ऋषिरुवाच
निर्भया वस कल्याणि पुत्रं पालय सुव्रते ।
न ते भयं विशालाक्षि कर्तव्यं शत्रुसम्भवम् ॥ ५८ ॥
पालयस्व सुतं कान्तं राजा तेऽयं भविष्यति ।
नात्र दुःखं तथा शोकः कदाचित्सम्भविष्यति ॥ ५९ ॥
व्यास उवाच
इत्युक्ता मुनिना राज्ञी स्वस्था सा सम्बभूव ह ।
उटजे मुनिना दत्ते वीतशोका तदावसत् ॥ ६० ॥
सैरन्ध्रीसहिता तत्र विदल्लेन च संयुता ।
सुदर्शनं पालयाना न्यवसत्सा मनोरमा ॥ ६१ ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां तृतीयस्कन्धे
मनोरमया भारद्वाजाश्रमं प्रति गमनं नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
मनोरमा सुदर्शनाला घेऊन वनात जाते
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
क्रोध व लोभ ह्यांचे अधीन होऊन संग्रामाकरिता शस्त्र धारण केलेल्या, त्या उभयता राजांचे युद्ध सुरू झाले असता चोहोकडे मोठीच गडबड उडाली. एका बाजूला विशाल बाहूंनी युक्त असा तो भूपति युधाजित राजा संग्रामाविषयी निश्चय करून व हातामध्ये धनुष्य घेऊन स्वकीय सैन्य, वाहने इत्यादिकांसह समरांगणामध्ये उभा राहिला. दुसर्या बाजूला इंद्रतुल्य तेजस्वी वीरसेन राजा नातवाच्या हिताकरता क्षात्रधर्माला अनुसरून सैन्यासह समरांगणामध्ये युद्धाकरिता सिद्ध झाला.
युधाजित रणामध्ये उभा असल्याचे अवलोकन करताक्षणी जलधारांनी पर्वतावर वृष्टी करणार्या मेघाप्रमाणे त्या पराक्रमी व क्रोधयुक्त युधाजित राजाने (?) त्याच्यावर बाणांनी वृष्टी केली. वीरसेनांनेही शिळेवर घासलेल्या आणि सत्वर व सरळ जाणार्या बाणांनी त्या युधाजिताला व्यापून टाकिले. तेव्हा आपणावर अतिशय वेगाने येणारे असे जे शिलामुख बाण त्या युधाजिताने सोडले होते ते त्याने तोडून टाकले. गज, रथ व अश्व यामध्ये प्रचंड युद्ध सुरू झाले असता देवगण, मर्त्यगण व मुनीगण ह्यांनाही ते अति घोर दिसू लागले. मांस-लोलुप काकगुघ्रादी पक्षी व इतरही प्रचंड पक्षीसमुदाय ह्यांनी तत्क्षणी आकाश व्याप्त करून टाकले.
यमलोकाच्या मार्गाने लागणारी वैतरणी नदी दृष्टीस पडली असता ज्याप्रमाणे पापी लोकांना भय उत्पन्न करते त्याप्रमाणे गद, वीर व अश्व ह्यांच्या समुदायापासून निघालेली रक्ताची अद्भूत नदी खरोखर तेथे भय उत्पन्न करू लागली. प्रवाह वेगाने तटही पाडून टाकलेल्या त्या रक्तमय नदीमध्ये पडलेली व केसांनी व्याप्त असलेली नरमस्तके यमुनातीरी राहणार्या बालकांनी जलक्रिडेकरिता यमुना नदीत टाकलेल्या भोपळ्याप्रमाणे भासू लागली.
रथातून भूमीवर मरून पडलेल्या वीरांना अवलोकन करून मांसाकरिता गुघ्र पक्षाच्या घिरट्या त्यावर सुरू झाल्या. जणू काय हा जीव अत्यंत पराधीन झाला असूनही पुनः आपल्या प्रिय शरीरात प्रवेश करण्याची इच्छा करीत होता. समरांगणामध्ये मृत झालेल्या नरवीर उत्कृष्ट विमानामध्ये आरूढ होऊन "हे सुंदरी, पहा ! हे माझे मनोहर शरीर बाणांनी ताडित झाल्यामुळे सांप्रत भूमीवर पडले आहे." असे आपल्या अंकावर बसलेल्या देवभोग्य अप्सरेशी प्रिय भाषण करीत होता.
