|
श्रीमद् भागवत महापुराण
माहात्म्य (श्रीस्कान्दे) - अध्याय ३ ला
श्रीमद्भागवताची परंपरा आणि त्याचे माहात्म्य, भागवतश्रवणाने श्रोत्यांना भगवद्धामाची प्राप्ती - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सूत म्हणतात - तेथे जमलेले लोक श्रीकृष्णकीर्तनात तल्लीन झालेले पाहून उद्धवाने सर्वांचा सत्कार केला आणि परीक्षिताला आलिंगन देऊन म्हटले. (१) उद्धव म्हणाला - हे राजा ! तू धन्य आहेस ! तू केवळ श्रीकृष्णांच्या भक्तीनेच नित्य पूर्णत्वाला पोहोचला आहेस. कारण श्रीकृष्णकीर्तनाच्या महोत्सवामध्ये तुझे मन अशा प्रकारे बुडून गेले आहे. सुदैवाने श्रीकृष्णांच्या पत्न्यांच्या ठायी तुझी भक्ती आणि वज्रनाभावर प्रेम आहे, ते योग्यच आहे. कारण श्रीकृष्णांनीच तुला शरीर आणि हे वैभव दिले आहे. सर्व द्वारकानिवासी लोकांमध्ये हे सर्वाधिक धन्य आहेत, याबाबत मुळीच शंका नाही. कारण यांनी व्रजामध्ये राहावे, अशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आज्ञा केली होती. श्रीकऋष्णांचा मनरूपी चंद्र राधेच्या मुखकमलाच्या चांदण्याने युक्त होऊन त्यांची लीलाभूमी असलेल्या वृंदावनाला आपल्या किरणांनी सुशोभित करीत येथे नेहमी प्रकाशमान असतो. श्रीकृष्णचंद्र हा नित्य परिपूर्ण आहे. त्याच्या ज्या सोळा कला आहेत, त्यांतून हजारो चिन्मय किरणे बाहेर पडतात, या सर्व कलांनी युक्त श्रीकृष्ण या व्रजभूमीमध्ये नेहमीच असतात. हे परीक्षिता ! शरणागतांचे भय दूर करणारा हा जो वज्र आहे, त्याचे स्थान श्रीकृष्णांच्या उजव्या पायाचे ठिकाणी आहे. भगवान श्रीकृष्णांनी या अवतारात या सर्वांना आपल्या योगमायेने आच्छादित केले आहे. त्यामुळे हे आपले स्वरूप विसरले आहेत. म्हणून हे दुःखी आहेत, हे निःसंशय. श्रीकृष्णांचा प्रकाश प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही आपल्या स्वरूपाच बोध होऊ शकत नाही. जीवांच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्णतत्त्वाचा जो प्रकाश आहे, त्याच्यावर नेहमी मायेचा पडदा पडलेला असतो. अठ्ठाविसाव्या द्वापर युगाच्या शेवटी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच प्रत्यक्ष प्रगट होऊन आपल्या मायेचा पडदा दूर सारला, त्यावेळी जीवांना त्यांचा प्रकाश प्राप्त झाला होता. पण ती वेळ आता तर निघून गेली. म्हणून त्यांचा प्रकाश प्राप्त करून घेण्यासाठी आता दुसरा उपाय सांगतो, तो ऐक. इतर वेळी जर कोणी श्रीकृष्णतत्त्वाचा प्रकाश प्राप्त करून घेऊ इच्छित असेल, तर तो त्याला श्रीमद्भागवतापासून प्राप्त होऊ शकेल. भगवंतांचे भक्त जेव्हा कोठे श्रीमद्भागवतशास्त्राचे कीर्तन आणि श्रवण करतात, तेव्हा तेथे खात्रीने भगवान श्रीकृष्ण असतात. जेथे श्रीमद्भागवताच्या एका किंवा अर्ध्या श्कोलाचा सुद्धा पाठ होतो, तेथेसुद्धा ते गोपींसह विराजमान असतात. या भारतवर्षात मनुष्यजन्म मिळूनही ज्या लोकांनी पापामुळे श्रीमद्भागवतकथा ऐकली नाही, ते आत्मघातकीच समजावे. ज्या भाग्यवान लोकांनी दररोज श्रीमद्भागवत शास्त्राचे सेवन केले आहे, त्यांनी आपले पिता, माता आणि पत्नी अशा तिन्ही कुळांचा चांगल्या तर्हेने उद्धार केला, असे समजावे. श्रीमद्भागवताच्या सेवनाने ब्राह्मणांना ज्ञान प्राप्त होते, क्षत्रियांना शत्रूंवर विजय मिळतो, वैश्यांना धन मिळतो आणि शूद्रांना स्वास्थ्य लाभते. स्त्रिया आणि अन्य लोकांच्यासुद्धा सर्व इच्छा श्रीमद्भागवतामुळे पूर्ण होतात. मग कोणता भाग्यवान त्याचे नित्य सेवन करणार नाही, बरे ? जन्म-जन्मांतरी साधना करून जेव्हा मनुष्य सिद्ध होतो, तेव्हा त्याला श्रीमद्भागवताची प्राप्ती होते. जेथे भागवताचा प्रकाश असतो, तेथे भगवभ्दक्ती उत्पन्न होते. पूर्वी सांख्यायनांच्या कृपेने बृहस्पतींना श्रीमद्भागवत मिळाले आणि त्यांनी ते मला दिल्यामुळे मी श्रीकृष्णांना प्रिय झालो. परीक्षिता ! बृहस्पतींनी मला एक आख्यायिकासुद्धा सांगितली होती, ती तू ऐक. या आख्यायिकेमुळे श्रीमद्भागवतश्रवणाच्या संप्रदायाचा क्रमसुद्धा समजतो. (२-२०) बृहस्पती म्हणाले- आपल्या मायेने पुरुषरूप धारण करणार्या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा सृष्टिनिर्मितीचा संकल्प केला, तेव्हा रजोगुण सत्त्वगुण व तमोगुण यांनी युक्त अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू व शिव असे तीन देव प्रगट झाले. भगवंतांनी या तिघांना अनुक्रमे जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्याचा अधिकार दिला. (२१-२२) तेव्हा भगवंतांच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्यांना प्रार्थना केली. बृहस्पती म्हणतात - तेव्हा प्रथम भगवंतांनी त्याला श्रीमद्भागवताचा उपदेश करून म्हटले, की, "ब्रह्मन ! तुझे मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू नेहमी याचे सेवन करीत राहा." श्रीमद्भागवताचा उपदेश ऐकून ब्रह्मदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने श्रीकृष्णांची नित्य प्राप्ती होण्यासाठी व सात आवरणे नष्ट होण्यासाठी श्रीमद्भागवताचे सप्ताह-पारायण केले. सप्ताहयज्ञाच्या विधीनुसार सात दिवसपर्यंत श्रीमद्भागवताचे पारायण करण्याने ब्रह्मदेवाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. याप्रमाणे तो वारंवार सप्ताहयज्ञाचे अनुष्ठान करीत सृष्टी उत्पन्न करीत असतो. विष्णूंनीसुद्धा आपले मनोरथ सिद्ध होण्यासाठी त्या परमात्म्याला प्रार्थना केली. कारण त्या पुरुषोत्तमांनीच विष्णूंची सुद्धा प्रजापालनाच्या कामात नेमणूक केली होती. (२५-२८) विष्णू म्हणाले - हे देवा ! मी आपल्या आज्ञाप्रमाणे कर्म आणि ज्ञान यांमुळे उपन्न होणार्या प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्याद्वारा योग्य रीतीने प्रजेचे पालन करीन. कालक्रमानुसार जेव्हा जेव्हा धर्माचा र्हास होईल, तेव्हा तेव्हा अनेक अवतार धारण करून मी पुन्हा धर्माची स्थापना करीन. ज्यांना भोगांची फळ अवश्य देईन. त्याचप्रमाणे जे मुक्त होऊ इच्छितात, त्या विरक्तांना पाच प्रकारच्या मुक्तीसुद्धा देईन. परंतु जे लोक मोक्षाची सुद्धा इच्छा करीत नाहीत, त्यांचे पालन मी कसे करावे, हे मला समजत नाही. तसेच मी माझे व लक्ष्मीचेसुद्धा रक्षण कसे करावे, ते आपण सांगावे. (२९-३२) आदिपुरुष श्रीकृष्णांनी त्यांनासुद्धा श्रीमद्भागवताचा उपदेश करून म्हटले, ’आपल्या मनोरथांच्या सिद्धीसाठी तू या श्रीमद्भागवतशास्त्राचा नेहमी पाठ करीत जा.’ या उपदेशाने प्रसन्न झालेले श्रीविष्णू लक्ष्मीसह प्रत्येक महिन्यात श्रीमद्भागवताचे स्मरण करू लागले. यामुळे ते परमार्थाचे आणि जगाचे योग्य रीतीने पालन करण्यास समर्थ झाले. जेव्हा श्रीविष्णू स्वतः सांगतात आणि लक्ष्मी प्रेमाने श्रवण करते , त्या प्रत्येक वेळी भागवतकथेचे श्रवण एक महिन्यातच पूर्ण होते. परंतु जेव्हा लक्ष्मी स्वतः कथा सांगते आणि श्रीविष्णू ऐकतात, तेव्हा भागवतकथेचे रसास्वादन दोन महिनेपर्यंत चालू राहाते. त्यावेळी कथा खूप रंगते. श्रीविष्णूंना जगाचे पालन करण्याची चिंता असते, पण लक्ष्मीला कसलीन चिंता नसते. म्हणूनच लक्ष्मीच्या मुखातून भागवताचे वर्णन अधिक प्रभावी होते. (३३-३७) यानंतर ज्याची भगवंतांनी संहार करण्यासाठी नेमणूक केली होती, त्या रुद्रानेही आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी त्या परमपुरुषांना प्रार्थना केली. (३८) रुद्र म्हणाला - हे माझे प्रभू देवाधिदेवा ! नित्य नैमित्तिक आणि प्राकृत संहार करण्याची शक्ती माझ्या अंगी आहे. परंतु आत्यंतिक प्रलयाची शक्ती नाही. हेच माझी मोठे दुःख आहे. माझ्यातील ही कमतरता नाहीशी व्हावी, म्हणून मी आपल्याला प्रार्थना करीत आहे. (३९-४०) बृहस्पती म्हणतात - नारायणांनी रुद्राची प्रार्थना ऐकून त्यालाही श्रीमद्भागवताचाच केली. त्याने एका वर्णत एक पारायण या पद्धतीने भागवतकथेचे सेवन केले. या सेवनाने त्याने तमोगुणावर विजय मिळवीला आणि आत्यंतिक संहार-मोक्ष करण्याची शक्तीसुद्धा प्राप्त करून घेतली. (४१-४२) उद्धव म्हणतो - श्रीमद्भागवताच्या माहात्म्या-संबंधीची ही कथा मी माझे गुरू श्रीबृहस्पती यांचे तोंडून ऐकली आणि भागवताचा उपदेश प्रात्प करून घेऊन मी आनंदित झालो व त्यांना प्रणाम केला. त्यानंतर श्रीविष्णूंच्याच पद्धतीने मीसुद्धा एकेका महिन्यात श्रीमद्भागवत कथेचा चांगल्या तर्हेने रसास्वद घेऊ लागलो. तेवढ्यानेच मी भगवान श्रीकृष्णांचा प्रियतम सखा झालो. त्यानंतर भगवंतांनी मला व्रजामध्ये आपल्या प्रियतम गोपींच्या सेवेसाठी नियुक्त केले. विरहव्याकूळ गोपींमध्ये वास्तविक नित्य विहार करणार्या श्रीकृष्णांनी, त्यांचे भ्रमामुळे वाटणारे दुःख दूर करण्यासाठी त्या गोपींना माझ्या मुखाने श्रीभागवताचा संदेश पाठविला. तो संदेश आपल्या बुद्धीनुसार ग्रहण करून गोपी ताबडतोब विरहवेदनांतून मुक्त झाल्या. हे रहस्य तर मी समजू शकलो नाही. परंतु मी हा चमत्कार मात्र प्रत्यक्ष पाहिला. या घटनेला पुष्कळ दिवस लोटल्यावर जेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देव येऊन भगवंतांना आपल्या परमधामाकडे येण्याविषयी प्रार्थना करून निघून गेले, त्यावेळी पिंपळाखाली त्यांच्यासमोरच असलेल्या मला भगवंतांनी श्रीमद्भागवताच्या त्या रहस्याचा स्वतःच उपदेश केला आणि माझ्या बुद्धीत तो दृढ केला. त्याच्याच प्रभावाने मी बदरिकाश्रमात राहूनसुद्धा येथे व्रजातील वेलींमध्येही निवास करीत आहे. त्याच आधारावर मी येथे नारदकुंडावर नेहमी स्वेच्छेने राहातो. भक्तांना श्रीमद्भागवताच्या सेवनानेच श्रीकृष्णतत्त्वाचा प्रकाश मिळेल. म्हणून येथे उपस्थित झालेल्या या सर्व भक्तजनांचे मनोरथ सिद्ध होण्यासाठी मी श्रीमद्भागवताचा पाठ करीन. परंतु या कार्यात तुम्हीच मला साहाय्य केले पाहिजे. (४३-५१) सूत म्हणतात - हे ऐकून परीक्षिताने उद्धवाला प्रणाम करून म्हटले. उद्धव म्हणाला- भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा या पृथ्वीचा त्याग केला, तेव्हापासून येथे कली बलवान झाला आहे. ज्यावेळी हे सत्कार्य सुरू होईल, तेव्हा तो याच्यामध्ये मोठे विघ्न आणील. म्हणून आता दिग्विजयासाठी जा आणि कलीला ताब्यात ठेव. इकडे मी तुझ्या साहाय्याने वैष्णवी पद्धतीने एक महिनाभर श्रीमद्भागवतकथेचे रसपान करवून यांना भगवान मधुसूदनांच्या नित्य गोलोक धामामध्ये पोहोचवीन. (५४-५६) सूत म्हणतात - उद्धवाचे म्हणणे ऐकल्यावर कलीवर विजय मिळवण्याच्या विचाराने राजाला आनंद झाला. परंतु तो चिंतातुरही झाला. त्यावेळी त्याने चिंतेचे कारण उद्धवाला सांगितले. (५७) परिक्षित म्हणाला- अहो काका ! आपल्या आज्ञेनुसार कलियुगाला मी लगाम घालीन. परंतु मला श्रीमद्भागवताची प्राप्ती कशी होईल ? (५८) आपल्या चरणांना शराण आलेल्या माझ्यावरही आपण कृपा करावी. उद्धव म्हणाला- राजन ! तुला तर कोणत्याही गोष्टीसाठी, कोणत्याही प्रकारे चिंता करण्याचे कारण नाही. कारण या भागवत शास्त्राचा खरा अधिकारी तूच आहेस. जगातील माणसे प्रापंचिक कामातच गढून गेलेली असल्यामुळे आजपर्यंत तरी बहुतेकांनी भागवतश्रवणाचे नावसुद्धा काढलेले नाही. या भारतवर्षातील बहुतेक लोक तुझ्याच कृपेने श्रीमद्भागवतकथेची प्राप्ती झाल्यावर शाश्वत सुख प्राप्त करून घेतील. महर्षी श्रीशुकदेव साक्षात श्रीकृष्णांचेच स्वरूप आहेत. तेच तूला श्रीमद्भागवताची कथा ऐकवतील, यात तिळमात्र शंका नाही. राजन ! त्या कथेच्या श्रवणाने तू व्रजेश्वर श्रीकृष्णांचे नित्यधाम प्राप्त करून घेशील. त्यानंतर या पृथ्वीवर श्रीमद्भागवतकथेचा प्रचार होईल. (६०-६४) म्हणून राजेंद्रा ! तू जाऊन कलीला बंधनात ठेव. यांच्याखेरीज जे श्रोते तेथे उपस्थित होते, ते सुद्धा भगवंताम्च्या नित्य अंतरंग लीलेमध्ये सामील होऊन या स्थूल व्यावहारिक जगातून तात्काळ अंतर्धान पावले. ते सर्वजण नेहमीच गोवर्धन पर्वतावरील वन आणि झाडांमध्ये, वृंदावन, काम्यवन इत्यादी वनांमध्ये तसेच तेथील दिव्य गाईंसमवेत श्रीकृष्णांच्याबरोबर विहार करीत अत्यानंदाचा अनुभव घेत असलेले, श्रीकृष्ण-प्रेमामध्ये मग्न असलेल्यांना दिसतात. (७२-७३) सूत म्हणतात - जे लोक ही भगवत्प्राप्तीची कथा ऐकतील आणि दुसर्यांना ऐकवतील, त्यांना भगवत्प्राप्ती होईल व त्यांचे दुःख नाहीसे होईल. (७४) अध्याय तिसरा समाप्त |