[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारद म्हणाले, ''हे भगवान, देवीचे चरित्र, त्या मातेचे आख्यान मी ऐकले. तिची उत्पत्ती हे सर्व मी श्रवण केले. आता कोणत्या आचारांमुळे देवी संतुष्ट होते ते मला सांगा.''
नारायण मुनी म्हणाले, सदाचाराच्या अनुष्ठानानेही देवी प्रसन्न होते. ब्राह्मणाने नित्य प्रातःकाली उठून हे अनुष्ठान करावे. आता त्याचा क्रम सांगतो. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ब्राह्मणाने सत्कर्मे करावीत. नित्य नैमित्तिक व अनिंद्य कर्मे करावीत. पुरुष स्वतःचा आपणच हितकर्ता असतो. कारण इतर कुणीही संकटाचे वेळी उभे रहात नाहीत. धर्मच उभा रहातो. म्हणून तू धर्माप्रमाणे आचरण कर. धर्मामुळे मनुष्य ज्ञानी होतो, आयुष्यमान होतो, पुत्रापौत्रादि सुखे भोगतो, त्याच्या पातकांचा नाश होतो. आचार हा श्रेष्ठ धर्म होय. आचारवान मनुष्य इहलोकी परलोकीही सुख भोगतो. अज्ञान अंधारात बुडालेल्यांना धर्मरूपी महादीप मुक्तीचा मार्ग दाखवतो. आचारामुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते. पुण्य लाभते. कर्माधिकार प्राप्त होतो. हे नारदा, आचार हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. जो द्विज उत्तम आचाररहित रहातो तो शूद्राप्रमाणे भ्रष्ट होय. आचार दोन प्रकारचा आहे. शास्त्रीय आचार व लौकिक आचार. कल्याणाची इच्छा करणार्याने दोन्ही आचार बाळगावेत.
ग्रामधर्म, जातीधर्म, देशधर्म, कुलधर्म हे सर्व धर्म पाळावेत. कारण दुराचार करणारा माणूस लौकिक जीवनात निंद्य ठरतो. तो दुःखी व व्याधीग्रस्त होतो. धर्मरहित अर्थ व काम यांचा त्याग करावा. दुःखदायक, लोक द्वेष करतात, असा धर्म सोडावा.
नारद म्हणाले, ''हे मुने, व्यवहारात अनेक शास्त्रे आहेत. तेव्हा धर्मनिर्णय कसा करावा ? धर्मनिर्णयास शास्त्रप्रमाण सांगा.''
नारायण म्हणतात, ''श्रुती, स्मृती हे दोन नेत्र असून पुराण हे हृदय आहे. या तिन्हीत सांगितलेला धर्म होय. या तिन्हीत कुठे विरोध असल्यास स्मृती हे प्रमाण आहे. भिन्न विषयानुरूप भिन्न स्मृतीवचने आढळतात. पुराणात तंत्राप्रमाणे बसणारी वचने आहेत. तोसुद्धा धर्मच आहे. पण चिरधर्म नव्हे. वेदाशी विरोध नसेल तर ते प्रमाण होय. वेद हेच धर्ममार्गात प्रमाण होय. त्याशी विरोध करणारे अप्रमाण होत. पापी लोकांसाठी यमलोकात कुंडे आहेत. म्हणून वेदोक्त धर्म आचरावा.
कोणतेही शास्त्र वेदमूलक असेल तर प्रमाण मानावे. असत् शास्त्राविषयी अभिमान बाळगणार्यांना खाली डोके वर पाय करून नरकात उभे रहावे लागते. यथेच्छ आचरण करणारे, पाशुपत नावाचे लिंग धारण करणारे, तप्तमुद्राधारक, वैखानस मताचे अनुयायी, हे सर्व वेदमार्ग सोडतात म्हणून नरकात पडतात म्हणून वेदोक्त धर्माचे आचरण करावे. मी आज दिलेले, देवविलेले किंवा वचन बोलल्याप्रमाणे कोणते सत्कार्य केले आहे ? असा विचार करावा. आपण केलेल्या पातकांचे स्मरण करावे. रात्रीच्या चवथ्या प्रहरी ब्राह्मणाने ध्यान करावे.
डाव्या मांडीवर उजवा पाय उताणा ठेवून तसाच उजव्या मांडीवर डावा पाय ठेवावा. मुख मागे घेऊन हनुवटीने उरास स्पर्श करावा. डोळे मिटून वृत्ती सात्त्विक कराव्यात. दातात दात लावू नये. जिव्हा टाळूस भिडवावी. तोंड बंद करून निश्चल बसावे. इंद्रियांचा निरोध करावा. अशाप्रकारे दोन-तीन वेळा प्राणायाम करावा. हृदयात ध्येयरूपाने स्थित असलेल्या प्रभूची धारणा धरावी. धारणा सिद्ध व्हावी म्हणून अभ्यास करावा.
सधूम, विधूम, समर्थ, अनर्थ, सलक्ष्य, अलक्ष्य असा सहा प्रकारचा प्राणायाम आहे. प्राणायामच सर्वश्रेष्ठ योग आहे. रेचक, पूरक, कुंभक, यामुळे प्राणायाम होतो. अ, ऊ व म या तीन वर्णांना प्रणव म्हणतात. इडा नावाच्या डाव्या नाकपुडीतल्या नाडीने वायू घेऊन उदरात साठवावा. मकारात्मक सोळा मात्रा उच्चारून उजव्या नाकपुडीतल्या पिंगला नाडीने श्वास सोडावा. ह्याला सधूम प्राणायाम म्हणतात.
मूलाधार, लिंग, नाभी, हृदय, कंठ, भूमध्य ही सहा चक्रे आहेत. भूचक्रात द्विदल कमल आहे. त्यावर हं व क्ष ही अक्षरे आहेत. कंठात सोळा दलांचे कमळ आहे. त्यावर सोळा स्वररूपाने तत्वार्थ रहातो. स्थानभयात्मक मूलधारात चतुर्दल कमल आहे. त्यावर व, श, ष व स ही अक्षरे आहेत. ड, फ, क, ढ या अक्षरांनी ते युक्त आहे.
लिंगात सहा दलाचे कमल आहे. त्यावर ब पासून ल पर्यंत अक्षरे आहेत. नाभीत दहा दलांचे कमल असून त्यावर ड पासून फ पर्यंत अष्टाक्षरे आहेत. हृदयात फ पासून ठ पर्यंत बारा अक्षरी कमळ आहे.
या अक्षरांनी ज्ञात होणार्या तत्त्वास नमस्कार असो, असे म्हणावे.
मूलाधाराचे ठिकाणी असलेल्या चतुर्दल कमलात स्थित रजोगुणवती, ह आणि रेफ यांच्यापुढे जिचे चिन्ह निश्चित झाले आहे, जिचे स्वरूप पद्म तंतूप्रमाणे आहे. रवी, अग्नी, चंद्र यांच्याप्रमाणे तेजस्वी मुख व स्तनयुग्म यांनी संपन्न अशा देवीचा एकदा जरी मनात उदय झाला तरी तो पुरुष मुक्त होतो.
अशारीतीने कुंडलिनीचे स्मरण करून सर्व कर्मे तिला अर्पण करावीत. ''हे देवा, मीच सर्वात्म असल्याने स्तुती व पूजा ही तुझीच आहेत. मीच देवी आहे. मी ब्रह्म आहे. मी दुःखी जीव नव्हे. मीच सच्चिदानंदरूप आहे.'' अशाप्रकारे स्वतःविषयी चिंतन करावे.
प्रत्येक प्राणायामसमयी प्रकाशमान, अमृतमय अशी अंतःकरणात संचार करणारी, आनंदरूप जी देवी तिला मी शरण आहे. आपल्या ब्रह्मरंधातील श्रेष्ठ गुरू ईश्वर याचे ध्यान करावे. त्याची मानसोपचारांनी विधियुक्त पूजा करावी. गुरू, ब्रह्मा, विष्णु, महेश्वरी देव असून गुरू परब्रह्मच आहे. म्हणून अशा गुरूस मी नमस्कार करतो. या मंत्राने ईश्वराचे स्तवन करावे.