त्या संग्रामात मरण पावलेल्या एखादा वीर अंतरिक्षामध्ये जाऊन अप्सरेसह विमानामध्ये आरूढ होत आहे. तोच त्याची स्वकीय प्रिया अग्नीमध्ये यथाविधी देह समर्पण केल्यामुळे दिव्य देह प्राप्त होऊन त्याच विमानात आपल्या पतीचा पुनरपी स्वीकार करीत होती. युद्धामध्ये एकमेकांच्या शस्त्राने वध पावून उभयताही बरोबरच हा लोक सोडून स्वर्गामध्ये संगत झाले असता तेथेही दोघांना अप्सरा एकच मिळाल्यामुळे आपल्यालाच प्राप्ती व्हावी, दुसर्याला मिळू नये, दुसर्याला प्राप्त झाली असता आपल्या इष्ट वस्तूची हानी झाली असे समजून परस्परात कलह करण्याचे मनामध्ये आणत होते.
अतिशय घातुक शस्त्रांनी एकमेकांवर प्रहार करीत युद्धात मृत झालेल्या एखाद्या तरुणाला स्वतःपेक्षा रूपाने व गुणांनी अधिक अशी अप्सरा प्राप्त झाली असता भक्तीने तो आपले प्रसिद्ध गुण तिला सांगत असे. तिने आपल्यावर प्रेम करावे एतदर्श स्वतः प्रेमपूर्वक तिच्या मनाप्रमाणे वागत असे. पृथ्वीवरील उडालेली धूळ अंतरिक्ष व्यापून टाकीत असता सूर्य आच्छादित करून रात्र झाली आहे की काय असा भास होई. परंतु एकाएकी रक्तसागरामध्ये निमग्न झाली असता कांतियुक्त सूर्य अकस्मात प्रकट होई. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्यव्रताने राहिलेला एखादा वीर वध पावून आकाशामध्ये गेला असता मनोहर मुद्रेने युक्त व अनुरक्त अशी अप्सरा त्याला प्राप्त होई. त्या वेळीही तो चतुर वीर ब्रह्मचर्याविषयी मी संपादन केलेली योग्य कीर्ती व्यर्थ होईल. ह्या भीतीने खरोखर तिचा अंगीकार करीत नसे.
संग्राम सुरू झाला असता त्या संग्रामात भूपति युधाजिताने तीव्र व अतिदारुण बाणांनी त्या वीरसेनाचा वध केला. शिरच्छेद होऊन वध पावलेला तो भूपति भूमीवर पडला असता त्याच्या त्या सर्व सैन्यासह दाणादाण झाली व ते चोहोकडे पळत सुटले. संग्रामामध्ये पिता वध पावल्याचे श्रवण करताक्षणी मनोरमेला त्या युधाजिताच्या वैराची आठवण होताच ती भयभीत झाली.
"पापात्मा व दुर्बुद्धी युधाजित राज्यलोभाने माझ्या पुत्राचाही वध करील." असे वाटून ती फारच चिंताक्रांत झाली.
'मी करू तरी काय ? जाऊ तरी कोठे ? माझा पती मृत झाला असून पित्याचाही संग्रामामध्ये आजच वध झाला आहे. हा माझा पुत्र बालक आहे. लोभ अतिशयच वाईट आहे. त्याने कोणाला बरे वश केले नाही ? सज्जनांमध्ये श्रेष्ठ असलेलाही राजा लोभाविष्ट झाला असता कोणते बरे पातक करणार नाही ? पिता, माता, गुरु, स्वजन व बांधव ह्या सर्वांचाही वध लोभाविष्ट पुरुष लोभाने अभक्ष भक्षण करून खरोखर धर्मत्याग करतो.
