समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध सहावा - अध्याय ९ वा
विश्वरूपाचा वध, वृत्रासूर देवांना हरवतो, भगवंत देवतांना दधिची ऋषीकडे पाठवतात -
राजा परीक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्)
ऐकिले आम्हि ऐसे की विश्वरूपा शिरे त्रय ।
एके सोम दुजे दारू तिजाने अन्न खाइ हा ॥ १ ॥
पिता त्वष्टादि ते बारा तयांचे यज्ञि तो स्वरे ।
मोठ्याने म्हणुनी मंत्र विनये एदेव तुष्टवी ॥ २ ॥
पुन्हा तो लपवोनीया असुरा भाग देतसे ।
आजोळ असुरांचे त्या तोषण्या करि हा असे ॥ ३ ॥
देवेंद्रे पाहिले की हा देवांचा अपराधिची ।
धर्मासी कपटी हा तो म्हणोनी क्रोधला मनीं ।
इंद्रे खड्गे शिरे तीन त्याचे कापोनि टाकिले ॥ ४ ॥
चातको सोमपीतोंड गौरेय मुखमद्यपी ।
अन्नमुखशिराचा तो पक्षी तीतर जाहला ॥ ५ ॥
ब्रह्महत्त्ये मधोनीया इंद्र तो सुटुही शके ।
परी ना वर्षपर्यंत तयाने योजिले असे ॥
सर्वां समक्ष त्याने त्या दोषासी सम भागिले ।
पृथिवी जल स्त्री वृक्षा समान वाटुनी दिसले ॥ ६ ॥
परीक्षिता धरेने त्या बदली वर घेतला ।
खड्डे जे पडती भूसी बुजतील अनायसे ।
पडीक भूमि हा दोष ब्रह्महत्त्यारि घेउनी ॥ ७ ॥
चतुर्थ दुसरा भाग वृक्षांनी घेतला असे ।
वर तो घेतला हा की डिंक तो नित्य स्रावतो ॥ ८ ॥
स्त्रीयांनी वर तो हा की सदैव संग तो घडे ।
दोष हा घेतला त्यांनी मासीक स्राव हा घडे ॥ ९ ॥
झर्यात न हटे पाणी जळाने वर घेतला ।
फेस नी बुड्बुडे हाची इंद्राचा दोष घेतला ॥ १० ॥
विश्वरूपपिता त्वष्टा तेणे ही यज्ञ योजिला ।
वाढा रे इंद्र शत्रूनो मारावे त्यास सत्वरी ।
मंत्र हा म्हणता ऐसा आहुत्या देवु लागला ॥ ११ ॥
यज्ञ तो संपला तेंव्हा दक्षिणाग्नी मधूनि तो ।
विकराल जसा काळ प्रगटे दैत्यही तसा ॥ १२ ॥
डोंगरा परि तो झाला काळा नी जाड लठ्ठ ही ।
सायं ढगापरी रंग ज्वाळा अंगासि दाटल्या ।
परीक्षिता जसे बाण वाढती वाढला तसा ॥ १३ ॥
सूर्याच्या परि ते नेत्र केस जै ताम्रतंतुची ।
अग्नीने तापल्या लाल दाढी मूछ तशाच त्या ॥ १४ ॥
त्रिशूळ तीक्ष्ण तो हाती घेवोनी नाचता तदा ।
अंतरीक्ष धरी वाटे त्रिशूळावरि हा बळी ।
ओरडे खेळता तेंव्हा धरणीकंप होतसे ॥ १५ ॥
जांभया नित्य तो देई तदा मुख दरी परी ।
वाटे आकाश चालोनी जिव्हे नक्षत्र चाटितो ॥ १६ ॥
दाढेने हा तिन्ही लोक वाटला उपटील की ।
धावले भिउनी लोक रूप आक्राळ पाहुनी ॥ १७ ॥
त्वष्टापुत्र तमोगुणी घेरिता जाहला जग ।
वृत्रासुर तया नाम पडले क्रौर्य पाहुनी ॥ १८ ॥
मोठाले देव ते सर्व सैन्यासह तुटोनिया ।
शस्त्रास्त्र सोडिती दिव्य गिळी तो सर्व दैत्य ते ॥ १९ ॥
आश्चर्य वाटले देवां प्रभाव संपला तदा ।
उदास दीन ते झाले एकाग्रचित्त हौनी ।
भगवान आदिपुरुषा चरणी सर्व लागले ॥ २० ॥
देवतांनि प्रार्थिले -
(इंद्रवज्रा)
आकाश वायू जल पृथ्वि अग्नी
उत्पन्न यांनी तिन्हि लोक यांचा ।
अधीप ब्रह्मा अन आम्हि सर्व
त्या कालदेवीं भयभीत आहो ।
अर्पीत त्यासी पुजनात भेटीं
रक्षो अम्हा तो हरि संकटी या ॥ २१ ॥
प्रभो तुम्हा ना नव कांहि विश्वीं
न हो तुम्ही विस्मित कांहि होता ।
तू पूर्णकामी सम शांत नित्य
जो सोडि पाया तव मूर्ख तोची ॥ २२ ॥
वैवस्वतो पूर्वकल्पांत वेळी
प्रचंड सिंगासचि नाव घेता ।
रक्षीयली संकटि ही धरा नी
या संकटीही मुचि रक्षिता रे ॥ २३ ॥
पूर्वी जधी वादळ घोर येता
पद्मा मधोनी पडताच ब्रह्मा ।
विशाल पाण्यामधुनी तदा तू
रक्षीयले आज आम्हाहि रक्षी ॥ २४ ॥
त्या एक ईशे रचिले स्व माये
आम्हा नि आम्ही प्रभूच्या कृपेने ।
ही चालवीतो मग सृष्टि सर्व
गर्वे न आम्ही नच पाहु त्यासी ॥ २५ ॥
शत्रू कडोनी जरि पीडिलो हो
हा निर्विकारी बघतोय नेत्रे ।
माया स्व योगे अवतीर्ण होतो
आम्हासि रक्षी युग यूग त्राता ॥ २६ ॥
सर्वात्म तो एकचि देव आहे
पुरुष तोची रचितोय सृष्टी ।
तो विश्वरूपी अन वेगळाही
त्यावत्सलाच्या पदि आम्हि आलो ।
पुत्रास आम्हा प्रभु तो उदार
कल्याणकारी करि सर्व नक्की ॥ २७ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
(अनुष्टुप्)
महाराजा ! जधी देवे प्रार्थिता भगवान् असा ।
शंख चक्र गदाधारी दिसला पश्चिमेकडे ॥ २८ ॥
कमळा परि ती दृष्टी सपार्षदहि पातला ।
कौस्तुभो शोभला कंठी श्रीवत्स चिन्हही तसे ॥ २९ ॥
पाहता देवतांनी तो आनंदे विव्हळोनिया ।
साष्टांग नमिले त्याला उठोनी बोलले स्तुती ॥ ३० ॥
देवता म्हणाल्या -
नमस्ते यज्ञशक्ती तू शत्रुघ्ना तुजला अमो ।
नमस्ते चक्रहस्तासी अनंत नाम तू नमो ॥ ३१ ॥
त्रिधात्या ! गति तू देसी रजादी गुण लक्षुनी ।
अगम्य तव हे कार्य प्राणी कोणी न जाणिती ॥ ३२ ॥
(भृंगनाद)
ॐ नमो तुज नारायणा, भगवंता वासुदेवा तू
आदीपुरुष ! असीम महिमा तुझी ! तू परम
मंगल, परम कल्याण स्वरूप, परम दयाळू
तसा । एकटा जगदाधार नी जगत् स्वामी ही
एकटा । तू सर्वेश्वर तू मृदुता नी सौंदर्य देवता
लक्ष्मीचा पती । प्रभो परमहंस परिव्राजक
महात्मे आत्मसंयमे आपणा चिंतिती, तदा
तयांच्या हृदयीं खर्या भजनाचा उदय हो । नी
तयांच्या हृदयाचे अज्ञानरूप कवाद उघडे ।
आम्ही आपणा सदैव नमितो ॥ ३३ ॥
भगवन् ! आपुली लीला नी रहस्य जाणणे बहू
कठिण, तू स्वयं निर्विकार असुनी स्वयं सगुण
जगता रक्षिसी नी तस संहारिसी ॥ ३४ ॥
भगवन् न जाणितो आम्ही की देवदत्तादी
व्यक्तीसमान गुनी प्रगटसी नी भल्या कर्मा
भोगिसी, आत्माराम तू, शांत नी उदास तू,
साक्षिमान् राहसी, सर्व कांही पाहसी ॥ ३५ ॥
आम्ही तो मानितो की या दो रुपी न भेद कांही ।
तू स्वयं भगवान् । तू अनंत गुणि असुनी
शक्तिमान । कोणी विकल्प, विचार, तर्क नी
खोट्या प्रमाणाचे, कुतर्क शास्त्राचे अध्ययन
करुनी स्वहृदय मळविती ते दुराग्रहीचि होती ।
तयांच्या वाद-विवादी ध्यान देण्या न तुला
अवसरही । तू परा, तू माया लपविसी तदा काय
ते अशक्य ? तू कर्ता नी भोक्ताही, नी संतासम
उदासही । तू न भोक्ता उदासही । तू दोहों पासुनी
विलक्षण नी अनिर्वचनीय ही ॥ ३६ ॥
जशी अंधारी दोरी एकची एका सर्प, दुजा माला
नी अन्यां धारा गमे, तसेचि भ्रांतियां तू कर्ता
भोक्तादीरूपी दिससी परी ज्ञानियां सच्चिदानंदचि
अससी, तू बुद्धीनुसार गमसी ॥ ३७ ॥
विचारे पाहता तू सर्व वस्तूसी अंतरात्मा,
सर्वांचा स्वामीही तूचि, ब्रह्मा नी प्रकृतीचा
कारण, तू अंतरात्मा, जेणे जगत् गुणदोषाते
प्रतित, तू प्रचीतीचा अधिष्ठाता, नी श्रृतिंनी
समस्तां निषेधिता शेष तू ॥ ३८ ॥
मधुसूदना ! तव अमृतमयी महिमा थोर
सागराहुनी ! तयातिल कण ही सेविता एकदा
मरमानंदस्रोत मिळे । तयाचे कारणे जगती विषय
भोग लेशमात्र ते प्रतित, परलोक सुख कथिले
नी तेणे सर्वांसी चुकविले, तू समस्त प्राणिया
प्रियतम, हितैषी, सुहृद नी सर्वात्मा, तू ऐश्वर्य
निधी, तुझ्यासी जे लाविती चित्ता ते सुख
लुटिती, ते अनन्यप्रेमी भक्तजन आपुल्या स्वार्था
नी परमार्था निपुण । मधुसूदना ! तुझे ते प्रियजन
कसे त्यजितील पदा, जयाने जन्म, मृत्यु
सम्सारचक्रापासुनी मिळे सुटका ॥ ३९ ॥
प्रभो तू त्रिलोकात्मा नी आश्रय । तू तव त्रिपदे
जगां व्यापिला नी तू त्रिलोक संचालक ।
आपुली महिमा त्रिलोकाचे मन हरी । न संशयो
की दैत्य दानव ही विभूती तुझ्या । तरी ही हा
समय न त्यांच्या प्रगतिचा, हा विचार करुनी तू
योगमाये देवता मनुष्य पशू नृसिंह आदी मिश्रित
नी मत्स्यादी जलचर रूप प्रगटसी । नी
अपराधरूपे तयां दंडिसी । दंडधारी प्रभो ! वाटले
तरचि तू त्या असुरासम वृत्रासुरास नष्टी ॥ ४० ॥
भगवन् ! पिता तू पितामह नी सर्वचि तू । आम्ही
तुझे निजजन नी सदैव तुज नमितो । ध्याता
चरणकमल तुझे आमुचे हृदय त्या प्रेमबंधनी
गुंतले । आपण आपुल्या दिव्य गुणे आम्हासी
केले आपुले । म्हणूनी प्रभो ! प्रार्थितो, की
आपण आपुल्या दयार्द्र शुद्ध सुंदर नी शीतल
हास्ययुक्त दृष्टीने तया आपुल्या मुखारविंदा
पासुनी तपकत्या मनोहर वाणीरूप सुधा
बिंदूंनी आमुच्या हृदयाच्या तापा शांत करणे,
नी आमुच्या हृदयाची आग विझविणे ॥ ४१ ॥
प्रभो ! अग्नीची ठिणगी अग्नीसी प्र्काशित
करण्या न समर्थ ! तसे आम्ही आमुच्या स्वार्था
नी परमार्था विषद करण्या असमर्थ काय
सांगणे आपणा आपणचि निर्माता, पोषिता
ही हरिताही तथा समस्त जीवांच्या अंतरी
विराजता ! तुम्ही सर्ववृत्तीचे साक्षी । नी
प्रकाशापरी सर्वगत नी निर्लेप । तुम्ही स्वयं
परमात्मा ॥ ४२ ॥
म्हणोनी हे निवेदितो, तरी न उपेक्षिता आमुची
पूर्ण करणे ही अभिलाषा । तुम्ही अचिंत्य;
ऐश्वर्य संपन्न नी जगद्गुरु । आम्ही आलो
आपुल्या पदछत्राश्रयीं, जयाने जन्म-मृत्यू
संसारी भटकता श्रमाचा हो परिहार ॥ ४३ ॥
(अनुष्टुप्)
शस्त्रास्त्र गिळिले सर्व त्या वृत्रासुर राक्षसे ।
त्रिलोक गिळु तो पाही कृष्णा ते मारि तू तयां ॥ ४४ ॥
(वसंततिलका)
श्रीकृष्णहंस वससी हृदयात सर्वां
तू कीर्तिमंत नि अनंत अनादि साक्षी ।
जे संत धुंडित तुला तुजपासि येती
तू मुक्त त्या करितसे तुजला नमस्ते ॥ ४५ ॥
(अनुष्टुप्)
परीक्षिता ! जधी ऐसी देवांनी स्तुति गायिली ।
प्रसन्न जाहला तेणे भगवान् बोलला तयां ॥ ४६ ॥
श्रीभगवान् म्हणाले -
ज्ञानाने स्तुति गावोनी तुम्ही मज प्रसन्निले ।
स्तुतीने आठवे मी नी मन भक्ति हि लाभते ॥ ४७ ॥
देवांनो ! पावलो मी तो कधी कांही न दुर्लभ ।
परी जे प्रिय ते भक्त इच्छिती मम रूपची ॥ ४८ ॥
जगा जो मानितो सत्य तेणे ना हित जाणिले ।
जरी हे कळुनी मागे अज्ञान तेच त्याचिये ॥ ४९ ॥
जाणी तो मुक्तिचे रूप तो कर्म नच दाखवी ।
रोग्यासी रुचते अन्न कुपथ्य वैद्य ना वदे ॥ ५० ॥
शुभं भवतु देवेंद्रा आता ना वेळ लाववी ।
दधीची ऋषिसी मागा तयाची दृढ ती तनू ॥ ५१ ॥
अश्वशिर असे नाम ब्रह्मज्ञानी तपी असा ।
अश्विनीकुमरे त्याच्या ज्ञानाने मुक्ति मेळिली ॥ ५२ ॥
प्रथम या दधीचीने त्वष्टाला वर्म जे दिले ।
विश्वरूपासे त्वष्टाने विश्वरूपे तुम्हा दिले ।
अभेद्य कवचा जाणी अथर्वी दधिची ऋषी ॥ ५३ ॥
मागता कुम्नरे देह देईल दधिचीहि तो ।
विश्वकर्मा कडोनीया अस्थिंचे शस्त्र योजिणे ।
मम शक्ती तिथे योजा वृत्रासुर मरेल तै ॥ ५४ ॥
मरता तो तुम्हा तेज द्रव्य संपत्ति येइ की ।
ममभक्ता नसे चिंता कल्याण तुमचे असो ॥ ५५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ ६ ॥ ९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|