श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
द्वादशोऽध्यायः

सत्संगमहिमा कर्मानुष्ठान कर्मत्यागव्यवस्था वर्णनं च -

सत्संगाचा महिमा व कार्मत्यागाचा विधि -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
न रोधयति मां योगो न साङ्ख्यं धर्म एव च ।
न स्वाध्यायस्तपस्त्यागो न इष्टापूर्तं न दक्षिणा ॥ १ ॥
व्रतानि यज्ञश्छन्दांसि तीर्थानि नियमा यमाः ।
यथावरुंधे सत्सङ्गः सर्वसङ्गापहो हि माम् ॥ २ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
( अनुष्टुप )
जगींच्या सर्व आसक्ती सत्संग नष्टितो पहा ।
न सांख्ये योग नी धर्मे स्वाध्याय तप त्याग ना ॥ १ ॥
ईष्टापूर्ती न दानाने न मी पावे तशा परी ।
वेद यज~झ व्रते तीर्थे सत्संगा परि श्रेष्ठ ना ॥ २ ॥

हि सर्वसंगापहः सत्संगः - प्रसिद्ध आहे की सर्व संगांचा नाश करणारा संतसंग - यथा मां अवरुंधे - जसा मला वश करतो - न योगः न सांख्यं धर्मः च एव - तसा योग, सांख्य वा धर्मही करीत नाही - न स्वाध्यायः तपः त्यागः - तसेच स्वाध्याय वा तपाचरण वा त्यागही करीत नाही - न इष्टापूर्तं न दक्षिणा मां रोधयति - इष्टापूर्त वा दानही मला वश करीत नाही - व्रतानि यज्ञः छंदांसि तीर्थानि - तसेच व्रते, यज्ञ, मंत्र तीर्थे - नियमाः यमाः अपि न रोधयंति - यम, नियम हेही वश करीत नाहीत. ॥ १-२ ॥
श्रीभगवान म्हणतात सर्व आसक्ती नष्ट करणार्‍या सत्संगामुळे भक्त मला जसा प्राप्त करू शकतो, तसा योग, सांख्य, धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, इष्ट, आपूर्त दक्षिणा, व्रते, यज्ञ, तीर्थ, नियम, यम इत्यादी साधनांनी मला मिळवू शकत नाही. (१-२)


सत्सङ्गेन हि दैतेया यातुधाना मृगाः खगाः ।
गन्धर्वाप्सरसो नागाः सिद्धाश्चारणगुह्यकाः ॥ ३ ॥
विद्याधरा मनुष्येषु वैश्याः शूद्राः स्त्रियोऽन्त्यजाः ।
रजस्तमःप्रकृतयः तस्मिन् तस्मिन् युगेऽनघ ॥ ४ ॥
बहवो मत्पदं प्राप्ताः त्वाष्ट्रकायाधवादयः ।
वृषपर्वा बलिर्बाणो मयश्चाथ विभीषणः ॥ ५ ॥
सुग्रीवो हनुमान् ऋक्षो गजो गृध्रो वणिक्पथः ।
व्याधः कुब्जा व्रजे गोप्यो यज्ञपत्‍न्यस्तथापरे ॥ ६ ॥
सत्संगे सर्व यूगाशी दैत्य राक्षस नाग नी ।
सिद्ध चारण गंधर्वा माझी प्राप्तीच जाहली ॥ ३ ॥
मनुष्यीं वैश्य नी शूद्र स्त्रीया अंत्यज ही मला ।
मिळाले ते असोनीया रज नी तम वृत्तिचे ॥ ४ ॥
वृत्रासुर नि प्रल्हाद वृषपर्वा बळी तसा ।
बाण सुग्रीव हनुमान जांबवान मयदानव ॥ ५ ॥
जटायु गज नी व्याध कुब्जा नी व्रजगोपिका ।
यज्ञपत्‍न्यादि सारेच सत्संगे मिळले तदा ॥ ६ ॥

अनघ - हे निष्पाप उद्धवा - सत्संगेन हि - संतांचा समागम झाला म्हणूनच - दैतेयाः, यातुधनाः, मृगाः खगाः - दैत्य, राक्षस, वन्यपशु, पक्षी - गंधर्वाप्सरसः, नागाः सिद्धाः चारणगुह्यकाः विद्याधराः - गंधर्व-अप्सरा,, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, विद्याधर - मनुष्येषु वैश्याः, शूद्राः, स्त्रियः अंत्यजाः, बहवः - मनुष्यांमध्ये वैश्य, शूद्र, स्त्रिया, अतिशूद्र, सारांश हजारो - रजस्तमः प्रकृतयः - रजोगुणी व तमोगुणी प्राणी - तस्मिन् तस्मिन् युगे - त्या त्या प्रत्येक युगात - मत्पदं प्राप्ताः - माझ्या पदाला पोचलेले आहेत - त्वाष्ट्रकायाधवादयः वृषपर्वा, - वृत्रासुर, प्रल्हादप्रभृति, वृषपर्वा, - बलिः, बाणः मयः च विभीषणः - बलि, बाण, मय आणि बिभीषण - सुग्रीव, हनुमान्, ऋक्षः गजः - सुग्रीव, मारुती, जांबुवंत, गजेंद्र - गृध्र, वणिक्पथः, व्याधः - जटायु, तुलाधार, व्याध - कुब्जा, व्रजे गोप्यः, यज्ञपत्‍न्यः तथा अपरे अपि - कुब्जा, गोकुळातील गोपी, यज्ञपत्‍न्या व इतरही अनेक सत्संगानेच मला प्राप्त करू शकले. ॥ ३-६ ॥
हे पुण्यशील उद्ववा ! प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्या योगानेच दैत्यराक्षस, पशुपक्षी, गंधर्वअप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक आणि विद्याधरांना माझी प्राप्ती झालेली आहे मनुष्यांमध्ये वैश्य, शूद्र, स्त्री, अंत्यज इत्यादी रजोगुणीतमोगुणी स्वभावाच्या पुष्कळशा जीवांनी माझे परमपद प्राप्त करून घेतले आहे वृत्रासुर, प्रह्लाद, वृषपर्वा, बली, बाणासूर, मयदानव, बिभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबवान, गजेंद्र, जटायू, तुलाधार वैश्य, धर्मव्याध, कुब्जा, व्रजातील गोपी, यज्ञपत्‍न्या आणि इतर अनेकजणसुद्धा सत्संगाच्या प्रभावानेच मला प्राप्त करू शकले. (३-६)


ते नाधीतश्रुतिगणा नोपासितमहत्तमाः ।
अव्रतातप्ततपसः मत्सङ्गान् मामुपागताः ॥ ७ ॥
श्रुति ना वाचिल्या त्यांनी न पूजा विधीपूर्वक ।
वज्र तप न ते केले सत्संगे मिळले मला ॥ ७ ॥

ते अधीतश्रुतिगणाः न - हे वर सांगितलेले मनुष्यादि जीव श्रुतीचे अध्ययन केलेले नव्हते - उपासितमहत्तमाः न - मोठमोठ्या शास्त्रज्ञ गुरुंची अथवा इंद्रचंद्रादि देवांची उपासना केलेलेही नव्हते - अव्रतात्प्ततपसः - ज्यांनी व्रताचरण अथवा उग्र तपश्चर्याही केली आहे असेही नव्हते - सत्संगात् मां उपागताः - संतांच्या संगतीमुळेच माझ्या पदाला प्राप्त झाले. ॥ ७ ॥
त्यांनी वेदाध्ययन केले नव्हते की महापुरूषांची उपासना केली नव्हती त्याचप्रमाणे त्यांनी कोणतीही व्रते किंवा तपश्चर्यासुद्धा केली नव्हती केवळ सत्संगानेच ते मला येऊन मिळले. (७)


केवलेन हि भावेन गोप्यो गावो नगा मृगाः ।
येऽन्ये मूढधियो नागाः सिद्धा मामीयुरञ्जसा ॥ ८ ॥
गोपिका गाइ नी वृक्ष हरीण पशू नागही ।
साधनी सर्वथा मूढ भजुनी धन्य जाहले ॥ ८ ॥

गोप्यः गावः नगाः मृगाः - गोपी, गाई, वृक्ष, पशु - ये अन्ये मूढधियः नागाः सिद्धाः - जे इतरही मंदबुद्धि लोक व नाग, सिद्ध इत्यादि - केवलेन हि भावेन - केवळ शुद्ध भावाने मात्र - मां अंजसा ईयुः - सहज लीलेने मला प्राप्त झाले. ॥ ८ ॥
गोपी, गाई, यमलार्जुन इत्यादी वृक्ष व्रजातील हरीण इत्यादी पशू,या सर्वांनी भक्तीनेच मला प्राप्त करून घेतले याखेरीज कालियानागासारखे अज्ञानी केवळ प्रेमभावनेने सहजपणे मला मिळून कृतकृत्य झाले. (८)


यं न योगेन साङ्ख्येन दानव्रततपोऽध्वरैः ।
व्याख्या स्वाध्याय संन्यासैः प्राप्नुयाद् यत्‍नवानपि ॥ ९ ॥
जे न योगे न सांख्याने यज्ञे दान तपे व्रते ।
त्यागानेहि न लाभे ते सत्संगे मिळले मला ॥ ९ ॥

योगेन सांख्येन - योगाने वा सांख्यशास्त्राच्य अज्ञानाने - दानव्रततपोध्वरैः - दान, व्रत, तप, यज्ञ यांच्या योगे - व्याख्या स्वाध्याय संन्यासैः - प्रवचने, स्वाध्या, संन्यासप्रभृति साधनांनी - यत्‍नवान अपि यं न प्राप्नुयात् - मोठा प्रयत्‍न करूनही माझी प्राप्ती व्हावयाची नाही. ॥ ९ ॥
उद्ववा ! प्रयत्‍नशील साधक, योग, सांख्य, दान, व्रत, तपश्चर्या, यज्ञ, वेदाध्ययन, स्वाध्याय, संन्यास इत्यादी साधनांच्याद्वारे ज्या मला प्राप्त करून घेऊ शकत नाहीत, ते सत्संगाने माझी प्राप्ती करून घेतात. (९)


( इंद्रवज्रा )
रामेण सार्धं मथुरां प्रणीते
     श्वाफल्किना मय्यनुरक्तचित्ताः ।
विगाढभावेन न मे वियोग
     तीव्राधयोऽन्यं ददृशुः सुखाय ॥ १० ॥
( इंद्रवज्रा )
बळी सवे त्या मथुरेत आलो
     अक्रूर आले मज घेउनीया ।
प्रेमात गोपी बहु रंगलेल्या
     व्याकूळल्या त्या मम रूप ध्याता ॥ १० ॥

रामेण सार्धं - बलरामासह - मथुरां श्वाफल्किना प्रणीते - मला श्वाफल्कि म्हणजे अक्रूराने मथुरेला नेले त्यावेळी - विगाढभावेन मयि - अंतःकरणात बद्धमूल झालेल्या भक्तीने माझ्या ठायी - अनुरक्तचित्ताः - ज्यांचे चित्त, मन अनुरक्त झाले होते अशा - वियोगतीव्राधयः - माझ्या वियोगामुळे ज्यांचे दुःख तीव्र झाले होते अशा गोपीस - सुखाय मे अन्यं न ददृशु - सुख देणारा माझ्याहून दुसरा कोणी दिसेनासा झाला. ॥ १० ॥
उद्ववा ! ज्यावेळी अक्रूर बलरामदादासह मला वज्रातून मथुरेला घेऊन निघाला, त्यावेळी माझ्याविषयीच्या गाढ प्रेमामुळे माझ्या ठिकाणीच चित्त जडलेल्या गोपी माझ्या वियोगाच्या तीव्र दुःखाने इतक्या व्याकूळ झाल्या होत्या की, माझ्याखेरीज दुसरी कोणतीही वस्तू त्यांना आनंददायक वाटत नव्हती. (१०)


तास्ताः क्षपाः प्रेष्ठतमेन नीता
     मयैव वृन्दावनगोचरेण ।
क्षणार्धवत्ताः पुनरङ्ग तासां
     हीना मया कल्पसमा बभूवुः ॥ ११ ॥
मी प्रीय त्यांचा मुळि एक आहे
     वृंदावनी त्या क्रिडल्या अशा की ।
कित्येक रात्री सरल्या क्षणात
     आता तयांना निशि कल्प वाटे ॥ ११ ॥

