श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १९ वा - अन्वयार्थ

ज्ञान, भक्ती आणि यमनियमादी साधनांचे वर्णन -

यः विद्याश्रुतसंपन्नः - जो पुरुष विद्या-स्वानुभव आणि श्रुति-शास्त्रजन्य ज्ञान यांनी संपन्न झाला आहे - आत्मवान् - जो प्रत्यक्ष आत्मरूपच झाला आहे - न अनुमानिकः - तर्कावरच अवलंबत नाही - इदं मायामात्रं ज्ञात्वा - हे दिसणारे सर्व मायाच-मिथ्याच आहे, असे जाणून - मयि - मत्स्वरूपामध्येच - ज्ञानं च - आपले सर्व ज्ञान - संन्यसेत् - लीन करावे - ॥१॥

ज्ञानिनः तु अहं एव इष्टः - ज्ञानवंताला मी परमात्माच अत्यंत प्रियतम असतो - स्वार्थः - त्याच्या ज्ञानविज्ञानाचे फल मीच असतो - हेतुः - प्रयोजन मीच असतो - संमतः - त्याला मीच मान्य असतो - स्वर्गः च अपवर्गः च - आणि त्याच्या स्वर्गीय सुखाचा उत्कर्ष करणारा आणि त्याला मोक्ष देणाराही मीच असतो - मदृते- माझ्यावाचून - अन्यः अर्थः न एव प्रियः - त्याला दुसरा कोणताच अर्थ प्रिय नसतो- ॥२॥

ज्ञानविज्ञानसंसिद्धाः - शास्त्रज्ञान आणि साक्षात्कारी विज्ञान ज्यास संपूर्ण लाभते ते - मम श्रेष्ठं पदं - माझे निरतिशय श्रेष्ठ स्वरूप - विदुः - जाणतात - अतः - म्हणून - ज्ञानी मे प्रियतमः - ज्ञानी मला अत्यंत प्रिय असतो - असौ मां ज्ञानेन बिभर्ति - कारण तो माझे आपल्या स्वतःच्या स्वानुभवपूर्ण ज्ञानाने धारण पोषण करतो - ॥३॥

या ज्ञानकलया (सिद्धिः) कृता - ज्ञानाच्या एका कलेने म्हणजे अंशाने मात्र सिद्धि प्राप्त होते, पुरुषार्थलाभ होतो - तां सिद्धिं - तो लाभ - तपः, तीर्थं, जपः, दानं - तपश्चर्या, तीर्थस्नान, जप, सर्वस्वदान - इतराणि पवित्राणि च - आणि दुसरी सर्व पवित्र कर्मे - न अलं कुर्वंति - मिळवून देण्याला पुरी पडत नाहीत - ॥४॥

तस्मात् उद्धव - म्हणून उद्धवा - ज्ञानेन सहितं स्वात्मानं ज्ञात्वा - ज्ञानाच्या मात्र साधनाने आत्मस्वरूप जाणून - ज्ञानविज्ञानसंपन्नः - शास्त्रज्ञानासह अपरोक्ष असणारे अनुभवज्ञान संपादून - भक्तिभावतः मां भज - भक्तिभावाने माझे, परमात्मस्वरूपाचे ध्यानभजन अखंड ठेव - ॥५॥

सर्वयज्ञपतिं मां आत्मानं - सर्व यज्ञांचा अधिपति अशा मज स्वात्म्याचे - आत्मनि - आपल्याच ठिकाणी - ज्ञानविज्ञानयज्ञेन - ज्ञानविज्ञानरूपी यज्ञाने - इष्ट्‌वा - आराधन करून - मुनयः - प्राचीन मुनि - मां संसिद्धिं - मत्प्राप्तिरुप सिद्धीला - अगमन् वै - गेले आहेत - ॥६॥

