[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
मंत्री म्हणाले, "हे असुरश्रेष्ठा, पुरुषाने सत्य व योग्य असेच बोलावे. केवळ प्रिय वाटेल ते बोलू नये. ज्यात हित आहे असेच विचारी पुरुषाने वागावे. हे राजा, राजाला प्रिय असेच भाषण करणे परिणामी अहितकारक ठरण्याची शक्यता असते. औषध जरी अप्रिय असले तरी ते रोगनाशक आहे. म्हणून सेवन करावे लागते. सत्य भाषणाचे तसेच आहे. फक्त प्रिय भाषण करणारे अनेक पुरुष आढळतात, पण सत्याचा भोक्ता व हितचिंतक मिळणे दुरापास्त आहे. तेव्हा या प्रसंगी आम्ही काय सांगावे ? कोणते काम शुभ व अशुभ आहे हे जाणणारा या जगात कुणीही नाही."
महिषासुर म्हणाला, "तुम्हाला जे योग्य वाटेल, जे आपल्या बुद्धीला पटेल, ते सांगण्याची सर्वांना मुभा आहे. मी संपूर्णपणे नंतर विचार करीन. कारण श्रेष्ठ पुरुष विचारपूर्वक सर्व काही निर्णय घेत असतो. तेच श्रेयस्कर होय."
त्याचे भाषण ऐकून महाबलाढ्य विरुपाक्ष राजाला प्रसन्न करून घेण्याच्या उद्देशाने म्हणाला, "हे राजा, एक यःकश्चित् स्त्री मदोन्मत्त होऊन बोलत आहे. ते तिचे नाममात्र भाषण ऐकून भिऊन जाण्याचे कारण नाही. साहसाच्या गोष्टी करणार्या दुर्गुणी स्त्रीचे चरित्र कोण जाणू शकेल ? कोणता पुरुष स्त्रीच्या असल्या भाषणांनी भिऊन जाईल ? आपण त्रिभुवन जिंकले आहे. तस्मात् स्त्रीला भिऊन जाण्याने आपली अपकीर्तीच होईल. म्हणून हवे तर मी एकटाच त्या चंडिकेकडे जाऊन तिचा वध करतो. आपण निर्धास्त रहा.
मी सैन्य घेऊन जाईन आणि पराक्रमाच्या वल्गना करणार्या त्या स्त्रीचा वध करीन अथवा सर्पमय पाशांनी बांधून आपणापुढे हजर करीन. ती सर्वदा तुझ्या अधीन होऊन राहील असे करीन. हे राजा, माझे सामर्थ्य एकदा पहाच.
विरुपाक्षाचे भाषण ऐकून दुर्धर नावाचा दैत्य म्हणाला, "हे राजा, विरुपाक्षाने सत्य व योग्य असेच भाषण केले आहे. तू विचारी आहेस तेव्हा माझेही भाषण श्रवण कर. उत्तम दंतांनी सुशोभित असलेली ती स्त्री एकंदर आविर्भावावरून काममोहित असावी. रूपाचा गर्व बाळगणारी स्त्री अशीच असते. मला वाटते, ती सुंदरी प्रथम तुला भय दाखवून नंतर तुला वश करण्याची इच्छा करीत असावी. मानिनी स्त्रियांचा आविर्भाव असाच असतो. रसिक पुरुषालाच ह्याची चांगली जाण असते. काममोहिनीची वक्रभाषा शेवटी पुरुषाच्या सुखाला कारण होते.
’बाणांनी मी संग्रामामध्ये तुझा वध करीन.' हे भाषण हेतुगर्भ असून जाण असणार्यांनाच त्याचा आतील गर्भितार्थ समजू शकेल. कारण कामिनीचे कटाक्ष हेच त्यांचे बाण आहेत. म्हणून इतर बाण तुझ्यावर सोडण्याचे तिला कोठून सामर्थ्य असणार ? प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु व महेश यांना जी शक्ती नाही ती केवळ स्त्रीच्या ठिकाणी कशी असेल ? हे राजा, तिने उच्चारलेले एक वाक्य अत्यंच सूचक आहे. ती म्हणाली, 'अरे मूर्खा, नेत्रकटाक्षांनीदेखील मी तुझ्या राजाचा वध करीन.' हे ऐकून त्या अरसिक सचिवाची काही तरी विपरीत समजूत झाली. ' तुझ्या राजाला मी रणशय्येवर पाडीन. ' हे वाक्य तर रतिक्रीडेसंबंधीचेच असले पाहिजे. 'मी त्याला गतप्राण करीन.' असे म्हणणे म्हणजे मी त्याला वीर्यहीन करीन असा अर्थ आहे. तेव्हा अशाप्रकारे भाषण करून ती स्त्री तुझा स्वीकार करीत आहे, असेच तिला सुचवायचे आहे. पण शृंगार रसाच्याबाबतीत परिपूर्ण असलेल्या पुरुषांनाच ही भाषा कळेल. तेव्हा महाराज, शृंगार रसाला योग्य असाच निर्णय आपण घ्यावा.
यावेळी साम, दान हाच उपाय योग्य आहे. अन्य उपाय योग्य नव्हे. ही स्त्री रागावलेली असो अथवा गर्वाने भारलेली असो, तुला खास वश होईल. अत्यंत मधुर भाषण करून मी तिला वश करून तुझ्याकडे आणीन. पण हे राजा, आता बोलण्यापेक्षा तिला मोहित करून मी तुजकडे आणतो. मी आताच जाऊन तिला तुझ्या आधीन होईल, असे करतो."
हे भाषण ऐकल्यावर विचारी ताम्र नावाचा दैत्य म्हणाला, "हे राजा, मी आता हेतुगर्भ, धर्मशील, न्याय्य भाषण करणार आहे. ही बाला कामातुर झालेली नाही. ती तुझ्यावर मोहितही झालेली नाही. तिची भाषणे त्या मनोवृत्तीची नव्हेत.
बलाढ्य राजा, अभिनव असे रूप धारण करून ती कोणाचेही सहाय्य न घेता एकटी युद्धाला आव्हान देत आहे हे आश्चर्यकारक आहे. अठरा हातांनी युक्त असलेली पराक्रमी स्त्री अस्तित्वात असलेली आजपर्यंत कोणाच्या ऐकिवातसुद्धा नाही. इतकेच काय, पण तिने अति भयंकर अशी आयुधे अठराही हातात धारण केली आहेत.
हे राजा, कालानेच हा अनिष्टकारक प्रसंग घडवून आणला आहे. काल रात्री मला काही दुःस्वप्ने पहावी लागली. त्यावरून आपला नाश जवळ आला आहे असे मला वाटते. पहाटेसच स्वप्नामध्ये कृष्णवस्त्रे परिधान केलेली स्त्री अंगणात रडत बसलेली मी पाहिली. रात्री विकृत पक्षी घरोघर एकसारखे आवाज करीत असतात. हे राजा, सांप्रत राज्यात अशुभ सूचक अशा घटना घडत आहे.
यावरून असे दिसते की ती यौवन तुला ज्याअर्थी युद्धार्थ आव्हान करीत आहे, त्याअर्थी खरोखरच काहीतरी विपरीत घडेल. हे दैत्यराज, ती मनुष्य, गंधर्व वा असुर योनीतील नाही. देवांनीच ही मोहमायी माया निर्माण केली असावी. हे जरी खरे असले तरी भित्रेपणा दाखवू नये असे माझे मत आहे. युद्धच करावे. दैवात असेल तसे होईल. तेव्हा विचारपूर्वक धैर्याचा अवलंब करणे हेच समंजस पुरुषाचे लक्षण आहे.
हे महाराजा, जन्म वा मरण दैवाधीन आहे. दैवावर विश्वास ठेवूनच प्रत्येकाने वागले पाहिजे.
अशा तर्हेचे ताम्रसुराच्या योग्य असे भाषण ऐकून महिषासुर म्हणाला, "भाग्यवान ताम्रा, तू युद्धाच्या निश्चयाने जाऊन धर्मशीलतेनेच त्या मानिनीला जिंकून येथे आण. जर त्या स्त्रीला तू जिंकू शकला नाहीस तर तिचा वध कर. प्रयत्न करून तिला शक्यतो सन्मानाने वागव. तू शूर आहेस व कामशास्त्रातही निपूण आहेस. तेव्हा तू कोणत्याही उपायांनी तिला वश करून घे.
हे शूर पुरुषा, तू मोठे सैन्य बरोबर घे. प्रथम विचारपूर्वक तू तिचा उद्देश समजवून घे. ती शत्रुभावनेने आली आहे की कामवासनेने आली आहे ? तसेच ही कोणाची माया आहे हेही समजून घे. आपल्या बळाचा योग्य तसा उपयोग कर. भित्रेपणा वा निर्भयपणा दाखविता उपयोगी नाही."
याप्रमाणे राजाचे भाषण ऐकून ताम्र महिषाला प्रणाम करून मोठे सैन्य घेऊन बाहेर पडला. पण रस्त्यात त्याला अपशकून दिसू लागले. विस्मयकारक गोष्टी पाहून त्याच्या मनात भय उत्पन्न झाले. तरीही सर्व देव स्तवन करीत असलेल्या व आयुधांनी भूषित असलेल्या सिंहारूढ देवीजवळ तो गेला. तिला प्रथम वंदन करून तो म्हणाला,
" हे देवी, तुझ्या रूपाने मोहित झालेला दैत्यराज तीक्ष्ण शृंगयुक्त महिषासुर तुझ्या प्राप्तीची इच्छा करीत आहे. हे सुंदरी, देवांनाही अजिंक्य असलेल्या महिषासुराबरोबर तू क्रीडा कर व नंदनवनाची प्राप्ती करून घे. सर्वांगसुंदर पती प्राप्त झाला असता दु:खाचा त्याग करून सुखाचा उपभोग सर्व उपायांनी घ्यावा असा सिद्धांत आहे.
हे कोमलांगी, तू आयुधे का बरे धारण केली आहेस ? तुझे कमलासारखे कर फक्त पुष्पांनाच योग्य आहेत. ही भिवयांची धनुष्ये कटाक्ष बाणांसाठीच निर्माण झाली असता तू हे लोहाचे बाण का घ्यावेत ?
वास्तविक या जगात शहाण्या पुरुषाने कधीही दु:खद असे युद्ध करू नये. प्राणी लोभाने एकमेकांशी युद्ध प्रवृत्त होतात. प्रत्यक्ष नाजुक पुष्पांनीही युद्ध करू नये. शरीरे जखमांनी छिन्नविच्छिन्न करण्यात कुणाला आनंद होत असतो ? तेव्हा हे चारूगात्री, कृपा करून देवांनांही पूज्य असलेल्या माझ्या राजाचा तू पती म्हणून स्वीकार कर ! तो तुझ्या सर्व मनकामना पूर्ण करील. तूच त्याची पट्टराणी होण्यास योग्य आहेस.
हे त्रिभुवन सुंदरी, तू जर माझे म्हणणे ऐकलेस तर तुला सर्व सुखे प्राप्त होतील. युद्ध करून जयापराजयाची निश्चिती नसते. तेव्हा वृथा श्रमण्यात काय अर्थ आहे ? तू राजनीतिज्ञ आहेस. तू आयुष्यभर त्या राज्यसुखाचा उपभोग घे. तुला सुंदर पुत्र प्राप्त होईल. या यौवनावस्थेत तुला राजासह क्रीडा करण्याची संधी मिळेल व अखेर वृद्धापकाळी सुख प्राप्त होईल.