अंग - हे उद्धवा - वृंदावनगोचरेण - वृंदावनात राहणारा - प्रेष्ठतमेन - गोपींस अत्यंत प्रियकर झालेला जो मी - मया एव - त्या माझ्यासह मात्र - ताः तोः क्षपाः याभिः क्षणार्द्धवत् नीताः - ज्या ज्या स्मरणीय रात्री ज्या गोपींनी क्षणार्धात घालविल्या - तासां पुनः मया हीनाः ताः - मी नव्हतो म्हणून त्या रात्री - कल्पसमाः बभूवुः - कल्पासारख्या दीर्घ वाटल्या. ॥ ११ ॥
अत्यंत प्रियतम असा मी वृंदावनामध्ये होतो, तेव्हा त्यांनी रासक्रीडेच्या रात्री, माझ्यासमवेत अर्ध्या क्षणाप्रमाणे घालविल्या होत्या परंतु प्रिय उद्ववा ! त्याच रात्री मी नसल्यामुळे त्यांना त्याच रात्री एकेका कल्पाप्रमाणे वाटू लागल्या. (११)


ता नाविदन् मयि अनुषङ्गबद्ध-
     धियः स्वमात्मानमदस्तथेदम् ।
यथा समाधौ मुनयोऽब्धितोये
     नद्यः प्रविष्टा इव नामरूपे ॥ १२ ॥
समाधि योगे ऋषि स्थीरतात
     नद्या समुद्री रुप अर्पिती तै ।
गोपी मिळाल्या मज प्रेम भावे
     त्या भौतिकाची नच शुद्ध त्यांना ॥ १२ ॥

यथा मुनयः - ज्याप्रमाणे मुनींना - समाधौ नामरूपे न - समाधीमध्ये नामरूपे कळत नाहीत - अब्धितोये प्रविष्टाः नद्यः इव - समुद्रात शिरलेल्या नद्यांस नामरूप राहात नाही त्याप्रमाणे - मयि अनुषंगबद्धधियः ताः - माझ्यावरच ज्यांचे चित्त प्रेमाने बद्ध होते अशा त्या गोपी - इदं स्वं आत्मानं तथा अदः - आपला देह हा किंवा इतर याचे भान - न अविदन् - विसरत्या झाल्या. ॥ १२ ॥
माझ्याठायी मनबुद्धी एकवटलेल्या त्यांना माझ्याशिवाय आपले आप्तेष्ट, स्वतःचे शरीर, इहलोक, परलोक अशा कशाचीही शुद्ध राहिली नव्हती जसे मुनी समाधीमध्ये भगवंताशी एकरूप होऊन किंवा नद्या समुद्राला मिळून जाऊन आपले नामरूप विसरून जातात, तसे त्यांचे झाले होते. (१२)


( अनुष्टुप् )
मत्कामा रमणं जारं अस्वरूपविदोऽबलाः ।
ब्रह्म मां परमं प्रापुः सङ्गात् शतसहस्रशः ॥ १३ ॥
( अनुष्टुप )
गोपींना नच ते ज्ञान जार भावचि अर्पिती ।
हजारो अबला तैशा परब्रह्मास पावल्या ॥ १३ ॥

अस्वरूपाविदः - माझे परमस्वरूप ठाऊक नसलेल्या - मत्कामाः अबलाः - ज्यांची कामबुद्धि मत्संबंधी उत्कट झाली होती अशा त्या अबला स्त्रिया - मां रमणं जारं - मी त्यांचा रमण अथवा उपपति असे समजल्या तरी - शतसहस्रशः हजारो प्रकारच्या - संगात् - माझ्या संगतीने - परमं ब्रह्म प्रापुः - परमश्रेष्ठ ब्रह्म प्राप्त करून घेत्या झाल्या - ॥ १३ ॥
त्या माझे खरे रूप जाणत नव्हत्या त्या मला फक्त प्रियतमच समजत होत्या आणि जारभावाने भेटण्याची इच्छा करीत होत्या असे असूनही त्या शेकडो, हजारो स्त्रियांनी केवळ सत्संगाच्या प्रभावानेच परब्रह्म अशा मला प्राप्त करून घेतले. (१३)


तस्मात् त्वं उद्धवोत्सृज्य चोदनां प्रतिचोदनाम् ।
प्रवृत्तिं च निवृत्तिं च श्रोतव्यं श्रुतमेव च ॥ १४ ॥
मामेकं एव शरणं आत्मानं सर्वदेहिनाम् ।
याहि सर्वात्मभावेन मया स्या ह्यकुतोभयः ॥ १५ ॥
श्रुतिस्मृति विधी सर्व प्रवृत्ति नी निवृत्ति ही ।
विषया त्यागुनी सर्व जीवात पाहणे मला ॥ १४ ॥
एकरूपचि त्या सर्वीं पाहणे एकटा मला ।
शरणी मजला येता होशील निर्भयो तसा ॥ १५ ॥

उद्धव - हे उद्धवा - तस्मात् चोदनां प्रतिचोदनां - म्हणून विधिनिषेध सांगणार्‍या - प्रवृत्तं च निवृत्तिं च - प्रवृत्ति-निवृत्तीची चर्चा करणार्‍या - श्रोतव्यं श्रुतं एव च - ऐकलेल्या व ऐकावयाच्या सर्व श्रुति - त्वं उत्सृज्य - यांचा त्याग करून - सर्वदेहिनां आत्मानं मां एकं एव - सर्व जीवांचा आत्मा जो मी, त्या मला एकट्याला - सर्वात्मभावेन तन मन धनाने - शरणं याहि - शरण ये - मया हि अकुतोभयः स्याः - माझ्या साह्याने तुला कशाचीही भिती राहणार नाही. ॥ १४-१५ ॥
म्हणून हे उद्ववा ! तू विधिनिषेध, प्रवृत्ती किंवा निवृत्ती तसेच इहपरलोकासंबंधी सर्व कर्मांचा त्याग करून, सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या एकमेव मला परमात्म्यालाच अनन्य भावाने शरण ये मग तुला कोणत्याही प्रकारचे भय राहाणार नाही. (१४-१५)


श्रीउद्धव उवाच -
संशयः श्रृण्वतो वाचं तव योगेश्वरेश्वर ।
न निवर्तते आत्मस्थो येन भ्राम्यति मे मनः ॥ १६ ॥
उद्धवजी म्हणाले -
योग योगेश्वरा देवा ऐकला उपदेश हा ।
माझा संदेह ना जाय कृपया सांगणे मला ॥
पाळावा तो स्वधर्मो की, त्यजुनी भजणे तुला ॥ १६ ॥

योगेश्वरेश्वर - हे योश्वरांच्या ईश्वरा - तव वाचं श्रृण्वतः मे - तुझे भाषण लक्ष देऊन ऐकणारा जो मी त्या माझ्या - आत्मस्थः संशयः न निवर्तते - अंतःकरणांतील संशय नाहीसा होत नाही - येन मनः भ्राम्यति - तो फिरून फिरून उद्‌भवतो म्हणून मन भ्रमित होत आहे. ॥ १६ ॥
उद्वव म्हणाला हे योगेश्वरांचे ईश्वर ! आपला उपदेश ऐकून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे तो असा "स्वधर्मानुसार मी कर्म करावे की, सर्व सोडून आपल्याला शरण यावे" यामुळे माझे मन गोंधळून गेले आहे. (१६)


श्रीभगवानुवाच -
( मिश्र )
स एष जीवो विवरप्रसूतिः
     प्राणेन घोषेण गुहां प्रविष्टः ।
मनोमयं सूक्ष्ममुपेत्य रूपं
     मात्रा स्वरो वर्ण इति स्थविष्ठः ॥ १७ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
( इंद्रवज्रा )
आत्मा प्रवेशे मुळचक्रि जेंव्हा
     तैं प्राणघोषो मग नाभि चक्री ।
पश्यंति शब्दे मनरूप होतो
     नी माध्यमानेहि विशुद्ध चक्रीं ।
वानी स्वरूपे मग व्यक्त होतो
     नी वैखरी स्थूलहि रूप घेतो ॥ १७ ॥

सः एषः जीवः - तोच हा जडास चेतविणारा जीव होय - प्राणेन घोषेण गुहां प्रविष्टः - नाद आणि प्राण घेऊन त्याने गुहेमध्ये प्रवेश केला - मनोमयं सूक्ष्मं रूपं उपेत्य - मनोमय सूक्ष्म स्वरूप धारण करतो - विवरःप्रसूतिः - विवरात, शरीराच्या अंतर्भागात प्रकट होतो. ॥ १७ ॥
श्रीभगवान म्हणाले तो हा परमेश्वरच प्रथम अनाहत नादस्वरूप परावाणी नावाच्या प्राणासह मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो नंतर तोच मनोमय सूक्ष्म रूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये पश्यंती नावाची वाणी होतो. नंतर तोच कंठस्थानी असलेल्या विशुद्ध नावाच्या चक्रात येऊन मध्यमा नावाने वाणीचे किंचित स्थूल रूप धारण करतो त्यानंतर तोच मुखामध्ये येऊन र्‍हस्वदिर्घ इत्यादी मात्रा, उदात्तादी स्वर आणि ककारादी वर्ण इत्यादी रूपांनी वैखरी नावाची स्थूल वाणी होतो. (१७)


यथानलः खेऽनिलबंधुरूष्मा
     बलेन दारुण्यधिमथ्यमानः ।
अणुः प्रजातो हविषा समिध्यते
     तथैव मे व्यक्तिरियं हि वाणी ॥ १८ ॥
त्या वीजरूपे गगनात अग्नी
     काष्ठात अग्नी ठिणगी रुपाने ।
तैं शद्धब्रह्मो रुप घेउनीया
     वाणी क्रमाने प्रगटोनि येतो ॥ १८ ॥

यथा अनलः खे उष्मा - ज्याप्रमाणे अग्नि आकाशामध्ये केवळ ऊष्मा नामक अव्यक्त स्वरूपाने असून - अनिलबंधुः - वायुसख्याचे साह्य करणारा तो अग्नि - बलेन अधिमत्यमानः - जोराने लाकडावर लाकडे घासली असत - दारुणि अणुः प्रजातः - लाकडात सूक्ष्म ठिणगीचे स्वरूप घेतो - हविषा समिद्ध्यते - आहुति टाकल्यानंतर आपले ज्वालारूप प्रकट करतो - तथा हि एव - त्यप्रमाणेच - इयं वाणी मे व्यक्तिः - ही वाणी माझे दृश्य स्वरूप घेते. ॥ १८ ॥
जसा आकाशात वार्‍याचा मित्र अग्नी हा उष्णतेच्या रूपात असतो तोच जोराने लाकडावर लाकूड घासले असता ठिणगीच्या रूपात प्रगट होतो नंतर तोच हविर्द्रव्य मिळाल्यानंतर प्रज्वलित होतो त्याचप्रमाणे या वाणीच्या रूपाने मीच प्रगट होतो. (१८)


एवं गदिः कर्म गतिर्विसर्गो
     घ्राणो रसो दृक् स्पर्शः श्रुतिश्च ।
सङ्कल्पविज्ञानमथाभिमानः
     सूत्रं रजःसत्त्वतमोविकारः ॥ १९ ॥
तसेच हाती अन पायि तैसे
     शिश्नी गुदी नासिक नेत्र कर्णी ।
मने नि बुद्ध्ये कळणे तसेची
     ते कर्म सारे मम शक्ति होय ॥ १९ ॥

एवं - याप्रमाणे - गदिः - भाषण - कर्म - हस्तेंद्रियाची वृत्ति - गतिः - पायांची वृत्ति - विसर्गः - विसर्जनाची वृत्ति - घ्राणः, रसः दृक्, स्पर्श, श्रुतिः च - नासिका, जिव्हा, नेत्र, स्पर्श, कर्णप्रभृति ज्ञानेंद्रियांची वृत्ति - संकल्पविज्ञानं - मनोवृत्ति व बुद्धिवृत्ति - अथ अभिमानः - अहंकारवृत्ति - सूत्रं - हिरण्यगर्भरूपी प्रधानाची वृत्ति - रजःसत्त्वतमोविकारः - सत्त्वादि गुणरूप अधिदैवादिकांची वृत्ति ॥ १९ ॥
याचप्रमाणे बोलणे, कर्म करणे, चालणे, मलमूत्र विसर्जन करणे, वास घेणे, चव घेणे, पाहाणे, स्पर्श करणे, ऐकणे, मनाने संकल्पविकल्प करणे, बुद्धीने निश्चय करणे, अभिमान धरणे इत्यादी सर्व क्रिया, महत्तत्त्व, तसेच सत्त्व, रज, तम इत्यादी तिन्ही गुणांची कार्ये, हे सर्व मीच आहे, असे समज. (१९)


अयं हि जीवः त्रिवृद् अब्जयोनिः
     अव्यक्त एको वयसा स आद्यः ।
विश्लिष्टशक्तिर्बहुधेव भाति
     बीजानि योनिं प्रतिपद्य यद्वत् ॥ २० ॥
यस्मिन्निदं प्रोतमशेषमोतं
     पटो यथा तन्तुवितानसंस्थः ।
य एष संसारतरुः पुराणः
     कर्मात्मकः पुष्पफले प्रसूते ॥ २१ ॥
ब्रह्मांड निर्मी हरि तोहि मीच
     अव्यक्त होते रुप ते पुराणे ।
बीजातुनी ये बहुथोर वृक्ष
     काळे तसे रूप अनंत होती ॥ २० ॥
पटीं जसे सूतचि पुर्ण राही
     तसेचि विशवो परमात्मारूपी ।
संसारवृक्षो अतिही पुराणा
     तो कर्मरूपी फळ मोक्ष त्याचे ॥ २१ ॥

यद्वत् - ज्याप्रमाणे - योनिं प्रतिपद्य बीजानि - चांगले क्षेत्र मिळाले म्हणजे एकच बीज अनेकामध्ये उत्क्रांत होते - अव्यक्तः आद्यः एकः - अव्यक्त, सनातन अद्वितीय असा - सः अयं जीवः - तो हा जीव - वयसा - कालाने - अब्जयोनिः - कमलोद्‌भव - त्रिवृत् - गुणत्रयासन्निध आला म्हणून ब्रह्मांडरूपी दृश्य कमल उत्पन्न करता झाला - विश्लिष्टशक्तिः बहुधा एव भाति हि - गुणोपाधींनी अनेक शक्ति धारण करून ’नाना’ आहे असा दिसला. ॥ २० ॥ यथा पटः तंतुवितानसंस्थः - ज्याप्रमाणे पट तंतूंमध्ये घटित असतो - अशेषं इदं - हे निःशेष अंतर्बाह्य विश्व - यस्मिन् ओतं प्रोतं - ज्या या जीवस्वरूपात ओतप्रोत भरले आहे - य एषः संसारतरुः - हे विश्व हाच संसारवृक्ष होय - पुराणः - हा वृक्ष पुरातन असून - कर्मात्मकः - कर्म हेच याचे स्वरूप आहे - पुष्पफले - इहलोकींचे व स्वर्गांचे भोगरूपी पदार्थांस - प्रसूते - जन्म देतो. ॥ २१ ॥
त्रिगुणमय ब्रह्मांडरूपी कमळाचे कारण हा परमात्माच आहे प्रथम तो एकच अव्यक्त होता नंतर काल व माया यांच्या साह्याने तोच अनेक रूपांमध्ये प्रगट झाल्यामुळे अनेक असल्यासारखा वाटू लागला जमिनीत बी पेरल्यानंतर ते जसे अनेक रूपांमध्ये विस्तार पावून प्रगट होते, तसे हे आहे कपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रोत असतात, त्याचप्रमाणे या परमात्म्यामध्येच सारे विश्व ओतप्रोत भरले आहे हा पुरातन संसाररूपी वृक्ष कर्ममय आहे ते कर्मच भोगरूप फुले आणि मोक्षरूप फळ उत्पन्न करते. (२०-२१)


द्वे अस्य बीजे शतमूलस्त्रिनालः
     पञ्चस्कन्धः पञ्चरसप्रसूतिः ।
दशैकशाखो द्विसुपर्णनीडः
     त्रिवल्कलो द्विफलोऽर्कं प्रविष्टः ॥ २२ ॥
अदन्ति चैकं फलमस्य गृध्रा
     ग्रामेचरा एकमरण्यवासाः ।
हंसा य एकं बहुरूपमिज्यैः
     मायामयं वेद स वेद वेदम् ॥ २३ ॥
दो बीज त्याचे शतमूळ तैसे
     ते तीन खोडे अन पाच फांघ्या ।
बारा डहाळ्या त‍इ एक खोपा
     नी त्यात ते दो वसतात पक्षी ।
त्या तीन साली फळ दो परीचे
     विशाल विस्तार नभाहुनीही ॥ २२ ॥
त्या शद्ध स्पशा रस या फळाला
     गुंतोनि जाता फसला म्हणावा ।
ते हंस होती विषयीं विरत्त
     रहस्य माझे गुरुला पुसावे ॥ २३ ॥

अस्य द्वे बीजे - याचीं बीजे दोन, पाप व पुण्य - शतमूलः - याची वासनारूपी मुळे हजारो - त्रिनालः - सत्त्वादि तीन गुण ही या वृक्षाची कांडे - पंचस्कंधः - पंचभूते ह्याच पाच फांध्या - पंचरसप्रसूति - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाच रस - दशैकशाखः - दहा इंद्रिये व एक मन अशा अकरा फांद्या - द्विसुपर्णनीडः - दोन पक्षांची घरटी - त्रिवल्कलः - वात, पित्त, कफ ही तीन त्वचा म्हणजे साली - द्विफलः - सुख आणि दुःख हीच दोन याची फळे - अर्कं प्रविष्टः - सूर्यमंडलापर्यंत उंच आहे. ॥ २२ ॥ ग्रामेचराः गृधः अस्य एकं फलं अदंति - गावात फिरणारी ससारस्थ गिधाडे म्हणजे वासनामय जीव या वृक्षाचे एक फळ, म्हणजे दुःख उपभोगतात - अरण्यवासाः हंसाः च एकं - अरण्यवासी परमहंस संन्यासी एक फळ, म्हणजे नित्य सुख उपभोगतात - यः एकं मायामयं इज्यैः बहुरूपं वेद - ज्याला एकच परब्रह्म मायेमुळे गुरुसाह्याने अनेकसे दिसते - सः वेदं वेद - त्यालाच वेद समजले. ॥ २३ ॥
पाप आणि पुण्य ही या संसाररूपी वृक्षाची दोन बीजे आहेत शेकडो वासना या याच्या मुळ्या तीन गुण ही त्याची तीन खोडे पंचमहाभूते या याच्या पाच फांद्या आहेत यांमधून पाच प्रकारचे रस. (शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध) बाहेर पडतात दहा इंद्रिये आणि एक मन ह्याही याच्या फांद्याच होत एक जीव आणि एक ईश्वर या झाडावर घरटे बांधून राहातात वात, पित्त, कफ या याच्या तीन साली आहेत सुखदुःख ही दोन फळे होत असा हा संसारवृक्ष सूर्यमंडलापर्यंत पसरलेला आहे विषयलोलुप गृहस्थ या झाडाची दुःखरूप फळे खातात परंतु वनवासी संन्यासी याची सुखरूप फळे खातात एक असणारा मीच मायेमुळे अनेकरूप झालो आहे, हे श्रीगुरूंकडून जे लोक जाणून घेतात, तेच वेदांचे रहस्य जाणणारे होत. (२२-२३)


एवं गुरूपासनयैकभक्त्या
     विद्याकुठारेण शितेन धीरः ।
विवृश्च्य जीवाशयमप्रमत्तः
     संपद्य चात्मानमथ त्यजास्त्रम् ॥ २४ ॥
अनन्य भावे गुरुच्या पुढेच
     ते ज्ञान शस्त्रो उजळोनि घ्यावे ।
नी जीवभावे समुळेचि कापा
     ते यागुनीही स्वरुपी निवावे ॥ २४ ॥

एवं - याप्रकारे - गुरूपासनया - गुरूची उपासना - एकभक्त्या - एकाग्रभक्ति - शितेन विद्याकुठारेण - आणि तीक्ष्ण कुठाररूपी आत्मविद्या यांच्या मदतीने - जीवाशयं - जीवाचा सूक्ष्म शरीररूपी गाभा - विवृश्च्य - कापून - आत्मानं धीरः - व आत्मस्वरूपाची सावधानपणे - अप्रमत्तः संपद्य च - इंद्रियजयपूर्वक प्राप्ति करून घेऊन - अथ - मग - अस्त्रं त्यज - विद्यारूपी अस्त्र टालून दे. ॥ २४ ॥
हे उद्ववा ! अशा प्रकारे, गुरूंची सेवा आणि अनन्य भक्तीने तू ज्ञानाची कुर्‍हाड धारदार कर आणि तिने सावधपणे आपला जीवभाव तोडून टाक अशा रीतीने आत्मस्वरूप होऊन नंतर ती कुर्‍हाड टाकून दे. (२४)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
अध्याय बारावा समाप्त

GO TOP