|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १४ वा
चंद्रवंशाचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! आता मी तुला चंद्राच्या पावन वंशासंबंधी सांगतो. या वंशामध्ये पुरूरवा इत्यादी मोठ-मोथ्या पवित्रकीर्ति राजांचे वर्णन आहे. (१) हजारो मस्तके असणार्या विराटपुरुष नारायणांच्या नाभिसरोवरातील कमळापासून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांचे पुत्र अत्री आपल्या गुणांमुळे ब्रह्मदेवांसारखेच होते. त्याच अत्रींच्या नेत्रांपासून अमृतमय अशा चंद्राचा जन्म झाला. ब्रह्मदेवांनी चंद्राला ब्राह्मण, वनस्पती आणि नक्षत्रांचा अधिपती बनविले. त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवून राजसूय यज्ञ केला. यामुळे तो गर्विष्ठ झाला आणि त्याने बळजबरीने बृहस्पतीची पत्नी तारा हिचे हरण केले. देवगुरू बृहस्पतींनी आपली पत्नी परत देण्याविषयी त्याला वारंवार विनंती केली. परंतु तो इतका मस्तवाल झाला होता की, त्याने तिला मुळीच परत दिले नाही. याच कारणाने देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झाले. बृहस्पतींच्या द्वेषामुळे शुक्राचार्यांनी असुरांसह चंद्राची बाजू घेतली आणि महादेवांनी स्नेहामुळे सर्व भूतगणांसह आपले विद्यागुरू अंगिरा यांचे पुत्र बृहस्पतींची बाजू घेतली. देवराज इंद्रानेसुद्धा सर्व देवांसह आपले गुरू बृहस्पती यांची बाजू घेतली. अशा प्रकारे तारेच्या निमित्ताने देव आणि असुरांचा संहार करणारा संग्राम झाला. (२-७) त्यानंतर अंगिरा ऋषींनी ब्रह्मदेवांकडे जाऊन हे युद्ध बंद करण्याची त्यांना प्रार्थना केली. यावर ब्रह्मदेवांनी चंद्राची निर्भर्त्सना करून तारेला तिच्या पतीच्या स्वाधीन केले. तेव्हा तारा गर्भवती आहे, असे जाणून बृहस्पती तिला म्हणाले, "दुष्टे ! माझ्या अधिकार क्षेत्रातील हा दुसर्याचा गर्भ तू ताबडतोब बाहेर टाक. हे स्त्रिये, मी तुला जाळून टाकणार नाही. कारण एक तर तू स्त्री आहेस आणि दुसरे म्हणजे मला संतानप्राप्तीची इच्छा आहे. पतीचे म्हणणे ऐकून तारेला लाज वाटली. तिने सोन्यासारखा चमकणारा बालक गर्भातून बाहेर टाकला. त्याला पाहून बृहस्पती आणि चंद्र दोघांनाही वाटू लागले की, हा आपल्याला मिळावा. आता ते एकमेकांशी "हा तुझा नाही, माझा आहे." असे म्हणत जोरजोराने भांडू लागले. ऋषींनी आणि देवांनी तारेला विचारले असता, लज्जित होऊन तिने काहीच उत्तर दिले नाही. आपल्या मातेच्या दिखावू लज्जेने रागावून बालक म्हणाला, "दुराचारिणी ! तू बोलत का नाहीस ? मला लवकर सांग तुझे कुकर्म." त्याच वेळी ब्रह्मदेवांनी तारेला एकांतात बोलावून तिची समजूत घालून विचारले. तेव्हा तारा हळूच म्हणाली ’चंद्राचा.’ म्हणून चंद्राने त्या बालकाला घेतले. परीक्षिता ! ब्रह्मदेवांनी त्या बालकाचे नाव ’बुध’ असे ठेवले. कारण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती. असा पुत्र प्राप्त झाल्याने चंद्राला अतिशय आनंद झाला. (८-१४) परीक्षिता ! बुधापासून इलेला पुरूरवा झाला. याचे वर्णन मी यापूर्वीच केले आहे. एके दिवशी इंद्राच्या सभेमध्ये देवर्षी नारद पुरूरव्याचे रूप, गुण, उदारता, शील, संपत्ती आणि पराक्रमाचे वर्णन करीत होते. ते ऐकून उर्वशीच्या हृदयात कामभाव उत्पन्न झाला आणि त्याने पीडित होऊन ती देवांगना पुरूरव्याकडे आली. उर्वशीला जरी मित्रावरुणांच्या शापामुळेच मृत्यूलोकात यावे लागले होते, तरीसुद्धा पुरुषश्रेष्ठ पुरूरवा मूर्तिमंत कामदेवाप्रमाणेच सुंदर आहे, असे ऐकून उर्वशी धैर्य धरून त्याच्याकडे आली. देवांगना उर्वशीला पाहून पुरूरव्याचे डोळे आनंदाने विस्फारले. त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. गोड श्ब्दांत तो म्हणाला, (१५-१८) पुरूरवा म्हणाला - हे सुंदरी ! तुझे स्वागत असो. बैस. मी तुझी काय सेवा करू ? तू माझ्याबरोबर रममाण हो आणि आपल्या दोघांचा हा विहार अनंत काळापर्यंत चालत राहो. (१९) उर्वशी म्हणाली - हे सुंदरा ! कोणत्या सुंदर स्त्रीची दृष्टी आणि मन आपल्यात आसक्त होणार नाही ? कारण आपल्याजवळ येताच आपल्याशी रममाण होण्याच्या इच्छेने आपल्या छातीचा आश्रय घेतलेले माझे मन तेथून दूर होऊ इच्छित नाही. राजन् ! जो पुरुष रूप-गुण इत्यादी कारणांमुळे प्रशंसनीय असतो, तोच स्त्रियांना हवाहवासा वाटतो. म्हणून मी आपल्याबरोबर अवश्य रमेन. परंतु महाराज ! मी आपल्याकडे माझी ठेव म्हणून हे दोन मेंढे सोपवीत आहे. आपण यांचे रक्षण करावे. (२०-२१) हे वीरशिरोमणे ! मी फक्त तूप खाईन. आणि मैथुनाव्यतिरिक्त कोणत्याही वेळी आपण मला विवस्त्र दिसता कामा नये. मनस्वी पुरूरव्याने "ठीक आहे" असे म्हणून तिची अट मान्य केली. आणि नंतर तो उर्वशीला म्हणाला - "पुरुषांना मोहविणारे तुझे हे सौंदर्य अद्भुत आहे. तुझा भावही अलौकिक आहे. तर मग हे देवी ! स्वतःहून आलेल्या तुझा कोणता मनुष्य स्वीकार करणार नाही ?" (२२-२३) तो पुरुषश्रेष्ठ देवांची विहारस्थळे असलेल्या चैत्ररथादी उपवनांमध्ये तिच्यासह स्वच्छंदपणे विहार कऊ लागला. उर्वशीच्या शरीरातून कमलकेसरासारखा सुगंध येत होता. राजा पुरूरव्याने तिच्याबरोबर पुष्कळ वर्षेपर्यंत आनंदविहार केला. तिच्या मुखकमलाच्या सुगंधाने त्याचे शुद्ध हरपून जात असे. उर्वशी नाही असे पाहून इंद्राने तिला आणण्यासाठी गंधर्वांना पाठविले. "उर्वशीखेरीज मला हा स्वर्ग सुना सुना वाटतो, असे तो म्हणाला. मध्यरात्रीच्या घोर अंधाराच्या वेळी ते गंधर्व तिकडे गेले आणि उर्वशीने ज्या दोन मेंढ्यांना राजाजवळ अनामत म्हणून ठेवले होते, ते त्यांनी चोरले. पुत्रासमान असलेल्या दोन मेंढ्यांना गंधर्व घेऊन जात असता त्यांचे ओरडणे उर्वशीने ऐकले. तेव्हा ती म्हणाली, अरेरे ! स्वतःला वीर समजणार्या पण नपुंसकासारख्या असणार्या या भित्र्या माणसाला आपला पती केल्यामुळे माझा घात झाला. याच्यावर विश्वास ठेवल्याकारणाने माझा सर्वनाश झाला. लुटारूंनी माझ्या मुलांना पळवून नेले. पहाना ! हा दिवसा तेवढा मर्द असतो आणि रात्री स्त्रियांप्रमाणे भिऊन झोपून राहतो. जसा एखाद्या हत्तीवर अंकुशाने प्रहार करावा, त्याचप्रमाणे उर्वशीने आपल्या वाग्बाणांनी राजाला घायाळ केले. तेव्हा रागाने हातात तलवार घेऊन वस्त्रहीन अवस्थेतच तो त्यांच्यावर धावून गेला, तेव्हा त्यांनी ताबडतोब मेंढ्यांना सोडून दिले आणि तेव्हाच विजा चमकू लागल्या. राजा मेंढ्यांना घेऊन परत येताना उर्वशीने त्या उजेडात त्याला वस्त्रहीन अवस्थेत पाहिले. (झाले ! ती त्याला लगेच सोडून निघून गेली.) (२४-३१) बिछान्यावर उर्वशी नाही, असे पाहून राजा खिन्न झाला. त्याचे चित्त उर्वशीकडेच लागले होते. तो तिच्यासाठी शोकविह्वल झाला आणि वेड्याप्रमाणे पृथ्वीवर इकडे तिकडे भटकू लागला. एके दिवशी कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तटावर त्याने उर्वशी आणि तिच्या पाच प्रसन्नमुख मैत्रिणींना पाहिले आणि गोड शब्दात म्हटले, "प्रिये ! थांब, थांब. हे निष्ठुरे ! निदान आज तरी मला सुखी केल्यावाचून तू जाऊ नकोस. ये. आपण दोघे काही वार्तालाप करू. देवी ! आता या शरीरावर तुझा कृपाप्रसाद राहिलेला नाही, तू याला आता लांब फेकून दिले आहेस. म्हणून लांडगे व गिधाडे याला खाऊन टाकतील." (३२-३५) उर्वशी म्हणाली - "तू पुरुष आहेस. असा मरू नकोस. या लांडग्यांनी तुला खाऊ नये. स्त्रियांची कोणाशीही मैत्री नसते. स्त्रिया आणि लांडगे या दोघांचे हृदय अगदी एकसारखे असते. स्त्रिया निर्दय, क्रूर, असहनशील आणि धाडसी कामे आवडणार्या असतात. थोड्याश्या स्वार्थासाठीही त्या विश्वास संपादन करून आपल्या पतीला आणि भावालासुद्धा मारतात. सौजन्य यांच्या हृदयात बिलकुल नसते. भोळ्याभाबड्यांना खोटा विश्वास दाखवून त्या फसवतात आणि नवनवीन पुरुषांच्या आकर्षणाने कुलटा आणि स्वैर बनतात. हे राजा, प्रत्येक एक वर्षानंतर एक रात्र तू माझ्या संगतीत राहशील. तेव्हा तुला आणखीही मुले होतील. (३६-३९) उर्वशी गर्भवती आहे, हे जाणून राजा राजधानीकडे परत आला. एक वर्षानंतर पुन्हा तिकडे गेला. तोपर्यंत उर्वशी एका वीर-पुत्राची माता झाली होती. उर्वशीबरोबर राहिल्याने त्याला अतिशय सुख मिळाले आणि तो एक रात्र निच्याबरोबर राहिला. पुन्हा विरहदुःखाने अत्यंत दीन झालेल्या त्याला उर्वशी म्हणाली. "तू या गंधर्वांची स्तुती कर. हे मला तुझ्याकडे सोपवतील." तेव्हा पुरूरव्याने गंधर्वांची स्तुती केली. परीक्षिता ! पुरूरव्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्याला एक अग्निकुंड दिले. ही उर्वशी आहे, असे वाटून ते हृदयाशी धरून तो एका वनातून दुसर्या वनात फिरू लागला. (४०-४२) जेव्हा तो सावध झाला, तेव्हा ते पात्र वनातच टाकून आपल्या महालात परतला आणि रात्रीच्या वेळी उर्वशीचे ध्यान करीत राहिला. अशा प्रकारे जेव्हा त्रेतायुग सुरू झाले, तेव्हा त्याच्या हृदयात तिन्ही वेद प्रगट झाले. नंतर जेथे त्याने अग्निपात्र टाकले होते, तेथे तो गेला. आता त्या ठिकाणी शमीवृक्षातून एक पिंपळाचा वृक्ष उगवला होता, तो पाहून त्याने त्यापासून दोन अरणी (मंथन करण्याची लाकडे) तयार केल्या. नंतर उर्वशीलोकाची प्राप्ती व्हावी, या इच्छेने खालील अरणीला उर्वशी, वरच्या अरणीला पुरूरवा आणि मध्ये लाकडाचे पुत्ररूपाने चिंतन करीत अग्नी प्रज्वलित करण्यार्या मंत्रांनी मंथन केले. त्या मंथनामुळे "जातवेदा" नावाचा अग्नी प्रगट झाला. राजा पुरूरव्याने अग्निदेवतेची तीन वेदांनी संस्कार करून आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी अशा तीन भागात विभागणी केली व त्याचा पुत्ररूपाने स्वीकार केला. नंतर उर्वशीलोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने पुरूरव्याने त्या तीन अग्नींच्या द्वारे सर्वदेवतास्वरूप, इंद्रियातीत, यज्ञपती, भगवान श्रीहरींना उद्देशून यज्ञ केला. (४३-४७) त्रेतायुगापूर्वी सत्ययुगामध्ये ॐकार हाच वेद होता. सर्व वेद-शास्त्रे त्याच्याच अंतर्भूत होती. देव फक्त नारायणच होता. आणखी कोणी नव्हते. अग्नी एकच होता आणि "हंस" हा एकच वर्ण होता. (४८) परीक्षिता ! त्रेतायुगाच्या सुरुवातीला पुरूरव्यापासून तीन वेद आणि तीन अग्नी यांचा आविर्भाव झाला. पुरूरव्याने अग्नीचा संतानरूपाने स्वीकार करून गंधर्वलोकाची प्राप्ती करून घेतली. (४९) अध्याय चौदावा समाप्त |