श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १२ वा

सृष्टीचा विस्तार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय म्हणाले - विदुरा, अशा रीतीने मी तुला भगवंतांचा कालरूप महिमा ऐकविला. आता ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे विश्वाची रचना केली, ते ऐक. प्रथम त्यांनी तम(अविद्या), मोह(अस्मिता), महामोह(राग), तामिस्त्र(द्वेष) आणि अंधतामिस्त्र(अभिनिवेश) या अज्ञानाच्या पाच वृत्ती निर्माण केल्या. परंतु ही अत्यंत पापमय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाहीत. तेव्हा भगवंतांचे ध्यान करून त्यांनी आपले मन पवित्र केले आणि दुसर्‍या सृष्टीची रचना केली. यावेळी ब्रह्मदेवांनी सनक, सनंदन, सनातन, आणि सनत्कुमार या चार निवृत्तिपरायण ऊर्ध्वरेता मुनींची उत्पत्ती केली. आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले, "पुत्रांनो ! तुम्ही प्रजा उत्पन्न करा. "परंतु ते जन्मतःच निवृत्तिपरायण आणि भगवच्चिंतनात तत्पर असल्याने ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती. आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहेत, असे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आला. आपला क्रोध आवरण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. त्यांनी विवेकाने क्रोध आवरण्याचा प्रयत्‍न करून सुद्धा तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवाच्या भुवयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रगट झाला. ते (बालक म्हणजेच) देवतांचे पूर्वज भगवान भव (रुद्र) रडत-रडत म्हणू लागले, "जगत्पिता विधाता, माझी नावे आणि राहण्याची ठिकाणे सांगा." (१-८)

तेव्हा कमलयोनी भगवान ब्रह्मदेव त्या बालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुर वाणीने म्हणाले की, "रडू नकोस. मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो." हे देवश्रेष्ठ, तू दुःखी बालकाप्रमाणे स्फुंदून-स्फुंदून रडू लागलास, म्हणून प्रजा तुला ‘रुद्र’ नावाने संबोधतील. तुझ्या राहण्यासाठी मी अगोदरच हृदय, इंद्रिये, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र, आणि तप ही स्थाने उत्पन्न केली आहेत. मन्यू, मन, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव, आणि धृतव्रत अशी तुझी नावे असतील. तसेच धी, वृत्ती, उशना, उमा, नियुत, सर्पि, इला, अंबिका, इरावती, सुधा, आणि दीक्षा या अकरा रूद्राणी तुझ्या पत्‍न्या असतील. तू वरील नावांचा, स्थानांचा, आणि स्त्रियांचा स्वीकार कर आणि त्यांच्या द्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर. कारण तू प्रजापती आहेस. (९-१४)

लोकपिता ब्रह्मदेवांची अशी आज्ञा घेऊन भगवान नीललोहित आपल्यासारखेच बल, आकार, आणि स्वभाव असणारी प्रजा निर्माण करू लागला. रुद्राने उत्पन्न केलेले त्या रुद्रांचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करीत आहेत, असे पाहून ब्रह्मदेवांना भीती वाटली. ते रुद्राला म्हणाले - "सुरश्रेष्ठ, तुझी प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला आणि सर्व दिशांना भस्म करू पाहात आहे. तेव्हा अशी प्रजा निर्माण करू नकोस. तुझे कल्याण असो, आता तू सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप कर. नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर. पुरुष तपानेच इंद्रियातीत, सर्वांतर्यामी आणि ज्योतिःस्वरूप श्रीहरीला सुलभतेने प्राप्त करून घेऊ शकतो." (१५-१९)

मैत्रेय म्हणाले - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशी आज्ञा केली, तेव्हा रुद्राने ‘फारच चांगले’ असे म्हणून आज्ञा शिरसावंद्य मानली आणि त्यांची अनुमती घेऊन, त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. (२०)

यानंतर जेव्हा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्पत्तीसाठी संकल्प केला, तेव्हा त्यांना आणखी दहा पुत्र झाले. त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगू, वसिष्ठ, दक्ष, आणि दहावे नारद अशी त्यांची नावे होत. यांपैकी नारद ब्रह्मदेवाच्या मांडीपासून, दक्ष आंगठ्यापासून, वसिष्ठ प्राणांपासून, भृगू त्वचेपासून, क्रतू हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानांपासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्यांपासून, आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले. त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला. ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले, त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला. त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला. तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठांपासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती, लिंगापासून समुद्र, गुदस्थानापासून पापांचे निवासस्थान निर्ऋती उत्पन्न झाले. सावलीपासून देवहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे सर्व जग जगत्कर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले. (२१-२७)

विदुरा, ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती. आम्ही ऐकले आहे की, ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात कामवासना निर्माण झाली. असा अधर्मी विचार ब्रह्मदेवांच्या मनात आलेला पाहून त्यांचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले. तात, आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवरू शकला नाहीत आणि कन्या-गमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात. असे तर यापूर्वी कोणीही केले नाही, आणि पुढेही कोणी करणार नाही. हे जगद्‌गुरो, आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही. कारण आपल्यासारख्यांच्या आचरणाचेच अनुकरण केल्याने या जगातील लोकांचे कल्याण होते. ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थित असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रगट केले आहे, त्यांना नमस्कार असो. यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे. आपले पुत्र मरीची आदी प्रजापती आपल्यासमोरच असे म्हणत आहेत असे पाहून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव लज्जित झाले आणि त्यांनी त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला. तेव्हा त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या. तेच धुके झाले. त्याला अंधार असेही म्हणतात. (२८-३३)

एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की, मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू ? त्याच वेळी त्यांच्या चार मुखातून चार वेद प्रगट झाले. त्याखेरीज उपवेद, न्यायशास्त्र, होता, उद्‌गाता, अध्वर्यु, आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांचे कर्म, यज्ञांचा विस्तार, धर्माचे चार चरण आणि चार आश्रम तसेच त्यांच्या वृत्ती, हे सर्व ब्रह्मदेवांच्या मुखापासूनच उत्पन्न झाले. (३४-३५)

विदुराने विचारले - हे तपोधन, विश्वरचनेचे स्वामी श्रीब्रह्मदेवांनी आपल्या मुखांतून या वेद इत्यादींची रचना केली. तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली, हे आपण सांगावे. (३६)

मैत्रेय म्हणाले - विदुरा, ब्रह्मदेवांनी आपल्या पूर्व, दक्षिण, पश्चिम, आणि उत्तर या मुखांपासून अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाची रचना केली. तसेच याच क्रमाने शस्त्र(होत्याचे कर्म), इज्या(अध्वर्यूचे कर्म), स्तुतिस्तोम(उद्‌गात्याचे कर्म) आणि प्रायश्चित(ब्रह्म्याचे कर्म) या चारांची रचना केली. याच रीतीने आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, आणि स्थापत्यवेद या चार उपवेदांनाही क्रमशः आपल्या त्याच पूर्वादी मुखांपासून उत्पन्न केले. नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या चारी मुखांपासून इतिहास-पुराणरूपी पाचवा वेद तयार केला. याच क्रमाने त्यांच्या पूर्वादी मुखांपासून षोडशी आणि उक्थ, चयन, आणि अग्निष्टोम, आप्तोर्याम, आणि अतिरात्र तसेच वाजपेय आणि गोसव हे दोन-दोन यज्ञही उत्पन्न झाले. विद्या, दान, तप आणि सत्य हे धर्माचे चार पाय आणि आचरणासह चार आश्रमसुद्धा याच क्रमाने प्रगट झाले. सावित्र, प्राजापत्य, ब्राह्म, आणि बृहत् या चार वृत्ती ब्रह्मचार्‍याच्या आहेत. तसेच वार्ता, संचय, शालीन, आणि शिलोञ्छ या चार वृत्ती गृहस्थाश्रमाच्या आहेत. याच प्रकारे वृत्तिभेदाने वैखानस, वालखिल्य, औदुंबर, आणि फेनप हे चार भेद वानप्रस्थाश्रमाचे आणि कुटीचक, बहूदक, हंस, आणि निष्क्रिय(परमहंस) हे चार भेद संन्याशांचे आहेत. याच क्रमाने आन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता, आणि दंडनीती या चार विद्या आणि चार व्याहृतीसुद्धा ब्रह्मदेवाच्या चार मुखांपासूनच उत्पन्न झाल्या. तसेच त्यांच्या हृदयाकाशातून ॐकार प्रगट झाला. त्यांच्या रोमांपासून उष्णिक्, त्वचेपासून गायत्री, मांसापासून त्रिष्टुप्, स्नायूंपासून अनुष्टुप्, हाडांपासून जगती, मज्जांपासून पंक्ती आणि प्राणांपासून बृहती असे छंद निर्माण झाले. याचप्रमाणे त्यांचा जीव स्पर्शवर्ण(क वर्गादी पाच वर्ग) आणि देह स्वरवर्ण(अकारादी) म्हणविला गेला. त्यांच्या इंद्रियांना ऊष्मवर्ण (श,ष,स,ह) आणि शक्तीला अंतःस्थ (य,र,ल,व) म्हणतात. तसेच त्यांच्या क्रीडांपासून निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, धैवत, आणि पंचम हे सात स्वर उत्पन्न झाले. ब्रह्मदेव शब्दब्रह्मस्वरूप आहेत. ते वाणीरूपाने व्यक्त आणि ॐकार रूपाने अव्यक्त आहेत. तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परब्रह्म आहे, तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित हो‌ऊन इंद्र आदींच्या रूपाने भासत आहे. (३७-४८)

विदुरा, धुके बनलेले आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवांनी दुसरे शरीर धारण करून विश्वविस्तार करण्याचा विचार केला.मरीची आदी महान् शक्तिशाली ऋषींकडूनसुद्धा विस्तार जास्त झाला नाही, हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले की, "अहो ! मोठे आश्चर्य आहे ! माझ्या सतत प्रयत्‍न करण्यानेही प्रजेची वृद्धी होत नाही. यात दैव काहीतरी विघ्न आणीत आहे. असे वाटते." योग्य कर्म करणारे ब्रह्मदेव जेव्हा अशा प्रकारे दैवाविषयी विचार करीत होते, त्यावेळी अकस्मात त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले. ‘क’ हे ब्रह्मदेवाचे नाव आहे. ते विभक्त झाल्याकारणाने शरीराला काय म्हणतात. त्या दोन विभागांतून एक स्त्री-पुरुषांची जोडी प्रगट झाली. त्यांपैकी जो पुरुष होता, तो सार्वभौ‌म सम्राट् स्वायंभुव मनू झाला आणि जी स्त्री होती, ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा झाली. तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली. मनूने शतरूपेपासून पाच संताने उत्पन्न केली. विदुरा, त्यात प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन पुत्र होते आणि आकूती, देवहूती व प्रसूती अशा तीन कन्या होत्या. मनूंनी आकूती रुचीला, देवहूती कर्दमाला आणि प्रसूती दक्षाला दिली. यांच्या संततीने सर्व जग भरून गेले. (४९-५६)

स्कंध तिसरा - अध्याय बारावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP