श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
पञ्चमः स्कन्धः
चतुर्थोऽध्यायः


भयातुरेन्द्रादिदेवैः सुरगुरुणा सह परामर्शवर्णनम्

व्यास उवाच
गते दूते सुरेन्द्रोऽपि समाहूय सुरानथ ।
यमवायुधनाध्यक्षवरुणानिदमूचिवान् ॥ १ ॥
महिषो नाम दैत्येन्द्रो रम्भपुत्रो महाबलः ।
वरदर्पमदोन्मत्तो मायाशतविचक्षणः ॥ २ ॥
तस्य दूतोऽद्य सम्प्राप्तः प्रेषितस्तेन भोः सुराः ।
स्वर्गकामेन लुब्धेन मामुवाचेदृशं वचः ॥ ३ ॥
त्यज देवालयं शक्र यथेच्छं व्रज वासव ।
सेवां वा कुरु दैत्यस्य महिषस्य महात्मनः ॥ ४ ॥
दयावान्दानवेन्द्रोऽसौ स ते वृत्तिं विधास्यति ।
नतेषु भृत्यभूतेषु न कुप्यति कदाचन ॥ ५ ॥
नोचेद्युद्धाय देवेश सेनोद्योगं कुरु स्वयम् ।
गते मयि स दैत्येन्द्रस्त्वरितः समुपेष्यति ॥ ६ ॥
इत्युक्त्वा स गतो दूतो दानवस्य दुरात्मनः ।
किं कर्तव्यमतः कार्यं चिन्तयध्वं सुरोत्तमाः ॥ ७ ॥
दुर्बलोऽपि न चोपेक्ष्यः शत्रुर्बलवता सुराः ।
विशेषेण सदोद्योगी बलवान्बलदर्पितः ॥ ८ ॥
उद्यमः किल कर्तव्यो यथाबुद्धि यथाबलम् ।
दैवाधीनो भवेन्नूनं जयो वाथ पराजयः ॥ ९ ॥
सन्धियोगो न चात्रास्ति खले सन्धिर्निरर्थकः ।
सर्वथा साधुभिः कार्यं विचार्य च पुनः पुनः ॥ १० ॥
यानमप्यधुना नैव कर्तव्यं सहसा पुनः ।
प्रेक्षकाः प्रेषणीयाश्च शीघ्रगाः सुप्रवेशकाः ॥ ११ ॥
इङ्‌गितज्ञाश्च निःसङ्गा निःस्पृहाः सत्यवादिनः ।
सेनाभियोगं प्रस्थानं बलसंख्यां यथार्थतः ॥ १२ ॥
वीराणां च परिज्ञानं कृत्वायान्तु त्वरान्विताः ।
ज्ञात्वा दैत्यपतेस्तस्य सैन्यस्य च बलाबलम् ॥ १३ ॥
करिष्यामि ततस्तूर्णं यानं वा दुर्गसंग्रहम् ।
विचार्य खलु कर्तव्यं कार्यं बुद्धिमता सदा ।
सहसा विहितं कार्यं दुःखदं सर्वथा भवेत् ॥ १४ ॥
तस्माद्विमृश्य कर्तव्यं सुखदं सर्वथा बुधैः ।
नात्र भेदविधिर्न्याय्यो दानवेषु च सर्वथा ॥ १५ ॥
एकचित्तेषु कार्येऽस्मिंस्तस्माच्चारा व्रजन्तु वै ।
ज्ञात्वा बलाबलं तेषां पश्चान्नीतिर्विचार्य च ॥ १६ ॥
विधेया विधिवत्तज्ज्ञैस्तेषु कार्यपरेषु च ।
अन्यथा विहितं कार्यं विपरीतफलप्रदम् ॥ १७ ॥
सर्वथा तद्‌भवेन्नूनमज्ञातमौषधं यथा ।
व्यास उवाच
इति सञ्चिन्त्य तैः सर्वैः प्रणिधिं कार्यवेदिनम् ॥ १८ ॥
प्रेषयामास देवेन्द्रः परिज्ञानाय पार्थिव ।
दूतस्तु त्वरितो गत्वा समागम्य सुराधिपम् ॥ १९ ॥
निवेदयामास तदा सर्वसैन्यबलाबलम् ।
ज्ञात्वा तद्‌बलमुद्योगं तुराषाडतिविस्मितः ॥ २० ॥
देवानचोदयत्तूर्णं समाहूय पुरोहितम् ।
मन्त्रं मन्त्रविदां श्रेष्ठं चकार त्रिदशेश्वरः ॥ २१ ॥
उवाचाङ्‌गिरसश्रेष्ठं समासीनं वरासने ।
इन्द्र उवाच
भो भो देवगुरो विद्वन्किं कर्तव्यं वदस्व नः ॥ २२ ॥
सर्वज्ञोऽसि समुत्पन्ने कार्ये त्वं गतिरद्य नः ।
दानवो महिषो नाम महावीर्यो मदान्वितः ॥ २३ ॥
योद्धुकामः समायाति बहुभिर्दानवैर्वृतः ।
तत्र प्रतिक्रिया कार्या त्वया मन्त्रविदाधुना ॥ २४ ॥
तेषां शुक्रस्तथा त्वं मे विघ्नहर्ता सुसंयतः ।
व्यास उवाच
तच्छ्रुत्वा वचनं प्राह तुरासाहं बृहस्पतिः ॥ २५ ॥
विचिन्त्य मनसा कामं कार्यसाधनतत्परः ।
गुरुरुवाच
स्वस्थो भव सुरेन्द्र त्वं धैर्यमालम्ब्य मारिष ॥ २६ ॥
व्यसने च समुत्पन्ने न त्याज्यं धैर्यमाशु वै ।
जयाजयौ सुराध्यक्ष दैवाधीनौ सदैव हि ॥ २७ ॥
स्थातव्यं धैर्यमालम्ब्य तस्माद्‌ बुद्धिमता सदा ।
भवितव्यं भवत्येव जानन्नेव शतक्रतो ॥ २८ ॥
उद्यमः सर्वथा कार्यो यथापौरुषमात्मनः ।
मुनयोऽपि हि मुक्त्यर्थमुद्यमैकरताः सदा ॥ २९ ॥
दैवाधीनं च जानन्तो योगध्यानपरायणाः ।
तस्मात्सदैव कर्तव्यो व्यवहारोदितोद्यमः ॥ ३० ॥
सुखं भवतु वा मा वा दैवे का परिदेवना ।
विना पुरुषकारेण कदाचित्सिद्धिमाप्नुयात् ॥ ३१ ॥
अन्धवत्पङ्गुवत्कामं न तथा मुदमावहेत् ।
कृते पुरुषकारेऽपि यदि सिद्धिर्न जायते ॥ ३२ ॥
न तत्र दूषणं तस्य दैवाधीने शरीरिणि ।
कार्यसिद्धिर्न सैन्येऽस्ति न मन्त्रे न च मन्त्रणे ॥ ३३ ॥
न रथे नायुधे नूनं दैवाधीना सुराधिप ।
बलवाञ्क्लेशमाप्नोति निर्बलः सुखमश्नुते ॥ ३४ ॥
बुद्धिमान्क्षुधितः शेते निर्बुद्धिर्भोगवान्भवेत् ।
कातरो जयमाप्नोति शूरो याति पराजयम् ॥ ३५ ॥
दैवाधीने तु संसारे कामं का परिदेवना ।
उद्यमे योजयेन्नूनं भवितव्यं सुराधिप ॥ ३६ ॥
दुःखदे सुखदे वापि तत्र तौ न विचिन्तयेत् ।
दुःखे दुःखाधिकान्पश्येत्सुखे पश्येत्सुखाधिकम् ॥ ३७ ॥
आत्मानं हर्षशोकाभ्यां शत्रुभ्यामिव नार्पयेत् ।
धैर्यमेवावगन्तव्यं हर्षशोकोद्‌भवे बुधैः ॥ ३८ ॥
अधैर्याद्यादृशं दुःखं न तु धैर्येऽस्ति तादृशम् ।
दुर्लभं सहनत्वं वै समये सुखदुःखयोः ॥ ३९ ॥
हर्षशोकोद्‌भवो यत्र न भवेद्‌ बुद्धिनिश्चयात् ।
किं दुःखं कस्य वा दुःखं निर्गुणोऽहं सदाव्ययः ॥ ४० ॥
चतुर्विंशातिरिक्तोऽस्मि किं मे दुःखं सुखं च किम् ।
प्राणस्य क्षुत्पिपासे द्वे मनसः शोकमूर्छने ॥ ४१ ॥
जरामृत्यू शरीरस्य षडूर्मिरहितः शिवः ।
शोकमोहौ शरीरस्य गणौ किं मेऽत्र चिन्तने ॥ ४२ ॥
शरीरं नाहमथवा तत्सम्बन्धी न चाप्यहम् ।
सप्तैकषोडशादिभ्यो विभिन्नोऽहं सदा सुखी ॥ ४३ ॥
प्रकृतिर्विकृतिर्नाहं किं मे दुःखं सदा पुनः ।
इति मत्वा सुरेश त्वं मनसा भव निर्ममः ॥ ४४ ॥
उपायः प्रथमोऽयं ते दुःखनाशे शतक्रतो ।
ममता परमं दुःखं निर्ममत्वं परं सुखम् ॥ ४५ ॥
सन्तोषादपरं नास्ति सुखस्थानं शचीपते ।
अथवा यदि न ज्ञानं ममत्वनाशने किल ॥ ४६ ॥
ततो विवेकः कर्तव्यो भवितव्ये सुराधिप ।
प्रारब्धकर्मणां नाशो नाभोगाल्लक्ष्यते किल ॥ ४७ ॥
यद्‌भावि तद्‌भवत्येव का चिन्ता सुखदुःखयोः ।
सुरैः सर्वैः सहायैर्वा बुद्ध्या वा तव सत्तम ॥ ४८ ॥
सुखं क्षयाय पुण्यस्य दुःखं पापस्य मारिष ।
तस्मात्सुखक्षये हर्षः कर्तव्यः सर्वथा बुधैः ॥ ४९ ॥
अथवा मन्त्रयित्वाद्य कुरु यत्‍नं यथाविधि ।
कृते यत्‍ने महाराज भवितव्यं भविष्यति ॥ ५० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
पञ्चमस्कन्धे भयातुरेन्द्रादिदेवैः सुरगुरुणा सह
परामर्शवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥


युद्धाचा विचार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

इंद्राने महिषासुराला निरोप पाठवल्यावर यम, वायु, कुबेर, वरुण ह्या देवांना बोलावून घेतले. इंद्र म्हणाला, "हे देवांनो, रंभाचा पुत्र महिषासुर दैत्य हा पराक्रमी असून सर्व मायाविद्यांमध्ये अधिकारी आहे. वरप्राप्तीमुळे तो अत्यंत उन्मत्त झाला आहे. त्याला आता स्वर्गप्राप्तीची इच्छा झाली आहे. त्याने दूताकरवी मला अत्यंत हीन शब्दात स्वर्ग सोडून कोठेही जाण्याविषयी निरोप पाठवला आहे व महिषासुराला आम्ही शरण जावे अशी त्याने इच्छा व्यक्त केली आहे. किंवा मी सैन्य तयार ठेवून युद्धास तयार व्हावे असे त्याने स्पष्ट शब्दात कळविले आहे. तेव्हा हे सर्व सुरश्रेष्टांनो, आपण सर्वांनी योग्य तो विचार करावा. पुढे काय करायचे ते ठरवावे.

हे देवांनो, बलाढ्य पुरुषानेही दुबळ्या शत्रूची उपेक्षा करू नये. त्यातून सततोद्योगी, महाबलाढ्य व स्वतःच्या वीर्याची घमेंड वाहणार्‍या शत्रूची उपेक्षा करणे हे केव्हाही योग्य नव्हे. तेव्हा आता आपल्याला पुढील तयारीला लागले पाहिजे. जय अथवा पराजय दैवाधीन आहे. तुम्ही म्हणाल युद्ध टाळून संधी करावा. पण हा दैत्यराज संधी करण्याच्या योग्यतेचा नाही. शिवाय खलात्म्याशी संधी करण्यात काहीही अर्थ नाही. अशा वेळी सज्जनांनी कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे. यावेळी तर एकाएकी दुसरीकडे प्रयाण करणेही योग्य नव्हे. म्हणून प्रथम शीघ्रगामी, संगीतज्ञ, निःसंग, निःस्पृह, सत्यवादी, दरबारात आतपर्यंत प्रवेश करू शकणारे दूत पाठवावेत हे बरे. त्यामुळे ते दूत त्याच्या सैन्यबलाचा अंदाज व त्याच्याकडील पराक्रमी दैत्यांची माहिती घेऊन सत्वर परत येतील, नंतर त्यावर विचार करून मी योग्य तो निर्णय घेईन व दूरवर प्रयाण करणे अथवा किल्ल्याचा आश्रय घेणे याचा विचार करीन. कारण एकाएकी अविचाराने केलेले काम दु:खदायक होते. विचारी पुरुषांनी योग्यायोग्यतेचा खल करून पुढील मार्ग अवलंबावा हेच सुखदायी ठरेल.

दानव एकनिष्ठ असल्याने त्यांच्यात फितुरी होणे अशक्य दिसते. म्हणून पुढील उपायांसाठी प्रथम हेरांना जाऊ द्यावे. मुत्सद्दी असुरांविषयी योग्यायोग्यतेचा विचार करावा. नाहीतर परिणामी अविचाराने सेवन केलेल्या अज्ञान औषधाप्रमाणे सर्व काही विपरीत घडेल."

अशा तर्‍हेने सर्व देवांबरोबर विचार विनिमय करून इंद्राचा कार्यतत्पर असा हेर महिषासुराकडे जाऊन त्याच्या बलाचा अभ्यास करून सत्वर इंद्राकडे परत आला. त्याने सर्व दानव युद्धासाठी केव्हाच तयार झाले असल्याचे इंद्राला सांगताच इंद्र आश्चर्याचकित झाला. त्याने तातडीने युद्धाची तयारी करण्याची सर्व सुरांना विनंती केली आणि तो आपल्या श्रेष्ठ मंत्रवेत्त्या पुरोहिताला आवाहन करून त्याच्याशी सल्लामसलत करू लागला.

उत्तम आसनावर बसलेल्या श्रेष्ठ अंगिरसाला इंद्र म्हणाला, "हे गुरुदेव, आता आम्ही काय करावे ? सांप्रतची सर्व परिस्थिती, तुम्ही सूज्ञ असल्याने तुम्हाला ज्ञात आहे. म्हणून यावेळी तुम्हीच आमचे आश्रयस्थान आहात. महिषासुर नावाचा अत्यंत गर्विष्ठ व महाबलाढ्य दैत्यराज आपली सेना सज्ज करून चालून येत आहे हे आपण जाणतच आहात. म्हणून आपल्याकडूनच त्याचा प्रतिकार झाला पाहिजे. ज्याप्रमाणे दानवांना शुक्र, त्याच्याप्रमाणे आम्हा देवांचे विघ्न हरण करणारे म्हणून आपण मान्यवर आहात."

हे भाषण ऐकल्यावर देवकार्य करण्यास तत्पर असलेल्या बृहस्पतीने मनात पूर्णपणे विचार करून उत्तर दिले. " हे देवेन्द्रा, तू धैर्य धर. संकटसमयी धैर्य सोडणे उचित नव्हे. जयपराजय हे जरी दैवाधीन असले तरी विचारी पुरुषाने धैर्य सोडू नये. हे देवराजा, भवितव्य चुकणार नाही असे समजून आपल्या शक्तीप्रमाणे सदैव उद्योग करीत राहिले पाहिजे. ऋषीमुनीसुद्धा सर्व काही दैवाधीन आहे. म्हणून योग व ध्यान यांचाच आश्रय करतात व मुक्तीसाठी सततोद्योग करीत असतात. तेव्हा व्यवहार न सोडता सर्वदा दैवावर विश्वास ठेवून कार्य करीत रहावे. मग सुखप्राप्ती होवो अथवा न होवो. दैवासंबंधी शोक व विचार करीत बसण्यात काही अर्थ नाही. एखाद्या आंधळ्या- पांगळ्याप्रमाणे एखाद्या वेळी प्रयत्‍नाशिवायदेखील कार्य सिद्धीस जाईल. परंतु उद्योग करून जो आनंद मिळतो तो मिळणार नाही. प्रयत्‍न करूनही जर कार्यसिद्धी झाली नाही तर तो प्रयत्‍न करणार्‍याचा दोष नाही. कारण प्राणी हा दैवाधीनच आहे.

म्हणून हे देवराजा, सैन्य, मंत्र, विचार, रथ व आयुधे कार्यसिद्धी अवलंबून नाही तर धैर्यावर अवलंबून आहे. कधी कधी बलाढ्य पुरुषाला क्लेश व निर्बलाला सुखप्राप्ती होते. बुद्धिमान पुरुषाला उपाशी राहावे लागते व मूर्ख पुरुष सुखाचा अनुभव घेत असतो. त्याचप्रमाणे एखादा भित्रा विजयी होऊन शूराचा पराभव होतो. तात्पर्य दैवाधीन फलाविषयी वृथा विचार करून काय उपयोग ?

मनुष्याने खरोखरच उद्योग व दैव यांची सांगड घालावी. दुःख प्राप्त झाले असता अधिक दु:खी लोकांकडे लक्ष द्यावे. सुख प्राप्त झाले असता अधिक सुखी लोकांकडे पाहावे. सुखदुःखाने निर्माण होणार्‍या हर्षशोकांच्या अधीन होऊ नये. हर्षशोक प्राप्त झाले असताही आपले धैर्य टिकवून धरावे. धैर्याचा अभाव असल्यास जसे दुःख होते तसे धैर्यशीलपणामुळे होत नाही.

सुखदुःखांच्या वेळी सहनशीलपणा दुर्लभ आहे. कारण मन चंचल असते. अशा स्थितीत हर्ष अथवा शोक प्राप्त होतात व मन स्थिर राहात नाही. दुःख म्हणजे काय ? ते कुणाला होत असते ? मी निर्गुण असल्याने अविनाशी आहे. माझ्याशी काहीही संबंध नसल्याने सुखदु:खाचा माझ्यावर कसा परिणाम होणार ?

क्षुधा व तृषा हे दोन मनाचे तरंग असून शोक व मुर्च्छा हे दोन मनाचे तरंग आहेत आणि जरा व मरण हे शरीराचे तरंग आहेत. ह्या सहाही अवस्थांचा संबंध नसलेला निर्विकार शिव मीच आहे. शोक व मोह हे शरीराचे गुण आहेत. तेव्हा त्यांचा विचार मी का करावा ? मी नसल्याने माझा शरीराशी संबंध नाही. मदादि सप्त विकृत मूलप्रकृती आणि सोळा विकार ह्यांहून मी भिन्न आहे. म्हणून मी सर्वदा सुखी आहे. मी प्रकृती व विकृती दोन्हीही नसल्याने दुःख मला काहीच करू शकत नाही. तेव्हा हे इंद्रा, तू विचार कर व मनात हे माझे बुद्धी धरू नकोस म्हणजे तुझ्या सुखदुःखाचा नाश होईल. कारण हे माझे अशी बुद्धी धरणे हे दुःखाचे मूळ आहे. हे इंद्रा, संतोषापेक्षा दुसरे काहीही सुखाचे साधन नाही.

पण ममत्सबुद्धीचा नाश होण्याइतके ज्ञान जर प्राप्त झाले नसेल तर भवितव्यासंबंधी विवेक केला पाहिजे. उपभोगाशिवाय प्राप्तकर्माचा नाश होत नाही. जे होणार ते चुकणार नाही. तस्मात् सुखदुःखाचा विचार करण्यात काय अर्थ आहे.

हे सज्जनश्रेष्ठा, "सुखामुळे पुण्याचा क्षय होत असतो. मग सर्व देवांचे सहाय्य होऊनही अथवा स्वत:च्या बुद्धीने जरी तुला सुखप्राप्ती झाली तरी उपयोग काय ? तेव्हा ज्ञानी पुरुषाने सुखाचा नाश होत असतानाही आनंदच मानला पाहिजे. तरीही आज विचारविनिमय करून तू पायाशुद्ध प्रयत्‍न कर. प्रयत्‍न केल्यावर जे होणार असेल ते होईल."


अध्याय चवथा समाप्त

GO TOP