समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ३१ वा

मनुष्ययोनि प्राप्त झालेल्या जीवांचे वर्णन -

भगवान कपिलदेव म्हणाले -
( अनुष्टुप्‌ )
पूर्व कर्मानुसाराने ईशाच्या प्रेरणे मुळे ।
पुरुषवीर्य बीजाने स्त्री देहात प्रवेशतो ॥ १ ॥
खल तो एक रात्रीत पाच रात्रीत बुड्‌बुडा ।
बोरापरी दहारात्रीं पेश्यंड रुप होतसे ॥ २ ॥
मासात शिर उत्पन्न द्वीमासी हात पाय ते ।
त्रिमासी नख नी रोम अस्थी लिंग नि छिद्रही ॥ ३ ॥
चौमासी सप्तही धातू भूक तृष्णादि पंचमी ।
षण्मासी वेष्ठिला जातो फिरे डाव्या कुशीत तो ॥ ४ ॥
माता जे खातसे अन्न तेणे धातूहि वाढती ।
कृमीं जंतू मल मुत्रीं लोळतो निंद्य स्थानि तो ॥ ५ ॥
कोवळ्या शरिरा त्याच्या चावती कृमि कीटके ।
क्षणोक्षणीहि क्लेशाने अचेत हो‌उनी पडे ॥ ६ ॥
तीक्ष्ण खारट नी उष्ण शुष्क आंबट जेवणी ।
माता जे सेविते अन्न तेणे पीडीत होतसे ॥ ७ ॥
वेष्टने वेष्टिला ऐसा घेरतो आतड्याही ।
लोळे पोटी वळे आणि कुंडलाकर भासतो ॥ ८ ॥
पंजरी बंद जै पक्षी तसा तोही पराधिन ।
अदृष्टे स्मरतो पूर्व शेकडो जन्म कर्मही ।
कोंदाटे श्वासही सर्व कैसी शांती तिथे मिळे ॥ ९ ॥
सप्तमासात उन्मेष पावतो ज्ञानशक्तिचा ।
प्रसूति वायुने हाले विष्ठीं ना स्थिर राहतो ॥ १० ॥
बांधिता सप्तधातूंनी भोगिता गर्भवास तो ।
भयाने जोडुनी हात प्रभूची याचना करी ॥ ११ ॥
जीव म्हणतो -
(वसंततिलका )
आहे बहु अधम मी मज योग्य शिक्षा
    केली असेचि प्रभुने बहुरुपि तो तो ।
हे नश्वरी जगत त्या करण्यास रक्षा
    तो भूतळी विचरतो नमि त्या पदा मी ॥ १२ ॥
मातेचिया उदरि इंद्रिय देह माया
    घेवोनि आश्रय इथे बहु पाप पुण्ये ।
बंदिस्त कर्मि पडलो, ह्रदयी प्रतीत
    होतो अखंड मज तो नमितो तया मी ॥ १३ ॥
मी देहहीन परि बद्धचि पंचभूते
    तेणेचि इंद्रिय गुणी अन शब्दभास ।
जाणू शके जरिहि वेष्टित मी महीमा
    वंदी परं प्रकृति-पुरुष त्यानियंत्या ॥ १४ ॥
मायेमुळेचि स्वरुपी स्मृति नष्ट होते
    सत्वादि गूण अन कर्म ययात बद्ध ।
होतो नि कष्ट उठवी फिरतो सदाचा
    युक्ती नसे हरिकृपे विण रुप पाह्या ॥ १५ ॥
त्रीकालज्ञान मज जे हरि तोचि देइ
    तो अंतरात वसतोच चरांचरांच्या ।
तेणेचि जीव स्वरुपी निज कर्म वर्ते
    शांत्यर्थ ताप भजतो पद श्रीहरीचे ॥ १६ ॥
मातेचिया उदरि देह मळात न्हातो
    तापे शरीर जठराग्नि रुधीरकूपीं ।
मुक्ति इथून भगवान्‌ मनिं मागतो मी
तेणेचि मास मनिं मोजित मी राहतो ॥ १७ ॥
स्वामी ! दयाळु असमी दशमास मध्ये
    उत्कृष्ट ज्ञान मजला तवची कृपाही ।
संतुष्ट तूं म्हणुनि हा उपकार केला
    संसारि पक्षि पशु ते सुख दुःख घेती
    मी तो तुझ्याचि कृपये शम दम जाणी ।
जी तूचि ही दिधलिसे मज बुद्धि, मी तो
    जाणी समक्ष तुज आत नि बाह्य देवा ॥ १९ ॥
गर्भात दुःख गमते बहुही परी त्या
    संसार कूप तम तो नच इच्छितो मी ।
कां की तिथेचि रिघता तव घेरि माया
    होतो अहं नि पडतो भवसागरात ॥ २० ॥
सोडीन खेद मनिचा ह्रदयात पाय
    श्री विष्णुचे करिन स्थापित त्याच योगे ।
शीघ्रेचि मी करिन पार भवास आणि
    भीती मुळी नच पुन्हा भवसागाची ॥ २१ ॥
भगवान्‌ कपिलदेव सांगतात- ( अनुष्टुप्‌ )
माते तो दश मासाचा विवेके गर्भ प्रार्थितो ।
अधोमुख अशा बाळा वायू बाहेर काढितो ॥ २२ ॥
दाबाने रड ते बाळ कष्टाने जन्म घेतसे ।
रोधितो श्वास नी तेंव्हा पूर्वस्मृती गमावतो ॥ २३ ॥
वळ्‌वळे रक्तमूत्रात विष्ठेच्या कीटकापरी ।
गर्भीचे ज्ञान नष्टोनी गतीनें रडतो पुन्हा ॥ २४ ॥
त्याचे ते मन ना कोणा कळते पोषितो तया ।
उलटा घडतो हेतू निषेधा शक्ति कोठली ॥ २५ ॥
मळक्या घाण शय्येसी बाळाला टाकिती जिथे ।
स्वेदजो ढेकणादींच्या चाव्याने कष्ट पावतो ॥ २६ ॥
कोवळी कातडी त्याची डास ढेकूण तोडिती ।
हारपे गर्भिचे ज्ञान रडणें फक्त ते उरे ॥ २७ ॥
बाल पौगंड दुःखात वाढे तरुण होतसे ।
इच्छिला भोग ना प्राप्त तै क्रोधे दुःख पावतो ॥ २८ ॥
गर्व क्रोध चढे अंगी कामासी वश पावतो ।
स्वनाशार्थ दुजा कामी अज्ञाने वैर साधतो ॥ २९ ॥
पंचभूतात्म देहाचा असत्य बुद्धिवादि तो ।
मिथ्या अभिनिवेशाने मी माझे गर्वही करी ॥ ३० ॥
वृद्धत्वी कष्टतो देह अविद्या कर्मबद्ध जो ।
मानितो आपुले सर्व भवाच्या चक्रि तो पडे ॥ ३१ ॥
सन्मार्गे चालता त्याचा जिव्हा वाजननेंद्रियी ।
भोगात रमती त्यांशी समागमहि होतसे ॥
अनुगमे तसा तोही पुनश्च नरकी पडे ॥ ३२ ॥
सत्यशौच दया मौन धन लज्जा क्षमा यश ।
बुद्धि संयम ऐश्वर्य सद्‌गुणो सर्व नष्टती ॥ ३३ ॥
शोचनीय रमे स्त्रीसी अशांत तनु गर्वि जो ।
खोट्या ऐशा पुरुषाचासंग केव्हाहि ना घडो ॥ ३४ ॥
स्त्रियांचा संग तो बाधे स्त्रैणांचाही तसाच तो ।
त्यागिता संग ना बाधी मोह दुष्यकर्म वागण्या ॥ ३५ ॥
पुत्रीचे रुप पाहोनी ब्रह्माही मोह पावला ।
हरिणीरुप घेवोनी धावली पुत्रि तेधवा ॥
निर्लज्य मृग रुपाने धावला पाठिशी तिच्या ॥ ३६ ॥
त्यानेचि मरिची आदी मरिच्ये कश्यपादिका
देव मानव सृष्टीही कश्यमे निर्मिली तदा ।
ऋषिप्रवर विष्णू तो सोडिता कोणता नर
जयासी बुद्धि स्त्री रुपी मोहवू न शके कधी ॥ ३७ ॥
अहो स्त्री रुपिणी मायाबळ माझे कसे पहा ।
तुडवी भ्रुकटीमात्रे दिग्वीजयिहि वीर ते ॥ ३८ ॥
( इंद्रवज्रा )
जो योगि इच्छी पदि श्रेष्ठ जाण्या
    आत्मा-अनात्माचि विवेक होता ।
स्त्री संग त्याने कधि ना करावा
    ते नारकीद्वार तशा नराला ॥ ३९ ॥
सेवादी रुप घेवोनी मायास्त्री रुपिणी हळू ।
ढकली झाकल्या कूपीं मृत्यु प्रत्यक्ष मानणे ॥ ४० ॥
आसक्त राहता स्त्रीसी मृत्युच्या वेळि चिंतिता ।
मिळते योनि ती स्त्रीची धन गेह नि पुत्र दे ॥ ४१ ॥
मानिते पति तो नित्य दुसरा जीव पूरुष ।
व्याधगाणे फसे पक्षी तसा तो नष्ट पावतो ॥ ४२ ॥
देवी जीव उपाधीच्या लिंग देहे पुरुष तो।
मेळवी दुसरा लोक प्रारब्ध कर्म भोगतो ॥
मेळिण्या दुसरा देह नित्य तो कर्म आचरी ॥ ४३ ॥
लिंगदेह उपाधीन मोक्षापर्यंत राहतो ।
भूत इंद्रिय नी चित्त स्थूलरुप शरीर ते ॥
भोगाधिष्ठानची त्याचे मेळुनी कार्य साधिती ।
तेंव्हा जन्म तया होतो तुटता मृत्यु तो घडे॥ ४४ ॥
भोगणे भोग्य वस्तूसी अयोग्य ठरता मरे ।
स्थूलाच्या अभिमानाने पाहता जन्म होतसे ॥ ४५ ॥
अंधूक दृष्टि होताची नेत्राने पाहु ना शके ।
दृष्टि नी इंद्रिये दोन्ही साक्षी जीवास त्यागिती ॥ ४६ ॥
म्हणुनी संतदेहाला मृत्यु भय नि दीनता ।
नसावी, जाणणे रुप धैर्याने संगवर्जित ॥ ४७ ॥
संसारी योग वैराग्य युक्त संम्यक्‌ नि ज्ञानची ।
बुद्धिने शरिरा दूर ठेवोनि संग तोडणे ॥ ४८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकतिसावा अध्याय हा ॥ ३ ॥ ३१ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP