श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
चतुर्थोऽध्यायः

गजाग्राहयोः पूर्वजन्मचरितः तयोरुद्धारश्च -

हत्ती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्यांचा उद्धार -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
तदा देवर्षिगन्धर्वा ब्रह्मेशानपुरोगमाः ।
मुमुचुः कुसुमासारं शंसन्तः कर्म तद्धरेः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
राजा ! ब्रह्मादि देवांनी ऋषी गंधर्व यांनि ही ।
प्रशंसिले हरीसी नी केली तै पुष्पवृष्टि ती ॥ १ ॥

तदा - त्यावेळी - ब्रह्मेशानपुरोगमाः - ब्रह्मदेव व शंकर ज्यामध्ये पुढारी आहेत असे - देवर्षिगन्धर्वाः - देव, ऋषि व गंधर्व - हरेः - श्रीविष्णूच्या - तत् - त्या - कर्म - कर्माची - शंसन्तः - प्रशंसा करणारे - कुसुमासारं - पुष्पवृष्टीला - मुमुचुः - सोडीते झाले. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - त्यावेळी ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव, ऋषी आणि गंधर्व श्रीहरी भगवंतांच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. (१)


नेदुर्दुन्दुभयो दिव्या गन्धर्वा ननृतुर्जगुः ।
ऋषयश्चारणाः सिद्धः तुष्टुवुः पुरुषोत्तमम् ॥ २ ॥
स्वर्गात वाजल्या भेरी गंधर्व नाचले तसे ।
ऋषी चारण सिद्धांनी स्तविले पुरुषोत्तमा ॥ २ ॥

दिव्याः - आकाशातील - दुंदुभयः - दुंदुभि - नेदुः - वाजू लागल्या - गन्धर्वाः - गंधर्व - ननृतु - नृत्य करू लागले - जगुः - गाऊ लागले - ऋषयः - ऋषि - सिद्धाः - सिद्ध - चारणाः - चारण - पुरुषोत्तमं - विष्णूची - तुष्टुवुः - स्तुति करू लागले. ॥२॥
स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व नाचू-गाऊ लागले. ऋषी, चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करू लागले. (२)


योऽसौ ग्राहः स वै सद्यः परमाश्चर्यरूपधृक् ।
मुक्तो देवलशापेन हूहूर्गन्धर्वसत्तमः ॥ ३ ॥
प्रणम्य शिरसाधीशं उत्तमश्लोकमव्ययम् ।
अगायत यशोधाम कीर्तन्यगुणसत्कथम् ॥ ४ ॥
तेंव्हा त्वरित तो नक्र दिव्यदेहीच जाहला ।
या पूर्वी नक्र तो होता गंधर्व हुहु नामक ॥
गती नक्राचि ही त्याला देवले शापिल्या मुळे ।
श्रीहरी दर्शने आता त्वरीत मुक्त जाहला ॥ ३ ॥
त्यापदी ठेवुनी डोळे स्तुती गाऊहि लागला ।
अविनाशी असा विष्णू कीर्तनीय असाचि तो ॥
मनोहर अशा त्याच्या लीला गाण्यास योग्य त्या ॥ ४ ॥

यः - जो - असौ - हा - ग्राहः - नक्र - सः - तो - वै - खरोखर - हूहूः गंधर्वसत्तमः - हूहू नावाचा गंधर्वश्रेष्ठ - देवलशापेन - देवलऋषीच्या शापामुळे - ग्राहः जातः - नक्र झालेला - सद्यः - तत्काळ - मुक्तः (भूत्वा) - मुक्त होऊन - परमाश्चर्यरुपधृक् - अत्यंत आश्चर्यजनक स्वरूप धारण करणारा - उत्तमश्लोकं - श्रेष्ठकीर्तीच्या - अव्ययं - अविनाशी - यशोधाम - कीर्तीचे स्थानच अशा - कीर्तन्यगुणसत्कथं - ज्याचे गुण व गोड कथा वर्णनीय आहेत अशा - अधीशं - त्रैलोक्याधिपति परमेश्वराला - शिरसा - मस्तकाने - प्रणम्य - नमस्कार करून - अगायत - गाऊ लागला. ॥३-४॥
इकडे तो मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीराने संपन्न झाला. हा मगर यापूर्वी "हुहु" नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता. देवलांच्या शापाने त्याला ही गती प्राप्त झाली होती. आता भगवंतांच्या कृपेने तो मुक्त झाला. अविनाशी कीर्तीने संपन्न, आणि ज्यांच्या गुणांचे आणि लीलांचे गायन करणे योग्य आहे, अशा सर्वेश्वर भगवंतांच्या चरणांवर डोके टेकवून त्याने त्यांना नमस्कार केला आणि तो भगवंतांच्या सुयशाचे गायन करू लागला. (३-४)


सोऽनुकम्पित ईशेन परिक्रम्य प्रणम्य तम् ।
लोकस्य पश्यतो लोकं स्वं अगान्मुक्तकिल्बिषः ॥ ५ ॥
भगवान्‌ स्पर्शिता त्याचे पाप तापहि नष्टले ।
स्वलोका बघता गेला नमून हरिसी पुन्हा ॥ ५ ॥

ईशेन - परमेश्वराने - अनुकंपितः - कृपा केलेला - मुक्तकिल्बिषः - निष्पाप झालेला - सः - तो हूहू गंधर्व - तं - त्या परमेश्वराला - परिक्रम्य - प्रदक्षिणा घालून - प्रणम्य - नमस्कार करून - लोकस्य पश्यतः - लोक पाहात असता - स्वं लोकं - आपल्या लोकाला - अगात् - गेला. ॥५॥
भगवंतांच्या कृपेने त्याचे सर्व पाप नष्ट झाले. त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि सर्वजण पाहात असतानाच तो आपल्या लोकी निघून गेला. (५)


गजेन्द्रो भगवत्स्पर्शाद् विमुक्तोऽज्ञानबन्धनात् ।
प्राप्तो भगवतो रूपं पीतवासाश्चतुर्भुजः ॥ ६ ॥
गजेंद्रही हरिस्पर्शे अज्ञानमुक्त जाहला ।
भगवद्‌रूप तो झाला पीतवस्त्र चतुर्भुज ॥ ६ ॥

भगवत्स्पर्शात् - श्रीविष्णुचा स्पर्श झाल्यामुळे - अज्ञानबन्धनात् - अज्ञानरूपी बंधनापासून - विमुक्तः - मुक्त झालेला - गजेन्द्रः - गजेंद्र - पीतवासाः - पिवळे वस्त्र नेसलेला - चतुर्भुजः - चार हातांचा - भगवतः - श्रीविष्णूच्या - रूपं - स्वरूपाला - प्राप्तः - मिळविता झाला. ॥६॥
भगवंतांचा स्पर्श होताच गजेंद्रसुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला. त्याला भगवंतांचेच रूप प्राप्त झाले. तो पीतांबरधारी आणि चतुर्भुज झाला. (६)


स वै पूर्वं अभूद् राजा पाण्ड्यो द्रविडसत्तमः ।
इन्द्रद्युम्न इति ख्यातो विष्णुव्रतपरायणः ॥ ७ ॥
गजेंद्र पूर्वजन्मीचा पांड्य राजा द्रवीडि तो ।
इंद्रद्युम्न तया नाम हरिभक्तीत श्रेष्ठही ॥ ७ ॥

सः - तो - वै - खरोखर - पूर्वं - पूर्वी - पांडयः - पाण्डयदेशातील - द्रविडसत्तमः - श्रेष्ठ द्रविड - इंद्रद्युम्नः इति ख्यातः - इंद्रद्युम्न ह्या नावाने प्रसिद्ध असा - विष्णुव्रतपरायणः - वैष्णवव्रत निष्ठेने आचरणारा - राजा - राजा - अभूत् - होता. ॥७॥
पूर्वजन्मात गजेंद्र द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता. त्याचे नाव इंद्रद्युम्न होते. तो भगवंतांचा एक श्रेष्ठ उपासक होता. (७)


स एकदाराधनकाल आत्मवान्
     गृहीतमौनव्रत ईश्वरं हरिम् ।
जटाधरस्तापस आप्लुतोऽच्युतं
     समर्चयामास कुलाचलाश्रमः ॥ ८ ॥
(इंद्रवज्रा)
जो राज्य त्यागे मलयात गेला
    दाढी जटावेश तपस्वियाचा ।
तो एकदा स्नान करोनि मौने
    पूजावया श्रीहरि बैसला जैं ॥ ८ ॥

एकदा - एके दिवशी - कुलाचलाश्रमः - कुलपर्वत हाच आहे आश्रम ज्याचा असा - तापसः - तपस्वी - जटाधरः - जटा धारण करणारा - आप्लुतः - स्नान केलेला - आत्मवान् - ज्ञानी - सः - तो इंद्रद्युम्न - आराधनकाले - पूजेच्या वेळी - गृहीतमौनव्रतः - मौनव्रत धारण केलेला - अच्युतं - कधीही अधोगतीला न जाणार्‍या - ईश्वरं - सर्वैश्वर्यसंपन्न - हरिं - श्रीविष्णूचे - समर्चयामास - पूजन करीत होता. ॥८॥
राजा इंद्रद्युम्न एकदा मलयपर्वतावरील आश्रमात राहात होता. त्याने जटा वाढवून तपस्व्याचा वेष धारण केला होता. एके दिवशी स्नानानंतर पूजेच्या वेळी तो मौनव्रत धारण करून एकाग्र मनाने सर्वशक्तिमान भगवंतांची आराधना करीत होता. (८)


यदृच्छया तत्र महायशा मुनिः
     समागमत् शिष्यगणैः परिश्रितः ।
तं वीक्ष्य तूष्णीमकृतार्हणादिकं
     रहस्युपासीनमृषिश्चुकोप ह ॥ ९ ॥
दैवे अगस्तीमुनि तेथ आले
    शिष्योत्तमाच्या सह पाहिले की ।
त्यजोनि राजाचि गृहस्थ धर्मा
    पाहून त्यासी बहु तप्त झाले ॥ ९ ॥

महायशाः - मोठा कीर्तिमान - शिष्यगणैः - शिष्यसमूहांनी - परिश्रितः - आश्रय केलेला - मुनिः - अगस्त्य ऋषि - यदृच्छया - सहजगत्या - तत्र - तेथे - समागमत् - आला - ऋषिः - ऋषि - तूष्णीं - स्तब्धपणे - रहसि - एकांतात - उपासीनं - बसलेल्या - अकृतार्हणादिकं - आपला पूजनादि सत्कार न करणार्‍या - तं - त्या राजाला - वीक्ष्य - पाहून - चुकोप ह - खरोखर रागावला. ॥९॥
दैवयोगाने त्याचवेळी कीर्तिमान अगस्त्य मुनी आपल्या शिष्यमंडळींसह तेथे येऊन पोहोचले. आपले आदरातिथ्य न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या त्याला पाहून ऋषी संतापले. (९)


तस्मा इमं शापमदादसाधुः
     अयं दुरात्माकृतबुद्धिरद्य ।
विप्रावमन्ता विशतां तमोऽन्धं
     यथा गजः स्तब्धमतिः स एव ॥ १० ॥
बोधा न घेता गुरुच्या ययाने
    परोपकारा त्यजिलेचि गर्वे ।
द्विजासि येणे अवमानिले की
    मिळेल याला गजयोनि जन्म ॥ १० ॥

सः - तो अगस्त्य ऋषि - तस्य - त्या इंद्रद्युम्न राजाला - इमं शापं - हा शाप - अदात् - देता झाला - असाधुः - दुष्ट - दुरात्मा - दुर्बुद्धि - अकृतबुद्धिः - ज्याच्या बुद्धीला चांगले वळण मिळाले नाही असा - विप्रावमन्ता - ब्राह्मणांचा अपमान करणारा - अयं - हा - अद्य - आज - अंधं - अंधकारमय - तमः - अज्ञानात - विशतां - शिरो - यथा - ज्याप्रमाणे - गजः - हत्ती - स्तब्धमतिः (अस्ति) - गर्विष्ठ बुद्धीचा असतो - (अतः) स एव (भवतु) - म्हणून तो हत्तीच होवो. ॥१०॥
त्यांनी राजाला शाप दिला की, "हा नीच, दुष्ट, असभ्य असून ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे. हा हत्तीप्रमाणे जडबुद्धी आहे. म्हणून याला नीच अज्ञानी-हत्तीची योनी प्राप्त होवो. (१०)


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
एवं शप्त्वा गतोऽगस्त्यो भगवान् नृप सानुगः ।
इन्द्रद्युम्नोऽपि राजर्षिः दिष्टं तदुपधारयन् ॥ ११ ॥
आपन्नः कौञ्जरीं योनिं आत्मस्मृतिविनाशिनीम् ।
हर्यर्चनानुभावेन यद्‍गजत्वेऽप्यनुस्मृतिः ॥ १२ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
अगस्ति शापिता ऐसे गेले शिष्यांसवे पुढे ।
राजर्षी इंद्रद्युम्नाने प्रारब्धीं तोष मानिला ॥ ११ ॥
आत्मविस्मृतिच्या जन्मी गजयोनीत पातला ।
परी श्रीहरिच्या पूजे त्या जन्मी स्मृति राहिली ॥ १२ ॥

नृप - हे परीक्षित राजा - सानुगः - शिष्यांसह - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - अगस्त्यः - अगस्त्य ऋषि - एवं - याप्रमाणे - शप्त्वा - शाप देऊन - गतः - गेला - इंद्रद्युम्नः - इंद्रद्युम्न - राजर्षिः - राजर्षि - अपि - सुद्धा - तत् - ते - दिष्टं - दैवाने प्राप्त झालेले संकट - उपधारयन् - समजून - आपन्नः - संकटात सापडलेला - आत्मस्मृतिविनाशिनीं - आत्मविषयक स्मरणाचा नाश करणार्‍या - कौञ्जरीं योनिं - हत्तीच्या जन्माला - आप - प्राप्त झाला - यत् - जे - गजत्वे अपि - गजजन्मामध्येही - अनुस्मृतिः (आसीत्) - पूर्वजन्माचे स्मरण राहिले - हर्यर्चनानुभावेन - भगवंताच्या पूजेच्या प्रभावाने होय. ॥११-१२॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! भगवान अगस्त्य ऋषी याप्रमाणे शाप देऊन आपल्या शिष्यांसह तेथून निघून गेले. हे आपले प्रारब्धच होते, असे इंद्रद्युम्नाने मानले. यानंतर स्वतःचे विस्मरण घडविणारी हत्तीची योनी त्याला प्राप्त झाली. परंतु भगवंतांच्या आराधनेच्या प्रभावाने हत्ती होऊनही त्याला भगवंतांची स्मृती कायम राहिली. (११-१२)


एवं विमोक्ष्य गजयूथपमब्जनाभः
     तेनापि पार्षदगतिं गमितेन युक्तः ।
गन्धर्वसिद्धविबुधैः उपगीयमान
     कर्माद्‍भुतं स्वभवनं गरुडासनोऽगात् ॥ १३ ॥
(वसंततिलका)
उद्धारिता गज असा मग श्रीहरीने
    पार्षद तो करुनिया निजधामि नेला ।
गंधर्व सिद्ध मुनिने स्तविले तयाला
    बैसोनि तो गरुडि श्रीहरिधामि गेला ॥ १३ ॥

एवं - याप्रमाणे - गजयूथपं - गजेंद्राला - विमोक्ष्य - मुक्त करून - पार्षदगतिं - स्वतःच्या सेवकाच्या पदवीला - गमितेन - पोहोचविलेल्या - तेन अपि युक्तः - त्याच्यासहित - गन्धर्वसिद्ध विबुधैः - गंधर्व, सिद्ध व देव यांनी - उपगीयमानकर्मा - ज्याचे पराक्रम गायिले आहेत असा - अब्जनाभः - श्रीविष्णु - गरूडासनः - गरुडावर बसून - अद्भुतं - आश्चर्यकारक अशा - स्वभवनम् - आपल्या लोकाला - अगात् - गेला. ॥१३॥
अशा रीतीने भगवान श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपला पार्षद बनविले. गंधर्व, सिद्ध, देवता त्यांच्या या लीलेचे गायन करू लागले. नंतर पार्षदरूप गजेंद्राला बरोबर घेऊन भगवंत आपल्या अलौकिक वैकुंठ धामाकडे गेले. (१३)


एतन्महाराज तवेरितो मया
     कृष्णानुभावो गजराजमोक्षणम् ।
स्वर्ग्यं यशस्यं कलिकल्मषापहं
     दुःस्वप्ननाशं कुरुवर्य शृण्वताम् ॥ १४ ॥
(इंद्रवज्रा)
माहात्म्य ऐसे हरिचे नृपारे
    गजेंद्र मोक्षा सह मी कथीले ।
दुःस्वप्नदोषा किलच्या हरी ही
    यशोन्नती देइ कथा नि स्वर्ग ॥ १४ ॥

महाराज - हे महाराज कुरुश्रेष्ठा - मया - मी - शृण्वतां - ऐकणार्‍यांना - स्वर्ग्यं - स्वर्ग देणारा - यशस्यं - कीर्ति देणारा - कलिकल्मषापहं - कलीसंबंधी पातके नष्ट करणारा - दुःस्वप्ननाशं - वाईट स्वप्नांचा नाश करणारा - एतत् - हा - गजराजमोक्षणं (नाम) - गजेंद्रमोक्षनामक - कृष्णानुभावः - श्रीकृष्णाचा पराक्रम - तव - तुला - ईरितः - सांगितला. ॥१४॥
हे कुरुश्रेष्ठ परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांचा महिमा तसेच गजेंद्राच्या उद्धाराची कथा मी तुला ऐकविली. ही कथा ऐकणार्‍यांचे कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे करील आणि त्यांना यश आणि स्वर्ग मिळवून देईल. (१४)


(अनुष्टुप्)
यथानुकीर्तयन्त्येतत् श्रेयस्कामा द्विजातयः ।
शुचयः प्रातरुत्थाय दुःस्वप्नाद्युपशान्तये ॥ १५ ॥
(अनुष्टुप्‌)
कल्याण इच्छिता विप्रे दुःस्वप्न शांति इच्छिता ।
सकाळी उठुनी याचा पवित्र पाठ योजिने ॥ १५ ॥

श्रेयस्कामाः - कल्याण इच्छिणारे - द्विजातयः - द्विज - प्रातः - सकाळी - उत्थाय - उठून - शुचयः (भूत्वा) - शुचिर्भूत होऊन - दुःस्वप्नाद्युपशान्तये - वाईट स्वप्नांच्या शांतीकरिता - एतत् - हे आख्यान - यथा (वत्) - जसेच्या तसे - अनुकीर्तयन्ति - पठण करितात. ॥१५॥
म्हणूनच आपले कल्याण इच्छिणारे द्विजगण दुःस्वप्न इत्यादीच्या शांतीसाठी सकाळी उठल्यानंतर शुचिर्भूत होऊन याचा पाठ करतात. (१५)


इदमाह हरिः प्रीतो गजेन्द्रं कुरुसत्तम ।
श्रृण्वतां सर्वभूतानां सर्वभूतमयो विभुः ॥ १६ ॥
परीक्षिता ! गजेंद्राची प्रसन्न हो‌उनी स्तुती ।
स्वयेचि सर्व लोकांना श्रीहरी वदला असे ॥ १६ ॥

कुरुसत्तम - हे कुरुश्रेष्ठा - सर्वभूतमयः - सर्व भूते हेच ज्याचे स्वरूप आहे असा - विभुः - व्यापक - हरिः - श्रीविष्णु - प्रीतः (भूत्वा) - प्रसन्न होऊन - सर्वभूतानां शृण्वतां - सर्व प्राणी श्रवण करीत असता - गजेन्द्रं - गजेंद्राला - इदं - हे - आह - म्हणाला. ॥१६॥
हे कुरुश्रेष्ठा, गजेंद्राने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन सर्वव्यापक तसेच सर्वभूतस्वरूप श्रीहरींनी सर्वांच्या समक्ष त्याला सांगितले. (१६)


श्रीभगवानुवाच -
ये मां त्वां च सरश्चेदं गिरिकन्दरकाननम् ।
वेत्रकीचकवेणूनां गुल्मानि सुरपादपान् ॥ १७ ॥
श्रृंगाणीमानि धिष्ण्यानि ब्रह्मणो मे शिवस्य च ।
क्षीरोदं मे प्रियं धाम श्वेतद्वीपं च भास्वरम् ॥ १८ ॥
श्रीवत्सं कौस्तुभं मालां गदां कौमोदकीं मम ।
सुदर्शनं पाञ्चजन्यं सुपर्णं पतगेश्वरम् ॥ १९ ॥
शेषं च मत्कलां सूक्ष्मां श्रियं देवीं मदाश्रयाम् ।
ब्रह्माणं नारदं ऋषिं भवं प्रह्रादमेव च ॥ २० ॥
मत्स्यकूर्मवराहाद्यैः अवतारैः कृतानि मे ।
कर्माणि अनन्तपुण्यानि सूर्यं सोमं हुताशनम् ॥ २१ ॥
प्रणवं सत्यमव्यक्तं गोविप्रान् धर्ममव्ययम् ।
दाक्षायणीर्धर्मपत्‍नीः सोमकश्यपयोरपि ॥ २२ ॥
गंगां सरस्वतीं नन्दां कालिन्दीं सितवारणम् ।
ध्रुवं ब्रह्मऋषीन्सप्त पुण्यश्लोकांश्च मानवान् ॥ २३ ॥
उत्थायापररात्रान्ते प्रयताः सुसमाहिताः ।
स्मरन्ति मम रूपाणि मुच्यन्ते ह्येनसोऽखिलात् ॥ २४ ॥
श्री भगवान म्हणाले -
पहाटे एकचित्ताने स्तुती माझी नि ही तुझी ।
सरोवर गिरी गुंफा वन वेत नि कर्दम ॥ १७ ॥
वेळुंचे बेट नी दिव्य गिरीशिखर नी तरू ।
माझे ब्रह्मा शिवो स्थान ते धाम क्षीरसागरू ॥ १८ ॥
श्वेतद्वीप प्रकाशी ते श्रीवत्स कौस्तुभोमणी ।
गदा कौ‌मुदि माझी नी श्रीसुदर्शन चक्र हे ॥ १९ ॥
पांचजन्य गरूडो हा कालस्वरुप शेषजी ।
लक्षुमी नारदो ब्रह्मा शिवो प्रल्हाद मत्स्य तो ॥ २० ॥
वराह कूर्म इत्यादी श्रेष्ठ पुण्यमयी कथा ।
चंद्रमा सूर्य नी अग्नी ॐकार मूळ प्रकृती ॥ २१ ॥
सत्य गो द्विज नी धर्म दक्षपुत्रीसती तशी ।
कश्यपो सोम नी गंगा नंदा नी यमुनाहि ती ॥ २२ ॥
तथा ऐरावतो आणि भक्त ध्रुवशिरोमणी ।
सप्तर्षी नल जनको युधिष्ठिर महामहिम्‌ ॥ २३ ॥
स्मरता सुटतो जीव पापाच्या बंधनातुनी ।
सर्वच्या सर्व ते माझे रूप माझेचि जाणणे ॥ २४ ॥

ये - जे - मां - माझे - त्वां - तुझे - च - आणि - सरः - ह्या सरोवराचे - च - आणि - इदं - हा - गिरिकन्दरकाननं - त्रिकूटपर्वत, त्यावरील गुहा व अरण्ये ह्यांचे - वेत्रकीचकवेणूनां - येथील वेत, शब्द करणारे कळक व वेळू यांचे - गुल्मानि - गुच्छांचे - सुरपादपान् - देववृक्षांचे ॥१७॥ इमानि शृङगाणि - या शिखरांचे - मे - माझी - ब्रह्मणः - ब्रह्मदेवाची - च - आणि - शिवस्य धिष्ण्यानि - शंकराची मंदिरे - मे - माझे - प्रियं - आवडीचे - धाम - स्थान - क्षीरोदं - क्षीरसमुद्र - च - आणि - भास्वरं - प्रकाशमान - श्वेतद्वीपं - श्वेतद्वीप - मम - माझे - श्रीवत्सं - श्रीवत्सलांच्छन - कौस्तुभं - कौस्तुभमणि - मालां - वनमाळा - कौ‌मोदकीं गदां - कौ‌मोदकी गदा - सुदर्शनं - सुदर्शनचक्र - पाञ्चजन्यं - पांचजन्य नावाचा शंख - पतगेश्वरं सुपर्णं - पक्ष्यांचा अधिपति गरुड - शेषं - शेष - च - आणि - सूक्ष्मां - अत्यंत लहान - मत्कलां - माझा अंश अशी - मदाश्रयां - माझा आश्रय करून राहणारी - देवीं - दैदीप्यमान - श्रियं - लक्ष्मी - ब्रह्माणं - ब्रह्मदेव - नारदम् ऋषिं - नारद ऋषि - भवं - शंकर - च - आणि - प्रह्लादम् एव - प्रल्हादसुद्धा - मे - माझ्या - मत्स्यकूर्मवराहाद्यैः - मत्स्य, कूर्म वराह इत्यादि - अवतारैः - अवतारांनी - कृतानि - केलेली - अनन्तपुण्यानि - अगणित पुण्य देणारी - कर्माणि - कर्मे - सूर्यं - सूर्य - सोमं - चंद्र - हुताशनं - अग्नि - सत्यं - सत्यस्वरूपी - प्रणवं - ओम्‌कार - अव्यक्तं - माया - गोविप्रान् - गाई व ब्राह्मण - अव्ययं - अविनाशी - धर्मं - धर्म - दाक्षायणीः धर्मपत्नीः - दक्षाच्या कन्या धर्माच्या ज्या तेरा भार्या त्या - सोमकश्यपयोः अपि (पत्नीः) - चंद्र व कश्यप ह्यांच्या सुद्धा भार्या - गङगां - गङगा - सरस्वतीं - सरस्वती - नंदां - नंदा - कालिंदीं - यमुना - सितवारणम् - ऐरावत - ध्रुवं - ध्रुव - सप्त ब्रह्मऋषीन् - सात ब्रह्मर्षि - च - आणि - पुण्यश्लोकान् मानवान् - नळराजादि पुण्यश्लोक पुरुष ॥१८-२३॥ मम रूपाणि - तसेच माझ्या स्वरूपाचे - उत्थाय - उठून - अपररात्रान्ते - पहाटे - प्रयताः (भूत्वा) - पवित्र होऊन - सुसमाहिताः - सावधानपणाने - स्मरन्ति - स्मरण करितात - हि - खरोखर - अखिलात् - संपूर्ण - एनसः - पापापासून - मुच्यन्ते - मुक्त होतात. ॥२४॥
श्रीभगवान म्हणाले - जे लोक पहाटे उठून इंद्रियनिग्रह करून, एकाग्र चित्ताने माझे, तुझे तसेच हे सरोवर, परव, गुहा, वन, वेत, वेळू आणि बांबू यांची बेटे, येथील दिव्य वृक्ष, माझे, ब्रह्मदेवाचे आणि शंकराचे निवासस्थान असलेली ही शिखरे, माझे प्रिय ठिकाण क्षीरसागर, प्रकाशमय श्वेतदीप, श्रीवत्स, कौस्तुभमणी, वनमाला, माझी कौमोदकी गदा, सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, पक्षिराज गरुड, माझा सूक्ष्म अंश असणारा शेष, माझ्या आश्रयाने राहणारी लक्ष्मीदेवी, ब्रह्मदेव, देवर्षी नारद, शंकर, प्रह्लाद, मत्स्य, कच्छप वराहादी अवतारात मी केलेल्या माझ्या अनंत पुण्यमय लीला, सूर्य, चंद्र, अग्नी, ॐकार, सत्य, मूलप्रकृती, गाय, ब्राह्मण, अविनाशी सनातनधर्म, सोम, कश्यप आणि धर्माच्या पत्‍न्या दक्षकन्या, गंगा, सरस्वती, अलकनंदा, यमुना, ऐरावत हत्ती, ध्रुव, सप्त ब्रह्मर्षी आणि पुण्यश्लोक महापुरुष यांचे जे स्मरण करतील, त्यांची सर्व पापांपासून सुटका होईल. कारण ही सगळी माझीच रूपे आहेत. (१७-२४)


