समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ६ वा
परीक्षिताची परमगति, जनमेजयाचे सर्पसत्र निवेदांचा शास्त्राभेद -
सूत सांगतात -
( वसंततिलका )
हे पाहती सम शुको सगळ्या जिवांना
नी आत्मरूपि करिती अनुभाव सर्वां ।
हे ऐकिले नरपतें मन लाऊनीया
पायी झुकोनि कर जोडुनिया म्हणाला ॥ १ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
भगवन् करुणामूर्ती कृपेने बोलिले लिला ।
बोधाने तुमच्या आता धन्य मी जाहलो पहा ॥ २ ॥
ज्ञानशून्य असे प्राणी दुःखाने जळती किती ।
बोधिती त्यांजला संत न आश्चर्य स्वभाव तो ॥ ३ ॥
पुराणसंहिता सर्व मुखीची ऐकिली अम्ही ।
गुण नी हरिच्या लीला गाती ज्या संत कीर्तनी ॥ ४ ॥
भगवन् शांतीब्रह्मी मी आत्मा ब्रह्मसि पाहिले ।
भिती ना तक्षकादींची अभयी जाहलो पहा ॥ ५ ॥
आज्ञापा मजला ब्रह्मन् वाचा बंद करावया ।
होईन मुक्त मोहात जाईन श्रेष्ठ त्या पदीं ॥ ६ ॥
जाहले ज्ञान विज्ञान अज्ञान नष्टले असे ।
तुम्ही ते दाविले रूप हरीचे क्षेम थोर ते ॥ ७ ॥
सूत म्हणाले -
नृपती वदुनी ऐसे प्रेमाने पूजिता शुकां ।
निरोप घेउनी गेले भिक्षुंच्यासह तेथुनी ॥ ८ ॥
राजाने धारिले ध्यान धारिता अंतरी हरी ।
थांबला श्वास उच्छ्वास वृक्षाचे खोड ज्या परी ॥ ९ ॥
गंगातिरी कुशाचे ते पूर्वाभिमुख आसन ।
घातले त्यजिला मोह जाहले परब्रह्मची ॥ १० ॥
शृंगीचा शाप तो होता तसा तक्षक पातला ।
कश्यपे पाहिला येता राजाला दंशिण्या तदा ॥ ११ ॥
विषज्ञ् कश्यपा खूप तक्षके धन देउनी ।
लाविले परतोनीया स्वतः द्विजवेष तो ।
घेउनी पातला आणि राजाला दंश घेतला ॥ १२ ॥
ब्रह्मात स्थित तो होता दंशाच्या पूर्वि भूपती ।
सर्वांसमक्ष आता तो विषाने भस्म जाहला ॥ १३ ॥
हळाळल्या दिशा स्र्व आकाश पृथिवी तशी ।
देवता माणसे सर्व स्तिमीत जाहले तदा ॥ १४ ॥
झडल्या दुंदुभी स्वर्गी आपोआपचि त्या तदा ।
गंधर्व अप्सरा गाती देवांनी पुष्प वर्षिले ।
साधु साधु म्हणोनीया देवता त्या प्रशंसिती ॥ १५ ॥
पित्याला तक्षके दंश करिता जनमेजय ।
क्रोधला विधिने त्याने केलेसे सर्पसत्र ते ॥ १६ ॥
तक्शके पाहिले मोठे अग्नीत सर्व दग्धता ।
भयभीत तये होता इंद्रा शरण पातला ॥ १७ ॥
अनेक जळता सर्प तक्षको नच पातला ।
का न ये पापि तो सर्प पुसले जनमेजये ॥ १८ ॥
वदले द्विज ते राजा इंद्राने रक्षिले तया ।
म्हणोनी अग्निकुंडात नच तो पडला असे ॥ १९ ॥
बुद्धिमान् नृप तो वीर मोठाचि जनमेजय ।
ऋत्विजां वदला जाळा इंद्राच्या सह सर्प तो ॥ २० ॥
यज्ञकुंडी द्विजांनी तैं इंद्राच्या सह तक्षका ।
आआहिले त्वरे यावे पडावे यज्ञकुंडि या ॥ २१ ॥
मंत्रे आकर्षिता ऐसे इंद्राने पळ काढिला ।
विमानी घिरट्या घाली सर्पाच्या सह इंद्रही ॥ २२ ॥
बृहस्पती जधी पाही देवेंद्रा तक्षकासह ।
पडता यज्ञकुंडात तो वदे जनमेजया ॥ २३ ॥
तक्षका जाळणे युक्त नरेंद्रा नच ते तसे ।
पिला तो अमृता तेणे अजरामरची असे ॥ २४ ॥
राजा रे जगती प्राणी कर्माने गति पावती ।
कर्मा सोडोनि कोणीही सुख दुःख न दे शके ॥ २५ ॥
अग्निने सर्प चोराने रोग भूकें विजेंहि ते ।
कितेक मरती लोक निमित्त कर्म ते खरे ॥ २६ ॥
तू तो निरपराधी ते कितेक सर्प जाळिले ।
हिंसा या अभिचारात म्हणोनी बंद हे करी ।
जगीं सर्वचि ते प्राणी प्रारब्धे भोग भोगिती ॥ २७ ॥
सूत सांगतात -
महर्षि बोलता ऐसे सन्मानी जनमेजय ।
जी आज्ञा म्हणुनी त्याने पूजिले ते बृहस्पती ॥ २८ ॥
माया ती हरिची सारी शरीरा मोह तो पडे ।
देती नी भोगिती दुःख प्रयत्ने सुटका नसे ॥ २९ ॥
( इंद्रवज्रा )
दंभादि दाटे हरिचीच माया
चर्चेत ना ते प्रगटे स्वरूप ।
वादातितिओ ते परमात्मरूप
ते भेटल्याने मन शांत होते ॥ ३० ॥
सामग्रि कर्मे अन साध्य कर्म
ना ज्यां अहंकार न त्यास बाधा ।
जो चित्त लावी स्वरुपात नित्य
न बाध येता स्वरुपात डुंबे ॥ ३१ ॥
निषेध त्यागो नच होय ज्याचा
ते विष्णुचेची पद श्रेष्ठ जाणा ।
हे वेद नी संतचि बोलतात
ध्याताचि अंती पद थोर लाभे ॥ ३२ ॥
( अनुष्टुप् )
खरे हे विष्णुचे रूप तेच की परमोपद ।
अहंकार न ज्या थोर त्याला हे पद लाभते ।
मीपणा जगती थोर दुष्कृत्य हेच की खरे ॥ ३३ ॥
इच्छि जो सद्गती त्याने निंदा ती साहिने तसे ।
नको देहास ती माया प्राण्यांसी वैर ते नको ॥ ३४ ॥
कृष्णपदांबुजा ध्याता संहिता शिकलो असे ।
नमोनी त्यांजला आता पुराण संपवीतसे ॥ ३५ ॥
शौनकांनी विचारले -
वेदाचार्यचि पैलादी व्यासांचे शिष्य उत्तम ।
वेदांचे ते किती भाग केले त्यांनी कथा अम्हा ॥ ३६ ॥
ब्रह्म्याने पूर्वसृष्टीच्या ज्ञानार्थ ध्यान लाविता ।
हृदयाकाशि भागासी कळला तो अनाहत ॥ ३७ ॥
उपासिता तया नादा योग्यांचा मळ संपतो ।
त्रिताप संपुनी त्यांना मोक्षाची प्राप्ति होतसे ॥ ३८ ॥
त्रिमासयुक्त ओंकार प्रगटे शक्तिरूप हो ।
ॐकारा ब्रह्म हे नाम ब्रह्माचे रूप चिन्ह ते ॥ ३९ ॥
सरता ऐकणे शक्ति समाधी नी सुषुप्तिसी ।
हृदयी परमात्म्याच्या प्रगटे वेदरूपि तो ॥ ४० ॥
ओंकार परब्रह्माचे प्रत्यक्ष वाणिवाचक ।
ॐकार पूर्ण तो मंत्र श्रुतिबीज सनातन ॥ ४१ ॥
ययात तीन ते वर्ण सत्त्व रज तमो गुणी ।
ऋक् यजू साम हे तीन नाम त्याचेच की पहा ।
भूभुवः स्वः तिन्ही तैसे तिन्ही वृत्तीच भाव ते ॥ ४२ ॥
ओंकाराच्या मधोनीया अंतःस्थ ऊष्म नी स्वर ।
स्पर्श नी र्हस्व दीर्घो ते वर्णमालाचे होतसे ॥ ४३ ॥
वर्णमाला मुखामध्ये ऋत्वि जी चार कर्म नी ।
व्याहृती सह ते चार जन्मती वेद ते पहा ॥ ४४ ॥
मरिची आदि पुत्रांची ब्रह्म्याने बुद्धी पाहुनी ।
बोधिले वेद नी धर्म केले शिक्षण पूर्ण ते ॥ ४५ ॥
परंपरेत त्यांनी ते रक्षिले त्या धृतव्रते ।
सांप्रदायेचि चारी त्या द्वापारी ते विभागिले ॥ ४६ ॥
आयु शक्ति नि बुद्धी ती समये क्षीण होतसे ।
पाहिले ब्रह्मवेत्त्यांनी प्रेरिता ते विभागिले ॥ ४७ ॥
याही मन्वंतरा मध्ये ईशाने लोकरक्षणा ।
ब्रह्मादी लोकपालांनी प्रार्थिता जन्म घेतला ॥ ४८ ॥
पराशरो सत्यवती अंशाने व्यास जाहले ।
या युगी चार भागात त्यांनीच वेद भागिले ॥ ४९ ॥
मणि जै भिन्न जातीचे निवडावे स्वतम्त्र ते ।
तसेचि बुद्धिमान् व्यासे मंत्रसंग्रह साधुनी ॥ ५० ॥
ऋक् यजु सामवेदो नी अथर्व चार या अशा ।
संहिता करुनी शिष्या एकेका एक ती दिली ॥ ५१ ॥
पैलाला संहिता आद्य बह्वृचा ती दिली असे ।
वैशंपायन यांना ती निगद नावची दिली ॥ ५२ ॥
छंदौग जैमिनी यांना सामवेदी दिली असे ।
अथर्वाऽगिरसी नामे सुमंता दिधली पहा ॥ ५३ ॥
पैलाने आपुला वेद दोन भागात वाटिला ।
बाष्कला इंद्रप्रमिति दो शिष्या दिधली असे ॥ ५४ ॥
बाष्कले आपुली शाखा चार भागात भागिली ।
बोध नी याज्ञवल्क्यो नी अग्निमित्र पराशरा ।
दिधला एक एकाते भाग तो वेगळा तसा ॥ ५५ ॥
प्रमती या महाभागे मांडुकेयास ती दिली ।
सौभरी देवमित्रादी शिकले त्याजची पुढे ॥ ५६ ॥
शाकल्य मांडुका पुत्र तयाने पाच भाग ते ।
वात्स्य मुद्गल शालीया गोखल्य शिशिरो यया ।
प्रत्येका भाग ते एक दिधले शिष्य उत्तमा ॥ ५७ ॥
जातुकर्मण्य या शिष्ये आपुली संहिता दिली ।
निरुक्ताच्या सर्व भागे बलाक पैज वैतला ॥ ५८ ॥
बाष्कली बाष्कला पुत्र तयाने सर्व शाखिची ।
वालखिल्य अशी एक शाखा ती रचिली असे ।
भज्य बालायनी तैसे कासारे ती स्विकारिली ॥ ५९ ॥
बह्वृचा संहिता यांनी पूर्वोक्त घेतली असे ।
कथा विभाजनाची ही ऐकता पाप जष्टते ॥ ६० ॥
वैशंपायनचे कांही चरकार्ध्युहि शिष्य ते ।
क्षाळाया ब्रह्महत्या ती केले व्रत तयांनि ते ।
म्हणोनी नाम हे सर्वां चरकार्ध्युचि जाहले ॥ ६१ ॥
याज्ञवल्क्य दुजा शिष्य वदला गुरुसी अहो ।
न शक्ति चरकार्ध्युंची घोर मी तप साधितो ॥ ६२ ॥
क्रोधले गुरु ऐकोनी वदले गप्प हो पहा ।
द्विजद्वेषी नको शिष्य विद्या सोडोनि जाय तू ॥ ६३ ॥
देवरातसुते आज्ञा गुरुची पाळिली असे ।
ओकिली सर्व ती विद्या गेला ही निघुनी तदा ॥ ६४ ॥
ऋषिंनी पाहिली विद्या ओकिली यजुची अशी ।
तित्तरीरूप घेवोनी केली ग्रहण ती तये ।
तैतरीय अशी शाखा रमणीयचि जाहली ॥ ६५ ॥
चिंतिले याज्ञवल्क्याने न गुरूपासि ज्या श्रुती ।
मिळवीन अशा, तेंव्हा सूर्योपस्थान मांडिले ॥ ६६ ॥
याज्ञवल्क्य म्हणतात -
( भृंगनाद )
ॐ नमो भगवते आदित्या । तू सकल जगता
आत्मा नी कालरूपही । ब्रह्म्यापासुनि तृण
पर्यंते जरायुज, अंडज स्वेदज नी उद्भिज हे
चार प्रकारचे प्राणी, तयीं हृदयाकाशा व्यापिशी
नी उपाधी धर्मापासुनी असंग राहसी, असा
अद्वितीय भगवान् तूं । तूंचि क्षण, लव,
निमिषादि अवयव संघटित संवत्सराद्वारा नी
जल आकर्षण, विकर्षणे समस्तांचे चालविसि
जीवनो ॥ ६७ ॥
प्रभो तुम्ही समस्त देवतात श्रेष्ठची । ते
प्रतिदिनी वेदावधिने उपासिती, तयांचे पाप
दुःख बीजा तू जाळिसी । सूर्यदेवा तू सकल
सृष्टिचा मूलकारण, नी समस्त ऐश्वर्यस्वामिही ।
मी आपुल्या या तेजोमय मंडलाचे पूर्ण एकाग्रे
ध्यान करितसे ॥ ६८ ॥
तू तो सकलाचा आत्मा नी अंतर्यामिही ।
जगींचे सर्व प्राणी आपुलेचि आश्रित । तुम्हीही
तयांचे अचेतन मन, इंद्रिय नि प्राण प्रेरको ॥ ६९ ॥
लोक हे प्रतिदिनी अंधकार रूपी अजगरमुखी
अचेत पडती, जणु मुडदेचि ते । तुम्ही तो
करुणा रूपचि, म्हणोनि दृष्टि टाकिता सर्वां
सचेत करितसा नी कल्याण समयि धर्मासी
लाउनि अंतर्मुख करिता । जैसा राजा दुष्टाते
भयभीत करुनी आपुले राज्यां विचरतो, तसे
तुम्ही चोर जारादिका भयभीत करिता
विचरता ॥ ७० ॥
चहूकडे दिक्पाल जाग जागी आपुली
कमल कलिकेपरी अंजुलि जोडोनी
तुम्हा उपहार असमर्पिती ॥ ७१ ॥
भगवान् आपुले चरणद्वय गुरुसदृश महात्मे
वंदिती । मी आपुल्या चरण युगुलीं पातलो
की मजला यजुर्वेदाची ऐशी प्राप्ति हो की
जी कोणा ना लाभली ॥ ७२ ॥
सूतजी सांगतात -
( अनुष्टुप् )
स्तविता भगवान् ऐसा अश्वरूप धरोनिया ।
आले नी संहिता तैसी कृपेने दिधली असे ॥ ७३ ॥
पंधरा निर्मिल्या शाखा यजुर्वेदात त्या तये ।
प्रसिद्ध वाजसन्यो ती कण्वमाध्यांदिने स्विकृत् ॥ ७४ ॥
जैमिनीने सुमंतो या सुपुत्रा साम ती दिली ।
सुमंते पुत्र नी पौत्रा एकेक बोधिली असे ॥ ७५ ॥
सुकर्मा शिष्य तो त्यांचा हजार संहिता तये ।
निर्मिल्या सामवेदाच्या फांद्या वृषास ज्या तशा ॥ ७६ ॥
हिरण्यनाभ कौसल्यीं पौष्यं जी तिसरा पुढे ।
आवंत्य ब्रह्मवेत्त्याने शाखा त्या घेतल्या पहा ॥ ७७ ॥
तयांचे पाचशे शिष्य उत्तरेचे म्हणोनिया ।
औदित्त्य सामवेदी या नावाने बोलती तयां ।
प्राच्यही म्हणती कोणी शिकले एक एक ते ॥ ७८ ॥
लौगाक्षि मांगली कुल्य कुसीद कुक्षि शिष्य ते ।
प्रत्येके संहिता याची घेतली ती शतो शते ॥ ७९ ॥
कृते हिरण्यनाभाच्या शिष्याने शिकल्या पुढे ।
चोवीस संहिता त्यांच्या आवंत्ये उर्वरीत त्या ।
दिधल्या दोन शिष्यांना विसतार सामवेदहि हा ॥ ८० ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ ६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|