|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ११ वा
मन्वन्तरादी कालविभागाचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मैत्रेय म्हणाले - पृथ्वी आदी कार्यवर्गाचा जो सूक्ष्मतम अंश आहे, ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाहीत, तसेच जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही आणि ज्याचा इतर परमाणूंच्या बरोबरही संयोग झालेला नाही, त्याला ‘परमाणू’ म्हणतात. असे अनेक परमाणू एकत्र आल्यानंतर मनुष्याला भ्रमाने त्याच्या समुदायाच्या रूपाला ‘अवयवी’ अशी प्रचीती येते. हा परमाणू ज्याचा सूक्ष्मतम अंश आहे, त्या आपल्या सामान्य स्वरूपात स्थित असलेल्या पृथ्वी इत्यादी कार्यांच्या समुदायाला ‘परम महान’ असे नाव आहे. यावेळी त्यात प्रलयादी अवस्थांची स्फूर्ती होत नाही. नवीन-जुने अशा कालभेदाचे ज्ञान होत नाही आणि घटपटादी वस्तुभेदाचीसुद्धा कल्पना असत नाही. हे साधुश्रेष्ठ विदुरा, अशा प्रकारे वस्तूच्या सूक्ष्मतम आणि महत्तम स्वरूपाचा विचार झाला. याच्याच साधर्म्याने परमाणू इत्यादी अवस्थांत व्याप्त होऊन व्यक्त पदार्थांना भोगणार्या सृष्टी इत्यादीमध्ये समर्थ, अव्यक्तस्वरूप अशा भगवान कालाची सुद्धा सूक्ष्मता आणि स्थूलता यांचे अनुमान केले जाऊ शकते. जो काल प्रपंचाच्या परमाणूसारख्या सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो, तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो, तो परम महान आहे. (१-४) दोन परमाणूंचा एक अणू होतो आणि तीन अणू मिळून एक त्रसरेणू होतो. (म्हणजे) जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. असे तीन त्रसरेणू ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो, त्याला ‘त्रुटी’ म्हणतात. याच्या शंभरपट काळाला ‘वेध’ म्हणतात आणि तीन वेधांचा एक ‘लव’ होतो. तीन लवांचा एक ‘निमिष’, तीन निमिषांचा एक ‘क्षण’, पाच क्षणांची एक ‘काष्ठा’ आणि पंधरा काष्ठांचा एक ‘लघू’ होतो.पंधरा लघूंना एक ‘नाडिका’ म्हणतात. दोन नाडिकांचा एक ‘मुहूर्त’ आणि सहा किंवा सात नाडिकांचा एक ‘प्रहर’ होतो.यालाच ‘याम’ म्हणतात. याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा चौथा भाग होय. सहा पल तांब्याचे एक असे भांडे बनवावे की, ज्यामध्ये एक शेर पाणी मावेल आणि चार मासे सोन्याची चार बोटे लांबीची सळी बनवून तिने त्या भांडयाच्या बुडाला एक छिद्र पाडून ते भांडे पाण्यात सोडावे. जितक्या वेळात एक शेर पाणी त्या भांडयात भरले जाईल, तेवढया वेळेला एक ‘नाडिका’ म्हणतात.विदुरा, मनुष्याचे चार-चार प्रहराचे ‘दिवस’ आणि ‘रात्र’ होतात आणि पंधरा दिवसांचा एक पंधरवडा होतो, जो शुक्ल आणि कृष्ण या नावांनी दोन प्रकारचा मानला गेला आहे. या दोन पक्षांचा मिळून एक महिना होतो, जो पितरांचा एक दिवस-रात्र असते. दोन महिन्यांचा एक ऋतू आणि सहा महिन्यांचे एक ‘अयन’ होते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन अयने आहेत. ही दोन्ही अयने मिळून देवतांची एक दिवस-रात्र होते. मनुष्यलोकात बारा महिन्यांना एक वर्ष असे म्हणतात. अशी शंभर वर्षे हे मनुष्याचे अधिकतम आयुष्य सांगितले गेले आहे. चंद्र इत्यादी ग्रह, अश्विनी इत्यादी नक्षत्रे आणि सर्व तारामंडलांचा अधिष्ठाता कालस्वरूप भगवान सूर्य परमाणूपासून संवत्सरापर्यंत काळात बारा राशीरूप अशा संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा करीत असतो. विदुरा ! सूर्य, बृहस्पती, सवन, चंद्र आणि नक्षत्रासंबंधी महिन्यांच्या भेदाने या वर्षांनाच संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर आणि वत्सर असे म्हटले जाते. अशी पाच प्रकारची वर्षे करणार्या भगवान सूर्याची आपण पूजा करा. हे सूर्यदेव पंचमहाभूतांपैकी तेजाचे स्वरूप आहेत आणि आपल्या कालशक्तीने बीजापासून अंकुर उत्पन्न करणार्या शक्तीला अनेक प्रकारे कार्यान्वित करतात. पुरुषांची मोहनिवृत्ती करण्यासाठी हे त्यांच्या आयुष्याचा क्षय करीत आकाशात भ्रमण करतात. तसेच हेच सकाम पुरुषांना यज्ञ इत्यादी कर्मांपासून प्राप्त होणारी स्वर्ग इत्यादी मंगलमय फले देतात. (५-१५) विदुर म्हणाला - मुनिश्रेष्ठ, आपण देवता, पितर आणि मनुष्यांच्या कमाल आयुष्याचे वर्णन केले. आता जे सनकादी ज्ञानी मुनिजन त्रैलोक्याच्या बाहेर कल्पापेक्षाही अधिक काळापर्यंत राहाणारे आहेत, त्यांच्याही आयुष्याचे वर्णन करावे. आपण भगवान असल्याने काळाची गती चांगल्या तर्हेने जाणता. कारण ज्ञानीलोक आपल्या योगसिद्ध दिव्य दृष्टीने सारे विश्व पाहातात. (१६-१७) मैत्रेय म्हणाले - विदुरा, असे सांगितले जाते की, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली ही चार युगे संध्या आणि संध्यांशांच्यासह देवांच्या बारा हजार वर्षांपर्यंत राहातात. या सत्यादी चार युगांची क्रमाने चार, तीन, दोन आणि एक हजार दिव्य वर्षे असतात आणि प्रत्येकाची जितकी सहस्त्र वर्षे असतात, त्याच्या दुप्पट शंभर वर्षे त्यांची संध्या आणि संध्यांशात असतात. युगांच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यांश असतो. यांची वर्षगणना शेकडयांच्या संख्येने सांगितली गेली आहे. यांच्या मधल्या काळाला कालवेत्ते ‘युग’ म्हणतात. प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान आहे. सत्ययुगातील मनुष्यांमध्ये धर्म आपल्या चार चरणांनी राहातो. नंतर अन्य युगात अधर्म वाढत गेल्याने त्याचा एक-एक चरण कमी होत जातो. प्रिय विदुरा, त्रैलोक्याच्या बाहेर महर्लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत येथील एक हजार चतुर्युगाचा एक दिवस असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते. त्या रात्री जगत्कर्ता ब्रह्मदेव शयन करतो. त्या रात्रीचा शेवट झाल्यावर या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो. त्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो, तोपर्यंत चालू असतो. त्या एका कल्पात चौदा मनू होतात. प्रत्येक मनू एकाहत्तर चतुर्युगांपेक्षा थोडा अधिक काळापर्यंत आपला अधिकार चालवतो. प्रत्येक मन्वन्तरामध्ये निरनिराळे मनुवंशी राजे, सप्तर्षी, देवगण, इंद्र आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी त्यांच्याबरोबरच उत्पन्न होतात. ही ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी आहे; यामध्ये तिन्ही लोकांची रचना होते. त्यामध्ये आपापल्या कर्मानुसार पशु-पक्षी, मनुष्य, पितर आणि देवतांची उत्पत्ती होते. भगवान या मन्वन्तरांमध्ये सत्त्वगुणाच्या आश्रयाने, आपल्या मनू इत्यादी रूपाने पुरुषाकार प्रगट करून या विश्वाचे पालन करतात. कालक्रमानुसार जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा तो तमोगुणाचा आश्रय करून आपले सृष्टिरचनारूप कार्य स्थगित करून सर्व आपल्यात लीन करून स्वस्थ राहातो.जेव्हा सूर्य आणि चंद्ररहित अशी प्रलयरात्र होते, तेव्हा भूः भुवः, आणि स्वः असे तिन्ही लोक त्या ब्रह्मदेवाच्या शरीरात लीन होतात. त्यावेळी शेषाच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंतांच्या शक्तीने तिन्ही लोक जळू लागतात. म्हणून त्या तापाने व्याकूळ होऊन भृगू आदी ऋषी महर्लोकातून जनोलोकात येतात. इतक्यात प्रलयकालाच्या प्रचंड तुफानामुळे सातही समुद्र उचंबळून येतात आणि आपल्या उसळत्या उत्तुंग लाटांनी त्रैलोक्य बुडवून टाकतात. त्यावेळी त्या जलात शेषशायी भगवान योगनिद्रेने डोळे झाकून घेऊन शयन करतात. तेव्हा जनोलोकात निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करतात. अशा प्रकारे कालाच्या गतीने एकेक हजार चतुर्युगांच्या रूपाने होणार्या दिवस-रात्रींमुळे ब्रह्मदेवाच्याही शंभर वर्षांच्या आयुष्याची समाप्ती होते, असे दिसते. (१८-३२) ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला परार्ध असे म्हणतात. आतापर्यंत पहिला परार्ध होऊन गेला असून दुसरा परार्ध चालला आहे. पहिल्या परार्धाच्या सुरुवातीला ब्राह्म नावाचा महाकल्प झाला होता. त्यातच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली होती. पंडित लोक याला ‘शब्दब्रह्म’ म्हणतात. त्याच परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला होता, त्याला पाद्मकल्प म्हणतात. यामध्ये भगवंतांच्या नाभिसरोवरातून सर्वलोकमय कमळ प्रगट झाले होते. विदुरा, आता जो कल्प चालू आहे, तो दुसर्या परार्धाच्या सुरुवातीचा आहे, असे सांगितले जाते. हा ‘वाराहकल्प’ नावाने प्रसिद्ध आहे. यात भगवंतांनी वराहरूप धारण केले होते. हा दोन परार्धांचा कालावधी अव्यक्त, अनंत, अनादी, विश्वात्मा श्रीहरींचा एक ‘निमेष’ मानला जातो. परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत पसरलेला हा काल सर्वसमर्थ असूनही सर्वात्मा श्रीहरींवर मात्र याची कोणत्याही प्रकारे सत्ता चालत नाही. हा देहादिकांमध्ये अभिमान ठेवणार्या जीवांवरच सत्ता चालवतो. (३३-३८) प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या आठ प्रकृतींसह दहा इंद्रिये, मन आणि पंचमहाभूते असे सोळा विकार मिळून बनलेला हा ब्रह्मांडकोश आतून पन्नास कोटी योजने विस्तार असलेला आहे. तसेच बाहेर चारी बाजूंनी याला उत्तरोत्तर दहा-दहा पट अशी सात आवरणे आहेत. त्या सर्वांसहित हा ज्यात परमाणूप्रमाणे पडलेला दिसतो आणि ज्याच्यामध्ये अशा कोटयवधी ब्रह्मांडराशी आहेत, तोच या प्रधान इत्यादी सर्व कारणांचे कारण ‘अक्षरब्रह्म’ म्हटला जातो आणि हेच पुराणपुरुष परमात्मा श्रीविष्णू भगवानांचे श्रेष्ठ स्वरूप आहे. (३९-४१) स्कंध तिसरा - अध्याय अकरावा समाप्त |