![]() |
श्रीमद् भागवत पुराण
हिरण्यकशिपोः स्वभृतेभ्यः प्रजापीडनार्थमादेशः, हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकशिपूकडून माता व कुटुंबियांचे सांत्वन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
नारद उवाच -
(अनुष्टुप्) भ्रातरि एवं विनिहते हरिणा क्रोडमूर्तिना । हिरण्यकशिपू राजन् पर्यतप्यद् रुषा शुचा ॥ १ ॥
नारद म्हणाले - (अनुष्टुप्) राजा ! श्रीहरिने जेंव्हा हिरण्याक्षासि मारिले । तेंव्हा तो पेटला बंधूप्रेमाने अग्निची असा ॥१॥
राजन् - हे धर्मराजा- एवं - याप्रमाणे- क्रोडमूर्तिना हरिणा - वराहरूपी परमेश्वराकडून- भ्रातरि विनिहते - भाऊ मारिला गेला असता- हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु- शुचा (च) रुषा - शोकाने व क्रोधाने- पर्यतप्यत् - संतप्त झाला. ॥१॥
नारद म्हणाले – युधिष्ठिरा ! जेव्हा भगवंतांनी वराह अवतार धारण करून स्वत:च्या भावाला मारले, तेव्हा हिरण्यकशिपूचा रागाने जळफळाट झाला आणि तो शोकाने संतप्त झाला. (१)
आह चेदं रुषा घूर्णः सन्दष्टदशनच्छदः ।
कोपोज्ज्वलद्भ्यां चक्षुर्भ्यां निरीक्षन् धूम्रमम्बरम् ॥ २ ॥
कर्करा ओठ चावोनी कंपला क्रोधाग्निने । क्रोधनेत्रेचि आकाशा कडे तो पाहु लागला ॥२॥
च - आणि- रुषा - क्रोधाने- घूर्णः - भ्रमिष्ट झालेला- संदष्टदशनच्छदः - दात खाणारा- कोपोज्ज्वलद्भ्यां चक्षुर्भ्यां - कोपाने अतिशय भडकून गेलेल्या नेत्रांनी- धूम्रं अंबरं - धूम्रयुक्त आकाश- निरीक्षन् - पाहात- इदं आह - हे बोलला. ॥२॥
तो क्रोधाने थरथर कापत दातओठ चावून क्रोधाने जळजळीत झालेल्या डोळ्यांतील क्रोधाग्नीच्या धुराने धुरकट झालेल्या आकाशाकडे पाहात म्हणू लागला. (२)
करालदंष्ट्रोग्रदृष्ट्या दुष्प्रेक्ष्य भ्रुकुटीमुखः ।
शूलमुद्यम्य सदसि दानवान् इदमब्रवीत् ॥ ३ ॥ भो भो दानवदैतेया द्विमूर्धंन् त्र्यक्ष शम्बर । शतबाहो हयग्रीव नमुचे पाक इल्वल ॥ ४ ॥ विप्रचित्ते मम वचः पुलोमन् शकुनादयः । श्रृणुत अनन्तरं सर्वे क्रियतां आशु मा चिरम् ॥ ५ ॥
दाढा विक्राळ त्या ऐशा केल्याने मुख ना दिसे । उचलोनि त्रिशूळाला वदला दानवो असा ॥३॥ शंबरा त्र्यक्ष द्वीमूर्धा शतबाहू हयग्रिवा । विप्रचित्ती पुलोमा रे नमुची पाक इल्वला ॥४॥ शकुना ऐकणे सर्व दैत्य नी दानवो तुम्ही । जसे मी सांगतो तैसे करावे पूर्ण ते तुम्ही ॥५॥
करालदंष्ट्रोग्रदृष्टया - भयंकर दाढांमुळे उग्र दिसणार्या डोळ्यांनी- दुष्प्रेक्ष्यभ्रुकुटीमुखः - पाहण्यास कठीण अशा भुवया आहेत मुखावर असा- सदसि - सभेमध्ये- शूलं - शूळ- उद्यम्य - वर करून- दानवान् - दानवांना- इदं - हे- अब्रवीत् - बोलला. ॥३॥ भो भो - अहो- दानवदैतेयाः - दानव व दैत्य हो- द्विमूर्धन् - हे द्विमूर्धा- त्र्यक्ष - हे त्र्यक्षा- शंबरः - हे शंबरा- शतबाहो - हे शतबाहो- हयग्रीव - हे हयग्रीवा- नमुचे - हे नमुचे- पाक - हे पाका- इल्वल - हे इल्वला. ॥४॥ विप्रचित्ते - हे विप्रचित्ते- पुलोमन् शकुनादयः - हे पुलोम्या, अहो शकुन आदिकरून दैत्य हो- सर्वे - सर्वजण- शृणुत - तुम्ही ऐका- अनंतरं - नंतर- आशु - लवकर- क्रियतां - त्याप्रमाणे करा- चिरं मा - विलंब लावू नका. ॥५॥
त्यावेळी त्याच्या विक्राळ दाढा, आग ओकणारी उग्र दृष्टी आणि विस्फारलेल्या भुवया यांमुळे त्याच्या तोंडाकडे बघवत नव्हते. भर सभेत त्रिशूळ हातात घेऊन तो द्विमूर्धा, त्र्यक्ष, शंबर, शतबाहू, हयग्रीव, नमुची, पाक, इल्वल, विप्रचित्ती, पुलोमा, शकुन इत्यादींना संबोधित म्हणाला, "हे दैत्य-दानवांनो, तुम्ही सर्वजण माझे म्हणणे ऐका आणि त्यानंतर मी म्हणेन, तसे तत्काळ करा, वेळ घालवू नका." (३-५)
सपत्नैर्घातितः क्षुद्रैः भ्राता मे दयितः सुहृत् ।
पार्ष्णिग्राहेण हरिणा समेनाप्युपधावनैः ॥ ६ ॥
तुम्ही हे जाणता सर्व शत्रूंनी विष्णुच्या करें । मारिला प्रिय तो बंधू देवतांनी विनंतिने ॥६॥
समेन अपि - देवदैत्यांशी समानभाव असणार्याही- उपधावनैः - पण स्तुतीच्या योगाने- पार्ष्णिग्राहेण हरिणा - साह्यकारी होणार्या विष्णूमुळे- क्षुद्रैः सपत्नैः - क्षुद्र शत्रु जे देव त्यांनी- मे - माझा- सहृद् - सखा- दयितः - प्रिय- भ्राता - भाऊ- घातितः - मारिला. ॥६॥
माझ्या क्षुद्र शत्रुंनी माझ्या परम प्रिय आणि हितैषी भावाला विष्णूकरवी मारविले आहे. तो समदृष्टी असला तरी मनधरणी करून देवांनी त्याला आपल्या बाजूला वळविले आहे. (६)
तस्य त्यक्तस्वभावस्य घृणेः मायावनौकसः ।
भजन्तं भजमानस्य बालस्येवास्थिरात्मनः ॥ ७ ॥ मत् शूलभिन्नग्रीवस्य भूरिणा रुधिरेण वै । रुधिरप्रियं तर्पयिष्ये भ्रातरं मे गतव्यथः ॥ ८ ॥
विष्णु हा मूळचा शुद्ध आता रूपे धरी असा । स्थीर ना चित्ति तो आता भक्तांची बाजु घेतसे ॥७॥ त्रिशुळे छेदितो कंठ तर्पितो रक्त बंधुला । तेंव्हाचि शांत मी होई चैन ती ना तया विना ॥८॥
तस्य त्यक्त्तस्वभावस्य - आपला मूळ स्वभाव सोडणार्या त्या- घृणेः - निर्दय अशा- मायावनौकस - मायारूपी अरण्यात राहणार्या- भजंतं भजमानस्य - भक्ती करणार्याला सेवणार्या- बालस्य इव अस्थिरात्मनः - बालकाप्रमाणे चंचलचित्ताच्या- मच्छूलभिन्नग्रीवस्य - माझ्या शूलाने ज्याचे मस्तक भग्न झाले आहे अशा विष्णूच्या- भूरिणा रुधिरेण - पुष्कळ रक्ताने- वै - खरोखर- गतव्ययः - ज्याचे दुःख नाहीसे झाले आहे असा मी- मे रुधिरप्रियं भ्रातरं - ज्याला रक्त आवडते अशा माझ्या भावाला- तर्पयिष्ये - तृप्त करीन. ॥७-८॥
हा विष्णू मुळात शुद्ध तेजोरूप असूनही आता मायेने वराह इत्यादी रूपे धारण करू लागला आहे. त्याने आपला स्वभाव सोडला आहे. लहान मुलाप्रमाणे, जो त्याची सेवा करील, त्याच्या बाजूला तो झुकतो. त्याचे चित्त स्थिर नाही. (७) "आता मी माझ्या या त्रिशूळाने त्याचा गळा छाटून त्याच्या रक्ताच्या धारेने रक्त-प्रिय असलेल्या माझ्या भावाचे तर्पण करीन, तेव्हाच माझ्या हृदयातील क्रोध शांत होईल." (८)
तस्मिन्कूटेऽहिते नष्टे कृत्तमूले वनस्पतौ ।
विटपा इव शुष्यन्ति विष्णुप्राणा दिवौकसः ॥ ९ ॥
तोडिता मूळ जै वाळे वृक्ष तो त्याचिया परी । मायावी शत्रु हा विष्णु देवतांचा तसाच की ॥९॥
तस्मिन् कूटे अहिते नष्टे - तो कपटी अकल्याण करणारा नष्ट झाला असता- विष्णुप्राणाः दिवौकसः - विष्णु हाच आहे प्राण ज्याचा असे देव- कृत्तमूले वनस्पतौ - वृक्षाचे मूळ तोडिले असता- विटपाः इव - जशा खांद्या तसे- शुष्यंति - सुकतील. ॥९॥
झाडाचे मूळ तोडल्यानंतर फांद्या आपोआप सुकतात, तसे तो मायावी शत्रू नष्ट झाल्यानंतर सर्व देव आपोआप निष्प्रभ होतील. कारण त्यांचे जीवन विष्णू हेच आहे. (९)
तावद्यात भुवं यूयं विप्रक्षत्रसमेधिताम् ।
सूदयध्वं तपोयज्ञ स्वाध्याय व्रतदानिनः ॥ १० ॥
म्हणोनी पृथ्वीसी जावे वाढले द्विज क्षत्रिय । तेथील लोक स्वाध्याय दान यज्ञ तपे व्रते । करिती शुभ इत्यादी त्या सर्वां ठार मारणे ॥१०॥
तावत् - तेथपर्यंत- यूयं - तुम्ही- विप्रक्षत्त्रसमेधितां - ब्राह्मण व क्षत्रिय यांनी वाढलेल्या- भुवं - भूमीवर- यात - जा- तपोयज्ञस्वाध्यायव्रतदानिनः - तप, यज्ञ, अध्ययन, व्रत व दान करणार्यांना- सूदयध्वं - मारा. ॥१०॥
म्हणून तुम्ही आता पृथ्वीवर जा. तेथे ब्राह्मण आणि क्षत्रियांचे वर्चस्व आहे. तेथे जे लोक तपश्चर्या, यज्ञ, स्वाध्याय, व्रत आणि दानादी शुभ कर्मे करीत असतील, त्या सर्वांना मारून टाका. (१०)
विष्णुर्द्विजक्रियामूलो यज्ञो धर्ममयः पुमान् ।
देवर्षि पितृ भूतानां धर्मस्य च परायणम् ॥ ११ ॥
विष्णुचे मूळ ते विप्रकर्म धर्म रूपीच तो । देवता सर्व प्राणी नी धर्माचा तोचि आश्रय ॥११॥
विष्णुः - विष्णु- द्विजक्रियामूलः - ब्राह्मणाचे अनुष्ठान हा ज्याचा आधार आहे असा- युज्ञः - यज्ञरूपी- पुमान् - पुरुष आहे- देवर्षि पितृभूतानां - देव, ऋषि, पितर व प्राणी यांचे- च - आणि- धर्मस्य - धर्माचे- परायणं - श्रेष्ठ आश्रयस्थान आहे. ॥११॥
द्विजांची धर्म-कर्मे हाच विष्णूचा आधार आहे. कारण यज्ञ आणि धर्मच त्याचे स्वरूप आहे. देव, ऋषी, पितर, सर्व प्राणी आणि धर्म यांचा तोच खरा आश्रय आहे. (११)
यत्र यत्र द्विजा गावो वेदा वर्णाश्रमक्रियाः ।
तं तं जनपदं यात सन्दीपयत वृश्चत ॥ १२ ॥
जेथे गायी नि ते वेद वर्णाश्रमचि धर्म हो । त्या त्या देशी तुम्ही जा नी जाळोनी सर्व नागवा ॥१२॥
यत्रयत्र - जेथे जेथे- द्विजाः - ब्राह्मण- गावः - गाई- वेदाः - वेद- वर्णाश्रमाः - वर्ण व आश्रम- क्रियाः - कर्मे ह्या गोष्टी चालू आहेत- तंतं जनपदं - त्या त्या देशाला- यात - जा- संदीपयत - जाळा- वृश्चत - उच्छिन्न करा. ॥१२॥
म्हणून जेथे ब्राह्मण, गायी, वेद आणि वर्णाश्रमांची धर्म-कर्मे असतील, त्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांना जाळून टाका, उजाड करून टाका. (१२)
इति ते भर्तृनिर्देशं आदाय शिरसाऽऽदृताः ।
तथा प्रजानां कदनं विदधुः कदनप्रियाः ॥ १३ ॥
जीवांना दुःख ते होता दैत्यांना सुख लाभते । स्वीकार करूनी आज्ञा लोकांना मारू लागले ॥१३॥
इति - याप्रमाणे- ते - ते दैत्य- भर्तृनिर्देशं - स्वामीची आज्ञा- शिरसा - मस्तकाने- आदाय - ग्रहण करून- आदृताः - आदर दाखविणारे- कदनप्रियाः - हिंसा करणे ज्यांना प्रिय आहे असे- तथा - त्याप्रमाणे- प्रजानां - प्रजांची- कदनं - हिंसा- चक्रुः - करिते झाले. ॥१३॥
तेव्हा दैत्यराज हिरण्यकशिपूची आज्ञा शिरसावंद्य मानून ते युद्धप्रिय दैत्य जनतेचा नाश करू लागले. (१३)
पुरग्राम व्रजोद्यान क्षेत्रारामाश्रमाकरान् ।
खेटखर्वटघोषांश्च ददहुः पत्तनानि च ॥ १४ ॥
तयांनी नगरे गावे गोठे बाग क्रिडांगणे । रत्नागरे नि वाड्या नी व्यापारी केंद्र जाळिले ॥१४॥
पुरग्रामव्रजोद्यानक्षेत्रारामाश्रमाकरान् - नगर, गाव, गोठे, बागा, शेते, उपवने व रत्नादिकांच्या खाणी- खेटखर्वटघोषान् - शेतकर्यांच्या झोपडया, डोंगरांच्या दर्यांमधील गाव, गवळ्यांचे वाडे- च - आणि- पत्तनानि - राजधान्या- ददहुः - जाळिते झाले. ॥१४॥
त्यांनी नगरे, गावे, गायींचे गोठे, बागबगीचे, शेते, विहार करण्याची ठिकाणे, ऋषींचे आश्रम, रत्नांच्या खाणी, शेतकर्यांच्या वस्त्या, डोंगराळ गावे, गवळ्यांच्या वस्त्या आणि नगरे जाळून टाकली. (१४)
केचित् खनित्रैर्बिभिदुः सेतु प्राकार गोपुरान् ।
आजीव्यांश्चिच्छिदुर्वृक्षाम् केचित् परशुपाणयः । प्रादहन् शरणान्येके प्रजानां ज्वलितोल्मुकैः ॥ १५ ॥
कोणी कुदळ घेवोनी मोठे पूल नि कोट नी । फाटके तोडिले तैसे फलवृक्षहि तोडिले । जळते काष्ठ घेवोनी घरे ती जाळु लागले ॥१५॥
केचित् - कोणी- खनित्रैः - खणण्याच्या हत्यारांनी- सेतुप्राकारगोपुरान् - पूल, देवळे, गोपुरे- बिभिदुः - फोडिते झाले- केचित् - कोणी- परशुपाणयः - हातांत कुर्हाड घेतलेले- आजीव्यान् - ज्यांवर उपजीविका होते असे- वृक्षान् - वृक्ष- चिच्छिदुः - तोडिते झाले- अन्ये - दुसरे- ज्वलितोल्मुकैः - जळक्या कोलत्यांनी- प्रजानां - प्रजांची- शरणानि - घरे- प्रादहन् - जाळिते झाले. ॥१५॥
काहींनी खोदण्याच्या साहित्याने मोठमोठे पूल, किल्ले आणि नगरांचे दरवाजे तोडून-फोडून टाकले. तर दुसर्यांनी कुर्हाडींनी फळे, फुले आलेले वृक्ष तोडून टाकले. काही दैत्यांनी जळत्या कोलितांनी लोकांची घरे जाळली. (१५)
एवं विप्रकृते लोके दैत्येन्द्रानुचरैः मुहुः ।
दिवं देवाः परित्यज्य भुवि चेरुरलक्षिताः ॥ १६ ॥
निष्पाप ती प्रजा सर्व दैत्यांनी पीडिली बहू । स्वर्ग सोडोनि त्या वेळी लपोनी पृथिवीस या । देवता राहिल्या होत्या गुप्तवेष धरोनिया ॥१६॥
एवं - याप्रमाणे- दैत्येंद्रानुचरैः - हिरण्यकशिपुच्या सेवकांनी- मुहुः - वारंवार- लोके विप्रकृते - जन त्रासवून सोडिले असता- देवाः - देव- अलक्षिताः - कोणीकडून न पाहिले गेलेले- दिवं - स्वर्गलोकाला- परित्यज्य - सोडून- भुवि - पृथ्वीवर- चेरुः - संचार करिते झाले. ॥१६॥
अशा प्रकारे दैत्यराजाच्या सेवकांनी निरागस प्रजेला छळण्यास सुरूवात केली. त्यावेळी देव स्वर्ग सोडून लपून-छपून पृथ्वीवर राहू लागले. (१६)
हिरण्यकशिपुर्भ्रातुः सम्परेतस्य दुःखितः ।
कृत्वा कटोदकादीनि भ्रातृपुत्रानसान्त्वयत् ॥ १७ ॥
हिरण्यकश्यपू झाला दुःखीत बंधु मृत्युने । अंत्येष्टी करूनी येता सांत्विले पुतण्यास त्या ॥१७॥
दुःखितः - दुःखी- हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु- संपरेतस्य - मेलेल्या- भ्रातुः - भावांची- कटोदकादीनि - प्रेताला उदक देणे, प्रेतश्राद्धे इत्यादि कृत्ये- कृत्वा - करून- भ्रातृपुत्रान् असांत्वयत् - भावांच्या मुलांचे सांत्वन करिता झाला. ॥१७॥
युधिष्ठिरा, दु:खी हिरण्यकशिपूने मृत भावाची अंत्येष्टी केल्यावर आपले पुतणे शकुनी, शंबर, धृष्ट, भूतसंतापन, वृक, कालनाभ, महानाभ, हरिश्मश्रू आणि उत्कच यांचे सांत्वन केले. (१७)
शकुनिं शम्बरं धृष्टिं भूतसन्तापनं वृकम् ।
कालनाभं महानाभं हरिश्मश्रुं अथ उत्कचम् ॥ १८ ॥ तन्मातरं रुषाभानुं दितिं च जननीं गिरा । श्लक्ष्णया देशकालज्ञ इदमाह जनेश्वर ॥ १९ ॥
शकुनी शंबरा धृष्टा कालनाभ हरिश्मश्रू । वृक नी भूतसंपन्नो उत्कलो सगळ्यास या ॥१८॥ रूषाभानू तयीं माता आपुली दिति मातृही । देशकालानुसारेण मधूर समजाविले ॥१९॥
शकुनिं - शकुनीला- शंबरं - शंबराला- धृष्टं - धृष्टाला- भूतसंतापनं - भूतसंतापनाला- वृकं - वृकाला- कालनाभं - कालनाभाला- महानाभं - महानाभाला- हरिश्मश्रुं - हरिश्मश्रूला- अथ - आणि- उत्कचं - उत्कचाला- जनेश्वर - हे धर्मराजा- देशकालज्ञः - देश व काळ जाणणारा हिरण्यकशिपु- तन्मातरं रुषाभानुं - त्यांची आई जी रुषाभानु तिला- च - आणि- जननीं दितिं - आपली आई जी दिति तिला- श्लक्ष्णया गिरा - मधुर वाणीने- इदं - हे- आह - म्हणाला. ॥१८-१९॥
हे राजा, त्यांची आई रुषाभानू आणि आपली माता दिती यांना मधुर वाणीने देशकालानुरूप समजावीत त्याने म्हटले. (१८-१९)
हिरण्यकशिपुः उवाच -
अम्बाम्ब हे वधूः पुत्रा वीरं मार्हथ शोचितुम् । रिपोरभिमुखे श्लाघ्यः शूराणां वध ईप्सितः ॥ २० ॥
हिरण्यकश्यपू म्हणाला - प्रियंबे ! वहिनी ऐका न करा शोक तो मुळी । वीर हा इच्छितो मृत्यू रणात शत्रु झोडिता ॥२०॥
अंब अंब - हे माते हे माते- हे वधूः - हे वहिनी- पुत्राः - पुत्र हो- वीरं - पराक्रमी हिरण्याक्षाविषयी- शोचितुं - शोक करण्याला- मा अर्हथ - तुम्ही योग्य नाही- शूराणां वधः रिपोः अभिमुखे - शत्रूंच्यासमोर शूरांचे वध- ईप्सितः श्लाघ्यः - इष्ट व स्तुत्य होय. ॥२०॥
हिरण्यकशिपू म्हणाला – हे माते, वहिनी आणि पुत्रांनो, वीर हिरण्याक्षासाठी तुम्ही शोक करू नका. शत्रूच्या समोर पराक्रम गाजवताना मृत्यू येणे, हेच वीरांना गौरवास्पद वाटते. (२०)
भूतानां इह संवासः प्रपायां इव सुव्रते ।
दैवेनैकत्र नीतानां उन्नीतानां स्वकर्मभिः ॥ २१ ॥
अड्ड्यासी जमती कैक येती जाती क्षणातची । कर्माने जीव हा तैसा भेटतो सोडितो दुजा ॥२१॥
सुव्रते - हे सुशील आई- दैवेन - दैवयोगाने- एकत्र - एकाठिकाणी- नीतानां - मिळालेल्या- स्वकर्मभिः - आपल्या कर्मांनी- उन्नीतानां - वियोग पावलेल्या- इह - ह्या लोकांत- भूतानां - प्राणिमात्रांचा- संवासः - एकत्र वास- प्रपायां इव - पाणपोईवरील वासाप्रमाणे. ॥२१॥
हे देवी, पाणपोईवर जमणार्या लोकांप्रमाणे या जगातील प्राण्यांचे एकमेकांना भेटणे असते. आपल्या कर्मांनुसार जीव काही काळ एकमेकांना भेटतात आणि दूर जातात. (२१)
नित्य आत्माव्ययः शुद्धः सर्वगः सर्ववित् परः ।
धत्तेऽसावात्मनो लिङ्गं मायया विसृजन् गुणान् ॥ २२ ॥
आत्मा तो अविनाशी नी नित्य शुद्ध नि सर्वगत् । सर्वज्ञ सवता ऐसा अविद्दे देह धारितो ॥२२॥
असौ - हा- नित्यः - नित्य- अव्ययः - नाशरहित- शुद्धः - पवित्र- सर्वगः - सर्वव्यापी- सर्ववित् - सर्वज्ञ- परः - सर्वश्रेष्ठ- आत्मा - आत्मा- आत्मनः मायया - आपल्या मायेने- गुणान् - सत्त्वादि गुणांना- विसृजन् - उत्पन्न करणारा- लिंगं - व्यक्तस्वरूप- धत्ते - धारण करितो. ॥२२॥
खरे पाहू जाता आत्मा नित्य, अविनाशी, शुद्ध, सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि देहापासून वेगळा आहे. तो आपल्या अविद्येनेच देह इत्यादी निर्माण करून सूक्ष्म शरीराचा स्वीकार करतो. (२२)
यथाम्भसा प्रचलता तरवोऽपि चला इव ।
चक्षुषा भ्राम्यमाणेन दृश्यते चलतीव भूः ॥ २३ ॥ एवं गुणैर्भ्राम्यमाणे मनस्यविकलः पुमान् । याति तत् साम्यतां भद्रे ह्यलिङ्गो लिङ्गवान् इव ॥ २४ ॥
तरंग हलता वृक्षप्रतिबिंबहि हालते । हालत्या बुबुळा सर्व पृथिवी हालता दिसे ॥२३॥ कल्याणी ! भटके चित्त मूळ आत्मा तया तदा । स्थूळ सूक्ष्मा न संबंधी परी संबंधि भासती ॥२४॥
यथा - ज्याप्रमाणे- प्रचलता अंभसा - हलणार्या उदकामुळे- तरवः अपि - वृक्षही- चलाः इव दृश्यन्ते - जणू हालणारे असे दिसतात- वा - किंवा- भ्राम्यमाणेन चक्षुषा - फिरणार्या नेत्राच्या योगाने- भूः - पृथ्वी- चलती इव - जणू फिरणारी अशी- दृश्यते - दिसते. ॥२३॥ एवं - याप्रमाणे- भद्रे - हे कल्याणकारक आई- गुणैः - गुणांनी- भ्राम्यमाणे मनसि - भ्रमिष्ठ झालेल्या मनाच्या ठिकाणी- अलिंगः - देहरहित- अविकलः - परिपूर्ण- पुमान् - पुरुष- लिंगवान् इव - देहवानाप्रमाणे- तत्साम्यतां - त्याच्या सारखेपणाला- याति - प्राप्त होतो. ॥२४॥
जसे हलणार्या पाण्याबरोबर त्यात प्रतिबिंबित झालेली झाडेसुद्धा हलतात असे वाटते आणि डोळे फिरवू लागलो की, सगळी पृथ्वी फिरत आहे असे वाटते, त्याचप्रमाणे हे कल्याणी, विषयांमुळे मन भटकू लागले की निर्विकार आत्मा भटकतो असे वाटते. शरीराशी त्याचा संबंध नसला तरीसुद्धा संबंध असल्यासारखे वाटते. (२३-२४)
एष आत्मविपर्यासो ह्यलिङ्गे लिङ्गभावना ।
एष प्रियाप्रियैर्योगो वियोगः कर्मसंसृतिः ॥ २५ ॥ सम्भवश्च विनाशश्च शोकश्च विविधः स्मृतः । अविवेकश्च चिन्ता च विवेकास्मृतिरेव च ॥ २६ ॥
आत्म्याला जड तो मानी खरा अज्ञानि तो पहा । तेणे भास असा होतो प्रपंची भ्रमणे पडे ॥२५॥ जन्म मृत्यु नि तो शोक चिंता नी अविवेक तो । विस्मृती ती विवेकाची अज्ञाने सगळे घडे ॥२६॥
हि - कारण- अलिंगे - देहरहित जीवाच्या ठिकाणी- लिंगभावना - देहाची कल्पना- प्रियाप्रियैः - प्रिय व अप्रिय यांच्याशी क्रमाने- वियोगः - वियोग- योगः - योग- कर्म - कर्म- संसृतिः - अनेक योनींत जन्म- संभवः - उत्पत्ति- च - आणि- विनाशः - नाश- च - आणि- विविधः - नानाप्रकारचा- स्मृतः - सांगितला आहे- शोकः - शोक- च - आणि- अविवेकः - अविचार- च - आणि- चिंता - काळजी- च - आणि- विवेकास्मृतिः - विवेकाचे विस्मरण- एव - खरोखर- एषः - हा- आत्मविपर्यासः (अस्ति) - आत्म्याचे स्वरूप उलट करण्याचा प्रकार होय. ॥२५-२६॥
सर्व प्रकारे शरीरविरहित असणार्या आत्म्याला शरीर समजणे, हेच ते अज्ञान होय. यामुळेच प्रिय किंवा अप्रिय वस्तूंची भेट किंवा वियोग होतो. हे सारे कर्मांशी संबंध आल्यामुळे घडते. (२५) जन्म, मृत्यू, अनेक प्रकारचे शोक, अविवेक, चिंता आणि विवेकाची विस्मृती होणे या सर्वांचे कारण अज्ञान हेच आहे. (२६)
अत्रापि उदाहरन्तीं इतिहासं पुरातनम् ।
यमस्य प्रेतबन्धूनां संवादं तं निबोधत ॥ २७ ॥
संत ते बोलती ऐसा इतिहास पुरातन । वदे संबंधिया येम चित्त देवोनि ऐकणे ॥२७॥
अत्र अपि - ह्याविषयीसुद्धा - इमं पुरातनं इतिहासं - हा प्राचीन इतिहास - उदाहरंति - उदाहरण म्हणून सांगतात - यमस्य प्रेतबंधूनां - यम व मृताचे संबंधी यांमधील - तं संवादं - तो संवाद - निबोधत - समजून घ्या. ॥२७॥
याविषयी एक प्राचीन इतिहास सांगतात. तो इतिहास म्हणजे मेलेल्या मनुष्यांच्या संबंधितांशी यमराजाने केलेला संवाद होय. तुम्ही तो आता एकाग्रचित्ताने ऐका. (२७)
उशीनरेषु अभूद् राजा सुयज्ञ इति विश्रुतः ।
सपत्नैर्निहतो युद्धे ज्ञातयः तं उपासत ॥ २८ ॥
उशीनर यया देशी सुयज्ञ नृप कीर्तिमान् । युद्धात मारला जाता आप्तेष्टे प्रेत घेरिले ॥२८॥
उशीनरेषु - उशीनर देशामध्ये - विख्यातः - प्रख्यात - सुयज्ञः इति - सुयज्ञ नावाचा - राजा - राजा - अभूत् - होता - सपत्नैः - शत्रूंनी - युद्धे - युद्धात - निहतः - मारिला - ज्ञातयः - ज्ञातिबांधव - तं उपासत - त्याच्याजवळ बसले. ॥२८॥
उशीनर देशामध्ये सुयज्ञ नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. लढाईत शत्रूंनी त्याला मारले. त्यावेळी त्याचे भाऊ-बंद त्याच्या भोवताली बसले. (२८)
विशीर्णरत्नकवचं विभ्रष्टाभरणस्रजम् ।
शरनिर्भिन्नहृदयं शयानं असृगाविलम् ॥ २९ ॥ प्रकीर्णकेशं ध्वस्ताक्षं रभसा दष्टदच्छदम् । रजःकुण्ठमुखाम्भोजं छिन्नायुधभुजं मृधे ॥ ३० ॥
तुटले रत्नकवचो मालाही तुटल्या तशा । हृदयो तुटले बाणे रक्ताने भिजली तनू ॥२९॥ तसे विखुरले केश डोळेही फुटले पहा । दातांनी दबले ओठ मातीने भरले मुख । युद्धात तुटले शस्त्र बाहूही तुटल्या तशा ॥३०॥
विशीर्णरत्नकवचं - तुटून गेले आहे रत्नाचे कवच ज्याचे अशा - विभ्रष्टाभरणस्रजं - गळून गेले आहे अलंकार व माळा ज्याच्या अशा - शरनिर्भिन्नहृदयं - बाणाने फुटले आहे हृदय ज्याचे अशा - शयानं - निजलेल्या - असृगाविलं - रक्ताने माखलेल्या - प्रकीर्णकेशं - विखुरले आहेत केस ज्याचे अशा - ध्वस्ताक्षं - नष्ट झाली आहे दृष्टि ज्याची अशा - रभसा - क्रोधाने - दष्टदच्छदं - चाविला आहे ओठ ज्याने अशा - रजःकुंठमुखांभोजं - धुळीने मुखकमळ भरून गेले ज्याचे अशा - मृधे छिन्नायुधभुजं - रणात शस्त्रे व हात छिन्न झालेल्या. ॥२९-३०॥
त्याचे रत्नजडित कवच छिन्न-विच्छिन्न झाले होते. अंगावरील अलंकार आणि माळा इतस्तत: विखुरल्या गेल्या होत्या. बाणांच्या मारांनी छाती फाटून गेली होती. तो मेला होता. त्याचे शरीर रक्ताने लडबडले होते. केस विस्कळित झाले होते. डोळे बाहेर आले होते आणि क्रोधामुळे दातांनी ओठ दाबले गेले होते. कमळासारखे त्याचे मुख धुळीने माखले होते. युद्धामुळे त्याचे शस्त्र आणि हात तुटले होते. (२९-३०)
उशीनरेन्द्रं विधिना तथा कृतं
पतिं महिष्यः प्रसमीक्ष्य दुःखिताः । हताः स्म नाथेति करैरुरो भृशं घ्नन्त्यो मुहुस्तत् पदयोरुपापतन् ॥ ३१ ॥
(इंद्रवज्रा) बघोनि ऐसी पतिची अवस्था राण्यासि झाले बहु दुःख तेंव्हा । मेलोत आम्ही जित आसुनीया छाती पिटोनी वदल्या अशा त्या ॥३१॥
दुःखिताः - दुःखी - महिष्यः - राजाच्या पटटराण्या - विधिना - दैवाने - तथाकृतं - त्याप्रमाणे अवस्था केलेल्या - पतिं उशीनरेंद्रं - उशीनरदेशाच्या राजाला - प्रसमीक्ष्य - पाहून - नाथ - हे स्वामी - हतः स्म - आम्ही अभागी आहो - इति - असे ओरडत - करैः - हातांनी - उरः - वक्षस्थलाला - भृशं - अत्यंत जोराने - घ्नंत्यः - ताडण करणार्या - मुहुः - वारंवार - तत्पदयोः उप अपतन् - त्याच्या पायांजवळ पडल्या. ॥३१॥
आपले पती उशीनर नरेशांची दैववशात झालेली ही दशा पाहून राण्यांना अतिशय दु:ख झाले. "हे नाथ ! आमचा घात झाला." असे म्हणत त्या जोरजोराने छाती पिटून घेत आपल्या स्वामीच्या चरणांजवळ पडल्या. (३१)
रुदत्य उच्चैर्दयिताङ्घ्रिपङ्कजं
सिञ्चन्त्य अस्रैः कुचकुङ्कुमारुणैः । विस्रस्तकेशाभरणाः शुचं नृणां सृजन्त्य आक्रन्दनया विलेपिरे ॥ ३२ ॥
शोकेचि अश्रू कुच-कुंकुमाते मिळोनि गेले प्रियच्या पदास । नी दागिने केशहि पांगले की आक्रंदता अन्यहि शोकि न्हाले ॥३२॥
उच्चैः - मोठयाने - रुदंत्यः - रडणार्या - दयितांघ्रिपंकजं - पतीच्या चरणकमळाला - कुचकुंकुमारुणैः - स्तनांवरील केशरामुळे लाल झालेल्या - अस्रैः - अश्रूंनी - सिंचन्त्यः - भिजविणार्या - विस्रस्तकेशाभरणाः - केस व अलंकार अस्ताव्यस्त झालेल्या - आक्रंदनया - आक्रोशाने - नृणां - मनुष्यांच्या - शुचं - शोकाला - सृजंत्यः - उत्पन्न करणार्या स्त्रिया - विलेपिरे - विलाप करित्या झाल्या. ॥३२॥
त्या जोरजोराने इतक्या रडू लागल्या की, डोळ्यांतील अश्रू कुंकुममंडित स्तनावर पडून त्या लाल लाल रंगाच्या धारांनी त्यांच्या प्रियतमाचे पाय धुतले गेले. त्यांचे केस आणि अलंकार अस्ताव्यस्त विखुरले गेले. करुण स्वरात त्या विलाप करीत होत्या आणि ते ऐकून पाहणार्या माणसांच्या मनात कालवाकालव होत होती. (३२)
अहो विधात्राकरुणेन नः प्रभो
भवान् प्रणीतो दृगगोचरां दशाम् । उशीनराणामसि वृत्तिदः पुरा कृतोऽधुना येन शुचां विवर्धनः ॥ ३३ ॥
देवा बहूक्रूरं असा कसा तू स्वामी तुम्हा दूरचि दृष्टि आड । तेणेचि नेले, तुम्ही लोकपाल दशा पहाता नच शोक थांबे ॥३३॥
अहो - अहो - प्रभो - स्वामी - अकरुणेन विधात्रा - निर्दय ब्रह्मदेवाने - नः दृगगोचरां - आमच्या दृष्टीने न दिसणार्या अशा - दशां - दशेला - भवान् - तू - प्रणीतः - नेलेला आहेस - उशीनराणां - उशीनर देशाच्या लोकांना - वृत्तिदः - निर्वाहाचे साधन देणारा असा - पुराकृतः - पूर्वी केलेला होतास - येन - ज्याने - अधुना - सांप्रत - शुचां विवर्धनः - शोकाची वृद्धी करणारा. ॥३३॥
हाय ! हाय ! विधाता किती क्रूर आहे ! स्वामी, त्यानेच आज आपल्याला आमच्या डोळ्यांआड केले. यापूर्वी आपण उशीनर देशातील प्रजेचे अन्नदाते होता. त्याच आपल्याला आज त्याने प्रजेला शोक देणारे केले. (३३)
त्वया कृतज्ञेन वयं महीपते
कथं विना स्याम सुहृत्तमेन ते । तत्रानुयानं तव वीर पादयोः शुश्रूषतीनां दिश यत्र यास्यसि ॥ ३४ ॥
तुम्हा विना आम्हि कसे जगावे तुम्हापदीच्या अम्हि सर्व दास्या । स्वामी तुम्ही जाल तिथेहि येण्या आज्ञा असावी मग आम्हि येऊ ॥३४॥
महीपते - हे स्वामी - कृतज्ञेन - केलेले जाणणार्या - सुहृत्तमेन - अत्यंत इष्ट अशा - त्वया विना - तुझ्याशिवाय - ते - तुझ्या - वयं - आम्ही - कथं - कशा - स्याम - जगू - वीर - हे पराक्रमी स्वामी - यत्र - ज्याठिकाणी - यास्यसि - तू जाशील - तत्र - त्याठिकाणी - तव पादयोः - तुझ्या पायाशी - शुश्रूषतीनां (नः) - सेवा करणार्या आम्हाला - अनुयानं देहि - सहगमन करण्याची आज्ञा दे. ॥३४॥
अहो महाराज, आपण आमच्यावर अतिशय प्रेम करून आम्ही केलेल्या लहानशा सेवेचे उपकार मानत होता. अरेरे ! आता आम्ही आपल्याशिवाय कशा राहू ? आम्ही आपल्या चरणांच्या दासी आहोत. वीरवर, आपण जेथे चालला आहात, तेथेच जाण्याची आम्हांला आज्ञा करा. (३४)
(अनुष्टुप्)
एवं विलपतीनां वै परिगृह्य मृतं पतिम् । अनिच्छतीनां निर्हारं अर्कोऽस्तं संन्यवर्तत ॥ ३५ ॥
(अनुष्टुप्) धरोनी पतिप्रेताला त्यांनी केला विलाप हा । नेच्छिती जाळण्या प्रेता सूर्यास्त जाहला तदा ॥३५॥
एवं - ह्याप्रमाणे - वै - खरोखर - निर्हारं - दहनासाठी नेणे - अनिच्छन्तीनां - न इच्छिणार्या - मृतं पतिं - मेलेल्या पतीला - परिगृह्य - घेऊन - विलपतीनां (तासां) - शोक करणार्या त्या स्त्रियांचा - अर्कः - सूर्य - अस्तं - अस्तास - सन्यवर्तत - गेला. ॥३५॥
आपल्या पतीच्या प्रेताला धरून त्या अशा प्रकारे विलाप करीत होत्या. ते प्रेत अग्निसंस्कारासाठी नेऊ देण्याची त्यांची इच्छा नव्हती. इतक्यात सूर्यास्त झाला. (३५)
तत्र ह प्रेतबन्धूनां आश्रुत्य परिदेवितम् ।
आह तान् बालको भूत्वा यमः स्वयमुपागतः ॥ ३६ ॥
तदा संबंधि यांनीही विलाप मांडला बहू । यमाने ऐकता शोक बालवेषात पातला ॥३६॥
ह - खरोखर - तत्र - त्याठिकाणी - प्रेतबंधूनां - मृतांच्या बांधवांचा - परिदेवितं - विलाप - आश्रुत्य - श्रवण करून - स्वयं - स्वतः - यमः - यम - बालकः - बालक - भूत्वा - होऊन - उपागतः - आला - तान् - त्यांना - आह - म्हणाला. ॥३६॥
उशीनर राजाच्या सग्यासोयर्यांनी त्यावेळी जो विलाप केला, तो ऐकून स्वत: यमराज तेथे बालकाच्या वेषात आले आणि त्यांना म्हणाले. (३६)
यम उवाच -
अहो अमीषां वयसाधिकानां विपश्यतां लोकविधिं विमोहः । यत्रागतस्तत्र गतं मनुष्यं स्वयं सधर्मा अपि शोचन्त्यपार्थम् ॥ ३७ ॥
यमराज (बालवेषात) म्हणाले - (इंद्रवज्रा) माझ्याहुनी वृद्धचि लोक तुम्ही मृत्यु नि जन्मा बघुनी ही मूढ । आला तयाला घडतेचि जाणे खोटाचि कां हा करितात शोक ॥३७॥
अहो - काय हो - वयसा अधिकानां अमीषां - वयाने वडील असणार्या ह्यांना - लोकविधिं - व लोकांमधील जन्ममरणादि प्रकार - विपश्यतां - पाहणार्यांना - विमोहः - मोठा मोह - यत्र - ज्या अव्यक्तापासून - आगतः - आला - तत्र - त्याठिकाणी - गतं - गेलेल्या - मनुष्यं - मनुष्याविषयी - स्वयं - स्वतः - सधर्माः अपि - तुल्य धर्माचे असतानाही - अपार्थं - व्यर्थ - शोचंति - शोक करीत आहेत. ॥३७॥
यमराज म्हणाले – अहो, हे लोक माझ्यापेक्षा वडील असून आपल्या बरोबरीच्या लोकांचे मरण पाहातात. तरीसुद्धा हे असे मूर्ख कसे ? अरे ! हा मनुष्य जेथून आला, तेथेच निघून गेला. या लोकांनाही एक दिवस तेथे जावयाचेच आहे. असे असता हे लोक विनाकारण इतका शोक का बरे करीत आहेत ? (३७)
अहो वयं धन्यतमा यदत्र
त्यक्ताः पितृभ्यां न विचिन्तयामः । अभक्ष्यमाणा अबला वृकादिभिः स रक्षिता रक्षति यो हि गर्भे ॥ ३८ ॥
आम्ही तुम्हाहून कितीक चांग त्या माय-बापे त्यजिले अम्हाला । न शक्ति अंगी तरि नाहि चिंता केसा न धक्का कुणि लावितात । गर्भात जेणे मज रक्षियेले रक्षी जगामाजिहि तोच आम्हा ॥३८॥
यत् - ज्याअर्थी - अत्र - ह्याठिकाणी - पितृभ्यां - आईबापांनी - त्यक्ताः - टाकिलेले - न विचिंतयामः - चिंता करीत नाही - अहो - अहो - वयं - आम्ही - वृकादिभिः - लांडगे आदिकरून पशूंकडून - अभक्ष्यमाणाः - न खाल्लेले - अबलाः - दुर्बळ असताही - धन्यतमाः - अत्यंत धन्य आहो - हि - कारण - यः - जो - गर्भे - गर्भामध्ये - रक्षति - रक्षण करितो - सः - तो सर्वठिकाणी - रक्षिता - रक्षण करील. ॥३८॥
आम्ही तर तुमच्यापेक्षा लाखपट चांगले. कारण आमचे आई-वडील आम्हांला सोडून गेले. आमच्या शरीरात पुरेसे बळही नाही. लांडगे वगैरे हिंस्र पशू आम्हांला खातील, याचीही आम्हांला काळजी वाटत नाही. कारण गर्भामध्ये ज्याने आमचे रक्षण केले, तोच आमचे या जीवनातसुद्धा रक्षण करीत आहे. (३८)
य इच्छयेशः सृजतीदमव्ययो
य एव रक्षत्यवलुम्पते च यः । तस्याबलाः क्रीडनमाहुरीशितुः चराचरं निग्रहसङ्ग्रहे प्रभुः ॥ ३९ ॥
हे देवियांनो हरि इच्छुनीया रची जगाला अन तोच मोडी । हे विश्व त्याचे नित खेळणे की जगास दंडी अन बक्षिसी दे ॥३९॥
यः - जो - ईशः - ईश्वर - इच्छया - इच्छेने - इदं - हे जग - सृजति - उत्पन्न करितो - यः - जो - अव्ययः - अविनाशी - अवलुंपते - संहार करितो - अबलाः - हे स्त्रियांनो - तस्य - त्या - इशितुः - परमेश्वराचे - चराचरं - स्थावरजंगमात्मक जग - क्रीडनं - खेळण्याचे साधन - आहुः - म्हणतात - निग्रहसंग्रहे - चराचराच्या संहारपालनाविषयी - प्रभुः - समर्थ. ॥३९॥
हे राण्यांनो, जो अविनाशी ईश्वर आपल्या लीलेने या जगाची उत्पत्ती, रक्षण आणि नाश करतो, त्या प्रभूचा हा एक केवळ खेळ आहे. या चराचर जगताला दंड किंवा बक्षीस देण्यास तोच समर्थ आहे. (३९)
पथि च्युतं तिष्ठति दिष्टरक्षितं
गृहे स्थितं तद् विहतं विनश्यति । जीवत्यनाथोऽपि तदीक्षितो वने गृहेऽभिगुप्तोऽस्य हतो न जीवति ॥ ४० ॥
वाटते वस्तू पडुनी रहाते न भाग्य तेंव्हा फुटते तिजोरी । ते वन्यप्राणी जगती वनात दैवे घरी कोणि मरोनि जातो ॥४०॥
