समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ८ वा
राजा परीक्षिताचे विविध प्रश्न -
राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
ब्राह्मणा ! वेदवेत्त्यात तुम्ही तो श्रेष्ठची असा ।
निर्गुणी भगवंताचे नारदा गुण वर्णिण्या ॥
ब्रह्म्याने सांगता त्यांनी कोणा कोणास बोधिले ॥ १ ॥
अचिंत्य भगवत्शक्ती कथा त्या मंगला सदा ।
स्वभाव नारदी ऐसा भगवद्दर्शनी सदा ॥
कृपया मजला सांगा गोष्टी त्या सर्वची तुम्ही ॥ २ ॥
महाभाग शुका तुम्ही मजला उपदेष द्या ।
आसक्ति सोडुनि सर्व स्मरता कृष्ण मी मरो ॥ ३ ॥
श्रद्धेने वर्णिता लीला ऐकता श्रवणेंद्रियी ।
हृदयी प्रगटे भगवान् विलंब क्षणही नको ॥ ४ ॥
कानाच्या छिद्रामार्गाने कृष्ण तो हृदयी शिरे ।
शरदी स्वच्छ जै पाणी तैसा तो मळ सारितो ॥ ५ ॥
जो न सोडी क्षणासाठी श्रीकृष्णचरणांबुज ।
शुद्ध ज्याच्या मनीं भाव क्लेष ना घडतो तया ॥ ६ ॥
भगवन् ! पंचभूतांचा संबंधी जीव ना कधी ।
तनू ही पंचभूतांची कैसी ते मर्म सांगणे ॥ ७ ॥
भगवत् नाभिपुष्यात उभे हे सर्व लोक की ।
मित इंद्रिय हा जीव तसा तो वर्णिला कसा ॥ ८ ॥
सर्वभूतमयी ब्रह्मा कृपेने जग निर्मितो ।
जन्मता नाभि पुष्यात कृपेने जाणुही शके ॥ ९ ॥
उत्पत्तिस्थिती नी नाश मायेचा स्वामी तो कसा
त्यागुनी मोह हे सारे झोपतो कोणत्या रूपी ॥ १० ॥
विराटरूपे अंगाचे लोक नी लोकपाल ते ।
रचिले बोधिले आणि उलटे बोधिले पुन्हा ॥
कल्पना सगळी रूपे दोन्हीई घडते कसे ॥ ११ ॥
कल्पनी तो महाकल्प अनुमान कशापरी ।
स्थूलदेहाभिमानांची आयु बांधिलि कां असे ॥ १२ ॥
काळाची गती नी वर्ष जाणणे कोणत्या परी ।
कर्माने जीव जीवांची गति ती केवधी कशी ॥ १३ ॥
देवादियोनि या सर्व गुणांनी मिळती तदा ।
कोणते कारणे कर्म इच्छित योनि लाभण्या ॥ १४ ॥
दिशा आकाश पाताळ ग्रह तारे नि पृथ्वी त्या ।
नद्या समुद्र द्वीपात जीव ते ते जन्मती कसे ॥ १५ ॥
ब्रह्मांड परिमाणाने आत बाहेर ते कसे ।
चरित्र थोर व्यक्तींची धर्म वर्णाश्रमोवदा ॥ १६ ॥
युगांचे भेद नी नीति तयांचे धर्म कोणते ।
भगवद् अवतारांच्या लीला आश्चर्य ही वदा ॥ १७ ॥
सामान्य नी विशेषत्वे मानवी धर्म कोणते ।
राजर्षि व्यवसायी नी विपत्ति धर्म कोणता ॥ १८ ॥
स्वरूप लक्षणा संख्या तत्वांच्या त्या वदा मज ।
पुरुषाराधना आणि आध्यात्म योग तो कसा ॥ १९ ॥
योगेश्वरास ऐश्वर्य गति ती कोणती मिळे ।
टाकिती शरिरा कैसे वेदांचे सार कोणते ॥ २० ॥
उत्पत्ति सर्व प्राण्यांची स्थिती लय कसा असे ।
विहिरी खोदणे कैशा काम्य कर्म नि यज्ञ त्या ॥
धर्मार्थकाम यांचा ही साधवा विधि तो कसा ॥ २१ ॥
प्रलयी लीन जे जीव पुढती जन्मती कसे ।
पाखंडी निघती कैसे आत्म्याचे बंध मोक्ष ते ॥ २२ ॥
मुक्त तो भगवान् नित्य मायेने क्रीडितो कसा ।
त्रयस्थापरि तो कैसा त्यागितो सर्व ते पुन्हा ॥ २३ ॥
तुम्हा मी पुसतो ब्रह्मन् ! शरणागत मी तुम्हा ।
क्रमाने सांगणे तत्व कृपया हे महामुने ॥ २४ ॥
विषयी याचिया आहा ब्रह्म्याच्या सम तो तुम्ही ।
पूर्वपरंपरेनेच दजे लोक अनुष्ठिती ॥ २५ ॥
माझ्या भूक तहानेची चिंता ती नकरा तुम्ही ।
शापीत प्राण हे माझे मुक्त ना अन्य साधने ॥
कथामृत तुम्ही देता प्राशितो भक्तिनेच् मी ॥ २६ ॥
सूतजी सांगतात-
संताच्या त्या सभे मध्ये कथेची प्रार्थना अशी ।
राजा तो करितो तेंव्हा शुकां आनंद जाहला ॥ २७ ॥
श्रीमद्भागवतो ऐसे पुराण महानीय हे ।
ब्रह्मकल्पा मधे देवे ब्रह्म्याला बोधिले जसे ॥ २८ ॥
परीक्षित् पांडुवंशाचा श्रेष्ठ तो प्रश्न जे करी ।
क्रमाने उत्तरे त्यांची श्री शुके बोधिली पुन्हा ॥ २९ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥ २ ॥ ८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|