समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय ९ वा

ब्रह्मदेवास भगवंताकडून चतुश्लोकी भागवताचा उपदेश -

श्री शुकदेवजी म्हणाले -
(अनुष्टुप्)
राजा स्वप्नात जे भासे त्याचा संबंध तो नसे ।
देहातीत तसा आत्मा दूर त्या मायिकाहुनी ॥ १ ॥
बहुरूपा अशी माया म्हणोनी बहुरूपि तो ।
रमता वदती लोक हा मी नी मम हे असे ॥ २ ॥
जेंव्हा तो मोह सोडोनी रमतो स्वरुपातची ।
तेंव्हा मी आणि माझे हे सोडुनि निर्गुणी बने ॥ ३ ॥
ब्रह्म्याचे तप पाहोनी तयाने रूप दाविले ।
आत्मबोध परासत्य परमार्थ हि बोधिला ॥ ४ ॥
(इंद्रवज्रा)
त्या आदिदेवे बसुनी फुलात
    विचार केला जग निर्मिण्याचा ।
जी ज्ञानदृष्टी असणे रचाया
    ती त्यास तेंव्हा नव्हती मिळाली ॥ ५ ॥
चिंतेत जेंव्हा बसला तदाची
    तऽपऽअसे दोनचि वेळ ऐके ।
परीक्षिता ते धन योगियांचे
    तपात सामर्थ्य समावलेले ॥ ६ ॥
हा बोल कोठोनि उठे कुणाचा
    बघे परी ना दिसले कुणीच ।
तेंव्हा तये ओळखिले तपाते
    आज्ञा असे मानुनि बैसला तो ॥ ७ ॥
तपस्वि जे त्यात अधीक श्रेष्ठ
    ब्रह्मा असे, ज्ञान अमोघ त्याचे ।
एकाग्र चित्तेचि हजार वर्षे
    केले तपा तो मग दिव्य झाला ॥ ८ ॥
बघून त्याचे तप थोर ऐसे
    स्वलोक दावी भगवंत श्रेष्ठ ।
जेथे न कोणा भय कांही
    जेथे तयाची नित दर्शने ती ॥ ९ ॥
जेथे न सत्वात रजो तमादी
    माया नि काळास जिथे न थारा ।
जेथे सदा देव नित्य सारे
    पार्षद त्याचे पद ध्याति नित्य ॥ १० ॥
कांती नभा सारखि दिव्य त्याची
    डोळे जसे ते शतपत्र नेत्र ।
वस्त्रे जयाची पिवळी अशी की
    सौंदर्यराशी गमतो मनासी ।
तो कोवळा आणि चतुर्भुजो नी
    माळा तया कंठि विशोभियेल्या ॥ ११ ॥
आकाश जैसे ढग वीज यांनी
    शोभे तसा तो भगवंत शोभे ।
स्थळी स्थळी कामिनि दिव्य कांती
    नी दिव्य आत्मे हि विमान यानी ॥ १२ ॥
ती लक्षुमी तेथ अनेक रूपे
    त्या नाथपाया नित सेविते की ।
झोक्यात बैसे अन गायि केंव्हा
    त्या गंधरूपास मिलिंद गाती ॥ १३ ॥
त्या दिव्य लोकी निजभक्त रक्षी
    लक्ष्मीपती यज्ञपतीच विष्णु ।
सुनंद नंद प्रबलार्हणादी
    प्रभूपदा पार्षद सेवितात ॥ १४ ॥
त्याच्या प्रसादाभिमुखात हास्य
    डोळ्यात लाली नि मधूर दृष्टी ।
किरीट नी कुंडल धारि ऐसा
    ती हेममाला हृदयी विलासे ॥ १५ ॥
सर्वोच्च त्या आसनि तो विराजे
    सभोवती शक्तिहि पंचवीस ।
षट्शक्ति तेथे रमती सदाच्या
    आनंदरूपी प्रभु नित्य राही ॥ १६ ॥
ब्रह्मा तया पाहुनि हर्षला तै
    प्रेमाश्रु नेत्री नि शहारलाही ।
पदांबुजाला नमिले तयाने
    जेणे मिळे मुक्ति सदा सदाची ॥ १७ ॥
ब्रह्मप्रिया प्रीय बघे तयास
    तो नम्र आनंदित योग्य ऐसा ।
निर्माण कार्यास सुयोग्य जाणी
    हासोनि बोले कर ते धरोनी ॥ १८ ॥
श्री भगवान म्हणाले-
वेदांचा जाणता तूचि तपाने मज तोषिले ।
कपटी योगसिद्धी ते कधी ना भावती मला ॥ १९ ॥
तुझे कल्याण हो सारे मागावा वर काय तो ।
समर्थ इच्छिले देण्या सर्वांत साधनात मी ॥ २० ॥
जळीं वाणीस ऐकोनी घोर तू तप साधिले ।
इच्छिले तूच मी तेणे अन हा लोकदाविला ॥ २१ ॥
सृष्टि ही रचण्या तू तो होता दिड्.मूढ तेधवा ।
माझीच ’तप्’ ती आज्ञा निष्पाप तप तोहि मी ॥ २२ ॥
तपाने निर्मितो सृष्टि तपाने पोषितो तसा ।
करितो लीन त्यानेच तप शक्ति असे मम ॥ २३ ॥
ब्रह्मदेवजी म्हणाले-
भगवन् ! सर्वभूतांत साक्षीरूप तुम्ही असा ।
सदैव आपुल्या ज्ञाने मम कार्यासि जाणिले ॥ २४ ॥
नाथा ! कृपा करी दीनां याचका दान देई हे ।
सगुणी निर्गुणी रूपा जाणण्या ज्ञान देई ते ॥ २५ ॥
मायेचे स्वामी हो तुम्ही संकल्प व्यर्थ ना कधी ।
मुखाने कीट जै जाळे काढितो क्रिडतो तयी ॥ २६ ॥
मायाजाळा तसे तुम्ही निर्मिता क्रीडता पुन्हा ।
कसे शक्य तुम्हा सारे,मर्माचे ज्ञान द्या मला ॥ २७ ॥
मला सामर्थ्य द्या ऐसे जेणे आज्ञाचि पाळि मी ।
करूनी रचिता सारे त्याचा गर्व नको मला ॥ २८ ॥
(इंद्रवज्रा)
मित्रा परी तू धरिले कराते
    सेवार्थ आता झटतो तुझ्या मी ।
कर्मानुसारे विभगीन जीव
    तेंव्हा मला ना मुळि गर्व व्हावा ॥ २९ ॥
श्री भगवान म्हणाले -
परं गुह्य असे ज्ञान प्रेमाने सांगतो तुला ।
माझ्या स्वरूप ज्ञानाला सांगतो ठीक ऐकणे ॥ ३० ॥
विस्तार लक्षणे माझी लीला रूप गुणासही ।
कृपेने जाणणे माझ्या तू तैसे अनुसरणे ॥ ३१ ॥
सृष्टिचा आदि तो मीची स्थूल ना सूक्ष्म ही जधी ।
जे जे सृष्टीत ते मीची राहील तोहि मीच की ॥ ३२ ॥
वास्तवी नसूनी वस्तु अनिर्वचनि ज्या अशा ।
माझ्याविना मुळी खोट्या हे माया मम रूपची ॥ ३३ ॥
थोर सान तनू मध्ये पंचभूते निवासती ।
प्रत्यक्ष न तिथे जैसे तसा जीवात मी शिरे ॥ ३४ ॥
निषेधे अन्वये सिद्ध मी तो सर्वत्र व्यापलो ।
एवढे जाणणे इच्छि जो मम दर्शन ॥ ३५ ॥
ब्रह्माजी ! ध्यानयोगाने निष्ठा सिद्धांति ठेवणे ।
निर्मिता कल्प कल्पेही तरी ना मोह हो तुम्हा ॥ ३६ ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
लोकांचा प्रपिता ब्रह्मा त्याला हे उपदेशिता ।
पाहता पाहता झाला गुप्त तो अरुपी असा ॥ ३७ ॥
सर्वभूत अशा ब्रह्मे जाणिले लोपले रुप ।
नमिले हात जोडोनी निर्मिली सृष्टि ही पुन्हा ॥ ३८ ॥
धर्म प्रजापती ब्रह्मा जनकल्याण साधण्या ।
यम नी नियमो यांना धारिले विधिपूर्वक ॥ ३९ ॥
तेंव्हा त्या समयी त्याचा लाडका पुत्र नारद ।
माया तत्वास जाणाया इच्छा घेवोनिया मनीं ॥ ४० ॥
संयमी विनयी सौम्य सेवेत रत राहिला ।
पाहुनी भक्ति ती त्याची ब्रह्मा संतुष्ट जाहला ॥ ४१ ॥
नारदे पाहिले ब्रह्मा प्रसन्न जाहले असे ।
तयाने प्रश्न हे केले राजा ! तू जे विचारिले ॥ ४२ ॥
हे असे प्रश्न ऐकोनी बह्माला हर्ष जाहला ।
दश लक्षण ही वार्ता पुत्रासी बोधिली असे ॥ ४३ ॥
परीक्षित् ! निधि तेजाचे माझे तात सरस्वती ।
तटासी बैसले ध्यानी भगवव् द चिंतना मनीं ।
पुढे ती नारदे व्यासा बोधिली भगवत् कथा ॥ ४४ ॥
तू मला प्रश्न जे केले सृष्टि ब्रह्मांड जाणण्या ।
श्रीमदभागवतातून उत्तरे ऐक ही पहा ॥ ४५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ २ ॥ ९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP