![]()  | 
|  
 
श्रीमद् भागवत पुराण  
धूर्मार्चिराख्यमार्गद्वयगतानां विभिन्नगतिः,  
धूममार्ग आणि अर्चिरादी मार्गाने जाणार्यांच्या  संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
कपिल उवाच -  
अथ यो गृहमेधीयान् धर्मानेवावसन्गृहे । काममर्थं च धर्मान् स्वान् दोग्धि भूयः पिपर्ति तान् ॥ १ ॥ स चापि भगवद्धर्मात् काममूढः पराङ्मुखः । यजते क्रतुभिर्देवान् पितॄंश्च श्रद्धयान्वितः ॥ २ ॥ 
भगवान कपिलदेव म्हणाले -  ( अनुष्टुप् ) माते जो घरि राहोनी सकाम भाव योजुनी । फळ जे कामअर्थी ते भोगितो नि अनुष्ठितो ॥ १ ॥ विन्मूख भगवद्धर्मी राहोनी यज्ञही करी । श्रद्धेने देवता आणि पितरासीच पूजितो ॥ २ ॥ 
अथ -  परंतु - यः -  जो - गृहे एव -  घरातच - आवसन् -  रहाणारा - गृहमेधीयान् धर्मान् -  गृहस्थाच्या धर्मांना - आचरन् -  आचरणारा - स्वान् धर्मान् -  आपल्या धर्मांना - कामम् अर्थं च दोग्धि -  दोहून त्यांपासून भोग आणि ऐश्वर्य प्राप्त करून घेतो - सः -  तो - तान् -  त्या धर्मांना - भूयः -  पुनः  - पिपर्ति -  भरतो ॥१॥  सः च अपि -  आणि तो - काममूढः -  भोग्य वस्तूंनी टाकिलेला - भगवद्धर्मा -  भागवतधर्मापासून - पराङ्मुखः -  परावृत्त झालेला - श्रद्धया अन्वितः -  श्रद्धेने युक्त असा - देवान् पितृन् च -  देवांना आणि पितरांना - क्रतुभि -  यज्ञांच्या योगाने - यजते -  पूजितो ॥२॥ 
 
श्रीकपिल म्हणतात- हे माते, जो पुरुष घरातच राहून सकामभावाने गृहस्थ धर्माचे पालन करतो आणि त्याचे फळ म्हणून अर्थ आणि काम यांचा उपभोग घेऊन पुन्हा पुन्हा तेच करीत राहातो, तो निरनिराळ्या कामनांनी मोहित झाल्याकारणाने भगवद्धर्मापासून विन्मुख होतो आणि श्रद्धेने यज्ञांनी देव आणि पितर यांचीच आराधना करीत राहातो. (१-२) 
 
तत् श्रद्धया क्रान्तमतिः पितृदेवव्रतः पुमान् । 
गत्वा चान्द्रमसं लोकं सोमपाः पुनरेष्यति ॥ ३ ॥ 
त्याची बुद्धी तशा श्रद्धे देव पित्रां उपासिते ।  तो जातो चंद्रलोकात सोम पीऊनि ये पुन्हा ॥ ३ ॥ 
तच्छ्रद्धया -  त्या श्रद्धेमुळे - आक्रान्तमतिः -  व्याप्त झालेली आहे बुद्धि ज्याची असा - पितृदेवव्रतः -  पितर आणि देव यांचीच व्रते आचरणारा - सोमपाः -  सोमपान करणारा - पुमान् -  पुरुष - चांद्रमसं लोकं गत्वा -  चंद्राच्या लोकास जाऊन - पुनः एष्यति -  पुनः मृत्युलोकावर येईल ॥३॥ 
 
त्याची बुद्धी त्याच प्रकारच्या श्रद्धेशी निगडित राहाते. देव आणि पितर हेच त्याचे उपास्य होत. म्हणून तो चंद्रलोकात जाऊन सोमपान करतो आणि पुन्हा पुण्य क्षीण झाल्यावर या लोकात परत येतो. (३) 
 
यदा चाहीन्द्रशय्यायां शेतेऽनन्तासनो हरिः । 
तदा लोका लयं यान्ति ते एते गृहमेधिनाम् ॥ ४ ॥ 
प्रलयी शेषशायीत गृहस्थाश्रमिया तदा ।  लाभला जरि तो लोक लीन होणेचि लागते ॥ ४ ॥ 
यदा च -  आणि तेव्हा - अनंतासनः हरिः -  शेष आहे आसन ज्याचे असा भगवान विष्णु - अहीन्द्रशय्यायाम् -  शेषशय्येवर - शेते -  शयन करतो  - तदा -  तेव्हा - गृहमेधिनाम् -  गृहस्थाश्रमी पुरुषांचे - ते एते लोकाः -  ते हे चंद्रादि लोक - लयं यांति -  लय पावतात ॥४॥ 
 
ज्यावेळी प्रलयकाळात शेषशायी भगवान शेषशय्येवर शयन करतात, त्यावेळी गृहस्थाश्रमातील सकाम लोकांना प्राप्त होणारे हे सर्व लोकही लयाला जातात. (४) 
 
ये स्वधर्मान्न दुह्यन्ति धीराः कामार्थहेतवे । 
निःसङ्गा न्यस्तकर्माणः प्रशान्ताः शुद्धचेतसः ॥ ५ ॥ निवृत्तिधर्मनिरता निर्ममा निरहङ्कृताः । स्वधर्माप्तेन सत्त्वेन परिशुद्धेन चेतसा ॥ ६ ॥ सूर्यद्वारेण ते यान्ति पुरुषं विश्वतोमुखम् । परावरेशं प्रकृतिं अस्योत्पत्त्यन्तभावनम् ॥ ७ ॥ 
विवेकी धर्म अर्थाला विलासीं नच घेतसे ।  परी त्या भगवंताच्या प्रसन्ने योजितो तसा ॥ ५ ॥ निवृत्त धर्मपाळी जो अहंता गर्व सोडुनी । स्वधर्मरुप सत्वाने शुद्ध चित्तचि पावतो ॥ ६ ॥ अंती जो सूर्यमार्गाने मिळतो पूर्ण पूरुषा । नियंता निर्मिता त्राता संहार करि त्याजला ॥ ७ ॥ 
ये धीराः -  जे धैर्यशाली पुरुष - निःसंगाः -  वैराग्यशाली - न्यस्तकर्माणः -  टाकिली आहेत कर्मे ज्यांनी असे  - प्रशांताः -  अत्यंत शांत असे - शुद्धचेतसाः -  शुद्ध आहे अंतःकरण ज्याचे असे - निवृत्तिधर्मनिरताः -  निवृत्तिधर्मात अत्यंत रमलेले  - निर्ममाः -  टाकिले आहे विषयावरील माझेपण ज्यांनी असे - निरहंकृताः -  अहंकाररहित - कामार्थहेतवे -  भोग्य वस्तु आणि संपत्ती यांच्या इच्छेने - स्वधर्मान् न दुह्यन्ति -  आपल्या धर्माचे दोहन करीत नाहीत - ते -  ते  - स्वधर्माख्येन सत्त्वेन -  आपला धर्म हेच बल त्याच्या योगाने - परिशुद्धेन चेतसा -  अत्यंत शुद्ध झालेल्या चित्तामुळे - सूर्यव्दारेण -  सूर्यरूप व्दाराने - विश्वतोमुखम् -  सर्वत्र मुखे आहेत ज्याला अशा - परावरेशम् -  स्थावर आणि जंगम अशा सर्व सृष्टीचा नियंता अशा - अस्य प्रकृतिम् -  या जगाचे साहित्यरूप कारण अशा - उत्पत्त्यन्तभावनम् -  उत्पत्ति व लय करणार्या अशा - पुरुषं -  पुरुषाप्रत - यांति -  जातात ॥५-६-७॥ 
 
जे विवेकी मनुष्य आपल्या धर्मांचा अर्थ आणि भोगासाठी उपयोग करीत नाहीत, तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच त्यांचे पालन करतात, ते अनासक्त, प्रशांत, शुद्धचित्त, निवृत्तिधर्मपरायण, ममतारहित आणि अहंकारशून्य पुरुष स्वधर्मपालनरूप सत्त्वगुणामुळे पूर्णपणे शुद्धचित्त होतात. (५-६) ते शेवटी सूर्यमार्गाने(अर्चिमार्ग किंवा देवयान मार्ग) सर्वव्यापी कार्यकारणरूप जगाचा नियंता, संसाराचे उपादान-कारण आणि त्याची उत्पत्ती, पालन व संहार करणार्या पूर्णपुरुषालाच प्राप्त होतात. (७) 
 
द्विपरार्धावसाने यः प्रलयो ब्रह्मणस्तु ते । 
तावद् अध्यासते लोकं परस्य परचिन्तकाः ॥ ८ ॥ 
परमात्म रुपे सेवी हिरण्यगर्भरुप जो ।  राही तो सत्यलोकात द्विपरार्ध निवांतची ॥ ८ ॥ 
तु -  अपि - व्दिपरार्धावसाने -  दोन परार्धांच्या शेवटी  - ब्रह्मणः -  ब्रह्मदेवाचा - यः प्रलयः -  जो प्रलय - भवति -  होतो - तावत् -  तोपर्यंत - ते -  ते - परचिंतकाः -  परमेश्वराचे ध्यान करणारे - परस्य लोकं -  ब्रह्मदेवाच्या लोकात - अध्यासते -  रहातात ॥८॥ 
 
जे लोक परमात्मदृष्टीने हिरण्यगर्भाची उपासना करतात, ते दोन परार्धांनी होणार्या ब्रह्मदेवाच्या प्रलयापर्यंत त्यांच्या सत्यलोकातच राहातात. (८) 
 
क्ष्माम्भोऽनलानिलवियन् मनैन्द्रियार्थ  
भूतादिभिः परिवृतं प्रतिसञ्जिहीर्षुः । अव्याकृतं विशति यर्हि गुणत्रयात्मा कालं पराख्यमनुभूय परः स्वयम्भूः ॥ ९ ॥ एवं परेत्य भगवन् तमनुप्रविष्टा ये योगिनो जितमरुन्मनसो विरागाः । तेनैव साकममृतं पुरुषं पुराणं ब्रह्म प्रधानमुपयान्ति अगताभिमानाः ॥ १० ॥ 
(वसंततिलका )  भोगोनि आयु अपुली मग ब्रह्मजी तो भूतेंद्रियो विषयऽहंकर आदि सर्व । संहारण्या जधि मनी करि निश्चयाते तै त्रैगुणाप्रकृतिने हरिलीन होतो ॥ ९ ॥ जे जिंकिती मुनि मना तनु त्यागुनीया ब्रह्मामध्येच शिरती परमात्मरुपी । होण्यास लीन पुरुषीं भगवंतरुपी गर्वो असे म्हणुनि सद्य न होत लीन ॥ १० ॥ 
यर्हि -  जेव्हा - क्ष्मांऽभोऽनलानिलवियन् -  पृथ्वी, उदक, अग्नि, वायु, आकाश, - मनइंद्रियार्थभूतादिभिः -  मन, इंद्रिये, शब्दादि विषय, अहंकार इत्यादिकांनी - परिवृतं -  युक्त अशा - ब्रह्मांडं -  ब्रह्मांडाला - प्रतिसंजिहीर्षुः -  आवरून घेण्याची इच्छा करणारा - गुणत्रयात्मा -  त्रिगुणात्मक असा - परः स्वयंभूः -  श्रेष्ठ ब्रह्मदेव - पराख्यं कालं अनुभूय -  परार्धनामक कालाचा अनुभव घेऊन - अव्याकृतं विशति -  अव्यक्त अशा ईश्वरस्वरूपात प्रविष्ट होतो ॥९॥ एवं -  याप्रमाणे - परेत्य -  दूरवर जाऊन - भगवंतम् अनुप्रविष्टाः -  भगवंताचे ध्यान करीत असलेले - जितमरुन्मनसः -  प्राण आणि मन यांवर विजय संपादन केलेले - विरागाः -  विषयावरील आसक्तीचा त्याग केलेले - ये योगिनः -  जे योगी आहेत ते - तेन एव साकम् -  त्या ब्रह्मदेवासह - अगताभिमानाः -  पूर्वी गेलेला नाही अहंकार ज्यांचा असे - अमृतं ब्रह्म -  अमृत व ब्रह्मस्वरूपी अशा - प्रधानम् पुराणं पुरुषं -  श्रेष्ठ पुराणपुरुषाला - उपयांति -  जाऊन पोचतात ॥१०॥ 
 
ज्यावेळी देवतांपेक्षाही श्रेष्ठ ब्रह्मदेव आपल्या दोन परार्ध कालपर्यंत अधिकार भोगून पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, इंद्रिये, त्यांचे विषय आणि अहंकारादिसहित संपूर्ण विश्वाचा संहार करण्याच्या इच्छेने त्रिगुणात्मक प्रकृतीबरोबर एकरूप होऊन निर्विशेष परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो, त्यावेळी प्राण आणि मन यांना जिंकलेले ते विरक्त योगीजनसुद्धा देहाचा त्याग करून त्या भगवान ब्रह्मदेवातच प्रवेश करतात. आणि पुन्हा त्यांच्याच बरोबर परमानंदस्वरूप पुराणपुरुष परब्रह्मामध्ये लीन होऊन जातात. त्याअगोदर ते भगवंतात लीन होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये अहंकार शिल्लक असतो. (९-१०) 
 
(अनुष्टुप्)  
अथ तं सर्वभूतानां हृत्पद्मेषु कृतालयम् । श्रुतानुभावं शरणं व्रज भावेन भामिनि ॥ ११ ॥ 
( अनुष्टुप् )  माताजी म्हणुनी तुम्ही अत्यंत भक्तियुक्त त्या । श्रीहरीशरणीं जावे सर्वांच्या ह्रदि तो वसे ॥ ११ ॥ 
अथ -  यास्तव - सर्वभूतानां -  सर्व प्राण्यांच्या  - हृत्पद्मेषु -  हृदयरूपी कमलात - कृतालयम् -  केले आहे घर ज्याने अशा - श्रुतानुभावं -  ऐकिला आहे पराक्रम ज्याचा अशा - तं -  त्या आदिपुरुषाला - भामिनि -  हे तेजस्वी माते - भावेन शरणं व्रज -  भक्तीने शरण जा ॥११॥ 
 
म्हणून हे माते, आता तूसुद्धा अत्यंत भक्तिभावाने समस्त प्राण्यांच्या हृदयकमलांत असणार्या त्या श्रीहरींच्याच चरणांना शरण जा. तूसुद्धा माझ्याकडून त्यांचा प्रभाव ऐकलाच आहेस. (११) 
 
आद्यः स्थिरचराणां यो वेदगर्भः सहर्षिभिः । 
योगेश्वरैः कुमाराद्यैः सिद्धैर्योगप्रवर्तकैः ॥ १२ ॥ भेददृष्ट्याभिमानेन निःसङ्गेनापि कर्मणा । कर्तृत्वात्सगुणं ब्रह्म पुरुषं पुरुषर्षभम् ॥ १३ ॥ स संसृत्य पुनः काले कालेनेश्वरमूर्तिना । जाते गुणव्यतिकरे यथापूर्वं प्रजायते ॥ १४ ॥ 
वेदगर्भ असा ब्रह्मा मरीची आदि ते ऋषी ।  योगी नी सनकादीक सिद्ध निष्कामकर्मि जे ॥ १२ ॥ कर्माने भजती आदी पुरुष गुण ब्रह्म ते । पावती भेददृष्टीने कर्तृत्व गर्व कारणे ॥ १३ ॥ सर्गकाल पुन्हा येता काळाच्या प्रेरणा गुणीं । क्षोभ होवोनि काळाचा येती या लोकि जन्मुनी ॥ १४ ॥ 
यः -  जो - स्थिरचराणां -  स्थावरजंगम सृष्टीच्या - आद्यः -  प्रारंभी असलेला - वेदगर्भः -  वेद आहेत गर्भात ज्याच्या असा ब्रह्मदेव - ऋषिभिः योगेश्वरैः -  ऋषि व मोठे मोठे योगी असे - योगप्रवर्तकैः कुमोराद्यैः सिद्धैः सह -  जे सनत्कुमारादि योगप्रवर्तक सिद्ध पुरुष त्यासह ॥१२॥ कर्तृत्वात् -  सृष्टीच्या कर्तेपणामुळे - भेददृष्ट्या -  भेदबुद्धीच्या योगाने - अभिमानेन -  अहंकारामुळे - निःसंगेन कर्मणा अपि -  निष्काम कर्माचे आचरण केलेले असूनही - सगुणं ब्रह्म -  सगुण ब्रह्मरूपी अशा - पुरुषर्षभम् पुरुषम् -  पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा पुरुषाला ॥१३॥ संसृत्य -  प्राप्त होऊन - पुनः -  फिरून - ईश्वरमूर्तिना कालेन -  ईश्वरस्वरूपी काळामुळे - गुणव्यतिकरे जाते -  तीन गुणांचे परस्पर मिश्रण झाले असता - यथापूर्वं प्रजायते -  पूर्वी प्रमाणे जन्मास येतो ॥१४॥ 
 
वेदांचे अंतरंग जाणणारे, सर्व स्थावर-जंगम प्राण्यांचे आदिकारण ब्रह्मदेवसुद्धा मरीची आदी ऋषी, योगेश्वर, सनकादिक तसेच योगप्रवर्तक सिद्धांसहित निष्काम कर्मांमुळे आदिपुरुष पुरुषश्रेष्ठ सगुण ब्रह्माला प्राप्त होऊनसुद्धा भेददृष्टी आणि कर्तृत्वाभिमान यांमुळे भगवद्-इच्छेने, जेव्हा सृष्टी उत्पन्न होण्याची वेळ येते, तेव्हा कालरूप ईश्वराच्या प्रेरणेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा पूर्ववत प्रगट होतात. (१२-१४) 
 
ऐश्वर्यं पारमेष्ठ्यं च तेऽपि धर्मविनिर्मितम् । 
निषेव्य पुनरायान्ति गुणव्यतिकरे सति ॥ १५ ॥ 
ब्रह्मलोकास भोगोनी पूर्वोक्त ऋषि सर्व ते ।  हरीच्छेने गुणी क्षोभ होता या लोकि पावती ॥ १५ ॥ 
ते च अपि -  आणि ते सुद्धा - धर्मविनिनिर्मितम् पारमेष्ठ्यं ऐश्वर्यं -  स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त झालेल्या ब्रह्मलोकातील ऐश्वर्याला - निषेव्य -  भोगून - गुणव्यतिकरे सति -  गुणांचे मिश्रण होऊ लागले असता - पुनः आयांति -  फिरून जन्मास येतात ॥१५॥ 
 
अशा प्रकारे पूर्वोक्त ऋषीसुद्धा आपापल्या कर्मानुसार ब्रह्मलोकाचे ऐश्वर्य उपभोगून भगवद्-इच्छेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा या लोकात जन्म घेतात. (१५) 
 
ये त्विहासक्तमनसः कर्मसु श्रद्धयान्विताः । 
कुर्वन्ति अप्रतिषिद्धानि नित्यान्यपि च कृत्स्नशः ॥ १६ ॥ रजसा कुण्ठमनसः कामात्मानोऽजितेन्द्रियाः । पितॄन् यजन्ति अनुदिनं गृहेष्वभिरताशयाः ॥ १७ ॥ 
श्रद्धेने करि जो कर्म आसक्त येथे राहुनी ।  काम्य नी नित्यकर्मांना सांगोपांग अनुष्ठिती ॥ १६ ॥ आधिक्ये रजवृत्तीच्या त्याची बुद्धीहि थांबते । हृदयी पसरे मोह पितरे नित्य पूजितो ॥ १७ ॥ 
ये तु इह -  पण जे या जगात - कर्मसु आसक्तमनसः -  कर्मावर आसक्त आहे मन ज्याचे असे - श्रद्धया अन्विताः -  श्रद्धेने युक्त असे - अप्रतिषिद्धानि -  ज्यांचा शास्त्राने निषेध केलेला नाही अशी काम्य - अपि च नित्यानि कर्माणि -  तशीच आणखी नित्य कर्मे - कृत्स्त्रशः -  सर्वतोपरी - कुर्वन्ति -  करितात ॥१६॥ रजसा कुठण्मनसः -  रजोगुणाने व्याकुळ झाले आहे चित्त ज्याचे असे - कामात्मानः -  भोगावर आसक्ती ठेवणारे - अजितेंद्रियाः -  इंद्रियांचा निग्रह न केलेले - अनुदिनम् -  प्रतिदिवशी - गृहेषु अभिरताशयाः -  घराच्या ठिकाणी अनुरक्त आहे मन ज्यांचे असे - पितृन् यजंति -  पितरांची उपासना करतात ॥१७॥ 
 
जे या लोकात कर्मांमध्ये आसक्त राहून श्रद्धेने वेदात सांगितलेल्या काम्य आणि नित्य कर्मांचे सांगोपांग अनुष्ठान करतात, रजोगुणामुळे ज्याची बुद्धी (विवेकाविषयी) कुंठित होते, ज्यांच्या हृदयामध्ये कामना असतात, आणि इंद्रिये ज्यांच्या स्वाधीन नसतात, ते आपल्या घरातच आसक्त होऊन नेहमी पितरांची पूजा करतात. (१६-१७) 
 
त्रैवर्गिकास्ते पुरुषा विमुखा हरिमेधसः । 
कथायां कथनीयोरु विक्रमस्य मधुद्विषः ॥ १८ ॥ 
धर्मार्थ काम आसक्त अत्यंत कीर्तनीय त्या ।  श्रीहरी भगवंताच्या कथेसी मुकतो पहा ॥ १८ ॥ 
ते त्रैवर्गिकाः पुरुषाः -  ते धर्म, अर्थ आणि काम यांनाच मानणारे पुरुष - हरिमेधसः -  संसार नष्ट करणारी आहे बुद्धि ज्यांची अशा - कथनीयोरुविक्रमस्य -  वर्णन करण्यासारखा आहे मोठा पराक्रम ज्याचा अशा - मधुव्दिषः -  भगवान् मधुसूदनाच्या - कथायाम् विमुखाः -  कथांपासून पराङ्मुख - भवंति -  होतात ॥१८॥ 
 
हे लोक धर्म, अर्थ, आणि काम यांमध्येच आसक्त असतात. म्हणून ज्यांचे महान पराक्रम अत्यंत कीर्तनीय आहेत, त्या भवभयहारी श्रीमधुसूदन भगवंतांच्या कथांविषयी विन्मुखच असतात. (१८) 
 
नूनं दैवेन विहता ये चाच्युतकथासुधाम् । 
हित्वा शृण्वन्ति असद्गाथाः पुरीषमिव विड्भुजः ॥ १९ ॥ 
हाय सूकर कुत्र्यास आवडे भोज नर्क तो ।  तसा हा सोडुनी वार्ता सेवी विषय निंद्य ते ॥ मोठे दुर्भाग्य त्याचे ते देवाने मारिले तया ॥ १९ ॥ 
च -  आणि - नूनं -  खरोखर - ते -  ते - दैवेन विहताः -  दैवाने नष्ट केलेले - ये -  जे - अच्युतकथासुधां हित्त्वा -  भगवंताच्या कथारूपी अमृताचा त्याग करून  - विङ्भुजः पुरीषम् इव -  विष्ठा भक्षिणार्या डुकरांप्रमाणे - असदाथाः शृण्वन्ति -  अकल्याण करणार्या गोष्टी ऐकतात ॥१९॥ 
 
विष्ठा खाणारी कुत्री-डुकरे इत्यादी जशी विष्ठेचीच अपेक्षा करतात, त्याप्रमाणे जे मनुष्य भगवत्कथामृत सोडून निंदनीय विषय-वार्ताच ऐकतात, ते निश्चितच दुर्दैवी होत. (१९) 
 
दक्षिणेन पथार्यम्णः पितृलोकं व्रजन्ति ते । 
प्रजामनु प्रजायन्ते श्मशानान्तक्रियाकृतः ॥ २० ॥ 
दक्षीणमार्गि जे जाती पितृलोकात पावती ।  फिरुनी आपुल्या वंशी जन्मती धूममार्गिते ॥ २० ॥ 
अर्यम्णः दक्षिणेन पथा -  सूर्याच्या दक्षिणेकडील मार्गाने - ते पितृलोकं व्रजन्ति -  ते पितृलोकाला जातात - च -  आणि - ततः -  तेथून - श्मशानांतक्रियाकृतः -  और्ध्वदेहिक संस्कारापर्यंत सर्व कर्मे करणारे - प्रजाम् अनु -  आपल्या पुत्रादिकांच्या वंशात  - प्रजायंते -  जन्म घेतात ॥२०॥ 
 
गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार करणारे हे लोक दक्षिण दिशेकडील पितृयान किंवा धूममार्गाने पितरांचे ईश्वर असणार्या अर्यमाच्या लोकात जातात आणि पुन्हा आपल्याच संततीच्या वंशामध्ये उत्पन्न होतात. (२०) 
 
ततस्ते क्षीणसुकृताः पुनर्लोकमिमं सति । 
पतन्ति विवशा देवैः सद्यो विभ्रंशितोदयाः ॥ २१ ॥ 
माते! ते पितृलोकात भोगाने पुण्य क्षेय तो ।  होताचि देवता त्याला लोटिती पृथिवीस की ॥ २१ ॥ 
ततः -  मग - क्षीणसुकृताःते -  संपले आहे पुण्य ज्याचे असे ते - सति -  हे साध्वी - विवशाः -  निःसहाय असे - देवैः विभ्रंशितोदयः -  देवांनी नष्ट केले आहे ऐश्वर्य ज्याचे असे - सद्यः -  तत्काळ  - पुनः इमं लोकं पतंति -  फिरून या मृत्युलोकात येऊन पडतात ॥२१॥ 
 
हे माते, पितृलोकातील भोग भोगल्यानंतर जेव्हा यांचे पुण्य क्षीण होते, तेव्हा देवता त्यांना तेथील ऐश्वर्यापासून दूर करतात आणि पुन्हा त्यांना लाचार होऊन ताबडतोब याच लोकात येऊन पडावे लागते. (२१) 
 
तस्मात्त्वं सर्वभावेन भजस्व परमेष्ठिनम् । 
तद्गुणाश्रयया भक्त्या भजनीयपदाम्बुजम् ॥ २२ ॥ 
तेंव्हा तू सर्वभावाने भजावे चरणांबुजा ।  भगवान् आश्रयो देतो सर्वांगे भज तू तया ॥ २२ ॥ 
तस्मात् -  या कारणास्तव - त्वं -  तू - सर्वभावेन -  एकनिष्ठ प्रेमाने - तहुणाश्रयया भक्त्या -  त्या भगवंताच्या गुणांचा आश्रय करणार्या भक्तीने - भजनीयपदांबुजम् -  भजन करण्याला योग्य असे आहे चरणकमल ज्याचे अशा - परमेष्ठिनं -  परम श्रेष्ठ भगवंताला - भजस्व -  भज ॥२२॥ 
 
म्हणून हे माते, ज्यांचे चरणकमल नेहमी भजन-पूजन करण्यायोग्य आहेत, त्या भगवंतांचेच तू त्यांच्या गुणांचा आश्रय करणार्या भक्तीने सर्वभावाने भजन कर. (२२) 
 
वासुदेवे भगवति भक्तियोगः प्रयोजितः । 
जनयत्याशु वैराग्यं ज्ञानं यद्ब्रह्मदर्शनम् ॥ २३ ॥ 
भगवान् वासुदेवाचा भक्तियोग प्रयोजिता ।  त्वरीत होय वैराग्य साक्षात्कारचि होतसे ॥ २३ ॥ 
भगवति वासुदेवे -  भगवान वासुदेवाच्या ठिकाणी - प्रयोजितः भक्तियोगः -  योजिलेला भक्तियोग - वैराग्यं -  विरक्तपणा - ब्रह्मदर्शनं यत् ज्ञानं -  ब्रह्माचा साक्षात्कार करून देणारे असे जे ज्ञान ते - आशु -  त्वरित - जनयति -  उत्पन्न करितो ॥२३॥ 
 
भगवान वासुदेवांविषयीचा भक्तियोग ताबडतोब वैराग्य आणि ब्रह्मसाक्षात्काररूप ज्ञानाची प्राप्ती करून देतो. (२३) 
 
यदास्य चित्तमर्थेषु समेष्विन्द्रियवृत्तिभिः । 
न विगृह्णाति वैषम्यं प्रियं अप्रियमित्युत ॥ २४ ॥ स तदैवात्मनात्मानं निःसङ्गं समदर्शनम् । हेयोपादेय रहितं आरूढं पदमीक्षते ॥ २५ ॥ 
विषयो भगवद्रूप होतात सर्व सारिखे ।  म्हणोनी इंद्रिया द्वारा भक्त तो गुंतु ना शके ॥ २४ ॥ स्वीकार त्याग नी तैसे गुण-दोषविहीन तो । आत्म्यासी बघतो ब्रह्मसाक्षात्कार स्थितीमुळे ॥ २५ ॥ 
यदा -  जेव्हा - अस्य चित्तम् -  या भक्ताचे चित्त - अर्थेषु समेषु -  विषय सर्व सारखेच असता - इंद्रियवृत्तिभिः -  इंद्रियांच्या आवडीनुसार - इदं प्रियं उत (इदं) अप्रियम् इति -  हे प्रिय आणि हे अप्रिय असे - वैषम्यम् -  विषमभाव - न विगृह्णति -  धारण करीत नाही ॥२४॥ तदा एव -  तेव्हाच - सः -  तो - आत्मना -  शुद्ध केलेल्या अंतःकरणाच्या योगाने - निःसंगं -  गुणरहित अशा - समदर्शनम् -  सर्वत्र एकाच दृष्टीने पहाणार्या अशा 
 
जेव्हा इंद्रियांच्या वृत्तींमुळे भगवद्भक्ताचे चित्त सम राहून प्रिय-अप्रिय अशा विषमतेचा अनुभव करीत नाही, त्यावेळीच तो भक्त निःसंग, सर्वांमध्ये समान असणार्या, त्याग आणि ग्रहण यांनी रहित अशा ब्रह्मपदावर आपण आरूढ झाल्याचा साक्षात्कार करून घेतो. (२४-२५) 
 
ज्ञानमात्रं परं ब्रह्म परमात्मेश्वरः पुमान् । 
दृश्यादिभिः पृथग्भावैः भगवान् एक ईयते ॥ २६ ॥ 
परमात्मा परब्रह्म ज्ञानरुपचि तो असे ।  पुरुषैश्वर भगवान् स्वयं जीव शरीर ही ॥ इंद्रियादी रुपी भासे श्रीमद्भक्तीपरायण ॥ २६ ॥ 
ज्ञानमात्रं -  केवळ ज्ञानस्वरूपी  - परं -  परब्रह्म - दृश्यादिभिः -  दृश्य, द्रष्टा, दर्शन या - भावैः -  भावनांमुळे - ब्रह्म -  ब्रह्मा - परमात्मा -  परमात्मा - ईश्वरः -  ईश्वर - पुमान् -  पुरुष - भगवान् -  षड्गुणैश्वर्यसंपन्न - इति -  अशा रीतीने - ईयते -  वर्णिले जाते ॥२६॥ 
 
तोच ज्ञानस्वरूप, तोच परब्रह्म, तोच परमात्मा, तोच ईश्वर, तोच पुरुष, तोच एक भगवंत, स्वतः जीव, शरीर, विषय, इंद्रिये इत्यादी अनेक रूपांत प्रतीत होतो. (२६) 
 
एतावानेव योगेन समग्रेणेह योगिनः । 
युज्यतेऽभिमतो ह्यर्थो यद् असङ्गस्तु कृत्स्नशः ॥ २७ ॥ 
संसारी संपता आशा त्याला सर्वचि योग नी ।  योगाचे फळ ते सारे अभीष्ट प्राप्त जाहले ॥ २७ ॥ 
इह हि -  खरोखर या जगात - योगिनः -  योग्याला - समग्रेण योगेन -  सर्व प्रकारचा योगांनी - एतावान् एव -  एवढेच - अभिमतः अर्थः -  मान्य असे फळ - युज्यते -  प्राप्त होते - यत् -  जो - कृत्स्त्रशः तु -  अगदी सर्वस्वी - असंगः -  विषयासक्तीचा त्याग ॥२७॥ 
 
या संसाराविषयी आसक्तीचा संपूर्ण नाश होणे, हेच योग्यांच्या सर्व प्रकारच्या योगसाधनेचे एकमात्र इष्ट फळ आहे. (२७) 
 
ज्ञानमेकं पराचीनैः इन्द्रियैर्ब्रह्म निर्गुणम् । 
अवभात्यर्थरूपेण भ्रान्त्या शब्दादिधर्मिणा ॥ २८ ॥ 
निर्गुण ज्ञानरुपी जे ब्रह्म ते एकटे असे ।  इंद्रीय वृत्तिने भ्रांत विभिन्न वस्तु भासते ॥ २८ ॥ 
पराचीनैः इंद्रियैः -  बहिर्मुख अशा इंद्रियांच्या योगाने - एकं ज्ञानं निर्गुणम् ब्रह्म -  एकत्र ज्ञानस्वरूप आणि निर्गुण असे ब्रह्म - शब्दादिधर्मेण अर्थरूपेण -  शब्दादी विषय आहेत धर्म ज्यांचे अशा आकाशादि वस्तुरूपाने - भ्रांत्या -  भ्रमामुळे - अवभाति -  भासमान होते ॥२८॥ 
 
ब्रह्म एक आहे, ज्ञानस्वरूप आणि निर्गुण आहे, तरीसुद्धा ते बाहेर धावणार्या इंद्रियांमुळे भ्रमाने शब्द इत्यादी पदार्थांच्या रूपात भासते. (२८) 
 
यथा महान् अहंरूपः त्रिवृत् पञ्चविधः स्वराट् । 
एकादशविधस्तस्य वपुरण्डं जगद्यतः ॥ २९ ॥ 
परब्रह्म महत्तत्वे वैकारे पंचभूति ते ।  इंद्रीयरुप ते होता जीव त्यालाचि बोधिती ॥ जीवाची तनु ब्रह्मांड ब्रह्मरुपचि सानुले ॥ २९ ॥ 
यथा -  ज्याप्रमाणे - अहंरुपः महान् -  अहंकाररूपी महत्तत्त्व - त्रिवृत् -  त्रिगुणात्मक - पंचविधः -  पाच प्रकारे - एकादशविधः -  अकरा प्रकारचे - भाति -  भासते - स्वराट् -  स्वयंप्रकाश जीव - यतः -  ज्यामुळे - तस्य वपुः -  त्या जीवाचे शरीर - अंडं -  ब्रह्मांड - च -  आणि - जगत् -  जग - भाति -  भासतात - तथा ज्ञानं -  त्याप्रमाणे ज्ञान - शब्दादिरूपेण भाति -  शब्दादिकांच्या रूपाने भासमान होते ॥२९॥ 
 
ज्याप्रमाणे एकच परब्रह्म महत्तत्त्व, सात्त्विक, राजस, आणि तामस असा तीन प्रकारचा अहंकार, पंचमहाभूते आणि अकरा इंद्रिये या रूपांनी बनले आहे आणि तेच स्वयंप्रकाशी जीव आहे. त्याचप्रमाणे त्या जीवाचे शरीररूप हे ब्रह्मांडसुद्धा ब्रह्मच आहे. कारण ब्रह्मापासूनच याची उत्पत्ती झाली आहे. (२९) 
 
एतद्वै श्रद्धया भक्त्या योगाभ्यासेन नित्यशः । 
समाहितात्मा निःसङ्गो विरक्त्या परिपश्यति ॥ ३० ॥ 
श्रद्धा भक्ती नि वैराग्य योगाने चित्त योजिता ।  असंग बुद्धि ठेवी त्यां दिसते ब्रह्मरुप हे ॥ ३० ॥ 
वै -  खरोखर - एतत् -  हे ज्ञानरूप ब्रह्म - नित्यशः श्रद्धया भक्त्या -  भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा व भक्ति - योगाभ्यासेन -  आणि योगाभ्यास यांच्या नित्य आचरणाने - समाहितात्मा -  एकाग्र झाले आहे अंतःकरण ज्याचे अशा - निःसंगः -  विरक्त पुरुष - विरक्त्या परिपश्यति -  वैराग्याच्या योगानी पाहतो ॥३०॥ 
 
परंतु जो श्रद्धा, भक्ती आणि वैराग्य तसेच निरंतर योगाभ्यास यांमुळे एकाग्रचित्त आणि अनासक्त झालेला आहे, तोच याला ब्रह्मरूपात पाहू शकतो. (३०) 
 
इत्येतत्कथितं गुर्वि ज्ञानं तद्ब्रह्मदर्शनम् । 
येन अनुबुद्ध्यते तत्त्वं प्रकृतेः पुरुषस्य च ॥ ३१ ॥ 
वंदनीय तुला माते ज्ञानसाधन बोललो ।  ब्रह्मदर्शन ज्यां होई पुरुष बोध होत तै ॥ ३१ ॥ 
गुर्वि -  हे माते - इति एतत् -  असे हे - तत् -  ते - ब्रह्मदर्शनम् -  ब्रह्मसाक्षात्कार करून देणारे - ज्ञानम् -  ज्ञान - कथितम् -  सांगितले - येन -  ज्याच्या योगाने - प्रकृतेः पुरुषस्य च -  प्रकृति आणि पुरुष यांचे - तत्त्वम् -  वास्तविक स्वरूप - अनुबुध्यते -  जाणता येते ॥३१॥ 
 
हे पूजनीय माते, मी तुला हे ब्रह्मसाक्षात्काराचे साधनरूप ज्ञान ऐकविले. याच्याद्वारा प्रकृती आणि पुरुषाच्या यथार्थस्वरूपाचा बोध होतो. (३१) 
 
ज्ञानयोगश्च मन्निष्ठो नैर्गुण्यो भक्तिलक्षणः । 
द्वयोरप्येक एवार्थो भगवत् शब्दलक्षणः ॥ ३२ ॥ 
देवी निर्गुण तो योग नी भक्तीफळ सारखे ।  साधितो त्यासि मानावा भगवान् पृथिवीवरी ॥ ३२ ॥ 
नैर्गुण्यः -  निर्गुण ब्रह्मविषयक - ज्ञानयोगः -  ज्ञानयोग - च -  आणि - मन्निष्ठाः -  माझ्याविषयी निष्ठा ज्यात आहे असा - भक्तिलक्षणः (योगः) -  भक्तियोग - व्दयोः अपि -  या दोघांचाही - भगवच्छब्दलक्षणः -  भगवंताची प्राप्ति या स्वरूपाचा - एकः एव अर्थः -  एकच उद्देश आहे ॥३२॥ 
 
हे देवी, निर्गुण-ब्रह्मविषयक ज्ञानयोग आणि माझ्य़ाविषयीचा भक्तियोग, या दोन्हींचे फळ एकच आहे. त्यालाच भगवंत म्हणतात. (३२) 
 
यथेन्द्रियैः पृथग्द्वारैः अर्थो बहुगुणाश्रयः । 
एको नानेयते तद्वद् भगवान् शास्त्रवर्त्मभिः ॥ ३३ ॥ 
पदार्थ एकची होतो भिन्नत्व इंद्रिया गमे ।  तसे विभिन्न शास्त्राने भगवद्रूप जाणवे ॥ ३३ ॥ 
यथा -  ज्याप्रमाणे - पृथग्व्दारैः इंद्रियैः -  ज्यांची व्दारे निरनिराळी आहेत अशा इंद्रियांमुळे - बहुगुणाश्रयः -  अनेक गुणांचा आश्रय असलेला - एकः अर्थः -  एकच पदार्थ - नाना ईयते -  विविध रूपांनी प्रतीतीस येतो - तव्दत् -  त्याप्रमाणे - भगवान् -  परमेश्वर - एकः सन् अपि -  एक असूनही - (विविधैः) शास्त्रवर्त्मभिः -  निरनिराळ्या शास्त्रमार्गांच्या योगाने - पृथक् प्रतीयते -  निरनिराळा भासतो ॥३३॥ 
 
जसे रूप, रस, गंध इत्यादी अनेक गुणांचा आश्रय असणारा एकच पदार्थ भिन्न-भिन्न इंद्रियांच्याद्वारा विभिन्नरूपाने अनुभवास येतो, तसेच शास्त्राच्या वेगवेगळ्या मार्गांनी एकाच भगवंतांची अनेक प्रकारांनी अनुभूती येते. (३३) 
 
क्रियया क्रतुभिर्दानैः तपःस्वाध्यायमर्शनैः । 
आत्मेन्द्रियजयेनापि सन्न्यासेन च कर्मणाम् ॥ ३४ ॥ योगेन विविधाङ्गेन भक्तियोगेन चैव हि । धर्मेणोभयचिह्नेन यः प्रवृत्तिनिवृत्तिमान् ॥ ३५ ॥ आत्मतत्त्वावबोधेन वैराग्येण दृढेन च । ईयते भगवानेभिः सगुणो निर्गुणः स्वदृक् ॥ ३६ ॥ 
विभिन्न कर्म ते सारे यज्ञ दान तसे तप ।  मिमांसा वेदपाठो नी मन इंद्रिय संयम ॥ ३४ ॥ त्याग योग तसी भक्ती वृत्ती प्रवृत्ति आणि ते । निष्कामी नी सकामी हे दोन्हीही धर्म सारिखे ॥ ३५ ॥ सर्व या साधनां द्वारे सगुणी निर्गुणी रुपा । स्वयंप्रकाश भगवान् प्राप्त्यर्थ योजिले असे ॥ ३६ ॥ 
क्रियया -  लौकिक कर्मांनी - क्रतुभिः -  यज्ञादि वेदोक्त कर्मांनी - दानैः -  दानांनी - तपस्वाध्यायमर्शनैः -  तपश्चर्या आणि वेदाभ्यास यांच्या विचाराने - आत्मेन्द्रियजयेन अपि -  मन आणि इंद्रिये यांचे नियंत्रण करूनही - कर्मणां च संन्यासेन -  आणि कर्मांचा त्याग करून - विविधाङ्गेन योगेन -  यमनियमादि निरनिराळी अंगे असलेल्या योगाने - च एव हि भक्तियोगेन -  तसेच भक्तियोगाने - यः प्रवृत्तिनिवृत्तिमान् -  जो प्रवृत्ति आणि निवृत्ति या उभयस्वरूपांचा आहे त्या - उभयचिन्हेन धर्मेण -  उभयलक्षणी धर्माने - आत्मतत्त्वावबोधेन -  आत्मतत्त्वाच्या ज्ञानाने - दृढेन वैराग्येण च -  आणि तीव्र वैराग्याने - एभिः -  या साधनांनी - भगवान् -  परमेश्वर - सगुणः निर्गुणः -  सगुण असो की निर्गुण असो - स्वदृक् ईयते -  सारखाच प्रत्ययास येतो ॥३४-३६॥ 
 
अनेक प्रकारची कर्मे, यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन, वेदविचार, मन आणि इंद्रियांचा संयम, कर्मांचा त्याग, विविध अंगे असलेला योग, भक्तियोग, प्रवृत्तिमार्ग, आणि निवृत्तिमार्ग(असे) दोन्ही प्रकारचे धर्म, आत्मतत्त्वाचे ज्ञान आणि दृढ वैराग्य या सर्व साधनमार्गांनी सगुण-निर्गुणरूप स्वयंप्रकाश भगवंतालाच प्राप्त केले जाते. (३४-३६) 
 
प्रावोचं भक्तियोगस्य स्वरूपं ते चतुर्विधम् । 
कालस्य च अक्तगतेः योऽन्तर्धावति जन्तुषु ॥ ३७ ॥ 
सत्व रज तमो तैशी निर्गुणी चार भक्ति या ।  जीवाची गति नी हेतू नकळे तोच काळ की ॥ ३७ ॥ 
भक्तियोगस्य -  भक्तीयोगाचे - चतुर्विधं स्वरूपं -  चार प्रकारचे स्वरूप - च -  आणि - यः -  जो - जन्तुषु अंतः -  प्राण्यांमध्ये - धावति -  धावत असतो  - (तस्य) अव्यक्तगतेः कालस्य -  समजून न येणारी आहे गति ज्याची अशा काळाचे - स्वरूपम् -  स्वरूप - ते -  तुला - प्रावोचं -  स्पष्ट सांगितले ॥३७॥ 
 
सात्त्विक, राजस, तामस आणि निर्गुणभेदाने चार प्रकारच्या भक्तियोगाचे आणि जो प्राण्यांच्या जन्मादी विकारांचा हेतू आहे, तसेच ज्याची गती जाणता येत नाही, त्या काळाचे स्वरूप मी तुला सांगितले. (३७) 
 
जीवस्य संसृतीर्बह्वीः अविद्याकर्म निर्मिताः । 
यास्वङ्ग प्रविशन्नात्मा न वेद गतिमात्मनः ॥ ३८ ॥ 
अविद्या कर्म देवी! जे तयाच्या बहुही गती ।  मिळती गति त्या तैशा स्वरुपा जाणु ना शके ॥ ३८ ॥ 
अविद्याकर्मनिर्मिताः -  अविद्येच्या कर्मांनी उत्पन्न केलेले - जीवस्य बह्णिः संसृतीः -  जीवाचे अनेक मार्ग - ते प्रावोचम् -  तुला मी सांगितले - अंग -  हे माते - यासु प्रविशन् -  ज्या मार्गात प्रविष्ट होणारा - आत्मा -  जीव - आत्मनः गतीः न वेद -  स्वतःचे वास्तविक स्वरूप जाणत नाही ॥३८॥ 
 
हे देवी, अज्ञानाने कर्मे केल्याने जीवाला ज्या अनेक गती प्राप्त होतात, तेथे गेला असता तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही. (३८) 
 
नैतत्खलायोपदिशेन् नाविनीताय कर्हिचित् । 
न स्तब्धाय न भिन्नाय नैव धर्मध्वजाय च ॥ ३९ ॥ 
तुला मी दिधले ज्ञान दुष्ट गर्व्या न बोधिणे ।  उद्धटा ताठरा दंभ्या दुराचार्या न सांगणे ॥ ३९ ॥ 
एतत् -  ही विद्या - कर्हिचित् -  केव्हाही - खलाय न उपदिशेत् -  दुष्टाला उपदेशू नये - न अविनीताय -  उर्मट माणसासही सांगू नये - न स्तब्धाय -  मौन धरणालाहि सांगू नये - न भिन्नाय -  दुराचरणी माणसाला सांगू नये - न एव च धर्मध्वजाय -  आणि धर्माचे केवळ चिन्ह धारण करणार्या दांभिकालाही सांगू नये ॥३९॥ 
 
मी तुला जो ज्ञानाचा उपदेश केला आहे, तो दुष्ट, उद्धट, घमेंडखोर, दुराचारी आणि दांभिक पुरुषांना कधीही करू नये. (३९) 
 
न लोलुपायोपदिशेत् न गृहारूढचेतसे । 
नाभक्ताय च मे जातु न मद्भक्तद्विषामपि ॥ ४० ॥ 
विषयी नी गृहासक्त अभक्त भक्तद्वेषि जो ।  तयासी कधि हे गुह्य न सांगावेचि सर्वथा ॥ ४० ॥ 
न लोलुपाय उपदिशेत् -  लोभी माणसाला सांगू नये - न गृहारूढचेतसे -  ज्याचे मन घर इत्यादि विषयांवर आसक्त झालेले आहे अशालाहि सांगू नये - न च मे अभक्ताय -  तशीच माझा भक्त नसलेल्या सांगू नये  - जातु -  कधीही - मद्भक्तव्दिषाम् अपि -  माझ्या भक्तांचा व्देष करणार्यांना सुद्धा सांगू नये ॥४०॥ 
 
जो विषयलोलुप आहे, गृहासक्त आहे, माझा भक्त नाही किंवा माझ्या भक्तांचा द्वेष करणारा आहे, त्याला सुद्धा याचा उपदेश कधी करू नये. (४०) 
 
श्रद्दधानाय भक्ताय विनीताय अनसूयवे । 
भूतेषु कृतमैत्राय शुश्रूषाभिरताय च ॥ ४१ ॥ बहिर्जातविरागाय शान्तचित्ताय दीयताम् । निर्मत्सराय शुचये यस्याहं प्रेयसां प्रियः ॥ ४२ ॥ 
विनयी भक्त श्रद्धाळू निर्द्वेषी जगमित्र जो ।  अनासक्त गुरुभक्त शांत मत्सरशून्य जो ॥ ४१ ॥ चित्ताने विमळो आणि प्रीती ईशासि बांधि जो । अवश्य त्याजला सांगा सर्वची उपदेश हा ॥ ४२ ॥ 
श्रद्दधानाय -  श्रद्धाळू - विनीताय -  नम्र - अनसूयवे -  निर्भत्सरी - भूतेषुकृतमैत्राय -  सर्व प्राणिमात्राशी स्नेह करणार्या - च -  आणि - शुश्रूषाभिरताय -  गुरु इत्यादिकांची सेवा करण्यात आनंद मानणार्या - बहिर्जातविरागाय -  अंतर्बाह्य झाले आहे वैराग्य ज्याला अशा - शांतचित्ताय -  शांत आहे मन ज्याचे अशा - निर्मत्सराय -  कोणाचा हेवा न करणार्या - शुचये -  शुद्ध अशा - भक्ताय -  भक्ताला - दीयताम् -  द्यावा - यस्य -  ज्याला - अहं -  मी - प्रेयसां प्रियः -  अत्यंत प्रिय वस्तूतहि प्रिय आहे ॥४१-४२॥ 
 
जो अत्यंत श्रद्धाळू, भक्त, विनयशील, दुसर्यांविषयी दोषदृष्टी न ठेवणारा, सर्व प्राण्यांशी मैत्री असणारा, गुरुसेवेमध्ये तत्पर, बाह्य विषयांमध्ये अनासक्त, शांतचित्त, मत्सरशून्य आणि पवित्रचित्त असेल, तसेच मला परम प्रियतम मानणारा असेल, त्याला याचा उपदेश करावा. (४१-४२) 
 
य इदं श्रृणुयाद् अम्ब श्रद्धया पुरुषः सकृत् । 
यो वाभिधत्ते मच्चित्तः स ह्येति पदवीं च मे ॥ ४३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे कपिलेये द्वात्रिंशोऽध्यायः ॥ ३२ ॥ 
माते ! माझ्यात चित्ताला श्रद्धेने लावितो तसा ।  वारंवार कथा ऐके त्यांना कैवल्य लाभते ॥ ४३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ ॥ बत्तिसावा अध्याय हा ॥ ३ ॥ ३२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥ 
अम्ब -  हे माते - यः पुरुषः -  जो पुरुष - इदम् -  हे तत्त्वज्ञान  - सकृत् -  एकदा तरी - श्रद्धया शृणुयात् -  श्रद्धेने ऐकेल - वा -  अथवा - यः -  जो - मच्चित्तः -  माझ्या ठिकाणी आहे मन ज्याचे असा - अभिधत्ते -  दुसर्याला सांगेल - सः च -  तो - हि -  खरोखर - मे पदवीं एति -  माझ्या स्थानाला जातो ॥४३॥  
 
माते, जो पुरुष माझे ठिकाणी चित्त ठेवून याचे श्रद्धापूर्वक एक वेळ का होईना श्रवण किंवा कथन करील, तो माझ्या परमपदाला प्राप्त होईल. (४३) 
 
स्कंध तिसरा - अध्याय बत्तिसावा समाप्त  |