श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १८ वा - अन्वयार्थ

वानप्रस्थ आणि संन्याशाचे धर्म -

पुत्रेषु भार्यां न्यस्य - पुत्रांच्या हाती आपल्या भार्येला देऊन - वा - अथवा - सह एव - आपल्या स्वतःबरोबर घेऊन - वनं विविक्षुः - वानप्रस्थ आश्रमात शिरु इच्छिणार्‍या गृहस्थाने आयुषः तृतीयं भागं - आपल्या आयुष्याचा तिसरा भाग - वने एव शांत वसेत् - अरण्यामध्येच शांत वृत्तीने वास्तव्य करून घालवावा. ॥ १ ॥

वन्यैः मेध्यैः कंदमूलफलैः - वनात उत्पन्न होणारी परंतु मेध्य (पवित्र) असणारी कंद, मुळे व फळे यांवरच - वृत्तिं प्रकल्पयेत् - आपला उदरनिर्वाह करावा - वल्कलं तृण-पर्ण - झाडांच्या साली, गवत, पाने - अजिनानि च वासः वसीत - अथवा व्याघ्रमृगादिकांची कातडी, हीच वस्त्रे वानप्रस्थाने स्वीकारावी. ॥ २ ॥

केश रोम-नख-श्मश्रु - डोकीचे केस, काखेतील वगैरे रोम, नखे, तोंड, ओठ यांवरील श्मश्रु - मलानि बिभृयात् - आणि अंगावरील मळ हे जसेच्या तसे ठेवावे - दंतः न घावेत् - दात धुवू नयेत - त्रिकालं अप्सु मज्जेत - तिन्ही काळी पाण्यात डुंबावे - स्थंडिलेशयः - भुईवरच निद्रा करावी. ॥ ३ ॥

ग्रीष्मे पंच अग्नीन् तप्येत - ग्रीष्मऋतूत (उन्हाळ्यात) पंचाग्निसाधन करावे, चोहीकडे अग्नि पेटवून भर उन्हात उभे रहावे - वर्षासु आसारषाट् - वर्षाऋतूत (पावसाळ्यात) मुसळासारख्या धारेचा पाऊस म्हणजे आसार, तो षाट् म्हणजे सहन करावा - शिशिरे जले आकंठमग्नः - शिशिर ऋतूत (हिवाळ्यात) आकंठ पाण्यात उभे राहावे - एवंवृत्तः - अशाप्रकारचे वर्तन ठेऊन - तपः चरेत - तपाचे आचरण करावे. ॥ ४ ॥

अग्निपक्वं अथ - अग्नीवर शिजवून अथवा भाजून तयार केलेले - कालपक्वं अपि वा समश्नीयात् - किंवा कालौघातच पिकलेले अन्न सेवावे - वा उलूखल-अश्मकुटटः - उखळात कांडून अथवा दगडाने ठेचून - वा - अथवा - दंतोलूखलः एव - दातांचेच उखळ करून म्हणजे दातांनी चावून खाणारा वानप्रस्थ असावा. ॥ ५ ॥

आत्मनः वृत्तिकारणं - आपल्या जीवितासाठी जे काय लागते ते - सर्वं स्वयं संचिनुयात् - सर्व स्वतः संपादावे - देश-काल-बल-अभिज्ञः - देश काल व आपले बल जाणणारा जो वनवासी त्याने - अन्यदा आहृतं न आददीत - दुसर्‍याने आणलेल्या अशा वस्तूंचा स्वीकार केव्हाही करू नये. ॥ ६ ॥

वन्यैः चरुपुराडोशेः - वनामध्ये उत्पन्न झालेल्या फळादिकांनी पुरोडाश म्हणजे आहुति समर्पण करून - कालचोदितान् निर्वपेत् - यथाकाली आग्रयणादि सांवत्सरिक विधि उरकून घ्यावे - तु वनाश्रमी - परंतु वानप्रस्थ आश्रम घेतलेल्या पुरुषाने माझे आराधन - श्रौतेन पशुना मां न यजेत - श्रुतीने सांगितलेल्या पशूची हत्या करून- करू नये. ॥ ७ ॥

मुनेः च - मुनीला म्हणजे वानप्रस्थाला - नैगमैः आम्नातानि - श्रुतींनी सांगितलेली कर्मे गृहस्थाश्रमात असल्याप्रमाणे करावी - पूर्ववत् अग्निहोत्रं च दर्शः च पूर्णमासः - पूर्वीप्रमाणे अग्निहोत्र दर्श-अमावास्येला व पूर्ण-पूर्णिमेला विहित केलेले कर्म, - च चातुर्मास्यानि च - आणि चातुर्मास्ये-चारचार महिन्यांनी होणार्‍य़ा इष्टि अवश्य कराव्या. ॥ ८ ॥

एवं चीर्णेन तपसा - याप्रमाणे आचरिलेल्या तपःसाहाय्याने - तपोमयं मां आराध्य - तपःस्वरूप जो मी त्या माझे आराधन करून - धमानिसंततः मुनिः - शिरांचे जाळे स्पष्ट दिसत आहे असा कृश मुनि - ऋषिलोकात् - ऋषिभुवनात जाऊन - मां उपैति - माझ्य़ा लोकाप्रत येतो. ॥ ९ ॥

यः तु - जो पुरुष तर - एतत् कृच्छ्‌रतः चीर्ण, - हे मोठया कष्टाने चीर्ण म्हणजे आचरिलेले - निःश्रेयसं महत् तपः - व निःश्रेयस म्हणजे मोक्षदायक म्हणून मोठया योग्यतेचे जे तप त्याचा - अल्पीयसे कामाय युञ्ज्यात् - क्षुद्र अशा विषयप्राप्तीकडे विनियोग करतो - ततः अपरः कः बालिशः - त्याच्यापेक्षा दुसरा मूर्ख कोण आहे बरे ? ॥ १० ॥

यदा - जेव्हा - जरया जातवेपथुः - वार्धक्यामुळे शरीराला कंप उत्पन्न झालेला - असौ नियमे अकल्पः - हा वनवासातील विधि यथासांग करण्यास असमर्थ झाला - अग्नीन् आत्मनि समारोप्य - अग्नीचा आत्मस्वरूपामध्ये समारोप करावा - मच्चित्तः - माझे मात्र चिंतन करीत करीत - अग्निं समाविशेत् - आपण म्हणजे आपला स्वतःचा देह अग्नीला अर्पण करावा. ॥ ११ ॥

(पण) यदा - जेव्हा - कर्मविपाकेषु - कर्मविपाक म्हणजे कर्मफलभूत - निरयात्मसु लोकेषु - म्हणूनच अत्यंत दुःखरूप जे सर्व निरयात्मक लोक त्याविषयी - विरागः जायते - वैराग्य उत्पन्न होते - सम्यङ्‌न्यस्ताग्निः - शास्त्रोक्त पद्धतीने ज्याने अग्नीचाही त्याग सर्वथा केला आहे - ततः प्रव्रजेत् - नंतर संन्यास घ्यावा. ॥ १२ ॥

मां यथोपदेशं इष्ट्‌वा - संन्यास घेण्यापूर्वी शास्त्रात सांगितलेल्या इष्टीने माझे आराधन वानप्रस्थाने करावे - ऋत्विजे सर्वस्वं दत्वा - आपले जे काय असेल, ते सगळेच्या सगळे ऋत्विजाला द्यावे - स्वप्राणे अग्नीन् आवेश्य - सर्व अग्नीस आपल्या प्राणात-स्वरूपात स्थिर ठेवावे, म्हणजे त्याचा लय स्वरूपात करावा - निरपेक्षः - निष्काम झालेल्या वानप्रस्थाने - परिव्रजेत् - संन्यास घ्यावा. ॥ १३ ॥

संन्यसतः वै विप्रस्य - संन्यास घेणार्‍या वानप्रस्थाच्या मार्गात - दारादिरूपिणः देवाः - पुत्र, कलत्र, मित्ररूपांनी अवतीर्ण झालेले देव - विघ्नान् कुर्वंति - अनेक विघ्ने आणतात - हि - कारण - अयं - हा वानप्रस्थ - अस्मान् आक्रम्य - आमचे अतिक्रमण करून - परं समियात् - आत्मलोकास जाईल. ॥ १४ ॥

मुनिः परं वासः बिभृयात् चेत् - मुनीला कौपीनाखेरीज अन्य वस्त्र हवे असलेच तर ते - कौपीनाच्छादनं - लंगोटी झाकील येवढेच असावे - अनापदि - रोगादि आधिव्याधि नसतील त्यावेळी - दंडपात्राभ्यां अन्यत् किंचित् त्यक्तं - हाती धरण्याची काठी व पाण्याचा कमंडलु यांशिवाय दुसरे सर्व त्यक्त झालेले असते - न - स्वीकारू नये ॥ १५ ॥

दृष्टिपूतं पादं न्यसेत् - पवित्र स्थान आहे असे पाहून पाऊल टाकावे - वस्त्रपूतं जलं पिबेत् - वस्त्रगाळ करून पाणी प्यावे - सत्यपूतां वाचं वदेत् - सत्यशुद्ध वाणी बोलावी - मनःपूतं समाचरेत् - विवेकपूर्वक आचरण करावे. ॥ १६ ॥

वाक्-देह-चेतसां - वाणी, शरीर व मन यांचे - मौन - मूकव्रत,म्हणजे मौनव्रताने वाणीचा, - अनीहा-अनिलायामाः दंडाः - - निरिच्छा आणि प्राणायाम हे दंड म्हणजे नियामक आहेत. सकाम-कर्मत्यागाने शरीराचा आणि प्राणायामाने मनाचा निग्रह करावा - अंग - उद्धवा - एते यस्य नहि संति - हे दंड ज्याच्याजवळ नाहीत तो - वेणुभिः यतिः न भवेत् - नुसत्या वेळूच्या काठया धरण्यानेच संन्यासी होत नाही. ॥ १७ ॥

विगर्ह्यान् वर्जयन् - निंद्य व पतित त्यांस वर्ज करून - चतुर्षु वर्णेषु भिक्षां चरेत् - चारी वर्णांमध्ये भिक्षा मागावी - असंक्लृप्तान् स्वप्त आगारान् - पूर्वी न ठरविलेली सात घरे मात्र मागावी - तावता लब्धेन तुष्येत् - त्या सात घरांत जे काय मिळाले असेल त्यातच संतोष मानावा. ॥ १८ ॥

बहिर्जलाशयं गत्वा - गावाबाहेर असणार्‍या जलाशयावर- नदीवर जावे - तत्र - तेथे - वाग्यतः उपस्पृश्य - मुकाटयाने न बोलता ती भिक्षा जलाने पवित्र करावी - अशेषं आहृतं विभज्य - मिळालेल्या भिक्षेचे शास्त्रोक्त चार भाग करावे - पावितं शेषं भुंजीत - पवित्र भाग घेऊन त्याचे सेवन करावे. ॥ १९ ॥

एतां महीं - या पृथ्वीवर - एकः चरेत् - एकटयाने मात्र हिंडावे - निःसंगः - अनासक्त, निर्लोभी होऊन - संयतेंद्रियः - इंद्रियांचा व मनाचा निग्रह करून - आत्मक्रीडः, आत्मरतः, आत्मवान् समदर्शनः - आत्म्याशी विलास करावा, आत्मस्वरूपातच संतोष मानावा व आत्मरूप होऊन समदृष्टि असावे. ॥ २० ॥

विविक्तक्षेमशरणः - निर्भय अशा एकांतस्थानी राहणारा - मद्‌भावविमलाऽऽशयः - माझ्याच चिंतनाने निर्मळ झाला आहे आशय म्हणजे अंतःकरण ज्याचे असा - मुनिः - संन्यासी - एकं आत्मानं मया अभेदेन चिंतयेत् - एकच जो आत्मा, त्याचा माझ्याशी म्हणजे परमात्म्याशी अभेद आहे, माझा आत्मा व त्याचा आत्मा भिन्न नाहीत, असे अखंड चिंतन करावे. ॥ २१ ॥

इंद्रियविक्षेपः बंधः - अनात्मविषयांकडे नेणारी इंद्रिये हीच बद्धकता - च - आणि - एषां संयमः च मोक्षः - त्यांचा निग्रह केला, इंद्रिये आत्मतंत्र झाली म्हणजे मोक्ष - ज्ञाननिष्ठया - ज्ञाननिष्ठेने - आत्मनः बंधं मोक्षं च अन्वीक्षेत - आत्म्याला बंध का होतो, तो कसा मुक्त होतो, याचे चिंतन करून निःसंदेह व्हावे. ॥ २२ ॥

तस्मात् - म्हणून - षड्‌वर्गं नियम्य - कामक्रोधादि सहा इंद्रिये यांचे नियमन करून - क्षुल्लकामेभ्यः विरक्तः - तुच्छ असणारे विषयकाम सोडून विरक्त होऊन - मद्‌भावेन - माझीच भावना ध्यानात धरून - आत्मनि महत् सुखं लब्ध्वा - आत्मस्वरूपातच आनंदमग्न होऊन - मुनिः - मुनीने - चरेत् - संचार करावा ॥ २३ ॥

पुरग्रामव्रजान् सार्थान् - नगरे, गावे, शेतकर्‍यांचे गोठे अथवा यात्रास्थाने - भिक्षार्थं प्रविशन् इत्यादि पवित्र स्थळी भिक्षेसाठी जावे - पुण्यदेश सरित्-शैल - पुण्यक्षेत्रे, पवित्र नद्या, हिमालयादि पर्वत, - वन-आश्रमवतीं महीं चरेत् - तपोवने आणि ऋषींचे आश्रम यांस आश्रय देणार्‍या पृथ्वीवर हिंडावे ॥ २४ ॥

वानप्रस्थाश्रमपदेषु - वामप्रस्थांच्या आश्रमाच्या स्थानी - अभीक्ष्णं - वारंवार - भैक्ष्यं आचरेत् - भिक्षा घेण्यास संन्याशाने जावे - शिलांधसा - कण टिपून गोळा केलेल्या पवित्र अन्नाने - आशु - लवकरच - असंमोहः - मोहशून्य - शुद्धसत्त्वः - शुद्धचित्त होऊन - संसिद्‌ध्‌यति - संसिद्धि मुक्ति मिळते ॥ २५ ॥

एतत् वस्तुतया न पश्येत् - हे दृश्य जग व त्यातील पदार्थ ‘वस्तु ’ सत् आहे, असे केव्हाही समजू नये - दृश्यमानं विनाश्यति - जे जे दृश्य आहे, त्याचा नाश होतो - असक्तचित्तः - अनासक्त मनाने - इहामुत्र चिकीर्षितात् - येथे अथवा स्वर्लोकी इच्छिलेल्या विषय-सुखापासून - विरमेत् - पराङ्‌मुखच व्हावे ॥ २६ ॥

मनोवाक्‌प्राणसंहतं - मन, वाणी व प्राण यांच्या सह वर्तमान - यत् एतत् जगत् - अथवा यांनीच उत्पादिलेले हे सर्व दृश्य जग - आत्मनि - आत्मस्वरूपात विलास करीत आहे - सर्वं - ते सर्व - ‘माया ’ इति - माया म्हणजे मिथ्या आहे असे - तर्केण - न्यायाने समजून - स्वस्थः - आत्मस्वरूपी जीवाने - त्यक्त्वा - त्याचा त्याग करावा - तत् न स्मरेत् - त्याचे स्मरणही करू नये ॥ २७ ॥

विरक्तः ज्ञाननिष्ठः वा - विषयाविषयी विरक्त होऊन आत्मैक्यज्ञानात एकनिष्ठ असणारा अथवा - अनपेक्षकः मद्‌भक्तः वा - निष्काम असणारा असा जो माझा भक्त - सलिंगान् आश्रमान् त्यक्त्वा - ज्यास काही तरी विशिष्ट चिन्हे असतात असे चारी आश्रम सोडून द्यावे - अविधिगोचरः चरेत् - त्या त्या आश्रमात श्रुतीने विहित केलेल्या विधींचे दास्य या विरक्त भक्ताने पत्करू नये ॥ २८ ॥

बुधः बालकवत् क्रीडेत् - प्रौढ ज्ञानी असूनही त्याने लहान मुलांसारखे खेळावे - कुशलः जडवत् चरेत् - कार्यनिपुण असूनही जडाप्रमाणे, जो प्रसंग येईल तो भोगावा - विद्वान् उन्मत्तवत् वदेत् - विवेकपूर्ण असूनही उन्मत्ताप्रमाणे बडबडावे - नैगमः गोचर्यां चरेत् - श्रुतिज्ञ असूनही वृषभाप्रमाणे स्वैर वागावे ॥ २९ ॥

वेदवादरतः न स्यात् - वेदविहित कोणते, अविवाहित कोणते, या संबंधे गुंतून जाऊन वाद करू नये - न पाखंडी - नास्तिक असू नये - न हैतुकः - तर्क किंवा तर्कट काढीत बसू नये - शुष्कवादविवादे - निरर्थक वादामध्ये - न कंचित् पक्षं समाश्रयेत् - कोणत्याही पक्षाचा अवलंब करू नये ॥ ३० ॥

धीरः जनात् न उद्विजेत - बुद्धिवान धैर्यवंताने लोकसमागम होतो म्हणून दुःखी कष्टी असू नये - च - आणि - जनं तु न उद्वेजयेत् - लोकांसही आपण दुःख देऊ नये - अतिवादान् तितिक्षेत - अपशब्द सहनच करावे - कंचन न अवमन्येत - कोणाचाही अपमान करू नये - देहं उद्दिश्य - या देहासाठी - पशुवत् - पशूप्रमाणे - केनचित् - कोणाशीही - वैरं न कुर्यात् - वैर करू नये ॥ ३१ ॥

हि - कारण - परः आत्मा एकः एव - परमात्मा एकचएक अद्वितीय आहे - भूतेषु आत्मनि (च) अवस्थितः - तोच सर्व भूतांमध्ये व आपल्या जीवात्म्यामध्ये राहिला आहे - उदपात्रेषु यथा इंदुः - जसा एकच चंद्र निरनिराळ्या उदकपात्रांत प्रतिबिंबित असतो - भूतानि एकात्मकानि - सर्व भूते एकात्मकच आहेत. तो परमात्माच सर्व भिन्न भूतांचा कर्ता आहे ॥ ३२ ॥

क्वचित् कालेकाले अशनं अलब्ध्वा - क्वचित केव्हा केव्हा अशन म्हणजे भिक्षेचे अन्न न मिळालेच तर - न विषीदेत - खिन्न होऊ नये - लब्ध्वा न हृष्येत् - भिक्षा मिळाली म्हणून हर्षही मानू नये - धृतिमान् - धैर्य धरून असावे - उभयं दैवतंत्रितं - भिक्षा मिळणे वा न मिळणे दोन्ही दैवाधीन आहेत ॥ ३३ ॥

आहारार्थं तत् समीहेत - आहारासाठी, शरीर जिवंत ठेवण्यासाठी मात्र भिक्षा मागावी - प्राणधारणं युक्तं - प्राणांचे धारणपोषण करणे युक्त आहे - तेन तत्त्वं विमृश्यते - सप्राण शरीर ठीक असेल तरच आत्मतत्वाचा विचार करता येतो - तत् विज्ञाय - ते तत्त्व जाणले असता - विमुच्यते - मोक्ष मिळतो ॥ ३४ ॥

श्रेष्ठं उत अपरं - चांगले मिष्ट असो, किंवा खारट, तुरट, तिखट असो - यदृच्छया उपपन्नान्नं अद्यात् - यदृच्छेने, दैववशात जे अन्न आपल्यास मिळाले असेल, ते संतोषाने खावे - तथा वासः - हाच विचार वस्त्राचा, आच्छादनाचा - तथा शय्यां - असाच निद्रास्थानाचाही विचार करावा - प्राप्तं प्राप्तं मुनिः भजेत् - जे काय ज्या काळी प्राप्त होईल, त्याचे संतुष्ट मनाने मुनीने सेवन करावे ॥ ३५ ॥

ज्ञानी - आत्मज्ञान्याने - शौचं आचमनं स्नानं - आपला प्रातर्विधि, आचमन, स्नान वगैरे विधि - चोदनया - श्रुति सांगते म्हणूनच - न तु चरेत् - संपादू नये - अन्यान् च नियमान् - इतर दुसर्‍या नियमांची हीच गति ठेवावी - यथा अहं ईश्वरः लीलया - जसा मी ईश्वर लीलेने वागतो (श्रुति सांगते म्हणून वागतो असे नव्हे) तीच रीति ज्ञान्याने स्वीकारावी. कारण तो स्वतंत्रच असतो ॥ ३६ ॥

हि तस्य विकल्पाख्या ख्यातिः न - कारण त्या आत्मनिष्ठ यतीला विकल्पभेद हे आहे नाव जिचे अशी ख्याति- ज्ञान, तात्पर्य भेदज्ञान मुळीच नसते - या च - जे भेदज्ञान - मद्वीक्षया हता - मत्स्वरूपाचे ज्ञान झाल्यामुळे नष्टच झालेले असते - आ देहांतात् - हा वर्तमान देह आहे तोपर्यंत - क्वचित् - केव्हातरी - ततः मया संपद्यते - हा वर्तमान देह पडल्यावर तो परमात्मा प्राप्त करून घेतो ॥ ३७ ॥

दुःखोदर्केषु - दुःखमूलक व दुःखपरिणामी, - कामेषु - जे काम म्हणजे इच्छा वासना आणि त्यांचे विषय आहेत - जातनिर्वेदः - त्यांसंबंधी ज्याला वैराग्य उत्पन्न झाले अशा - आत्मवान् - आत्मवंत पुरुषाने - अजिज्ञासितमद्‌धर्मः - माझ्या स्वरूपप्राप्तीची साधने समजून घेण्याकरिता - मुनि गुरुं उपाव्रजेत् - ब्रह्मज्ञान असणार्‍या मुनीला गुरु म्हणून शरण जावे ॥ ३८ ॥

यावत् ब्रह्म विजानीयात् तावत् - ब्रह्माचे ज्ञान व विज्ञान होईतोपर्यंत - मां एव गुरुं - गुरु म्हणजे मी परमात्मा अशी भावना धरून - आदृतः - आदरपूर्वक - श्रद्धावान् - श्रद्धा ठेऊन, श्रद्धेने - अनसूयकः - मनात कसलीही असूया, मत्सर न बाळगता - भक्तः - भक्त होऊन - परिचरेत् - गुरुची सेवा करावी ॥ ३९ ॥

तु - परंतु - यः - जो - असंयतषड्‌वर्गः - षड्‌वर्गाचे निग्रह करणारा नाही - प्रचंडेंद्रियसारथिः - बलवान इंद्रिये हेच ज्याच्या देहरथाचे सारथी आहेत (ज्याला) - ज्ञानवैराग्यरहितः - आत्मज्ञान नसून वैराग्यही नाही - त्रिदंडं उपजीवति - त्रिदंडी यतिवेष उपजीविकेकरिता जो धारण करतो ॥ ४० ॥

सुरान् - तो देवांचा - आत्मानं - जीवात्म्याचा - आत्मस्थं मां - आपल्या शरीरी राहणार्‍या माझा, परमात्म्याचा - निन्हुते - तिरस्कार करतो - च - आणि - धर्महा - स्वस्वरूपाची व स्वकर्तव्यांची हत्या करतो - अस्मात् अमुष्मात् च - येथील व परलोकांतील सुखे - विहीयते - मिळत नाहीत - अविपक्वकषायः - त्याचे कामक्रोधादि षड्रिपु जोरात असतात ॥ ४१ ॥

भिक्षोः धर्मः शमः अहिंसा - संन्याशाचे धर्म मनाची शांति आणि हिंसाशून्यता - वनौकसः तपः ईक्षा - वानप्रस्थाचे तपश्चरण व यजन म्हणजे अग्निसेवा - गृहिणः भूतरक्षा इज्या - गृहस्थाचे जीवांचे रक्षण आणि यजन म्हणजे यज्ञयाग - द्विजस्य आचार्यसेवनं - ब्रह्मचार्‍याचा धर्म गुरुसेवा होय ॥ ४२ ॥

गृहस्थस्य अपि - गृहस्थाचे आणखी धर्म ऐक - ब्रह्मचर्यं तपः - ब्रह्मचर्य, तपाचे आचरण, - शौचं संतोषः - शरीर व मनाची पवित्रता, समाधान, - भूतसौहृदं सर्वेषां मदुपासनं - सर्वांशी मैत्री आणि सर्वात्मक अशा माझी उपासना हे त्याचे धर्म होत - ऋतौ गन्तुः - ऋतुकाली भार्यासमागम हे गृहस्थाचे ब्रह्मचर्यच ॥ ४३ ॥

इति - याप्रमाणे - स्वधर्मेण मां नित्यं - स्वतःच्या वर्णाश्रमधर्माचे आचरणद्वाराच - अनन्यभाक् भजन् - माझी अनन्यभक्ति करणारा - सर्वभूतेषु मद्‌भावः - सर्व भूतांचे ठायी मीच परमेश्वर आहे अशी श्रद्धा ठेवणारा - यः - (जो) त्याला - अचिरात् मद्‍भक्तिं विंदते - लवकरच माझी दृढ भक्ति प्राप्त होते ॥ ४४ ॥

उद्धव - उद्धवा - अनपायिन्या भक्त्या - शाश्वत आणि अखंड भक्तीने - सर्वलोकमहेश्वरं - सर्व भूतभुवनांचा जो परमश्रेष्ठ ईश्वर - सर्वोत्पत्त्यप्ययं - जो सर्वांची उत्पत्ति व संहार करतो - (व) - कारणं - जो सर्वकारण आहे - ब्रह्म - जो ब्रह्मस्वरूप आहे - मा - त्या माझ्याप्रत - सः उपयाति - तो अनन्य भक्त प्राप्त होतो ॥ ४५ ॥

इति - अशा प्रकारच्या - स्वधर्मनिर्णिक्तसत्वः - स्वधर्माचरणाने शुद्धचित्त झालेला - निर्ज्ञातमद्‌गतिः - माझे ऐश्वर्य जाणलेला तो भक्त - ज्ञानविज्ञानसंपन्नः - परोक्षज्ञान व अपरोक्षज्ञान यांनी संपन्न होऊन - न चिरात् - लवकरच - माम् समुपैति - मजप्रत येऊन मिळतो ॥ ४६ ॥

वर्णाश्रमवतां - द्विज वर्गातील चार आश्रमांत ज्यांचा अंतर्भाव होतो त्याचा - एषः आचारलक्षणः धर्मः - हा सांगितलेला आचरणाचा धर्म, कर्तव्याचरणाचा धर्म आहे - सः एव मद्‌भक्तियुतः - त्यालाच माझ्या भक्तीची जोड मिळाली म्हणजे - निःश्रेयसकरः - मोक्ष देणारा - परः - अत्यंत श्रेष्ठ धर्म होतो ॥ ४७ ॥

साधो - हे साधो उद्धवा - भवान् यत् च मां पृच्छति - तू जे काय मला विचारले होतेस - एतत् ते अभिहितं - ते हे मी तुला सांगितले - यथा स्वधर्म संयुक्तः भक्तः - स्वधर्माचे आचरण शास्त्रोक्त पद्धतीने करणारा माझा अनन्यभक्त - मां परं समियात् - श्रेष्ठ परमात्मा जो मी त्या मजप्रत येऊन पोहोचेल ॥ ४८ ॥

अध्याय अठरावा समाप्त

GO TOP