समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ३२ वा
धूममार्ग अर्चिरादि मार्गाने जाणार्यांची गति, भक्तियोगाच्या श्रेष्ठतेचे माहात्म्य -
भगवान कपिलदेव म्हणाले -
( अनुष्टुप् )
माते जो घरि राहोनी सकाम भाव योजुनी ।
फळ जे कामअर्थी ते भोगितो नि अनुष्ठितो ॥ १ ॥
विन्मूख भगवद्धर्मी राहोनी यज्ञही करी ।
श्रद्धेने देवता आणि पितरासीच पूजितो ॥ २ ॥
त्याची बुद्धी तशा श्रद्धे देव पित्रां उपासिते ।
तो जातो चंद्रलोकात सोम पीऊनि ये पुन्हा ॥ ३ ॥
प्रलयी शेषशायीत गृहस्थाश्रमिया तदा ।
लाभला जरि तो लोक लीन होणेचि लागते ॥ ४ ॥
विवेकी धर्म अर्थाला विलासीं नच घेतसे ।
परी त्या भगवंताच्या प्रसन्ने योजितो तसा ॥ ५ ॥
निवृत्त धर्मपाळी जो अहंता गर्व सोडुनी ।
स्वधर्मरुप सत्वाने शुद्ध चित्तचि पावतो ॥ ६ ॥
अंती जो सूर्यमार्गाने मिळतो पूर्ण पूरुषा ।
नियंता निर्मिता त्राता संहार करि त्याजला ॥ ७ ॥
परमात्म रुपे सेवी हिरण्यगर्भरुप जो ।
राही तो सत्यलोकात द्विपरार्ध निवांतची ॥ ८ ॥
(वसंततिलका )
भोगोनि आयु अपुली मग ब्रह्मजी तो
भूतेंद्रियो विषयऽहंकर आदि सर्व ।
संहारण्या जधि मनी करि निश्चयाते
तै त्रैगुणाप्रकृतिने हरिलीन होतो ॥ ९ ॥
जे जिंकिती मुनि मना तनु त्यागुनीया
ब्रह्मामध्येच शिरती परमात्मरुपी ।
होण्यास लीन पुरुषीं भगवंतरुपी
गर्वो असे म्हणुनि सद्य न होत लीन ॥ १० ॥
( अनुष्टुप् )
माताजी म्हणुनी तुम्ही अत्यंत भक्तियुक्त त्या ।
श्रीहरीशरणीं जावे सर्वांच्या ह्रदि तो वसे ॥ ११ ॥
वेदगर्भ असा ब्रह्मा मरीची आदि ते ऋषी ।
योगी नी सनकादीक सिद्ध निष्कामकर्मि जे ॥ १२ ॥
कर्माने भजती आदी पुरुष गुण ब्रह्म ते ।
पावती भेददृष्टीने कर्तृत्व गर्व कारणे ॥ १३ ॥
सर्गकाल पुन्हा येता काळाच्या प्रेरणा गुणीं ।
क्षोभ होवोनि काळाचा येती या लोकि जन्मुनी ॥ १४ ॥
ब्रह्मलोकास भोगोनी पूर्वोक्त ऋषि सर्व ते ।
हरीच्छेने गुणी क्षोभ होता या लोकि पावती ॥ १५ ॥
श्रद्धेने करि जो कर्म आसक्त येथे राहुनी ।
काम्य नी नित्यकर्मांना सांगोपांग अनुष्ठिती ॥ १६ ॥
आधिक्ये रजवृत्तीच्या त्याची बुद्धीहि थांबते ।
ह्रदयी पसरे मोह पितरे नित्य पूजितो ॥ १७ ॥
धर्मार्थ काम आसक्त अत्यंत कीर्तनीय त्या ।
श्रीहरी भगवंताच्या कथेसी मुकतो पहा ॥ १८ ॥
हाय सूकर कुत्र्यास आवडे भोज नर्क तो ।
तसा हा सोडुनी वार्ता सेवी विषय निंद्य ते ॥
मोठे दुर्भाग्य त्याचे ते देवाने मारिले तया ॥ १९ ॥
दक्षीणमार्गि जे जाती पितृलोकात पावती ।
फिरुनी आपुल्या वंशी जन्मती धूममार्गिते ॥ २० ॥
माते! ते पितृलोकात भोगाने पुण्य क्षेय तो ।
होताचि देवता त्याला लोटिती पृथिवीस की ॥ २१ ॥
तेंव्हा तू सर्वभावाने भजावे चरणांबुजा ।
भगवान् आश्रयो देतो सर्वांगे भज तू तया ॥ २२ ॥
भगवान् वासुदेवाचा भक्तियोग प्रयोजिता ।
त्वरीत होय वैराग्य साक्षात्कारचि होतसे ॥ २३ ॥
विषयो भगवद्रूप होतात सर्व सारिखे ।
म्हणोनी इंद्रिया द्वारा भक्त तो गुंतु ना शके ॥ २४ ॥
स्वीकार त्याग नी तैसे गुण-दोषविहीन तो ।
आत्म्यासी बघतो ब्रह्मसाक्षात्कार स्थितीमुळे ॥ २५ ॥
परमात्मा परब्रह्म ज्ञानरुपचि तो असे ।
पुरुषैश्वर भगवान् स्वयं जीव शरीर ही ॥
इंद्रियादी रुपी भासे श्रीमद्भक्तीपरायण ॥ २६ ॥
संसारी संपता आशा त्याला सर्वचि योग नी ।
योगाचे फळ ते सारे अभीष्ट प्राप्त जाहले ॥ २७ ॥
निर्गुण ज्ञानरुपी जे ब्रह्म ते एकटे असे ।
इंद्रीय वृत्तिने भ्रांत विभिन्न वस्तु भासते ॥ २८ ॥
परब्रह्म महत्तत्वे वैकारे पंचभूति ते ।
इंद्रीयरुप ते होता जीव त्यालाचि बोधिती ॥
जीवाची तनु ब्रह्मांड ब्रह्मरुपचि सानुले ॥ २९ ॥
श्रद्धा भक्ती नि वैराग्य योगाने चित्त योजिता ।
असंग बुद्धि ठेवी त्यां दिसते ब्रह्मरुप हे ॥ ३० ॥
वंदनीय तुला माते ज्ञानसाधन बोललो ।
ब्रह्मदर्शन ज्यां होई पुरुष बोध होत तै ॥ ३१ ॥
देवी निर्गुण तो योग नी भक्तीफळ सारखे ।
साधितो त्यासि मानावा भगवान् पृथिवीवरी ॥ ३२ ॥
पदार्थ एकची होतो भिन्नत्व इंद्रिया गमे ।
तसे विभिन्न शास्त्राने भगवद्रूप जाणवे ॥ ३३ ॥
विभिन्न कर्म ते सारे यज्ञ दान तसे तप ।
मिमांसा वेदपाठो नी मन इंद्रिय संयम ॥ ३४ ॥
त्याग योग तसी भक्ती वृत्ती प्रवृत्ति आणि ते ।
निष्कामी नी सकामी हे दोन्हीही धर्म सारिखे ॥ ३५ ॥
सर्व या साधनां द्वारे सगुणी निर्गुणी रुपा ।
स्वयंप्रकाश भगवान् प्राप्त्यर्थ योजिले असे ॥ ३६ ॥
सत्व रज तमो तैशी निर्गुणी चार भक्ति या ।
जीवाची गति नी हेतू नकळे तोच काळ की ॥ ३७ ॥
अविद्या कर्म देवी! जे तयाच्या बहुही गती ।
मिळती गति त्या तैशा स्वरुपा जाणु ना शके ॥ ३८ ॥
तुला मी दिधले ज्ञान दुष्ट गर्व्या न बोधिणे ।
उद्धटा ताठरा दंभ्या दुराचार्या न सांगणे ॥ ३९ ॥
विषयी नी गृहासक्त अभक्त भक्तद्वेषि जो ।
तयासी कधि हे गुह्य न सांगावेचि सर्वथा ॥ ४० ॥
विनयी भक्त श्रद्धाळू निर्द्वेषी जगमित्र जो ।
अनासक्त गुरुभक्त शांत मत्सरशून्य जो ॥ ४१ ॥
चित्ताने विमळो आणि प्रीती ईशासि बांधि जो ।
अवश्य त्याजला सांगा सर्वची उपदेश हा ॥ ४२ ॥
माते! माझ्यात चित्ताला श्रद्धेने लावितो तसा ।
वारंवार कथा ऐके त्यांना कैवल्य लाभते ॥ ४३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बत्तिसावा अध्याय हा ॥ ३ ॥ ३२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|