यत् - ज्या अर्थी - उद्धव - हे उद्धवा - यः त्रिविधः विकारः - जो तीन प्रकारचा आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक स्वरूपांचा विकार - त्वयि आश्रयति - तुझ्या आश्रयाला असतो - मायांऽतरा पतति - मायेच्या-मिथ्यात्वाच्या राज्यातच असतो - न आद्यपवर्गयोः - जो मायेच्या पूर्वी नसतो व मायेच्या निरासानंतरही नसतो - अस्य यत् अमी जन्मादयः - त्या विकारानेच हे प्रत्यक्ष जन्ममरणादि ज्या अर्थी परिणाम असतात - तस्य तव किं स्युः - त्या अर्थी तूं जो अखंड निर्विंकारस्वरूप, त्या तुला त्या विकाराचे परिणाम जे जन्मादि, त्यापासून काय लाभ होणार ? - आद्यंतयोः असतः यत् अस्ति - मायेच्या उत्पत्तीपूर्वी व तिचा निरास झाल्यानंतर असताचे जे स्वरूप असते - तदेव - तेच - मध्ये - मधील स्थितीतही असते - ॥७॥

विश्वेश्वर विश्वमूर्ते - हे विश्वनियंत्या आणि विश्वरूपा - विशुद्धं - अत्यंत निर्मळ - वैराग्यविज्ञानयुतं - वैराग्य व स्वानुभव यांनी अलंकृत - पुराणं - सनातन असलेले - एतत् - हे - ज्ञानं - ज्ञान - विपुलं यथा (तथा) आख्याही - माझे अज्ञान नष्ट होईल अशा रीतीने सविस्तर सांग - महद्विमृग्यं - व मोठमोठया लोकांनाही शोधून काढण्यास योग्य अशा महत्त्वाचा - तव भक्तियोगं च - तुझा भक्तियोगही सांग - ॥८॥

ईश - परमेश्वरा - तापत्रयेण अभिहतस्य - त्रिविध तापांनी जर्जरित झालेला - घोरे भवाध्वनि संतप्यमानस्य - अत्यंत भयंकर अशा संसारपंथात संतप्त झालेला जो मी त्या मला - अमृताभिवर्षात् - ज्ञानरूपी अमृताचा वर्षाव करणार्‍या - तव अंत्रिद्वंद्वातपत्रात् - तुझ्या चरणद्वयांच्या आतपत्राहून म्हणजे छत्राहून - अन्यत् शरणं न पश्यामि - शरण जाण्याला योग्य असे दुसरे आश्रयस्थान दिसतच नाही - ॥९॥

महानुभाव - हे उदार मनाच्या श्रेष्ठ परमेश्वरा - अस्मिन् बिले संपतितं - ह्या संसाराच्या वारुळातल्या बिळात पडलेला - कालाहिना दष्टं - कालरूपी सर्पाने दंश केलेला - क्षुद्रसुखोरुतर्षं - क्षुद्र-नाशवंत सुखाची उरु-अतिशय तर्ष-तहान लागलेला - एनं जनं - अशा ह्या माझा - कृपया समुद्धर - कृपा करून उद्धार कर, मला बिळातून बाहेर काढ - आपवर्गैः वचोभिः आसिंच - मोक्ष देणार्‍या वचनामृतांचा माझ्यावर वर्षाव कर - ॥१०॥

पुरा - पूर्वी - राजा अजातशत्रुः - निर्वैरबुद्धि जो धर्मराजा त्याने - धर्मः भृतां वरं भीष्मं - धर्माचे व्रत धारण करणार्‍यांमध्ये अत्यंत श्रेष्ठ भीष्मपितामहाला - इत्थं - अशाप्रकारे - सर्वेषां नः अनु शृण्वतां - आम्ही सर्व ऐकत असता आमच्या समक्ष - एतत् - असाच - पप्रच्छ - प्रश्न केला होता - ॥११॥

निवृत्ते भारते युद्धे - भारती युद्ध आटपल्यानंतर - सुहृन्निधनविव्हलः - आप्तेष्टांच्या मरणामुळे विव्हल झालेल्या धर्मराजाने - बहून् धर्मान् श्रुत्वा - पुष्कळ प्रकारचे धर्म ऐकल्यानंतर - पश्चात् मोक्षधर्मान् अपृच्छत - मग मोक्षधर्म विचारले - ॥१२॥

देवव्रतमुखात् श्रुतान् - धर्माचे उत्कृष्ट अनुष्ठान करणार्‍या भीष्मराजाच्या मुखांतून प्रकट झालेले - ज्ञानवैराग्य विज्ञान - ज्ञान, विरक्ती, स्वानुभव, - श्रद्धा भक्त्युपबृंहितान् - श्रद्धा आणि भक्ति या सर्वांस आश्रय देणारे - तान् - असे जे धर्म तेच - अहं ते अभिधास्यामि - मी तुला सांगतो - ॥१३॥

भूतेषु नव - या दृश्य विश्वातील चराचर भूतांमध्ये पुरुष, प्रकृति, महत्, अहंकार व पंचतन्मात्रा मिळून नऊ; - एकादश - मन, पांच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये मिळून अकरा; - पंच त्रीन् भावान् - पाच पृथ्व्यादि महाभूते; आणि सत्त्वादि तीन गुण याप्रमाणे अठठावीस भाव, भूतांतील ही अठठावीस तत्त्वे - येन वै ईक्षेत - ज्या साधनाने पहाता व समजता येतील - अथ - आणि - एषु अपि एकं (ईक्षेत) - या सर्व भूतांतही एकच वस्तु सर्वत्र आहे, असे ज्याने समजते - तत् ज्ञानं - तेच यथार्थ ज्ञान होय - मम निश्चितं - माझा निश्चय आहे - ॥१४॥

यत् - जेव्हा - येन - ज्याच्या साह्याने - एकेन - एकाच ज्ञानाने अनुगत अन्वित असलेले अनंत पदार्थ - तथा न - तसे नाहीत म्हणजे अनेकत्व नसून सर्व एकच आहे असे जे - एतत् एव हि विज्ञानं - ते हे मात्र विज्ञान आहे - त्रिगुणात्मनां भावानां - सत्त्वादि त्रिगुणात्मक जे विश्व व तद्‌गत पदार्थ - स्थित्युत्पत्त्यप्ययान् पश्येत् - अस्तित्व, उत्पत्ती व संहार पहावे - ॥१५॥

आदौ अंते च मध्ये च - उत्पत्तीपूर्वी, विनाशानंतर आणि मधस्थितीत असणारे जे - सृज्यात् सृज्यं यत् अन्वियात् - एका कार्यातून दुसर्‍या कार्यात पदार्थ जात असताना त्या प्रतिकार्यात विद्यमान असते - पुनः तत्प्रतिसंक्रामे - पुनः ती कार्ये उलट रीतीने कारणात जाऊ लागली असताही - यत् शिष्येत - जे शेवटी जसेच्या तसे निर्विकार असते - तत् एव सत् - तेच सत् ब्रह्म होय - ॥१६॥

श्रुतिः प्रत्यक्षं ऐतिह्यं अनुमानं चतुष्टयं - श्रुति म्हणजे आप्तवाक्ये, प्रत्यक्ष, ऐतिहासिक आणि अनुमान ही चार प्रमाणे होत - प्रमाणेषु अनवस्थानात् विकल्पात् - या प्रमाणांना गोचर नसणार्‍या किंवा या प्रमाणांनी खंडित न होणार्‍या भेदबुद्धीपासून - सः विरज्यते - तो ज्ञानी विरक्त होतो - ॥१७॥

विपश्चित् - ज्ञानी पुरुष - कर्मणां परिणामित्वात् - सर्व कर्मे व त्यांची फले परिणामी, अनित्य असतात म्हणून - आविरिंचात् अदृष्टं अपि - ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंतचे श्रुतिकथित अदृष्ट म्हणजे कर्म व स्वर्गातील तत्फल सुखही - दृष्टवत् अमंगलं नश्वरं पश्येत् - दृश्य सुखासारखेच अमंगल, नाशवंत आहे असे जाणतो - ॥१८॥

अनघ - निष्पाप उद्धवा - पुरा एव - पूर्वीच - प्रीयमाणाय ते - मला प्रियकर असणार्‍या तुला समाधान व्हावे म्हणून - भक्तियोगः उक्तः - भक्तियोग सांगितलाच आहे - मद्‌भक्तेः परं कारणं - माझ्या भक्तीचे श्रेष्ठ कारण - पुनः च कथयिष्यामि - पुनः आणखी एकदा सांगतो - ॥१९॥

मे अमृतकथायां श्रद्धा - माझ्य़ा अमृतासारख्या मधुर कथांवर श्रद्धा ठेऊन - शश्वत् मदनुकीर्तनं - नेहमी माझ्याविषयीच संकीर्तन करणे - परिनिष्ठा च पूजायां - माझ्या अर्चनामध्ये अखंड निष्ठा ठेवणे - स्तुतिभिः मम स्तवनं - स्तोत्रे म्हणून माझा स्तव करणे - ॥२०॥

परिचर्यायां आदरः - माझीच पूजादि सेवा करण्यामध्ये उत्तम आदर ठेवणे - सर्वांगैः अभिवंदनं - अष्टांगांनी अभिवंदन करणे - मद्‌भक्तपूजा - माझ्य़ा भक्तांची सादर केलेली पूजा - सर्वभूतेषु मन्मतिः - सर्व चराचर भूतांत मीच परमात्मा ओतप्रोत आहे अशी बुद्धी - अभ्यदिका - अधिका योग्यतेची आहेत हा माझा सिद्धांत - ॥२१॥

मदर्थेषु अंगचेष्टा च - माझ्यासाठीच सर्व व्यवहार, कर्म करणे - वचसा मद्‌गुणेरणं - वाणीने माझ्याच गुणांचे संकीर्तन करणे - मनसः च मयि अर्पणं - सर्व अंतःकरणवृत्ति मला अर्पण करणे - सर्वकामविवर्जनं - अर्थात् सर्व आशा- मनीषा यांचा त्याग करणे - ॥२२॥

भोगस्य च, सुखस्य च मदर्थे अर्थपरित्यागः - सर्व उपभोगांचा व सर्व विषयसुखांचा माझ्याप्रीत्यर्थ त्याग करणे - मदर्थं यत् व्रतं, तपः, इष्टं, दत्तं, हुतं, जप्तं, - आणि माझ्या प्रीत्यर्थच सर्व व्रते, तप, यजन, दान, हवन, जप वगैरे करणे - ॥२३॥

उद्धव - हे उद्धवा - एवं - या प्रकारांनी - आत्मनिवेदिनां मनुष्याणां धर्मैः - सर्वथा आपला आत्मा म्हणजे शरीर, प्राण, इंद्रिये, मन, बुद्धि, अहंकार ही सर्व मला अर्पण करणार्‍या मानवांच्या धर्मांनी कर्तव्यांनी - मयि भक्तिः संजायते - मजविषयी उत्तम प्रकारची प्रेमळ भक्ति उत्पन्न होते - अस्य - मद्‌भक्ताला - कः अन्यः अर्थः अवशिष्यते - दुसरा कोणता पुरुषार्थ साध्य करावयाचा राहतो ? ॥२४॥

सत्त्वोपबृंहितं शांतं यदा चित्तं - जेव्हा माझ्या भक्ताने आपले सत्त्वगुणाच्या उत्कर्षाने शांतचित्त - आत्मनि अर्पितं - आत्मस्वरूपात अर्पण केलेले असते - सवैराग्यं धर्मं ज्ञानं ऐश्वर्यं च अभिपद्यते - वैराग्यपूर्ण धर्म, ज्ञान, आणि उत्कृष्ट प्रकारचे सिद्धिरूप ऐश्वर्य प्राप्त होते - ॥२५॥

यत् - जेव्हा - तत् - तेच चित्त - विकल्पे अर्पितं - भेदामुळे अथवा अनात्मक पुत्रकलत्रगेहदेहादिकांमध्ये मग्न केलेले असते - इंद्रियैः परिधावति - इंद्रिये धावतील तिकडे धावत असते - रजस्वलं असनिष्ठं च - ते रजस्वल म्हणजे विषयासक्त आणि असनिष्ठ म्हणजे नाशवंताचा अभिमान धरणारे चित्त - विपर्ययं विद्धि - उलट प्रकारचे म्हणजे अधर्म, अज्ञान, अविरक्ति आणि अनैश्वर्य प्राप्त करून घेते असे जाण - ॥२६॥

मद्‌भक्तिकृत् धर्मः प्रोक्तः - जेणेकरून मजविषयी भक्ति उत्पन्न होईल तोच धर्म - ज्ञानं च एकात्म्यदर्शनं - ज्ञान म्हणजे एकचएक अद्वितीय आत्मा आहे असा निश्चय - गुणेषु असंगः वैराग्यं - सत्त्वादि गुणांवर मुळीच आसक्ति नसणे हेच वैराग्य - अणिमादयः ऐश्वर्यं च - आणिमादि सिद्धि प्राप्त होणे हे ऐश्वर्य - ॥२७॥

अरिकर्शन - शत्रुविनाशका देवा - यमः कतिविधः प्रोक्तः - योगातील प्रथमांग जो यम तो किती प्रकारचा सांगितला आहे ? - वा - अथवा - नियमः - नियम किती प्रकारचे असतात - कः शमः - शमाचे स्वरूप काय - कः दमः - दमाचे काय ? - कृष्ण ! का तितिक्षा - कृष्णा ! सहनशीलता म्हणजे काय - प्रभो - भगवंता - धृतिः - धैर्य म्हणजे काय - ॥२८॥

किं दानं - दान म्हणजे काय - किं तपः - तप कोणते - किं शौर्यं - शौर्य कसे असते - ऋतं सत्यं उच्यते - ऋत व सत्य कशाला म्हणतात - कः त्यागः - त्याग कोणता - किं धनं च इष्टं - कोणते धन आदरणीय आहे - कः यज्ञः - यज्ञ म्हणजे काय - का च दक्षिणा - दक्षिणा कशी असते व असावी - ॥२९॥

श्रीमान् - लक्ष्मीपते - पुंसः बलं किंस्वित् - पुरुषाचे खरे बल कोणते - भगः - भाग्य कोणते - लाभः च - खरा लाभ कसा - केशव - कृष्णा - का (परा) विद्या - उत्तम विद्या कोणती - का परा ‍र्‍हीः - उत्कृष्ट विनय कोणता - का परा श्रीः - उत्तमोत्तम संपत्ति कोणती - किं सुखं दुःखं एव च - सुख कसे असते आणि दुःखाचे स्वरूप कसे असते बरे - ॥३०॥

कः पंडितः कः च मूर्खः - पंडित कोणाला म्हणावे व मूर्ख कोण - कः पंथाः कः च उत्पथः - देवमान्य मार्ग कोणता व भ्रष्टकारी मार्ग कोणता - कः स्वर्गः कः स्वित् नरकः - स्वर्ग कोणता ? नरक कोणता ? - कः बंधुः - बंधु कोण ? - उत किं गृहं - खरे गृह किंवा धाम कोणते - ॥३१॥

क आढयः कः दरिद्रः - खरा श्रीमंत कोण ? दरिद्री कसा असतो - वा - अथवा - कः कृपणः - खरा कंजुष कोण - कः ईश्वरः - ईश्वर कोण - सत्पते - हे सत्पालका कृष्णा - एतान् प्रश्नान् - ह्या प्रश्नांची - विपरीतान् च - व ह्यांच्या उलट जे अशम, अदम इत्यादि त्यांचीही लक्षणे - मम ब्रूहि - मला सांग - ॥३२॥

अहिंसा, सत्यं, अस्तेयं, - १) कसली हिंसा न करणे, २) सत्यनिष्ठ असणे, ३) परापहार गुप्तपणे अथवा प्रसिद्धपणेही न करणे, असंगः, र्‍हीः, असंचयः, - ४) कोणत्याही अनात्म विषयावर आसक्ति नसणे, ५) मर्यादा ठेवणे, ६) खाद्य पेय भोग्यांचा संग्रह न करणे, आस्तिक्यं, ब्रह्मचर्यं च, - ७) आप्तवाक्यांवर म्हणजे धर्मगुरु प्रभृति सांगतील त्यावर विश्वास ठेवणे, ८) ब्रह्मचर्य पाळणे, मौनं, स्थैर्यं, क्षमा, अभयं, - ९) व्यर्थ बडबड न करणे, १०) चित्त स्थिर असणे, ११) क्षमावृत्ति धारण करणे आणि १२) सर्वांस अभय देणे हे बारा यम होत - ॥३३॥

शौचं, जपः, तपः, होमः, - १) शरीराची शुद्धि, २) मनाची शुद्धि, ३) जप करणे, ४) तपाचे आचरण, ५) आश्रमास योग्य ते हवन करणे, - श्रद्धा, आतिथ्यं, मदर्चनं, तीर्थाटनं, - ६) धर्माविषयी आदर असणे, ७) अतिथींचा परामर्श घेणे, ८) माझी पूजा करणे, ९) तीर्थयात्रा करणे, परार्थेहा, तुष्टिः, आचार्यसेवनं - १०) आत्मप्राप्तीसाठी मनःपूर्वक यत्न करणे, ११) संतोषवृत्ति असणे, १२) गुरुसेवा करणे हे बारा नियम होत - ॥३४॥

उभयोः एते सनियमाः यमाः द्वादश स्मृताः - प्रवृत्तींच्या पुरुषांस व निवृत्त साधूंस म्हणजे उभयतांस उपयोगी पडणारे बारा नियमांसह बारा यम शास्त्रांनी सांगितले आहेत - तात - बाळा उद्धवा - उपासिताः - या यमनियमांचे सादर ग्रहण व तदनुसार आचरण केल्यास - पुंसां यथाकामं दुहंति - निवृत्त साधूंचे व प्रवृत्त संसार्‍यांचे जे काय मनोरथ असतील ते पूर्ण करितात- हि - असा सिद्धांत प्रसिद्ध आहे - ॥३५॥

शमः बुद्धेः मन्निष्ठता - शम म्हणजे बुद्धि सर्वस्वी माझ्या ठिकाणी निष्ठेने ठेवणे, तात्पर्य शम- ईश्वरनिष्ठा - दमः इंद्रियसंयमः - दम म्हणजे इंद्रियानिग्रह - तितिक्षा दुःखसंमर्षः - दुःख सहन करण्याचे सामर्थ्य ही तितिक्षा - धृतिः जिव्होपस्थजयः - जिव्हा आणि कामदंड यांच्या आवेगास स्वाधीन ठेवणे ही धृति होय -॥३६॥

दंडन्यासः परं दानं - दंडाचा म्हणजे वैरसूचक हत्याराचा त्याग हेच श्रेष्ठ दान - तपः कामत्यागः - वासनांचा त्याग म्हणजेच तप - स्मृतं - असे म्हटले आहे - स्वभावविजयः शौर्यं - आपल्यासह उत्पन्न झालेल्या षड्रिपूंवर जय मिळविणे हे खरे शौर्य - च - आणि - सत्यं समदर्शनं - सर्वत्र अवघे ब्रह्मरूप पाहणे हे सत्य - ॥३७॥

ऋतं च सूनृता वाणी कविभिः परिकीर्तिता - सत्य व प्रिय बोलणे ऋत होय असे समदर्शी कवि म्हणत असतात - कर्मसु असंगमः शौचं - कर्मसंबंधे असंग, निःसंग असणे, अनासक्त असणे याचे नाव शौच - त्यागः संन्यासः उच्यते - त्याग म्हणजे संन्यास असे म्हटले आहे - ॥३८॥

नृणां इष्टं धनं धर्मः - लोकांस अत्यंत उपकारक धन कोणते तर धर्म होय - यज्ञः भगवत्तमः अहं - यज्ञ म्हणजे परमश्रेष्ठ जो भगवान तो मी - दक्षिणा ज्ञानसंदेशः - दक्षिणा म्हणजे ज्ञानाचा उपदेश - परं बलं प्राणायामः - प्राणाचा निरोध करता येणे हे श्रेष्ठ बल होय - ॥३९॥

भगः मे ऐश्वरः भावः - भग-सुदैव-माझे भगवंताचे जे षड्‌गुण ऐश्वर्य ते - उत्तमः लाभः मद्‌भक्तिः - उत्तमोत्तम लाभ म्हणजे माझी भक्ति होय - विद्या आत्मनि भिदाबाधः - विद्या-जीवात्मस्वरूपात जे भेद भासतात त्यांचा समूळ निरास - र्‍हीः अकर्मसु जुगुप्सा - र्‍ही म्हणजे निंद्यकर्मासंबंधी तिरस्कारबुद्धि - ॥४०॥

श्रीः नैरपेक्ष्याद्याः गुणाः - श्री-अलंकार कोणते तर निरपेक्षता-स्वतंत्रता प्रभृति गुण - सुखं दुःखसुखात्ययः - सुख=दुःख व सुख यांच्या पलीकडे असणे, त्यांची खबरही नसणे - दुःखं कामसुखापेक्षा - दुःख म्हणजे इष्ट विषयांच्या उपभोगाची लालसा - पंडितः बंधमोक्षवित् - बंध व मोक्ष यांची स्वरूपे जाणणारा तो पंडित - ॥४१॥

मूर्खः देहाद्यहंबुद्धिः - देहादि नश्वर वस्तूच मी आहे अशी बुद्धि ठेवणारा तो मूर्ख - पंथाः मन्निगमः स्मृतः - सन्मार्ग तो, की ज्या मार्गाने गेले असता माझी-परमेश्वराची गाठ पडते असे स्मृती म्हणते - उत्पथः चित्तविक्षेपः - उत्पथः= चित्ताला विक्षिप्त करणारा, मोह पाडणारा, भ्रष्ट करणारा मार्ग - स्वर्गः सत्त्वगुणोदयः - स्वर्ग= सात्त्विक गुणांचा उदय होतो ते स्थान - ॥४२॥

नरकः तम उन्नाहः - नरक तो, की जेथे तामसी गुणांचा उत्कर्ष होतो - सखे - सख्या उद्धवा - बंधुः गुरुः अहं - बंधु कोण ? मोक्षोपदेश करणारे आचार्य. श्रीकृष्ण म्हणतो मीच सर्वांचा गुरु, सर्वांचा कल्याणकर्ता आहे - गृहं मानुष्यं शरीरं - गृह कोणते ? उत्तम भोग भोगण्याचे साधन जे मानवी शरीर ते होय - आढय= गुणाढयः हि उच्यते - आढय= संपत्तिमान कोण ? जो सात्विकगुणसंपन्न आहे तो - ॥४३॥

दरिद्रः यः असंतुष्टः - जो सर्वदा असंतुष्ट खिन्नमुख तो दरिद्री - कृपणः यः अजितेंद्रियः - कृपण कोण ? ज्याने इंद्रियांवर आपले प्रभुत्व स्थापन केले नाही तो - ईशः गुणेषु असक्तधीः - प्रभु कोण ? सत्त्वादि गुणांमध्ये जो आसक्त झाला नाही, ज्याची बुद्धी गुणांमध्ये रममाण झाली नाही तो - गुणसंगः विपर्ययः - गुणांमध्ये आसक्ति धरणे याचे नाव अप्रभुत्व, पारतंत्र्य - ॥४४॥

उद्धव एते ते सर्व प्रश्नाः साधु निरूपिताः - उद्धवा ! हे तुझे जे सारे प्रश्न होते त्यांची मी समर्पक उत्तरे दिली आहेत. ती उत्तरे मोक्षोपयोगी आहेत - किं वर्णितेन बहुना - फार काय वर्णन करावे - गुणदोषयोः लक्षणं - गुण व दोष यांचे लक्षण सांगतो ते ऐक - गुणदोषदृशिः दोषः - पदार्थांचे गुणदोष आपल्यास ज्ञात झाले आहे अशी दृष्टि असणे याचे नाव दोष. ॥ ४५ ॥

अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP