[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारायण म्हणाले, ''आता भस्ममहात्म्या नंतर संध्योपासना श्रवण कर. प्रातःसंध्या नक्षत्रे लुप्त होण्यापूर्वी, मध्यान्ह संध्या सूर्य मध्यावर आला असताना, सायंसंध्या सूर्यास्तापूर्वी करून उपासना करावी. प्रातःसंध्या सूर्योदयापूर्वी उत्तम, नक्षत्रे लोप झाल्यावर मध्यम व सूर्योदयानंतर अधम होय. सायंसंध्या सूर्यास्तापूर्वी उत्तम, सूर्यास्तानंतर मध्यम, नक्षत्रे दिसू लागल्यावर अधम अशी तीन प्रकारची आहे. ब्राह्मण हा वृक्ष, संध्या ही त्याची मूळे, कर्म हीच त्याची पाने होत. म्हणून प्रयत्नपूर्वक मूळांचे रक्षण करावे. नाहीतर वृक्षशाखा रहाणार नाहीत.
जो जिवंतपणी संध्योपासना करीत नाही तो शूद्र होय. तो मृत्यूनंतर श्वान होतो. संध्येवाचून अन्य कर्माचा अधिकारी होता येत नाही. उदय व अस्त यांच्यानंतर तीन घटकांपर्यंत संध्येची उपासना करावी. तोपर्यंत संध्या केल्यास प्रायश्चित नाही. कारण अन्य कारणाने मुख्य काल न साधल्यास हा गौण काल सांगितला आहे. काळाचे अतिक्रमण झाल्यास चवथे अर्ध्य द्यावेत किंवा प्रथम आठशे गायत्री जप करावा. त्या कालाची अधिदेवता असेल तिचे स्मरण करून संध्या करावी.
घरात केलेली संध्या साधारण, गाईच्या गोठ्यात मध्यम, नदीकिनारी उत्तम, देवीच्या घरात सर्वोत्तम होय. देवीची उपासना असल्याने तिन्ही संध्या देवीच्या समीप कराव्यात. ब्राह्मणांना हेच फलदायी दैवत आहे. गायत्री उपासनेपुढे विष्णु व शिव यांची उपासना मुख्य नाही. ब्रह्मादि देवसुद्धा योग्यवेळी संध्यास्नान करीत असतात. वेदही तिची उपासना करतात. म्हणून तिला वेदोपास्या म्हणतात. सर्व द्विज शाक्त आहेत. कारण ते आदिशक्ती वेदांची माता जी गायत्री, तिची उपासना करीत असतात. केशवादि देवांची नावे घेऊन आचमन करावे. केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषीकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नारसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र, हरी, कृष्ण या क्रमाने नावे ॐकारपूर्वक उच्चारावीत. नंतर स्वः असे म्हणून उदक प्राशन करावे व नमः म्हणून स्पर्श करावा. पहिल्या तीन नावांनी उदक प्राशावे. नंतरच्या दोन नावांनी हात धुवावेत. दोन नावांनी मुख प्रक्षालन, दोन नावांनी मार्जन, एका हाताने प्रोक्षण करावे. एकेका नावाने दोन्ही पाय, मस्तक प्रोक्षित करावे. संकर्षणादि बारा नावांनी शरीराच्या बारा अंगास स्पर्श करावा.
संकर्षण म्हणून मधली तीन बोटे जोडून मुखास, वासुदेव, प्रद्युम्न नावांनी अंगठा व तर्जनी जोडून नाकपुड्यास, अनिरुद्ध, पुरुषोत्तम नावांनी अंगठा व अनामिका जुळवून नेत्रास, अधोक्षज, नारसिंह म्हणून कर्णद्वारास, अच्युत म्हणून नाभीस, जनार्दन म्हणून तळहाताने हृदयास, उपेंद्र म्हणून मस्तकास, हरये नम: कृष्णाय नमः म्हणून दोन्ही बाजूस स्पर्श करावे. आचमन घेताना डावा हात उजव्या हातास लावावा. त्याशिवाय उदक शुद्ध होत नाही. गोकर्णाच्या आकाराचा हात करावा. उडीद बुडेल इतके पाणी घ्यावे. त्यापेक्षा कमी अधिक उदक प्राशन केल्यास तो द्विज मद्यपी होतो.
सर्व अंगुली, अंगठा, कनिष्ठिका जोडून उजव्या हाताने आचमन करावे. प्रणवाचे स्मरण करून चतुर्थपदयुक्त शिरसासह गायत्री जप करावा. नंतर प्राणायाम करावा. प्रथम उजवी नाकपुडी दाबून डाव्या नाकपुडीने वायु उदरात घ्यावा. त्याला कुंभकाने स्थिर करावे. नंतर डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने वायु बाहेर सोडावा. यालाच प्राणायाम म्हणतात. उजवी नाकपुडी अंगठा डावी कनिष्ठिका व अनामिका यांनी दाबून मधले बोट व तर्जनी सोडावी. ज्यांचे मन नियमित केले आहे त्यांनी रेचक, कुंभक, पूरक असा प्राणायाम करावा.
रेचक वायूस बाहेर सोडतो. पूरक वायूस उदरात भरतो. कुंभक वायूस स्थिर करतो, पूरक करताना नीलकमलाप्रमाणे कृष्णवर्ण, चतुर्भुज हरी नाभिकमलात असल्याची भावना करावी. कुंभकाचे वेळी हृदयात कमलासनावर ब्रह्मदेव व रेचकसमयी स्कटिकवर्णाच्या निर्मल ललाटावरील महेशाचे चिंतन करावे. पूरकाचे वेळी विष्णूस पूज्य, कुंभकाचे वेळी ब्रह्मदेवाची गती व रेचकाने महेश्वर यांची प्राप्ती होते. हे पौराण आचमन होय.
हे नारदा, आता पापनाश करणारे श्रौत आचमन सांगतो. प्रथम प्रणवाचा उच्चार करून गायत्रीची ऋचा म्हणावी. तिच्या प्रत्येक पदारंभी भूः वगैरे तीन व्याहुती म्हणाव्यात. या आचमनास श्रौत आचमन म्हणतात.
शिरसासह व्याहृतीपूर्वक गायत्रीचा जप करावा. प्रत्येक वेळी प्रणव योजून तीन वेळा जप केल्यास प्राणायाम होतो. प्रणव म्हणून पाच बोटांनी नाकाचे अग्र दाबून धरावे म्हणजे सर्व पापहरण करणारी मुद्रा होते. कनिष्ठिका व अनामिका यांच्या योगाने यतींनी व ब्रह्मचार्यांनी प्राणायाम करावा. 'अपोहिष्ठा' हे मंत्र म्हणून कुशोदकाने प्रोक्षण करावे.
ऋचेच्या अथवा पदाच्या शेवटी मार्जन करावे. म्हणजे वर्षभरातले पाप नाहीसे होते, आचमन करून 'सूर्याश्च' या मंत्रांनी अंतःकरणात पोहोचेपर्यंत उदक प्राशन करावे. प्रणव, व्याहृती, प्रणवयुक्त गायत्रीजप करून 'अपोहिष्टा' या सूत्रांनी मार्जन करावे. यज्ञोपवीत उजव्या हाताखाली घालावे. गोकर्णाप्रमाणे केलेल्या हातात उदक घेऊन नासिकेजवळ न्यावे. डाव्या कुशीत पातकाचे व कृष्णवर्ण पुरुषाचे स्मरण करावे. नंतर 'ॠतूंच' ही ऋचा म्हणावी. दुपादा इत्यादी ऋचा म्हणाव्या. उजव्या नाकपुडीने श्वासाच्या योगाने उदकात पाप आणावे. नंतर उदकाकडे न पहाता ते डाव्या बाजूस दगडावर टाकावे व शरीर निष्पाप झाल्याची भावना करावी.
नंतर उठून दोन्ही पाय सारखे जोडावेत. अंजुलीने जल घेऊन सूर्याकडे पहात गायित्रीने अभिमंत्रित करावे. असे तीन वेळा उदक उडवावे. हेच अर्ध्यदान होय. नंतर 'असौ अदित्यः' मंत्र म्हणून सभोवार उदक उडवीत स्वांग प्रदक्षिणा घालावी. मध्यान्हकाली एकदा, दोन्ही संध्यांचे वेळी अर्ध्य द्यावेत. प्रभातकाली दंडाप्रमाणे उभे राहून, मध्यान्हसमयी जरा ओणवे होऊन, सायंकाळी आसनावर बसून द्विजाने उदक उडवावे. त्याचे धारण सांगतो.
मंदेह नावाचे कृतघ्न, घोर असे तीस कोटी महावीर राक्षस सूर्यास खाण्याची इच्छा करीत असतात. त्यासाठी तप करणारे ऋषी महासंध्येची उपासना करतात व उदकांजली फेकतात. त्यामुळे उदक वज्रासारखे होऊन राक्षस दग्ध होतात. म्हणून ब्राह्मणाने संध्योपासना करावी. त्यामुळे महत्पुण्य लाभते. अर्ध्याच्या अंगभूत मंत्राच्या उच्चाराने सांग संध्येचे फल मिळते.
''तो अर्क मी आहे, मी ज्योती आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे. मी शिव आहे, मी आत्मज्योती आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे. शुद्ध, सर्व ज्योती व रस मी आहे.'' असा हा मंत्र आहे.
हे वरदायिनी, ब्रह्मरूपिणी, देवी गायत्री, ये आणि जपाची, अनुष्ठानाची सिद्धी होण्यासाठी माझ्या हृदयात प्रवेश कर. हे देवी, उठ. आता पुन्हा येण्यासाठी गमन कर. हे देवी, माझ्या हृदयात प्रवेश करून अर्ध्यामध्ये गमन कर.
असे म्हणून आपले आसन शुद्धी स्थळी मांडावे. त्यावर बसून वेदमाता गायत्रीचा जप करावा. प्राणायामानंतर खेचरी मुद्रा करावी. प्रातः संध्येच्या वेळी अशी मुद्रा करावी. आता हे नारदा, तिच्या नावाचा अर्थ सांगतो.
चित्त शून्य आकाशात भ्रमण करते, जिव्हा पोकळीमध्ये रहाते, दृष्टी दोन्ही भिवयात प्रवेश करते, त्या अवस्थेला खेचरी अवस्था म्हणतात. सिद्धासनासारखे आसन नाही. कुंभकासारखा वायु नाही. खेचरी मुद्रेसारखी मुद्रा नाही.
प्रणवाचा उच्चार करून वायूस जिंकून, निरहंकार, ममताशून्य होऊन स्थिर आसनावर निश्चल व्हावे. योनीस्थान एका पायाच्या अंगुलांनी बंद करावे. दुसर्या पायाच्या टाचेने शिवणी दाबून धरावी. हृदय एकाग्र करावे, शरीर दंडाप्रमाणे ताठ ठेवावे. स्तंभाप्रमाणे निश्चल व्हावे. इंद्रियांचे संयमन करावे. निश्चल दृष्टीने भूमध्यप्रदेशी पहावे. ह्मा आसनालाच सिद्धासन म्हणतात.
गुणविशिष्ट गायत्री मजकडे येवो. हे देवी, तू वेदांचे ज्ञापन करणारी आहेस. म्हणून सवितृमंडलापासून माझ्या हृदयात ये. ॐ हे अक्षर 'ब्रह्मसदृश' आहे म्हणून मजकडून उपासना होईल असे कर. दिवसाची अभिमानी देवता दिवसाचे पाप घालविते. हे सर्व वर्णे, हे महादेवी, हे संध्याविद्ये, हे सरस्वती, हे अजरे, हे अमरे, सर्वदेवी, तुला नमस्कार असो.''
'तेजोसि' या मंत्राने देवीचे आवाहन करावे. नंतर शापमोचनासाठी विधान करावे. ब्रह्मदेव, विश्वामित्र, वशिष्ठ या तीन प्रकारे शाप आहेत. ब्रह्मदेवाच्या स्मरणाने ब्रह्मदेवाचा शाप निवृत्त होतो. विश्वामित्राच्या स्मरणाने विश्वामित्राचा शाप व वसिष्ठाच्या स्मरणाने वसिष्ठाचा शाप नाहीसा होतो.
'मी हृदयकमलात प्रमाणभूत, सत्यस्वरूप, सर्व जगत्स्वरूप अशा पुरुषाने ध्यान करतो.' तो परमात्मा चिद्रूप शब्दातीत आहे.
हे नारदा, आता संध्येच्या अंगभूत न्यासविधी सांगतो.
ॐ असे म्हणून 'पादाभ्यां नमः' असा उच्चार करावा. ॐ भूवः ' जानुभ्यां नमः' म्हणावे. 'स्वः कटिभ्यां नमः; महः मनाम्यै नम:; जनः हृदयाय नमः; तपः कंठाय नमः;' 'सत्यं ललाटायनम'; असे म्हणावे. 'तत्सवितुः अंगुष्टाभ्यां नमः; 'वरेण्यं ' तर्जनीच्य्या नमः ;' 'भर्गो देवस्य मध्यमाभ्यां नमः ।' 'धीमहि अनामिमकाभ्या नम:; ।' धियो यो नः कनिष्टिकाभ्यां नमः । ' असे म्हणून न्यास करावा. प्रचोदयात् असे म्हणून हाताची पाठ व तळ यावर न्यास करावा. 'तत्सवितुः ब्रह्मात्मने हृदयाय नम:;' तसेच 'वरेण्यं विष्णूवात्मने शिरसे नमः;' पुढे ' भर्गो देवस्य रुद्रात्मने शिखायै धीमही शक्यात्मने करचायाय; धीयोयोनः कलात्मने नेत्रत्रयाय; प्रचोदयातू सर्वात्मने अस्त्राय' असे म्हणून शेवटी नमः उच्चारून न्यास करावा.
गायत्रीच्या अक्षरापासून उत्पन्न झालेला न्यास श्रेष्ठ व पापहरण करणारा आहे. प्रथम प्रणवाचा उच्चार करून वर्णाचा न्यास करावा. तत्काराचा उच्चार करून दोन्ही पदांगुष्ठावर न्यास करावा. सकाराचा दोन्ही घोट्यावर, विकाराचा दोन्ही जंघावर न्यास करावा. तुकाराचा दोन्ही जानुवर, वकाराचा मांड्यांवर, रेकाराचा गुदाचे ठिकाणी, णिकार लिंगप्रदेशी, यकार दोन्ही कटीवर, भकार नाभीमंडलावर, गोकार हृदयाच्या ठिकाणी, देकार स्तनांचे भागी, वकार हृदयावर, स्यकार कंठप्रदेशी असे न्यास करावेत.
नंतर धीकार मुखामध्ये, मकार तालूमध्ये, हिकार नासाग्रावर, धिकार, नेत्रमंडळावर, मोकार भ्रूमध्यभागी, दुसरा योकार ललाटावर, नकार पूर्वमुखी, प्रकार दक्षिणमुखी, चोकार पश्चिम मुखावर, दकार उत्तर मुखावर, याकार मस्तकावर व तकाराचा व्यापक न्यास करावा. काही जपात तत्पर रहाणारे पुरुष हा न्यास करीत नाहीत. त्यानंतर जगदंबिका महेश्वरीचे ध्यान करावे.
जिची कांती जास्वंदीप्रमाणे आहे, जी परमेश्वरी कुमारी आहे, जी लाल कमलासनावर बसली आहे, लालपुष्पे व वस्त्रे जिने धारण केली आहेत, जिला चार मुखे, चार हात, प्रत्येक मुखास दोन नेत्र, स्रुक, स्रुवी, जपाची माळ, कमंडलू जिने धारण केला आहे, जी सर्व आभरणांनी युक्त आहे, जी ऋग्वेदाचे ध्यान करीत आहे, हंस हे जिचे वाहन आहे, आहवनीय अग्नीमध्ये जी रहात असते, जी ब्रह्मदेवाची देवता आहे, ऋग्वेदाचा एक, यजुर्वेदाचा एक, सामवेद व अथर्ववेदाचा एकेक अशा चार पादांची जी युक्त आहे, जी अष्टदिशा अष्टकुशींनी युक्त आहे, अशा त्या देवीचे ध्यान करावे.
व्याकरण, शिक्षा, कल्प, निरुक्त, ज्योतिष, इतिहास, पुराण, उपनिषद या सात मुखांनी जी युक्त आहे, अग्निमुखा, रुद्रशिखा, विष्णूचित्ता अशा माहेश्वरीची भावना करावी. जिचे कवच ब्रह्मदेव आहे, गोत्र सांख्यायन सांगितले आहे. त्या आदित्य मंडलात असलेल्या महेश्वरी देवीची ध्यान करावे.
अशारीतीने वेदमाता गायत्रीचे ध्यान करावे. नंतर देवीची प्रीती उत्पन्न करावी. अशी मुद्रा धारण करावी. संमुख, सुंपटं, विततं, विस्तृत, द्विमुख, त्रिमुख, चतुष्कं, पंचकं, षण्मुखं, अधोमुखं, व्यापकांडालीकं, शंकरं, यमपाशं, ग्रथितं, उमुखं, क्लिबं, मुष्टिकं, मस्त्यं, कूर्म, वराहकं, सिंहाक्रांतं, महाक्रांतं, मुद्गरं, पल्ववं हा गायत्रीच्या चोवीस मुद्रा आहेत. त्या सर्व मुद्रा तंत्रोक्त असून हातांनी करावयाच्या आहेत.
नंतर शंभर अक्षरांच्या गायत्रीची आवृत्ती करावी. गायत्रीची चोवीस अक्षरे सांगितलेली आहेत. तिचा उच्चार करून नंतर 'जातवेदसे सुनवाभ सोमं' ही ऋचा म्हणावी. शेवटी त्र्यंबकं यजामहे' हा मंत्र म्हणावा. याप्रमाणे तीन ऋचा म्हटल्यावर शंभर वर्णात्मक गायत्री होते. ही पुण्यकारक आहे. म्हणून ॐ भूः भुवः, स्व या व्याहृती म्हणून चोवीस अक्षरांची गायत्री म्हणावी.
श्रेष्ठ ब्राह्मणाने नित्य जप करावा. त्यामुळे संध्येचे फल प्राप्त होऊन सुख मिळते.