|
श्रीमद् भागवत पुराण
भृगुकर्तृकं त्रिदेवपरिक्षणं तत्र विष्णोः श्रैष्ठ्यं पार्थेन सह भृगूकडून तीन देवांची परीक्षा व मेलेल्या ब्राह्मणबालकांना भगवंतांनी परत आणणे - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) सरस्वत्यास्तटे राजन् ऋषयः सत्रमासत । वितर्कः समभूत्तेषां त्रिष्वधीशेषु को महान् ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) सरस्वती नदीकाठी एकदा यज्ञ योजिण्या । बसता चालला वाद श्रेष्ठ तो कोण देव हो ॥ १ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - ऋषयः - ऋषि - सरस्वत्याः तटे - सरस्वती नदीच्या काठी - सत्त्रम् आसत - दीर्घ अवधीचा यज्ञ करिते झाले - त्रिषु अधीशेषु कः महान् (इति) - ब्रह्मा, विष्णु, महेश या तीन देवांमध्ये कोण मोठा असा - तेषां वितर्कः समभूत् - त्यांमध्ये वाद उत्पन्न झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी ऋषी एकत्र आले होते. ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू यांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण, याविषयी त्यांच्यामध्ये तर्क-वितर्क चालू होते. (१)
तस्य जिज्ञासया ते वै भृगुं ब्रह्मसुतं नृप ।
तज्ज्ञप्त्यै प्रेषयामासुः सोऽभ्यगाद् ब्रह्मणः सभाम् ॥ २ ॥
परीक्षा पाहण्या तेंव्हा भृगुंना पाठवीयले । ब्रह्मा शिव नि विष्णूच्या भेटीला या क्रमे तसे ॥ २ ॥
नृप - हे राजा - ते वै - ते ऋषि - तस्य जिज्ञासया - ते जाणण्याच्या इच्छेने - ब्रह्मसुतं भृगुं - ब्रह्मदेवाचा पुत्र जो भृगु ऋषि त्याला - तज्ज्ञप्त्यै प्रेषयामासुः - ते जाणण्यासाठी पाठविते झाले - सः ब्रह्मणः सभाम् अभ्यगात् - तो भृगु ब्रह्मदेवाच्या सभेत गेला. ॥२॥
परीक्षिता ! हे समजून घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाचा पुत्र भृगू याला पाठविले. तो सर्वप्रथम ब्रह्मदेवांच्या सभेत गेला. (२)
न तस्मै प्रह्वणं स्तोत्रं चक्रे सत्त्वपरीक्षया ।
तस्मै चुक्रोध भगवान् प्रज्वलन् स्वेन तेजसा ॥ ३ ॥
ब्रह्माजींच्या सभी जाता वंदिले नच ते तयां । तेजाने तापले ब्रह्मा क्रोध तो जाहला असा ॥ ३ ॥
सः - तो भृगु - सत्त्वपरीक्षया - सद्गुणांची कसोटी पहाण्यासाठी - तस्मै प्रह्वणं स्तोत्रं न चक्रे - त्या ब्रह्मदेवाला नमस्कार करिता झाला नाही व त्याची स्तुतिही करिता झाला नाही - भगवान् - ब्रह्मदेव - स्वेन तेजसा प्रज्वलन् - आपल्या तेजाने तळपणारा - तस्मै चुक्रोध - त्या भृगुच्यावर रागावला. ॥३॥
ब्रह्मदेवांची सत्त्वपरीक्षा घेण्यासाठी त्याने त्यांना नमस्कार केला नाही की, त्यांची स्तुती केली नाही. तेव्हा आपल्या तेजाने तळपणार्या ब्रह्मदेवांना त्याचा राग आला. (३)
स आत्मन्युत्थितं मन्युं आत्मजायात्मना प्रभुः ।
अशीशमद् यथा वह्निं स्वयोन्या वारिणाऽऽत्मभूः ॥ ४ ॥
ब्रह्म्याने पाहिले हा तो आपुला पुत्रची असे । विवेके जाहले शांत अग्नि जै शांत हो तसा ॥ ४ ॥
सः प्रभुः आत्मभूः - तो समर्थ ब्रह्मदेव - आत्मजाय - पुत्राला उद्देशून - आत्मना आत्मनि उत्थितं मन्युं - स्वतःच स्वतःच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या क्रोधाला - यथा स्वयोन्या वारिणा वह्निं (तथा) - जसे स्वतः अग्नीपासून उत्पन्न झालेल्या उदकाने अग्नीला विझवावे त्याप्रमाणे - अशीशमत् - शांत करिता झाला. ॥४॥
परंतु समर्थ ब्रह्मदेवांनी तो आपलाच पुत्र आहे, असे पाहून आलेला क्रोध विवेकबुद्धीने आतल्या आत शांत केला. जसा अग्नी स्वत:च्या पुत्ररूपी पाण्याने शांत होतो. (४)
ततः कैलासमगमत् स तं देवो महेश्वरः ।
परिरब्धुं समारेभ उत्थाय भ्रातरं मुदा ॥ ५ ॥
पुन्हा कैलासि ते गेले शंकरे पाहता भृगु । आलिंगुनी तदा शंभु स्वागता वदलेहि या ॥ ५ ॥
ततः सः कैलासम् अगमत् - नंतर तो भृगुऋषि कैलासास गेला - देवः महेश्वरः - देव शंकर - उत्थाय - उठून - मुदा - आनंदाने - तं भ्रातरं परिरब्धुं - तो भाऊ जो भृगुऋषि त्याला आलिंगन देण्याला - समारेभे - उद्युक्त झाला. ॥५॥
तेथून भृगू कैलासावर गेला. भगवान शंकरांनी आपला भाऊ भृगू आलेला पाहून आनंदाने ते उठून उभे राहिले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे झाले. (५)
नैच्छत्त्वमस्युत्पथग इति देवश्चुकोप ह ।
शूलमुद्यम्य तं हन्तुं आरेभे तिग्मलोचनः ॥ ६ ॥
परंतु भृगुने त्यांचा स्वागता न स्विकारिले । वदले वेद आज्ञेला तुम्ही तो नच मानिता । ऐकता तापले शंभू मारण्या घेतला त्रिशू ॥ ६ ॥
(सः परिभ्रमणं) न ऐच्छत् तो भृगु आलिंगनाला इच्छिता झाला नाही - त्वं उत्पथगः असि - तू वाईट मार्गाने जाणारा आहेस - इति (अब्रवीत्) - असे म्हणाला - देवः (तं) चुकोप ह - शंकर भृगुवर रागावला - तिग्मलोचनः - तीक्ष्ण आहेत डोळे ज्याचे असा तो - शूलं उद्यम्य - शूळ उगारून - तं हन्तुं आरेभे - त्या भृगुला मारू लागला. ॥६॥
परंतु भृगूने "तू मर्यादा सोडून वागणारा आहेस," असे म्हणून त्याच्या आलिंगनाचा स्वीकार केला नाही. ते ऐकून शंकरांचे डोळे क्रोधाने लाल झाले. आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला सरसावले. (६)
पतित्वा पादयोर्देवी सान्त्वयामास तं गिरा ।
अथो जगाम वैकुण्ठं यत्र देवो जनार्दनः ॥ ७ ॥
परी पार्वतिने त्यांच्या पायासी लागुनी तयां । केले शांत, तदा विप्र पातले विष्णुशी पुन्हा ॥ ७ ॥
देवी पादयोः पतित्वा - पार्वती शंकराच्या पाया पडून - (मधुरया) गिरा तं सान्त्वयामास - मधुर शब्दांनी शंकराला शांतविती झाली - अथ - नंतर - यत्र जनार्दनः देवः (आस्ते) - जेथे लोकरक्षक विष्णु असतो - (तं) वैकुण्ठं जगाम - त्या वैकुंठाला गेला. ॥७॥
परंतु त्याचवेळी देवी सतीने त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून गोड बोलून त्यांचे सांत्वन केले. नंतर भॄगू श्रीविष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठलोकात गेले. (७)
शयानं श्रिय उत्सङ्गे पदा वक्षस्यताडयत् ।
तत उत्थाय भगवान् सह लक्ष्म्या सतां गतिः ॥ ८ ॥ स्वतल्पादवरुह्याथ ननाम शिरसा मुनिम् । आह ते स्वागतं ब्रह्मन् निषीदात्रासने क्षणम् । अजानतां आगतान् चः क्षन्तुमर्हथ नः प्रभो ॥ ९ ॥
विष्णु तै झोपले होते लक्ष्मीजीच्या कुशीत तै । भृगुंनी मारिली लाथ विष्णु तै उठले पहा । विनम्र होवुनी त्यांनी भृगुला नमिले असे ॥ ८ ॥ सुस्वागतम् तुम्हा ब्रह्मन् माहीत नव्हते मला । म्हणोनी स्वागता लागी न आलो असुद्या क्षमा ॥ ९ ॥
श्रियः उत्सङगे शयानं (तं) - लक्ष्मीच्या मांडीवर निजलेल्या त्या विष्णूला - (सः) पदा वक्षसि अताडयत् - तो भृगु पायाने छातीवर ताडिता झाला - ततः - नंतर - सतांगतिः - साधूंचा आश्रय असा - भगवान् - श्रीविष्णु - लक्ष्म्या सह उत्थाय - लक्ष्मीसह उठून - स्वतल्पात् अवरुह्य - आपल्या शय्येवरून उतरून - अथ शिरसा मुनिं ननाम - नंतर मस्तकाने भृगुऋषीला नमस्कार करिता झाला. ॥८॥ आह (च) - आणि म्हणाला - ब्रह्मन् - हे भृगो - ते स्वागतं - तुझे स्वागत असो - अत्र आसने क्षणं निषीद - ह्या आसनावर क्षणभर बस - प्रभो - हे समर्थ ब्राह्मणा - आगतान् वः अजानतां नः - आलेल्या तुम्हाला न जाणणार्या आम्हाला - क्षन्तुम् अर्हथ - क्षमा करण्यास समर्थ आहा. ॥९॥
त्यावेळी भगवान विष्णू लक्ष्मीदेवींच्या मांडीवर आपले डोके ठेवून पहुडले होते. भृगूंनी तेथे जाऊन त्यांच्या वक्ष:स्थळावर एक लाथ मारली. भक्तवत्सल भगवान विष्णू लक्ष्मीसह उठून पलंगावरून खाली उतरले आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला. नंतर म्हणाले- ब्रह्मन ! आपले स्वागत असो. या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या. महर्षी ! आपण आल्याचे मला माहित नव्हते. म्हणून मी आपले स्वागत करू शकलो नाही. माझ्या या अपराधाची आपण क्षमा करावी. (८-९)
अतीव कोमलौ तात चरणौ ते महामुने ।
इत्युक्त्वा विप्रचरणौ मर्दयन् स्वेन पाणिना ॥ १० ॥
कोवळे तुमचे पाय भृगुजी हो महामुनी । वदोनी धरिता पाय विष्णु ते चेपु लागले ॥ १० ॥
तात - अहो - महामुने - महर्षे भृगो - ते चरणौ अतीव कोमलौ - तुझे पाय अत्यंत कोमल आहेत - इति उक्त्वा - असे बोलून - स्वेन पाणिना - आपल्या हाताने - विप्रचरणौ मर्दयन् (स्थितः) - त्या भृगुचे पाय चेपीत राहिला. ॥१०॥
हे महामुने ! आपले चरण अत्यंत कोमल आहेत. असे म्हणून भगवान, भृगूंचे चरण आपल्या हाताने चेपू लागले. (१०)
पुनीहि सहलोकं मां लोकपालांश्च मद्गतान् ।
पादोदकेन भवतः तीर्थानां तीर्थकारिणा ॥ ११ ॥
वदले तुमच्या पायें पाण्याचे तीर्थ होतसे । कृपया मम वैकुंठा पवित्र करणे द्विजा ॥ ११ ॥
भवतः - तुझ्या - तीर्थानां तीर्थकारिणा - तीर्थानाहि पवित्र करणार्या - पादोदकेन - पाय धुतलेल्या पाण्याने - सहलोकं मां - चतुर्दश भुवनांसह मला - च मद्गतान् लोकपालान् - आणि माझ्या ठिकाणी असणार्या लोकपालांना - पुनीहि - पवित्र कर. ॥११॥
आणि म्हणाले,- महर्षे ! तीर्थांनाही पवित्र करणार्या आपल्या चरणतीर्थाने वैकुंठलोक, मी आणि माझ्या आत राहाणार्या लोकपालांना पवित्र करावे. (११)
अद्याहं भगवंल्लक्ष्म्या आसमेकान्तभाजनम् ।
वत्स्यत्युरसि मे भूतिर्भवत्पादहतांहसः ॥ १२ ॥
तुमच्या पदस्पर्शाने संपले मम पाप ते । वक्षाच्या पदचिन्हासी राहील नित्य लक्षुमी ॥ १२ ॥
भगवन् - हे भृगो - अद्य अहं - आज मी - लक्ष्म्याः एकान्तभाजनम् आसम् - लक्ष्मीचे एकच एक असे निवासस्थान झालो आहे - भवत्पादहतांहसः मे उरसि - तुझ्या पायाच्या ताडनाने नष्ट झाले आहे पाप ज्याचे अशा माझ्या वक्षस्थलावर - भूतिः - लक्ष्मी - वत्स्यति - राहील. ॥१२॥
मुनिवर्य ! आज मी लक्ष्मीचे एकमेव आश्रयस्थान झालो. आपल्या चरणांच्या स्पर्शाने पापे नष्ट झालेल्या माझ्या वक्ष:स्थळावर लक्ष्मी नेहमी निवास करील. (१२)
श्रीशुक उवाच -
एवं ब्रुवाणे वैकुण्ठे भृगुस्तन्मन्द्रया गिरा । निर्वृतस्तर्पितस्तूष्णीं भक्त्युत्कण्ठोऽश्रुलोचनः ॥ १३ ॥
श्रीशुकदेव सांगतात - गंभीर बोलता विष्णु महर्षि भृगु हे अता । जाहले सुखि नी तृप्त आनंदे कंठ दाटलो ॥ १३ ॥
वैकुंठे मन्द्रया गिरा एवं ब्रुवाणे - श्रीविष्णु गंभीर वाणीने याप्रमाणे बोलत असता - भृगुः - भृगुमुनि - भक्त्युत्कंठः - भक्तीने उत्कंठित झालेला - अश्रुलोचनः - अश्रु वहात आहेत नेत्रातून ज्याच्या असा - तर्पितः - तृप्त झालेला - निर्वृतः - सुखी होत्साता - तूष्णीम् (आसीत्) - स्वस्थ राहिला. ॥१३॥
श्रीशुक म्हणतात- अत्यंत भावपूर्ण वाणीने जेव्हा भगवान असे म्हणाले, तेव्हा भृगू अतिशय आनंदित आणि तृप्त झाला. भक्तीच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यांत अश्रू तरारले आणि तो स्तब्ध झाला. (१३)
पुनश्च सत्रमाव्रज्य मुनीनां ब्रह्मवादिनाम् ।
स्वानुभूतमशेषेण राजन् भृगुरवर्णयत् ॥ १४ ॥
परीक्षित् ! भृगुजी आले सत्संगी परतोनिया । तिघांच्या त्या प्रसंगाला वर्णिले त्या सभेत तै ॥ १४ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - भृगुः - भृगुऋषी - पुनः - पुनः - ब्रह्मवादिनां मुनीनां सत्त्रं आव्रज्य - ब्रह्मवेत्त्या ऋषींच्या यज्ञात येऊन - च - आणि - स्वानुभूतं अशेषेण अवर्णयत् - आपण अनुभविलेले सविस्तर सांगता झाला. ॥१४॥
परीक्षिता ! तेथून परत फिरून भ्रूगू ब्रह्मवेत्त्या मुनींच्याकडे आला आणि त्याला तिन्ही ठिकाणी जो काही अनुभव आला, तो त्याने विस्तृतपणे सांगितला. (१४)
तन्निशम्याथ मुनयो विस्मिता मुक्तसंशयाः ।
भूयांसं श्रद्दधुर्विष्णुं यतः शान्तिर्यतोऽभयम् ॥ १५ ॥ धर्मः साक्षाद् यतो ज्ञानं वैराग्यं च तदन्वितम् । ऐश्वर्यं चाष्टधा यस्माद् यद्यशश्चात्ममलापहम् ॥ १६ ॥
विस्मयो जाहला सर्वां संदेह मिटला असे । विष्णुला मानिले सर्वे शांत नी अभयाश्रयो ॥ १५ ॥ भगवान् विष्णुने साक्षात् लाभते धर्म ज्ञान नी । वैराग्य आठि ऐश्वर्य यशही शुद्ध लाभते ॥ १६ ॥
अथ - मग - मुनयः - ऋषि - तत् निशम्य - ते ऐकून - विस्मिताः मुक्तसंशयाः - विस्मय पावलेले, संशयरहित झालेले - विष्णुं भूयांसं श्रद्दधुः - विष्णूला अत्यंत थोर मानू लागले - यतः शान्तिः यतः (च) अभयं (भवति) - ज्या विष्णूपासून शांति व ज्यापासून निर्भयता प्राप्त होते. ॥१५॥ यतः - ज्या ठिकाणी - साक्षात् धर्मः - प्रत्यक्ष धर्म - ज्ञानं - ज्ञान - तदन्वितं वैराग्यं च - व त्यामुळे येणारे वैराग्य - अष्टधा ऐश्वर्यं - आठ प्रकारचे ऐश्वर्य - यस्मात् - ज्यापासून - आत्ममलापहं यशः - चित्तावरील वासनारूप मळ दूर करणारी कीर्ती. ॥१६॥
ते ऐकून सर्व मुनींना अतिशय आश्चर्य वाटले व त्यांची शंकाही दूर झाली. तेव्हापासून ते भगवान विष्णूंनाच सर्वश्रेष्ठ मानू लागले. कारण तेच शांती आणि अभयाचे उगमस्थान असून, त्यांच्यापासूनच साक्षात धर्म, ज्ञान, वैराग्य, आठ प्रकारची ऐश्वर्ये आणि चित्त शुद्ध करणारे यश प्राप्त होते, असा निश्चय केला. (१५-१६)
मुनीनां न्यस्तदण्डानां शान्तानां समचेतसाम् ।
अकिञ्चनानां साधूनां यमाहुः परमां गतिम् ॥ १७ ॥
अकिंचन समा शांत साधुंचा अभयो हरी । गतिही एक तो विष्णु सर्व शास्त्रास मान्य हे ॥ १७ ॥
न्यस्तदंडानां शान्तानां - टाकिले आहेत कायिक, वाचिक इत्यादि दंड ज्यांनी अशा शांत चित्ताच्या - समचेतसां - सम बुद्धीच्या - अकिंचनानां साधूनां मुनीनां - सर्वसंगपरित्यागी अशा सदाचारसंपन्न ऋषींचा - परमां गतिम् - उत्तम आश्रय - (इति) यं आहुः - असे ज्याला म्हणतात. ॥१७॥
शांत , समचित्त, नि:स्पृह आणि सर्वांना अभय देणार्या साधूंचे व मुनींचे तेच एकमेव परम प्राप्तव्य आहेत, असे सगळी शास्त्रे सांगतात. (१७)
सत्त्वं यस्य प्रिया मूर्तिः ब्राह्मणास्त्विष्टदेवताः ।
भजन्त्यनाशिषः शान्ता यं वा निपुणबुद्धयः ॥ १८ ॥
सत्त्व त्याची प्रिय मूर्ति द्विज ते इष्ट देवता । विवेकी शांत निष्काम भजती त्याजला जन ॥ १८ ॥
सत्त्वं यस्य प्रिया मूर्तिः (अस्ति) - सत्त्वगुण हाच ज्याची आवडीची मूर्ति आहे - ब्राह्मणाः तु इष्टदेवताः (सन्ति) - व ब्राह्मण हे पूज्य देवता होत - अनाशिषः शान्ताः निपुणबुद्धयः - निरिच्छ, शांत व कुशल बुद्धीचे सत्पुरुष - यं वा भजन्ति - ज्याचे भजन करितात. ॥१८॥
सत्त्वगुण ही त्यांची प्रिय मूर्ती आहे आणि ब्राह्मण इष्टदेव आहेत. निष्काम, शांत आणि विवेकसंपन्न लोकच त्यांचे भजन करतात. (१८)
त्रिविधाकृतयस्तस्य राक्षसा असुराः सुराः ।
गुणिन्या मायया सृष्टाः सत्त्वं तत्तीर्थसाधनम् ॥ १९ ॥
राक्षसासुर नी देव मायेने मूर्ति निर्मि तो । सत्त्वाची देवमूर्ती ती प्राप्तीचे साधनो तया । पुरुषार्थ असा रूपी स्वयं विष्णुचि तो असे ॥ १९ ॥
गुणिन्या मायया सृष्टाः - त्रिगुणात्मक अशा मायेने उत्पन्न केलेल्या - राक्षसाः असुराः सुराः (इति) - राक्षस, दैत्य व देव अशा - तस्य त्रिविधा आकृतयः (भवन्ति) - त्या श्रीविष्णुच्या तीन प्रकारच्या आकृति आहेत - सत्त्वं तत्तीर्थसाधनम् - सत्त्वगुण हाच त्या पवित्र वस्तूची प्राप्ति करून देण्याचे साधन होय. ॥१९॥
भगवंतांच्या गुणमय मायेने राक्षस, असुर आणि देवता असे त्यांचे तीन प्रकार निर्माण केले आहेत. त्यांपैकी सत्त्वमय देवमूर्तीच त्यांच्या प्राप्तीचे साधन आहे. (१९)
श्रीशुक उवाच -
इत्थं सारस्वता विप्रा नृणां संशयनुत्तये । पुरुषस्य पदाम्भोज सेवया तद्गतिं गताः ॥ २० ॥
श्रीशुकदेव सांगतात - सरस्वती नदीकाठी जमले सर्व जे ऋषी । संशयो सर्व लोकांचा मिटाया योजिले असे । तयांनी भजता विष्णु गति उत्तम घेतली ॥ २० ॥
एवं - याप्रमाणे - नृणां संशयन????????????? - मनुष्यांचे संशय दूर करण्यासाठी - सारस्वताः विप्राः - सरस्वती नदीच्या काठी यज्ञ करीत बसलेले ब्राह्मण - पुरुषस्य पदाम्भोजसेवया - श्रीकृष्णाच्या चरणकमलाच्या सेवेने - तद्गतिं गताः - त्याच्या स्थानाला गेले. ॥२०॥
श्रीशुक म्हणतात- सरस्वती नदीच्या तटावरील ऋषींनी लोकांचा संशय दूर करण्यासाठी ही युक्ती योजिली होती. पुरुषोत्तमांच्या चरणकमलांची सेवा करून त्यांनी त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले. (२०)
श्रीसूत उवाच -
( प्रहर्षिणि ) इत्येतन्मुनितनयास्यपद्मगन्ध पीयूषं भवभयभित्परस्य पुंसः । सुश्लोकं श्रवणपुटैः पिबत्यभीक्ष्णम् पान्थोऽध्वभ्रमणपरिश्रमं जहाति ॥ २१ ॥
श्रीसूत सांगतात - ( प्रहर्षिणी ) कीर्ति ही अशि हरिची भवास नष्टी श्रीव्यासोतनय मुखी सुधाचि धारा । संसारी पथिक पिता न तो थके की विश्वी या भटकत तो जरी फिरे की ॥ २१ ॥
इति एतत् - याप्रमाणे हे - मुनितनयास्यपद्मगन्धपीयूषं - शुकाचार्याच्या मुखकमलापासून निघालेले पुष्परसामृताप्रमाणे मधुर असे - भवभयभित् - संसाराची भीति दूर करणारे - परस्य पुंसः सुश्लोकं - श्रेष्ठ पुरुष अशा श्रीकृष्णाचे श्रेष्ठ यशोरुपी माहात्म्य - श्रवणपुटैः अभीक्ष्णं पिबति - कर्णद्वारा एकसारखे प्राशन करितो - (सः) पान्थः अध्वभ्रमणपरिश्रमं जहाति - तो वाटसरु संसार मार्गांत भ्रमण केल्यामुळे उत्पन्न होणार्या श्रमाला दूर करितो ॥२१॥
सूत म्हणतात- पुरुषोत्तमांची ही कमनीय कीर्तिकथा जन्म-मृत्यूरूप संसाराचे भय नाहीसे करणारी आहे. श्रीशुकदेवांच्या मुखारविंदाचा सुगंध असलेले हे अमृत आहे. जन्म-मरणाचा दीर्घ प्रवास करणारा जो वाटसरू आपल्या कानांच्या द्रोणांनी हिचे निरंतर पान करतो, त्याचा सारा थकवा हिच्यामुळे नाहीसा होतो. (२१)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) एकदा द्वारवत्यां तु विप्रपत्न्याः कुमारकः । जातमात्रो भुवं स्पृष्ट्वा ममार किल भारत ॥ २२ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) एकदा द्वारकेमाजी द्विजेला पुत्र जाहला । जन्मताचि परी मेला धरेचा स्पर्श हो क्षणी ॥ २२ ॥
भारत - हे परीक्षिता - एकदा - एके दिवशी - द्वारवत्यां - द्वारकेत - विप्रपत्न्याः कुमारकः तु - ब्राह्मण स्त्रीचा पुत्र तर - जातमात्रः - नुकताच जन्मलेला असा - भुवं स्पृष्ट्वा किल ममार - पृथ्वीला स्पर्श करून खरोखर मेला ॥२२॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! एकदा द्वारकेत एका ब्राह्मणस्त्रीने एका पुत्राला जन्म दिला, परंतु जमिनीवर ठेवताच तो मरण पावला. (२२)
विप्रो गृहीत्वा मृतकं राजद्वार्युपधाय सः ।
इदं प्रोवाच विलपन् आतुरो दीनमानसः ॥ २३ ॥
बाळाचे प्रेत त्या विप्रे घेतले द्वारि पातला । विलाप करुनी मोठा दुःखाने बोलु लागला ॥ २३ ॥
सः विप्रः - तो ब्राह्मण - मृतकं (सुतं) गृहीत्वा - मेलेल्या पुत्राला घेऊन - राजद्वारि उपधाय - राजसभेच्या द्वाराजवळ ठेवून - आतुरः दीनमानसः - दुःखी व दीन आहे मन ज्याचे असा - विलपन् - रडत - इदं प्रोवाच - हे म्हणाला ॥२३॥
आपल्या मृत बालकाचे प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला आणि त्याला तेथे ठेवून दु:खी अंत:करणाने शोक करीत असे म्हणू लागला. (२३)
ब्रह्मद्विषः शठधियो लुब्धस्य विषयात्मनः ।
क्षत्रबन्धोः कर्मदोषात् पंचत्वं मे गतोऽर्भकः ॥ २४ ॥
द्विजद्वेषी नि कृपणो धूर्त ते राजकर्म की । म्हणॊनी मम हा बाळ मेलासे वाटते मला ॥ २४ ॥
ब्रह्मद्विषः शठधियः - ब्राह्मणांचा द्वेष करणार्या, लबाडी करणार्या - लुब्धस्य विषयात्मनः - लोभिष्ट व विषयासक्त झालेल्या - क्षत्रबन्धोः कर्मदोषात् - दुष्ट क्षत्रिय राजाच्या दुष्कृत्यांमुळे - मे अर्भकः पञ्चत्वां गतः - माझा पुत्र मृत झाला ॥२४॥
ब्राह्मणद्रोही, धूर्त, लोभी आणि विषयी राजाच्या कर्मदोषानेच माझ्या बालाकाचा मृत्यू झाला आहे. (२४)
हिंसाविहारं नृपतिं दुःशीलं अजितेन्द्रियम् ।
प्रजा भजन्त्यः सीदन्ति दरिद्रा नित्यदुःखिताः ॥ २५ ॥
हिंसाप्रीय असा राजा अजितेंद्रिय तो म्हणा । नृपती म्हणता त्याला दारिद्य दुःख भोगणे ॥ २५ ॥
हिंसाविहारं - लोकांचा प्राण घेऊन क्रीडा करणार्या - दुःशीलं अजितेन्द्रियं - दुष्ट स्वभावाच्या व जिंकिली नाहीत इंद्रिये ज्याने अशा - नृपतिं - राजाला - भजन्त्यः प्रजाः - भजणार्या प्रजा - दरिद्राः नित्यदुःखिताः (भूत्वा) - दरिद्री व नित्यदुःखित होऊन - सीदन्ति - खेद पावतात ॥२५॥
जो राजा हिंसा करण्यात आनंद मानणारा , गुष्ट आणि इंद्रिये न जिंकलेला असा असतो, त्याला राजा मानून त्याची सेवा करणारी प्रजा दारिद्र्यात पडून दु:खच दु:ख भोगते. (२५)
एवं द्वितीयं विप्रर्षिः तृतीयं त्वेवमेव च ।
विसृज्य स नृपद्वारि तां गाथां समगायत ॥ २६ ॥
अल्पायु जन्मती बाळे वदता विप्र तो असे । टाकिले प्रेत द्वारासी गेला कृष्णास भेटण्या ॥ २६ ॥
एवं - याप्रमाणे - सः विप्रर्षिः - तो ब्राह्मण - द्वितीयं - दुसर्या - एवमेवच तृतीयं तु - त्याचप्रमाणे तिसर्या मुलालाहि - नृपद्वारि विसृज्य - राजद्वाराजवळ ठेवून - तां गाथां समगायत - तेच वाक्य बोलला. ॥२६॥
परीक्षिता ! अशा प्रकारे आपले दुसरे आणि तिसरे अपत्यसुद्धा जन्मत:च मरण पावल्यानंतर तो ब्राह्मण त्या पुत्रांची प्रेते राजवाड्याच्या दरवाजासमोर टाकून तेच म्हणून गेला. (२६)
तामर्जुन उपश्रुत्य कर्हिचित् केशवान्तिके ।
परेते नवमे बाले ब्राह्मणं समभाषत ॥ २७ ॥
मेलेले बाळ टाकोनी कृष्णाला भेटला द्विज । तिथे अर्जुनही होते ऐकता बोलले द्विजा ॥ २७ ॥
कर्हिचित् - एका प्रसंगी - नवमे बाले परेते - नववा बालक मृत झाला असता - अर्जुनः - अर्जुन - केशवान्तिके - श्रीकृष्णासमीप - तां उपश्रुत्य - ते वाक्य ऐकून - ब्राह्मणं समभाषत - ब्राह्मणाला म्हणाला. ॥२७॥
नववे मूल मरण पावल्यावर जेव्हा त्या ब्राह्मणाने ते प्रेत तेथे टाकून पूर्वीप्रमाणेच म्हटले, त्यावेळी श्रीकृष्णांच्या शेजारी बसलेल्या अर्जुनाने ते ऐकून ब्राह्मणाला म्हटले. (२७)
किं स्विद्ब्रह्मंन् त्वन्निवासे इह नास्ति धनुर्धरः ।
राजन्यबन्धुरेते वै ब्राह्मणाः सत्रमासते ॥ २८ ॥
ब्रह्मन् ! या द्वारके माजी न कोणी का धनुर्धर । यदु हे वाटती विप्र जणू यज्ञात गुंतले ॥ २८ ॥
ब्रह्मन् - हे ब्राह्मणा - इह त्वन्निवासे - ह्या तुझ्या रहाण्याच्या ठिकाणी - किंस्वित् राजन्यबन्धुः धनुर्धरः न अस्ति - कोणीहि धनुर्धारी क्षत्रिय नाही - वै - खरोखर - एते (सर्वे क्षत्रियाः) - हे सर्व क्षत्रिय - ब्राह्मणाः - ब्राह्मण होत - सत्त्रं आसते - यज्ञ करीत बसले होते. ॥२८॥
हे ब्राह्मणा ! आपण राहात असलेल्या द्वारकेमध्ये कोणी धनुर्धारी नाममात्र क्षत्रियही नाही काय ? हे यादव म्हणजे यज्ञ करण्यासाठी बसलेले ब्राह्मण असावेत ! (२८)
धनदारात्मजापृक्ता यत्र शोचन्ति ब्राह्मणाः ।
ते वै राजन्यवेषेण नटा जीवन्त्यसुम्भराः ॥ २९ ॥
धन स्त्री अथवा पुत्र-वियोगे दुःखि जै द्विज । राज्याचे क्षत्रियो तेंव्हा व्यर्थची नट ते जसे ॥ २९ ॥
यत्र धनदारात्मजापृक्ताः ब्राह्मणाः शोचंति - ज्या राज्यात द्रव्य, स्त्री, पुत्र यांनी विरहित झालेले ब्राह्मण दुःखी होतात - वै - खरोखर - ते असुंभराः नटाः राजन्यवेषेण जीवन्ति - ते प्राणांचे पोषण करणारे नटच राजवेष घेऊन रहात आहेत. ॥२९॥
ज्या राज्यामध्ये धन, स्त्री किंवा पुत्राचा वियोग झाल्यामुळे ब्राह्मण दु:खी होतात, ते राजे क्षत्रियांचा वेष धारण केलेले, पोटभरू नटच होत. (२९)
अहं प्रजाः वां भगवन् रक्षिष्ये दीनयोरिह ।
अनिस्तीर्णप्रतिज्ञोऽग्निं प्रवेक्ष्ये हतकल्मषः ॥ ३० ॥
शोकात बुडले तुम्ही रक्षितो तुमची प्रजा । प्रतिज्ञा जर हो खोटी तर मी जाळितो स्वयां ॥ ३० ॥
भगवन् - हे ब्राह्मणा - अहं - मी - इह - येथे - दीनयोः वाम् - दीन अशा तुमच्या - प्रजां रक्षिष्ये - संततीचे रक्षण करीन - अनिस्तीर्णप्रतिज्ञः - सिद्धीला गेलेली नाही प्रतिज्ञा ज्याची असा मी - अग्निं प्रवेक्ष्ये - अग्निप्रवेश करीन - हतकल्मषः (भविष्यामि) - नष्ट झाले आहे पाप ज्याचे असा होईन. ॥३०॥
हे ब्राह्मणा ! पुत्रांच्या मृत्यूमुळे दु:खी असलेल्या तुमच्या संतानाचे मी रक्षण करीन. जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही, तर अग्निप्रवेश करून प्रायश्चित्त घेईन. (३०)
श्रीब्राह्मण उवाच -
सङ्कर्षणो वासुदेवः प्रद्युम्नो धन्विनां वरः । अनिरुद्धोऽप्रतिरथो न त्रातुं शक्नुवन्ति यत् ॥ ३१ ॥ तत्कथं नु भवान् कर्म दुष्करं जगदीश्वरैः । त्वं चिकीर्षसि बालिश्यात् तन्न श्रद्दध्महे वयम् ॥ ३२ ॥
ब्राह्मण म्हणाला - वासुदेव बळीराम प्रद्युम्न वीर थोर तो । अनिरुद्ध असा योद्धा न समर्थ कुणी तसा ॥ ३१ ॥ न शके रक्षु तो कृष्ण तुजला शक्य ते कसे । मूर्खता वाटते सर्व विश्वास नच मी धरी ॥ ३२ ॥
संकर्षणः वासुदेवः धन्विनां वरः प्रद्युम्नः अप्रतिरथः अनिरुद्धः (च) - बलराम, श्रीकृष्ण, धनुर्धार्यांत श्रेष्ठ असा प्रद्युम्न व ज्याच्यासमोर कोणीहि युद्धासाठी उभा राहू शकत नाही असा अनिरुद्ध हे - यत् त्रातुं न शक्नुवन्ति - ज्या बालकाचे रक्षण करण्यास समर्थ नाहीत. ॥३१॥ तत् - ते - भवान् कथं नु (शक्नोति) - तू कसे करू शकशील - बालिश्यात् - मूर्खपणाने - जगदीश्वरैः दुष्करं कर्म - त्रैलोक्याधिपतींनाहि करिता न येणारे कार्य - त्वं चिकीर्षसि - तू करण्याची इच्छा करितोस - वयं तत् न श्रद्दध्महे - आम्ही ते खरे मानीत नाही. ॥३२॥
ब्राह्मण म्हणाला- येथे बलराम, श्रीकृष्ण, श्रेष्ठ धनुर्धर प्रद्युम्न , अद्वितीय योद्धा अनिरुद्धसुद्धा जेथे माझ्या बालकांचे रक्षण करू शकले नाहीत, या जगदीश्वरांनासुद्धा जे काम करणे अवघड झाले, ते तुम्ही कसे काय करू इच्छिता? हा तुमचा मला पोरकटपणा वाटतो. आमचा या म्हणण्यावर विश्वास नाही. (३१-३२)
श्रीअर्जुन उवाच -
नाहं सङ्कर्षणो ब्रह्मन् न कृष्णः कार्ष्णिरेव च । अहं वा अर्जुनो नाम गाण्डीवं यस्य वै धनुः ॥ ३३ ॥
अर्जुन म्हणाला - न मी संकर्षणो विप्रा प्रद्युम्न कृष्णही न मी । अर्जुनो मम हे नाम विख्यात गांडिवो धनु ॥ ३३ ॥
ब्रह्मन् - हे ब्राह्मणा - अहं संकर्षणः न - मी बलराम नव्हे - कृष्णः कार्ष्णिः च एव न - कृष्ण व प्रद्युम्नहि नव्हे - अहं वा अर्जुनः - मी तर अर्जुन आहे - यस्य वै गाण्डीवं नाम धनुः - ज्याच्या जवळ गांडीव धनुष्य आहे. ॥३३॥
अर्जुन म्हणाला- ब्रह्मन ! मी बलराम, श्रीकृष्ण किंवा प्रद्युम्न नाही. ज्याचे गांडीव नावाचे धनुष्य आहे, तो मी अर्जुन आहे. (३३)
मावमंस्था मम ब्रह्मन् वीर्यं त्र्यम्बकतोषणम् ।
मृत्युं विजित्य प्रधने आनेष्ये ते प्रजाः प्रभो ॥ ३४ ॥
तिरस्कार न व्हावा जी शौर्ये मी शिव तोषिला । युद्धात जिंकितो मृत्यू आणितो बाळ ते पुन्हा ॥ ३४ ॥
ब्रह्मन् - हे ब्राह्मणा - मम त्र्यंबकतोषणम् वीर्यम् - शंकरालाहि संतुष्ट करणारा माझा पराक्रम - मा अवमंस्थाः - अवमानू नको - प्रभो - हे समर्थ ब्राह्मणा - प्रघने मृत्यूं विजित्य - युद्धात मृत्यूला जिंकून - ते प्रजाम् आनेष्ये - तुझ्या संततीला मी परत आणीन. ॥३४॥
हे ब्राह्मणा ! माझ्या पराक्रमाला नावे ठेवू नकोस. मी माझ्या पराक्रमाने भगवान शंकरांना संतुष्ट केले आहे. युद्धामध्ये मी मृत्यूला जिंकून तुझे मूल आणून देईन. (३४)
एवं विश्रम्भितो विप्रः फाल्गुनेन परंतप ।
जगाम स्वगृहं प्रीतः पार्थवीर्यं निशामयन् ॥ ३५ ॥
आश्वासिता असा पार्थ प्रसन्न विप्र जाहला । बल पौरुष गावोनी पातला आपुल्या घरा ॥ ३५ ॥
परंतप - हे शत्रुतापना परीक्षिता - एवं फाल्गुनेन विश्रम्भितः विप्रः - याप्रमाणे अर्जुनाने विश्वास दाखविलेला ब्राह्मण - प्रीतः पार्थवीर्यं निशामयन् - प्रसन्न अंतःकरणाने अर्जुनाचा पराक्रम सर्वांना ऐकवीत - स्वगृहं जगाम - आपल्या घरी गेला. ॥३५॥
परीक्षिता ! त्या ब्राह्मणाला अर्जुनाने जेव्हा असे आश्वासन दिले, तेव्हा तो लोकांना त्याच्या पराक्रमाचे वर्णन ऐकवीट प्रसन्न मनाने घरी गेला. (३५)
प्रसूतिकाल आसन्ने भार्याया द्विजसत्तमः ।
पाहि पाहि प्रजां मृत्योः इत्याहार्जुनमातुरः ॥ ३६ ॥
प्रसव समयो येता अर्जुना भेटुनी द्विज । या वेळी वाचवा तुम्ही माझे बालक जन्मता ॥ ३६ ॥
भार्यायाः प्रसूतिकाले आसन्ने - स्त्रीचा प्रसूत होण्याचा काळ जवळ आला असता - आतुरः द्विजसत्तमः - भीतीने व्याकुळ झालेला तो श्रेष्ठ ब्राह्मण - प्रजां मृत्योः पाहि पाहि - संततीचे मृत्यूपासून रक्षण कर, रक्षण कर - इति अर्जुनं आह - असे अर्जुनाला म्हणाला. ॥३६॥
पत्नीच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर ब्राह्मण व्याकूळ होऊन अर्जुनाकडे येऊन म्हणू लागला, " वाचवा. माझ्या मुलाला मृत्यूपासून वाचवा. " (३६)
स उपस्पृश्य शुच्यम्भो नमस्कृत्य महेश्वरम् ।
दिव्यान्यस्त्राणि संस्मृत्य सज्यं गाण्डीवमाददे ॥ ३७ ॥
अर्जुने ऐकता केले आचम्य शुद्ध त्या जले । शंकरा नमिले आणि गांडिवा घेतले करीं ॥ ३७ ॥
सः - तो अर्जुन - शुचि अम्भः उपस्पृश्य - निर्मळ पवित्र उदकाचे आचमन करून - महेश्वरं नमस्कृत्य - शंकराला नमस्कार करून - दिव्यानि अस्त्राणि संस्मृत्य - तेजस्वी अस्त्रांचे स्मरण करून - सज्यं गाण्डीवं आददे - दोरी चढविलेले गाण्डीव धनुष्य घेता झाला. ॥३७॥
हे ऐकून अर्जुनाने पवित्र पाण्याने आचमन केले, शंकरांना नमस्कार केला, दिव्य अस्त्रांचे स्मरण केले आणि गांडीव धनुष्य सज्ज करून हातात घेतले. (३७)
न्यरुणत् सूतिकागारं शरैर्नानास्त्रयोजितैः ।
तिर्यगूर्ध्वमधः पार्थः चकार शरपञ्जरम् ॥ ३८ ॥
अर्जुने मंत्रिले बाण प्रसवगृह घेरले । सर्व बाजून तो केला पिंजरा जो सुरक्षित ॥ ३८ ॥
पार्थः - अर्जुन - नानस्त्रयोजितैः शरैः - अनेक प्रकारच्या अस्त्रांची योजना केलेल्या बाणांनी - तिर्यक् ऊर्ध्वं अधः - तिरके, वरती, खालती - सूतिकागारं न्यरुणत् - बाळंतिणीची खोली वेढिता झाला - शरपञ्जरं चकार - बाणांचा पिंजरा करिता झाला. ॥३८॥
बाणांना अनेक प्रकारच्या अस्त्रमंत्रांनी अभिमंत्रित करून अर्जुनाने प्रसूतिगृहाच्या सर्व बाजूंनी त्या बाणांचा एक पिंजरा तयार केला. (३८)
ततः कुमारः सञ्जातो विप्रपत्न्या रुदन् मुहुः ।
सद्योऽदर्शनमापेदे सशरीरो विहायसा ॥ ३९ ॥
प्रसवली द्विजा तेंव्हा मूल ते लागले रडू । पाहता पाहता झाले अंतर्धान नभात की ॥ ३९ ॥
ततः - नंतर - विप्रपत्न्याः - ब्राह्मणस्त्रीला - कुमारः संजातः - पुत्र झाला - सद्यः - तत्काळ - मुहुः रुदन् - वारंवार रडणारा - सशरीरः (सः) - शरीरासह तो पुत्र - विहायसा अदर्शनम् आपेदे - आकाशमार्गाने दिसत नाहीसा झाला. ॥३९॥
यानंतर ब्राह्मणस्त्रीने एका पुत्राला जन्म दिला, जो सारखा रडत होता. परंतु पाहाता पाहाताच तो आपल्या शरीरासह आकाशात दिसेनासा झाला. (३९)
तदाह विप्रो विजयं विनिन्दन् कृष्णसन्निधौ ।
मौढ्यं पश्यत मे योऽहं श्रद्दधे क्लीबकत्थनम् ॥ ४० ॥
कृष्णा समक्ष तो आता अर्जुना निंदु लागला । मूर्ख मी याच षंढाशी विश्वास ठेविला असे ॥ ४० ॥
तदा - त्यावेळी - विप्रः - तो ब्राह्मण - कृष्णसन्निधौ विजयं विनिन्दन् आह - श्रीकृष्णाजवळ अर्जुनाची निंदा करीत म्हणाला - मे मौढ्यं पश्यत - माझा मूर्खपणा पहा - यः अहं - जो मी - क्लीबकत्थनं श्रद्दधे - नपुंसकाच्या बडबडीवर विश्वास ठेवला. ॥४०॥
तेव्हा तो ब्राह्मण श्रीकृष्णांच्या देखतच अर्जुनाची निंदा करू लागला. तो म्हणाला- माझा मूर्खपणा तर पहा ! मी या नपुंसकाच्या फुशारकीच्या शब्दांवर विश्वास ठेवला. (४०)
न प्रद्युम्नो नानिरुद्धो न रामो न च केशवः ।
यस्य शेकुः परित्रातुं कोऽन्यस्तदवितेश्वरः ॥ ४१ ॥
न प्रद्युम्नो अनिरुद्धो न राम अन केशव । वाचवू शकले तेंव्हा कोणा सामर्थ्य या जगीं ॥ ४१ ॥
यस्य परित्रातुं - ज्याचे रक्षण करण्यास - प्रद्युम्नः न अनिरुद्धः न रामः न केशवः च न शेकुः - प्रद्युम्न, अनिरुद्ध, बलराम आणि श्रीकृष्ण हे समर्थ झाले नाहीत - अन्यः कः ईश्वरः तत् अविता - दुसरा कोणता समर्थ राजपुरुष त्या बालकांचे रक्षण करील ? ॥४१॥
ज्याला प्रद्युम्न, अनिरुद्ध एवढेच काय , पण बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा वाचवू शकले नाहीत, त्याचे रक्षण करण्यास दुसरा कोण समर्थ असू शकेल बरे ? (४१)
धिग् अर्जुनं मृषावादं धिग् आत्मश्लाघिनो धनुः ।
दैवोपसृष्टं यो मौढ्याद् आनिनीषति दुर्मतिः ॥ ४२ ॥
धिक्कार अर्जुना खोट्या धिक्कार धनुचा तुझ्या । मूढ हा आणितो बाळा म्हणे, प्रारब्ध हे असे ॥ ४२ ॥
मृषावादं अर्जुनं धिक् - खोटे बोलणार्या अर्जुनाचा धिक्कार असो - आत्मश्लाघिनः (तस्य) धनुः धिक् - स्वतःची प्रौढी मिरविणार्या अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचाहि धिक्कार असो - यः दुर्मतिः - जो कोत्या बुद्धीचा अर्जुन - मौढयात् - वेडगळपणाने - दैवोपसृष्टं आनिनीषति - दैवाने ग्रासिलेल्याला परत आणण्याची इच्छा करितो. ॥४२॥
खोटारड्या अर्जुनाचा धिःकार असो ! आपल्याच तोंडाने बढाई मारणार्या अर्जुनाच्या धनुष्याचा धि:कार असो ! जो मंदबुद्धी, प्रारब्धाने आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणाने परत आणू पाहातो. (४२)
एवं शपति विप्रर्षौ विद्यामास्थाय फाल्गुनः ।
ययौ संयमनीमाशु यत्रास्ते भगवान्यमः ॥ ४३ ॥
बरे वाईट ते सारे विप्र तो बोलु लागला । संयमनीपुरी तेंव्हा गेला अर्जुन निश्चये ॥ ४३ ॥
विप्रर्षौ एवं शपति - तो ब्राह्मण याप्रमाणे दोष देत असता - फाल्गुनः विद्यां आस्थाय - अर्जुन योगविद्येचा अवलंब करून - आशु संयमनीं ययौ - लवकर यमाच्या संयमनी नगरीला गेला - यत्र भगवान् यमः आस्ते - जेथे भगवान यम रहातो. ॥४३॥
जेव्हा तो ब्राह्मण असे शिव्याशाप देऊ लागला, तेव्हा अर्जुन ताबडतोब योगबळाने यमराजांचे निवासस्थान असलेल्या संयमनीपुरीला गेला. (४३)
विप्रापत्यमचक्षाणः तत ऐन्द्रीमगात् पुरीम् ।
आग्नेयीं नैर्ऋतीं सौम्यां वायव्यां वारुणीमथ । रसातलं नाकपृष्ठं धिष्ण्यान्यन्यान्युदायुधः ॥ ४४ ॥
न मिळे बाळ ते तेथे तै इंद्र अग्नि निर्ऋति । सोम वायु वरुणाच्या पुरासी पातला क्रमे । स्वर्गादी सर्व लोकात अन्यान्य स्थानि पातला ॥ ४४ ॥
उदायुधः (सः) - आयुध धारण केलेला तो अर्जुन - (तत्र) विप्रापत्यं अचक्षाणः - तेथे ब्राह्मणाच्या पुत्राला न पहाणारा - ततः ऐन्द्रीं पुरीं अगात् - तेथून इंद्राच्या अमरावती नगरीला गेला - अथ - नंतर - आग्नेयीं नैऋतीं सौम्यां वायव्यां वारुणीं (च) - अग्नीच्या नगरीला, राक्षसांच्या नगरीला, सोमलोकाला, वायुलोकाला आणि वरुणाच्या नगरीला - रसातलं नाकपृष्ठं अन्यानि धिष्ण्यानि (च ययौ) - पाताळात, स्वर्गात व दुसर्याहि अनेक ठिकाणी गेला. ॥४४॥
तेथे त्याला ब्राह्मणबालक मिळाला नाही, मग तो धनुष्य घेऊन इंद्र, अग्नी, निऋती, सोम, वायू आणि वरुण यांच्या नगरांत, रसातळ व स्वर्गाच्या वर असणार्या लोकांत तसेच इतरही पुष्कळ ठिकाणी गेला. (४४)
ततोऽलब्धद्विजसुतो ह्यनिस्तीर्णप्रतिश्रुतः ।
अग्निं विविक्षुः कृष्णेन प्रत्युक्तः प्रतिषेधता ॥ ४५ ॥
तरी बाळ न भेटेची तेंव्हा अग्नीत जावया । विचार करिता त्याने रोधोनी कृष्ण बोलले ॥ ४५ ॥
ततः अलब्धद्विजसुतः - तेथेहि मिळाला नाही ब्राह्मण पुत्र ज्याला असा - अनिस्तीर्णप्रतिश्रुतः - पूर्ण झाले नाही वचन ज्याचे असा अर्जुन - अग्निं विविक्षुः - अग्निप्रवेश करण्यास इच्छिणारा - प्रतिषेधता कृष्णेन प्रत्युक्तः हि - निषेध करण्याच्या श्रीकृष्णाकडून खरोखर बोलला गेला. ॥४५॥
परंतु त्याला ब्राह्मणबालक मिळाला नाही. त्याची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही. तेव्हा त्याने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला. परंतु श्रीकृष्णांनी त्याला अडवून म्हटले. (४५)
दर्शये द्विजसूनूंस्ते मावज्ञात्मानमात्मना ।
ये ते नः कीर्तिं विमलां मनुष्याः स्थापयिष्यन्ति ॥ ४६ ॥
स्वताला नच तू द्वेषू दावितो द्विजपुत्र तो । आज जे निंदिती ते ते गातील यश ते पुन्हा ॥ ४६ ॥
ते द्विजसूनून् दर्शये - तुला ब्राह्मणाचे मुलगे दाखवितो - आत्मना आत्मानं मा अवज्ञ - स्वतः स्वतःचा अपमान करू नको - ये (अधुना निन्दंति) ते मनुष्याः - जे आता निंदीत आहेत ते मनुष्य - नः विमलां कीर्तिं स्थापयिष्यन्ति - आमच्या पवित्र कीर्तीला स्थापित करितील. ॥४६॥
अर्जुना ! तू असा स्वत:च स्वत:चा तिरस्कार करू नकोस. ब्राह्मणाची सर्व मुले मी तुला आता दाखवतो. जे लोक आज आपली निंदा करीत आहेत, तेच नंतर आपली निर्मळ कीर्ती प्रस्थापित करतील. (४६)
इति संभाष्य भगवान् अर्जुनेन सहेश्वरः ।
दिव्यं स्वरथमास्थाय प्रतीचीं दिशमाविशत् ॥ ४७ ॥
शक्तिमान् भगवान् कृष्णे समजावुनि त्या सवे । रथात बैसता गेले निघोनी पश्चिमेकडे ॥ ४७ ॥
भगवान् ईश्वरः - भगवान श्रीकृष्ण - इति संभाष्य - असे भाषण करून - अर्जुनेन सह - अर्जुनासह - दिव्यं स्वरथम् आस्थाय - तेजस्वी अशा आपल्या रथात बसून - प्रतीचीं दिशम् आविशत् - पश्चिम दिशेत प्रवेश करिता झाला. ॥४७॥
सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजूत घालून ते अर्जुनासह आपल्या दिव्य रथात बसून पश्चिम दिशेकडे निघाले. (४७)
सप्त द्वीपान् ससिन्धून् सप्त सप्त गिरीनथ ।
लोकालोकं तथातीत्य विवेश सुमहत्तमः ॥ ४८ ॥
सप्त पर्वत नी द्वीप सप्त सागर लोक ते । ओलांडुनि तदा घोर अंधारी कृष्ण पातले ॥ ४८ ॥
अथ - नंतर - सप्त सप्त गिरीन् सप्तद्वीपान् सप्तसिन्धून् - सात सात पर्वत असलेली सात द्वीपे, सात समुद्र यांना - तथा लोकालोकं - त्याचप्रमाणे लोकालोक पर्वताला - अतीत्य - उल्लंघून - सुमहत् तमः विवेश - अत्यंत मोठया अंधारात शिरला. ॥४८॥
त्यांनी सात सात पर्वत असणारी सात द्वीपे, सात समुद्र आणि लोकालोक पर्वत ओलांडून घोर अंधकारात प्रवेश केला. (४८)
तत्राश्वाः शैब्यसुग्रीव मेघपुष्पबलाहकाः ।
तमसि भ्रष्टगतयो बभूवुर्भरतर्षभ ॥ ४९ ॥
अश्व ते शैब्य सुग्रीव मेघपुष्प बलाक हे । चुकले मार्ग तो घोर अंधार दाटला असे ॥ ४९ ॥
भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा परीक्षिता - तत्र - तेथे - शैब्यसुग्रीवमेघपुष्पबलाहकाः अश्वाः - सुग्रीव, मेघपुष्प व बलाहक या नावांचे चार घोडे - तमसि भ्रष्टगतयः बभूवुः - काळोखात चुकला आहे मार्ग ज्यांचा असे झाले. ॥४९॥
परीक्षिता ! त्या अंधकारामध्ये शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक नावाचे चारही घोडे रस्ता न दिसल्यामुळे इकडे तिकडे भटकू लागले. (४९)
तान्दृष्ट्वा भगवान् कृष्णो महायोगेश्वरेश्वरः ।
सहस्रादित्यसङ्काशं स्वचक्रं प्राहिणोत्पुरः ॥ ५० ॥
योग योगेश्वरे कृष्णे चुकता अश्व हे असे । हजारो सूर्यतेजाचे सुदर्शनचि योजिले ॥ ५० ॥
महायोगेश्वरश्वरा भगवान् कृष्णः - मोठमोठया योगाधिपतींचा चालक असा भगवान श्रीकृष्ण - तान् (तथा) दृष्टवा - त्यांना तशा स्थितीत पाहून - सहस्रादित्यसंकाशं स्वचक्रं पुरः प्राहिणोत् - हजार सूर्याप्रमाणे प्रकाशणारे आपले सुदर्शन चक्र पुढे सोडिता झाला. ॥५०॥
योगेश्वरांचेसुद्धा परमेश्वर भगवान श्रीऋष्णांनी घोड्यांची ही अवस्था पाहून आपल्या हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा सुदर्शन चक्राला पुढे पाठविले. (५०)
( मिश्र )
तमः सुघोरं गहनं कृतं महद् विदारयद् भूरितरेण रोचिषा । मनोजवं निर्विविशे सुदर्शनं गुणच्युतो रामशरो यथा चमूः ॥ ५१ ॥
( इंद्रवज्रा ) ज्योतिर्मयी तेज असेचि चक्र कापीत अंधार गतीत चाले । श्रीरामबाणो जणु चालला तो त्या राक्षसांना वधण्यास सार्या ॥ ५१ ॥
मनोजवं सुदर्शनं - मनाच्या वेगाप्रमाणे वेग असणारे सुदर्शन चक्र - यथा गुणच्युतः रामशरः चमूः (तथा) - ज्याप्रमाणे धनुष्याच्या दोरीपासून सुटलेला रामचंद्राचा बाण सैन्यात घुसतो त्याप्रमाणे - भूरितरेण रोचिषा - अत्यंत तेजाने - सुघोरं गहनं कृतं महत् तमः विदारयत् - अत्यंत भयंकर व दाट प्रकृतीचे परिणत स्वरूप अशा मोठया अंधकाराला दूर करीत - निर्विविशे - पुढे घुसले. ॥५१॥
आपल्या तेजाने सुदर्शन चक्र भगवंतांनीच निर्माण केलेल्या घनदाट भयंकर अंधकाराला कापीत, मनासारख्या तीव्र वेगाने, पुढे पुढे चालू लागले. श्रीरामांच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणाने राक्षसांच्या सेनेत प्रवेश करावा तसे. (५१)
द्वारेण चक्रानुपथेन तत्तमः
परं परं ज्योतिरनन्तपारम् । समश्नुवानं प्रसमीक्ष्य फाल्गुनः प्रताडिताक्षो पिदधेऽक्षिणी उभे ॥ ५२ ॥
अंधारसीमा सरली तदा नी अपार ज्योतीच झळाळल्या त्या । न साहि पार्थो अति तेज तेंव्हा घेई मिटोनी अपुल्याच नेत्रा ॥ ५२ ॥
फाल्गुनः - अर्जुन - चक्रानुपथेन द्वारेण (गच्छन्) - सुदर्शन चक्राने प्रकाशित केलेल्या मार्गाच्या द्वाराने जात - तत् तमः परं - त्या अंधाराच्या पलीकडे - समश्नुवन् अनन्तपारं परं ज्योतिः प्रसमीक्ष्य - व्यापक व ज्याचा पार लागत नाही असे श्रेष्ठ तेज पाहून - प्राताडिताक्षः - ज्याचे डोळे दिपून गेले आहेत असा - उभे अक्षिणी पिदधे - दोन्ही डोळे मिटून घेता झाला. ॥५२॥
अशा प्रकारे सुदर्शन चक्राने दाखविलेल्या मार्गावरून तो रथ अंधकाराच्या पलीकडे असलेल्या सर्वश्रेष्ठ पारावार नसलेल्या, व्यापक अशा प्रकाशसागरात पोहोचला. ते तज पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले आणि त्याने आपले डोळे मिटून घेतले. (५२)
ततः प्रविष्टः सलिलं नभस्वता
बलीयसैजद् बृहदूर्मिभूषणम् । तत्राद्भुतं वै भवनं द्युमत्तमं भ्राजन्मणिस्तम्भ सहस्रशोभितम् ॥ ५३ ॥
जळात नेले हरिने रथाला तै वादळाने उठल्याहि लाटा । महाल तेथे अति श्रेष्ठ होता झळाळला जो मणिरत्न तेजे ॥ ५३ ॥
ततः - नंतर - बलीयसा नभस्वता - बलवान वाय़ूने - एजद्बृहदूर्मिभूषणं - कापणार्या मोठमोठया लाटा आहेत भूषण ज्याचे अशा - सलिलं - उदकात - प्रविष्टः - शिरला - तत्र वै - तेथे खरोखर - द्युमत्तमं - अत्यंत तेजस्वी - भ्राजन्मणिस्तम्भसहस्रशोभितम् - चकाकणार्या हजारो मण्यांच्या खांबांनी शोभणारे - अद्भुतं भवनं - आश्चर्यजनक मंदिर पहाता झाला. ॥५३॥
यानंतर रथाने दिव्य अशा महासागरात प्रवेश केला. झंझावाताने उसळणार्या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता. तेथे एक आश्चर्यकारक अत्यंत तेजस्वी भवन होते. चमकणार्या रत्नांच्या हजारो खांबांनी ते शोभत होते. (५३)
तस्मिन् महाभोगमनन्तमद्भुतं
सहस्रमूर्धन्यफणामणिद्युभिः । विभ्राजमानं द्विगुणोल्बणेक्षणं सिताचलाभं शितिकण्ठजिह्वम् ॥ ५४ ॥ ददर्श तद्भोगसुखासनं विभुं महानुभावं पुरुषोत्तमोत्तमम् । सान्द्राम्बुदाभं सुपिशङ्गवाससं प्रसन्नवक्त्रं रुचिरायतेक्षणम् ॥ ५५ ॥ महामणिव्रातकिरीटकुण्डल प्रभापरिक्षिप्तसहस्रकुन्तलम् । प्रलम्बचार्वष्टभुजं सकौस्तुभं श्रीवत्सलक्ष्मं वनमालया वृतम् ॥ ५६ ॥ सुनन्द्नन्दप्रमुखैः स्वपार्षदैः चक्रादिभिमूर्तिधरैहिजायुधैः । पुष्ट्या श्रिया कीर्त्यजयाखिलर्द्धिभिः निषेव्यमाणं परामेष्ठिनां पतिम् ॥ ५७ ॥
नी शेषजी तेथ विराजमान भयान अद्भूत सहस्रशीर्षा । कैलासवर्णी तनु शोभली ती जिव्हा नि कंठा निलवर्ण शोभे ॥ ५४ ॥ नी शेषशय्यी पुरुषोत्तमाला सुखात पाही तइ पार्थ त्याची । मघापरी कांति नि उच्च वस्त्र विशाल नेत्रे बहु हास्य शोभे ॥ ५५ ॥ रत्नांकितो तो मुकुटो शिरासी नी कुंडले नी कुरुळेहि केस । त्या लांब बाहू गळि कौस्तुभो नी श्रीवत्स चिन्हो वनमाळ लोंबे ॥ ५६ ॥ सुनंदनादी हरिपार्षदो नी चक्रादि चिन्हे करि घेतलेला । शक्ती नि सिद्धी नित सेविताना तो पार्थ पाहि हरि साजिरा हा ॥ ५७ ॥
तस्मिन् - तेथे - अद्भुतं - आश्चर्यजनक - सहस्रमूर्धन्यफणामणिद्युभिः - हजारो मस्तके व त्या फण्यांवरील हजारो रत्ने ह्यांच्या कांतींनी - विभ्राजमानं - प्रकाशणार्या - द्विगुणोल्बणेक्षणं - दुप्पट प्रखर आहेत डोळे ज्याचे अशा - सिताचलाभं - हिमालय पर्वताप्रमाणे कांति आहे ज्याची अशा - शितिकण्ठजिह्वम् - काळी आहेत कंठ जिह्वा ज्याची अशा - महाभीमम् अनन्तम् - मोठया भयंकर अशा शेषाला - तद्भोगसुखासनं (च) - व त्या शेषाचे अंग हेच आहे मऊ आसन ज्याचे अशा - महानुभावं - मोठया पराक्रमी - पुरुषोत्तमोत्तमं - मोठमोठया श्रेष्ठ पुरुषांमध्येहि श्रेष्ठ अशा - सान्द्राम्बुदाभं - उदकाने भरलेल्या काळ्याकुटट मेघांप्रमाणे तेज आहे ज्याचे अशा - सुपिशङगवाससं - उत्तम पीतांबर आहे वस्त्र ज्याचे अशा - प्रसन्नवक्त्रं - प्रसन्न आहे मुख ज्याचे अशा - रुचिरायतेक्षणम् - सुंदर व लांब आहेत डोळे ज्याचे अशा - महामणिव्रातकिरीटकुण्डलप्रभापरिक्षिप्तसहस्रकुन्तलम् - मोठमोठया मण्यांच्या समूहांनी युक्त असा जो किरीट त्याच्या व कुंडलांच्या कांतीने तिरस्कृत केली आहे हजारो कुंतलांची कांती ज्याने अशा - प्रलम्बचार्वष्टभुजं - लांब व सुंदर आहेत आठ बाहु ज्याला अशा - सकौस्तुभं - कौस्तुभ मणि धारण करणार्या - श्रीवत्सलक्ष्मं - श्रीवत्सलांछनाने युक्त अशा - वनमालयावृतं - वनमाळेने आच्छादिलेल्या - सुनन्दनन्दप्रमुखैः स्वपार्षदैः - सुनंद व नंद आहेत मुख्य ज्यांत अशा सेवकांनी - मूर्तिधरैः चक्रादिभिः निजायुधैः - मूर्तिमान अशा आपल्या चक्रादिक आयुधांनी - पुष्टया श्रिया - पुष्टि व लक्ष्मी यांनी - कीर्त्यजया अखिलर्द्धिभिः निषेव्यमाणं - कीर्तिरूपी मायेने व सर्व ऐश्वर्यांनी सेविलेल्या - विभुं परमेष्ठिनां पतिं ददर्श - सर्वव्यापी व सर्व अधिपतींचा स्वामी अशा श्रीविष्णूला पाहता झाला. ॥५४-५७॥
त्याच भवनामध्ये भगवान शेष विराजमान झाले होते. त्यांचे शरीर अत्यंत भयानक तसेच अद्भू त होते. त्यांना एक हजार फणा होत्या. आणि त्या तेजस्वी रत्नांनी चमकत होत्या. प्रत्येक फणेला भयानक दोन दोन डोळे होते. त्यांचे शरीर कैलासपर्वताप्रमाणे शुभ्र होते आणि गळे व जिभा निळ्या रंगाच्या होत्या. (५४) त्या शेषाच्या सुखमय शय्येवर सर्वव्यापक महान प्रभावशाली परम पुरुषोत्तम भगवान विराजमान झाल्याचे अर्जुनाने पाहिले. त्यांचे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल वर्णाचे होते. अत्यंत सुंदर असा पीतांबर त्यांनी धारण केला होता. सुंदर असा आकर्ण नेत्र असलेले त्यांचे मुख प्रसन्न होते. (५५) बहुमोल रत्नजडित मुकुट आणि रत्नजडित कुंडले यांच्या तेजाने हजारो कुरळे केस चमकत होते. त्यांना लांब असे सुंदर आठ होते, गळ्यात कौस्तुभमणी होता. वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिन्ह आणि गळ्यात वनमाला होती. (५६) तेथे नंद-सुनंद इत्यादी पार्षद, सुदर्शन चक्र इत्यादी मूर्तिमंत आयुधे, पुष्टी, श्री, कीर्ती आणि माया या चार शक्ती, तसेच सर्व ऋद्धी, ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे अधीश्वर अशा भगवंतांची सेवा करीत असल्याचे अर्जुनाने पाहिले. (५७)
ववन्द आत्मानमनन्तमच्युतो
जिष्णुश्च तद्दर्शनजातसाध्वसः । तावाह भूमा परमेष्ठिनां प्रभुः बद्धाञ्जली सस्मितमूर्जया गिरा ॥ ५८ ॥
स्वरूप कृष्णे नैले अनंता पाहोनि पार्थो भयभीत झाला । नी वंदुनी तोहि उभाच ठेला तै हासुनीया वदला पुरुष ॥ ५८ ॥
अच्युतः - श्रीकृष्ण - तद्दर्शनजातसाध्वसः जिष्णुः च - आणि त्या शेषशायी भगवंताच्या दर्शनाने उत्पन्न झाले आहे भय ज्याला असा अर्जुन - आत्मानम् अनन्तं ववन्दे - आत्मस्वरूपी अंतरहित परमेश्वराला वंदन करिता झाला - भूमा परमेष्ठिनां प्रभुः - सर्वाहून श्रेष्ठ व ब्रह्मादि लोकपालांचा अधिपति असा भगवान - ऊर्जया गिरा - गंभीर वाणीने - बद्धाञ्जली तौ सस्मितं आह - हात जोडून उभे राहिलेल्या त्या दोघा कृष्णार्जुनांना मंद हास्य करीत म्हणाला. ॥५८॥
आपलेच स्वरूप असलेल्या भगवान अनंतांना श्रीकॄष्णांनी नमस्कार केला. त्यांच्या दर्शनाने भयभीत झालेल्या अर्जुनानेही त्यांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे स्वामी असलेल्या त्या पुरुषोत्तमाने स्मित हास्य करीत गंभीर वाणीने त्यांना म्हटले. (५८)
द्विजात्मजा मे युवयोर्दिदृक्षुणा
मयोपनीता भुवि धर्मगुप्तये । कलावतीर्णाववनेर्भरासुरान् हत्वेह भूयस्त्वरयेतमन्ति मे ॥ ५९ ॥
मी इच्छिले भेटिसि की तुम्हा हो नी आणवीले द्विजबाळ येथे । घेवोनि अंशा तुम्हि जन्मला तै त्या दैत्यभारा त्वरि हारिताल ॥ ५९ ॥
युवयोः दिदृक्षुणा मया - तुम्हाला पाहू इच्छिणार्या माझ्याकडून - द्विजात्मजाः उपनीताः - ब्राह्मणाचे मुलगे आणिले गेले - भुवि धर्मगुप्तये - पृथ्वीवर धर्म रक्षणासाठी - मे कलावतीर्णौ (युवां) - माझ्या अंशापासून उत्पन्न झालेले तुम्ही दोघे - अवनेः भरासुरान् हत्वा - पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांना मारून - भूयः इह मे अन्ति त्वरया इतम् - पुनः येथे माझ्याजवळ लवकर या. ॥५९॥
तुम्हा दोघांना पाहाण्यासाठी मी ब्राह्मणाची मुले माझ्याकडे आणली. धर्माचे रक्षण करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्या कलांसह पृथ्वीवर अवतार घेतला आहे. पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत या. (५९)
पूर्णकामावपि युवां नरनारायणावृषी ।
( अनुष्टुप् ) धर्ममाचरतां स्थित्यै ऋषभौ लोकसङ्ग्रहम् ॥ ६० ॥
( अनुष्टुप् ) नर नारायणो तुम्ही पूर्ण काम ऋषीश्वर । तरीही धर्म स्थापावा करावा लोकसंग्रह ॥ ६० ॥
युवाम् पूर्णकामौ नरनारायणौ ऋषी अपि - तुम्ही पूर्ण आहेत मनोरथ ज्यांचे असे नर व नारायण ऋषि असतांहि - ऋषभौ - श्रेष्ठ असल्यामुळे - (जगतः) स्थित्यै - जगाच्या रक्षणासाठी - लोकसंग्रहं धर्मं आचरतां - लोकांना सन्मार्गदर्शक अशा धर्माचे आचरण करा. ॥६०॥
तुम्ही दोघे नर आणि नारायण ऋषी आहात. तुम्ही पूर्णकाम आणि सर्वश्रेष्ठ आहात. तरीसुद्धा जगाच्या कल्याणासाठी लोकांना शिक्षण देणार्या धर्माचे आचरण करा. (६०)
इत्यादिष्टौ भगवता तौ कृष्णौ परमेष्ठिना ।
ओं इत्यानम्य भूमानं आदाय द्विजदारकान् ॥ ६१ ॥ न्यवर्तेतां स्वकं धाम सम्प्रहृष्टौ यथागतम् । विप्राय ददतुः पुत्रान् यथारूपं यथावयः ॥ ६२ ॥
आज्ञापिता असे तेणे प्रणाम करुनी तया । आनंदे बाळ ते दोन्ही घेता द्वारकि पातले ॥ ६१ ॥ मुले ती जाहली थोर जसे होते लहान ते । द्वयांनी पुत्र ते दोन्ही द्विजाला दिधले तदा ॥ ६२ ॥
इति भगवता परमेष्ठिना आदिष्टौ तौ कृष्णौ - याप्रमाणे भगवान शेषशायीने आज्ञापिलेले ते कृष्णार्जुन - ओम् इति (उक्त्वा) भूमानं आनम्य - बरे आहे असे म्हणून, सर्वव्यापी भगवंताला वंदन करून - द्विजदारकान् आदाय - ब्राह्मणपुत्रांना घेऊन - संप्रहृष्टौ - आनंदित झालेले - यथागतं स्वकं धाम न्यवर्तताम् - आलेल्या मार्गानेच परत आपल्या ठिकाणी गेले - यथारुपं यथावयः विप्राय पुत्रान् ददतुः - रूप व वय ही यथायोग्य असलेले पुत्र ब्राह्मणाला देता झाला. ॥६१-६२॥
भगवान अनंतांनी जेव्हा त्या दोघांना अशी आज्ञा केली, तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार केला, त्यांना नमस्कार केला आणि अतिशय आनंदित हौन, ब्राह्मणबालकांना घेऊन ते जसे आले होते, तसे द्वारकेला परतले. त्या मुलांची जी वये व जशी रूपे होती, तसेच त्यांना त्या ब्राह्मणाकडे सोपविले. (६१-६२)
निशाम्य वैष्णवं धाम पार्थः परमविस्मितः ।
यत्किञ्चित् पौरुषं पुंसां मेने कृष्णानुकम्पितम् ॥ ६३ ॥
विष्णुचे धाम पाहोनी पार्था आश्चर्य जाहले । तयाने जाणिले जीवा कृष्णाचे बळ पौरुष ॥ ६३ ॥
परमविस्मितः पार्थः - अत्यंत आश्चर्यचकित झालेला अर्जुन - वैष्णवं धाम निशाम्य - विष्णूचे तेज पाहून - पुंसां यत्किंचित् पौरुषं - पुरुषांचे जे काही सामर्थ्य - कृष्णानुकम्पितं मेने - श्रीकृष्णाची कृपाच होय असे मानिता झाला. ॥६३॥
भगवान विष्णूंचे ते परमधाम पाहून अर्जुनाच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. जीवांमध्ये जे काही बळ आहे, ते श्रीकृष्णांच्याच कृपेचे फळ आहे, हा त्याला अनुभव आला. (६३)
इतीदृशान्यनेकानि वीर्याणीह प्रदर्शयन् ।
बुभुजे विषयान् ग्राम्यान् ईजे चात्युर्जितैर्मखैः ॥ ६४ ॥
परीक्षित् ! भगवंताने केल्या लिला कितेक त्या । विषया भोगिले ग्राम्य नृपाच्या परि याजिले ॥ ६४ ॥
इति ईदृशानि अनेकानि वीर्याणि इह प्रदर्शयन् - येणेप्रमाणे अशी अनेक पराक्रमाची कृत्ये या लोकी दाखविणारा श्रीकृष्ण - ग्राम्यान् विषयान् बुभुजे - इंद्रियांचे विषय सेविता झाला - अत्यूर्जितैः मखैः च ईजे - आणि अत्यंत तेजस्वी अशा मोठमोठ्या यज्ञांनी हवन करिता झाला. ॥६४॥
भगवंतांनी अशा अनेक पराक्रमी लीला केल्या. सामान्य लोकांप्रमाणे संसारातील विषयांचा भोग घेतल्यासारखे दाखविले आणि श्रेष्ठतम असे यज्ञही केले. (६४)
प्रववर्षाखिलान् कामान् प्रजासु ब्राह्मणादिषु ।
यथाकालं यथैवेन्द्रो भगवान् श्रैष्ठ्यमास्थितः ॥ ६५ ॥
आदर्श राहिले कृष्ण श्रेष्ठ त्या पुरुषा सम । प्रजा नी द्विजवर्गाचे पूर्ण केले मनोरथ । प्रजेच्या साठि जै इंद्र नियमे वर्षितो जलां ॥ ६५ ॥
श्रैष्ठयम् आस्थितः भगवान् - श्रेष्ठपणाला प्राप्त झालेला भगवान श्रीकृष्ण - यथाकालं - योग्य काळी - यथा इंद्रः एव - इंद्राप्रमाणेच - ब्राह्मणादिषु प्रजासु अखिलान् कामान् प्रववर्ष - ब्राह्मणादि लोकांमध्ये असणारे सर्व मनोरथ पुरविता झाला. ॥६५॥
जसा इंद्र प्रजेसाठी वेळेवर पाऊस पाडतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आदर्श महापुरुषासारखे आचरण करीत ब्राह्मणादी सर्व प्रजेचे सगळे मनोरथ पूर्ण केले. (६५)
हत्वा नृपानधर्मिष्ठान् घातयित्वार्जुनादिभिः ।
अञ्जसा वर्तयामास धर्मं धर्मसुतादिभिः ॥ ६६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे द्विजकुमारानयनं नाम एकोननवतितमोऽध्यायः ॥ ८९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
स्वयें अधर्मि राजांना कितेका अर्जुना करीं । मारिले स्थापिला धर्म धर्मराजादिकां करें ॥ ६६ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणनव्वदावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
अधर्मिष्ठान् नृपान् (स्वयं) हत्वा - अधर्माचे आचरण करणार्या राजांना स्वतः मारून - अर्जुनादिभिः (च) घातयित्वा - व अर्जुनादिकांकडून मारवून - धर्मसुतादिभिः (सह) - यमधर्माचा पुत्र युधिष्ठिर इत्यादिकांसह - अञ्जसा धर्मं वर्तयामास - तत्काळ धर्माची घडी बसविता झाला. ॥६६॥ एकूणनव्वदावा अध्याय समाप्त
त्यांनी काही अधर्मी राजांना स्वत: मारून इतर कित्येकांना अर्जुन इत्यादींकडून मारविले. अशा प्रकारे धर्मराज इत्यादींकडून त्यांनी अनायसे धर्माची स्थापना केली. (६६)
अध्याय एकूणनव्वदावा समाप्त |