ये मां स्तुवन्त्यनेनाङ्‌ग प्रतिबुध्य निशात्यये ।
तेषां प्राणात्यये चाहं ददामि विपुलां गतिम् ॥ २५ ॥
गजेंद्रा प्रिय भक्ता रे ! पहाटेस उठोनिया ।
तुझी माझी स्तुती गातो स्तवितो मज जो सदा ॥
मृत्युच्या समयी शुद्ध बुद्धी मी दान त्यां करी ॥ २५ ॥

अग्ङ - बा गजेन्द्रा - ये च - आणि जे - निशात्यये - रात्रीच्या शेवटी म्हणजे पहाटे - प्रतिबुद्‌ध्य - जागे होऊन - अनेन - ह्या स्तोत्राने - मां - माझे - स्तुवन्ति - स्तवन करितात - तेषां - त्यांना - अहं - मी - प्राणात्यये - मरणसमयी - विमला - निर्मळ - मतिं - बुद्धि - ददामि - देतो. ॥२५॥
हे गजेंद्रा, जे लोक ब्राह्ममुहूर्तावर उठून तू केलेल्या स्तुतीने माझे स्तवन करतील, त्यांना मृत्युसमयी मी निर्मळ बुद्धी देईन. (२५)


श्रीशुक उवाच -
इत्यादिश्य हृषीकेशः प्राध्माय जलजोत्तमम् ।
हर्षयन् विबुधानीकं आरुरोह खगाधिपम् ॥ २६ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे गजेन्द्रमोक्षणं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
परीक्षिता ! ह्रषीकेशे देवतांना कथोनिया ।
आनंदे शंख फुंकोनी गरुडावरि बैसला ॥ २६ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ चौथा अध्याय हा ॥ ८ ॥ ४ ॥ हरिः ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

हृषीकेशः - श्रीविष्णु - इति - याप्रमाणे - आदिश्य - सांगून - जलजोत्तमः प्रध्माय - पाञ्चजन्यनामक उत्तम शंख वाजवून - विबुधाकनीकं - देव सैन्याला - हर्षयन् - आनंद देत - खगाधिपं - गरुडावर - आरुरोह - बसला. ॥२६॥
श्रीशुक म्हणतात - भगवान श्रीकृष्ण असे म्हणून आपला श्रेष्ठ शंख वाजवून देवतांना आनंदित करीत गरुडावर स्वार झाले. (२६)


स्कंध आठवा - अध्याय चवथा समाप्त

GO TOP