श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६४ वा - अन्वयार्थ

नृग राजाची कथा -

राजन् - हे परीक्षित राजा - एकदा - एके दिवशी - साम्बप्रद्युम्नचारुभानुगदादयः - सांब, प्रद्युम्न, चारु, भानु व गद इत्यादि - यदुकुमारकाः - यदुपुत्र - विहर्तुं उपवनं जग्मुः - क्रीडा करण्यासाठी बागेत गेले. ॥१॥

तत्र सुचिरं क्रीडित्वा - तेथे बराच वेळ खेळून - पिपासिताः - तहान लागलेले - जलं विचिन्वंतः - पाणी शोधणारे - निरुदके कूपे - पाणी नसलेल्या एका विहिरीत - अद्‌भुतं सत्त्वं ददृशुः - आश्चर्यजनक प्राण्याला पहाते झाले. ॥२॥

गिरिनिभं कृकलासं वीक्ष्य - पर्वताप्रमाणे विस्तीर्ण अशा सरडयाला पाहून - विस्मितमानसाः कृपयान्विताः ते - आश्चर्ययुक्त अंतःकरण झालेले व दयायुक्त असे ते कुमार - तस्य च उद्धरणे यत्‍नं चक्रुः - त्याला वर काढण्याचा प्रयत्‍न करिते झाले. ॥३॥

उत्सुकाः - उत्कंठित झालेले - अर्भकाः - ते बालक - पतितं (तं) - पडलेल्या त्या सरडयाला - चर्मजैः तान्तवैः पाशैः बद्‌ध्वा - कातडयाच्या व तंतूंच्या पाशांनी बांधून - समुद्धर्तुं न अशक्नुवन् - वर काढण्यास समर्थ झाले नाहीत - कृष्णाय आचख्युः - श्रीकृष्णाला सांगते झाले. ॥४॥

स विश्वभावनः अरविन्दाक्षः भगवान् - तो जगाचे संरक्षण करणारा कमलनेत्र भगवान श्रीकृष्ण - तत्र आगत्य - तेथे येऊन - वीक्ष्य (च) - आणि पाहून - वामेन करेण - डाव्या हाताने - तं लीलया उज्जहार - त्या सरडयाला सहज वर काढिता झाला. ॥५॥

उत्तमश्लोककराभिमृष्टः सः - श्रीकृष्णाच्या हाताने मुक्त झालेला तो सरडा - सद्यः कृकलासरूपं विहाय - तत्काळ सरडयाचे स्वरूप टाकून - संतप्तचामीकरचारुवर्णः - तापलेल्या सुवर्णाप्रमाणे सुंदर वर्णाचा - अद्‌भुतालङकरणाम्बरस्रक् - आश्चर्यजनक आहेत अलंकार, वस्त्रे व माळ ज्याची असा - स्वर्गी (बभूव) - स्वर्गात रहाणारा देव झाला. ॥६॥

मुकुन्दः विद्वान् अपि - श्रीकृष्ण जाणत असताहि - तन्निदानं जनेषु विख्यापयितुं - त्याला सरडयाचा जन्म प्राप्त होण्याचे कारण लोकांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी - पप्रच्छ - विचारिता झाला - महाभाग - हे महाभाग्यवंता - वरेण्यरूपः त्वं कः - श्रेष्ठ स्वरूप धारण करणारा तू कोण आहेस - नूनं त्वां देवोत्तमं गणयामि - खरोखर तुला श्रेष्ठ देव असे समजतो. ॥७॥

सुभद्र - हे दैवशाली पुरुषा - अतदर्हः (त्वं) - ह्या वाईट स्थितीला अयोग्य असा तू - कतमेन वा कर्मणा - कोणत्या बरे कर्माने - इमां दशां संप्रापितः असि - ह्या अवस्थेला पोचविला गेलास - यत् अत्र नः वक्तुं क्षमं मन्यसे - जर ह्या बाबतीत आम्हांला सांगणे योग्य वाटत असेल तर - विवित्सतां नः आत्मानं आख्याहि - जाणण्याची इच्छा करणार्‍या आम्हाला स्वतःचे वृत्त सांग. ॥८॥

अनन्तमूर्तिना कृष्णेन - अंतरहित आहे स्वरूप ज्याचे अशा श्रीकृष्णाने - इति संपृष्टः राजा - याप्रमाणे विचारलेला राजा - अर्कवर्चसा किरीटेन - सूर्यासारख्या तेजस्वी अशा मुकुटाने - माधवं प्रणिपत्य - श्रीकृष्णाला नमस्कार करून - आह स्म - म्हणाला. ॥९॥

प्रभो - हे कृष्णा - अहं इक्ष्वाकुतनयः - मी इक्ष्वाकु राजाचा पुत्र - नृगः नाम नरेन्द्रः - नृग नावाचा राजा - दानिषु आख्यायमानेषु - दानशूर लोक वर्णिले जात असता - यदि ते कर्णं अस्पृशम् - बहुधा तुझ्या ऐकिवातहि मी आलो असेन. ॥१०॥

नाथ - हे श्रीकृष्णा - सर्वभूतात्मसाक्षिणः - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मरूपाने रहाणार्‍या - कालेन अव्याहतदृशः ते - काळाने ज्याचे ज्ञान नष्ट झाले नाही अशा तुला - किं नु अविदितं (स्यात्) - काय बरे माहित नाही असे आहे - अथापि तव आज्ञया वक्ष्ये - तरी सुद्धा तुझ्या आज्ञेने मी सांगतो. ॥११॥

भूमेः यावन्त्यः सिकताः - पृथ्वीवर जितके म्हणून रजःकण आहेत - दिवि यावन्त्यः तारकाः - आकाशात जितकी नक्षत्रे आहेत - यावन्त्यः च वर्षधाराः - आणि जितक्या म्हणून पावसाच्या धारा आहेत - तावतीः गाः अददं स्म - तितक्या गाई मी दान दिल्या. ॥१२॥

अहं - मी - पयस्विनीः - चांगल्या दूध देणार्‍या - तरुणीः - तरुण - शीलरूपगुणोपपन्नाः - स्वभावाने, रूपांनी व गुणांनी श्रेष्ठ अशा - हेमश्रृङगीः - सोन्याने मढविली आहेत शिंगे ज्यांची अशा - रूप्यखुराः - रुप्याची टोपणे आहेत खुरांवर ज्यांच्या अशा - दुकूलमालाभरणाः - रेशमी वस्त्रे, माळा व अलंकार घातलेल्या - सवत्साः कपिलाः - वासरांसह कपिला गाई - न्यायार्जिताः - न्यायाने मिळविलेल्या - ददौ - देता झालो. ॥१३॥

स्वलङकृतेभ्यः गुणशीलवद्‌भ्यः - अलंकार घातलेल्या, गुण व स्वभाव यांनी युक्त अशा - सीदत्कुटुम्बेभ्यः ऋतव्रतेभ्यः - ज्यांची बायका मुले गरीबीमुळे दुःख भोगीत आहेत अशा व खरे बोलणार्‍या - तपःश्रुतब्रह्मवदान्यसद्‌भ्यः - तपश्चर्या, वेदाध्ययन व अध्यात्मविचार करणार्‍या व दानधर्म करणार्‍या - युवभ्यः द्विजपुङगवेभ्यः - तरुण श्रेष्ठ ब्राह्मणांना - (गाः) प्रादाम् - गाई देता झालो. ॥१४॥

गोभूहिरण्यायतनाश्वहस्तिनः - गाई, पृथ्वी, सुवर्ण, घरे, घोडे व हत्ती - सदासीः कन्याः - दासींसह कन्या - तिलरूप्यशय्याः - तीळ, रुपे व शय्या - वासांसि रत्‍नानि - वस्त्रे व रत्‍ने - परिच्छदान् रथान् - परिवार, रथ - यज्ञैः च इष्टं - आणि यज्ञांनी पूजा केली - पूर्तम् च चरितम् - आणि विहिरी बांधणे इत्यादि धर्मकृत्ये केली. ॥१५॥

कस्यचित् द्विजमुख्यस्य - कोणा एका श्रेष्ठ ब्राह्मणाची - भ्रष्टा गौः - पळून आलेली गाय - मम गोधने संपृक्ता - माझ्या गाईच्या कळपात मिसळली - अविदुषा मया च - आणि ते न जाणणार्‍या माझ्या कडून - सा - ती गाय - (अन्वस्मै) द्विजातये दत्ता - दुसर्‍या ब्राह्मणाला दिली गेली. ॥१६॥

तत्स्वामी - त्या गाईचा स्वामी - नीयमानां तां दृष्टवा - नेल्या जाणार्‍या त्या गाईला पाहून - मम (इयं) इति तं उवाच - माझी ही गाय आहे असे त्या ब्राह्मणाला म्हणाला - प्रतिग्राही - दान घेणारा - मम (इयं) इति - ही माझी आहे असे - नृगः मे दत्तवान् इति - नृगराजा ही मला देता झाला असे - आह - म्हणाला. ॥१७॥

स्वार्थसाधकौ विवदमानौ विप्रौ - स्वार्थलंपट व वाद करणारे ते दोघे ब्राह्मण - भवान् दाता अपहर्ता इति - तू दान देणारा व परत घेणारा आहेस असे - माम् ऊचतुः - मला म्हणाले - तत् श्रुत्वा मे भ्रमः अभवत् - ते ऐकून मला भ्रम उत्पन्न झाला. ॥१८॥

धर्मकृच्छ्‌रगतेन (मया) उभौ विप्रौ अनुनीतौ - धर्मविषयक संकटात सापडलेल्या माझ्याकडून ते दोघे ब्राह्मण प्रार्थिले गेले - प्रकृष्टानां गवां लक्षं दास्यामि वै - खरोखर एक लक्ष उत्कृष्ट गाई मी देईन - एषा प्रदीयतां - ही गाय मला द्यावी. ॥१९॥

भवन्तौ - तुम्ही - अविजानतः किंकरस्य - अज्ञानी सेवक अशा माझ्यावर - अनुगृह्‌णीतां - अनुग्रह करा - अशुचौ निरये पतन्तं मां - अपवित्र नरकात पडणार्‍या मला - कृच्छ्‌रात् समुद्धरतं - संकटातून वर काढा. ॥२०॥

राजन् - हे राजा - अहं (इमां दातुम्) वै न प्रतीच्छे - मी ही देऊ इच्छित नाही - इति उक्त्वा - असे म्हणून - स्वामी अपाक्रमत् - गाईचा मूळ स्वामी निघून गेला - अपरः - दुसरा ब्राह्मण - अन्यत् गवां अयुतं अपि (गृहीतुम्) - हिच्या शिवाय दुसर्‍या लक्षहि गाई घेण्यास - न इच्छामि - मी इच्छित नाही - इति ययौ - असे म्हणून निघून गेला. ॥२१॥

देवदेव जगत्पते - हे देवाधिदेवा जगन्नाथा - एतस्मिन् अन्तरे - इतक्या अवधीत - याम्यैः दूतैः (अहं) यमक्षयं नीतः - यमाच्या दूतांकडून मी यमलोकी नेला गेलो - तत्र अहं यमेन पृष्टः - तेथे मी यमाकडून विचारिला गेलो. ॥२२॥

नृपते - हे राजा - त्वं पूर्वं अशुभं भुङ्‌क्षे - तू प्रथम पापाचे फळ भोगणार - उताहो - किंवा - शुभं (भुङ्‌क्षे) - पुण्याचे फळ भोगणार ? - भास्वतः लोकस्य - तेजस्वी पुरुषांच्या - दानस्य धर्मस्य - दानधर्माचा - अन्तं न पश्ये - अंत मी पहात नाही. ॥२३॥

देव - हे यमा - पूर्वं अशुभं भुञ्जे - प्रथम मी पापफळ भोगतो - इति (अहम् अब्रुवम्) - असे मी म्हणालो - सः पत इति प्राह - तो यम पड असे म्हणाला - प्रभो - हे कृष्णा - तावत् पतन् (अहं) - तेव्हा पडणारा मी - आत्मानं कृकलासं अद्राक्षम् - स्वतःला सरडा झालेला पहाता झालो. ॥२४॥

केशव - हे श्रीकृष्णा - ब्रह्मणस्य वदान्यस्य - ब्राह्मणांचे रक्षण करणार्‍या दानशूर अशा - तव दासस्य - तुझा सेवक अशा - भवत्सन्दर्शनार्थिनः - तुमच्या दर्शनाची इच्छा करणार्‍या - (मे) स्मृतिः अद्य अपि न विध्वस्ता - माझी आठवण अजूनहि नाहीशी झाली नाही. ॥२५॥

विभो अधोक्षज - हे समर्था श्रीकृष्णा - योगेश्वरैः श्रुतिदृशा अमलहृद्विभाव्यः - योगाधिपतींनी ज्ञानदृष्टिने आपल्या निर्मल अन्तःकरणात अवलोकिला जाणारा - सः परात्मा त्वं - परमेश्वर असा तो तू - उरुव्यसनान्धबुद्धेः मम - मोठया दुःखाने ज्याची बुद्धि अन्ध झालेली आहे अशा माझ्या - कथं अक्षिपथः (कथं च) मे साक्षात् (भूतः) - दृष्टीच्या मार्गात प्रत्यक्ष कसा पडलास - यस्य भवापवर्गः (भवति) - ज्याची संसारबंधनातून मुक्तता होते - (तस्य) इह (भवान्) अनुदृश्यः स्यात् - त्याला या ठिकाणी तू दृश्य होतोस. ॥२६॥

देवदेव जगन्नाथ - हे देवाधिदेवा जगत्पते - गोविन्द पुरुषोत्तम - हे गोविन्दा, हे पुरुषश्रेष्ठा श्रीकृष्णा - नारायण हृषीकेश - हे नारायणा, हे हृषीकेशा - पुण्यश्लोक अव्यय अच्युत - हे पुण्यकीर्ते अविनाशीस्वरूपा अच्युता - प्रभो कृष्ण - हे समर्था कृष्णा - देवगतिं यान्तं मां अनुजानीहि - स्वर्गाला जाणार्‍या मला आज्ञा दे - यत्र क्व अपि सतः मे चेतः - कोणत्याहि ठिकाणी असलो तरी माझे अन्तःकरण - त्वत्पदास्पदं भूयात् - तुझ्या चरणी लागलेले असो. ॥२७-२८॥

सर्वभावाय - सर्वांच्या उत्पत्तीला कारण अशा - अनन्तशक्तये ब्रह्मणे ते नमः - अनंतशक्ति व ब्रह्मस्वरूपी अशा तुला नमस्कार असो - योगानां पतये वासुदेवाय कृष्णाय नमः - योगाधिपति व वसुदेवपुत्र अशा श्रीकृष्णाला नमस्कार असो. ॥२९॥

इति उक्त्वा - असे म्हणून - तं परिक्रम्य - त्या श्रीकृष्णाला प्रदक्षिणा घालून - स्वमौलिना पादौ स्पृष्टवा - आपल्या मस्तकाने पायांना स्पर्श करून - अनुज्ञातः (सः) - आज्ञा दिलेला तो नृगराजा - नृणां पश्यतां - लोक पहात असता - विमानाग्र्यम् आरुहत् - श्रेष्ठ विमानात बसला. ॥३०॥

ब्रह्मण्यदेवः धर्मात्मा - ब्राह्मणांचे रक्षण करणारा धर्ममूर्ति देव असा - भगवान् देवकीसुतः कृष्णः - भगवान देवकीपुत्र श्रीकृष्ण - राजन्यान् अनुशिक्षयन् - राजेलोकांना शिक्षण देत - परिजनं प्राह - सेवक मंडळीला सांगता झाला. ॥३१॥

मनाक् अपि भुक्तं ब्रह्मस्वं - थोडेहि उपभोगिलेले ब्राह्मणाचे द्रव्य - अग्नेः तेजीयसः (पुरुषस्य) अपि दुर्जरं बत - अग्नीहून तेजस्वी अशा पुरुषाला सुद्धा पचविता येणे खरोखर कठीण आहे - ईश्वरमानिनां राज्ञां किमुत - तर मग आपण समर्थ आहो असा अभिमान बाळगणार्‍या राजांची कथा काय ? ॥३२॥

अहं - मी - यस्य प्रतिक्रिया (विद्यते) - ज्याच्यावर उलट उपाय आहे - (तत्) हालाहलं विषं न मन्ये - त्या हालाहलाला विष असे माहीत नाही - हि ब्रह्मस्वं विषं प्रोक्तं - खरोखर ब्राह्मणाचे द्रव्य हेच विष होय असे सांगितले आहे - भुवि अस्य प्रतिविधिः न (शक्यते) - पृथ्वीवर याचा परिहार करिता येत नाही.॥३३॥

विषं अत्तारं हिनस्ति - विष खाणाराला मारिते - अद्‌भिः वह्निः प्रशाम्यति - उदकांनी अग्नि शांत होतो - ब्रह्मस्वारणिपावकः (तु) - पण ब्राह्मणांचे द्रव्य हेच कोणी अग्निमंथनकाष्ठ त्यापासून उत्पन्न झालेला अग्नि - कुलं समूलं दहति - कुळाला समूळ जाळितो. ॥३४॥

दुरनुज्ञातं ब्रह्मस्वं - दुःखाने आज्ञा दिलेले ब्राह्मणांचे द्रव्य - भुक्तं (सत्) - खाल्ले असता - त्रिपुरुषं हन्ति - तीन पुरुषांना मारिते - बलात् प्रसह्य भुक्तं तु - बलात्काराने एकाएकी घेऊन खाल्लेले तर - दश पूर्वान् दश अपरान् (हन्ति) - दहा पूर्वीचे पुरुष व दहा पुढील पुरुष यांना मारिते. ॥३५॥

राजलक्ष्‌म्या अन्धाः - राज्यैश्वर्याने आंधळे बनलेले - ये बालिशाः राजानः - जे मूर्ख राजे - निरयं ब्रह्मस्वं - नरकरूपी ब्राह्मणाच्या द्रव्याला - साधु अभिमन्यंते - चांगले मानितात - (ते) आत्मपातं न विचक्षते - ते स्वतःचा नाश पहात नाहीत. ॥३६॥

हृतवृत्तीनां वदान्यानां कुटुम्बिनाम् - ज्यांची उपजीविकेची साधने हरण केली गेली आहेत व जे दानशूर असून कुटुंबवत्सल आहेत अशा - क्रन्दतां विप्राणां - आक्रोश करणार्‍या ब्राह्मणांचे - अश्रुबिन्दवः - अश्रुबिंदु - यावतः पांसून् गृह्‌णन्ति - जितक्या धुळीच्या कणांवर पडतील - तावतः अब्दान् - तितकी वर्षेपर्यंत - निरङकुशाः - उच्छृंखल असे - ब्रह्मदायापहारिणः - ब्राह्मणांचे द्रव्य हरण करणारे - राजानः राजकुल्याः च - राजे व राजकुलातील पुरुष - कुम्भीपाकेषु पच्यन्ते - कुंभीपाक नावाच्या नरकात दुःख भोगतात. ॥३७-३८॥

च - आणि - यः - जो - स्वदत्तां परदत्तां वा - स्वतः दिलेल्या किंवा दुसर्‍याने दिलेल्या - ब्रह्मवृत्तिं हरेत् - ब्राह्मणांच्या उपजीविकेचे हरण करील - (सः) षष्टिः वर्षसहस्राणि - तो साठ हजार वर्षेपर्यंत - विष्ठायां कृमिः जायते - विष्ठेमधील किडा होतो. ॥३९॥

मे ब्रह्मधनं न भूयात् - माझ्याजवळ ब्राह्मणांचे द्रव्य असू नये - यत् गृध्वा - जे इच्छून - अल्पायुषः नराः - अल्पायु झालेले लोक - पराजिताः राज्यात् च्युताः - पराभव पावलेले व राज्यापासून भ्रष्ट झालेले - उद्वेजिनः अहयः भवन्ति - लोकांना पीडा देणारे साप होतात. ॥४०॥

मामकाः - हे माझ्या भक्तांनो - घ्नन्तं बहु शपन्तं - मारणार्‍या किंवा पुष्कळ शाप देणार्‍या - कृतागसं अपि वा - अथवा अपराध करणार्‍याहि - विप्रम् - ब्राह्मणाचा - न एव द्रुह्यत - द्रोह करूच नका - (अपि तु) नित्यशः नमस्कुरुत- पण उलट तुम्ही त्यांना नित्य नमस्कार करा.॥४१॥

यथा अहं - ज्याप्रमाणे मी - समाहितः - स्वस्थ अंतःकरणाने युक्त असा - अनुकालं विप्रान् प्रणमे - वेळोवेळी ब्राह्मणांना नमस्कार करितो - तथा यूयं च नमत - त्याप्रमाणे तुम्हीही नमस्कार करा - यः अन्यथा सः मे दण्डभाक् - जो तसे न करील तो माझ्या दंडास पात्र होईल.॥४२॥

हि - कारण - ब्राह्मणगौः - ब्राह्मणाची गाय - अजानन्तम् अपि एनं नृगं इव - जशी न जाणणार्‍याहि ह्या नृगराजाला नरकात पाडिती झाली तसे - अपहृत ब्राह्मणार्थः - हरण केलेले ब्राह्मणाचे द्रव्य - हर्तारं अधः पातयति हि - हरण करणार्‍याला खरोखर नरकात पाडिते. ॥४३॥

सर्वलोकानां पावनः मुकुन्दः भगवान् - सर्व लोकांना पवित्र करणारा भगवान श्रीकृष्ण - एवं द्वारकौकसः विश्राव्य - याप्रमाणे द्वारकावासी लोकांना सांगून - निजमन्दिरं विवेश - आपल्या मंदिरी गेला. ॥४४॥

अध्याय चौसष्ठावा समाप्त

GO TOP