एखाद्याच्या आधाराने राहून ह्या माझ्या एकुलत्या एक पुत्राचे परिपालन करीन म्हणावे तर असा कोणीही माझा महाबलाढ्य सहाय्यकर्ता ह्या नगरामध्ये नाही. युधाजित राजाने पुत्राचाही वध केल्यास मी काय बरे करावे ? ज्याच्या आश्रयाने मला सुरक्षित राहता येईल असा जगतामध्ये माझा कोणीही त्राता नाही. आता ही सवत लिलावती तर सर्वदा यथेष्ठ वैरच करीत राहील ! माझ्या पुत्रावर ती दया करणार नाही. आता काही तरी उपाय लवकरच योजला पाहिजे. कारण युधाजित आल्यावर मला येथून
निसटून जाता येणार नाही. माझा पुत्र बालक आहे असे समजून तो आजच त्याला कारागारात नेऊन टाकील. पूर्वी मातेच्या गर्भामध्ये असलेल्या बालकाचे इंद्राने वज्र हाती घेऊन व मातेच्या उदरामध्ये प्रविष्ट होऊन सात तुकडे केले. त्या प्रत्येक तुकड्याचे पुनरपी सात सात तुकडे झाले. ह्याप्रमाणे स्वर्गामध्ये एकूण पन्नास पुत्र उत्पन्न झाले असे ऐकण्यात आहे.
प्राचीन काळी सवती असलेल्या दोन राजभार्यांपैकी गर्भाच्या नाशाकरिता एकीने दुसरीला विष दिल्याचेही मी ऐकले आहे. तो गर्भामध्ये विषाने युक्त असा बालक खरोखर उत्पन्न झाला. त्यामुळे तो सगर या नावाने भूमंडलावर विख्यात झाला. कैकेयीचा पती दशरथ जिवंत होता, तथापि त्या राजभार्येने ज्येष्ठ पुत्र रामास वनामध्ये हाकलून लाविले व त्यामुळे दशरथ राजा मरण पावला.
हे मंत्री तर खरोखरच पराधीन पडले ! जे माझ्या सुदर्शन पुत्राला राज्य देण्याची इच्छा करीत होते तेच सांप्रत युधाजिताला वश होऊन राहणार ? माझा भ्राता तशा प्रकारचा शूर नाही. दुर्दैवाने मला मोठेच संकट प्राप्त झाले आहे. परंतु सिद्धी जरी दैवाधीन असली तरी प्रयत्न हा सर्वथा केलाच पाहिजे. म्हणून पुत्राच्या रक्षणाकरिता मी आज सत्वर प्रयत्न करीन."
असा मनामध्ये विचार करून त्या मनोरमेने सर्व कार्यामध्ये निपुण, मुख्य मंत्र्यामध्येही श्रेष्ठ आणि सल्ला घेण्यास योग्य अशा महाविचारी विदल्ल नावाच्या मंत्र्याला एकांतामध्ये हाक मारली. मनामध्ये खिन्न होऊन अत्यंत दुःखित झालेली ती मनोरमा बालकाला हाती धरून रडत रडत म्हणाली, " संग्रामामध्ये माझ्या पित्याचा वध झाला असून हा पुत्र बालक आहे. राजा युधाजित बलाढ्य आहे म्हणून पुढे काय करावे हे तू मला सांग. "
विदल्ल म्हणाला, " तुम्ही येथे रहाता उपयोगी नाही. खरोखर आपण खुशाल वाराणशीच्या वनामध्ये जाऊ. तेथे माझा सुबाहु म्हणून प्रख्यात असलेला मातुल श्रीमान व बलाढ्य आहे. तो आपले रक्षण करील. म्हणून युधाजित राजाचे दर्शन घेण्याविषयी माझे मन उत्सुक झाले आहे असे सांगून नगराबाहेर पडावे आणि रथारूढ होऊन निःसंशय निघून जावे. "
त्याप्रमाणे त्या विदल्लाने सांगितले असता ती राणी मनोरमा लीलावतीकडे गेली आणि म्हणाली, 'हे सुलोचने, तुझ्या पित्याचे दर्शन घेण्याकरिता मी जात आहे. '
असे सांगून ती सैरंध्रीसह रथारूढ झाली आणि विदल्लाबरोबर नगराबाहेर गेली. पित्याच्या शोकाने व्याकुळ झाल्यामुळे अतिशय दीन व दुःखित झालेल्या त्या मनोरमेने राजा युधाजिताला भेटून आपल्या मृत पित्याचा संस्कार करविला. भयाने व्याकूळ झाल्यामुळे कापत ती राणी दोन दिवसात त्वरेने भागीरथीचे तीरी गेली. परंतु तेथेही भिल्लांनी लुटून तिचे सर्व द्रव्य घेतले. रथाचाही अपहार करून ते चोर निघून गेले. तेव्हा मनोहर वस्त्रांनी युक्त असलेली मनोरमा रडू लागली. तेव्हा दासीने तिला आपल्या हातांनी सावरून धरले. नंतर मुलाला घेऊन ती मनोरमा भीत भीत सत्वर नौकेवर चढली. ती पवित्र गंगा उतरून त्रिकूटाचलाकडे गेली. भयाने व्याकुळ झालेली ती मनोरमा भरद्वाजमुनीच्या आश्रमामध्ये त्वरेने गेली. तेथे तो तपस्वी दृष्टीस पडल्यावर ती निर्भय झाली.
नंतर ते मुनी तिला म्हणाले, "हे सुहास्यवदने, तू कोण ? कोणाची स्त्री ? ह्या ठिकाणी कशाकरता दुःखाने आली आहेस ? हे तू खरे सांग. तू देवांगना आहेस किंवा मनुष्य स्त्री आहेस ? तुला पुत्र बालक असताना तू वनामध्ये कशी ? हे सुंदरी, हे कमलनयने, तू राज्यभ्रष्ट झाल्यासारखे भासत आहेस."
ह्याप्रमाणे मुनींनी तिला प्रश्न केला असताही मोठमोठ्या लोकांच्या वर्णनास पात्र असलेली ती मनोरमा दुःखाने संतप्त झाल्यामुळे रडू लागली आणि आपली हकीकत मुनींना कळविण्याविषयी तिने विदल्लाला आज्ञा केली.
विदल्ल त्या मुनींना म्हणाला, "ध्रुवसंधि नावाचा जो श्रेष्ठ राजा होऊन गेला, त्याची ही भार्या होय. ही धर्मपत्नी असून हिचे नाव मनोरमा असे आहे. सूर्यवंशामध्ये उत्पन्न झालेल्या त्या महाबलाढ्य ध्रुवसंधिराजाचा सिंहाने वध केला. हा त्या राजाचा सुदर्शन नावाचा पुत्र आहे. ह्या राणीचा पिता अतिशय धर्मनिष्ठ होता. परंतु आपल्या नातवाकरता तो रणामध्ये मृत्यु पावला. म्हणून युधाजिताच्या भयाने त्रस्त होऊन, निर्जन वनामध्ये प्राप्त झालेली, व बालपुत्राने युक्त असलेली ही राजपत्नी सांप्रत आपणालाच शरण आली आहे. हे भाग्यशाली मुनीश्रेष्ठहो, आपण हिचे रक्षक व्हा. दीनाचे रक्षण केले असता, यज्ञापेक्षाही अधिक फल प्राप्त होते, असे म्हटले आहे. भयाने त्रस्त होऊन दीन झालेल्यांचे रक्षण तर विशेषच फलदायक म्हणून सांगितले आहे."
ऋषि म्हणाले, "हे कल्याणी तू तेथे निर्भयपणे वास्तव्य कर. हे पतिव्रते, तू येथे आपल्या पुत्राचे परिपालन कर. हे विशालनयने, शत्रुसंबंधाने आता तुला भीती बाळगण्याचे मुळीच कारण नाही. सौंदर्यसंपन्न पुत्राचे तू रक्षण कर. हा तुझा पुत्र राजा होईल. ह्या ठिकाणी तुला दुःख अथवा शोक कधीही प्राप्त होणार नाही."
ह्याप्रमाणे त्या मुनींनी सांगितले असता ती राणी स्वस्थ झाली. त्यांनी दिलेल्या पर्णकुटीमध्ये तिने शोकरहित होऊन वास्तव्य केले. दासी आणि विदल्ल ह्यांसह ती मनोरमा तेथे सुदर्शनाचे रक्षण करीत राहिली.