प्र् श्रीमद्‌देवीभागवत महापुराण - नवमः स्कन्धः - प्रथमोऽध्यायः


श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
प्रथमोऽध्यायः


प्रकृतिचरित्रवर्णनम्

श्रीनारायण उवाच
गणेशजननी दुर्गा राधा लक्ष्मीः सरस्वती ।
सावित्री च सृष्टिविधौ प्रकृतिः पञ्चधा स्मृता ॥ १ ॥
नारद उवाच
आविर्बभूव सा केन का वा सा ज्ञानिनांवर ।
किं वा तल्लक्षणं साधो बभूव पञ्चधा कथम् ॥ २ ॥
सर्वासां चरितं पूजाविधानं गुण ईप्सितः ।
अवतारः कुत्र कस्यास्तन्मे व्याख्यातुमर्हसि ॥ ३ ॥
श्रीनारायण उवाच
प्रकृतेर्लक्षणं वत्स को वा वक्तुं क्षमो भवेत् ।
किञ्चित्तथापि वक्ष्यामि यच्छ्रुतं धर्मवक्त्रतः ॥ ४ ॥
प्रकृष्टवाचकः प्रश्न कृतिश्च सृष्टिवाचकः ।
सृष्टौ प्रकृष्टा या देवी प्रकृतिः सा प्रकीर्तिता ॥ ५ ॥
गुणे सत्त्वे प्रकृष्टे च प्रशब्दो वर्तते श्रुतः ।
मध्यमे रजसि कृश्च तिशब्दस्तमसि स्मृतः ॥ ६ ॥
त्रिगुणात्मस्वरूपा या सा च शक्तिसमन्विता ।
प्रधाना सृष्टिकरणे प्रकृतिस्तेन कथ्यते ॥ ७ ॥
प्रथमे वर्तते प्रश्न कृतिश्च सृष्टिवाचकः ।
सृष्टेरादौ च या देवी प्रकृतिः सा प्रकीर्तिता ॥ ८ ॥
योगेनात्मा सृष्टिविधौ द्विधारूपो बभूव सः ।
पुमांश्च दक्षिणार्धाङ्‌गो वामार्धा प्रकृतिः स्मृता ॥ ९ ॥
सा च ब्रह्मस्वरूपा च नित्या सा च सनातनी ।
यथाऽऽत्मा च तथा शक्तिर्यथाग्नौ दाहिका स्थिता ॥ १० ॥
अत एव हि योगीन्द्रैः स्त्रीपुम्भेदो न मन्यते ।
सर्वं ब्रह्ममयं ब्रह्मञ्छश्वत्सदपि नारद ॥ ११ ॥
स्वेच्छामयस्येच्छया च श्रीकृष्णस्य सिसृक्षया ।
साऽऽविर्बभूव सहसा मूलप्रकृतिरीश्वरी ॥ १२ ॥
तदाज्ञया पञ्चविधा सृष्टिकर्मविभेदिका ।
अथ भक्तानुरोधाद्वा भक्तानुग्रहविग्रहा ॥ १३ ॥
गणेशमाता दुर्गा या शिवरूपा शिवप्रिया ।
नारायणी विष्णुमाया पूर्णब्रह्मस्वरूपिणी ॥ १४ ॥
ब्रह्मादिदेवैर्मुनिभिर्मनुभिः पूजिता स्तुता ।
सर्वाधिष्ठातृदेवी सा शर्वरूपा सनातनी ॥ १५ ॥
धर्मसत्यपुण्यकीर्तिर्यशोमङ्‌गलदायिनी ।
सुखमोक्षहर्षदात्री शोकार्तिदुःखनाशिनी ॥ १६ ॥
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणा ।
तेजःस्वरूपा परमा तदधिष्ठातृदेवता ॥ १७ ॥
सर्वशक्तिस्वरूपा च शक्तिरीशस्य सन्ततम् ।
सिद्धेश्वरी सिद्धिरूपा सिद्धिदा सिद्धिरीश्वरी ॥ १८ ॥
बुद्धिर्निद्रा क्षुत्पिपासा छाया तन्द्रा दया स्मृतिः ।
जातिः क्षान्तिश्च भ्रान्तिश्च शान्तिः कान्तिश्च चेतना ॥ १९ ॥
तुष्टिः पुष्टिस्तथा लक्ष्मीर्धृतिर्माया तथैव च ।
सर्वशक्तिस्वरूपा सा कृष्णस्य परमात्मनः ॥ २० ॥
उक्तः श्रुतौ श्रुतगुणश्चातिस्वल्पो यथागमम् ।
गुणोऽस्त्यनन्तोऽनन्ताया अपरां च निशामय ॥ २१ ॥
शुद्धसत्त्वस्वरूपा या पद्मा सा परमात्मनः ।
सर्वसम्पत्स्वरूपा सा तदधिष्ठातृदेवता ॥ २२ ॥
कान्तातिदान्ता शान्ता च सुशीला सर्वमङ्‌गला ।
लोभमोहकामरोषमदाहङ्‌कारवर्जिता ॥ २३ ॥
भक्तानुरक्ता पत्युश्च सर्वाभ्यश्च पतिव्रता ।
प्राणतुल्या भगवतः प्रेमपात्रं प्रियंवदा ॥ २४ ॥
सर्वसस्यात्मिका देवी जीवनोपायरूपिणी ।
महालक्ष्मीश्च वैकुण्ठे पतिसेवारता सती ॥ २५ ॥
स्वर्गे च स्वर्गलक्ष्मीश्च राजलक्ष्मीश्च राजसु ।
गृहेषु गृहलक्ष्मीश्च मर्त्यानां गृहिणां तथा ॥ २६ ॥
सर्वप्राणिषु द्रव्येषु शोभारूपा मनोहरा ।
कीर्तिरूपा पुण्यवतां प्रभारूपा नृपेषु च ॥ २७ ॥
वाणिज्यरूपा वणिजां पापिनां कलहाङ्‌कुरा ।
दयारूपा च कथिता वेदोक्ता सर्वसम्मता ॥ २८ ॥
सर्वपूज्या सर्ववन्द्या चान्यां मत्तो निशामय ।
वाग्बुद्धिविद्याज्ञानाधिष्ठात्री च परमात्मनः ॥ २९ ॥
सर्वविद्यास्वरूपा या सा च देवी सरस्वती ।
सा बुद्धिः कविता मेधा प्रतिभा स्मृतिदा नृणाम् ॥ ३० ॥
नानाप्रकारसिद्धान्तभेदार्थकलना मता ।
व्याख्याबोधस्वरूपा च सर्वसन्देहभञ्जिनी ॥ ३१ ॥
विचारकारिणी ग्रन्थकारिणी शक्तिरूपिणी ।
स्वरसङ्‌गीतसन्धानतालकारणरूपिणी ॥ ३२ ॥
विषयज्ञानवाग्‍रूपा प्रतिविश्वोपजीविनी ।
व्याख्यावादकरी शान्ता वीणापुस्तकधारिणी ॥ ३३ ॥
शुद्धसत्त्वस्वरूपा च सुशीला श्रीहरिप्रिया ।
हिमचन्दनकुन्देन्दुकुमुदाम्भोजसन्निभा ॥ ३४ ॥
यजन्ती परमात्मानं श्रीकृष्णं रत्‍नमालया ।
तपःस्वरूपा तपसां फलदात्री तपस्विनाम् ॥ ३५ ॥
सिद्धिविद्यास्वरूपा च सर्वसिद्धिप्रदा सदा ।
यया विना तु विप्रौघो मूको मृतसमः सदा ॥ ३६ ॥
देवी तृतीया गदिता श्रुत्युक्ता जगदम्बिका ।
यथागमं यथाकिञ्चिदपरां त्वं निबोध मे ॥ ३७ ॥
माता चतुर्णां वर्णानां वेदाङ्‌गानां च छन्दसाम् ।
सन्ध्यावन्दनमन्त्राणां तन्त्राणां च विचक्षणा ॥ ३८ ॥
द्विजातिजातिरूपा च जपरूपा तपस्विनी ।
ब्रह्मण्यतेजोरूपा च सर्वसंस्काररूपिणी ॥ ३९ ॥
पवित्ररूपा सावित्री गायत्री ब्रह्मणः प्रिया ।
तीर्थानि यस्याः संस्पर्शं वाञ्छन्ति ह्यात्मशुद्धये ॥ ४० ॥
शुद्धस्फटिकसंकाशा शुद्धसत्त्वस्वरूपिणी ।
परमानन्दरूपा च परमा च सनातनी ॥ ४१ ॥
परब्रह्मस्वरूपा च निर्वाणपददायिनी ।
ब्रह्मतेजोमयी शक्तिस्तदधिष्ठातृदेवता ॥ ४२ ॥
यत्पादरजसा पूतं जगत्सर्वं च नारद ।
देवी चतुर्थी कथिता पञ्चमीं वर्णयामि ते ॥ ४३ ॥
पञ्चप्राणाधिदेवी या पञ्चप्राणस्वरूपिणी ।
प्राणाधिकप्रियतमा सर्वाभ्यः सुन्दरी परा ॥ ४४ ॥
सर्वयुक्ता च सौभाग्यमानिनी गौरवान्विता ।
वामाङ्‌गार्धस्वरूपा च गुणेन तेजसा समा ॥ ४५ ॥
परावरा सारभूता परमाद्या सनातनी ।
परमानन्दरूपा च धन्या मान्या च पूजिता ॥ ४६ ॥
रासक्रीडाधिदेवी श्रीकृष्णस्य परमात्मनः ।
रासमण्डलसम्भूता रासमण्डलमण्डिता ॥ ४७ ॥
रासेश्वरी सुरसिका रासावासनिवासिनी ।
गोलोकवासिनी देवी गोपीवेषविधायिका ॥ ४८ ॥
परमाह्लादरूपा च सन्तोषहर्षरूपिणी ।
निर्गुणा च निराकारा निर्लिप्ताऽऽत्मस्वरूपिणी ॥ ४९ ॥
निरीहा निरहङ्‌कारा भक्तानुग्रहविग्रहा ।
वेदानुसारिध्यानेन विज्ञाता मा विचक्षणैः ॥ ५० ॥
दृष्टिदृष्टा न सा चेशैः सुरेन्द्रैर्मुनिपुङ्‌गवैः ।
वह्निशुद्धांशुकधरा नानालङ्‌कारभूषिता ॥ ५१ ॥
कोटिचन्द्रप्रभा पुष्टसर्वश्रीयुक्तविग्रहा ।
श्रीकृष्णभक्तिदास्यैककरा च सर्वसम्पदाम् ॥ ५२ ॥
अवतारे च वाराहे वृषभानुसुता च या ।
यत्पादपद्मसंस्पर्शात्पवित्रा च वसुन्धरा ॥ ५३ ॥
ब्रह्मादिभिरदृष्टा या सर्वैर्दृष्टा च भारते ।
स्त्रीरत्‍नसारसम्भूता कृष्णवक्षःस्थले स्थिता ॥ ५४ ॥
यथाम्बरे नवघने लोला सौदामनी मुने ।
षष्टिवर्षसहस्राणि प्रतप्तं ब्रह्मणा पुरा ॥ ५५ ॥
यत्पादपद्मनखरदृष्टये चात्मशुद्धये ।
न च दृष्टं च स्वप्नेऽपि प्रत्यक्षस्यापि का कथा ॥ ५६ ॥
तेनैव तपसा दृष्टा भुवि वृन्दावने वने ।
कथिता पञ्चमी देवी सा राधा च प्रकीर्तिता ॥ ५७ ॥
अंशरूपाः कलारूपाः कलांशांशांशसम्भवाः ।
प्रकृतेः प्रतिविश्वेषु देव्यश्च सर्वयोषितः ॥ ५८ ॥
परिपूर्णतमाः पञ्च विद्यादेव्यः प्रकीर्तिताः ।
या याः प्रधानांशरूपा वर्णयामि निशामय ॥ ५९ ॥
प्रधानांशस्वरूपा सा गङ्‌गा भुवनपावनी ।
विष्णुविग्रहसम्भूता द्रवरूपा सनातनी ॥ ६० ॥
पापिपापेध्मदाहाय ज्वलदग्निस्वरूपिणी ।
सुखस्पर्शा स्नानपानैर्निर्वाणपददायिनी ॥ ६१ ॥
गोलोकस्थानप्रस्थानसुखसोपानरूपिणी ।
पवित्ररूपा तीर्थानां सरितां च परावरा ॥ ६२ ॥
शम्भुमौलिजटामेरुमुक्तापंक्तिस्वरूपिणी ।
तपःसम्पादिनी सद्यो भारतेषु तपस्विनाम् ॥ ६३ ॥
चन्द्रपद्मक्षीरनिभा शुद्धसत्त्वस्वरूपिणी ।
निर्मला निरहङ्‌कारा साध्वी नारायणप्रिया ॥ ६४ ॥
प्रधानांशस्वरूपा च तुलसी विष्णुकामिनी ।
विष्णुभूषणरूपा च विष्णुपादस्थिता सती ॥ ६५ ॥
तपःसंकल्पपूजादिसङ्‌घसम्पादिनी मुने ।
सारभूता च पुष्पाणां पवित्रा पुण्यदा सदा ॥ ६६ ॥
दर्शनस्पर्शनाभ्यां च सद्यो निर्वाणदायिनी ।
कलौ कलुषशुष्केध्मदहनायाग्निरूपिणी ॥ ६७ ॥
यत्पादपद्मसंस्पर्शात्सद्यः पूता वसुन्धरा ।
यत्स्पर्शदर्शने चैवेच्छन्ति तीर्थानि शुद्धये ॥ ६८ ॥
यया विना च विश्वेषु सर्वकर्म च निष्फलम् ।
मोक्षदा या मुमुक्षूणां कामिनी सर्वकामदा ॥ ६९ ॥
कल्पवृक्षस्वरूपा या भारते वृक्षरूपिणी ।
भारतीनां प्रीणनाय जाता या परदेवता ॥ ७० ॥
प्रधानांशस्वरूपा या मनसा कश्यपात्मजा ।
शङ्‌करप्रियशिष्या च महाज्ञानविशारदा ॥ ७१ ॥
नागेश्वरस्यानन्तस्य भगिनी नागपूजिता ।
नागेश्वरी नागमाता सुन्दरी नागवाहिनी ॥ ७२ ॥
नागेन्द्रगणसंयुक्ता नागभूषणभूषिता ।
नागेन्द्रवन्दिता सिद्धा योगिनी नगशायिनी ॥ ७३ ॥
विष्णुरूपा विष्णुभक्ता विष्णुपूजापरायणा ।
तपःस्वरूपा तपसां फलदात्री तपस्विनी ॥ ७४ ॥
दिव्यं त्रिलक्षवर्षं च तपस्तप्त्वा च या हरेः ।
तपस्विनीषु पूज्या च तपस्विषु च भारते ॥ ७५ ॥
सर्वमन्त्राधिदेवी च ज्वलन्ती ब्रह्मतेजसा ।
ब्रह्मस्वरूपा परमा ब्रह्मभावनतत्परा ॥ ७६ ॥
जरत्कारुमुनेः पत्‍नी कृष्णांशस्य पतिव्रता ।
आस्तीकस्य मुनेर्माता प्रवरस्य तपस्विनाम् ॥ ७७ ॥
प्रधानांशस्वरूपा या देवसेना च नारद ।
मातृकासु पूज्यतमा सा षष्ठी च प्रकीर्तिता ॥ ७८ ॥
पुत्रपौत्रादिदात्री च धात्री त्रिजगतां सती ।
षष्ठांशरूपा प्रकृतेस्तेन षष्ठी प्रकीर्तिता ॥ ७९ ॥
स्थाने शिशूनां परमा वृद्धरूपा च योगिनी ।
पूजा द्वादशमासेषु यस्या विश्वेषु सन्ततम् ॥ ८० ॥
पूजा च सूतिकागारे पुरा षष्ठदिने शिशोः ।
एकविंशतिमे चैव पूजा कल्याणहेतुकी ॥ ८१ ॥
मुनिभिर्नमिता चैषा नित्यकामाप्यतः परा ।
मातृका च दयारूपा शश्वद्‌रक्षणकारिणी ॥ ८२ ॥
जले स्थले चान्तरिक्षे शिशूनां सद्मगोचरे ।
प्रधानांशस्वरूपा च देवीमङ्‌गलचण्डिका ॥ ८३ ॥
प्रकृतेर्मुखसम्भूता सर्वमङ्‌गलदा सदा ।
सृष्टौ मङ्‌गलरूपा च संहारे कोपरूपिणी ॥ ८४ ॥
तेन मङ्‌गलचण्डी सा पण्डितैः परिकीर्तिता ।
प्रतिमङ्‌गलवारेषु प्रतिविश्वेषु पूजिता ॥ ८५ ॥
पुत्रपौत्रधनैश्वर्ययशोमङ्‌गलदायिनी ।
परितुष्टा सर्ववाञ्छाप्रदात्री सर्वयोषिताम् ॥ ८६ ॥
रुष्टा क्षणेन संहर्तुं शक्ता विश्वं महेश्वरी ।
प्रधानांशस्वरूपा सा काली कमललोचना ॥ ८७ ॥
दुर्गाललाटसम्भूता रणे शुम्भनिशुम्भयोः ।
दुर्गार्धांशस्वरूपा सा गुणेन तेजसा समा ॥ ८८ ॥
कोटिसूर्यसमाजुष्टपुष्टजाज्वलविग्रहा ।
प्रधाना सर्वशक्तीनां बला बलवती परा ॥ ८९ ॥
सर्वसिद्धिप्रदा देवी परमा योगरूपिणी ।
कृष्णभक्ता कृष्णतुल्या तेजसा विक्रमैर्गुणैः ॥ ९० ॥
कृष्णभावनया शश्वत्कृष्णवर्णा सनातनी ।
संहर्तुं सर्वब्रह्माण्डं शक्ता निःश्वासमात्रतः ॥ ९१ ॥
रणं दैत्यैः समं तस्याः क्रीडया लोकशिक्षया ।
धर्मार्थकाममोक्षांश्च दातुं शक्ता च पूजिता ॥ ९२ ॥
ब्रह्मादिभिः स्तूयमाना मुनिभिर्मनुभिर्नरैः ।
प्रधानांशस्वरूपा सा प्रकृतेश्च वसुन्धरा ॥ ९३ ॥
आधाररूपा सर्वेषां सर्वसस्या प्रकीर्तिता ।
रत्‍नाकरा रत्‍नगर्भा सर्वरत्‍नाकराश्रया ॥ ९४ ॥
प्रजाभिश्च प्रजेशैश्च पूजिता वन्दिता सदा ।
सर्वोपजीव्यरूपा च सर्वसम्पद्विधायिनी ॥ ९५ ॥
यया विना जगत्सर्वं निराधारं चराचरम् ।
प्रकृतेश्च कला या यास्ता निबोध मुनीश्वर ॥ ९६ ॥
यस्य यस्य च या पत्‍नी तत्सर्वं वर्णयामि ते ।
स्वाहादेवी वह्निपत्‍नी प्रतिविश्वेषु पूजिता ॥ ९७ ॥
यया विना हविर्दानं न ग्रहीतुं सुराः क्षमाः ।
दक्षिणा यज्ञपत्‍नी च दीक्षा सर्वत्र पूजिता ॥ ९८ ॥
यया विना हि विश्वेषु सर्वकर्म हि निष्फलम् ।
स्वधा पितॄणां पत्‍नी च मुनिभिर्मनुभिर्नरैः ॥ ९९ ॥
पूजिता पितृदानं हि निष्कलं च यया विना ।
स्वस्तिदेवी वायुपत्‍नी प्रतिविश्वेषु पूजिता ॥ १०० ॥
आदानं च प्रदानं च निष्फलं च यया विना ।
पुष्टिर्गणपतेः पत्‍नी पूजिता जगतीतले ॥ १०१ ॥
यया विना परिक्षीणाः पुमांसो योषितोऽपि च ।
अनन्तपत्‍नी तुष्टिश्च पूजिता वन्दिता भवेत् ॥ १०२ ॥
यया विना न सन्तुष्टाः सर्वलोकाश्च सर्वतः ।
ईशानपत्‍नी सम्पत्तिः पूजिता च सुरैर्नरैः ॥ १०३ ॥
सर्वे लोका दरिद्राश्च विश्वेषु च यया विना ।
धृतिः कपिलपत्‍नी च सर्वैः सर्वत्र पूजिता ॥ १०४ ॥
सर्वे लोका अधैर्याश्च जगत्सु च यया विना ।
सत्यपत्‍नी सती मुक्तैः पूजिता च जगत्प्रिया ॥ १०५ ॥
यया विना भवेल्लोको बन्धुतारहितः सदा ।
मोहपत्‍नी दया साध्वी पूजिता च जगत्प्रिया ॥ १०६ ॥
सर्वे लोकाश्च सर्वत्र निष्फलाश्च यया विना ।
पुण्यपत्‍नी प्रतिष्ठा सा पूजिता पुण्यदा सदा ॥ १०७ ॥
यया विना जगत्सर्वं जीवन्मृतसमं मुने ।
सुकर्मपत्‍नी संसिद्धा कीर्तिर्धन्यैश्च पूजिता ॥ १०८ ॥
यया विना जगत्सर्वं यशोहीनं मृतं यथा ।
क्रिया तूद्योगपत्‍नी च पूजिता सर्वसम्मता ॥ १०९ ॥
यया विना जगत्सर्वं विधिहीनं च नारद ।
अधर्मपत्‍नी मिथ्या सा सर्वधूर्तैश्च पूजिता ॥ ११० ॥
यया विना जगत्सर्वमुच्छिन्नं विधिनिर्मितम् ।
सत्ये अदर्शना या च त्रेतायां सूक्ष्मरूपिणी ॥ १११ ॥
अर्धावयवरूपा च द्वापरे चैव संवृता ।
कलौ महाप्रगल्भा च सर्वत्र व्यापिका बलात् ॥ ११२ ॥
कपटेन समं भ्रात्रा भ्रमते च गृहे गृहे ।
शान्तिर्लज्जा च भार्ये द्वे सुशीलस्य च पूजिते ॥ ११३ ॥
याभ्यां विना जगत्सर्वमुन्मत्तमिव नारद ।
ज्ञानस्य तिस्रो भार्याश्च बुद्धिर्मेधाधृतिस्तथा ॥ ११४ ॥
याभिर्विना जगत्सर्वं मूढं मत्तसमं सदा ।
मूर्तिश्च धर्मपत्‍नी सा कान्तिरूपा मनोहरा ॥ ११५ ॥
परमात्मा च विश्वौघो निराधारो यया विना ।
सर्वत्र शोभारूपा च लक्ष्मीर्मूर्तिमती सती ॥ ११६ ॥
श्रीरूपा मूर्तिरूपा च मान्या धन्यातिपूजिता ।
कालाग्नी रुद्रपत्‍नी च निद्रा सा सिद्धयोगिनी ॥ ११७ ॥
सर्वे लोकाः समाच्छन्ना यया योगेन रात्रिषु ।
कालस्य तिस्रो भार्याश्च संध्या रात्रिर्दिनानि च ॥ ११८ ॥
याभिर्विना विधाता च संख्यां कर्तुं न शक्यते ।
क्षुत्पिपासे लोभभार्ये धन्ये मान्ये च पूजिते ॥ ११९ ॥
याभ्यां व्याप्तं जगत्सर्वं नित्यं चिन्तातुरं भवेत् ।
प्रभा च दाहिका चैव द्वे भार्ये तेजसस्तथा ॥ १२० ॥
याभ्यां विना जगत्स्रष्टा विधातुं च न हीश्वरः ।
कालकन्ये मृत्युजरे प्रज्वारस्य प्रियाप्रिये ॥ १२१ ॥
याभ्यां जगत्समुच्छिन्नं विधात्रा निर्मितं विधौ ।
निद्राकन्या च तन्द्रा सा प्रीतिरन्या सुखप्रिये ॥ १२२ ॥
याभ्यां व्याप्तं जगत्सर्वं विधिपुत्र विधेर्विधौ ।
वैराग्यस्य च द्वे भार्ये श्रद्धा भक्तिश्च पूजिते ॥ १२३ ॥
याभ्यां शश्वज्जगत्सर्वं यज्जीवन्मुक्तिमन्मुने ।
अदितिर्देवमाता च सुरभी च गवां प्रसूः ॥ १२४ ॥
दितिश्च दैत्यजननी कद्रूश्च विनता दनुः ।
उपयुक्ताः सृष्टिविधावेतास्तु कीर्तिताः कलाः ॥ १२५ ॥
कला अन्याः सन्ति बह्व्यस्तासु काश्चिन्निबोध मे ।
रोहिणी चन्द्रपत्‍नी च संज्ञा सूर्यस्य कामिनी ॥ १२६ ॥
शतरूपा मनोर्भार्या शचीन्द्रस्य च गेहिनी ।
तारा बृहस्पतेर्भार्या वसिष्ठस्याप्यरुन्धती ॥ १२७ ॥
अहल्या गौतमस्त्री साप्यनसूयात्रिकामिनी ।
देवहूतिः कर्दमस्य प्रसूतिर्दक्षकामिनी ॥ १२८ ॥
पितॄणां मानसी कन्या मेनका साम्बिकाप्रसूः ।
लोपामुद्रा तथा कुन्ती कुबेरकामिनी तथा ॥ १२९ ॥
वरुणानी प्रसिद्धा च बलेर्विन्ध्यावलिस्तथा ।
कान्ता च दमयन्ती च यशोदा देवकी तथा ॥ १३० ॥
गान्धारी द्रौपदी शैव्या सा च सत्यवती प्रिया ।
वृषभानुप्रिया साध्वी राधामाता कुलोद्वहा ॥ १३१ ॥
मन्दोदरी च कौसल्या सुभद्रा कौरवी तथा ।
रेवती सत्यभामा च कालिन्दी लक्ष्मणा तथा ॥ १३२ ॥
जाम्बवती नाग्नजितिर्मित्रविन्दा तथापरा ।
लक्ष्मणा रुक्मिणी सीता स्वयं लक्ष्मीः प्रकीर्तिता ॥ १३३ ॥
काली योजनगन्धा च व्यासमाता महासती ।
बाणपुत्री तथोषा च चित्रलेखा च तत्सखी ॥ १३४ ॥
प्रभावती भानुमती तथा मायावती सती ।
रेणुका च भृगोर्माता राममाता च रोहिणी ॥ १३५ ॥
एकनन्दा च दुर्गा सा श्रीकृष्णभगिनी सती ।
बह्व्यः सत्यः कलाश्चैव प्रकृतेरेव भारते ॥ १३६ ॥
या याश्च ग्रामदेव्यः स्युस्ताः सर्वाः प्रकृतेः कलाः ।
कलांशांशसमुद्‌भूताः प्रतिविश्वेषु योषितः ॥ १३७ ॥
योषितामवमानेन प्रकृतेश्च पराभवः ।
ब्राह्मणी पूजिता येन पतिपुत्रवती सती ॥ १३८ ॥
प्रकृतिः पूजिता तेन वस्त्रालङ्‌कारचन्दनैः ।
कुमारी चाष्टवर्षीया वस्त्रालङ्‌कारचन्दनैः ॥ १३९ ॥
पूजिता येन विप्रस्य प्रकृतिस्तेन पूजिता ।
सर्वाः प्रकृतिसम्भूता उत्तमाधममध्यमाः ॥ १४० ॥
सत्त्वांशाश्चोत्तमा ज्ञेयाः सुशीलाश्च पतिव्रताः ।
मध्यमा रजसश्चांशास्ताश्च भोग्याः प्रकीर्तिताः ॥ १४१ ॥
सुखसम्भोगवश्याश्च स्वकार्ये तत्पराः सदा ।
अधमास्तमसश्चांशा अज्ञातकुलसम्भवाः ॥ १४२ ॥
दुर्मुखाः कुलहा धूर्ताः स्वतन्त्राः कलहप्रियाः ।
पृथिव्यां कुलटा याश्च स्वर्गे चाप्सरसां गणाः ॥ १४३ ॥
प्रकृतेस्तमसश्चांशाः पुंश्चल्यः परिकीर्तिताः ।
एवं निगदितं सर्वं प्रकृते रूपवर्णनम् ॥ १४४ ॥
ताः सर्वाः पूजिताः पृथ्व्यां पुण्यक्षेत्रे च भारते ।
पूजिता सुरथेनादौ दुर्गा दुर्गार्तिनाशिनी ॥ १४५ ॥
ततः श्रीरामचन्द्रेण रावणस्य वधार्थिना ।
तत्पश्चाज्जगतां माता त्रिषु लोकेषु पूजिता ॥ १४६ ॥
जाताऽऽदौ दक्षकन्या या निहत्य दैत्यदानवान् ।
ततो देहं परित्यज्य यज्ञे भर्तुश्च निन्दया ॥ १४७ ॥
जज्ञे हिमवतः पत्‍न्यां लेभे पशुपतिं पतिम् ।
गणेशश्च स्वयं कृष्णः स्कन्दो विष्णुकलोद्‍भवः ॥ १४८ ॥
बभूवतुस्तौ तनयौ पश्चात्तस्याश्च नारद ।
लक्ष्मीर्मङ्‌गलभूपेन प्रथमं परिपूजिता ॥ १४९ ॥
त्रिषु लोकेषु तत्पश्चाद्देवतामुनिमानवैः ।
सावित्री चाश्वपतिना प्रथमं परिपूजिता ॥ १५० ॥
तत्पश्चात्त्रिषु लोकेषु देवतामुनिपुङ्‌गवैः ।
आदौ सरस्वती देवी ब्रह्मणा परिपूजिता ॥ १५१ ॥
तत्पश्चात्त्रिषु लोकेषु देवतामुनिपुङ्‌गवैः ।
प्रथमं पूजिता राधा गोलोके रासमण्डले ॥ १५२ ॥
पौर्णमास्यां कार्तिकस्य कृष्णेन परमात्मना ।
गोपिकाभिश्च गोपैश्च बालिकाभिश्च बालकैः ॥ १५३ ॥
गवां गणैः सुरभ्या च तत्पश्चादाज्ञया हरेः ।
तदा ब्रह्मादिभिर्देवैर्मुनिभिः परया मुदा ॥ १५४ ॥
पुष्पधूपादिभिर्भक्त्या पूजिता वन्दिता सदा ।
पृथिव्यां प्रथमं देवी सुयज्ञेनैव पूजिता ॥ १५५ ॥
शङ्‌करेणोपदिष्टेन पुण्यक्षेत्रे च भारते ।
त्रिषु लोकेषु तत्पश्चादाज्ञया परमात्मनः ॥ १५६ ॥
पुष्पधूपादिभिर्भक्त्या पूजिता मुनिभिः सदा ।
कला या याः समुद्‌भूता पूजितास्ताश्च भारते ॥ १५७ ॥
पूजिता ग्रामदेव्यश्च ग्रामे च नगरे मुने ।
एवं ते कथितं सर्वं प्रकृतेश्चरितं शुभम् ॥ १५८ ॥
यथागमं लक्षणं च किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ १५९ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे
प्रकृतिचरित्रवर्णनं नाम प्रथमोध्यायः ॥ १ ॥


शक्तींचे संक्षिप्त वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायण मुनी म्हणाले, "प्रकृतिरूपी सृष्टीवर केवळ उपकार करावेत या भावनेने श्री गणेशाची माता दुर्गा ही राधा, लक्ष्मी, सरस्वती व सावित्री अशा पाच स्वरूपात वर्णन केली आहे."

नारद म्हणाले, "हे मुनीश्रेष्ठा, तिला प्रकट होण्यासाठी काय कारण घडले ? ती प्रकट झालेली प्रकृती जड आहे की अजड आहे ? तिचे लक्षण कशा प्रकारचे आहे ?

हे साधो, ती पाच स्वरूपात कशी प्राप्त झाली ? दुर्गा वगैरे स्वरूपांचे चरित्र, पूजाविधी, शिवाय त्यांचा अवतार कोणापासून झाला ?"

नारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, हे बालका, त्या प्रवृत्तीचे लक्षण सांगण्यास कोणीही वस्तुतः समर्थ नाही. पण धर्माच्या तोंडून मी जसे ऐकले आहे तसेच मी सांप्रत तुला सांगतो.

हे देवर्षे, प्रकृष्ठ म्हणजे मुख्य प्रकृती शब्दातील प्र हे पद प्रकृष्ठाचा बोध करून देते. कृती या शब्दाने सृष्टीचे ज्ञान होते. म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीसाठी जी देवी मुख्य आहे ती प्रकृती होय. मुख्यत्वेकरून प्र हा शब्द सत्त्व गुणाचा निर्देशक आहे. कृ या शब्दामुळे रजोगुणाचे दर्शन घडते ति हा शब्द तामस गुणाचे द्योतक आहे. याचा अर्थ असा की, प्र, कृ, ति या तिन्ही अक्षरांमुळे ज्या नावाचा अर्थबोध होतो ते सत्त्व, रज, तम हे गुण होत.

तीन गुण हेच त्या देवीचे स्वरूप आहे. ती माया आवरण व विक्षेप या दोन शक्तींनी युक्त आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचे मुख्य कारण तीच आहे. म्हणून तिला प्रकृती असे म्हणतात.

प्रकृती या शब्दातील प्र हे अक्षर प्रथम असा बोध करते. कृती शब्द उत्पत्तीचे दर्शक आहे, म्हणून सृष्टीच्या पूर्वीही जी देवी आहे तीच प्रकृती होय असे वर्णन केले आहे. सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी मायारूप शक्तीने युक्त असलेला परमात्मा दोन रूपांचा म्हणजे अर्धी स्त्री व अर्धा पुरुष असा झाला.

तो आपल्या स्वरूपातील उजव्या बाजूच्या अर्ध्या अंगाने पुरुष असून डाव्या बाजूचे अर्धे अंग प्रकृती स्वरूपाचे आहे. ती शक्ती ब्रह्मस्वरूपच आहे.

ज्याप्रमाणे अग्नीत दहन करण्याची दाहकता ती शक्ती आहे, त्याचप्रमाणे ही शक्ती माया ब्रह्मस्वरूपातच स्थित आहे. या अग्नीपासून ही दाहकशक्ती वेगळी काढता येणारच नाही. तसेच ब्रह्मस्वरूपातून हिला वेगळे काढता येणार नाही. म्हणूनच श्रेष्ठ सिद्ध पुरुष स्त्री आणि पुरुष यात भेद मानीत नाही.

हे ब्रह्मपुत्रा नारदा, हे सर्व ब्रह्ममय आहे. ते त्रिकालाबाधित व नित्य आहे. स्वतःच्या इच्छामय असा जो श्रीकृष्ण त्याच्या सृष्टी उत्पन्न करण्याच्या इच्छेने ती सर्वांचे नियमन करणारी मूल प्रकृती तत्‌काल प्रकट झाली. नंतर त्या परमात्म्याच्या आज्ञेने सृष्टीच्या कर्माचा भेद करणारी ती माया पाच स्वरूपात व्यक्त झाली. अथवा भक्तांवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने ती आपले स्वरूप प्रकट करते असे म्हटले तरी चालेल. त्यासाठीच ती योग्य देह धारण करते.

गणेशाची माता जी दुर्गा ती शिवरूप आहे, व शिवाला अति प्रिय आहे. ती नारायणी नावाची विष्णूची माया परब्रह्म स्वरूप आहे. ब्रह्मदेव वगैरे देव व मुनी तिचीच उपासना करतात व स्तुती करतात. तीच शंकरस्वरूपी सनातन देवी सर्वांचाच आधार आहे हे लक्षात ठेव.

ती धर्मद्वारा कधीही नष्ट होत नाही. तिची कीर्ती पुण्यकारक आहे. ती भक्तांना शुभ यश देते. तसेच ती सुख, मोक्ष व हर्ष प्राप्त करून देते. ती आपल्या मनाची तळमळ नाहीशी करते. शरीरव्यथांचा नाश करते व दुःखे नष्ट करून टाकते शरण आलेल्यांचे ती अशाप्रकारे रक्षण करते.

तीच तेज स्वरूपाची देवी श्रेष्ठ असून कृष्णाच्या अंतःकरणरूप तेजाची आधारभूत देवता आहे. सर्वशक्ती हेच तिचे स्वरूप आहे. ती स्वतःच ईश्वराची नित्य शक्ती आहे. ती सिद्धांचे नियमन करते. ती सिद्धीरूप असून सिद्धी देते. ती मूर्तिमंत सिद्धी व ईश्वरी माया आहे.

बुद्धी, निद्रा, क्षुधा, तृष्णा, छाया, आळस म्हणजे तंद्रा, तुष्टी, पुष्टी, लक्ष्मी, धृती, माया इत्यादी सर्व तिचेच स्वरूप आहे. सारांश ती देवी परमात्मा कृष्णाचे सर्व शक्तीस्वरूप आहे.

श्रुतीमध्ये सांगितलेले दुर्गेचे प्रसिद्ध गुण आता मी तुला कथन केले. अंतरहित अशा देवीचे गुण पाहिले असता वेदांप्रमाणे अनंत आहेत. आता हे नारदा, तू माझ्याकडून दुसर्‍या देवीचे वर्णन ऐक.

शुद्धसत्त्व स्वरूपिणी अशी ती देवी पद्मा ही त्या परमात्म्याची दुसरी शक्ती आहे. ती संपत्तीची देवता आहे व स्वतः संपत्तीरूप आहे. कांता, आदिशांता, शांता, सुशीला, सर्वमंगला अशी त्या देवीची यथायोग्य नावे आहेत. लोभ, मोह, काम, रोष, मद व अहंकार यांपासून ती अलिप्त आहे.

ती आपल्या भक्तांवर फार प्रेम करते. ती पतिव्रता असून पतीलाही ती सर्वापेक्षा जास्त प्रिय आहे. ती देवी प्राणाप्रमाणे व प्रिय अशीच वाटते. म्हणून ती त्या भगवानाचे प्रेमाचेच स्थान आहे. ती देवी सर्व प्रकारच्या धान्यात्मक असून तीच सर्वांच्या जीवनाचा तद्‌रूप उपाय आहे.

ती सती महालक्ष्मी वैकुंठात पतीच्या सेवेत सदा मग्न असते. तिलाच स्वर्गातील देव स्वर्गलक्ष्मी म्हणतात. राजे तिला राजलक्ष्मी म्हणून ओळखतात तर मृत्यूलोकाच्या घरात ती गृहलक्ष्मी म्हणून असते.

सर्व प्राण्यांच्या व द्रव्याच्या ठिकाणी मनोहर अशा शोभारूपाने, पुण्यवान पुरुषांचे ठिकाणी ती कीर्तिरूपाने, प्राण्यांच्या ठिकाणी कलहांकुर रूपाने नित्य वास्तव्य करते. ती लक्ष्मी देवी ही दयारूप आहे. तसेच ती वेदांनी प्रतिपादिली असल्याने सर्वांनाच संमत आहे. आता सर्वांना अत्यंत वंदनीय व पूज्य अशा तिसर्‍या देवीसंबंधी तुला सांगतो, तू ऐक.

परमात्म्याची वाणी, बुद्धी, विद्या व ज्ञान यांची आधारभूत देवी आहे. तीच सर्व विद्यांचे स्वरूप असून प्रत्यक्ष सरस्वती तीच आहे. ती सर्वांना बुद्धी, कविता, मेधा, प्रतिभा व स्मृती देते. नानाप्रकारचे सिद्धांत असलेले भेद पंडितांना आकलन व्हावेत अशी ती शक्ती असून सर्वांना मान्य आहे.

तीच व्याख्या व बोधरूपाने असते. त्यामुळे ती सर्व संशय नाश करून टाकते. विचार करणारी, ग्रंथ निर्माण करणारी, शक्तिरूपी, स्वरयुक्त, संगीत, अनुसंधानयुक्त जो ताल त्याचे कारणरूप व विषयज्ञान, तसेच वाणी, प्रत्येक प्राणीजीवाला जीवन पुरविणारी, व्याख्या व वाद करणारी, शांत असून हातात वीणा व ग्रंथ धारण करणारी, शुद्धसत्त्वरूपिणी, शीतोत्तमा, हरिप्रिया, बर्फ, चंदन, कुंदपुष्प, कुमुद व कमल याप्रकारे वर्ण असलेली, तसेच परमात्मा श्रीकृष्ण, त्याचे रत्नमालेने पूजन करणारी, तपस्व्यांना तपाचे फल देणारी, सिद्धी व विद्यारूपिणी, तसेच वारंवार सर्वांना सिद्धी देणारी अशी ती देवी श्रेष्ठ आहे.

ती नसेल तर ब्राह्मणवर्ग आणि पंडित हे नित्य मुके व शवासारखे होतील. तेव्हा हे देवर्षे, मी तुला आता ही अशी तिसरी देवीही सांगितली आहे. तसेच श्रुतींमध्ये जे जगदंबेचे यथाशास्त्र वर्णन केले आहे ते तू ऐकलेस. आता यापुढे आणखी असलेल्या देवीचे तू वर्णन ऐक. हे महाबुद्धे, चारी वर्णांची, वेदांची व वेदांगांची, संध्यावंदनमंत्रांची व तंत्रांची ती माता आहे. द्विजांच्या जातीरूप जपरूप व तपश्चर्या करणारी, ब्रह्मविषयक पण तेजोरूप असणारी, सर्व संस्काररूप व पवित्ररूप अशी जी देवी, सविता ही जिची देवी आहे अशी ती सवितृ देवता गायत्री ती ब्रह्मदेवाला प्रिय आहे. ती स्वच्छ स्फटिकासारख्या वर्णाची, शुद्धसत्त्वस्वरूप, परमानंदस्वरूप, श्रेष्ठ व नित्य आहे.

ती प्रत्यक्ष परब्रह्माचे स्वरूप असून सर्वांना निर्वाणपद प्राप्त करून देते. ती ब्रह्मतेजोमय आहे. ती ब्रह्मदेवाच्या अंतःकरणाची आधारभूत देवता आहे.

हे नारदा, तिच्या पायावरील धुळीमुळे हे सर्व जग पवित्र झाले आहे. अशाप्रकारे हे देवर्षे, तुला मी ही चवथी देवी सांगितली. आता पाचवी देवी कशी आहे व कोणती आहे याचे वर्णन करतो.

ती पाचही प्राणांची अधिदेवता असून स्वतः पंचप्राणरूपिणी आहे. ती प्राणापेक्षाही अधिक प्रिय असून सर्वात सुंदर आहे. ती श्रेष्ठ व सर्व पदार्थांनी युक्त आहे. सौभाग्याविषयी ती अभियानी आहे. तीच गौरवयुक्त असून डावीकडील अर्धे अंग रूप, गुण व तेज यांनी ती ईश्वराप्रमाणेच दिसते. परमेश्वराप्रमाणे ती श्रेष्ठ, कनिष्ठ, सारभूत, अनादि, सनातन, परमानंदरूप धन्य, मान्य, पूज्य आणि भगवान श्रीकृष्णाच्या रासक्रिडेतील ती मुख्य देवी आहे. ती रासमंडलात निर्माण झाली असून त्या मंडलाने ती मंडित आहे.

तीच रासांचे नियमन करणारी आहे. तसेच ती अतिशय रसिक आहे. रासस्थानीच ती वास्तव्य करते. ती गोकुळात गोपिकांच्या स्वरूपात वास्तव्य करते. अत्यंत आल्हाददायक असे तिचे स्वरूप, संतोष, हर्ष, एवदूप, गुणविहीन, निराकार, अनासक्त व आत्मस्वरूप निष्काम, अहंकाररहित, भक्तावर अनुग्रह करणारी अशी ती अनुग्रहरूपिणी, वेदात सांगितल्याप्रमाणे सूक्ष्मदर्शी व साधकांना ज्ञात होणारी ती देवी आहे.

नियमन करणारे श्रेष्ठ असे देव, श्रेष्ठ ऋषी यांनीही ती दृष्टिगोचर होत नाही. ती अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेले वस्त्र धारण करते. ती नानाप्रकारच्या अलंकारांनी भूषित असून कोटयावधी चंद्रांची प्रभा जशी असेल त्या प्रभेने ती युक्त आहे. असा तिचा आकार असून, श्रीकृष्णभक्त, कृष्णदास्य करणारी, सर्व संपत्ती देणारी अशी ती देवी आहे.

वराह नावाच्या कल्पात ती वृषभानू या नावाची गोपिकन्या झाली. ती एका व्रजवासी गोपाच्या घरी जन्मली. तिच्या पदकमलस्पर्शाने सर्व पृथ्वी पवित्र झाली. ब्रह्मदेवादिकांनाही तिचे दर्शन झाले नाही. पण भारतवर्षातील सर्वांनी मात्र तिला पाहिले.

हे मुने, नवीनच मेघांनी आकाश भारून येते तशी ती कृष्णाच्या वक्षस्थली होती. पूर्वी ब्रह्मदेवाने तिच्या पदकमलांवरील केवळ नखाचे दर्शन व्हावे म्हणून चित्तशुद्धीसाठी अखंड साठ हजार वर्षे तप केले, पण स्वप्नातही तिची नखे त्याला दिसली नाहीत. मग प्रत्यक्षात दर्शन कसे बरे मिळणार ?

त्याच तपामुळे त्याला ती देवी भूलोकी वृंदावनामध्ये दिसली. मी तुला पाचवी देवी जी सांगितली हिलाच राधा या नावाने संबोधले आहे.

प्रत्येक विश्वात निर्माण झालेल्या सर्व स्त्रिया व देवी या देवीच्याच अंशापासून, चतुर्थांशापासून षोडषांशापासून व त्याहीपेक्षा सूक्ष्मांशापासून उत्पन्न झालेल्या आहेत. पण त्यातील पाच विद्यादेवी सांगून त्या सर्व प्रकृतीच्या आधारभूत आहेत असे सांगितले. हे नारदा, मूल प्रकृतीच्या अंशभूत अशा ज्या देवी आहेत त्याबद्दल मी तुला आता निवेदन करतो. तू एकचित्ताने श्रवण कर.

विष्णूच्या शरीरापासून उत्पन्न झालेली, द्रवरूपाने असलेली, नित्य, सर्व ब्रह्मांडाला पावन करणारी जी गंगा ती प्रकृतीच्या प्रमुख अंशापासून निर्माण झालेली आहे. पाप्यांना पापरूप काष्ठांचे दहन व्हावे या हेतूने तिने पेटलेल्या अग्नीप्रमाणे स्वतःचे स्वरूप धारण केले आहे.

तिच्या स्पर्शापासून सुख होते, तिच्या उदकांत स्नान केल्यास अथवा ते जल प्राशन केल्यास ती निर्वाण स्थान प्राप्त करून देते. वैकुंठी ज्यांना गमन करावयाचे आहे त्यांना हीच शिडी उपयोगात आणावी लागेल. ती अतिशय पवित्र तर आहेच, ती सर्व नद्यांमध्ये व तीर्थामध्येही श्रेष्ठ आहे.

शंकराच्या मस्तकावरील जटारूप मेरूपासून पडलेल्या मोत्यांप्रमाणे ती भासते. भारतवर्षातील तपस्व्यांचे तपाचे तत्काल फल देणारी आहे. ती चंद्र, श्वेतकमल, दूध याप्रमाणे शुभ्र अशा रंगाची आहे. तीच शुद्ध सत्त्वस्वरूपिणी, निर्मल, अहंकाररहीत, सच्छील व नारायणास नित्य प्रिय अशी आहे. तीच मुख्य अंश असून तुलसी म्हणून प्रसिद्ध आहे व विष्णूची आवडती आहे. ती विष्णूचे भूषणच आहे. ती साध्वी विष्णूच्या पदकमलाजवळ राहिली आहे.

हे मुने, ती तुलसी तप, संकल्प, पूजा इत्यादी समुदाय संपादन करून देणारी पुष्पातील सारभूत, पवित्र व सर्वदा पुण्यच देणारी आहे. ती दर्शन व स्पर्श यांच्या योगाने तत्काल निर्वाणपद देणारी आहे. कलियुगात पापरूपी सुकलेल्या काष्ठाला दहन करण्याकरता ती अग्नीरूपी झाली आहे.

तिच्या पदकमलाचा स्पर्श होताच पृथ्वी पवित्र होऊन गेली. तीर्थेसुद्धा तिचे दर्शन घेऊन व तिला स्पर्श करून स्वतःला पवित्र करून घेतात. तिच्याविना या सर्व सृष्टीतील कर्मे निष्फल आहेत. ती मुमुक्षूंना मोक्ष देते. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. अशी ती कामिनी आहे. ती देवी कल्पवृक्ष रूपच आहे. या भारतवर्षात भारतीयांना तृप्त करण्याकरता ती वृक्षरूपी झाली आहे.

मुख्य अंशाचे स्वरूपात असलेली ती मनसादेवी कश्यपापासून उत्पन्न झाली. ती शंकराची प्रिय शिष्यीण असून मोठी ज्ञानसंपन्न आहे. नागांचा स्वामी जो अनंत, त्याची ती बहीण आहे. म्हणून नागलोक तिची पूजा करतात.

ती सुंदरी नागेश्वरी, नागमाता, नागवाहिनी असून तिच्या सभोवती श्रेष्ठ नागांचे समुदाय नित्य वावरत असतात. तिची सर्वांगभूषणेही नागरूपीच आहेत. त्यामुळे ती अत्यंत संपन्न झालेली आहे. या सर्व लक्षणसंपन्न अशा या देवीला नाग नित्य वंदन करीत असतात.

ती स्वतः सिद्ध आहे, तशीच महान योगिनी आहे. ती नेहमी नागावर शयन करते. ती साक्षात् विष्णुरूप आहे व शिवाय विष्णूची महान भक्त आहे. ती सदासर्वदा विष्णुपूजेत रममाण झालेली असते, ती तपोरूप असून सर्व तपांचे फल देत असते. ती उत्कृष्ट तपस्विनी आहे. तिने देवांची तपश्चर्या केली. ही तिची तपश्चर्या अव्याहत तीन लक्ष वर्ष चालली होती. त्यामुळे जे लोक हरिप्राप्तीसाठी तप करीत असतात त्या सर्व स्त्रीपुरुषांमध्ये भारतवर्षात अत्यंत प्रसिद्ध पावलेली असून तप करणारेही तिची पूजा करतात. ती सर्व मंत्रांची आधिदेवता आहे. तसेच ती ब्रह्मतेजाने दैदीप्यमान झाली आहे.

ब्रह्माचे स्वरूप, अत्यंत श्रेष्ठ व ब्रह्मचिंतनात नित्य तत्पर अशी ती देवी आहे. कृष्णाच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या जरत्कारू मुनींची ती पत्नी असून अत्यंत पतिव्रता आहे. तसेच तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या त्या अगस्तीची ती माता आहे.

हे नारदा, प्रमुख अंशापासून ज्या देवसेनेची निर्मिती झाली व जिला मातृकांमध्ये अत्यंत पूज्य मानतात, ती ही देवी षष्ठी या नावाने प्रसिद्ध आहे.
ही देवी कृपाळू होऊन पुत्रपौत्रादि संतती देते व संपूर्ण त्रैलोक्याचे पालन करते. तीच ही सती प्रकृतीच्या सहाव्या अंशातून निर्माण झालेली असल्याने तिला षष्ठी हे नाव प्राप्त झाले.

बालकाच्या स्थानी श्रेष्ठ व वृद्धरूप धारण करणारी अशी ती महायोगिनी आहे. मुलांच्या जन्मापासून ऋतूत बाराही महिने या जगात तिचेच पूजन करीत असतात. पण अशा तर्‍हेने तिची पूजा करण्यात काही अडचण निर्माण होत असल्यास मुलाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी प्रसूतिगृहात तिची पूजा करावी. अशाप्रकारे समजा यदाकदाचित बाळंतिणीच्या खोलीत तिची पूजा करणे न शक्य झाल्यास एकविसावे दिवशी तिचे पूजन करावे. ते कल्याण प्राप्त करून देते.

ही महादेवी सर्व मुनींनाही वंदनीय आहे. हिच्यापुढे सत्यकाम असूनही दयारूप, जळी, स्थळी, अंतरिक्षात, गृहप्रदेशी, सर्वांचे रक्षण करणारी अशी, मंगलचंडिका नावाची मातृका म्हणून संबोधलेली प्रसिद्ध देवी आहे. ती प्रकृतीच्या मुखापासून निर्माण झाली आहे. ती देवी नित्य मंगलदायिनी आहे. ती सृष्टीच्या पालनप्रसंगी मंगल फल देते व सृष्टीच्या संहार काली ती कोपिष्ट होते. म्हणून सर्व प्राज्ञ जन तिला, 'हे मंगलचडी' असे म्हणून तिची पूजा करतात.

या सर्व जगात दर मंगळवारी तिची श्रेष्ठ पूजा केली जाते. त्यामुळे ती पुत्र, पौत्र, धन, ऐश्वर्य, यश व सौभाग्य प्राप्त करून देते. ती जर कृपामूर्ती होऊन संतुष्ट झाली तर सर्व स्त्रियांची मनोरथे तत्काळ पूर्ण करते. त्यामुळे स्त्रियांच्या इच्छा पूर्ण होतात.

पण जर का ही मंगल देवी रूष्ट झाली तर ही महा महेश्वरीदेवी एका क्षणात संपूर्ण विश्वाचा सत्वर संहार करते.

प्रकृतीच्या मुख्य अंशापासून उत्पन्न झालेली आणि जिचे नेत्र कालाप्रमाणे सुंदर आहेत अशी ती देवी काली, दुर्गेच्या ललाटप्रदेशापासून निर्माण झाली. कारण देवांचे शुंभ व निशुंभ राक्षसांशी युद्ध चालू होते. म्हणून त्या देवीने म्हणजे कालीने अवतार धारण केला.

तिचे स्वरूप म्हणजे ती दुर्गेच्या अर्ध्या अंशापासून उत्पन्न झाली आहे. तसेच तिचे सर्व गुण व स्वयंतेज हे दुर्गेप्रमाणे प्रत्यक्ष आहे.

एकाच वेळी कोटी सूर्य प्रज्वलीत व्हावेत असे त्या काली देवीचे तेज आहे. तसेच ती अत्यंत जाज्वल्य देवी आहे. ती स्वतः सर्वात बलाढय असून ती शक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ व बलवान आहे. तसेच ती सर्व सिद्धी प्राप्त करून देते. ती साक्षात श्रेष्ठ योगरूपाने युक्त आहे. ती स्वतःच कृष्णाची अत्यंतिक भक्त आहे. तसेच तेज, पराक्रम गुण यांनी ती कृष्णासारखीच महाबलशाली आहे. ती देवी सदासर्वदा कृष्णचिंतनातच मग्न असते. तसेच तिचा नित्याचा वर्ण ही कृष्णवर्णच आहे. केवळ एकच निश्वास टाकून ती सर्व ब्रह्मांडाचा संहार करू शकते. एवढे तिचे सामर्थ्य अद्‌भूत आहे.

पण केवळ क्रीडा करण्यासाठी व लोकांना ज्ञान व्हावे म्हणजे लोकशिक्षण व्हावे म्हणून तिने दानवांशी घनघोर युद्ध केले. तीच धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्त करून देते. म्हणून ती सर्व लोकांना अत्यंत पूज्य आहे. ती अतिशय बलाढय अशी देवी आहे.

ब्रह्मदेवासह सर्व देव, मुनी, मनू, मनुष्ये हे सर्वजण त्याच देवीची आराधना करतात. प्रकृतीच्या प्रधान अंशरूप अशी जी वसुंधरा ती सर्वाधाररूप व सर्वधान्यरूप म्हणून प्रसिद्ध आहे.

ती स्वतःच सर्व रत्नांची खाण आहे. तिच्या उदरात नानाविध अनेक रत्ने आहेत. हे नारदा, सर्व समुद्रही तिचाच आश्रय करून राहतात. राजा व प्रजापती या सर्वांनाच ती नित्य वंदनीय आहे. तसेच सर्व स्थावर जंगम सृष्टीलाही उपजीव्यभूत व सर्व संपत्ती देणारी अशी ती देवी आहे. तिच्याशिवाय हे सर्व चराचर जगत निराधार होईल. हे मुनीश्वरा, प्रकृतीच्या कोणकोणत्या कला आहेत, त्या आता मी तुला कथन करतो. हे नारदा, त्या सर्व तू एकाग्र होऊन श्रवण कर. तसेच कोण कोणाची पत्नी आहे हे ही समजावून घे. सर्व मी तुला सांगत आहे.

स्वाहा नावाची प्रसिद्ध देवी अग्नीची पत्नी आहे. तिची प्रत्येक लोकात पूजा करीत असतात. ती नसेल तर हविर्भाग ग्रहण करण्यास देव समर्थ होत नाहीत. म्हणून ती देवी श्रेष्ठ आहे.

यज्ञाच्या दोघी पत्नी दीक्षा व दक्षिणा या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांची सर्वत्रच पूजा होत असते. कारण दक्षिणा नसेल तर जगातील सर्व कर्मे निष्फल आहेत. स्वधा या नावाने प्रख्यात असलेली देवी ही पितरांची पत्नी आहे. सर्व मुनी, तापसी, मनू व पुरुष तिची नित्य उपासना करतात. तिची पूजा केल्यावाचून पितरांना दिलेले दान हे निष्फल होय.

याप्रमाणेच वायूची पत्नी स्वस्ती या नावाने प्रसिद्ध आहे. ती सर्वच लोकात पूजनीय आहे. तिच्यावाचून दान व प्रतिग्रह निष्फल होतात.

पृष्ठी म्हणून संबोधलेली देवी गणपतीची पत्नी असून ती सर्व भूखंडात पूज्य आहे. हिच्यावाचून सर्व पुरुष व स्त्रिया अत्यंत क्षीण होतात.

अनंताच्या पत्नीचे नाव तुष्टी असून ती सर्वत्र विख्यात आहे व सर्वांना वंदनीय व पूजनीय आहे. तीही अतिशय श्रेष्ठ देवी आहे. तिच्यावाचून देवही संतुष्ट होत नाहीत.

ईशानाची पत्नी संपत्ती ही असून ती देव व मनुष्य यांना फारच पूज्य आहे. तिच्यावाचून जगातील सर्व लोक दरिद्री होतात. कपिलाच्या पत्नीचे नाव धृति असे आहे. सर्व काली सर्व लोक तिची उपासना करतात व तिचीच पूजा करतात. ती नसल्यास जगातले सर्वच लोक भित्रे होतील. सत्याची पत्नी सती या नावाने प्रसिद्ध असून मुक्तांनाही ती मान्य आहे व सर्वांना अत्यंत प्रिय आहे. तिच्यावाचून सर्व लोक नित्य स्नेहरहित होतील. कोठेच प्रेम रहाणार नाही.

मोहाची साध्वी पत्नी दया नावाची असून ती सर्वांनाच पूज्य व जगात सर्वांची आवडती आहे. तिच्याबद्दल सर्वांना फार आदर आहे. तिच्याविना सर्व लोक सर्वकाली निष्फल होतात.

प्रतिष्ठा या नावाने पुण्याची पत्नी प्रसिद्ध आहे. हे नारदा, तिच्याशिवाय सर्व जगत जिवंत असूनही मृताप्रमाणेच आहे.

सुकर्माची पत्नी कीर्ती ही आहे. ही अत्यंत सिद्ध आहे. जे पुरुष तिची पूजा करतात ते धन्य होत. तिच्या वाचून हे सर्व जग अपयशी व मृतःप्राय आहे.

उद्योगाची पत्नी क्रिया या नावाने प्रसिद्ध आहे. ती सर्वांनाच मान्य असून अत्यंत श्रेष्ठ व पूज्य आहे. हे नारदमुने, तिच्यावाचून हे सर्व जग विधिशून्य होते. धूर्त लोकांना अत्यंत पूज्य असलेली देवी मिथ्या या नावाने प्रसिद्ध असून ती अधर्माची पत्नी आहे. तिच्यावाचून ईश्वरनिर्मित जग धूर्तसमुदाय रूपाने उच्छिन्न होते. ती सत्ययुगात अदर्शनरूप असून त्रेतायुगात ती सूक्ष्मरूप असून कलियुगात अत्यंत प्रगल्भ व बलात्काराने सर्वव्यापी झाली आहे. ती आपल्या कपट नावाच्या भ्रात्याबरोबर घरोघर हिंडत असते.

शांती व लज्जा या नावाच्या दोन पूज्य भार्या सुशीलाच्या आहेत. हे नारदा, त्याच्यावाचून जग उन्मत्तासारखे होते.

याप्रमाणे ज्ञानाच्या तीन भार्या प्रसिद्ध आहेत. एक बुद्धी, दुसरी मेधा, तिसरी धृति या नावांनी त्यांना ओळखतात. त्यांच्यावाचून सर्व जग मूढ होते व नेहमी उन्मतासारखे वाटते.

मूर्ती ही अत्यंत मनोहर असून कांतीने तेजस्वी आहे. तीच धर्माची पत्नी आहे. तिच्यावाचून परमात्मा व विश्वसमूह निराधार होतो.

सर्वत्र शोकरूपाने दृष्टीस भासणारी अशी जी लक्ष्मी ती साक्षात सतीच आहे. ती श्रीरूप, मूर्तीरूप, मान्य, धन अतिशय पूजनीय अशी आहे. रुद्राची पत्नी कालाग्नी अशी जी निद्रा, ती सिद्ध योगिनी आहे. ती रात्री संबंधद्वारा सर्व लोकांस पूर्णपणे आच्छादित करते.

संध्या, रात्री व दिवस या कालाच्या तीन भार्या आहेत. त्यांच्यावाचून ब्रह्मदेवालाही काल गणना करता येत नाही.

