श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय २३ वा - अन्वयार्थ

अनू, द्रुह्यू, तुर्वसू आणि यदुच्या वंशाचे वर्णन -

अनोः सभानरः चक्षुः - अनूला सभानर, चक्षु- परोक्षः च त्रयः सुताः - आणि परोक्ष असे तीन मुलगे झाले- सभानरात् कालनरः - सभानरापासून कालनर- तत्सुतः सृंजयः - त्याचा पुत्र सृंजय- ततः जनमेजयः - त्या सृंजयापासून जनमेजय- तस्य पुत्रः महाशीलः - त्याचा पुत्र महाशील- (ततः) महामनाः - त्यापासून महामना- महामनसः आत्मजौ उशीनरः तितिक्षुः च - त्या महामनाचे पुत्र उशीनर आणि तितिक्षु. ॥१-२॥

शिबि वनः शमिः दक्षः - शिबि, वन, शमि व दक्ष- चत्वारः उशीनरात्मजाः - हे चार उशीनराचे मुलगे- वृषादर्भः सुवीरः मुद्रः कैकेयः च - वृषादर्भ, सुवीर, मद्र आणि कैकेय- (इति) शिबेः चत्वार एव आत्मजाः (आसन्) - असे शिबीचे चारच पुत्र होते- तितिक्षोः च रूशद्रथः - आणि तितिक्षूचा रुशद्रथ हा मुलगा होय- ततः हेमः - त्यापासून हेम- अथ सुतपाः - नंतर सुतपा- सुतपसः बलिः अभवत् - सुतपापासून बलि झाला. ॥३-४॥

दीर्घतमसः महीक्षितः बलेः क्षेत्रे - दीर्घतमसापासून बलीराजाच्या पत्नीच्या ठिकाणी- अङ्गवङ्गकलिङ्गाद्याः - अंग, वंग, व कलिंग इत्यादि- सुह्मपुड्रांध्रसंज्ञिताः (पुत्राः) जज्ञिरे - सुह्म, पुंड्र व अंध्र ह्या संज्ञा असलेले पुत्र झाले. ॥५॥

ते षट् इमान् प्राच्यकान् विषयान् - ते सहा ह्या पूर्वेकडील देशांना- स्वनाम्ना चक्रुः - आपल्या नावांनी प्रसिद्ध करिते झाले- अंगतः खनपानः - अंगापासून खनपान- तस्मात् दिविरथः जज्ञे - त्यापासून दिविरथ जन्मला- ततः धर्मरथः - त्या दिविरथापासून धर्मरथ- यस्य सुतः अप्रजाः चित्ररथ जज्ञे - ज्याचा पुत्र निपुत्रिक असा चित्ररथ उत्पन्न झाला- (सः) रोमपाद इति ख्यातः - तो रोमपाद नावाने प्रसिद्ध झाला- (तस्य) सखा दशरथः - त्याचा मित्र दशरथ- तस्मै स्वः कन्यां शान्तां प्रायच्छत् - त्याला आपली शांती नावाची कन्या देता झाला- तां ऋष्यशृङ्गः उवाह - तिच्याशी ऋष्यशृंगाने विवाह लाविला- देवे अवर्षति - इंद्र वृष्टि करीनासा झाला असता- रामाः यं हरिणीसुतं - वारांगनांनी ज्या हरिणीपुत्र ऋष्यशृंगाला- नाटयसंगीतवादित्रैः - नृत्य, गायन, वाद्य,- विभ्रमालिङगनार्हणैः आनिन्युः - अभिनय, आलिंगन व सेवा यांनी मोहित करून आणिले- अनपत्यस्य राज्ञः मरुत्वतः इष्टिं निरूप्य - निपुत्रिक अशा रोमपादाला पुत्रकामेष्टि सांगून- सः प्रजां अदात् - तो संतान देता झाला- येन अप्रजाः दशरथः प्रजाः लेभे - ज्यामुळे निपुत्रिक दशरथ संतति मिळविता झाला- रोमपादात् चतुरंगः - रोमपादापासून चतुरंग- तत्सुतः तु पृथुलाक्षः - त्याचा पुत्र पृथुलाक्ष. ॥६-१०॥

बृहद्रथः बृहत्कर्मा - बृहद्रथ, बृहत्कर्मा- बृहद्भानुः च तत्सुताः - आणि बृहद्भानु हे त्या पृथुलाक्षाचे मुलगे- आद्यात् बृहन्मनाः - पहिल्या बृहद्रथापासून बृहन्मना झाला- तस्मात् जयद्रथः उदाहृतः - त्यापासून जयद्रथ सांगितला आहे. ॥११॥

तस्य संभूत्यां विजयः - त्या जयद्रथाच्या संभूतीच्या ठिकाणी विजय- ततः धृतिः अजायत - त्यापासून धृति झाला- ततः धृतव्रतः - त्यापासून धृतव्रत- तस्य सत्कर्मा - त्याचा सत्कर्मा- ततः अधिरथः - त्यापासून अधिरथ. ॥१२॥

यः असौ अनपत्यः - जो हा निपुत्रिक अधिरथ- गंगातटे क्रीडन् - गंगेच्या काठी क्रीडा करीत असता- कुन्त्या कानीनं - कुंतीने कन्यावस्थेत झालेला- मञ्जूषान्तर्गतं अपविद्धं शिशु - व पेटीत घालून गंगेत सोडिलेला जो बालक त्याला- सुतं अकरोत् - आपला पुत्र करिता झाला. ॥१३॥

तस्य जगतीपतेः कर्णस्य सुतः वृषसेन - त्या पृथ्वीपति कर्णाचा पुत्र वृषसेन- द्रुह्योः च तनयः बभ्रुः - आणि द्रह्युचा पुत्र बभ्रु- तस्य आत्मजः सेतुः - त्याचा पुत्र सेतु- ततः आरब्धः - त्यापासून आरब्ध- तस्य गान्धारः - त्याचा गांधार- तस्य धर्मसुतः धृतः - त्या गांधाराचा पुत्र धर्म व धर्माचा पुत्र धृत- धृतस्य दुर्मनाः - धृताचा दुर्मना- तस्मात् प्रचेताः - त्यापासून प्रचेता- (ततः) प्राचेतसं शतं - त्या प्रचेत्यापासून शंभर पुत्र झाले. ॥१४-१५॥

उदीचीं दिशं आश्रिताः - उत्तर दिशेचा आश्रय करणारे- (ते) म्लेच्छाधिपतयः अभूवन् - ते प्राचेतस म्लेच्छांचे अधिपति झाले- तुर्वसोः च सुतः वह्निः - तुर्वसुचा पुत्र वह्नि- वह्नेः भर्गः - वह्नीचा पुत्र भर्ग- अथ भानुमान् - त्यानंतर भानुमान. ॥१६॥

तत्सुतः त्रिभानुः - त्याचा पुत्र त्रिभानु- अस्य अपि उदारधीः करंधमः - ह्याचाही पुत्र बुद्धिमान करंधम- तत्सुतः मरुतः - त्याचा पुत्र मरुत- (सः) अपुत्रः - तो मरुत निपुत्रिक असल्यामुळे- पौरवं अन्वभूत् - पुरुकुलातील दुष्यंताला पुत्राप्रमाणे मानिता झाला. ॥१७॥

राज्यकामुकः - राज्याची इच्छा करणारा- सः दुष्यन्तः - तो दुष्यंत- पुनः स्ववंशं भेजे - पुनः आपल्या पुरुवंशाला स्वीकारिता झाला- हे नरर्षभ - हे राजा- ययातेः ज्येष्ठपुत्रस्य यदोः - ययातीचा वडीलपुत्र जो यदु त्याचा- महापुण्यं नृणां - अत्यंत पुण्यकारक व मनुष्यांच्या- सर्वपापहरं वशं वर्णयामि - सर्व पापांचा नाश करणारा वंश, त्याचे वर्णन करितो- नरः यदोः वंशं श्रुत्वा - मनुष्य यदुवंशाला श्रवण करून- सर्वपापैः प्रमुच्यते - सर्व पापांपासून मुक्त होतो. ॥१८-१९॥

यत्र भगवान् परमात्मा - जेथे षड्‌गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वर- नराकृतिः अवतीर्णः - मनुष्यरूप घेऊन अवतार घेता झाला- यदोः सहस्रजित् क्रोष्टाः अनलः - यदूचे सहस्रजित, क्रोष्टा, अनल- रिपुः इति श्रुताः चत्वारः सूनवः - व रिपु ह्या नावाचे प्रसिद्ध चार मुलगे होते- तत्र प्रथमात्मजः शतजित - त्यापैकी सहस्रजिताचा मुलगा शतजित- महाहयः वेणुहयः हैहयः चः इति तत्सुताः - महाहय, वेणुहय आणि हैहय असे त्या शतजिताचे मुलगे होत- हैहयसुतः धर्मः - हैहयाचा पुत्र धर्म- ततः कुंतेः पिता नेत्रः - त्या धर्मापासून कुंतीचा पिता जो नेत्र तो झाला- कुंतेः सोहंजिः अभवत् - कुंतीपासून सोहंजि झाला- (ततः) महिष्मन् (ततः) भद्रसेनकः - त्यापासून महिष्मान व त्यापासून भद्रसेनक. ॥२०-२२॥

भद्रसेनस्य दुर्मदः कृतवीर्यसूः धनकः (च) - भद्रसेनाला दुर्मद आणि कृतवीर्याला उत्पन्न करणारा धनक- कृताग्निः कृतवर्मा च कृतौजाः धनकात्मजाः - कृताग्नि, कृतवर्मा आणि कृतौजा हे धनकाचे पुत्र. ॥२३॥

कृतवीर्यस्य अर्जुनः सप्तद्वीपेश्वरः अभवत् - कृतवीर्याचा पुत्र अर्जुन सात द्वीपांचा राजा झाला- (सः) हरेः अंशात् दत्तात्रयात् - तो भगवंताचा अवतार जो दत्तात्रेय त्यापासून- प्राप्तयोगमहागुणः - योगसिद्धी प्राप्त झाली आहे ज्याला असा होता. ॥२४॥

पार्थिवाः (राजे) यज्ञदानतपोयोगश्रुतवीर्यजयादिभिः - यज्ञ, दान, तप, योग, वेदशास्त्राध्ययन पराक्रम व विजय इत्यादिकांनी- कार्तवीर्यस्य गतिं नूनं यास्यन्ति - कृतवीर्यपुत्र जो अर्जुन त्याच्या योग्यतेला खरोखर जाणार नाहीत. ॥२५॥

अव्याहतबलः - ज्याचे सामर्थ्य खंडित झाले नाही असा- (सः) अनष्टवित्तस्मरणः - ज्याच्या स्मरणाने नष्ट झालेले द्रव्य पुनः प्राप्त होते असा तो कार्तवीर्य अर्जुन- पंचाशीतिसहस्राणि समाः - पंचाऐंशी हजार वर्षे- अक्षय्यषड्‌वसु बुभुजे - सहा इंद्रियांना नेहमी भोगता येणारे विषय सेविता झाला. ॥२६॥

मृधे तस्य पुत्रसहस्रेषु - युद्धात त्याच्या हजार पुत्रांपैकी- जयध्वजः शूरसेनः वृषभः मधुः ऊर्जितः (इति) - जयध्वज, शूरसेन, वृषभ, मधु व ऊर्जित असे- पंच एव उर्वरिताः - पाचच पुत्र राहिले. ॥२७॥

जयध्वजात् तालजङघः - जयध्वजापासून तालजंघ- तस्य तु पुत्रशतं अभूत् - त्या तालजंघाला तर शंभर पुत्र झाले- यत् तालजंघाख्यं क्षत्रं - ते तालजंघ नावाचे क्षत्रिय- ततः और्वतेजोपसंहृतम् - नंतर और्वाच्या तेजाने नष्ट झाले. ॥२८॥

तेषां ज्येष्ठः वीतिहोत्रः - त्यापैकी वडील पुत्र वीतिहोत्र- मधोः पुत्रः वृष्णिः स्मृतः - मधूचा पुत्र वृष्णि होय- तस्य तु पुत्रशतं आसीत् - त्या वृष्णिला तर शंभर पुत्र झाले- यतः (तत्) कुलं वृष्णिज्येष्ठम् - ज्यामुळे ज्या कुळाला वृष्णिज्येष्ठकुल म्हणजे वृष्णिकुल असे म्हणतात. ॥२९॥

राजन् - हे परीक्षित राजा- (ते) माधवा वृष्णयः च यादवाः - ते शंभर पुत्र माधव, वृष्णि व यादव- इतिसंज्ञिताः - अशा नावाचे आहेत- यदुपुत्रस्य क्रोष्टोः च पुत्रः वृजिनवान - आणि यदुपुत्र जो क्रोष्टा त्याचा पुत्र वृजिनवान- ततः श्वाहिः - त्यापासून श्वाहि- ततः रुशेकुः - त्यापासून रुशेकु- तस्य वै चित्ररथः - त्याचाच चित्ररथ- ततः शशबिंदुः - त्यापासून शशबिंदु- (ततः) महायोगी महान् - त्यापासून मोठा योगी- महाभोजः अभूत् - व मोठा ऐश्वर्यसंपन्न असा महाभोज झाला. ॥३०-३१॥

(अयं) चक्रवर्तीं - हा महाभोज सार्वभौ‌म राजा असून- चतुर्दशमहारत्नः - ह्याजवळ मोठी चौदा रत्ने होती;- अपराजितः - आणि ह्याला कोणी जिंकू शकत नसे.- तस्य - त्या महाभोजाच्या- दशानां पत्नीसहस्राणां - दहा हजार स्त्रियांमध्ये- प्रत्येकं लक्षम् इति - प्रत्येकीच्या ठिकाणी एक लक्ष याप्रमाणे- सः महायशाः - तो महाकीर्तिमान- तासु पुत्राणां दहलक्षसहस्राणि अजीजनत् - त्यांच्या ठिकाणी शंभर कोटी मुलगे उत्पन्न करिता झाला- तेषां षट्‍प्रधानानां - त्यांमध्ये सहा पुत्र ज्येष्ठ असून- (पृथुश्रवाः ज्येष्ठः) - ह्या सहांमध्ये पृथुश्रवा हा ज्येष्ठ होता- पृथुश्रवसः धर्मः नाम आत्मजः - पृथुश्रवाला धर्म नावाचा पुत्र झाला- तस्य हयमेधशतस्ययाट् - त्या धर्माला शंभर अश्वमेघ यज्ञ करणारा- उशनाः - उशना नामक पुत्र झाला- तत्सुतः रुचकः - त्याचा पुत्र रुचक- तस्य पंच आत्मजाः आसन् - त्या रुचकाला पाच मुलगे झाले- (तान्) शृणु - त्यांची नावे ऐक. ॥३२-३४॥

(ते) पुरुजिद्रुक्मरुक्मेषुपृथुज्यामधसंज्ञिताः - ते पुरुजित, रुक्म, रुक्मेषु, पृथु व ज्यामध अशा नावाचे होते- अप्रजाः अपि - निपुत्रिक असूनही- ज्यामधः तु शैब्यापतिः - ज्यामध तर शैब्येचा पति असून- भयात् अन्यां भार्यां न अविन्दत् - तिच्या भीतीने दुसरी स्त्री मिळविता झाला नाही- (सः) शत्रुभवनात् भोज्यां - तो शत्रूपासून भोज्या नावाची- कन्यां अहारषीत् - कन्या हिरावून आणिता झाला- शैब्या रथस्थां तां निरीक्ष्य - शैब्या रथात बसलेल्या भोज्येला पाहताच- अमर्षिता पतिं आह - क्रुद्ध झालेली पतीला म्हणाली. ॥३५-३६॥

कुहक - हे कपटया- का इयं मत्स्थानं रथं आरोपिता - कोण ही माझ्या जागी रथात बसविली आहे- इति वै - असे म्हणाली- स्नुषा तव इति अभिहिते - ही तुझी सून असे त्याने म्हटले असता- स्मयंती पतिं अब्रवीत् - स्मित हास्य करीत ती पतीला म्हणाली. ॥३७॥

अहं वंध्या - मी वंध्या- च असपत्नी - आणि जिला सवत नाही अशी आहे- मे स्नुषा कथं युज्यते - मला सून कशी जुळेल- राज्ञि - हे राणी- यं जनयिष्यसि - तुला जो पुत्र होईल- तस्य इयं उपयुज्यते - त्याला ही योग्य होईल. ॥३८॥

विश्वेदेवाः पितरः च एव - विश्वदेवे आणि पितरसुद्धा- तत् अन्वमोदंत - त्याला अनुमोदन देते झाले- शैब्या गर्भं अधात् - शैब्या गर्भ धारण करिती झाली- काले शुभं कुमारं सुषुवे - योग्यवेळी चांगला पुत्र प्रसवली- सः विदर्भः इति प्रोक्तः - तो विदर्भ नावाने प्रसिद्ध झाला- (सः) सतीं स्नुषां उपमेये - तो विदर्भ पित्याने ठरविलेल्या त्या साध्वी अशा सुनेबरोबर विवाह लाविता झाला. ॥३९॥

नवमः स्कन्धः - अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP