श्रीमद् भागवत पुराण
सप्तमः स्कंधः
प्रथमोऽध्यायः

नारदयुधिष्ठिरसंवादारंभः, जयविजयोः सनकादिशापाद् दैत्यजन्मप्राप्तिः -

नारद-युधिष्ठिर-संवाद आणि जय-विजयाची कथा -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


राजोवाच -
(अनुष्टुप्)
समः प्रियः सुहृद्‍ब्रह्मन् भूतानां भगवान् स्वयम् ।
इन्द्रस्यार्थे कथं दैत्यान् अवधीद् विषमो यथा ॥ १ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
(अनुष्टुप्‌)
सम समस्त भूतांना समप्रीय सुहृद हरी ।
सामान्यां परि तो ऐसा इंद्रार्थ दैत्य का वधी ? ॥१॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्या - भगवान् - परमेश्वर - स्वयं - स्वतः - भूतानां - प्राण्यांचा - सुहृद् - मित्र - प्रियः - प्रिय - समः सन् - सर्वांशी समान भावाने वागणारा असता - यथा विषमः तथा - जसा शत्रु तसा - इंद्रस्य अर्थे - इंद्राकरिता - दैत्यान् - राक्षसांना - कथं अवधीत् - कसा मारिता झाला ॥१॥
परीक्षिताने विचारले – ब्रह्मन, भगवान स्वत: सर्वांच्या विषयी समदृष्टी आहेत. सर्व प्राण्यांचे प्रिय आणि सुहृद आहेत. असे असताना भेदभाव करणार्‍या सामान्य माणसाप्रमाणे त्यांनी इंद्रासाठी दैत्यांचा वध कसा केला ? (१)


न ह्यस्यार्थः सुरगणैः साक्षात् निःश्रेयसात्मनः ।
नैवासुरेभ्यो विद्वेषो न उद्वेगश्च अगुणस्य हि ॥ २ ॥
स्वयंपूर्ण असाची तो उदास भद्र तो असे ।
निर्गूण असल्याने त्यां दैत्याचा द्वेष ना कधी ॥२॥

हि - कारण - साक्षात् - प्रत्यक्ष - अगुणस्य - निर्गुण अशा - निःश्रेयसात्मनः - परमानंदस्वरूप - अस्य - ह्या परमेश्वराला - सुरगणैः - देवांशी - अर्थः - प्रयोजन - नहि - नाही - च - आणि - असुरेभ्यः - दैत्यांपासून - उद्वेगः - भय - न - नाही - विद्वेषः - शत्रुत्व - न एव - नाहीच. ॥२॥
ते साक्षात मोक्षस्वरूप आहेत. म्हणून त्यांना देवांकडून काहीही मिळवायचे नाही. तसेच ते निर्गुण असल्यामुळे दैत्यांशी त्यांचे वैर किंवा त्यांच्यापासून त्यांना उद्वेगसुद्धा नाही. (२)


इति नः सुमहाभाग नारायणगुणान् प्रति ।
संशयः सुमहान् जातः तद्‍भवांन् छेत्तुं अर्हति ॥ ३ ॥
भगवत्‌ प्रेमसंपन्ना संदेह सम या गुणा ।
कृपया आमुचा तुम्ही मिटवा संशयो पुरा ॥३॥

सुमहाभाग - हे अत्यंत भाग्यशाली मुने - इति - याप्रमाणे - नारायणगुणान्प्रति - परमेश्वराच्या गुणांविषयी - नः - आम्हांला - सुमहान् - अत्यंत मोठा - संशयः - संशय - जातः - उत्पन्न झाला आहे - तत् - तरी तो - छेत्तुं - दूर करण्याला - भवान् - आपण - अर्हति - योग्य आहां. ॥३॥
हे महात्मन, भगवंतांच्या समत्वादी गुणांच्या संबंधाने आमच्या मनात मोठा संदेह निर्माण झाला आहे. आपण तो नाहीसा करावा. (३)


श्रीशुक रुवाच -
साधु पृष्टं महाराज हरेश्चरितमद्‍भुतम् ।
यद्‍भागवतमाहात्म्यं भगवद् भक्तिवर्धनम् ॥ ४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
महाराजा ! खरा छान प्रश्न हा पुसला असे ।
अद्‍भूत हरिच्या लीला येणे भक्तीच वाढते ॥४॥

महाराज - हे परीक्षीत राजा - हरेः - नारायणाचे - अद्‌भुतं - चमत्कारिक - चरितं - कथानक - साधु - चांगले - पृष्टं - विचारिले गेले - यत्र - ज्यामध्ये - भगवद्‌भक्तिवर्धनं - परमेश्वराविषयी भक्ति वृद्धिंगत करणारे - भागवतमाहात्म्यं अस्ति - भगवद्‌भक्त प्रल्हादाचे माहात्म्य आहे. ॥४॥
श्रीशुकाचार्य म्हणाले – महाराज, श्रीहरींच्या अद्‌भुत चरित्रासंबंधी तू सुंदर प्रश्न विचारलास. कारण भगवद्‍भक्तांच्या महिम्याने भगवंतांविषयी भक्ती वाढते. (४)


गीयते परमं पुण्यं ऋषिभिः नारदादिभिः ।
नत्वा कृष्णाय मुनये कथयिष्ये हरेः कथाम् ॥ ५ ॥
प्रल्हादाचे असे येश गाती प्रेमेचि नारद ।
सांगतो सर्व ती वार्ता पिता व्यास नमोनिया ॥५॥

नारदादिभिः ऋषिभिः - नारदादिक ऋषींनी - परमं - श्रेष्ठ - पुण्यं तत् - पुण्यकारक असे ते चरित्र - गीयते - गाइले आहे - कृष्णाय मुनये - व्यास मुनीला - नत्वा - नमस्कार करून - हरेः - परमेश्वराचे - कथां - चरित्र - कथयिष्ये - मी सांगतो. ॥५॥
या परम पुण्यमय प्रसंगांचे नारदादी ऋषी मोठ्या प्रेमाने गायन करतात. आता मी श्रीकृष्ण-द्वैपायन मुनींना नमस्कार करून भगवंतांच्या कथांचे वर्णन करतो. (५)


निर्गुणोऽपि ह्यजोऽव्यक्तो भगवान् प्रकृतेः परः ।
स्वमायागुणमाविश्य बाध्यबाधकतां गतः ॥ ६ ॥
अजन्मनी पराव्यक्त भगवान्‌ निर्गुणी तरी ।
स्वीकारी गुण मायेचे बाध्य बाधक दोन्हिही ॥६॥

हि - कारण - प्रकृतेः - मायेहून - परः - निराळा - अजः - जन्मादिरहित - अव्यक्तः - ज्याचे स्वरूप व्यक्त नाही असा - निर्गुणः अपि - आणि गुणरहित असूनही - स्वमायागुणं - स्वतःच्या मायेच्या सत्त्वादि गुणांत - आविश्य - राहून - बाध्यबाधकतां - शिक्षेला योग्य असणार्‍यांना शिक्षा करणारा या पदवीला - गतः - प्राप्त झाला. ॥६॥
वास्तविक पाहाता भगवंत निर्गुण, अजन्मा, अव्यक्त आणि प्रकृतीच्याही पलीकडील असे आहेत. असे असून सुद्धा आपल्या मायेच्या गुणांचा स्वीकार करून ते मरणारा व मारणारा अशी दोन्ही रूपे धारण करतात. (६)


सत्त्वं रजस्तम इति प्रकृतेर्नात्मनो गुणाः ।
न तेषां युगपद् राजन् ह्रास उल्लास एव वा ॥ ७ ॥
सत्व रज तमो ऐसे प्रकृतीचे तिन्ही गुण ।
गुण ते नच ईशाचे, सवे ना वाढती उणे ॥७॥

राजन् - हे राजा - सत्त्वं रजः तमः इति - सत्त्व, रज व तम असे - प्रकृतेः गुणाः संति - मायेचे गुण आहेत - आत्मनः - आत्म्याचे - न - नाहीत - तेषां - त्या गुणांचा - युगपत् - एकाच समयी - ह्लासः वा उल्लासः - क्षय किंवा उत्कर्ष - न एव भवति - होतच नाही. ॥७॥
सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे गुण आहेत. परमात्म्याचे नव्हेत. परीक्षिता, या तीनही गुणांचे कमी-जास्त होणे एकाच वेळी नसते. (७)


जयकाले तु सत्त्वस्य देवर्षीन् रजसोऽसुरान् ।
तमसो यक्षरक्षांसि तत्कालानुगुणोऽभजत् ॥ ८ ॥
गुणासी कालमानाने श्रीहरीही स्विकारतो ।
सत्वार्थ ऋषिचा जन्म रजार्थ दैत्य जन्मती ।
तमार्थ राक्षसा जन्म अभ्यूदय गुणा तसा ॥८॥

सत्त्वस्य जयकाले तु - सत्त्वगुणाच्या जयाच्या वेळी तर - देवर्षीन् - देव व ऋषि इत्यादिकांना - रजसः - रजोगुणाच्या उत्कर्षकाळी - असुरान् - दैत्यांना - तमसः - तमोगुणाच्या जयकाळी - यक्षरक्षांसि - यक्ष व राक्षस यांना अशाप्रकारे - तत्कालानुगुणः - त्या त्या काळाला अनुरूप गुण धारण करणारा - अभजत् - सेवन करितो. ॥८॥
वेळेनुसार भगवंत गुणांचा स्वीकार करतात. सत्वगुण वाढतो, त्यावेळी देव आणि ऋषींचा, रजोगुणाच्या वाढीच्या वेळी दैत्यांचा आणि तमोगुणाची वाढ होते तेव्हा ते यक्ष आणि राक्षसांचा लौकिक वाढवितात. (८)


ज्योतिरादिरिवाभाति सङ्घातान्न विविच्यते ।
विदन्त्यात्मानं आत्मस्थं मथित्वा कवयोऽन्ततः ॥ ९ ॥
काष्ठात असतो अग्नी परी नेत्रा न तो दिसे ।
आत्माराम तसा देही असुनी नच तो दिसे ।
मथिता काष्ठिचा अग्नी प्रगटोनी दिसे जना ।
आंतरर्यामी तसा आत्मा पाहती साधु संत ते ॥९॥

ज्योतिरादिः काष्ठादिषु इव - तेजादि पंचमहाभूते काष्ठादिकांच्या ठिकाणी जशी तसा - आभाति - भासमान होतो - संघातात् - देवादिकांच्या देहाहून - न विविच्यते - पृथक् दृग्गोचर होत नाही - कवयः - विद्वान पुरुष - मथित्वा - सारासार विचाररूप मंथन करून - अंततः - शेवटी - आत्मानं आत्मस्थं विदंती - जीवात्म्याला शरीराच्या ठिकाणी राहणारा असे समजतात. ॥९॥
जसा अग्नी लाकूड इत्यादी वस्तूंत असताना त्यापेक्षा वेगळा भासत नाही, पण घर्षण केल्यावर मात्र तो वेगळा दिसतो. त्याप्रमाणे परमात्मा सर्व शरीरांत असताना वेगळा असल्याचे भासत नाही. परंतु विवेकी पुरुष विचार करून त्याच्याव्यतिरिक्त अन्य वस्तूंचा निषेध करून शेवटी आपल्या हृदयातच अंतर्यामीरूपाने असणार्‍या त्याला प्राप्त करून घेतात. (९)


यदा सिसृक्षुः पुर आत्मनः परो
     रजः सृजत्येष पृथक् स्वमायया ।
सत्त्वं विचित्रासु रिरंसुः ईश्वरः
     शयिष्यमाणस्तम ईरयत्यसौ ॥ १० ॥
(इंद्रवज्रा)
इच्छी जधी ईश स्वतास देह
    रजो गुणे सृष्टि करी निराळी ।
उत्कृष्टदेही रमण्यास इच्छी
    सत्वागुणाची रचि तोच सृष्टी ।
नी झोपण्याचे जधि ईश इच्छी
    तदा तमाला नित वाढवी तो ॥१०॥

यदा - ज्या वेळेस - परः - परमेश्वर - आत्मनः - जीवाच्या भोगाकरिता - पुरः - शरीरे - सिसृक्षुः तदा - उत्पन्न करण्याची इच्छा करितो तेव्हा - एषः - हा - स्वमायया - आपल्या मायेने - पृथक् - निराळा - रजः - रजोगुण - सृजति - उत्पन्न करितो - ईश्वरः - परमेश्वर - विचित्रासु - नानाप्रकारच्या शरीरांच्या ठिकाणी - रिरंसुः अस्ति तदा - क्रीडा करण्याची इच्छा करितो तेव्हा - सत्त्वं - सत्त्वगुणाला - असौ - हा - शयिष्यमाणः - व जेव्हा शयन करण्याची इच्छा करितो तेव्हा - तमः - तमोगुणाला - ईरिरयति - प्रेरणा करितो. ॥१०॥
जेव्हा परमेश्वर जीवासाठी शरीरे निर्माण करू इच्छितो, तेव्हा आपल्या मायेने रजोगुण वेगळा करून त्याचे आधिक्य निर्माण करतो. जेव्हा जीवरूपातील तो विचित्र योनींमध्ये रममाण होऊ इच्छितो, तेव्हा सत्वगुणाची वाढ करतो आणि जेव्हा तो या शरीरांचा संहार करू इच्छितो तेव्हा तमोगुणाला वाढण्याची प्रेरणा देतो. (१०)


कालं चरन्तं सृजतीश आश्रयं
     प्रधानपुम्भ्यां नरदेव सत्यकृत् ।
य एष राजन्नपि काल ईशिता
     सत्त्वं सुरानीकमिवैधयत्यतः ।
तत्प्रत्यनीकान् असुरान् सुरप्रियो
     रजस्तमस्कान् प्रमिणोत्युरुश्रवाः ॥ ११ ॥
सृष्टीस निर्मि हरि आश्रयास
    काळाधिनी ना म्हणुनीच देव ।
सत्वात वाढे बळ देवतांचे
    ते वाढावया प्रगटे हरीच ।
संहारितो तो तमि दैत्य सारे
    तसे पहाता सम श्रीहरी तो ॥११॥

नरदेव - हे नरश्रेष्ठा - राजन् - हे राजा - अजः - जन्मादिरहित - सत्यकृत् - ज्याची कृति व्यर्थ होत नाही असा - ईशः - ईश्वर - प्रधानपुंभ्यां - प्रधान व पुरुष यांच्या सहाय्याने - आश्रयं - आश्रयीभूत अशा - चरंतं - फिरणार्‍या - कालं - काळाला - सृजति - उत्पन्न करितो - यः - जो - एषः - हा - कालः - काळ - सत्त्वं - सत्त्वगुणाला - एधयति - वाढवितो - सः ईशिता अपि - तो समर्थ असताही - अतः सुरानीकं इव - त्यामुळे देवसमूहाला जणू - एधयति - वाढवितो - उरुश्रवाः - मोठी कीर्ति असणारा - सुरप्रियः - ज्याला देव आवडतात असा - तत्प्रत्यनीकान् - देवांशी विरुद्ध असणार्‍या - रजस्तमस्कान् - रजोगुण व तमोगुण यांनी युक्त अशा - असुरान् - दैत्यांना - प्रमिणोति - मारितो. ॥११॥
परीक्षिता, भगवान सत्यसंकल्प आहेत. तेच जगाच्या उत्पत्तीला कारण असलेली प्रकृती आणि पुरुष यांचे सहकारी व आश्रय अशा कालाची निर्मिती करतात. राजा, हे कालस्वरूप ईश्चर जेव्हा सत्वगुणाची वाढ करतात, तेव्हा सत्वगुणी देवतांचे सामर्थ्य वाढते आणि तेव्हाच ते परमयशस्वी देवप्रिय परमात्मा देवांचे शत्रू असणार्‍या रज-तमोगुणी दैत्यांचा संहार करतात. (११)


(अनुष्टुप्)
अत्रैव उदाहृतः पूर्वं इतिहासः सुरर्षिणा
प्रीत्या महाक्रतौ राजन् पृच्छतेऽजातशत्रवे ॥ १२ ॥
(अनुष्टुप्‌)
राजा ! या विषयी मोठ्या प्रेमाने नारदे कथा ।
कथिली राजसूयात धर्माच्या प्रश्न उत्तरा ॥१२॥

राजन् - हे राजा - महाक्रतौ - मोठया यज्ञामध्ये - पृच्छते - विचारणार्‍या - अजातशत्रवे - धर्मराजाला - अत्र एव - ह्यासंबंधीच - इतिहासः - इतिहास - सुरर्षिणा - नारदाने - प्रीत्या - प्रीतीने - पूर्वं - पूर्वी - उदाहृतः - सांगितला. ॥१२॥
राजन, जेव्हा राजसूय यज्ञाच्या वेळी युधिष्ठिरांनी एक प्रश्न विचारला होता, त्यावेळी देवर्षी नारदांनी याविषयी मोठ्या प्रेमाने एक इतिहास सांगितला होता. (१२)


दृष्ट्वा महाद्‍भुतं राजा राजसूये महाक्रतौ ।
वासुदेवे भगवति सायुज्यं चेदिभूभुजः ॥ १३ ॥
महान राजसूयात धर्मे आश्चर्य पाहिले ।
चेदिराजा शिशूपाल समक्ष कृष्णि पावला ॥१३॥

राजा - धर्मराज - राजसूये महाक्रतौ - मोठया राजसूय यज्ञामध्ये - भगवति वासुदेवे - भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी - चेदिभूभुजः - चेदिदेशाचा राजा शिशुपाल याचे - सायुज्यं - मिळून जाणे - महाद्‌भुतं - अत्यंत चमत्कारिक - दृष्ट्‌वा - पाहून. ॥१३॥
त्या महान राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिरांनी आपल्या डोळ्यांदेखत एक आश्चर्यकारक घटना पाहिली की, चेदिदेशाचा राजा शिशुपाल भगवान श्रीकृष्णांमध्ये एकरूप झाला. (१३)


तत्रासीनं सुरऋषिं राजा पाण्डुसुतः क्रतौ ।
पप्रच्छ विस्मितमना मुनीनां श्रृण्वतामिदम् ॥ १४ ॥
तिथे नारद ते होते राये चकित होवुनी ।
सभेत मुनिच्या श्रेष्ठ नारदा प्रश्न टाकिला ॥१४॥

पांडुसुतः राजा - पांडूचा मुलगा धर्मराज - क्रतौ - यज्ञांत - तत्र आसीनं सुरऋषिं - त्याठिकाणी बसलेल्या नारदऋषीला - विस्मितमनाः - विस्मययुक्त झाले आहे अंतःकरण ज्याचे असा - शृण्वतां मुनीनां - ऋषि ऐकत असता - इदं - हे - पप्रच्छ - विचारता झाला. ॥१४॥
देवर्षी नारद तेथेच बसले होते. या घटनेने आश्चर्यचकित होऊन धर्मराजाने मुनींच्या समोर त्या यज्ञमंडपात नारदांना हा प्रश्न विचारला होता. (१४)


युधिष्ठिर उवाच -
अहो अत्यद्‍भुतं ह्येतद् दुर्लभा एकान्तिनामपि ।
वासुदेवे परे तत्त्वे प्राप्तिश्चैद्यस्य विद्विषः ॥ १५ ॥
युधिष्ठिराने विचारिले -
मोठी विचित्र ही गोष्ट भक्तां हि दुर्लभो असे ।
द्वेषी या शिशुपाळाला गती ती लाभली कशी ? ॥१५॥

अहो - अहो - एकांतिनां अपि दुर्लभा - एकनिष्ठ भक्तांनासुद्धा दुर्लभ अशी - परे तत्त्वे वासुदेवे - श्रेष्ठ तत्त्वरूपी श्रीकृष्णाच्या ठिकाणी - प्राप्तिः - सायुज्यता - विद्विषः चैद्यस्य - अत्यंत द्वेष करणार्‍या शिशुपालाला - एतत् - हे - हि - खरोखर - अत्यद्‌भुतं - मोठे आश्चर्य. ॥१५॥
युधिष्ठिराने विचारले – अहाहा ! ही तर मोठी विचित्र घटना आहे. परमतत्व भगवान श्रीकृष्णांमध्ये समाविष्ट होणे हे अनन्य भक्तांनासुध्दा कठीण आहे. मग भगवंताचा द्वेष करणार्‍या शिशुपालाला ही प्राप्ती कशी झाली ? (१५)


एतद् वेदितुमिच्छामः सर्व एव वयं मुने ।
भगवन् निन्दया वेनो द्विजैस्तमसि पातितः ॥ १६ ॥
मुनी रहस्य हे काय आम्ही ते जाणु इच्छितो ।
भगवद्‍द्वेषि तो वेन पूर्वी नर्कात पातला ॥१६॥

मुने - हे नारदा - वयं सर्वे एव - आम्ही सगळेजणच - एतत् - हे - वेदितुं - जाणण्यास - इच्छामः - इच्छितो - भगवन्निंदया - परमेश्वराच्या निंदेमुळे - द्विजैः - ब्राह्मणांनी - वेनः - वेनराजा - तमसि - नरकात - पातितः - पाडिला. ॥१६॥
नारदमुने ! आम्ही सर्वच याचे रहस्य जाणू इच्छितो. पूर्वी एकदा भगवंतांची निंदा केल्यामुळे ऋषींनी राजा वेनाला नरकात धाडले होते. (१६)


दमघोषसुतः पाप आरभ्य कलभाषणात् ।
सम्प्रति अमर्षी गोविन्दे दन्तवक्रश्च दुर्मतिः ॥ १७ ॥
दमघोषसुतो पापी शिशुपाल नि तो तसा ।
वक्रदंते हरीसी या बरळोनिहि द्वेषिले ॥१७॥

पापः दमघोषसुतः - पापी दमघोषराजाचा मुलगा शिशुपाल - च दुर्मतिः - आणि दुष्टबुद्धि - दंतवक्त्रः - दंतवक्त्र राजा - कलभाषणात् आरभ्य - बोबडे बोलत असतापासून - संप्रति - आतापर्यंत - गोविंदे - श्रीकृष्णाच्याठिकाणी - अमर्षी - मत्सरी होता. ॥१७॥
दमघोषाचा हा पुत्र पापात्मा शिशुपाल आणि दुष्ट दंतवक्त्र हे दोघेही जेव्हापासून बोबडे बोलू लागले होते, तेव्हापासून आतापर्यंत भगवंतांचा द्वेषच करीत आले आहेत. (१७)


शपतोः असकृद् विष्णुं यद्‍ब्रह्म परमव्ययम् ।
श्वित्रो न जातो जिह्वायां नान्धं विविशतुः तमः ॥ १८ ॥
पाणी पिऊनिया यांनी शिव्या कृष्णास की दिल्या ।
न त्यांना लाभला नर्क न कोड जिभिसी तसा ॥१८॥

यत् - जो - परं - श्रेष्ठ - अव्ययं - अविनाशी - ब्रह्म (अस्ति) - ब्रह्मस्वरूपी आहे - (तं) कृष्णं - त्या श्रीकृष्णाला - असकृत् - वारंवार - शपतोः - शिव्या देणार्‍या शिशुपालदंतवक्त्रांच्या - जिह्वायां - जिभेच्या ठिकाणी - श्वित्रः - कुष्ठ - न जातः - झाले नाही - अंधं तमः - व अंधकाररूप नरकात - न विविशतुः - प्रवेश करिते झाले नाहीत. ॥१८॥
अविनाशी परब्रह्म श्रीकृष्णांना अखंड शिव्याशाप देणार्‍या यांच्या जिभेला कोड कसे फुटले नाही की यांना घोर नरकाची प्राप्ती कशी झाली नाही ? (१८)


कथं तस्मिम् भगवति दुरवग्राह्यधामनि ।
पश्यतां सर्वलोकानां लयं ईयतुः अञ्जसा ॥ १९ ॥
उलटे भगवत्‌प्राप्ती अत्यंत ती कठीणची ।
त्या दोघा सहजी मोक्ष लाभला काय कारणे ॥१९॥

तस्मिन् दुरवग्राहधामनि भगवति - त्या दुर्ज्ञेय स्वरूपाच्या परमेश्वराच्या ठिकाणी - सर्वलोकानां पश्यतां - सगळे लोक पाहत असता - अंजसा - सहजरीत्या - कथं - कसे - लयं ईयतुः - लय पावले. ॥१९॥
उलट, ज्या भगवंतांची प्राप्ती अत्यंत कठीण आहे, त्या भगवंतांमध्ये हे दोघेजण सर्वांच्या देखत सहजपणे विलीन झाले. (१९)


एतद्‍भ्राम्यति मे बुद्धिः दीपार्चिरिव वायुना ।
ब्रूह्येतद् अद्‍भुततमं भगवान् तत्र कारणम् ॥ २० ॥
हवेने हालते ज्योत चळे बुद्धी तशी मम ।
सर्वज्ञ तुम्हि तो आहा रहस्य समजाविणे ॥२०॥

एतत् - ह्याविषयी - मे बुद्धिः - माझी बुद्धि - वायुना - वार्‍याने - दीपार्चिः इव - जशी दिव्याची ज्योत तशी - भ्राम्यति - अस्थिर झाली आहे - एतत् अद्‌भुतमम् - हे मोठे आश्चर्य आहे - भगवान् - सर्वज्ञानी असा तू - तत्र कारणं - त्याचे कारण - ब्रूहि - सांग. ॥२०॥
वार्‍याच्या झोताने हलणार्‍या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे माझी बुद्धी याविषयी द्विधा झाली आहे. आपण सर्वज्ञ असल्याने या अद्‌भुत घटनेचे रहस्य समजावून द्यावे. (२०)


श्रीशुक उवाच -
राज्ञस्तद्वच आकर्ण्य नारदो भगवान् ऋषिः ।
तुष्टः प्राह तमाभाष्य श्रृण्वत्यास्तत्सदः कथाः ॥ २१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
राजाचा प्रश्न एकोनी प्रसन्न जाहले मुनी ।
नृपा संबोधुनी ऐसी सभेत बोलले कथा ॥२१॥

राज्ञः - धर्मराजाचे - तत् - ते - वचः - भाषण - आकर्ण्य - श्रवण करून - प्रीतः भगवान् नारदः ऋषिः - संतुष्ट झालेला भगवान नारद ऋषि - तत्सदः शृण्वंत्याः - ते सभासद ऐकत असता - तं आभाष्य - त्या धर्मराजांना हाक मारून - कथाः - कथा - प्राह - सांगता झाला. ॥२१॥
श्रीशुक म्हणतात – देवर्षी नारद राजाचा हा प्रश्न ऐकून अत्यंत प्रसन्न झाले. युधिष्ठिराला संबोधित सर्वजण ऐकत असता, भर सभेत त्यांनी ही कथा सांगितली. (२१)


नारद उवाच -
निन्दन स्तव सत्कार न्यक्कारार्थं कलेवरम् ।
प्रधानपरयो राजन् अविवेकेन कल्पितम् ॥ २२ ॥
श्रीनारद म्हणाले -
निंदास्तुती तिरस्कार सत्कार शरिरास या ।
विवेके नच बघता राजा ! प्रकृति पूरूषा ॥२२॥

राजन् - हे धर्मराजा - निंदनस्तवसत्कारन्यक्कारार्थं - निंदा, स्तुति, सत्कार व तिरस्कार यांच्या ज्ञानाकरिता - कलेवरं - शरीर - प्रधानपरयोः - प्रकृति आणि पुरुष यांचा - अविवेकेन - भेद न करिता - कल्पितं (अस्ति) - रचिले आहे. ॥२२॥
नारद म्हणाले – युधिष्ठिरा ! निंदा, स्तुती, सत्कार आणि तिरस्कार हे शरीराचेच असतात. प्रकृती आणि पुरुषाविषयी विवेक न केल्यामुळे या शरीराची कल्पना केली जाते. (२२)


हिंसा तदभिमानेन दण्डपारुष्ययोर्यथा ।
वैषम्यं इह भूतानां ममाहं इति पार्थिव ॥ २३ ॥
शरीरा मानिता आत्मा मी हा भाव तसा दृढे ।
भेदाने मूळ ते एक तेणे पीडा मनास या ॥२३॥

पार्थिव - हे धर्मराजा - यथा - ज्याप्रमाणे - इह - या लोकी - भूतानां - प्राणिमात्रांना - तदभिमानेन - देहाभिमानाने - मम अहं इति वैषम्यं - माझे व मी अशी विषमता - दंडपारुष्ययोः - ताडन व निंदा यांपासून - हिंसा - हिंसा. ॥२३॥
हे राजा, जेव्हा या शरीरालाच आपला आत्मा मानले जाते, तेव्हा ’मी माझे’ असा भाव तयार होतो. भेद उत्पन्न होण्याचे हेच मूळ आहे. या कारणामुळेच मारणे आणि निंदा यांमुळे क्लेश होतात. (२३)


यन्निबद्धोऽभिमानोऽयं तद् वधात् प्राणिनां वधः ।
तथा न यस्य कैवल्याद् अभिमानोऽखिलात्मनः ।
परस्य दमकर्तुर्हि हिंसा केनास्य कल्प्यते ॥ २४ ॥
अभिमाने तनूच्या या मृत्यु तो मानि आपुला ।
हरिसी नाहि हे कांही हिंसा त्यासी न स्पर्शिते ॥२४॥

यन्निबद्धः - ज्या देहाच्या ठिकाणी जखडून राहिलेला - अयं अभिमानः - हा अभिमान - तद्वधात् - व त्या देहाच्या वधामुळे - प्राणिनां - प्राण्यांचा - वधः - वध - तथा - त्याप्रमाणे - यस्य अखिलात्मनः - ज्या सर्वात्मा परमेश्वराला - कैवल्यात् - अद्वितीयपणामुळे - अभिमानः - अभिमान - न - नाही - हि - कारण - अस्य दमकर्तुः परस्य - ह्या शासनकर्त्या परमेश्वराची - हिंसा - हिंसा - केन - कोणी - कल्प्यते - कल्पिली आहे. ॥२४॥
हे मी आहे असा ज्या शरीराविषयी अभिमान निर्माण होतो, त्या शरीराच्या वधाने प्राण्यांना आपला वध झाला असे वाटते. परंतु भगवंतांमध्ये असा अभिमान नाही. कारण ते सर्वात्मा आणि अद्वितीय आहेत. ते दुसर्‍यांना दंड देतात, तो रागाने किंवा द्वेषाने नव्हे, तर त्यांच्या कल्याणासाठीच देतात. मग भगवंतांविषयी हिंसेची कल्पना कशी करता येईल ? (२४)


तस्माद् वैरानुबन्धेन निर्वैरेण भयेन वा ।
स्नेहात् कामेन वा युञ्ज्यात् कथञ्चित् न ईक्षते पृथक् ॥ २५ ॥
म्हणोनी दृढ वैराने भक्तिने वा भये तसे ।
स्नेहाने वा सकामे जो भजे त्या सम श्रीहरी ॥२५॥

तस्मात् - त्याकरिता - वैरानुबंधेन - वैर धरून - वा - किंवा - निर्वैरेण - वैरभाव सोडून - वा - अथवा - भयेन - भीतीने - स्नेहात् - स्नेहाने - कामेन - कामवासनेने - युंज्यात् - परमेश्वराकडे लावावे - कथंचित् - कोणत्याही प्रकाराने - पृथक् - भिन्न - न ईक्षते - पाहात नाही. ॥२५॥
म्हणून वैरभावाने किंवा वैर सोडून, भयाने, स्नेहाने किंवा इच्छा मनात धरून, कसेही असो; आपले मन भगवंतांच्या ठिकाणी लावले पाहिजे. म्हणजे भगवंत त्याला वेगळा मानीत नाहीत. (२५)


यथा वैरानुबन्धेन मर्त्यः तन्मयतां इयात् ।
न तथा भक्तियोगेन इति मे निश्चिता मतिः ॥ २६ ॥
वाढे तन्मयता जैसी वैरभावात हे नृपा ।
तेवढी नच ती वाढे भक्तियोगातही पहा ॥२६॥

यथा - ज्याप्रमाणे - मर्त्यः - मनुष्य - वैरानुभावेन - शत्रुत्वाने - तन्मयतां - तत्स्वरूपाला - इयात् - प्राप्त होतो - तथा - त्याप्रमाणे - भक्तियोगेन - प्रेमभक्तीने - न - प्राप्त होत नाही - इति मे निश्चिता मतिः - असे माझे ठाम मत ॥२६॥
माझे तर असे ठाम मत आहे की, वैरभावाने मनुष्य भगवंतांमध्ये जितका तन्मय होऊन जातो तितका भक्तीयोगाने होत नाही. (२६)


कीटः पेशस्कृता रुद्धः कुड्यायां तं अनुस्मरन् ।
संरम्भभययोगेन विन्दते तत् स्वरूपताम् ॥ २७ ॥
भृंगी कीटास आणोनी बंद छिद्रात ती करी ।
ध्यासाने कीटही भृंगी होतसे नच संशय ॥२७॥

पेशस्कृता - भ्रमराने - कुडयायां - भिंतीवर - रुद्धः - अडकविलेला - कीटः - कीडा - संरंभभययोगेन - द्वेष व भय यामुळे - तम् - त्या भ्रमराला - अनुस्मरन् - नित्य स्मरत - तत्स्वरूपतां - त्या भ्रमराच्या स्वरूपाला - विंदते - प्राप्त होतो. ॥२७॥
गांधीलमाशी किड्याला आणून मातीच्या घरट्यात बंदिस्त करते आणि वारंवार येऊन त्याला नांगी मारते. तेव्हा तो किडा भीती आणि उद्वेगाने त्या माशीचे चिंतन करीत करीत तिच्यासारखाच होऊन जातो. (२७)


एवं कृष्णे भगवति मायामनुज ईश्वरे ।
वैरेण पूतपाप्मानः तं आपुः नुचिन्तया ॥ २८ ॥
सूत्र हे हरिसी लागू लीलें माणूस वाटतो ।
वैराही चिंतने याच्या शुद्ध होता पदी मिळे ॥२८॥

एवं - त्याप्रमाणे - ईश्वरे मायामनुजे - समर्थ अशा मायेने मनुष्यरूप धारण केलेल्या - भगवति कृष्णे - भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी - वैरेण - वैरबुद्धीने - अनुचिंतया - नित्य स्मरणाने - पूतपाप्मानः - ज्यांची पापे धुवून गेली आहेत असे पुरुष - तं ईयुः - त्या श्रीकृष्णाप्रत प्राप्त झाले. ॥२८॥
मायेने मनुष्य झालेल्या भगवान श्रीकृष्णांशी वैर करणारेसुद्धा सतत त्यांचे चिंतन करता करता पापरहित होऊन त्यांनाच प्राप्त झाले. (२८)


कामाद् द्वेषाद् भयात् स्नेहाद् यथा भक्त्येश्वरे मनः ।
आवेश्य तद् अघं हित्वा बहवः तद्‍गतिं गताः ॥ २९ ॥
एक ना कैक ते द्वेषी स्नेहे कामे नि त्या भये ।
मनात भगवान्‌ ध्याता पापीही पोचले पदा ॥२९॥

यथा भक्त्या - जसे कोणी भक्तीने - बहवः - पुष्कळ लोक - कामात् - काम वासनेने - द्वेषात् - द्वेषबुद्धीने - भयात् - भीतीने - स्नेहात् - स्नेहाने - मनः - अंतःकरण - ईश्वरे - परमेश्वराच्या ठिकाणी - आवेश्य - ठेवून - तदघं - त्या द्वेषादिकांचे पाप - हित्वा - टाकून - तद्‌गतिं - त्या परमेश्वराच्या स्थानाला - गताः - गेले. ॥२९॥
जसे भक्तीने भक्त, तशीच अनेक माणसे कामनेने, द्वेषाने, भीतीने किंवा स्नेहाने आपले मन भगवंतांमध्ये लावून आपली सर्व पापे धुऊन टाकून भगवंतांना प्राप्त झाली. (२९)


गोप्यः कामाद् भयात् कंसो द्वेषात् चैद्यादयो नृपाः ।
सम्बन्धाद् वृष्णयः स्नेहाद् यूयं भक्त्या वयं विभो ॥ ३० ॥
गोपिंनी प्रेमभावाने कंसाने भय घेवुनी ।
द्वेषाने शिशुपालाने यादवे बंधु मानुनी ।
स्नेहाने तुम्हि नी आम्ही भक्तिने भजले तया ॥३०॥

विभो - हे राजा - गोप्यः कामात् - गोपी वासनेमुळे - कंसः भयात् - कंस भयामुळे - चौद्यादयो नृपाः द्वेषात् - शिशुपालादि राजे द्वेषामुळे - वृष्णयः संबंधात् - यादव नात्यामुळे - यूयं स्नेहात् - तुम्ही पांडव मैत्रीमुळे - वयं भक्त्या - आम्ही भक्तीने - तद्‌गतिं गताः - परमेश्वराच्या स्थानाला पावलो. ॥३०॥
महाराज, गोपींनी प्रेमाने, कंसाने भयाने, शिशुपाल-दंतवक्त्र इत्यादी राजांनी द्वेषाने, यदुवंशीयांनी नात्याच्या संबंधाने, तुम्ही स्नेहाने आणि आम्ही भक्तीने आपले मन भगवंतांमध्ये लावले आहे. (३०)


कतमोऽपि न वेनः स्यात् पञ्चानां पुरुषं प्रति ।
तस्मात् केनापि उपायेन मनः कृष्णे निवेशयेत् ॥ ३१ ॥
भक्तिचे पाच हे स्त्रोत वेण त्यात न तो कुठे ।
सारंश हाच की याचा मना कृष्णास अर्पिणे ॥३१॥

पुरुषं प्रति - परमेश्वराच्या संबंधाने - पंचानां - पाच वृत्ती ठेवणार्‍यामधील - वेनः कतमः अपि न स्यात् - वेन राजा कोणत्याही वृत्तीचा नव्हता - तस्मात् - म्हणून - केन अपि - कोणत्याही - उपायेन - उपायाने - कृष्णे - परमेश्वराच्या ठिकाणी - मनः - मन - निवेशयेत् - ठेवावे. ॥३१॥
भक्तांच्या व्यतिरिक्त भगवंतांचे चिंतन करणारे जे पाच प्रकारचे पुरुष आहेत, त्यांपैकी कोणाशीही राजा वेनाची तुलना होऊ शकत नाही. म्हणून कसेही का असेना, आपले मन भगवान श्रीकृष्णांमध्ये लावले पाहिजे. (३१)


मातृष्वस्रेयो वश्चैद्यो दन्तवक्रश्च पाण्डव ।
पार्षदप्रवरौ विष्णोः विप्रशापात् पदच्युतौ ॥ ३२ ॥
महाराजा ! तुझे दोघे मावस्‌बंधूच दोन्हि ते ।
भगवत्पार्षदो होते शापानेच्युत जाहले ॥३२॥

पांडव - हे धर्मराजा - वः - तुमच्या - मातृष्वस्रेयः - मावशीचा मुलगा - चैद्यः - चेदिदेशाचा राजा शिशुपाल - च - आणि - दंतवक्त्रः - दंतवक्त्र - विप्रशापात् - ब्राह्मणांच्या शापामुळे - पदात् - आपल्या स्थानापासून - च्युतौ - भ्रष्ट झालेले - विष्णोः - विष्णूच्या - पार्षदप्रवरौ - सेवकामधील श्रेष्ठ. ॥३२॥
महाराज, शिवाय तुझे मावस भाऊ शिशुपाल आणि दंतवक्त्र हे दोघेही भगवान विष्णूंचे मुख्य पार्षद होते. ब्राह्मणांच्या शापामुळे या दोघांना आपल्या पदावरून खाली यावे लागले. (३२)


युधिष्ठिर उवाच -
कीदृशः कस्य वा शापो हरिदासाभिमर्शनः ।
अश्रद्धेय इवाभाति हरेः एकान्तिनां भवः ॥ ३३ ॥
राजा युधिष्ठिराने विचारले -
भगवत्‌पार्षदांनाही कोणी शाप असा दिला ।
अनन्यप्रेमी ते भक्त अतर्क्य सर्व वाटते ॥३३॥

हरिदासाभिमर्शनः - परमेश्वराच्या भक्तांवर संकट आणणारा - कीदृशः - कोणत्या प्रकारचा - वा - अथवा - कस्य - कोणाचा - शापः - तो शाप - हरेः - परमेश्वराच्या - एकांतिना - एकनिष्ठ भक्तांचा - भवः - जन्म - अश्रद्धेयः इव आभाति - विश्वास ठेवण्यास योग्य नव्हे असा भासतो. ॥३३॥
युधिष्ठिराने विचारले – भगवंतांच्या पार्षदांनासुद्धा पदभ्रष्ट करणारा शाप कोणी दिला होता ? तो कोणता होता ? भगवंतांच्या अनन्य भक्तांचा जन्म व्हावा ही गोष्ट विश्वास ठेवण्याजोगी वाटत नाही. (३३)


देहेन्द्रियासुहीनानां वैकुण्ठपुरवासिनाम् ।
देहसम्बन्ध सम्बद्धं एतद् आख्यातुमर्हसि ॥ ३४ ॥
वैकुंठी राहती त्यांची तनू प्राण अप्राकृत ।
प्राकृतीं पातले कैसे सांगा काय प्रकार तो ॥३४॥

देहेन्द्रियासुहीनानां - देह, इंद्रिये व प्राण यांनी विरहित अशा - वैकुंठपुरवासिनां - वैकुंठात राहणार्‍यांचे - एतत् - हे - देहसंबंधसंबद्धं - देहसंबंधाने घडलेले वृत्त - आख्यातुं - सांगण्याला - अर्हसि - तू योग्य आहेस. ॥३४॥
वैकुठांत राहणारे लोक प्राकृत शरीर, इंद्रिये आणि प्राणांविरहित असतात. त्यांच प्राकृत शरीराशी संबंध कसा आला, ते आपण सांगावे. (३४)


नारद उवाच -
एकदा ब्रह्मणः पुत्रा विष्णुलोकं यदृच्छया ।
सनन्दनादयो जग्मुः चरन्तो भुवनत्रयम् ॥ ३५ ॥
श्रीनारद सांगतात -
एकदा सनकादीक विधिमानसपुत्र जे ।
स्वच्छंद फिरता गेले वैकुंठधाम पाहण्या ॥३५॥

एकदा - एके समयी - ब्रह्मणः पुत्राः - ब्रह्मदेवाचे मुलगे - सनंदनादयः - सनक, सनंदन, सनातन व सनत्कुमार हे - यदृच्छया - सहजगत्या - भुवनत्रयं - तीनही लोकांमध्ये - चरंतः - फिरणारे - विष्णोः लोकं - विष्णूच्या लोकाला - जग्मुः - गेले. ॥३५॥
नारद म्हणाले – ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादी ऋषी एके दिवशी तिन्ही लोकांमध्ये स्वच्छंदपणे विहार करीत असता वैकुंठात जाऊन पोहोचले. (३५)


पञ्चषड्ढायनार्भाभाः पूर्वेषामपि पूर्वजाः ।
दिग्वाससः शिशून् मत्वा द्वाःस्थौ तान् प्रत्यषेधताम् ॥ ३६ ॥
पुराण परिही चारी पाच वर्षाचिती मुले ।
वस्त्रहीन अशा अंगे द्वारी रक्षकि रोधिले ॥३६॥

पूर्वेषां अपि - पूर्वीच्या मरीच्यादिक ऋषींच्याही - पूर्वजाः - पूर्वी जन्मलेले - पंचषढढायनार्भाभाः - पाच सहा वर्षाच्या बालकासारख्या कांतीने युक्त - द्वाःस्थौ - दोघे द्वारपाल - दिग्वाससः तान् - नग्न अशा त्यांना - शिशून् - लहान बालके असे - मत्वा - मानून - प्रत्यषेधतां - अडविते झाले. ॥३६॥
वास्तविक हे सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत, परंतु पाचसहा वर्षांच्या बालकांसारखे आहेत. ते वस्त्रसुद्धा नेसत नाहीत. त्यांना सामान्य मुले समजून द्वारपालांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. (३६)


अशपन् कुपिता एवं युवां वासं न चार्हथः ।
रजस्तमोभ्यां रहिते पादमूले मधुद्विषः ॥ ३७ ॥
तेणे ते क्रोधले आणि वदले शाप तो असा ।
रज तमी न की पात्र विष्णुच्या पदि राहण्या ।
शीघ्र जा पापयोनीस असूर म्हणुनी जगा ॥३७॥

कुपिताः - क्रुद्ध झालेले - एवं - याप्रमाणे - अशपन् - शाप देते झाले - बालिशौ युवाम् - पोरकट असे तुम्ही दोघे - मधुद्विषः - मधुसूदनाच्या - रजस्तमोभ्यां - रजोगुण व तमोगुण - रहिते पादमुले - यांनी विरहित अशा चरणांशी - वासं न च अर्हथः - राहण्याला मुळीच योग्य नाही - अतः - याकरिता - पापिष्ठां आसुरीं योनिं - पातकी अशा दैत्यांच्या जन्माला - आशु - लवकर - यांत - जा. ॥३७॥
यामुळे रागावून त्यांनी द्वारपालांना शाप दिला की, "मूर्खांनो, भगवान विष्णूंच्या रज-तमोगुणरहित चरणांजवळ निवास करण्यास तुम्ही पात्र नाही. सबब तुम्ही ताबडतोब येथून अत्यंत पापमय असुरयोनीत जा." (३७)


पापिष्ठां आसुरीं योनिं बालिशौ यातमाश्वतः ॥ ३७३ ।
एवं शप्तौ स्वभवनात् पतन्तौ तौ कृपालुभिः ।
प्रोक्तौ पुनर्जन्मभिः वां त्रिभिर्लोकाय कल्पताम् ॥ ३८ ॥
पाहिले पडता शापे तदा संते कृपाळु हे ।
तीनची भोगणे जन्म येथ या वदले पुन्हा ॥३८॥

एवं - याप्रमाणे - शप्तौ - शापिलेले - स्वभवनात् - स्वतःच्या स्थानापासून - पतंतौ - च्युत होत असलेले - पुनः - पुनः - तैः - त्या - कृपालुभिः - दयाळू सनंदनादिक ऋषींनी - प्रोक्तौ - बोलले गेले - त्रिभिः जन्मभिः - तीन जन्मांनी - लोकाय - आपल्या लोकाला - वां कल्पतां - तुमचे येणे होवो. ॥३८॥
त्यांनी शाप देताच जेव्हा ते वैकुंठातून खाली येऊ लागले, तेव्हा ते कृपाळू महात्मे त्यांना म्हणाले – "ठीक आहे. हा शाप तीन जन्म भोगून तुम्ही परत या वैकुंठात याल." (३८)


जज्ञाते तौ दितेः पुत्रौ दैत्यदानव वन्दितौ ।
हिरण्यकशिपुर्ज्येष्ठो हिरण्याक्षोऽनुजस्ततः ॥ ३९ ॥
हिरण्यकश्यपूबंधू हिरण्याक्ष दितीसुत ।
दैत्य दानव वंशात श्रेष्ठ पुत्र चि हे द्वय ॥३९॥

तौ - ते दोघे - दैत्यदानववंदितौ - दैत्य व दानव यांनी वंदित असे - दितेः - दितीचे - पुत्रौ - दोन पुत्र - जज्ञाते - झाले - हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु - ज्येष्ठः - वडील - हिरण्याक्षः - हिरण्याक्ष - ततः - त्याहून - अनुजः - लहान. ॥३९॥
तेव्हा तेच दोघेजण दितीचे पुत्र झाले. त्यांपैकी थोरल्याचे नाव हिरण्यकशिपू होते आणि धाकट्याचे हिरण्याक्ष. दैत्य-दानवांच्या समाजात हेच सर्वश्रेष्ठ होते. (३९)


हतो हिरण्यकशिपुः हरिणा सिंहरूपिणा ।
हिरण्याक्षो धरोद्धारे बिभ्रता शौकरं वपुः ॥ ४० ॥
वराह अवताराने हिरण्याक्षास मारिले ।
नृसिंह अवताराने हिरण्यकशपू पुन्हा ॥४०॥

हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु - सिंहरूपिणा - सिंहाचे रूप धारण करणार्‍या - हरिणा - परमेश्वराने - हतः - मारिला - सौकरं - वराहाचे - वपुः - शरीर - बिभ्रता - धारण करणार्‍या हरीने - धरोद्धारे - पृथ्वीच्या उद्धाराच्या वेळी - हिरण्याक्षः (हतः) - हिरण्याक्ष मारिला. ॥४०॥
भगवान विष्णूंनी नृसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकशिपूला आणि पृथ्वीला समुद्रातून वर काढताना वराह अवतार धारण करून हिरण्याक्षाला मारले. (४०)


हिरण्यकशिपुः पुत्रं प्रह्लादं केशवप्रियम् ।
जिघांसुः अकरोत् नाना यातना मृत्युहेतवे ॥ ४१ ॥
हिरण्यकश्यपू याने पुत्र प्रल्हादभक्तला ।
भक्तिच्या कारणे केल्या यातना मारण्या तया ॥४१॥

हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु - केशवप्रियं - श्रीहरि ज्याला प्रिय होता अशा - प्रह्लादं पुत्रं जिघांसुः - प्रल्हाद नावाच्या मुलाला मारण्याची इच्छा करणारा - मृत्यूहेतवे - मारण्याकरिता - नानायातनाः - अनेक क्लेश - अकरोत् - देता झाला. ॥४१॥
आपला पुत्र प्रल्हाद भगवत्प्रेमी आहे, म्हणून त्याला मारू इच्छिणार्‍या हिरण्यकशिपूने त्याला अतिशय यातना दिल्या. (४१)


तं सर्वभूतात्मभूतं प्रशान्तं समदर्शनम् ।
भगवत् तेजसा स्पृष्टं नाशक्नोत् हन्तुमुद्यमैः ॥ ४२ ॥
तो पुत्र हरिचा प्रीय समदर्शी नि शांतची ।
रक्षिले हरिने त्याला न मेला तो पित्याकरें ॥४२॥

सर्वभूतात्मभूतं - सर्व प्राणिमात्रांचा अंतर्यामी झालेल्या - समदर्शनं - ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला आहे अशा - प्रशांतं - अत्यंत शांत अशा - स्पृष्टं - व्याप्त अशा - तं - त्या प्रल्हादाला - उद्यमैः - उपायांनी - हन्तुं - मारण्याला - न अशक्नोत् - समर्थ झाला नाही. ॥४२॥
परंतु प्रल्हाद सर्वात्मा भगवंतांचा परमप्रिय, समदर्शी व अत्यंत शांत भक्त होता. भगवंतांच्या तेजाने युक्त असल्यामुळे पुष्कळ प्रयत्‍न करूनही हिरण्यकशिपू त्याला मारू शकला नाही. (४२)


ततस्तौ राक्षसौ जातौ केशिन्यां विश्रवःसुतौ ।
रावणः कुम्भकर्णश्च सर्वलोकोपतापनौ ॥ ४३ ॥
राजा पुढेहि ते दोघे विश्रवा मुनिच्या मुळे ।
केशिनीपुत्रही झाले कुंभकर्ण नि रावण ॥४३॥

ततः - नंतर - तौ - ते दोघे - केशिन्यां - केशिनीच्या ठिकाणी - विश्रवःसुतौ - विश्रव्याचे पुत्र म्हणून - राक्षसौ - राक्षसरूपाने - जातौ - जन्मास आले - रावणः - रावण - च - आणि - कुंभकर्णः - कुंभकर्ण - सर्वलोकोपतापनौ - सर्व जगाला पीडा देणारे. ॥४३॥
नंतर हेच दोघे विश्रवा मुनी व केशिनी यांचे रावण व कुंभकर्ण नावाचे पुत्र झाले. ते त्रैलोक्याला पीडा देणारे होते. (४३)


तत्रापि राघवो भूत्वा न्यहनत् शापमुक्तये ।
रामवीर्यं श्रोष्यसि त्वं मार्कण्डेयमुखात् प्रभो ॥ ४४ ॥
त्या वेळी भगवान्‌ रामे तयांना वधिले असे ।
मार्कंडेय मुखाने ते चरित्र ऐकणे पुन्हा ॥४४॥

तत्र अपि - त्यावेळीही - राघवः भूत्वा - परमेश्वर रामरूप होऊन - शापमुक्तये - शापापासून मुक्तता होण्याकरिता - न्यहनत् - त्यांना मारिता झाला - प्रभो - युधिष्ठिरा - त्वं - तू - रामवीर्यं - रामाचा पराक्रम - मार्कंडेयमुखात् - मार्कंडेय ऋषीच्या तोंडून - श्रोष्यसि - ऐकशील. ॥४४॥
त्यावेळीसुद्धा भगवंतांनी त्यांना शापातून सोडविण्यासाठी रामरूपाने त्यांचा वध केला. युधिष्ठिरा, मार्कंडेय मुनींच्या तोंडून तू भगवान श्रीरामांचे चरित्र ऐकशील. (४४)


तौ अत्र क्षत्रियौ जातौ मातृष्वस्रात्मजौ तव ।
अधुना शापनिर्मुक्तौ कृष्णचक्रहतांहसौ ॥ ४५ ॥
पुढच्या तिसर्‍या जन्मी शिशुपाल नि तो दुजा ।
दंतवक्त्र अशा नामे क्षत्रीय कुळि जन्मले ।
भगवत्‌चक्र स्पर्शाने जाहले शापमुक्त ते ॥४५॥

तौ एव - तेच दोघे - क्षत्त्रियौ - क्षत्रिय म्हणून - जातौ - जन्मलेले - तव - तुझे - मातृष्वस्रात्मजौ - मावसभाऊ - अधुना - आताच - कृष्णचक्रहतांहसौ - ते कृष्णाच्या चक्राने ज्यांचे पाप नष्ट झाले आहे असे - शापनिर्मुक्तौ - शापापासून मुक्त. ॥४५॥
तेच दोघे या जन्मात तुझ्या मावशीचे क्षत्रियपुत्र झाले. भगवान श्रीकृष्णांच्या चक्राच्या स्पर्शाने सर्व पापे नष्ट होऊन आता ते शापातून मुक्त झाले. (४५)


वैरानुबन्धतीव्रेण ध्यानेन अच्युतसात्मताम् ।
नीतौ पुनर्हरेः पार्श्वं जग्मतुः विष्णुपार्षदौ ॥ ४६ ॥
वैरभावा मुळे दोघे स्मरले नित्य श्रीहरी ।
तयाचे फळ त्या दोघा भगवत्‌पदि पावले ।
पार्षदो हरिचे दोघे झाले वैकुंठि ते पुन्हा ॥४६॥

वैरानुबंधतीव्रेण - सतत वैरांमुळे तीव्र झालेल्या - ध्यानेन - चिंतनाने - अच्युतसात्मतां - परमेश्वरस्वरूपाला - नीतौ तौ - नेलेले ते दोघे - पुनः - पुनः - हरेः - हरीच्या - पार्श्वं - समीप - विष्णुपार्षदौ - विष्णूचे द्वारपाल होऊन - जग्मतुः - गेले. ॥४६॥
तीव्र वैरभाव ठेवल्यामुळे ते सतत श्रीकृष्णांचेच चिंतन करीत असत. म्हणूनच ते भगवंतांना प्राप्त झाले आणि पुन्हा त्यांचे पार्षद होऊन त्यांच्याजवळ गेले. (४६)


युधिष्ठिर उवाच -
विद्वेषो दयिते पुत्रे कथं आसीत् महात्मनि ।
ब्रूहि मे भगवन्येन प्रह्लादस्याच्युतात्मता ॥ ४७ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
राजा युधिष्ठिराने विचारिले -
हिरण्यकश्यपू याने स्वपुत्रा द्वेषिले कसे ।
महात्मा तो असोनिया सांगा प्रल्हाद कीर्ति ती ॥४७॥
। इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ ७ ॥ १ ॥
हरिः ॐ तत्सत्‌ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

महात्मनि - मोठया मनाच्या - दयिते पुत्रे - व दया करण्यास योग्य अशा पुत्राच्या ठिकाणी - विद्वेषः - अत्यंत द्वेष - कथं आसीत् - कसा झाला बरे - येन - ज्यामुळे - प्रल्हादस्य - प्रल्हादाला - अच्युतात्मता - परमेश्वराची प्राप्ति झाली - भगवन् - हे नारद मुने - मे - मला - ब्रूहि - तू सांग. ॥४७॥
युधिष्ठिराने विचारले – भगवन, हिरण्यकशिपूने आपल्या महात्मा असलेल्या पुत्र प्रल्हादाचा इतका द्वेष का केला ? शिवाय प्रल्हाद भगवन्मय कसा झाला, हेही मला सांगा. (४७)


स्कंध सातवा - अध्याय पहिला समाप्त

GO TOP