श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २२ वा

देवहूतीबरोबर कर्दम प्रजापतींचा विवाह -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणाले - अशा प्रकारे जेव्हा कर्दमांनी मनूच्या संपूर्ण गुणांचे आणि कर्मांच्या श्रेष्ठतेचे वर्णन केले, तेव्हा तो काहीसे संकोचून निवृत्तिपरायण मुनींना म्हणाला. (१)

मनू म्हणाला - वेदमूर्ती भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या वेदमय रूपाचे रक्षण करण्यासाठी तप, विद्या, आणि योगसंपन्न तसेच विषयांमध्ये अनासक्त अशा तुम्हां ब्राह्मणांना आपल्या मुखापासून प्रगट केले आहे. नंतर हजारो चरण असलेल्या त्या विराट पुरुषाने सर्वांचे रक्षण करण्यासाठीच आपल्या हजारो भुजांपासून आम्हां क्षत्रियांना उत्पन्न केले आहे. अशा प्रकारे ब्राह्मण त्यांचे हृदय आणि क्षत्रिय शरीर म्हणविले जाते. म्हणून एकाच शरीराशी संबंधित असल्याकारणाने स्वतःचे आणि एक-दुसर्‍याचे संरक्षण करणार्‍या त्या ब्राह्मण आणि क्षत्रियांचे वास्तविक श्रीहरीच रक्षण करतात. ते सर्व कार्यांचे कारणरूप असूनही वास्तविक पाहता निर्विकार आहेत. आपल्या केवळ दर्शनानेच माझे सर्व संदेह दूर झाले आहेत. कारण आपण माझ्य़ा प्रशंसेच्या निमित्ताने प्रजा पालन करण्याची इच्छा ठेवणार्‍या राजाच्या धर्मांचे मोठया प्रेमाने निरूपण केले आहे. ज्यांनी आपली इंद्रिये जिंकलेली नाहीत, अशांना आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. माझे मोठे भाग्य की, मला आपले दर्शन झाले आणि मी आपल्या चरणांची पवित्र धूळ आपल्या मस्तकी ठेवू शकलो. माझा भाग्योदय झाला म्हणूनच आपण मला राजधर्माचा उपदेश देऊन माझ्यावर मोठीच कृपा केली आणि मी सुद्धा माझे प्रारब्ध उजाडल्यामुळेच आपली पवित्र वाणी एकाग्रतेने ऐकली. (२-७)

हे मुने, या कन्येच्या स्नेहामुळे माझे चित्त फार चिंताग्रस्त झाले आहे. म्हणून नम्र अशा माझी ही प्रार्थना आपण कृपया ऐकावी. प्रियव्रत आणि उत्तानपादाची बहीण असलेली माझी ही कन्या वय, शील, आणि गुण यांनी संपन्न असा पती मिळण्याची इच्छा करीत आहे. जेव्हा हिने नारदांच्या मुखातून आपले शील, विद्या, रूप, वय आणि गुणांचे वर्णन ऐकले, तेव्हापासूनच तिने आपल्याला पती म्हणून वरण्याचा निश्चय केला आहे. हे द्विजवर, मी मोठया श्रद्धेने आपल्याला ही कन्या अर्पण करीत आहे, आपण हिचा स्वीकार करावा. गृहस्थाला उचित अशी सर्व कर्मे करण्यास ही सर्व दृष्टींनी आपल्याला योग्य आहे. जो भोग स्वतःहून प्राप्त होईल, त्याची अवहेलना करणे विरक्त पुरुषाला सुद्धा योग्य नाही. तर मग विषयासक्ताबद्दल काय सांगावे ? जो पुरुष स्वतः प्राप्त झालेल्या भोगाचा आदर करीत नाही आणि एखाद्या कंजुष माणसापुढे हात पसरतो, त्याचे सर्वदूर पसरलेले यशही नाहीसे होते आणि दुसर्‍यांनी तिरस्कार केल्याने त्याचा मानभंग होतो. हे विद्वन, मी असे ऐकले आहे की, आपण विवाह करण्यासाठी उत्सुक आहात. म्हणून ठराविक काळापुरते ब्रह्मचर्य पाळणार्‍या आपण या कन्येचा स्वीकार करावा. मी हिला आपल्याला अर्पण करीत आहे. (८-१४)

कर्दम मुनी म्हणाले - ठीक आहे. विवाह करण्याची माझी इच्छा आहे आणि आपल्या कन्येचा अजून कोणाशी वाङ्‌निश्चय झालेला नाही. म्हणून आम्हां दोघांचा सर्वश्रेष्ठ अशा ब्राह्म-विधीने विवाह होणे उचित ठरेल. हे राजन, तुझ्या या मुलीचा वेदोक्त विवाह-विधीमध्ये प्रसिद्ध असलेला संतान-उत्पादनरूप मनोरथ पूर्ण होईल. जी आपल्या अंगकांतीने शोभा देणार्‍या अलंकारांनाही तुच्छ करीत आहे, अशा आपल्या कन्येचा कोण आदर करणार नाही ? ही कन्या एक दिवस आपल्या महालाच्या गच्चीवर चेंडू खेळत होती. चेंडूच्या मागे मागे पळताना हिचे डोळे चंचल होत होते आणि पायांतील नूपुर मधुर झंकार करीत होते. त्यावेळी हिला पाहून विश्वावसू गंधर्व मोहाने बेशुद्ध होऊन आपल्या विमानातून खाली पडला होता. तीच यावेळी येथे स्वतः येऊन विनंती करीत आहे, अशा स्थितीत कोणता शहाणा पुरुष हिचा स्वीकार करणार नाही ? ही तर साक्षात महाराज श्रीस्वायंभुव मनूची कन्या आणि उत्तानपादाची प्रिय बहीण आहे. तसेच सुंदर स्त्रियांमध्ये ही रत्‍न आहे. ज्यांनी कधी श्रीलक्ष्मीच्या चरणांची उपासना केलेली नाही, त्यांना तर हिचे दर्शन सुद्धा होऊ शकणार नाही. म्हणून मी या आपल्या साध्वी कन्येचा अवश्य स्वीकार करीन, परंतु एका अटीवर. जोपर्यंत हिला संतान होणार नाही, तोपर्यंत गृहस्थधर्मानुसार मी हिच्यासमवेत राहीन. त्यानंतर(मात्र) भगवंतांनी सांगितलेल्या संन्यासप्रधान, हिंसारहित, शम-दमादी धर्मांना प्राधान्य देईन. ज्यांच्यापासून या वैचित्र्यपूर्ण जगाची उत्पत्ती झाली आहे, ज्यांच्यामध्ये हे लीन होते आणि ज्यांच्या आश्रयाने हे स्थित आहे, ते प्रजापतींचेही पती असलेले भगवान श्री अनंत मला श्रेष्ठ प्रमाण आहेत. (१५-२०)

मैत्रेय म्हणाले - धनुर्धर विदुरा, कर्दम मुनी केवळ एवढेच बोलू शकले. नंतर ते हृदयात भगवान कमलनाभांचे ध्यान करीत स्तब्ध झाले. त्यावेळी त्यांच्या मंद हास्ययुक्त मुखकमलाला पाहून देवहूतीचे चित्त त्यांच्यावर लुब्ध झाले. मनूने महाराणी शतरूपा आणि राजकुमारीची स्पष्ट अनुमती जाणून अनेक गुणांनी संपन्न असलेल्या कर्दमांना त्यांच्याचसारखी गुणवती कन्या आनंदाने प्रदान केली. यावेळी महाराणी शतरूपाने सुद्धा कन्या आणि जावई यांना मोठया प्रेमाने पुष्कळशी बहुमोल वस्त्रे, अलंकार आणि गृहस्थाश्रमाला उचित असे साहित्य दिले. अशा प्रकारे सुयोग्य वराला आपली कन्या देऊन महाराज मनू निश्चिंत झाला. निरोप घेताना तिचा वियोग सहन न होऊन उत्कंठेने चित्त व्याकूळ झाल्यामुळे तिला छातीशी कवटाळून "मुली, बाळे," म्हणत तो रडू लागला. तेव्हा त्याच्या नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्या अश्रूंनी त्याने देवहूतीची सारी वेणी भिजवली. नंतर कर्दमांचा निरोप घेऊन त्यांच्या अनुमतीने तो राणी व परिवारासह रथावर बसून ऋषिकुलांनी सेवन केलेल्या सरस्वती नदीच्या दोन्ही तीरांवरील शांत मुनींच्या आश्रमांची शोभा पाहात आपल्या राजधानीला परतला. (२१-२७)

आपले महाराज येत आहेत, हे जाणून ब्रह्मावर्तातील प्रजा अत्यंत आनंदित होऊन, स्तुती, गाणी आणि मंगल-वाद्यांसह स्वागत करण्यासाठी सामोरी आली. सर्व वैभवाने संपन्न असणारी बर्हिष्मती नगरी मनूची राजधानी होती. पृथ्वीला रसातळातून वर आणल्यानंतर तेथे अंग झाडताना श्रीवराहभगवानांचे केस गळून पडले होते. तेच केस नंतर नेहमी हिरवेगार असणारे दर्भ आणि लव्हाळे झाले. त्यांच्याद्वारा मुनींनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणार्‍या दैत्यांचा पराभव करून यज्ञ केले. ज्यांच्याकडून भूमीरूप निवासस्थान प्राप्त झाले, त्या श्रीयज्ञभगवानांसाठी महाराज मनूने याच ठिकाणी दर्भ आणि लव्हाळे यांचे आसन आंथरून यज्ञ केले होते. (२८-३१)

ज्या बर्हिष्मतीपुरीत मनू निवास करीत होता तेथे जाऊन त्याने आध्यात्मिक, आधिदैविक, व आधिभौतिक ताप नाहीसे करणार्‍या राजभवनामध्ये प्रवेश केला. तेथे आपली पत्‍नी आणि संततीसह तो धर्म, अर्थ आणि मोक्षाला अनुसरून असणारे भोग भोगू लागला. तेथे प्रातःकाळी गंधर्व आपल्या पत्‍नींसह त्याचे गुणगान करीत; परंतु मनू मात्र त्यात आसक्त न होता प्रेमपूर्ण हृदयाने श्रीहरींच्या कथा ऐकत असे. मनू आपल्या इच्छेनुसार भोग निर्माण करण्यात कुशल असूनही मननशील आणि भगवत्परायण असलेल्या त्याला भोग जराही विचलित करू शकत नव्हते. भगवान विष्णूंच्या कथांचे श्रवण, ध्यान, रचना आणि निरूपण करीत राहिल्याकारणाने त्याचे मन्वन्तर व्यतीत होत असतानाचे क्षण कधीच वाया जात नव्हते. अशा प्रकारे आपल्या जागृती आदी तीन अवस्था किंवा तीन गुणांचा पराभव करून त्याने भगवान वासुदेवांच्या कथाप्रसंगांमध्ये आपल्या मन्वन्तराची एकाहत्तर चतुर्युगे घालविली. व्यासपुत्र विदुरा, जो पुरुष श्रीहरींच्या आश्रयाने राहतो त्याला शारीरिक, मानसिक, दैविक, मानवी किंवा भौतिक दुःखे कशी त्रास देणार ? मनू नेहमी सर्व प्राण्यांचे हित करण्यात व्यग्र असे. मुनींनी विचारल्यानंतर त्याने माणसांच्या वर्णाश्रमांचे अनेक प्रकारचे कल्याणकारक धर्म वर्णन केले आहेत. (ते ‘मनुस्मृती ’म्हणून आजही उपलब्ध आहेत.) (३२-३८)

जगातील सर्वप्रथम सम्राट महाराज मनूच्या वर्णन करण्यास योग्य अशा अद्‌भुत चरित्राचे मी वर्णन केले. आता त्याच्या कन्येचा प्रभाव ऐक. (३९)

स्कंध तिसरा - अध्याय बाविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP