श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
चतुर्थः स्कन्धः
षोडशोऽध्यायः


हरेर्नानावतारवर्णनम्

जनमेजय उवाच
भृगुशापान्मुनिश्रेष्ठ हरेरद्‌भुतकर्मणः ।
अवताराः कथं जाताः कस्मिन्मन्वन्तरे विभो ॥ १ ॥
विस्तराद्वद धर्मज्ञ अवतारकथा हरेः ।
पापनाशकरीं ब्रह्मञ्छ्रुतां सर्वसुखावहाम् ॥ २ ॥

व्यास उवाच
शृणु राजन् प्रवक्ष्यामि अवतारान् हरेर्यथा ।
यस्मिन्मन्वन्तरे जाता युगे यस्मिन्नराधिप ॥ ३ ॥
येन रूपेण यत्कार्यं कृतं नारायणेन वै ।
तत्सर्वं नृप वक्ष्यामि संक्षेपेण तवाधुना ॥ ४ ॥
धर्मस्यैवावतारोऽभूच्चाक्षुषे मनुसम्भवे ।
नरनारायणौ धर्मपुत्रौ ख्यातौ महीतले ॥ ५ ॥
अथ वैवस्वताख्येऽस्मिन्द्वितीये तु युगे पुनः ।
दत्तात्रेयावतारोऽत्रेः पुत्रत्वमगमद्धरिः ॥ ६ ॥
ब्रह्मा विष्णुस्तथा रुद्रस्त्रयोऽमी देवसत्तमाः ।
पुत्रत्वमगमन्देवास्तस्यात्रेर्भार्यया वृताः ॥ ७ ॥
अनसूयात्रिपत्‍नी च सतीनामुत्तमा सती ।
यया सम्प्रार्थिता देवाः पुत्रत्वमगमंस्त्रयः ॥ ८ ॥
ब्रह्माभूत्सोमरूपस्तु दत्तात्रेयो हरिः स्वयम् ।
दुर्वासा रुद्ररूपोऽसौ पुत्रत्वं ते प्रपेदिरे ॥ ९ ॥
नृसिंहस्यावतारस्तु देवकार्यार्थसिद्धये ।
चतुर्थे तु युगे जातो द्विधारूपो मनोहरः ॥ १० ॥
हिरण्यकशिपोः सम्यग्वधाय भगवान् हरिः ।
चक्रे रूपं नारसिंहं देवानां विस्मयप्रदम् ॥ ११ ॥
बलेर्नियमनार्थाय श्रेष्ठे त्रेतायुगे तथा ।
चकार रूपं भगवान् वामनं कश्यपान्मुनेः ॥ १२ ॥
छलयित्वा मखे भूपं राज्यं तस्य जहार ह ।
पाताले स्थापयामास बलिं वामनरूपधृक् ॥ १३ ॥
युगे चैकोनविंशेऽथ त्रेताख्ये भगवान् हरिः ।
जमदग्निसुतो जातो रामो नाम महाबलः ॥ १४ ॥
क्षत्रियान्तकरः श्रीमान्सत्यवादी जितेन्द्रियः ।
दत्तवान्मेदिनीं कृत्स्नां कश्यपाय महात्मने ॥ १५ ॥
यो वै परशुरामाख्यो हरेरद्‌भुतकर्मणः ।
अवतारस्तु राजेन्द्र कथितः पापनाशनः ॥ १६ ॥
त्रेतायुगे रघोर्वंशे रामो दशरथात्मजः ।
नरनारायणांशौ द्वौ जातौ भुवि महाबलौ ॥ १७ ॥
अष्टाविंशे युगे शस्तौ द्वापरेऽर्जुनशौरिणौ ।
धराभारावतारार्थं जातौ कृष्णार्जुनौ भुवि ॥ १८ ॥
कृतवन्तौ महायुद्धं कुरुक्षेत्रेऽतिदारुणम् ।
एवं युगे युगे राजन्नवतारा हरेः किल ॥ १९ ॥
भवन्ति बहवः कामं प्रकृतेरनुरूपतः ।
प्रकृतेरखिलं सर्वं वशमेतज्जगत्त्रयम् ॥ २० ॥
यथेच्छति तथैवेयं भ्रामयत्यनिशं जगत् ।
पुरुषस्य प्रियार्थं सा रचयत्यखिलं जगत् ॥ २१ ॥
सृष्ट्वा पुरा हि भगवाञ्जगदेतच्चराचरम् ।
सर्वादिः सर्वगश्चासौ दुर्ज्ञेयः परमोऽव्ययः ॥ २२ ॥
निरालम्बो निराकारो निःस्पृहश्च परात्परः ।
उपाधितस्त्रिधा भाति यस्याः सा प्रकृतिः परा ॥ २३ ॥
उत्पत्तिकालयोगात्सा भिन्ना भाति शिवा तदा ।
सा विश्वं कुरुते कामं सा पालयति कामदा ॥ २४ ॥
कल्पान्ते संहरत्येव त्रिरूपा विश्वमोहिनी ।
तया युक्तोऽसृज द्‌ब्रह्मा विष्णुः पाति तयान्वितः ॥ २५ ॥
रुद्रः संहरते कामं तया सम्मिलितः शिवः ।
सा चैवोत्पाद्य काकुत्स्थं पुरा वै नृपसत्तमम् ॥ २६ ॥
कुत्रचित्स्थापयामास दानवानां जयाय च ।
एवमस्मिंश्च संसारे सुखदुःखान्विताः किल ॥ २७ ॥
भवन्ति प्राणिनः सर्वे विधितन्त्रनियन्त्रिताः ॥ २८ ॥


भगवान हरीचे अवतार -

जनमेजयाने प्रश्‍न विचारला, "हे मुनिश्रेष्ठा, हे प्रभो, भृगूच्या शापामुळे अद्‌भुत कर्म करणार्‍या हरीचे अवतार कसे झाले व ते कोणत्या मन्वंतरामध्ये झाले ? हे धर्मज्ञा, हे ब्रह्मनिष्ठा, पापाचा नाश करून सर्व प्रकारचे सुख उत्पन्न करणारी जी हरिकथा आपण ऐकली असेल तर मला सांगा."

व्यास म्हणाले, "हे प्रजाधिपते राजा, श्रीहरीचे अवतार मी कथन करतो. हे अवतार कोणत्या मन्वंतरामध्ये व कोणत्या युगामध्ये झाले आणि नारायणाने कोणते रूप धारण करून कोणते कार्य केले ते सर्व मी सांप्रत तुला संक्षेपाने कथन करतो. तू ऐक तर आता.

हे राजा, चक्षु मन्वंतरामध्ये धर्माचाच प्रत्यक्ष अवतार झाला व धर्माचे पुत्र नरनारायण म्हणून भूतलावर प्रसिद्ध झाले.

नंतर दुसर्‍या युगात वैवस्वत मन्वंतरामध्ये दत्तात्रेयाचा अवतार घेऊन हरी अत्रिपुत्र झाला. त्या अत्रीच्या भार्येने वर मागितल्यामुळे ब्रह्मा, विष्णु व महेश्वर हे तीन सुरश्रेष्ठच तिचे दत्तात्रेय नावाने पुत्र झाले. पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ अशी जी साध्वी अत्रिभार्या अनसूया तिने प्रार्थना केल्यामुळे तिन्ही देव तिचे पुत्र झाले. ब्रह्मा सोमरूप झाला, विष्णु स्वत: दत्तात्रेय झाला आणि दुर्वासमुनी हा रुद्राचा अवतार झाला. अशा रीतीने तिन्ही देवांनी अनसूयेचे पुत्रत्व स्विकारले.

चवथ्या युगामध्ये देवकार्य सिद्धीस जाण्याकरता दोन प्रकारच्या रूपांनी युक्त व मनोहर असा नृसिंहावतार झाला. हिरण्यकशिपूचा वध व्हावा म्हणून भगवान हरीने देवांनाही विस्मय उत्पन्न करणारे असे नरसिंहरूप धारण केले.

श्रेष्ठ त्रेतायुगामध्ये बलीचे संयमन करण्याकरता भगवान श्रीहरीने कश्यपमुनीपासून वामनरूप धारण केले. नंतर यज्ञामध्ये त्या वामनरूप धारण करून विष्णूने बलीशी कपट करून त्याचे राज्य हरण केले आणि पातालामध्ये त्याची स्थापना केली.

एकोणिसाव्या त्रेतायुगामध्ये भगवान हरी परशुराम म्हणून जमदग्नीचा

महाबलाढय पुत्र झाला. तो श्रीमान परशुराम क्षत्रियांचा अंत करणारा, सत्यवादी व जितेंद्रिय निघाला. महात्म्या कश्यपाला त्याने सर्व पृथ्वी अर्पण केली. परशुराम म्हणून जो प्रसिद्ध झाला तो अद्‍भुत कर्म करणार्‍या हरीचाच अवतार होय.

त्रेतायुगामध्ये रघुवंशात दशरथपुत्र राम आणि लक्ष्मण असे नरनारायणाचे अंश म्हणून दोन महाबलाढय अवतार भूतलावर प्रगट झाले.

अठठाविसाव्या द्वापर युगामध्ये पृथ्वीचा भार कमी करण्याकरता कृष्णार्जुन उत्पन्न झाले. त्यांनी कुरुक्षेत्रामध्ये भयंकर व मोठे युद्ध केले. हे राजा ह्याप्रमाणे प्रत्येक युगामध्ये प्रकृतीला अनुरूप असे हरीचे अनेक अवतार झाले.

हे सर्व त्रैलोक्य पूर्णपणे प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या अधीन आहे. ही माया इच्छेप्रमाणे एकसारखी हे जग फिरवीत असते आणि पुरुषाचे प्रिय करण्याकरता ती संपूर्ण जगत् निर्माण करीत असते. जगाच्या पूर्वी सर्वादि, सर्वस्वामी आणि अव्यक्त अशा परमात्म्याने हे चराचर जगत् उत्पन्न केले आहे. तो भगवान निराधार, निःस्पृह व मायातीत असून उपाधिभेदाने तीन प्रकारांनी भासत आहे. त्या आदिमायेचे तो आदि, मुख्य स्वरूप आहे. उत्पत्तिकाली जेव्हा ती कल्याणी बहिर्मुख होते तेव्हा द्वैत भासू लागते. विश्वाची उत्पत्ती तीच करीत असते. मनोरथ परिपूर्ण करणारी तीन रूपांनी युक्त असलेली तीच विश्वमोहिनी कल्पांतसमयी जगताचा संहारही करीत असते.

सारांश तिचे साहाय्य प्राप्त झाल्यानंतरच ब्रह्मा, विष्णु व महेश्वर हे अनुक्रमे जगताची उत्पत्ती, स्थिती व लय तिच्या इच्छेप्रमाणे करीत असतात. तिनेच पूर्वी काकुस्थ नामक एक नृप श्रेष्ठ उत्पन्न करून दानवांचा पराजय करण्याकरता त्याची एका दिव्य ठिकाणी स्थापना केली. ह्याप्रमाणे या संसारामध्ये सर्वही प्राणी विधितंत्राने नियमित व प्रतिबद्ध असल्यामुळे सुखदुःखांनी युक्त असतात.

हे राजा, असे हे हरीचे अवतार मी तुला निवेदन केले. आता तुला काय ऐकण्याची इच्छा आहे ?"इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
चतुर्थस्कन्धे हरेर्नानावतारवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
अध्याय सोळावा समाप्त

GO TOP