समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय ८ वा

मार्कंडेयाची तपस्या आणि वरप्राप्ति -

शौनक म्हणाले -
( अनुष्टुप् )
आयुष्मन् सूतजी व्हा हो ! तुम्ही वक्ता शिरोमणी ।
तमी भटकता लोक तुम्हि तो ब्रह्म दाविता ॥ १ ॥
मार्कंडेय चिरंजीव वदती कोणि लोक ते ।
प्रलयें गिळिले विश्व तदा ते वाचले म्हणे ॥ २ ॥
परी या आमच्या कूळी श्रेष्ठ जे भृगुवंशिय ।
माहीत जेवढे त्यांना न प्राणी प्रलयो कळे ॥ ३ ॥
प्रलयीं बुडता पृथ्वी मृकुंड पुत्र पोहतो ।
अद्‌भूत पाहिले त्यांनी मुकुंदबाल तेधवा ॥ ४ ॥
कसे हे जाहले शक्य शंका मोठीच मानसी ।
तुम्ही तो योगि नी वक्ते करा संशय दूर हा ॥ ५ ॥
सूत सांगतात -
पुसला छान हा प्रश्न लोकभ्रम यये मिटे ।
नारायणकथा ही तो गाता कलिमलो हटे ॥ ६ ॥
मिळता द्विज संस्कार मार्कंडेय पित्या पुढे ।
शिकले वेद नी धर्म तपी स्वाध्यायि जाहले ॥ ७ ॥
राहिले ब्रह्मचारी ते वल्कले धारिल्या जटा ।
मेखळा पवित्रो दंड शभले शांत रूप ते ॥ ८ ॥
अक्षमाला मृगचर्म कुश हे सर्व पुंजि की ।
अग्नि अर्क गुरू विप्र पूजा मानस सांध्य ती ॥ ९ ॥
दो वेळा गुरुला भिक्षा अर्पोनी मौनि राहती ।
गुर्वाज्ञे भोज ते एक अन्यथा उपवासची ॥ १० ॥
वागले तप स्वाध्याये करोडो वर्ष ते असे ।
आराधिता हृषीकेशा जिंकिला मृत्यु दुर्जय ॥ ११ ॥
विजया पाहता त्यांचा ब्रह्मा दक्ष शिवो भृगु ।
मनुष्य पितरे देवां आश्चर्य जाहले बहू ॥ १२ ॥
ब्रह्मचर्ये व्रते योगे तपे स्वाध्याय संयमे ।
अविद्या क्लेश संपोनी ध्यायिती परमात्म तो ॥ १३ ॥
योग्याने त्या पहा होगे जोडिले चित्त या परी ।
गेला काल तसा यांचा सहा मनवंतरे पहा ॥ १४ ॥
मन्वंतरात या सप्ती इंद्र शंके भिला असे ।
तपात विघ्न घालाया केला आरंभ तो तये ॥ १५ ॥
आश्रमीं अप्सरा काम वसंत मलयानलो ।
मद नी लोभ धाडोनी विघ्न ही टाकिले पहा ॥ १६ ॥
हिमालयोत्तरी त्यांचा आश्रमो तेथ पातले ।
पुष्पभद्र नदी तेथे चित्रा नामक ही शिळा ॥ १७ ॥
आश्रमो पावनो त्यांचा हिरवे वृक्ष चौदिशीं ।
वेली जाळीत पुण्यात्मे नी पवित्र जलाशय ॥ १८ ॥
गाती तै मत्त ते भृंग मत्त कोकिळ कूजती ।
नाचती नटवे मोर गाती द्विजथवे कुठे ॥ १९ ॥
इंद्रे पाठविता वायू मंद त्या झुळुकीसह ।
फुलां आलिंगुनी वारा कामोत्तेजक धावला ॥ २० ॥
उदेला निशिसी चंद्र किरणे पसरीतची ।
हजारो वृक्ष वेली ते झुकती कवटाळुनी ।
फळ नी फुलभारांचे गुच्छ ते शोभले बहू ॥ २१ ॥
गंधर्व चालता गाती अप्सरा चालती सवे ।
काम तो नायको त्यांचा करी संमोहिनी तिर ॥ २२ ॥
अग्निहोत्र करोनीया मुनी ध्यानस्थ बैसता ।
दैदिप्य अग्निच्या ऐसे कामदेवेहि पाहिले ।
मनात लक्षिले त्याने जिंकिणे या कठीणची ॥ २३ ॥
अप्सरा नाचल्या गान गंधर्वे छेडिल असे ।
मृदंग ढोल नी वीणा मधूर छेडिती तसे ॥ २४ ॥
पंचमुखी असा बाण कामाने वेधिला तदा ।
वसंत लोभ या भृत्यें केले चित्तास अस्थिर ॥ २५ ॥
[ पंचमुखी = शोषण, दीपन, संमोहन, तापन, उन्माद ]
पुंजिकस्थल नावाची अप्सरा चेंडु खेळली ।
स्तनभारें कटी मध्ये लचके मधुनीच ती ।
सवेचि वेणिची पुष्पे फ़ळली जमिनीस ती ॥ २६ ॥
नेत्राने तिरके पाही धावे चेंडुसवे कधी ।
कर्धनी तुटली तेणे फिटली साडि पूर्ण ती ॥ २७ ॥
युक्त ही पाहुनी वेळ कामाने बाण सोडिला ।
मुनिला जिंकितो वाटे परी निष्फळ जाहला ॥ २८ ॥
वसंत काम नी अन्य ऋषिंचे तेज पाहुनी ।
पळाले पळती जैसे सापां डिवचुनी मुले ॥ २९ ॥
इंद्राचे भृत्य येवोनी थोडाही न ढळे मुनी ।
अहंकार न त्या झाला संतां ना सर्व शक्य ते ॥ ३० ॥
देवेंद्रे पाहता काम निस्तेजचि ससैन्य तो ।
ब्रह्मर्षींच्या प्रभावाला ऐकता नवलावला ॥ ३१ ॥
धारणा तप स्वाध्याये ध्यान लावोनि चिंतनी ।
बैसता बोधिण्या आले नर नारायणो हरी ॥ ३२ ॥
( इंद्रवज्रा )
ते शुक्ल कृष्णो नवकंजनेत्री
     चतुर्भुजो वल्कल मृगचर्म ।
त्रिसूत्र कूशे बहु शोभले ते
     कमंडलू दंडहि एक साधा ॥ ३३ ॥
ती पद्ममाला करि कुंचि तैशी
     ब्रह्मादिकांच्या हुनि उंच दोघे ।
करांत वेदो तळपेहि तेज
     तपोचि झाले ज‍इ मूर्तिमंत ॥ ३४ ॥
( अनुष्टुप् )
पाहता भगवद्‌रूप नरनारायणो ऋषी ।
तदा ते उठए आणि दंडवत् नमिले तयां ॥ ३५ ॥
आनंदी डुंबला देह हृदयो शांत जाहले ।
आनंदे गळले अश्रु न शके पाहु पूर्णही ॥ ३६ ॥
उठोनी जोडिले हात झुकले पूर्ण त्या पुढे ।
न फुटे शब्द तो अन्य वदती ते नमो नमो ॥ ३७ ॥
आसने घालती त्यांना श्रद्धेने पाय धूतले ।
धूप चंदन मालांनी तयांना पूजिले असे ॥ ३८ ॥
द्वय ते आसनी स्वस्थ कृपेची दृष्टी टाकिती ।
मार्कंडेये नमोनीया पुढती स्तविले असे ॥ ३९ ॥
मार्कंडेय म्हणाले -
( वसंततिलका )
वर्णू कसा प्रभू तुझा महिमाच थोर
     ही स्पंदने नि मन वाणि तुझीच शक्ती ।
ब्रह्मादिका नि सकला हरि प्राण तूची
     तू मुक्त ते भजक बांधिति प्रेम भावे ॥ ४० ॥
हे दो तुपे हरि तुझे जगि सौख्य देण्या
     जिंकावयास मरणा तुम्हि घतलेले ।
घेता विवीध रुपडे जग रक्षिण्याला
     जै कीट जाल पसरी मिटवोनि घेई ॥ ४१ ॥
स्वामी जगास तुम्हि नी नियतेहि तैसे
     मी पादमद्म नमितो त्यजिण्यास क्लेश ।
मर्मज्ञ ते ऋषिमुनी नित ध्याति तूं ते
     पूजा नि वंदन नि ध्यान स्तवोनि तैसे ॥ ४२ ॥
जीवास ते चहुकडे भय दातलेले
     ब्रह्मादि भीति तुमच्या नित कालरूपा ।
नाही पदाहुनि दुजा कसला उपाय
     मोक्षस्वरूप तुम्हि तो अन शांति दाते ॥ ४३ ॥
तुम्ही समस्त जगता गुरुज्ञानरूपी
     त्यागोनि देह घत निष्फळ नाशवंत ।
आलो पदास शरेणी तुमच्या म्हणोनी
     जेणे अभिष्ट सगळे मिळते जगाला ॥ ४४ ॥
सत्त्वो रजो तम तसे तुमचेच बंध
     मायामयी स्थिति लयो उदयो नि हेतु ।
कीका करोनि सगळ्या तरि शांति देता
     ना तो तमीं नि रजि ते मुळि दुःख वाढे ॥ ४५ ॥
तेणेचि ते चतुरही भजती तुम्हाला
     नी पंचरात्रि भजता नितधाम लाभे ।
जे भोगयुक्त असुनी निजबोध ऐसे
     ना तो रजो नि तमही मुळि तेथ लिंपे ॥ ४६ ॥
शुद्धस्वरूप गुरु तू तुजला नमस्ते
     तू सर्व व्यापि सकला तुचि व्यापियेले ।
वेदादि वाणि तवची तव आधिनी ती
     नारायण नररुपा तुजला नमस्ते ॥ ४७ ॥
इंद्रीय प्रान वसशी तरी ती
     माया तुझीच फसवी अन तेज झाकी ।
तू जो गुरूचे जगता तुझिया कृपेने
     ते वेदज्ञान मिळते अन रूप लाभे ॥ ४८ ॥
वेदी रहस्य प्रगटे तव त्या रुपाचे
     ब्रह्मादि यत्‍नि पडता ग्रसतात मोही ।
जैसा स्वभाव धरिता रुप तैचि भासे
     वंदे तुला पुरुष तूचि विशुद्ध ज्ञानी ॥ ४९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ ८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP