श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कन्धः
त्रयस्त्रिंशोऽध्यायः

देवहूतिकृता भगवत्स्तुतिः, कपिलस्य प्रस्थानम्, देवहूतेर्ब्रह्मभावापत्तिश्च -

देवहूतीला तत्त्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


मैत्रेय उवाच -
एवं निशम्य कपिलस्य वचो जनित्री
     सा कर्दमस्य दयिता किल देवहूतिः ।
विस्रस्तमोहपटला तमभिप्रणम्य
     तुष्टाव तत्त्वविषयाङ्कित सिद्धिभूमिम् ॥ १ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(वसंततिलका)
ऐकोनि श्रीकपिल बोल वदेचि माता
    ती कर्दमप्रियसखी अशि देवहूती ।
फाटूनि मोह सरता करुनी प्रणाम
    धाली नि तत्व विषयास करी स्तुती ती ॥ १ ॥

एवम् - याप्रमाणे - कपिलस्य - कपिल मुनीचे - वचः - भाषण - निशम्य - श्रवण करून - विस्त्रस्तमोहपटला - गेले आहे अज्ञानरूपी आवरण जिचे अशी - जनित्री - कपिलाची माता - सा - ती - कर्दमस्य - कर्दमऋषीची - दयिता - प्रियपत्नी - देवहूतिः - देवहूति - तत्त्वविषयाङ्कितसिद्धिभूमिम् - तत्त्वरूपी विषयाने युक्त अशा सांख्यशास्त्राचा प्रवर्तक अशा - तम् - त्या कपिलाला - अभिप्रणम्य - नमस्कार करून - तुष्टाव किल - स्तुती करू लागली. ॥१॥
मैत्रेय म्हणतात- श्रीकपिलांचा हा उपदेश ऐकून कर्दमांची प्रिय पत्‍नी देवहूतीचा मोहाचा पडदा दूर झाला आणि तिने सांख्यतत्त्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्रीकपिलांना प्रणाम केला आणि ती त्यांची स्तुति करू लागली. (१)


देवहूतिरुवाच -
अथाप्यजोऽन्तःसलिले शयानं
     भूतेन्द्रियार्थात्ममयं वपुस्ते ।
गुणप्रवाहं सदशेषबीजं
     दध्यौ स्वयं यत् जठराब्जजातः ॥ २ ॥
देवहूति म्हणाली - ( इंद्रवज्रा )
ब्रह्मा तुझ्या नाभिफुलात झाला
    नी लोप पावे प्रलयी तुझ्यात ।
जो सत्वरुपी बिज सर्व रुपा
    तोही तुझे ध्यान करी सदैव ॥ २ ॥

अथ - नंतर - यज्जठराब्जजातः - ज्याच्या उदरात असलेल्या कमलापासून उत्पन्न झालेला असा - स्वयम् - स्वतः - अजः अपि - ब्रह्मदेव देखील - अन्तःसलिले - पाण्यामध्ये - शयानम् - शयन करणार्‍या अशा - सत् - व्यक्त अशा - अशेषबीजम् - संपूर्ण विश्वाचे कारण अशा - गुणप्रवाहम् - सत्त्वादि गुणांचा आहे प्रवाह ज्यामध्ये अशा - भूतेन्द्रियार्थात्ममयम् - भूते, इन्द्रिये, शब्दादिक विषय आणि मन एतद्रूप अशा - ते - तुझ्या - वपुः - शरीराचे - दध्यौ - ध्यान करता झाला. ॥२॥
देवहूती म्हणाली- ज्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव प्रगट झाले होते, त्यांनीही प्रलयकालीन जलात शयन करणार्‍या आपल्या पंचभूते, इंद्रिये, शब्दादी विषय आणि मन यांनी युक्त, सत्त्वादी गुणमय कार्य व कारण अशा दोन्हींचे बीज असणार्‍या आपल्या व्यक्त स्वरूपाचे केवळ चिंतन केले होते. (ते प्रत्यक्ष पाहिले नव्हते.) (२)


स एव विश्वस्य भवान् विधत्ते
     गुणप्रवाहेण विभक्तवीर्यः ।
सर्गाद्यनीहोऽवितथाभिसन्धिः
     आत्मेश्वरोऽतर्क्य सहस्रशक्तिः ॥ ३ ॥
तू चिंतिता होय तसेचि सारे
    स्वामी जगां तू परिपूर्णवीर्य ।
तू शक्ति कांही करुनी निराळी
    ब्रह्मादि रुपें रचितोस सृष्टि ॥ ३ ॥

सः - तो - गुणप्रवाहेण - सत्त्वादि गुणांच्या प्रवाहाच्या योगाने - विभक्तवीर्यः - विभक्त केली आहे शक्ति ज्याने असा - अनीहः - निष्क्रिय असा - अवितथाभिसन्धिः - सत्य आहे संकल्प ज्याचा असा - आत्मेश्वरः - जीवाचा नियन्ता - अतर्क्यसहस्त्रशक्तिः - अतर्क्य आहेत अनंत शक्ति ज्याच्या असा - भवान् एव - तूच - विश्वस्य - जगाची - सर्गादि - उत्पत्त्यादि अवस्था - विधत्ते - करितोस. ॥३॥
आपण निष्क्रिय, सत्यसंकल्प, संपूर्ण जीवांचे प्रभू तसेच हजारो अचिंत्य शक्तींनी संपन्न आहात. आपल्या शक्तीला गुणप्रवाहरूपाने ब्रह्मादी अनंत मूर्तींमध्ये विभक्त करून त्यांच्याद्वारा आपण स्वतःच विश्वाची उत्पत्ती इत्यादी करीत आहात. (३)


स त्वं भृतो मे जठरेण नाथ
     कथं नु यस्योदर एतदासीत् ।
विश्वं युगान्ते वटपत्र एकः
     शेते स्म मायाशिशुरङ्‌घ्रिपानः ॥ ४ ॥
नाथा! लयासी उदरात सृष्टी
    घेसी पुन्हा बाळरुपास आणि ।
नी चोखितो बोट वटास पत्रीं
    गर्भात माझ्या धरिले तुला मी ॥ ४ ॥

