २१ ॥
आसनावर, जेवतांना, एकांतांत, जप करतांना अथवा ध्यान करतांना मनाची अकस्मात् उडी येऊन पडते, आणि तें शत्रुत्वाने सर्वस्वी पराभव करितें २१.

बाह्य शत्रूचें अल्प दुःख । मनाची पीडा विशेख ।
जन्ममरणांचे आवर्त देख । मन आवश्यक भोगवी ॥ २२ ॥
बाहेरच्या शत्रूचे दुःख फार थोडे असते, पण मनाची पीडा मोठी असते. ते मन जन्ममरणांचे भोंवरे हटकून भोगावयाला लावते २२.

बाह्य शत्रु मरणात्मक । मन मरणासी अटक ।
हा वैरी न जिंकितां देख । जीवाचें अतिदुःख टळेना ॥ २३ ॥
बाह्य शत्रु मरणाधीन असतात, परंतु मन हे मरणालाही विद्या करिते. या मनरूपी शत्रूला जर जिंकलें नाही, तर जिवाचे मोठे दुःख टळावयाचे नाही २३.

मनाचे सवेग वेगासी । न साहवे सुरनरांसी ।
कष्टीं न जिंकवे कोणासी । यालागीं मनासी दुर्जयत्व ॥ २४ ॥
मनाच्या वेगवान् गतीला देवांना किंवा मनुष्यांनाही सहन करितां येत नाही. कोणी कितीही श्रम केले तरी त्या मनाला जिंकता येत नाही. म्हणूनच मनाला अजिंक्यपणा प्राप्त झाला आहे २४.

ऐशिया मनातें न जिंकित । बाह्य शत्रु जिणोनि येथ ।
जे होती अतिगर्वित । ते निश्चित जाण महामूर्ख ॥ २५ ॥
अशा मनाला न जिंकता केवळ जगामध्ये बाहेरचे शत्रु जिंकून जे अत्यंत गर्वाने फुगतात, ते खरोखरच महामूर्ख होत असे समज २५.

मनेंचि जिंकावें मनासी । हें गतश्लोकीं तुजपाशीं ।
सांगीतलें यथार्थेंसीं । मनोजयासी उपावो ॥ २६ ॥
मनानेच मनाला जिंकावें हें  मागच्या श्लोकांत तुझ्याजवळ यथार्थ रीतीने सांगितलेच आहे. तोच मनोजयाचा उपाय होय २६.

एवं मनातें ऐशियापरी । न साधवेचि करूनि वैरी ।
तरी मनासी करोनि मैत्री । मन सुखी करी मित्रत्वें ॥ २७ ॥
तात्पर्य, अशा रीतीने मनाला शत्रु बनवून मन जिंकणे साधत नसेल, तर मनाशी मैत्री करून मित्रभावानेच मनाला सुखी करावें २७.

प्राकृत मित्रांची मैत्री । उपकारीं प्रत्युपकारी ।
तेही विषयसुखावरी । येरयेर घरीं उचितानुकाळें ॥ २८ ॥
सामान्यतः मित्रांची मैत्री म्हटली म्हणजे एकाने उपकार केला तर उलट दुसऱ्याने उपकार करावयाचा, पण ती सारी मैत्री विषयसुखाची असते, आणि योग्य प्रसंगी ते एकमेकांच्या घरीही जातात २८.

तैशी नव्हे मनाची मैत्री । उपकारेंवीण प्रत्युपकारी ।
सकळ दुःखातें निवारी । सुखसागरीं नांदवी ॥ २९ ॥
तशी मनाची मैत्री नव्हे. ते कोणी उपकार न करतांच त्याच्यावर उपकार करते, आणि सर्व दुःखांचे निवारण करून सुखसागरामध्ये नांदविते २९.

प्राकृतीं अतिमित्रत्व ज्यासी । निजदुःख सांगतां त्यापाशीं ।
सर्वथा निवारेना त्यासी । म्हणे हें आम्हांसी असाध्य ॥ ७३० ॥
साधारणपणे ज्याच्याशी आपली अत्यंत मैत्री असते, त्याच्यापाशी आपले दुःख सांगितले असता तें काही त्याच्याने सर्वस्वी दूर करवत नाही. तो म्हणतो की, "हे आपल्याला असाध्य आहे" ७३०.

तैसें मित्रत्वा नव्हे मन । मना बैसवूनि सावधान ।
करितां निजदुःख निवेदन । हरी जन्ममरणमहाबाधा ॥ ३१ ॥
तशी कांहीं मनाची मैत्री नव्हे. मनाला नीट बसवून त्याला जर आपले दुःख सांगितले तर तें जन्ममरणाची मोठी पीडाही दूर करते ३१.

मरणभय असतां चित्तीं । कनककामिनींची आसक्ती ।
स्त्रिया अतिशयें निर्भर्त्सिती । तरी निर्लज्जवृत्ती लाजेना ॥ ३२ ॥
मरणाचे भय मनामध्ये असतांही कनक आणि कांता ह्यांची आसक्ति असते; ' स्त्रिया अतिशय निर्भर्त्सना करतात तरी निर्लज्ज वृत्तीला लाज वाटत नाही ३२; 

परदारा परधन । परद्रोहो परनिंदा जाण ।
लागल्या न सांडितां क्षण । नरक दारुण भोगावया ॥ ३३ ॥
परस्त्री, परद्रव्य, परद्रोह  व परनिंदा यांची एकदां संवय लागली असतां ती व्यसने एक क्षणभरही रिकामें बसू देत नाहीत, आणि भयंकर नरकवास भोगावयाला लावतात ३३.

उसंत नाहीं क्षुधेहातीं । द्वंद्वदुःखांची अतिप्राप्ती ।
नावरे इंद्रियवृत्ती । ऐसें मनाप्रती सांगतां ॥ ३४ ॥
क्षुधेपुढे तर मुळीच उशीर खपत नाही. द्वंद्वाची दुःखें तर काय एकावर एक येऊन कोसळतात. इंद्रियांची वृत्ति तर काहीं  आवरत नाही, असे मनाला सांगितलें असतां ३४, 

ऐसें ऐकतां स्वयें मन । वैराग्यें खवळे पूर्ण ।
वेंचूनि विवेकाचें धन । दुःखनिर्दळण करूं पावे ॥ ३५ ॥
तें ऐकतांना मन स्वतः वैराग्याने पूर्णपणे खवळते, आणि विवेकाचे द्रव्य खर्च करून दुःखाचा नाश करण्यास तयार होते ३५.

चोर भांडारी करित पूर्ण । चोर चोरातें निवारी जाण ।
तेवीं मनासीं करितां मित्रपण । मनाचे अवगुण मनचि नाशी ॥ ३६ ॥
चोर असेल त्यालाच जामदारखान्याचा संरक्षक नेमिलें असतां तो चोरच इतर चोरांचे निवारण करतो. त्याप्रमाणे मनाशीच मैत्री केली असता मनात असलेले दुर्गुण मनच नाहीसे करून टाकतें ३६.

अधर्मीं प्रवर्ततां आपण । मनचि मनासी निवारी जाण ।
असत्याची वाचेसी आण । आपण्या आपण मन घाली ॥ ३७ ॥
आपण अधर्मकृत्ये करण्यास प्रवृत्त झालों असतां मनच मनाला निवारण करते, आणि मन हे आपल्या आपणच वाणीला ' असत्य बोलू नकोस ' अशी शपथ घालते ३७.

कैशी मनाची मैत्री परम । निःशेष जाळावया कर्माकर्म ।
जोडावया चित्तशुद्धिचें वर्म । स्मरे हरिनाम अहर्निशीं ॥ ३८ ॥
मनाची मैत्री कशी श्रेष्ठ आहे ! कर्माकर्म निःशेष जाळण्याकरितां व चित्तशुद्धीचे वर्म समजून घेण्याकरिता ते रात्रंदिवस हरिनाम स्मरूं लागते ३८.

श्रीराम जयराम दों अक्षरीं । महापातका होय बोहरी ।
नाम न विसंबे क्षणभरी । अखंडाकारीं हरी स्मरे ॥ ३९ ॥
' श्रीराम जयराम' यांतील 'राम' ह्या दोन अक्षरांनीच महापातकाचा नाश होतो. ते मन त्या नामाला सोडून क्षणभरही विश्रांति घेत नाही. अखंड हरीचेंच स्मरण करतें ३९.

तेव्हां असत्याचें शीस तोडी । अधर्माची साली काढी ।
कल्पनेचे पाय मोडी । तटका तोडी आशेचा ॥ ७४० ॥
त्या वेळी ते असत्याचा शिरच्छेद करते; अधर्माची साल काढते; कल्पनेचे पाय मोडते; आणि आशेचा तटका तोडून टाकतें ७४०.

विकल्पाचा घरठाव मोडी । प्रपंचाचे दांत पाडी ।
अविश्वासू तीं ठायीं तोडी । विश्वासाची गुढी उभवी मन ॥ ४१ ॥
विकल्पाच्या घराचा नाश करते; प्रपंचाचे दांत पाडते; अविश्वासाचे तीन तुकडे करून टाकते आणि अखेरीस ते मन विश्वासाची गुढी उभारतें ४१.

ऐसेनि परिपक विश्वासीं । येऊनि सद्‌गुरुचरणांपाशीं ।
तनु मन धन सर्वस्वेंसीं । गुरुवचनासी विश्वासे ॥ ४२ ॥
अशा परि पक्व विश्वासाने सद्गुरूच्या पायांपाशी येऊन त्यांना शरीर, मन, धन इत्यादि सर्वस्व अर्पून गुरुवचनावर विश्वास ठेवितें ४२.

पूर्ण विश्वासाचें लक्षण । होतां गुरुवाक्यश्रवण ।
परीसीं लोह पालटे जाण । तैसें अंतकःरण पालटे ॥ ४३ ॥
पूर्ण विश्वासाचे लक्षण हेंच की, गुरूच्या उपदेशाचे श्रवण होतांच, ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शान लोखंडाचे स्वरूप बदलून त्याचे सोने होते, त्याप्रमाणे त्याचेंही अंतःकरण पालटते ४३.

गुरुवचन सांगोन राहे । परी मनींचें मनन न राहे ।
कीटकी भ्रमरी ऐसा पाहे । तद्रूप होये निदिध्यासें ॥ ४४ ॥
गुरूचा उपदेश सांगून झाला की तो संपतो, परंतु मनांतले मनन काही संपत नाही. कुंभारणीच्या ध्यासानें रूप बदलणाऱ्या अळीप्रमाणेच निदिध्यासाने तें मन तद्रूप  होते ४४.

तेव्हां कमनीय कामिनी धन । तें देखे विष्ठेसमान ।
निंदा द्वेष मानाभिमान । हे मनाचे अवगुण मनचि नाशीं ॥ ४५ ॥
त्यावेळी ते मन सौंदर्यसंपन्न स्त्री किंवा द्रव्य ही विष्ठेप्रमाणेच मानते. निंदा, द्वेष, मान, अभिमान, हे मनाचे दुर्गुण मनच नाहीसे करून टाकतें ४५.

धन्य धन्य मनाची मैत्री । विश्वास धरोनि निर्धारीं ।
जन्ममरण जीवें मारी । जीवातें करी अजरामर ॥ ४६ ॥
मनाची मैत्री फार धन्य ! पूर्णपणे विश्वास धरून ते जन्ममरणांना ठार मारिते  व जीवाला तरुण व अमर करून सोडते ४६.

ऐशी मनाशीं करितां मैत्री । मन परम उपकारी ।
जीवातें धरूनि निजकरीं । स्वानंदसागरीं बुडी दे ॥ ४७ ॥
अशा प्रकारे मनाशी मैत्री केली असतां मन हे फार उपकार करते, व जीवाला आपल्या हातात धरून आत्मानंदसमुद्रात बुडी देते ४७.

तेथ मनाचें मनपण सरे । जीवाचें जीवपण विरे ।
बंधमोक्षांची धांव पुरे । समूळ ओसरे भवभय ॥ ४८ ॥
त्या वेळी मनाचे मनपणच नाहींसें होते, जीवाचे जीवपणच विरून जाते, बंध-मोक्षांची धांव संपते, आणि संसारभय पूर्णपणे नाहीसे होते ४८.

मनाचें मित्रत्व यापरी । आपुलें कुळ स्वयें संहारी ।
आपणही मरे मित्रोपकारीं । मन मित्राचारीं अवंचक ॥ ४९ ॥
याप्रमाणे मनाची मैत्री आहे. ते मन आपला वंश आपण स्वत:च मारून टाकतें, आणि आपणही मित्रावर उपकार करण्यासाठी मरून जाते. असें मन हें मैत्रीमध्ये लबाडी न करणारे आहे ४९.

ऐसें मैत्रीसी मन सादर । जवळी असतां निरंतर ।
त्यातें वोसंडूनि पामर । प्राकृत नर मित्र करिती ॥ ७५० ॥
असें मैत्रीला आदरपूर्वक वश होणारे मन सदोदित जवळ असतां क्षुद्र लोक त्याला सोडून यःकश्चित् मनुष्याला मित्र करीत असतात ७५०.

वैर करोनि मनचि मारावें । मित्रत्वें मनें मन साधावें ।
इयें दोनीं जैं न संभवे । तैं उपेक्षावें मनातें ॥ ५१ ॥
मनाशी शत्रुत्व करून  मन मारून टाकावें , किंवा मैत्री जोडून  मनानेच मन वळवावें. आणि ही दोन्ही न घडतील तर मनाला मुळी सोडूनच द्यावें ५१.

मन म्हणेल तें न करावें । मनातें हातीं न धरावे ।
मनातें कांहीं नातळावें । जीवेंभावें निःशेष ॥ ५२ ॥
मन म्हणेल ते करू  नये, मनाला हाताशी धरूं नये, आणि जिवाभावाने मनाला मुळीच स्पर्शही करू नये ५२.

मन म्हणेल जें सुख । तें सांडावें आवश्यक ।
मन म्हणेल जें दुःख । तेंही निःशेख त्यजावें ॥ ५३ ॥
जे सुख आहे असें मन म्हणेल ते अवश्य सोडून द्यावे; आणि जें दुःख आहे असे मन म्हणेल तेंही निखालस टाकून द्यावें ५३.

ऐसें उदास मन देख । जो करी आवश्यक ।
तरी तो झाला अमनस्क । शांती अलोलिक ते ठायीं ॥ ५४ ॥
याप्रमाणे जो आपले मन अवश्य उदासवाणे करील; तो मनरहित झाला असे समजावे. त्या ठिकाणी अलौकिक शांति प्राप्त होते ५४.

शत्रु मित्र उदासीन । करूनि वश्य न करी मन ।
जो धरी देहाभिमान । त्याचें भवभ्रमण सरेना ॥ ५५ ॥
शत्रुत्वाने, मित्रत्वाने किंवा उदासीनपणाने वागून जो मनाला वश करणार नाही, आणि जो देहाभिमान धरून बसेल, त्याचे संसारचक्रांतील भ्रमण चुकावयाचें नाहीं ५५.

देहं मनोमात्रमिमं गृहीत्वा ममाहमित्यन्धधियो मनुष्याः ।
एषोऽहमन्योऽयमिति भ्रमेण दुरन्तपारे तमसि भ्रमन्ति ॥ ५० ॥
[श्लोक ५०] अविवेकी माणसे या केवळ मनःकल्पित शरीराला 'मीमाझे' मानून हा मी आणि हा दुसरा या भ्रमाने या शेवट नसलेल्या संसारात भटकत राहातात. (५०)

आत्मा विदेहो चिद्‌घन । तेथ मी देही हें मानी मन ।
त्या देहासवें मी-माझेपण । जन्ममरण सुखदुःखें ॥ ५६ ॥
आत्मा हा विदेही असून ज्ञानस्वरूप आहे. असे असतां मन हे मी देहधारी आहे असे मानते. त्या देहाबरोबरच मीपणा व माझेपणा उत्पन्न होऊन जन्ममरण व सुखदुःखें भोगावी लागतात ५६.

आत्मा नित्यमुक्त विदेही । तो मनाच्या एकात्मता पाहीं ।
विदेही तो म्हणवी देही । शेखीं देहाच्या ठायीं आत्मत्व मानी ॥ ५७ ॥
आत्मा हा नित्यमुक्त असून विदेही आहे. तो मनाशी एकरूप झाल्यामुळे, मूळचा विदेही असतांही मी देही आहे असे म्हणतो, आणि शेवटी देहाच्या ठिकाणींच आपलेपणा मानतो ५७.

मी देह हें मानी मन । तेणें दृढ होय देहाभिमान ।
तेव्हां देहचि होय आपण । मी-माझेपण ते ठायीं ॥ ५८ ॥
मी देह असें मन मानते, त्यामुळे देहाभिमान बळावतो, आणि तो आत्मा आपणच देहस्वरूप होऊन त्या देहाच्या ठिकाणी मीपणा व माझेपणा मानू लागतो ५८.

मी सच्चिदानंद परिपूर्ण । हें आपलें विसरे आपण ।
मी वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण । मूर्ख सज्ञान मी एक ॥ ५९ ॥
मी सच्चिदानंद व परिपूर्ण आहे हे आपले लक्षण तो आत्मा स्वत:च विसरतो आणि मी वैश्य, शूद, क्षत्रिय, ब्राह्मण आहे; किंवा मीच काय तो एक मूर्ख किंवा ज्ञाता आहे असे मानतो ५९.

मी रोडका बोडका कुब्ज काण । मी धाटामोठा विचक्षण ।
हे नाथिले घेऊनि देहगुण । माणुसपण स्वयें मिरवी ॥ ७६० ॥
मी रोडका, बोडका, कुबडा, तिरवा आहे; मी मोठा धीट आणि चाणाक्ष आहे; असे मिथ्या असलेले देहाचे गुण आंगी लावून घेऊन स्वत:च मनुष्यपणा मिरवतो ७६०.

स्वप्नामाजीं संन्यासी । आपण देखे अंत्यजवंशीं ।
तो आतळों मी ब्राह्मणासी । जीवास तैसी दशा झाली ॥ ६१ ॥
एकादा संन्यासी स्वप्नामध्ये आपण अंत्यजवंशांत जन्माला आलो आहों असें पहातो व त्यामुळे तो ब्राह्मणाला शिवावयाला भितो; तशीच दशा जीवाला झालेली आहे ६१.

स्वयें परमात्मा भेदशून्य । तेथ मी माझे स्त्री पुत्र धन ।
स्वजन दुर्जन उदासीन । त्रिविध भेद पूर्ण सत्यत्वें मानी ॥ ६२ ॥
परमात्मा स्वतः भेदरहित असा असून तो स्वत:च्या ठिकाणी मी, माझी स्त्री, माझा पुत्र, माझें द्रव्य इत्यादि मानितो; व आपले इष्टमित्र, दुर्जन, उदासीन इत्यादि जे त्रिविध भेद आहेत ते पूर्णपणे खरेच आहेत असे मानितो ६२.

ऐसी देहात्मभावसिद्धी । सत्य मानितां भेदविधी ।
जीवाची निजात्मबुद्धी । झाली त्रिशुद्धी आंधळी ॥ ६३ ॥
अशा प्रकारें देहात्मभाव सिद्ध झाला आणि भेदभाव खरेच आहेत असे वाटू लागले, म्हणजे जीवाची स्वतःची आत्मबुद्धि खरोखरच आंधळी झाली असे समजावें ६३.

जैसा स्वप्नींचा मिथ्या वेव्हार । तैसा मनःकल्पित संसार ।
तो मानितांचि साचार । देहअहंकार द्रुढ झाला ॥ ६४ ॥
ज्याप्रमाणे स्वप्नांतील व्यवहार खोटा; त्याप्रमाणेच मनाने कल्पिलेला संसार हाही खोटा आहे. तो खरा मानला, की देहाचा अहंकार बळावतो ६४.

दृढ होतां देहाभिमान । पुढती जन्म पुढती मरण ।
भवचक्रीं परिभ्रमण । निजभ्रमें जाण जीवासी ॥ ६५ ॥
देहाभिमान बळावला की पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण अशा प्रकारे संसारचक्रांतील परिभ्रमण जीवाला त्याच्याच भ्रमाने भोगावें लागते ६५.

जेवीं केवळ अग्नीप्रती । घणघाय कदा न लागती ।
तेचि लोहाचिया संगतीं । घण वरी घेत सुबद्ध ॥ ६६ ॥
ज्याप्रमाणे नुसत्या अग्नीला घणाचे घाव कधींच लागत नाहीत, पण तोच अग्नि लोखंडाच्या संगतीला लागला की आपल्या आंगावर अवजड घणाचे घाव मारून घेतो ६६,

तेवीं नित्यमुक्त परिपूर्ण । तेणें धरितां देहाभिमान ।
अंगीं लागलें जीवपण । जन्ममरण तेथें सोशी ॥ ६७ ॥
 त्याप्रमाणेच नित्यमुक्त व परिपूर्ण जो आत्मा, त्याने देहाभिमान धरिला असता, त्याच्या आंगी जीवपणा लागतो, आणि त्यामुळे तो जन्ममरण सोशीत बसतो ६७.

जेवीं डोळे बांधोनि व्यापारू । मंवे तेलियाचा ढोरू ।
तेवीं अहंकारें अंध नरू । परिभ्रमे थोरू भवचक्रीं ॥ ६८ ॥
ज्याप्रमाणे तेल्याच्या पाण्याचा बैल डोळे बांधलेले असल्यामुळे आंधळेपणानेच वाटोळा फिरत राहतो, त्याप्रमाणे मनुष्यही अहंकाराने आंधळा होऊन अफाट संसारचक्रांत फिरत राहतो ६८.

तेथ सोशितां जन्ममरण । अतिदुःखी होय आपण ।
तरी न सांडी देहाभिमान । अंधतमीं जाण तो घाली ॥ ६९ ॥
तेथे जन्ममरण सोशीत असता आपण अत्यंत दुःखी होतो, तरी देहाभिमान सोडीत नाही. आणि शेवटीं तो अभिमान त्याला अंधतम नरकांत नेऊन घालतो ६९.

ज्याचे दुःखें न पविजे पार । जो तरवेना अतिदुस्तर ।
जो भोग भोगवी अघोर । तो संसार मनोजन्य ॥ ७७० ॥
ज्याचे दुःख अपार आहे, तो दुस्तर असल्यामुळे तरूनही जाता येत नाही, जो अघोर भोग भोगावयास लावतो, तो संसार मन:कल्पितच होय ७७०.

मनचि सुखदुःखांसी कारण । हें आठवे श्लोकीं निरूपण ।
भिक्षु बोलोनि आपण । जनादि दुःखकारण मिथ्यात्वें दावी ॥ ७१ ॥
मन हेंच सुखदुःखांना कारण होय असें वर्णन आठव्या श्लोकांत भिक्षूनें  स्वतः सांगितलेच आहे. आता दुःखांना कारण लोक वगैरे होत असें जें म्हणतात, तेही खोटे असे दाखवितो ७१.

जनस्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत् किमात्मनश्चात्र हि भौमयोस्तत् ।
जिह्वां क्वचित्संदशति स्वदद्‌भिः ततद्वेदनायां कतमाय कुप्येत् ॥ ५१ ॥
[श्लोक ५१] मनुष्यच सुखदुःखाला कारणीभूत आहे असे मानले, तर त्याचा आत्म्याशी काय संबंध ? कारण सुखदुःख देणारेही भौतिक शरीर आणि भोगणारेसुद्धा भौतिक शरीरच ! एखादे वेळी आपल्या दातांनीच आपली जीभ चावली गेली आणि वेदना होऊ लागल्या तर त्या मनुष्याने कोणावर रागवावे ? (५१)

जननीजठरीं ज्यासी जनन । त्या नांव बोलिजेती जन ।
ते सुखदुःखांसी कारण । सर्वथा जाण मज नव्हती ॥ ७२ ॥
ज्याला जननीच्या उदरामध्ये जन्म घ्यावा लागतो, त्याला 'जन' हे नांव देतात. ते जन माझ्या सुखदुःखांना मुळीच कारण होत नाहीत ७२.

जन जनासी दे दुःखबाधू । तेथ आत्म्यासी काय संबंधू ।
आत्मा देहातीत शुद्धू । सुखदुःखबाधू त्या न लगे ॥ ७३ ॥
लोक लोकांनाच दुःख-पीडा देतात, त्याचा आत्म्याशी संबंध काय ? आत्मा देहाहून निराळा असून शुद्ध आहे. त्याला सुखदुःखांची बाधा लागत नाहीं ७३.

देहें देहासे होईल दुःख । देहो तितुका पांचभौतिक ।
त्यांसी परस्परें असे ऐक्य । सर्वथा सुखःदुख घडेना ॥ ७४ ॥
देहानें देहाला दुःख होईल म्हणावें, तर देह तितके पंचभूतात्मक आहेत. तेव्हा त्यांचे परस्पर ऐक्यच आहे. अर्थात त्यांनाही सुखदुःख मुळीच घडावयाचें नाहीं ७४.

जळामाजीं जळ सूतां । जेवीं जळासी नव्हे व्यथा ।
कां दीपू दीपें एकवटतां । दीपासी सर्वथा दुःख न बाधी ॥ ७५ ॥
पाण्यामध्येच पाणी ओतले असतां ज्याप्रमाणे पाण्याला काही दुःख होत नाहीं; किंवा दिव्याशी दिवा एकत्र मिळाला असतां दिव्यालाही मुळीच पीडा होत नाहीं ७५, 

तेवीं पार्थिवें पार्थिवासी । सुखदुःखबाधा न घडे त्यासी ।
आत्मा नातळे सुखदुःखांसी । तो देहासी स्पर्शेना ॥ ७६ ॥
त्याप्रमाणे देहाने देहाला (पार्थिव = पृथ्वीपासून झालेला देह) स्पर्श केला असता त्याला सुखदुःखांची पीडा होत नाही, आणि आत्मा हा देहाला शिवतही नसल्यामुळे सुखदुःखांनाही शिवत नाही ७६.

म्हणाल जीव जो देहाचा अभिमानी । सुखदुःखें होती त्यालागोनी ।
दुःखभोक्ता दुजेपणीं । पाहतां कोणी दिसेना ॥ ७७ ॥
आता तुम्ही म्हणाल की, जो जीव देहाचा अभिमानी आहे, त्यालाच सुखदुःखें होतात. कारण दुःखाचा भोक्ता निराळा असा पाहूं लागले असतां कोणीच दिसत नाहीं ७७.

आपुली जिव्हा आपुले दांतीं । रगडिली होय अवचितीं ।
तया कोपाची अतिप्राप्ती । कोणाप्रती करावी ॥ ७८ ॥
आपली जीभ अकस्मात आपल्या दांतांखाली चावली गेली, तर त्यामुळे आलेला मोठा संताप काढावा कोणावर? ७८.

तेथील कोपाच्या कडाडीं । दांत पाडी कीं जीभ तोडी ।
तैशी जगीं एकात्मता धडफुडी । कोप यावया सवडी असेना ॥ ७९ ॥
त्या वेळच्या संतापाच्या भरात तो दांत पाडतो की जीभ तोडतो? काही नाही. त्याप्रमाणे जगामध्ये सर्वच ऐक्य जर स्पष्ट दिसते आहे, तर राग यावयास काही कारणच नाहीं ७९.

जो पुढिलाचे ढक्यांनीं पडे । तो त्यावरी कोपें वावडे ।
स्वयें निसरोनि गडबडे । तो लाजिला मागेंपुढें न कोपतां निघे ॥ ७८० ॥
दुसऱ्याच्या धक्क्याने जो पडतो, तो त्या धक्का देणारावर रागाने हात उगारतो. पण जो स्वतःच निसरून गडबडा लोळू लागतो, तो लाजून मागेपुढे कोणावर न रागावतां चालता होतो ७८०.

तेवीं मीचि भूतें मीचि भोक्ता । माझ्या दुःखाचा मी दाता ।
जगीं मीच मी एकात्मता । कोणावरीं आतां कोपावें ॥ ८१ ॥
त्याप्रमाणे प्राणिमात्र मीच आणि भोग भोगणाराही मीच; माझे दुःख देणाराही मीच; जगामध्ये ऐक्यरूपाने मीच सर्वत्र भरलेलों आहे. आतां रागवावयाचें कोणावर? ८१.

माझ्या सुखदुःखांसी कारण । यापरी नव्हतीच जन ।
म्हणाल जरी देवतागण । तेंही प्रमाण घडेना ॥ ८२ ॥
 ह्याप्रमाणे माझ्या सुखदुःखांना लोक कारण नाहीतच. आता त्याला देवांचा समुदाय कारण असेल असें म्हणाल तर तेही प्रमाण खरें नाहीं ८२.

दुःखस्य हेतुर्यदि देवतास्तु किमात्मनस्तत्र विकारयोस्तत् ।
यदङ्गमङ्गेन निहन्यते क्वचित् क्रुध्येत कस्मै पुरुषः स्वदेहे ॥ ५२ ॥
[श्लोक ५२] दुःख देण्याला देवता कारण आहे असे मानले, तरी आत्म्याचा त्या दुःखाशी काय संबंध आहे ? कारण सर्वांच्या शरीरांमध्ये इंद्रियांच्या देवता एकच आहेत म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारीही ठरते जसे आपल्याच एका अवयवाने दुसर्‍या अवयवाला इजा केली, तर माणसाने कोणावर रागवावे ? (५२)

आतां दुसरें कारण मतीं । देवांपासोनि दुःखप्राप्ती ।
देवांची देहामाजीं वस्ती । आत्मा निजस्थितीं विदेही ॥ ८३ ॥
आता ज्या काही जणांच्या मताने दुसरेंच कारण आहे, ते म्हणतात-देवांपासून दुःखप्राप्ति होते. परंतु देवांची वस्ती देहामध्ये आहे, व आत्मा हा आत्मस्वरूपांत असून विदेहीच आहे ८३.

देहींच्या इंद्रियविकारीं । देव झाले अधिष्ठात्री ।
आत्मा अखंड अविकारी । सुखदुःखांमाझारी अलिप्त ॥ ८४ ॥
देहांतील इंद्रियांच्या विकारांना देवच नियामक होतात. आत्मा हा अखंड अविकारीच असतो. तो सुखदुःखांपासून अलिप्त असतो ८४.

भूमी सहजें निर्विकार । तिची भिंती तीवरी सविकार ।
तेवीं वस्तु नित्य निर्विकार । तेथ भासती सविकार अधिष्ठात्रीं देव ॥ ८५ ॥
भूमि ही स्वभावत: निर्विकारच आहे. तिचीच तिच्यावर घातलेली भिंत सविकार होय. त्याप्रमाणे ब्रह्म हे नित्य व निर्विकारच आहे. त्यांत नियामक देव असतात ते सविकार भासतात ८५.

भिंती पडल्या भूमिवरी । ते मेळवी आपण्यामाझारी ।
तेवीं निर्गुणनिर्विकारी । इंद्रियें अधिष्ठात्री येती ऐक्या ॥ ८६ ॥
भिंत जमिनीवर पडली, म्हणजे तिला जमीन आपल्यामध्ये एकरूप करते, त्याप्रमाणे निर्गुण व निर्विकार ब्रह्मामध्ये इंद्रियांच्या नियामक देवता एक होतात ८६.

स्वदेहीं परदेहीं जाण । इंद्रियें अधिष्ठात्रीं समान ।
इंद्रियांचें सुखदुःख दारुण । आपुलें आपण भोगिती देव ॥ ८७ ॥
आपल्या देहांत किंवा दुसऱ्याच्या देहांत इंद्रियांचे नियमन करणाऱ्या देवता सारख्याच आहेत. त्यामुळे इंद्रियांचे भयंकर सुखदुःख देव आपले आपणच भोगतात ८७.

हातें हाणतां तोंडावरी । तेथ इंद्र अग्नि अधिष्ठात्री ।
तेव्हा इंद्रचि अग्नीतें मारी । आत्मा अविकारी दुःखातीत ॥ ८८ ॥
हाताने तोंडावर मारले असता, तेथे अनुक्रमें इंद्र आणि अग्नि या नियामक देवता आहेत, म्हणून इंद्रच अग्नीला मारतो असे झाले. आत्मा अविकारी असल्यामुळे तो दु:खापासून अलिप्तच आहे ८८.

हो कां मुखें डसल्या हातासी । अग्नीनें घाय केलें इंद्रासी ।
आत्मा अलिप्त इंद्रादिदेवांसी । सुखदुःख त्यासी स्पर्शेना ॥ ८९ ॥
किंवा तोंडाने हाताचा चावा घेतला, तर अग्नीने  इंद्राला घायाळ केले असे होईल. आत्मा हा इंद्रादि देवांपासून भिन्न असल्यामुळे त्याला सुखदुःख शिवतच नाही ८९.

परमुखें स्वमुखावरी थुंकिजे । दोहीं मुखी अग्नीनें नांदिजे ।
तेथ कोणें कोणावरी कोपिजे । आत्मस्वरूपी दुजें असेना ॥ ७९० ॥
दुसऱ्याच्या तोंडाने आपल्या तोंडावर थुकी थुंकली, तर दोन्ही मुखांमध्ये अग्नीनेच आपले वास्तव्य केलेले असल्यामुळे अशा वेळी कोणी कोणावर रागवावें ? आत्मस्वरूपांत दुसरे कोणीच नाहीं ७९०.

थुंक आणि जें कां मूत । देहीं उपजे तें देहाचें अपत्य ।
तें देहींचें देहावरी लोळत । कोपे तेथ कोण कोणा ॥ ९१ ॥
थुका झाला काय, आणि मूत झाले काय, दोन्ही देहापासूनच झालेली असल्यामुळे देहाचीच अपत्ये होत. ती देहाची देहावर लोळतात, तेथे कोणी कोणावर रागवावें? ९१.

स्वमुखें परमुखा चुंबन दीजे । तेथ अग्नीनें अग्नीसी चुंबिजे ।
तेणें सुखें कोण फुंजे । आत्मत्वीं दुजें असेना ॥ ९२ ॥
आपल्या मुखाने दुसऱ्याच्या मुखाला चुंबन द्यावे, तर अनीनेच अग्नीचे चुंबन घेतले. त्या आनंदानें कोण फुगणार! कारण आत्मस्वरूपांत दुसरे कोणीच नाहीं ९२.

स्वदेहें परदेहा आलिंगन । उभयस्पर्शीं वायूचि जाण ।
तेणें सुखें सुखावे कोण । दुजेपण असेना ॥ ९३ ॥
किंवा आपल्या देहाने दुसऱ्याच्या देहाला आलिंगन दिले, तर त्या दोघांच्या स्पर्शामध्ये एकटा वायूच असतो. त्या आनंदाने आनंदित कोण होणार? कारण तेथे दुसरेपणाच मुळी असत नाहीं ९३.

यापरी देवतागण । नव्हे सुखदुःखांसी कारण ।
आत्म्याचे ठायीं दैवतें जाण । हारपती पूर्ण अभेदत्वें ॥ ९४ ॥
बावरून देवांचा समुदाय हा काही सुखदुःखांना कारण नाही. कारण, आत्म्यामध्येच सर्व देवतें अभेदपणाने लयास जातात ९४.

देवीं देहो पीडितां निःशेख । देहाभिमान्या होईल दुःख ।
हें मानिती ते अतिमूर्ख । तेंही देख घडेना ॥ ९५ ॥
देवांनी देह पूर्णपणे पीडित केला असतां देहाभिमान्याला दुःख होईल असे जे मानतात, ते अत्यंत मूर्ख होत. कारण, तसेंही कधी घडत नाही ९५.

पुर म्हणिजे देहो देख । ते पुरी जा पुरनिवासक ।
तो सकळ देहीं पुरुष एक । तेथ कोणाचें दुःख कोण मानी ॥ ९६ ॥
पुर म्हणजे देह, त्या देहांत जो देहनिवासी असतो, तो सर्वांच्या देहांमध्ये एकच पुरुष  आहे. असे असल्यामुळे कोणाचे दुःख कोण मानणार ? ९६.

जेवीं संभ्रम आवेशवेगीं । निजकर हाणतां निजांगीं ।
तेथील व्यथेचा भागी । कोपावयालागीं आप आपण्या ॥ ९७ ॥
ज्याप्रमाणे आवेशाच्या पाळ्यांत आपलाच हात आपल्या अंगावर जोराने मारिला असता तेथे होणाऱ्या दुःखाचे भागीदारही आपणच, किंवा रागावण्याचे भागीदारही आपले आपणच ९७.

देखतां आपलें एकपण । कोणाची व्यथा मानी कोण ।
कोण कोणावरी कोपे जाण । आपण्या आपण एकला ॥ ९८ ॥
सर्वत्र आपलेच ऐक्यपण दिसून आले असतां कोणाचे दुःख कोण मानणार ? कोण कोणावर रागावणार ? कारण सर्व काय तो एकीएक आपला आपणच ९८.

तेवीं विश्वात्मा मीचि एक । मीचि दैवतें मीचि लोक ।
तेथ कोण कोणा दुःखदायक । म्यां कोणावरी देख कोपावें ॥ ९९ ॥
त्याप्रमाणे मीच एक विश्वात्मा आहे, मीच दैवते आणि मीच लोक, तेव्हा कोण कोणाला दुःख देतो। आणि मी रागवावे तरी कोणावर? ९९.

यापरी स्वयें विचारितां । देवांपासाव सुखदुःखता ।
समूळ न घडे सर्वथा । दैविकी व्यथा असेना ॥ ८०० ॥
याप्रमाणे आपल्याशी विचार केला असता देवांपासून सुखदुःख सर्वस्वी मुळीच होत नाही, म्हणून दैविक दुःख असत नाही अशी खात्री होते ८००. 

आत्मा सुखदुःखांसी कारण । मूळीं मजचि हें अप्रमाण ।
आत्म्याच्या ठायीं कार्यकारण । सुखदुःख जाण असेना ॥ १ ॥
आत्मा हा सुखदुःखांस कारण आहे म्हणावें, तर ते मुळांत मलाच मान्य नाही. कारण, आत्म्याच्या ठिकाणी कार्यकारण व सुखदुःख ही असतच नाहीत १.

आत्मा यदि स्यात्सुखदुःखहेतुः किमन्यतस्तत्र निजस्वभावः ।
न ह्यात्मनोऽन्यद्यदि तन्मृषा स्यात् क्रुध्येत कस्मान्न सुखं न दुःखम् ॥ ५३ ॥
[श्लोक ५३] सुखदुःखाचे कारण आत्मा आहे असे मानले, तर त्याचा इतरांशी काय संबंध ? तो त्याचाच स्वभाव ठरेल कारण आत्म्याव्यतिरिक्त आणखी काहीही नाही काही भासमान होत असेल, तर ते खोटे आहे म्हणून सुखदुःखही नाहीत मग रागाचे कारणच काय ? (५३)

आत्मा केवळ एकला एक । तेथ कैंचें सुख कैंचें दुःख ।
आत्मा सुखदुःखदायक । म्हणती ते मूर्ख अविवेकी ॥ २ ॥
आत्मा हा केवळ एकटा एक आहे; तेथे कसलें सुख आणि कसले दुःख ! आत्मा हाच सुखदुःख देणारा आहे असे जे म्हणतात, ते मूर्ख व अविचारी होत २.

जेवीं विघुरलें घृत जाण । त्यासी नसे आकार ना वर्ण ।
तेंचि सहजें थिजोनि जाण । दिसे शुभ्रवर्ण कणिकारूपें ॥ ३ ॥
ज्याप्रमाणे पातळ झालेले तूप असलें म्हणजे त्याला आकारही नसतो आणि वर्णही नसतो, पण तेंच आपोआप थिजलें म्हणजे कण्याकण्यांच्या आकाराने पांढरें दिसू लागते ३, 

त्या घृतकणिका मिळतां देख । नाहीं परस्परें सुखदुःख ।
तेवीं निजात्मा एकला एक । तोचि अनेक स्वरूपें ॥ ४ ॥
व त्या तुपाच्या कण्या एके ठिकाणी मिळाल्या असता त्यांना परस्परांपासून सुखदुःख होत नाही. त्याप्रमाणे आपला आत्मा हा एकटा एकच असून तोच अनेक स्वरूपें धारण करतो ४.

जळीं जळाच्या जळलहरी । आदळतांही परस्परीं ।
सुखदुःख नुमटे त्यांमाझारीं । तेवीं चराचरीं परमात्मा ॥ ५ ॥
पाण्यामध्ये पाण्याच्या लाटा एकमेकींवर आदळल्या असता त्यांच्यामध्ये सुखदुःख उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणेच चराचरामध्ये परमात्मा असतो ५.

परमात्मा एकला एक । एकपणेंचि तो अनेक ।
तेथ विजातीय नाहीं देख । मा सुखदुःख कोणाचें ॥ ६ ॥
परमात्मा हा एकटा एक असून एकपणानेच तो अनेकविध होतो. म्हणून त्यांत निरनिराळेपणा नाही. मग सुख आणि दुःख कोणाचे? ६.

आत्मा सुखरूप अवघा एक । तेथ आभासे जें अनेक ।
तें मायामय काल्पनिक । स्वप्नप्राय देख मिथ्यात्वें ॥ ७ ॥
आत्मा आनंदस्वरूप असून सर्वत्र एकच आहे. त्यांत ज्या अनेकत्वाचा भास होतो, तें अनेकत्व मायामय असून काल्पनिक आहे. मिथ्या असल्यामुळे स्वप्नवत होय ७.

मृगजळीं पाहतां दिसे जळ । परी तें कोरडें देख केवळ ।
तेवीं दिसे जें जगड्वाळ । तें मिथ्या समूळ मायिक ॥ ८ ॥
मृगजळामध्ये पाहूं लागळे असतां पाणीच दिसते. पण ते निखालस कोरडेच असते. त्याप्रमाणे हे जे जग पसरलेले दिसते, ते मिथ्या व समूळ मायिक होय ८.

जेथ मिथ्या द्वैत मायिक । तेथ परमात्मा एकला एक ।
तेव्हांचि हारपलें सुखदुःख । कोपावया निःशेख ठावो नाहीं ॥ ९ ॥
जेथे मायामय मिथ्या भेदाभेद असतात, तेथे एकटा एक परमात्माच असतो. तेव्हां अर्थातच सुखदुःखें नाहींशी झाली, आणि राग करावयाला मुळीच जागा राहिली नाहीं ९.

जेथ निजात्मता एकपण । तेथ सुखदुःखें नाहीं जाण ।
कोणावरी कोपे कोण । आपल्या आपण एकला ॥ ८१० ॥
जेथे आपल्या आत्म्याच्या योगानेच सर्वत्र एकात्मता आहे, तेथें सुखदुःखें नाहीत हे लक्षात ठेव. सर्वत्र आपला आपण एकटाच असल्यामुळे कोण कोणावर रागावणार ? ८१०.

जेथ आत्म्याचा निजानुभवो । तेथ द्वैताचा अभावो ।
सुखदुःखें झाली वावो । कोपासी ठावो असेना ॥ ११ ॥
जेथें आत्म्याला स्वतःचाच अनुभव आला, तेथें द्वैताचा अभाव होतो; आणि सुखदुःखेही मिथ्या झाली, की त्यामुळे क्रोधालाही जागा राहात नाही ११.

हे निजात्मता नेणोनि देख । सत्य मानिती जे सुखदुःख ।
ते होत कां वेदशास्त्रज्ञ लोक । तयां क्रोध देख विभांडी ॥ १२ ॥
ही आत्मस्वरूपता न जाणतां जे लोक सुखदुःख खरे मानतात, ते लोक जरी वेदशास्त्रवेत्ते असले, तरी क्रोध त्यांची वाताहात करितो १२.

ज्यासी सर्व भूतीं निजात्मता । तेथ कोण कोणा दुःखदाता ।
कोण कोणावरी कोपता । निजात्मता एकली ॥ १३ ॥
सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी ज्याला आत्मभाव दिसतो, तेथे कोण कोणाला दुःख देणार १ आणि कोण कोणावर रागावणार ? कारण सर्वत्र एकटें आत्मस्वरूपच असते १३.

आत्मा सुखदुःखांचा दाता । यापरी नव्हे गा तत्त्वतां ।
आपण्या आपण व्यथा । मूर्खही सर्वथा न देती ॥ १४ ॥
ह्याप्रमाणे खरोखर आत्मा हा सुखदुःख देणारा नव्हे. कारण, अगदी मूर्ख असले तरी तेसुद्धा आपणच आपल्याला दुःख देत नाहीत १४.

एथिलेनि चौथे मतें । ग्रह मानावे दुःखदाते ।
तेंही न घडे गा येथें । ऐक निश्चितें सांगेन ॥ १५ ॥
यांतल्याच चौथ्या मताप्रमाणे ग्रह हे दुःख देणारे आहेत असे मानले, तर येथें तेंही खरोखर घडत नाही. ऐक. तुला निश्चितपणे सांगतों १५.

ग्रहा निमित्तं सुखदुःखयोश्चेत् किमात्मनोऽजस्य जनस्य ते वै ।
ग्रहैर्ग्रहस्यैव वदन्ति पीडां क्रुध्येत कस्मै पुरुषस्ततोऽन्यः ॥ ५४ ॥
[श्लोक ५४] सुखदुःख देणारे ग्रह आहेत असे मानले, तर अजन्मा अशा आत्म्याला सुखदुःख देण्यास कारणीभूत ठरू शकत नाहीत कारण जी शरीरे ज्या लग्नावर जन्मतात, त्यांनाच ग्रह त्रास देऊ शकतात आत्म्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याने तो क्रोध कोणावर करणार ? (५४)

जननीजठरीं जन्मे जाण । त्या देहाचें नांव म्हणती जन ।
ते जन्मकाळीं जें होय लग्न । त्या जन्मापासून पूर्ण ग्रहगति लागे ॥ १६ ॥
देह जननीच्या उदरामध्ये जन्म घेतो, म्हणून त्या देहाला 'जन' असें नांव देतात. त्या जन्मकाळी जे लग्न असते, त्या जन्मलग्नाला जन्मकालापासून ग्रहांची परिभ्रमणे सुरू होतात १६.

तेथ द्वादशाष्टमजन्मस्थ । शुभाशुभ ग्रह जे येत ।
ते सुखदुःखांतें देत । आत्मा अलिप्त ग्रहगतीं ॥ १७ ॥
त्यांत बारावा आठवा, जन्मस्थ अशा प्रकारें निरनिराळ्या स्थानी जे शुभाशुभ ग्रह असतात, तेच सुखदुःख देतात. परंतु आत्मा हा ग्रहांच्या गतींपासून अलिप्तच असतो १७.

मुळीं आत्म्यासी जन्म नाहीं । मा ग्रह लागती कवणे ठायीं ।
जेथ शेतचि पेरिलें नाहीं । तेथ उंदिरीं कायी करांडावें ॥ १८ ॥
आत्म्याला मुळीं जन्मच नाही, मग त्याला ग्रह लागणार कोठे ? जेथे शेत मुळी पेरलेलेच नाही, तेथे उंदरांनी कुरतडावयाचे काय ? १८.

मुख्यत्वें घर केलें नाहीं । तेथली माडी जळेल कायी ।
आत्म्यासी तंव जन्मचि नाहीं । मा ग्रहगती काई लागेल ॥ १९ ॥
मुख्यतः घरच मुळी बांधलेले नाही, तर त्याची माडी जळणार कशी? त्याप्रमाणे आत्म्याला तर जन्मच नाही; मग त्याला ग्रहांची शुभाशुभ फळे लागणार कशी ? १९.

ग्रहांची ग्रहगती देहापासीं । आत्मा अलिप्त देहभावासी ।
जेवीं काउळा न चढे कैलासी । तेवीं ग्रह आत्म्यासी न लागती ॥ ८२० ॥
ग्रहांची ग्रहदशा असते ती देहापाशी असते; आणि आत्मा हा देहभावापासून अलिप्त असतो. ज्याप्रमाणे कावळा कैलासावर चढत नाही; त्याप्रमाणे ग्रहही आत्म्याला लागत नाहींत ८२०.

जेवीं कां अग्नीतें न चाखे माशी । घारी झडपीना चंद्रम्यासी ।
तेवीं लागावया आत्म्यासी। सामर्थ्य ग्रहांसी असेना ॥ २१ ॥
ज्याप्रमाणे माशी विस्तवाला चाखून पहात नाही; किंवा घार कांहीं चंद्रावर झडप घालीत नाही, त्याप्रमाणे आत्म्याला लागण्याइतकें सामर्थ्य ग्रहांना असत नाही २१.

आत्मा सर्वाचा अवघा एक । तैं ग्रहांचा आत्मा तोचि देख ।
तया निजात्म्यासी देतां दुःख । ग्रह पीडी आवश्यक आपआपण्या ॥ २२ ॥
आत्मा हा सर्वांचा सर्वस्वी एकच आहे. तेव्हा ग्रहांचा आत्माही तोच होय. त्या आपल्याच आत्म्याला दुःख दिले असतां ग्रहांनी मुद्दाम आपल्यालाच आपण पीडा करून घेतली असे होईल २२.

देह जड मूढ अज्ञान । तें सुखदुःखांचें नेणे ज्ञान ।
आत्म्यासी सुखदुःख देतां जाण । तैं आपण्या पीडिती ग्रह ॥ २३ ॥
देह हा जड, मूढ आणि अज्ञानी आहे. तो देह सुखदुःखांचे ज्ञान मुळीच जाणत नाही. आतां आत्म्यालाच सुखदुःख देऊ  लागतील तर, ते ग्रह  आपणच आपल्याला पीडा देतात असे होईल २३.

आपणाचि आपणाप्रती । कदा न देववे दुःखप्राप्ती ।
यालागीं आत्म्यासी ग्रहगती । जाण कल्पांतीं बाधीना ॥ २४ ॥
आपणच आपल्याला कधीच दुख प्राप्त करून देववत नाही. म्हणून आत्म्याला ग्रहांची पीडा कल्पांती सुद्धा बाधावयाची नाही २४.

ग्रहग्रहांमाजीं वैरस्थिती । ग्रह ग्रहांतें पीडा देती ।
तेही अर्थींची उपपत्ती । यथानिगुती अवधारा ॥ २५ ॥
 ग्रहाग्रहांमध्ये वैरभावना आहेच. ग्रह  ग्रहांना पीडा देतात. त्यासंबंधीचंही विवेचन नीटपणे ऐका २५.

ज्योतिषशास्त्रसंमती शनि-भौमसूर्या वैरप्राप्ती ।
गुरु-शुक्र दोनी वैरी होती । बुध-सोमांप्रती महावैर ॥ २६ ॥
ज्योतिषशास्त्राच्या मताने शनीचे मंगळ व सूर्य यांच्याशी वैर आहे. गुरु आणि शुक्र हे एकमेकांचे शत्रु आहेत. तसेंच बुध आणि चंद्र यांच्यामध्येही मोठे वैर आहे २६.

तेथ एकांची ते शीघ्रगती । एक ग्रह मंदगामी होती ।
अतिचार कां वक्रगती । मंडळभेदें येती एकत्र ॥ २७ ॥
या ग्रहांमध्ये कांहीं ग्रहांची गति शीघ्र असते, तर कोणी मंदगतीने चालत असतात. कोणी अत्यंत जलद गतीने चालतात, तर कोणी वक्रगतीने मागेंच परत येत असतात. आणि कोणी दुसऱ्या ग्रहाच्या मंडलाचा भेद करून एकत्र येत असतात २७.

वैरी मीनल्या एके राशी । एके चरणीं एकत्रवासी ।
तैं राहु गिळी सूर्यासी । सूर्य चंद्रासी कुहू करी ॥ २८ ॥
परस्पर वैरी असलेले ग्रह एका राशीत जमले, ते एकाच नक्षत्रचरणांत येऊन एकत्र राहू  लागले, तर त्यांत राहु सूर्याचा ग्रास करतो आणि सूर्य चंद्राला लोपवून अमावास्या (काळोखी रात्र) करितो २८.

ऐसे ग्रहचि ग्रहांसी जाण । परस्परें पीडिती आपण ।
मी आत्मा त्यांहूनि भिन्न । सुखदुःख कोण मज त्यांचे ॥ २९ ॥
अशा रीतीने ग्रह हेच ग्रहांना परस्पर स्वतः पीडा देतात. परंतु मी आत्मस्वरूपी असून त्यांच्याहून भिन्न आहे, तेव्हा मला त्यांचे सुखदुःख काय २९.

अलंकार मोडितां खणाण । सोनें मोडेना आपण ।
तेवीं ग्रह ग्रहांसी पीडितां जाण । मज आत्म्यासी कोण सुखदुःख ॥ ८३० ॥
खणाखण सर्व दागिने मोडले तरी सोने असते ते स्वतः काही त्रास पावत नाही. त्याप्रमाणे ग्रह  हेंच प्रहांना पीडा देऊ लागले तर त्यांत मला आत्म्याला सुखदुःख कसले ? ८३०.

रणभूमीं युद्धझोटधरणी । होतां घायवट नव्हे धरणी ।
तेवीं ग्रहपीडेपासूनी । मी अलिप्तपणीं निजात्मा ॥ ३१ ॥
 रणांगणामध्ये युद्धाची हातघाई झाली असतां भूमि काहीं घायाळ होत नाही. त्याप्रमाणे मी आत्मस्वरूपी असल्यामुळे  ग्रहपीडेपासून अलिप्त असतों ३१.

रजस्वला चालतां भूमीसी । तो विटाळ बाधीना पृथ्वीसी ।
तेवीं ग्रहीं पीडितां ग्रहांसी । मी सुखदुःखांसी अलिप्त ॥ ३२ ॥
रजस्वला स्त्री जमिनीवरून चालली, म्हणून विटाळ पृथ्वीला बाधक होत नाही. त्याप्रमाणे  ग्रहांनी  ग्रहांना पीडा केली असतांही मी सुख:दुखांपासून अलिप्तच आहे ३२.

एवं ग्रहांनिमित्त जें कांहीं । सुखदुःख उमटे देहीं ।
तें मज आत्म्यासी न लगे कंहीं । मग कोणें पाहीं कोणा कोपावें ॥ ३३ ॥
तात्पर्य, ग्रहांपासून जे काही सुखःदुख देहांमध्ये उत्पन्न होते, ते मला आत्म्याला कधीच लागत नाही. मग असे पहा की, कोणी कोणावर रागवावें ? ३३.

सुखदुःख नुमटे ज्याच्या ठायीं । त्यासी क्रोधचि न ये कंहीं ।
एवं ग्रहनिमित्त दुःख कांहीं । सर्वथा नाहीं या हेतू ॥ ३४ ॥
ज्याच्या ठिकाणी सुख दुख उत्पन होत नाही, त्याला कधीं क्रोधच येत नाही. याच कारणाने ग्रहांमुळे काही मुळीच दु:ख होत होत नाही ३४.' 

सुखदुःखदातें निजकर्म । म्हणतां जनांसी पडे भ्रम ।
आत्मा केवळ निष्कर्म । त्यासी जड कर्म केवीं बाधी ॥ ३५ ॥
सुखदुःख देणारे आपलें कर्मच आहे असे म्हटले असता लोकांना भ्रम पडतो. पण वस्तुतः आत्मा हा केवळ निष्कर्म आहे , त्याला जड कर्म बांधणार कसें ३५.

कर्मास्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत् किमात्मनस्तद्धि जडाजडत्वे ।
देहस्त्वचित्पुरुषोऽयं सुपर्णः क्रुध्येत कस्मै न हि कर्ममूलम् ॥ ५५ ॥
[श्लोक ५५] जर कर्मांनाच सुखदुःखाचे कारण मानले तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध ? कारण जी एकच वस्तू चेतन व अचेतन असेत, तेथेच कर्म घडते देह अचेतन आहे आणि त्यात राहणारा आत्मा चेतन असला, तरी केवळ साक्षी आहे म्हणून कर्मच संभवत नाही मग तो कोणावर क्रोध करील. (५५)

कर्म जडत्वें अतिबद्ध । आत्मा चिद्रूपें परम शुद्ध ।
त्यासी कर्माचा कर्मबाध । सर्वथा संबंध धरीना ॥ ३६ ॥
कर्म जड असल्यामुळे अत्यंत बाधक आहे, माणि आत्मा हा ज्ञानस्वरूपी असल्यामुळे अत्यंत  शुद्ध आहे. त्याला कर्माचा कर्मदोष मुळींच लागत नाही ३६.

रवीसी अंधारीं लपवे । वणवा तृणामाजीं बांधवे ।
गोचिडाचेनि मुखलाघवें । जरी लागवे दीपासी ॥ ३७ ॥
सूर्याला जर अंधारांत लपून बसता येईल, वणवा जर गवतामध्ये बांधता येईल, किंवा गोचिडाला जर आपल्या मुखाने दिव्याला स्पर्श करता येईल ३७.

चंडवातातें तुष राखे । थिल्लरचिखलें चंद्र माखे ।
तैं कर्मजन्य सुखदुःखें । आत्मा यथासुखें बद्धता भोगी ॥ ३८ ॥
झंझावाताला जर कोंडा प्रतिबंध करील, डबक्यांतल्या चिखलाने जर चंद्र माखला जाईल, तर कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखाने आत्माही खुशाल बंधन पतकरील ३८.

आत्मा कर्माकर्म संहारी । सुख-दुःखांची होळी करी ।
तो कर्मफळांचा फळहारी । मूर्ख गव्हारीं मानिजे ॥ ३९ ॥
आत्मा हा कर्माकर्मांचा संहार करतो, व सुखदुःखांची होळी करून टाकतो. तो कर्मफळांचा उपभोग घेणारा आहे असें अडाणी मूर्ख असतील त्यांनीच मानावें ३९.

स्वप्नींची स्वप्नसंतती । जागृतीं कोणा भेटों येती ।
तरी कर्माची सुखदुःखप्राप्ती । आत्म्याप्रती बाधक ॥ ८४० ॥
स्वप्नांत झालेली  स्वप्नंसंतति जर जागेपणामध्ये कोणाला भेटावयास येत असेल, तरच कर्मापासून प्राप्त होणारी सुखदुःखें आत्म्यालाही बाधक होतील ८४०.

जेवीं अग्नीवरी मुंगी न चले । तेवीं आत्मा न माखे कर्ममळें ।
आकाश न खोंचे शस्त्रबळें । तेवीं आत्मा कर्मफळें स्पर्शेना ॥ ४१ ॥
ज्याप्रमाणे विस्तवावर मुंगी चालत नाही, त्याप्रमाणे आत्मा कर्माच्या फळाने लिप्त होत नाही. आकाशाला जसे शस्त्राच्या घावाने भोंक पडत नाही, त्याप्रमाणे आत्माही कर्मांच्या फळाला स्पर्श करीत नाही ४१.

कर्म तितुकें आविद्यक । आत्मा विद्याअविद्यातीत चोख ।
त्यासी कर्माचें सुखदुःख । मानिती मूर्ख देहमोहें ॥ ४२ ॥
कर्म म्हणून जितके आहे तितकें अविद्यात्मक आहे, आणि आत्मा हा विधे-अविद्येच्या पलीकडे असून अत्यंत निर्मळ आहे. त्याला कर्माचे सुखदुःख प्राप्त होतें असें मूर्ख लोक देहाच्या मोहामुळे मानतात ४२.

कर्म अतिजड आत्मा शुद्ध । कर्म परिच्छिन्न आत्मा अगाध ।
कर्म कर्मठतां नित्यबद्ध । आत्मा चिदानंदस्वरूप ॥ ४३ ॥
कर्म अत्यंत जड आहे, आणि आत्मा हा शुद्ध आहे. कर्म मर्यादित असून आत्मा अनंत आहे. कर्माला कर्मठता असल्यामुळे ते नित्य बद्ध आहे. आणि आत्मा चिदानंदस्वरूप आहे ४३.

कर्म मिथ्याभूत मायिक । आत्मा नित्य अमायिक ।
कर्मासी ब्रह्मअनोळख । ब्रह्म तेथ देख कर्म नाहीं ॥ ४४ ॥
कर्म मिथ्याभूत असून मायिक आहे, आणि आत्मा नित्य असून अमायिक आहे. कर्माला ब्रह्माची ओळख नाही, म्हणून ब्रह्म असते तेथें कर्म असत नाही ४४.

दोराचे सर्पी सर्पत्व नाहीं । मा तो डसोनि चढेल कायी ।
तेवीं स्वरूपीं कर्म मिथ्या पाहीं । तें आत्म्यासी कायी बाधील ॥ ४५ ॥
दोरीला सर्प मानिले असता त्या सर्वांत मुळीं सर्पपणाच नसतो, मग तो डसून  विष चढणार काय? त्याप्रमाणे स्वस्वरूपामध्ये कर्म हे मिथ्याच आहे. तेव्हां तें आत्म्याला बाघेल काय? ४५.

वांझ राणीचा लाडका नातू । राजबळें जगा दंडितू ।
तेवीं कर्माची सुखदुःखमातू । कर्मठांतू दाटुगी ॥ ४६ ॥
वांझ राणीचा लाडका नातू राजसत्तेने जगाला शासन करीत सुटतो, त्याप्रमाणे कर्माच्या सुखदुःखांच्या गोष्टी कर्मठांमध्येच काय त्या विशेष भरलेल्या असतात ४६.

एवं कर्माचि मिथ्या एथें । तें केवीं दे सुखदुःखांतें ।
हें जाणोनियां निश्चितें । कोणें कोणातें कोपावें ॥ ४७ ॥
तात्पर्य, येथे कर्म हेच मिथ्या होय. तें सुखदुःख कसे देणार ? हें निश्चितपणे जाणून घेतले म्हणजे मग कोणी कोणावर कोप करावा ? ४७.

कर्म सुखदुःखांचें दातें । यापरी न घडे एथें ।
म्हणाल काळ दे सुखदुःखांतें । तेंही निश्चितें घडेना ॥ ४८ ॥
ह्याप्रमाणे कर्म हें सुखदुःख देणारे होत नाहींच, तेव्हां सुखदुःख काळ देतो असें म्हणाल, तर तेही खरोखर घडत नाही ४८.

कालस्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत् किमात्मनस्तत्र तदात्मकोऽसौ ।
नाग्नेर्हि तापो न हिमस्य तत्स्यात् क्रुध्येत कस्मै न परस्य द्वन्द्वम् ॥ ५६ ॥
[श्लोक ५६ ] काळ हा सुखदुःख देणारा आहे असे मानले, तर काळ आणि आत्मा तर एकच होत अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडून त्रास दिला जाऊ शकत नाही जसा अग्नी आपल्याच ज्वाळेला जाळू शकत नाही किंवा बर्फाचा थंडपणा त्याच्या कणाचा नाश करून शकत नाही काळाहून आत्मा वेगळा मानला तरी आत्म्याला सुखदुःखात्मक द्वंद्व नाही मग तो कोणावर का रागावेल ? (५६)

काळ शीतकाळीं शीतें पीडी । उष्णकाळीं उबारा सोडी ।
वर्षाकाळीं पर्जन्य धाडी । त्रिमाळिकें पाडी धवळारें ॥ ४९ ॥
काळ हा थंडीच्या दिवसांत थंडीने पीडा करतो, उन्हाळ्यात उकाडा करतो, वर्षाकाळांत पाऊस पाडतो, आणि तीन तीन मजली वाडे जमीनदोस्त करून सोडतो ४९.

बैसवूनि सातवांकडी । अखंडधारा डोळा नुघडी ।
जीवमात्रा तेणें पीडी । पडे सांकडी अन्नाची ॥ ८५० ॥
सात सात दिवस पावसांची सारखी अखंड धार लागून डोळासुद्धा उघडू देत नाही. त्यामुळे प्रत्येक प्राणिमात्राला पीडा होते, आणि अन्नाची पंचाईत पडते ८५०.

अन्नाचिया चिडाणीं । पीडती पशुपक्षिप्राणी ।
ते काळीं सुखदुःख न मानी कोणी । दुखदाता जनीं निजकाळू ॥ ५१ ॥
अन्नाच्या दुर्मिळतेमुळे पशु, पक्षी व प्राणी व्याकुळ होतात. त्या वेळी सुखदुःख कोणीच मानीत नाही. कारण त्या वेळी जगामध्ये आपला काळ हाच दुःख देणारा असतो ५१.

अतिताप अतिशीत । सोडूनियां अतिवात ।
काळ जगातें खात । जग कांपत काळासी ॥ ५२ ॥
अतिशय उष्णता, अतिशय थंडी, किंवा अतिशय वारा सोडून काळ जगाला खात असतो. म्हणून जगही काळाला थरथर कांपत असते. ५२.

ऐकोनि काळाची गोठी । देव कांपती उठाउठी ।
इतरांची कायसी गोठी । धाके पोटीं विधाता ॥ ५३ ॥
काळाच्या पराक्रमाची गोष्ट ऐकली  की देवसुद्धा तत्काळ कांपत सुटतात. इतरांची गोष्ट कशाला ? प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा अंत:करणांत काळाला भीत असतो ५३.

अतिवृष्टि अनावृष्टि । जन पीडी नाना संकटीं ।
शेखीं प्रळयो करी उठाउठी । दुखदाता सृष्टीं महाकाळ ॥ ५४ ॥
अतिवृष्टि आणि अनावृष्टि करून नाना प्रकारच्या संकटांत काळ लोकांना पीडा देतो, आणि शेवटी तत्काळ प्रळय करून सोडतो. असा हा महाकाळ सृष्टीत दुःख देणारा आहे ५४; 

ऐसें बोलती ज्ञाते लोक । ते ज्ञातेपणें झाले मूर्ख ।
काळ तोचि ईश्वरू देख । सुखदायक सर्वांसी ॥ ५५ ॥
असे मोठमोठाले ज्ञाते लोक म्हणतात, पण ते ज्ञातेपणानेच मूर्ख झालेले असतात. कारण असे पाहा की, काळ तोच ईश्वर होय, आणि तो सर्वांना सुखदायकच आहे ५५.

ईश्वराहूनि काळ भिन्न म्हणे तो जड मूढ अज्ञान ।
काळ तोचि ईश्वर जाण । कृपाळू पूर्ण विश्वात्मा ॥ ५६ ॥
ईश्वराहून काळ निराळा असें जो म्हणतो, तो जड, मूर्ख व अज्ञानी होय. काळ तोच ईश्वर असे समज. तो विश्वात्मा असून पूर्णपणे कृपाळू आहे ५६.

काळ स्वकाळीं वर्षोनि जीवन । सुखी करी संतप्त जन ।
पृथ्वी निववूनियां जाण । नव धान्य वाफवी ॥ ५७ ॥
काळ हा यथाकाळी पाऊस पाडून संतप्त झालेले लोक सुखी करतो, आणि पृथ्वीला भिजवून नवे धान्य पेरण्याजोगी करितो ५७.

ते काळीं जैं शीत न वाहे । तैं वाफिलें धान्य राख होये ।
तेव्हां शीतकण वर्षोनि पाहें । करी लवलाहें सफळित धान्यें ॥ ५८ ॥
त्या वेळी जर शीतळ हवा राहाणार नाही, तर पेरलेले धान्य जळून त्याची राख होईल. म्हणून त्या वेळी दंव पाडून तत्काळ सर्व धान्ये फलद्रूप करतो ५८.

तीं आर्द्र धान्यें भूतांसी । उपेगा न येती संग्रहासी ।
यालागीं उष्ण काळेंसीं । काळ शोषी आर्द्रता ॥ ५९ ॥
ती पिकलेली धान्ये ओली असल्यामुळे लोकांना ती तशीच सांठवून ठेवण्याच्या उपयोगी येत नाहीत, म्हणून उन्हाळा करून काळ हाच त्यांतील ओलावा शोषून घेतो ५९.

यापरी शीतोष्णपर्जन्यांसी । काळ उत्पादी भूतहितासी ।
तेंचि कठिण वाटे त्यासी । देहभ्रमासी भुलोनि ॥ ८६० ॥
ह्याप्रमाणे प्राण्यांच्या हिताकरितांच थंडी, उन्ह, पाऊस ह्यांना काळ उत्पन्न करतो. परंतु देह हाच मी अशा भ्रमाने प्राणी भुलल्यामुळे तेंच त्याला दुःखदायक वाटते ८६०.

हिरोनि अतिजीर्ण वस्त्रांसी । नवीं नेसवी जो साक्षेपेंसीं ।
ऐशिया हितकारिया काळासी । वैरी पिशीं म्हणताती ॥ ६१ ॥
अत्यंत जुनी झालेली वस्त्रे काढून घेऊन जो आस्थेनें नवीं नेसवितो, अशा आपल्या कल्याणकर्त्या काळाला वेडे लोक शत्रु असे म्हणतात ६१.

तेवीं जराजर्जरित विकळ । तें देह निर्दळी सकाळें काळ ।
आणिक नवें दे तत्काळ । ऐसा कृपाळू काळ जनासी ॥ ६२ ॥
त्याचप्रमाणे वृद्धावस्थेनें जर्जर होऊन जो देह विगलित झालेला असतो, तो देह काळ योग्य वेळी नष्ट करतो, आणि तत्काळ नवा देह देतो. अशा प्रकारे काळ हा लोकांवर कृपा करणारा आहे ६२.

जुनें घेऊनि दे नव्यासी । ऐसा उपकारिया काळासी ।
अपकारी म्हणती पिशीं । देहमोहेंसीं लोभिटें ॥ ६३ ॥
जुने घेऊन नवें देतो अशा उपकारकर्त्या काळाला देहाच्या लोभाने लोभिष्ट झालेले वेडे लोक अपकारी असे म्हणतात ! ६३.

जन जैशिया निजभावना । जे जे धरी दृढ वासना ।
काळ कृपाळू तत्क्षणा । ते ते देह जाणा त्या देत ॥ ६४ ॥
मनुष्य जशा आपल्या भावनेने जी जी दृढ वासना धरतो, तसे तसे देह कृपाळू काळ त्याला तत्काळ देतो असें समज ६४.

महामहोत्साहें पिता पुत्रासी । सांडवूनि जीर्ण वासांसी ।
नवीं वस्त्रें दे तयासी । तेवीं जगासी प्रळयकाळू ॥ ६५ ॥
पिता मोठ्या आनंदाने पुत्राची जुनी वस्त्रं  काढून टाकून त्याला नवी वस्त्रे देतो, त्याप्रमाणेच प्रळयकाळ जगालाही नवीं नवीं रूपें देतो ६५.

तेवीं प्रळयकाळीं जगासी । काळ जीर्ण देह नाशी ।
मग नूतन देह सर्वांसी । अतिकृपेंसी गौरवी ॥ ६६ ॥
काळ हा प्रळयकाळी जगातील सर्वांचे जुने देह नाशून टाकून मग त्या सर्वांना अत्यंत कृपेने नवे देह देऊन त्यांचा गौरव करतो ६६.

यापरी काळ कृपाळू । त्यासी वैरी म्हणे जन बरळू ।
जगाचा निजात्मा स्वयें काळू । तो दुःखाचा सळू कोणासी नेदी ॥ ६७ ॥
अशा प्रकारे काळ कृपाळू आहे. मूर्ख लोक त्याला वैरी म्हणतात. काळ हा स्वतःच जगाचा खरा आत्मा आहे. तो कोणाचाच दुःखाने छळ करीत नाहीं ६७.

जनांचा देहीं दृढ भावो । भावनानुसारें काळ पहा हो ।
देहापाठीं उपजवी देहो । जन्ममरणनिर्वाहो तेणें वाढे ॥ ६८ ॥
अहो ! पाहा. लोकांची देहावरच पूर्ण भक्ति असते, तेव्हां काळही त्या लोकांच्या भक्तीप्रमाणेच देहामागून देह उत्पन्न करून ठेवतो, आणि त्यामुळेच हा जन्ममरणांचा उपद्व्याप वाढतो ६८.

जो साचार वांछी विदेहभावो । त्याचा काळ निर्दळी अहंभावो ।
निजानंदें निववूनि स्वयमेवो । जन्ममरणांचा ठावो विभांडी ॥ ६९ ॥
जो खरोखर विदेहभावनेचीच इच्छा धरतो, त्याचा अहंभाव काळ नष्ट करतो, आणि स्वतः आत्मानंदाने तृप्त करून जन्ममरणाचा ठावच मोडून टाकतो ६९.

जैशी ज्यासी होय बुद्धी । काळ तैशी दे त्यासी सिद्धी ।
हें नेणिजे देहमोहांधीं । काळ त्रिशुद्धी कृपाळू ॥ ८७० ॥
ज्याला जशी बुद्धि होते, तशीच त्याला काळ सिद्धि देतो. परंतु काळ हा खरोखर कृपाळू आहे हें  देहाच्या मोहाने आंधळे झालेले लोक मुळीच जाणत नाहीत ८७०.

काळ तोचि निजात्मा जनीं ऐसें जाणे जो निजज्ञानी ।
तैं कोणाचें दुःख कोण कां मानी । दुसरें कोणी असेना ॥ ७१ ॥
जगामध्ये काळ तोच आपला आत्मा होय. हे जो आत्मज्ञानी जाणतो तेथे कोणाचे दुःख कोण का मानणार ? कारण दुसरे असे कोणी असतच नाहीं ७१.

मी एक एथें दुःखदाता । पैल तो एक दुःखभोक्ता ।
हेही नाहीं द्वैतकथा । जगासी एकुलता निजात्मा काळ ॥ ७२ ॥
येथे मी एक दुःख देणारा आहे, आणि पलीकडे आहे तो एक दुःख भोगणारा आहे अशी ही द्वैताची गोष्टच नाही. कारण जगाचा एकुलता एक आत्मा तोच काळ होय ७२.

काळ निजात्मा दोनी एक । तैं कोणाचें कोणास होय सुख ।
कोण कोणाचा मानी शोक । द्वंद्वदुःख असेना ॥ ७३ ॥
काळ आणि आपला आत्मा हे दोन्ही एकच होत. तर मग कोणाचे सुख कोणाला होणार ? आणि कोण कोणाचा शोक मानणार ? कारण येथे द्वंद्वाचे दुःखच रहात नाहीं ७३.

जेवीं नाममात्र मृगजळ । तेथ नाहीं तिळभरी जळ ।
तेवीं आत्मत्वीं जगड्व्याळ । तो भ्रम केवळ मनाचा ॥ ७४ ॥
ज्याप्रमाणे मृगजळ हे फक्त नाव मात्र आहे; त्यांत थेंबभर देखील पाणी नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये जगाचा जो पसारा आहे, तो केवळ मनाचा भ्रम होय ७४.

आत्मा एकत्वें अभेद । काळनामें तोचि प्रसिद्ध ।
जीव तदंशें चिदत्वें शुद्ध । त्यासी काळादि द्वंद्व बाधिना ॥ ७५ ॥
आत्मा एकच असल्यामुळे त्यांत भेद नाही. तोच काळ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. जीव हा त्याचाच अंश असल्यामुळे ज्ञानस्वरूपाने शुद्धच आहे. म्हणून त्याला काळादिक द्वंद्व बाधत नाहीं ७५.

आगीनें काय आगी जळे । कां उन्हाळेनि सूर्य पोळे ।
सागरू बुडे लहरीबळें । कीं अंधारातें काळें काजळें कीजे ॥ ७६ ॥
आगीने काय आग जळते ? उन्हाळ्याने काय सूर्य पोळतो? लाटांच्या पराक्रमाने काय समुद्र बुडून जातो ? की काजळाने अंधाराला काळें केलें आहे ? ७६.

कीं हिमाचळ हिमकणें कांपे । तुपासी मोडशी होय तुपें ।
तैं काळसत्ता खटाटोपें । आत्मा अमूपें द्वंद्वें भोगी ॥ ७७ ॥
की हिमालय पर्वत बर्फाने कापूं लागतो ? तुपाला तुपानेंच मोडशी होते ? हे जर घडेल तरच काळसत्तेच्या खटाटोपाने आत्मा अनेक द्वंद्वे  भोगील ७७.

आप आपणियां आपदा । कोणा न करवे विरुद्धा ।
तेवीं आत्म्यासी द्वंद्वबाधा । काळाचेनि कदा करवेना ॥ ७८ ॥
आपणच आपल्याला विरुद्ध अशी आपत्ति कोणी आपणांवर आणीत नाही, त्याप्रमाणे आत्म्याला द्वंद्वाची बाधा काळाच्यानंही करवत नाही ७८.

एवं एकात्मता अभेद । तेथ काळाचा न चले बाध ।
अभेदीं सर्वथा नाहीं द्वंद्व । कोणावरी क्रोध करावा ॥ ७९ ॥
अशा प्रकारे जेथे एकात्मतेनें अभेद असतो, तेथे काळाचीही पीडा चालत नाही. अभेदामध्ये द्वंद्व मुळीच नाही, मग कोणावर राग करावयाचा ? ७९.

जीव-शिवत्वें मी केवळ । मीचि आत्मा मीचि काळ ।
मिथ्या द्वंद्वदुःखागोंधळ । क्रोधाचा कल्लोळ कोणावरी करूं ॥ ८८० ॥
जीव-शिवरूपाने केवळ मीच आहे. मीच आत्मा, आणि मीच काळ आहे. द्वंद्वदुःखांचा गोंधळ हा मिथ्या आहे. तेव्हां क्रोधाचा भडिमार कोणावर करूं? ८८०.

काळ सुखदुःखांचा दाता । यापरी नव्हे विचारितां ।
सुखदुःखांची बाधकता । आत्म्यासी सर्वथा असेना ॥ ८१ ॥
अशा प्रकारे विचार केला असता काळ हा सुखदुःखे देणारा ठरत नाही. कारण, सुखदुःखांची पीडा आत्म्याला मुळीच असत नाही ८१.

सुखदुःखादि हेतुषट्क् । 'नायं जनो' इत्यादिक ।
याचा करितां निजविवेक । नव्हती बाधक आत्म्यासी ॥ ८२ ॥
'नायं जनः. ' इत्यादि श्लोकांत ( अ. २३ श्लो. ४३) सुखदुःखांची जी सहा कारणे सांगितली आहेत, त्यांचा नीट विचार केला असता ती आत्म्याला बाधक होत नाहीत असे समजून येते ८२.

यांही वेगळीं बाधकपणें । देशवासें त्रिगुणगुणें ।
आत्म्यासी बाधावयाकारणें । कोठे कोणी दिसेना ॥ ८३ ॥
ह्याशिवाय देशवासाने किंवा त्रिगुणांच्या गुणाने बाधकपणाने आत्म्याला पीडा करावयाला कोणीच कोठे दिसत नाही ८३.

निजात्म्यासी बाधकता । कायसेनि न संभवे सर्वथा ।
जनासी बाधक देहअहंता । त्याचि निजार्था भिक्षु बोले ॥ ८४ ॥
आत्म्याला कशानेच कधी पीडा होण्याचा मुळींच संभव नाही. लोकांना देहाची अहंताच बाधक होते. तोच आपला अभिप्राय भिक्षु सांगत आहे ८४.

न केनचित्क्वापि कथञ्चनास्य द्वन्द्वोपरागः परतः परस्य ।
यथाहमः संसृतिरूपिणः स्याद् एवं प्रबुद्धो न बिभेति भूतैः ॥ ५७ ॥
[श्लोक ५७] प्रकृतीच्या पलीकडे आत्म्याला कोणाच्याही द्वारे, कोठेही, कोणत्याही प्रकारे, द्वंद्वाचा स्पर्श होत नाही जशी नसलेला संसार दाखविणार्‍या अहंकाराला सुखदुःखादी द्वंद्वे निर्माण होतात, असे ज्ञान झालेला योगी कोणालाही भीत नाही. (५७)

आत्मा गुणातीत शुद्ध । परात्परतर स्वानंद ।
परिपूर्ण सच्चिदानंद । तेथ द्वंद्वबाध रिघेना ॥ ८५ ॥
आत्मा हा गुणांहून भिन्न असून शुद्ध आहे. तो मायेच्या पलीकडचा असून आनंदस्वरूप आहे. तो परिपूर्ण सच्चिदानंद आहे. त्यांत द्वंद्वाची बाधा शिरत नाही ८५.

द्वंद्व रिघावया आत्मभुवनीं । कैसेनि कायिसेनि कोणाचेनी ।
कर्मकार्यक्रियाकरणी । बाधकपणीं असेना ॥ ८६ ॥
आत्ममंदिरांत द्वंद्व शिरण्याइतकें बाधक होईल अशा प्रकारचे कर्म, कार्य किंवा क्रिया कशीही, कशानेही व कोणाकडूनही होऊ शकत नाही ८६.

अभेदा नाहीं द्वंद्वबाध । स्वानंदासी दुःखसंबंध ।
पूर्णासी कैंचे विरुद्ध । परमानंद एकला ॥ ८७ ॥ ॥
अभेदाला द्वंद्वाची बाधा नाहीं; स्वानंदाला दुःखाचा संबंध नाहीं, परिपूर्णाला विरुद्ध कोण असणार ? परमानंद हा एकटा एकच असतो ८७.

आशंका ॥ आत्म्यासी न घडे द्वंद्वसंबंध । देहो जडत्वें नेणे द्वंद्वं ।
तरी सुखदुःखांचा महाबाध । कोणासी प्रसिद्ध होतसे ॥ ८८ ॥
(आशंका) आत्म्याला द्वंद्वाचा संबंध घडत नाही. आणि देह हा जड असल्यामुळे तो द्वंद्व जाणत नाही; तर मग ही सुखदुःखांची जी मोठी पीडा प्रसिद्ध आहे, ती होते तरी कोणाला ? ८८.

सुखदुःखभोगासी जाण । सोसावया जन्ममरण ।
एथ मुख्यत्वें देहाभिमान । तेंही लक्षण अतर्क्य ॥ ८९ ॥
(उत्तर) सुखदुःखांचे भोग भोगावयाला आणि जन्ममरण सोसावयाला, येथे मुख्यत्वेकरून देहाभिमान कारण आहे. पण त्याचे लक्षणही अतर्क्यच आहे ८९.

जेवीं असोनि भर्तारापाशीं । व्यभिचार करितां अहेवेसी ।
पोट वाढल्याही परपुरुषीं । तें कोणासी कळेना ॥ ८९० ॥
ज्याप्रमाणे नवऱ्यापाशी राहुन सुवासिनी स्त्रीने व्यभिचार केला असतां परपुरुषाकडून गर्भ राहिला, तरीही ते कोणाला समजत नाही ८९०,

तैसें अभिमानाचें विंदान । चित्स्वरूपीं जडोनि जाण ।
मिथ्या दावूनि जीवपण । सुखदुःखें आपण स्वेच्छा भोगी ॥ ९१ ॥
 त्याचप्रमाणे या अभिमानाचे आश्चर्य आहे. तो ज्ञानस्वरूपाशी एकरूप होऊन मिथ्या जीवपण दाखवून आपल्या इच्छेनेच आपण सुखदुःखें भोगतो ९१.

जेवीं रायापाशील कुडा मंत्री । राजबळें अधर्म करी ।
प्रजेतें छळी नानापरी । तैसा शरीरीं अभिमान ॥ ९२ ॥
ज्याप्रमाणे राजाच्या पदरी असलेला कपटी प्रधान राज्याधिकाराच्या जोरावर अधर्म करतो, नानाप्रकारांनी प्रजेला छळतो, त्याप्रमाणेच अभिमानही शरीरांत पाहिजे तें करीत असतो ९२.

कां अग्नीसंगें लोह जाण । अग्निप्राय होय आपण ।
तया हातीं धरूं शके कोण । पोळी दारुण सर्वांसी ॥ ९३ ॥
किंवा अग्नीच्या संगतीने लोखंड स्वतः अग्नीप्रमाणेच होते, त्याला कोण हातांत धरूं शकेल ? ते सर्वांना चांगलेच होरपळून टाकतें ९३.

तेवीं चिद्रूपाचा अभिमान । देहात्मता खवळोनि पूर्ण ।
सुखदुःखादी जन्ममरण । वाढवितां कोण आवरी ॥ ९४ ॥
त्याप्रमाणे ज्ञानस्वरूपाचा अभिमान देहात्मतेच्या योगाने पूर्णपणे खवळून सुखदुःखादिक जन्ममरण वाढवू लागला असता त्याला कोण आवरणार ? ९४. 

स्वप्नींचा देह केवळ मन । त्याही देहासी असे मनपण ।
तैसा हाही देहो मनचि जाण । अभिमानें कठिण स्थूळ केला ॥ ९५ ॥
 स्वप्नांतील देह म्हणजे केवळ मनाचा खेळ होय. त्या देहालाही मनपणा असतो. तसाच हा देहही मनच होय असे समज. तो अभिमानाने कठीण व स्थूल केला आहे ९५.

कार्यकारणरूपें जाण । संसारचि मनोभिमान ।
वाढवूनि सुखदुःख दारुण । जन्ममरण स्वयें भोगी ॥ ९६ ॥
तूं असे लक्षात घे की, कार्यकारणरूपाने संसार म्हणजेच मनाचा अभिमान होय. तो भयंकर सुखदुःख वाढवून जन्ममरण स्वतःच भोगतो ९६.

भोगिलेचि भोग भोगितां । नानापरींची पावे व्यथा ।
तरी न सांडी अहंता । देहात्मता वाढवी ॥ ९७ ॥
भोगलेलेच भोग भोगतांना नानाप्रकारचे त्रास पावतो तरी अहंता सोडीत नाही, व देहाचा आपलेपणाच वाढवितो ९७.

ब्रह्मप्रळय होतां जाण । देहअहंता नव्हे क्षीण ।
प्रळयीं विरेना अभिमान । सुखदुःख जाण तो भोगी ॥ ९८ ॥
ब्रह्मप्रलय झाला, तरीसुद्धा देहाची अहंता नाहीशी होत नाही, प्रलयामध्येसुद्धा अभिमान नाहीसा होत नाही. तो सुखदुःख भोगतो ९८.

यामाजीं जीव असे कैसा । जपाकुसुमीं स्फटिक जैसा ।
दिसोन त्या रंगाऐसा । स्वयें तैसा होयेना ॥ ९९ ॥
या अभिमानांत जीव कसा असतो ! तर जसा जास्वंदीच्या फुलावर स्फटिक ठेवल्यावर तो स्फटिक , त्या फुलाच्या रंगासारखा दिसत असून स्वतः मात्र तसा होत नाही ९९.

आत्मत्वीं सुखदुःख नाहीं । तें प्रत्यक्ष दिसताहे देहीं ।
हें अविचाररमणीय पाहीं । कल्पनेच्या ठायीं आभासे ॥ ९०० ॥
आत्मस्वरूपांत सुखदुःख नाही. ते देहामध्ये प्रत्यक्ष दिसते. हे सुखदुःख अविचारामुळे रमणीय वाटते व कल्पनेमध्येच भासते ९००. 

तें देह माझें म्हणोनि तत्त्वतां । अभिमानें घेऊनि माथां ।
जन्ममरणादि आवर्तां । सुखदुःखभोक्ता स्वयें होय ॥ १ ॥
तो देह खरोखर माझा असें म्हणून अभिमानाने मस्तकावर घेऊन जन्ममरणादिक भोवऱ्यात  सुखदुःखांचा स्वत:च भोक्ता होतो १. 

येणेंचि विवेकें निजज्ञानी । प्राप्ततत्त्व गुरुवचनीं ।
ते वर्ततांही जनींवनीं । देहाभिमानी कदा नव्हती ॥ २ ॥
ह्याच विचाराने जे आत्मज्ञानी असतात त्यांना गुरूपदेशाने पूर्णपणे तत्त्वज्ञान ठसलेले असल्यामुळे ते जनांत किंवा वनांत कोठेही राहिले असतां कधीही देहाभिमानी होत नाहींत २.

ऐसे प्रबुद्ध जे आत्मप्रतीतीं । त्यांसी प्रारब्धाचिये निजगती ।
नाना सुखदुःखें देतां भूतीं । आत्मस्थिती ढळेना ॥ ३ ॥
असे जे आत्मस्वरूपाच्या अनुभवाने शहाणे झालेले पुरुष असतात, त्यांना प्रारब्धाच्या गतीने प्राणिमात्रांनी अनेक प्रकारची सुखदुःखें दिली असा त्यांची आत्मस्वरूपस्थिति ढळत नाही ३.

त्यांसी द्वेष नुपजे भूतीं । कोप सर्वथा न ये चित्तीं ।
मी एक त्रिजगतीं । जाणोनि निश्चितीं निर्द्वंद्व ॥ ४ ॥
त्यांना प्राणिमात्राच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न होत नाही व त्यांच्या मनांत मुळीच राग येत नाही. त्रिभुवनामध्ये मीच एक भरलेला आहे असे समजून ते निश्चितपणे द्वंद्वरहित असतात ४.

तो देखोनियां विषमासी । भय न धरी मानसीं ।
पारकें न म्हणे कोणासी । आप्त सर्वांसी निजात्मा ॥ ५ ॥
असा मनुष्य संकट पाहून मनामध्ये भय धरीत नाही, आणि कोणाला परकी असे समजत नाही.  सर्वच आत्मस्वरूप असल्याने तो सर्वांबरोबर आप्तपणानेच असतो ५.

समविषमभाव ना भेद । ज्ञाता सर्वरूपें अभेद ।
तो न मानीं कोणाचा भयखेद । सुखस्वानंद सर्वदा ॥ ६ ॥
ज्ञाता हा सर्वस्वी भेदरहित असतो. त्याला समविषमभाव व भेद हे असत नाहीत. तो कोणाचें भयही मानीत नाही व कोणाचा खेदही करीत नाही. तो सदोदित सुखांत आणि आत्मानंदांतच निमग्न असतो ६.

निंदाउपद्रव अनुद्विग्न । साहोनियां सुखसंपन्न ।
हें सिद्धाचें मुख्य लक्षण । तेंचि साधन साधकां ॥ ७ ॥
निंदा किंवा उपद्रव झाला तरी उद्विग्न न होतां सर्व सहन करून सुख प्राप्त झाल्याप्रमाणे राहावयाचे, हेच सिद्धाचे मुख्य लक्षण होय, आणि साधकांना साधनही तेच होय ७.

एतां स आस्थाय परात्मनिष्ठां अध्यासितां पूर्वतमैर्महर्षिभिः ।
अहं तरिष्यामि दुरन्तपारं तमो मुकुन्दाङ्घ्रिनिषेवयैव ॥ ५८ ॥
[श्लोक ५८] प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्मनिष्ठेचा आश्रय घेतला होता, तिचाच आश्रय घेऊन मी भगवंतांच्या चरणकलांच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईन. (५८)

माझ्या पूर्वापरभाग्योदयें । अद्वैतात्मनिष्ठा उपजलीं पाहें ।
जे निष्ठेचेनि समवायें । नाना दुःखें साहें निर्द्वंद्व ॥ ८ ॥
हे पाहा ! माझ्या पूर्वपुण्याच्या भाग्योदयाने अद्वैतस्वरूप आत्मनिष्ठा माझ्या ठिकाणी उत्पन्न झाली. त्या आत्मनिष्ठेच्याच आश्रयाने मी द्वंद्वरहित होऊन अनेक प्रकारची दुःखें सहन करीत आहे ८.

द्वंद्वसुखदुःखसहिष्णुपण । हें सिद्धाचें सहज लक्षण ।
माझें मुख्यत्वें हेंचि साधन । मनोजयो जाण येणें होये ॥ ९ ॥
भेदभावापासून होणारी सुखदुःखें सहन करण्याचा गुण हेच सिद्धांचे स्वाभाविक लक्षण आहे. माझें मुख्यतः हेच साधन आहे. याच्याच योगाने मनोजय होतो ९.

हेंचि परमार्थसाधन वरिष्ठा । हेचि महाऋषींची निजनिष्ठा ।
हेंचि निजभजन वैकुंठा । निजात्मनिष्ठा येणें साधे ॥ ९१० ॥
हेंच परमार्थाचें श्रेष्ठ साधन होय. मोठमोठ्या ऋषींची हीच आत्मनिष्ठा होय. विष्णूचें मुख्य भजन ते हेच होय. याच्या योगानेच आत्मनिष्ठा साध्य होते ९१०.

येणें न बाधे द्वंद्वदुःख । येणें पाविजे नित्यसुख ।
दुस्तर संसारतारक । हा निजविवेक आम्हांसी ॥ ११ ॥
ह्याच्या योगाने द्वद्वांपासून होणारे दुःख बाधत नाही. ह्याच्याच योगाने नित्य सुख प्राप्त होते. हाच आत्मविवेक आम्हांला दुस्तर संसारांतून तारणारा आहे ११.

दुस्तर तरावया भवसागरू । हा विवेकू सुकल्प तारूं ।
एथ सद्गुरू कर्णधारू । परात्परपारू पाववी ॥ १२ ॥
संसारसमुद्र तरून जावयाला फार कठीण आहे, तरी तो तरून जाण्याला आत्मविवेक हे उत्तम तारूं आहे. त्यांतील सद्गुरु हा सुकाणूंवाला मायेच्या पैलतीराला पोचवितो १२.

हा विवेक कैसेनि ये हाता । हेही करणें न लगे चिंता ।
निजभावें एकाग्रता । शरण भगवंता रिघावें ॥ १३ ॥
हा आत्मविवेक हाती कसा येईल ? ही देखील चिंता करावयास नको. आत्मभावनेने एकाग्रता करून भगवंताला शरण जावें १३.

सांडोनि लौकिकाचे लाजे । सांडोनि अभिमानाचें ओझें ।
भगवंता शरण रिघिजे । तैं लाहिजे विवेक ॥ १४ ॥
लौकिकाची लाज सोडून व अभिमानाचे ओझें फेंकून देऊन भगवंताला शरण जावें, तेव्हां आत्मविवेक प्राप्त होतो १४.

तानें बाळ जेवीं जननीसी । अनन्य शरण सर्वभावेंसीं ।
ऐशिया अनन्यता अहर्निशीं । शरण हरिसी रिघावें ॥ १५ ॥
ज्याप्रमाणे तान्हें मूल आईला सर्वतोपरी अनन्यभावाने शरण जाते, तशा अनन्यभावाने रात्रंदिवस श्रीहरीला शरण जावें १५.

हरीसी रिघालिया शरण । मुख न दाखवी जन्ममरण ।
तेथ बाधूं शके द्वंद्व कोण । हरि रक्षण निजभक्तां ॥ १६ ॥
हरीला शरण गेले असतां जन्ममरण तोंडसुद्धा दाखवीत नाही. हरीच आपल्या भक्तांना रक्षण करणारा असल्यामुळे तेथे कोणते द्वंद्व पीडा देऊ शकेल ? १६.

मोक्षदाता मुकुंद पूर्ण । त्यासी कैसें रिघावें शरण ।
तो अनंतत्वें निजनिर्गुण । तेथ कोण पावेल ॥ १७ ॥
श्रीहरि हाच पूर्णपणे मोक्षदाता आहे. त्याला शरण कसे जावें ? तो अनंतस्वरूप असूनही स्वतः निर्गुण आहे. तेथे कोण जाणार ? १७.

असो हरिरूप अतिनिर्गुण । त्याची मूर्ति चिंतितां सगुण ।
ध्यानीं स्थिरावल्या संपूर्ण । द्वंद्वदुःखें जाण हारपती ॥ १८ ॥
परंतु हरीचे स्वरूप अत्यंत निर्गुण असले तरी त्याच्या सगुण मूर्तीचे चिंतन केले असता तीच सर्व मूर्ति जरी ध्यानात ठसली, तरी देखील द्वंद्वापासून होणारी सर्व दुःखें लयास जातात म्हणून समजावें १८.

ध्यानीं मूर्ति न ये संपूर्ण । तैं दृढ धरावे हरीचे चरण ।
तेणें उठोनि पळे जन्ममरण । आपभयें आपण पळती द्वंद्वें ॥ १९ ॥
श्रीहरीची संपूर्ण मूर्ति ध्यानात न भरेल, तर श्रीहरीचे पायच नीट ध्यानांत धरावेत, म्हणजे तेणेकरून जन्ममरण उठून पळून जाते आणि भेदाभेदही आपल्याच भयाने स्वतः पळून जातात १९.

जैं न धरवती दृढ चरण । तैं करावें नामस्मरण ।
ज्याचेनि नाममात्रें जाण । यम काळ पूर्ण कांपती ॥ ९२० ॥
जर ते पायही ध्यानात नीट धरवले नाहीत, तर नास्ममरण करावें. ज्याच्या नामस्मरणाने यम आणि काळ हे पूर्णपणे थरथर कांपतात ९२०.

जेथ हरिनामाचा नित्य घोख । तेथ मरणा मरण आलें देख ।
जन्माचें होय काळें मुख । लाजोनि निःशेख तें पळे ॥ २१ ॥
जेथें हरिनामाचा नित्य घोष चालतो, तेथे मरणालाच मरण आले असे समजा. जन्माचे तोंड काळे  ठिक्कर  होते, आणि तें लाजून पार पळून जातें २१.

रामनामाच्या गजरापुढें । काइसें द्वंद्वदुःख बापुडें ।
अवघें भवभयचि उडे । नामपवाडे गर्जतां ॥ २२ ॥
रामनामाच्या गजरापुढे भेदाभेदाचे दु:ख ते बिचारे किती? नाममाहात्म्याची गर्जना करीत असतां संसाराचे सर्व भयच उडून जातें २२.

अखंड नामें गर्जे वाणी । त्याचे बोलांमाजीं चक्रपाणी ।
तेथ ऋद्धिसिद्धि वाहे पाणी । मुक्ती आंदणी तयाची ॥ २३ ॥
ज्याची वाणी निरंतर नामाची गर्जना करीत असते, त्याच्या शब्दांमध्येच श्रीहरीची वस्ती असते. त्याच्या घरी ऋद्धि सिद्धि पाणी भरतात. मुक्ति त्याची दासी होऊन राहते २३.

निर्विकल्प भावार्थें आपण । सगुण निर्गुण कां नामस्मरण ।
भक्त भावार्थें आदरी जाण । तें तें होय पूर्ण सद्भावेंचि ॥ २४ ॥
स्वतः विकल्परहित अशा शुद्ध भक्तिभावाने सगुण ध्यान, निर्गुण चिंतन किंवा नामस्मरण यांपैकी भक्तीने जे काय भक्त आदरपूर्वक स्वीकारील ते ते सद्भक्तीनेच परिपूर्ण होतें २४.

भावार्थें जे भगवत्प्रीती । तेचि जाणावी साचार भक्ती ।
भावें तुष्टला श्रीपती । दे निजशांती साधकां ॥ २५ ॥
भक्तीनें जी भगवंतावर प्रीति करणे तीच खरी भक्ति समजावी. भक्तीनेच श्रीहरि सुप्रसन्न होऊन साधकांना आत्मशांति देत असतो २५.

ते निजशांतीच्या पोटीं । हरपती द्वंद्वतुःखकोटी ।
परमानंदें कोंदे सृष्टी । मी तूं दृष्टीं दिसेना ॥ २६ ॥
त्या आत्मशांतीच्या पोटांतच कोट्यवधि द्वंद्वांची दुःखे पार नाहीशी होतात. सर्व सृष्टि परमानंदाने भरली जाऊन 'मी' ' तूं ' हे दृष्टीला दिसतच नाही २६.

ऐसेनि अभेदभावें जाण । सेवितां मुकुंदश्रीचरण ।
मी आपणिया आपण । तारीन जाण निश्चित ॥ २७ ॥
अशा अभेदभावाने श्रीहरीच्या चरणांची सेवा केली असता मी स्वतांच मला खरोखर तारीन २७.

तारीन म्हणतां उधारू । बोलीं दिसताहे उशिरू ।
जो झाला हरिचा डिंगरू । त्यासी संसारू असेना ॥ २८ ॥
'तारीन' असा उधारपणाचा भविष्यकालीन शब्द उच्चारला असतां या बोलण्यांत तरावयास उशीर लागेल असा अर्थ दिसतो. पण वस्तुतः जो श्रीहरीचा भक्त झाला, त्याला संसार असतच नाही २८.

ऐशी भिक्षूनें गाइली गाथा । ते अत्यंत रुचली श्रीकृष्णनाथा ।
हरिखे ओसंडोनि चित्ता । उद्धवाचा माथा थापटी ॥ २९ ॥
अशा प्रकारें भिक्षूनें जी गाथा गाइली, ती श्रीकृष्णाला फारच आवडली. तेव्हां अंत:करणांत आनंदाने भरून जाऊन त्याने उद्धवाचे मस्तक थोपटले २९.

ऐशी जे हे निजशांती । माझ्या उद्धवासी व्हावी प्राप्ती ।
ऐसा कळवळोनि श्रीपती । काय उद्धवाप्रती बोलिला ॥ ९३० ॥
अशी जी ही आत्मशांति आहे, ती माझ्या उद्धवाला प्राप्त व्हावी असा मनामध्ये कळवळा उत्पन्न होऊन श्रीकृष्ण उद्धवाला काय म्हणाले ? ९३०.

श्रीभगवानुवाच-
निर्विद्य नष्टद्रविणो गतक्लमः प्रव्रज्य गां पर्यटमान इत्थम् ।
निराकृतोऽसद्भिरपि स्वधर्माद् अकम्पितोऽमुं मुनिराह गाथाम् ॥ ५९ ॥
[श्लोक ५९] प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्मनिष्ठेचा आश्रय घेतला होता, तिचाच आश्रय घेऊन मी भगवंतांच्या चरणकलांच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईन. (५८)

ज्याचे निःश्वासीं जन्मले वेद । ज्याचेनि चरणीं गंगा प्रसिद्ध ।
ज्याचें नाम छेदी भवबंध । तो उद्धवासी गोविंद स्वमुखें बोले ॥ ३१ ॥
ज्याच्या निःश्वासाने वेद निर्माण झाले, ज्याच्या चरणांपासून प्रसिद्ध गंगा उत्पन्न झाली, ज्याचें नाम संसाराचा बंध तोडून टाकतें, तो श्रीकृष्ण स्वत:च्या मुखाने उद्धवाला सांगू लागला ३१.

यालागीं उद्धवाचे भाग्य थोर । ज्यासी तुष्टोनि शार्ङ्गधर ।
दाखवी निजशांतीचें घर । निरंतर वस्तीसी ॥ ३२ ॥
म्हणून उद्धवाचें भाग्य फार थोर म्हटले पाहिजे. ज्याच्यावर श्रीकृष्ण संतुष्ट होऊन निरंतर राहण्यासाठी आत्मशांतीचे मंदिर दाखविता झाला ३२.

उद्धवा ऐक सावधान । धनलोभ्याचें नासोनि धन ।
तो धननाशु झाला प्रसन्न । केला विवेकसंपन्न वैरागी ॥ ३३ ॥
उद्धवा! नीट लक्ष देऊन ऐक. धनलोभ्याचें धन नाहीसे होऊन तो धननाशच त्या धनलोभ्यावर प्रसन्न झाला, आणि त्याला विवेकसंपन्न वैरागी केलें ३३.

जो धनलोभी न खाता । ज्याचें नांव न घेती सर्वथा ।
तोचि वैराग्यें केला सरता । माझे मुखीं कथा तयाची ॥ ३४ ॥
जो धनलोभी पोटालाही पुरेसे खात नव्हता, ज्याचे कोणी मुळीच नावसुद्धा घेत नव्हते, तोच वैराग्याने सर्वश्रेष्ठ करून सोडला. त्याची गोष्ट नेहमी माझ्या मुखांत असते ३४.

त्याचें नाम माझे मुखीं जाण । त्याचें कर्म वर्णी मी आपण ।
तो मज पढियंता जाण । जो विवेकसंपन्न वैरागी ॥ ३५ ॥
त्याचे नांव माझ्या तोंडात असते. त्याच्या कृतीचे मी स्वतः वर्णन करतो. जो विवेकसंपन्न वैरागी असतो, तो माझा फार आवडता असतो ३५.

वैराग्यपरतें भाग्य थोर । जगीं नाहीं आन सधर ।
विवेकवैराग्यें जो साचार । तो माझें जिव्हार उद्धवा ॥ ३६ ॥
वैराग्यापेक्षा थोर असें भाग्य जगामध्ये दुसरे काहीच नाही. उद्धवा! जो खरोखर विवेकाने व वैराग्याने युक्त असतो, तो माझा जीव की प्राण आहे ३६.

जो विवेकवैराग्यें आथिला । तो जाण मजमाजीं आला ।
मी अधीन त्याचिय बोला । तो मज विकला । सर्वस्वें ॥ ३७ ॥
विवेकाने आणि वैराग्याने जो संपन्न झाला तो माझ्यामध्येच आला म्हणून समज. मी त्याच्या शब्दांना वश झालेला असतो, आणि तोही मला सर्वस्वी विकलेला असतो ३७.

लोभ्याचें निःशेष गेलें धन । धनासवें गेले मानाभिमान ।
अभिमानासवें जाण । गेलें द्वंद्व दारुण सुखदुःख ॥ ३८ ॥
लोभ्याचे सर्व द्रव्य गेलें, द्रव्याबरोबर मान अभिमान गेले, आणि त्या अभिमानाबरोबरच द्वंद्वापासून होणारें भयंकर सुखदुःख गेले ३८.

धन जातां झाली विरक्ती । तेणें नेमस्त झाला यती ।
भिक्षार्थ हिंडता क्षितीं । दुर्जनीं दुरुक्तीं निर्भर्त्सिला ॥ ३९ ॥
द्रव्य जातांच विरक्ति उत्पन्न झाली, त्यामुळे तो नियमनिष्ट संन्यासी बनला; आणि भिक्षेकरितां पृथ्वीवर हिंडतां हिंडतां दुष्ट लोकांनी दुर्भाषणांनी त्याची निर्भत्सना केली ३९.

पीडितां नाना विकारीं । उपद्रवितां नानापरी ।
न डंडळीच निज निर्धारीं । स्वधर्मधैर्य करी निर्द्वंद्व ॥ ९४० ॥
अनेक प्रकारच्या विकारांनी पीडा दिली असतां, किंवा नानाप्रकारांनी उपद्रव दिला असतां आपल्या दृढनिश्चयापासून तो ढळला नाही. त्याला स्वधर्माच्या धैर्याने पूर्ण अभेदस्वरूप केले होते ९४०.

संन्याशाचा स्वधर्म पूर्ण । मी देहातीत नारायण ।
साचार हरविला देहाभिमान । यालागीं जाण न डंडळी ॥ ४१ ॥
संन्याशाचा पूर्ण स्वधर्म हाच की, मी देहाहुन भिन्न असून नारायणस्वरूप आहे अशा ज्ञानाने त्याने खरोखर देहाभिमान टाकलेला असतो. म्हणूनच तो आत्मस्वरूपापासून ढळत नाही ४१.

जेवीं छायेसी लागतां घावो । पुरुषासी नाहीं भयसंदेहो ।
तेवीं दुर्जनीं दंडिता देहो । नाहीं दुःखभेवो निरहंकार ॥ ४२ ॥
ज्याप्रमाणे छायेवर घाव बसला असता त्या पुरुषाला भयाचा संशयसुद्धा नसतो, त्याप्रमाणे दुर्जनांनी देहाला ताडण केले असतां निरहंकार असणाऱ्याला दुःख आणि भय ही प्राप्त होत नाहीत ४२.

देहासी होतां नाना व्यथा । आपुली जे देहातीतता ।
तेचि भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज म्यां आतां निरूपिली ॥ ४३ ॥
देहाला नानाप्रकारच्या पीडा झाल्या असतां आपली जी देहातीत स्थिति झाली, तीच गाथा त्या भिक्षुनें गायन केली, आणि ती आता मी तुला सांगितली ४३.

येथ सुखदुःखांसी कारण । आपला भ्रम आपणा जाण ।
येचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४ ॥
ह्यांत आपल्या सुखदुःखांना कारण आपला भ्रम होय असे समज. ह्याच अर्थाचे निरूपण स्वतः श्रीकृष्ण सांगतो ४४.

सुखदुःखप्रदो नान्यःपुरुषस्यात्मविभ्रमः ।
मित्रोदासीनरिपवः संसारस्तमसः कृतः ॥ ६० ॥
[श्लोक ६०] मनुष्याला या जगात दुसरा कोणीही सुख किंवा दुःख देत नाही दुसरा दुःख देतो, हा त्याच्या चित्ताचा केवळ भ्रम आहे हे सगळे जग आणि यातील मित्र, उदासीन आणि शत्रू हे भेद अज्ञानाने कल्पिलेले आहेत. (६०)

आविद्यक जें निजअज्ञान । तेथें मनपणें उठी मन ।
मनें भेद करूनियां पूर्ण । सुखदुःखें जाण भोगावी ॥ ४५ ॥
अविद्यात्मक जें आपलें अज्ञान, त्यांत मनाच्या स्वरूपाने मनच उत्पन्न होते आणि त्या मनानेच पूर्ण भेद उत्पन्न करून ते सुखदुःखें भोगावयास लाविते ४५.

आत्मा केवळ भेदशून्य । तेथ शत्रु मित्र उदासीन ।
मनें कल्पूनियां जाण । मन संपूर्ण स्वयें चाळी ॥ ४६ ॥
आत्मा केवळ भेदरहित आहे. त्यांत शत्रु, मित्र, उदासीन असे भेद मनानेच कल्पून ते सर्व मनच स्वतः चाळवितें ४६.

ऐसें भेदीं ठसावलें मन । तेंचि पुरुषाचें अज्ञान ।
तेणें द्वंद्वदुःखेंसीं जाण । संसार दारुण सभ्रांता ॥ ४७ ॥
अशा रीतीने भेदामध्ये मन गुंतून राहणें तेंच पुरुषाचे अज्ञान होय. अशा भ्रांत झालेल्या मनुष्याला त्या द्वंद्वदुःखाने संसार भयदायक होतो ४७.

मन सुखदुःखांसी कारण । मनःकल्पित संसार जाण ।
त्या मनाचें निग्रहण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४८ ॥
मन हेच सुखदुःखाला कारण आहे आणि संसार हाही मनःकल्पितच आहे हे लक्षात ठेव. त्या मनाचा निग्रह कसा करावा ते स्वतःच श्रीकृष्ण सांगतो ४८.

तस्मात्सर्वात्मना तात निगृहाण मनो धिया ।
मय्यावेशितया युक्त एतवान् योगसंग्रहः ॥ ६१ ॥
[श्लोक ६१] म्हणून बाबा रे ! माझ्यामध्ये एकरूप केलेल्या बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव बस्स ! सर्व योगसाधनेचे हेच सार आहे. (६१)

जो नासूं पाहे संसारदुःख । तेणें मन नेमावें आवश्यक ।
मनावेगळें दुःखदायक । नाहीं आणिक त्रिलोकीं ॥ ४९ ॥
ज्याला संसाराचे दु:ख नष्ट करावयाचे असेल, त्याने मनाचे अवश्य नियमन करावें. कारण, मनाशिवाय दुसरे कोणी दुःख देणारे त्रिभुवनांतसुद्धा नाही ४९.

मन अतिशयें चंचळ । तें सहसा नव्हे निश्चळ ।
त्यासी विवेक द्यावा मोकळ । अभेदशील अहर्निशीं ॥ ९५० ॥
मन हे अत्यंत चंचल आहे. ते सहसा स्थिर होत नाही.  ह्याकरितां भेदभाव नाहीसा होईल असा मोकळा विचार त्याला रात्रंदिवस करावयास द्यावा ९५०.

मन सिंतरील विवेकासी । यालागीं हातकडिया दोहींसी ।
करूनियां अहर्निशीं । येरयेरांपाशीं राखावीं ॥ ५१ ॥
मन हे विवेकाला घुलाटणी देईल, याकरितां मन व विचार ह्या दोघांनाही हातबेड्या घालून रात्रंदिवस एकमेकांजवळ ठेवावी ५१.

मन जेथ विकल्पूं धांवे । तेथ महामारी वीवेकू पावे ।
मन जेथ अधर्में संभवे । तेथ विवेक धांवे हांकित ॥ ५२ ॥
म्हणजे मन जिकडे विकल्प उत्पन्न करावयाला धावेल, तेथे त्या विकल्पाचा फडशा पाडणारा विवेक तत्परतेने उभा असतो, आणि मन जेथे अधर्माकडे वळण्याचा संभव दिसतो, तेथें विवेकही त्याला हांकून देण्याला धावत येतो ५२.

मन जाय कामक्रोधांपाशीं । विवेक ओढी धरोनि केशीं ।
मन रिघतां निंदेपाशीं । विवेक त्यासी बुकाली ॥ ५३ ॥
मन कामक्रोधापाशी जाऊन बसलें की, विवेक त्याचे केस धरून त्याला मागें  खेचतो. मन निंदेजवळ गेलें की, विवेक त्याला बुकलीत असतो ५३, 

मन म्हणे विषय सुटी । विवेक हाणे वैराग्यकाठी ।
मन धांवतां कल्पनेपाठीं । विवेक उठाउठीं झोंटाळी ॥ ५४ ॥
मन ' मला विषयाकडे जाऊं द्या ' असे म्हणाले, की विवेक त्याच्या मस्तकांत वैराग्याची काठी हाणतो. मन कल्पनेच्या पाठीमागे धावू लागले तर विवेक त्याला तत्काळ फेंटाळून लावतो ५४.

परदारपरधन । अभिलाषू धांवे मन ।
तेथ मन विवेक पावोन । रणकंदन आरंभी ॥ ५५ ॥
परस्त्री आणि परद्रव्य  ह्यांचा अभिलाष करावयाला मन धावू लागलें तर विवेक तेथे जाऊन भयंकर युद्ध सुरू करतो ५५.

ऐसा मनां विवेकांचा झगडा । गार्‍हाणें आलें सद्गुरूपुढां ।
तेणें करावया निवाडा । अद्वैतवाडां कोंडिलीं ॥ ५६ ॥
अशा रीतीने मन आणि विवेक ह्यांचा झगडा लागून त्यांचे गाऱ्हाणे  सदर पुढें येते. तो त्यांचा न्याय करण्याकरितां अद्वैताच्या वाड्यात त्या दोघांना कोंडून ठेवितो ५६.

तो दृष्टी देखतांचि ठावो । मनाचा मोडला स्वभावो ।
देहींचा सांडोनि अहंभावो । विवेकेंसीं पहा हो ऐक्य केलें ॥ ५७ ॥
ती जागा डोळ्यांनी पाहातांच मनाचा स्वभावच नाहीसा होऊन जातो, आणि देहांतील अभिमान सोडून  मन हें  विवेकाशी ऐक्य करते ५७.

तेथ मनाचें गेलें मनपण । विवेक विसरला आकळण ।
जीवाचें विरालें जीवपण । वस्तु संपूर्ण अद्वयें ॥ ५८ ॥
तेथें मनाचे मनपणच नाहीसे होऊन जाते आणि विवेकही मनाला आकलन करण्याचे विसरतो. जीवाचे जीवपण  नाहीसे होते, आणि अद्वैताच्या योगाने संपूर्ण परब्रह्मच बनते ५८.

जेवीं सुवर्णाचीं नागभूषणें । फडा पुच्छ मिरवी नागपणें ।
तें न मोडितां नागत्वाचें लेणें । सोनें सोनेपणें नागत्व विसरे ॥ ५९ ॥
ज्याप्रमाणे सोन्याचे सर्पाकार अलंकार केले असतां त्यांवर नागाच्याच आकाराची फणी, शेपटी, वगैरे शोभत असतात, पण तो नागाच्या आकाराचा दागिना मोडला नाही तरी सोने हें  सोन्याच्याच रूपाने असल्यामुळे नागाचे त्याला भानही असत नाही ५९, 

तेवीं जाणोनि वस्तु पूर्ण । न मोडितां जग जाण ।
जीव विसरला जीवपण । मनत्वा मन मूकलें ॥ ९६० ॥
त्याप्रमाणे पूर्णब्रह्म जाणून घेऊन जग हें  न मोडताही जीव जीवपणा विसरतो, आणि मन मनस्वरूपाला मुकतें ९६०.

ऐशिया विवेकयुक्ती जाण । माझे स्वरूपीं प्रवेशे मन ।
जेथ मनपणें नुठी मन । मनोनिग्रहण या नांव ॥ ६१ ॥
अशा विवेकाच्या युक्तीने मन माझ्या स्वरूपात प्रवेश करते. जेथे मन मनस्वरूपानें  उठत नाही, त्याचेच नाव मनोनिग्रह होय ६१.

ऐक चतुरचित्तचिंतामणी । विवेकचक्रवर्तिचूडामणी ।
उद्धवा भक्तशिरोमणी । मनोनिग्रहणीं प्रवर्त ॥ ६२ ॥
हे चतुरचित्तचिंतामणे! हे विवेकचक्रवर्तिचूडामणे ! हे भक्तशिरोमणे उद्धवा ! तूं  मनोनिग्रह करण्याचा प्रयत्न  कर ६२.

आवडीं भुलला कृष्णनाथ । तो उद्धवासी म्हणे तात ।
मनोनिग्रही तूं एथ । होईं साक्षेपयुक्त सादर ॥ ६३ ॥
प्रेमाने श्रीकृष्ण अगदी वेडा होऊन गेला. तो उध्दवाला  म्हणाला- "बाबा! तूं येथे आदरपूर्वक मनोनिग्रही हो" ६३.

साक्षेपें निग्रहूनि मनासी । जो सांडवी मनोजन्य भेदासी ।
शांती सांडूं नेणे त्यासी । जेवीं तान्हयासी माउली ॥ ६४ ॥
जो आदरपूर्वक मनाचा निग्रह करून मनापासून उत्पन्न होणाऱ्या भेदाचा त्याग करितो, त्याला ज्याप्रमाणे लेकराला आई सोडीत नाही, त्याप्रमाणे शांति सोडीत नाही ६४.

निजशांति बाणल्या शुद्ध । त्यासी बाधी न कोण द्वंद्व ।
हाचि योगसंग्रहो प्रसिद्ध । बोलिले सिद्ध महायोगी ॥ ६५ ॥
खरी आत्मशांति मनांत बिंबली असता त्याला कोणताच भेदभाव पीडा देत नाही. मोठमोठाले सिद्ध व योगी 'योगसंग्रह' म्हणतात तो हाच ६५.

सांडूनि संसाररस्फुर्ती । चित्स्वरूपीं जडे वृत्ती ।
जीव शिव एकत्व येती । योगसंग्रहस्थिती या नांव ॥ ६६ ॥
संसाराची स्फूर्ति सोडून चित्स्वरूपाकडे वृत्ति जडते आणि जीव-शिव एकत्र येतात, त्याचेच नाव योगसंग्रहस्थिति' होय ६६.

ऐशिया योगसंग्रहशांती । साधका द्वंद्वें न बाधीती ।
हें असो जया भिक्षुगीतभक्ती । द्वंद्वनिर्मुक्ति तया लाभे ॥ ६७ ॥
अशी योगसंग्रहाची शांति प्राप्त झाली असतां साधकांना त्रास देत नाहीत. पण हें  वर्णन इतकंच पुरे. तात्पर्य इतकेंच की, ज्याला या भिक्षुगीताची भक्ति प्राप्त होईल, त्याला द्वंद्वापासून मुक्ति प्राप्त होईल ६७.

य एतां भिक्षुणा गीतां ब्रह्मनिष्ठां समाहितः ।
धारयञ्छ्रावयञ्छ्र्ण्वन् द्वन्द्वैर्नैवभिभूयते ॥ ६२ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
श्रीकृष्णोद्धवसंवादे एकादसस्कन्धे त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥
[श्लोक ६२] भिक्षूने गाइलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो दुसर्‍यांना ऐकवितो आणि यानुसार वागतो, तो कधीही सुखदुःखादी द्वंद्वाने खचून जात नाही. (६२)

साधावया शांतीची प्राप्ती । कोटिसाधनें न लभे शांती ।
हा भिक्षुगीतार्थ धरितां चित्तीं । शांति आपैती साधकां ॥ ६८ ॥
शांति प्राप्त करून घेण्याकरितां कोट्यवधि साधने केली, तरी शांति प्राप्त होत नाही. परंतु ह्या भिक्षुगीतेतील रहस्य मनांत बाळगले असतां साधकांना आपोआपच शांति प्राप्त होते ६८.

योगनिष्ठां ब्रह्मज्ञान । तें हें भिक्षुगीतनिरूपण ।
जो हृदयीं धरी सावधान । शांति आंदण तयाची ॥ ६९ ॥
जी योगनिष्ठा  आणि जें ब्रह्मज्ञान, तेंच हें  भिक्षुगीतांतील निरूपण आहे. जो हे लक्षपूर्वक ध्यानांत धरितो त्याची शांति ही दासी होते ६९.

ये भिक्षुगीतेचा गीतार्थू । जो जीवीं धरी समाहितू ।
त्यासी द्वंद्वांचा न बाधी घातू । अतिशांतू निजबोधें ॥ ९७० ॥
ह्या भिक्षुगीतेतील गुह्यार्थ जो स्वस्थचित्ताने लक्षात धरितो, त्याला द्वंद्वांची पीडा बाधत नाही, आणि आत्मज्ञानाने तो अत्यंत शांत होतो ९७०.

भिक्षूगीतार्थें समाधान । हें सांगतां नवल कोण ।
जो सादरें करी श्रवण । त्यासी द्वंद्वें जाण न बाधिती ॥ ७१ ॥
भिक्षुगीतेच्या रहस्याप्रमाणे वागल्याने समाधान होईल हे सांगण्यांत आश्चर्य काय ? पण जो भक्तिपूर्वक त्याचे श्रवण करील, त्यालासुद्धा द्वंद्वे  पीडा देणार नाहीत ७१.

परदेशा गेला बहुतकाळ भर्ता । त्याचे पत्र सादर ऐके कांता ।
तैशिया अतिएकाग्रता । भिक्षुगीता ऐकावी ॥ ७२ ॥
पति पुष्कळ दिवस परदेशाला गेला असतां  त्याच्याकडून आलेले पत्र त्याची स्त्री जशी उत्कंठेने ऐकत बसते, त्याप्रमाणे अत्यंत एकाग्रतेने भिक्षुगीता ऐकावी ७२.

निघोनि गेलिया पुत्रासी । त्याची शुद्धि ये मातेपाशीं ।
ऐकोनियां उणखुणेसी । चरफडी जैसी विव्हळ ॥ ७३ ॥
मुलगा घरांतून पळून गेला असता, त्याचा सर्व शोध लागल्याचे कोणी आईला सांगितले, म्हणजे तो पळून जाण्याचा हेतु वगैरे ऐकून ती जशी चरफडून विव्हळ होते ७३; 

तीजवळ ज्या सोयर्‍या असती । त्याही स्नेहें कळवळती
परी माता जैसी तळमळी चित्तीं । तें आणिकाप्रती असेना ॥ ७४ ॥
अशा वेळी तिच्याजवळ ज्या नातेवाईक स्त्रिया असतात, त्याही स्नेहाने कळवतात; पण आई जशी मनांत तळमळते, तसे तळमळणे इतरांच्या मनांत असत नाहीं ७४; 

तैसें भिक्षुगीतश्रवण । करितां द्रवे ज्याचें मन ।
जो सात्त्विकें वोसंडे पूर्ण । तो द्वंद्वांसी जाण नाटोपे ॥ ७५ ॥
त्याप्रमाणे भिक्षुगीताचे श्रवण करीत जसता ज्याचे मन द्रवतें, जो सात्त्विक वृत्तीने पूर्णपणे भरून जातो, तो द्वंद्वांच्या सपाट्यात सांपडत नाहीं ७५.

असो नव्हे सादरें श्रवण । तरी करितां याचें नित्य पठण ।
भिक्षुगीतप्रतापेंकरून । द्वंद्वें जाण नातळती ॥ ७६ ॥
असो. असें आदरपूर्वक श्रवण घडत नसेल तर ह्याचे नित्य पठण केले असतांही ह्या भिक्षुगीताच्या प्रभावाने द्वंद्वे त्याला शिवतसुद्धा नाहीत ७६.

पडतां पंचाननाची घाणी । मदगजां होय महापळणी ।
तेवीं भिक्षुगीतपठणीं । होय भंगणी द्वंद्वांची ॥ ७७ ॥
सिंहाच्या अंगाचा दर्प बाहेर पडला की मदोन्मत्त हत्तींनाही पळ सुटतो, त्याप्रमाणे भिक्षुगीताच्या पठणाने द्वंद्वांची पळापळ होते ७७.

निर्लोभ होऊनि मानसीं । बैसोनि साधुसज्जनांपाशीं ।
जो निरूपी भिक्षुगीतासी । द्वंद्वें त्यासी नातळती ॥ ७८ ॥
मनामध्ये निर्लोभ होऊन साधुसंतांपाशी बसून जो भिक्षुगीताचे विवरण करील, त्याला द्वंद्वे शिवणारही नाहींत ७८.

अर्थे पाठें श्रवण करितां । द्वंद्वें निवारी भिक्षुगीता ।
हे वर्म कळलेंसे श्रीकृष्णनाथा । तो सांगे हितार्था उद्धवा ॥ ७९ ॥
ह्या भिक्षुगीतेतील अर्थाचे किंवा या भिक्षुगीतापाठाचे श्रवण केले असतां ही भिक्षुगीता द्वंद्वांचे निवारण करते. हे वर्म श्रीकृष्णाला कळले होते. ते त्याने उद्धवाच्या कल्याणाकरितां त्याला सांगितले ७९.

ज्या भिक्षुगीताची फळश्रुती । स्वमुखें सांगताहे श्रीपती ।
त्या भिक्षूचें भाग्य वानूं किती । धन्य त्रिजगतीं तो एक ॥ ९८० ॥
ज्या भिक्षुच्या गीताची फलश्रुति श्रीकृष्ण आपल्याच मुखाने सांगत आहे, त्या भिक्षूचे भाग्य किती वर्णन करूं? त्रिभुवनांत तोच एक धन्य होय ९८०.

विवेकवैराग्यसमरसीं । जो साहे अतिद्वंद्वांसी ।
तोचि पढियंता हृषीकेशीं । हें उद्धवासी दाविलें ॥ ८१ ॥
विवेक आणि वैराग्य ही अंगामध्ये बिंबवून घेऊन जो मोठमोठ्या द्वंद्वांना सहन करतो, तोच भगवंताचा आवडता होतो, हे उद्धवाला दाखवून दिले ८१,

जगासी उद्धवाचा उपकार। गुह्य ज्ञान परात्पर ।
उघडूनि श्रीकृष्णें भांडार । भिक्षुगीतसार प्रकटिलें ॥ ८२ ॥
  उद्धवाचा उपकार सर्व जगावर झाला आहे. कारण त्याच्याकरितां श्रीकृष्णाने आपल्या गुह्य व परात्पर ज्ञानाचे भांडार उघडून भिक्षुगीताचे रहस्य प्रगट केले ८२.

उद्धव न पुसता जैं शांती । तैं हें कां सांगता श्रीपती ।
कृष्णासी उद्धवाची प्रीती । त्यासी नाना उपपत्ती उपदेशी ॥ ८३ ॥
उद्धवाने जर शांतीच विचारली नसती, तर श्रीकृष्णाने हें  वर्णन कां सांगितले असते परंतु श्रीकृष्णाला उद्धवाचे फार प्रेम होते. म्हणून त्याने उद्ध्वाला नानाप्रकारांनी उपदेश केला ८३; 

हेंचि जडजीवां उद्धरण । येणें उपायें तरती दीन ।
जग तारावया जगज्जीवन । उद्धवमिषें श्रीकृष्ण बोलिला ॥ ८४ ॥
आणि हाच जडजीवांना उद्धरण्याचा मार्ग झाला. ह्या उपायाने दीनदुबळे तरून जातात. जगजीवन असा जो श्रीकृष्ण, तो  सर्व जगाचा उद्धार करण्याकरितांच उद्धवाच्या निमित्ताने हे बोलला ८४.

श्रीकृष्ण बोलिला भिक्षुगीत । जें वेदशास्त्रार्थमथित ।
उपनिषदांचें सारभूत । वर्तिकांतर्गत रहस्य ॥ ८५ ॥
श्रीकृष्णाने असें हें भिक्षुगीत सांगितले आहे की, जे वेदशास्त्रांचे तात्पर्य, उपनिषदांचे सार आणि वार्तिकांतील गूढ रहस्य आहे ८५.

येणें आपआपणीयां आपण । लागताहे निजात्मलग्न ।
हें ज्ञानाचेंही गुह्य ज्ञान । भक्तकृपें श्रीकृष्ण बोलिला ॥ ८६ ॥
ह्या भिक्षुगीतानें आपोआपच जीवाचें आत्म्याशी लग्न लागते (ताप्य होते). असें हें  ज्ञानांतीलही गुह्मज्ञान भक्ताच्या कृपेकरितां श्रीकृष्ण बोलला ८६.

येणें जीवाचें जीवत्व उडे । शिवाचें शिवत्वही बुडे ।
द्वंद्वाचें बाधकत्व मोडे । स्वानंदाचें उघडे भांडार ॥ ८७ ॥
ह्याच्या योगानें जीवाचे जीवपण नाहीसे होते, शिवाचे शिवपण बुडून जाते, द्वंद्वांचा पीडा देण्याचा गुण नाहीसा होतो, आणि आत्मानंदाचे भांडार खुले होते ८७.

वेदें मौन धरिलें जेथ । सशब्द शास्त्रें लाजलीं तेथ ।
ऐसें अतिरहस्य भिक्षुगीत । तें मी प्राकृत बोलिलों ॥ ८८ ॥
वेदांनी जेथें मौन धारण केलें, शब्दशास्त्रेही जेथे लाजून गेली, असें उत्कृष्ट रहस्य जें भिक्षुगीत, ते मी सामान्य माणसाने सांगितले ८८.

जेवीं जळीं बुडते पाषाण । श्रीरामें तारिले आपण ।
तेवीं मी जड मूढ अज्ञान । बोलवी ब्रह्मज्ञान जनार्दनकृपा ॥ ८९ ॥
ज्याप्रमाणे जळांत बुडणारे दगड श्रीरामाने स्वत: तरविले, त्याप्रमाणे मी जड, मूढ व अज्ञानी असतांही जनार्दनाची कृपा माझ्याकडून ब्रह्मज्ञान बोलवीत आहे ८९.

अहल्या जे व्यभिचारिणी । ते लागतां श्रीरामचरणीं ।
तिचेनि नामें पापा धुणी । प्रातःस्मरणीं पढविली ॥ ९९० ॥
जी अहल्या व्यभिचारिणी होती, ती श्रीरामाच्या चरणी लागली असल्यामुळे तिच्या नामस्मरणाने पापे नाहीशी होतात. तिचं नाम प्रातःस्मरणांत गोंविले आहे ९९०.

तेवीं सद्‌गुरुकृपेची करणी । माझी प्राकृत जड मूढ वाणी ।
मानिजें साधुसज्ञानीं । तैशीं बोलणीं बोलविलीं ॥ ९१ ॥
त्याप्रमाणे सद्गुरूच्या कृपेची ही करणी आहे. माझी प्राकृत, जड व मूढ वाणी साधु व ज्ञाते ह्यांनी मान्य करावी अशीच भाषणे त्या कृपेने माझ्याकडून वदविली आहेत ९१.

सरस्वती ज्यासी वोळे । तो मुकाही वेदशास्त्र बोले ।
तैसें जनार्दनें आम्हां केलें । भिक्षुगीत बोलविलें प्राकृत ॥ ९२ ॥
सरस्वती ज्याच्यावर प्रसन्न होते, तो मुका असला तरीसुद्धा वेदशास्त्र बोलतो; त्याप्रमाणेच जनार्दन आम्हाला प्रसन्न झाले आणि प्राकृत भाषेत भिक्षुगीत बोलविले ९२.

राजमुद्रा चढे ज्याचे हातीं । त्यातें समस्त सन्मानिती ।
तेवीं माझी वाणि सरती । केली निश्चितीं जनार्दनें ॥ ९३ ॥
राजमुद्रा ज्याच्या हातांत असते, त्याला सर्व लोक सन्मान देतात. त्याप्रमाणे माझी वाणी खरोखर जनार्दनानेच श्रेष्ठ केली ९३.

बाळकाची बोबडी वाणी । ऐकोनी संतोषे निजजननी ।
तेवीं माझी आरिख वाणी । संतसज्जनीं प्रियकर ॥ ९४ ॥
मुलाचे बोबडे बोल ऐकून आई आनंदित होते, त्याप्रमाणे माझी संस्कारहीन वाणीही संतसज्जनांना गोड वाटते ९४.

मी माझें उंच नीच बोलणें । हेहीं माथां घ्यावें कोणें ।
मीपण नेऊनि जनार्दनें । ग्रंथकथनें कथवित ॥ ९५ ॥
मी किंवा माझे चांगले अथवा वाईट बोलणें हें  तरी माथ्यावर घ्यावें कोणी ? कारण माझे मीपण नेऊनच जनार्दनस्वामी ग्रंथ बोलवीत आहे ९५.

आधींच हें श्रीभागवत । त्यामाजीं गूढ एकादशार्थ ।
त्याहीमाजीं भिक्षुगीत । अतिगुह्यार्थ निर्द्वंद्व ॥ ९६ ॥
आधीच हे श्रीभागवत, त्यामध्ये गूढार्थाने भरलेला एकादशस्कंध, आणि त्यामध्ये हें  भिक्षुगीत पूर्णपणे निर्द्वद्व करणाऱ्या अत्यंत गूढ अर्थाने भरलेलें आहे ९६.

त्या भिक्षुगीताची टीका । एकला कर्ता नव्हे एका ।
तें एकपण हिरोनि देखा । ग्रंथार्थलेखा जनार्दन वदवी ॥ ९७ ॥
त्या भिक्षुगीतावर टीका करणारा एका-एकनाथ-काही एकटाच नाही. कारण ते एकपण नष्ट करून ग्रंथाचे निरूपण जनार्दनाने बोलविलें ९७.

तेथ एक ना अनेक । ऐसें जनार्दनें केलें देख ।
त्यावरी द्वंद्वसाम्य-कवतिक । ग्रंथ सम्यक वाखाणवी ॥ ९८ ॥
त्यांत एक नाही आणि अनेकही नाही, असेंच जनार्दनांनी केलें पहा! आणखी त्यांत द्वंद्वांची समता करण्याचे कौशल्य आहे, त्या योगानें ग्रंथाची उत्तम प्रकारे वाखाणणी करवितात ९८.

एका जनार्दना शरण । जनार्दनू झाला एकपण ।
ऐसेनिएकत्वें जाण । केलें संपूर्ण भिक्षुगीत ॥ ९९ ॥
एका जनार्दनाला शरण आहे. जनार्दनाशी त्याचे ऐक्य झाले आहे. अशा ऐक्यरूपाने भिक्षुगीत समाप्त  केले ९९.

माझे निजगुरूचाही गुरू । श्रीदत्त परमगुरू ।
तो भिक्षुगीतार्थें साचारू । योग्यां योगेश्वरू तुष्टला ॥ १००० ॥
माझ्या गुरूचाही गुरु जो परमगुरु श्रीदत्तात्रेय, तोच योग्यांचा योगीश्वर खरोखर भिक्षुगीताच्या अर्थाने संतुष्ट झाला १०००. 

तेणें तोखलेनि अद्भुतें । आदरें अश्वासूनी मातें ।
अभय देऊनि निजहस्तें । पूर्ण ग्रंथार्थें डुल्लतू ॥ १ ॥
त्या अद्भुत  आनंदाच्या भरात त्यांनी अत्यंत आदराने मला आश्वासन देऊन व आपल्या हाताने अभय देऊन ग्रंथाच्या अर्थाने ते आनंदाने बोलू लागले १. 

एका जनार्दना शरण । श्रोतां व्हावें सावधान ।
पुढील अध्यायीं श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुषलक्षण सांगेल ॥ २ ॥
एका हा जनार्दनाला शरण आहे. श्रोत्यांनी आतां सावध व्हावें. पुढच्या अध्यायांत श्रीकृष्ण प्रकृति-पुरुषांची लक्षणे सांगेल २.

ते प्रकृति-पुरुषांची कथा । विवंचना हृदयीं धरितां ।
मी सुखदुःखद्वंद्वांपरता । निजात्मता निजबोधू ॥ ३ ॥
त्या प्रकृति-पुरुषांच्या कथेचा विचार मी अंत:करणांत वागविल्यामुळे मी सुखदुःखद्वंद्वाहुन भिन्न  झालों आहे. आत्मज्ञानाच्या योगाने माझे आत्म्याशी ऐक्य झाले आहे ३.

संतसज्जनां साष्टांग नमन । श्रोतेजनांसी लोटांगण ।
एका विनवी जनार्दन । अतिगोड निरूपण पुढें आहे ॥ ४ ॥
संतसज्जनांना माझा साष्टांग नमस्कार असो. श्रोतेजनांपुढेही माझें  लोटांगण आहे. आता एकनाथस्वरूपी जनार्दन विनंती करतात की, पुढचे निरूपण अत्यंत रसभरित आहे १००४.

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
एकाकारटीकायां भिक्षुगीतनिरूपणं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ६२ ॥ ओंव्या ॥ १००४ ॥
तेविसावा अध्याय समाप्त. 



GO TOP