सर्वांना धन्य, अतिशय मान्य व सर्वांना पूज्य अशा क्षुधा व तृषा या लोभाच्या दोन भार्या आहेत. त्यांनी तर सर्व जग व्यापून टाकले आहे. त्यामुळे या जगात नित्य चिंताच निर्माण होत असतात.

प्रत्यक्ष तेजाच्या दोन भार्या आहेत. त्यांची नावे प्रभा व दाहिका अशी असून ईश्वर त्यांच्या शिवाय जग निर्माण करण्यास व संरक्षण करण्यास असमर्थ आहेत. कालाच्या कन्या मृत्यु व ज्वरा या कालज्वराला अतिशय प्रिय आहेत. त्यांच्या योगाने, सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी जे जग ब्रह्मदेव निर्माण करतो, ते नष्ट होत असते.

निद्रेच्या दोन कन्या असून पहिलीचे नाव तंद्रा व दुसरी प्रीती या नावाने प्रसिद्ध आहे. त्या दोघीही सुखाच्या भार्या आहेत. विधिसुतांच्या क्रियेला आरंभ होताच त्यांनी हे सर्व जग व्यापून टाकले. त्यांच्याविना जगातील समाधान नाहीसे होईल हे निश्चित.

श्रद्धा व भक्ती या वैराग्याच्या पूज्य भार्या आहेत. त्यांच्यामुळे सर्व चराचर जग सतत मुक्तीयुक्त होते. आदिती देवांची माता व सुरभी गाई-बैलांची प्रसवणारी होय. दैत्यांची जननी दीती, कद्रू, वनिता, दनु ह्या सृष्टी निर्माण करण्याकरता नियुक्त केलेल्या आहेत. याच सर्व कला आहेत म्हणून सांगितले आहे.

दुसर्‍याही पुष्कळ कला आहेत. आता त्यापैकी मी काही तुला समजावून सांगतो.

चंद्राची पत्नी रोहिणी, सुर्याची संज्ञा, मनूची भार्या शतरूपा, इंद्राची गृहिणी शची, बृहस्पतीची पत्नी तारा, वसिष्ठाची स्त्री अरुंधती, गौतमपत्नी अहिल्या, अत्रीची भार्या अनसूया, कर्दमाची देवहूती, दक्षाची पत्नी प्रसूती, पितरांची कन्या मानसी, अंबिकेची माता मेनका, लोपामुद्रा व तशीच कुंती होय.

कुबेराची पत्नी वरुणानी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच बलीची विंद्यावली, कांता, दमयंती, यशोदा, देवकी तसेच गांधारी, द्रौपदी, सत्यवती, प्रिया, शैब्या, कुलाचा उद्धार करणारी व वृषभानूला प्रिय असलेली साध्वी राधामाता, मंदोदरी, कौसल्या, सुभद्रा, कौरवी, रेवती, सत्यभामा, कालिंदी, लक्ष्मणा, रुक्मिणी, सीता व लक्ष्मी अशा या इतर कला सांगितल्या आहेत.

काली, योजनगंधा व्यासमाता, बाणकन्या, उषा, तिची सखी चित्रलेखा, प्रभावती, भानुमती, मायावती, परशुरामाची माता रेणुका, बलरामाची जननी रोहिणी, एकनंदा, कृष्णभगिनी सती दुर्गा, भारतवर्षामध्ये या सर्व कला प्रसिद्ध आहेत. त्या संक्षेपाने तुला सांगितल्या.

प्रत्येक लोकात ज्या स्त्रिया असतात त्याही प्रकृतीच्याच कला आहेत. प्रत्येक लोकातील स्त्रिया या प्रकृतीच्याच अंशापासून उत्पन्न होतात. असा हा सर्व प्रकार असल्याने स्त्रियांचा अपमान केल्याने प्रकृतीचाच अपमान होतो. पतिपुत्रवती साध्वी ब्राह्मणपत्नीची वस्त्रे, अलंकार, चंदन यांच्या उपयोगाने पूजा करावी, म्हणजे प्रत्यक्ष प्रकृतीचीच पूजा केल्याचे पुण्य मिळेल. ज्याने आठ वर्षाच्या ब्राह्मण कुमारीची वस्त्रे, अलंकार, चंदन यांच्यायोगाने पूजा केली, त्याने प्रकृतीचीच पूजा केल्याप्रमाणे आहे.

म्हणून उत्तम, मध्यम व अधम स्त्रिया प्रकृतीपासूनच झालेल्या आहेत. लगतीत ज्या स्त्रिया सत्वांशापासून निर्माण झाल्या त्या उत्तम स्त्रिया होत. त्या अत्यंत शीलसंपन्न, पतिव्रता असतात. ज्या रजोगुणापासून उत्पन्न होतात त्या स्त्रिया मध्यम स्त्रिया असतात. त्या मध्यम स्त्रिया उपभोग्य असतात. त्या सुख व उत्तम भोग यामुळेच स्वाधीन रहातात. त्या नित्य आपल्या कामात तत्पर असतात.

तमोगुणाच्या अंशापासून झालेल्या स्त्रिया ज्यांचा जन्म खरोखरच कोणत्या कुलात झाला आहे हे समजत नाही, त्या अधम स्त्रिया होत. त्या नित्य, दुर्मुखलेल्या, कुलघातकी, लबाड, स्वैरिणी, भांडखोर व या पृथ्वीवर दारोदार भटकणार्‍या त्या कुलटा असतात.

स्वर्गलोकांतील अप्सरांचा समुदाय व सर्व दुराचारिणी स्त्रिया प्रकृतीच्या तमोअंशापासून झालेल्या आहेत असे सांगितले आहे. असे मी प्रकृतीचे यथासांग वर्णन केले. त्या सर्वांची भूलोकी व भारतवर्षात तसेच सर्व पुण्यक्षेत्रात नित्य पूजा होते.

प्रथम सुरथराजाने कठीण व्याधीचा नाश करणार्‍या त्या दुर्गेची आराधना केली. त्यानंतर रावणाच्या वधाची इच्छा करणार्‍या रामचंद्राने तिचीच पूजा केली. तेव्हापासून ही जगन्माता सर्व त्रिभुवनात पूज्य झाली.

दैत्य व दानव यांना मारून ती प्रथम दक्षकन्या झाली. त्यानंतर पतीची निंदा झाल्यामुळे तिने यज्ञात देह टाकला आणि हिमालयाच्या पत्नीचे पोटी तिने जन्म घेतला. तिला पशुपती शंकर हा प्राप्त झाला.

गणेश व विष्णुकलेपासून उत्पन्न झालेला स्कंद असे दोन पुत्र तिला नंतर झाले.

हे नारदा, मंगलसंज्ञक राजाने प्रथम लक्ष्मीची पूजा केली. त्यानंतर मुनी आणि मानव हे तिन्ही लोकात तिची पूजा करू लागले. अश्वपती नावाच्या राजाने प्रथम सावित्रीची पूजा केली. तेव्हापासून त्या देवीची तिन्ही लोकात पूजा होऊ लागली.

ब्रह्मदेवानेच प्रथम सरस्वती देवीची पूजा केली. त्यानंतर मुनी वगैरे श्रेष्ठ पुरुष तिची उपासना करू लागले. परमात्म्या भगवान कृष्णाने गोकुळातील रासमंडलात त्या राधेची पूजा केली. तो दिवस कार्तिकी पौर्णिमेचा होता. त्या वेळेपासून हरीच्याच आज्ञेमुळे गोपगोपींनी, लहान मुलामुलींनी, गाईच्या समुदायांनी व सुरभीनेही तिचीच पूजा केली. तेव्हा ब्रह्मदेवादि अमरांनी व मुनींनी मोठया आनंदाने व भक्तीने पुष्पे, धूप इत्यादिकांच्या योगाने तिची पूजा केली व तिला वंदन केले.

शंकराने सांगितलेल्या विधीप्रमाणे भूलोकीचे पुण्य क्षेत्र जे भारतवर्ष त्यात सुयशाने प्रथम त्या देवीचे पूजन केले. तेव्हापासून पुढे त्या भगवान परमात्म्याच्या आज्ञेने तिन्ही लोकांमध्ये पुष्प, धूप, दीप, गंध वगैरेच्या योगाने महाश्रेष्ठ ऋषीमुनींनी, नित्यनेमाने तिची पूजा केली.

थोडक्यात असे की, हे नारदा, प्रकृतीच्या अंशापासून ज्या ज्या कला उत्पन्न झाल्या, त्या सर्वांची भारतवर्षांत आदरपूर्वक पूजा होत असते.

हे नारदमुने, गावात, नगरात, हिची ग्रामदेवी म्हणून पूजा करतात. हे नारदा, प्रकृतीपासून निर्माण झालेल्या कलांविषयी मी तुला संक्षेपाने सांगितले, ते प्रकृतीचे चरित्र अत्यंत शुभ असून ते मी तुला यशाशास्त्र व लक्षणांसहित सांगितले. आता तुला आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे ते सांग."


अध्याय पहिला समाप्त

GO TOP