समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३४ वा

सुदर्शन आणिशंखचूडाचा उद्धार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
एकदा शिवरात्रीस नंदगोपादि उत्सुके ।
अंबिकावन यात्रेसी बैलगाड्यात पातले ॥ १ ॥
सरस्वती नदी मध्ये केले सर्वेचि स्नान तैः ।
पूजिली भक्तिने अंबा शिवहि विधिपूर्वक ॥ २ ॥
आदरे गायि सोने नी वस्त्र अन्नादि दान ते ।
द्विजांना दिधले श्रद्ध्ये शंकरो पावण्या तदा ॥ ३ ॥
त्या दिनी नंदबाबानी नी गोपांनी उपवासिले ।
सर्व ते जल पीवोनी झोपले नदिच्या तटी ॥ ४ ॥
अजगरो वनि त्या थोर भुकेला एक त्या तिथे ।
दैवाने पातला तेणे धरिले नंदाजीस की ॥ ५ ॥
तदा ओरडुनी नंद वदले कृष्ण कृष्ण रे ।
वाचवी संकटातून धाव हा गिळितो पहा ॥ ६ ॥
गेले घाबरुनी सारे नंदांना तो न सोडिता ।
जळत्या लाकडे त्याला गोप ते मारु लागले ॥ ७ ॥
ऐसेही मारिता त्याला तरीहि नच सोडि की ।
भक्तवत्सल तो कृष्ण येऊन पाय लाविता ॥ ८ ॥
भगवत्‌पद स्पर्शाने सर्पाचे पाप संपले ।
विद्याधरार्चितो रूप सुंदरो सर्प जाहला ॥ ९ ॥
दिव्यज्योती तया अंगी सोन्याचे हार ते गळा ।
कृष्णाला नमिले त्याने कृष्णाने पुसले तया ॥ १० ॥
कोण तू हे तुझ्या अंगी सौंदर्य पसरे कसे ।
निंदनीय अशी योनी मिळाली तुजला कशी ॥ ११ ॥
मी तो विद्याधरो नामे सुदर्शन नि लक्ष्मिवान् ।
सौंदर्य बहु ते माझे विमानी तैं फिरे सदा ॥ १२ ॥
कुरूप अंगिरा गोत्री तयां गर्वेचि हासलो ।
तयांनी शापिता सर्प योनी ही मज लाभली ॥ १३ ॥
अनुग्रहा मला त्यांनी कृपेने शापिले असे ।
जगद्‌गुरो तुझे पाय तेणेचि लाभले मला ॥ १४ ॥
नासले पाप ते सर्व करिशी भयमुक्त तू ।
मुक्त मी जाहलो स्पर्शे स्वलोका संमती मिळे ॥ १५ ॥
भक्तवत्सल तू योगी पातलो शरणार्थ मी ।
लोकलोकेश्वरो ईशा द्यावी आज्ञा मला तशी ॥ १६ ॥
ब्रह्मशापा मधोनीया स्पर्शाने मुक्त जाहलो ।
नाम ते ऐकता गाता पावित्र्य मिळते त्वरे ॥ १७ ॥
सुदर्शने असे कृष्णा स्तवोनी नमिलो पुन्हा ।
परीक्रमा करोनीया स्वलोकी पातला असे ।
संकटी या परी कृष्णे पित्याला सोडवीयले ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा )
कृष्णप्रभावा बघताच नंद
     स्तिमीत झाले मग गोप सारे ।
व्रतास तेथे करुनीहि पूर्ण
     ते गाता लीला व्रजि पातले की ॥ १९ ॥
( अनुष्टुप् )
एकदा रात्रिच्या वेळी गोविंद बलराम तो ।
गोपिकां सह ते गेले वना माजी विहारण्या ॥ २० ॥
भगवद्‌वस्त्र ते पीत बल ते नील नेसला ।
गंधीत उटि अंगाला गळीं माळा नि दागिने ।
राग दारीत गोपी त्या लीलाही गाउ लागल्या ॥ २१ ॥
सायंकाळ जशी झाली पडले चांदणे तसे ।
वेलीत गुंजती भृंग कौमुदी गंध दर्वळे ॥ २२ ॥
कृष्ण रामे मिळोनीया आलापिलाहि राग तो ।
तान ती ऐकुनी जीव आनंदे भरले पहा ॥ २३ ॥
गायने मोहिल्या गोपी न शुद्ध राहिली तयां ।
विस्कटे केश नी वस्त्र अवस्था जाहली अशी ॥ २४ ॥
तल्लीन गात ते तेंव्हा वना माजी विहारता ।
पातला शंखचूडॊ जो कुबेरीभृत्य यक्ष तो ॥ २५ ॥
दोघे बंधूच पाहोनी निःशंके गोपि घेउनी ।
पळाला, रडती ध्याती हरिशी गोपि तेधवा ॥ २६ ॥
चोर गायी जसा नेई तसा प्रीयेस नेइ हा ।
पाहता धावले दोघे ऐकता हाक ती तशी ॥ २७ ॥
शालवृक्ष करीं घेता न भ्यावे शब्द बोलले ।
वेगाने धावता गेले यक्षाला गाठिले असे ॥ २८ ॥
यक्षाने पाहिले दोघे कालमृत्यु असेचि ते ।
भिला नी सोडिल्या गोपी पळाला प्राणरक्षिण्या ॥ २९ ॥
बळीने रक्षिल्या स्त्रीया कृष्ण तो पाठिं धावला ।
चुडामणी शिरींचा तो काढण्या कृष्ण इच्छितो ॥ ३० ॥
थोडेसे पळता त्याचे चुडामणि सहीत ते ।
दुष्टचे तोडिले डोके हाताने पिरगाळुनी ॥ ३१ ॥
कृष्णाने मारिला ऐसा शंखचूड तसा मणी ।
सतेज घेउनी आला बळीला अर्पिला तदा ॥ ३२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौतिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP