|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय २१ वा
कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] विदुराने विचारले - "भगवन, स्वायंभुव मनूचा वंश मोठा आदरणीय मानला गेला आहे. त्यात मैथुनधर्माने प्रजेची वृद्धी झाली होती. आता आपण मला त्याची कथा ऐकवावी. ब्रह्मन, आपण म्हणाला होतात की, स्वायंभुव मनूचे पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद यांनी सात द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचे धर्मपूर्वक पालन केले होते आणि त्यांची देवहूती नावाची कन्या हिचा कर्दमप्रजापतींशी विवाह झाला होता. यम इत्यादी योगाच्या लक्षणांनी देवहूती संपन्न होती. तिच्यापासून महायोगी कर्दमांना किती संताने झाली ? तो सर्व प्रसंग आपण मला सांगावा. मला तो ऐकण्याची खूप इच्छा आहे. तसेच भगवान रुची आणि ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापतींनीसुद्धा मनूंच्या कन्यांचे पाणिग्रहण करून त्यांच्यापासून कोणत्या प्रकारे कोणकोणती संतती उत्पन्न केली, ते सर्व चरित्र मला सांगावे. (१-५) मैत्रेय म्हणाले - जेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान कर्दमांना आज्ञा केली की, तुम्ही प्रजोत्पत्ती करावी. तेव्हा त्यांनी दहा हजार वर्षांपर्यंत सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या केली. ते एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक पूजादी उपचारांनी शरणागतवरदायक श्रीहरींची आराधना करू लागले. हे विदुरा, तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी कमलनयन भगवान श्रीहरींनी प्रसन्न होऊन आपल्या शब्दब्रह्ममय स्वरूपाने मूर्तिमान होऊन त्यांना दर्शन दिले. (६-८) भगवंतांची ती भव्य मूर्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. त्यांनी गळ्यात पांढर्या आणि निळ्या कमळांची माळ धारण केली होती, त्यांचे मुखकमल काळ्या आणि सुंदर केसांच्या बटांनी सुशोभित दिसत होते. त्यांनी स्वच्छ वस्त्र परिधान केले होते. मस्तकावर झगमगणारा सुवर्णमय मुगुट, कानात चमकणारी कुंडले आणि हातांमध्ये शंख चक्र, गदा ही आयुधे होती. त्यांच्या एका हातात क्रीडेसाठी घेतलेले पांढरे कमळ शोभून दिसत होते. प्रभूंचे मधुर, हास्यमय मुखकमल चित्त आकर्षित करून घेत होते. त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. वक्षःस्थळावर श्रीलक्ष्मी आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. प्रभूंच्या या आकाशस्थित मनोहर मूर्तीचे दर्शन करून कर्दमांना फार आनंद झाला. त्यांच्या सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी प्रसन्न हृदयाने पृथ्वीवर मस्तक टेकवून भगवंतांना साष्टांग नमस्कार केला आणि नंतर प्रेमाने मनःपूर्वक हात जोडून सुमधुर वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले. (९-१२) कर्दम म्हणाले - हे स्तुती करण्यायोग्य परमेश्वरा, आपण संपूर्ण सत्त्वगुणाचे निधी आहात. योगीजन उत्तरोत्तर शुभ योनींमध्ये जन्म घेऊन शेवटी योगस्थ झाल्यावर आपल्या ज्या दर्शनाची इच्छा करतात, तेच आपले दर्शन आज आम्हांला झाल्याने आमचे नेत्र धन्य झाले. भवसागरातून पार होण्यासाठी आपले चरणकमल जहाज आहेत. असे असूनही ज्यांची बुद्धी आपल्या मायेने लोप पावली आहे, तेच केवळ नरकामध्येही मिळणार्या तुच्छ क्षणिक विषयसुखांसाठी, त्या चरणांचा आश्रय घेतात. परंतु स्वामी, आपण तर त्यांना ते विषयभोगही देताच. प्रभो, तसाच कामकलुषितहृदय असलेला मीसुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप आणि गृहस्थधर्म पालन करण्यास सहायक अशा कन्येशी विवाह व्हावा, म्हणून आपल्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना पुरविणार्या चरणकमलांना शरण आलो आहे. सर्वेश्वरा, आपण सर्व लोकांचे अधिपती आहात. नाना प्रकारच्या कामनांमध्ये गुंतलेले हे लोक आपल्या वेदवाणीरूप दोरीने बांधलेले आहेत. हे धर्ममूर्ते, त्यांचेच अनुकरण करीत मीही कालरूप आपल्याला कर्ममय आज्ञापालनरूप पूजा समर्पण करीत आहे. (१३-१६) आपले भक्त, विषयासक्त लोक आणि त्यांच्याच मार्गांचे अनुकरण करणार्या माझ्यासारख्या कर्मजड पशूंची पर्वा न करता आपल्य़ा चरणांच्या छत्रछायेचाच आश्रय घेतात. तसेच एकमेक आपल्या गुणगानरूप चविष्ट सुधेचे पान करून आपल्या तहान-भूक इत्यादी देहधर्मांना शांत करतात. प्रभो, हे कालचक्र मोठे प्रबळ आहे. साक्षात ब्रह्म याची फिरण्याची धुरी आहे. अधिक मासासह तेरा महिने आरे आहेत. तीनशे साठ दिवस जोड आहेत, सहा ऋतू चाकाचा घेर, अनंत क्षण-पल इत्यादी याच्या तीक्ष्ण धारा आहेत. तसेच तीन चातुर्मास याची आधारभूत तीन वर्तुळे आहेत. हे अत्यंत वेगवान संवत्सररूप कलचक्र चराचर जगाचे आयुष्य संपवत फिरत असते; परंतु आपल्या भक्तांच्या आयुष्याचा र्हास करू शकत नाही. भगवन, ज्याप्रमाणे कोळी-कीटक स्वतःच जाळे पसरतो, त्याचे रक्षण करतो आणि शेवटी ते गिळून टाकतो त्याचप्रमाणे आपण एकटेच या जगाची रचना करण्यासाठी आपल्याशी अभिन्न अशा योगमायेचा स्वीकार करून त्यातून अभिव्यक्त झालेल्या आपल्या सत्त्वगुणादी शक्तिद्वारा स्वतःच या जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करता. प्रभो, यावेळी आपण आपल्या तुळसीमालामंडित, मायेने परिच्छिन्न दिसणार्या सगुण-मूर्तीचे आम्हांला दर्शन दिले आहे. आपण आम्हां भक्तांना जे शब्दादी विषयसुख प्रदान करता, ते मायिक असल्याकारणाने आपल्याला जरी पसंत नसले तरी परिणामतः आमचे कल्याण करण्यासाठी असल्याने ते आम्हांला प्राप्त होवो. (१७-२०) आपण स्वरूपतः निष्क्रिय असूनसुद्धा मायेच्या द्वारा सर्व जगाचा व्यवहार चालविणारे आहात. तसेच अल्पशी उपासना करणार्यांवरसुद्धा सर्व इच्छित वस्तूंचा वर्षाव करणार्या आपल्या वंदनीय चरणकमलांना मी वारंवार नमस्कार करतो. (२१) मैत्रेय म्हणाले - भगवंतांच्या भुवया प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त दृष्टीने चंचल होत होत्या. ते गरुडाच्या खांद्यावर विराजमान झाले होते. कर्दमांनी जेव्हा निष्कपटभावाने त्यांची स्तुती केली, तेव्हा ते अमृतवाणीने बोलू लागले. (२२) श्री भगवान म्हणाले - ज्यासाठी तू आत्मसंयम करून माझी आराधना केली आहेस, तो तुझ्या हृदयातील हेतू जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केली आहे. प्रजापते, माझी आराधना कधीच निष्फळ होत नाही; त्यातून ज्यांचे चित्त नेहमी माझ्या ठिकाणीच लागलेले असते, त्या तुझ्यासारख्या महात्म्या लोकांनी केलेली उपासना तर अधिकच फलदायी होते. प्रजापतिपुत्र सदाचारसंपन्न सम्राट स्वायंभुव मनू ब्रह्मावर्तामध्ये राहून सात समुद्रांनी वेढलेल्या सर्व पृथ्वीचे राज्य करीत आहे. विप्रवर, तो धर्मज्ञ राजर्षी मनू शतरूपा राणीबरोबर तुला भेटण्यासाठी परवा येथे येईल. त्याची एक रूप, यौवन, शील आदी गुणांनी संपन्न, काळेभोर डोळे असलेली कन्या या वेळी विवाहाला योग्य झाली आहे. प्रजापते, तू तिच्यासाठी सर्व दृष्टींनी योग्य आहेस. म्हणून तो तुलाच ती कन्या अर्पण करील. ब्रह्मन, गेल्या अनेक वर्षांपासून तुझे चित्त जशा पत्नीची इच्छा करीत आहे, तशीच ती राजकन्या लवकरच तुझी पत्नी होऊन तुझी यथेष्ट सेवा करील. ती तुझे वीर्य आपल्या गर्भात धारण करून त्यापासून नऊ कन्या उत्पन्न करील आणि पुन्हा त्या कन्यांपासून लोकरीतीला अनुसरून मरीची आदी ऋषिगण पुत्र उत्पन्न करतील. तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन करून शुद्धचित्त होऊन, नंतर आपली सर्व कर्मफळे मला अर्पण करून मलाच प्राप्त होशील. जीवांवर दया करून तू आत्मज्ञान प्राप्त करशील आणि नंतर सर्वांना अभयदान देऊन स्वतःसहित संपूर्ण जगताला माझ्यामध्ये आणि मला तुझ्यात स्थित असलेला पाहाशील. महामुनी, मीसुद्धा माझ्या अंश-कलारूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूतीच्या गर्भात अवतीर्ण होऊन सांख्यशास्त्राची रचना करीन.(२३-३२) मैत्रेय म्हणाले- कर्दमऋषींना असे सांगून इंद्रिये अंतर्मुख झाल्यावरच प्रकट होणारे श्रीहरी सरस्वती नदीने घेरलेल्या बिंदुसर तीर्थावरून निघून गेले. भगवंतांच्या सिद्ध मार्गाची(वैकुंठ मार्गाची) सर्व सिद्धपुरुष प्रशंसा करतात. कर्दम पाहात असतानाच ते त्या मार्गाने गरुडाच्या पंखांतून प्रगट होणार्या सामवेदाच्या आधारभूत ऋचा ऐकत निघाले. (३३-३४) श्रीहरी निघून गेल्यावर त्यांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहात भगवान कर्दम ऋषी बिंदुसरोवरावरच राहिले. वीरवर, इकडे मनूसुद्धा महाराणी शतरूपा आणि कन्या यांना सुवर्णजडित रथात बसवून पृथ्वीवर फिरत फिरत भगवंतांनी जो दिवस सांगितला होता, त्या दिवशी शांतिपरायण महर्षीं कर्दमांच्या त्या आश्रमात पोहोचले. सरस्वतीच्या पाण्याने भरलेले हे बिंदुसरोवर असे स्थान आहे की जेथे, आपला शरणागत भक्त कर्दमाबद्दल उत्पन्न झालेल्या अत्यंत करुणेने भगवंतांच्या डोळ्यांतून अश्रुबिंदू ओघळले होते. हे फार पवित्र तीर्थ आहे. याचे पाणी कल्याणप्रद आणि अमृतासारखे मधुर आहे. तसेच महर्षिगण नेहमी याचे सेवन करतात. हे बिंदु-सरोवर पवित्र वृक्ष-वेलींनी वेढलेले होते. त्यात निरनिराळे शब्द करणारे पवित्र पशुपक्षी राहात होते. ते स्थान सर्व ऋतूंमधील फळांनी आणि फुलांनी संपन्न होते आणि सुंदर वनराई त्याची शोभा वाढवीत होती. तेथे मदमस्त पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते. धुंद भ्रमर गुंजारव करीत होते. आनंदित मोर पिसारा पसरून नृत्य करीत होते आणि आनंदित झालेले कोकिळ कुहू-कुहू करून एकमेकांना बोलावीत होते. तो आश्रम कदंब, चंपक, अशोक, करंज, बकुळ, आसणा, कुंद, मंदार, कुडा आणि लहान लहान आम्रवृक्षांनी अलंकृत झाला होता. तेथे कारंडव, बदक, बेडूक, हंस, कुरर, पाणकोंबडा, सारस, चकवे आणि चकोर पक्षी मधुर किलबिलाट करीत होते. तसेच हरीण, डुक्कर, साळी, गवे, हत्ती, वानर, सिंह, माकडे, मुंगुस, कस्तुरीमृग आदी पशूंनी तो आश्रम भरलेला होता. (३५-४४) आदिराजा मनू त्या श्रेष्ठ तीर्थाच्या ठिकाणी कन्येसह पोहोचल्यावर मुनिवर कर्दम अग्निहोत्र करून बसलेले त्यांनी पाहिले. पुष्कळ दिवसपर्यंत उग्र तपस्या केल्यामुळे त्यांचे शरीर अत्यंत तेजस्वी दिसत होते. तसेच भगवंतांनी स्नेहपूर्ण नजरेने पाहिल्यामुळे आणि त्यांनी उच्चारलेल्या कर्णामृतरूप मधुर वचनांच्या श्रवणाने इतके दिवस तपश्चर्या करूनही ते विशेष दुर्बल दिसत नव्हते. ते उंच होते. त्यांचे नेत्र कमलदलासारखे होते. डोक्यावर जटा शोभून दिसत होत्या आणि कमरेला वल्कले होती. त्यांना जवळून पाहिले तर संस्कार न केलेल्या बहुमोल रत्नासारखे ते मलीन दिसत होते. नंतर महाराज स्वायंभुव मनूला आपल्या पर्णकुटीत येऊन प्रणाम करताना पाहून त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन प्रसन्न केले आणि यथोचित आदरातिथ्य करून त्याचे स्वागत केले. (४५-४८) पूजेचा स्वीकार करून जेव्हा मनू स्वस्थ चित्ताने आसनावर बसला तेव्हा मुनिवर कर्दमांनी भगवंतांच्या आज्ञेचे स्मरण होऊन आपल्या मधुर वाणीने त्याला प्रसन्न करीत म्हटले. "महाराज, आपण भगवान विष्णूचे पालनशक्तिरूप आहात. म्हणून आपले संचार करणे हे निश्चितच सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा संहार करण्यासाठीच आहे. आपण साक्षात विष्णुस्वरूप आहात. तसेच निरनिराळ्या कार्यांसाठी सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वायू, यम, धर्म, आणि वरुण इत्यादी रूपे धारण करता. आपणांस नमस्कार असो. आपण रत्नजडित विजयी रथावर आरूढ होऊन आपल्या तेजस्वी प्रचंड धनुष्याचा टणत्कार करीत त्या रथाच्या गडगडाटानेसुद्धा पापी लोकांना भय उत्पन्न करता आणि आपल्या सेनेच्या पायांनी रगडलेल्या भूमंडलाचा थरकाप करीत आपल्या त्या विशाल सेनेला बरोबर घेऊन पृथ्वीवर सूर्यासारखे भ्रमण करता. आपण असे केले नाही तर भगवंतांनी निर्माण केलेल्या वर्णाश्रमधर्माची मर्यादा चोर, डाकू, इत्यादी तत्काळ नाहीशी करतील आणि विषयलोलुप निरंकुश मानवांच्या द्वारे सगळीकडे अधर्माचा प्रसार होईल. जर आपण जगाच्या बाबतीत निष्काळजी झालात तर हे जग दुराचारी लोकांच्या तावडीत सापडून नष्ट होईल. तरीसुद्धा वीरवर, मी आपल्याला विचारतो की, यावेळी आपले कोणत्या कारणाने इथे आगमन झाले आहे ? आपण मला आज्ञा करावी. तिचा मी निष्कपट भावाने स्वीकार करीन." (४९-५६) स्कंध तिसरा - अध्याय एकविसावा समाप्त |