श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय ५ वा

दुर्वासांची दुःखनिवृत्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - भगवंतांनी असे सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास परत अंबरीषाकडे आले आणि अत्यंत दुःखी होऊन त्यांनी राजाचे पाय धरले. दुर्वासांचे हे कृत्य पाहून आणि त्यांनी पाय धरल्याने लज्जित होऊन अत्यंत दयाकुल अंबरीषाने भगवंतांच्या त्या चक्राची स्तुती केली. (१-२)

अंबरीष म्हणाला - हे सुदर्शना ! तू अग्नी, भगवान सूर्य, नक्षत्रमंडळाचा अधिपती चंद्र आहेस. जल, पृथ्वी, आकाश, वायू, पंचतन्माता आणि सर्व इंद्रियेसुद्धा तूच आहेस. भगवंतांना प्रिय, एक हजार दात असणार्‍या, हे सुदर्शना ! मी तुला नमस्कार करतो. सर्व अस्त्रांना नष्ट करणार्‍या आणि पृथ्वीचे रक्षण करणार्‍या चक्रा ! तू या ब्राह्मणाचे रक्षण कर. तूच धर्म, मधुर आणि सत्य वाणी, सर्व यज्ञांचा अधिपती आणि स्वतः यज्ञसुद्धा आहेस. तू सर्व लोकांचा रक्षक तसाच सर्वलोकस्वरूप सुद्धा आहेस. परम पुरुष परमात्म्याचे श्रेष्ठ तेज तू आहेस. हे सुनाभा, तू सर्व धर्मांच्या मर्यादांचा रक्षणकर्ता आणि अधर्माचे आचरण करणार्‍या असुरांचे भस्म करणारा अग्नी आहेस. तू तिन्ही लोकांचा रक्षक, विशुद्ध तेजोमय, मनोवेगासारखा गतिमान आणि अद्‍भुत कर्मे करणारा आहेस. तुला नमस्कार असो. मी तुझी स्तुती करतो. हे वेदवाणीच्या अधीश्वरा ! तुझ्या धर्ममय तेजाने अंधकाराचा नाश होतो आणि सूर्य इत्यादी महापुरुषांच्या प्रकाशाचे रक्षण होते. तुझा महिमा जाणणे कठीण आहे. लहान-मोठे असे हे सर्व कार्यकारणात्मक जग तुझेच स्वरूप आहे. हे अजिंक्य सुदर्शन चक्रा ! ज्यावेळी निरंजन भगवान तुला सोडतात, तेव्हा तू दैत्य-दानवांच्या सेनेत प्रवेश करून युद्धभूमीवर त्यांच्या भुजा, पोट, जांघा, पाय, मान इत्यादी अवयव कापीत अत्यंत शोभिवंत दिसतोस. हे विश्वरक्षका ! सर्वांचे प्रहार सहन करणार्‍या तुला गदाधारी भगवंतांनी दुष्टाच्या नाशासाठीच नेमले आहे. तू आमच्या कुलाच्या भाग्योदयासाठी दुर्वासांचे कल्याण कर. आमच्यावर तुझा हाच मोठा उपकार ठरेल. मी जर काही दान केले असेल, यज्ञ केला असेल किंवा आपल्या धर्माचे उत्तम पालन केले असेल, जर आमच्या वंशातील लोक ब्राह्मणांनाच आपले दैवत समजत असतील, तर दुर्वांचा त्रास नाहीसा होवो. सर्व गुणांचे एकमेव आश्रय असणार्‍या भगवंतांना जर मी समस्त प्राण्यांच्या आत्म्याच्या रूपात पाहिले असेल आणि ते माझ्यावर प्रसन्न असतील, तर दुर्वासांचा सर्व त्रास दूर होवो. (३-११)

श्रीशुक म्हणतात - दुर्वासांचा सगळ्या बाजूंनी दाह करणार्‍या भगवंतांच्या सुदर्शन चक्राची राजाने अशी स्तुती केली, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे ते चक्र शांत झाले. जेव्हा दुर्वास चक्राच्या आगीपासून मुक्त झाले आणि त्यांचे चित्त स्वस्थ झाले, तेव्हा ते त्या राजाला उत्तम आशीर्वाद देत त्याची प्रशंसा करू लागले. (१२-१३)

दुर्वास म्हणाले - धन्य आहे ! आज मी भगवंतांच्या भक्तांचे महत्त्व पाहिले. राजन् ! मी तुझा अपराध केलेला असूनही तू माझ्यासाठी शुभ कामनाच करीत आहेस. ज्यांनी भक्तवत्सल भगवान श्रीहरींच्या चरणकमलांना घट्ट मिठी मारली आहे, त्या साधुपुरुषांना कोणता अनुग्रह अवघड आहे ? आणि अशा महात्म्यांना कोणता अपराध विसरणे अशक्य आहे ? ज्यांच्या नामाच्या केवळ श्रवणाने जीव निर्मल होऊन जातो, त्या भगवंतांच्या दासांना कोणते कर्तव्य शिल्लक राहते ? महाराज, आपले हृदय करुणेने भरल्यामुळेच आपण माझ्यावर मोठेच उपकार केले. कारण मी केलेला अपराध विसरून माझ्या प्राणांचे रक्षण केलेत. (१४-१७)

राजा काही न खाता त्यांच्या परत येण्याची वाट पहात होता. आता त्याने दुर्वासांचे चरण धरून आणि त्यांना प्रसन्न करवून भोजन घातले. राजाने आदरपूर्वक आणलेले अतिथीला योग्य असे सर्व प्रकारचे भोजन करून दुर्वास तृप्त झाले. आणि राजाला आदराने म्हणाले, "राजन् ! आता आपणही भोजन करावे." भगवंतांचे भक्त असणार्‍या आपले दर्शन, स्पर्श, संवाद आणि मनाला भगवंतांकडे प्रवृत्त करणार्‍या आतिथ्याने मी अत्यंत प्रसन्न आणि उपकृत झालो आहे. स्वर्गातील देवांगना वारंवार आपल्या या उज्ज्वल चरित्राचे गायन करतील. ही पृथ्वीसुद्धा आपल्या परम पुण्यमय कीर्तीचे संकीर्तन करीत राहील." (१८-२१)

श्रीशुक म्हणतात - दुर्वासांनी अतिशय संतुष्ट होऊन राजाच्या गुणांची प्रशंसा केली आणि त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन फक्त निष्काम कर्माने प्राप्त होणार्‍या ब्रह्मलोकाकडे ते आकाशमार्गाने गेले. दुर्वास परत येईपर्यंत एक वर्षाचा कालावधी लोटला. इतके दिवसपर्यंत राजा त्यांच्या दर्शनाची इच्छा मनात धरून फक्त पाणी पिऊनच राहिला. (२२-२३)

जेव्हा दुर्वास निघून गेले, तेव्हा त्यांनी भोजन करून उरलेले अत्यंत पवित्र अन्न स्वतः खाल्ले. आपल्यामुळे दुर्वासांना दुःख भोगावे लागले आणि नंतर आपणच केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांची सुटका झाली. या दोन्ही गोष्टी स्वतःमुळे होऊनही त्यांनी तो भगवंतांचाच महिमा मानला. अशा अनेक गुणांनी संपन्न राजा आपल्या सर्व कर्मांच्या द्वारा परब्रह्म परमात्मा श्रीभगवंताविषयी भक्ती वाढवीत होता. त्यामुळे त्याला ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व भोग नरकासमान वाटत होते. (२४-२५)

त्यानंतर अंबरीषाने आपल्यासारखेच गुण असलेल्या पुत्रांवर राज्याचा भार सोपविला आणि तो स्वतः वनात निघून गेला. तेथे त्याने धैर्याने आत्मस्वरूप भगवंतांमध्ये आपले मन लावून गुणांच्या प्रवाहरूप संसारातून तो मुक्त झाला. महाराज, अंबरीषाचे हे परम पवित्र आख्यान जो वाचतो आणि त्याचे स्मरण करतो, तो भगवंतांचा भक्त होतो. (२६-२७)

अध्याय पाचवा समाप्त

GO TOP