दिष्टरक्षितं - दैवाने रक्षण केलेले - पथि - रस्त्यात - च्युतं - पडलेले सुद्धा - तिष्ठति - जिवंत राहते - गृहे - घरात - स्थितं - असलेले - तद्विहतं - दैवाने उपेक्षिलेले - विनश्यति - नष्ट होते - तदीक्षितः - दैवाने अवलोकिलेला - वने - अरण्यात - अनाथः अपि - रक्षणकर्त्याशी रहित असताही - जीवति - जगतो - अस्य - ह्या परमेश्वराने - हतः - उपेक्षिलेला - गृहेअपि - घरातही - गुप्तः - रक्षण केलेला - न जीवति - जगत नाही. ॥४०॥
भाग्य अनुकूल असेल तर रस्त्यात पडलेली वस्तूसुद्धा जशीच्या तशी पडून राहते. परंतु भाग्य प्रतिकूल असेल तर घरात ठेवलेली वस्तूसुद्धा हरवते. जीव, कोणत्याही सहार्याशिवाय, दैवाच्या दया दृष्टीने जंगलातसुद्धा पुष्कळ दिवस जिवंत राहतो, परंतु दैव विपरीत झाल्यावर घरात सुरक्षित असूनही तो मरतो. (४०)
भूतानि तैस्तैर्निजयोनिकर्मभिः
भवन्ति काले न भवन्ति सर्वशः । न तत्र हात्मा प्रकृतावपि स्थितः तस्या गुणैः अन्यतमो हि बध्यते ॥ ४१ ॥
ज्या पूर्वजन्मी मनि वासना त्या तसाचि मृत्यू अन जन्म होता । आत्मा शरीराहुनि वेगळा तो त्यां जन्म मृत्यू नच स्पर्शिती की ॥४१॥
भूतानि - प्राणी - तैः तैः - त्या त्या - निजयोनिकर्मभि - आपल्या उत्पत्तीला कारणीभूत असे जे लिंगशरीर त्याला निमित्त झालेल्या कर्मांनी - भवंति - उत्पन्न होतात - काले - वेळ आली असता - सर्वशः - सर्वस्वी - न भवंति - नष्ट होतात - तत्र ह - खरोखर त्या वेळी - प्रकृतौ अपि - देहाच्या ठिकाणीही - स्थितः - असणारा - आत्मा - आत्मा - अन्यतमः - अगदी भिन्न असल्यामुळे - तस्याः - त्या प्रकृतीच्या - गुणैः - गुणांनी - न निबध्यते - बांधला जात नाही. ॥४१॥
सर्व प्राण्यांचा मृत्यू पूर्वजन्मातील कर्मानुसार त्या त्या वेळीच होतो. आणि जन्मसुद्धा तसाच होतो. परंतु आत्मा त्याच्या धर्मांना स्पर्श करीत नाही. (४१)
इदं शरीरं पुरुषस्य मोहजं
यथा पृथग्भौतिकमीयते गृहम् । यथौदकैः पार्थिवतैजसैर्जनः कालेन जातो विकृतो विनश्यति ॥ ४२ ॥
माती घरा जाणिती लोक भिन्न तशी तनू मृत्तिका भिन्न आहे । बुद्बूद होती जल ते जलात देहा तसे मातित होय जाणे ॥४२॥
इदं - हे - पुरुषस्य - पुरुषाचे - मोहजं - अविवेकापासून उत्पन्न झालेले - शरीरं - शरीर - यथा - ज्याप्रमाणे - भौतिकं - ऐश्वर्ययुक्त - गृहं - घर त्याप्रमाणे - पृथक् - वेगळे - ईयते - दिसते - यथा - जसा - औदकैः - उदकापासून झालेल्या पदार्थांनी - पार्थिवतैजसैः - पृथ्वी व तेज यांपासून झालेल्या पदार्थांनी - जातः - झालेला बुडबुडा, घट व कुंडल इत्यादि पदार्थ - कालेन - काही काळाने - विनश्यति - नष्ट होतो तसा - जनःविकृतः - पुरुषाचा देह परिणत झाल्यावर. ॥४२॥
जसे मनुष्य आपले मातीचे घर आपल्याहून वेगळे समजतो, त्याचप्रमाणे हे पंचभूतात्मक शरीरसुद्धा आपल्याहून वेगळे असूनही मोहाने त्याला आपले समजतो. जसे बुडबुडे इत्यादी पाण्याचे विकार, घडा इत्यादी मातीचे विकार आणि अलंकार इत्यादी सोन्याचे विकार परमाणूंपासून तयार होतात, रूपांतरित होतात आणि नष्ट होऊन जातात, त्याचप्रमाणे या तिन्ही प्रकारच्या परमाणूंपासून बनलेले हे शरीरसुद्धा काळानुसार उत्पन्न होते, त्यात बदल होतो आणि ते नष्ट होते. (४२)
यथानलो दारुषु भिन्न ईयते
यथानिलो देहगतः पृथक् स्थितः । यथा नभः सर्वगतं न सज्जते तथा पुमान् सर्वगुणाश्रयः परः ॥ ४३ ॥
काष्ठात अग्नी असुनीहि भिन्न तसाचि वायू तनुसीहि भिन्न । सर्वत्र आकाश तरी अलिप्त निर्लेप आत्मा मग तो तसाचि ॥४३॥
यथा - ज्याप्रमाणे - अनलः - अग्नि - दारुषु - काष्ठांच्या ठिकाणी - भिन्नः - निराळा - ईयते - प्रतीत होतो - यथा - जसा - अनिलः - वायु - देहगतः - देहात असून - पृथक् स्थितः - निराळा अनुभवास येतो - तथा - ज्याप्रमाणे - नभः - आकाश - सर्वगतं - सर्वव्यापक असूनही - न सज्जते - कशालाही चिकटून राहत नाही - तथा - त्याप्रमाणे - पुमान् - आत्मा - सर्वगुणाश्रयः - देहेंद्रियाचा आश्रयभूत - परः - निराळा ॥४३॥
जसे लाकडात व्यापून असलेला अग्नी त्यापेक्षा वेगळा असतो, जसे देहात राहूनही वायूचा त्याच्याशी संबंध नसतो, जसे आकाश सगळीकडे व्याप्त असूनही कोणाच्या गुणदोषांनी लिप्त होत नाही, तसेच सर्व देहेंद्रियात राहणारा आणि त्यांचा आश्रय असलेला आत्मासुद्धा त्यांहून वेगळा आणि निर्लिप्त आहे. (४३)
(अनुष्टुप्)
सुयज्ञो नन्वयं शेते मूढा यं अनुशोचथ । यः श्रोता योऽनुवक्तेह स न दृश्येत कर्हिचित् ॥ ४४ ॥
(अनुष्टुप्) मूर्खांनो तुम्हि ज्या साठी शोकी तो तुमच्या पुढे । बोलवी जो तया आत्मा तुम्ही तो नच पाहिला ॥४४॥
मूढाः - हे मूर्ख लोक हो - यं - ज्याकरिता - अनुशोचथ - तुम्ही शोक करिता - अयं - हा - सुयज्ञः - सुयज्ञ - ननु - खरोखर - शेते - निजलेला आहे - इह - ह्याठिकाणी - यः - जो - श्रोता - ऐकणारा - यः - व जो - अनुवक्ता - बोलणारा - सः - तो - कर्हिचित् - केव्हाही - न दृश्येत - दिसणार नाही. ॥४४॥
मूर्खांनो, ज्याच्यासाठी तुम्ही शोक करीत आहात, तो हा सुयज्ञ तर तुमच्यासमोर पडला आहे. पण यामध्ये जो ऐकणारा आणि बोलणारा होता, तो मात्र कधी कोणाला दिसत नव्हता. आणि आजही दिसत नाही. (तर शोक कुणासाठी ?) (४४)
न श्रोता नानुवक्तायं मुख्योऽप्यत्र महानसुः ।
यस्तु इह इंद्रियवान् आत्मा स चान्यः प्राणदेहयोः ॥ ४५ ॥
महाप्राण शरीरासी चेतवी बोलवी तसे । द्रष्टा तो शरिरा माजी पृथक् प्राण तनू असे ॥४५॥
अयं - हा - अत्र - येथे - महान् - मोठा - असुः - प्राण - मुख्यः अपि - मुख्य असताही - श्रोता - ऐकणारा - न - नाही - अनुवक्ता - बोलणारा - न - नाही - च - आणि - यः - जो - इह - याठिकाणी - देहेंद्रियवान् - शरीर व इंद्रिये धारण करणारा - आत्मा - आत्मा - सः - तो - तु - तर - प्राणदेहयोः - प्राण व देह यांहून - अन्यः (अस्ति) - निराळा आहे. ॥४५॥
जो मुख्य महाप्राण आहे, तो सुद्धा बोलणारा किंवा ऐकणारा नाही. सर्व पदार्थांना देह आणि इंद्रियांद्वारा पाहणारा जो आत्मा आहे, तो शरीर आणि प्राण या दोहोंपासून वेगळा आहे. (४५)
भूतेन्द्रियमनोलिङ्गान् देहानुच्चावचान् विभुः ।
भजति उत्सृजति ह्यन्यः तच्चापि स्वेन तेजसा ॥ ४६ ॥
अविच्छिन्न असा तोची देह घेतो परो परी । विवेके मुक्त तो होतो सर्वां पासुनि वेगळा ॥४६॥
हि - कारण - अन्यः - निराळा - प्रभुः - आत्मा - भूतेंद्रियमनोलिंगान् - पंचमहाभूते, इंद्रिये, मन इत्यादि आहेत लक्षणे ज्यांची अशा - उच्चावचान् - लहानमोठया - देहान् - देहांना - भजति - सेवन करतो - च - आणि - स्वेन तेजसा - आपल्या तेजाने - तत् अपि - तेहि - उत्सृजति - टाकितो. ॥४६॥
व्यापक असा तो आत्मा पंचमहाभूते, इंद्रिये आणि मनाने युक्त अशी श्रेष्ठ-कनिष्ठ शरीरे ग्रहण करतो आणि आपल्या विवेकाच्या सामर्थ्याने सोडून देतो. वास्तविक पाहाता तो या सर्वांपासून वेगळा आहे. (४६)
यावलिङ्गान्वितः ह्यात्मा तावत् कर्मनिबन्धनम् ।
ततो विपर्ययः क्लेशो मायायोगोऽनुवर्तते ॥ ४७ ॥
सतरा तत्व मेळोनी धारिती देह साजिरा । कर्माच्या बंधने जाती क्लेश मोह तया सवे ॥४७॥
हि - खरोखर - यावत् - जोपर्यंत - आत्मा लिंगान्वितः - आत्मा लिंगशरीराने युक्त - तावत् - तोपर्यंत - कर्मनिबंधनं - त्याला कर्माचे बंधन असते - ततः - त्यामुळे - विपर्ययः - स्वरूपाच्या उलट असे देहधर्मसेवन - क्लेशः - दुःख - अनुवर्तते - मागोमाग येते - (यतः अयं) मायायोगः - कारण हा सर्व मायेचा खेळ होय. ॥४७॥
जोपर्यंत तो लिंगशरीराने युक्त असतो, तोपर्यंत कर्मांनी बांधलेला असतो आणि या बंधनांमुळेच मायेने होणारे मोह आणि क्लेश त्याचा पिच्छा सोडीत नाहीत. (४७)
वितथाभिनिवेशोऽयं यद् गुणेष्वर्थदृग्वचः ।
यथा मनोरथः स्वप्नः सर्वं ऐंन्द्रियकं मृषा ॥ ४८ ॥
सृष्टिसी मानणे सत्य दुराग्रह असाचि तो । मनोरथापरी सर्व असत्य समजा मनीं ॥४८॥
गुणेषु - गुणांच्या कार्याविषयी - यत् - जे - अर्थदृग्वचः - वास्तविक दृष्टीचे बोलणे - अयं - हा - वितथाभिनिवेशः - मिथ्या आरोप - सर्वं - सर्व - ऐंद्रियकं - इंद्रियांचे व्यापार - मृषा - असत्य - यथा - जसे - मनोरथः स्वप्नः - मनात आलेले स्वप्न. ॥४८॥
प्रकृतीचे गुण आणि त्यांपासून बनलेल्या वस्तूंना खरे समजणे किंवा म्हणणे हा खोटाच दुराग्रह आहे. मनाने कल्पना केलेल्या किंवा स्वप्नात दिसणार्या वस्तूंप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे जे काही ग्रहण केले जाते, ते सर्व खोटे आहे. (४८)
अथ नित्यमनित्यं वा नेह शोचन्ति तद्विदः ।
नान्यथा शक्यते कर्तुं स्वभावः शोचतामिति ॥ ४९ ॥
म्हणोनी जाणते त्यांनी शोक न करणे कधी । अज्ञान दृढ त्या लोकां कळणे नच स्वल्प हे ॥४९॥
अथ - यास्तव - इह - ह्या लोकांत - नित्यं - नित्य अशा आत्म्याविषयी - वा - किंवा - अनित्यं - अनित्य देहाविषयी - तद्विदः - नित्यानित्यविवेकी ज्ञानी पुरुष - न शोचंति - शोक करीत नाहीत - शोचतां - शोक करणार्यांचा - स्वभावः - स्वभाव - अन्यथा कर्तुं - पालटणे - न शक्यते - शक्य नाही - इति - असा हा प्रकार आहे. ॥४९॥
म्हणून शरीर आणि आत्म्याचे तत्त्व जाणणारे पुरुष अनित्य शरीरासाठी शोक करीत नाहीत की नित्य आत्म्यासाठी. परंतु ज्ञान नसल्याकारणाने जो लोक शोक करतात, त्यांचा स्वभाव बदलणे कठीण आहे. (४९)
लुब्धको विपिने कश्चित् पक्षिणां निर्मितोऽन्तकः ।
वितत्य जालं विदधे तत्र तत्र प्रलोभयन् ॥ ५० ॥
अशाच जंगला मध्ये एक तो पारधी वसे । जणू तो काळ पक्षांचा जाळ्याने पक्षि तो धरी ॥५०॥
विपिने पक्षिणां - अरण्यात पक्ष्यांचा - अंतकः - काळ म्हणून - निर्मितः - परमेश्वराने निर्माण केलेला - कश्चित् लुब्धकः - कोणी एक पारधी - तत्रतत्र - प्रत्येक ठिकाणी - प्रलोभयन् - पक्ष्यांना लोभ दाखवीत - जालं वितत्य - जाळे पसरून - विदधे - धरून होता. ॥५०॥
एका जंगलात एक पारधी राहत होता. तो पक्ष्यांचा काळ म्हणूनच जम्नाला आला होता. तो ठिकठिकाणी जाळे लावून पक्ष्यांना पकडत असे. (५०)
कुलिङ्गमिथुनं तत्र विचरत् समदृश्यत ।
तयोः कुलिङ्गी सहसा लुब्धकेन प्रलोभिता ॥ ५१ ॥
एकदा जोडपे पक्षी चरता पाहिले तये । मादीला शीघ्रची तेणे जाळे टाकोनि घेरिले ॥५१॥
तत्र - तेथे - विचरत् - फिरणारे - कुलिंगमिथुनं - कुलिंगपक्ष्यांचे जोडपे - तेन समदृश्यत - त्याला दिसले - तयोः - त्या जोडप्यांमधील - कुलिंगी - मादी - लुब्धकेन - पारध्याने - सहसा - अकस्मात - प्रलोभिता - लोभविली. ॥५१॥
तेथे त्याने चिमण्यांचे एक जोडपे फिरताना पाहिले. त्या पारध्याने त्यांपैकी मादीला अचानक भुलविले. (५१)
आसज्जत सिचस्तन्त्यां महिष्यः कालयन्त्रिता ।
कुलिङ्गस्तां तथाऽऽपन्नां निरीक्ष्य भृशदुःखितः । स्नेहाद् अकल्पः कृपणः कृपणां पर्यदेवयत् ॥ ५२ ॥
विपरीत अशी मादी पडता पाहिली नरे । न सोडू शकतो तो नी विलाप करू लागला ॥५२॥
सा - ती - कालयंत्रिता - कालचक्रांत सापडलेली - महिषी - कुलिंगपक्ष्याची स्त्री - शिचः - जाळ्याच्या - तंत्यां - दोर्यात - असज्जत - अडकली - भृशदुःखितः - अत्यंत दुःखित असा - कुलिंगः - कुलिंग पक्षी - स्नेहात् - प्रेमामुळे - तां - त्या - तथा आपन्नां - त्याप्रमाणे दुःखात सापडलेल्या - कृपणां - दीन अशा स्त्रीला - निरीक्ष्य - पाहून - अकल्पः - तिला मुक्त करण्यास असमर्थ असा - कृपणः (सन्) - दीन होत्साता - पर्यदेवयत् - शोक करिता झाला. ॥५२॥
ती दैववशात त्या जाळ्यात अडकली. मादीची अवस्था पाहून नराला अत्यंत दु:ख झाले. तो बिचारा तिला सोडवू शकत नव्हता. तरीपण प्रेमामुळे तो त्या बिचारीसाठी विलाप करू लागला. (५२)
अहो अकरुणो देवः स्त्रियाऽऽकरुणया विभुः ।
कृपणं मामनुशोचन्त्या दीनया किं करिष्यति ॥ ५३ ॥
वदला ईश हा मोठा शक्तिमान् परि निर्दय । एकची पत्नि ही माझी नेवोनी काय तो करी ॥५३॥
अहो - अहो - अकरुणः - निर्दय असा - प्रभुःदेवः - समर्थ परमेश्वर - मा अनु कृपणं शोचंत्या - दीन अशा माझ्याविषयी शोक करणार्या - अकरुणया - कृपा करण्यास योग्य अशा - दीनया स्त्रिया - दीन स्त्रीला नेऊन - कि करिष्यति - काय करणार ॥५३॥
तो म्हणाला, खरे तर विधाता सर्व काही करू शकतो, परंतु तो अतिशय निर्दय आहे. ही अभागी अशा माझ्यासाठी शोक करीत, दीन होऊन तडफडत आहे. हिला नेऊन तो काय करणार ? (५३)
कामं नयतु मां देवः किमर्धेनात्मनो हि मे ।
दीनेन जीवता दुःखं अनेन विधुरायुषा ॥ ५४ ॥
मौज त्याला तशी वाटे तरी नेवो तिला बरे । एकटा जगुनी दुःखी जगीं मी काय ते करू ॥५४॥
देवः - देव - मा - मला - कामं - खुशाल - नयतु - नेवो - हि - कारण - अनेन - ह्या - विधुरायुषा - विधुरावस्थेतील आयुष्यक्रमाने - दुःखेन - दुःखाने - जीवता - जगणार्या - दीनेन - दीन अशा - मे आत्मनः अर्धेन - माझ्या अर्ध्या शरीराने - किं - काय ॥५४॥
देवाने मला खुशाल न्यावे. हिच्याखेरीज मी माझे अपूर्ण, दीनवाणे आणि दु:खाने भरलेले विधुराचे जीवन घेऊन काय करू ? (५४)
कथं त्वजातपक्षांस्तान् मातृहीनान् बिभर्म्यहम् ।
मन्दभाग्याः प्रतीक्षन्ते नीडे मे मातरं प्रजाः ॥ ५५ ॥
पिलांना पंख ना आले सांभाळू मी कसा तयां । पाहतील तिची वाट खोप्यात बसुनी तशी ॥५५॥
अहं - मी - तान् - त्या - अजातपक्षान् - पंख न फुटलेल्या - मातृहीनान् - पोरक्या बालकांना - तु - तर - कथं - कसा - बिभर्मि - पोसणार - मे - माझी - मंदभाग्याः - दुर्दैवी - प्रजाः - बालके - नीडे - घरटयात - मातरं प्रतीक्षंते - आईची वाट पाहत आहेत. ॥५५॥
माझ्या अभागी पिल्लांना अजून पंखही फुटलेले नाहीत. त्या मातृहीन पक्ष्यांचे पालन मी कसे करणार ? अरेरे ! घरट्यात ती आपल्या आईची वाट पाहत असतील. (५५)
एवं कुलिङ्गं विलपन्तमारात्
प्रियावियोगातुरं अश्रुकण्ठम् । स एव तं शाकुनिकः शरेण विव्याध कालप्रहितो विलीनः ॥ ५६ ॥
(इंद्रवज्रा) पक्ष्ये असा खूप विलाप केला आतूर झाला बहु तो वियोगे । आसू गळाले अन कंठ दाटे व्याधे तयाही वधिले तिराने ॥५६॥
एवं - याप्रमाणे - आरात् - जवळ - विलपंतं - विलाप करणार्या - प्रिया वियोगातुरं - स्त्रीच्या वियोगाने पीडित झालेल्या - अश्रुकंठं - रडून गळा भरून आलेल्या - तं कुलिंगं - त्या कुलिंग पक्ष्याला - शाकुनिकः - पक्षी मारणारा पारधी - कालप्रहितः - काळाने प्रेरणा केलेला - विलीनः - लपून बसलेला - सः एव - तोच - शरेण - बाणाने - विव्याध - मारता झाला. ॥५६॥
अशा तर्हेने तो पक्षी अत्यंत विलाप करू लागला. आपल्या सहचारिणीच्या वियोगाने तो अत्यंत व्याकूळ झाला होता. अश्रूमुळे त्याचा गळा दाटून आला. तेवढ्यात, काळाच्या प्रेरणेने जवळच लपून बसलेल्या त्या पारध्याने त्या पक्ष्यावर बाण सोडला आणि तोही मेला. (५६)
(अनुष्टुप्)
एवं यूयं अपश्यन्त्य आत्मापायं अमबुद्धयः । नैनं प्राप्स्यथ शोचन्त्यः पतिं वर्षशतैरपि ॥ ५७ ॥
(अनुष्टुप्) राण्यांनो गति ती तैसी होईल तुमचीहि की । वर्षही पिटता छाती नये हा परतोनिया ॥५७॥
एवं - याप्रमाणे - अबुद्धयः यूयं - निर्बुद्ध अशा तुम्ही - आत्मापायं - आपल्या मृत्यूला - अपश्यंत्यः - न पाहणार्या - शोचंत्यः - शोक करणार्या - वर्षशतैरपि - शेकडो वर्षांनीसुद्धा - एनं पतिं - ह्या पतीला - नप्राप्स्यथ - मिळवू शकणार नाही. ॥५७॥
मूर्ख राण्यांनो, तुम्हांला आपला मृत्यू दिसत नाही. आणि याच्यासाठी मात्र रडता ! शंभर वर्षे जरी तुम्ही याप्रकारे शोकाने छाती बडवीत राहिलात, तरी तुम्हांला तो पुन्हा मिळणार नाही. (५७)
हिरण्यकशिपुरुवाच -
बाल एवं प्रवदति सर्वे विस्मितचेतसः । ज्ञातयो मेनिरे सर्वं अनित्यं अयथोत्थितम् ॥ ५८ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला - बाळाचे ज्ञानि हे बोल ऐकता दंग जाहले । राजाचे बंधुनी स्त्रीया यांनी मिथ्यत्व जाणिले ॥५८॥
एवं - याप्रमाणे - बाले प्रवदति - बालक भाषण करीत असता - सर्वे - सगळे - विस्मितचेतसः - मनात आश्चर्य पावलेले - ज्ञातयः - बांधव - सर्व - सगळे - अनित्यं - अनित्य - अयथोत्थितं - खोटयापासूनच उत्पन्न झालेले - मेनिरे - मानिते झाले. ॥५८॥
हिरण्यकशिपू म्हणाला – त्या मुलाचे हे बोलणे ऐकून सर्वचजण स्तंभित झाले. त्याचे नातलग समजून चुकले की, सर्व काही अनित्य आणि खोटे आहे. (५८)
यम एतद् उपाख्याय तत्रैवान्तरधीयत ।
ज्ञातयो हि सुयज्ञस्य चक्रुर्यत् साम्परायिकम् ॥ ५९ ॥
ऐकवोनि कथा ऐसी यमही गुप्त जाहला । सुयज्ञाची पुन्हा केली अंत्येष्टी बंधुने तदा ॥५९॥
यमः - यमराज - एतत् - हे चरित्र उपाख्याय - सांगून - तत्र एव - त्याठिकाणीच - अंतरघीयत - अंतर्धान पावला - सुयज्ञस्य ज्ञातयः अपि - सुयज्ञाचे बांधव देखील - यत् सांपरायिकं - जे परलोकसंबंधी कृत्य असते. ॥५९॥
हे उपाख्यान ऐकवून यमराज तेथेच अंतर्धान पावले. नातलगांनीसुद्धा सुयज्ञाचे अंत्यसंस्कार केले. (५९)
ततः शोचत मा यूयं परं चात्मानमेव वा ।
क आत्मा कः परो वात्र स्वीयः पारक्य एव वा । स्वपराभिनिवेशेन विनाज्ञानेन देहिनाम् ॥ ६० ॥
म्हणोनी तुम्हि सर्वांनी कुणाचा शोक ना करा । जगात कोण तो आत्मा कोण भिन्न स्वताहुनी । आपुले परके काय अज्ञानाचा दुराग्रह । न कारण तया अन्य भेद बुद्धीस तो असे ॥६०॥
ततः - त्या कारणास्तव - परं - दुसर्याविषयी - च - आणि - आत्मानं - स्वतःविषयी - यूयं - तुम्ही - एव - खरोखर - मा शोचत - शोक करू नका - देहिनां - प्राण्यांच्या - स्वपराभिनिवेशेन - हे आपले व हे दुसर्याचे अशा आग्रहरूपी - अज्ञानेन विना - अज्ञानाशिवाय - अत्र - या जगात - आत्मा कः - आपण कोण - च - आणि - परः कः - दुसरा कोण - वा - अथवा - स्वीयः कः - आपला कोण - वा - किंवा - पारक्यः एव कः - दुसर्याचा कोण. ॥६०॥
म्हणून तुम्हीसुद्धा स्वत:साठी किंवा दुसर्यासाठी शोक करू नका. या संसारात कोण आपला आणि कोण आपल्यापासून वेगळा आहे ? अज्ञानामुळेच प्राण्यांचा हा आपला-परका असा दुराग्रह असतो. (६०)
नारद उवाच -
इति दैत्यपतेर्वाक्यं दितिराकर्ण्य सस्नुषा । पुत्रशोकं क्षणात् त्यक्त्वा तत्त्वे चित्तं अधारयत् ॥ ६१ ॥ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कन्धे द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
श्रीनारद सांगतात - राजा हे दितिने सर्व पुत्राचे शब्द ऐकिले । सुनेच्या सह तो त्यांनी पुत्राचा शोक त्यागिला । परं तत्व स्वरूपात दितिने चित्त लाविले ॥६१॥ । इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ ७ ॥ २ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
सस्नुषा - सुनेसह - दितिः - दिति - इति - याप्रमाणे - दैत्यपतेः - हिरण्यकशिपुचे - वाक्यं - भाषण - आकर्ण्य - श्रवण करून - क्षणात् - थोडया वेळात - पुत्रशोकं - पुत्राविषयीचा शोक - त्यक्त्वा - टाकून - तत्त्वे - आत्मस्वरूपी - चित्तं - मन - अधारयत् - ठेविती झाली. ॥६१॥
नारद म्हणाले – दितीने आपल्या सुनेसह हिरण्यकशिपूचे हे म्हणणे ऐकून त्याच क्षणी पुत्रशोकाचा त्याग केला आणि परमात्म्यामध्ये आपले चित्त लावले. (६१)
स्कंध सातवा - अध्याय दुसरा समाप्त |