नाथ - हे कपिल मुने - युगान्ते - प्रलयकाळी - एतत् - हे - विश्वम् - जग - यस्य - ज्याच्या - उदरे - उदरात - आसीत् - होते - यः च - आणि जो - एकः - एकटा - अङ्घ्रिपानः - पायाच्या अंगठ्याला चोखणारा असा - मायाशिशुः - मायेच्या योगाने बालकाचे रूप धारण केलेला - वटपत्रे - वडाच्या पानावर - शेते स्म - निजला होतास - सः त्वम् - तो तू - मे - माझ्याकडून - जठरेण - उदराच्या योगाने - कथं नु भृतः - कसा धारण केला गेलास. ॥४॥
नाथ, प्रलयकाल आल्यावर ज्यांच्या पोटात हे सारे विश्व लीन होऊन जाते आणि जे कल्पांताच्या वेळी मायामय बालकाचे रूप धारण करून आपल्या पायाचा अंगठा चोखीत एकटेच वटवृक्षाच्या पानावर शयन करतात, त्या तुम्हांला मी गर्भामध्ये कसे काय धारण केले ? (हीही आपलीच माया नव्हे का ?) (४)


त्वं देहतन्त्रः प्रशमाय पाप्मनां
     निदेशभाजां च विभो विभूतये ।
यथावतारास्तव सूकरादयः
     तथायमप्यात्म पथोपलब्धये ॥ ५ ॥
पाप्यास तू रे करितोस शिक्षा
    नी भक्तकाजा अवतार घेसी ।
केलेस तू सोंग वराह रुपे
    हे ज्ञान देण्यास कपील झाला ॥ ५ ॥

विभो - प्रभो कपिला - त्वम् - तू - पाप्मनाम् - दुष्टांच्या - प्रशमाय - संहारासाठी - च - आणि - निदेशभाजाम् - आज्ञा पालन करणारांच्या - विभूतये - उत्कर्षासाठी - देहतंत्रः - देहाचा स्वीकार केलेला असा - असि - आहेस - यथा - ज्याप्रमाणे - तव - तुझे - सुकरादयः - वराह इत्यादिक - अवताराः - अवतार - तथा - त्याप्रमाणे - अयम् अपि - हा देखील - अवतारः - अवतार - आत्मपथोपलब्धये - ज्ञानमार्ग दाखविण्यासाठी - अस्ति - आहे. ॥५॥
हे विभो, आपण पापी लोकांना शासन आणि आज्ञाधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने देह धारण करता. म्हणून जसे त्यासाठी आपले वराह आदी अवतार झाले, त्याचप्रमाणे हा कपिलावतारसुद्धा मुमुक्षूंना ज्ञानमार्ग दाखविण्यासाठी झाला आहे. (५)


यन्नामधेयश्रवणानुकीर्तनाद्
     यत्प्रह्वणाद् यत् स्मरणादपि क्वचित् ।
श्वादोऽपि सद्यः सवनाय कल्पते
     कुतः पुनस्ते भगवन्नु दर्शनात् ॥ ६ ॥
देवा तुझे नाव ऐकोनि गाता
    तो श्वानभक्षी जरि पापि हो का ।
चांडाळ तो पूज्य असाचि होतो
    शंका नसे दर्शनि धन्य होतो ॥ ६ ॥

भगवन् - हे कपिल मुने - श्वादः अपि - कुत्र्याचे मांस खाणारा चाण्डाळ देखील - यन्नामधेयश्रवणानुकीर्तनात् - ज्याच्या नामाचे श्रवण व कीर्तन याच्यामुळे - यत्प्रहृणात् - ज्याला नम्र झाल्यामुळे - क्वचित् - एखादे वेळी - यत्स्मरणात् अपि - ज्याच्या स्मरणामुळे देखील - सद्यः - तत्काल - सवनाय - सोमयोगाला - कल्पते - प्राप्त होतो - नु - खरोखर - ते - तुझ्या - दर्शनात् - दर्शनामुळे - कल्पते इति - समर्थ होतो - हे पुनः - पुनः - कुतः - सांगावयाला कशाला पाहिजे. ॥६॥
हे भगवन, आपल्या नावाचे श्रवणकीर्तन करण्याने किंवा चुकून-माकून आपल्याला नमस्कार अथवा आपले स्मरण करण्याने सुद्धा चांडाळ देखील तत्काळ सोमयागाला पात्र होऊ शकतो, तर मग आपले दर्शन घेण्याने मनुष्य कृतकृत्य होईल, यात काय शंका ! (६)


अहो बत श्वपचोऽतो गरीयान्
     यज्जिह्वाग्रे वर्तते नाम तुभ्यम् ।
तेपुस्तपस्ते जुहुवुः सस्नुरार्या
     ब्रह्मानूचुर्नाम गृणन्ति ये ते ॥ ७ ॥
अहो! खरा श्रेष्ठ असोनि पापी
    जिव्हेवरी नाम विराजते हे ।
जो श्रेष्ठ गातो तव नाम नित्य
    केले तयाने तप थोर जाणा ॥ ७ ॥

अहो - अहो - यज्जिह्‌वाग्रे - ज्याच्या जिव्हाच्या अग्रावर - तुभ्यं नाम - तुझे नाव - वर्तते - असते - अतः - यास्तव - श्वपचः - चाण्डाळ - गरीयान् - अतिशय मोठा - अस्ति - आहे - बत - खरोखर - ये - जे - ते नाम - तुझे नाव - गृणन्ति - घेतात - ते आर्याः - ते श्रेष्ठ पुरुष - तपः तेपुः - तप करिते झाले - जहुवुः - होम करिते झाले - सस्नुः - अवभृत स्नान करिते झाले - च - आणि - ब्रह्म अनूचुः - ब्रह्माचे व्याख्यान करिते झाले. ॥७॥
ज्याच्या जिभेवर आपले नाव आहे, तो चांडाळसुद्धा यामुळेच श्रेष्ठ होय. जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नामाचे उच्चारण करतात, त्यांनी तप, हवन, तीर्थस्थान, सदाचारपालन आणि वेदाध्ययन असे सर्व काही केले, (असेच समजावे.) (७)


तं त्वामहं ब्रह्म परं पुमांसं
     प्रत्यक्स्रोतस्यात्मनि संविभाव्यम् ।
स्वतेजसा ध्वस्तगुणप्रवाहं
     वन्दे विष्णुं कपिलं वेदगर्भम् ॥ ८ ॥
तू ब्रह्म नी श्रेष्ठ पुरुष थोर
    वृत्तीस मेळोनि तुलाचि ध्यावे ।
तेजेचि तू शांत माया करीशी
    तू वेद विष्णु नमिते तुला मी ॥ ८ ॥

अहम् - मी - तम् - त्या - परम् - श्रेष्ठ अशा - ब्रह्म - ब्रह्मरूप अशा - पुमांसम् - पुरुषरूप अशा - प्रत्यक्‌स्नोतसि - विषयापासून अन्तर्मुख केलेल्या अशा अन्तःकरणाच्या ठिकाणी - संविभाव्यम् - चिंतन करण्यास योग्य अशा - स्वतेजसा - आपल्या तेजाच्या योगाने - ध्वस्तगुणप्रवाहम् - नष्ट केला आहे गुणांचा प्रवाह ज्याने अशा - विष्णुम् - विष्णु अशा - वेदगर्भम् - वेद आहेत उदरामध्ये ज्याच्या अशा - कपिलं त्वाम् - कपिल अशा तुला - वन्दे - नमस्कार करते. ॥८॥
आपण साक्षात परब्रह्म आहात; आपणच परमपुरुष आहात, वृत्तींचा प्रवाह अंतर्मुख करून अंतःकरणात आपलेच चिंतन केले जाते. आपण आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता. आपल्यातच वेद समाविष्ट आहेत. अशा साक्षात विष्णुस्वरूप कपिलांना मी प्रणाम करते. (८)


मैत्रेय उवाच -
ईडितो भगवानेवं कपिलाख्यः परः पुमान् ।
वाचाविक्लवयेत्याह मातरं मातृवत्सलः ॥ ९ ॥
मैत्रेयजी सांगतात -( अनुष्टुप्‌ )
मातेने स्तुति ही सर्व करिता मातृवत्सल ।
भगवान्‌ कपिले तेंव्हा गंभीर शब्द काढले ॥ ९ ॥

एवम् - याप्रमाणे - ईडितः - स्तुति केलेला - भगवान् - भगवान - कपिलाख्यः - कपिल आहे नाव ज्याचे असा - परः - सर्वान्तर्यामी असा - पुमान् - पुरुष - मातृवत्सलः - मातृभक्त असा - विक्लवया - प्रेमाने सद्गदित झालेल्या - वाचा - वाणीने - मातरम् - मातेला - इति - असे - आह - म्हणाला. ॥९॥
मैत्रेय म्हणतात- मातेने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर मातृवत्सल परमपुरुष भगवान कपिलदेव तिला गंभीर वाणीने म्हणाले. (९)


कपिल उवाच -
मार्गेणानेन मातस्ते सुसेव्येनोदितेन मे ।
आस्थितेन परां काष्ठां अचिराद् अवरोत्स्यसि ॥ १० ॥
भगवान्‌ कपिलदेव म्हणाले -
माते मी तुजला सोपा मार्ग हा वदलो असे ।
याच्या त्या अवलंबाने शीघ्र उद्धार पावसी ॥ १० ॥

मातः - माते - त्वम् - तू - मे - मजकडून - उदितेन - सांगितला गेलेल्या अशा - सुसेव्येन - सुखाने आचरण्याला योग्य अशा - आस्थितेन - अनुष्ठिलेल्या अशा - अनेन - ह्या - मार्गेण - मार्गाने - अचिरात् - लवकर - परां काष्ठाम् - जीवनमुक्तीला - प्राप्स्यसि - प्राप्त होशिल. ॥१०॥
श्रीकपिल म्हणाले- माते, मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे, त्याचे अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला जाशील. (१०)


श्रद्धत्स्वैतन्मतं मह्यं जुष्टं यद्‍ब्रह्मवादिभिः ।
येन मां अभयं याया मृत्युमृच्छन्त्यतद्विदः ॥ ११ ॥
विश्वास ठेव या शब्दीं संतांनी सेविले यया ।
लाभेल तुजला मोक्ष अन्यथा भव सोडिना ॥ ११ ॥

यत् - जे - ब्रह्मवादिभिः - ब्रह्मज्ञानी पुरुषांनी - जुष्टम् - सेविले - तत् - त्या - एतत् - ह्या - मह्यम् - माझ्या - मतम् - मतावर - श्रद्धस्व - विश्वास ठेव - येन - ज्या मताच्या योगाने - अभवम् - जन्मरहित अशा - माम् - मला - यायाः - प्राप्त होशील - अतव्दिदः - त्या माझ्या मताला न जाणणारे असे पुरुष - मृत्युम् - संसारात - ऋच्छन्ति - जातात. ॥११॥
माझ्या या मतावर तू विश्वास ठेव. ब्रह्मवादी लोकांनी याचे अनुकरण केले आहे. याद्वारा तू माझ्या, जन्ममरणरहित स्वरूपाला प्राप्त करून घेशील. जे लोक माझे हे मत मानीत नाहीत, ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकतात. (११)


मैत्रेय उवाच -
इति प्रदर्श्य भगवान् सतीं तां आत्मनो गतिम् ।
स्वमात्रा ब्रह्मवादिन्या कपिलोऽनुमतो ययौ ॥ १२ ॥
मैत्रेयजी सांगतात -
बोधिली अत्मबोधाने कपिले ब्रह्मवादिनी ।
मातेस पुसली आज्ञा मिळता दूर चालले ॥ १२ ॥

इति - याप्रमाणे - सतीम् - साध्वी अशा - ताम् - त्या देवहूती मातेला - आत्मनः - आत्म्याची - गतिम् - गति - प्रदर्श्य - दाखवून - भगवान् कपिलः - भगवान कपिल - ब्रह्मवादिन्या - ब्रह्मज्ञानी अशा - स्वमात्रा - आपल्या मातेकडून - अनुमतः - अनुमोदन मिळालेला असा - ययौ - गेला. ॥१२॥
मैत्रेय म्हणतात - अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून श्रीकपिलदेव आपल्या ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेऊन तेथून निघून गेले. (१२)


सा चापि तनयोक्तेन योगादेशेन योगयुक् ।
तस्मिन् आश्रम आपीडे सरस्वत्याः समाहिता ॥ १३ ॥
शारदामुकुटा ऐशा आश्रमी देवहूतिजी ।
योगाच्या साधनी योगे समाधीत स्थिरावली ॥ १३ ॥

च - आणि - सा अपि - ती देवहूति देखील - सरस्वत्याः - सरस्वतीचा - आपीडे - पुष्पमुकुटच अशा - तस्मिन् आश्रमे - त्या आश्रमात - तनयोक्तेन - पुत्राने उपदेशिलेल्या अशा - योगादेशेन - योगशास्त्राच्या विधीने - योगयुक् - योगाभ्यासाने युक्त अशी - समाहिता - स्थिरचित्त अशी - बभूव - झाली. ॥१३॥
तेव्हा देवहूतीसुद्धा सरस्वतीचा मुकुट शोभेल अशा आपल्या आश्रमात पुत्राने केलेल्या योगसाधनेने योगाभ्यास करीत समाधीत मग्न झाली. (१३)


अभीक्ष्ण अवगाहकपिशान् जटिलान् कुटिलालकान् ।
आत्मानं च उग्रतपसा बिभ्रती चीरिणं कृशम् ॥ १४ ॥
त्रिकाल स्नान घेवोनी कुरुळे केश सर्व ते ।
जटाचि जाहले, देह तपाने क्षीण जाहला ॥ १४ ॥

अभीक्ष्णावगाहकपिशान् - पुनःपुनः स्नान करण्यानेपिंगट झालेल्या अशा - जटिलान् - जटायुक्त अशा - कुटिलालकान् - कुरळ्या केसांना - च - आणि - आत्मानम् - शरीराला - उग्रतपसा - तीव्र तपश्चर्येच्या योगाने - कृशम् - कृश झालेल्या अशा - चीरिणम् - वस्त्राच्या तुकड्यांनी युक्त अशा - विभ्रती - धारण करणारी - आसीत् - होती. ॥१४॥
त्रिकाल स्नान करण्याने तिच्या कुरळ्या केसांचे भुरकट जटांमध्ये रूपांतर झाले. तसेच वल्कलांनी झाकलेले शरीर उग्र तपस्येमुळे कृश झाले. (१४)


प्रजापतेः कर्दमस्य तपोयोगविजृम्भितम् ।
स्वगार्हस्थ्यमनौपम्यं प्रार्थ्यं वैमानिकैरपि ॥ १५ ॥
कर्दमीतप सामर्थे मिळाले गृहसौख्य जे ।
त्यागिले तिजने सर्व देव ज्यां इच्छिती सदा ॥ १५ ॥

वैमानिकैः अपि - विमानातून संचार करणार्‍या देवांना देखील - प्रार्थ्यम् - इच्छिण्याला योग्य अशा - अनौपम्यम् - अनुपम अशा - कर्दमस्य प्रजापतेः - कर्दम प्रजापतीच्या - तपोयोगविजृम्भितम् - तपश्चर्या व योग यांच्या योगाने वाढलेल्या अशा - स्वगार्हस्थ्यम् - आपल्या गृहस्थधर्मातील सौख्याला. ॥१५॥
तिने प्रजापती कर्दमांच्या तपश्चर्या आणि योगबलाने प्राप्त झालेल्या, देवांनी इच्छा करावी अशा अनुपम गृहस्थसुखाचा त्याग केला. (१५)


पयःफेननिभाः शय्या दान्ता रुक्मपरिच्छदाः ।
आसनानि च हैमानि सुस्पर्शास्तरणानि च ॥ १६ ॥
स्वच्छस्फटिककुड्येषु महामारकतेषु च ।
रत्‍नप्रदीपा आभान्ति ललना रत्‍नसंयुताः ॥ १७ ॥
गृहोद्यानं कुसुमितै रम्यं बह्वमरद्रुमैः ।
कूजद् विहङ्गमिथुनं गायन् मत्तमधुव्रतम् ॥ १८ ॥
यत्र प्रविष्टमात्मानं विबुधानुचरा जगुः ।
वाप्यां उत्पलगन्धिन्यां कर्दमेनोपलालितम् ॥ १९ ॥
हित्वा तदीप्सिततमं अप्याखण्डलयोषिताम् ।
किञ्चिच्चकार वदनं पुत्रविश्लेषणातुरा ॥ २० ॥
जिथे ते हस्तिदंतांचे पलंग शुभ्र कोमळ ।
सिंहासनादि सोन्याचे सोन्याचे पात्र सर्वही ॥ १६ ॥
सर्वत्र म‌उ त्या गाद्या पाचूंच्या भिंति शोभल्या ।
सुरेख दीपमूर्तींच्या रत्नज्योति प्रकाशती ॥ १७ ॥
फुलांनी शोभले वृक्ष पक्षीही गाति सुंदर ।
गुंजती भ्रमरे नित्य बारवीं पद्‌मगंध तो ॥ १८ ॥
कर्दमासह ती जेथे प्रेमाने नित्य क्रीडली ।
गंधर्व गुण ते गाती इंद्रपत्न्याहि मोहल्या ॥ १९ ॥
असे ते गृह उद्यान सर्वही त्यागिले तिने ।
वियोगे परि पुत्राच्या म्लानमुख क्वचित्‌ दिसे ॥ २० ॥

पयःफेननिभाः - दुधावरील फेसासारखा - शय्याः - शय्या - रुक्मपरिच्छदाः - सोन्याची टोपणे घातलेले - च - आणि - सुस्पर्शास्तरणानि - मऊ आहेत अस्तरणे ज्यावर अशी - हैमानि - सुवर्णाची - आसनानि - आसने. ॥१६॥ च - आणि - महामा कतेषु - उंची पाचूच्या केलेल्या - स्वच्छस्फटिकाकुड्येषु - स्वच्छ स्फटिकांच्या भिंतीमध्ये - ललनारत्नसंयुक्ताः - सुंदर पुतळ्यांच्या हातात असलेले - रत्नप्रदीपाः - रत्नांचे दिवे - आभान्ति - शोभतात. ॥१७॥ कुसुमितैः - फुललेल्या अशा - बह्‌वमरद्रुमैः - पुष्कळ कल्पवृक्षांच्या योगाने - रम्यम् - सुंदर असे - कूजव्दिहङ्गमिथुनम् - शब्द करीत आहेत पक्ष्यांचं जोडपी ज्यामध्ये असे - गायन्मत्तमधुव्रतम् - गायन करीत उन्मत भ्रमर ज्यामध्ये असे - गृहोद्यानम् - घरातील उपवन - आसीत - होते. ॥१८॥ विबुधानुचराः - देवांचे सेवक - यत्र - ज्या उपवनात - प्राविष्टम् - प्रवेश केलेल्या अशा - उत्पलगन्धिन्याम् - कलमांचा आहे गन्ध जीमध्ये अशा - वाप्याम् - पुष्करिणीमध्ये - कर्दमेन - कर्दम ऋषीशी - उपलालितम् - क्रीडा करीत असलेल्या अशा - आत्मानम् - स्वतः देवहूतीची - जगुः - स्तुति करीत असत. ॥१९॥ आखण्डलयोषिताम् अपि - इन्द्राच्या स्त्रियांना देखील - इप्सिततमम् - अत्यंत इष्ट अशा - तत् - त्या ऐश्वर्याला - हित्वा - टाकून - पुत्रविश्लेषणातुरा - पुत्राच्या वियोगाने व्याकुळ झालेली अशी - वदनं किञ्चित् चकार - म्लान वदन करिती झाली. ॥२०॥
जेथे दुधाच्या फेसाप्रमाणे स्वच्छ आणि कोमल शय्यांनी युक्त हस्तिदंती पलंग, सुवर्णपात्रे, सोन्याचे सिंहासन, त्यावर अतिकोमल गाद्या अंथरलेल्या आहेत, तसेच ज्याच्यामध्ये स्वच्छ स्फटिकमणी आणि उच्च प्रकारचे पाचू लावलेल्या भिंतीमध्ये रत्‍नजडित रमणीय मूर्तींसहित मणिमय दिवे झगमगत आहेत, जे फुलांनी लहडलेल्या अनेक दिव्य वृक्षांनी सुशोभित आहेत, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुंद भ्रमरांचा गुंजारव होत आहे, जेथील कमलगंधांनी सुवासित सरोवरात कर्दमांच्या सहवासात त्यांचे प्रेम प्राप्त करून घेऊन क्रीडेसाठी प्रवेश केल्यावर जिचे गंधर्वगण गुणगान करीत असत आणि जे मिळविण्यासाठी इंद्रपत्‍न्या सुद्धा इच्छुक असत, अशा गृहोद्यानाची ममता तिने सोडून दिली. परंतु पुत्रवियोगाने व्याकूळ झाल्यामुळे तिचे वदन काहीसे उदास झाले. (१६-२०)


वनं प्रव्रजिते पत्यौ अपत्यविरहातुरा ।
ज्ञाततत्त्वाप्यभून्नष्टे वत्से गौरिव वत्सला ॥ २१ ॥
वनात पति तो गेला जाहले पुत्रदुःखही ।
वैराग्य असुनी झाली गोवत्सा परि ती स्थिती ॥ २१ ॥

पत्यौ वनं प्रव्रजिते - पति वनांत गेला असता - अपत्यविरहातुरा - पुत्राच्या विरहाने व्याकुळ झालेली अशी - ज्ञाततत्त्वा अपि - जाणिलेले आहे तत्त्व जिने अशी असूनहि - सा - ती देवहूति - वत्से नष्टे - वासरू नष्ट झाले असता - वत्सला गौः इव - प्रेमळ गाय जशी तशी - अभूत् - झाली. ॥२१॥
पती वनात गेल्यानंतर पुत्राचाही वियोग झाल्याने ती आत्मज्ञानसंपन्न असूनही वासराचा वियोग झाल्यावर हंबरणार्‍या गाईसारखी व्याकूळ झाली. (२१)


तमेव ध्यायती देवं अपत्यं कपिलं हरिम् ।
बभूवाचिरतो वत्स निःस्पृहा तादृशे गृहे ॥ २२ ॥
विदुरा सांख्यदेवाच्या चिंतनी राहिली सती ।
ऐश्वर्य असुनी सर्व उपरी राहिली सदा ॥ २२ ॥

वत्स - हे विदुरा - तम् एव - त्याच - देवम् - देवस्वरूप अशा - अपत्यम् - पुत्ररूप अशा - हरिम् - दुःखमुक्त करणार्‍या - कपिलम् - कपिलाचे - ध्यायती - ध्यान करणारी - तादृशे गृहे - तशा प्रकारच्या घरात - अचिरतः - लवकरच - निस्पृहा - निरिच्छ अशी - बभूव - झाली. ॥२२॥
विदुरा, आपला पुत्र कपिलदेवरूप भगवान हरीचेच चिंतन करता करता लवकरच तिला अशा ऐश्वर्यसंपन्न घराबद्दलसुद्धा उपरती झाली. (२२)


ध्यायती भगवद्‌रूपं यदाह ध्यानगोचरम् ।
सुतः प्रसन्नवदनं समस्तव्यस्तचिन्तया ॥ २३ ॥
पुन्हा त्या भगवद्‌रूपी कपिले बोधिले जसे ।
तसे एकेक अंगाला ध्यानही लाविले तिने ॥ २३ ॥

सुतः - पुत्र - यत् आह - जे म्हणाला - तत् - त्या - ध्यानगोचरम् - ध्यानाचा विषय अशा - प्रसन्नवदनम् - प्रसन्न आहे मुख ज्याचे अशा - भगवद्रूपं - भगवंताच्या मूर्तीची - समस्तव्यस्तचिन्तया - संपूर्ण स्वरूपाच्या व एकएक अवयवाच्या ध्यानाच्या योगाने - ध्यायती - ध्यान करणारी - बभूव - झाली. ॥२३॥
नंतर कपिलदेवांनी भगवंतांच्या ज्या ध्यान करण्यायोग्य प्रसन्नवदनारविंदयुक्त स्वरूपाचे वर्णन केले होते, त्याच्या एकेक अवयवाचे तसेच त्याच्या समग्र स्वरूपाचे चिंतन करीत ती ध्यानमग्न झाली. (२३)


भक्तिप्रवाहयोगेन वैराग्येण बलीयसा ।
युक्तानुष्ठानजातेन ज्ञानेन ब्रह्महेतुना ॥ २४ ॥
विशुद्धेन तदात्मानं आत्मना विश्वतोमुखम् ।
स्वानुभूत्या तिरोभूत मायागुणविशेषणम् ॥ २५ ॥
भक्ति वैराग्य कर्माने जाहले शुद्ध चित्त ते ।
ज्ञानाने सर्वव्यापी तो आत्म्यात पाहिला तिने ॥ २४ ॥
ज्या त्या स्वरुप तेजाने माया दूरचि राहते ॥ २५ ॥

भक्तिप्राहवयोगेन - भक्तिप्रवाहरूप योगाने - बलीयसा - कडकडीत अशा - वैराग्येन - वैराग्याच्या योगाने - युक्तानुष्ठानजातेन - योग्य आचरणाने उत्पन्न झालेल्या अशा - ब्रह्महेतुना - ब्रह्म आहे फल ज्याचे अशा - ज्ञानेन - ज्ञानाच्या योगाने. ॥२४॥ तदा - त्या वेळी - विशुद्धेन - निर्मळ अशा - आत्मना - अन्तःकरणाच्या योगाने - स्वानुभूत्या - आत्मानुभवाच्या योगाने - तिरोभूतमायागुणविशेषणम् - ज्याचा मायेच्या गुणांचा भेद नष्ट झाला आहे अशा - विश्वतोमुखम् - सर्वतोमुख अशा - आत्मानम् - आत्म्याचे - ध्यायती - ध्यान करणारी. ॥२५॥
भगवद्‌भक्तीचा प्रवाह, प्रबळ वैराग्य आणि यथोचित कर्मानुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या ब्रह्मसाक्षात्कार करून देणार्‍या ज्ञानाने शुद्ध झाल्याने ती त्या सर्वव्यापक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झाली, जो आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने मायाजनित आवरण दूर करतो. (२४-२५)


ब्रह्मण्यवस्थितमतिः भगवति आत्मसंश्रये ।
निवृत्तजीवापत्तित्वात् क्षीणक्लेशाऽऽप्त निर्वृतिः ॥ २६ ॥
ईश्वरी स्थित ती बुद्धी होताचि जीवभाव तो ।
निवृत्त जाहला सारा परमानंदि राहिली ॥ २६ ॥

आत्मसंश्रये - जीवांचा आश्रय अशा - ब्रह्मणि - ब्रह्मरूप अशा - भगवति - परमेश्वराच्या ठिकाणी - अवस्थितमतिः - स्थिर केली आहे बुद्धि जीने अशी - निवृत्तजीवापत्तित्वात् - जीवपण नष्ट झाल्यामुळे - क्षीणक्लेशा - जिचे क्लेश नष्ट झाले आहेत अशी - आप्तनिर्वृतिः - जिला सुख प्राप्त झाले आहे अशी. ॥२६॥
अशा प्रकारे जीवाचे अधिष्ठानभूत परब्रह्म श्रीभगवंतांमध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि ती सर्व क्लेशांपासून मुक्त होऊन परमानंदात निमग्न झाली. (२६)


नित्यारूढसमाधित्वात् परावृत्तगुणभ्रमा ।
न सस्मार तदाऽऽत्मानं स्वप्ने दृष्टमिवोत्थितः ॥ २७ ॥
अखंड राहता ध्यानी सत्यवान्‌ भ्रांति संपली ।
देहाही विसरे जैसी स्वप्नी ती तनु भासते ॥ २७ ॥

नित्यारूढसमाधित्वात् - नित्य समाधि लागलेली असल्यामुळे - परावृत्तगुणभ्रमा - जिचा गुणनिमित्तक भ्रम नष्ट झाला आहे अशी - सा - ती देवहूती - तदा - त्यावेळी - उत्थितः - उठलेला पुरुष - स्वप्ने - स्वप्नात - दृष्टम् इव - पाहिलेल्या विषयाला जसेजसे - आत्मानम् - आपल्या देहाला - न सस्मार - न स्मरती झाली. ॥२७॥
आता निरंतर समाधिस्थ राहिल्याकारणाने तिचा विषयांच्या खरेपणाबद्दलचा भ्रम नाहीसा झाला आणि तिला आपल्या शरीराचीसुद्धा शुद्ध राहिली नाही. (२७)


तद्देहः परतः पोषोऽपि अकृशश्चाध्यसम्भवात् ।
बभौ मलैरवच्छन्नः सधूम इव पावकः ॥ २८ ॥
स्वाङ्गं तपोयोगमयं मुक्तकेशं गताम्बरम् ।
दैवगुप्तं न बुबुधे वासुदेवप्रविष्टधीः ॥ २९ ॥
दुसरे पोषिती देह तरी ना क्षीण जाहली ।
मानसी नव्हता क्लेश तेणे तेज विखूरले ॥ २८ ॥
केश पिंजारले सर्व वस्त्र ते पडले कुठे ।
ध्यानी हरपली शुद्ध प्रारब्ध रक्षि केवळ ॥ २९ ॥

परतःपोषः अपि - दुसर्‍याकडून आहे पोषण ज्याचे असा असूनही - आध्यसंभवात् - निरोगी असल्यामुळे - अकृशः - क्षीण न झालेला - तद्देहः - त्या देवहूतीचा देह - मलैः अवच्छन्नः - मळांनी व्याप्त झाले असा - सधूमः - धुराने युक्त अशा - पावकः इव - अग्नीप्रमाणे - बभौ - शोभता झाला. ॥२८॥ वासुदेवप्रविष्टधीः - श्रीहरीच्या ठिकाणी प्रविष्ट झालेली आहे बुद्धि जीची अशी - सा - ती देवहूती - तपोयोगमयम् - तपश्चर्या व योग एतद्रूप अशा - मुक्त केशम् - सुटलेले आहेत केस ज्यातील अशा - गताम्बरम् - गेले आहे वस्त्र ज्याचे अशा - दैवगुप्तम् - दैवाने रक्षण केलेल्या - स्वाङ्गम् - स्वतःच्या शरीराला - न बुबुधे - जाणत नव्हती. ॥२९॥
जसे जागा झालेल्या माणसाला आपण स्वप्नात पाहिलेल्या शरीराची शुद्ध राहात नाही. तिच्या शरीराचे पोषणसुद्धा दुसर्‍यांकडून होत होते. परंतु कोणत्याही प्रकारचे मानसिक क्लेश नसल्याने शरीर दुर्बळ झाले नाही. तिचे तेज आणखीच वाढले, परंतु ते धुळीने माखल्यामुळे धुराने व्याप्त अग्नीप्रमाणे दिसू लागले. तिचे केस अस्ताव्यस्त विखुरले आणि वस्त्रही गळाले. परंतु नेहमी श्रीभगवंतांमध्ये चित्त लागून राहिल्यामुळे तिला आपल्या तपोयोगमय शरीराची काहीच शुद्ध राहिली नाही. केवळ प्रारब्धच त्याचे रक्षण करीत होते. (२८-२९)


एवं सा कपिलोक्तेन मार्गेणाचिरतः परम् ।
आत्मानं ब्रह्मनिर्वाणं भगवन्तं अवाप ह ॥ ३० ॥
अशी ती कपिलीबोधे योगाचा मार्ग आचरे ।
पावली भगवद्रूपी नित्य ती मुक्त जाहली ॥ ३० ॥

एवम् - याप्रमाणे - कपिलोक्तेन - कपिलमुनीने उपदेशिलेला अशा - मार्गेण - मार्गाच्या योगाने - सा - ती देवहूती - अचिरतः - लवकरच - परम् - श्रेष्ठ अशा - आत्मानम् - अन्तर्यामीरूप अशा - निर्वाणम् - नित्ययुक्त - ब्रह्म - ब्रह्मरूप - भगवन्तम् - भगवन्ताला - अवापह - प्राप्त झाली. ॥३०॥
अशा प्रकारे देवहूतीने कपिलांनी सांगितलेल्या मार्गाने थोडयाच दिवसात नित्यमुक्त, परमात्मस्वरूप, श्रीभगवंतांना प्राप्त करून घेतले. (३०)


तद्वीरासीत् पुण्यतमं क्षेत्रं त्रैलोक्यविश्रुतम् ।
नाम्ना सिद्धपदं यत्र सा संसिद्धिमुपेयुषी ॥ ३१ ॥
तस्यास्तद्योगविधुतं आर्त्यं मर्त्यमभूत्सरित् ।
स्रोतसां प्रवरा सौम्य सिद्धिदा सिद्धसेविता ॥ ३२ ॥
वीरवरा! जिथे सिद्धी तिजला प्राप्त जाहली ।
‘सिद्धपद’ त्रिलोकात क्षेत्र विख्यात स्थान ते ॥ ३१ ॥
साधुस्वभाव विदुरा शुद्ध ती जाहली तने ।
प्रगटे नदिच्या रुपे सिद्ध ते तीर्थ सेविती ॥ ३२ ॥

वीर - ही वीरा विदुरा - यत्र - ज्या ठिकाणी - सा - ती देवहूती - ससिद्धिम् - सिद्धीला - उपेयुषी - प्राप्त झाली - तत् - ते - नाम्ना - नावाने - सिद्धपदम् - सिद्धपद असे - त्रैलोक्यविश्रुतम् - त्रैलोक्यात प्रसिद्ध असे - पुण्यतमम् - अत्यंत पुण्यकारक असे - क्षेत्रम् - क्षेत्र - आसीत् - झाले - सौम्य - हे गंभीर विदुरा - तस्याः - त्या देवहूतीचे - तत - ते - योगविधूतमार्त्यम् - योगाने लीन झाले आहेत देहसंबंधी मल ज्याचे असे - मर्त्यम् - शरीर - स्त्रोतसाम् - नद्यांमध्ये - प्रवरा - श्रेष्ठ अशी - सिद्धसेविता - सिद्धांनी सेविलेली अशी - सिद्धिदा - सिद्ध देणारी अशी - सरित् - नदी - अभूत - झाले. ॥३१-३२॥
वीरवर, ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली, ते परम पवित्र क्षेत्र त्रैलोक्यात ‘सिद्धपद’ (सिद्धपूर) नावाने प्रख्यात झाले. (३१) विदुरा, योगसाधनेने तिच्या शरीराचा सर्व मळ नाहीसा झाला आणि एका नदीच्या रूपात परिणत झाला, तीच सिद्धगणांकडून सेवन केली जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी श्रेष्ठ नदी ठरली. (३२)


कपिलोऽपि महायोगी भगवान् पितुराश्रमात् ।
मातरं समनुज्ञाप्य प्राग् उदीचीं दिशं ययौ ॥ ३३ ॥
सिद्धचारण गन्धर्वैः मुनिभिश्च अप्सरोगणैः ।
स्तूयमानः समुद्रेण दत्तार्हणनिकेतनः ॥ ३४ ॥
आस्ते योगं समास्थाय साङ्ख्याचार्यैरभिष्टुतः ।
त्रयाणामपि लोकानां उपशान्त्यै समाहितः ॥ ३५ ॥
मातेची घेउनी आज्ञा भगवान्‌ कपिलो मुनी ।
पित्राश्रमास सोडोनी गेले ईशान्यकोनि ते ॥ ३३ ॥
तिथे स्वयं समुद्राने पूजुनी स्थान त्या दिले ।
जगासी शांती देण्याला योगात स्थित राहिले ॥ ३४ ॥
स्दिध चारण गंधर्व मुनी नी अप्सरागण ।
स्तविती विदुरा तुम्ही पुसले तेचि बोलले ॥ ३५ ॥

महायोगी - श्रेष्ठ योगी असा - भगवान् कपिलः अपि - भगवान् कपील मुनीदेखील - मातरम् - मातेची - समनुज्ञाप्य - अनुज्ञा घेऊन - पितुः - पित्याच्या - आश्रमात् - आश्रमातून - प्रागुदीचीम् - पूर्व व उत्तर या दोन दिशांच्यामध्ये असलेल्या अशा - दिशम् - ईशान्य दिशेला - ययौ - गेला - सिद्धचारणगन्धर्वैः - सिद्ध, चारण व गंधर्व यांनी - मुनिभिः - ऋषींनी - च - आणि - अप्सरोगणै - अप्सरांच्या समुदायांनी - स्तूयमानः - स्तुति केलेला - समुद्रेण - समुद्राने - दत्तार्हणनिकेतनः - दिली आहेत पूजा व स्थान ज्याला असा. ॥३३-३४॥ सांख्याचार्यैः - सांख्यशास्त्राच्या तत्त्वज्ञान्यांनी
महायोगी भगवान कपिलसुद्धा मातेची आज्ञा घेऊन पित्याच्या आश्रमातून ईशान्य दिशेकडे निघून गेले. (३३) तेथे स्वतः समुद्राने त्यांचे पूजन करून त्यांना स्थान दिले. ते तिन्ही लोकांना शांती प्रदान करण्यासाठी योगमार्गाचा अवलंब करून समाधीमध्ये स्थिर झाले. सिद्ध, चारण, गंधर्व, मुनी आणि अप्सरागण त्यांची स्तुती करतात. तसेच सांख्याचार्य सुद्धा त्यांचे सर्व प्रकरे स्तवन करीत असतात. (३४-३५)


एतन्निगदितं तात यत्पृष्टोऽहं तवानघ ।
कपिलस्य च संवादो देवहूत्याश्च पावनः ॥ ३६ ॥
विदुरा ! मज पुसिले म्हणोनि तुज बोललो । कपील देवहूतीचा जो संवाद पवित्र तो ॥ ३६ ॥

अनघ तात - हे निष्पाप विदुरा - यत् - जे - तव - तुजकडून - अहम् - मी - पृष्टः - विचारिला गेलो - एतत् - हे - निगदितम् - सांगितले - च - आणि - कपिलस्य - कपिल मुनीचा - च - आणि - देवहूत्याः - देवहूतीचा - पावनः - पवित्र असा - संवादः - संवाद - निगदितः - सांगितला. ॥३६॥
हे निष्पाप विदुरा, तू विचारल्यावरून तुला हा कपिल आणि देवहूतीचा परम पवित्र संवाद ऐकविला. (३६)


य इदमनुशृणोति योऽभिधत्ते
     कपिलमुनेर्मतं आत्मयोगगुह्यम् ।
भगवति कृतधीः सुपर्णकेतौ
     उपलभते भगवत् पदारविन्दम् ॥ ३७ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां
तृतीयस्कंधे कापिलेयोपाख्याने त्रयस्त्रिंशोऽध्यायः ॥ ३३ ॥
॥ तृतीयः स्कंधः समाप्तः ॥
(पुष्पिताग्रा)
कपिल मुनि पवित्र योग गूढ
    करि नित जो श्रवणो कथी हि लोकां ।
गरुडध्वज कृपेचि युक्त होतो
    हरिपद शीघ्रचि प्राप्तहि तो करीतो ॥ ३७ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥
॥ तेहतिसावा अध्याय हा ॥ ३ ॥ ३३ हरिः ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥
॥ तिसरा स्कंध समाप्त ॥

सुपर्णकेतौ - गरुड आहे ध्वजाच्या ठिकाणी ज्याच्या अशा - भगवति - श्रीहरीच्या ठिकाणी - कृतधीः - केलेली आहे बुद्धि ज्याने असा - यः - जो पुरुष - इदम् - ह्या - आत्मयोगगुह्यम् - आत्मज्ञानाचे रहस्यरूप अशा - कपिलमुनेः - कपिल मुनीच्या - मतम् - मताला - अनुश्रृणीति - श्रवण करतो - वा - किंवा - यः - जो - अभिधत्ते - कथन करितो - सः - तो - भववत्पदारविन्दम् - भगवन्ताच्या चरणकमलाला - उपलभते - प्राप्त करून घेतो. ॥३७॥
हे कपिलदेवांचे मत अध्यात्मयोगाचे गूढ रहस्य आहे. जो पुरुष याचे श्रवण किंवा वर्णन करतो, तो भगवान गरुडध्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच श्रीहरींच्या चरणारविंदांना प्राप्त करतो. (३७)


स्कंध तिसरा - अध्याय तेहतिसावा समाप्त

GO TOP