समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १७ वा

कालियाची कालिया डोहात येण्याची कथा, व्रजवासींना दावानलातून वाचविणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
राजा परीक्षिताने विचारले -
रमणक् द्वीप नागांचे कालिये का त्यजीयले ।
अपराध गरूडाचा केला तो कोणता यये ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
तळी निश्चित वृक्षाच्या गरूडा रोज सर्प तो ।
खाण्यास द्यावया केले सर्व सर्पे मिळूनिया ॥ २ ॥
रक्षणार्थ असा होई आपुला भाग निश्चये ।
प्रत्येक त्या अमावास्यीं जमती भाग निश्चया ॥ ३ ॥
सर्पात पुत्र कद्रूचा कालिया माजला असे ।
न देता गरुडा भाग भक्षिले अन्य भाग ही ॥ ४ ॥
हरिभक्त गरूडाला चढला क्रोध ऐकता ।
मारण्या कालियासर्पा केले आक्रमणो तये ॥ ५ ॥
( इंद्रवज्रा )
तै वीषधारी बघता चढाई
     डंखावया तो शतशीर धावे ।
ते शस्त्र त्याचे अतिवीष दंत
     तेणेचि तो त्या डसला गरूडा ।
नेत्रे तसे लाल जिभाहि चाटी
     फुत्कारता तो भिववी जगाला ॥ ६ ॥
अतूलनीयो हरिवाहनो तो
     तो त्या शरीरे झटकोनि फेकी ।
क्रोधेचि झाडी बहुपंख ऐसे
     प्रहारिला तो मग सर्प तेणे ॥ ७ ॥
( अनुष्टुप् )
प्रहारे जखमी होता यमुनीं सर्प पातला ।
अगम्य खोल हा डोह न तेथे कोणि पोचतो ॥ ८ ॥
पूर्वी सौभरिने त्यासी आडवीताहि ये स्थळी ।
क्षुधातून गरूडाने एक मत्स्यास भक्षिले ॥ ९ ॥
मरता मत्स्यराजा तो मत्स्या व्याकूळ जाहल्या ।
सौभरीसी दया आली तये गरुड शापिला ॥ १० ॥
गरूडा तू पुन्हा येथे मत्स्याला भक्षिता पहा ।
तत्क्षणी मृत्यु पातेल सत्य सत्यचि बोलतो ॥ ११ ॥
महर्षी सौभरींचा हा शाप त्या कालिया विना ।
कुणाला नव्हता ठावा आता कृष्णेचि निर्भयो ।
करोनी कालिया याला रमणक् द्वीपि धाडिले ॥ १२ ॥
परीक्षित् इकडे कृष्ण दिव्य माला नि गंध ते ।
वस्त्र आभूषणे लेता कुंडा बाहेर पातला ॥ १३ ॥
तयांस पाहता सर्व सचेत उठले पुन्हा ।
गोपाळां दाटला मोद प्रेमाने धरिला उरी ॥ १४ ॥
यशोदा रोहिणी नंद गोपी गोपादि सर्व ते ।
उठले कृष्ण येताची फळले ते मनोरथ ॥ १५ ॥
प्रभाव राम तो जाणी भेटता हासु लागला ।
वासरे बैल नी गाई वृक्ष पर्वत हर्षले ॥ १६ ॥
सपत्‍न्य पातले विप्र नंदबाबास बोलले ।
सापाने सोडिले बाळा भाग्याची गोष्ट जाहली ॥ १७ ॥
मृत्यूच्या मुखिचा बाळ पातला दान ते करा ।
ऐकता हर्षले नंद सोने गायी द्विजां दिल्या ॥ १८ ॥
यशोदादेविने बाळा हृदयीं धरिले असे ।
वारंवार तिचे नेत्र आनंदे भरले पहा ॥ १९ ॥
राजेंद्रा गोप गाई त्या भुकेने थकल्या पहा ।
न व्रजात कुणी गेले थांबले यमुना तटी ॥ २० ॥
उन्हाने सुकले तृण रात्रीच आग लागली ।
घेरिले सर्व लोकांना जाळाया लागली पहा ॥ २१ ॥
चटके बसता सारे घाबर्‍या उठले तदा ।
कृष्णासी प्रार्थिती सारे लीलाधर हरीस या ॥ २२ ॥
कृष्णा कृष्णा महाभागा रामा अमित विक्रमा ।
पहा तो घोर हा अग्नी आम्हाला जाळु इच्छितो ॥ २३ ॥
सामर्थ्यवान तू तैसा आम्ही सर्व तुझे प्रिय ।
मृत्यूचे भय ना आम्हा परी पाया न सोडितो ॥ २४ ॥
अनंत शक्ति हा कृष्ण भगवान् जगदीश्वर ।
स्वजना दुःखि पाहोनी प्यालाही आग ती पहा ॥ २५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP