|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ६ वा
इक्ष्वाकू वंशाचे वर्नन, मान्धाता आणि सौभरी ऋषींची कथा - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - विरूप, केतुमान आणि शंभू असे अंबरीषाचे तीन पुत्र होते. विरूपाचा पृषदश्व आणि त्याचा पुत्र रथीतर होता. (१) रथीतराला संतान नव्हते. वंश-परंपरेचे रक्षण करण्यासाठी त्याने अंगिरा ऋषींना प्रार्थना केली. त्यांनी त्याच्या पत्नीपासून ब्रह्मतेजाने संपन्न असे अनेक पुत्र उत्पन्न केले. ते जरी रथीतराच्या पत्नीपासून उत्पन्न झाले होते, म्हणून रथीतराचे जे गोत्र होते तेच यांचे असावयास पाहिजे होते. तरीसुद्धा ते अंगिरसच म्हणविले गेले. हे रथीतर वंशाचे श्रेष्ठ पुरुष होते. कारण क्षत्रिय आणि ब्राह्मण अशा दोन्ही वर्णांशी त्यांचा संबंध होता. (२-३) एकदा मनूच्या शिंकण्याने त्याच्या नाकपुडीतून इक्ष्वाकू नावाचा पुत्र उत्पन्न झाला. इक्ष्वाकूचे शंभर पुत्र होते. विकुक्षी, निमी आणि दंडक हे त्यांपैकी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांच्याहून धाकटे पंचवीस पुत्र आर्यावर्ताच्या पूर्व भागाचे आणि पंचवीस पश्चिम भागाचे तसेच वरील तिघेजण मध्य भागाचे अधिपती झाले. उरलेले सत्तेचाळीस दक्षिण इत्यादि अन्य प्रांतांचे अधिपती झाले. एकदा इक्ष्वाकूने अष्टका श्राद्धाचे वेळी थोरल्या पुत्राला आज्ञा केली की, "विकुक्षे ! लगेच जाऊन श्राद्धाला योग्य पवित्र पशूचे मांस आण." "ठीक आहे." असे म्हणून विकुक्षी वनात गेला. तेथे त्याने श्राद्धासाठी योग्य अशा पुष्कळ पशूंची शिकार केली. तो थकला होता आणि त्याला भूकही लागली होती. म्हणून श्राद्धासाठी मारलेला पशू आपण खाऊ नये, हे विसरून त्याने एक ससा खाल्ला. विकुक्षीने उरलेले मांस आणून आपल्या पित्याला दिले. इक्ष्वाकूने त्यावर प्रोक्षण करायला आपल्या गुरूंना सांगितले. तेव्हा गुरुजींनी सांगितले की, हे मांस दूषित आणि श्राद्धासाठी अयोग्य आहे. गुरुजींच्या सांगण्यावरून क्क्ष्वाकूला आपल्या पुत्राने केलेल्या कृत्याचा उलगडा झाला. शास्त्रीय विधीचे उल्लंघन करणार्या आपल्या पुत्राला रागाने त्याने आपल्या देशातून बाहेर घालविले. त्यानंतर इक्ष्वाकूने आपले गुरुदेव वसिष्ठ यांच्याबरोबर ज्ञानविषयक चर्चा केली आणि योगाने शरीराचा त्याग करून परमपद प्राप्त करून घेतले. पित्याचा देहांत झाल्यानंतर विकुक्षी आपल्या राजधानीत परत आला आणि तो या पृथ्वीचे राज्य करू लागला. त्याने मोठमोठ्या यज्ञांनी भगवंतांची आराधना केली आणि जगात तो शशाद नावाने प्रसिद्ध झाला. विकुक्षीच्या पुत्राचे नाव पुरंजय होते. त्याला कोणी ’इंद्रवाह’ तर कोणी ’ककुत्स्थ’ म्हणतात. ज्या कर्मांमुळे त्याला ही नावे पडली, ते ऐक. (४-१२) सत्ययुगाच्या शेवटी देवांचे दानवांशी घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये देवांचा दैत्यांकडून पराभव झाला. तेव्हा त्यांनी आपल्याला साहाय्य करण्यासाठी वीर पुरंजयाला आपला मित्र बनविले. पुरंजय म्हणाला की, "जर देवराज इंद्र माझे वाहन होतील, तर मी युद्ध करीन." प्रथम इंद्राने हे मानले नाही. परंतु देवाधिदेव सर्वशक्तिमान विश्वात्मा भगवंतांच्या सांगण्यावरून शेवटी तो एक अतिशय मोठा बैल झाला. सर्वांतर्यामी भगवान विष्णूंनी आपल्या शक्तीने पुरंजयाला सिद्ध केले. त्याने कवच धारण करून दिव्य धनुष्य आणि तीक्ष्ण बाण घेतले. त्यानंतर बैलावर चढून तो त्याच्या वशिंडावर बसला. जेव्हा तो युद्धासाठी तयार झाला, तेव्हा देव त्याची स्तुती करू लागले. देवांना बरोबर घेऊन त्याने पश्चिमेकडे असलेल्या दैत्यांच्या नगराला घेरले. वीर पुरंजयाचा दैत्यांच्या बरोबर अत्यंत रोमांचकारी घोर संग्राम झाला. युद्धामध्ये जे जे दैत्य त्याच्यसमोर आले, त्यांना पुरंजयाने बाणांनी यमाच्या हवाली केले. त्या प्रलयकालीन धगधगत्या आगीप्रमाणे होणार्या बाणांच्या वर्षावाने छिन्नभिन्न झालेले दैत्य रणभूमी सोडून आपापल्या स्थानी पळून गेले. पुरंजयाने त्यांचे नगर, धन आणि ऐश्वर्य, सर्व काही जिंकून इंद्राला दिले. म्हणूनच त्या राजर्षीला ’पुर’ जिंकल्याकारणाने ’पुरंजय’, इंद्राला वाहन बनविल्याने ’इंद्रवाह’ आणि बैलाच्या ककुदावर (वशिंडावर) बसल्याकारणाने ’ककुत्स्थ’ म्हटले जाते. (१३-१९) पुरंजयाचा पुत्र अनेना होता. त्याचा पुत्र पृथू झाला. पृथूचा विश्वरन्धी, त्याचा चंद्र आणि चंद्राचा युवनाश्व. युवनाश्वाचा पुत्र झाला शाबस्त. त्याने शाबस्तीपुरी वसविली. शाबस्ताचा पुत्र बृहदश्व आणि त्याचा पुत्र कुवलयाश्व झाला. हा अत्यंत बलशाली होता. त्याने उत्तंक ऋषींना प्रसन्न करण्यासाठी आपले एकवीस हजार पुत्र बरोबर घेऊन धुंधू नावाच्या दैत्याचा वध केला. म्हणूनच त्याचे नाव ’धुंधूमार’ असे पडले. धुंधू दैत्याच्या मुखातील आगीमुळे त्याचे सर्व पुत्र जळाले. फक्त तीनच जिवंत राहिले. परीक्षिता ! जिवंत राहिलेल्या पुत्रांची नावे दृढाश्व, कपिलाश्व आणि भद्राश्व अशी होती. दृढाश्वापासून हर्यश्व आणि त्यापासून निकुंभ यांचा जन्म झाला. (२०-२४) निकुंभाचा बर्हणाश्व, त्याचा कृश्वाश्व, कृशाश्वाचा सेनजित आणि सेनजिताचा युवनाश्व नावाचा पुत्र झाला. युवनाश्वाला संतान नव्हते. म्हणून तो दुःखी होऊन आपल्या शंभर पत्न्यांसह वनामध्ये निघून गेला. तेथे दयाळू ऋषींनी युवनाश्वाकडून एकाग्रतेने इंद्रदेवतेचा यज्ञ करविला. रात्रीच्या वेळी युवनाश्वाला तहान लागली. तो यज्ञशाळेत गेला. परंतु ऋषी झोपलेले आहेत, असे पाहून अभिमंत्रित केलेले पाणीच तो प्याला. परीक्षिता ! जेव्हा ऋषी उठले, तेव्हा कलशात पाणी नाही, असे पाहून त्यांनी विचारले की, "हे कोणाचे काम आहे" पुत्र उत्पन्न करणारे पाणी कोण प्याले ?" भगवंतांच्या प्रेरणेने राजा युवनाश्वच ते पाणी प्याला, असे जेव्हा त्यांना कळले, तेव्हा भगवंतांना नमस्कार करून त्यांनी म्हटले, "धन्य आहे ! दैवाचे सामर्थ्यच खरे सामर्थ्य होय." यानंतर प्रसवसमय आल्यावर युवनाश्वाचे उजवीकडील पोट फाडून त्यातून एक चक्रवर्ती पुत्र उत्पन्न झाला. त्याला रडताना पाहून ऋषी म्हणाले - "हे बालक दुधासाठी फार रडत आहे. तर मग आता हे कुणाचे दूध पिणार." तेव्हा इंद्र म्हणाला,"(मां धाता) माझे पिणार." "पुत्रा ! तू रडू नकोस." असे म्हणून इंद्राने आपली तर्जनी त्याच्या तोंडात घातली. (कारण इंद्रयागातून जन्मला होता.) ब्राह्मण आणि देवांच्या प्रसादाने त्या मुलाचा पिता युवनाश्व यालासुद्धा मृत्यू आला नाही. तो तेथेच तपश्चर्या करून मुक्त झाला. इंद्राने त्याचे नाव त्रसद्दस्यू असे ठेवले. कारण रावण इत्यादि दस्यू (लूट्मार करणारे) त्याला भीत असत. युवनाश्वाचा पुत्र मांधाता (त्रसद्दस्यू) चक्रवर्ती राजा झाला. भगवंतांकडून मिळालेल्या तेजामुळे त्याने एकट्यानेच सात द्वीपे असलेल्या पृथ्वीचे पालन केले. तो जरी आत्मज्ञानी होता, तरीसुद्धा त्याने मोठ-मोठ्या दक्षिणायुक्त यज्ञांनी स्वयंप्रकाश, सर्वदेवस्वरूप, सर्वात्मा तसेच इंद्रियातीत अशा यज्ञस्वरूप प्रभूंची आराधना केली. यज्ञाची सामग्री, मंत्र, विधिविधान, यज्ञ, यजमान, ऋत्विज, धर्म, देश आणि काल, हे सर्व तर भगवंतांचेच स्वरूप आहे. जेथून सूर्याचा उदय होतो आणि जेथे त्याचा अस्त होतो, तो सगळा भूभाग युवनाश्वाचा पुत्र मांधाता याचाच होता. (२५-३७) मांधात्याची पत्नी शशबिंदूची कन्या बिंदुमती ही होती. तिच्यापासून पुरुकुत्स, अंबरीष आणि योगी मुचकुंद असे तीन पुत्र झाले. त्यांना पन्नास बहिणी होत्या. त्या पन्नास जणींनी एकट्या सौभरी ऋषींना पती म्हणून वरले. परम तपस्वी सौभरी एकदा यमुनेच्या पाण्यात बुडी मारून तपश्चर्या करीत होते. तेथे त्यांनी पाहिले की, एक मत्स्यराज आपल्या पत्नीसह सुख उपभोगीत आहे. त्याचे ते सुख पाहून ब्राह्मण सौभरींच्या मनामध्येसुद्धा विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि राजा मांधात्याकडे येऊन त्यांनी त्यांच्या पन्नास कन्यांपैकी एक कन्या मागितली. राजा म्हणाला, "ब्रह्मन् ! स्वयंवरात कन्येने आपल्याला वरले, तर आपण तिला घेऊन जा." सौभरी ऋषींना राजा मांधात्याचे मनोगत समजले. त्यांनी विचार केला की, राजाने मला अशासाठी हे रूक्ष उत्तर दिले की, "आता मी वृद्ध झालो आहे, माझ्या त्वचेला सुरकुत्या पडल्या आहेत. केस पिकले आहेत आणि मान हलू लागली आहे. आता कोणतीही स्त्री मला पसंत करणार नाही. ठीक आहे. मी आता स्वतःला असा सुंदर बनवीन की, राजकन्याच काय पण देवांगनासुद्धा माझ्यासाठी इच्छुक असतील." असा विचार करून समर्थ सौभरी तसेच गेले. (३८-४२) अंतःपुरातील रखवालाने कन्यांच्या सजविलेल्या महालात सौभरी मुनींना नेऊन सोडले. तेव्हा त्या पन्नासही राजकन्यांनी एका सौभरीलाच आपला पती म्हणून वरले. त्या कन्यांचे मन सौभरींमध्ये अशा प्रकारे आसक्त झाले की, त्या त्याच्यासाठी आपापसातील प्रेमभाव सोडून देऊन एकमेकींशी कलह करू लागल्या आणि एकमेकींना म्हणू लागल्या, "हे तुला योग्य नाहीत, मलाच योग्य आहेत." ऋग्वेदी सौभरींनी त्या सर्वांचे पाणिग्रहण केले. ते आपल्या अपरंपार तपश्चर्येच्या प्रभावाने बहुमूल्य सामग्रींनी सुसज्ज अनेक उपवने आणि निर्मल जलांनी भरलेल्या सरोवरांनी युक्त, तसेच सुगंधी फुलांच्या बगीच्यांनी घेरलेल्या महालांमध्ये बहुमूल्य शय्या, आसने, वस्त्रे, अलंकार, स्नान, सुगंधी उटणी, स्वादिष्ट भोजन आणि पुष्पमालांच्या योगाने आपल्या पत्नींसह विहार करू लागले. उत्तमोत्तम वस्त्रे, अलंकार इत्यादि धारण केलेली स्त्री-पुरुष नेहमी त्यांच्या सेवेत असत. कुठे पक्षी चिवचिवाट करीत, तर कुठे भुंगे गुंजारव करीत असत. सात द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचा स्वामी मांधाता, सौभरींचे हे गृहस्थाश्रमाचे सुख पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याचा सार्वभौम संपत्तीचा आपण स्वामी असल्याचा गर्व गळून गेला. अशाप्रकारे सौभरी अनेक विषयांचे सेवन करीत गृहस्थसुखात रममाण झालेले असले तरी ज्याप्रमाणे तुपाच्या थेंबांनी आग तृप्त होत नाही, त्याप्रमाणे तृप्त झाले नाहीत. (४३-४८) ऋग्वेदाचार्य सौभरी एक दिवस स्वस्थ चित्ताने बसले होते. त्यावेळी त्यांच्या मनांत विचार आला की, माशांच्या संगमाच्या दृश्याने आपण कशारीतीने आपली तपश्चर्या आणि स्वत्वसुद्धा घालवून बसलो. ते पुढे विचार करू लागले - "अरेरे ! मी तर तपस्वी आणि सदाचरणाचे निष्ठेने पालन करीत होतो. माझे झालेले हे अधःपतन पहा ! मी दीर्घकालपर्यंत केलेले तप पाण्यात विहार करणार्या माशांचा संगम पाहून नष्ट झाले. म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याने भोगात रमलेल्या प्राण्यांच्या जवळही जाता कामा नये आणि एका क्षणासाठी सुद्धा आपली इंद्रिये बहिर्मुख होऊ देऊ नयेत. एकट्यानेच रहावे आणि एकांतात आपले चित्त सर्वशक्तिमान भगवंतांमध्येच लावावे. संगतीच जर करावयाची असेल, तर भगवंतांच्या अनन्यप्रेमी निष्ठावान महात्म्यांचीच करावी. मी अगोदर एकांतात एकटाच तपश्चर्येमध्ये मग्न होतो. नंतर पाण्यांतील माशांचा संग झाल्याने विवाह करून पन्नास झालो आणि पुन्हा संतानांच्या रूपाने पाच हजार झालो. विषयांमध्ये सत्यबुद्धी ठेवल्याने मायेच्या गुणांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली. आता तर लोक आणि परलोक यासंबंधी माझे मन इतक्या विविध लालसांनी भरले आहे की, त्यांना अंतच नाही. अशा प्रकारे विचार करीत काही दिवस ते घरीच राहिले. नंतर विरक्त होऊन त्यांनी संन्यास घेतला आणि ते वनात निघून गेले. आपल्या पतीलाच सर्वस्व मानणार्या त्यांच्या पत्न्यासुद्धा त्यांच्याबरोबर वनात गेल्या. परम संयमी सौभरींनी तेथे जाऊन अतिशय घोर तपश्चर्या केली, शरीर कृश केले आणि आहवनीय इत्यादी अग्नींसह स्वतःला परमात्म्यामध्ये लीन केले. आपल्या पतीची ती आध्यात्मिक गती पाहून ज्वाळा जशा अग्नीमध्ये लीन होऊन जातात, त्याचप्रमाणे त्या पतीच्या प्रभावाने सती होऊन त्यांच्यामध्येच लीन झाल्या. (४९-५५) अध्याय सहावा समाप्त |