श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १५ वा

ऋचीक, जमदग्नी आणि परशुराम यांचे चरित्र -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! उर्वशीपासून, आयू, श्रुतायू. सत्यायू, रय, विजय आणि जय असे पुरूरव्याला सहा पुत्र झाले. (१)

श्रूतायूचा पुत्र वसुमान, सत्यायूचा श्रुतंजय, रयाचा एक आणि जयाचा अमित. विजयाचा भीम, भीमाचा कांचन, कांचनाचा होत्र आणि होत्राचा पुत्र जह्नू होता. ज्याने गंगेला आपल्या ओंजळीत घेऊन पिऊन टाकले, तोच हा जह्नू होय. जह्नूचा पुत्र पूरू होता, पुरूचा बलाक आणि बलाकाचा अजक. अजकाचा पुत्र कुश. कुशांबू, तनय, वसू आणि कुशनाभ हे कुशाचे चार पुत्र होते. यांपैकी कुशांबूचा पुत्र गाधी होता. (२-४)

गाधीच्या कन्येचे नाव सत्यवती होते. ऋचीक ऋषींनी तिला मागणी घातली. हा वर कन्येसाठी योग्य नाही, असे वाटून गाधी ऋचीकाला म्हणाला. "मुनीश्वर ! आम्ही कुशिक आहोत. आमच्या कन्येसाठी आपण मला एक हजार घोडे शुल्करूपाने द्या. त्यांचे शरीर पांढरे परंतु एक कान मात्र काळा असावा." गाधी असे म्हणाला, तेव्हा ऋचीक मुनींना त्याचा आशय समजला आणि वरुणाकडे जाऊन त्यांनी तसेच घोडे आणले आणि ते देऊन सुंदरी सत्यवतीशी विवाह केला. एकदा महर्षी ऋचीकांना त्यांची पत्‍नी आणि सासू दोघींनीही पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. महर्षी ऋचीकांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून दोघींसाठी वेगवेगळ्या मंत्रांनी चरू शिजविला आणि ते स्नान करण्यासाठी निघून गेले. सत्यवतीच्या आईला वाटले की, ऋषींनी आपल्या पत्‍नीसाठी श्रेष्ठ प्रतीचा चरू शिजविला असेल, म्हणून तिने तिच्याकडून तिचा चरू मागून घेतला. तेव्हा सत्यवतीने आपला चरू आईला दिला आणि आईचा चरू स्वतः खाल्ला. जेव्हा मुनींना ही गोष्ट समजली, तेव्हा ते सत्यवतीला म्हणाले, "तू मोठा अनर्थ केलास ! आता तुझा पुत्र लोकांना शासन करणारा क्रूर स्वभावाचा होईल आणि तुझा भाऊ एक ज्येष्ठ ब्रह्मवेत्ता होईल."

सत्यवतीने ऋचीक मुनींना प्रसन्न करून प्रार्थना केली की, "असे होऊ नये." तेव्हा ते म्हणाले - "ठीक आहे. पुत्राऐवजी तुझा नातू तसा होईल." नंतर सत्यवतीला जमदग्नी झाला. सत्यवती सर्व लोकांना पवित्र करणारी परम पुण्यमयी ’कौशिकी’ नदी झाली. रेणू ऋषींची कन्या रेणुका होती. जमदग्नींनी तिचे पाणिग्रहण केले. जमदग्नी ऋषींना रेणुकेपासून वसुमान इत्यादी अनेक पुत्र झाले. त्यातील सर्वांत लहान परशुराम होते. त्यांचे यश सर्व जगात प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, हैहयवंशाचा नाश करण्यासाठी स्वतः भगवंतांनीच हा अंशावतार ग्रहण केला होता. त्यांनी या पृथ्वीला एकवीस वेळा क्षत्रियहीन केले. क्षत्रियांनी जरी त्यांचा थोडासाच अपराध केला होता, तरीसुद्धा ते क्षत्रिय दुष्ट, ब्राह्मणांचे द्वेष्टे, रज-तमांनी व्यापलेले आणि याच कारणामुळे ते पृथ्वीला भारभूत झाले होते. म्हणून त्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरविला. (५-१५)

परीक्षिताने विचारले - त्यावेळच्या संयमशून्य क्षत्रियांनी परशुरामांचा असा कोणता अपराध केला होता की, ज्या कारणाने त्यांनी वारंवार क्षत्रियांच्या वंशाचा संहार केला ? (१६)

श्रीशुक सांगू लागले - त्यावेळी हैहयवंशाचा अधिपती अर्जुन होता. तो एक श्रेष्ठ क्षत्रिय होता. त्याने अनेक प्रकारे सेवाशुश्रूषा करून भगवान नारायणांचे अंशावतार दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून एक हजार हात आणि शत्रूपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला. त्याचबरोबर इंद्रियांचे अबाधित बळ, अतुल संपत्ती, तेजस्विता, वीरता, कीर्ति आणि शारीरिक बळसुद्धा त्याने प्राप्त करून घेतले. तो योगेश्वर झाला होता. अणिमादी सर्व सिद्धी त्याला प्राप्त होत्या. जगात तो वायूप्रमाणे सगळीकडे बेधडकपणे विहार करीत असे. एकदा गळ्यात वैजयंती माळ घालून सहस्रबाहू अर्जुन पुष्कळशा सुंदर स्त्रियांसह नर्मदा नदीमध्ये जलविहार करीत होता. त्यावेळी मदोन्मत्त होऊन सहस्रबाहूने आपल्या हातांनी नदीचा प्रवाह अडविला. सहस्रार्जुनाच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह उलट वाहू लागल्यामुळे आपले शिबिर बुडू लागले, ही गोष्ट पराक्रमी रावणाला सहन झाली नाही. जेव्हा रावणाने अर्जुनाची कळ काढली, तेव्हा त्याने त्या स्त्रियांच्या देखतच त्याला पकडले आणि माहिष्मतीत नेऊन वानरासारखे कैद केले आणि नंतर पुलस्त्यांच्या सांगण्यावरून सोडून दिले. (१७ -२२)

एके दिवशी सहस्रबाहू अर्जुन शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. दैववशात तो जमदग्नींच्या श्रमात जाऊन पोहोचला. तपस्वी जमदग्नी मुनींनी आश्रमातील कामधेनूच्या प्रतापाने सेना, मंत्री आणि वाहनांसह हैहयाधिपतीचे आतिथ्य केले. जमदग्नी मुनींचे ऐश्वर्य आपल्यापेक्षाही मोठे असल्याने पाहून त्याने त्यांच्या आदरसत्काराचा मान न ठेवता कामधेनूच घेऊन जाण्याचे ठरविले. त्याने उर्मटपणाने मुनींची कामधेनू बळेच नेण्याची सेवकांना आज्ञा केली. तेव्हा त्याच्या सेवकांनी हंबरणार्‍या कामधेनूला वासरासह बळजबरीने माहिष्मतीपुरीला नेले. तो तेथून निघून गेल्यावर परशुराम आश्रमात आले आणि त्याच्या दुष्टपणाची हकीकत ऐकून जखमी झालेल्या सापाप्रमाणे संतापले. ते आपला भयंकर परशू, बाणांचा भाता, ढाल आणि धनुष्य घेऊन कोणालाही न जुमानणारा सिंह हत्तींच्या राजाच्या मागे धावतो, त्याप्रमाणे त्याच्या पाठोपाठ धावू लागले. (२३-२८)

अर्जुन नुकताच आपल्या नगरात प्रवेश करीत होता, तेवढ्यात त्याने पाहिले की, परशुराम अत्यंत वेगाने आपल्याकडेच धावत येत आहेत. त्यांनी हातात धनुष्य-बाण आणि परशू घेतला होता, शरीरावर काळे मृगचर्म धारण केले होते आणि त्यांच्या जटा सूर्यकिरणांप्रमाणे चमकत होत्या. त्यांना पाहताच त्याने गदा, खड्ग, बाण, ऋष्टी, तोफा, शक्ती इत्यादी आयुधांनी सुसज्ज हत्ती, घोडे, रथ, पायदळ यांनी युक्त अशी अत्यंत भयंकर सतरा अक्षौहिणी फौज पाठविली. भगवान परशुरामांनी एकट्याने ती सर्व फौज नष्ट करून टाकली. भगवान परशुरामांचा वेग मन आणि वायू यांप्रमाणे होता. बस्स ! जिथे जिथे ते आपल्या परशूचा प्रहार करीत तिथे तिथे सारथी आणि वाहनांसह वीरांचे हात, मांड्या आणि खांदे तुटून जमिनीवर पडत होते. (२९-३१)

हैहयाधिपती अर्जुनाने जेव्हा पाहिले की, आपल्या सेनेतील सैनिक, त्यांचे धनुष्य-बाण, ध्वज आणि ढाली भगवान परशुरामांच्या परशूने आणि बाणांनी तुकडे तुकडे होऊन रणभूमीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत, तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो स्वतः त्यांच्याशी लढण्यासाठी येऊन थडकला. त्याने एकाच वेळी आपल्या हजार हातांनी पाचशे धनुष्यांना बाण लावले आणि ते परशुरामांवर सोडले. परंतु परशुराम सर्व अस्त्रे धारण करणार्‍यांत अग्रगण्य होते. त्यांनी आपल्या एका धनुष्याने सोडलेल्या बाणानेच ते सर्व एकदम तोडून टाकले. आता अर्जुन हातांनीच पहाड आणि झाडे उपटून घेऊन वेगाने युद्धभूमीवर जाऊन परशुरामांवर टाकणार, तोच परशुरामांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशूने अत्यंत वेगाने सापासारखे त्याचे हात तोडून टाकले. त्याचे हात तुटल्यावर परशुरामांनी पर्वताच्या शिखरासारखे असलेले त्याचे उंच मस्तक धडापासून वेगळे केले. वडील मारले गेल्यानंतर त्याचे दहा हजार पुत्र भिऊन पळून गेले. (३२-३५)

शत्रूंचा नाश करणार्‍या परशुरामांनी वासरासह कामधेनू परत घेतली. ती अत्यंत दुःखी होती. त्यांनी तिला आश्रमात आणून वडिलांकडे सोपविले आणि माहिष्मती नगरीत आपण जे काही केले, ते सर्व आपल्या वडिलांना आणि भावांना सांगितले. ते ऐकून जमदग्नी म्हणाले, "महावीरा परशुरामा ! तू मोठेच पाप केलेस. कारण सर्व देवमय राजाचा तू विनाकारण वध केलास. पुत्रा ! आपण ब्राह्मण आहोत. एवढेच काय, सर्वांचे पितामह ब्रह्मदेवसुद्धा क्षमेच्या बलावरच ब्रह्मपदाला प्राप्त झाले आहेत. क्षमेमुळेच ब्राह्मणांचे तेज सूर्याच्या प्रभेप्रमाणे चमकते. भगवान श्रीहरीसुद्धा क्षमावान लोकांवरच लवकर प्रसन्न होतात. (३६-४०)

पुत्रा ! सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय आहे. जा ! भगवंतांचे स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपले पाप धुऊन टाक." (४१)

अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP