|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ८ वा - अन्वयार्थ
नामकरण-संस्कार आणि बाललीला - राजन् - हे राजा - यदूनां पुरोहितः - यादवांचा पुरोहित - सुमहातपाः गर्गः - अत्यंत मोठा तपस्वी गर्ग मुनी - वसुदेवप्रचोदितः - वसुदेवाच्या सूचनेवरून - नंदस्य व्रजं जगाम - नंदाच्या गोकुळात गेला ॥१॥ तं दृष्ट्वा - त्याला पाहून - परमप्रीतः (नंदः) - अत्यंत आनंदित झालेला तो नंद - प्रत्युत्थाय कृताञ्जलिः - उठून जोडिले आहेत हात ज्याने असा - अधोक्षजधिया - हा विष्णुच होय अशा बुद्धीने - प्रणिपातपुरःसरं - नमस्कारपूर्वक - (तं) आनर्च - त्याला पूजिता झाला. ॥२॥ सूपविष्टं - उत्तमप्रकारे बसलेल्या - कृतातिथ्यं - व ज्याचा अतिथिसत्कार केला आहे - मुनिं - अशा त्या मुनीला - सूनृतया गिरा - आपल्या मधुर वाणीने - नंदयित्वा - आनंदित करून - (नंदः) अब्रवीत् - नंद म्हणाला - ब्रह्मन् - हे ब्रह्मनिष्ठ मुने - पूर्णस्य (ते) - नित्य तृप्त अशा तुझे - किं करवाम - कोणते काम आम्ही करावे. ॥३॥ भगवन् - हे भाग्यशाली मुने - महद्विचलनं - थोरांची हालचाल - दीनचेतसां - ज्यांची अंतःकरणे दुबळी आहेत - गृहिणां नृणां - अशा गृहस्थाश्रमी लोकांच्या - निःश्रेयसाय कल्पते - कल्याणाकरिता असते - अन्यथा क्वचित् न - विनाकारण कधीही नसते. ॥४॥ यत् ज्योतिषां अयनं - जे आकाशस्थ तेजोगोलांच्या गतीचे शास्त्र - तत् अतींद्रियं ज्ञानं - ते इंद्रियांच्या पलीकडील ज्ञान - भवता साक्षात् प्रणीतं - तुम्हांकडून असे प्रत्यक्ष रचिले गेले - येन - ज्याच्या योगाने - पुमान् परावरं वेद - पुरुष मागे केलेली कर्मे व पुढे मिळणारी फले जाणतो. ॥५॥ ब्रह्मविदां श्रेष्ठः त्वं - ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ तू - अनयोः बालयोः - ह्या दोन्ही मुलांचे - संस्कारान् - नामकरणादि संस्कार - कर्तुं अर्हसि - करण्याला योग्य आहेस - हि ब्राह्मणः जन्मना - कारण ब्राह्मण हा जन्मतः - नृणां गुरुः - सर्व मनुष्यांचा गुरु होय. ॥६॥ अहं यदूनां आचार्यः (इति) - मी यादवांचा उपाध्याय म्हणून - भुवि सर्वदा ख्यातः (अस्मि) - पृथ्वीवर सर्वत्र प्रसिद्ध आहे - (अतः) मया संस्कृतं - यास्तव माझ्याकडून संस्कार झालेल्या - ते सुतं - तुझ्या पुत्राला - (कंसः) देवकीसुतं मन्यते - कंस देवकीचा मुलगा मानील ॥७॥ कंसः पापमतिः (अस्ति) - कंस दुष्टबुद्धीचा आहे - तव (च) आनकदुंदुभेः - आणि तुझे तर वसुदेवाशी - सख्यं अस्ति - सख्य आहे - देवक्याः अष्टमः गर्भः - देवकीचा आठवा गर्भ - स्त्री भवितुम् न अर्हति - मुलगी असणे शक्य नाही ॥८॥ इति - असे - देवक्याः दारिकावचः श्रुत्वा - देवकीच्या मुलीचे भाषण ऐकून - संचिंतयन् (कंसः) - विचार करणारा कंस - आगताशंकः - संशय येऊन - अपि (कुमारं) हंता (चेत्) - जर कदाचित मुलाला मारील - तर्हि तत् नः अनयः भवेत् - तर तो आमचा दोष होईल ॥९॥ मामकैः अपि - माझ्या मंडीळीकडूनहि - अलक्षितः (त्वं) - न पाहिला गेलेला असा तू - अस्मिन् गोव्रजे - ह्या गाईच्या गोठ्यात - रहसि - गुप्तपणे - स्वस्तिवाचनपूर्वकं - पुण्याहवाचनपूर्वक - द्विजाति संस्कारं कुरु - द्विजांना युक्त असे संस्कार कर ॥१०॥ एवं संप्रार्थितः - ह्याप्रमाणे प्रार्थना केलेला - (सः) गूढः विप्रः - तो खोलबुद्धीचा गर्ग मुनी - स्वचिकीर्षितं एव - आपण करू इच्छिलेले असेच - तत् बालयोः नामकरणं - त्या दोघा मुलांचे नामकरण - रहिस चकार - एकांती करिता झाला ॥११॥ अयं हि रोहिणीपुत्रः - हा तर रोहिणीचा मुलगा - गुणैः सुहृदः रमयन् - आपल्या गुणांनी मित्रांना रमविणारा - रामः इति आख्यास्यते - राम ह्या नावाने प्रसिद्ध होईल - बलाधिक्यात् (एनं) - बलाच्या विपुलपणावरून याला - बलं (अपि) (लोकाः) विदुः - बल असेहि लोक जाणतील - उत यदूनां - आणि यादवांच्या - अपृथग्भावात् संकर्षणं उशंति - एकीकरणावरून संकर्षण म्हणतील. ॥१२॥ अनुयुगं तनूः गृह्णतः - प्रत्येक युगांत अवतार घेणार्या - अस्य (द्वितीयस्य पुत्रस्य) - ह्या दुसर्या मुलाचे - शुक्लः रक्तः तथा पीतः (इति) - पांढरा, तांबडा व पिवळा - त्रयः वर्णाः आसन् - असे तीन वर्ण होऊन गेले - (सः) इदानीं कृष्णतां गतः - तो सांप्रत कृष्णवर्णाला गेला आहे. ॥१३॥ अयं तव श्रीमान् आत्मजः प्राक् - हा सर्वगुणसंपन्न असा तुझा पुत्र - क्वचित् - पूर्वी कधी तरी - वसुदेवस्य जातः - वसुदेवाच्या पोटी जन्मला होता - अतः - म्हणून - अभिज्ञाः - तज्ञ पुरुष - (तं) वासुदेवः इति संप्रचक्षते - त्याला वासुदेव असे म्हणतील. ॥१४॥ ते सुतस्य - तुझ्या पुत्राची - गुणकर्मानुरूपाणि - गुण व लीला यांना अनुरूप - बहूनि नामानि रूपाणि च सन्ति - अशी अनेक नावे व रूपे आहेत - तानि अहं नो वेद - ती मी जाणत नाही - जनाः (अपि न विदुः) - व लोकही जाणत नाहीत. ॥१५॥ एषः गोपगोकुलनंदनः - हा गोपांना व गोकुलाला आनंद देणारा - वः श्रेयः आधास्यत् - असा तुमचे कल्याण करील - यूयं अनेन सर्वदुर्गाणि - तुम्ही ह्याच्या योगाने सर्व संकटे - अंजः तरिष्यथ - अनायासे तरून जाल. ॥१६॥ व्रजपते - हे गोकुळपालका नंदा - पुरा अराजके - पूर्वी राजा नसताना - दस्युपीडिताः साधवः - चोरांनी पीडिलेले सज्जन - अनेन रक्ष्यमाणाः - ह्याने रक्षण केलेले - समेधिताः (च) - आणि बलवृद्धि केलेले - दस्यून् जिग्युः - चोरांना जिंकिते झाले. ॥१७॥ ये महाभागाः मानवाः - जे महाभाग्यशाली मनुष्य - एतस्मिन् प्रीतिं कुर्वंति - ह्याच्या ठिकाणी प्रेम करतील - एतान् - त्यांना - असुराः विष्णुपक्षान् इव - जसे दैत्य विष्णुपक्षीयांना त्याप्रमाणे - अरयः न अभिभवन्ति - शत्रू पराभूत करू शकणार नाहीत. ॥१८॥ नंदः - हे नंदा - अयं ते आत्मजः - हा तुझा मुलगा - गुणैः श्रिया - गुणांनी, ऐश्वर्यांनी, - कीर्त्या अनुभावेन (च) - कीर्तीने व पराक्रमाने - नारायणसमः (अस्ति) - नारायणासारखा आहे - तस्मात् समाहितः - त्याकरिता सावध राहून - (एनं) गोपायस्व - तू याचे रक्षण कर. ॥१९॥ इति च आत्मानं - आणि आपल्याला असे सांगून - समादिश्य स्वगृहे गते गर्गे - गर्ग मुनी आपल्या घरी गेला असता - प्रमुदितः नंदः - मोठा आनंदित झालेला नंद - आत्मानं आशिषां - स्वतःला त्या आशीर्वादाने - पूर्णं मेने - कृतकृत्य मानिता झाला. ॥२०॥ कल्पेन व्रजता कालेन - थोडा काळ गेला असता - सहपाणिभ्यां जानुभ्यां - हातांसह गुडघ्यांनी - रिंगमाणौ रामकेशवौ - रांगणारे बलराम व कृष्ण - गोकुले विजह्लतुः - गोकुळात खेळू लागले. ॥२१॥ अङ्घ्रियुग्मं अनुकृष्य - दोन्ही पाय एकामागून एक ओढीत - व्रजकर्दमेषु - गोकुळातील चिखलामध्ये - घोषप्रघोषरुचिरं - कंबरेतील घागर्यांच्या ध्वनीमुळे मनोहर वाटणार्या - सरीसृपन्तौ - वेगाने रांगत जाणारे - तन्नादहृष्टमनसौ तौ - त्या घागर्यांच्या नादाने आनंदित झालेले दोघे - लोकं अनुसृत्य - लोकांच्या मागून जाऊन - मुग्धप्रभीतवत् - बावरल्यासारखे व भ्याल्यासारखे होऊन - मात्रोः अंति उपेयतुः - मातांजवळ येत असत. ॥२२॥ घृणया स्नुवंत्यौ - प्रेमाने पान्हा फुटलेल्या - तन्मातरौ - त्यांच्या माता - पंकाङ्गरागरुचिरौ - चिखलरूपी उटीने सुंदर दिसणार्या - निजसुतौ - आपल्या मुलांना - दोर्भ्यां उपगुह्य - बाहूंनी आलिंगन देऊन - स्तनं दत्वा - त्यांच्या मुखात स्तन देऊन - प्रपिबतोः (तयो) - ते दोघे पीत असता - मुग्धस्मिताल्पदशनं - ज्यात मनोहर हास्य व कोवळे दात आहेत - मुखं निरीक्ष्य - असे त्यांचे मुख पाहून - प्रमोदं ययतुः स्म - अत्यंत आनंदित होत असत. ॥२३॥ यर्हि (तौ) - जेव्हा ते दोघे - अंगनादर्शनीय - स्त्रियांनी पाहण्यास योग्य - कुमारलीलौ (जातौ) - अशी बालक्रीडा करणारे झाले - प्रगृहीतपुच्छैः वत्सैः - वासरांच्या शेपट्या धरून ठेवल्यामुळे - इतस्ततः अनुकृष्यमाणौ - इकडे तिकडे ओढिल्या जाणार्या - उभौ प्रेक्षंत्यः - त्या दोघांना पाहणार्या - अंतव्रज तदबलाः - गोकुळातील त्या गोपस्त्रिया - उज्झितगृहाः - ज्यांनी घरांतील काम टाकिले आहे अशा - हसंत्यः जहृषुः - हसत व आनंदित होत. ॥२४॥ तज्जनन्यौ - त्यांच्या माता - यत्र - जेव्हा - अतिचलौ क्रीडापरौ स्वसुतौ - अतिचपळ व खेळकर अशा आपल्या मुलांना - शृंग्यग्निदंष्ट्र्यसिजलद्विजकंटकेभ्यः निषेद्धुं - शिंगांची जनावरे, दाढांची जनावरे, अग्नी, तरवारीसारखी शस्त्रे, पाणी, पक्षी व काटे यापासून राखण्यासाठी - गृह्याणि कर्तुं अपि न शेकाते - गृहकृत्येही करू शकत नसत - अलं मनसः अनवस्थां - पूर्णरीतीने मनाची धांदल झाली आहे - आपतुः - अशा स्थितीस प्राप्त झाल्या. ॥२५॥ राजर्षे - हे परीक्षित राजा - अल्पेन कालेन - थोडयाच दिवसांनी - गोकुले रामःकृष्णः च - गोकुळात राम व कृष्ण - अघृष्टजानुभिः - ज्यांचे गुडघे घासले जात नाहीत - पद्भिः अंजसा विचक्रमतुः - अशा पायांनी सहज चालू लागले. ॥२६॥ ततः तु सहरामः भगवान कृष्णः - मग तर बळरामासह भगवान कृष्ण - वयस्यैः व्रजबालकैः - सवंगडी अशा गोकुळांतील मुलांसह - व्रजस्त्रीणां मुदं जनयन् - गोकुळातील स्त्रियांना आनंद उत्पन्न करीत - चिक्रीडे - खेळत असे. ॥२७॥ कृष्णस्य रुचिरं - कृष्णाचा सुंदर असा - कौमारचापलं वीक्ष्य - लहानपणाचा चपलपणा पाहून - गोप्यः - गोपी - समागताः - एकत्र जमून - तन्मातुः शृण्वत्याः - त्याची माता यशोदा ऐकत असता - इति ह किल ऊचुः - खरोखर याप्रमाणे बोलत असत. ॥२८॥ क्वचित् असमये - कधी भलत्याच वेळी - वत्सान् मुंचन् - वासरे सोडणारा - क्रोशसंजातहासः सः - रागे भरले असता हसणारा असा तो - स्तेयं स्वादु दधि पयः अत्ति - चोरून मिळविलेले दही व दूध खातो - अथ कल्पितैः स्तेययोगैः - नंतर अनेक प्रकारच्या चोरीच्या युक्त्यांनी - भोक्षन् - खाऊ पाहणारा - मर्कान् विभजति - माकडांना वाटतो - सः न अत्ति चेत् - माकड जर खात नाहीसे झाले तर - भांडं भिनत्ति - भांडे फोडून टाकतो - द्रव्यालाभे - काही पदार्थ सापडले नाहीत तर - सः - तो - गृहकुपितः - घरावर रागावून - तोकान् उपक्रोश्य याति - लहान मुलांना रडवून जातो. ॥२९॥ यर्हि काले गोप्यः गृहकृत्येषु - ज्यावेळी गोपी घरकामात - सुव्यग्रचित्ताः आसन् - अत्यंत गढून गेलेल्या असतात - अंतर्निहितवयुनः - घरात ठेविलेल्या वस्तूंचे ज्ञान आहे ज्याला असा - तद्वित् (कृष्णः) - चोरीच्या युक्त्या जाणणारा कृष्ण - हस्ताग्राह्ये (द्रव्ये) - हातांनी घेण्यासारखे पदार्थ नसल्यास - पीठकोलूखलाद्यैः - पाट, उखळी इत्यादिकांनी - विधिं रचयति - मांडणी करितो - शिक्यभांडेषु छिद्रं (करोति) - शिंक्यावरील भांडयांना भोक पाडतो - ध्वांतागारे - काळोख असलेल्या घरात - धृतमणिगणं - ज्यावर रत्नसमुदाय धारण केले आहेत - स्वांगं - अशा आपल्या शरीरालाच - अर्थप्रदीप्तं (रचयति) - पदार्थ दाखविणारा दिवा करितो. ॥३०॥ उशति वास्तौ - स्वच्छ केलेल्या घरात - मेहनादीनि - मूत्रपुरुषोत्सर्गादि - धाष्टर्यानि कुरुते - दांडगेपणाची कृत्ये करितो - एवं स्तेयोपायैः - याप्रमाणे चोरीच्या उपायांनी - विरचितकृतिः - केली आहेत कामे ज्याने असा - त्वत्समीपे - तुझ्याजवळ मात्र - यथा सुप्रतीकः आस्ते - साधुसारखा असतो - इत्थं सभयनयन - याप्रमाणे श्रीकृष्णाचे बावरलेल्या नेत्रामुळे - श्रीमुखालोकिनीभिः - शोभायुक्त झालेले मुख पाहणार्या - स्त्रीभिः - जिला इतर स्त्रियांनी - व्याख्यातार्था - गार्हाणी सांगितली आहेत - प्रहसितमुखी (अभवत्) - अशी ती यशोदा हसत असे - (कृष्णं तु) उपालब्धुं - परंतु कृष्णाला रागे भरण्याची - न ऐच्छत् - इच्छा करीत नसे. ॥३१॥ एकदा क्रीडमानाः - एके दिवशी खेळत असलेले - ते रामाद्याः गोपदारकाः - ते बळरामादि गोपांचे मुलगे - कृष्णः मृदं भक्षितवान् - कृष्णाने माती खाल्ली - इति मात्रे न्यवेदयन् - असे त्याच्या आईला सांगते झाले. ॥३२॥ हितैषिणी सा यशोदा - कल्याणाची इच्छा करणारी ती यशोदा - कृष्णं करे गृहीत्वा - कृष्णाचा हात धरून - उपालभ्य - रागे भरून - भयसंभ्रांतप्रेक्षणाक्षं - भीतीने ज्याची दृष्टि कावरीबावरी झाली आहे - अभाषत - अशा त्याला म्हणाली. ॥३३॥ अदान्तात्मन् - हे चपलगात्राच्या श्रीकृष्णा - भवान् रहः कस्मात् मृदं भक्षितवान् - तू एकीकडे माती का खाल्लीस - एते तावकाः कुमाराः वदंति - हे तुझे बरोबरीचे मुलगे सांगतात - अयं हि ते अग्रजः अपि (वदति) - शिवाय हा तुझा वडील भाऊहि सांगतो. ॥३४॥ अंब अहं (मृदं) न भक्षितवान् - हे माते, मी माती खाल्ली नाही - सर्वे मिथ्याभिशंसिनः (सन्ति) - सर्वजण खोटे बोलणारे आहेत - यदि (ते) सत्यगिरः (सन्ति) - जर ते खरे सांगणारे असतील - तर्हि समक्षं मे मुखं पश्य - तर प्रत्यक्ष माझे तोंड पहा. ॥३५॥ यदि एवं तर्हि व्यादेहि - जर असे आहे तर आ कर - इति उक्तः सः - याप्रमाणे यशोदेने सांगितलेला तो - अव्याहतैश्वर्यः - अकुंठित ऐश्वर्यवान - क्रीडामनुजबालकः - व लीलेसाठी लहान मनुष्यरूप धारण केलेला - भवान् हरिः व्यादत्त - भगवान श्रीकृष्ण आ करिता झाला. ॥३६॥ सा तत्र - ती यशोदा त्या मुखात - जगत् स्थास्नु विश्वं - जंगम व स्थावर असे विश्व - खं दिशः - आकाश, दाहीदिशा, - साद्रिद्वीपाब्धिभूगोलं - पर्वत, द्वीपे, समुद्र यांसह भूगोल - सवाय्वग्नींदुतारकं - वायु, अग्नि व चंद्र आणि नक्षत्रे यांसह - ज्योतिश्चक्रं जलं तेजः - ज्योतिर्मंडल, जल, तेज - नभस्वान् वियत् - वायु, आकाश, - वैकारिकाणि इंद्रियाणि - विकार उत्पन्न करणारी इंद्रिये, - मनः मात्राः - मन, सूक्ष्मभूते, - त्रयः गुणाःददृशे - आणि तीन गुण पाहती झाली. ॥३७-३८॥ तत् जीवकालस्वभाव - हे जीव, काल, स्वभाव, - कर्माशयलिंगभेदं - कर्म व अंतःकरण अशाप्रकारच्या स्थावरजंगम शरीरांच्या - विचित्रं - निरनिराळ्या भेदांनी भरलेले विचित्र जग - सहात्मानं व्रजं (च) - आणि स्वतःसुद्धा गोकुळ - सूनोः विदारितास्ये - ज्याचे मुख उघडले आहे अशा मुलाच्या - तनौ वीक्ष्य - अशा शरीरात एकत्र पाहून - शंकां अवाप - भीतीप्रत प्राप्त झाली. ॥३९॥ किं एतत् - हे आहे तरी काय ? - स्वप्नः उत देवमाया - हे स्वप्न आहे की देवाची माया आहे - किंवा मदीयः बुद्धिमाहः बत - किंवा माझ्या बुद्धीला खरोखर मोह पडला आहे ? - अथो - अथवा - अमुष्य मम अर्भकस्य एव - ह्या माझ्या मुलाचेच - यः कश्चन - काहीतरी विलक्षण असे - औत्पत्तिकः आत्मयोगः - स्वतःचे जन्मसिद्ध ऐश्वर्य आहे ? ॥४०॥ अथो - आता - चेतोमनःकर्मवचोभिः - ज्ञानशक्ति, विचारशक्ति, कृती व वाणी ह्यांनी - अंजसा यथावत् - सहजरीत्या ज्याविषयी - न वितर्कगोचरं - यथार्थ तर्काने ज्ञान होणे शक्य नाही अशा - (इदं जगत्) यदाश्रयं - हे जग ज्याच्या आधाराने आहे - येन यतः प्रतीयते - व ज्यामुळे भासमान होते - तत् सुदुर्विभाव्यं - त्या ध्यान करण्यास अत्यंत कठीण अशा - पदं प्रणता अस्मि - पदाला मी नमस्कार करिते. ॥४१॥ अहं व्रजेश्वरस्य - मी गोकुळाधिपतीच्या - अखिलवित्तपा सती - सर्व द्रव्याचे रक्षण करणारी त्याची धर्मपत्नी असून - असौ मम पतिः - हा माझा पति - एष मे सुतः - हा माझा मुलगा - सहगोधनाः गोप्यः गोपाः च मे - सर्व गोधनांसह गोपी व गोप माझे आहेत - इत्थं कुमतिः - अशी दुष्ट बुद्धि - यन्मायया (अभवत्) - ज्याच्या मायेने उत्पन्न झाली आहे - सः मे गतिः (अस्ति) - तो परमेश्वरच माझा आश्रय होय.॥४२॥ सः ईश्वरः विभुः - तो सर्वसमर्थ सर्वव्यापक परमेश्वर - इत्थं विदिततत्त्वायां - याप्रमाणे तत्त्वज्ञान प्राप्त झालेल्या - गोपिकायां - यशोदेच्या ठिकाणी - पुत्रस्नेहमयीं - पुत्रप्रेमरूपी - वैष्णवीं मायां - वैष्णवी मायेला - व्यतनोत् - पसरिता झाला. ॥४३॥ सद्यः नष्टस्मृतिः - जिचे तत्त्वज्ञानाचे स्मरण तत्काल नष्ट झाले आहे - सा गोपी - अशी ती यशोदा - आत्मजं आरोहं आरोप्य - मुलाला मांडीवर घेऊन - यथा पुरा (तथैव) प्रवृद्ध - पूर्वीप्रमाणे अतिशय वाढलेल्या - स्नेहकलिलहृदया आसीत् - प्रीतीमुळे जिचे हृदय भरून गेले आहे अशी झाली. ॥४४॥ सा - ती - त्रय्या उपनिषद्भिः - तीन वेद, उपनिषदे, - सांख्ययोगैः सात्वतैः च - सांख्यशास्त्र व भक्तिमार्गी पुरुष यांनी - उपगीयमानमाहात्म्यं हरिं - गाईले जात आहे माहात्म्य ज्याचे अशा त्या परमेश्वराला - आत्मजं अमन्यत् - आपला मुलगा असे मानू लागली. ॥४५॥ ब्रह्मन् - हे शुकाचार्य - नंदः एवं - नंदाने - महोदयं श्रेयः - मोठे फल देणारे - किं अकरोत् - असे कोणते पुण्य केले होते ? - हरिः यस्या स्तनं पपौ - आणि परमेश्वराने जिचे स्तनपान केले - (सा) महाभागा - त्या भाग्यशाली - यशोदा च (किम् श्रेयः अकरोत्) - यशोदेनेही कोणते पुण्य केले होते ? ॥४६॥ पितरौ - खरे आईबाप - कृष्णोदारदारार्भकेहितं - कृष्णाच्या उत्तम बाललीला - न अन्वविंदेतां - पाहू शकले नाहीत - यत् लोकमलापहं - जी लोकांच्या पापाचे निरसन करणारी लीला - कवयः अद्यापि गायंति - ज्ञानी पुरुष अजूनही गातात. ॥४७॥ वसूनां प्रवरः द्रोणः - अष्टवसूंमध्ये श्रेष्ठ असा द्रोण - धरया भार्यया सह - धरा नावाच्या पत्नीसह - ब्रह्मणः आदेशान् - ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे - करिष्यमाणः - पालन करीत असता - तं उवाच ह - ब्रह्मदेवाला म्हणाला. ॥४८॥ भुवि लोके जातयोः नौ - भूलोकात उत्पन्न झालेल्या आम्हाला - महादेवे विश्वेश्वरे _ देवाधिदेव जगदीश्वर - हरौ - अशा श्रीहरीच्या ठिकाणी - परमा भक्तिः स्यात् - श्रेष्ठ भक्ति प्राप्त व्हावी - यया (नरः) अंजःदुर्गतीं तरेत् - ज्यामुळे मनुष्य सहज दुर्गतीला तरून जातो. ॥४९॥ (तथा) अस्तु इति (ब्रह्मणा) उक्तः - तसेच असो असे ब्रह्मदेवाने सांगितलेला - सः महाशयाः भगवान् द्रोणः - तो महाकीर्तिमान ऐश्वर्यसंपन्न वसु द्रोण - व्रजे नंदः इति ख्यातः जज्ञे - गोकुळात नंद ह्या नावाने जन्मास आला - सा धरा यशोदा अभवत् - ती धरा यशोदा झाली. ॥५०॥ भारत - हे परीक्षित राजा - ततः - म्हणून - पुत्रीभूते जनार्दने भगवति - पुत्र झालेल्या जनार्दन भगवंताच्या ठिकाणी - गोपगोपीषु - गोप व गोपींमध्ये - तयोः दंपत्योः भक्तिः नितरां आसीत् - ह्या पतिपत्नीची अत्यंत प्रीती होती. ॥५१॥ विभुः कृष्णः - सर्वसमर्थ कृष्ण - सहरामः - बळरामासह - ब्रह्मणः आदेशं सत्यं कर्तुं - ब्रह्मदेवाचा वर खरा करण्याकरिता - व्रजे वसन् - गोकुळात वास करीत - स्वलीलया तेषां प्रीतिं चक्रे - आपल्या लीलेने त्यांना संतोष देता झाला. ॥५२॥ अध्याय आठवा समाप्त |