|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १९ वा - अन्वयार्थ
गाई आणि गोपांचा वणव्यातून बचाव - गोपेषु क्रीडासक्तेषु - गोप खेळण्यात गढून गेले असता - स्वैरं चरन्त्यः दुरचारिणीः तद्वावः - स्वच्छंदाने चरत दूर गेलेल्या त्यांच्या गाई - तृणलोभेन गह्वरं विविशुः - गवताच्या लोभाने एका गुहेत शिरल्या. ॥१॥ वनात् वनं निर्विशन्त्यः - एका वनातून दुसर्या वनात शिरणार्या - दावतर्षिताः क्रन्दत्यः - अरण्यात फिरल्यामुळे तहानेने व्याकुळ झालेल्या व आक्रोश करणार्या - अजाः गावः महिष्यः च - शेळ्या, गाई व म्हशी - ईषिकाटवीं निर्विविशुः - दाट गवताच्या रानात शिरल्या. ॥२॥ तदा - त्यावेळी - पशून् अपश्यन्तः - गाईंना न पाहणारे - ते कृष्णरामादयः गोपाः - ते कृष्ण, बलराम आदिकरून गोपाळ - विचिन्वतः - शोधीत - जातानुतापाः - झाला आहे पश्चात्ताप ज्यांना असे - गवां गतिं न विदुः - गाईंचे काय झाले ते जाणते झाले नाहीत. ॥३॥ नष्टाजीव्याः विचेतसः सर्वे - खाणेपिणे सोडून दिलेले व भ्रांतचित्त झालेले ते सर्व गोप - तत्खुरदच्छिन्नैः - गाईंच्या खुरांच्या प्रहारांनी छिन्नभिन्न झालेल्या - गौष्पदैः अङ्कितैः तृणैः - गाईंच्या पावलांनी चिन्हित झालेल्या गवतांनी - गवां मार्गं अन्वगमन् - गाईंचा मार्ग काढीत गेले. ॥४॥ ततः - नंतर - तृषिताः श्रान्ताः - तहानेने व्याकूळ होऊन थकलेले ते गोप - मुञ्जाटव्यां भ्रष्टमार्गं - मुंज नावाच्या गवताच्या रानात चुकला आहे रस्ता ज्यांचा असा - क्रन्दमानं स्वगोधनं संप्राप्य - आक्रोश करणारा आपल्या गाईंचा समूह फिरवून - संन्यवर्तयन् - परत आले. ॥५॥ भगवता - श्रीकृष्णाने - मेघगम्भीरया गिरा आहूताः ताः - मेघासारख्या गंभीर वाणीने बोलाविलेल्या त्या गाई - स्वनाम्नां निनदं श्रुत्वा - आपापल्या नावाचा ध्वनी ऐकून - प्रहर्षिताः प्रतिनेदुः - आनंदित होत्सात्या हंबरू लागल्या. ॥६॥ ततः - नंतर - वनौकसां क्षयकृत् - वनवासी प्राण्यांचा नाश करणारा - सारथिना समीरितः - वायूने पसरविलेला - उल्बणोल्मुकैः - वाढलेल्या ज्वाळांनी - स्थिरजङ्गमान् विलेलिहानः - स्थावरजंगम प्राण्यांना जाळणारा - महान् वनधूमकेतुः - मोठा रानातील वणवा - समन्तात् यदृच्छ्या अभूत् - सर्व बाजूंनी अकस्मात उत्पन्न झाला. ॥७॥ गोपाः गावः - गोप व गाई - परितः आपतन्तं तं दावाग्निं - सभोवार वेढा घालणार्या त्या वणव्याला - प्रसमीक्ष्य भीताः - पाहून भीतीयुक्त झाल्या - च - आणि - मृत्युभयार्दिताः जनाः - मृत्यूच्या भीतीने पीडिलेले लोक - यथा हरिं (तथा) - जसे श्रीविष्णूला शरण जातात तसे - सबलं कृष्णं प्रपन्नाः - बलराम व श्रीकृष्ण यांना शरण जाऊन - ऊचुः - म्हणाले. ॥८॥ हे कृष्ण - हे श्रीकृष्णा - महावीर कृष्ण - हे मोठया पराक्रमी श्रीकृष्णा - अमितविक्रम राम - हे अगणित पराक्रमी बलरामा - दावाग्निना दह्यमानान् - वणव्याने जळत असल्यामुळे - प्रपन्नान् (नः) - शरण आलेल्या आम्हाला - त्रातुं अर्हथः - रक्षण करण्यास तुम्ही योग्य आहात. ॥९॥ कृष्ण - हे कृष्णा - नूनं - खरोखर - त्वद्बान्धवाः - तुझे बांधव - अवसीदितुं न च अर्हन्ति - दुःखित होण्यास योग्य नाहीत - सर्वधर्मज्ञ - हे सर्व धर्म जाणणार्या कृष्णा - वयं हि - आम्ही खरोखर - त्वन्नाथाः - तूच आहेस रक्षणकर्ता ज्यांचा असे - त्वत्परायणाः - तूच आहेस सर्वस्व ज्यांचे असे. ॥१०॥ भगवान् हरिः - भगवान श्रीकृष्ण - बन्धूनां कृपणं वचः निशम्य - आपल्या बांधवांची ती दीन वाणी ऐकून - मा भैष्ट - भिऊ नका - लोचनानि निमीलयत - तुम्ही डोळे मिटा - इति अभाषत - असे म्हणाला. ॥११॥ योगाधीशः भगवान् - योग्यांचा स्वामी असा भगवान श्रीकृष्ण - तथा इति मीलिताक्षेषु (तेषु) - बरे आहे असे म्हणून डोळे मिटले असता - उल्बणं अग्निं मुखेन पीत्वा - पसरलेला अग्नी मुखाने पिऊन - तान् कृच्छ्रात् व्यमोचयत् - त्यांना संकटातून सोडविता झाला. ॥१२॥ ततः च - आणि नंतर - पुनः भाण्डीरं आपिताः ते - पुन्हा भाण्डीरम् वनाला आणिलेले ते - अक्षीणि उन्मील्य - डोळे उघडून - आत्मानं (मोचितं) गाः च - आपल्याला व गाईंना - मोचिताः निशाम्य - सोडविलेले पाहून - विस्मिताः आसन् - आश्चर्यचकित झाले. ॥१३॥ ते - ते गोप - कृष्णस्य योगमायानुभावितं - योगमायेच्या योगे प्रभावशाली असे - तत् योगवीर्यं - ते योगसामर्थ्य - दावाग्नेः आत्मनः क्षेमं - आणि वणव्यापासून स्वतःचे रक्षण - वीक्ष्य - पाहून - तं अमरं मेनिरे - त्याला ईश्वर मानिते झाले. ॥१४॥ गोपैः अभिष्टुतः - गोपांनी स्तविलेला - सहरामः जनार्दनः - बलरामासह श्रीकृष्ण - सायाह्ने वेणुं विरणयन् - संध्याकाळी मुरली वाजवीत - गाः संनिवर्त्य - गाईंना परत फिरवून - गोष्ठं अगात् - गोकुळात आला. ॥१५॥ गोविन्ददर्शने - श्रीकृष्णाचे दर्शन होताच - गोपीनां परमानन्दः आसीत् - गोपींना मोठा आनंद झाला - येन विना - ज्या श्रीकृष्णाशिवाय - यासां क्षणं - ज्यांचा क्षण - युगशतं इव अभवत् - शंभर युगाप्रमाणे होता. ॥१६॥ अध्याय एकोणिसावा समाप्त |